मनातले काहीतरी

प्रसंग - १

५ वीची शाळा नुकती सुरु झाली होती. नवीन शाळा, दर तासाला बदलणारे शिक्षक, एकटीने सुरु केलेला बसचा प्रवास सारेच अप्रुपाचे.
असाच एक प्रसंग - बसने शाळेतुन घरी येतानाची नेहमीचीच गर्दी. चुकुन बसायला जागा मिळाली. मधे एका स्टॉपवर पुढच्या दाराने एक आजी चढतात. शाळेत, घरी शिकवल्याप्रमाणे पटकन उठुन आजींना बसायला जागा दिली, पण आजींचा त्या जागेवर बसायला नकार. डोळ्यातल्या पाण्याला कसेबसे थोपवत प्रवास पूर्ण करुन घरी येइपर्यंत चेहरा नीट करायचा प्रयत्न सुफळ.

प्रसंग - २

वरची घटना घडुन जवळपास ८-९ वर्ष उलटली आहेत, काळाबरोबर कटु आठवणीपण मागे पडत चालल्या आहेत. आजचे लोकेशन मॉडेल कॉलनीतला एक भाग. थंडीतल्या दिवसातली एक सकाळ. एक काम करुन परत येत असताना वाटेत एक आजोबा ऊन खात उभे. समोरुन येणारी व्यक्ती पाहुन त्या व्यक्तीची स्वःतावर सावलीही पडणार नाही याची खात्री होईपर्यंत कडेला सरकले. परत एकदा अवाक, पण यावेळेपर्यंत बहुदा मन पुरेसे निगरगट्ट झाले आहे, रडु वैगरे आलेच नाही की...

प्रसंग - ३

१०-१५ दिवसांपूर्वीचा.
दरम्यान पूलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले आहे. एका सुपरशॉपीतुन बाहेर पडताना एका पन्नाशीच्या बाईच्या जवळुन जावे लागणार होते. तेवढ्यात त्या बाईचेच लक्ष गेले आणि तिने गर्कन वळुन जाण्या-येण्याच्या रस्त्यातुन स्वःता बाजुला होऊन रस्ता मोकळा करुन दिला. हे सर्व करताना आपादमस्तक न्याहळायला मात्र अजिबात विसरली नाही हे ही लक्षात आलेच.

हे सगळे परत परत का आठवतेय ? मी अजुनही मलाच आहे तशी स्वीकारले नाहीये का आता लाडक्या लेकीच्या नाकाजवळचा पहिलाचा पांढरा ठिपका मला टोचतोय ?
मी ज्या दिव्यातुन गेले तसेच तिला पण करावे लागणार का ?
२५-३० वर्ष झाली तरी समाज बदललाच नाही असा अर्थ घ्यायचा का या सगळ्या घटनांचा ?

सध्या तरी काही समजत नाहीये, बहुधा याचे उत्तर पण येणारा काळाच सांगेल ...

(ज्या मैत्रीणींनी मला बघितले आहे त्यांना मी वर खरडलेल्याचा संदर्भ लागेल, बाकीच्यांच्या माहिती साठी - मी आणि माझे आई - बाबा तिघेही विटिलिगोग्रस्त आहोत)

Keywords: 

आधारगट: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle