तसं आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून ऐकून माहिती असतंच की, नोबेल पारितोषिक हा संपूर्ण जगातील अत्यंत सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अत्युत्तम कामगिरी, अथवा संशोधन केल्याबद्दल ही पारितोषिके दिली जातात. 'आल्फ्रेड नोबेल' या स्वीडीश शास्त्रज्ञाने आपल्या मृत्यूपत्रात या पारितोषिकांची तरतूद करून ठेवली आहे, वगैरे... वगैरे...
दरवर्षी जेव्हा नोबेल पारितोषिक जाहीर होतात, तेव्हा आपल्याकडे २-३ दिवस वृत्तपत्रांमधून/सोशल मिडीयामधून याविषयी बातम्या, क्वचित कधी मोठे लेख/चर्चाही येतात. वेळ असेल तर आपण कोणा-कोणाला नक्की कशासाठी नोबेल मिळालंय, हेही चाळतो. पण इतर सगळ्या 'ताज्या बातम्यां'च्या गर्दीत लगेच ती बातमी शिळी होते. आणि खरं तर, बर्यापैकी महत्वाच्या या बातमीकडे सालाबादप्रमाणे आपल्यापैकी बहुतांश लोक दुर्लक्षच करतो. तेव्हा, याविषयी काय करता येईल, या विचारातून आपल्या या नव्या उपक्रमाची कल्पना पुढे आली.

चित्र सौजन्य : http://www.nobelprize.org
पुढच्या आठवड्यात स्टॉकहोम, स्वीडन येथे २०१६ च्या नोबेल पारितोषिकांचा वितरण सोहळा आहे. यावर्षीचा ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर हा आठवडा 'नोबेल वीक' म्हणून साजरा होणार आहे. तर, या निमित्ताने मैत्रीण टीम यावर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांविषयी माहिती संकलीत करून संक्षिप्त स्वरूपात आपल्या मैत्रिणींसमोर आणते आहे.
तर, सुरूवात करुया?
लेखिका - धारा

चित्र सौजन्य : Tokyo Institute of Technology
नोबेल पारितोषिक विजेते : योशिनोरी ओह्सुमी (Yoshinori Ohsumi)
विभाग : वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र
जन्म : ९ फेब्रुवारी, १९४५ (सध्या वय : ७१ वर्षे)
देश : जपान
ओह्सुमी यांचा नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनाचा मुख्य विषय आहे - स्वभक्षण (autophagy) ! स्वभक्षण म्हणजे शरीरातील पेशींनी स्वतःचाच नाश करणं, किंवा अजून सोप्या भाषेत - स्वतःलाच खाणं.
ओह्सुमी यांनी आपल्या याआधीच्या संशोधनांमधून पेशी आपल्या आतील गोष्टींना कसे रिसायकल करते, याविषयी नवा अर्थबोध लावून दाखवला होता. त्यामुळे १९९० मध्ये जगाला काही खास आजारांचे आकलन तर झालंच, शिवाय विविध शरीरविज्ञानशास्त्रविषयक (physiological) प्रक्रियांमधील स्वभक्षणाचं महत्व कळालं. पेशींच्या स्वभक्षणातील हे फेरफार (Mutations) कॅन्सरसारख्या आजारांमध्ये, किंवा मेंदूचे विकार जसे की पार्किन्सन्स विकार, यांमध्ये फार महत्वाची भूमिका बजावतात.
तर, आपल्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनात, ओह्सुमीनी यीस्ट्मधल्या स्वभक्षणासाठी निर्णायक भूमिका बजावणार्या जनुकांना शोधून काढले. ते करता करताच यीस्टमधील स्वभक्षण प्रक्रियेची मूलभूत यंत्रणाही सापडली, आणि महत्वाचे म्हणजे, त्यांनी यीस्ट व मानवी पेशींमध्येही समान यंत्रणा असल्याचे दाखवून दिले.
संशोधन कसे केले? :
मानवी शरीर विविध पेशींनी बनलेले असते. पेशींच्या आत अनेक भाग आणि उपविभाग असतात. व्हक्युओल (vacuole) हा मानवी पेशींमधला एक उपविभाग. या व्हॅक्युओलमधील स्वभक्षणाची प्रक्रिया ओह्सुमींना समजून घ्यायची होती. यीस्ट ही बुरशी आपण बेकिंगमध्ये अनेकदा वापरतो. या यीस्टच्या पेशी मानवी पेशींचं मॉडेल म्हणून संशोधनात वापरतात. परंतु या पेशींचा आकार अत्यंत लहान असतो. म्हणून त्यांना यीस्टच्या पेशींमधील अंतर्गत रचना आणि कार्य पाहण्याची प्रक्रिया ओह्सुमींनी विकसीत केली. या यीस्ट पेशींच्या व्हॅक्युओलमधील स्वभक्षणाची प्रक्रियेमध्ये ओह्सुमींनी व्यत्यय आणला. यामुळे व्हॅक्युओलमध्ये ऑटोफॅगोझोम (autophagosomes - पेशींचा अजून एक उपविभाग) गोळा होतात. ते त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली दाखविले.
त्यासाठी त्यांनी व्हॅक्युओलमधील हानी करू शकणारे वितंचके (enzymes) काढून टाकून म्युटेटेड यीस्टचं विरजण बनवले, आणि त्याच वेळी स्वभक्षणासाठी तयार करण्यासाठी पेशींना अनुकूल वातावरणही बनवले. या सगळ्या प्रक्रियेत त्यांना हानी (degrade) होऊ न शकणारे व्हॅक्युओल सापडले. त्यावरून त्यांनी यीस्टमध्ये स्वभक्षण होते, हे सिद्ध केले आणि त्यात समाविष्ट असलेली जनुके शोधून काढली.
इतर काही खास:
संदर्भ :
अधिकृत वैज्ञानिक मराठी शब्द :
Vacuole - रिक्तिका
Autophagy - स्व-अंश-भक्षण
Mutation - उत्परिवर्तन
लेखिका - धारा

मायकेल कोस्ट्लिर्ट्झ, डंकन हॉल्डन, डेव्हिड थाउलेस (डावीकडून क्रमाने)
चित्र सौजन्य : Diario Chaco
नोबेल पारितोषिक विजेते : डेव्हिड थाउलेस, डंकन हॉल्डन, मायकेल कोस्ट्लिर्ट्झ
विभाग : भौतिकशास्त्र
देश : अमेरिका
डेव्हिड थाउलेस, (पारितोषिक श्रेय : १/२) (David J. Thouless)
जन्म : २१ सप्टेंबर १९३४ (सध्या वय : ८२ वर्षे)
मायकेल कोस्ट्लिर्ट्झ, (पारितोषिक श्रेय : १/४) (J. Michael Kosterlitz)
जन्म : २२ जून, १९४३ (सध्या वय : ७३ वर्षे)
डंकन हॉल्डन, (पारितोषिक श्रेय : १/४) (F. Duncan M. Haldane)
जन्म : १४ सप्टेंबर १९५१ (सध्या वय : ६५ वर्षे)
नोबेल पारितोषिक विजेत्या या त्रयीने पदार्थाच्या अत्यंत कमी तापमानात आणि अत्यंत पातळ थरांमध्ये असणार्या अवस्थांचा/गुणधर्मांचा आणि या अवस्थांमधील संक्रमणांचा/बदलांचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे नवनवीन पदार्थ तयार करता आले आहेत, आणि पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण अवस्थांचे, उदा अतिवाहकता (superconductivity), आगळे-वेगळे विश्व जगासमोर आले आहे. त्यांनी गणितातील टोपोलॉजी (संस्थिती) या विद्याशाखेच्या आधारावर पदार्थांच्या निरनिराळ्या अवस्थांचा अभ्यास केल्याने 'गणित भौतिकशास्त्र' या प्रकारच्या एकत्रित संशोधनाचे महत्वही अधोरेखित झाले. त्यांच्या संशोधनांमुळे अतिवाहकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्वांटम कंप्युटिंग या क्षेत्रांमध्ये अभिनव संशोधन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संशोधन कसे केले? :
टोपोलॉजी ही गणितातली एक विद्याशाखा आहे. यात एखादी गोष्ट पूर्णांकांच्या स्वरूपात असताना तिच्यातील जी काही वैशिष्ट्ये बदलतात, फक्त त्या वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला जातो. पण त्या गोष्टीचे कुठल्याही प्रकारे विभाजन करणे, मान्य नसते. सोप्या भाषेत, आपण लहान मुलांचा प्ले-डोचा एक गोळा घेतला. आता, त्या गोळ्यापासून बॉल बनवा किंवा बॅट बनवा - ती एकच गोष्ट मानली जाईल. कारण या गोळ्याचे फक्त आकार आपण बदलत आहोत. जर त्या गोळ्याचे तुकडे करून आपण त्याचे ३ स्टंप्स बनवले तर ते चालणार नाही. म्हणजेच टोपोलॉजीनुसार एका गोष्टीला फक्त पूर्णांकातच मोजायचं, ती गोष्ट अपूर्णांकात असूच शकत नाही.
डेव्हिड थाउलेस आणि मायकेल कोस्ट्लिर्ट्झ, या जोडगोळीने द्विमीतीय पदार्थात अत्यंत कमी तापमानात अतिवाहकता असू शकते, आणि तापमान वाढवल्यावर ती नाहीशी होते, हे दाखवून दिले. तरी, अति-पातळ पदार्थांच्या बाबतीत अत्यंत कमी तापमानात त्यांच्या बांधणीचे दुवे नाहीसे होतात, आणि म्हणून त्यांची अवस्था बदलत नाही, असे मानले जात असे. पण या जोडगोळीने ही मान्यता चुकीची आहे, हे दाखवून दिले. पदार्थाच्या अतिप्रवाहितेमुळे अतिथंड तापमानात या पदार्थांच्या थेंबात आवर्तने निर्माण होतात. हीच क्रिया अतिथंड तापमानात पदार्थाच्या अतिपातळ थरातही होते, म्हणजेच अतिथंड पातळ पदार्थही अतिप्रवाही असतो. अतिथंड पदार्थाच्या पातळ थरात ही आवर्तने जोडीच्या रूपात असतात. वाढत्या तापमानासोबत ही जोडी तुटते आणि त्याची अवस्था बदलते. या बदलाची/संक्रमणाची कारणमीमांसा या दोन्ही शास्त्रज्ञांनी टोपोलॉजीच्या माध्यमातून सिद्ध केली.
पदार्थांच्या अवस्थांतराबाबत जे अत्यंत कमी तापमानात घडतं, तेच तीव्र चुंबकीय क्षेत्र असताना घडतं का, यावर डेव्हिड थाउलेस यांनी नंतर अभ्यास केला. तर, तापमान, चुंबकीय क्षेत्र या घटकांनी पदार्थाच्या विद्युतवहनात होणारा बदल बघण्यासाठी पुन्हा टोपोलॉजीचाच त्यांनी आधार घेतला. यालाच 'क्वांटम हॉल इफेक्ट' म्हणतात.
आता, या विजेत्यांमधले तिसरे शास्त्रज्ञ - डंकेन हॉल्डन, यांनी पदार्थांतील चुंबकीय अणुसाखळीचा अभ्यास केला. त्यात पदार्थांमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या दोन अणुसाखळ्या (सम आणि विषम) तयार होऊ शकतात, हे त्यांच्या लक्षात आले. शिवाय फक्त सम साखळ्या टोपोलॉजीचे नियम पाळतात, विषम नाहीत. याखेरीज, या साखळ्यांच्या टोकांवरूनच त्यांचे टोपोलॉजीवरचे अवलंबित्व शोधता येतं, हेही त्यांनी दाखवून दिले.
इतर काही खास:
संदर्भ :
लेखिका - धारा

चित्र सौजन्य : http://www.asianews.it
नोबेल पारितोषिक विजेते : ह्युअॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन (Juan Manuel Santos Calderón)
विभाग : शांतता
जन्म : ऑगस्ट १०, १९५१ (सध्या वय : ६५ वर्षे)
देश : कोलंबिया
पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला अंतर्गत सशस्त्र नागरी संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोलंबियाचे अध्यक्ष ह्युअॅन मॅन्युएल सॅन्तोस यांना २०१६चा नोबेल शांतता पुरस्कार दिला जाणार आहे.
नागरी संघर्षाची पार्श्वभूमी :
स्पॅनिश राजवटीतून मुक्त झाल्यानंतरही कोलंबियामधल्या सामान्य माणसाने स्वातंत्र्य म्हणजे काय, हे अनुभवलेच नव्हते. एकीकडे तिथली शेकडो एकर जमीन मुठभर जमिनदारांच्या ताब्यात, तर दुसरीकडे अनेकांकडे उदरनिर्वाहासाठी जमिनीचा हातभर तुकडाही नव्हता. पोटातली भूक आणि वर्षानुवर्षांची खदखद या शेतकऱ्यांना, भूमिहीनांना एकत्र घेऊन आली. त्यांची 'नागरी अधिकार आणि जमिनीवरच्या मालकी'ची मागणी वाढली, तेव्हा त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी जमीनदारांनी दबाव आणून लष्कर पाठवलं. मग सारंच बिनसलं. इतके दिवस शांत असलेले शेतकरी खवळले. स्व-संरक्षणासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि त्यातून कोलंबियात प्रदीर्घ यादवीचं बीज पेरलं गेलं. कोलंबियातली सर्वात मोठी बंडखोर संघटना फार्क (revolutionary armed forces of Colombia)चा जन्म झाला. याच काळात ईएलएन म्हणजे ‘नॅशनल लिबरेशन आर्मी’ ही आणखी एक डावी संघटना जन्माला आली.
छोट्या-छोट्या गटांमध्ये बांधणी, गनिमी काव्याने लढण्याचं तंत्र आणि दाट जंगलातलं लपणं, यामुळे प्रदीर्घ काळ फार्कचे हे बंडखोर टिकून राहिलेत. काळासोबत बदलत तरुण शेतकऱ्यांसोबत बायका आणि अगदी लहान मुलंही बंदुका खांद्यावर घेऊन संघटनेत आली. कोलंबियाची सुरक्षा दलं, पोलिस स्टेशनं, लष्करी ठाणी, गस्ती पथकं हे बंडखोरांचे लक्ष्य असायचे. पुढे त्यात तेलाच्या पाइप लाइन उडवणे, वीज वाहिन्या तोडणे, पूल उडवणे, सरकारी कार्यालयांवर बॉम्ब हल्ले करणे असेही उद्योग सुरू झाले. शेकडो सामान्य निरपराध लोक यात मारले जाऊ लागले. संघटनेला लागणार्या पैशासाठी खंडण्या, अपहरण यांचं सत्र सुरू झालं. सरकारी अधिकारी, उद्योगपती, परदेशी पत्रकार यांचं अक्षरशः हजारोंच्या संख्येत अपहरण झालं. त्यापुढे कोकेनच्या व्यवसायातल्या टोळ्यांशी संधान बांधता बांधता हे लोकच त्यात उतरले. पैशांचा ओघ सुरू झाला.
इकडे बंडखोरांचा उपद्रव वाढला, तसे जमीनदार आणि अंमली पदार्थांचे व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी एयूसी (United self defense force of Colombia) ही संघटना तयार केली. लष्कर आणि बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे थेट संबंध होते. त्यांनीही हत्याकांडं घडवली. डाव्या बंडखोरांशी चकमकी झाल्या.
गेल्या दशकात या उजव्या आणि डाव्या बंडखोरांपेक्षा कोलंबियात उच्छाद मांडलाय तो BACRIMS ने. हे लोक आधी सक्रिय बंडखोर होते. तिथून बाहेर पडून कोकेनचे उत्पादन, व्यापार यात उतरलेत. भरपूर पैसा आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंध यामुळे ते प्रचंड धोकादायक झालेत. कसलाही राजकीय कार्यक्रम नाही, केवळ हिंसा आणि पैशांची भाषा बोलणारे BACRIMS कोलंबियाच्या सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरलीय.
ह्युअॅन यांची कामगिरी आणि शांततेसाठी निभावलेली भूमिका :
एखादा देश तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ हिंसाचाराच्या छायेत राहतो. तीन चार पिढ्या याच वातावरणात वाढतात, हे भयंकर आहे. बंडखोरांमध्ये तर कोवळ्या वयात जंगलात गेलेल्या अनेकांनी बंदूक आणि हिंसेशिवायचं सामान्य जगणं कधी अनुभवलेलंच नाही. भरपूर साधनं संपत्तीचे स्रोत असूनही घरातले वाद सोडवताना हा देश अक्षरशः मेटाकुटीला आलाय.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत बंडखोरही थकलेत. सुरक्षा दलांकडून सतत हल्ले होताहेत. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे आणि माफियांमुळे वैतागलेल्या अमेरिकेने कोट्यवधी डॉलर बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी कोलंबियाच्या सरकारला दिलेत. बंडखोरांनी त्यांचे अनेक नेते या काळात गमावले. लढाऊ सदस्यांची संख्या घटून २० हजारांहून ७ हजारांवर आली. तरुणांना बंदुकीशिवायचं जगणं अधिक आकर्षक वाटू लागलं. ‘आता हिंसाचार पुरे’ ही मानसिकता वाढली. गेले दशकभर त्यासाठी देशभरातून मोठा दबाव होता. सरकारवर आणि बंडखोरांवरही.
२००६ मध्ये संरक्षण मंत्री बनलेल्या ह्युअॅन यांनी अमेरिकेच्या पाठिंब्यावर फार्कवर कठोरपणे कारवाई करण्यास सुरवात केली. त्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईत फार्कचे अनेक प्रमुख म्होरके मारले गेले. २०१० मध्ये अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या ह्युअॅन यांनी मध्यममार्ग स्वीकारत फार्कशी बोलणी सुरू केली. बंडखोरांवरच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयं, शरणार्थींना सौम्य शिक्षा आणि कोलंबियाच्या काँग्रेसमध्ये फार्कसाठी १० जागा ठेवाव्यात, यावर समझोता झाला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे, यापुढे अपहरण आणि खंडणी वसूल करणार नसल्याचे फार्कने जाहीर केले. ह्युअॅन यांच्या धोरणांमुळे आणि फार्कचीही क्षमता कमी झाल्याने २०१४ पासून त्यांचा सैन्याबरोबर असलेला थेट संघर्ष कमी झाला.
शांतता करारावरील सार्वमत आणि कोलंबियाचे भविष्य :
फार्कसोबत झालेल्या या शांतता करारानंतर देशात सार्वमत घ्यायचं ठरलं. तर जनतेनं ५०.५ विरुद्ध ४९.५ अशा काट्यावरच्या मतांनी हा करार नाकारला! हा अनेकांना धक्का होता. राजकीय विश्लेषकांच्या मते बंडखोरांना या करारात झुकतं माप दिलं गेलंय. शिवाय यावेळी मतदानही केवळ ३७.४ म्हणजे २२ वर्षांतलं नीचांकी असं झालं.
पण तरीही सॅन्तोस आणि बंडखोर - दोघांनाही शांतता प्रक्रिया पुढे न्यायची आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तरी फार्क आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी होण्याची शक्यता नाही. सगळ्या देशभर सकारात्मक वातावरण तयार झालंय. त्यामुळे दोन्ही बाजूंवर शांततेसाठी मोठा दबाव आहे.
सार्वमत मिळवण्यात यश आलेलं नसलं तरी त्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल घेत नोबेल निवड समितीने यावर्षीच्या नोबेल शांततेच्या पारितोषिकासाठी सॅन्तोस यांची निवड केली. कोलंबियामध्ये अराजकतेचे वातावरण असताना शांततेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही या वेळी समितीने म्हटले आहे. शिवाय समितीने कोलंबियाच्या नागरिकांचेही कौतुक केले आहे. प्रचंड नुकसान सहन करूनही या नागरिकांनी शांततेची आशा सोडलेली नाही. गेल्या पाच दशकांत कोलंबियामधील अंतर्गत संघर्षात जवळ जवळ दोन लाख साठ हजार नागरिकांचा बळी गेला असून, ४५ हजार नागरिक बेपत्ता आहेत.
इतर काही खास:
संदर्भ :
लेखिका - धारा

बेंट हॉमस्ट्रॉम आणि ऑलिव्हर हार्ट
चित्र सौजन्य : ndtv.com
नोबेल पारितोषिक विजेते : ऑलिव्हर हार्ट(Oliver Hart) आणि बेंट हॉमस्ट्रॉम (Bengt Holmström)
विभाग : अर्थशास्त्र
देश : अमेरिका
ऑलिव्हर हार्ट, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : ९ ऑक्टोबर १९४८ (सध्या वय : ६८ वर्षे)
बेंट हॉमस्ट्रॉम, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : १८ एप्रिल, १९४९ (सध्या वय : ६७ वर्षे)
कॉन्ट्रॅक्ट थिअरीविषयी अर्थात करार सिद्धांताविषयी क्रांतिकारी स्वरूपाचं संशोधन करणारे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलंडचे अर्थतज्ज्ञ बेंट होमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे.
विश्वासावर चालणारे करार :
कॉन्ट्रॅक्ट अर्थात करार हे आधुनिक समाजात अत्यंत उपयुक्त अशी कार्यपद्धती. कोणत्याही दोन व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा सरकारे यांच्यातील करार हे सहकार्य आणि विश्वासावर होत असतात. काहीवेळा नमूद गोष्टींचे उल्लंघन केल्यास हे करार संपुष्टात येतात. भविष्यातील कार्यपद्धती सुकर होण्यासाठी करार हे सर्वांत महत्त्वाचे ठरतात. उदा. नोकरीसंदर्भातील करारामध्ये चांगल्या कामगिरीसाठी बक्षीस व काही अटींच्या उल्लंघनासाठी हकालपट्टीची कारवाई केली जाते. हे करारामुळेच शक्य होते.
काय आहे कॉन्ट्रॅक्ट थिअरी/करार सिद्धांत?
हा सिद्धांत कराराचे स्वरूप, त्याची व्याप्ती समजावत कराराचा आराखडा समोर मांडतो. कराराच्या विविध पद्धती व आराखडे का असतात, हे उलगडून सांगणे या सिद्धांताचा महत्त्वाचा उद्देश आहे.
करारासंदर्भातील विशिष्ट परिस्थिती व संदर्भ ह्यांवर हा 'करार सिद्धांत' आधारित आहे. हा सिद्धांत कराराच्या मूळ समस्येवर विचार करायला भाग पाडतो. रोजच्या जगण्यातले विविध करार बनवताना, आणि नव्याने कराराची रचना करताना येणाऱ्या प्रश्नांवर हा सिद्धांत उत्तरं देतो.
हॉलस्टॉर्म यांनी प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात १९८१ पासून केलेल्या संशोधनामध्ये टीम वर्कवर जास्त जोर देण्यात आलेला आहे. एक समूह म्हणून होणारी कामगिरी आणि एकल म्हणून कामगिरी, यावरच प्रोत्साहन भत्त्याचे स्वरूप ठरते. विम्यामुळे माणूस निष्काळजी बनतो, याचबरोबर पूर्ण विमा नैतिक अध:पतनास कारणीभूत असतो, असेही हा सिद्धांत मांडतो. त्यानुसार 'बक्कळ तरीही संतुलित प्रोत्साहन भत्ता' हा कामगार व मालक - दोन्ही बाजूंना फायदेशीर ठरतो.
करार सिद्धांतामुळे विमा पॉलिसी, अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तीचं वेतन या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडले. त्याचबरोबर तुरुंग व्यवस्थापनातही मोठ्या सुधारणा झाल्या. 'शिक्षक, तुरुंगांचे सुरक्षारक्षक, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना त्यांच्या कामानुसार वेतन दिले जावे का', किंवा 'शाळा, रुग्णालयं, तुरुंग यासारख्या सेवा खासगी असाव्यात की सार्वजनिक मालकीच्या असाव्यात' या अत्यावश्यक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हार्ट आणि होमस्ट्रॉम यांनी करार सिद्धांताद्वारे काही साधने तयार केली. संपूर्ण व्यवस्थेतील संतुलन कायम राखण्याचे काम त्या दोघांच्या सिद्धांतामुळे झाल्याचे प्रशंसोद्गार नोबेल निवड समितीने काढले आहेत. या संशोधनातून दिवाळखोरीशी संबंधित घटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पाया घातला गेला, असेही म्हणता येईल.
इतर काही खास:
संदर्भ :