'ट' ट्रेडमार्कचा - भाग १ - बौद्धिक संपदा (Intellectual Properties)

नमस्कार !!

गेली १४ वर्षे बौद्धिक संपदा या क्षेत्रात काम केल्यानंतर आणि १००० हुन अधिक ट्रेडमार्क एकहाती रजिस्टर केल्यानंतर याबाबतीत थोडी माहिती सर्वांना द्यावी असं वाटलं म्हणून एक छोटोशी लेखमालिका सुरु करते आहे. आवडली तर नक्की कळवा. तुमच्या शंका, सूचना, प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे.

ट्रेडमार्क विषयी बोलण्याआधी आपल्याला भारतात आणि भारताबाहेर ओळख असलेल्या विविध बौद्धिक संपदा (Intellectual Properties)आणि त्यांच्या अधिकारांविषयी (Rights) समजून घेणे अनिवार्य आहे.

बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय?

जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेंव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरती तिला प्राप्त झालेली मक्तेदारी! त्या निर्मितीच्या प्रकारावरून बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

१. पेटंट्स:

एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला त्या उत्पादनावर किंवा त्या प्रक्रियेवर स्वामित्व हक्क मिळतात (Ownership Right) त्यांना पेटंट्स किंवा शुद्ध मराठीत एकस्व असं म्हणतात. याची उदाहरणे म्हणजे विविध औषधांचे फॉर्म्युले, नवीन टेक्नॉलॉजीज (ऍपल विरुद्ध सॅमसंग हि या बाबतीतली अगदी ताजी केस आहे), अगदी खास धान्ये/ बियाणे (बासमती आणि हळद यांच्यासाठी भारताने दिलेली फाईट बऱ्यापैकी गाजलेली आहे).

२. कॉपीराईट्स:

कलाक्षेत्रातील कोणत्याही नवनिर्मितीवर उदाहरणार्थ लेख, कविता, साहित्य, चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, ऑडिओ, व्हिडीओ इत्यादीवर त्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला जे हक्क मिळतात त्याला म्हणतात कॉपीराईट्स. (इलियाराजा आणि एस पी बालसुब्रमनियम यांची केस या बाबतीत बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे). याव्यतिरिक्त विविध वाङ्मयचौर्य आणि संबंधित गोष्टींविषयी फेसबुक आणि अन्य संस्थळांवर नेहेमी चर्चा होतच असते.

३. डिझाईन्स/ इंडस्ट्रिअल डिझाईन्स:

एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, वेगळ्या/ हटके आकारावर जे स्वामित्व हक्क घेता येतात त्याला डिझाइन रजिस्ट्रेशन असे म्हणतात. कोकच्या बाटलीचे डिझाईन हे अश्या प्रकारे प्रोटेक्ट केलेलं आहे. तसेच Air Wick नावाच्या कंपनीचे एअर फ्रेशनर आपण वापरतो, त्याच्या बाटलीचे वैशिष्टयपूर्ण डिझाइन सुद्धा प्रोटेक्ट केलेले आहे.

४. जिओग्राफिकल इंडीकेशन / भौगोलिक निर्देशक:

कोल्हापुरी चप्पल, येवल्याची पैठणी, बिकानेर भुजिया, रत्नागिरी हापूस इत्यादी उदाहरणे भौगोलिक निर्देशकांशी जोडलेली आहेत. अश्या ठिकाणी बनलेल्या सर्व उत्पादकांना(च) आपल्या उत्पादनावर त्या त्या स्थानाचा उल्लेख करण्याची परवानगी असते.

५. ट्रेडमार्क:

हा आपल्या लेखमालेचाच विषय असल्याने 'ट्रेडमार्क म्हणजे काय?' इथपासून 'काय म्हणजे ट्रेडमार्क नाही?' इथपर्यंत सगळंच पुढील लेखात येत जाईल.

यातल्या प्रत्येक बौद्धिक संपदेचा विषय, हक्क, त्या हक्कांना दिले जाणारे संरक्षण आणि त्या संरक्षणाचे प्रकार / नियम हे वेगवेगळे आहेत. जसे कॉपीराईट हे कलाकाराला त्याच्या कलेसाठी योग्य तो मानसन्मान (आणि काही आर्थिक मोबदला असला तर तोही) मिळावा यासाठी असते तर ट्रेडमार्क हे ग्राहकांना त्यांच्या उत्पादकाची खात्री पटावी यासाठी केले जाते. पेटंट हे शास्त्रज्ञाने केलेल्या इन्व्हेंशनच्या वापराचे सर्व अधिकार त्याच्याकडेच राहावेत म्हणून केले जाते तर भौगोलिक निर्देशक हे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी उपयोगी ठरते.

आपल्याकडून कोणत्याही प्रकारची निर्मिती झाल्यावर ती नक्की कोणत्या प्रकारात मोडते आणि तिला कश्याप्रकारे संरक्षित करता येईल हे जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची मदत घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

तळटीपा:

१. तुम्हाला ट्रेडमार्क विषयी काय काय जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा. मी या लेखमालेत त्या सर्व पैलूंचा समावेश करायचा नक्की प्रयत्न करेन.

२. मोठ्ठे आणि पाल्हाळिक लिखाण करण्याऐवजी छोटे छोटे भाग प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. तुम्हाला हि पद्धत आवडेल अशी आशा आहे.

३. हि सर्व लेखमाला लिहिताना अनेक ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर अनिवार्य आहे. तसेच मनात येईल तसे लिहीत गेल्याने अनेक ठिकाणी सोपे इंग्रजी प्रतिशब्द वापरले गेले आहेत त्याबद्दल आधीच क्षमा मागते. कोणालाही वेळ / इच्छा असल्यास मुद्रितशोधन करून दिल्यास मूळ लेखात नक्की कॉपी पेस्ट करेन.

पुढील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4705

Keywords: 

'ट' ट्रेडमार्कचा - भाग २ - ट्रेडमार्क म्हणजे काय?

मागील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4699

मागील भागात आपण वेगवेगळ्या बौद्धिक संपदांचे प्रकार बघितले. त्यातला एक महत्वाचा आणि सर्वाधिक प्रचलित प्रकार म्हणजे ट्रेडमार्क. आजकाल सारं काही 'ब्रँडेड' वापरण्याच्या युगात ट्रेडमार्क्स चे महत्व अनन्यसाधारण वाढले नसते तरच नवल होते.

'ट्रेडमार्क' च्या नावातच ट्रेड आहे. 'ट्रेड' म्हणजेच व्यापार/ खरेदी-विक्री / सेवा (Services) देणे-घेणे. 'मार्क' म्हणजे खूण. एखाद्या विशिष्ट व्यापारी/ विक्रेता, सेवादाता (Service Provider) याची वेगळी ओळख पटवणारी कोणतीही खूण म्हणजे 'ट्रेडमार्क'. अश्या खुणा वेगवगेळ्या प्रकारच्या असू शकतात.

'ऍपल', 'बाटा', 'क्रोसीन', 'डेअरी मिल्क' हि आपल्या उत्पादकांची ओळख पटवून देणारी नावं (ट्रेडनेम्स) आहेत.

स्टारबक्सची हिरवी राणी, ऍपलचे उष्टे सफरचंद, मर्सिडीझचा गोल आणि त्यातलया विशिष्ट रेखा, गुगलचा रंगीत G, ट्विटरची चिमणी, फेसबुकचा F, अँड्रॉइडचा हिरवा रोबोट, मॅकडॉनल्ड चा M हि सारी 'लोगो' ची उदाहरणे आहेत.

'जस्ट डू इट', 'आयेम लव्हिंग इट', 'जिंदगी के साथ भी.. जिंदगी के बाद भी', 'अटरली बटरली डिलिशीयस..'जी ललचाये.. रहा ना जाये', 'द टेस्ट ऑफ इंडिया', 'बजाते रहो', 'पेहले इस्तेमाल करें.. फिर विश्वास करें' या टॅग लाईन्स वाचून तुम्ही अगदी सहज त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचे नाव सांगू शकता. म्हणूनच टॅग लाईन्स चा सुद्धा ट्रेडमार्क मध्ये समावेश होतो.

अनेक वर्षे जाहिरातीत वापरली जाणारी ऍनिमेटेड कॅरेक्टर्स सुद्धा प्रॉडक्ट/ सर्व्हिसेस ची ओळख बनली आहेत आणि म्हणूनच ट्रेडमार्क मध्ये त्यांचाही समावेश होतो. अमूल च्या जाहिरातीतली पोलका डॉट्स चा फ्रॉक घातलेली मुलगी, पिल्सबरी आटा च्या जाहिरातीतले कणकेचे गोंडस कार्टून, वोल्ट डीझने चा मिकी, चिटोझ चा चित्ता, एअर इंडिया चा महाराजा, व्होडाफोन चे क्युट झूझू हे सगळे मॅस्कॉट्स ट्रेडमार्कच्या अंतर्गत प्रोटेक्टड आहेत.

काही रंगसंगती पाहिल्यावर सुद्धा आपल्याला प्रॉडकट्स/सर्व्हिसेस ओळखता येतात. डेअरी मिल्क चा विशिष्ट जांभळा रंग, पेप्सीचे लाल-निळे कॉम्बिनेशन, मॅकडॉनल्ड्सचे लाल-पिवळे कॉम्बिनेशन, स्टारबक्सची हिरवी राणी/ परी, बिसलेरीचा विशिष्ट सी ग्रीन रंग, लेज चिप्स चे पिवळे-लाल कॉम्बिनेशन, रेड बुल चे लाल-निळे-मेटल कलर कॉम्बो, कोडॅकच्या लोगो मधले पिवळे-लाल कॉम्बिनेशन अशी अनेक उदाहरणे देता येतील. यांना देखील ट्रेडमार्क अंतर्गत प्रोटेक्शन आहे.

'टिंग टिंग टिडींग' वाचल्यावर (हेही तुम्ही चालीत वाचले असेल याची खात्री आहे) काय आठवतंय? एअरटेलसाठी ए आर रेहमान ने बनवलेली सिग्नेचर ट्यून आठवतेय? याहू ची 'याहूSSSSS' अशी मारलेली हाक आठवतेय? जुनी अतिफेमस नोकिया ट्यून, ऍपल, सॅमसंगच्या कॅची रिंगटोन्स सुद्धा ट्रेडमार्क मध्ये येतात.

हल्ली नव्याने काही विशिष्ट वासांवरही ट्रेडमार्क घ्यायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भारतात अजूनही कागदावर मांडता येणार नाही अश्या ट्रेडमार्क्सना प्रोटेक्शन नाहीये. तरीही पुण्यातील काही हॉटेल्सचे (विशेषतः मांसाहारी) याविषयी एकत्रित प्रयत्न सुरु आहेत. भारताबाहेर काही कंपन्यांनी त्यांच्या काही प्रोडक्टस च्या युनिक वासाचे ट्रेडमार्क्स घेतल्याची अगदी तुरळक उदाहरणे आहेत.

थोडक्यात.. तुमचे प्रोडक्ट/तुम्ही देत असलेली सर्व्हिस यांचे इतर प्रॉडक्ट वा सेवा देणार्यांपासून वेगळेपण दाखवणारी कोणतीही गोष्ट म्हणजे ट्रेडमार्क. एखादी गोष्ट ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर होण्यास / प्रचलित होण्यास कितपत लायक आहे याचे एकमेव परिमाण म्हणजे त्याचे वेगळेपण, हटकेपण, युनिकनेस !!!

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

पुढील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4717

Keywords: 

'ट' ट्रेडमार्कचा - भाग ३ - ट्रेडमार्क म्हणजे काय नाही?

मागील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4705

मागच्या भागात आपण 'ट्रेडमार्क म्हणजे काय?' हे बघितल्यावर 'त्यात बसत नाही ते सगळे ट्रेडमार्क नाहीत' असं एका वाक्यात हा लेख उरकता येईल. पण इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये हे इतकं सोपं प्रकरण नाही हे मला उमगलं आहे. एखादा ट्रेडमार्क / लोगो / टॅग लाईन हि आपल्या बिझनेस ची ओळख आहे असं तुम्हाला वाटत असलं तरी तो ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर होण्यास पात्र आहे कि नाही (विशेषतः भारतात) यासाठी त्याला अनेक क्रायटेरियातून जावं लागतं. भारतातील सद्य ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे ट्रेडमार्क कसा नसावा ते आपण बघुयात.

१. वेगळेपण नसलेला:

बौद्धिक संपदांचा बेसच युनिकनेस / हटकेपण/ वेगळेपण हे आहे. त्यामुळे ट्रेडमार्क म्हणून वापरले जाणारे नाव / चिन्ह / टॅग लाईन हे आपले वेगळेपण असलेले असावे. सफरचंद विकणाऱ्या माणसाला 'ऍपल' हा ब्रँड मिळणे तितकेच अवघड आहे जितके सेलफोन बनवणाऱ्या कंपनीला 'मोबाईल' हा शब्द ट्रेडमार्क म्हणून मिळणे. जर 'मोबाईल' हा शब्द एखाद्याला ट्रेडमार्क म्हणून दिला गेला तर पुढे सर्वच सेलफोन कंपन्यांना 'मोबाईल' हा शब्दच वापरता येणार नाही जे एकप्रकारे अन्यायकारक ठरेल. मागच्या वर्षी गुगलने त्यांच्या बहुचर्चित गुगल ग्लासचा ट्रेडमार्क नुस्त्या ‘ग्लास’ या नावाने नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला. यात ‘ग्लास’ हा शब्द मोठय़ा वैशिष्टय़पूर्ण अक्षरामध्ये लिहिलेला होता; पण अर्थातच हा ट्रेडमार्क मंजूर केला तर दुसऱ्या कुठल्याही काचेच्या वस्तू उदा. चष्मे बनविणाऱ्या उत्पादकाला त्याच्या उत्पादनाची जाहिरात करताना ग्लास हा शब्द वापरताच येणार नाही. या कारणास्तव हा ट्रेडमार्क नाकारला गेला. 'सायकल' हा ट्रेडमार्क अगरबत्तीच्या ब्रँडसाठी अगदी सहज मिळाला पण सायकलच्या कंपनीला मुळीच मिळणार नाही. ट्रेडमार्क ज्या उत्पादन / सेवेसाठी वापरला गेला आहे त्याचेच नाव ट्रेडमार्क म्हणून घेता येत नाही. नुकताच एका फार्मा कंपनीला 'फार्मा ड्रग्स' हा ट्रेडमार्क नाकारला गेला तो याच कारणाने.

२. प्रोडक्टचे गुणधर्म / वजन / क्वालिटी / नैसर्गिक आकार सांगणारे मार्क:

तुमच्या घराजवळच्या नाक्यावरच्या 'ए-१ समोसे'वाल्याकडचे सामोसे बेस्ट असतात म्हणता? तरीही त्याला ट्रेडमार्क मिळणार नाही. स्टेशनजवळच्या 'सुंदर साडी भांडार' मध्ये कीतीही सुंदर साड्या मिळत असल्या तरीही 'सुंदर साड्या' हा ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येणार नाही. 'राउंड पिझ्झा', 'सुगंधी अगरबत्ती', 'फास्ट सायकल' 'फोल्डिंगची खुर्ची' 'रेडी टू मेक पावभाजी' अशी नावं केवळ आकार / गुणधर्म सांगणारे आहेत. निव्वळ वजन/ क्वालिटी / गुणधर्म / नैसर्गिक आकार सांगणारे शब्द ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत.

३. प्रचलित चिन्हे/ खुणा/ रासायनिक किंवा गणिती सूत्रे:

प्रॉफिट वाढण्याचे निर्देशक असणारा अपवर्ड बाण, एखाद्या गोष्टीला नकार देणारी फुली ची खूण, वेगवेगळे दिशादर्शक बाण, बुल्स आय साठी आपण बरोब्बर मध्ये बाण लागलेला डार्ट बोर्ड वापरतो तो, whatsapp मधल्या विविध स्मायलीज ट्रेडमार्क म्हणून घेता येत नाहीत. तसेच वेगवेगळी रासायनिक आणि गणिती सूत्रे सुद्धा ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत.

४. लोकांच्या मनात संभ्रम / गोंधळ निर्माण करणारे ट्रेडमार्क्स:

ऑलरेडी इतरांच्या प्रचलित, रजिस्टर्ड असलेल्या ट्रेडमार्क्सशी साधर्म्य दाखवणारे, प्रचलित/ रजिस्टर्ड ट्रेडमार्क्सची सरळ सरळ कॉपी करणारे आणि लोकांच्या मनात गोंधळ तयार करणारे मार्क्स/ नावं ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत. हा संभ्रम कधी तयार होतो? तर जेव्हा तुम्ही प्रचलित ट्रेडमार्क्सचे नाव फक्त थोडेफार स्पेलिंग बदलून वापरता (Reliance आणि Relianse) किंवा आपल्या लोगोत रजिस्टर्ड असलेल्या ट्रेडमार्कशी मिळती जुळती रंगसंगती वापरता (डेअरी मिल्क चा जांभळा रंग कॉपी करून छोट्या खेडेगावांमध्ये फेक चॉकलेट्स बेकायदेशीररीत्या विकली जातात), ट्रेडमार्क चे स्पेलिंग असे बनवता जे दिसताना पूर्ण वेगळे असेल पण उच्चार अगदीच सारखे असतील तरीही ते रजिस्टर करता येत नाहीत (कोडॅक आणि मोडॅक). एखाद्या प्रचलित ट्रेडमार्क चे नाव इंग्रजीत लिहिलेले असेल तर तुम्ही फक्त ते नाव देवनागरी किंवा अन्य लिपीत लिहून किंवा भाषांतर करून (व्हिक्टोरियाचे गुपित) रजिस्टर करू शकत नाही.

५. भारतातील कोणत्याही समूहाच्या धार्मिक किंवा अन्य भावना दुखावणारे ट्रेडमार्क्स:

साईबाबा, गणपतीबाप्पा, तिरुपती बालाजी या नावाने पूर्वी ट्रेडमार्क मिळत होते आता मिळत नाहीत. औरंगजेब, शिवाजी महाराज, महात्मा गांधी या नावाने ट्रेडमार्क्स भारतात मिळणे अशक्य आहे. 'ओम नमः शिवाय' किंवा कुराणातील किंवा बायबल मधील साहित्य ट्रेडमार्क करता येणार नाही.

६. अश्लील/बीभत्स/धक्कादायक/गैर असे शब्द/चित्र/लोगो/आवाज/वाक्य ऑब्व्हियस कारणाने ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाहीत.

७. नेम अँड एम्ब्लेम्स कायद्यात उल्लेख केलेली नावं आणि चिन्ह ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करता येत नाही. उदाहरणार्थ भारताचा झेंडा, भारत हे नाव, भारताची राजमुद्रा, महात्मा गांधी हे नाव, पंडित नेहरू हे नाव, भारतरत्न किंवा पद्मश्री सारख्या सरकारने दिलेल्या पदव्या/उपाध्या इत्यादी इत्यादी.

८. अन्य प्रकारातली बौद्धिक संपदा:

एखादा फोटो ट्रेडमार्क मध्ये रजिस्टर करण्याऐवजी कॉपीराईट म्हणून रजिस्टर करणे अधिक सोपे आहे. ट्रेडमार्क मध्ये भौगोलिक निर्देश असल्यास (रत्नागिरी हापूस, कोल्हापुरी चपला वगैरे) जिऑग्राफिकल इंडिकेटर्सच्या अंतर्गत रजिस्टर होतात. त्याला ट्रेडमार्क अंतर्गत संरक्षण नाही.

तुम्हाला ट्रेडमार्क म्हणून हवं असलेलं नाव या सगळ्या क्रायटेरियात बसतंय ना आणि बसत नसेल तर कसं बसवता येईल Wink यासाठी या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीची मदत घेणे केव्हाही उपयोगी पडते.

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

पुढील भागाची लींकः https://www.maitrin.com/node/4731

Keywords: 

'ट' ट्रेडमार्कचा - भाग ४ - ट्रेडमार्कचे क्लासेस (वर्गीकरण)

मागिल भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/4717

अहं.. गडबडून जाऊ नका.. आपण गाण्याचे किंवा चित्रकलेचे क्लासेस लावतो ते हे क्लासेस नव्हेत. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनच्या आणि प्रोटेक्शनच्या सोयीसाठी प्रॉडक्टस आणि सर्व्हिसेसचे वर्गीकरण करून त्यांचे ४५ ग्रुप्स पाडले गेले आहेत. यांनाच ट्रेडमार्कच्या भाषेत ट्रेडमार्क क्लास असं म्हणतात. यातले १ ते ३४ क्लासेस हे प्रॉडक्टस साठी आहेत तर ३५ ते ४५ क्लासेस हे सर्व्हिसेस साठी आहेत. उत्सुकता असल्यास https://ipindiaonline.gov.in/tmrpublicsearch/classfication_goods_service... इथे जाऊन तुम्हाला हे वर्गीकरण बघता येईल.

आता असं वर्गीकरण करण्याची गरजच काय? तर असं बघा.. आपण मागच्याच भागात बघितलं कि एखादा ट्रेडमार्क एखाद्या बिझनेससाठी ऑलरेडी रजिस्टर झालेला असेल तर इतर कोणाला त्याच बिझनेसाठी तो स्वतःच्या नावावर पुन्हा रजिस्टर करता येत नाही. आता यातला 'त्याच बिझनेससाठी' हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे काय.. तर मी पेंटॉनिक हे नाव पेनाच्या बिझनेससाठी रजिस्टर केले असेल तर इतर कोणत्या पेन निर्मात्याला ते वापरता येणार नाही. बरोबर? पण मग एखाद्या पेन किलर बनवणाऱ्या कंपनीला ते नाव हवे असेल तर मिळेल? उत्तर आहे होय.

ट्रेडमार्कला प्रोटेक्शन देण्यामागचे कारण एखाद्या निर्मात्याने एखाद्या क्षेत्रात आपल्या उत्पादनाचे जे नाव / रेप्युटेशन / गुडविल निर्माण केले आहे ते जपणे हे आहे. तर यात हे गृहीत धरले जाते कि जे नाव / गुडविल / रेप्युटेशन तयार झाले आहे ते त्या त्या उत्पादनापुरतेच आहे. उदाहरणार्थ 'बाटा' कंपनीने उद्या बर्गर विकायला सुरुवात केली तर तुम्ही फक्त 'बाटा' हे नाव वाचून डोळे झाकून खाल का? 'झेरॉक्स' कंपनीने कपडे शिवले तर डोळे झाकून घ्याल का? बालाजी वेफर्स वाल्या कंपनीने कोविड ची लस बनवली तर डोळे झाकून घ्याल का? 'जावेद हबीब' ने डेंटिस्टच्या सर्व्हिसेस दिल्या तर जाऊन ट्रीटमेंट घ्याल का? तर नाही.

म्हणजेच त्या ब्रँडचे जे काही रेप्युटेशन आहे ते ठराविक उत्पादनासाठीच आहे. अश्या वेळी अश्या ट्रेडमार्कला इतर उत्पादनांसाठी प्रोटेक्शन देण्याची काही गरज आहे का? अर्थातच नाही.

म्हणूनच ट्रेडमार्क रजिस्टर करताना तो ज्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिससाठी रजिस्टर करायचा आहे, त्याचा योग्य तो ट्रेडमार्क क्लास आयडेंटिफाय करावा लागतो. त्याच क्लासमध्ये तो आधी रजिस्टर नाहीये ना हे चेक करावे लागते. आणि आपल्याला केवळ त्याच क्लासमध्ये प्रोटेक्शन दिले गेले आहे हे लक्षात ठेवावे लागते.

काही वेळेला काही बिझनेस / ट्रेडमार्क एक किंवा अनेक प्रॉडकट्ससाठी वापरला जात असतो जर हे वेगवेगळे प्रॉड्क्टस / सर्व्हिसेस एकाच क्लास मध्ये येत नसल्यास वेगवेगळ्या क्लास मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागते. उदाहरणार्थ एखादी छोटी हार्डवेअर-सॉफ्टवेअर कंपनी मोठ्या कंपन्यांचे कम्प्युटर्स / सॉफ्टवेअर्स कमिशन बेसिस वर विकत असते, शिवाय शक्य असेल तेव्हा शक्य असेल तिथे स्वतःचे कस्टमाईज्ड सॉफ्टवेअर डेव्हलप करून देत असते. अश्या वेळी त्या बिझनेसचे / कंपनीचे / ब्रँडचे नाव कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उत्पादन व विक्री (क्लास ९) आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व विक्री (क्लास ४२) अश्या दोन्ही क्लास मध्ये रजिस्टर केलेले सोयीचे ठरते. काही स्किनकेअर प्रॉडक्टस बनवणाऱ्या कंपन्या शेड्युल एच प्रोडक्टस बनवतात जे रजिस्टर्ड डर्मोटॉलॉजिस्टच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकत घेता येत नाहीत. तर काही अशी प्रॉडक्टस बनवतात जी ओव्हर द काउंटर कोणीही घेऊ शकतात. अश्यांना फार्मास्युटिकल्स (क्लास ५) आणि कॉस्मेटिकस (क्लास ३) असे दोन्हीकडे अप्लाय करावे लागू शकते.

काही वेळेला सर्व्हिसचे स्वरूप आणि त्याचा वापर यावर त्यांचे क्लासेस बदलू शकतात. उदाहरणार्थ बिझनेस ला सहाय्यक ठरणाऱ्या अनेक सर्व्हिसेस (अकौंटिंग, मार्केटिंग, कन्सल्टन्सी इत्यादी) ढोबळमानाने क्लास ३५ मध्ये रजिस्टर होतात. परंतु 'मार्केट रिसर्च' हि सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीचा ट्रेडमार्क मात्र क्लास ४२ (सायंटिफिक रिसर्च) मध्ये रजिस्टर करावा लागतो. सीएस ची फर्म ही बिझनेस पूरक वाटली तरी लीगल सर्व्हिसेस (क्लास ४५) मध्ये रजिस्टर करावी लागते.

ट्रेडमार्क रजिस्टर किंवा प्रोटेक्ट करताना त्याचा क्लास आयडेंटिफाय करणे हि सगळ्यात मुख्य आणि महत्वाची पायरी आहे. इथे चूक झाल्यास क्लाएंट्सचे प्रचंड आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय बराच मनस्ताप होतो आणि शुल्लक चुकांमुळे कोर्टाचे निकाल मनाविरुद्ध लागल्यावर बिझनेस आणि आयपीआर जगतात निगेटिव्ह पब्लिसिटी होते ती वेगळीच.

आपला ट्रेडमार्क नक्की कोण(कोण)त्या क्लासमध्ये मोडतो आणि आपण विकत असलेल्या छोट्यातल्या छोट्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला कोण(कोण)त्या क्लासमध्ये प्रोटेक्शन मिळू शकेल हे निश्चित करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीची मदत घेणे केव्हाही उपयोगी पडते.

'ज्या क्लासमध्ये रजिस्ट्रेशन.. त्याच क्लासमध्ये प्रोटेक्शन' या थम्बरूल ला अपवाद आहे तो म्हणजे वेल नोन ट्रेडमार्क्स (Well known Trademark)चा. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

पुढील भागाची लिंक: https://www.maitrin.com/node/4738

'ट' ट्रेडमार्कचा - भाग ५ - ट्रेडमार्क का रजिस्टर करावा?

मागील भागाची लिंक: https://www.maitrin.com/node/4731

ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन विषयी वेगवेगळे पैलू पुढील भागात आपण बघणार आहोतच. तत्पूर्वी या भागात आपण बघुयात कि मुळात ट्रेडमार्क रजिस्टर का करावा? भारतात ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणे इतर देशांप्रमाणे अनिवार्य नाही ऐच्छिक आहे. ट्रेडमार्क रजिस्टर केल्याचे अनेक फायदे आहेत. त्यातले काही खाली देत आहे.

१. कायदेशीर मालकी हक्क:

अर्थातच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्याचं सर्वात महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे प्रॉडक्ट/ सर्व्हिसेसच्या युनिक नावाचे कायदेशीर हक्क स्वतः कडे घेणे आणि ते नाव / लोगो / टॅग लाईन वगैरे वापरण्याचे सर्वाधिकार स्वतः कडे ठेवणे हे आहे. रजिस्टर झालेल्या ट्रेडमार्क च्या वर उजवीकडे बरेचदा वर्तुळात आर हे अक्षर लिहिलेलं आपण पाहिलं असेल. हा 'आर' "खबरदार या ट्रेडमार्कची कॉपी कराल तर.." असंच अप्रत्यक्षरीत्या सगळ्यांना सांगत असतो.

या मालकी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तुम्ही कायद्याची मदत घेऊन कॉपी करणाऱ्या माणसाला तुरुंगाची हवा दाखवू शकता, त्याच्या मालावर जप्ती आणू शकता, त्याच्या गोडाऊनला टाळं ठोकू शकता, कोर्टाकडे याचना करून त्याला घसघशीत दंड भरायला लावू शकता.. इतकंच कश्याला.. तुमचं नाव वापरून त्याने जो बिझनेस केला आहे किंवा प्रॉफिट कमावले आहे ते सगळेच्या सगळे (तुम्ही डायरेक्ट काहीही कष्ट केलेले नसतानाही) तुम्हाला मिळतील अशी व्यवस्था कोर्टाच्या मदतीने करू शकता.

२. युनिक नाव ब्लॉक करणे:

आपल्याशिवाय / आपल्याव्यतिरिक्त कोणालाही आपण निवडलेले, आपल्याला सुचलेले युनिक/ कॅची नाव वापरता येऊ नये यासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून ते ब्लॉक करता येते. यासाठी ट्रेडमार्क मध्ये प्रॉडक्ट लॉन्च होण्याआधीच नाव रजिस्ट्रेशन करून ठेवण्याची सोय देण्यात आली आहे. अश्या ट्रेडमार्क्सना 'प्रपोझ्ड टू बी युज्ड' असं म्हणतात.

३. इतरांना सारखे (सिमिलर) नाव / लोगो वापरण्यापासून अटकाव करणे:

जेव्हा ट्रेडमार्क रजिस्टर्ड असतो तेव्हा त्याच्या आसपाससुद्धा जाणारा दुसरा ट्रेडमार्क रजिस्टर होऊ नये यासाठी भारताच्या बौद्धिक संपदा विभागाकडून अगदी नीट लक्ष दिले जाते. कारण तुमचं नाव काय आहे, लोगो कसा आहे हे त्यांना ठाऊक असते. तुम्ही तुमचं नाव ट्रेडमार्क अंतर्गत रजिस्टरच करत नाही तेव्हा त्यांना मुळातच तुमचे नाव/ लोगो याविषयी ठाऊकच नसते. त्यामुळे इतर कोणी साधारणपणे सारखे नाव घेऊन डिपार्टमेंटकडे गेल्यास अर्थातच ते सिमिलर/ सेम असूनही नंतरच्या माणसाला मिळण्याचे चान्सेस वाढतात.

एवढेच कश्याला? सिमिलर नाव घेऊनसुद्धा केवळ रजिस्ट्रेशन केलेले असल्याने नंतरच्या वापरकर्त्याने आधीच्या वापरकर्त्यावर केस केल्याची अनेक उदाहरणे आमच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.

४. मालकीहक्काचा कायदेशीर पुरावा:

भारतात ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य नसले तरी ते न करण्याचा मनस्ताप इतका जास्त आहे ज्याची कल्पना असणारा कोणीही सुज्ञ माणूस ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ऑप्शनला टाकणार नाही. जिथे जिथे तुम्हाला लोगो / नावासंदर्भात कोणतीही कायदेशीर फाईट द्यायची वेळ येते तेव्हा एक ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे तुमच्या मनस्तापाचे किमान ३ महिने वाचवतात असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. अनरजिस्टर्ड युझर विरुद्ध रजिस्टर्ड युझर अशी केस कधी उभी राहिलीच तर अनरजिस्टर्ड युझरला आपल्याला हे नाव किंवा लोगो कधी/ कसा सुचला, त्याने तो सर्वप्रथम कधी-कुठे-कसा वापरला इथपासून सगळं प्रूव्ह करावं लागतं. आणि तसं करूनही त्याचे केस जिंकण्याचे चान्सेस रजिस्टर्ड युझरच्या तुलनेत अगदी नगण्य असतात.

५. नावाचे वेगळेपण जपणे:

वर आपण बघितलं तसं जेव्हा रजिस्टर्ड ट्रेडमार्कशी सिमिलर असणारे नाव इतरांना दिले जात नाही तेव्हा आपण निवडलेल्या नावाचे वेगळेपण जपता येते. आपल्या नावावर विसंबून प्रॉडक्ट घेणाऱ्या कस्टमर्सच्या मनात शंका कुशंका राहत नाहीत.

६. संपूर्ण प्रॉडक्ट रेंजसाठी प्रोटेक्शन:

शिवाय प्रोटेक्शन त्या क्लासमधील सर्वच्या सर्व प्रॉड्क्टससाठी दिले जात असल्याने कस्टमर्सना तुमची संपूर्ण प्रॉडक्ट रेंज ओळखता येते. जसं कि एखादी कॉस्मेटिक कंपनी आज फक्त लिप्स्टीक बनवत असेल तरी तिला ट्रेडमार्क रजिस्टर केल्यावर सर्वसाधारणपणे कॉस्मेटिक रेंज मध्ये येणाऱ्या मस्कारा पासून फाउंडेशन पर्यंत सगळ्याच प्रॉड्क्टससाठी ते नाव ब्लॉक करून मिळते. अनरजिस्टर्ड ट्रेडमार्कला हे फायदे मिळत नाहीत

७. ऍसेट बनवणे:

बिझनेस चे रेप्युटेशन/ गुडविल हे बिझनेसचे ऍसेट असते. ते विकता येते, त्याची फ्रॅंचाईजी देता येते, बॅलन्स शीट मध्ये लिहिलेले असते, अकाऊंटिंग नि इन्कम टॅक्स भरताना गुडविलला फार महत्व असते. रजिस्टर्ड ट्रेडमार्क हे सगळे फायदे एनकॅश करणे सोपे करते.

८. इंटरनॅशनल ओळख:

भारतात रजिस्टर केलेल्या ट्रेडमार्कला भारताबाहेर रजिस्टर करताना तेच सगळे फायदे मिळतात जे भारतात रजिस्टर केले त्याच दिवशी त्यांच्याच देशात सुद्धा रजिस्टर केल्यावर मिळाले असते. भारताने अनेक देशांसोबत केलेल्या माद्रीद कराराअंतर्गत हे फायदे मिळतात.

फेमस लॅकॉस्टे विरुद्ध क्रोकोडाईल ब्रँडच्या केसमध्ये पुन्हा नव्याने सिद्ध झाले कि ट्रेडमार्क रजिस्टर केला तर इंटरनॅशनल कोर्ट सुद्धा कोणत्याही देशाने दिलेल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट चा अपमान करत नाही आणि होऊही देत नाही.

९. बिझनेसचा विस्तार:

बिझनेस आणि त्याचे नाव याविषयी जिथे जिथे निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा भारतात ट्रेडमार्क डिपार्टमेंट आणि त्यांचा निवाडा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मी व्यवसायाने सी एस सुद्धा आहे. आणि प्रत्येक नवीन कंपनी / एल एल पी सुरु करताना मला ट्रेडमार्कला वळसा घालून जाताच येत नाही.

थोडं सोपं करून सांगायचं तर जर तुम्ही प्रोप्रायटर असाल आणि तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर नसेल तर तुमच्या ब्रँडची कंपनी मी अगदी सहज सुरु करू शकते. इतकंच कश्याला? पुढे जाऊन तुम्हालाच तुम्ही प्रोप्रायटरी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरु करताना त्यात व्यवस्थित अडथळे निर्माण करू शकते. आमच्याकडे २०-२० वर्ष जुन्या प्रोपायटरी फर्म किंवा पार्टनरशिपचे कंपनीत कन्व्हर्जन करायला अनेकदा क्लाएंट्स येतात आणि आपल्या बिझनेसच्या नावाने आधीच ढीगभर कंपन्या आहेत हे बघून तोंडात बोटं घालून परत जातात.

हेच जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर असेल तर कोणालाच त्या नावाने प्रोप्रायटरशीप, पार्टनरशिप, ट्रस्ट, सोसायटी, कंपनी, एल एल पी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) यातलं काहीही सुरु करताना ते नाव घेता येणार नाही. कारण याबाबतीतले कायदे अगदी कडक आहेत.

सो भविष्यात बिझनेसचा विस्तार करायचा असेल (जो सगळ्यांनाच करायचाच असतो).. तर आपल्या बिझनेसचे नाव आत्ताच लॉक करून ठेवलेले फायद्याचे ठरते.

१०. कायमस्वरूपी प्रोटेक्शन:

रजिस्टर झालेला ट्रेडमार्क ज्या दिवशी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केले त्या दिवसापासून १० वर्षांसाठी वैध असतो. आणि पेटंट / कॉपीराईटसारखा तो एक्सपायर होत नाही. म्हणजेच १० वर्षांनंतर सुद्धा तो पुढील १० वर्षांसाठी रिन्यू करता येतो आणि त्यानंतरही असा १०-१०-१० वर्षांसाठी रिन्यू करता येतो. एका विशिष्ट कालावधीनंतर पेटंट आणि कॉपीराईट मध्ये असलेले एक्स्क्ल्युजीव हक्क संपतात आणि तो शोध किंवा ते साहित्य सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध होते. ट्रेडमार्क मात्र अनंतकाळासाठी फक्त आणि फक्त तुमचा.. तुमच्यानंतर तुमच्या वारसांचा आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांचा राहतो.

असे ट्रेडमार्क रजिस्टर करण्याचे ढोबळमानाने फायदे सांगता येतील. याव्यतिरिक्त रजिस्टर केलेल्या ट्रेडमार्कचे रेप्युटेशन मार्केट मध्ये वाढते (जसे प्रोपायटरशीपचे कंपनीत रूपांतर केल्याने बिझनेसचे रेप्युटेशन आपोआप वाढते) ज्याचे मोजमाप पैश्यात करता येत नाही.

एक चांगला ट्रेडमार्क तज्ञ तुम्हाला तुमच्या बिझनेसला यातील कोण(कोण)ते फायदे अप्लाय होतात हे शोधायला आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घ्यायला मदत करतो.

- विनिता जोगदेव
(कंपनी सेक्रेटरी आणि बौद्धिक संपदा सल्लागार)

पुढील भागाची लिंकः https://www.maitrin.com/node/5076