स्पॅनिश वारी!

square

स्पॅनिश वारी! -१

स्पॅनिश वारी

प्रसंग १

प्रसंग -शाळेतल्या मैत्रीणींच बर्‍एच दिवसानी जमवलेल गेट टूगेदर! एप्रिल १८ ची एक रविवार सकाळ
स्थळ - वाडेशवर ( हे वर्षानुवर्षे बदलत नाही)
पात्र परिचय - १९८७ मधे दहावी झालेल्या ( काकू मत कहो ना ) ८-१० मुली

अ- वाडेश्वर चा कंटाळा आला आता दुसरी जागा पाहू
ब- मी केव्हापासून म्हणतेय माझ्या गिरीवनच्या फार्महाउस वर जाउ दोन दिवस
क- मे महिन्यात जमेल का ?
अ, ड फ - अमुक कारण , तमुक कारण , ढमुक कारण , नाही
क - १५ ऑगस्ट ?
ब, ए , स- अमुक कारण , तमुक कारण , ढमुक कारण , नाही
अ- हे अस जवळपासच ठरवतो आपण म्हणून पार पडत नाहीत आपले बेत . आपण क्ष कडे जर्मनीला जाउ!
ब - लवाजमा घेउन तिच्या गह्री जाण्यापेक्षा इतर जागा शोधू युरोपात , क्ष ला पण बोलाउ तिथेच
एव्हाना अमुक ढमुक तमुक कारणांनी आप्पे अन सेट डोसा मागवायचा का यावर खल चालू केलेला असतो
नेहेमीच्या गप्पा मारून , वाडेशवराला दक्षिणा देउन पोरी बाहेर उभ्या राहून आता परत कधी भेटयच चा प्लॅन करत असतात .

दहावी पर्यंत एकत्र एकाच वाटेवर चालून आता आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरच्या , ह्या मैत्रीणींच्या प्रायॉरिटीज पण वळणानुरूप असतात . युरोपाच सोडाच पण पुन्हा भेटण्याबाबतही , काहीच न ठरवता सगळ्या सखू वेशी वरून माघारी घरी !!

प्रसंग २

प्रसंग एक प्रमाणेच
तारीख ऑगस्ट १८
तपशील पहिल्या प्रमाणेच
एक वाढिव तपशील , स्पेन ला जाउया !!
सखू वेशी वरून माघारी घरी !!

प्रसंग २ नंतर वर्गाच्या वॉट्स अ‍ॅप ग्रुप वर स एक खडा टाकते , स्पेन ट्रीप चे ३ पर्याय , शेवटचा घाबरत घाबरत ( माहितही नसेल कोणाला ह्या खात्रीनी ) कामिनो द सांतियागो!!
अजून दोन जणींचे डोळे चम्कतात अन तिसरी विचारते काय आहे ग हे !

-क्रमशः

स्पॅनिश वारी! -२

स्पॅनिश वारी - २

कामिनो द सांतियागो बद्दल सुचवल त्या क्षणी , त्या चमकलेल्या डोळ्यांपैकी एकीनी , म्हणजे मी , नक्की ठरवल होतं , जायच!!
उत्सुकता दाखवलेली , उत्साही मेंबरही कन्व्हर्ट झाली ! :) अन आमच्या चौघींचा एक नवा वॉट्स अ‍ॅप ग्रुप करून , पुढच्या चर्चा सुरू झाल्या.

तर काय असतं ग हे ! च उत्तर जायच्या आधीच!

स्पेन च्या गॅलिशिया प्रांतात सांतियागो नावाच टुमदार गाव आहे. खुंता द गलीशिया ( राज्यसरकार) ची राजधानी आहे हे गाव ! स्पेन चा इतिहास भुगोल पाहिला तर गलिशिया , कातालुनिया , व्हॅलेन्शिया , अंडालोशिया , बास्क आदी ऑटोनॉमस राज्यांचा समुह आहे . पॉप्युलर टुरिस्ट नकाशावर गॅलिशिया , यादित फार खाली आहे खरतर . पण 'अपोस्टल सेंट जेम्स द ग्रेट ' च्या कॅथेड्रल ला जायची वाट - कामिनो , हे जगभरातल्या लोकाना सांतियागोला घेउन येते. या सेंट जेम्स ची समाधी सांतियागोच्या कॅथेड्रल मधे आहे .

मध्ययुगापासून ,जेरुसेलेम , रोम च्या पापक्षालनार्थ तिर्थयात्रां प्रमाणेच, ह्या कामिनोची ही दखल घेउन, स्वर्गात पापाचा घडा जरा हलका होतो म्हणे . संत म्हटल की आख्यायिका आल्या , चमत्कार आले! भक्त आले! तसेच्ज ह्या संत जेम्स बाबाच्या पण आहेत. लिहिते त्या सावकाश .

काही शतके , कॅथॉलीक अन इतरही भक्त आपापल्या घरून पायी , ह्या संताला भेटायला निघायचे . सोळाव्या शतकातला प्लेग , मग प्रोटेस्टंट चळवळ , नंतर इतर राजकिय धुमश्चक्रीत , ह्याच महात्म्य काहीस कमी झाल . १९७० च्या दशकात फक्त काही शे लोक वर्षभरात भेट द्यायचे अशी नोंद आहे.

१९८७ मधे , युरोपियन युनियन ने ह्या रूटला ,पहिला युरोपियन कल्चरल रुट म्हणून जाहिर केल . युरोपला सांधणारा , इतिहास ,संस्कृती , आठवणींचा पूल ! पुढे युनेस्कोने ही ह्याला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा दिला . अन फक्त कॅथॉलिकच नाही तर जगभरातले इतरही वारकरी ह्या वाटेनी चालायला लागले.

प्रामुख्यानी चालला जाणारा रूट म्हणाजे कामिनो फ्रान्सेस. ७९० किमी ची वाट , फ्रान्स च्या सेंट जॉन पिएर दे पोर्ट ( ह्याचा उच्चार विविध भाषीक लोक वेग्वेगळा करतात , मी असा करते  106 ) पासून सुरू होतो अन सांतियागो ला संपतो. हा सगळ्यात मोठा रूट आहे.
एन्ग्लिस वे ,हा इंग्लंड अन आयर्लंड ला किनार्‍यावरून चालत अन मग बोटीनी फेरोल नावाच्या स्पॅनिश बंदरावर येतो अन तिथून परत पायी सांतियागोला !
नॉर्दन वे - हा एक गॅलिशिया च्या उत्तरेच्या डोंगराळ सागरकिनार्‍यावरून आहे , प्रेक्षणिय पण तितकाच अवघड !
प्रिमितिव्हो - मध्ययुगातला प्रचलीत मार्ग
असे बरेच रस्ते म्हणजेच कामिनो सांतियागोच्या दिशेनी आखलेले आहेत .

camino routes

ह्या चालणार्‍याना पेरेग्रिनो अर्थात पिलग्रिम्स म्हणतात , वारकरी ! बोर्गो हा त्यांच प्रतिक! वाट्भर हा बोर्गा ह्या ना त्या स्वरूपात भेटत रहातो. पेरेग्रिनो ना रहायला मुनिसिपल अल्बेर्गे ( सरकारी /चर्च च्या धर्मशाळा ) अगदी ५ युरो एका रात्रीचे या दरात उपलब्ध असतात. इथे आधीपासून बुकिंग करता येत नाही . जो पहिल्यांदा पोचेल त्याला बेड! वेळेत नाही पोचलात तर पुढच्या गावी जायच नाहीतर , प्राय्व्हेट अल्बेर्गे देखिल असतात .जरा महाग म्हणजे १०-१५ युरो !! किंवा सराइत वारकरी आपली स्लिपिंग बॅग उलगडून शेतातच/ चर्च च्या आवारात पथारी पसरतात. पेरेग्रिनो मिल राशन्स असतात . खाणे पिणे रहाणे , ह्याचा खर्च दिवसाला २० युरोपेक्षा जास्त नाही.

कोणती वाट चालायची? किती चालायची ? एकाच खेपेत का तुकड्या तुकड्यात? सरकारी धर्मशाळा का खासगी ? एकांड्या शिलेदारासारखी का ग्रुप करून ? मुळात का चालायची !??

To each, his Camino!

-क्रमशः

स्पॅनिश वारी -३ , नकटीच लग्न

स्पॅनिश वारी- नकटीच लग्न

सगळ्यात पहिल्यांदा काय केल तर ह्या ट्रिप च नाव ठेवल , कांपोस्टेला एक्स्पेडिशन !! कांपोस्टेला म्हणजे वारकर्‍याला वारी पूर्ण करण्याच मिळणारं सर्टिफिकिट ! आमचा उद्देश , स्पॅनिश वारी चालण्याचा अनुभव घेणे इतकाच होता , एक सांस्कृतिक अनुभव. मग वारकरी /पेरेग्रिनो म्हणवून घ्यायला पात्र होण्यासाठी निदान शेवटचे १०० किमी चालणे अपेक्षित असते तेवढे करूया अस ठरवल. कामिनो फ्रान्सिस हा 'बहुचलीत' मार्ग आम्ही निवडला . अन शेवटचे १०० किमी करण्यासाठी आम्ही सारीया हे गाव निवडल. आता वारीची वाट ११९ किमी , पण इतर आजूबाजूची गाव अन ट्रेल्स मोजले तर १४०-१४५ किमी होतील असा अंदाज होता. सराव करायला, शारिरीक क्षमता वाढवायला , मोप ८ महिने होते ( जे खरतर कसे संपले ते कळलच नाही अन आमचा आकार , स्टॅमिना जिथल्या तिथेच राहिला  106 ) , अन मानसिक क्षमता ,अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स ऑलरेडीच मोप होता!

अजूनही आमच्या डोक्यात ( माझ्यातरी) हा एक ट्रेक वजा सहल असच होतं . रुट ठरवणे वगैरे ठरवा ठरव्यांना भेटणं पण मस्तच होतं. वातावरण निर्मिती तर जबरदस्त होत होती . इतर तयार्या ही उत्साहानी करायला घेतल्या !!

आमच्या शाळेत ( ज्ञानप्रबोधिनी) पहिल्याच वर्षी एक पद्य शिकवल होतं

'जिथे जायचे ठरवू तेथे आम्ही जाउच जाउ.....' . काय वाट्टेल ते झाल तरी ( हे मनातल्या मनात म्हणायचे मी ) ! आता प्रसंग , ध्येय , उद्दिष्ट याप्रमाणे ' वाट्टेल ' शब्दात जितके ट तितकी मजा जास्त! :P हे माझ्या सुखी जीवनाचे सार!!
तर या ट्रिप ला , प्लॅन करण्यापासून ते खुद्द जाईपर्यंत भरपूर ट आले. अन मजाही !

नकटीच लग्न अस रितसर तयारीच नाव ठेवाव लागल ! नकटी , शेंबडी पण होती ! अन दोन दा तर नेब्युलाइज करून परिस्थिती वर नियंत्रण मिळवाव लागल ! ह्यात निदान साडे तीन तरी 'ट " मोजावे लागतील. :uhoh:

जायच ठरवल अन त्यावर शिक्का मोर्तब म्हणून तारखा ठरवून विमान तिकीट करून टाकल. मुंबई माद्रिद मुंबई . अत्यंत भरवश्याची तरीही स्वस्त ( ३७,०००/- रिटर्न तिकीट ) मिळाल म्हणून , जेट एयरवेज. :rollingeyes:

२०१९ मे महिन्यातल्या तारखा नक्की केल्या , आदल्या सप्टेंबर महिन्यात ! आमच्या स्वस्तातल्या डिल वर बेहद्द खूष होतो आम्ही. चालण्याचा सराव {( ?) ऑफिसातून घरी , ८.५के ,चालत येणे आठवड्याचे निदान ३-४ दिवस} , आधी तिथे जाउन आलेल्यांशी ( तिघांशी बोललो अन तिघेही पूर्ण ७९० के चाललेले होते !! आम्ही लिंबूटिंबू ) गप्पा मारणे , सगळ दिवाळी पर्यंत व्यवस्थित चालू राहिल. आम्च्या पैकी एक डिटेल प्लॅनिंग वाली . तिनी रस्ते , अंतरं , चालतानाचे एलिव्हेशन गेन्स, हवामान , खादाडी ( हे तर महा महत्वाच !! ) , जिथे मुक्काम होउ शकतो तिथल्या अल्बेर्गेंची माहिती अस सगळ शोधून डाटा एकत्र करून ठेवला. एक्सेल्शीट !! मी ऐनवेळी , समोर येइल तस , सुचेल तस , वाटेल तस भटकण्यात सुख मानणारी , त्यामुळे त्यात अज्जिबात डोकावले नाही!

अजून खूप वेळ आहे म्हणता म्हणाता दिवाळी , वर्षाखेर उजाडली , ऑफिसात जे संपण अपेक्षित होतं ते तस संपेना. त्यातच दोन तिन खेळाडूंच्या विकेट पडल्या . केलेल्या कामांची फी वसुली, जी सहज होण अपेक्षित होतं त्याला एक अनिश्चित खिळ बसली , लेकाच्या परिक्षेच वेळापत्रक लागल अन नेमक ते मी जाणार तेव्हाच होतं :thinking: ( ह्याबद्दल नकटीचा दोष नाही खरतर , परिक्षा साधारण तेव्हाच असते , पण एव्हाना लेक आपापल पहातो त्यामुळे माझ्या रडार वर हा मुद्दाच उमटलाही नव्हता :rollingeyes: :ड . लेक म्हणाला , तू काय माझा अभ्यास घेणारेस का ? जा की ! :P )

मग काही बॅक बर्नर वरचे , काही पार माळ्यावर टाकलेले प्रोजेक्ट अचानक सजीव झाले ! हाताशी माणस नाहीत , नव्यांना शिकवण्यात प्रचंड शक्ती अन मनःशांती खर्ची टाकावी लागते, डोक्यात एका ट्रॅक वर ( मिड लाइफ क्रायसेस म्हणा) मी हा पसारा का मांडलाय ? ह्यात मजा येत नाहीये वगैरे ट्युन्स चालू होत्या. वसुली वेळेत न झाल्यानी लेकाच्या पुढच्या शिक्षणाची मांडून ठेवलेली गणितं बोंबलली. अन एका क्षणी सगळ रद्द करून टाकाव वाटल! तोवर जेट च्या गोयलांनी ते भलतच मनावर घेउन जेट च क्रॅश लँडिंग करून पण टाकल .

कांपोस्टेला च्या ग्रुपवर मैत्रीणींनी धीर दिला तरी आपल्या लढाया आपल्यालाच लढाव्या लागतात! मी माझ्या पद्धतीनी रितसर कागदावर मांडून सुरवात केली . सगळे प्रश्न एकत्र पाहिल्यावर दिसणारा गुंता कागदावर नीटच सोडवता येतो, एकेक धागा बाजूला काढत. ऑफिस चे, घरचे अन एक्स्पेडिशन चे धागे वेगळे केले . घरचा प्रश्न हा प्रश्न नव्हताच मुळी हे लक्षात आल ! ऑफिसातले मार्गी लावण्यासारखे होते . ठरलेल्या वेळी होणार नसले तरी उशीरानी होणारच होते सगळे टास्क . त्याप्रमाणे कामाच वेळापत्रक बदलल . अन प्राधान्यक्रमही!
एक्स्पेडिशचा पहिला धागा , जायच का नाही ? !! प्रबोधिनीतल गाण ठसक्यात अन चालीत म्हटल - जिथे जायच ठरवू तेथे आम्ही जाउच जाउ !! टिक मार्क
आता पुढचा प्रश्न जेट चा , इतर विमान कंपन्या ह्याला पैसे उकळण्याची संधी समजत होत्या पण नेमकी १८ एप्रिल पासून महाराजा नी दिल्ली माद्रीद सेवा चालू केली अन जराश्या वाढीव पण परवडण्यासारख्या दरानी तिकिट मिळाली पण .

मग स्पॅनिश व्हिसा! एम्बसी पेक्षा , आउटसोअर्स केलेली कंपनी जास्त खडूस्/काटेकोरपणा पणा करते ह्याबद्दल बरच ऐकल होतं. आमच्या ग्रुप पैकी प्लॅनर ला अचानक कामासाठी परदेशी महिनाभर जाव लागेल अस दिसल अन तिनी ,लगोलग उरकलेल बरं म्हणून दोनेक महिने आधी व्हिसा साठी अर्ज केला . दर दिवसाची रहायची सोय काय हे दाखवण अनिवार्य आहे अस सुनावण्यात आल. म्युनिसिपल अल्बेर्गे तर आगाउ आरक्षण करतच नाहीत मग खाजगी धर्मशाळा शोधल्या अन बुकिंग झालं , पोर्तोमरीन , सारीया , आर्झुआ, मेलिदे , ओ पेद्रोझो , पलास दे राय ,मोंतो दे गोझो या नावाची पिटुकली गाव अन तिथल्या धर्मशाळा, बुकिंग्स डॉट कॉम वर शोधणे ही भारीच उपक्रम होता !! कामिनो नंतर चा मिळणारा जवळपास एक आठवडा हाताशी होता . तिकीट बदलामुळे अजून एक दिवस बोनस मिळाला होता. अन माद्रिद ऐवजी, आमचा अंतोनी गाउडी अन बार्सेलोना खुणावत होतं . स्पेन ला दाखल होणे अन रवाना होणे ,इतपतच दिड दिवस माद्रिद ला ठेवला . बार्सेलोना मधे दोन स्पॅनिश मैत्रीणीं नी ( मैत्रीण की मैत्रीण अपनी मैत्रीण ह्या न्यायानी ओळख ) एकीनी घरी अन एकीनी तिच्या बोटीवर रहायच आमंत्रण दिल. आता मात्र व्हिसा साठी एक चक्क डमी बुकिंग करून मोकळ्या झालो. ( डोक्यात किडा पोखरत होताच ते व्हिसा इंटर्व्ह्यु च्या वेळी, माप त्यांच्या पदरात घालूनच आले, मग दर दिवसाच बुकिंग दाखवायच नसेल तर काय करायच हा सल्ला अन कामिनो साठी शुभेच्छा ,माझ्या पदरी पडले )
व्हिसा करताना १० युरो एका रात्रीचे ह्या रेटची बुकिंग पाहून डोळे पांढरे झाले त्या माणसाचे .चक्क नेटवर अन एका ठिकाणी कॉल करून खात्री करून घेतली त्यानी. माझ्या आगे मागे मुंबैकर सोबो गुज्जू कुटूंब , एक हनिमून ला चाललेले जोडपे होते , त्यांच्या खर्चाच्या तुलनेत तर त्याची शंका सार्थ होती. मग लगे हात त्यांच कामिनो प्रबोधन करून टाकल. गुज्जू बेन नी ,आर यु प्लॅनिंग टू कन्व्हर्ट असा प्रश्न विचारून घेतला मला ! :rollingeyes: :ड हनीमूनवाल्या बायकोला १० युरोत रहायच म्हणजे उरलेले पैसे शॉपिंग ला Party अस वाटून अत्यानंद झाला त्यावर , नवरदेवानी 'जानू रोजका बिस पच्चिस किलोमिटर पैदल चलना पडेगा' अस सांगितल अन मी डॉर्मिटरीत निदान दहा बंक बेड असतात एका हॉल मधे हे सांगितल . :P

नकटी च सगळ बर चाल्लय म्हणेतो , एक सुसंधी आली अन आमच ऑफिस जरा मोठ्या पण 'द फर्ग्युसन कॉलेज' च्या राजरस्त्यावरून दूर बाणेर मधे हलवण्याच ठरल .
पण तोवर कांपोस्टेला फिवर इतका चढला होता , की जेम्स बाबा भेटल्याशिवाय सोडत नाही हे मनात ठाम होतं.
नकटीच्या लग्नातल शेवटच मिनी विघ्न म्हणजे , मोठ्या प्रेमानी नवर्‍यानी एयर्पोर्टला ( पुण्याच्याच ) सोडतो सकाळी अस दोन दिवस आधी जाहिर केल. अन जायच्या दिवशी खाली आलो तर गाडीच नाही पार्किंग मधे. :hypno: त्याच्या कलीग ला घरी सोडून , उशिर झाला म्हणून डायवरबाबूंनी गाडी आपल्या घरीच लावली ( हे करतो तो बर्याचदा , अन तस सांगतो पण , आमचे नवरोबो , विसरले, ) माझी गाडी ,मी नसणारे म्हणून माझ्या कलीग कडे होती . अत्यंत शांतपणे मी ओला उबर शोधायला लागले ( ह्या संतपणाबद्दल बद्दल मी मला नंतर शाबासकी पण दिली ) पण डायवरबाबूंनी एका फोनवर , पहाटे पहाटे , लगेच गाडी घरी आणून सायबाची लाज राखली!

वाजंत्री वाजली !!

क्रमशः

स्पॅनिश वारी -४ कामिनो द सांतियागो अन वारकरी!

कामिनो द सांतियागो अन वारकरी!

कामिनोची दर दिवसाची दैनंदिनी , किती चाललो , कुठे राहिलो , वगैरे पेक्षा वॄत्तांत जरा वेगळा लिहावासा वाटतोय. तिथल्या वाटा , भेटलेली अतरंगी माणस अन त्या बरोबरीनी उलगडत जाणारा प्रवास , माहिती.

या भागात वारकरी उर्फ पेरेग्रिनो ( यात्रेकरी)
भरपूर माणस भेटली , दिसली . कथा , आख्यायीकांमधून भेटली अन प्र्यत्यक्षातही. सरळ , सुलभ, चार अंगुले वरून रथ हाकणारी, प्रेमळ , भक्तीरसात डुंबलेली , काही भवतालात गटांगळ्या खाणारी काही भवसागरात पोहायला शिकायच म्हणून आलेली. काही जे भेटले नाहीत पण , त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे आज वर्षाकाठी अडीच तीन लाख लोक कामिनो चालतात. बहुरंगी , बहुढंगी , अतरंगी!

अत्रंगी म्हणाल , तर आम्ही होतो. चौघी शाळेतल्या मैत्रीणी, शाळेतही सख्ख्या मैत्रीणी नव्हतो. आमच्या पैकी कोणीही किरिस्ताव नाही , इतकच नव्हे तर भाविक सुध्हा नाही. खरतर नास्तिक् म्हटल तरी चालेल. धावणे पळणे सायकलींग करणार्‍या दोघी होतो पण अल्ट्रा स्पोर्ट्स वाल कोणी नव्हत. पण एक कल्पना आली समोर अन एक वेगळा अनुभव घ्यायला उत्साहानी तैय्यार मात्र होतो सगळ्याच.

chaughi

काही महाभाग जिथे असतील तिथे सांतियागोला मनोमन भेटणारे होते. हा माद्रीद च्या एका वर्दळीच्या चौकात , असा ध्यानस्थ बसला होता . क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे अश्या अर्थाच काही लिहुन ठेवल होत त्यानी समोर. ह्याचा सांतियागो ह्याला लवकर प्राप्त होवो !

madrid man

टू इच हिज ओन कामिनो! हे वाक्य खूप दा ऐकल अन ह्या बाई पण निघाल्या वारीसाठी . केव्हा कधी किती सावकाश चाललात हे महत्वाच नाही . अन गंतव्य स्थळ मगत्वाच नाही प्रवास जास्त महत्वाच्गा .

gogalgaay

हा आद्य वारकरी, कामिनो च्या रस्ताभर वेगवेगळ्या स्वरूपात भेटत रहातो. त्याची काठी , शिंपला अन कमंडलू सदॄश बाटली वजा भांड ! हे आधूनिक पेरेग्रिनो ही घेउन हिंडतो.

peregrine

हा खिडकीतून लक्ष ठेवत होता पेरेग्रीनोज वर

12

हे रस्ता दाखवणारे

123

पूर्वी पेरेग्रिनो आपल्या घरून पायी निघायचे . हा कमंडलू एक बहु उपयोगी , किंवा सर्व उपयोगी भांड होतं , ट्रेकर्स च टम्ब्लर असतो तस! चालताना आधार अन सुरक्षा म्हणून काठी . अन शिंपल्याच चिन्ह , त्यांच्या पांडूरंगाची आठवण म्हणून .
हा शिंपला जणू पासवर्ड होता तिथे . सॅक वर लटकवलेला शिंपला दिसला की लागलीच 'आपल्यातला माणून अस वाटायच! बाहेरच्या जगातले , शिष्टाचार पाळायची गरज नाही . बिंधास्त गप्पा मारायला सुरवात. देश , भाषा , रंग , आर्थीक स्तर ( हा कळायला फारसा वाव नव्हता सगळे सारखेच मळके दिसायचे अन सगळ्यांच्याच बुटाना काढल की वास यायचा ) वय , लिंग कश्याचाच भेद्भाव नाही.

वेगवेगळ्या देशातले लोक भेटले ,

दोन अमेरीकन आज्या होत्या. सारीया च्या ट्रेन मधे भेटल्या. भारतातून माद्रिद सारीया ट्रेन च तिकीट काढल होत. ट्रेन मधे बसल्यावर सात तास प्रवास आहे म्हणून निवांत गप्पा चालल्या होत्या आमच्या. एखादी झोप काढायचाही विचार होता. ह्या आजींमुळे कळल की ट्रेन रूट वर काम चालू आहे अन त्यामुळे मधेच एका लहान्श्या स्टेशन वर उतरून बस पकडायची आहे. गम्मत म्हणजे आमच्या ट्रेन तिकिटावर ह्याबद्दल उल्लेख होता , पण एक तर स्पॅनिश भाषेत होतं अन तिकिटाखालच्या सुचना ओलांदून फक्त वेळ ट्रेन नंबर इतकीच माहिती पहाण्याची (वाईट ) सवय , ह्यामुळे आमच्या लक्षातच नव्हत आलं . बस मधे माझ्या शेजारीच बसल्या अन मग भरपूर गप्पा झाल्या. बदामाची शेती आहे त्यांची . त्यांची नातवंड कोण काय करतात माझी मुल काय करतात, आमचे चतुष्पाद , ट्रम्प , मोदी , मेक्सिकोची भिंत , किटो डायट , कामिनो , बायकांच स्वातंत्र्य , मेनॉपोझ , स्पेन मधली निवडणूक , काय वाट्टेल त्या विषयावर गप्प मारल्या. आजूबाजूचे प्रवासी पण सारीयाला कामिनो साठीच चालले होते . विषयानुसार आपाप्ले दोन चार आणे त्यांचे पण ! तो प्रवास संपल्यावर एकमेकाना शुभेच्छा देउन आम्ही मार्गाला लागलो. अनोळाखी कोणाशी एवढ्या गप्पा मारायची माझी पहिलीच वेळ आहे पण तुझ्याबद्दल पॉझीटिव्ह व्हाइब्स आल्या म्हणाल्या. परत काही भेटू , न भेटू . पण तुझी वारी सफलच होणार असही म्हणाल्या. वाट एकच अन त्यातल्या काही क्षणांची सोबत सुंदर , आठवणीत रहाण्याजोगी करून ,परत आपप्ल्या भल्यामोठ्या जगात हरवणारे असे वारकरी रोज भेटले , अनेक भेटले . ह्या आजींनी सुरवात केली.

us aji

अशीच आम्च्या पहिल्या होस्टेल ची व्यवस्था पहाणारी बियात्रीस. एखाद दिवशी २५-३० के चालण वेगळ पण रोज चालण जमेल ना? होस्टेल्स मधे रहाण भारतात केलय पण इथे काय असेल परिस्थिती? खाणे पिणे , आजारी पडल तर काय वगैरे ची छापिल उत्तर माहित होती पण मनात अंधूक शंका होत्या. हीच्या प्रसन्न वावरानी आमची सुरवात मस्त झाली. आमच्या पिल्ग्रिम्स पासपोर्टावर पहिला शिक्का तिनी मारला ! आमचे कोन्चा ( शिंपले) ही इथेच घेतले अन सॅक वर लटकवले ही!

koncha

एक जर्मन मैत्रीण भेटली. तिच्याशी इतर कल्चर रुट्स बद्दल गप्प मारल्या . एक पनामाचे काका भेटले . एक नौ महिन्याची मुलगी अन चार वर्षाच्या मुला ला घेउन चालणारे आईबाबा भेटले .
हे मादागास्कर चे ! तुम्ही आमचे शेजारीच आहात , मधे एक समुद्र आहे म्हणाली ती !
234

ग्वाटेमालाचे दोघे सारीया पासून रोज कुठे ना कुठे भेटायचे. अन आमच्यापैकी कोणी पुढेमागे असल तर निरोप्याच काम करायचे.
बरेचसे आपापल्या देशाचा झेंडा मिरवत होते . स्विस , ब्रिटिश , जर्मन , आयरीश अन हा ब्राझीलचा

brazil

हे आजोबा अगदी संथ गतीनी चालायचे . आम्हाला दोनदा भेटले . म्हणजे रोजचे २२-२५ किमी नक्कीच चालत होते. अगदी प्रेमानी बुएन कामिनो म्हणायचे ( बुएन कामिनो म्हणजे यात्रा सुखरूप / यशस्वी होवो असा काहिसा अर्थ. तिथे येता जाता स्थानिक , इतर पांथस्थ , एकमेकाना या शुभेच्छा द्यायचे)

ajoba

ह्या डच आजी बाई होत्या. आख्या प्रवासात भेटलेल्या एकमेव कुर्कुर आज्जी. जेव्हा जेव्हा भेटल्या तेव्ह तेव्हा टोचून बोलल्या , अन त्रस्त होत्या. ह्यांची पाचवी वारी होती म्हणे , पण सांतियागो काही पावला नव्हता काय्की.

aji

ह्या आनंदी आजी ! ऑस्ट्रेलिया हून आलेल्या . आजोबाना झेपत नाही म्हणून मी एकटीच आले म्हणाल्या . आमची आर्झुआ मधील एक दुपार छान गेली ह्यांच्याबरोबर . सत्तरीच्या वयात , ह्या आजी त्यांच्या सगळ्या लिमिटेशन्स सह इतक्या आनंदी होत्या.

34

पारंपारीक भाविक पायी चालत नाहीतर घोड्यावरून जायचे अन आजचे आधूनिक पेरेग्रिनो चालत , पळत , सायकल वर अन काही पार त्यांच्या देशातून बाइक्वर येतात!
हे सायकल्स्वार दिवसाला २०० किमी चालवत होते. अन आम्हाला शेवटच्या टप्प्यात होते . गप्पा मारल्या त्यांच्याशी . ते त्याच्या अन आम्ही आपल्या भाषेत बोललो. कसा होता अनुभव अस विचारल्यावर त्यांच्यातला एक पायाकडे बोट दाखवून म्हणाला गेम ओव्हर!! :ड

cycle

हे बाइकस्वार. ह्यांचा मोठा ताफा होता. बाइकस्वार , एक मेंटेनन्स वॅन , एक डॉक्टर . bike

अर्थात सगळे इतके लवाजम्यासहीत नसतात. काहींच अगदी तोकड बजेट असत. अगदी म्युनिसिपल अल्बेर्गे मधे ही न रहाता चर्च च्या आवारात रहातात. पण सांतियागोला पोचल्यावरचा आनंद मात्र तोच असतो .
हे एक जिप्सी कुटूंब jypsy

कृतकृत्य झालेले हे काही नग ! आनंद मावत नाही मनात अन सुखरूप पोचल्या च्या क्षणाला छायाचित्रबद्ध करण्याचे प्रत्येकाचे अंदाज अपने अपने!
1

2

3

6

पोचल्यावर कोणाला देव पावतो अन कोणासाठी उभ्या आयुष्याचा जोदीदार वाट पहात असतो.
ह्या ची मैत्रीण सांतियागो मधे वाट पहात थांबली होती. अन पोचल्यावर पहिल्यांदा पिल्ग्रीम मास मधे अन मग हिच्यासमोर ऑन हिज नी!

ring

सांतियागोच्या कॅथेड्रल समोर एक मोठा चौक आहे . एका कोपर्‍यात बसून नुसत समोर काय काय घडतय ते पहाण फार फार आवडल मला.
काही कृतकृत्य झाले होते ! काही जितं मया भावानी चार अंगुले वर ! काही चक्क ' हे का संपल इतक्या लवकर ? आता मी काय करू चे रिकामपण घेउन !
rikama

12345

ह्या ग्रुप चा आनंद गाण्यातून ओसंडत होता.

music

अन हा सांतियागो!

santiago

हा कॅथेड्रल मधला ! ह्याला चक्क पाठीमागून एक लहानसा जिना आहे . त्यावरून जाउन मागून मिठी मारता येते.

santi

बियात्रीस नी चालू करून दिलेली वारी लास्त स्तॅम्प ह्या अल्बेर्गे मधे संपली तिथली ही मोनिका! जिप्सीच म्हणा ना. आवडल म्हणाली सांतियागो मग राहिली इथेच . काही दिवसानी अजून कुठे जाइल.
moniq

जगभरातली माणस त्यांच्या लिमिटेशन्स , बंधनांसहीत ह्या ठिकाणी पोचण्यासाठी चालतात.

square

इथे पोचल्यावर कामिनो ची वाट संपते . पण मनात काहीतरी वाजायला लागलेल असत चालता चालता . प्रत्येकाची आपापली धून , आपापल गाणं ! ते मात्र चालूच रहात!
पेरेग्रीनोज कीप वॉकिंग!!

feet

स्पॅनिशवारी -५ चिन्ह खुणा अन संकेत

स्पॅनिश वारी -५ चिन्ह खुणा अन संकेत!

मी मुळात श्रद्धाळू वगैरे नाही . अजिबातच नाही. त्यामुळे आजवर संकेत दृष्टांत वगैरे कथा , अख्यायीका मनोरंजन म्हणून वाचल्या होत्या , अन सोडून दिल्या होत्या. पण ह्या कथा अन आख्यायीका , कितीही अतर्क्य अन अचाट असल्या तरी त्यात एक स्पष्ट हेतू असतो . ठरावीक माहिती पोचवायचा. धर्मा प्रसार , सत्ता प्रसार , एखादी नविन कल्पना , चळवळ उभी करणे ह्या सगळ्यात अश्या मिथकांचा , प्रतिकांचा अन अख्यायीकांचा मोठा हात असतो. तत्कालीन समाजाची , अर्थव्यवस्थेची , संस्कृतीची फार मस्त प्रतिबिम्ब पडलेली असतात ह्या गोष्टींमधे .

सांतियागो अन आजूबाजूचा जो गॅलिशिया ( पुर्वीचा इबेरिया )प्रांत आहे त्याचा पेट्रन संत म्हणजे सेंट जेम्स. इथल्या खडकाळ किनारपट्टीवर मासेमारी करणारे जेम्स अन जॉन हे दोघे बंधू , ख्रिस्ताच्या १२ प्रमुख अनुयायांपैकी ( अपोस्टल्स) . तोवर पेगन जीवन पद्धती ( कोणत्याही ठरावीक धर्माचे अनुयायी नसलेले) असलेले गॅलिशियन मोठ्या प्रमाणात ख्रिश्चॅनिटी कडे वळवायच भलमोठ काम , सेंट जेम्स नी केलय अस मानल जात. जेम्स द मूर स्लेयर ( मूर आक्रमणकर्त्यांचा कर्दनकाळ जेम्स ) अशी ही एक ओळख आहे त्याची. तेव्हाच्या रोमन राजा च्या विरोधात जाउन ख्रिस्ता ची शिकवण दिल्याबद्दल ह्याला सुळावर चढवण्यात आल. अपोस्टल्स पैकी हा पहिला शहिद.
हा ख्रिस्ताच्या कार्यकाळात ला आहे म्हणजे केव्हाचा ते पहा ! पण ह्याची शवपेटी घेउन येणारी बोट भरकटली , ती इबेरियन किनार्‍याला लागली , तिथल्या राणीनी ह्या अनुयायांना हुसकून लावायला सैन्य पाठवल .तर चमत्कार झाला ! सैन्य पुलावरून पडल अन वाहून गेल. हे पाहून राणी सरकार लगेच जेम्स चा झेंडा हाती धरून मदत कर्त्या झाल्या . एक खेचर अन रसद दिली अन ' जा ढुंढ लो समाधी के लिये जगह म्हणून " लवाजमा पाठवून दिला . अनुयायी अन भक्त गणाना काय करावे कोठे जावे काही कळेना मग सर्वानुमते खेचराला फॉलो करायचे ठरले. ते ही बिचारं चाल चाल चालल अन आताच्या सांतियागो ला जाउन बसकण मारली. तिथ्थेच आता च कॅथिड्रल आहे. ( ही झाली आख्यायीका क्रमांक १ )

आता हा प्रवास भौगोलीक तर झालाच तसाच टाइम ट्रॅव्हलही झाला ! पण ते असो .

आता हिच शवपेटीवाली बोट वादळात सापडली , बुडाली ( नक्कीच त्याचा कप्तान सत्यनारायणाचा प्रसाद न खाल्ल्लेला साधूवाणी होता ) ती कालांतरानी ( हे काही शतकं ही असू शकतं ) किनार्‍याला लागली. शंख शिंपल्यांच आवरण तयार झाल होतं पेटीवर . अन पेटीतला ऐवज सुरक्षित ठेवला होता.हा ऐवज आजही कॅथेड्रल मधे आहे! तर असा शिंपला आला गोष्टीत. आपल्या विठोबाची मकरकुंडले तशी ह्यांची शिंपले माळ ! ( ही दुसरी गोष्ट! )

अश्या गोष्टी अनेक आहेत . पण ह्या सेंट नी एका झेंड्याखाली एक मोठा प्रभाग एकत्र केला , तेव्हा अन नंतरही विविध वेळा मिळालेला राजाश्रय यामुळे हे प्रस्थ मोठ झालं . राजा अल्फोन्सो -२ यानी सांतियागोला समाधी ला पायी चालत भेट दिली अन इथे कॅथिड्रल बांधून टाका ! मोठ्ठ तिर्थक्षेत्र झालच पाहिजे अशी कामिनोची सुरवात जवळ्पास नवव्या शतकात केली. ख्रिस्त पूर्व काळातही पेगन्स , वर्ष अखेरीस पायी चालत फिस्तेरे ( जगाचा शेवट ) नावाच्या किनार्‍यावर जायचे . इबेरियाचा( आज गॅलिशिया म्हणून ओळखला जातो ) हा पश्चिम किनारा . तिथे जाउन जुने कपडे मावळत्या सुर्याला साक्षी ठेउन जाळून टाकायचे अन नव्या दिवसाची / वर्षाची सुरवात करायची ही प्रथा. विविध ठिकाणाहून इथे येणार्‍या वाटा प्रचलीत होत्याच. ह्याचच नवीन रुप म्हणजे कामिनो द सांतियागो .

आधुनिक काळातही असाच राजाश्रय मिळाला , युरोपियन युनियन नी कामिनो फ्रान्सिस ला ( प्रामुख्यानी चालली जाणारी वाट ) पहिला कल्चरल रूट म्हणून जाहिर केला . नव्या युगात ही गोष्टी सांगणारे होतेच . पाओलो कोहेलो , अर्नेस्ट हेमिंग्वे नी कामिनो चालण्याच्या अनुभवांवर लिहिलेली पुस्तके , द वे , मिल्किवे सारखे सिनेमे यांनी परत एकदा जान आणली. अन कामिनो च स्वरूप निव्वळ धार्मिक न रहाता , फिलॉसॉफीच्या वाटेनी जाणार झालं . अर्थात अजूनही सेंट जेम्स उर्फ सांतियागो च्या ओढीनी जाणारे , खूप लोक आहेत . त्याच्या पायाशी सगळ्या संकटांची गाठोडी ठेवणारे , पापांची कबुली देय्न प्रायश्चित्त घेणारे, प्रश्नांची उत्तर शोधणारे आहेत . मला वाटत अत्यंत बेसिक गरजा पुर्‍या करत , महिना दिड महिना निसर्गाच्या सानिध्यात चालत जाताना , अजिबात ओळख नसलेल्या सहवाटसरू बरोबर चालताना , जगण्याच्या आयुष्याच्या गप्पा मारताना ,मनातले डोक्यातले गुंते आपसूक सुटत असणार .

भक्ती म्हटली की दृष्टांत आला! ओक च्या झाडाखाली बसलेल्या गुराख्याला द्रुष्टांत झाला अन सांतियागोत कॅथिड्रल उभ राहील! आता ही फेसबुक वर अनेक कामिनो फोरम्स आहेत! जायच्या तयार्‍या , टिप्स , संकेत ,द्रूष्टांत !! ताजा द्रूष्टांत- एका अमेरिकेतल्या मध्यवयीन बाबानी लिहिलय. "संसार मुलं नोकरी सगळ्या जबाबदार्‍या संपल्या अन मी मनाशी नक्की केल की आता कामिनो चालायच! विमानाची तिकिट काढली अन धाकट्या लेकाच्या ग्रॅज्युएशन ला आलो! अन त्याला डिग्री द्यायला आलेला चान्सलोर होता जिमी नेस्बिट , द वे मधे काम केलेला अभिनेता! हा नक्कीच संकेत आहे! सांतियागो इस कॉलिंग मी!!"

एकदा का त्या नजरेनी पहायला लागल की त्या रंगात बरच काही दिसत! मला ही दिसल!
आम्ही सारीयाला ( जिथून चालायला सुरवात केली ) पोचलो तेव्हा बियात्रीस भेटली अन म्हणाली इथल्या चर्च ला जाउन या! गल्लीच्या टोकाला आहे .
church

लिड काइंड्ली लाइट!
lead kindly light ,amid the encircling gloom , lead thou me on!
the night is dark and i am away from home , lead thou me on.

ही सुंदर कविताच आठवली मला. मी औरंगजेब आहे कविता कळण्याबाबत. पण रस्ताभर विविध कविता आठवल्यात अन अत्यंत सुदर प्रसंग धडलेत त्या कवितांभोवती.
आर्झुअ गावा नंतर चालताना निलगीरीच्या जंगलात दोन वाटा दिसल्या , दोन्ही इतक्या सुंदर ! दोन्ही कडे जावस वाटल अन अजून एक कविता आठवली ! उस्फुर्त पणे ती म्हटली . अन चक्क शेवटची ओळ मागून येणार्‍या एका पेरेग्रिनो नी बरोबर म्हटली! मला अन त्याना दोघानाही अत्यंत आनंद झाला तो क्षण सुंदर झाला म्हणून अन ब्युएन कमिनो म्हणून आम्ही आपापल्या वाटेला लागलो! अन हिच गम्मत आहे कामिनो ची. इतके लहान लहान क्षण जगतो ना आपण इतरांबरोबर.

2ways

ह्या त्या वाटा! आता कविता ओळखा पाहू!!

घाबरू नका , कवितांचा अँटेना सक्रिय झाला कामिनो चालताना , पण त्याला मी कोणताही संकेत मानलेला नाही , अन मी कै कविता करणार नाही . :ड

हे संकेत अन त्याचे अर्थ लावण हे प्रत्येकाच आपापल खाजगी असेलच. पण भाषा निरपेक्ष , निव्वळ चिन्हांतून ,चित्रातून माहिती सांगणे ए अश्या ट्रेल्स वर फार महत्वाच ! अन ते काम गॅलिशियातल्या फादर डॉन इलियास यांच. नवव्या शतकात तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या सांतियागोला , युरोपभरातून भाविक यायचे. व्यापारासाठी प्रचलीत रोमन रूट्स सहसा वापरले जायचे. खरतर ह्या वाटांवरच चर्च , बाजारपेठा , हॉस्पिटल्स ( त्या काळी हॉस्पिटल्स ही रुग्ण बरे करण्यासाठी नाही , तर चर्च ला संलग्न अशी रुग्ण सेवागृहे होती , गावापासून आजाराच अन आजार्‍यांच आयसोलेशन ) कॉन्व्हेन्ट्स बनली , अन लहान मोठी गाव ही वसली. चौदाव्या शतका पर्यंत युद्ध , दुष्काळ , साथीच्या रोगांमुळे हे जरा कमी ही झाल, परत आधुनिक राजाश्रय मिळेतो. १९५० च्या दर्म्यान , एका पॅरिश च्या फादर नी ह्या सेंट जेम्स च्या वाटांचा अभ्यास केला , स्वतः पायी चालून अभ्यास केला , त्यावर युनिव्हर्सिटी ऑफ सालामांका मधे प्रबंध ही लिहिला. आज ह्याच सद्गृहस्थाच्या वाटा मार्क करण्याच्या भल्या मोञ्ह्या कामामुळे लाखो लोक कुठेही न चुकता सांतियागो ला पोचतात. खुण होती पिवळ्या रंगाचा दिशादर्शक बाण ! इतक साध सोप करून टाकल त्या बाणानी चालण!
ह्याच बरोबर होते मैलाचे दगड. किलोमिटर चे म्हणा खरतर. निळ्या रंगावर पिवळ्या शिपल्याच रेखाचित्र अन खाली चौकोनात सांतियागोपासून किती अंतर उरल त्याचा आकडा! मजल दरमजल करताना लहान होत जाणारी ही संख्या अजून जरा चालू अस वाटायला लावायची!

हा पिवळा बाण ! अगदी कुठेही असायचा.

arrow

अन हा मैलाचा दगड!

milestone

हा १०० किलोमिटर चा दगड !

456

चालणारे ह्या वर दगडाची उतरंड करून नवस बोलतात! अन सह्या पण करतात.

काही ठिकाणी दोन वाटा दिसतात! पुर्वापार चालत आलेला रस्ता अन नवा रस्ता! ह्या नव्या रस्त्यांवर सहसा एखाद सुंदर गाव , चर्च , पायवाट , झरा असतो! जरा लांबचा असतो पण सुंदर असत्तो. आम्ही नेहेमी तोच रस्ता निवडला!!

789

कधी गावांमधे हा खिडकीवर दिसतो

arrow3

कधी शेतांमधे
field

निर्मनुष्य वाटेवर पण शेतघरांवर हा बाण साथ देतो!

arrow45

अन शेवटी शुन्य मैलावर ! तिथे थेट सुर्यानीच दाखव्ली वाट !
sun

हे कामिनोची आठवण म्हणून !!
log

इतक्या विविध माध्यमातून हे बाण दिसत रहातात! रस्ता दाखवत राहतात. मग काय , शिंपला पाठीवरच्या सॅक ला अडकवून पेरेग्रिनोज कीप वॉकिंग !!

asdfgh