जीवनज्योती कृषी उद्योग डायरी

20200902_152847_1.jpg

दोन पिढयांमागे ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, करी विचार’ असं सूत्र होतं. ते बदलत बदलत ‘उत्तम नोकरी, कनिष्ठ शेती’ इथपर्यंत येऊन पोचलं. एका टप्प्यावर नोकरी-व्यवसाय सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयात आलेल्या अडचणी आणि मिळालेला आनंद, ह्याची ही गोष्ट.

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी- १

20200902_152847_1.jpg
पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.

हे सगळं रमणीय आहे. गडबड होते ती चिखलात चालावं लागतं तेव्हा! आत्तापर्यंत पाऊस झाला, ते पाणी जमिनीत मुरलं. आता मातीची तहान भागली. त्यामुळे चिखल भरपूर झालाय. घसरून पडायच्या भीतीने डायनोसॉर चालत असतील, तसं सावकाश आणि पाय दाबत दाबत चालावं लागतंय. काळजी घेऊन लाडाने वाढवलेल्या झाडांपेक्षा नेहमीच गवत आणि तण जोमाने वाढतं. शेतावरच्या सगळ्या मोकळ्या जागा गवत आणि तणाने व्यापल्या आहेत.

आज गेल्या-गेल्या स्वागताला आली ती माऊची दोन देखणी गोजिरवाणी पिल्लं. ही बाळं आता दोन आठवड्याची झाल्यामुळे इकडेतिकडे भटकायला लागली आहेत. आमची तितकी ओळख नसल्यामुळे चाहूल लागली की पळून जातात आणि त्यांच्या सुरक्षित कोपऱ्यात बसून टुकूटुकू बघत बसतात.

IMG_20200823_111033417_HDR_0.jpg

IMG_20200823_111053848_0.jpg

आत्ता शेतावर काकडी, दोडकी, दुधी भोपळा, कारली अशा वेलभाज्या आहेत. शिवाय भुईमूग, तूर-मूग-उडीद आहे. हळदही आहे. काकडीच्या वेलांनी छान जोर धरला आहे. पिवळी फुलं, हिरवीगार पानं आणि डोकावणाऱ्या पांढऱ्या काकड्या. प्रत्येक वेलांची पानंही वेगवेगळी आहेत. काकडीची चरबरीत भरपूर पानं, दुधीभोपळ्याची मोठमोठी आणि स्पर्शाला मऊ पानं, दोडक्याचीही पानं मोठी असतात पण गर्दी नाही. वेल मोकळा दिसतो. कारल्याची नाजूक-नक्षीदार पानं आहेत. बाकी वेलांना वास नाही. पण कारल्याच्या वेलाजवळ कडसर वास येतो. मला तो वास इतका आवडतो की घरीआल्यावरही तो वास मनात रुंजी घालत असतो.

IMG_20200823_114950899_0.jpg

वेलांना नवेनवे फुटवे येत राहतात. नैसर्गिकरित्या त्यांचा ओढा जवळपासच्या जिवंत, हिरव्या झाडांकडे असतो. मग ते मोठं झाड असो नाहीतर गवत किंवा तण. ह्या फुटव्यांना मांडवावर चढवणे, हे माझं दरवेळी करायचं आवडतं काम आहे. उनाड मुलांना आपापल्या जागेवर बसवायच्या उत्साहाने मी दोरी बांधून त्या फुटव्यांना योग्य दिशा दाखवत असते. सगळ्या वेलांच्या मिळून आठ रांगा आहेत. सगळीकडे फिरताफिरता दुपार झाली.
IMG_20200823_114835098_0.jpg

इतका वेळ पावसाची कृपा होती, त्यामुळे चटचट काम उरकलं. मी वेलांचं काम करत होते तोवर महेश आणि आमच्या शेतावरच्या मदतनिसाची धाकली (म्हणजेच आमची छोटी ताई) ह्या दोघांनी मिळून जीवामृत फवारायचं काम केलं. तेवढ्यात पाऊस आलाच. पाऊस बघत जेवण झालं. पावसामुळे जरा रेंगाळत जेवलो.

जेवणानंतर दुसऱ्या दिवशीच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तोडणीचं काम होतं. मग छोटी ताई आणि मी काकड्या काढायला गेलो. काकड्यांच्या वेलाला इतकी पानं असतात, की एक दिग्दर्शक आणि एक मुख्य कलाकार लागतोच. मी लांबून तिला मोठ्या काकड्या कुठेआहेत, ते दाखवत होते आणि ती पटापट तोडत होती. जवळपास पाच किलो काकड्या निघाल्या. मग थोडी भेंडी, थोड्या तिखटजाळ मिरच्या आणि एका मैत्रिणीने आग्रहाने सांगितलेली हळदीची पानं काढली. विसरले असते तर तिच्या पातोळ्या कशा घडल्या असत्या?

तिखटजाळ मिरच्या
IMG_20200824_081954680_0.jpg

तिळाचं झाड
IMG_20200823_135848045_0.jpg

काळे तीळ - पांढरे तीळ
IMG_20200823_140113914_0.jpg

IMG_20200823_140113914_0.jpg

---------------
माझ्या ब्लॉगची लिंक

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-३

20200902_132559_1.jpg

एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.

069a9f9b-cb54-493e-84dc-7c78316fd283.jpg

बाकी सगळ्या गोष्टींसारखं हेही चित्र बदललं. उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणं आलं. कारखान्यात तयार होणारी खताची पोती ‘’उज्ज्वल, सुफल’’ पिकांची स्वप्ने दाखवू लागली. पाणीपुरवठ्यासाठी पंप आले. भरपूर आलेल्या पिकाने आपल्यासारख्या खूप लोकसंख्या असलेल्या देशाची भूक भागली. एकेकाळी दुष्काळात बाहेरच्या देशातून धान्य आणावं लागत होतं, तिथे आता कोठारं भरून वाहू लागली. ह्या खतं, कीटकनाशकांनी काही प्रश्न संपवले आणि काही निर्माणही केले. धान्याची चव बदलली, जमिनीचा कस कमी झाला. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे रोगराईला निमंत्रण मिळते, असं मत काही तज्ज्ञांनी मांडलं.

21ec126e-e120-4923-a7b1-5f88c0d947c5.jpg

पूर्ण वेळ शेती करणं हा विचार पक्का झाल्यावर शेती म्हणजे नक्की काय करायचं ह्या दृष्टीने विचार सुरु केला. काय करायचं नाही, हे ठरवणं जरी सोपं असलं तरी काय करायचं हे ठरवणं सोपं नव्हतं. कारण ‘शेती’ हा सर्वसमावेशक शब्द आहे. तांदूळ-गहू-डाळी-भाज्या-परदेशी भाज्या-औषधी वनस्पती-फळं ह्यातलं काहीही किंवा हे सगळं ‘शेती’ ह्या शब्दाखाली येऊ शकतं.
761bcc04-bea2-435c-80d5-ab3312c93bc1.jpg

आम्ही पिढीजात शेतकरी नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे पारंपरिक ज्ञान मिळतं, तसं काही मिळालं नव्हतं. आमच्या आधीच्या पिढ्यांनी शेतीत हात पोळून घेऊन नोकरीचा ठराविक उत्पन्न देणारा सुरक्षित रस्ता धरला होता. आमचा हा प्रवास त्या अर्थाने उलट दिशेचा होता. शेतजमीन घेऊन तशी बरीच वर्षं झाली होती. तेव्हा फळझाडं लावली होती. भाजी किंवा अन्य पिकं घेत नव्हतो. ती सुरवात करायची तर नवीन माहिती मिळवणं गरजेचं झालं. फळांचं उत्पन्न चांगलं मिळतं पण वर्षभर हंगाम असणारी फळं कमी असतात. आंब्यासारख्या फळाचं उत्पन्न (जर मिळालं तर) वर्षात एकदाच मिळतं. भाजी वर्षभर आणि सगळ्यांनाच लागते, म्हणून भाजीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.
41043272-00cb-4b5c-8b05-0f46ef6c6a8c.jpg

यू-ट्यूबवर शेतीविषयक देशी-परदेशी असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते बघायला लागलो. ‘लाखोंका पॅकेज ठुकराकर इंजिनियर कर रहा है ऑरगॅनिक खेती’ अशा प्रकारच्या सक्सेस स्टोरी असायच्या. ते बघताना सगळं फार सहजसोपं वाटायचं. परदेशातले व्हिडिओ बघताना यंत्राधारित शेती बघताना, इतक्या प्रचंड मोठ्या शेतीचं व्यवस्थापन एक-दोन माणसं कसं सांभाळतात, असा अचंबा वाटायचा. हे सगळं छान होतं. पण हे सगळे यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी सांगत होते. त्या मुक्कामापर्यंत पोचताना कोणते काटेकुटे पार करावे लागले, किती नुकसान झालं, सुरवात केल्यापासून नफ्याचा जमाखर्च जुळेपर्यंत किती वर्ष लागली, हे कोणी सांगत नव्हतं.

ते शोधतानाच मध्य प्रदेशातील आकाश चौरसिया ह्या प्रगतिशील शेतकऱ्याच्या बहुस्तरीय शेतीचे काही व्हिडिओ बघितले. एका वेळी जास्तीतजास्त पिके कशी घेता येतील, कुठली पिके लावायची ह्याचं नियोजन कसं करायचं, हे सोप्या पद्धतीने सांगितलं होतं. वर्षभर पाठोपाठ उत्पादन मिळत राहील आणि भांडवली खर्च कमी होईल, अशी माहिती मिळाली.

त्यांच्या तंत्रात ते फेब्रुवारीच्या सुरवातीला वर्षाचं नियोजन करतात. जागेवर एकाआड एक असे पिकाचे आणि चालायच्या जागेचे पट्टे करतात. पिकाच्या जागेत विशिष्ट अंतरावर बांबू उभे करून त्याचा मांडव तयार करतात. त्या बांबूंच्या मांडवावर नारळाच्या झावळ्या किंवा आधीच्या पिकाचे शिल्लक दांडे ह्यांचं छप्पर तयार करतात. उभ्या बांबूंना तारा बांधून जाळी करतात. मांडवाच्या बाहेरच्या बाजूने सात फूट उंचीपर्यंत साड्या किंवा ग्रीन नेट बांधतात. हे सगळं करण्याचे बरेच फायदे आहेत. बाजूने साड्या आणि वरून छप्पर असल्यामुळे आत उन्हाळ्यातही थोडा गारवा राहतो. हवेबरोबर उडून येणारं गवताचं बी अडवलं जातं. पिकांचं नुकसान करणारे कीटक सहा फूट उंचीच्या खालीच उडत असतात. ते कीटक किंवा लहान प्राणीही आत शिरू शकत नाहीत. वरच्या आणि बाजूच्या आच्छादनामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते.

आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. परदेशात अक्षरशः हजारो एकर जमिनी असलेले शेतकरी असतात. आपल्याकडे सरासरी दोन ते अडीच एकर जमीन शेतकऱ्याकडे असते. ह्या तंत्राने कमी जागेत जास्त पीक घेता येतं. गवताचं बी अडवलं गेल्यामुळे तणाचं प्रमाण कमी होतं. तण काढण्यासाठी उचलून पैसे द्यावे लागत नाहीत. कमी क्षेत्रात बरीच पिकं असल्याने पाण्याची, खताची बचत होते. बांबू तसंच मांडवावर टाकायचं आच्छादन शेतातूनच येतं. बाजूला बांधायच्या साड्या जुन्या चालतात. भांडवली खर्च बेतात राहतो.

पिकांची लागवड करताना जमिनीच्या खाली आलं किंवा हळद लावतात. जमिनीवर भरपूर प्रमाणात पालेभाजीचं बी पसरवतात. मांडवाच्या आधाराने वेलभाज्या लावतात. त्यातही लहान पानं असलेल्या वेळी मांडवाच्या वर जातात आणि मोठी पानं असलेल्या वेली बाजूने लावतात. कडेला पपईची झाडं लावतात. दोन ते तीन आठवड्यात पालेभाज्या येऊ लागतात. त्याचं उत्पन्न दोन-अडीच महिने चालू राहतं. पालेभाज्या संपल्या की तिथे हळद-आलं उगवायला लागतं. शिवाय वेलभाज्यांचं उत्पन्नही सुरू होतं. ते पुढे तीन-चार महिने चालू असतं. सहा महिन्यात पपईला फळं येऊ लागतात. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान हळद-आलं तयार होतं. बाजारात चांगला भाव मिळेल तसं विकता येतं. त्याजागी फळभाज्या लावता येतात. असं ते चक्र सुरू राहतं.

सुरवातीचं चित्र
IMG_20200527_120401107[1].jpg

आम्हीही ही पद्धत वापरायची ठरवली. पण सुरुवात असल्यामुळे काही चुका झाल्या. बांबू जरा जास्त अंतरावर लावले. ते बांबू तेवढे मजबूतही नव्हते. त्यामुळे मांडव जरा डळमळीत झाला. बाजूने लावायला पुरेशा साड्या जमल्या नाहीत. काही भागात बांधल्या. पण त्या वाऱ्याने फाटून गेल्या. पालेभाजी उगवायला लागली आणि लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमधले पहिले दोन-अडीच महिने जाऊच शकलो नाही. तोवर पालेभाजी जून होऊन वाया गेली. पास मिळून पुन्हा जायला लागलो आणि थोड्याच दिवसात निसर्ग वादळाचा फटका बसला. बराचसा मांडव चांगले वाढलेले वेल बरोबर घेऊन आडवा झाला.

आता सध्या तिथे हळद, आलं आहे आणि थोडे वेल आहे . काय काय अडचणी येऊ शकतात, ह्याचं ज्ञान सुरवातीलाच मिळालं. जगात काहीच फुकट शिकायला मिळत नाही. कधी पैसे, कधी कष्ट, कधी शिव्या खाणे, कधी निराशा अशा कुठल्याना कुठल्या स्वरूपात ट्यूशन फी प्रत्येकाला भरावीच लागते.

आम्ही ही सगळी फी बिगरी यत्तेची प्रवेश फी म्हणून भरली आहे.
*******************************************************************************
लॉकडाउनच्या आधीचा फोटो आहे. पालक उगवायला सुरवात झाली होती.
acf46c71-21c1-40e6-82e4-70c7f53c3f74_0.jpg

निसर्ग वादळ येऊन गेल्यानंतर. मांडवाचं नुकसान झालं. बांधलेल्या तारा कोसळलेल्या दिसत आहेत.
IMG_20200612_122655984[1].jpg

नुकतीच उगवलेली हळद
54ab0ab7-e2bc-4883-a2b5-b12e17602043.jpg

सद्यस्थितीतील हळद
IMG_20200816_133456795.jpg

---------------
माझ्या ब्लॉगची लिंक

जीवनज्योती कृषी डायरी भाग-०४ : आमची माती, आमची शेती!

logo.jpg

हे सगळं सुरू झालं साधारण पंधरा-सतरा वर्षांपूर्वी. तोपर्यंत आम्ही आमच्या संसारात, नोकरी-व्यवसायात बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. सर्वसाधारण कुटुंबात सुरवातीच्या ज्या गरजा असतात, त्या असतात स्वतःच्या मालकीचं घर, चारचाकी असणे. त्या पूर्ण झाल्या होत्या. महेशच्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून शेतजमीन घ्यायचे विचार होते. त्याच्या एका नातेवाइकांच्या अशा एका शेतावर त्याने लहानपणीच्या सुट्ट्या घालवल्या होत्या, ते मॉडेल त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्यासाठी त्याची धडपड चालू होती. पुण्याच्या आसपास काही जमिनी बघूनही आलो होतो. पण अजून गणित जुळून आलं नव्हतं. आज तशीच एक फेरी होती. त्या ठिकाणी पोचलो. शेतजमीन म्हणजे नुसतं माळरान होतं. उन्हाच्या माऱ्यामुळे सोनेरी-पिवळं पडलेलं भरपूर गवत आसपास सगळीकडे होतं. आजूबाजूला बघितलं की लांबवर गावातल्या घरांची लाल कौलारू किंवा निळ्या पत्र्याची छपरं दिसत होती. त्याच्याही मागे पावसाळ्यातल्या धबधब्यांच्या खुणा अंगावर वागवणारे काळेभोर डोंगर. अधेमधे शेतांचे लाल मातीचे तुकडे. तुरळक झाडी. गावातल्या देवळाच्या कळसावरचा भगवा झेंडा वाऱ्यावर उडत होता. नेहमीच्या शहरी वातावरणातून अगदी वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत होतं. इथलं झगझगीत ऊन, वारा, गवताचा सूक्ष्म वास, पक्ष्यांचे आवाज सगळंच वेगळं होतं.

साधारणपणे शहरी-पांढरपेशी लोकं जेव्हा अशी जमीन घेतात, तेव्हा फार्महाउस प्लॉटच्या योजनेतील प्लॉट घेतात. अशा ठिकाणी डांबरी रस्ते, वीज-पाणी अशा सुविधा, मुख्य प्रवेशाजवळ सुरक्षा कर्मचारी अशा सोयी असतात. प्लॉटला कुंपण घालून प्रत्येकाच्या सीमारेषा आखलेल्या असतात. ह्या जागेवर मात्र ह्यातलं काही म्हणजे काहीच नव्हतं. ही नुसती मोकळी जागा होती. नंतर बऱ्याच वेळा ‘तिकडे तुमचं फार्म हाउस आहे का’ असं कोणी विचारल्यावर मी ‘नाही. फार्म हाउस नाहीये. आमचं हौसेचं फार्म आहे’ असं सांगायचे!

आधी इथली जवळचीच एक जमीन बघितली होती. त्या जमिनीजवळ आमच्या एका स्नेह्यांनी जमीन घेतली होती. नवीन जागी तो मोठाच आधार झाला असता. पण ह्या भागात एकतर औद्योगिक महामंडळाचं किंवा विमानतळाचं रिझर्वेशन येऊ शकतं, अशी कुणकूण कानावर आली. जरा इकडेतिकडे त्यासंदर्भात चौकशी करेपर्यंत त्या जागेचा व्यवहार होऊनही गेला. आता बघतोय ती जमीन हातची जाऊ द्यायची नाही, असा चंग महेशनी बांधला होता.
4-1.jpg
4-2_0.jpg
मला मात्र ह्या सगळ्या कल्पनेबद्दल खूप साऱ्या शंका होत्या. शेती करण्याचा कुठलाही अनुभव गाठीशी नसला, तरी हे काम बाजारातून वस्तू विकत आणणे किंवा तीन तासांचा सिनेमा बघून येणे इतकं सोपं नाही, इतकं कळत होतं. शेती करायची म्हणजे सतरा भानगडी. जमिनीच्या व्यवहारात होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल इकडेतिकडे वाचायला मिळतं.पुन्हा सरकारी रिझर्वेशन आलं तर सगळंच मुसळ केरात जायचं. महेशची नोकरी, त्याचे सततचे देशी-परदेशी प्रवास असायचे. मी नुकतीच आर्किटेक्ट म्हणून स्वतंत्र कामं घ्यायला लागले होते. त्यामुळे सगळे दिवस कामाचेच. ज्या दिवशी क्लाएंटना सुट्टी, ते खूप कामाचे दिवस. घरी शाळकरी मुलगा आणि वृद्धत्वाकडे झुकणारे सासू-सासरे. ह्या सगळ्या चौकटीत शेतीत जो वेळ, कष्ट आणि पैसे ओतावे लागलात, ते कसं बसवायचं? एक ना दोन अनेक शंका आणि प्रश्न डोक्यात घिरट्या घालत होते.

आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या बऱ्याच जणांचे आजे-पणजे शेती करणारे होते. हळूहळू शेतीतल्या बेभरवशाच्या उत्पन्नावर मोठ्या कुटुंबाचं पोट भरणं, कुटुंबातल्या सदस्यांच्या प्राथमिक गरजा भागणं कठीण होत गेलं. तेव्हाच्या शेतीयंत्रे नसलेल्या काळात घरातली माणसं हेच मुख्य भांडवल होतं. घरचे लहानथोर तिथे राबत असत. पण लहरी निसर्ग, वाढती महागाई आणि सतत पडणारे शेतमालाचे भाव ह्यामुळे उत्पन्नाचं गणित जुळेनासं झालं. त्यापेक्षा शिक्षण घेऊन रोख पैसा देणारी नोकरी शहरात मिळाली, तर शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना आधार होतो आणि शेतीवरचा भार कमी होतो, हे लक्षात आल्यावर कुटुंबातल्या काही सदस्यांनी शहराची वाट धरली. पुढे बदललेली राजकीय-सामाजिक परिस्थिती, जमिनीच्या विषयातले नवे कायदे ह्यामुळे तर ‘शेती कनिष्ठ आणि उत्तम नोकरी’ हेच ब्रीदवाक्य झालं.
4-3.jpg
4-4_0.jpg

मग ह्या भानगडीत आपण कशाला पडायचं? असं वाटत होतं. पण हो-नाही करत आम्ही ती जमीन घेतली. हळूहळू करत जागेला कुंपण घातलं, बरीच खटपट करून वीज मिळवली. पुष्कळ फळझाडं लावली. तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी खोली, पाणी साठवायला टाकी असं बस्तान बसलं. ह्यात माझा सहभाग नगण्य होता. महेश दर शनिवारी न चुकता, न कंटाळता तिथे जायचा आणि दिवसभर थांबून घरी परतायचा. त्यानेच कोंकणातून आंब्याची, फणसाची, काजूची झाडं आणली आणि जोपासली. गावातल्या लोकांशी चांगले संबंध तयार केले. मला मुळात आवड नव्हती आणि घरच्या तसंच व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सात दिवस कमी पडायचे.

असं करता करता गोष्टीत म्हणतात ना, तशी खरंच वर्षांमागून वर्षं गेली. थोडी उसंत मिळाल्यावर नीट डोळे उघडून बघितलं तर आत्ताआत्ता तीनचाकी स्कूटर चालवणारा मुलगा ऐटीत मोटरसायकल फिरवायला लागला होता. थोड्याच दिवसात तो शिक्षणाच्या निमित्ताने घरा बाहेर पडला आणि घरी उरलो आम्ही दोघेच. विं.दा.करंदीकरांच्या कवितेतल्यासारखं ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते’ जगून कंटाळलो होतो. सुरवातीपासूनच महेशचं नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करायचं स्वप्न होतं. ते प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करता येईल, अशी शक्यता खुणावायला लागली होती. ह्याच दरम्यान अनपेक्षितपणे काही वर्षे परदेशी वास्तव्य झालं होतं. तिथे फिरताना अतिप्रचंड मोठी शेतं दिसायची. अगदी थोडं मनुष्यबळ असताना यंत्रांच्या मदतीने कशी शेती करत असतील, असा अचंबा वाटायचा. महेशला तर तिथल्या एखाद्या शेतावर चार-सहा महिने काम करावं असा मोह व्हायचा! त्याचं ते स्वप्न काही प्रत्यक्षात उतरलं नाही. त्या आधीच आम्ही गाशा गुंडाळून मायदेशी परत आलो.
4-5_0.jpg
4-6.jpg

तिथे असताना यू-ट्यूब, इंटरनेटवर शेतीबद्दल माहिती मिळवायला सुरवात केली होती. यू-ट्यूबवर सगळ्यांच्या यशोगाथा, झालेल्या फायद्याचे मोठाले आकडे, त्यांची सुबक-सुंदर शेती बघून कौतुक वाटायचं आणि ‘हे काय सोपं आहे की असं वाटायचं. कारण कोणाच्या अपयशाच्या कथा बघायला मिळतच नाहीत.

हे सगळं बघून आम्ही अमाप प्रभावित झालो. तो प्रभाव ओसरल्यानंतर अगदी मूलभूत प्रश्नांना हात घातला. आपल्याला शेती करायची आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे? गाण्यात जशी घराणी आहेत, तशीच शेतीतही आहेत. भाजीपाला, फुलशेती, फळबाग, औषधी वनस्पती, बांबू, ड्रॅगनफ्रूट, पॉलिहाऊस उभारून परदेशी भाज्या लावणे, सुगंधी वनस्पती असे असंख्य पर्याय आहेत. रासायनिक खतं, कीटकनाशके वापरायची नाहीत, नैसर्गिक शेती करायची ठरवलं की त्यासाठीचे पर्याय समोर येतात. गांडूळ खत, जीवामृत, पंचामृत, गोकृपामृत, वैदिक शेती एक ना दोन. असं प्रत्येक बाबतीत म्हणजे बी-बियाण्यांपासून पाणी द्यायच्या पद्धतीपर्यंत होतं. आमच्या शेताच्या आसपासचे जे पिढीजात शेतकरी आहेत, त्यांना हे प्रश्न पडत नसावेत. ते त्यांच्या मळलेल्या, ठरलेल्या वाटेने जातात. ‘युरिया मारल्याशिवाय पिकं येणार नाहीत’ ही खात्री असते आणि आयुष्याच्या केंद्रस्थानी शेती आणि बाकीचे जोडधंदे त्याच्या परिघावर असल्याने ‘आपण नक्की का शेती करतोय?’ असे प्रश्नही पडत नाहीत. आमच्या वाट्याला मात्र खूप सारे पर्याय आणि त्याहूनही जास्त प्रश्न होते.

आमच्या स्वभावाला जागून आम्ही सावध पर्याय निवडले. बरीच फळझाडं शेतावर होतीच. त्यासोबत भाजी लावायची ठरवली. त्यामागे असा विचार होता की भाजीपाल्याचं जीवन चक्र कमी दिवसांचं असतं. म्हणजे पालेभाजी लावली तर वीस-पंचवीस दिवसात भाजीची सुरवात होते. वेलभाज्या-फळभाज्या महिन्या-दीड महिन्यात येऊ लागतात. शेतावर गाई बैल आधीपासूनच होते. त्यामुळे गोमूत्र-शेणावर आधारित खतं वापरायचं ठरवलं. कारण कुठलेही पर्याय वापरायचे की नवीन काहीतरी विकत घ्यायला लागतंच. शेती हा तसा फार महागडा छंद आहे. बी-बियाणे, अवजारं, खतं, मजुरी सगळ्याला रोख पैसा मोजावा लागतो. पैसा हातात किती येईल ह्याची मात्र अजिबातच खात्री नसते.
4-7.jpg
4-8.jpg

विचारविमर्ष, चर्चा-चर्विचरण झालं आणि आम्ही चक्क शेती करायला लागलो! ही बातमी जशी पसरली, तशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. शहरातील लोकांच्या थोड्या गंमतीच्या, चेष्टेच्या. खेड्यातल्या लोकांच्या अविश्वासाच्या. ‘तू मग टोपलीत धन्यांसाठी जेवण घेऊन बिगीबिगी जातेस की नाही’ ह्या प्रश्नाने तर एव्हाना शतक पूर्ण केलं असेल! चांगली असलेली नोकरी सोडून हे असलं कोणी करू शकेल, ही कल्पना काही जणांना वेडेपणाची वाटायची. पण बहुतेकांना मातीत हात घालून काम करणे, आपल्या डोळ्यासमोर झाडं वाढताना बघणे ह्याचं आकर्षण वाटतंच. त्यांना हे सगळं फार रोमांचकारक वाटायचं. मध्यंतरी काही वर्षे परदेशात राहिल्यामुळे शेतावरच्या आमच्या मदतनिसाला आता काही आम्ही परत येणार नाही, अशी खात्री झाली असावी. त्यामुळे त्याला आम्ही परदेश सोडून कायमचे परत आलो आणि आता शेतीत लक्ष घालणार, ही कल्पना अजिबातच आवडली नाही. ‘तुम्हाला कुठलं जमतंय शिकलेल्या लोकांना’ असं पालुपद त्याने बरेच दिवस ऐकवलं. आम्ही तरीही येत राहिलो म्हटल्यावर त्याची गाडी पुन्हा रुळांवर आली.

अगदी सुरवातीला मी शेतावर गेले की महेशच्या मागे फिरायचं. झाडांचं कौतुक करायचं आणि परत घरी. संपला विषय. पण हे नवलाईचे दिवस ओसरले. हळूहळू मी शेतीत रमायला लागले. शहरापेक्षा बघायला मिळत नाहीत असे निसर्गाचे विभ्रम शेतात बघायला मिळतात. कालपर्यंत निष्पर्ण, ओक्याबोक्या दिसणाऱ्या झाडाला अचानक कोवळी, चकचकीत, तजेलदार नवीन पानं दिसायला लागतात. झाडं फुलांनी-फळांनी भरून जातात. वेगवेगळ्या फुला-फळांकडे वेगवेगळे पक्षी येतात. तुम्ही काही करा किंवा करू नका. हे चक्र चालूच असतं.
4-9.jpg

नोकरी-व्यवसायात असतानाही निसर्गाच्या लहरीचा फटका बसतो. पण त्यामुळे आपल्या उत्पन्नावर त्यामानाने कमी परिणाम होतो. शेती करताना मात्र निसर्ग मित्रही असतो आणि शत्रूही. उदाहरणच द्यायचं झालं तर आंब्याच्या झाडांवर आत्ताआत्ता तुरळक मोहोर दिसायला लागला आहे. ह्या भागात आंबे हातात यायला जूनचा पहिला आठवडा उजाडतो. म्हणजे अजून पाच-साडेपाच महिने बाकी आहेत. तोपर्यंत पाऊस, थंडी, ढगाळ हवा, वादळ ह्यातलं काहीही होऊ शकतं आणि बहुतेक वेळा काहीतरी होतंच. त्यातून वाचेल, ते आपलं म्हणायचं. आम्ही तांदूळ लावला नव्हता. पण आसपासच्या शेतातला अगदी कापणीला आलेला तांदूळ अतिवृष्टीने आडवा झाला. मलाच इतकी हळहळ वाटली. पण त्या शेतकऱ्यांनी पाऊस ओसरल्यावर शांतपणे जो तांदूळ वाचला होता, त्याची कापणी आणि इतर प्रक्रिया करून घरी नेला. ही अनिश्चितता त्यांनी आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारली आहे. मला अजून ते जमलं नाही. काही झाडांचं-पिकांचं नुकसान झालं की हळहळायला होतं. निसर्गाची लहर अपरिहार्य आहे, हे अजून झिरपलं नाहीये.

शेती करायला लागल्यावर आधीच्या अनुभवात नसलेल्या अनेक स्पर्श-गंधांशी ओळख होऊन माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या. प्रत्येक झाडाच्या पानांचा पोत खूप वेगवेगळा असतो. दुधी भोपळ्याच्या वेलाची पानं अगदी मऊ-मुलायम असतात. सुखाने डोळे मिटून गालावर फिरवत राहावी, अशी. काकडीची मात्र चरचरीत काटेरी. तिथे फार काम करायचं असेल, तर हातमोजे घातलेले बरे. नाहीतर हातात कुसळ जाऊ शकतं. कारल्याच्या वेलाची नाजूक, देखणी पानं असतात. कारल्याच्या वेलाला इतकी दाट पानं असतात, की चांगला वाढलेला वेल असेल, तर समोर हिरवी भिंत उभी असल्यासारखं वाटतं. गिलकी (घोसाळी) पानांमागे लपतात. नीट लक्ष देऊन बघितलं नाही, तर दोनेक आठवड्यात चांगलीच मोठठी वाढून जून होतात. मग ‘राहूदे आता बियांसाठी’ असं आम्ही आमचं समाधान करून घेतो. अशी पैलवान झालेली बरीच गिलकी आमच्या शेतात दिसतील. दोडक्याचा वेल त्यातल्या त्यात सोपा. पानं मोठी पण विरळ. दोडकी लपून बसत नाहीत. सहज दिसतात आणि तोडताही येतात.
4-10.jpg

तिथली गंधांची दुनिया तर अजून वेगळी आहे. शेताचा भाग इंद्रायणी तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे तजेलदार हिरवी भाताची खाचरं चमकताना दिसायची. कारमधून उतरल्याक्षणी भाताच्या सुवासाचे लोट अंगावर येत असत. कारल्याच्या वेलापाशी काम करताना अगदी कडसर पण हवाहवासा वास येतो. त्या कारल्याची भाजी करतानाही मला तो वास आठवतो. टोमॅटोच्या झाडांजवळ काहीसा उग्र, जंगली वास येतो. ऋतू बदलले, तसा आता काजूच्या, आंब्याच्या झाडांवर मोहर दिसायला लागला आहे. अजून थोड्याच दिवसात त्याचा घमघमाट येऊ लागेल. काजूचा काहीसा मादक वास असतो तर आंब्याचा मोहक. पण दोन्ही इतके छान असतात की काहीच काम न करता त्या झाडाखाली थांबून वास घेत बसून राहावं असं वाटतं. ह्याच्या व्यतिरिक्त गोठ्यातला वास, उन्हाने तापलेल्या जमिनीचा वासही आसपास रेंगाळतात. पहिल्या पावसाचा मृद्गंध आपल्या ओळखीचा असतोच.

नियमित जायला लागल्यावर तिथल्या लोकांच्या जगण्याकडे लक्ष जायला लागलं. खेडं असलं तरी शहरापासून जवळ आहे. गावातली काही तरुण मंडळी एम.आय.डी.सी.मध्ये, पॉलिहाऊसमध्ये नोकऱ्या करतात. टेम्पो किंवा प्रवासी वाहनांचा व्यवसाय करणारे आहेत. तिथे बारावीपर्यंत शाळा आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत पक्का रस्ता आहे. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. तरुण मुलं ‘पबजी’ खेळत असतात! तिथल्या बहुतेक बायका साडी नेसतात. क्वचित नऊवारी, जास्ती करून पाचवारी. तरुण मुली मात्र आधुनिक कपडे घालतात. पुरुष मंडळी पायजमा-शर्ट आणि तरुण मुलं जीन्स-टी शर्ट. मुला-मुलींच्या केशरचना आणि एकंदर राहणी शहरी म्हणता येईल अशी. एक-दोन पिढ्यांमागे शहरातल्या आणि खेड्यातल्या लोकांच्या कपड्यांमध्ये ठळक फरक दिसायचा. तो आता नाहीसा झाला. मुलांची नावं, करमणुकीची साधनंही सारखी झाली. फरक आहे तो पायाभूत सोयींमध्ये. पुण्यात जेवढ्या वेळा वीज खंडीत होते, त्या तुलनेत तिथे वीज नसण्याचं प्रमाण प्रचंड आहे. निसर्ग वादळ येऊन तिथे दाणादाण करून गेलं. त्यानंतर तिथे आठवडाभर वीज नव्हती. वीज, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, कचरा व्यवस्थापनाची आश्वासनं देत कितीतरी सरकारं आली आणि गेली. पण ती परिस्थिती काही सुधारली नाही.

मी शेतावर जायला लागले तेव्हा सलवार-कमीज-ओढणी ह्या वेषात जात होते. आपला शहरीपण लपवता येत नाही. पण निदान त्याचं प्रदर्शन नको, असं वाटत होतं. पण काम करताना जरा त्रासदायक व्हायला लागले. आता मी चिखल-मातीत वावरताना सुटसुटीत कपडे बरे, म्हणून मी जीन्स आणि लांब हाताचा टॉप घालते. पायात बूट आणि डोक्यावर टोपी. शाळेत असताना जसा रोजचा एकच गणवेश असायचा, तसे हेच कपडे नेहमी घालते.

एकदा गावातल्या एक आजी आमच्या मदतनिसाकडे आल्या होत्या. आम्ही तिथेच झाडाखाली बघुनी सावली जेवत बसलो होतो. त्या आजी येऊन एकदम तोडक्या-मोडक्या हिंदीतच बोलायला लागल्या. मला आश्चर्यच वाटलं. आमची मदतनीस मंडळी आपापसात हिंदी बोलतात. म्हणून ह्या आजीही बोलत असतील, असं वाटलं. नंतर मी महेशला काहीतरी सांगायला लागल्यावर त्या एकदम म्हणाल्या,’मराठी चांगलं बोलताय की तुम्ही!’ मला काही क्षण कळलंच नाही. मग मी भानावर येऊन म्हटलं,’अहो मी मराठीच आहे. मराठी शाळेत शिकले. घरीदारी मराठीच बोलतो’ तर त्या म्हणाल्या ‘मला आपलं वाटलं तुम्ही सिटीतली लोकं. मराठी येत का कसं!!!’ (आता घरी तो आवडता विनोद झालाय. काही जरा जड बोललं की आम्ही एकमेकांना म्हणतो,’सिटीतले असून मराठी चांगलं बोलताय की साहेब/मॅडम’) तिथल्या बायकांशी ओळख वाढल्यावर हळूहळू प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ‘माहेर कुठलं? भाऊ किती? वडिलांची शेती आहे का? सासरी कोणकोण आहे? साहेब एकटेच? भाऊ नाही? मुलं किती? एकटाच मुलगा? पुण्याला बंगल्यात राहता का? स्वैपाक करता का? काय जेवता? किती शिकल्या? नोकरी करता का?’ असे बरेच. मी जमतील तशी उत्तरं देतेही. पण ‘मराठी येतं का?’ ह्या प्रश्नाला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला आहे.
4-11.jpg

आता आठवड्यातून दोन वेळा शेतावर जाऊन कष्ट करायच्या रूटीनला मी चांगलीच सरावले आहे. महेश तर रोजच जातो. रात्री जेवतानाच्या आमच्या गप्पा बऱ्याच वेळा आज शेतावर काय झालं, काय अडचणी आल्या, काय करायला हवं ह्याभोवती फिरतात. शेतावर गेले की भाजी/ फळं तोडणे, त्याची वर्गवारी करणे हे काम माझं असतं. त्याशिवाय शेती हे सतत चालणारं चक्र असल्याने बियांची पेरणी करणे, वेलांना आधार देऊन मांडवावर चढवणे, तण काढणे ही कामंही असतात. ज्या दिवशी मी घरी असते, त्या दिवशी आलेली भाज्या-फळे विकणे, बियाणं किंवा तत्सम गोष्टी आणणे ही कामं असतात.

बियाण्यांविषयी एक गोष्ट सांगावीशी वाटते. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या योजनांबद्दल आपण नेहमीच वाचतो, बघतो. पण प्रत्यक्षात मात्र त्या योजनांचा फायदा मिळवणं अतिशय अवघड असतं, हे शेती करायला लागल्यावर समजलं. उत्तम प्रतीचं बियाणं हा तर शेती व्यवसायाचा पाया. त्यासंदर्भात संशोधन व विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाबीज आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय बीज अनुसंधान अशी महामंडळं स्थापन केलेली आहेत. दोन्हीची कार्यालये पुण्यात आहेत. त्यांच्याकडचं बियाणं सवलतीत मिळतात. खाजगी कंपन्यांच्या बियाण्यापेक्षा बरीच स्वस्त असतात. पण वाईट भाग असा की त्यांच्याकडून बियाणं मिळवणं जवळजवळ अशक्यच असतं. मला जे बियाणं हवं होतं त्या संदर्भात मी महाबीजकडे फेऱ्या मारल्या. पत्रव्यवहारही केला. त्यांच्या उत्तराप्रमाणे त्यांनी नेमलेल्या वितरकाकडे बियाणं मिळायला हवं. वितरकांना विचारलं की एकतर मुदत संपत आलेलं बियाणं मिळतं किंवा मिळतच नाही. तांदूळ लावायचे दिवस संपलेले असतात पण बियाणं तेच उपलब्ध असतं. शेवटी त्यांचा नाद सोडून आपण खाजगी कंपनीचं बियाणं घेतो. कारण शेतीत वेळापत्रक सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. वेळ गेली की नंतर काही उपयोग नाही.
4-12.jpg

‘राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं’ तर दाद कोणाकडे मागायची, अशी म्हण आपण ऐकलेली असते. ह्याचा प्रत्यय शेतकऱ्याला सतत येत असतो. मला कधीकधी वाटतं की कंटाळून सगळ्यांनीच जर शेती करणं बंद केलं तर काय होईल? शेतकऱ्याच्या स्वतःच्या कुटुंबाला असं किती धान्य लागत असेल? ‘नकोच ती कटकट. बियाणं मिळवा, खतासाठी रांगा लावा, पावसाची वाट बघा. सगळं करून पीक हाती लागलं की भाव पडतात. त्यापेक्षा स्वतःपुरेसं लावावं आणि शांत बसावं’ असं जर शेतकऱ्याने ठरवलं तर आपल्याला खायला कसं मिळेल?

मी पुण्यात राहते. सरकारी ऑफिसमध्ये उभं राहून (कारण बसायला कोणी सांगतही नाही) बोलण्याची मला भीती वाटत नाही. ही धावपळ करण्यासाठी लागणारा वेळ,साधनं माझ्याकडे आहे. पण आमच्या शेताला लागून शेत असलेला सदू बबन चव्हाण हे करू शकणार आहे का? त्याला हातातली कामं टाकून स्वस्त बियाण्यासाठी खेपा मारणं परवडेल का? नाही. तो नाईलाजाने महाग बियाणं घेतो. पण अशा असंख्य सदू बबन चव्हाणांना स्वस्त, निरोगी आणि चांगलं उत्पन्न मिळेल असं बियाणं उपलब्ध व्हावं हाच तर महाबीजचा उद्देश आहे. राष्ट्रीय बीज अनुसंधानाचं तर बोधवाक्य ‘राष्ट्रीय बीजका वादा, फसल अच्छी फायदा जादा’ असं काहीतरी आहे. ‘फायदा जादा’ हे अगदी खरं आहे. पण तो नक्की कोणाला होणं अपेक्षित आहे, आणि प्रत्यक्षात कोणाला होतो, हा जरा गडबडीचा विषय आहे.

4-13.jpeg
4-14.jpg

अशा सगळ्या अडचणींसकट आमचं शेत आता माझं लाडकं झालं आहे. मी सुरवातीलाच म्हटलं आहे की मला स्वतःला शेतीची विशेष आवड नव्हती. मग असं काय झालं की मी शेतीत रमले आणि काय शिकले? कारण तसं काही फार मोठं नाही. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मी माझी हातातली कामं संपवून काही काळासाठी परदेशात गेले. परत आल्यावर आता हळूहळू पुन्हा सुरवात करावी, असं ठरवेपर्यंत कोरोनाचं तांडव सगळीकडे सुरू झालं. घराबाहेर पडता येत नाही, कोणाला भेटता येत नाही, अशी भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आली. काही दिवसांनंतर शेतावर जायला परवानगी मिळाली. तोवर घरात बसून मी पुरेशी कंटाळले होते. ‘चला, शेतावर तरी जाऊया’ अशा विचाराने जायला लागले. गेल्यावर नुसतं काय बसायचं? म्हणून कामं करायला लागले आणि हळूहळू त्यात रमत गेले. मी पहिल्यापासून शहरात राहिले. टोमॅटो आणि वांग्याचं रोप मला ओळखता येत नव्हतं. कुठल्या भाजीचे वेल असतात आणि कुठल्या भाजीची झुडपं हेही मला ठाऊक नव्हतं. आता दोन नवजात पानं मिरवणारं रोप बघून ते कशाचं असेल, हा माझा अंदाज बहुतेक वेळा बरोबर येतो, तेव्हा माझी मलाच गंमत वाटते!

मला कॉलेजला असल्यापासून ट्रेकिंगची आवड आहे. शक्य होईल तेव्हा पायात बूट आणि पाठीला पिशवी लावून निसर्गाच्या कुशीतल्या त्या चाकोरीबाहेरच्या वाटा तुडवण्यासारखं सुख नाही. पण आता ह्या ‘न्यू नॉर्मल’ जगात ते डोंगर दुरूनच साजरे करावे लागतील की काय? अशी काळजी वाटते. शेतावर गेल्यावर ती तहान बऱ्यापैकी भागते. अजून काही वर्षांनी शारीरिक क्षमता कमी झाली आणि डोंगरवाटा दुरावल्या तरी शेतावर येता येईल, अशी आशा वाटते.

मला शिकत असल्यापासून कधी एकदा नोकरी/ व्यवसाय करून पैसे मिळवेन अशी घाई झाली होती. खरंतर स्वतः पैसे मिळवले तरच शिकता येईल, अशी काही परिस्थिती नव्हती. आई-वडील ती सगळी बाजू सांभाळून आणि वर हौसमौज करत होते. पण आपली माझीच आवड. त्यामुळे काय झालं की पैसे मिळवले म्हणजेच आपण काम करतोय, अशी काहीतरी समजूत माझ्या डोक्यात पक्की झाली. आता आम्ही नवीन नवीन सुरू केलेल्या शेतीत पैशात फायदा होत नाही, इतक्यात होणारही नाहीये. मग हे आपण का करतोय? हा भातुकलीचा खेळ खेळावा तसं करतोय का? असे विचार कधीकधी मनात येतात.
4-15.jpg

पण एका दाण्याचे शंभर दाणे होताना बघणं अतिशय आनंददायक असतं. एक बी पेरली, रुजली की तिच्यापासून शेकडो फळं तयार होतात. तितक्या फळांना निर्माण करायची शक्ती त्या इवलुश्या बीमध्ये असते, ही निसर्गाची किमया अक्षरशः अवाक करते. जोवर त्या बीला योग्य वातावरण मिळत नाही, तोवर ही जिगीषा सुप्त अवस्थेत असते. जमिनीच्या गर्भात जाऊन ओलावा मिळाला की सृजनाची प्रक्रिया सुरू होते. हे सगळं आश्चर्य बघताना माझ्या मनाभोवतीचा ‘पैसे मिळवणे’ ह्या विचाराचा घट्ट वेढा सैलावला. पैसे मिळवणे म्हणजेच काम करणे आणि पैसे ज्या प्रमाणात मिळतात त्याच प्रमाणात आनंद-समाधान मिळतं, ही माझी गृहीतकं बदलली. आता त्या पलीकडे जाऊन मी आनंद मिळवायला लागले आहे.

पलीकडचं गवत सगळ्यांनाच हिरवं वाटतं. मलाही वाटतं. शेतात काम करायला लागल्यापासून मात्र आपण कष्टाने जोपासलेलं तितकंसं हिरवं नसलेलं गवतही अतिशय देखणं वाटायला लागलं आहे.

(अनुभव मासिकाच्या जानेवारी २०२१ च्या अंकात पूर्वप्रकाशित)

शेती संदर्भातील अन्य काही लेखांच्या लिंक खाली दिल्या आहेत

शेतावर वीज मिळवण्यासाठी माहिती अधिकार वापरून वीज मंडळाबरोबर केलेल्या खटपटीची गोष्ट
दिव्याखाली अंधार

एका वर्षी खूप आंबे आले. विक्रीचा आजिबात अनुभव नसताना स्वस्त दरात मस्त आंबे कसे विकले, त्याची गंमत
आम्रविक्री योग्य

---------------
माझ्या ब्लॉगची लिंक

आम्र-विक्री योग

मावळ भागातल्या एका खेड्यात आमची थोडी शेतजमीन आहे. नवऱ्याने मोठ्या आवडीने घेतली, तेव्हा अगदी माळरान होतं. त्याने दर आठवड्यात तिथे चकरा मारून, गावकऱ्यांशी मैत्री करून, कष्टाने-प्रेमाने त्या जागेला हिरवं केलं. एकट्यानेच. घरच्या आणि व्यवसायाच्या व्यापात वर्षावर्षात मी तिथे फिरकत नसे. तसाही माझा पिंड पूर्णपणे शहरी आहे. काय भाजी- फळे हवी असतील, ती भाजी बाजारातून पाव-अर्धा किलो आणावी आणि खावी एवढीच माझी झेप आहे. त्यामुळे ह्या लेखातही काही तांत्रिक चुका असल्या, तर पोटात घाला.

नवऱ्याला मात्र हे उपद्व्याप मनापासून आवडायचे. नोकरी सांभाळून गहू-तांदूळ-ऊस-ज्वारीची प्रकारची शेती तर जमण्यासारखी नव्हती. म्हणून मग त्याने तिथे फळझाडे लावायची ठरवली. कोकणातून आंब्यांची, काजूची, फणसाची रोपं आणली आणि रुजवली. सुरवातीला तिथे पाण्याचा प्रश्न होता, वीज नव्हती. हळूहळू ह्या सगळ्या सोयी झाल्या आणि शेत बहरत गेलं. फळझाडांच्या जोडीला अधूनमधून थोडीफार भाजीची लागवडही सुरू केली. दर शनिवारी शेतावरून येणाऱ्या ताज्या भाज्यांप्रमाणे आमच्या आठवड्याचा भाज्यांचं वेळापत्रक बेतलं जाऊ लागलं. ह्या भाज्या- फळांचं प्रमाण घरी खाऊन कोणाकोणाला नमुना देण्याइतपतच असायचं. बाजारात नेऊन विकता येईल, इतकं काही उत्पादन नव्हतं.

गोष्टीत म्हणतात ना, तशीच वर्षामागून वर्ष गेली. लावलेल्या आंब्यांच्या रोपांपैकी काही जगून चांगली मोठी झाली आणि फळं देऊ लागली. सुरवातीला १५०-२०० आंबे आले, तरी आम्ही आनंदाने खायचो, खाऊ घालायचो आणि 'यंदा घरचा भरपूर आंबा खायला मिळाला' अशा गप्पा वर्षभर सांगत राहायचो. हळूहळू आंब्यांचं प्रमाण वाढायला लागलं. आंब्यांची संख्या आपल्या आपल्यात खाणे ह्याच्या पलीकडे जायला लागली. स्वानंदासाठी सुरू झालेल्या उपक्रमाकडे गंभीरपणे बघायला पाहिजे, असं वाटायला लागलं.

एका वर्षी एका ओळखीच्या फळविक्रेत्याला विकायला दिले. पण त्याच्याकडून पैसे मिळवायला बरेच कष्ट करावे लागले, मागे लागून वसुली करावी लागली. मे महिन्यातल्या आंब्यांचे तुटपुंजे पैसे दिवाळीत हातात पडले. त्याच्या पुढच्या वर्षी मार्केट यार्डच्या व्यापाऱ्याला विकले. ह्या वेळी वसुलीसाठी मागे न लागता पैसे मिळाले खरे. पण अतिशय कमी भाव मिळाला. म्हणजे टेम्पोचं भाडं, मार्केट यार्डची लेव्ही वगैरे विचारात घेतली, तर चणे-फुटाणेच. कुठलीही वस्तू आपण विकत घ्यायला गेलो तर आणि विकायला गेलो तर किमतीत मोठा फरक असतो, हे माहितीही होतं आणि मान्यही. पण तरीही हा फरक डाचत होता.

ह्या वर्षी तर खूप म्हणजे खूपच आंबे आले. खूप म्हणजे जवळपास साडेचार हजार आंबे आले! चार डझनच्या तीन-चार पेट्या आणून खायची वर्षानुवर्षांची सवय. इतकी सगळी आंब्यांची पोती घरी पोचली, तेव्हा ते आंबे बघून अक्षरशः उरावर दडपण आलं. आपल्या शेतावरचे छान तजेलदार, मोठे मोठे आंबे. बघून एकीकडे एकदम भारी फिलिंग येत होतं आणि दुसरीकडे आंब्यांची व्यवस्था नीटपणे लावू नाही शकलो तर, अशी भीतीही वाटत होती.

त्यांचं नक्की काय करावं, ह्यावर कुटुंबात खल सुरू झाला. आमच्या घरात हे एक काम आम्ही सगळेजण अत्यंत उत्साहाने करतो. प्रत्येक सदस्य आपलं मत ठामपणे आणि स्पष्टपणे मांडतो. संयमित चर्चांना ऊत आला

तेव्हा माझी भाची सुट्टीत राहायला आली होती. तिचं मत ' आत्या, आपणच खाऊ सगळे. काही नको विकायला’
'अगं, रोज दहा खाल्लेस, तरी महिन्यात तीनशेच खाशील. उरलेले? '
'आत्या, मी रोज शंभरपण खाऊ शकते'
आता चिरंजीव रिंगणात उतरले.
' शंभर आंबे खाल्लेस, तर 'तिकडेच' मुक्काम करायला लागेल.
चिरंजीव त्यांची स्पष्ट मते मांडायला पुढेमागे बघत नाहीत. त्यामुळे त्यांनी मुळावरच घाव घातला. ‘आई, तू ह्या भानगडीत पडायलाच नको होतं. जाऊ द्यायचे होतेस शेतावरच वाया. तुझ्यामागे आधीच कमी कामं आहेत का? ‘

'आत्या, अजून एक आयडिया. आपण टपरी टाकूया का? मी 'आंबे घ्या आंबे' असं ओरडीन. तू विकायचं काम कर'

चिरंजीवांना ‘आपल्या मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, शेजारी ह्यांच्याकडून पैसे कसे घ्यायचे? ’ असा संकोचही वाटत होता. ते बरोबरही होतं. पण नमुना म्हणून दिलेले आंबे आवडले म्हणून कोणी परत मागायला येत नाही. विकत घ्यायचे असले, तर ते विनासंकोच हवे तेवढे घेऊ शकतील, हा मुद्दा त्याला पटला.

घरातील ज्येष्ठ नागरिक आंबे खराब व्हायला लागले तर? ह्या काळजीत होते. शिवाय सहकारनगरच्या प्रत्येक बंगल्यात आंब्याची झाडं आहेत. आपल्याकडे विकत घ्यायला कोण येणार, अशी योग्य शंकाही त्या आघाडीला होती.
अजून एक कल्पना होती की आंब्याच्या रसाचं कॅनिंग करून बाटलीबंद करून घ्यायचा आणि त्या बाटल्या निवांतपणे विकता येतील. आंबे खराब होण्याची जी काळजी होती, ती राहिली नसती. मी कॅनिंग सेंटरमध्ये जाऊन चौकशी करून आले. पण कॅनिंग करायचं तर आपल्या खिशातून पैसे घालायचे आणि पुन्हा विकण्यासाठी धावपळ करावी लागेल, म्हणून आंबे विकले गेले नाहीत आणि खराब व्हायला लागले, तरच हा पर्याय वापरायचा असं ठरलं.

ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण घरूनच आंबे विकावे का? असा विचार मनात जोर धरू लागला. तसेही मार्केट यार्डचे व्यापारी फुटकळ पैसे देतात. मग आपण 'शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांकडे' अशी विक्री करून तर बघूया, असं वाटत होतं. आतापर्यंत व्यापारी आपल्याला फसवून कमी पैसे देतात, ही बोच दरवर्षी लागत होती, ते तरी टळेल. फार काय, नुकसान होईल. पण चूकच करायची, तर निदान नवीन चूक केल्याचं समाधान मिळेल, असा विचार केला. आंबे विक्री हा काही आपला नेहमीचा व्यवसाय नाही. त्यात पैसे मिळाले तर चांगलंच पण कमी मिळाले, तरी चूल पेटणार आहे, हा विश्र्वास होता.

बाजारातील आंब्यांचे भाव वर्तमानपत्रात येतात. त्यातल्या कमीतकमी भावाच्या अर्ध्या भावात म्हणजे पन्नास रुपये डझन अशा भावाने आंबे विकायचे ठरवले. आज बाजारात केळी किंवा अंडी सुद्धा इतक्या कमी भावात मिळत नाहीत. पण जास्त भाव मिळायची हाव धरली आणि आंबे सडून वाया गेले, असं नको व्हायला, ही भीती होती.

जाहिरातीचा मजकूर A4 कागदावर छापून त्याला लॅमीनेट करून आणलं. उन्हाळ्याच्या दिवसांत बरेच लोक आंब्यांचा व्यापार करतात. आपला भर होत, तो कमी दराने आंबे विकण्यावर. त्यामुळे चाणाक्षपणे जाहिरातीत आंब्यांचा स्वस्त दर ठळकपणे लिहिला. मोबाईल नंबर इतका जाहीरपणे लिहायला नको वाटलं, म्हणून घरच्या फोनचा नंबर दिला. त्या जाहिराती सहज दिसेल, अशा जागी लटकवल्या. आमच्या घराजवळ एक अत्यंत लोकप्रिय अशी भाजीची टपरी आहे. भाजी विकणारे मामा तेव्हा नेमके गावाला गेलेले होते. परिस्थितीचा फायदा घेऊन लगेच मी तिथे एक जाहिरात लटकवली. रोजची वहिवाट असल्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर आपोआपच त्या टपरीकडे जाते. बाकीच्या जाहिरातींपेक्षा ह्या जाहिरातीला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला!

शनिवारी आंबे घरी आले. रविवारी नुसत्या चर्चा आणि आंबे विकले जातील का? कसे? ह्या प्रश्नांवर खल झाला. रविवारी रात्री ‘आत्या, एक डझन जरी आंबे विकले गेले, तरी मला फोन कर' असं सतरा वेळा बजावून भाची घरी गेली.

********************************************************************************************************

सोमवारी सकाळी आठवतील त्या सगळ्या देवांची नावं घेऊन मी सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर मेसेज पाठवला. ‘पन्नास रुपये डझन’ भाव वाचल्यावर बहुतेक सगळ्यांचे ‘अग, तू भाव बरोबर लिहिला आहेस ना? ’ अशी उत्तरं आली! कोणाला खरंच वाटत नव्हतं. ‘टायपो नाहीये. खरंच पन्नास रुपयांत विकतोय, असं कळवून टाकलं.

सगळी तयारी झाली आणि आम्ही अस्वस्थपणे लोकांची वाट बघायला लागलो.

आमचे एक सख्खे शेजारी दोन डझन आंबे घेऊन आमची बोहोनी करून गेले, आणि आमच्या आम्र-विक्रीचा नारळ फुटला. हळूहळू आंबे घ्यायला लोकं येऊ लागली. आम्ही आंबे प्रकरणात किती ‘ढ’ आहोत, हे कळायला लागलं. शेतावरच्या माणसाने आंबे उतरवून पोत्यात भरून पाठवून दिले. पण आंब्यांचं वर्गीकरण केलं नव्हतं. तसं करायला सांगायला हवं, हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे लहान-मोठे-हापूस-केशर-तोतापुरी सगळ्यांचं महासंमेलन प्रत्येक पोत्यात तयार झालं होतं. आंबे घ्यायला आलेल्यांनी ‘कुठले आंबे आहेत? हापूस की केशर? ’ असं विचारलं की उत्तर देताना माझी त-त-प-प होत होती. खरं म्हणजे हापूस आणि केशर आंब्यांचे आकार स्पष्टपणे वेगळे असतात. पण इतके आंबे बघून आमची नजर फिरत होती. त्या आंब्यांमधला अगदी ठळक फरकही कळत नव्हता. शेवटी जे तोंडाला येईल ते उत्तर देऊन आम्ही वेळ मारून न्यायला लागलो.

आंबे छानच होते. दोन दिवसांपूर्वी झाडावरून उतरवलेले ताजे, तजेलदार दिसणारे मोठेमोठे आंबे. कोणालाही बघताक्षणी आवडतील असेच होते. जे लोकं आंबे घ्यायला आले, तेच आमची जाहिरात करायला लागले. भाव अगदी कमी असल्याने पांढरपेशा लोकांबरोबरच कामवाल्या मावशी, वॉचमन, ड्रायव्हर मंडळीही येऊ लागली. ह्या मंडळींचं नेटवर्क फार जोरदार असतं. स्वस्तात मस्त आंबे मिळत आहेत, ही बातमी सहकारनगरामध्ये पसरायला लागली.

पहिल्या दिवशी जी विक्री झाली, त्यावर आम्ही खूश होतो. मागच्या वर्षी मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांकडून जेवढे पैसे मिळाले, त्यापेक्षा एक रुपया जरी जास्त मिळाला, तरी खूप झालं. आपल्याला अनुभव तरी मिळेल, अशा चर्चा झाल्या. घरगुती घेणारे घेऊन-घेऊन किती आंबे घेणार? त्यापेक्षा फळ दुकानदारांना विकले, तर भराभर आंबे संपतील, ह्या अपेक्षेने जवळपासच्या भाजीवाल्यांकडे नमुन्याला आंबे दिले आणि विकत घ्यायला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण करून आले.

त्यापैकी उन्हाळ्यात हॉल भाड्याने घेऊन रीतसर आंबेविक्री करणारे एकजण आंबे घ्यायला आले. पूर्ण पुण्यात फिरलं तरी पन्नास रुपये डझन भावाने आंबे मिळाले नसते. पण ह्या काकांनी ‘मला चाळीस रुपयांनी मिळतात. तुमच्याकडचं फळ चांगलं आहे, म्हणून मी पंचेचाळीसने घेईन’ अशीच सुरवात केली. पण आम्ही कोणालाच भाव कमी करून द्यायचा नाही, असं पक्कं ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्यांनाही भाव कमी करून द्यायला नकार दिला. त्यांनी कुरकूर करत दहा-बारा डझन आंबे घेतले.

ह्या प्रसंगाचं मनोरंजक उपकथानक आहे. हे व्यापारी आले, तेव्हा माझे बाबा घरी नव्हते. त्यामुळे बाबांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या हॉलवर जाऊन आंब्याचा भाव विचारला. आमच्याकडून नेलेले आंबे ते सहापट जास्त भावाने विकत होते!! अर्थात आम्ही मागितलेला भाव त्यांनी आम्हाला दिला होता. त्यामुळे त्यांनी किती भावाने आंबे विकायचे, हा त्यांचा प्रश्न होता. पण आम्हाला चर्चा करायला खमंग विषय मिळाला, एवढं मात्र नक्की.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून आंबे घ्यायला येणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागली.

सहकारनगरामधली सकाळी फिरायला जाऊन परतणारी मंडळी, भाजीच्या टपरीजवळचा बोर्ड वाचून येत होती. उजाडल्यापासून दारावरची बेल वाजत होती. दार उघडून आम्ही आलेल्या माणसांचं स्वागत करणे आणि ‘ किती हवेत आंबे? पिशवी आणलीत का? हो, आमच्या शेतावरचेच आहेत. तळेगावजवळ आहे शेत’, इत्यादी वाक्य कितीवेळा म्हणणे, हे काम किती वेळा केलं असेल, ह्याची गणतीच राहिली नाही!

आमचं घर दुमजली आहे. शेतावरून आलेली पोती वरच्या मजल्यावर ठेवली होती. एक-दोन पोती खाली आणून सतरंजीवर ओतून ठेवायचो. आंबे संपत आले, की पुढचं पोतं खाली आणायचो. तीन दिवस आमची इतकी पळापळ झाली, की बस्स. दिवसभर मी आणि मुलगा वरची पोती खाली आणत होतो. आई येणाऱ्यांशी बोलत होती आणि आंबे मोजून देत होती. बाबांना गल्ल्यावर पैसे घ्यायला. लोकांची इतकी झुंबड उडली होती की आम्हाला जेवा-खायची फुरसत मिळाली नाही. मावशी सकाळी पोळ्या करून गेल्या पण मला आणि आईला भाजी करायला जमलं नाही. शेवटी आम्ही चटणी-लोणचं घेऊन जेवण भागवलं.

शेतावरून पोती आली तेव्हा खोली भरून गेली होती. आंबे खरं तर पोत्यात भरून ठेवू नयेत, पसरून ठेवावे. पण खोलीत जागाच नव्हती. आता मात्र जागा झाली. घरच्यासाठी जे आंबे ठेवायचे होते, ते निवांत पसरून ठेवता आले. आधी आम्ही आलेल्या मंडळींचा आंबे घ्यायचा उत्साह वाढावा, म्हणून वर ठेवलेली पोती दाखवायचो. आंबे संपत आल्याने आता आम्ही आलेल्यांना वरच्या मजल्यावर नेणं अजिबात थांबवून टाकलं. विक्रीचा वेग इतका वाढला होता, की कटाक्षाने आंबे बाजूला ठेवले नसते, तर आम्हालाच बाजारातून आंबे आणायची वेळ आली असती!!

आंब्याची उष्णता बरीच असते. आंबा हातात घेतला, तरी कोमट उबदार लागतो. सुरवातीला बरीच पोती वरच्या मजल्यावरच्या ज्या खोलीत होती, तिथे गेलं की गरम हवेचा झोत अंगावर येत होता. माझा मुलगा ‘आई, भराभर आंबे संपले नाहीत, तर स्लॅब उडेल वरचा. ’ असं गमतीने म्हणायचा. आता मात्र खोली रिकामी आणि गार झाली. ते पाच-सहा दिवस घरातली प्रत्येक खोलीत कुठले ना कुठले आंबे होते. हॉलमध्ये विकायचे आंबे. स्वयंपाकघरात रस काढण्यासाठी तयार झालेले आंबे. आंबे घेणारे लोकं पाठोपाठ आले, की फार धावपळ होते, म्हणून एका बेडरूममध्ये जास्तीची पोती आणून ठेवली होती आणि घरी खायचे किंवा नातेवाइकांना द्यायचे आंबे दुसऱ्या बेडरूममध्ये बाजूला ठेवले होते….

गुरुवारी संध्याकाळी मला मैत्रिणीकडे जायचं होतं. तोपर्यंत आंबे संपत आले होते. पोती आणून, आंबे ओतून, आलेल्यांशी बोलून त्यांच्या शंकांना उत्तरं देऊन स्टॅमिना संपला होता. उरलेले आंबे ज्याला आपण ‘गेला बाजार’ म्हणू, अशा प्रकारचे होते. अगदी लहान, थोडा मार खाल्लेले असे. ते कोणी विकत घेईल, असं वाटत नव्हतं. मी दुखरी कंबर, खांदे घेऊन मैत्रिणीकडे गेले. गप्पा मारून, रिलॅक्स होऊन परत घरी आले, तर काय आश्यर्य! तेही आंबे विकले गेले होते.. आता काही काम नाही, ह्या खात्रीने मी गेले खरी, पण आईला पुन्हा दुकान चालू ठेवावं लागलंच.

सोमवारी सकाळी विक्रीला सुरवात केली आणि गुरुवारी दुपारपर्यंत चार हजार आंबे संपले सुद्धा…

लहान, शिकाऊ, घरगुती व्यापार केला तरी त्याचा जमाखर्च तर मांडायला हवाच.

हा सगळा व्यापार आतबट्ट्याचा व्यवहार होणार आहे, हे आधीपासूनच माहिती होतं. पन्नास रुपये डझन भावाने आंबे विकले तर नफा होणं अशक्य होतं. पण म्हणून हा सगळा प्रकार वेडेपणाचा झाला, असं काही मी म्हणणार नाही. व्यापाऱ्यांकडून मिळतील तेवढे पैसे खिशात घालून बाजूला होण्यापेक्षा आपल्या हाताने विक्री करण्याचं समाधान खूप जास्त होतं. व्यापाऱ्यांना आंबे विकून जेवढे पैसे मिळाले होते, त्याच्या दुप्पट पैसे ह्या मार्गाने मिळाले. तरीही रुपयांच्या हिशेबात नफा झाला नाही. शेतजमिनीची किंमत सोडून देऊया. पण नुसता झाडांच्या निगराणीचा खर्च, मदतनिसांचे पगार, वीज-पाण्याचा खर्च लक्षात घेतला तरी मिळालेल्या पैशाची आणि एकूण खर्चाची तोंडमिळवणी होणार नाही.

मग ह्या सगळ्यातून श्रीशिल्लक काय राहिली?

पुढच्या वर्षी प्रकाराप्रमाणे आणि आकाराप्रमाणे वर्गीकरण शेतावर करून मगच ते पोत्यात भरायचे हा महत्त्वाचा धडा मिळाला. म्हणजे आंब्यांचा दर ठरवताना त्याप्रमाणे ठरवता येईल. पन्नास रुपयांसारख्या कमी दरात विक्री केली, तर आपल्या शेतावरचे आंबे आपण कुठल्याही मध्यस्थाशिवाय विकू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. खरेदी करायला आलेल्यांचे मोबाईल नंबर मी टिपून ठेवले आहेत. शेतावर येणारी बाकीची फळं, भाजी घरी आणली की संपर्क साधण्यासाठी सगळ्यांनी मला बजावून ठेवलं आहे.

ह्या नफा-तोट्याच्या गणिताच्या पलीकडे खूप साऱ्या सदिच्छा पदरात पडल्या. ‘दोन लेकी माहेरी आल्या आहेत. त्यांना, नातवंडांना भरपूर आंबे खाऊ घालता आले बघा वहिनी’ असं सांगणाऱ्या मावशींच्या चेहऱ्यावरचं समाधान आजही मन प्रसन्न करतं. स्वस्त आणि चांगले आंबे मिळत आहेत म्हणून कोणी लांबच्या नातेवाइकांना उरापोटी उचलून नेऊन दिले तर कोणी जवळच्या लोकांच्या मुखी पडावे म्हणून घर दाखवायला कितीतरी चकरा मारल्या.

काही गमतीही झाल्या. आपण केळ्याच्या भावात आंबे विकतो आहे, त्यामुळे कोणी ‘भाव कमी करा’ असं म्हणणार नाही, असं वाटलं होतं. पण तो समज खोटा ठरला. ‘एकदम चार डझन घेते, जरा कमी करा की वाहिनी’ अशी मागणी झाली. त्यांना मी ‘आख्ख्या पुण्यात कुठेही ह्या भावाने आंबे मिळाले, तर आणा. मी हे सगळे आंबे तुम्हाला फुकट देईन’ असं सांगायचे. तसंच ‘मी काल आले होते, तेव्हा लहान आंबे होते. आज छान मोठेमोठे आहेत. बदलून द्याल का कालचे? ’ ह्यालाही नम्र आणि ठाम नकार दिला. आंबे खरेदी करायला आलेल्यांपैकी बरेच ‘आमच्या *** गावाला आंब्याच्या बागा आहेत. पण जायला जमेना म्हणून घ्यायला आलो’ असं बजावून सांगायचे.

आमची शेतजमीन आहे, तिथल्या आंब्याची आम्ही यशस्वी विक्री केली, हे खरंच. पण तरी हा सगळा काहीसा हौसेचा मामला होता, हे देखील खरंच. कमी आंबे आले असते किंवा आलेच नसते तर बाजारातून आंबे विकत आणण्यापलीकडे आम्हाला फरक पडला नसता. उत्पन्नाचे दुसरे भरवशाचे स्रोत असल्याने आमचं घर ह्या विक्रीच्या पैशांवर अवलंबून नव्हतं. पण शेतकऱ्यांचं काय? त्यांना ही अशी विक्री करायला परवडेल का? त्यांनी कष्ट करून बाजारापर्यंत आणलेलं उत्पादन पडेल भावात विकलं गेल्यावर त्यांची चूल कशी पेटत असेल?

शेतकरी आणि त्यांचे प्रश्न जटिल आहेत. अनेक समाजधुरीणांनी त्यासाठी कष्ट केले. पण परिस्थिती होती त्यापेक्षा वाईटच होते आहे. शेतमालाला बाजारपेठ आणि योग्य तो भाव मिळणे, हा त्यातील एक ज्वलंत प्रश्न. त्याउलट शहरी लोकांना नेहमीच चढा भाव द्यावा लागतो. पण ताजा, उत्तम प्रतीचा शेतमाल शहरात सहज खात्रीने उपलब्ध होत नाही. आमच्या आसपासच्या लोकांनी उत्साहाने आंबे खरेदी करून ही उत्पादक-ग्राहक साखळी तयार करण्यासाठी मोठं प्रोत्साहन दिलं आहे. खिशात पैसे नक्की किती पडले? ह्या पेक्षाही ह्या उपक्रमाने एक मराठी शेतकरी छोटासा, चिमुकला व्यापारी झाला, हे अगदी नेमकं, नक्की आणि निश्चित!!

दिव्याखालचा अंधार

पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात आमची काही शेतजमीन आहे. सुरवातीपासूनच तिथे विजेची सुविधा नव्हती. डिझेलवर चालणारा कृषीपंप आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी सौर्य कंदील अश्या सोयींवर भागत होत. पण लांबचा विचार केला, तर वीज असणं फार सोयीच होणार होत. वीज नसण्यामुळे आमच्या राहत्या घरी जेवढी भयानक अडचण झाली असती. तेवढी अडचण शेतावर होत नव्हती. शेताला आणि शेतावर राहणाऱ्या कुटुंबाला वीज नसण्याची सवय होती. गैरसोय होत होती, पण भागवता येत होते.

शहरात काय किंवा खेड्यात काय महावितरणचा कारभार बऱ्यापैकी भोंगळच आहे. अर्ज केला आणि काहीही खटपट न करता वीजजोड मिळाला, असं काही होत नाही. बरेच अर्थपूर्ण मार्ग ह्या कामासाठी चोखाळावे लागतात, असा सल्ला आम्हाला अनुभवी मंडळींनी दिला होता. खरंतर आपण अर्ज केल्यापासून वीजजोड मिळेपर्यंतच प्रत्येक कामाला किती वेळ लागायला हवा, ह्याची मानके (standards of performance) महावितरणने तयार केली आहेत. त्याप्रमाणे काम न झाल्यास ग्राहक नुकसानभरपाई मागू शकतो. ह्या संदर्भातील माहिती महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात लावलेली असणे अपेक्षीत आहे. पण दुर्दैवाने, हे असे फलक बऱ्याच वेळा नसतातच, किंवा असलेच तर भिंतींची शोभा वाढवण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्या मानकांची जागा अजूनही महावितरणच्या कार्यालयांच्या बाहेरच आहे. त्याचा जाणवण्याइतपत परिणाम कार्यालयाच्या आत काही झालेला नाही.

आम्हालाही त्या खेड्यातल्या विजेची कामे करणारा एजंट व तिथला लाईनमन ह्यांनी अधिकृत खर्चाव्यतिरिक्त काही हजार रुपये इतका वरखर्च येईल असं सांगितलं होतं. हा एकाअर्थी सोपा मार्ग होता. पैसे द्यायचे, वीज घ्यायची. पण हा शॉर्टकट होता. सरळसरळ भ्रष्टाचार होता. खिशाला सोसत असला, तरी मनाला बोचत होता. इथे एक सांगायलाच हवं, की आमच्या कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांशी किंवा राजकारण्यांशी वैयक्तिक ओळखी नाहीत. लक्ष्मणच्या व्यंगचित्रात असायची, तितकीच सामान्य माणसं आहोत. आमच्या नावाला किंवा चेहऱ्याला कोणतंही वलय नाही.

कामे करून घेण्याचे सध्याचे दोन रूढ मार्ग आहेत. एकतर वरचे पैसे द्यायचे नाहीतर ओळखी काढायच्या. काम झाल्यावर त्याबद्दल प्रौढी मिरवायची. पुढच्या माणसाला हे मार्ग चोखाळल्याशिवाय आपलं काम होणारच नाही, अशी खात्रीच होते, आणि हे दुष्टचक्र पुढे सुरू राहत. थोडा पेशन्स ठेवायची, सरळ रस्त्याने जाण्याची काम करून घेणाऱ्याचीच मानसिक तयारी राहत नाही. हे सगळं करून सवरून, आपण पुन्हा भ्रष्टाचाराबद्दल खडे फोडायला मोकळे होतो.

पैसे देणे हा आर्थिक भ्रष्टाचार आणि ओळखीने काम करून घेणे, हा झाला तत्वांचा भ्रष्टाचार. आपल्या कामासाठी ह्यातल्या कुठल्याच रस्त्याने जायचं नाही, असं आम्ही पक्कं ठरवलं. जास्तीत जास्त काय होईल, थोडा वेळ जास्त लागेल, खेपा माराव्या लागतील, त्रास होईल. ह्या सगळ्याला माझी पूर्ण तयारी होती. माझ्या नवऱ्याला, त्याच्या नोकरीमुळे फेऱ्या मारण्याचं काम स्वतः करणं शक्य नव्हतं. पण मी हार मानण्याच्या सीमारेषेपर्यंत पोचायला लागले, की मला धीर देऊन पुन्हा मार्गावर आणणे आणि काम व्हायला वेळ लागतोय ह्याबद्दल अजिबात तक्रार न करणे ही दोन अत्यंत महत्त्वाची कामे त्याने केली.

हा निश्चय पक्का झाल्यावर आम्ही कागदपत्रांची जुळवाजुळव केली आणि महावितरणच्या कार्यालयात तो अर्ज दाखल केला. यथावकाश तो अर्ज शेत ज्या खेड्यात येतं, तिथल्या कार्यालयात पोचला. महावितरणच्या नियमावलीप्रमाणे अर्ज मिळाल्यापासून १० दिवसात संबंधीत इंजिनियरने जागा पाहून येणे आणि २० दिवसांमध्ये खर्चाच्या अंदाजाचे कोटेशन देणे अपेक्षीत आहे. (न केल्यास दर आठवड्याला रु.१०० इतकी भरपाई ग्राहकाला मिळू शकते.) कार्यालयातील अभियंता जागा पाहून आला. शहरातून बहुतेक ठिकाणी विजेचं जाळ पसरलेलं असतच. त्या जाळ्यातून आपल्याला विजेची जोडणी मिळू शकते. खेड्यातून मात्र परिस्थिती वेगळी असते. आमच्या शेताच्या अगदी जवळ विजेचे खांब आलेलेच नव्हते. ते उभारायला हवे, विजेसाठीची केबल टाकायला हवी, मग वीज येणार. हे खूप खर्चिक आणि डोक्याला त्रास देणारं काम होत.

त्या अभियंत्याने ‘पोलही तुम्हीच उभे करा, केबलही तुम्हीच टाका. महावितरण ह्यातलं काहीही करणार नाही. काम झालं की आम्ही तपासणी करून वीजपुरवठा करू, असं सांगितलं’ म्हणजे मांडव उभारून, सजवून, वधू-वर बोहल्यावर उभे केले, की मग हे फक्त अक्षता टाकायला येणार! असं कसं? आम्हाला काही हे पटेना. मग महावितरणची वेबसाइट बघितली. तिथे वेगळीच माहिती होती. महावितरण आपल्यापुढे दोन पर्याय ठेवतं. काम कश्या पद्धतीने करायचं हे आपण ठरवू शकतो. सर्व काम, म्हणजे केबल- खांब टाकणे इत्यादी महावितरणने करायचे आणि आपण त्याचे ठरलेले पैसे भरायचे हा एक पर्याय आणि केबल- खांब टाकायचं काम आपण केल्यास त्या कामाचे पैसे महावितरणने आपल्या दर महिन्याच्या वीजबिलात वळते करायचे हा दुसरा पर्याय आहे.

ही माहिती ग्राहकाने मागणी केली नाही, तरी त्याच्यापुढे ठेवली गेली पाहिजे. मग ग्राहक त्याच्या सोयीने हवा तो पर्याय निवडू शकेल. पण दुर्दैवाने असं होत नाही. महावितरणचे अधिकारी, त्यांना सोयीचा असलेला पर्याय आपल्यासमोर ठेवतात. आमच्या बाबतीतही तेच झालं होतं. माहिती अधिकार कायद्यामुळेच हा माहितीचा खजिना आमच्यासाठी उघडा झाला होता. नाहीतर घरबसल्या हे आम्हाला कुठून कळणार होत? एरवी आपला आणि महावितरणचा संबंध दर महिन्याचं बील आठवणीने भरण्यापलीकडे येत नाही. अशी ही वीजजोडणी घेण्याची काम आयुष्यात एखाद्या वेळी करावी लागतात. त्याची इतकी सखोल माहिती आमच्या समोर इतक्या सहज आली होती.थोडा चौकसपणा दाखवून वेबसाइट बघितल्यावर ही माहिती मिळाली.

आम्ही महावितरणच्या त्या अभियंत्याला ‘आम्ही चार्जेस भरू, तुम्ही खांब-केबलच काम करा’, असं सांगितलं. ‘तुम्हालाच उशीर होईल, ही कामं सोपी नसतात,’ अशी बरीच कुरकूर झाली, पण आम्ही काही दाद देत नाही म्हटल्यावर वीजजोडाच्या आघाडीवर शांतता पसरली. आम्ही जून २०१२ मध्ये केलेल्या अर्जाबाबत नोव्हेंबर २०१२ पर्यंत काही म्हणजे काही हालचाल झाली नाही. आम्हीही धीराने वाट बघत होतो. वाट बघून मग आमच्या मूळ अर्जाच्या प्रगतीबाबत विचार करणारा एक तक्रारअर्ज केला. ते उत्तर आजतागायत आलेले नाही! पण बहुधा त्याचाच परिणाम होऊन आम्हाला येणाऱ्या खर्चाविषयीचे कोटेशन मिळाले. आम्ही अजिबात दिरंगाई न करता ते पैसे लगेचच भरले.

आमच्या आशा आता चांगल्याच पल्लवित झाल्या. शेतावर राहणारी मंडळी आता आपल्याकडे लख्ख प्रकाश पडणार, आपणही रोज टी.व्ही. बघणार, अशी सुखस्वप्ने रंगवू लागले. पण कोटेशनच्या रूपाने चमकलेल्या विजेनंतर महावितरणच्या आघाडीवर शांतता पसरली. मी आणखी दोन वेळा तक्रारअर्ज केले. त्याचा परिणाम म्हणून आम्हाला महावितरण कडून एक पत्र आले. ‘शेतावरच्या वीजजोडासाठी खांब उभारण्याचं ते काम आम्ही कंत्राटी पद्धतीने काही एजन्सीला दिले असून ज्येष्ठता यादीनुसार काम होईल’ असे भरघोस आश्वासन महावितरणकडून मिळाले.
पुन्हा सगळं थंड झालं. आता काय करावं ते कळेना. तक्रार अर्ज झाले, प्रत्यक्ष भेटून विनंती झाली, पण महावितरण आपलं ढिम्म. त्याच दरम्यान आमची ओळख सजग नागरिक मंचाचे श्री.विवेक वेलणकर ह्यांच्याशी झाली. ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती अधिकाराचा प्रभावी वापर कसा करायचा, ह्याबद्दल अगदी उत्साहाने सक्रिय मदत करतात. ग्राहकांचे विजेच्या बाबतीतले हक्क तसेच त्याबरोबर येणारी त्यांची कर्तव्ये ह्याबद्दल त्यांनी मला खूप महत्त्वाची माहिती दिली आणि ‘जर असाच पेशन्स ठेवून प्रकरण हाताळलं, तर अधिकृत खर्चात वीजजोडणी निश्चितच मिळेल’, असा विश्वासही दिला.

माझी कागदपत्रे पाहून त्यांनी मला आणखी एक माहिती अधिकार अर्ज करायचा सल्ला दिला. त्यानुसार मी जून १३ मध्ये अर्ज दाखल केला. ह्या अर्जात मी बरीच माहिती विचारली होती. पहिल्यांदाच हा उद्योग करत होते. त्यामुळे महावितरणच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. कायद्याने महावितरणला उत्तर द्यायला एक महिन्याची मुदत होती. तेवढे दिवस शांतपणे वाट बघितली. सरकारी खात्यांचा अनुभव पाठीशी होता, तरी ही मंडळी माहितीच्या अधिकाराला वचकून असतील, असा भाबडेपणा माझ्यात शिल्लक होता.

ह्या अर्जाचं एका ओळीचंही उत्तर मला मिळालं नाही. मला त्या अधिकाऱ्यांचं आश्चर्य वाटत होतं. माहिती अधिकार अर्जाचे उत्तर वेळेवर दिल नाही, तर त्यांना दंड होऊ शकतो. तशी त्या कायद्यात तरतूद आहे. पण महिन्याभरात ना काही माहिती मिळाली, ना शेतावर काही प्रगती झाली. ती मुदत संपल्यावर पहिले अपील दाखल केले. ह्या अपिलात खालील मुद्दे होते.

ह्यानंतर तरी वीजमंडळ खडबडून जागं होईल, संबंधित अधिकारी आपल्या कामात लक्ष घालतील, असं मला वाटलं होतं. पण दुर्दैवाने असं काहीही झालं नाही. त्यांच्या कार्यालयाकडून ना पत्र ना फोन. जागेवरही जैसे थे परिस्थिती. प्रत्येक सरकारी / निमसरकारी कार्यालयात माहिती अधिकारी नेमलेला असतो. त्या अधिकाऱ्याने अर्जदाराला माहिती अपुरी दिल्यास किंवा न दिल्यास अर्जदार अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करतो. त्यामुळे अर्थातच ही सुनावणी अपिलीय अधिकाऱ्यासमोर व्हायला हवी. ती सुनावणी कशी होते, तिथे कोण हजर राहू शकतं आणि अशी इतर माहिती मी श्री.वेलणकर तसंच माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारा माझा भाऊ श्री.अतुल पाटणकर ह्यांच्याकडून घेऊन तयारी करून ठेवली होती.

मग एक दिवस मला ‘*** ह्या दिवशी ** ह्या वेळी अपिलाबाबत सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु आपण वा आपला प्रतिनिधी हजर न राहिल्यामुळे आता सुनावणी *** तारखेस *** वेळेस ठेवण्यात येत आहे.’ असं पत्र आलं! मी बुचकळ्यातच पडले. सुनावणी आहे, हे मला कोणत्याही प्रकारे कळवलं गेलं नव्हतं. पण ह्या पत्रात जी नवी वेळ कळवली होती, त्या तारखेला आणि वेळेला मी त्या कार्यालयात हजर झाले.

तिथे सर्व कार्यालयात असतं तसं टिपीकल सरकारी वातावरण होतं. टेबल-खुर्च्या पसरलेल्या. सगळ्या टेबलांवर कागद अस्ताव्यस्त पसरलेले. निरनिराळ्या नेत्यांच्या, महापुरुषांच्या आणि देवांच्या तसबिरी भिंतीवर लटकत होत्या. काही कर्मचारी कामात तर बरेचसे कामाव्यतिरिक्तच्या अत्यंत महत्त्वाच्या कामात गुंतलेले होते. मी मला जे रिसेप्शन काउंटर वाटलं, तिथे गेले.
तिथे झालेला संवाद नमुनेदार होता.

मी मी माहिती अधिकाराच्या अपिलाच्या सुनावणीसाठी आले आहे.
कर्मचारी मॅडम, बील भरायचं आहे का? आजची वेळ संपली. उद्याला या.
मी बील नाही भरायचं. अपिलाची सुनावणी आहे. त्यासाठी आले आहे. साहेब कुठे आहेत?
कर्मचारी इथे नाही होत ते काम. तुम्हाला पुण्याला हेड ऑफिसला जावं लागेल.
मी मला पत्र पाठवलंय तुमच्या ऑफिसने. हे बघा. आज बोलवलं आहे. दिसलं का? कोण साहेब आहेत? कुठे बसतात?
कर्मचारी असं होय? मग आधी नाही का सांगायचं ‘माहिती अधिकार’ला आले म्हणून?
मी हं......... खरं आहे तुमचं. साहेब कुठे आहेत?
कर्मचारी हे काय ह्या शेवटच्या केबिनमध्ये आहेत.

साधारण कोलंबसाला झाला असेल, त्या धर्तीच्या आनंदात मी ‘त्या’ शेवटच्या केबिनमध्ये गेले. साहेब मोबाइलवर बोलत होते. त्याचं प्रssssदीर्घ संभाषण संपेपर्यंत नम्रपणे उभी राहिले. पुढचं संभाषण सुरू होण्याआधी चपळाईने विषयाला हात घातला.

मी मी माहिती अधिकाराच्या अपिलाच्या सुनावणीसाठी आले आहे.
अधिकारी आज होती का सुनावणी, बरं बरं. चला सुरू करूया. अरे, कोरे कागद आणा रे.
मी आपलं नावं कळेल का साहेब? तुम्ही अपिलीय अधिकारी आहात का? माहिती अधिकारी कोण आहे? ते सुनावणीला हजर पाहिजेत ना?
अधिकारी मी इथला माहिती अधिकारी आहे. तुमचं गावं माझ्याकडे नाही येत. पण त्याने काही फरक पडत नाही. चला, सुनावणी घेऊन टाकू.
मी (हतबुद्ध होऊन) पण तुम्ही अपिलीय अधिकारी नाही. तुम्ही कशी सुनावणी घेणार?
अधिकारी मॅडम, साहेबांना हेड ऑफिसला अर्जंट जायला लागलं. मिनिस्टर साहेबांबरोबर मीटिंग होती. ते येतीलच इतक्यात. आपण सुरू करूया.
मी मग मला तुम्ही तसं कळवायला हवं होत. मी सुनावणीसाठी पुण्यापासून इथे आले. हे अपील माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्याबद्दल आहे. त्याची सुनावणी माहिती अधिकाऱ्यांसमोर होऊ शकत नाही. तुम्हाला ही सुनावणी घेण्याचा अधिकारच नाही. मी तुमच्यासमोर अक्षरही बोलणार नाही.
अधिकारी मी आताच साहेबांना फोन केला होता. ते खडकीपर्यंत आलेत. आत्ता १५-२० मिनिटात पोचतीलच.
मी काहीही काय? विमानाने आले, तरी १५-२० मिनिटात पोचणार नाहीत. ‘अपिलीय अधिकारी नसल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही’, असा एक अर्ज मी आत्ता लिहिते. मला त्याची पोच द्या. मी निघते. माझा कामाचा एक दिवस तुमच्यामुळे वाया गेला.
अधिकारी अरे, मॅडमसाठी चहा मागव. तुम्ही काय करता मॅडम? वकील आहे का तुम्ही?
मी मी चहा घेत नाही. मी आर्किटेक्ट आहे, वकील नाही.
अधिकारी मग बरोबर आहे. घरी राहणाऱ्या बायकांना असलं स्मार्टपणाने बोलायला जमणारच नाही.
मी (प्रचंड संतापून) काय बोलताय तुम्ही? काम करण्याचा हुशारीशी काय संबंध?
अधिकारी सॉरी, सॉरी. म्हणजे पुण्यामुंबईच्या बायकांचं वेगळं आणि खेड्यातल्या बायकांचं वेगळं…

अजून संताप करून घेण्यापासून स्वतःला आणि साहेबांना वाचवण्यासाठी मी भरभर अर्ज लिहिला. पोच घेतली आणि बस पकडून, वेळ वाया गेल्याची खंत करत घरी आले. थोड्या दिवसांनी आधीच्या तारखेला ‘अत्यावश्यक कारणांमुळे’ सुनावणी घेता आली नाही. आता ती *** तारखेला **** वेळेला घेण्यात येईल असं पत्र आणि त्या तारखेच्या आदल्या दिवशी तसा फोनही मला त्या कार्यालयाकडून आला. पुन्हा एकदा मी तिथे गेले. ह्यावेळेस परिस्थिती बरी होती. रिसेप्शनच्या माणसाने मागची ओळख लक्षात ठेवली होती. ‘माहिती अधिकाराला आल्या ना?’ असं हसून विचारल्यावर मीही हसून त्याला दाद दिली! त्याच्या दृष्टीने विहिरीवर पाण्याला जावं, तशी मी इथे ‘माहिती अधिकाराला’ आले होते! असो.

‘त्या’ केबिनमध्ये अपिलीय अधिकारी, माहिती अधिकारी तसंच सुनावणीची नोंद करण्यासाठी एक लिपिक, असा लवाजमा हजर होता. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर साहेबांनी विषयाला हात घातला. सुनावणी सुरू झाली.

अपिलीय अधिकारी बोला मॅडम
मी मी आज बोलायला नाही, तर मला माहिती का मिळू शकली नाही, ह्याची कारणं ऐकायला आले आहे. पण तरी तुम्हाला पार्श्वभूमी सांगते. माझी *** गावी शेतजमीन आहे. तिथे वीजजोडणी मिळावी म्हणून मी केलेल्या अर्जापासून ते अपील केल्याच्या तारखा ह्या कागदावर आहेत.
अ.अ. हं... *** गावी का? कोणाकडे आहे रे तो भाग?
माहिती अधिकारी *** कडे. फोन लावू का साहेब.
अ.अ. (फोनवर) अरे, ह्या मॅडम इथे सुनावणीला आल्या आहेत. त्यांचं काम चार दिवसात झालंच पाहिजे. बाकी सगळं बाजूला ठेव आणि वॉर फुटिंगवर ते काम कर’ मॅडम, तुमचं काम झालं समजा. तसे तुमच्या पुढे बऱ्याच जणांचे नंबर आहेत, पण तुमचं आधी संपवू.
मी तसं नको साहेब. मी तुम्हाला नियम काय अधिकाराने मोडायला सांगू? आणि आज मी माझं काम करून घेण्यासाठी आलेली नाहीये, तर माहिती अधिकार अर्जाच्या अपील सुनावणीसाठी आले आहे. तुमच्यासारखे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी असल्यावर माझं काम आज नाही तर उद्या होईलच ना. इतकी वर्षे आम्ही विजेशिवाय आहोत, अजून थोडे दिवस राहता येईल. आमचा नंबर आला की करा, घाई नाही.
अ.अ. काय हो माहिती अधिकारी? कधी देताय माहिती?
मी हे विचारायची वेळ कधीच संपली साहेब. आता त्यांना माहिती न दिल्याबद्दल समज द्या. आणि तुमच्या कार्यालयात ‘नागरिकांची सनद’ लिहिलेला बोर्ड कुठे आहे? नियमाप्रमाणे असायला हवा ना? मला तुमच्याकडून *** तारखेला सुनावणी होती, पण तुम्ही आला नाहीत, असं पत्र मिळाल आहे. मला सुनावणीबाबत ज्या पत्राने कळवलं होतं, त्याची जावक नोंद दाखवा.
मा.अ. मॅडम, बोर्ड रंगवायला गेलाय.
मी तसं मला लिहून द्या.
अ.अ. मॅडम, थोडं तुम्हीही समजुतीने घ्या. प्रत्येक गोष्ट नियमावर बोट ठेवून नाही होतं.
(हे वाक्य महाराष्ट्राच्या एका वजनदार नेत्याचं आहे. ते सगळ्या सरकारी खात्यांमध्ये बोधवाक्य, सुविचार, कामाचं सूत्र असं गरजेप्रमाणे वापरतात.)
मी बरं. ती जावक नोंद दाखवताय ना.
मा.अ. आवक-जावक बघणाऱ्या मॅडम बाळंतपणाच्या सुट्टीवर आहेत. (!)
मी नोंद दाखवा. नाहीतर पत्र पाठवलंच नव्हतं अस लिहून द्या.
(प्रचंड प्रमाणात धावपळ आणि शोधाशोध होते. नोंद सापडत नाही)
मी मला माहिती वेळेत न दिल्याबद्दल माहिती अधिकाऱ्यांना दंड होऊ शकतो आणि ती रक्कम त्यांच्या पगारातून कापली जाऊ शकते, ह्याचीही त्यांना समज देण्यात यावी.
अ.अ. ठीक आहे. काय रे, ऐकतो आहेस ना?
मी वेळेत वीजजोडणी न मिळाल्यामुळे मी नुकसानभरपाई मागणार आहे.
अ.अ शेती जोडणीसाठी नुकसानभरपाई मिळत नाही मॅडम.
मी ठीक आहे. तसं लिहून द्या.
अ.अ. तुम्ही काय करता मॅडम आणि तुम्ही एकट्याच आलात? साहेब नाही आले?
मी मी आर्किटेक्ट आहे. शेती माझी आहे, अर्ज मी केला आहे. साहेब का येतील?
अ.अ. नाही तसं नाही. साधारण लेडीज ह्या कामात पडत नाहीत ना? म्हणून विचारलं. तुम्ही आर्किटेक्ट, म्हणजे तश्या शेतकरी नाही. हॅ हॅ हॅ.
मी शेती माझ्या नावावर आहे, म्हणजे मी शेतकरी आहे. असे आणि तसे शेतकरी अश्या वेगवेगळ्या नोंदी ७/१२ वर नसतात. तुमच्या मागे स्व.इंदिरा गांधींचा फोटो आहे. त्या देशाचा कारभार करू शकल्या, मग मी हे का नाही करू शकणार?
अ.अ. हो,हो, मी आपलं गमतीने म्हटलं. मॅडम, तुम्हाला चार दिवसात माहितीही मिळेल आणि वीजजोडही. काही काळजी करू नका. अरे, मॅडमसाठी चहा मागव.
मी मी कशाला काळजी करू? काळजी आता ह्या माहिती अधिकाऱ्यांना करायला हवी.

सुनावणी संपली. माहिती अधिकाऱ्यांच्या फाइलमध्ये माझ्या अर्जाची प्रत होती. पण दोन पानांपैकी एकच पान होत! माझ्याकडेही आवक शिक्का असलेलं एकच पान होतं. पुन्हा पळापळ-आरडाओरडा-फोनाफोनी झाली. ते पान मिळवण्यासाठी (करदात्यांच्या पैशाचा चुराडा करत) कार्यालयाची गाडी पुण्याला हेड ऑफिसला पाठवायची, असं ठरलं. त्या गाडीतून मला घरापर्यंत सोडायची ऑफर ठामपणे नाकारून मी राज्य परिवहनाच्या बसने घरी आले.
ह्यानंतर चक्र हालली. अगदी चार दिवसात नाही, तरी पुढच्या पंधरा-वीस दिवसात आमच्या शेतावर वीज आली. तिथे राहणाऱ्या कुटुंबाने जवळपास दिवाळी साजरी केली! अधिकृत खर्चाव्यतिरिक्त एक नवा पैसाही आम्ही खर्च केला नाही. विजेचे खांब उभे करणे, भूमिगत केबल टाकणे इत्यादी सर्व कामे वीजमंडळानेच केली.

हे सगळे अर्ज, कागदपत्रांची जुळवाजुळव, सुनावणीचे मुद्दे तयार करणे, मंडळाच्या कार्यालयात खेपा मारणे ह्या कामांमध्ये चांगल्यापैकी वेळ आणि शक्ती खर्च झाली. पण सरळ रस्त्याने जाऊनही काम होतं, ह्याबाबत आत्मविश्वास वाढला, भ्रष्टाचार न केल्याचं अपूर्व समाधान मिळालं.

शेतावर वीज येऊन तिथे दिवा पेटेपर्यंत अजून काही दिवस गेले. ह्या सगळ्या प्रकरणात मागे टाकलेली माझी व्यावसायिक कामे, आता आ वासून उभी राहिली होती. मुलगा बारावीला होता, त्याची परीक्षा जवळ आली होती. त्या धांदलीत वीजजोडणीला झालेल्या उशीराबद्दल मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठीच्या अर्जाची मुदत संपून गेली.
हा अर्ज आणि त्याचा पाठपुरावा करण्यामागे आर्थिक लाभाचा विचार नव्हता. अपिलीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेती जोडासाठी नुकसानभरपाई लागू होत नाही. ते खरं आहे का हे तपासायचं होतं. शिवाय, कोणीच जर अशी नुकसानभरपाई मागितली नाही, तर वीजमंडळावर त्या नियमांचा वचक राहणार नाही. त्यामुळे ‘काळ सोकावतो’ अशी परिस्थिती होऊ नये, म्हणून तरी हा अर्ज रेटायला हवा होता. पण कामाच्या आणि कौटुंबिक गडबडीत ते जमलं नाही, ह्याची खंत आजही वाटते. तिथे मी कमी पडले. वेलणकरसाहेब सगळी मदत करायला, मार्गदर्शन करायला होते, पण माझ्याकडून ते काम करायचं राहिलं .

वीजजोडणीसाठीचा उपद्व्याप करून आम्ही दोघांनी हे फार मोठं काम केलं असा माझा अजिबात दावा नाही. ह्याने भारत देशातील, गेला बाजार महावितरणामधील भ्रष्टाचार संपेल अस म्हणणं सरळसरळ मूर्खपणा होईल, ह्याचीही आम्हाला खरी आणि म्हणूनच अतिशय बोचरी जाणीव आहे. पण, हे काम आम्ही सरळ मार्गाने, कोणतीही लाचलुचपत न करता करू शकलो, ह्याचा योग्य असा अभिमानही आहे.

आम्ही दोघेही आपापल्या नोकरी, व्यवसायात इतर चार लोकांइतकेच अडकलेले असतो. वेळ कायमच कमी. घरच्या, बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिवसाचे चोवीस तास कमी पडावे, अशी अवस्था असते. पण पैसे घेणाऱ्या इतकाच देणाराही दोषी असतो. ‘आपला व्यग्र दिनक्रम’ हे कारण पैसे देऊन काम करून घ्यायला योग्य आहे का?
आज भारत देशाचा क्रमांक अत्यंत भ्रष्ट देशांमध्ये बराच वरचा आहे. दुसऱ्याला दोष देण्याइतकी सोपी गोष्ट दुसरी नाही. पण एक बोट समोरच्याला दाखवताना चार बोटे आपल्याकडे रोखली जातात, हे आत्मपरीक्षण कोण आणि कधी करणार? गप्पा मारताना ह्या भ्रष्टाचाराबाबत बोटे मोडणारे किती लोकं पूर्ण खात्रीने ‘मी आतापर्यंत कधीही, कुठलंही काम गैरमार्गाने केलं नाही’, अस म्हणू शकतील? पैसे देणारे आहेत म्हणूनच घेणारे आहेत. सगळ्यांनी जर आम्ही पैसे नाहीच देणार, असं ठरवलं तर किती दिवस कामं होणार नाहीत/ करणार नाहीत? कधीतरी हे संपेलच की. वाचायला फार आदर्शवादी, भाबडं वाटेल, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

आपल्यापैकी सर्वांनाच जन्म प्रमाणपत्रापासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेतच. त्याला दुसरा पर्याय आज तरी उपलब्ध नाही. २००५ पर्यंत आपण सरकारला कोणताही प्रश्न विचारू शकत नव्हतो. आता आपल्याकडे ‘माहिती अधिकार’ हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. प्रत्येक नागरिकाने जर निश्चय केला, की मी माहिती अधिकाराचा वापर करून माझं एकतरी सरकारदरबारी अडकलेलं काम सरळ मार्गानेच करेन, तरी पुष्कळ फरक पडेल.

हे काम करण्याआधी मला माहिती अधिकार कायद्याबद्दल जुजबी माहिती होती. वर्तमानपत्रातून त्याबद्दल नेहमीच काही ना काही छापून येत असतं. बऱ्याचदा त्याचं स्वरूप ‘माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरचे हल्ले’ किंवा ‘कायद्याचा गैरवापर’ अश्या स्वरूपाच असतं. पण शेवटी हा कायदा हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर कसा करायचा, हे ज्याचं त्यानेच ठरवायला लागणार. अजून सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता ‘हे कोण आम्हाला प्रश्न विचारणार?’ अशी असते. आपण आपल्या समोरच्या सामान्य नागरिकाला उत्तर द्यायला जबाबदार आहोत; ही भावना अजून नीटशी रुजलेली नाही.

दुसरी अडचण असते, की बऱ्याच लोकांचा आपल्या कामाच्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या सरकारी खात्याशी संबंध येतो. म्हणजे जसा आर्किटेक्ट लोकांचा बांधकाम परवानगीच्या निमित्ताने म.न.पा.शी किंवा सी.ए. लोकांचा आयकर-विक्रीकर इत्यादी विभागांशी, ठेकेदारी करणाऱ्यांचा त्या त्या खात्याशी, शैक्षणिक संस्थेशी संबंधीत लोकांचा शिक्षण खात्याशी वगैरे वगैरे. आपली रोजची कामे असतात, अश्या कार्यालयात माहिती अधिकार कायद्याची लढाई लढलो, तर आपल्या कामावर परिणाम होईल की काय, अशी काहीशी रास्त भीती प्रत्येकाच्या मनात असते. शेवटी आपण सामान्य नागरिक. थोड्याफार उलाढाली करायची आवड असली, तरी रोजीरोटी महत्त्वाची असतेच ना.

पण प्रत्येक खात्याशी तर संबंध येत नाही ना? मग ज्या खात्याशी क्वचित काम पडत, तिथे तरी ह्या शस्त्राचा वापर करून बघा. आपण सगळ्यांनी मनावर घेतलं, तर भारतातला भ्रष्टाचार नियंत्रणात येईल अशी मला खात्री आहे.
देशसेवा म्हणजे सत्याग्रह करून तुरुंगात जायला पाहिजे, उपोषणं – मोर्चे काढायला पाहिजेत असं नाही. परमार्थासाठी हे सगळं करणारी मोठी माणसं आपण पाहतो. त्यांचं काम मोठं आहे. पण आपलं वाहन नीट चालवणं, कर वेळेवर भरणं, कायद्याचं पालन करणं ही सुद्धा एक देशसेवाच झाली. तसंच भ्रष्टाचाराचा मार्ग न अवलंबणे ही सुद्धा देशसेवाच नाही का? सगळीकडे अंधार आहेच. ती वस्तुस्थिती नाकारण्यात काहीही अर्थ नाही. पण अंधार आहे, म्हणून निष्क्रियपणे बसून न राहता, तो कमी करण्यासाठी प्रयत्न करूया. प्रकाशाची एक मिणमिणती पणती लावणे आपल्या हातात आहे की. चला, तेवढं खारीचा वाटा आपणही उचलूया आणि आपल्या स्वप्नातल्या भारत देशापर्यंतचा पूल बांधण्यात आपल्याला जमेल तेवढी मदत करूया

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' - दिवाळी २०१४
हा लेख प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार.

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३

jjkd_5-1.jpg

आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.

पुण्यातली गजबज आणि शेताजवळच्या खेड्यातलं वातावरण इतकं वेगळं असतं, की दुसऱ्या ग्रहावर गेलो आहोत, असं वाटायला लागतं. तरी पुण्यापासून फार दूर नाहीये. घरून निघाल्यापासून दीड तासात तिथे पोचता येतं. जाताना बंगलोर हायवे. नंतर जुना मुंबई-पुणे रस्ता, तळेगाव औद्योगिक वसाहतीचा रस्ता अशा पायऱ्या उतरत मग खेड्याच्या रस्त्याला लागतो. त्या रस्त्यावर एक प्रचंड मोठी दगडाची खाण आहे. तिथून दगड, खडी वाहून नेणाऱ्या डम्पर, ट्रकची वाहतूक सगळ्या परिसरावर धूळ उडवत अव्याहत चालू असते. ह्या जड वाहनांमुळे रस्त्यात अशक्य मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. महेश आठवड्यातून तीन-चार वेळा हा प्रवास करतो. त्यामुळे त्याची ह्या खड्ड्यांशी अगदी जवळची ओळख झालेली आहे. शेती आणि शेतावरच्या प्रेमापोटी तो ह्या खड्ड्यातून लीलया मार्ग काढत असतो. हा खाणीचा टप्पा संपला की छान देखणा रस्ता येतो. माळांवरचे रंग ऋतूप्रमाणे बदलतात. पाऊस सुरू झाला की हिरवागार. गौरी-गणपतीच्या आसपास तेरड्याचं साम्राज्य. आता किंचित हिरवा आणि बाकी पिवळा-सोनेरी रंग. रस्त्याजवळ भाताची शेतं आहेत. भात आता कापणीला आलं आहे. काही ठिकाणी मजूर तर काही ठिकाणी यंत्राने कापणी चालू आहे. दिवाळीचं असं काही वेगळं वातावरण अजून दिसत नाहीये.

jjkd_5-2.jpg

आज लवकर गेल्यामुळे आम्हाला शाळेत जाणारी मुलं दिसली. आम्ही शाळेत असताना मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळांमध्ये सर्वसाधारणपणे मुलींचा गणवेश पांढरा-निळा आणि मुलांचा पांढरा-खाकी असायचा. आता हे रंग नाहीसे झाले. आम्हाला दिसलेली जनता हायस्कुलची असावी. मुलींना बेज आणि ब्राऊन सलवार-कमीज-ओढणी आणि मुलांना त्याच रंगसंगतीत अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि फुल पॅंट असा गणवेश दिसला. कुठल्यातरी योजनेखाली दप्तरं मिळाली असावी. कारण सगळ्यांच्या पाठीला एकसारखी दप्तरं दिसत होती. काही मुलांना घरचं कोणीतरी दुचाकीवर घेऊन येत होते. जवळपासची चालत, धावत, गप्पा मारत येत होती. लांबच्या मुलांसाठी राज्य परिवहनची बस येते. रस्त्यातल्या लहान-लहान गावात बसची वाट बघत मुलं थांबलेली दिसली. बसच्या आधी शाळेपाशी पोचलेली मुलं शाळेची वेळ होईपर्यंत समोरच्या दुकानातून काही बाही खाऊ घेत गप्पा मारत थांबली होती.

jjkd_5-3.jpg

अशी गंमत बघत शेताजवळ पोचलो. आज शेतातला काही भाग नांगरायचा होता. त्यासाठी गावातल्या एका ट्रॅक्टरवाल्या दादांना आधीच सांगून ठेवलं होतं. रस्त्याजवळच्या एका शेतात त्यांचं काम चालू होतं. गाडी बघून ते बोलायला आले. खेड्यातल्या लोकांची आणि शहरी लोकांची बोलायची पद्धत बरीच वेगळी आहे, असं मला नेहमी वाटतं. आपण लोकं सदैव घाईत असल्यासारखं बोलतो. समोरच्या माणसाने पटकन विषयावर येऊन बोलावं अशी अपेक्षा असते. खेड्यातल्या मुलांची नावं, कपडे, केशरचना, मोबाइलचे हँडसेट, करमणुकीची साधनं शहरापेक्षा वेगळी नाहीत. पण आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य थोडं निवांत आहे. त्यामुळे संभाषणही निवांत असतं. आता ह्या ट्रॅक्टरवाल्या दादांना ‘दुपारी जेवण करून आपलं काम करायला येतो’ इतकंच सांगायचं होतं. पण संभाषण झालं ‘वरच्या रस्त्याला गाडी बघितली, तेव्हा म्हटलं साहेब आलेले दिसतात. आज म्याडम पण आल्या का? बऱ्याच दिवसांनी आल्या का? पोरगा बराय का? आता ह्या शेताचं काम झालं ही जेवण करतो. नंतर येतो. यंदा पाऊस थांबत थांबत आला, त्याने गवत लै वाढलं. आता नांगरायला हवं. नंतर करा पेरणी’!! दादांना ‘हो, हो. मुलगा बराय.’ वगैरे सांगून आम्ही शेतावर पोचलो. शेतावर गेल्यावर लगेच शेत-फेरीला निघालो. आता इतक्या दिवसात सगळी झाडं ओळखीची झाली आहेत. कुठल्या झाडाचं नक्की काय चालू आहे, ह्याची खबरबात घेणे, हा ह्या फेरीचा उद्देश असतो. चालता चालता नवी झाडं कुठली आणायची, कुठे लावायची ही चर्चा होते. कुठे ड्रीपच्या पाइपांची दुरुस्ती गरजेची आहे, कुठे अजून काही ही उजळणीही होते.

jjkd_5-4.jpg

दोन-अडीच वर्षांपूर्वी एका ताईंनी मला पॅशनफ्रूटचं रोप दिलं होतं. अगदी खरं सांगायचं, तर तोपर्यंत मला पॅशनफ्रूट ऐकूनच माहिती होतं. प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. एका झाडाजवळ पॅशनफ्रूट लावलं. वेल चांगला जगला, त्याला नवीन पानं फुटली. एकदा आमची एक गाय तिथून येताना तिला त्या वेलाची चव घ्यावीशी वाटली, आणि तिने तो बराचसा वेल उडवला! झालं कल्याण. पण त्यातूनही वेल जगला. काही महिन्यांनी दोन-चार फळं दिसू लागली. पावसाचे दिवस होते. झाडाखाली गवत बेसुमार वाढलं होतं. वरून फळं पडली, तर त्या गवतात दिसणारही नाहीत, म्हणून गवत काढायचं ठरलं. मी जोरजोरात गवत उपटत असताना चुकून तो वेलही उपटला!! इतकं वाईट वाटलं. शेतावरच्या मदतनिसाने लगेच खत घालून वेळाची मुळं मातीत रोपली. फळं लवकर पडून गेली पण पुन्हा एकदा वेल जगला. इतके आघात सहन केलेला हा आमचा ‘फायटर पॅशनफ्रूट वेल’ आहे.

jjkd_5-5.jpg

जिथे दुपारी नांगरायचं होतं, तिथे बघितलं तर एक लाल बोंडं असलेलं झुडूप दिसलं. ते कशाचं असावं, ह्यावर बराच खल झाला. भेंडीची आणि अंबाडीची पानं दिसायला साधारण सारखीच असतात. त्यामुळे आधी लाल भेंडी आहे, असं वाटलं. पण पाकळ्या खाऊन बघितल्या, तर अगदी कोवळ्या चिंचेची चव. तोवर काही निसर्गप्रेमी व्हॉट्सऍप ग्रुपवर ती अंबाडी आहे, अशी खात्रीची माहिती मिळाली होती. अंबाडीची भाजी घरी सगळ्यांना अगदी प्रिय आहे. पण त्याची बोंडं कधी बघितली नव्हती. ह्या बोंडांपासून सरबत, जॅम करतात तसंच नैसर्गिक रंग तयार करण्यासाठीही ही फुलं वापरतात, अशी माहिती मिळाली. आम्ही तर ह्या बिया लावल्या नव्हत्या. कुठून आल्या कोण जाणे? नेमकी तीच जागा आज नांगरली जाणार होती. मग त्यातली काही रोपं काढून दुसरीकडे लावली. ती जगली, बियाणं मिळालं, तर पुन्हा लावता येईल. पालेभाजी खाता येईल शिवाय नंतर फुलंही मिळतील.

jjkd_5-6.jpg
.

jjkd_5-7.jpg

शेतावर बरीच चिकूची झाडं आहेत. आता चिकूचा हंगाम सुरू झाला. मागच्यावेळी थोडी फळं उतरवली होती. नीट पिकतात की कसं ह्याची खात्री करून आज एका झाडाचे चिकू उतरवले. किंचित गोड व्हायला लागलेली फळं पक्षी खातात. असे अर्धवट खाल्लेले, टोकरलेले चिकू दिसले, की त्या झाडाची फळं उतरवता येतात. चिकू खूप गोड आहेत. रासायनिक खतं, कीटकनाशकं न वापरल्याने चव छान आहे. साधारण नोव्हेंबर ते मार्च असा हंगाम असतो. पाच महिने विक्री चालू राहते. झाडावरून तोडून खाण्यासारखं फळ नाही. त्यामुळे चोरीची भीती कमी! चिकूच्या फांद्या चिवट असतात. फळ काढताना वाकवल्या तरी तुटत नाहीत. फार पसंत पडलेलं झाड आहे. गेल्या अक्षय्यतृतीयेला काही नवीन रोपं लावली होती. पण जवळच्या माळरानावर वणवा लागला. तो आगीचा लोळ शेतात आला, त्यात बरीच झाडं होरपळली. मोठी झाडं जगली. ही बारकी मात्र बिचारी मारून गेली. फार वाईट वाटलं. पण काही उपयोग नाही. आता पुन्हा लागवड करू.

jjkd_5-8.jpg
.
jjkd_5-9.jpg

शेतात इथे-तिथे झेंडू आहे. दसऱ्याच्या वेळी ओंजळभरच फुलं मिळाली होती. आता एकेका झाडाला कळ्या-फुलं दिसू लागली आहेत. दिवाळीपर्यंत भरपूर येतील, असं वाटतंय. पपईला फळ आहे. पण अजून रंग बदलला नाहीये. हिरवीगार आहे. किंचित रंग बदलला, तिथल्या भाषेत ‘कवडी पडली’ की उतरवता येतील. रामफळं दिसत आहेत. ती त्यात व्हायला अजून बरेच महिने आहेत. बोराच्या झाडावर तुऱ्यांसारखी फुलं दिसली. केळीला एक घड दिसतोय. मागे निसर्ग वादळात एक अशी घड लागलेली केळ आडवी झाली होती. ह्यावेळी आधीच केळीला बांबूचा आधार दिला आहे.

jjkd_5-10.jpg

असं प्रत्येक झाड, रोप त्याचं नशीब घेऊन येतं. कधी गाय खाते तर कधी वादळ चांगल्या वाढलेल्या झाडाला आडवं करतं. उन्हाळ्यात लागलेल्या वणव्यानंतर शेतावर गेले, तेव्हा जळका वास, होरपळलेली झाडं बघून रडू आलं होतं. पण आंब्याच्या झाडांच्या ज्या फांद्यांना आगीची झळ लागली नाही, त्या फांद्यांना आंबे लागले. ज्या फांद्या होरपळल्या, तिथेही कुठेकुठे नवी, तजेलदार, कोवळी पानं दिसू लागली आहेत. निसर्गात भूतकाळ नाही. आहे त्या परिस्थितीत तगायचं, जगायचं, वाढायचं हाच सृष्टीचा नियम.

jjkd_5-11.jpg

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६

20240202_150722.jpg

काही वर्षांपूर्वीपर्यंत मी शेतावर फारशी येत नसे. घरच्या जबाबदाऱ्या, व्यवसायाची गणितं, शिकणारा मुलगा आणि वृद्ध सासू-सासरे एवढ्या धावपळीत तेवढी फुरसत नसायची. पण नंतर महेश कामाच्या निमित्ताने दीर्घ वास्तव्यासाठी परदेशी गेला. मग अधूनमधून तरी आपण शेतावर चक्कर मारायला हवी, असं वाटायला लागलं. शेताच्या रस्त्यात एक भलीमोठी दगडाची खाण आहे. त्यामुळे त्या भागात डंपरची वाहतूक अहोरात्र चालू असते. त्या काळजीने एकटीने चारचाकी चालवत जायला नको वाटायचं. मग माझा भाचा आणि मी असे एखाद्या महिन्याने शेत-फेरी करायचो. त्याआधी कधी गेलेच तरी महेशबरोबर जाऊन त्याच्याबरोबर घरी येत असे. त्यामुळे रस्ताही धड माहिती नव्हता. भाच्याबरोबर जाताना तळेगावपासून पुढे गेलो की आम्ही ऍलर्ट मोडमध्ये जायचो. सगळ्याच वाटा आणि शेतं ओळखीचीही वाटायची आणि अनोळखीही. शेताजवळच्या खेड्यात एक शाळा आहे. मदतनिसाला त्या शाळेपाशी थांबायला सांगायचे. तो भेटला की त्याच्या मागेमागे जाता येत असे. त्याला ह्याची फार गंमत वाटायची. ‘तुमचं रान तुमाला सापडेना. काय करावं आता!!’ अशी चेष्टा होत असे. पुण्यात मी आरामात पत्ते शोधते. ‘ह्या चौकातून डावीकडे. त्या दुकानाच्या नंतर उजवीकडची दुसरी गल्ली’ असे पत्ते सापडतात. पण ‘भांगरेंच्या रानानंतरची तिसरी मोरी आली की डावीकडे’ ह्या पत्त्याला मी अगदी क्लीन बोल्ड होत असे..

20231109_142238.jpg

आता नेहमी जाऊन रस्ते, रानं, झाडं सगळं ओळखीचं झालं. तेव्हा आपल्याला इतका सरळ आणि सोपा रस्ता कसाकाय सापडत नव्हता? असा प्रश्न हल्ली शेतात जाताना पडतो. नियमित शेती करायला लागल्यावर बाकी बऱ्याच गोष्टीतही फरक पडला. एकतर शेतीमागे किती कष्ट आहेत, हे अनुभवातून कळलं. किंचित वाकडं किंवा एका भागाला कीड आहे, असा शेतमाल मी कदाचित आधी टाकून दिला असता. आता तेवढा भाग काढून उरलेला वापरते. नैसर्गिक शेतीतल्या ताज्या फळांची-भाज्यांची चव, स्वाद किती चांगला असतो, हे कळलं. कुठल्याच भाज्या-फळांच्या बिया आता फेकून देववत नाहीत. सगळ्या बिया ठेवणं शक्य नसतं. पण ठेवाव्या असं वाटतं खरं. आंब्याच्या कोयी, जांभळाच्या, लाल भोपळ्याच्या बिया पुढच्या मोसमात बियाणं म्हणून कामाला येतात. ओळखीत कोणाला पपई दिली, तर त्या बिया सांभाळून ठेवायला सांगते. त्याची रोपं करून शेतावर लावली जातात. सध्या पपई लागवड करत आहे, त्यातली बरीचशी रोपं अशी शेतावरच्या पपईच्या बियांचीच आहेत. अजून एक बदल म्हणजे कुठेही जाता-येताना इतर शेतांवर, पिकांवर, झाडांवर बारीक नजर ठेवली जाते. कुठल्या शेतात काय लावलं आहे, कुठल्या झाडांना फुलं-फळं आहेत, कुठे कापणी-लावणीची तयारी चालू आहे, ह्याची उगीचच नोंद घेतली जाते. तेच पीक किंवा झाड शेतात असेल, तर निश्चितच लक्ष जातं. ‘पुण्यातल्या आंब्याच्या झाडांवर मोहोर दिसायला लागला, आपल्याकडे नाही अजून’ असे विचार येतात.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_11.jpeg

शेतावर पोचलो की आणलेलं सामान ठेवायचं. पायात साध्या चपला किंवा फ्लोटर्स असतात ते बदलून गमबूट घालायचे. डोक्यावर टोपी अडकवायची. एका बारक्या पर्समध्ये काम करताना घालायचे हातमोजे, एक छोटी कात्री, इयरफोन असं साहित्य असतं. ती पर्स शेतावरच असते. त्यात मोबाईल घ्यायचा. ती पर्स गळ्यात अडकवायची. एका खांद्याच्या पिशवीत शेताच्या मातीने रंगलेल्या २-४ पिशव्या भाजी-फळं काय मिळतील ती ठेवण्यासाठी घ्यायच्या. त्यासोबत पाण्याची बाटली, ब्रँच कटर घ्यायचं की निघायचं असं नेहमीचं रूटीन आहे. आम्ही जिथे सामान ठेवतो, त्याच्या समोर आमची हौसेची बाग आहे. तिथे सध्या कांदा, कोथिंबीर, मेथी आहे. वांग्याची, मिरचीची काही रोपं लावली आहेत. घेवडा आणि मका पण आहे. मका गोड असल्यामुळे उंदरांनी त्याची पार्टी केली. घेवडा थोडा कडवट चवीचा. तो वाचला. तिथेच माझ्या आवडीचं म्हणून अनंताचं, एका अतिप्रिय व्यक्तीची आठवण म्हणून बकुळीचं, कधीतरी घरी गुलकंद करायची महत्त्वाकांक्षा आहे, म्हणून देशी गुलाबाचं, मैत्रिणीने दिलेलं एक सोनचाफ्याचं झाडही आहे. काकडीचे वेल जरा अंग धरत आहेत. गेल्यागेल्या ह्या बागेची प्रगती बघायची आणि मग पुढे जायचं असं रूटीन असतं.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_10.jpeg

सध्या अमेरिकास्थित असलेल्या मुलाचा आम्ही शेतावर असताना फोन आला. मग व्हिडिओ कॉलवर त्याला शेत-दर्शन घडवलं. तो अगदीच शहरी मुलगा आहे. त्यात आता परदेशस्थ. शेतावर नियमित जायला लागेपर्यंत मला जसं मिरची आणि टोमॅटोचं रोप वेगळं ओळखता येत नसे, तसंच त्याचं आहे. पण काहीही असलं तरी ते शेताचे ‘धाकटे मालक’! त्यामुळे त्याच्या सामान्य ज्ञानात भर घालायचा प्रयत्न केला. नव्या पिढीतील अत्याधुनिक सदस्याच्या ज्ञानात भर घालायची संधी क्वचितच मिळते . त्यामुळे त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. नेट त्रास देत होतं, तरी नेटाने त्याला हे झाड आणि ती भाजी दाखवली. त्याची पायधूळ शेतावर पडली, त्याला बरीच वर्ष झाली. त्यानंतर जे बदल झाले होते, ते त्याला दाखवता आले. त्याला त्याच्या आवडत्या भाज्या, फळं बघून आनंद झाला. पण आश्चर्य वाटलं ते फणसाच्या फुलाचं. फणसाचं फूल गऱ्यासारखं दिसतं. फूल उमललं आणि परागीभवन झालं ही त्यातून इवला फणस डोकावायला लागतो. अमेरिकेत जरा दुर्लभ असलेली चिकू, पेरू सारखी फळं बघून त्याला कधी एकदा सुट्टीवर येतोय असं झालं आणि मला इतकं खंडीभर असून लेकराला मिळत नाही, म्हणून जरा दुखलं. असो.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_9.jpeg

प्रत्येक कामाच्या क्षेत्रात आपले विशेष विनोद असतात. आमच्या बांधकाम क्षेत्रातही असतात. बांधकाम सुरू करताना सरकारी परवानगी घ्यावी लागते, काम पूर्ण झाल्यावर तसा दाखला (भोगवटा पत्र) घ्यावा लागतो. अशा कामाच्या निमित्ताने मी महापालिकेत नेहमीच जात असते. एखाद्या जादा माणसाचं वर्णन तिथले लोकं ‘मॅडम तो पहिल्यापासून जरा वाढीव बांधकामच होता’ असं करायचे. तसंच ‘एखाद्या माणसाला कंस पडणे’ हा तर मला फारच आवडलेला विनोद आहे. सातबारा किंवा तत्सम नोंदींवर एखाद्याची नोंद असेल आणि ती व्यक्ती निवर्तली, तर त्याच्या वारसांची तिथे नोंद होते. हे करताना निवर्तलेल्या व्यक्तीच्या नावाभोवती कंस करतात. त्यामुळे कोणी गेल्याची बातमी ‘त्याला कंस पडला मागच्या आठवड्यात’ अशी सांगतात!! ‘आम्हाला कंस पडले, की शेत तुला सांभाळायचं आहे. सगळं बघून ठेव’ असं सांगून मी चिरंजीवांची माफक करमणूक केली.

मी आठवड्यातून एकदा शेतावर जाते. महेश चार दिवस जातो. मला फार काम नसतं. महेश आणि शेतावरच्या मदतनिसाची कामाची यादी मात्र न संपणारी असते. नवीन काही पेरणी करायची असली, की तो भाग तयार करायचा, तिथे जीवामृत टाकायचं, बियाणं किंवा रोपांची जुळणी करायची. ह्या दरम्यान एखादं मशीन काहीतरी काम काढतं. मग त्या दुरुस्तीची तिथे खटपट करायची. जमलं तर उत्तम नाहीतर ते मशीन पुण्यात दुरुस्तीसाठी आणायचं. ही यादी कितीही वाढवता येईल. आज माझं आवरेपर्यंत पावसाळ्यात पेरणीसाठी ठेवलेल्या सोयाबीनला ऊन दाखवणे, हे काम ते दोघं मिळून करत होते.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_8.jpeg

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_7.jpeg

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_6.jpeg

प्रत्येक जागी पाणी पोचवणे, हे शेतीतलं फार महत्त्वाचं आणि रोजचं काम. त्यासाठी प्रत्येकजण निरनिराळे उपाय शोधत असतो. शेताच्या कडेने पाट केलेले आहेत. ड्रीप पण आहे. आता एक रेन पाइप घेतला आहे. शेडसमोरच्या बागेत त्या पाइपचा जादूचा प्रयोग करून झाला. योग्य प्रेशर तयार झाल्यावर मस्त कारंजी उडायला लागली. थोड्या वेळात बऱ्याच वेला-झुडपांना पाणी मिळालं.

हे झाल्यावर मग उगीच इकडे तिकडे हिंडले. बोरं पिकली आहेत का, पपई तयार झाली आहे का? अशी पाहणी केली. आता शेतावरचे मनोरंजक दिवस सुरू झाले. आंब्याला, काजूला, आवळ्याला मोहोर आला आहे. फणसाला फुलं येत आहेत. फणसाच्या झाडावर बारके बारके फणस लगडले आहेत. असं फांदीफांदीला बोटभर फणस लागलेलं झाड बघायला छान वाटतं. फणसाच्या फुलांना एक सौम्य पण विशिष्ट गंध असतो. तो मला फार आवडतो. काजूचंही तसंच. ती अगदी नाजूक फुलं दिसायलाही फार देखणी दिसतात. बोरं पुष्कळ लागली आहेत. पण अजून हिरवी आहेत. ‘कोल्होबा, कोल्होबा बोरं पिकली’ ही वेळ अजून महिन्याभराने येईल.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_5.jpeg

पपईचा रंग बदलून किंचित पिवळा रंग झाला, की त्याला ‘कवडी पडली’ असं इकडे म्हणतात. अशी पपई उतरवली, की ती थोड्या दिवसात पिकते. तशी कवडी पडलेली एक सणसणीत मोठी, जवळजवळ अडीच किलो वजनाची पपई मिळाली. पूर्ण नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या ह्या पपयांची चव,पोत आणि स्वाद उत्तम असतो. पपयांचं उत्पादन वाढवावं म्हणून दोन वर्षांमागे बरीच रोपं लावली होती. पण तेव्हाच पपयांवर कसलासा व्हायरस आला. पानं खराब होऊन गुंडाळल्यासारखी झाली. मग ती सगळी रोपटी काढून जाळून टाकली. आता पुन्हा लावली आहेत. रोपांचीही गंमत असते. शेजारी लावलेल्या दोन रोपांपैकी एक कमरेइतकं उंच झालं तर दुसरं गुडघ्याइतकंच असतं. लावलेल्या रोपांपैकी सगळी जगातील, ह्याचीही शाश्वती नसते. लावलेल्या रोपांपैकी जेवढी ‘नर’ झाडं असतील, त्यांचा उपयोग परागीकरणाकरता होतो. पण ती फळधारणा करू शकत नाहीत. अशा सगळ्या कहाणीनंतर जी फळं हातात पडतात, तो आनंद अमूल्य असतो. थोडक्यात काय, आपण रोपं लावणं, त्याला खत-पाणी करणं, ते फळभाराने जडावलं तर आधार देणं, ही कामं मन लावून करायची. ‘फळाची’ अपेक्षा करायची नाही. फिरता फिरता दोन-चार आवळे, थोडे पेरू असा मेवा गोळा केला.

आदिमानव जेव्हा शिकार करून जगत होता, तेव्हा त्याला ज्या त्या मोसमातील फळं मिळायची. आता आपण बाजारात जाऊन आपल्याला हवी ती फळं आणून खाऊ शकतो. आम्ही शेती करायला लागल्यापासून मात्र ‘आपल्या शेतावरचीच फळं खायची’ ह्या स्टेशनवर आलो आहोत. त्यामुळे त्या त्या मोसमातली फळं खाल्ली जातात. बाजारातून आणून फारच क्वचित खातो. असंच भाजीचंही व्हावं, ह्या दृष्टीने प्रयत्न करतोय. अगदी पूर्ण आठवडाभराच्या भाज्या नाही, तरी अर्ध्या भाज्या शेतावरच्या असाव्या असं नियोजन करतो आहे. बघूया.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_4.jpeg

साधारणपणे संक्रांतीच्या आसपास आवळे बाजारात येतात. पण आमचं शेत आमच्यासारखंच निवांत असल्यामुळे आता आवळ्याच्या झाडावर फुलोरा दिसतोय. मार्च-एप्रिलमध्ये आवळे तयार होतात. ही सगळी झाडं कंपाउंडच्या जवळ आहेत. कंपाउंडच्या बाहेर तण अगदी आनंदाने वाढतं. तिथे चरणारी गुरं त्यातल्या काही वनस्पती खातात. काही रानमारीसारखी झुडपं आणि वेल फार गतीने वाढतात. तारेच्या कंपाउंडचा आधार मिळतो. आवळ्याच्या खडबडीत खोडांचाही. ह्या वेली दिसायला नाजूक दिसल्या, तरी त्या भयानक चिवट असतात. आवळ्याच्या काही फांद्या ह्या वेलांच्या ताणाने तुटल्या आहेत. कंपाउंडलाही ह्या सगळ्या प्रकरणाचा भार होतो. वेळ मिळेल, तशी आम्ही तिथे साफसफाई करतो. गाई तिथे बांधल्या, की त्या त्यांना आवडणारे प्रकार खातात. पण कंपाउंडच्या बाहेरची सफाई करणं आवश्यक झालं आहे. महेशच्या मागे बरीच कामं असतात. त्यामुळे मी दरवेळी थोडं थोडं करायचं ठरवलं आहे. अगदी दर आठवड्यात थोडं थोडं करत गेले, तर बहुतेक पुन्हा त्याच जागी एक वर्षाने येईन. पण काहीच नाही केलं तर हे invesive plants चं शेत आहे की काय अशी शंका येऊ शकेल! आज बरेच कटर, हातमोजे, गॉगल वगैरे सरंजाम चढवून शेताला प्रदक्षिणा घालून मी सुस्थळी गेले. अतिक्रमण विरोधी पथक आल्यावर रस्ते जसे स्वच्छ, मोकळे होतात, तसा तो भाग मोकळा झाला. आता नियमाने हे काम करणार आहे. असे शारीरिक कष्ट केल्यावर हात, खांदे, पाठ दमते. पण काहीतरी काम केल्याचं समाधानही वाटतं.

बहुतेक सगळ्या आंब्याच्या झाडांवर मोहोर डोकावायला लागला आहे. त्यामुळे मधमाश्या, छोटे पक्षी ह्यांची वर्दळ वाढली आहे. काजूच्या काही झाडांवर भरपूर फुलं आहेत, तर काही झाडांनी यंदा सुट्टी घ्यायचं ठरवलं आहे. बारकीबारकी लिंबं आहेत. आता नवीन झाडं लावायची वेळ जवळ आली. चिकू, आंबा, शेवगा, सीताफळ अशी पुष्कळ रोपं मिळवायची आहेत. पावसाच्या आधी ती व्यवस्थित रुजली की पावसाच्या पाण्यावर चांगली वाढतील. मी बांधकामाची कामं करत होते, तेव्हाही एक पाऊस संपला की थोड्या दिवसात ‘monsoon is just round the corner’ हा डायलॉग सुरू व्हायचा. शेतावरही तेच. पाऊस हे सगळ्या वर्दळीच्या केंद्रस्थानी असतो. ‘पावसाच्या आधी’ आणि ‘पावसाच्या नंतर’ ही चर्चा सतत चालू असते.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_3.jpeg

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_2.jpeg

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm_1.jpeg

सध्या शेतावर नवीन पेरणी जोरात चालू आहे. भुईमूग, ज्वारी, घेवडा, भेंडी, गवार, मका, सूर्यफूल, बटाटे असं कायकाय नवीन लावलं आहे. एका ठिकाणी ताग पेरला आहे. तो थोडा मोठा झाला, की त्याला जमिनीत गाडून टाकणार. त्या हिरव्या खतामुळे पुढच्या पिकाला फायदा होतो. कडवे वाल थोड्या दिवसांपूर्वी लावले होते. पण कीड पडल्यामुळे ते काही हाती लागले नाहीत. एवढी सगळी पेरणी करायची म्हणजे मोठंच काम. गेले दोन आठवडे महेश आणि नानाची धांदल चालू होती. नुकतीच पेरणी झाल्यामुळे अजून मातीच्या लाल रंगाचं प्राबल्य आहे. हिरवे अंकुर अजून थोड्या दिवसांनी डोकं वर काढतील. लसूण नवरात्रात लावला होता, तो थोड्या दिवसांनी काढता येईल. गेल्या वर्षी एका जागी जांभळ्या घेवड्याचे वेल इतके फोफावले की त्याचा मांडव कोसळतो की काय? अशी भीती वाटत होती. त्याच्या बिया पडून तिथे परत वेल उगवले आहेत. आता त्याला जांभळी फुलं आली आहेत. थोड्याच दिवसात शेंगा येतील. जेवणानंतरही महेश आणि नाना त्याच कामात होते. घरी आणलेली काही पॅशनफ्रूट वाळली होती. वेलींसाठी तयार केलेला एक मांडव सध्या रिकामा आहे. तिथे ती फळं लावली. अळू, कढीलिंब, गवती चहा काढला. जास्वंदीच्या कळ्या, झेंडूची फुलं अलगद पिशवीत ठेवली. गमबूट काढून नेहमीच्या चपला घातल्या. त्यांना धोपटमार्गाचा सराव आहे. त्या रस्त्याला लागलो.

whatsapp_image_2024-02-14_at_7.22.55_pm.jpeg

दर वर्षी आंब्यावर मोहोर आला की वासंती मुजुमदार ह्यांच्या ‘झळाळ’ पुस्तकात वाचलेला एक प्रसंग आठवतो. त्या पुस्तकात पं.कुमार गंधर्व ह्यांच्यावरचा लेख आहे. कुमारांच्या प्रथम पत्नी, भानुताई अकाली गेल्या. त्यानंतर कुमारजी अगदी सैरभैर झाले होते. कशातच त्यांना गोडी वाटेना. ना गाण्यात ना कोणाला भेटण्यात. रोजच्या रियाजातही मन लागेना. असेच खिन्न होऊन ते एकदा बागेत फिरत होते. सहज वर लक्ष गेलं तर आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता. ते बघून कुमारजींना वाटलं.’ मी इतका माझ्या दुःखात बुडून गेलो आहे, की मला कशाचं भान नाहीये. पण सृष्टीचं हे अविरत फिरणारं चक्र मात्र त्याच्या गतीने फिरतंय. नवी पानं जन्म घेत आहेत. फुलं फुलत आहेत. मी सुद्धा ह्या चक्राचा एक भाग आहे. मलाही नव्याने सुरवात करायला हवी’. त्यानंतर ते हळूहळू सावरले. हा क्षण कुमारजींच्या अलौकिक प्रतिभेमुळे ‘फेर आई रे मौरा’ ह्या बागेश्री रागातल्या रचनेमध्ये अजरामर झाला. आपल्याकडे त्यांच्यासारखी प्रतिभा कुठून येणार? ‘उत्पत्ती, स्थिती आणि विलय’ हे चक्र अपरिहार्य आहे, एवढं भान आलं तरी पुष्कळ.

‘जीवनज्योती कृषी उद्योग’ ह्या शेतीच्या प्रयोगाशी संबंधित अजून काही लेख

जीवनज्योती कृषी डायरी भाग ५
https://www.maitrin.com/node/5510

जीवनज्योती कृषी डायरी भाग ४ : आमची माती, आमची शेती
https://www.maitrin.com/node/4584

जीवनज्योती कृषी डायरी भाग ३
https://www.maitrin.com/node/4385

जीवनज्योती कृषी डायरी भाग २
https://www.maitrin.com/node/4354

जीवनज्योती कृषी डायरी भाग १
https://www.maitrin.com/node/4384

दिव्याखालचा अंधार
https://www.maitrin.com/node/4303

आम्रविक्री योग
https://www.maitrin.com/node/3835