दैनंदिनी- प्रि श्रीलंका

मी श्रीलंकेला जाणार हे डिक्लेअर केल्यानंतर बर्‍याच जणांनी का? हा प्रश्ण केला. त्यात काहीजणांच्या मते एवढे देश बघायचे राहिलेयत त्यात श्रीलंकाच का आत्ता? वगैरे प्रकारची कुतुहले होती. पण मी ठरवलं होतं मला श्रीलंकेला जायचय. त्याची कारणे कधीतरी डिस्कवरी वर पाहिलेला तो सर्वत्र असलेला हिरवा पाचूचा रंग, रत्नांच्या खाणीची वर्णने आणि मागच्या पाच -सहा वर्षांपासून बॉस कडून सतत ऐकलेली श्रीलंकेची स्तुती ही होती. (बॉस कोलंबोमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलचे सीईओ होते).

सो फायनली पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टी येत आहे हे पाहून मी पटकन टिकीटे बुक करुन टाकली पुढचा काहीच विचार न करता...

मग नेहमीची मारामारी सुरु झाली. अ‍ॅन्युअल रिपोर्ट कंप्लिशन अ‍ॅन्ड डिसपॅच. ते मला पुर्ण करायचेच होते कारण सुट्टीवरुन परत आल्यावर त्याची लिंक काही मला परत लागली नसती. तर आता मी १२ तारखेला डिसपॅच पुर्ण करतीये ऐकल्यावर एकेक डिपार्टमेंट जागे होऊ लागले, मुख्यत्वे अकाउंटस आणि फायनान्स ( :ड ) आणि मग वेळेच्या मारामार्‍या सुरु झाल्या. शेवटी अगदी फ्लाईटच्या दोन तास आधी डिसपॅच कंप्लिटेड असे स्टॉक एक्स्चेंजला कळवुन फायनली ऑफिसमधून पळाले. नेहमीचे यशस्वी भयानक ट्राफिक वगैरे होतेच. अगदीच ट्राफिक नाही सुटले तर आता विमानतळावर चालत जावे हा एक ऑप्शन मनाशी तयार ठेवला. पण तशी काही वेळ आली नाही आणि सिक्युरिटी चेक वगैरे पार पाडून मी गेट समोर जाऊन चेन्नईला जाणार्‍या विमानाची वाट बघत बसले.

तर या ट्रिपच्या तयारीबद्दलः

ट्रीपची 'बेअर मिनिमम' हे सोडून फारशी काहीच तयारी करायची नाही हे मनाशी ठरले होते आणि शक्य तेवढे कमी सामान न्यायचे हे सुद्धा. मला माझेच बघायचे होते किती कमी सामानात तगून जाता येते ते.

त्याप्रमाणे 'बेअर मिनिमम' यादीनुसार विसा काढला, श्रीलंकेचे थोडेफार चलन गोळा केले, चार कपडे घालून बॅग भरली आणि पहिल्या दिवशीच्या हॉस्टेलचे बुकिंग केले. झाले. टोटल तयारी संपली.

बॅक टू ट्रिपः

चेन्नईचे विमान उशिरा सुटले, तिकडे मला माझ्या कनेक्टींग कोलंबो विमानाची चिंता सुरु झाली कारण मला भर रात्री चेन्नई डोमेस्टीक वरून चेन्नई इंटरनॅशनलला चालत जायचे होते. नक्की कुठल्या दिशेने हे सुद्धा माहीत नव्हते.

तर एकदाचे चेन्नई विमान जमिनीवर उतरले, माझी बॅकपॅक घेतली आणि चेन्नई इंटरनॅशनलला चालत निघाले. साधारण पंधरा मिनिटे उजव्या दिशेने चालून आणि थोडीफार शोधाशोध करुन इंटरनॅशनल एअरपोर्टला नेणारी लिफ्ट एकदाची सापडली. तोपर्यंत चेन्नईच्या उकाड्यात भर रात्री १.०० वाजता पुर्ण घामाघुम झाले होतेच. शेवटी ते बोअरींग इमिग्रेशन आणि सिक्युरिटी पार करुन कोलंबोच्या विमानाची वाट बघत बसले. तेव्हा जाणवलं आदल्या दिवशी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडले होते ते अजून अर्ध्या प्रवासातच आहे. व्यवस्थित झोप येत होती पण मला कोलंबोला पोहचायचे वेध लागले होते. :)