जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम...

आज मधल्या खोलीतलं कपाट आवरायला काढलं. जुनी पुस्तकं, मासिकं, मी काहीबाही खरडलेल्या वह्या, वर्तमानपत्रांतली, मासिकांतली आवडलेली कात्रणं लावलेल्या फायली.. कितीतरी महिने.. कदाचित बहुधा वर्षंच झाली असतील, हे कपाट मुळापासून आवरल्याला. बैठकीच्या खोलीतल्या, काचेचं दार असलेल्या कपाटात सहसा नवीन आणलेली, खूप आवडणारी वगैरे गटातली पुस्तकं मी ठेवते. मग जागा कमी पडायला लागली की, काही पुस्तकांची रवानगी या मधल्या खोलीतल्या कपाटात होते. कधीतली मला आवराआवरीचा उत्साह असतो तेव्हा वरवर आवरते हे कपाट. पण गेल्या महिन्यात माझं तसं मोठं आजारपण झालं, तसं मनात हे सगळंच आवरतं घ्यायचे विचार घोळतायत. तशी आता मी एकदम ठणठणीत आहे, डॉक्टरांनी मला मी एकदम फिट असल्याचं सर्टिफिकेट दिलंय.. पण मन वेडं आहे त्याला कोण काय करणार? असं वाटतं, सगळं नीटनेटकं आवरून ठेवावं, नकोसं ते टाकून द्यावं, कुणाला काही द्यायचं असेल तेही देऊन टाकावं एकदाचं.. मग कधीही गेले तरी हरकत नाही.

एकेक एकेक करत गठ्ठे बाहेर काढले. जमिनीवर ठेवले. बसल्या बसल्या पुस्तकं चाळू लागले. काही पुस्तकं जीर्ण झालेली, पिवळी झालेली पानं, काहींची मुखपृष्ठं फाटून गेलेली, काहींना घातलेली वर्तमानपत्राची कव्हरं.. आणि प्रत्येक पुस्तकावर निळ्या शाईपेनानं मी लिहिलेलं माझं नाव.. सौ. वासंती सदानंद कुलकर्णी. डावीकडे झुकणारं माझं तिरकं अक्षर. असं अक्षर असणारी माणसं म्हणे भूतकाळात रमणारी असतात. त्यांना त्या आठवणी आठवत बसायला आवडतं. असं म्हणणारा माणूस मला भेटला असता, तर त्याला माझा भूतकाळ ऐकवला असता आणि विचारलं असतं, बाबा रे, आहे का या आठवणींत काही रम्य, सतत आठवायला आवडेलसं? मग माझ्या अक्षरावरून असा अंदाज कुणी बांधला तर तो चुकीचा आहे की नाही?

किती वेळ गेला माहीत नाही. दुपारचं जेवण झाल्यावर आवरायला बसले होते. आत्ता मघाशी चार टोले पडले बहुधा घड्याळात. वेळाचं भान राहिलंच नाही आज! कधीतरी आधी या कपाटात रवानगी झालेली पुस्तकं खूप काळानंतर पुन्हा बघताना छान वाटतंय, जुने सुहृद भेटल्याची भावना मनात येतेय.. काही महागाची पुस्तकं घेताना कशी नि किती महिने काटकसर केली होती, कसे थोडे थोडे पैसे बाजूला काढून साठवले होते ते आठवताना मजा वाटतेय. अरेच्चा, तिरक्या अक्षराचा परिणाम का काय हा?

चहाची तलफ आली म्हणून आवराआवर जरा बाजूला सारून उठले. समोर एक जुनं 'वाङ्मयशोभा' मासिक पडलं होतं. चहाबरोबर वाचायला होईल, म्हणून ते उचलून घेतलं. स्वयंपाकघरात जाऊन आधी मागच्या अंगणाकडची खिडकी उघडली. मार्चातले दिवस आहेत हे! घरामागच्या माळावरचं गवत पिवळं झालंय आता. अजून आठवड्याभराने हळूहळू उन्हं वाढायला लागतील. मग नुसत्या झळा येतात खिडकीतून गरम हवेच्या! आत्ता खिडकीतून वार्‍याची मंद झुळूक आत आली. जीव सुखावला. एकीकडे चहा टाकला, डब्यातून दोन खारी बशीत काढून ती खिडकीपाशी ठेवली. डायनिंग टेबलापासची एक खुर्ची ओढून खिडकीपाशी आणली. सगळा सरंजाम कसा झक्क मनासारखा जमला. चहाचा कप घेऊन आरामात खिडकीपाशी मासिक घेऊन बसले.

'... हिचं केशवपन करू नका. मला भवितव्य स्पष्ट दिसत आहे. हिचा पती माघारी येत आहे.' वाचत असलेल्या गोष्टीतल्या या वाक्यापाशी नकळत थबकले. जुन्या काळात घडणारी गोष्ट! पोरवयात लग्न करून सासरी आलेली मुलगी आणि संसारात, घरादारात रस नसल्यानं परागंदा झालेला पती. सात वर्षं थांबूनही तिचा पती न मिळाल्यानं तिला विधवा ठरवून तिचं केशवपन करू पाहणारे तिचे सासरचे लोक! आणि घाटावरच्या एका संन्याशानं त्यांना सांगणं... 'हिचा पती परत येत आहे.' तो संन्यासीच तिचा पती असल्याचं पुढे समजणं, आपल्या रुपवान पत्नीच्या प्रेमापायी त्यानं परत येणं, पुन्हा गरोदर अवस्थेत तिला सोडून निघून जाणं आणि या सगळ्याला कंटाळून ती आत्महत्या करायला जात असताना नेमकं परतून तिच्यासमवेत घरी येणं.. वळणावळणानं कथा पुढे सरकत गेली. शेवट गोड झाला. कथेत बरेचदा होतो तसा! वर्षानुवर्षं दूर गेलेली, नाहीशी झालेली माणसं अचूक वेळेला समोर येऊन उभी ठाकतात. इतकी वर्षं लोक तितक्याच उत्कंठेनं त्यांची वाट बघत राहतात, त्यांच्या परतून येण्यानं लोकांना आनंदच होतो, पुनर्भेटीतही रागवारागवीऐवजी प्रेमाश्रू बरसतात. सगळं कसं गोड, नेटकं, वास्तवापासून शेकडो मैल दूर असलेलं!

.. टेलिफोन वाजला. गेला अर्धातास तरी ते मासिक नुसतं हातात धरून मी बाहेर दूरवर बघत बसले होते. टेलिफोनाच्या आवाजानं तंद्री भंगली. अनंताचा फोन असणार! उद्या रविवार. दर रविवारी अकरा-सव्वाअकराच्या सुमारास त्याची चक्कर ठरलेली. सोबत डबा घेऊन येतो. उज्ज्वला भरपूर काहीकाही भरून देते. नेहमी एखादा गोडाचा पदार्थ असतोच. अनंताला मी बरेचदा 'डबा आणू नकोस; त्याची गरज नाही, मला एकटीला एवढं जात नाही' वगैरे बोलून पाहिलंय. तो ऐकत नाहीच. उतारवयात मी त्याच्याकडे किंवा दत्ताकडे न राहता एकटी, या घरी राहते, ह्यामुळे समाज आपल्याला काय म्हणेल, याची आधीच त्यांना धास्ती आहे. त्यामुळे ह्या साप्ताहिक भेटींचा खटाटोप दोघं न चुकता करतात. दत्ताचा स्वतःचा व्यवसाय आहे, म्हणून तो जमेल तशी चक्कर आठवड्यातून एकदा टाकतो. घरून आला असेल तर त्याच्याकडेही प्रमिलेनं दिलेला मोठ्ठाच्या मोठ्ठा डबा असतोच. खरंतर बर्‍यापैकी औपचारिक झालेल्या या भेटींचा मला खूप कंटाळा येतो. तेच तेच विषय, त्याच त्याच गप्पा! तब्येत नीट आहे ना, औषधं घेतेस ना.. मधूनच कधीतरी 'माझ्याकडे किंवा दत्ताकडेच राहा ना आता..' समाज काय म्हणेल, लोकांना काय वाटेल, अमकाढमका काय बोलेल, वगैरे बाबींचं यांना भलतंच भय. आपलं कर्तव्य आपण चोख पार पाडतोय हे जगाला दाखवून देण्याची जबर इच्छा! सगळे चांगले आहेत, कर्तव्याला चुकणारे नाहीत, पण मला कुणाकडेच करमत नाही, त्याला मी काय करू? कधीतरी जाते, चार दिवस पाहुण्यासारखी राहते, नातवंडांसोबत वेळ मस्त जातो, तेवढं मला पुरतं. पण या दोघांना उमजत नाही. आजारपणानंतर एकदा दोघांनी फारच धोशा लावला तेव्हा नकळत तोंडून निघून गेलं, "काय समाज अन् लोकांचं कौतुक लावलंय तुम्ही दोघांनी? काही म्हणत नाही समाज कुणाला.. कुणी जाब विचारायला येत नाही कुणालाच.. अरे, पस्तीस वर्षांपूर्वीच्या काळातही सदानंद महादेव कुलकर्ण्यांना वाटलं नाही भय समाजाचं, आपल्याला सोडून जाताना.. तर आता.." बोलताबोलता थबकले. किती वर्षांनंतर ह्यांचा उल्लेख तोंडून निघाला. तोही कुणा तिर्‍हाइताबद्दल असावा असा! अनंता, दत्ता गप्पच झाले होते ते ऐकून! बोलणं मग तसंच अर्ध्यावर तुटलं त्यादिवशी.

'वासंती, मला क्षमा कर. इथून निघून जात आहे, कारण इथे आता करमत नाही. माझ्या अंगी कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. बाहेरच्या देशात तिला किंमत आहे. गेल्या महिन्यात हमीदभाईंशी खूप बोलणे झाले मलायाबद्दल. केवढे काय काय सांगत होते. व्यापाराच्या कितीतरी संधी आहेत. कष्ट करणार्‍याला भरभरून मिळेल, म्हणाले. रेशमी कापड, मसाले, रबर.. कितीतरी उद्योग आहेत करण्यासारखे. परत अफाट पैसा मिळेल. पंधरा दिवसांपूर्वी आपण याबद्दल बोललो. पण तू नाहीच म्हणालीस. मग मीही तो विचार बाजूला सारायचा फार प्रयास केला. जमत नाही. शेवटी गेल्या आठवड्यात हमीदभाईंशी बोललो. कागदपत्रे वगैरे सगळे पाहतो, म्हणाले. त्यांचा केवढातरी उद्योग आहे तिथे!

माझ्या अशा अचानक जाण्याने तिन्ही मुलांची जबाबदारी तुझ्या एकटीवर येऊन पडणार, याचे मात्र वाईट नक्कीच वाटत आहे. तू काहीतरी मार्ग काढशीलच. इथे राहिलीस तर बरे! या पत्त्यावर पत्र वगैरे पाठवता येईल. पुढेमागे जम चांगला बसला आणि तू तयार असलीस तर तुम्हां सर्वांना मी मलायात नेईन. स्वतःला, मुलांना सांभाळ. - सदानंद.'

दागिन्यांच्या लॉकरात एका जुन्या, निळ्या मखमली पेटीत त्यांचं हे पत्र मी अजूनही ठेवलं आहे. ते निघून गेल्यानंतरच्या दीड-दोन वर्षांच्या काळात सारखंसारखं वाचून ते पाठच झालंय माझं. पण ते फाडायचा, टाकून द्यायचा धीर अजूनही होत नाही. हा दुबळेपणा म्हणावा की काय माझ्या मनाचा? एक हताश सुस्कारा सोडून मी तशीच खिडकीत बसून राहिले.

'त्याच्या पायावर चक्रच आहे मुली. तो काही स्थिर राहायचा नाही एके ठिकाणी. तुझं वय लहान, तुझ्या मनातली भीती मला कळते. पण माझंही ऐकणार्‍यातला नाही तो.' अण्णा बोलत होते. थकल्या आवाजात. डोळे मिटून, तक्क्याला रेलून बसले होते. सरत्या हिवाळ्यातली नाशकातली ती एक संध्याकाळ. आम्हांला नाशकात येऊन चारेक महिने झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही दोघे इतका दीर्घकाळ नाशकात, माझ्या सासरी राहिलो असू. अनंता पोटात होता तेव्हाची गोष्ट. माझ्या आईला संधिवातानं गाठलं होतं. तिच्याच्यानं काही होत नव्हतं. दोघे भाऊ लहान! दोघांचीही लग्नं झालेली नव्हती. बाळंतपणाला घरी जायचं तर करणारं कुणी नाही. तेव्हा सासूबाईंनी आम्हांला नाशकात बोलावून घेतलं. तेव्हा हे नि मी कलकत्त्यात होतो. पन्नाशीच्या दशकातला तो काळ. स्वातंत्र्य, फाळणी या गोष्टींना तीन-चार वर्षं झालेली. कलकत्त्यात तेव्हा ज्यूट, लेदर, कागद वगैरे उद्योग होते. हे ४३-४४ सालीच एका परिचितांच्या मदतीनं तिथं व्यवसायात हातपाय मारायला गेले होते. कमाईही चांगली होत होती. बाकी कुटुंब नाशकात होतं. हे एकुलते एक! आईबाबा यात्रेला नाशकात गेले होते तेव्हा एका परिचितांकडून यांच्या कुटुंबाबद्दल, यांच्याबद्दल कळलं. पसंती झाली. सेहेचाळीस साली आमचं लग्न झालं. माझं वय सोळा वर्षांचं! हे फार मोठे नव्हते. बावीस वर्षांचे होते. अंगात धडपड भरपूर. नवीन नवीन गोष्टी शिकणं, अनेक उद्योग करून बघणं, नवीन शहरं बघणं, असं सगळं त्यांना आवडायचं. मी तर लग्न होईपर्यंत सांगलीतून बाहेरदेखील पडले नव्हते. यांच्याबरोबरीनं एकदम कलकत्त्यासारख्या ठिकाणी आल्यावर मी खूप गोंधळून, भिऊन गेले. भाषा येत नव्हती. आजूबाजूला अगदी वेगळीच माणसं दिसत. नाशकात सासरी परत जावं असं खूप वाटे. पण ह्यांना कसं सांगणार? सुरुवातीला खूप रडू येई. मग हळूहळू सावरले. थोडं तिथं मन रमायला लागलं, भवतालाशी जुळवून घ्यायला लागले. तर फाळणीचं प्रकरण सुरू झालं. हे मात्र त्या सगळ्या भयंकर प्रलयातही बर्‍यापैकी स्थिर होते. 'जे इतरांचं होईल, ते आपलंही होईल गं. भितेस कशाला?' म्हणायचे. मी आपली रोज देवापुढे बसून आठवतील ती स्तोत्रं म्हणायचे, जप करत बसायचे. मध्ये काही महिने आसपासच्या भागात लपून काढले, पण यांनी काही नाशकात परतायचं नाव काढलं नाही. 'सगळीकडे थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती असणार गं. आपला लहानसा का होईना, उद्योग आहे इथं. तो असाच का सोडून द्यायचा?' हे वाक्य तर ठरलेलं. 'काही म्हणता काही झालं तर काय उपयोग त्या उद्योगाचा?' असं बोलायचं हजारदा मनात येई, पण जीभ रेटायची नाही. दैव बलवत्तर म्हणून वाचलो सगळ्यातून. काळ पुढे जात राहिला. पन्नास साली अनंताची चाहूल लागली तसा मी इकडे परतायचा धोशाच लावला. बंगालच्या फाळणीनं कलकत्त्यातल्या लहानमोठ्या उद्योगांवर परिणाम झालाच होता. त्यामुळे यांचंही मन कलकत्त्यात लागेनासं झालं होतं. तिथली आवरासावर करून आम्ही नाशकात परतलो.

एक्कावन्न सालाच्या सुरुवातीला अनंता झाला. मग पंचावन्न सालच्या सुरुवातीला दत्ता आणि विजया ही जुळी दोघंजणं. ह्यांनी बावन्न साली नाशकातल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये काही काळ नोकरी केली. पण त्यांचा जीव नोकरीत अजिबात रमला नाही. मग द्राक्षमळा विकत घेऊन, द्राक्षांचं उत्पादन सुरू केलं. अंगातल्या कौशल्यानं त्यातही चटकन जम बसवला. मी आता काहीशी निर्धास्त झाले होते. ह्यांनी पुन्हा कलकत्त्याला जायचा विषय ही दोनतीन वर्षं अजिबात काढला नव्हता. पण चोपन्न-पंचावन्न सालांत आजारपणांनी अण्णा-सासूबाई पाठोपाठ गेले. ह्यांना नाशकाशी बांधून ठेवणारा हा धागा नाहीसा झाला, तेव्हा यांच्या मनानं पुन्हा बाहेर पडायला उचल खाल्ली.

"पुन्हा कलकत्ता?" मी धास्तावून विचारलं.

"नाही, यावेळी इतक्या लांब नाही जात आपण. सुरतेस जातोय. तिकडं रेशमी कापडाचा, जरीकामाचा मोठा उद्योग आहे, कापडगिरण्या आहेत. तिकडं जायचं आता.."

नवं गाव, नवा प्रांत, नवी भाषा. कलकत्त्याच्या अनुभवामुळे आता फारसं काही वाटलं नाही. आजूबाजूच्यांनीही आम्हांला लगेच आपलंसं केलं. ह्यांच्या मदतीनं बरोबरीनं मीही भाषा शिकले. अनंताची शाळा सुरू झाली. पोरं हळूहळू तिकडे रमू लागली. आमचा व्यवसायही चांगला चालू लागला. आजूबाजूच्या बायकांकडून मी त्यांच्या पद्धतीची वाळवणं, लोणची शिकू लागले. माझा वेळ मजेत जाऊ लागला. ह्यांनी अनंताला घरच्याघरी इंग्रजी शिकवायचं मनावर घेतलं. त्याच्याबरोबरीनं मीही हौसेनं पाटी हाती घेतली. इंग्रजी शिकण्यात गोडी वाटू लागली. हीच भाषा पुढे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे, हे तेव्हा कुठं माहीत होतं!

बासष्ट सालची गोष्ट. तब्बल दहाएक वर्षांनंतर हमीदभाईंचं कुटुंब भारतभेटीसाठी आलं होतं. ह्यांच्या नेहमीच्या मित्रमंडळींमध्ये हमीदभाईंना ओळखणारे बरेच होते. मग यांचीही ओळख झाली त्यांच्याशी. हमीदभाईंचा मलायात कापडाचा व्यापार होता, खेरीज काही कुटुंबीय रबराचे मळे, मसाल्यांचा व्यापार वगैरे करत होते. ह्यांनी त्यांच्याशी व्यवसायासंदर्भानं भरपूर चर्चा केली. यांनी नाशकातून इकडं येऊन बसवलेला जम, आधीचं कलकत्त्यातलं काम वगैरे गोष्टींचं हमीदभाईंना खूप कौतुक वाटलं. त्याच चर्चांमधून कधीतरी यांच्या मनात मलायात जायचा विचार पक्का होत गेला. मला बोलून दाखवला तेव्हा मात्र पहिल्यांदाच आमच्यात मोठं भांडण झालं. कलकत्ता, नाशिक, सुरत.. कुठल्यातरी एका ठिकाणी चांगला जम बसतोय असं वाटलं, चारसहा वर्षं निवांत गेली की, यांच्या सगळं आवरून नवीन ठिकाणी निघण्याच्या सवयीचा मला आता वीट आला होता. सुरतेत काही कमी होतं, अशातलाही भाग नव्हता. तरीही ही घडी मोडून मलायात जायला हे अगदी आतुर झाले होते.

"असे कुठवर गावं, शहरं, देश बदलत राहणार आपण? तिथं गेलो की, चारसहा वर्षांनी कुणीतरी तुम्हांला युरोपात चला, म्हणून सांगेल. की तिथं मांडलेला संसार उचलून निघायचं भटक्यासारखं.. हे पुरे झालं आता. ऐकलं ना? मुलं इथं रमली आहेत, शाळेत जातायत. उत्पन्नही चांगलंच आहे. सगळं चांगलं चाललेलं असताना मला नाही बाई इच्छा मलायाबिलायात जायची.." मी निक्षून बोलले. हे त्यावर काही बोलले नाहीत. 'तू म्हणतेस तसं होऊ दे. हमीदभाईंना कळवून तरी येतो..' म्हणून बाहेर पडले. पुढले दोनेक आठवडे तणावाखालीच गेले. घरात हे उगीच चिडचिड करत, मध्येच शून्यात पाहत बसून राहत. हळूहळू येईल पूर्वपदाला सगळं, अशी मनाची समजूत घालून मी रोजच्याप्रमाणे गोष्टी करत राहिले. यांचं ते पत्र हातात पडेपर्यंत!

त्यानंतर सुरतेत काढलेली दोनेक वर्षं कधी आठवूदेखील नयेत, असं वाटतं. ह्यांच्या वागण्यानं मनाला बसलेला धक्का जबर होता. आपण पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करताना कुटुंबाचाही विचार ह्यांच्या मनात न येणं, ह्याने मला खचायलाच झालं होतं. त्या पहाटे कितीतरी वेळ ते पत्र हातात घेऊन मी सुन्न बसून राहिले होते. मुलांना, नातलगांना, आजूबाजूच्या लोकांना काय सांगायचं? यांच्याशिवाय या परमुलखात दिवस तरी कसे काढायचे? आर्थिक चिंता नव्हती, कारण ह्यांनी ठेवलेला पैसा दीडदोन वर्षं पुरला असता. मात्र मी मनाने दुबळी झाले होते. नातलगांचा आधार हवासा वाटत होता. पण परत महाराष्ट्रात जाणं त्या घडीला तरी अशक्य दिसत होतं. हे आम्ही इथंच राहणार, असं गृहीत धरून गेले होते. पत्रव्यवहार केला असता तो याच पत्त्यावर! यांच्याकडून काही कळत नाही तोवर तरी मला सुरतेतच राहणं भाग होतं. मी स्वतःला कसंबसं सावरलं. बाबा कामासाठी म्हणून दुसर्‍या देशात गेलेत, वगैरे मुलांना समजावलं. यांचं पत्र येण्याची वाट पाहत काळ कंठू लागले.

गेल्यानंतर चारेक महिन्यांनी यांचं पत्र आलं. त्यात त्यांनी पुन्हा एकदा माफी मागितली होती. तिथं कापडाच्या व्यापारात शिरायचा प्रयत्न करत आहेत, वगैरे लिहिलं होतं. मलायाबद्दल लिहिलं होतं. सोबत हमीदभाईंचा पत्ता दिला होता. मी त्यांना पत्र लिहिलं. भारतात परत यायची विनंती केली. मुलं त्यांची आठवण काढतात, रडतात वगैरेसुद्धा लिहिलं त्यात. त्यानंतर त्यांच्याकडून काही पत्रच आलं नाही. त्यांनी जणू माझ्याशी, मुलांशी संबंधच तोडून टाकले होते. पुढे चारपाच महिने मी वेड्यासारखी दर पंधरा दिवसांनी पत्रं पाठवत राहिले, त्यांच्या उत्तराची वाट पाहत राहिले. त्यांची माफी मागितली. मी तुमची वाट पाहीन, हेही लिहिलं. पण काही उपयोग झाला नाही.

.. हे निघून गेल्याला पुरी दोन वर्षं होत आली होती. जवळची गंगाजळी संपत आली होती. घर चालवायचं तर मला हातपाय हलवावे लागणार होते. तोपर्यंत इंग्रजी चांगलं येऊ लागलं होतं. एखादी शिक्षिकेची नोकरी पहावी, असा विचार केला. पण मला सुरतेत राहायचं नव्हतं. दोन्ही भाऊ, आईवडील आता पुण्यात हलले होते. मीदेखील तिकडं जायचं ठरवलं. यांच्याकडून काही पत्र येण्याची, खुद्द हे परत येण्याची आशा आता संपलीच होती जवळपास! तरीही 'यांच्याकडून काही पत्रबित्र आलं तर मला लगेच कळवा' असं परिचितांना सांगून मी सुरतेतलं बिर्‍हाड आवरलं. पासष्ट सालच्या जानेवारीत मी आणि मुलं पुण्यात आलो.

**

त्या कडूजहर आठवणींत किती वेळ गेला, कळलंच नाही. दिवस मावळला होता. उदास वाटत होतं, डोळे पाणावलेले. खिडकीतून उठले. देवापाशी दिवा लावला. भरकटलेल्या मनाला चुचकारायला हळू आवाजात रामरक्षा म्हणू लागले. कधी नव्हे ती, आठवडाभर अनंताकडे राहायला जायची इच्छा झाली. नातवंडांशी भेट झाली की, बरं वाटलं असतं. मी लगेचच त्याला फोन केला. दुसर्‍या दिवशी तो सकाळी अकराला मला घ्यायला आला तेव्हा माझी छोटी बॅग भरून मी तयार होते. घरी पोचताच आशू, मनीषच्या दंग्यानं, आरडाओरड्यानं, आज्जी आज्जी करत बिलगण्यानं जीव सुखावला. उज्ज्वलेनं केलेला चवदार, आयता स्वयंपाक जेवून मी दुपारी छानपैकी झोप काढली. दुपारचा चहा घेत टीव्हीवर सिनेमा पाहत होते. बाकीच्यांची कुठे बाहेर जायची गडबड सुरू होती.

"आई, आमच्या ऑफिसमधला तो पटेल आहे, त्याच्या घरी आज संध्याकाळी पार्टी आहे. आम्हांला सगळ्यांना तिकडे जायचंय. तू एकटी थांबशील ना घरी?"

"अनंता, अरे एरवीही मी तिकडे एकटीच नाही का राहात? तुम्ही लोक निघा. सकाळचा स्वयंपाक आहेच थोडा. मला रात्रीला पुरे.. मस्तपैकी टीव्ही पाहीन तुम्ही येईपर्यंत."

ते सगळे गेले. मी सिनेमा संपेपर्यंत टीव्हीसमोर बैठक मारली. मग उठून, तोंडबिंड धुऊन कॉलनीत फेरफटका मारायला बाहेर पडले. अनंताच्या शेजारपाजारच्यांशी तशा ओळखी होत्याच. बिल्डिंगमध्ये खालच्याच मजल्यावर शहाभाभी राहायच्या. पंचाहत्तरीच्या तरी असतील. एकदम बोलघेवड्या! मला गुजराती छान बोलता येतं, हे कळल्यापासून कधीकधी गुजरातीत गप्पा मारायच्या. त्यांचं मूळ गावही सुरतेजवळचं. तिथल्या आठवणी सांगायच्या. अनंताकडे आले की, मी नियमित त्यांच्याशी गप्पा मारायला जात असे. त्यांचं कॉलनीच्या कोपर्‍यावरच मोठ्ठं किराणामालाचं दुकान होतं. घरी नसल्या की, हमखास दुकानात सापडत. कधीकधी संध्याकाळी कुठेतरी सत्संग, भजन वगैरे कार्यक्रमाला गेलेल्या असत. मी त्यांच्याकडे डोकावले तेव्हा घाईघाईने तयारच होताना दिसल्या.

"तुम्हीसुद्धा बाहेर निघालात की काय? अनंता आणि मंडळी आत्ताच पार्टीला गेली. म्हटलं, तुमच्याकडे यावं गप्पा मारायला.. घाईत दिसताय.. मी उद्या चक्कर टाकते मग.."

"वासंतीबेन, तुम्ही येता का माझ्यासोबत? पुढच्या महिन्यात बहिणीच्या नातीचं लग्न आहे. तिच्यासाठी साडी घ्यायची आहे. चला की!"

घरात नाहीतरी एकटीच बसले असते. त्यापेक्षा भाभींबरोबर निघाले. रस्त्याने जाताना खूप गप्पा झाल्या. भाभींनी बहिणीच्या नातजावयाबद्दल इत्थंभूत माहिती दिली. रविवार पेठेतून खरेदी आटोपून आम्ही बस पकडून कॉलनीपाशी आलो. जवळच असलेल्या बागेपाशी भेळ खाल्ली. थोडं पुढे शहाभाभींचं आवडतं मंदिर होतं. तिथे प्रवचनं, सत्संग असं काही असलं की, त्या आवर्जून जात असत. घरी जाण्याआधी दोन मिनिटं टेकावं, म्हणून आम्ही तिथे जाऊन कट्ट्यावर हाश्शहुश्श करत बसलो. तिकडे भिंतींवर कुणा स्वामीजींच्या आगमनाची पोस्टरं लागली होती. नोटिसबोर्डावरही माहिती लिहून ठेवली होती. स्वामीजींचा फोटोही झळकत होता पोस्टरावर. भगवी वस्त्रं, पांढरेशुभ्र केस, रुद्राक्षांच्या माळा, कपाळावर ठसठशीत टिळा आणि कपाळाच्या उजव्या बाजूला असणारी जखमेची खूण...

"तुम्ही येणार असाल नं प्रवचनांना?" मी शहाभाभींना विचारलं. त्यांनी हसून मान डोलावली.

**

दुसर्‍या दिवशी सकाळी चहा घेत निवांत पेपर वाचत होते. मागच्या पानावरही कालच्याच स्वामीजींच्या पुणे-भेटीची मोठ्ठी जाहिरात छापली होती. त्यासोबत तोच तो काल पाहिलेला फोटोही होताच. त्याच आठवड्यात गुरुवारापासून प्रवचनं सुरू होणार होती. त्याचं वेळापत्रक दिलं होतं. खेरीज भक्तांना महाप्रसाद, प्रवचनाचा हॉल वातानुकूलित आहे, लांबवर राहणार्‍या भाविकांना रात्री उशिरा मोफत बससेवा पुरवली जाईल, वगैरे तपशील त्या पानावर स्वामीजींच्या फोटोखाली दाटीवाटीनं बसवले होते. 'एवढी मोठी जाहिरात आणि सोयींची खैरात म्हणजे स्वामीजींचं प्रस्थ मोठं दिसतंय..' मनात विचार आला. मी देवावर विश्वास ठेवणारी असले तरी असा बडेजाव असलेली प्रवचनं, सत्संग या गोष्टी मला अजिबात आवडत नव्हत्या. मी पान उलटून बाकी बातम्या वाचू लागले.

.. गुरूवारी अपेक्षेप्रमाणे शहाभाभी 'प्रवचनाला येता का?' म्हणून विचारायला डोकावल्याच. माझं कारण तयारच होतं. डॉक्टरांची फॉलो अप अपॉइंटमेंट! माझ्या नुकत्याच होऊन गेलेल्या आजारपणाबद्दल त्यांना सारं माहीत होतंच, त्यामुळे त्या फार चौकशी न करता निघून गेल्या. प्रवचनाला जाणं मी शिताफीने टाळलं खरं, पण स्वामीजींचा विषय पुन्हापुन्हा निघत राहिलाच. स्वामीजींना इंग्रजी आणि अजूनही काही परदेशी भाषा येतात, ते देशविदेश फिरले आहेत, त्यांनी सहा वर्षं हिमालयात खडतर तप केलं, त्यांच्या हाताचा दिव्य स्पर्श डोक्याला झाला तर माणसाला आपला पूर्वजन्म, तसंच भविष्य लख्ख दिसतं, म्हणून ते कुणाच्याच डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत नाहीत, अशी बारीकबारीक माहिती मिळत राहिली त्यांच्याबद्दल! बरीचशी शहाभाभींकडून.. त्या उत्साहाने दर प्रवचनाला हजेरी लावत असत आणि ऐकलेलं नवीन काहीबाही मला येऊन सांगत. मीही मजा म्हणून ऐकत बसे.

.. त्या शुक्रवारी अनंता घरी आला तो खूप अस्वस्थ होऊनच. गेले काही दिवस त्याच्या चेहर्‍यावर अधूनमधून ताण दिसत होताच. मुलं, उज्ज्वला झोपायला गेली तरी हा रात्री एकटाच जागत बसलेला दिसे. एकदा विजयेला रात्री उशिरा फोन लावून तिच्याशीही बरंच काही बोलत होता. मध्ये एकदा मी बाहेर गेले होते तेव्हा दत्ताही घरी चक्कर टाकून गेल्याचं कळलं. नक्की काय चाललंय, हे मी त्याला विचारणार होते, त्याआधीच तो विषय निघाला.

"आई, प्लीज इथे ये. बस.." त्याच्या आवाजातलं गांभिर्य जाणवून मी धसकलेच जरा. त्याच्याजवळ खुर्चीवर जाऊन बसले.

"अनंता.."

"आई, स्वामी अमृतानंद.. सध्या पुण्यात आलेत ते.." तो काहीसा अडखळला. "ते बाबा आहेत..."

मला बधीर झाल्यासारखंच झालं. हा काय बोलतोय? कुणाबद्दल बोलतोय? याला कसं कळलं? कुणी सांगितलं? काय पुरावा ? हे जिवंत आहेत? संन्यासी झालेत? ते तर व्यापारासाठी गेले होते नं? प्रश्नच प्रश्न! प्रश्नांची दाटीच झाली मनात.. बराच वेळ मी तशीच सुन्न बसून होते. भानच उरलं नव्हतं कशाचं.. भानावर आले ते अनंताच्या हलवण्यानं..

"आई.. आई.."

"अरे अनंता, काय बोलतोयस तू? तुझ्या वडलांना जाऊन पस्तीस वर्षं झालीत.. ते व्यापारानिमित्तानं गेले होते.. त्यांना व्यापार, पैसा या गोष्टींत रस होता.. आणि हे साधू आहेत.. ते जन्मात साधूबिधू होणं शक्य नाही, संन्यास घेणं शक्य नाही.. अरे, देवादिकांचंही ते काही करत नसत. छे! काहीतरीच.."

"आई, नीट पूर्ण ऐकून तरी घे.." अनंताने माझं बोलणं थांबवत म्हटलं. मग त्याने बोलायला सुरुवात केली. "...गेल्या आठवड्यात ऑफिसात हा विषय निघाला कुणाच्यातरी बोलण्यातून. त्या सहकार्‍याची आई ही स्वामी अमृतानंदांची भक्त आहे. त्यांचं कसलंसं शिबीर झालं गेल्यावर्षी दिल्लीमध्ये, तिथे त्या गेल्या होत्या. तिथल्या इतर शिष्यांकडून स्वामीजींच्या पूर्वायुष्यातले थोडे थोडे तपशील कळले म्हणे त्यांना.. आमच्या गप्पांच्या ओघात येत गेलं सगळं.. स्वामी आधी म्हणे, व्यापारी होते. परदेशात कुठंसे होते. मग एके वर्षी कुटुंब, व्यापार सगळं सोडून देऊन हिमालयात गेले... त्यांना खूप भाषा माहीत आहेत.. खेरीज ते बहुधा मूळचे मराठीच आहेत.. गेले चारपाच दिवस मी त्यांच्याबद्दल मिळेल तशी माहिती गोळा करत होतो.. त्यावरून मला तरी खात्री वाटतेय, ते बाबाच आहेत.. मी आणखी माहिती काढायचा प्रयत्न करतोच.. त्यांच्याबद्दल एकेक एकेक जसं कळत गेलं तसतसं अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून विजयेशी आणि दत्ताशीही बोललो. विजया खूप रडली फोनावर आई.. उज्ज्वला, प्रमिला पण खूप अस्वस्थ झाल्या सगळं ऐकून! सगळ्यांचंच थोडं मन ताळ्यावर आल्यावर तुझ्याशी बोलायचं ठरवलं होतं."

"अनंता, अरे काय हे? नाहीत रे ते तुझे वडील.. ते नसते झाले कधी संन्यासी वगैरे.."

"आई, एक ओळखीची खूण! तू त्यांच्या फोटोत कपाळावरची जखमेचा व्रण नाही पाहिलास? त्यावरून नाही काही आठवत तुला? सुरतेत असताना, एका संक्रांतीला बाबा आमच्या पतंगांच्या पसार्‍यामुळे पडले होते आणि कपाळाला पायरीची कड लागून मोठी जखम झाली होती त्यांना.. नाही आठवत तुला? खरंतर ती खूण पाहून जास्त अस्वस्थ झालो मी.."

मला लख्ख आठवला तो प्रसंग! संक्रांतीच्या संध्याकाळी पतंग उडवायचे म्हणून मुलांचा, त्यांच्या मित्रमंडळींचा नुसता गलका, घरभर गोंधळ चालला होता. अंगणात पतंग, कागदाचे कपटे, कात्र्या, मांज्याच्या फिरक्या, गोंद असा सगळा पसारा पडला होता. हे बाहेरून कुठूनतरी आले आणि त्या सगळ्या पसार्‍यात कशात तरी पाय अडकून धाडकन पडले. मी आतमध्ये हलवा करत होते तो बाहेर हा गोंधळ! हे कपाळावर लालभडक झालेला रुमाल दाबून बसले आहेत, धाकटी दोघं मोठ्ठ्यानं रडताहेत, अनंता भेदरून बाजूला उभा आहे.. वाहणारं रक्त काही थांबेना.. मग डॉक्टर शोधण्याची पळापळ, टाके, वगैरे सगळं यथासांग झालं.. जखम बरी झाली, पण कपाळावर खूण राहिलीच..

.. एकदम परवा वाचलेल्या कथेतलं ते वाक्य मनात चमकून गेलं, '.. हिचा पती माघारी येत आहे.'

**

त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मनाच्या तळाशी असलेल्या त्या पस्तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी उसळून वर येऊ लागल्या. हे सोडून गेल्यानंतर सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत झुंजत, नातेवाईक, परिचित यांच्या प्रश्नांना तोंड देत, दगडासारखं घट्ट मन करून मी इथवर मजल मारली होती. मुलांच्या जबाबदार्‍या कणखरपणे पार पाडल्या होत्या. स्वतःच्या हिमतीवर लहानसं का होईना, घरही बांधलं. आता तिथं निवांतपणे आहे तितका काळ घालवायचा, एवढंच मी ठरवलं होतं. मग आयुष्याच्या या टप्प्यावर हे काय घडत होतं? ज्या व्यक्तीला मी प्रयत्नपूर्वक आयुष्यातून पुसून टाकलं होतं, तीच व्यक्ती आता पुन्हा समोर का येत होती? माणूस मरतो, तेव्हा तो कायमचा आयुष्यातून गेला हे पक्कं माहीत असतं. पण नाहीशा झालेल्या माणसाचं काय? आपल्यालेखी तो जिवंत असतोही आणि नसतोही. यांचा खूप राग आला की, मंगळसूत्र काढून ठेवायचा विचार मनात यायचा. पण ते काढून टाकण्याच्या कल्पनेनंही थरथरायला व्हायचं. पुढे काही वर्षांनी खूप प्रयत्न करून, एक दिवस मन घट्ट करून मी मंगळसूत्र काढून ठेवलं. मग त्यानंतर विजयेच्या लग्नात ते मोडून स्वतःसाठी हार करून घेताना मी किंचितही डगमगले नव्हते. एका पत्रानंतर ज्या माणसाने सगळे बंध तोडून टाकले तो माणूस जिवंत असला काय नसला काय, माझ्यालेखी आता दोन्ही सारखंच होतं. मला मग अनंताचाही राग आला. काय गरज त्या स्वामीजींबद्दल इतका खोलात जाऊन तपास करायची? मी एकटीने प्रपंच चालवताना या तिन्ही मुलांना काही कमी पडू दिलं नाही. मग जो बाप पस्तीस वर्षांपूर्वी पोरांचीही फिकीर न करता चालता झाला, त्याला शोधून काढायची ही धडपड आता का? त्यातल्या त्यात बरं एकच होतं की, हे स्वामीजी खरोखर सदानंद कुलकर्णी आहेत की नाहीत, हे अजून माहीत नव्हतं. दुसर्‍या दिवशी सकाळी अनंताशी सविस्तर या विषयावर बोलायचं ठरवून मी डोळे मिटले.

"अनंता, कशासाठी हे सगळं? ते खरोखर सदानंद कुलकर्णी आहेत की नाहीत, हे आज जाणल्याने काय फरक पडतो? काय मिळणार तुला हा सगळा तपास करून?"

त्याच्याकडे उत्तर नव्हतं. माझी नजर चुकवत तो कॉफीचे घोट घेत बसून राहिला. हे निघून गेले तेव्हा अनंताला एकट्यालाच जरा समज आली होती. बाबांचं आणि त्याचं पहिलं मूल म्हणून विशेष गूळपीठ होतं. हे निघून गेले तेव्हाही 'असे कसे मला न सांगता गेले?' म्हणत महिनाभर रडला होता तो! अवघ्या महिन्याभरात अकाली मोठा, प्रौढ झाला. नंतर आईची सगळी धडपड पाहताना आणि हे सगळं बाबांमुळे झालं म्हणून कधी बाबांचं नावही काढायचं नाही, हेही तो आपणहून शिकला. मग आता?

"आई, मला नाही माहीत! पण ते खरंच बाबा असतील, तर मला एकदातरी भेटायचं आहे त्यांना.. असं का केलंत, हे विचारायचं आहे. मला न सांगता का निघून गेलात, हेही विचारायचं आहे.. गेल्या पस्तीस वर्षांबद्दल सांगायचं आहे. तुझ्याबद्दल सांगायचं आहे.. त्याने काय साध्य होणार, हे नको विचारूस. नाही माहीत मला.." पुढ्यातली कॉफी संपवून तो उठून गेला. मला एकदम गळून गेल्यासारखं झालं. उज्ज्वला बाजूला येऊन बसली होती. माझ्या पाठीवर ती हळूहळू थोपटत राहिली.

थोड्या वेळाने दत्ताला फोन लावला. त्याचंही अनंतासारखंच! भेटायचंय! जाब विचारायचाय म्हणे बाबांना. झाली ना त्या सगळ्याला कितीतरी वर्षं. आता कसले हिशोब करायचे? कशाला त्या माणसाला भेटायचा अट्टहास? आपल्या आयुष्यात ही नसती उलथापालथ का? आपण सगळी आवराआवर करू पाहत होतो. उर्वरित आयुष्य शांततेत जाईल याची आपल्याला खात्रीच होती. तो माणूस परतून आयुष्यात येईल, असं आपल्याला कधी वाटलं तरी होतं का?

दत्ताही अनंतासारखंच बोलल्यावर मला विजयेला फोन करायची इच्छाच झाली नाही. तीही तेच सांगणार. एक भेट. एका भेटीने काय होतंय?, त्या दोघांना भेटायचं असेल एकदा तर काय हरकत आहे?, वगैरे वगैरे. मग मला का इतकी भीती वाटतेय त्या भेटीची? ते स्वामीजी म्हणजे खरंच हे असले तरी आता काय फरक पडणार आहे? पण ते मुळात इतक्या वर्षांनी परतून यावेतच का? त्यापेक्षा तेव्हा मेले.. विचारांची गाडी त्यांच्या मरणावर आली तेव्हा चरकलेच. आपण काय विचार करत होतो, ते एकदम जाणवून हुंदक्यांवर हुंदके यायला लागले.

कपाळावर अमृतांजन चोळून, एक जुनं फडकं घट्ट बांधून मी पलंगावर डोळे मिटून पडले होते. काल रात्री एकदम घामाने अंग डबडबून मला जाग आली. छातीत धडधड, घशाला कोरड पडलेली! हे असं व्हायला नको, हेही कुठेतरी वाटत होतं. पण इतक्या वर्षांनी होऊ घातलेल्या एवढ्या मोठ्या बदलासाठी मन तयार होत नव्हतं. 'त्यांच्या असण्याची सवय होती, तशी त्यांच्या नसण्याची सवय झाली. आता पुन्हा सगळं संपत आल्यावर त्यांच्या असण्याची सवय करून घ्यायची? मला नको आहेत ते माझ्या आयुष्यात परतायला. माझ्या मुलांच्या आयुष्यातही नकोत मला ते! एकटीने वाढवलंय मी मुलांना. यांचा काही हक्क नाहीये मुलांवर.' मग मध्येच अशा विचारांची मलाच लाजही वाटायची. खूप रडायला यायचं. सारा वेळ तणावात जायचा. नियतीने हा असला प्रसंग माझ्या आयुष्यात का आणावा, मला कळेना. मला रात्री झोप लागेनाशी झाली. रात्ररात्रभर विचार. रडणं. डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेऊन आले. सकाळी ध्यान सुरू केलं. उपयोग नाही. अनंता, दत्ताला स्वतःची शपथ घालावी आणि या सगळ्यापासून परावृत्त करावं, अशीही वेडगळ कल्पना मनात येऊन गेली. स्वतःच्या घरी जायचा मनात विचार आला. पण अशावेळी अनंतानं जाऊ दिलं नसतं, हे माहीत होतं. मग दोन दिवस दत्ताकडे गेले. प्रमिलाही खूप काळजी घेत होती माझी. 'सर्व काही ठीक होईल' म्हणायची. मला कशाचीच खात्री वाटत नव्हती.

त्या रात्री अशीच विचार करत पडले होते. गेले दहा दिवस हेच चाललं होतं. एकीकडे अनंताला स्वामींच्या भेटीची वेळ मिळता मिळत नव्हती. तोही प्रचंड अस्वस्थ होता. एकीकडे त्याला माझी काळजीही होती, दुसरीकडे 'बाबा' यावेळी भेट न होता जाऊ नयेत, असंही तीव्रतेनं वाटत होतं. त्याच्या ऑफिसातल्या कामांचं प्रेशरही होतंच नेहमीसारखं! तिन्ही आघाड्यांवर तो एकटाच लढत होता. एकदम त्याच्याबद्दलच्या काळजीनं मन भरून आलं. 'जाऊ दे. फक्त एकदा भेटायचंय म्हणतोय ना तो? आपल्याला यायचा आग्रह करणार नाही, हेही कबूल केलंय त्याने. दत्ता आणि तो.. दोघेच जाऊन भेटणार आहेत त्यांना. विजया तशीही लांब, परदेशात आहे. खरंच एका भेटीने काय फरक पडणार आहे आज? ते स्वामीजी म्हणजे हेच असतील तर थोडं बोलणं होईल.. खरंतर होणार नाहीही. त्यांना बोलावंसं वाटलं तरच काही बोलणं होणार. इतक्या वर्षांपूर्वी सोडून दिलेल्या कुटुंबाबद्दल काही भावना उरल्या तरी असतील का त्यांच्या मनात? पण हे बरोब्बर उलट असलं तर? त्यांना आमची खूप आठवण येत असेल तर? आपण सुरतेशी पुढे काहीही संपर्क ठेवला नाही. त्यांना आपल्याशी पुन्हा संपर्क साधणं अवघड झालं असणार. आता इतक्या वर्षांनी मुलांची भेट झाल्यावर त्यांनी पुन्हा आमच्या आयुष्यात परतायचं ठरवलं तर? ते परत आले तर आपल्याला काय वाटेल नक्की? आनंद होईल की दु:ख होईल? आपण त्यांना पुन्हा स्वीकारू शकू?..'

स्वामीजींची भेट पुढच्या आठवड्यात सोमवारी रात्री नऊ वाजता होऊ शकेल, असं अनंताला सांगण्यात आलं होतं. सोमवाराला अजून दोनेक दिवस होते. हा ताण लौकर संपावा, अशी मी रोज देवाकडे प्रार्थना करत होते.

**

.. शनिवार दुपार. टेलिफोनच्या आवाजाने मला जाग आली. घरात बाकी कुणीच नव्हतं. मी जाऊन फोन उचलला. अनंताचा होता.

"आई.." तो क्षणभर घुटमळला.

"काय रे, काय झालं? स्वामी.."

"ते आज सकाळी... पहाटेच पुण्यातून निघून गेले आई.."

"गेले? कुठे?"

"माहीत नाही. म्हणजे त्यांच्यासोबत असणार्‍या लोकांनाही माहीत नाही. पण हे काही नवलाईचं नाही म्हणे त्यांच्यासाठी. ते असे अधूनमधून महिनोन्महिने निघून जातात म्हणे. एकदा तर दोन वर्षं ते परतलेच नव्हते. काहीजण म्हणतात, ते हिमालयात जातात म्हणून.. कुणाला सांगून जात नाहीत. परत येतील का, तेही माहीत नसतं.."

"आता?"

"मला वाटतं आई, आपण थांबावं आता.. स्वामी अमृतानंदांचा विषय बंद आजपासून.."

"अरे अनंता, काय झालं? खूप अस्वस्थ वाटतोयस आवाजावरून.."

"काही नाही गं.. एकंदरीत या सगळ्या फंदात पडायलाच नको होतं असं एकदम वाटून गेलं सकाळी ती बातमी ऐकली तेव्हा. पस्तीस वर्षांपूर्वीचीच पुनरावृत्ती झाल्यासारखी वाटली. त्याआधीही गेले काही दिवस तणावाखाली जगत असलेले आपण सगळे. ते खरंच बाबा होते की नाही, तेही कळलं नाही. पण हे सगळं अनुभवल्यानंतर ते कळायला नकोच, अशा निर्णयाला मी आलोय.."

तो बरंच काही भराभर बोलत होता. उत्तेजित झाल्याने त्याचा श्वास फुलून आलेला! मी ऐकत होते आणि नव्हतेही. पस्तीस वर्षांपूर्वीही ती घटना उमजावी, इतका मोठा तोच तर होता. याही वेळेला ती बातमी याच्या कानांवर आधी आली होती. त्याच्या मनातली ती बोच पुन्हा ताजी झाली होती. पण 'याही वेळेला' असं तरी कसं म्हणावं? ते कुणी दुसरेच असले तर? कुणा दुसर्‍यालाच सदानंद कुलकर्णी मानून आम्ही उगीचच सगळ्या गुंत्यात अडकलो, असं असतं तर? ह्या सगळ्या 'जर-तर'ला अंत नव्हता. जाणारा माणूस आपण आपली वेळ ठरवून निघून गेला होता. तेव्हाही नि आताही! त्यानंतरची ही सगळी फोल अस्वस्थता संपवणं, केवळ आमच्याच हातात होतं. किंबहुना, शांतपणे जगायचं तर हा विषय आम्ही संपवायलाच हवा होता.

"... आई, तू स्वतःला सांभाळ. प्लीज.. मीच चौकशी करायला गेलो नसतो, तर हे काहीच घडलं नसतं. सॉरी आई.." तो पुनःपुन्हा सॉरी म्हणत राहिला. मी त्याला शांत केलं. जुजबी बोलून फोन ठेवला.

मला एकदम मोकळं वाटलं. 'तो माणूस निघून गेला. मग कशाचा ताण? ताण संपला आता.' मी मनाशी बोलले. या सगळ्या भावनिक आंदोलनांनी प्रचंड मानसिक थकवा आलेला. तरी मनात कुठेतरी हायसंदेखील वाटत होतं. पण मग हे डोळ्यांतून वाहणारं पाणी कशामुळे? कितीही नाही म्हटलं तरी ते येणारच, मग थांबेल आपोआप काही दिवसांनी! मी डोळे मिटून पडून राहिले. शेजारी कुणाकडेतरी रेडिओ लागला होता. किशोरकुमारच्या आवाजातले ते शब्द;

"जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम,
वो फिर नही आते... वो फिर नही आते..."

.. ते ऐकताऐकता कितीतरी दिवसांनी मला शांत झोप लागली.

(माहेर मासिकात पूर्वप्रकाशित.)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle