आईसलँड - भाग ८ - Jokulsarlon Glacier Lagoon & Diamond Beach

भाग ७

हे केबिन्स आम्हाला फारच आवडले होते. उठून बाहेर बघितलं तर समोरच दिसणारे ग्लेशियर दिसले. चहा घेऊन मग जवळ एक फेरफटका मारून आलो.

.

आदल्या दिवशी भरपूर स्वयंपाक केलेला होताच, त्याचाच पोटभर नाश्ता करून मग निघालो Jokulsarlon Glacier Lagoon कडे. ग्लेशियर आणि समुद्र यांच्या मध्ये हा लहानसा लगून. बर्फाचे मोठे तुकडे ग्लेशियर मधून समुद्रात जातात, त्यात विविध आकाराचे तुकडे आणि प्रकाश जसा असेल त्याप्रमाणे त्याचे रंग बदलत जातात. ढगाळ हवामान असेल निळसर छटा जास्त दिसतात. पुढे हे समुद्र किनाऱ्याजवळ जातात तेव्हा त्यातले स्फटिकासारखे तुकडे सूर्यप्रकाशात चमकतात आणि डायमंड सारखे दिसतात म्हणून याचं नाव डायमंड बीच. या लगून मध्ये आधी बोट टूर जी ग्लेशियर जवळ घेऊन जाईल आणि मग डायमंड बीच असा प्लॅन होता.

पंधरा मिनिटात तिथे पोचलो आणि गाडी पार्क करून आमच्या आधीच बुकिंग केलेल्या बोटींसाठी काउंटर शोधून तिथे रिपोर्टींग केलं. वेळेवर बुकिंग मिळत नाहीत असं ऐकलं होतं, प्रत्यक्षात बरेच जण वेळेवर तिकीट घेत होते, पण उगाच रांगेत उभं राहण्यापेक्षा आधीच तिकीटं काढलेली होती ते सोयीचं होतं.

या जमिनीवर आणि पाण्यावर चालणार्‍या Amphibian बोटींचे भरपूर टूर्स आहेत. ही त्याची लिंक. या बोटीने ग्लेशियरच्या जवळ जाता येतं.

.

दर दहा ते पंधरा मिनिटांनी बोट टूर्स आहेत. सगळ्यांना लाईफ जॅकेट्स देण्यात आले. जागेवर बसून राहा आणि आम्ही सांगू तेव्हाच उठा अशा सूचना देण्यात आल्या. कोण कुठून आले आहेत याची चौकशी झाली आणि बोटीची गाडी निघाली. पाण्यात शिरल्यावर ही पूर्ण बोट झाली आणि हळूहळू ग्लेशीयरच्या दिशेने जाऊ लागली. ग्लेशियरच्या जवळ आणि वेगवेगळ्या कोनातून हिमनगाचे तुकडे बघणे हा अतिशय छान अनुभव होता. मग मध्यावर एका ठिकाणी बोट थांबली आणि आता तुम्ही उभं राहून पण बघू शकता असं सांगण्यात आलं.

.

.

.

.

.

.

प्रत्येक तुकड्याचे रंग वेगळे, आकार वेगळे. एकीकडे समुद्र आणि एकीकडे बर्फाचे थर. दुरून ग्लेशियर बघताना डोंगरावर बर्फाचा थर असेल असं काहीसं वाटतं पण जवळ गेलो की त्याची भव्यता जाणवायला लागते, काहीशी अंगावर येते म्हणता येईल. आइसलँड का बघायलाच हवं याचा पुन्हा पुन्हा नवीन अनुभव मिळत होता. एका दुसऱ्या लहान बोटीतून मग या बोटीवर बर्फाचा एक मोठा तुकडा आणून दिला आणि हा काही वर्षं जुना बर्फ आहे असं सांगितलं, मग तिथेच त्याचे तुकडे केले आणि सगळ्यांना हाताळायला, खायला दिले. बर्फ खायला मिळतोय म्हणून सृजन आणि इतरही लहान मुलं खुश झाली.

.

मधूनच दूरवर एक सील दिसला, म्हणजे आम्हाला सहजी दिसला नाही, त्या बोटीवरच्या माणसाने दाखवला. त्याच्या त्या संथ अ‍ॅक्शन्स, रांगणे, लोळणे सगळंच बघायला मजा येत होती. एका बाजूने थोडं पुढे चालत गेलात तर अजून बरेच सील दिसतील असं तो म्हणाला, पण नंतर आमचं जाणं झालं नाही.

.

बोटीत बसायचं आहे हे आम्ही सतत सृजनला सांगत होतो. एकदाचं ते बोटीत बसणं झालं त्यामुळे गडी शांत झाला होता. बाहेर येऊन सृजनने पुन्हा दगड पाण्यात फेकणे हा त्याचा उद्योग पुढे चालू ठेवला. मोठी मुलं ज्या पद्धतीने हे करत होते तसाच तोही प्रयत्न करत होता. बरेच व्यावसायिक फोटोग्राफर्स इथे मोठमोठे कॅमेरे घेऊन होते, कुणी झोपून तर कुणी कोपऱ्यात दगडावर बसून वेगवेगळे फोटो टिपत होते.

इथेच किनाऱ्यावर या बोटींसाठी वापरलं जाणारं ऑइल सगळीकडे दिसत होतं, पाणी गढूळ झालेलं दिसत होतं. ते बघून पर्यटनाच्या या हौशीपायी आपण अप्रत्यक्ष पणे निसर्गाची हानी करत आहोत ही बाब ते बघून बराच वेळ डोक्यातून जात नव्हती.

मग रस्त्याच्या पलीकडे डायमंड बीच वर गेलो. जून महिना असल्यामुळे तिथल्या हवामानाप्रमाणे खूप हिमनग नव्हते, म्हणजे जसे फोटो पाहिले होते तसे नव्हते. पण जे होते तेही सुंदरच दिसत होते. हाही काळ्या वाळूचा किनारा आहे. इथेही ज्वालामुखीच्या खुणा आहेत. एका बाजूला इतका प्रचंड बर्फ, एकीकडे समुद्राचं गार, गोठवणारं पाणी, त्या लाटा, ग्लेशियर मधून वाहत येणारे मोठे हिमनगाचे तुकडे आणि मग वेगवेगळे आकार आणि रूपं घेत, कधी पारदर्शक स्फटिकासारखे तर काही निळसर छटांचे, आणि लाटांच्या माऱ्याने मग हळूहळू पाण्यात मिसळून जाणारे, असा सगळाच आगळावेगळा निसर्ग. संध्याकाळी, किंवा उन्हाळ्यात मध्यरात्री सूर्य मावळताना हे सगळं दृष्य अजूनच सुंदर दिसतं. आत्ता उन्हाळ्यामुळे हे बर्फाचे हिरे तसे कमी दिसले, पण दृष्य सुंदर होतं.

.

.

.

.

इथे लहान बर्फाचे तुकडे हातात घेऊन फोटो काढले, नवर्‍याने बघ मी दिलेला डायमंड वगैरे विनोद केले आणि ते मी योग्य शब्दात परतवून लावले. सृजन इथेही दगड उचलत होता. मग त्यातले दोन तीन छान दगड मी आईसलँडची ही खास आठवण म्हणून उचलले.

ही जागा म्हणजे महाबळेश्वरचा वेण्णा लेक आठवला. सगळं कमर्शियल झालेलं, गर्दी, गडबड असं. सृजनने इथे भरपूर मजा केली, कधीचा बर्फ बघायचा होता तो जवळून बघता आला, बोटीत बसता आलं, बर्फाशी खेळता आलं त्यामुळे छान वाटत होतं.

भूक लागली होती आणि थंडीचाही त्रास होत होता, त्यामुळे सरळ पुन्हा केबिन्स मध्ये परत आलो आणि आराम केला.

मग पुन्हा केबिन्सच्या परिसरात पायी फिरून आलो. तिथून दुसऱ्या एका ग्लेशियर कडे जाणारा एक रस्ता सुमेधला सतत खुणावत होता. केबिन मध्ये काही माहितीपत्रकं दिली होती ती वाचून मग तिथल्या मालकाकडे त्या रस्त्याची जरा चौकशी केली, तो म्हणाला की तुम्ही गाडी घेऊनही जाऊ शकता किंवा पायी पण, आणि सहज जाता येईल. पण आईसलँड मध्ये काही रस्ते हे एफ रोड म्हटले जातात, थोडक्यात कच्चे डोंगरातले रस्ते, जिथे जाण्यासाठी वेगळ्या गाड्या लागतात. रेंट करून घेतानाच हे ठरवावं लागतं. आम्ही घेतलेली गाडी तशी नव्हती, पण तो माणूस म्हणाला की या गाडीनेही जाता येईल. रेंटची गाडी असल्यामुळे कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती, मग थोडा अंदाज घेऊन येतो म्हणून सुमेध गाडीने अगदी २ किलोमीटर जाऊन त्या बाजूला जाऊन बघून आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पायी जाउ शकतो हे लक्षात घेऊन परत आला. आम्ही मायलेक झोपू आणि तू जाऊन ये निवांत असं ठरवून सगळे झोपलो. हा दिवस अजूनच नवीन काही अनुभव देणार आहे हे तेव्हा डोक्यातही नव्हतं.

क्रमश: