अमेरीकेतील हायस्कूल प्रवास

ही लेखमाला मी लेकाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले तेव्हा दुसर्‍या संकेतस्थळावर लिहिली होती. इथे बर्‍याच मैत्रीणींची मुलं मिडलस्कूल सुरु करत आहेत त्यांना कदाचित याचा उपयोग होईल म्हणून पुन्हा इथे डकवतेय.

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -१

ही लेखमाला मी लेकाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले तेव्हा दुसर्‍या संकेतस्थळावर लिहिली होती. इथे बर्‍याच मैत्रीणींची मुलं मिडलस्कूल सुरु करत आहेत त्यांना कदाचित याचा उपयोग होईल म्हणून पुन्हा इथे डकवतेय.

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

१ जूनला माझ्या मुलाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले. चार, नाही, खरे तर पाच वर्षांचा प्रवास. इथे हायस्कूल करणारी पहिली पिढी. त्यामुळे आमच्यासाठीही हा प्रवास नवीनच होता. काही निर्णय योग्य ठरले, काही चूका झाल्या तर काही वेळा he was just lucky. या प्रवासात पालक म्हणून आम्ही जे शिकलो ते इतरांना कदाचित उपयोगी पडेल म्हणून हा लेख.

अमेरीकेतील शिक्षण पद्धतीत हायस्कूलची चार वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात केलेली तयारी, घेतलेले कोर्सेस, ग्रेड्स, स्कोअर्स, समाजसेवा यावर पुढील शिक्षणाचे दरवाजे उघडणार असतात. तसेच या महागड्या शिक्षणाच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी लागणार्‍या स्कॉलरशिप्स आणि ग्रॅंट्स देखील विद्यार्थ्यांनी या चार वर्षांत शाळेत आणि शळेबाहेर जी काही कामगिरी केली त्यावर अवलंबून असतात. म्हणताना जरी हायस्कूलची चार वर्षे धरली तरी आजकाल बहूतेक शाळांतून मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे काही कोर्सवर्क करता येते त्यामुळे खरे तर मिडलस्कूलपासूनच हा प्रवास सुरु होतो.

मिडलस्कूल : ६वी ते ८वी
५वी पर्यंत वेगवेगळ्या प्राथमिक शाळांत शिकणारी मुले गावातल्या मिडलस्कूलमधे येतात. ६वीचे वर्ष नव्या बदलाशी जमवून घ्यायचे. प्रत्येक विषयासाठी नवीन शिक्षक, लॉकर्स, वर्गातील काही मुले माहितीची तर काही दुसर्‍या, खरेतर प्रतिस्पर्धी शाळेतली. त्यातच ५वी त 'दादा' असलेली मुलं इथे परत लोअर क्लास झालेली असतात. स्कुलबसने जातायेता हे बदललेलं स्टेटस सुरुवातीला चांगलच जाणवतं. पण बहूतेक मुलं महिन्याभरात रुळतात. मुलांना रुळायला कठीण जात असेल तर वेळीच काउंसेलरला भेटावे. तसेच मुलांना काही हेल्थ कंडीशन असेल त्याची हेल्थ फाईल प्रत्येक शिक्षकाच्या नजरेखालून गेली आहे ना याची खात्री करावी. इतरही काही सवलत किंवा सुविधा आवश्यक असेल तर त्याबाबत काउंसेलर आणि शिक्षकांशी बोलावे. शाळा सुरु होताना ओपनहाऊस असते. तेव्हा मुलाच्या होमरुम टिचरना भेटून आपल्या पाल्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. काही कंसर्न असतील तर सांगाव्यात. होमरुम टिचर आपापल्या मुलांची खूप छान काळजी घेतात. या वयात मुलं आपल्या 'वेगळे' असण्याबद्दल खूप संवेदनाशील होतात. अशावेळी आधी बोलणे झाले असेल तर शिक्षक खूप छान पद्धतीने मुलांना सामावून घेतात. इतर मुलांना परीस्थिती समजावून सांगतात.

इथे शाळेत अभ्यासाबरोबरच खेळ आणि इतर कलागुणांनाही महत्व असते. मिडलस्कूलपातळीवरील अभ्यासाच्या ग्रेड्स आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटीज जरी कॉलेज अॅडमिशनसाठी विचारात घेतल्या जाणार नसल्या तरी हायस्कूल मधील यशाचा पाया मिडलस्कूलमधे घातला जातो.

मुलांना पुढे हायस्कूलसाठी खेळायचे असेल तर ही वर्षे महत्वाची. प्राथमिक शाळेत बहुतेक ठिकाणी सगळ्या मुलांना टीमवर घेतात. मिडलस्कूलमधे हे बदलते. कोच मंडळींचे नव्या मुलांवर बारीक लक्ष असते. टीम मध्ये सिलेक्शन झाले नाही निराश न होता सराव चालू ठेवावा. मुलांचा सुधारलेला खेळ, वर्तन बघून बरेचदा पुढील सिझनला कोच ऑफर देतात. सिलेक्शन झाल्यास या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा. भरपूर मेहनत करावी. बॉइज क्लब, गर्ल्स इंक चे प्रोगॅम्स असतात. तिथेही खूप शिकायला मिळते. हायस्कूलला वर्सिटी स्पोर्ट्स खेळायचे असतील तर मिडलस्कूलमधे मेहनत आवश्यक.

६वी पासून अभ्यास वाढायला सुरुवात होते. बरेचदा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट्स किंवा प्रोजेक्ट्स असेही होते. रोजच्या रोज अभ्यास आणि प्लॅनर वापरायची सवय लावली तर आयत्या वेळचे मेल्टडाऊन टळतात. मिडलस्कूलमधे टाईम मॅनेजमेंट आणि नियमित अभ्यासाची सवय लागली की हायस्कूल सोपे होते. इथे शाळेतील शिक्षक खूप मदत करतात. मुलांची शाळेत लवकर येण्याची किंवा शाळा सुटल्यावर थांबायची तयारी असेल तर कठीण भाग पुन्हा समजावून सांगतात. त्या त्या आठवड्यात शिकवलेल्या भागापैकी जे काही नीट समजले नसेल त्यासाठी शिक्षकांकडे वेळीच मदत मागावी.
रोजचा ग्रुहपाठ आणि विकेंडला थोडा अभ्यास किंवा प्रोजेक्ट्सची तयारी एवढे या लेवलला पुरेसे असते. या पातळीवर हा अभ्यास मुले आपला आपण करु शकतात. अभ्यासाव्यतिरिक्त रोज कमीतकमी अर्धा तास अवांतर वाचन होणे गरजेचे आहे. हे वाचन शक्यतो ग्रेड लेवलच्या वरचे असावे. यामुळे एकंदरीत भाषेचा अभ्यास सोपा होतो. त्याचबरोबर शक्य झाल्यास विकेंडला मुलांच्या आवडीचे एक-दोन निवडक कार्यक्रम मुलांबरोबर बघायची, त्यावर चर्चा करायची सवय लावावी. यामुळे स्वतंत्र विचार करायची, आपले विचार मांडायची मुलांना सवय लागते आणि आपल्यालाही त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळते.
बँड किंवा कॉयर यापैकी जे काही निवडले असेल त्याचाही नियमीत सराव हवा. म्युझिकमधे पुढे काही करायचे नसले तरी म्युझिक डिपार्टमेंट मधे लागलेली शिस्त, एकत्र काम करणे, कलेबद्दलची जाणीव वगैरे गोष्टी पुढे कायम साथ देतात.
बर्‍याच शाळांतून आजकाल मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे गणित विषयाचे कोर्स घेता येतात. मात्र त्यासाठी ६वीत गणिताची चांगली तयारी हवी. तयारी चांगली असेल तर गणिताचे शिक्षक वरच्या वर्गाच्या कोर्ससाठी निवड करतात. निवड झाल्यास रोजचा ग्रूहपाठ आणि विकेंडला कन्सेप्ट क्लिअर आहेत ना हे बघण्यासाठी थोडा सराव सोडल्यास फार काही करावे लागत नाही. काही शाळा ८वीसाठी हायस्कूल बायोलॉजी घेण्याचा पर्याय देतात. बरेचदा कोर्सची अॅडमिशन टिचर रेकमेंडेशनवर असते. मिडलस्कूलला हायस्कूल लेवलचे कोर्स घेणार असल्यास अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तसेच या ग्रेड हायस्कुल ट्रान्सक्रिप्टवर कायम होतात. त्यामुळे कोर्ससाठी निवड झाल्यास मुलांशी चर्चा करुन, एकंदरीत कोर्सवर्क आणि वाढीव कष्टाची मुलांना कल्पना देऊन अॅडमिशनचे ठरवावे. माझ्या मुलाला जेव्हा हायस्कूल कोर्सेस ऑफर केले गेले तेव्हा डिपार्टमेंट हेडशी बोलून कोर्ससाठी काय अपेक्षित आहे ते समजून घेतले. मुलाला एकंदरीत काय अभ्यास करावा लागेल त्याची कल्पना यावी म्हणून क्रमिक पुस्तके शाळेकडून विकेंड्साठी मागून घेतली. त्याच्या इतर अॅक्टिविटीज आणि वाढीव अभ्यास यासाठीच्या वेळाचा ताळमेळ जुळतोय ना ते पाहिले. माझ्या मुलाने ८वीत अल्जिब्रा -१ आणि बायलॉजी ऑनर्स असे दोन हायस्कूल कोर्सेस घेतले. अल्जिब्रा - १ मुळे हायस्कूलला AP Calculus घेता आले तर बायोलॉजी ऑनर्स मुळे आवडत्या विषयांसाठी हायस्कूल स्केड्युलमधे जागा झाली. मिडलस्कूलला हायस्कूलचे कोर्सेस घेण्याचा फायदा म्हणजे हायस्कूलमधे वेगवेगळे AP कोर्सेस घेणे शक्य होते. हायस्कूलमधे कुठले AP कोर्सेस उपलब्ध आहेत ते पाहून शिक्षक आणि काउंसेलरच्या मदतीने एकंदरीत मार्ग आखावा. फंडिंग उपलब्ध असेल तर मिडलस्कूलमधे फॉरीन लँग्वेजचा पर्यायही उपलब्ध होतो. तसे असेल तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. मिडलस्कुलमधे हायस्कूलचे कोर्सेस उपलब्ध नसतील तर काळजी करु नये. कॉलेज अॅडमिशन ऑफिस विद्यार्थ्याच्या करीयर ट्रॅकनुसार हायस्कूलमधे जे काही सगळ्यात वरच्या लेवलचे कोर्सेस उपलब्ध आहेत ते विद्यार्थ्याने चांगल्या ग्रेड्सह पूर्ण केलेत ना एवढेच पहाते.

मिडलस्कूलमधे शाळेच्या वेगवेगळ्या क्लब्जमधून एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिविटीज मधे भाग घेता येतो. . यामुळे आपल्या वर्गाव्यतिरिक्त इतर वर्गातील मुलांशी ओळखी होतात. समविचारी मित्र-मैत्रीणी भेटतात. क्लब्ज व्यतिरिक्त शाळेच्या अ‍ॅथलेटिक्स डिपार्टमेंटमधे वेगवेगवेगळ्या संघांसाठी मॅनेजर होण्याची संधी उपलब्ध असते. काम करावे लागते पण त्यातूनच नेतृत्व करायची, वेळेचे नियोजन करायची सवय लागते. शाळेव्यतिरीक्त 4-H तर्फेही विविध संधी उपलब्ध असतात. 4-H हे खेड्यातील शेतीवाल्यामुलांसाठी आहे असा एक गैरसमज असतो. अर्बन सेटिंग मधील मुलांनाही 4-H मधे बरेच काही शिकता येते. मुलामुलींसाठी केक डेकोरेशन पासून रोबोटिक्स पर्यंत विविध उपक्रम यात असतात. गावात समाजसेवेच्याही अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला काय करायला आवडते हे समजून घ्यायला मिडलस्कूलचा काळ योग्य. तेव्हा उपलब्ध असलेल्या संधी अजमावून पहाव्यात. निरनिराळे अनुभव घेऊन आपल्याला काय आवडते ते पहावे आणि त्यानुसार हायस्कूलला कुठल्या १-२ अॅक्टिव्हिटी करायच्या ते ठरवावे.

८वी च्या शेवटच्या ग्रेडिंग पिरिएडच्या सुरुवातीला हायस्कूलचे स्केड्युल आखून ९वी (फ्रेशमन इअर) साठी कोर्सेस ठरवावे लागतात. त्यासाठी ८वीच्या दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला हायस्कुलचे कोर्सबुक डोळ्याखालून घालावे. हायस्कूलच्या वेबसाईटवर हे उपलब्ध असते. नसल्यास हायस्कूल गायडन्स ऑफिसाकडे विचारणा करावी. पुढील ४ वर्षांचा मार्ग आखताना स्केड्युल कंफ्लिक्ट, कोर्स रद्द होणे, मुलांना घेतलेला कोर्स न आवडणे वगैरे शक्यता विचारात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करून ठेवावा. हायस्कूलमधे बरेचदा शाळा सुरु व्हायच्या ८-१० दिवस आधी स्केड्युल कंन्फ्लिक्टचे घोळ लक्षात येतात. काही वेळा बजेट कट्स मुळे निवडलेला कोर्स रद्द झालेला असतो. अशावेळी आधी विचार केला नसेल तर आयत्यावेळी गडबड उडते. माझ्या मुलाच्या बाबतीत दोनदा अशी गडबड झाली. एकदा कोर्स रद्द म्हणून आयत्यावेळी दुसरा पर्याय शोधावा लागला तर एकदा स्केड्युल कंफ्लिक्ट म्हणून बिझिनेस एलेक्टिवच्या जागी अजून एक फॉरीन लँग्वेज घ्यावी लागल्याने अचानक वर्कलोड वाढले. तेव्हा उपलब्ध पर्याय आधीच विचारात घ्यावेत.

इथे वयाची १४ वर्षे पूर्ण झाली की मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शाळा सांभाळून पार्टटाईम नोकरी करु शकतात. शक्य असेल तर किमान सुट्टीत तरी नोकरी करावी. बहुतेक जणांसाठी मिडलस्कूल पूर्ण केल्यावर घेतलेला समर जॉब हा पहिला वहिला जॉब असतो. जॉब शोधण्यासाठी बरेचदा शाळेतील शिक्षकांची मदत मिळते. शाळेतील सिनियर फ्रेंड्स, समाजसेवा आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटी निमित्ताने ओळखीची झालेली मोठी माणसे वगैरे मंडळी देखील जॉब मिळवण्यासाठी मदत करतात. माझ्या मुलाला आत्ता पर्यंतचे सगळे जॉब शिक्षक आणि ब्युरो डायरेक्टर्सनी कामाच्या संधींबद्दल सुचना दिल्यामुळे मिळाले. जानेवारीपासून काम शोधायला सुरुवात केली तर सुट्टी सुरु होताना हातात काम असेल. नोकरी व्यतिरिक्त लॉन केअर, स्नो काढणे, बेबी सिटिंग वगैरे करुनही मुले अर्थार्जन करु शकतात. इथे हॉस्पिटल्समधे बेबीसिटिंगचा कोर्स असतो. तो केल्यास बेबीसिटिंगची कामे मिळणे सोपे जाते.

मिडलस्कूलचा काळ छान एंजॉय करावा. मिडलस्कूलच्या एखाद्या विषयात ग्रेड कमी मिळाली म्ह्णून निराश होऊ नये. कुठे कमी पडत आहोत ते शोधून सुधारण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी सजग रहावे. पण उगाच स्ट्रेस घेऊ नये. मुलांचे 'मोठे' होणे एंजॉय करावे.

टीप : लेखातील माहिती माझ्या माफक अनुभवावर आधारीत आहे. इतर मायबोलीकरांनी त्यात आपापल्या अनुभवानुसार जरूर भर घालावी ही विनंती.

AP Courses
AP courses कॉलेज लेवलचे कोर्सेस असतात. हायस्कूल मधे हे कोर्सेस घेता येतात. परीक्षा कॉलेजबोर्ड (हो. तेच ते सॅट वाले) घेते. परीक्षेत स्कोर चांगला आला तर कॉलेज क्रेडिट मिळू शकते. या कॉलेज क्रेडिटचे प्रत्येक युनिवर्सिटीचे स्वतःचे असे नियम आहेत. त्याबाबतची माहिती युनिवर्सिटी देते. बर्‍याचदा AP course हा dual credit असतो. अशावेळी हायस्कूलचे तुमच्या स्टेटमधील पब्लिक युनिवर्सिटीशी कॉन्ट्रॅक्ट असते. कोर्सचे फ्रेमवर्क हे एकाचवेळी AP आणि युनिवर्सिटीचा संबंधीत कोर्स यानुसार असते. विद्यार्थी AP/university credit/dual यापैकी हवा तो पर्याय निवडू शकतात. यातील युनि. क्रेडीट स्टेट मधील बहुतेक पब्लिक युनिवर्सिटी घेतात. स्टेट्मधील प्रायवेट युनिवर्सिटीच्या बाबतीत तुमच्या स्टेटचे लॉज कसे आहेत त्याप्रमणे क्रेडिट ट्रान्सफर होते किंवा नाही. बाहेरच्या स्टेट मधे बहूतेक वेळा क्रेडीट ट्रान्सफर होत नाही.

Keywords: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - २

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -१

मुलं मिडलस्कूलमधे जातात तेव्हा नविन शाळा, वाढलेला अभ्यास, खेळातील स्पर्धा वगैरे गोष्टींशी त्यांना जमवून घ्यावे लागते. त्यातच भर म्हणून शरीरात होणारात बदल आणि त्यातून मनात उठणारी वादळे ही याच काळात सुरु होतात. अपरीपक्व वयातील पीयर प्रेशर आणि वेगवेगळी प्रलोभने यामुळे मुलं गोंधळून जातात. मुलांनी वरवर मोठं झाल्याचा कितीही आव आणला तरी आईबाबांच्या भक्कम आधाराची गरज याच काळात जास्त असते. डेटिंग ते कर्फ्यु आणि इंटरनेट ते प्रिस्क्रिप्श्न ड्रग्ज पर्यंत बर्‍याच गोष्टींच्या सीमा रेषा ठरवाव्या लागत असल्याने पालकांसाठीही हा काळ काहीसा परीक्षेचा असतो. आमच्यासाठीही होता. पण याचकाळात मुलाबरोबर जे नवे मैत्रीचे, विश्वासाचे नाते तयार होत गेले ते बघता हा काळ खूप आनंददायी देखील होता.

डेटिंग - : प्राथमिक शाळेत निखळ असलेली मैत्री या काळात थोडी बदलू लागते. इथे ६वी-७वी पासून हळूहळू काही मुलं डेटिंग करायला लागतात. हे डेटिंग बहुतेक वेळा मुव्ही, पिझा इतपतच असतं. एक प्रकारची प्लेडेटच. दोघांपकी कुणाचे तरी पालक मुलांना मुवीला नेऊन सोडतात आणि मुवी सुटला की पिकप करुन पिझा किंवा आयस्क्रिम खायला नेतात. बरेचदा २-३ जोड्या मिळून ग्रुपडेटही करतात. जोड्या जमतात आणि शुल्लक कारणावरुन तुटतातही. चिटिंगचे आरोप होतात, जोडीदार पळवला म्हणून भांडणे होतात, मैत्री तुटते. नाही म्हटले तरी मन गढूळ होते, अभ्यासावर परीणाम होतो. माझ्या मुलाच्या बाबतीत अजून एक प्रश्न होता. तो म्हणजे इंटर रिलीजीअस डेटिंग साठी आवश्यक असलेली समज त्याला किंवा त्याच्या मित्र मैत्रीणींना नव्हती. या सगळ्याचा विचार करून आम्ही मुलाच्या बाबतीत १६ च्या आत डेटिंग नाही असा निर्णय घेतला. त्याला शांतपणे समजावून सांगितल्यावर त्यालाही ते पटले. त्यातून त्याला खरेच मनापासून कुणाबद्दल विशेष काही वाटायला लागले तर याबद्दल पुन्हा बोलून, विचार करुन काय करायचे ते ठरवू मात्र सगळे करतायत म्हणून डेटिंग फॉर द सेक ऑफ डेटिंग नको असेही सांगितले. Dating is a wonderful experience if done at the right the age अशी डेटिंगबद्दल सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे जेव्हा घरी कळू न देता कर असे काही मित्र-मैत्रीणींनी सुचवले तेव्हा ' I am not going to do it as if it's sin. ' असे सांगून मुलाने लपून छपून डेटिंगला नकार दिला. आम्ही मुलगा १० वर्षांचा असल्यापसून वयात येताना मुलगा आणि मुलगी यांच्यात होणार्‍या शारीरीक बदलांबद्दल बोलायला सुरुवात केली होती. त्यात भर म्हणून हेल्दी रिलेशनशिपबद्दलही बोलायला सुरुवात केली. जेंडरलेस मैत्रीला प्रोत्साहन दिले. अर्थात नेहमीच सगळे सुरळीत घडायचे असे नाही. वेड्या वयाचा परीणाम म्हणून अधून मधून हॉलबडी, मुलीने मुलाचे जॅकेट घालणे वगैरे काहीबाही खुळंही चालायची. मात्र आम्ही या गोष्टींकडे एक फेज म्हणून बघितले. लेकाचे फ्लीसचे जॅकेट दिवसभर त्याची मैत्रीण घालून बसते कळल्यावर लेकाला काही न बोलता एक्स्ट्रा जॅकेट द्यायला सुरुवात केली. विंटर बरोबर जॅकेटचे खूळही गेले. Happy शाळेत सेक्स एज्युकेशनच्या अंतर्गत अ‍ॅब्स्टिनन्सवाले भाषण वगैरे द्यायचे. आम्ही त्याच्या जोडीला कमिटेड रिलेशनशिप, सेफ सेक्स वगैरे कव्हर केले. शाळेत डान्स असायचे. फॉर्मल ड्रेसकोड आणि टिचर्सनी निवडलेले म्युझिक असल्याने एकंदरीत क्राऊड मर्यादेत वागायचा. काही अनुचित घडू नये म्हणून बडी सिस्टिम वापरायला शिकवले होते. ६वी-७वीत पक्की डेट नसल्याने माझा लेक त्याच्या ग्रुप मधील सिंगल मैत्रीणींबरोबर डान्स करायचा. ८वीच्या सेकंड टर्म पर्यंत त्याच्या मैत्रीणींना बॉय फ्रेंड मिळाले होते. ग्रुप बरोबर जाऊन तिथे कुणा रँडम मुलीबरोबर नाच करण्यात लेकाला स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यावर्षी मात्र त्याने डान्सला न जाण्याचा निर्णय घेतला.

पार्ट्या आणि कर्फ्यु :
माझ्या मुलाला पालकांच्या देखरेखीखाली होणार्‍या पार्ट्याना जायला परवानगी होती. पालक हजर असले तरी ५०-६० टीन एजर्सचा ग्रुप हाताबाहेर जाण्यास वेळ लागत नाही हे लक्षात घेऊन त्याला वॉर्निंग साइन्स ओळखायला शिकवले. थोडे जरी अनकंफर्टेबल वाटले तरी सेल वर मेसेज पाठव आम्ही घ्यायला येऊ हे पुन्हा पुन्हा सांगितले. एक अशीच ५-७ वेळात ठेवलेली पार्टी हाताबाहेर गेली. मुलाशी आधीच बोलणे झाले होते तरी गडबडून जाऊन तो आणि त्याच्या दोघी मैत्रीणी तिथून बाहेर पडले आणि साईड वॉक नसलेल्या रस्त्यावरून चालत सेफ प्लेस असलेल्या बॉइज क्लबच्या दिशेनी चालायला लागले. सुदैवाने थोडे अंतर गेल्यावर बीटवर असलेल्या पोलीसाने थांबून चौकशी केली. असे रस्त्याच्या कडेने चालणे सेफ नाही सांगितले. मग लेकाने तीनही घरी फोन केला आणि आम्ही मुलांना घरी घेऊन आलो.
माझ्या मुलाला आम्ही घरी नसताना मित्र-मैत्रीणींना घरी बोलवायला तसेच पालक नसताना त्यांच्याही घरी हँग आउट करायला परवानगी नव्हती. कर्फ्यु टाईम प्रसंगानुसार ९:३० ते १० या रेंजमधे असायचा. नियम मोडल्यास त्याचे काय परीणाम असतील हे आधीच त्याच्याशी बोलून ठरवले होते.

बुलिंग, हॅरॅसमेंट वगैरे
आजकाल सर्व शाळाच्या अ‍ॅंटीबुलिंग पॉलिसीज असतात. त्यासंबंधी माहिती पत्रकात असते. जोडीला वर्कशॉप्सही असतात. मात्र अधून मधून होणारे अनवॉन्टेड अडव्हान्सेस, डेटिंग वायलन्स याबाबत फार कमी बोलले जाते. मिडलस्कूलम्धे काही वेळा मुलींना मुलांचा उपद्रव होतो. अशा वेळी वेळीच न घाबरता तक्रार करावी. बदनामी होइल म्हणून घाबरू नये. शाळा अशा तक्रारींची लगेच दखल घेते. माझ्या मुलाच्या मैत्रीणींना असा त्रास झाला होता तेव्हा शाळेने लगेच योग्य ती कारवाई केली. या सगळ्या प्रकारात मैत्रीणींची व्यथा ऐकून /पाहून माझा मुलगा आणि त्याचे मित्रही बरेच समजूतदार झाले. काही वेळा मुलींचाही मुलांना उपद्रव होतो. एका मुलीला डेटिंगसाठी नाही म्हटले म्हणून माझ्या मुलाला असा उपद्रव झाला होता. अशा वेळी देखील शाळा योग्य ती कारवाई करते. बरेचदा या वयात आपापसात हिशोब चुकता करायची खुमखुमी असते पण इथले कायदे बघता काहीवेळा त्याचे परीणाम गंभीर होऊ शकतात याची पाल्याला आणि त्याच्या मित्र-मैत्रीणींना कल्पना द्यावी.

सेलफोन, इंटरनेट, मेडिया
मिडलस्कूलमधे मुलं एक ट्रान्सपोर्टेशन सोडले तर बर्‍यापैकी स्वतंत्र होतात. साहाजिकच त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग रहावे लागते. सेलफोन, इंटरनेटचा चुकून जरी अयोग्य वापर झाल्यास त्याचे गंभीर परीणाम होऊ शकतात.माझ्या मुलाला तो १६ पूर्ण होईपर्यंत स्वतंत्र इमेल आणि फेसबुक अकाउंट नव्हते. त्याचे कामाचे सगळे इमेल्स हे फॅमिली अकाउंटला यायचे. इंटरनेटचा वापर आमच्या देखरेखीखाली व्हायचा. सेलफोन साधा इमर्जन्सीसाठी वापरण्यायोग्य पे अॅज यु गो होता. एवढी काळजी घेऊनही डेमोक्रॅटिक कन्वेशनसाठी एकंदरीत प्रोसीजरचा भाग म्हणून सेलफोन नं. सबमिट केल्यावर साधारण १५ दिवसांनी त्याच्या फोनवर ड्रग्ज विकत घ्या म्हणून वॉइसमेल, मेसेजेस यायला लागले. आम्ही लगेच पोलीसांची मदत घेतली तरी मेसेजेस थांबायला १५ दिवस लागले. विडीयो गेम्स आणि टिव्हीच्या माध्यमातून मुलापर्यंत काय पोहोचत आहे त्यावर अंकुश ठेवला. आमच्या कडे केबल नव्हती/ नाहीये. स्कूल नाईटला ६:३० च्या न्युज व्यतिरिक्त टिव्ही टाईम नव्हता. विकेंडला तो बहुतेक वेळा आमच्या बरोबर टिव्ही बघायचा. बहूतेक शाळा सेक्स्टिंग बाबत वर्षाच्या सुरुवातीला माहीती देतात. पालकांनी देखील आपापल्या स्टेटचे सेक्स्टिंग संबंधीचे कायदे माहीत करुन घ्यावेत आणि पाल्यालाही समजावून सांगावे. लोकल पोलिसांतर्फे बर्‍यच ठिकाणी मुलांसाठी अणि पालकांसाठी इंटरनेट सेफटी वर्कशॉप्स असतात त्याचा जरूर फायदा घ्यावा.

इल्लिगल ड्रग्ज, अल्कोहोल, प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज, गन्स
आमच्या काउंटीमधे मेथ लॅब्जचा सुकाळ असल्याने ड्रग्ज संबंधी बोलणे ४थी-५वी पासूनच सुरु केले होते. अल्कोहोल बद्दलही त्याच सुमारास बोलायला सुरुवात केली होती. मिडल स्कूल मधे ड्रग्ज, अल्कोहोलच्या जोडीला प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज बद्दल बोलायला सुरुवात केली. अभ्यास करताना लक्ष केंद्रीत व्हावे म्हणून ते 3-D movie बघताना अधिक मजा यावी म्हणून विविध कारणांसाठी प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचा गैरवापर केला जातो. ६वी-७वीतली मुलं याबाबतचे अज्ञान, पियर प्रेशर याला बळी पडतात आणि इमर्जन्सी रुमला जायची वेळ आणतात. आमच्या सुदैवाने माझ्या मुलाला वायप्रेसच्या प्रिस्क्रिप्शन ड्रगवरील स्टोरीसाठी इलस्ट्रेटर म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यावेळी होणार्‍या चर्चा, केलेला रिसर्च, समोर आलेला डेटा या सगळ्यातून लेक याबाबत खूप जागरूक झाला आणि आमचे काम सोपे झाले.
आमच्या मित्र मंडळीत तसेच मुलाच्या मित्रमंडळींत हंटिंग खूप कॉमन असल्याने रिस्पॉन्सिबल गन ओनरशिपबाबत आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही होतो.

मनी स्किल्स : माझ्या मुलाला आम्ही तो लहान असल्यापासून पॉकेट मनी देत होतो. बेसीक मनी स्किल्स शिकवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मिडलस्कूलमधे त्याला हळूहळू लोन, क्रेडिट, इंटरेस्ट, टॅक्सेस वगैरे गोष्टींची ओळख करुन दिली. गृह कर्ज, इमर्जन्सी फंड, रिटायरमेंट, एज्युकेशन फंड वगैरे गोष्टी स्टेटमेंट्स दाखवून समजावून सांगितल्या. खरेदी करताना आपले बजेट, गरजा, चैन यांचा मेळ घालायला शिकवले. कंझुमर रिपोर्ट वाचून तसेच क्लिअरंस, डिस्काउंट, कुपन्स, रिवार्डस वगैरे वापरुन आम्ही कशी खरेदी करतो ते तो बघत होता. आमच्या इथे चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे ७वीच्या मुलांसाठी रियॅलिटी स्टोअर असते. यात दिवसभर वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीतून मुले डॉलर आणि सेंट्स बद्दल शिकतात. बाहेरच्या जगात आईबाबांना ज्या आर्थिक जबाबदार्‍या पाड पाडाव्या लागतात त्याची जाणीव या वर्कशॉपमधे मुलांना होते. 'being grown up is no fun' ते 'babies are expensive' पर्यंत अनेक प्रतिक्रिया मुलांकडून ऐकायला मिळाल्या. :). २००८ ची बिकट इकॉनॉमीने देखील मुलांना बरेच काही शिकवले.

आमच्या फॅमिली वॅल्यूज आणि माझ्या मुलाला तेव्हा असलेली समज याचा विचार करुन आम्ही आमच्या सीमारेषा आखल्या. शाळेतील शिक्षक, काउंसेलर, फॅमिली डॉक्टर यांनी वेळोवेळी योग्य सल्ले दिले, धीर दिला..मुलानेही चांगली साथ दिली. प्रसंगी दोन्ही बाजूंनी थोडीफार तडजोड केली आणि अवघड वर्षं पार पडली.

टीप - मला एकच मुलगा असल्याने माझा अनुभव हा मुलगा मोठा होतानाचा आहे. कुणाला मुलींचे पालक म्हणून अजून काही अनुभवाचे बोल सांगायचे असतील त्यांचे स्वागतच आहे.

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -३

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -१
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -२
मिडलस्कूल पूर्ण करुन हायस्कूलमधे प्रवेश हा मुलांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा काळ. मिडलस्कूल संपतासंपता हायस्कूलच्या पहिल्या वर्षासाठी कोर्सवर्कची निवड केली जाते. रजिस्ट्रेशनच्या वेळेला तुमचे स्केड्युल हातात येते. सामान्यतः तुमच्या निवडीप्रमाणे कोर्सेस मिळतात पण कधी कधी कोर्स कॅन्सल किंवा ओवरबुक होणे, स्केड्युल कन्फ्लिक्ट वगैरे गोंधळ होतो. असे काही झाल्यास घाबरुन जाऊ नये. ऑफिसमधे जाऊन याबाबत बोलावे. काउंसेलर आणि इतर स्टाफ सगळे सुरळीत करायला मदत करतात. नविन मोठी शाळा,लॅब्ज, जेवणासाठी बरेच पर्याय असलेला मोठा कॅफेटेरीया, स्टेडियम, जीम, स्वतःच्या गाडीने शाळेत येणारी वरच्या वर्गातली मुलं सगळे बघून सुरुवातीला गोंधळायला होणे साहजिक आहे. मुलांच्या मनातील भीती, गोंधळ कमी व्हावा म्हणून हायस्कूलचे ओरीएंटेशन्/ओपनहाउस असते. वरच्या वर्गातील मुले वॉलेंटियर म्हणून असतात. शाळेचा मॅप घेऊन वर्ग शोधायला वगैरे मदत करतात. शाळेच्या पहिल्या दिवशी बर्‍याच मुलांना वर्ग शोधायला प्रॉब्लेम येतो. अशा वेळी देखील वॉलेंटियर्स मदत करतात. एक-दोन दिवसात मुलं रुळतात. कॅफेटेरियातही सुरुवातीला वेगवेगळ्या फूड लाईन्स, तिथली 'राखीव' टेबल्स वगैरे गोष्टीशी जमवून घ्यायला थोडा वेळ द्यावा.

हायस्कूलमधे प्रत्येक विद्यार्थ्याला काउंसिलर असाइन्ड करतात. काही प्रशासकीय बदल झाले नाहीत तर शक्यतो चारही वर्षे पाल्याचा एकच काउंसिलर रहातो. हायस्कूल प्रवासात काउंसिलर ही व्यक्ती खूप महत्वाची. विद्यार्थ्याने सुरुवातीपासूनच काउंसिलरशी उत्तम नाते जोडायचा प्रयत्न करावा. या लेवलला मुलांनी आपल्या अडचणींबाबत काउंसेलरशी स्वतः संपर्क करणे, भेटणे अपेक्षित आहे. पालकांनी हवे तर नंतर फॉलो अप करावे. मिळालेल्या मदतीबाबत आभाराची इमेल पाठवायला विसरु नये. या वयात मुलांना सल्ले दिलेले आवडत नाहीत पण काउंसेलरने दिलेले सल्ले हे अनुभवाचे बोल असतात. आपल्या ड्युटीच्या पलीकडे जाऊन काउंसेलर मंडळी मुलांसाठी काम करतात. क्लास स्केड्युल मधील गोंधळ निस्तरण्यापासून ते लिडरशिप पोझिशनसाठी, स्कॉलरशिप्ससाठी रेकमेंड करण्यापर्यंत अनेक प्रकारे काउंसेलर मदत करतात. हायस्कूलचा प्रवास संपेपर्यंत आपले मुल हे त्यांचेही मुल झालेले असते हा आमचा अनुभव आहे.

अमेरीकेत अंडरग्रॅड म्हणून कॉलेजच्या प्रवेशासाठी शैक्षणीक गुणवत्तेच्या जोडीला विद्यार्थ्याच्या नेतृत्व, सामाजीक बांधीलकी, खेळातील प्राविण्य, एखाद्या कलेतील प्राविण्य यासारख्या इतर गुणांचाही विचार केला जातो. विद्यार्थ्याच्या शैक्षणीक गुणवत्तेचे मापन करताना देखील अनेक गोष्टींचा एकत्रीत विचार केला जातो. त्यामुळे हायस्कूलची वर्षे उत्तम रित्या पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. या भागात मी शैक्षणीक गुणवत्तेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

हायस्कूल ग्रॅड्युएशनसाठी प्रत्येक स्टेटचे स्वतःचे असे नियम असतात. यात प्रत्येक विषयाचे आवश्यक क्रेडिट्स आणि काही विषयांच्या स्टेटच्या परीक्षा याचा समावेश होतो. या नियमांची माहिती तुमच्या स्टेटच्या वेबसाईटवर उपलब्ध असते तसेच शाळेतही उपलब्ध असते. काही वेळा स्टेट, घेतलेले कोर्सेस आणि ग्रेड्सवर वेगवेगळे डिप्लोमा देते. या शिवाय युनिवर्सिटीजच्या अ‍ॅडमिशनसाठी स्वतःच्या काही अधिक आवश्यकता असू शकतात. उदा. तुमच्या स्टेटमधे ग्रॅड्युएशनसाठी ३ वर्षाचे इंग्रजी या विषयाचे कोर्सेस पुरेसे असतील पण तुम्हाला ज्या युनिवर्सिटीत प्रवेश हवाय तिथे ४ वर्षाचे कोर्सेस आवश्यक असतील. आपण योग्य मार्गावर आहोत हे पडताळून पहाण्यासाठी एक चार्ट करावा. यात high school subject, desired diploma's requirement, university 1 requirement , university 2 requirement,...... असे कॉलम करावे. हायस्कूल कोर्सेस मिडलस्कूलमधे घेतले असल्यास तेव्हा किंवा पहिल्या वर्षाचे फायनल स्केड्युल मिळाले की या चार्टमधे नोंद ठेवायला सुरुवात करावी. काउंसेलरकडे विद्यार्थ्याची फाईल असते त्यानुसार विद्यार्थी योग्य मार्गावर आहे ना ते पाहिले जाते पण काही वेळा अनावधानाने किंवा कोर्सेस मधे बदल केल्याने एखाद्या कोर्सची पूर्तता करणे राहून जाते आणि शेवटच्या वर्षी तो गोंधळ निस्तरावा लागतो. माझ्या नवर्‍याच्या सहकार्‍याच्या मुलीबाबत असा प्रकार झाला होता.

शैक्षणीक गुणवत्ता मापन : यात हायस्कूल ग्रेड पॉइंट अ‍ॅवरेज (GPA), SAT/ACT Score, AP Courses याचा समावेश होतो. काही युनिवर्सिटीज मधे प्रवेशासाठी SAT subject test (SAT II ) देखील आवश्यक असते.

GPA : अमेरीकेत फ्रेशमन(९वी), सोफोमोर(१०वी), ज्युनियर(११वी), सिनियर(१२वी) अशी चार वर्ष हायस्कूलची असतात. या चारही वर्षांत विद्यार्थ्याने मिळवलेल्या ग्रेड्स GPA साठी विचारात घेतल्या जातात. प्रत्येक विषयाच्या ग्रेडस मधे होमवर्क ग्रेड, प्रोजेक्ट्स, क्वीझेस आणि टेस्ट या सगळ्याचा समावेश होतो. प्रत्येक हायस्कूलचे/स्कूल डिस्ट्रिक्टचे स्वतःचे ग्रेडिंग स्केल असते. याशिवाय हायस्कुलचे त्या त्या विषयाचे डिपार्टमेंट्स/शिक्षक स्वतःचे असे गुणमापनाचे नियम करतात. या नियमांचे पत्रक वर्षाच्या सुरुवातीला दिले जाते. ते काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावे. बरेचदा कठीण विषयाच्या टेस्टसाठी गुण देताना कर्व्ह वापरला जातो. होमवर्क वेळेवर पूर्ण न केल्यास गुण कापले जातात. काही वेळा एक्स्ट्रा क्रेडिट मिळवून घसरलेली ग्रेड वर आणायची संधी दिली जाते. अशी संधी उपलब्ध असेल तर एक्स्ट्रा क्रेडिट लगेच पूर्ण करायला घ्यावे. कारण एक्स्ट्रा क्रेडिटसाठी मेहनतही एक्स्ट्रा लागते आणि लागणार्‍या वेळाचा अंदाज चुकल्याने मिळालेली संधी फुकट जाते. हायस्कूलमधे काही कारणाने गैरहजर असल्यास बुडालेला अभ्यास भरुन काढणे, टेस्ट देणे वगैरे गोष्टींची जबाबदारी विद्यर्थ्याची असते. शिक्षक त्यांच्या बाजूने सहकार्य करतात. परंतू पुढाकार घेऊन, जादा कष्ट घेऊन विद्यार्थ्याने काम पूर्ण करणे अपेक्षित असते. शालेय उपक्रमात सहभाग घेतल्यामुळे जरी काही तासांना अनुपस्थित रहाणार असाल तरीही मागे पडलेला अभ्यास, बुडालेली टेस्ट देणे वगैरे विद्यार्थ्याची जबाबदारी असते. शालेय उपक्रम, रुटिन डॉक्टर/डेंटिस्ट अपाँइटमेंट यासरख्या अनुपस्थितीबाबत शिक्षकांना पूर्वसुचना द्यावी. बुडणारा अभ्यास, टेस्ट वगैरे कसे पूर्ण करायचे याचे चर्चा करुन नियोजन करावे. असे नियोजन करताना शाळा सुरु होण्याआधी किंवा शाळा सुटल्यानंतर थांबून काम करायची तयारी ठेवावी. विद्यार्थी मनापासून प्रयत्न करत आहे हे पाहून शिक्षकही चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. हायस्कूल मधील शैक्षणिक यशासाठी अभ्यासाच्या चांगल्या सवयी मिडलस्कूलपासूनच लावून घ्याव्यात. रोजच्या रोज अभ्यास, नोट्स काढणे, प्रोजेक्ट्स साठी प्लॅनरचा वापर, विकेंडच्या अभ्यासाचे नियोजन केल्यास आयत्यावेळी ओढाताण होत नाही. समर रिडिंग लिस्ट पूर्ण करण्यासाठी टाईमटेबल करावे. त्याच बरोबर अवांतर वाचन सुरु ठेवावे. समरमधे शाळा काही कोर्सेस ऑफर करत असेल तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. मात्र आख्ख्या सेमिस्टरचा अभ्यास साधारणतः ४-६ आठवड्यात पूर्ण करायला लागणार आहे हे लक्षात घ्यावे. समर कोर्सला लिमिटेड जागा असते त्यामुळे ओपन झाल्यावर लगेच फॉर्म सबमिट करावा. ऑनर्स आणि AP लेवलचे कोर्स असल्यास कामाच्या दर्जाबाबतच्या शिक्षकांच्या अपेक्षा काय आहेत ते समजून घ्यावे. ग्रेड कमी मिळाल्यास काय सुधारणा अपेक्षित आहे ते शिक्षकांना विचारावे. पीअर ट्युटरिंग केल्याने देखील आपला अभ्यास पक्का व्हायला मदत होते, त्याशिवाय गुडविल जमा होते ते वेगळेच. कुठल्याही परीस्थितीत चिटिंग, उचलेगिरीचा मोह टाळावा. कॉलेज अ‍ॅडमिशनच्या दृष्टीने पहिल्या तीन वर्षांच्या ग्रेड्स आणि चौथ्या वर्षीचे कोर्स सिलेक्शन महत्वाचे. त्यामुळे चौथ्या वर्षी उपलब्ध असलेले सगळ्यात वरच्या लेवलचे कोर्सेस घेतले जातील असे पहावे. चांगल्या युनिवर्सिटीज तुमची क्लास रँक तसेच GPA विचारात घेतात तेव्हा सुरुवातीपासून GPA उत्तम ठेवायचा प्रयत्न करावा. शाळा लहान असेल तर टॉप टेनमधे रहायचा प्रयत्न करावा.

PSAT/NMSQT : Preliminary SAT ही नावाप्रमाणेच SAT ची प्रॅक्टिस टेस्ट आहे. त्याचबरोबर National Merit Scholarship Qualifying Test म्हणून ही टेस्ट दिली जाते. बर्‍याच शाळातून १०वीत मुलं एकदा SAT ची प्रॅक्टिस म्हणून ऑक्टोबर मधे PSAT देतात. त्याशिवाय नॅशनल मेरीट स्कॉलरशिपसाठी विचारात घेतले जावे म्हणून पुन्हा ११वीत ऑक्टोबरमधे PSAT देतात. मेरीट स्कॉलरशिपच्या स्पर्धेत उतरायचे असेल तर ही परीक्षा ११वीत देणे आवश्यक आहे.

PLAN : ही ACT ची प्रॅक्टिस टेस्ट १०वी त दिली जाते.

SAT/ACT : कॉलेज अ‍ॅडमिशन साठी युनिवर्सिटीज स्टँडर्डाइझ टेस्टचे गुण विचारात घेतात. यासाठी युनिवर्सिटीज SAT (Scholasic Assessment Test) किंवा ACT( American College Testing) चे गुण विचारात घेतात. आपली बलस्थाने लक्षात घेवून दोन्ही पैकी कुठली टेस्ट द्यायची याचा निर्णय विद्यार्थ्याने घ्यायचा असतो. आपल्या पाल्याची बलस्थाने लक्षात घेऊन कुठली टेस्ट देणे योग्य होईल ते काउंसेलरच्या मदतीने ठरवायला मदत व्हावी म्हणून काही आर्टिकल्सची लिंक देत आहे.
http://www.nytimes.com/2007/11/04/education/edlife/guidance.html?pagewan...
http://collegeapps.about.com/od/standardizedtests/tp/sat-act.htm
http://www.cbsnews.com/8301-505145_162-37241433/sat-and-act-which-is-the...

SAT आणि ACT वर्षातून बरेचदा ऑफर केल्या जातात. वर्षाच्या सुरुवातीला टेस्टींग स्केड्युल वेबसाइटवर देतात. तुमच्या सोईनुसार कधी टेस्ट द्यायची ते तुम्ही ठरवू शकता. इतर वर्कलोड लक्षात घेऊन SAT/ACT च्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करावे. मुलं एकापेक्षा जास्त वेळा टेस्ट देऊन स्कोर उंचावण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जिथे अप्लाय करणार त्या युनिवर्सिटीकडे टेस्ट स्कोअर रिपोर्टिंगच्या नियमांबाबत चौकशी करावी. काही ठिकाणी SAT Super score करतात तर काही ठिकाणी करत नाहीत. शक्यतो १२वीचे वर्ष सुरु होण्याआधी या टेस्ट देण्याचे काम पूर्ण करावे.

SAT II : युनिवर्सिटीज जरी SAT किंवा ACT यापैकी एका टेस्टचे गुण विचारात घेत असल्या तरी त्या जोडीला काही युनिवर्सिटीज सॅट सबजेक्ट टेस्टचे स्कोरही विचारात घेतात. सबजेक्ट टेस्ट द्यावी लागणार असेल तर ती शक्यतो ज्या विषयाचे कोर्सवर्क पूर्ण झाले आहे, ज्या विषयात उत्तम गुण मिळाले आहेत त्या विषयाची द्यावी. कोर्सवर्क पूर्ण झाल्यावर शक्य तितक्या लवकर टेस्ट द्यावी. अनायासे अभ्यास तयार असतो त्यामुळे फार तयारी करावी लागत नाही. माझ्या मुलाने याबाबत आधी विचार केला नव्हता. त्यामुळे AP टेस्ट नंतर जवळ जवळ वर्षभराने १२ वीच्या सुरुवातीला केमिस्ट्रीची सबजेक्ट टेस्ट दिली गेली. साहाजिकच कष्ट थोडे वाढले.

AP Courses : AP (Advanced Placement) courses हे कॉलेज लेवलचा अभ्यासक्रम असलेले कोर्सेस असतात. परीक्षा मे मधे घेतली जाते. परीक्षेचा स्कोअर १-५ मधे मिळतो. चांगला स्कोअर आल्यास युनिवर्सिटीच्या नियमांप्रमाणे कॉलेजच्या अभ्यासक्रमाची काही क्रेडीट मिळतात. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला कष्ट घ्यावे लागतात. अ‍ॅडमिशन ऑफिसला विद्यार्थ्याने किती चॅलेंजिंग कोर्सवर्क केले आहे, त्याची एखाद्या विषयाची जाण कितपत आहे हे बघायचे असते. ट्रान्सक्रिप्ट मधील AP course मुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा, तयारीचा योग्य अंदाज बांधायला मदत होते. कॉलेज लेवलचा करीक्युलम असल्याने कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी असलेली विद्यार्थ्याची तयारी यात दिसून येते. काही स्टेट्स विशेष प्राविण्यासह हायस्कूल ग्रॅड्युएट होण्यासाठी देखील २ AP courses ची अट ठेवते. कॉलेज अ‍ॅप्लीकेशन्सच्या गर्दीत उठून दिसण्यासाठी AP चा उपयोग होतो. मात्र हायस्कूलमधे AP Courses उपलब्धच नसतील तर अ‍ॅडमिशन ऑफिस त्यासाठी विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देत नाही. हायस्कूलमधे उपलब्ध असलेले सगळ्यात वरच्या पातळीचे कोर्सवर्क उत्तम गुणांनी विद्यार्थ्याने पूर्ण केले आहे ना एवढेच ऑफिस बघते. हे कोर्सेस खूप चॅलेंजिंग असल्याने दर वर्षी थोडे थोडे कोर्सेस घ्यावेत. असे केल्याने हायस्कूल ग्रॅड्युएशनला ८-११ AP Courses सहज पूर्ण झालेले असतील. कोर्सेसची निवड करताना तुमचा करीयर ट्रॅक, आवड या गोष्टी विचारात घ्याव्यात. हायस्कूलचे कोर्सेस घ्यायला सुरुवात कराल तेव्हाच AP चा मार्ग आखून टाईमटेबल ठरवावे. काही AP कोर्सेस हे ड्युएल क्रेडिट असतात. अशावेळी ड्युएल क्रेडीट/AP/ कॉलेज क्रेडीट यापैकी तुमच्या केस मधे जे योग्य आहे त्याची निवड करावी.

उत्तम GPA , चांगला SAT/ACT Score आणि जोडीला शक्य असल्यास आवडत्या विषयांचे AP कोर्सेस असा मेळ घालता आला की शैक्षणिक गुणवत्तेची बाजू भक्कम होते.

PSAT/SAT/SAT II/AP Course/ college planning - https://www.collegeboard.org/

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -४

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -१
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -२
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -३

हायस्कूलची वर्षं ही मुलांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची असतातच पण त्याच बरोबर ही वर्षे त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्वाची असतात. या वयात मुलांमध्ये काहीतरी करुन दाखवायची जिद्द असते आणि ऊर्जाही असते. आपल्याला काय आवडतयं, काय जमतयं हे थोडेफार उमगायलाही लागलेले असते. या सगळ्याचा सकारात्मक वापर केला गेला तर एक समृद्ध व्यक्तिमत्व तयार होणार असते. शाळेत आणि शाळेबाहेर उपलब्ध असलेल्या एक्स्ट्रा करीक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज,समाजसेवेच्या संधी, सुट्टीत किंवा शाळा संभाळून केलेला नोकरी-धंदा, मुलांचे मित्र-मैत्रीणी आणि सोशल लाईफ हे सगळेच घटक याबाबतीत फार महत्वाची कामगिरी बजावतात.
कॉलेज अ‍ॅडमिशन ऑफिसही अभ्यासाच्या जोडीला इतरही वेगवेगळे अनुभव आणि कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यास उत्सुक असतात. हायस्कूलच्या चार वर्षांत विद्यार्थ्याने अभ्यासाव्यतिरिक्त जे काही छंद जोपासले, समाजसेवा केली, एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवले त्यातून त्या विद्यार्थ्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा अंदाज घेतला जातो. त्याने केलेल्या नोकरी-धंद्यातून जबाबदारीची जाणीव दिसून येते. तेव्हा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आणि कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी एक्स्ट्रा करीक्युलर अ‍ॅक्टिविटीज, समाजसेवा, नोकरी वगैरे अभ्यासाइतक्याच महत्वाच्या आहेत.
हायस्कूल मधील एक्स्ट्रा करिक्युलर बाबत वेबसाईटवर माहिती असतेच त्याच प्रमाणे ओरिएंटेशन्/ओपन हाउस असते तेव्हाही या बद्दल माहिती देण्यासाठी, रिक्रुट करण्यासाठी सिनियर मुलं बुथ टाकतात.
तुमच्या हायस्कूलचे बजेट, स्टुडंट बॉडी, तुम्ही कुठे रहाता यानुसार काय संधी उपलब्ध आहेत ते ठरते. तरीही सामन्यत: खाली दिलेल्या यादीपैकी काही ना काही उपक्रम शाळांमधून उपलब्ध असतातच.

स्पोर्ट्स -
हायस्कूल फॉल स्पोर्ट्ससाठी मिडलस्कूल संपता संपताच ट्राय आउट्स आणि ट्रेनिंगबाबत अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंट मिडलस्कूलला माहिती पाठवते. बाकी स्पोर्ट्ससाठी अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटकडे चौकशी करावी. यात वर्सिटी अणि ज्यु. वर्सिटी अशा दोन लेवल्स असतात. खूप टॅलेंटेड असल्यास ज्यु. लेवल स्किप करुन वर्सिटी लेवलला खेळायला मिळते. अन्यथा ज्यु. लेवलला तयारी करुन त्यातून वर्सिटीला सिलेक्शन होते. हायस्कूल स्पोर्टस इथे खूप सिरीयसली घेतले जातात. भरपूर मेहनत असते. जोडीला नियमानुसार ग्रेड/GPA राखावा लागतो. काही वेळा कम्युनिटी सर्विस आवर्सही लागतात. चिअरलिडींग पासून गोल्फ पर्यंत वेगवेगळ्या टिम्स आणि तसेच ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड ची मंडळी हा सगळा पसारा बघता स्पोर्ट्स न खेळणार्‍या मुलांसाठी देखील अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटमधे नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. वर्षभर काहीना काही इवेंट सुरु असल्याने मुले त्यांचे इतर उद्योग सांभाळून काम करतात. माझा मुलगा ट्रॅक मिटसाठी मदतनीस म्हणून नोकरी करायचा.

अ‍ॅकेडेमिक -
अ‍ॅकेडेमिक टिम्स, क्वीझ लीग, मॅथ बोल, स्पेल बोल इत्यादीचे ट्राय आउट्स बद्दल त्या त्या कोचना विचारावे. बर्‍याचशा स्टेट्स मधे हायस्कूल टिम्सचा टिव्ही/रेडीओ क्वीझ शो/कॉपिटीशन देखील असते. यात टिम्सना आपल्या शाळेसाठी कॅश प्राईझेस मिळवायची संधी मिळते. याशिवाय वेगवेगळी सायन्स फेअर्स वगैरे उपक्रमातही मुले भाग घेऊ शकतात. याशिवाय वेगवेगळे फॉरीन लॅंग्वेज क्लब्ज, रोबोटिक्स क्लब वगैरे उपक्रम असतात. आमच्या मुलाने सोशल स्टडीज अ‍ॅकेडेमिक टिम, क्वीझ लीग आणि ब्रेन गेम हा टिव्ही क्वीझ शो आणि फ्रेंच क्लब हे उपक्रम चार वर्ष केले.

म्युझिक -
मार्चिंग बँड पासून शो कॉयर पर्यंत अनेक उपक्रमातून संगीत क्षेत्रात काम करायची संधी असते.

मेडीआ - शाळेत इयर बुक स्टाफ, न्युजपेपर, रेडीओ, टिव्ही या उपक्रमातून मेडीआ मधे काम करायची आवड असेल तर काम करत शिकता येते. नवीन तंत्र अवगत करायला मिळते. विविध उपकरणे तसेच सॉफ्टवेअर वापरायला मिळतात. टिव्ही स्टुडीयो सारखे अभ्यासक्रम बर्‍याचदा को करीक्युलर असतात. रेडीओ या माध्यमात काम करत असाल तर PRX Youth Editorial Board वर कामाची संधी मिळू शकते. माझ्या मुलाने त्यांच्यासाठी ७ वीत असताना काम केले होते.

हॉबीज -
चेस पासून ड्रामापर्यंत वेगवेगळ्या छंदांसाठी शाळेत क्लब्ज असतात.

गवर्नमेंट -
स्टुडंट कौसिल, प्रॉम कमिटी, क्लब ऑफिसर्स

मिलीटरी - Junior ROTC

इतर ऑर्गनाझेशन्स चे चॅप्टर्स - SADD, FFA, BPA, NHS या सारख्या ऑर्गनाझेशन्सचे चॅप्टर्स शाळेत कार्यरत असतात.

समाजसेवा -
शाळेत रजिस्ट्रेशन/ ओरीएंटेशन साठी मदत करणे, स्पोर्टिंग इवेंट्सना कन्सेशन स्टॅन्ड चालवणे, शो कॉयर कॉम्पिटिशन सारख्या मोठ्या इवेंट्सना कॅफेटेरीया ड्युटी, मेंटरींग प्रोग्रॅम, एलिमेंटरी स्कुलच्या अ‍ॅकेडेमिक टीम्ससाठी असिस्टंट कोच वगैरे समाजसेवेच्या संधी उपलब्ध असतात. माझ्या मुलाने ओरीएंटेशन वॉलेंटियर , कॅफेटेरीयात डीश वॉशर आणि मॅथ बोल असिस्टंट कोच असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे काम केले. प्रत्येक कामातून तो काहीतरी नविन शिकला. स्वतःची बलस्थाने कळली तसेच आपण कुठे कमी पडतो, काय सुधारायला हवे हे देखील लक्षात आले.

हायस्कूल मधे उपलब्ध असलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त गावातही अनेक संधी मिळू शकतात. शाळेबाहेरील उपक्रमांसाठी गावातील नॉन प्रॉफिट्स, पार्क अ‍ॅन्ड रिक्रिएशन या ठिकाणी चौकशी केल्यास उपलब्ध संधींबाबत अधिक माहिती मिळेल. इंडिया असोशिएशन युथ ग्रुप असेल तर त्या मार्फतही उपक्रम आयोजित केले जातात. लोकल चर्च किंवा देवळातर्फेही काम करायची संधी असते. आवड असेल त्याप्रमाणे गावातील वेगवेगळ्या आर्ट, म्युझिक, ड्रामा ग्रुप्सशी संपर्क साधावा. मुलांचे सिनियर मित्रमैत्रीणीही याबाबत चांगले मार्गदर्शन करतात.
अमेरीकन लोकशाहीत सहभाग घेण्यासाठी तुमच्या स्टेटच्या पेज प्रोग्रॅमसाठी अप्लाय करावे. तसेच आवड असल्यास पोल बुथ वॉलेंटियर म्हणून काम करता येते. गावातील अडवायजरी बोर्डांवर, स्टिअरींग कमिटीवर देखील युथ मेंबर असतात.
स्काऊटमधे निरनिराळे प्रोजेक्ट पूर्ण करत इगल स्काऊट होता येते. याशिवाय लोकल रेड क्रॉस साठी ब्लड ड्राइव, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी, फूड पॅन्ट्री, अ‍ॅनिमल शेल्टर, साल्वेशन आर्मीचे उपक्रम, स्पेशल ऑलिंपिक वगैरे वेगवेगळ्या समाजसेवेच्या संधी उपलब्ध असतात. माझा मुलगा फूड पॅन्ट्री वॉलेंटियर होता. मिडलस्कूलमधे काही संधी अजमावून पाहिल्या असल्यास आधीच्या अनुभवावरुनही पुढे वाटचाल करता येइल.
शाळेची नॅशनल ऑनर सोसायटीसाठी अ‍ॅप्लीकेशनची प्रोसेस काय आहे ते माहित करुन घ्यावे. माझ्या मुलाच्या मैत्रीणी ला पुरेसे कम्युनिटी सर्विस आवर्स नाही या कारणास्तव ऑनर सोसायटीत स्थान मिळाले नव्हते. नॅशनल ऑनर सोसायटीतही ऑफिसर्स म्हणून काम करायची संधी मिळते. माझा मुलगा पब्लीक रिलेशनचे काम पहायचा.
११वीच्या सुट्टीत शाळेतर्फे अमेरीकन लिजन बॉइज अ‍ॅन्ड गर्ल्स स्टेट साठी डेलिगेट्स पाठवतात. प्रत्येक शाळेची स्वतःची सिलेक्शन प्रोसेस असते. त्या बाबत चौकशी करावी. आम्हाला काहीच माहिती नव्हती. लेकाची शाळेने निवड केल्याचे पत्र पाठवले तेव्हा याबाबत कळले. मुलाला विचारल्यावर तो ' रुटीन स्ट्फ' म्हणून खांदे उडवून मोकळा झाला. Uhoh हा उपक्रम अमेरिकन लिजनचे लोकल चॅप्टर्स स्पॉन्सर करतात. गवर्नमेंट बद्दल हॅन्ड्स ऑन शिकायला मिळते. स्टेट मधून पुढे नेशन साठी जायची संधी असते, स्कॉलरशिप्स असतात. तसेच काही युनिवर्सिटीज देखील डेलिगेट्सना स्कॉलरशिप्स ऑफर करतात. माझ्या मुलाला अशा ऑफर्स आल्या होत्या,

एक्स्ट्रा करीक्युलरच्या बाबत उगाच प्रत्येक ठिकाणी हजेरी लावणे किंवा दर वर्षी काहीतरी ट्राय करुन मध्येच सोडून देणे असे करु नये. आपल्याला ज्या गोष्टीची खूप आवड आहे अशा शक्यतो २-३ अ‍ॅक्टिव्हिटीज निवडाव्यात आणि हायस्कूलची चारही वर्षे त्यासाठी वेळ द्यावा. शाळेने आयोजित केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या जोडीला शाळेबाहेरचीही काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी करावी. मन लावून काम करावे. हळू हळू वाढीव जबाबदारी घेत नविन कौशल्ये आत्मसात करावीत. नेतृत्व दाखवायची संधी उपलब्ध झाल्यास जरूर स्विकारावी. हे सगळे करताना यासाठी किती वेळ द्यावा लागेल ते माहित करून घ्यावे. तुम्ही ज्या उपक्रमांमधे सहभागी होऊ इच्छिता त्यात काही स्केड्युल कन्फ्लिक्ट होत नाही ना याची आधीच खात्री करावी. बर्‍याचदा शाळेच्या अ‍ॅथलेटिक आणि अ‍ॅकेडेमिक टिम्स, बँड वगैरे बाबत हे घडते. याबाबत कोच, डायरेक्टर्सशी बोलून काही सोल्युशन मिळते का ते पहावे. खेळणार असाल तर स्पोर्ट्सचे स्केड्युल फॉल का स्प्रिंग यावर बाकी अ‍ॅक्टिव्हिटीज काय आणि कधी करायच्या ते ठरवावे. समाजसेवेसाठी काय कार्यक्षेत्र निवडायचे ते ठरवतानाही आवड आणि द्यावा लागणारा वेळ विचारात घ्यावा. एखाद्या गोष्टीची आवड नसेल तर निव्वळ मित्रमंडळी करणार आहेत म्हणून उपक्रमात सहभागी होण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या सर्व एक्स्ट्रा करीक्युलर्सची, समाजसेवेची एक फाईल करावी. केलेल्या उपक्रमांची, कर्तबगारीची, शिकलेल्या कौशल्यांची नोंद करावी. समाजसेवेचे टाईमकार्ड ठेवावे. पार्टटाईम किंवा सुट्टीतला जॉब शोधण्यासाठी अर्ज करताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसला तरी सॉफ्ट स्किल्स म्हणून याबाबत लिहावे.
.
ड्रायविंग आणि सोशल लाइफ
प्रत्येक स्टेटचे टीन ड्रायविंगचे लॉज असतात. आजकाल बजेट कट्स मुळे बर्‍याच शाळांतून ड्रायवर एड नसते. अशावेळी चांगल्या टीन ड्रायविंग प्रोग्रॅमला पाल्याचे नाव घालावे. कार ओनरशिप बाबतच्या खर्चाची जबाबदारी कशी घेतली जाईल त्या बद्दल आधीच चर्चा करावी. टीन ड्रायवर्सच्या सुरक्षिततेसाठी इंश्युरन्स कंपन्यांतर्फे बरेच रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्यांचे सेफ्टी प्रोग्रॅम पूर्ण केल्यास इंश्युरन्समधे थोडी सवलत मिळते. शाळेत चांगल्या ग्रेड्स असतील तर गुड स्टुडंट डिस्काउंट मिळतो. मुलं आपले वर्तन पहात मोठी होतात. पालक स्वतः सेफ ड्रायवर असतील तर मुले देखील सेफ ड्रायवर होतात.
हायस्कूलमधे मुलांना मिळणारे स्वातंत्र्य वाढते त्याच प्रमाणे गैरवर्तनाचे परीणामही गंभीर होतात. लॉसुट्स, लायबिलीटीचा विचार करत शाळेचे शिस्तीबाबतचे नियम कठोर होतात. शाळेची डिसिप्लीन पॉलिसी समजून घ्यावी. प्रसंगी जुवेनाइल कोर्ट/ अ‍ॅडल्ट कोर्ट पर्यंत प्रकरण वाढते हे लक्षात घेऊन याबाबत पालकांनी मुलांशी याबाबत शांतपणे बोलावे. संभाव्य धोक्यांबद्दल चर्चा करावी. तुमच्या स्टेटचे तसेच सिटीचे टीन कर्फ्यु लॉज माहित करुन घ्यावेत. इथल्या इतरही कायद्यांची माहिती करुन घ्यावी आणि मुलांनाही द्यावी. मुलांच्या नव्या मित्र-मैत्रीणींबद्दल तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती करुन घ्यावी. मुलांच्या पार्ट्यांना संबंधीत पालक उपस्थित असणार आहेत ना याची फोनकरुन खात्री करावी. तसेच मुले ज्यांच्याकडे जाणार त्यांची गन्स, अल्कोहोल वगैरे बाबतच्या भूमिकेबाबत आधीच योग्य ते प्रश्न विचारावेत. हेल्दी रिलेशनशशिप्स, अ‍ॅबस्टिनन्स/ सेफ सेक्स, कंसेंटचे वय, इनअ‍ॅप्रोप्रिएट रिलेशन्स याबाबत बोलणे सुरु ठेवावे. वास्तव आणि आभासी जगात स्वतः सजग रहावे आणि मुलांनाही सजग रहायला शिकवावे.
मुलांनी अभ्यास, एक्स्ट्रा करीक्युलर्स, सोशल आणि फॅमिली लाइफचा मेळ साधत हायस्कुल एंजॉय करावे. त्याचवेळी हायस्कूल नंतर पुढे काय करायचे याचाही विचार करावा. १२ वीच्या वर्षाच्या सुरुवातीला कॉलेज अ‍ॅडमिशन प्रोसेस सुरु होते. त्यासंबंधीची माहिती तसेच हायस्कूल टाईमलाइन, कॉलेज अ‍ॅप्लीकेशन फ्लोचार्ट्स पुढील भागात.

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -५

अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up. आजकाल युनिवर्सिटीजमधे देखील undecided students साठी सर्व शक्यता अजमावून निर्णय घ्यायचा पर्याय असतो. निर्णय घेण्यासाठी बरेचदा मिड सोफोमोर पर्यंत अवधी दिला जातो.
साधारण १०वी च्या दुसर्‍या सेमिस्टरमधे पालकांनी आपल्या मुलांशी कॉलेज निवडीबद्दल बोलायला सुरुवात करावी. आपल्या शैक्षणीक खर्चाचे बजेट काय असणर आहे त्याचाही प्रामाणिक आढावा घ्यावा.
बर्‍याचदा पालकांचा प्रश्न असतो - कुठली युनिवर्सिटी चांगली? याचे उत्तर देणे सोपे ही आहे आणि कठीणही. तुमच्या पाल्याला जी युनिवर्सिटी योग्य वाटते आणि जिथला खर्च तुमच्या आवाक्यातला आहे ती तुमच्यासाठी चांगली युनिवर्सिटी.

युनिवर्सिटीची निवड

योग्य युनिवर्सिटी निवडताना विद्यार्थ्याने आणि पालकांनी खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते.

१. घराजवळ, होम स्टेट मधे, फार तर शेजारच्या राज्यात की दूर अगदी दुसर्‍या टोकाला
२. मोठे शहर, सबर्ब की रुरल सेटिंग
३. मोठी युनिवर्सिटी की सगळे एकमेकांना ओळखतात टाईप लहान युनिवर्सिटी
४. करीअर चॉइस बद्दल पक्का निर्णय झालाय की अजून नक्की काही ठरत नाहिये
५. इंटर्नशिप प्रोग्रॅम, को-ऑप, स्ट्डी अ‍ॅब्रॉड प्रोग्रॅम
६. इतर क्लासरुममधे तसेच कँपसवर तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टी. उदा. रिसर्चची संधी, क्लास साईझ/ स्टुडंट टिचर रेशो, अ‍ॅकेडेमिक सपोर्ट, रेशिअल डायवर्सिटी, सिंगल जेंडर कॉलेज, कँपस सेफटी, फेथ/धार्मिक कल, कम्युनिटी सर्विसच्या संधी वगैरे
या जोडीला आपला GPA आणि SAT/ACT score देखील विचारात घ्यावा.

कॉलेज शोध मोहिमेत आम्हाला खूप उपयोग झाला तो कॉलेज बोर्ड बिग फ्युचर आणि कॉलेज कॉन्फिडेन्शिअल या दोन संकेत स्थळांचा. या साईट्सवरची टुल्स वापरुन तुम्हाला योग्य युनिवर्सिटीज तुम्ही शॉर्ट लिस्ट करु शकता. त्याशिवाय शाळेमधे दरवर्षी कॉलेज फेअर असते. वेगवेगळ्या युनिवर्सिटीच्या अ‍ॅडमिशन ऑफिसतर्फे बुथ्स असतात. बर्‍याच युनिवर्सिटीज चांगले विद्यार्थी मिळावेत म्हणून अमेरीकेच्या वेगवेगळ्या भागात इवेंट्स ठेवतात. युनिवर्सिटीजच्या साइटवर जाऊन तसेच वर्च्युअल टुर घेऊनही अधिक माहिती मिळवता येते. तुमची शॉर्ट लिस्ट तयार झाली की या युनिवर्सिटीजना औपचारिक भेट देण्याचे ठरवावे. इथे शाळा देखील खास कॉलेज विजीट्ससाठी अनुपस्थीती म्ह्णून वेगळी सवलत देतात. त्यासाठी वेगळा फॉर्मही भरुन घेतात. युनिवर्सिटीजचे अ‍ॅडमिशन ऑफिस देखील इच्छूक विद्यार्थी आणि पालकांसाठी कॉलेज विझीट्सचा वेगळा उपक्रम वर्षभर राबवतात. युनिवर्सिटीजच्या संकेतस्थळांवर भावी अंडरग्रॅड स्टुडंट्सनी कॉलेज विझिट कशी प्लॅन करावी याबद्दल माहिती असते. दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. यात युनिवर्सिटीबद्दल छान पद्धतीने माहिती दिली जाते. आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळतात. हायस्कूल नंतर पुढील ४-६ वर्षे या ठिकाणी घालवायची आहेत हे विचारात घेऊन विद्यार्थी आणि पालक दोघांनीही विझिट्स साठी जाताना काय प्रश्न विचारायचे त्याची नीट यादी करावी. तिथल्या डायनिंग हॉलमधेच जेवावे. डॉर्म्स पहाव्यात. शक्य झाल्यास गाईड बरोबर टुर झाल्यावर स्वतंत्रपणे फिरुन कॅम्पस बघावा. ज्या विषयात मेजर करायचे त्या डिपार्टमेंटमधील प्रोफेसर्सना शक्य असेल तर भेटावे. युनिवर्सिटीने दिलेल्या माहितीपत्रकांच्या जोडीला आपणही नोंद करावी. काही वेळा युनिवर्सिटीजचे वेगळे इनविटिशन ओन्ली इवेंट्स असतात. यात विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस वेगवेगळ्या लेक्चरना बसता येते, लॅब मधे नेतात. काही वेळा एक रात्र डॉर्म मधे रहाता येते. अशा इवेंटला जाण्याची संधी मिळाल्यास जरूर जावे. मुलांच्या ओळखीची सिनियर मित्र मंडळी मदत करणार असल्यास इन्फॉर्मल विझिट्ही घेता येतील. कॉलेज विझिट्स घेऊन कुठे अप्लाय करायचे त्याची शॉर्ट लिस्ट शक्यतो १२वीचे वर्ष सुरु होण्याआधी तयार असावी.

शैक्षणिक खर्चाचा अंदाज
आपल्या पाल्याला योग्य वाटणार्‍या युनिवर्सिटीचा शोध घेताना एकीकडे शैक्षणीक खर्चाचा अंदाज घ्यावा.
शैक्षणिक खर्चाला Cost of attending university असे म्हणतात. यात फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च, इतर फीज, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य, आणि वैयक्तीक खर्च याचा समावेश होतो. प्रत्येक युनिवर्सिटीच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती असते. या खर्चापैकी फी सोडल्यास इतर खर्च जवळ जवळ सारखाच असतो.
विद्यार्थ्याच्या शैक्षणीक खर्चासाठी किती मदत मिळेल हे ठरवण्यासाठी कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा आणि मिळकतीचा विचार करुन विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी किती खर्च कुटुंबाने करणे अपेक्षित आहे ते निश्चित केले जाते. या रकमेला EFC (Expected Family Contribution) असे म्हणतात. EFC मोजण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात - FAFSA, CSS Profile ,568 Consensus . यापैकी FAFSA हे फेडरल एड साठी वापरले जाते तसेच बर्‍याचदा कॉलेजेस प्रायवेट ग्रांट साठी देखील FAFSA विचारात घेतात. काही वेळा त्या जोडीला स्टेटचा वेगळा फॉर्म देखील भरावा लागतो. FAFSA हा फॉर्म भरण्यासंबंधी सर्व माहिती शाळा देते तसेच http://studentaid.ed.gov/fafsa या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध आहे. याशिवाय जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त प्रायवेट युनिवर्सिटीज CSS Profile वापरतात. अनेक स्कॉलरशिप प्रोग्रॅम्स देखील CSS Profile वापरतात. याबाबतची माहिती http://student.collegeboard.org/css-financial-aid-profile या ठिकाणी मिळेल. या व्यतिरिक्त सिलेक्टेड २५ कॉलेजेस Consensus पद्धत वापरतात. यात FAFSA आणि CSS Profile हे दोन्ही फॉर्म्स वापरले जातात मात्र अ‍ॅसेट वेगळ्या प्रकारे मोजले जातात. प्रत्येक पद्धत वेगवेगळे नियम वापरते याचे एक उदा. ५२९ प्लॅन मधले पैसे विचारात घेताना FAFSA ५.६% विचारात घेते, CSS Profile २०% आणि Consensus ५% . त्यामुळे तुमचे इनकम आणि अ‍ॅसेट काय आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने मोजले जाणार आहेत यावर तुमचे Expected Family Contribution वेगवेगळे येऊ शकते. शैक्षणिक खर्चाचा साधारण अंदाज येण्यासाठी विद्यार्थी ११वी(ज्युनिअर) ला असताना EFC Calculator वापरून बघावा.
त्याच बरोबर विशिष्ठ कॉलेज मधे शिकण्याची नेट प्राईस काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी त्या युनिवर्सिटीचा कॅलक्युलेटर वापरावा. कारण एखाद्या कॉलेजचा खर्च (स्टीकर प्राईस) जास्त असला तरी EFC साठी वापरलेली पद्धत, उपलब्ध असलेल्या ग्रांट्स वगैरे विचारात घेतल्यावर येणारी नेट प्राईस तुमच्या आवाक्यातील आहे की नाही याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय घेता येतात.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेट युनिवर्सिटी इन स्टेट आणि आउट ऑफ स्टेट अशी वेगवेगळी फी आकारते. काही वेळा पब्लीक युनिवर्सिटीच्या out of state tuition मधे सवलत मिळू शकते, मात्र अशी सवलत मिळ्ण्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही कुठल्या स्टेट मधे रहाता, कुठल्या स्टेटच्या युनिवर्सिटीत जाऊ इच्छिता , कुठल्या विषयात्/कुठल्या प्रकारची डिग्री हवी आहे त्यानुसार तुम्हाला सवलत मिळणार की नाही ते ठरते. काही वेळा प्रायवेट युनिवर्सिटी देखील out of state tuition reduction program मधे सहभागी होते. अशावेळी प्रायवेट युनिवर्सिटीसाठी असलेल्या नियमानुसार सवलत मिळते. याबद्दलच्या अधिक माहिती साठी खाली दुवे देत आहे.

http://www.nebhe.org/programs-overview/rsp-tuition-break/overview/
http://www.sreb.org/page/1304/academic_common_market.html
http://wiche.edu/wue
http://msep.mhec.org/MidwestStudentExchangeProgram

कॉलेज अ‍ॅडमिशन
विद्यार्थ्याचा करीअर पाथ, इतर वैयक्तिक आवडनिवड , शैक्षणिक खर्चाचे बजेट वगैरे बाबी लक्षात घेऊन १२वी चे वर्ष सुरु होताना युनिवर्सिटीज शॉर्ट लिस्ट केल्या की सुरुवात होते ती प्रवेश प्रक्रियेची. तुम्ही निवड केलेल्या कॉलेजच्या संकेत स्थळावर कॉलेज अ‍ॅडमिशनची सर्व माहिती दिलेली असते. युनिवर्सिटी कॉलेज कॉमन अ‍ॅप्लीकेशन वापरणार की युनिवर्सल कॉलेज अप्लिकेशन वापरणार की स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन वापरणार त्या प्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया थोडीशी बदलते. कॉमन किंवा युनिवर्सल अ‍ॅप मधे तुम्ही एक कॉमन फॉर्म भरता आणि जोडीला विशिष्ठ कॉलेजसाठी वेगळे सप्लीमेंट अ‍ॅप्लीकेशन करता तर स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन असेल तर तुम्ही त्या विशिष्ठ युनिवर्सिटीचा प्रवेश अर्ज भरता. पब्लीक युनिवर्सिटीला प्रवेश घेणार असाल तर त्यांच्या मेरीट स्कॉलरशिपसाठी विचारात घेतले जावे म्हणून प्रवेशाचे अर्ज लवकर (साधारणतः १५ नोवेंबर डेडलाईन) पाठवणे आवश्यक असते. प्रायवेट युनिवर्सिटीजच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ली डिसीजन, अर्ली अ‍ॅक्शन , सिंगल चॉइस अर्ली अ‍ॅक्शन, रेग्युलर असे वेगवेगळे प्रकार असतात. युनिवर्सिटीजच्या साईटवर त्या संबंधीचे नियम लिहिलेले असतात. प्रवेश प्रक्रियेसाठी कुठला पर्याय योग्य याचे उत्तर प्रत्येक केस मधे वेगवेगळे असू शकते. याबाबत अधिक मदत लागल्यास शाळेच्या काउंसेलरशी बोलावे. माझ्या मुलाने तीन पब्लीक युनिवर्सिटीजना मेरीट स्कॉलरशिप मिळावी म्हणून लवकर अर्ज केले होते. त्यातील एक युनिवर्सिटी त्याच्या लिस्टमधे दुसरा चॉइस होती. त्याचा पहिला चॉइस असलेल्या प्रायवेट युनिवर्सिटीला त्याने अर्ली अ‍ॅक्शन पर्याय घेतला तर अजून एका प्रायवेट युनिवर्सिटीला अर्ली डिसीजन ऐवजी रेग्युलर अ‍ॅडमिशनसाठी अर्ज केला. असे केल्याने त्याला काही युनिवर्सिटीजचे होकार ख्रिसमस आधीच कळले होते शिवाय अ‍ॅडमिशन मिळाल्यावर युनिवर्सिटीजनी देऊ केलेल्या स्कोलरशिप्स्/एड पॅकेजेसची तुलना करुन निर्णय घेण्यासाठी नॉर्मल डेडलाईन पर्यंत थांबता आले.
कॉलेज प्रवेश प्रक्रिये मधे निबंध लेखन, रेकमेंडेशन्स, टिचर आणि काउंसेलर इवॅल्युएशन फॉर्म्स, ट्रान्सक्रिप्ट्स वगैरे वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. वेगवेगळ्या डेडलाईन्स सांभाळाव्या लागतात. साधारण १ ऑगस्टला अ‍ॅप्लीकेशन फॉर्म्स ऑनलाईन असतात. ते डोळ्याखालून घालावेत. किती निबंध लिहावे लागतील, त्यांचे विषय काय आहेत ते पहावे. निबंधाचे विषय विचारपूर्वक ठरवावेत. निबंधलेखनासाठी पुरेसा वेळ द्यावा. इंग्लीशच्या शिक्षकांना आधी विनंती केल्यास ते ड्राफ्ट फायनल करण्यापूर्वी वाचून आवश्यक असल्यास सुधारणा सुचवतात. रेकमेंडेशन्ससाठी ज्या व्यक्तींना विनंती करणार आहात त्यांना शक्य तितक्या लवकर भेटावे. बर्‍याच युनिवर्सिटीजना टिचर्सची रेकमेंडेशन्स लागतात. अशावेळी शक्यतो ११वी संपताना याबद्दल तुमच्या शिक्षकांशी बोलून ठेवावे. स्कॉलरशिप्ससाठी देखील रेकमेंडेशन्स लागतील. त्याबद्दलही बोलून ठेवावे. शिक्षकांना बरीच रेकमेंडेशन्स लिहावी लागतात. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यावर लवकरात लवकर रेकमेंडेशन साठी विनंती पाठवावी म्हणजे घाई गडबड न होता योग्य मुदतीत काम पूर्ण होईल. अनावधानाने होणार्‍या चुका टाळण्यासाठी प्रत्येक युनिवर्सिटीसाठी वेगळे फोल्डर करावे. त्यात आवश्यक गोष्टी आणि डेड्लाईन्सची नोंद करावी. जसजशी पूर्तता होत जाइल तसे चेक मार्क करावे. १२वी चा अभ्यास, एक्स्ट्रा करीक्युलर्स वगैरे सांभाळून ही सगळी कामे करायची असल्याने विकेंड्सना यासाठी आधीच वेळ राखून ठेवावा.

शैक्षणीक खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पालकांनी शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे, मुलांनी केलेले सेविंग याच्या बरोबर स्कॉलरशिप्स, फेडरल आणि स्टेट कडून मदत मिळण्याची शक्यता, शैक्षणीक आणि इतर लोनची तयारी या गोष्टींचा विचार केला जातो. .

स्कॉलरशिप्स

युनिवर्सिटी मेरीट स्कॉलरशिप्स - पब्लिक युनिवर्सिटीज मेरीट स्कॉलरशिप्स देतात. तसेच प्रायवेट युनिवर्सिटीज देखील मेरीट स्कॉलरशिप्स देतात. काही युनिवर्सिटीज नॅशनल मेरीट स्कॉलरशिप मिळाल्यास ती रक्कम मॅच करतात. नीड ब्लाईंड युनिवर्सिटीज प्रवेश दिल्यावर EFC नुसार एड पॅकेज देत असल्याने वेगळ्या मेरीट स्कॉलरशिप्स देत नाहीत.
त्याशिवाय इतर अनेक स्कॉलरशिप्स लोकल, स्टेट आणि नॅशनल लेवलवर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या हॉबीजपासून ते वेगवेगळ्या कॉलेज मेजर्स पर्यंत अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध असतात. पालकांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील काही स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत का याची देखील चौकशी करावी. फक्त हायस्कूल सिनियर्ससाठी स्कॉलरशिप्स असतात असा एक समज असतो. पण अंडरक्लाससाठी देखील स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत.
स्कॉलरशिप्स शोधण्यासाठी उपयोगी साईट्सची यादी खाली देत आहे. Every little bit helps so happy searching.

www.fastweb.com
www.finaid.org
www.scholarships.com
www.scholarshipexperts.com
http://www.petersons.com/college-search/scholarship-search.aspx
www.freschinfo.com
www.salliemaefund.org
www.naas.org
http://www.scholarshippoints.com/about.php
www.schoolsoup.com

स्कॉलरशिप्स मिळवायला मदत करतो असे सांगुन कुणी फी चार्ज करत असेल तर तो स्कॅम समजावा.

फेडरल आणि स्टेट एड
युनिवर्सिटीत शिक्षण घेण्यासाठी उत्पन्नाच्या नियमानुसार Federal Pell Grant , Federal Supplemental Educational Opportunity Grant (FSEOG) , तसेच स्टेट एड मिळू शकते. या मदतीसाठी आर्थिक परीस्थिती हा निकष असतो. FAFSA फॉर्म भरावा लागतो.
लोन
शिक्षणासाठी लोनचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
1. Federal Student Loan
2. Private Student Loan

Federal Student Loan
1. Federal Perkins Loan - हे कर्ज अंडरग्रॅड आणि ग्रॅड स्टुडंटसाठी असते. कॉलेज कडे असलेले फंड्स आणि विद्यार्थ्याची आर्थिक परीस्थिती या निकषावर हे कर्ज दिले जाते. हे कर्ज कॉलेज देते आणि यावरील व्याज हे विद्यार्थी जोपर्यंत कमीत कमी अर्धवेळ शिकत आहे तोपर्यंत डिफर होते.
2. Direct Subsidized Loan - हे कर्ज देखील आर्थिक निकषावर आधारीत असून अंडरग्रॅड साठी मिळते. हे कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. व्याज विद्यार्थी कमीत कमी अर्धवेळ शिकत असेल तोपर्यंत डिफर होते.
3. Direct Unsubsidized Loan - या कर्जासाठी आर्थीक निकष नाही. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.
4. Direct PLUS Loan - हे कर्ज अंडरग्रॅड स्टुडंटचे पालक किंवा ग्रॅड/ प्रोफेशनल स्टुडंट यासाठी असून आर्थीक निकष लागत नाही. क्रेडीट हिस्ट्री वाईट नसावी. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.

Private Student Loan हे कर्ज खाजगी बँका किंवा पतपेढ्या देतात. क्रेडीट हिस्टरी चेक करतात. व्याज दर जास्त असतो. प्रायवेट लोन हा प्रकार शक्यतो टाळावा.

Federal Work Study Program :
या प्रकारात कॉलेज खर्चासाठी पार्ट टाईम जॉब करणे अपेक्षित असते. आर्थिक निकष आणि इतर काही अटींची पूर्तता करावी लागते. आर्थिक निकष अपेक्षित खर्चानुसार बदलतो. उदा. 'अ' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्ट्डी प्रोग्रॅम लागू होणार नाही पण 'ब' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्टडी प्रोग्रॅम लागू होईल. कॉलेजकडे पुरेसे फंडिंग नसेल तर वेटिंग लिस्टवर ठेवतात. आठवड्याला किती तास काम करता येइल यावर लिमिट असते. क्लास स्केड्युलही विचारात घेतले जाते. वर्क स्ट्डी जॉब्ज ऑन कॅम्पस तसेच ऑफ कॅपस उपलब्ध असतात.
कॉलेज खर्चासाठी या वर्क स्ट्डी प्रोग्रॅम व्यतिरिक्त ऑन कॅम्पस अणि ऑफ कॅम्पस इतरही जॉब उपलब्ध असतात. आर्थिक निकष लावला जात नाही. बरीच मुले खर्चाची मिळवणी करण्यासाठी तसेच नेटवर्किंगसाठी असे जॉब करतात. यात ऑन कॅम्पस जॉब बर्‍याचदा जास्त सोइचे पडतात.
बर्‍याचदा वर्क स्टडी प्रोग्रॅम मधले जॉब्ज तसेच इतर ऑन कॅम्पस जॉब्ज कॉलेज सुरु होण्याआधीच लिस्ट केले जातात. तेव्हा जॉब सर्च करायला कॉलेज सुरु होईपर्यंत थांबू नये.

खाली मी माझ्या मुलाच्या हायस्कूल प्रवासाची टाइमलाइन देत आहे.

       
9th 10th 11th 12th
August Sign up for extra curriculars Sign up for extra curriculars and PSAT Sign up for extra curriculars and PSAT Sign up for extra curriculars and start working on college essays and scholarships
September outline highschool courses to take for next three years college application and scholarship work continues
October Take PSAT Take PSAT Take SAT subject tests, college application cont. ; meet deadline for early action and public universities12th
November visit colleges meet deadlines for public universities/ work continues for regular admissions/scholarship work cont.
December start searching for summer job/enrichment program start srarching for summer job/enrichmen program Register for ACT meet deadline for regular admission
January start applying for summer jobs/enrichment program start applying for summer jobs/enrichment program start applying for summer jobs/enrichment program scholarship work cont. start folder for FAFSA and CSS profile
February Schedule classes for next year, Register for SAT schedule classes for next year, take ACT meet deadlines for FAFSA and CSS profile
March schedule classes for next year signup for summer courses, sign up for SAT, visit colleges prospective student events
April visit colleges review all scholarships/aid packages and take decision
May Take SAT and AP exams Take AP exams Meet 1st May deadline to inform university; take AP exams
June summer job/projects summer job take SAT, summer course, other summer projects Graduation
July summer job/projects summer job/projects visit colleges, projects, rejister for SAT subject tests

अमेरीकेतील हायस्कूल प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

टीप - हे लेखन २०१३ साली मुलगा हायस्कूल ग्रॅड्युएट झाला तेव्हा केले होते. आता काही बदल झाले असतील. त्यामुळे अनुभवी पालकांनी यात जरूर भर घालावी/ बदल सुचवावेत.
अ‍ॅथलेटिक स्कॉलरशिपवर कॉलेजला जाणार्‍यांचा प्रवास थोडा वेगळा असतो. इथे कुणाला अनुभव असेल तर त्यांनीही आपले अनुभव शेअर करावेत. माझ्या मुलाच्या काही मित्रांनी ROTC चा पर्याय निवडला. तुमच्या पाल्याला आवडणार असेल तर जरूर विचार करावा.

Keywords: