स्टेट, नॅशनल पार्क्स - १. ये क्या हुआ, कब हुआ, क्यु हुआ!

कोलोरॅडोत रहायला आल्याला आता बरीच वर्षे झाली. रॉकी माउंटन पर्वतरांगांनी घेरलेले, नजर जाईल तेथे स्वच्छ रंगीत आकाश दाखवणारे असे हे सुंदर राज्य. हाय अल्टिट्युड्मुळे (Altitude)सुर्य भारी प्रखर जाणवतो. दुरवरच्या पर्वतरांगांवर कायम बर्फ दिसतोच. मला स्नो पाहिला की चक्करल्यासारखे होते पण आता इतकी वर्षे राहुन सवय होतेयही.

सगळ्यांसारखेच मलाही फिरायला आवडते आणि कोलोरॅडोत तर दुरदुरच्या राज्यांतुन लोक फिरायला येतात. मुबलक निसर्गसौंदर्य, स्नो स्पोर्ट्सचे अनेक पर्याय, विशाल नॅशनल आणि स्टेट पार्क्स यामुळे पर्यटक न येते तरच नवल. कोलोरॅडोत फिरणे होतेच पण आमची भटकंती मुख्यतः कोलोरॅडोबाहेरच्या शहरांत असायची. प्रत्येक राज्यात एकदा तरी जावे असे वाटते आणि तश्या ट्रीप्स आखतो. मात्र कोविडकाळ येथे सुरु झाला साधारण फेब्रुवारी, मार्च २०२० च्या आसपास. आम्ही तेव्हा वेगासच्या रोड ट्रीपमध्ये होतो. वेगासला हॉटेलात चेकइन केले आणि तेवढ्यात बातमी आली की कसिनोज बंद होतायत एक दोन दिवसात. आमचे हॉटेलही दोन दिवसात आम्हास चेकआउट करायची जबरदस्ती करु लागले. तेथे आम्हाला गंभीर परिस्थीतीची पहिली जाणीव झाली आणि आम्ही निमुटपणे तिसरया दिवशी परतीला लागलो. आलो तर शाळा बंद, वर्क फ्रॉम होम हे सगळे पाठोपाठ झालेच. वर्षाला ३/४ दुरच्या ट्रीप्स करणारे आम्ही घरी पुरते अडकलो.

हे अडकणे घरच्या इतर सदस्यांना मानवले. मी मात्र प्रचंड कंटाळले. विमानप्रवास बंद, हॉटेल्स, लॉजेस, इन्डोअर आउटडोअर वॉटर पार्क्स, अ‍ॅम्युझमेंट पार्क्स, रेस्टॉरंट्स सगळे सगळे बंद. करनेका तो क्या करनेका? उठा, ऑफिसचे काम करा, स्वयंपाक करा, लेकाचा अभ्यास घ्या, बातम्या पहा, वाचा, फोनवर आप्तमित्रांच्या खुशाल्या घ्या असे बोअरिंग रुटीन चालु होते. समर चालु झाला. बाहेर प्रचंड सुंदर हवा पण सगळा शुकशुकाट. कुणाच्या घरी जायची चोरी, कुणाला बोलवायचे नाही, पोरं पार्कमध्ये खेळतही नाही असे सगळे निरस चालु होते.

नेमके कधी ते आठवत नाही पण एक दिवस सायकल गाडीला लावली आणि पडले घराबाहेर. दुरवर गाडी चालवत गेले आणि नेहमी येताजाता दिसणारा चॅटफिल्ड स्टेट पार्कचा बोर्ड नव्याने दिसला. स्टेट पार्क चक्क उघडे होते. मोजक्याच गाड्या आणि तुरळक मास्कधारी लोक दिसले. कधी स्टेट पार्कात न गेलेली मी, त्या दिवशी कोलोरॅडो स्टेट पार्क्सचा वार्षिक पासच विकत घेतला आणी आत शिरले. गाडी पार्क करुन सायकलवर बसले आणि जे काही मोकाटले ते आजतागायत. आता साधारण दोन वर्षे झाली. एवढ्यात १५ एक स्टेट पार्क्स आणि ५ नॅशनल पार्क्स झाल्येत फिरुन. कालच ग्रँड कॅनयनहुन परतले. विमानसेवा सुरु झाल्यापासुन अजुनच उत्साह वाढतोय. जमेल तितकी पार्क्स फिरायचे आहे आणि त्याबद्दल खुपखुप लिहायचे आहे.

स्टेट, नॅशनल पार्क्स फिरताना एक लक्षात आले की एक दोन दिवसांत काही बघुन होत नाही. तसेच खरया निरव निसर्गाचा, जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल, जंगली प्राणी त्यांच्या नैसर्गिक आवासात पहायचे असतील तर बॅककंट्री ओवरनाईट हायकिंगला पर्याय नाही. त्यामुळे हायकिंग, कँपिंग, विल्डरनेस सर्वायवलही शिकले. पार्कचे आखलेले रस्ते सोडुन खोल जंगलात शिरु लागले. त्यासाठी बॅककंट्री परमिट घ्यावे लागते, काही खास सामान, तयारीही दाखवावी लागते. ते सामान गोळा करणे हा एक सुंदर अनुभव होता, त्यावरही लिहेन.

कोविडकाळाने मला एक अनमोल खजिना दाखविला आणि माझ्यात सुप्त असलेली बाजु मला उलगडली. रात्री उठुन बाथरुमला जातानाही २/३ दिवे लावणारी मी एकटीने दाट जंगलात, मिट्ट काळोखात, जंगली प्राण्यांच्या सहवासात अनेक रात्री घालवल्या. पायातले त्राण जाईपर्यंत डोंगरदरया तुडवल्या, कैक वेळेस एकटेपणामुळे, अंधारामुळे किंवा प्राण्यांमुळे प्रचंड भिती वाटल्याने राम राम म्हणत वाटांवरुन पळत राहिले आणि घरी पोचल्यावर घरच्यांना ते सर्व सांगत प्रचंड हसुन घेतले, डावा गुडघा चांगलाच दुखावलाय एकदा पण आता थेरपीने तोही बरा आहे. हे नवीन वेड टिकेल तोवर टिकेल, पाहु. गेल्या दोन वर्षात मी जे जे पाहिले, अनुभवले ते ते लिहायला आवडेल. पुढील भागांपासुन विस्तॄत माहिती, फोटोंसकट लिहेन. शुद्द्लेखनावर काम करतेय, सांभाळुन घ्या.

स्टेट, नॅशनल पार्क्स - २. विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर

lake.jpg

'विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर' ही म्हण बॅककंट्री कँपिंगला अगदीच लागु पडते.

सुरुवातीला मी जेव्हा कोलोरॅडोतील एकदोन स्टेट पार्क्स फिरले तेव्हा एक छोटीशी बॅकपॅक नेत असे. त्यात पाणी, ताक, एकवेळचा खाऊ, लिप बाम, नॅपकिन एवढेच असे. ४/५ मैलांची पायपीट किंवा जेथे सायकल नेण्याजोगी वाट असेल तेथे ८/९ मैल एवढेच एका दिवसात करत असे. पण दरवेळी काहीतरी अपुरे वाटायचे. दुरवर दिसणारे जंगल, त्यातील वाटा खुणावत होत्या. घरी आल्यावर मी जंगलाचा, बॅककंट्रीचा मॅप गुगल करुन शोधत असे आणि आपण येथे जाऊ शकतो का असा विचार करत असे. घरच्यांशी बोलले की त्यांचा नन्नाचा पाढा असायचा. बॅककंट्री नको, सेफ नाही अजिबात किंवा मग, तु साधी या खोलीतुन त्या खोलीत जायला घाबरतेस रात्री आणि म्हणे जंगलात जाणार असे काहीतरी ऐकायला मिळे. मी कोलोरॅडो पार्क्स अँड वाइल्ड्लाईफ या वेबसाईटवर माहिती वाचु लागले. www.cpwshop.com कुठली पार्क्स बॅककंट्रीसाठी परमिट देतात, काय काय साहित्य आवश्यक आहे, वगैरे माहिती गोळा केली.

वेळेचाही हिशोब केला. साधारणपणे मी १२/१४ मैल एका दिवशी चालु शकते. हे चालणे डोंगर टेकडयांतुन असेल तर मला १० तास किंवा जास्तही सहज लागु शकतात. त्यामुळे मला वन वे जंगलात गेल्यावर रात्री तेथेच थांबणे भाग आहे हे लक्षात आले. काही काही पार्क्समध्ये अशा तंबु उभारण्यापुरत्या सपाट जागा त्यांनी जंगलात बनवल्या आहेत, ज्यांना बॅककंट्री कँपसाइट्स म्हणतात. खाली एक फोटो देते आहे (झाडावर फोन ठेवुन काढलाय). त्या ६ महिने आधीपासुन बुक करता येतात. काही काही नॅशनल पार्क्समध्ये मात्र अशा जागा नसुन, तुम्ही जेथे सपाट जागा पहाल तेथे आपला निवारा उभारु शकता. काही बेसिक नियम आहेत. जसे की कचरा करु नका. वेस्टची योग्य विल्हेवाट लावा. शेकोटी पेटवु नका. खायचे पदार्थ तंबुत किंवा आजुबाजुला ठेवु नका जेणेकरुन प्राणी (अस्वले, कोल्हे. लांडगे, माउंटन लायन) फिरकणार नाहीत इ. खालील फोटोत सांगितले आहे की कसे खायचे पदार्थ व्यवस्थित पॅकबंद डब्यात किंवा बॅगेत ठेवुन ती बॅग जमिनीपासुन काही फुट उंच वरच्या झाडाच्या फांदीला टांगायची ते. मला हे अजुनही जमत नाही. सतरा वेळा बॅग स्वतःच्याच डोक्यात पाडणे, भलत्याच फांदीवर अडकवणे, इतकी सुरक्षीत टांगणे की दुसर्‍या दिवशी पोटात आग पडल्यावरही ती झाडावरुन न काढता येणे वगैरे वगैरे.
campsite_0.png

backcountry.jpg

आमच्याइथे एक कबेला'ज रिटेल चेनचे आइटडोअर अ‍ॅक्टिविटीज गिअर्सचे दुकान आहे. www.cabelas.com तेथे जाऊन हायकिंग, कँपिंगचे सामान पाहिले. www.rei.com हे एक अजुन चांगले दुकान आहे. सामानाची यादी केली ती अशी:

१. ५० पाउंडपर्यंत वजन घेऊ शकेल अशी बॅकपॅकिंग स्पेशल बॅग. ही वेगळी असते. कँपिंगचे सामान व्यवस्थित लेयर्समध्ये भरता येते. बॅक सपोर्ट, स्ट्रॅप्स अंगासरशी छान बसतात जेणेकरुन पाठीवरुन वजन वाहणे जरा सोप्पे होते.

२. लाईटवेट तंबु (एका माणसाला झोपता येईल असा आणी वॉटरप्रुफ), इन्फ्लेटेबल मॅट्रेस, स्लीपींग बॅग.

३. पिटुकला गॅस स्टोव्ह, छोटे प्रोपेनचे सिलेंडर, कँपिंगचे कुकवेअर (एक पातेले आणि दोन कप्स), लायटर, आगपेटी

४. बेअर स्प्रे (अचानक एखादा जंगली प्राणी आक्रमक झाल्यास स्वसंरक्षणार्थ. याचे किस्से पुढे येतीलच), पॉकेट नाइफ, व्हिसल, फ्लॅशलाइट, कंपास

५. हीटवेअर, वार्मर्स, पायमोजे, हातमोजे, कानापर्यंत येईल अशी गरम टोपी

६. वॉटर प्युरिफाइंग सिस्टम असलेली २ लीटरची पाण्याची बाटली. कुठलेही नदी, ओढ्यातले गढुळ पाणीही या बाटलीतुन स्वच्छ करुन पिता येते. जेणेकरुन पाण्याचे ओझे वाहायला नको.

७. हलके प्लास्टिक किंवा टार्प. याचा कधीही कशाहीसाठी उपयोग होऊ शकतो. सुतळीचे छोटे बंडल.

८. हायकिंग पोल (किमान एक). चढउतारावर चांगला सपोर्ट मिळतो आणि संरक्षणासाठीही वापरु शकतो. टोकेरी असेल तर वेस्टची विल्हेवाट लावायला खड्डा खणायलाही उपयोग होतो.

९. सॅनिटायझर आणि बाकी हायजिन प्रॉडक्ट्स

१०. ड्राय रेडी टु इट माउंटन मील्स. फक्त उकळते पाणी या पाकीटांत ओतले की मील तयार. चव खास नसते मात्र पोट भरते आणि आवश्यक त्या कॅलरीज, पोषक घटक मिळतात. मी पक्की खादाडखाऊ असल्याने पुढे मटण, मॅगी, ऑम्लेट ते भाकरी, सोडे असे काय काय खाल्ले ते पुढे येईलच. खायच्या पदार्थांचे कधी वजन होते काय? छे छे. घरुन भरपुर टोमणे मिळालेत यावरुन.

ही बेसिक यादी होती. आता त्यात हळुहळु भर पडतेय, त्याबद्दल पुढे येईलच.

तर, हे सर्व सामान कबेलाज , rei किंवा नॉर्थ फेसमधुन घ्यायचे तर माझा एक पेचेकही अपुरा पडला असता. शिवाय मी किती काळ हे करणार आहे याचीही काही शाश्वती नसताना नवीन ब्रँडेड वस्तु घेणे मनाला पटेना. मग मी फेसबुक मार्केटप्लेस, गराज सेल्स अशा मार्गांनी खरेदी चालु केली. माझ्या लिस्टमधली वस्तु दिसली रे दिसली की विक्रेत्याला काँटॅक्ट करणे, भेटायची वेळ, जागा ठरवणे, भाव करणे असे उद्योग सुरु केले. कोविडकाळ असल्याने +१ ला हे बिल्कुल पसंत नव्हते. त्याने नवीन तंबु, मॅट्रेस आणि स्लिपिंग बॅग ऑर्डर केली. झोपायच्या वस्तु तरी नवीन घे म्हणाला. म्हंटले ठीक आहे. मी आता गेल्याशिवाय काही रहात नाही हे फायनली पटवुन घेतले त्याने. हेही नसे थोडके. पाण्याची बाटली, फिल्टर्सही नवीनच घेतले.

बाकीच्या वस्तु सेकंडहँड घेतल्याचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की मला या वस्तु वापरलेल्या अनुभवी लोकांना भेटता आले. त्यांच्याकडुन अनुभवाचे बोल आणि मौल्यवान सल्ले मिळाले. वस्तु कशा वापरायच्या याचेही प्रात्यक्षिक मिळाले. ज्या गड्याकडुन बॅकपॅक घेतली त्याच्या डोळ्यांत तर मी तुला माझी खुप जीवापाड लपलेली वस्तु देतोय असे भाव होते. आता त्या मेकची बॅकपॅक बनवत नाहीत असे त्याने मला सांगितले. मीही त्याला नीट वापरेन हां बॅकपॅक असे आश्वासन दिले. आणि खरंच आज २० एक ट्रीप्सनंतरही ती दणकट बॅग मस्त टकाटक आहे. माझा सगळा संसार त्यात लीलया मावतो आणि माझ्या पाठी, कंबरेशी ती बॅग छान बसते. बॅगेच्या बाहेरही बरेचसे सामान लटकावुन वाहता येते. फोटो पहा (सेल्फी)
backpack.jpg

हा एका जंगलाचा आणि पाणवठ्याचा फोटो.
forest.jpg

water.jpg

बेअर स्प्रे विकत घेतला आणि सगळ्या सुचना वाचुन ठेवल्या. आयत्यावेळी भांबावल्यामुळे प्राण्यांऐवजी स्वतःच्याच तोंडावर स्प्रे मारुन जवळजवळ आंधळी झालेली काही माणसे आहेत. स्प्रे प्रचंड स्ट्राँग असतो. कसा हाताळावा हे नीट शिकणे मस्ट आहे. मी पहिल्यावहिल्या ट्रीपला निघायच्या अगोदर लेकाने चांगलाच पराक्रम केलेला. अगदी किंचीत मारुन बघावा म्हणुन आमच्या लिविंग रुममध्ये आमच्या नकळत स्प्रे केला आणि किचनमध्ये असलेली मी, बेडरुममध्ये असलेला नवरा आणि स्वतः मुलगा खोकुन खोकुन बेजार झालो. वास बाहेर जावा म्हणुन पॅटिओचे दार उघडले तर बोक्याने त्या दारातुन बाहेर धुम ठोकली. एरवी तो कधीच उघड्या दारातुन बाहेर जात नाही. पण त्यालाही वास असह्य झाला असावा. आम्ही खोकतोय, तोंड, डोळे धुतोय, बोक्याला हाकारतोय. सगळा सावळा गोंधळ. नशीबाने शेजारचे बॅकयार्डमध्येच होते, त्यांना बोका त्यांच्या बॅकयार्डमध्ये सापडला. बोक्याचे पण तोंड पुसुन घेतले. लेकाचा चांगलाच सत्कार केला नंतर. रात्री झोपताना मनात नुसती धाकधुक. सकाळी मी लवकरच निघणार होते आणि आज जे काही झाले त्यामुळे मनात संभ्रम निर्माण झालेला की जावे की नाही!

स्टेट, नॅशनल पार्क्स - ३. दे धक्का! - Roxborough

Welcome.jpg
Roxborough State Park हे जवळपास साडेतीन हजार एकराचे पार्क आहे. मी एकदा डे ट्रीपला जाऊन आले होते आणि ट्रेल्सची, मॅप्सची माहिती घेऊन आले होते. तीन मैलाची एक ट्रेल डोंगरमाथ्याशी नेते. ती मी पुर्वी केली होती त्यामुळे तेथुन पाठच्या बाजुने बॅककंट्रीची वाट आहे हे माहित होते. पुढे जंगलातुन साधारण १० मैल आत गेल्यावर एक फाटा येतो. एक बाजु कँपिंग एरिआकडे जाते ( Bear Creek) आणि दुसरी नो कँपिंग एरिआकडे (Waterton Canyon). ही माहिती मॅप पाहुन जमवलेली आणि हीच ट्रीप पहिली बॅककंट्री ट्रीप म्हणुन फायनल केली.

शनिवारी सकाळी निघेपर्यंत ८ वाजलेच. पार्कला पोचेतो ९. वाटेत गरम डोनट्स घेऊन खाल्ले. उगीचंच शुगर आणि कार्ब्स शरिरात असावेत म्हणुन खाल्ले की खरंतर नर्व्हस किंवा स्ट्रेस्ड होते आणि त्यामुळेच खाल्ले असे आता वाटते. मला डोनट्स आवडतच नाहीत मुळात तरी त्या दिवशी मी का खावेत? जियरा बाकबुक होए ,हाये असं चाल्लं होतं.

पार्कच्या प्रवेशदाराशी रेंजर बाई होती. तिने आपले सहज विचारले. काय, कशी आहेस? यावर एरवी हसुन एक ओळीचे उत्तर देणारी मी तिला त्यादिवशी चांगलीच पकवायला सुरुवात केली. मी डोंगर चढणार आहे आणि मग पाठी जंगलात जाणार आहे वगैरे. मला असे वाटत होते की मी हरवेन, मला काहीतरी होईल आणि हिला माहीत असावे. जंगलात फोन नेटवर्क अभावानेच असते. खरेतर कुठलेही पार्क तुमच्या बॅककंट्री प्रवासाची जबाबदारी घेत नाही. एकदा का तुम्ही पार्कच्या आखलेल्या वाटा सोडुन आडवाटेला शिरलात की सगळी जबाबदारी सर्वस्वी तुमची स्वतःची. किंवा रामभरोसे.

नवर्‍याला ट्रेलची आणि साधारण लोकेशनची कल्पना दिलेली होती पण त्याने कधीच पार्कमध्ये पाय न ठेवलेला असल्याने त्याला कितपत कळाले होते देव जाणे. शिवाय घरी त्याच्या आणि लेकासमोर आणलेला शुरवीराचा आव आता उतरत चाललेला. रेंजर बाई जुजबी काळजी घे, पाणी पीत रहा, मॅप, कंपास आहे ना, ऑल द बेस्ट वगैरे म्हणाली. पुढेपुढे मी ती सवयच लावुन घेतली की पार्कमध्ये शिरले की रेंजर ऑफिस किंवा विझिटर सेंटरमध्ये जाऊन आपला प्लॅन कुणाच्या तरी कानावर घालणे. कुणी आपले बोलणे नीट ऐकुन चार शब्द माहितीचे, आधाराचे सांगतो, कुणी नुसताच आपल्या तोंडाकडे "मी नाचु का?" असे भाव घेऊन बघत राहतो पण आपली टकळी चालु ठेवायची. आपल्याला मानसिक आधार मिळतो की कुणा एका कर्मचार्‍याला तरी माहितेय की आपण कुठे जातोय. तसेच गाडी पार्किंगपासुन आपल्या मागे कुणी मुद्दाम तर येत नाही ना, कुणी संशयास्पद दिसत नाही ना हे पण बघत रहावे.

रेस्टरुम वापरुन, पाणी भरुन घेतले आणि ट्रेलकडे निघाले. पाच मिनिटे नाही चालले तर हे महाशय दिसले. पटकन एक फोटो काढला.
Mule Deer.jpg

माझ्या अवताराकडे त्याने एक ३० सेकंद पाहिले, आणि मग सुसाट मागे पळत सुटला. इतकी वाईट दिसत होते का मी?! डाव्या स्ट्रॅपला बेअर स्प्रे लावला आहे पहा. तो असाच चटकन हातासरशी वापरता येईल असा ठेवायचा असतो.
Me.jpg

मागच्यावेळी बिनासामानाचे डोंगर चढलेले त्यामुळे फार भरभर वर गेले होते पण ईथे अर्धा मैल नाही होत तोवर हाशहुश चालु झाले. मधेमधे थांबत साधारण दीड पावणेदोन तासाने वर पोचले. या वाटेत बरोबर आणलेली ताकाची बाटली अक्खी संपली. बरेच झाले, तेवढे च एक ओझे कमी झाले. वरती १० मिनिटे टेकले. फोनला नेटवर्क होते तोवर नवर्‍याला मेसेज केला की अजुन १० मैलांच्या वर प्रवास बाकी आहे. नेटवर्क मिळाले तर परत मेसेज करेन नाहीतर उद्या. त्याने उलट मेसेज केला की दमली असशील तर ये ना घरी परत. लंचला जाऊ मस्त. दुपारी झोप काढु. मी जरा ढेळपाटले. शनिवार दुपारची झोप मला भारी प्रिय हे त्याला चांगलेच माहितेय पण नेटाने नाही म्हणाले. त्याने घरी स्वतःच्या कपाळावर मारलेला हात डोळ्यांसमोर तरळला. काय केले म्हणजे माझे खुळ जाईल हे त्याला कळत नव्हते त्या दिवसांत.

मी जंगलाच्या वाटेला लागले. मगाच्या ट्रेल्वर किमान ४/५ टाळकी तरी दिसत होती पुढे मागे. या वाटेला मात्र अर्धा तास झाला तरी कुणी दिसेना. जमिनीवर बुटांचे ठसेही नव्हते. वाट अगदी अरुंद आणि ओबडधोबड होती. मी चांगलाच वेग घेतलेला चालण्याचा. जरा उतारच होता दरीत त्यामुळे अंतर भरभर कापले जात होते.

Trail.jpg

तास, दीड तास झाला आणि मग आजुबाजुचा परिसर जरा अंगावर येऊ लागला. परत फिरावेसे वाटु लागले. जी दरी उतरुन आले ती परत चढायचा विचारही नको नको होत होता, मग पुढे जात राहिले. भुक लागली होती पण कुठे नीट बसुन खाता येईल अशी जागाही दिसेना. तरी बॅकपॅक काढुन जरा अंग मोकळे केले. आजुबाजुचे आवाज ऐकले. असे म्हणतात की पक्ष्यांचे आवाज नीट ऐकावेत. ते धोक्याची सुचना देतात. तसेच आजुबाजुच्या झाडीझुडपांत नजर टाकत टाकत चालावे. मध्ये मध्ये मागे वळुनही पहावे. माउंटन लायन लाइक्स टु स्टॉक यु बिफोर ही अ‍ॅटॅक्स. बेअर स्टॉक करत नाही तर ते आपल्याच विश्वात मग्न असते. खाणे पिणे शोधत असते, पिल्ले सांभाळत असते. अशावेळी आपल्या येण्याने तेच दचकुन, घाबरुन हल्ला करु शकते. त्यामुळे गाणी म्हणत, काठी आपटत चालावे. म्हणजे ते आपसुकच दुर पळुन जाते. ही सर्व ऐकीव माहिती आता मी अंमलात आणत होते. अगदी मन लावुन गात होते. गाणे कुठले तर "थांबायचे नाय गड्या थांबायचे नाय, दे धक्का". जंगलाचे एक बरे आहे आपण काहीही , कसल्याही आवाजात गाऊ शकतो. अगदी नेक्स्ट बेस्ट टु बाथरुम सिंगिंग. एखादे पाखरु किंवा खारुटली विस्कटते तुमच्या आवाजावर आणी भरकन उडते किंवा पळते सैरावैरा आणि तुम्ही तीनताड दचकता एकदम पण ही तर आपल्याच आवाजाची किमया आहे हे समजले की मज्जा वाटते.

थोडे अजुन चालल्यावर शेवटी एकदाची हवी तशी जागा मिळाली आणि बरोबर आणलेले थोडे खाऊन घेतले. घाईघाईत ब्रेड स्लाईसेस आणि हाताला लागतील ते सॉसेस, डीप्स कोंबलेले बॅगेत. प्रचंड भुक लागली की काहीही गोड लागते त्याप्रमाणे सगळे चट्टामट्टा केले. सनस्क्रीन, लिपस्टीक लावुन जरा फ्रेश झाले आणि पुढच्या पल्ल्याला निघाले. अंदाजे अजुन ६/७ मैल बाकी होते. म्हणजे मुक्कामापासुन बरेच लांब. फोनला नेटवर्क नव्हतेच. पाणी पुरवुन पीत होते कारण पाण्याचा साठा बराच लांब होता.
snack.jpg
Woods.jpg

स्टेट, नॅशनल पार्क्स - ४. 'रात बाकीSS' - Roxborough

paw print.jpg

काही अंतरावर असे ठसे दिसु लागले. पहिल्यांदा माझे लक्ष गेले तेव्हा मी गडबडले. नीट निरखुन पाहिले तरी कळेना की कुठल्या प्राण्याचे पाऊल आहे. अस्वलाच्या पायाइतके मोठे नाही, माउंटन लायन सारखा पंजा नाही मग नक्की कुठला प्राणी ते कळेना. ठसे अगदी फ्रेश वाटत होते म्हणजे सकाळचेच असावेत किंवा अगदी आताचेही. खिशातील शिट्टी काढुन तोंडात धरली. गाणे बंद पडले आणि मनात 'धाव रे मला पाव रे' वाजु लागले. मी अजिबातच आस्तिक नाही पण मनातल्या मनात जप करायची लहानपणीची सवय आपसुकच वर येते कधीकधी. जसे की रोलर कोस्टर राईड. चालु झाली रे झाली की माझा जप चालु होतो.

साधारण पाव मैलानंतर ते ठसे झाडीत गायब झाले. हुश्श केले. सुर्यास्ताआधी पोचुन तंबु ठोकायचा होता. तसा समरमध्ये सुर्य रात्री किमान ८ पर्यंत तरी असतोच त्यामुळे तसा अवधी होता. जंगलात जरा लवकरच अंधारते. काही काही भागांत एवढी गच्च झाडी आहे की भरदिवसाही एकही सुर्याची तिरिप तेथे पोचत नाही त्यामुळे मिट्ट काळोखच दिसतो. लवकरच एका सपाट कुरणासारख्या भागात पोचले. सुंदर हिरवेगार कंबरेपर्यंत वाढलेले गवत आणि गवतावर उमललेली सुरेख फुले. त्यावर अनेक मधमाश्या घोंघावत होत्या. त्या कुरणातुनच छोट्याश्या वाटेवरुन चालु लागले. गवतामुळे गुदगुल्या होऊ लागल्या. माश्यांच्या कामात माझ्यामुळे व्यत्यय आल्याने त्या कानाशी येऊन शिव्या देऊन गेल्या. गवतात, झुडुपांत सापांचे भय असते. मी एव्हाना साधारण ५०००/५५०० फुट एलेवेशनवर असल्याने उंचीवर 'रॅटलस्नेक्स' (आक्रमक आणि विषारी जात) शक्यतो नसतात (असे आपण ट्रेलवर असताना स्वतःला खोटे का होईना, सांगावे). ते कुठेही असुही शकतात, असे निश्चीत काही सांगता येत नाही. बाकी 'बुल स्नेक्स' आणि तत्सम जमाती आक्रमक नसतात. आपलाच चुकुन पाय वगैरे पडला तर चावतात त्यामुळे खाली नीट बघुन चालले होते. हायकिंग पोलही आपटत होते, म्हणजे तेही आपल्या चाहुलीने लांब पळतात.

कुरण संपताच परत चढ लागला. येथे वाटेत एक जाडजुड खोड आणि फांद्या आडव्या पडल्या होत्या की पाडलेल्या होत्या? अमेरिकेत अनेक दंतकथांपैकी 'बिग फुट' ची कथा फार प्रसिद्द् आहे. माहिती नसलेल्यांसाठी सांगते -

Bigfoot, also commonly referred to as Sasquatch, is a purported ape-like creature said to inhabit the forests of North America (विकिपिडिया). याच्या अस्तित्वाचे कुठलेही ठोस शास्त्रीय पुरावे आतापर्यंत मिळालेले नाहीत. मात्र बर्‍याच लोकांचा 'बिग फुट' जमातीच्या अस्तित्वावर विश्वास आहे. असे म्हणतात की त्यांना झाडे रस्त्यात आडवी पाडायची सवय असते. ते झाडे, बांबु अशा पद्दतीने पाडतात की जेणेकरुन क्रॉस डिझाइन तयार होते, ज्याचा अर्थ 'थांबा' किंवा 'नो एंट्री'. तरीही त्यांच्या हद्दीत शिरल्यास ते दगड फेकुन मारतात. 'बिगफुट ने मुले, माणसे पळवल्याच्या कथाही प्रसिद्द आहेत. वाटेतला अडथळा पाहुन माझ्या मनात 'बिगफुट' चाच विचार आला. एक मन मात्र म्हणाले की "तु इतकी भित्री आणि बावळट आहेस ना की तुझे काही काम नाही इथे, घरी बसत जा गपचुप" . पाचेक मिनिटे त्या अडथळ्याचे निरिक्षण करुन तो ओलांडुन निघाले शेवटी. न निघुन सांगते कुणाला? आता वळुन परतीचा रस्ता धरती तर मध्यरात्रीशिवाय काही गाडीपर्यंत पोचत नव्हते मी. शिवाय आपण काही 'बिगफुट' चे वाईट केलेले नाही तर तो कशाला आपल्याला छळेल वगैरे मनाला समजावले.

वाटेच्या दुतर्फा अनेक 'बेरी'ज ची रोपे दिसु लागली. बेरीज अगदी लगडलेल्या. रास्पबेरी खायचा मोह झाला पण हे आपल्यासाठी नसुन इथल्या प्राण्यांसाठी आहे हे स्वतःला बजावले. आणि फोटोवर समाधान मानले. शिवाय 'बिगफुट' चा धाक होताच. टाकली बेरी तोंडात की येईल तो धावत आणि नेईल गचांडी पकडुन.
raspberry.jpg

शहाणी माणसे सांगतात की जंगल हे प्राण्यांचे घर आहे. आपण येथे आगंतुक आहोत. त्यामुळे आपल्यापासुन जंगलाला कमीत कमी त्रास कसा होईल हे बघा ते मी फॉलो करायचा प्रयत्न करते. अनेक इतर पार्क्समध्ये 'Leave footprints, take nothing' तसेच 'Leave no trace' असे फलक पाहिले आहेत.

चढावर पाय, पाठ चांगलीच भरुन आली. कधी एकदा फाटा दिसतोय असे झाले. थांबत थांबत, मग पाय ओढत अशी चालले होते. वाटेत घोड्याची लीद पडलेली दिसली आणि या हू! कधी वाटले नव्हते की horse poo पाहुन एवढा आनंद होईल! आनंद यासाठी की फाटा जवळ आल्याचे ते लक्षण होते. फाट्या पलिकडे Bear Creek भागात कधीकधी घोडस्वार येतात. एका वेगळ्या ट्रेलचा उगम तेथे आहे. ट्रेल पल्याडच्या गावातुन काही हौशी मंडळी घोडयावरुन जंगलात फिरतात. नवीन जोमाने पावले पडु लागली. दिसलाच काही वेळात फाटा आणि आता Bear Creek च्या वाटेला वळाले. मध्येच वाहते पाणी दिसले ते बाटलीत फिल्टर लावुन भरुन घेतले. थोड्यावेळ पाण्यात पाय टाकुन बसायचा मोह आवरला. काळोख पडायच्या आधी मुक्काम शोधायचा होता.

मैलाभराच्या आतच तंबु ठोकण्याजोगी जागा दिसली. नवीन तंबु घरी आला तेव्हा मी बॅकयार्डमध्ये तो मांडायची प्रॅक्टीस केली होती. त्याआधी आम्ही जेव्हाजेव्हा सहकुटूंब, मित्रमंडळींसोबत पिकनीक कंवा ग्रुप कँपिंगला जायचो तेव्हा सगळी पुरुषमंडळीच तंबु उभारायची आणि स्त्रीवर्ग खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत असायचा. का वाटायचे की फार कठीण आहे हे? खरे तर काही कठीण नाही तंबु उभारणे. चांगल्या कंपनीचा लाइटवेट तंबु घेतला तर असेंब्ली मॅन्युअल वाचुन कुणीही ते करु शकतो. मात्र उभारला की लगेच चेन लावुन दार बंद करुन टाकायचे म्हणजे मच्छर, किडे आत शिरत नाहीत. किडे मारायच्या खडुने तंबुभोवती आखुन घ्यायचे किंवा छोटया डिसिन्फेक्टंट स्प्रेने आखावे म्हणजे किडा मुंगी शक्यतो फिरकत नाही वासाने.
tent.jpg

कॉफीसाठी पाणी उकळत ठेवले. सकाळपासुन घातलेला मळका टॉप काढुन जरा बरा घातला आणि फोटो काढला एक. कॉफी पीत पीतआजुबाजुला फिरुन जरा चांगले फेकुन मारण्याजोगे दगड आणि काठ्या गोळा करुन आणल्या. मनाचे समाधान.
selfie2.jpg

सुर्य आता थोड्याचवेळात गुडुप होईल अशी लक्षणे दिसु लागताच, झटपट मॅगी करुन खाल्ली. मॅगीचे भांडे, कप जराश्या पाण्यात विसळुन खाऊच्या पिशवीत बांधले. दात घासुन घेतले आणि टुथपेस्टही खाऊच्या पिशवीत गुंडाळुन झाडावर टांगली. अस्वले नुसत्याच खाऊच्या वासाने नाही तर टुथपेस्ट, फेसवॉश, क्रीम्स, च्युइंगम इ. च्या वासाने सुद्दा आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे ते सगळेही वर झाडावर. तंबुत फक्त स्लीपिंग बॅग, पाणी, फ्लॅशलाइट, पुस्तक वगैरे.

सुर्य अस्ताला गेला आणी हिरवी झाडे काळीकुट्ट दिसु लागली. आकाशात ढगांचे विक्राळ आकार दिसु लागले.. बारकासा आवाजही दचकवु लागला. अभी तो पुरी रात बाकी थी!

स्टेट, नॅशनल पार्क्स - ५. 'आल ईज वेल?' - Roxborough

tent window.jpg

थोडावेळ तंबुच्या जाळीच्या खिडकीतुन बाहेर पहात बसले. दुरवर बारकासा चंदामामा दिसत होता. पक्ष्यांचे आवाज एकदम चिडिचुप झालेले. अगदी शांत, स्वतःचा श्वास नी श्वास ऐकु येईल इतके शांत. तंबुच्या आत काठ्या, दगड, नाइफ, स्प्रे, सगळे शेजारी शेजारी मांडुन ठेवले. गारवा वाढु लागला तसा स्वेटर, टोपी घातली आणि एकुलता एक फ्लॅशलाईट लावुन पुस्तक वाचायचा प्रयत्न केला. दगड काही डोक्यात शिरेना. सगळे विचार बाहेर कुणी आहे का? मला कुणी पाहतेय का? इथे भुत असेल का? सापाला थंडी वाजली तर तो माझ्या तंबुखाली बसायला येईल का? असे काहीही विचार चालु झाले. मग आमिर खान आठवला. छातीवर हात ठेवुन आल ईज वेल, आल ईज वेल पुटपुटले. मोठ्याने गायचीही चोरी आता. रात्री गाऊन उगीच कुणाचे लक्ष वेधु नये. प्राणी हे तंबु फाडुन वगैरे काही सहसा आत घुसत नाहीत. ते काम माणसांचे.

पाय, पाठ चांगलेच दुखत होते. आता जर घरी असते तर केव्हाची बेडमध्ये गुडुप झाले असते पण ईथे झोपावेसे वाटेना. तरी ९.३०/१० च्या सुमारास १ नंबरला जाऊन यावे असे वाटले. तंबुच्या खिडकीबाहेर फ्लॅशलाईट मारला. कलादॄष्टी, कल्पनाशक्ती एव्हाना चांगलीच उफाळलेली असल्याने जिथे लाईट मारावा तिथे काही ना काही दिसु लागले. त्या झाडापाठी कुणीतरी उभे आहे, तिकडे काहीतरी चमकतेय, हलले का काय ते झाड? एक ना दोन. पण बाहेर जाणे भागच होते. बुट घालुन बाहेर पडले आणि संध्याकाळी जी जागा बघुन ठेवली होती तिथे जाऊन कसेबसे काम उरकुन आले. मनात अखंड जप सुरु होता. हातावर, मानेवर शहारुन काटे आले. तंबुत परतल्यावर कसले सुरक्षीत वाटले! हेच माझे घर आणी हाच माझा बेड असं म्हणुन स्व्तःला स्लिपींग बॅगेत कोंबले आणी मॅटवर आडवी झाले. पाठीला आराम मिळाला. फोनवर फोटो पाहत बसले आणि डोळा लागला. डोळा लागायच्या जस्ट आधी एक 'डोळा लागतोय' ही हलकीशी फेज असते. त्या फेजमध्ये झोप लागत असल्याबद्दल दैवाचे आभार मानलेले आठवतेय.

ते आभार कमी पडले असावेत म्हणुन की काय १२.३० च्या सुमारास जाग आली. थंडी वाजत होती आणि तंबुबाहेर जरा लांबुन पापडाचा चुरा करताना येतो तसा आवाज येत होता. बाजुला ठेवलेले एक जास्तीचे लाइट ब्लँकेट ओढुन घेतले आणि आवाज ऐकु लागले. आवाज हळुहळू जवळ येत होता आणि मोठा होत होता. मेल्यासारखी स्तब्ध पडुन राहिले. नवरा, लेक आठवला. म्हंटले, झाले आता मी रडणार. बाहेर जे काही आहे ते मला काहीतरी करणार. आवाज आता कुडुम कुडुम असा खाल्ल्यासारखा येऊ लागला. रॅकुन असेल का? रॅकुन, पॉसम, उंदीर हे रात्रीचे भटकतात. काहीतरी मिळाले असेल त्याला खायला अशी स्वतःची समजुत घातली. झोप पार उडुन गेली होती. कुस वळवायचीही भिती, जे काही आहे ते तंबुकडे यायला नको. शिट्टी वाजवावी का? मग हल्केच शिट्टी वाजवली. आवाज जरा बंद झाला आणि काही सेकंदात परत चालु. मग मला धीर आला. दर मिनिटाला मी हलकी शिट्टी वाजवत राहिले. टाईमपास होऊ लागला, धीर आला. कुस बदलली. डाव्या कुशीवर झोप लागते त्याप्रमाणे साधारण तासाभराने झोप लागली परत. मध्ये एकदा ३ च्या सुमारास थंडीने जाग आल्याचे आठवतेय. जास्तीचे काही पांघरुण शिल्ल्क नव्हते. पायाशी ठेवलेली प्लॅस्टीक शीट झोपेतच वरुन ओढुन घेतली आणी मुटकुळं करुन झोपले. बाहेरचे आवाज ऐकायची शुद्द नव्हती तेव्हा. बाहेर वाघ असो वा वाघाचे भुत, आता मला झोपुदे अशा वैतागलेल्या टिपीकल झोपाळु अवस्थेत होते.

सकाळी लवकरच जाग आली. जेमतेम सुर्योदयाच्या पुर्वीची वेळ असावी. तंबुच्या खिडकीतुन पाहिले, आजुबाजुला असे ठसे होते: कुठला प्राणी येऊन गेला कोण जाणे:
foot print.jpg

लवकरच पक्ष्यांचे प्रसन्न आवाज येऊ लागले. सुर्यकिरणे दिसु लागली. रात्री भयाण दिसलेली झाडे आता किती सुंदर दिसत होती. अगदी छान छान वाटले. काढली बुवा आपण एक रात्र जंगलात, उसमे क्या है! आमिर जाऊन आता सुबोध आला. ताजा ताजा जोश अंगात भरु लागला. रात्री रडवेली झाले होते ते आठवुन आता हसु फुटले. उड्या मारुन मारुन आणि काठी वापरुन झाडावरचे सामान खाली काढले.

थंडी चांगलीच होती. तंबुच्या भागात काही सुर्य अजुन पोचलेला नव्हता. आणि बाहेर दवाची ओल होती सगळीकडे. मग तंबुच्या आतच चहा करत शेकत बसले. फोटो आहे खाली. सकाळच्या अवताराकडे बघुन हसु नये. चहा नाश्ता आणि तंबुबिंबु पॅक करुन झाला की मग आपण तयार होतो नीट केस बिस विंचरुन.

चहा घेतल्यावर मात्र जास्त वेळ न घालवता आवराआवरीला लागले. परतीचा मार्ग धरायला हवा होता लवकरच. नवर्‍याचा जीव घरी टांगणीला लागला असेल त्याला लवकर नेटवर्क मिळवुन मेसेज तरी करणे भाग होते. ब्रेकफास्ट बोल रेडी मिक्समध्ये गरम पाणी घालुन नाश्ता केला. निसर्गाच्या सान्निध्यात खायची मजा वेगळीच असते. समोर स्वच्छ सुर्यप्रकाशाचा नजारा, आजुबाजुला दवात निथळणारी झाडे, किलबिल किलबिल पक्षी आणि हातात गरमगरम खाऊ, अजुन काय पाहिजे. उठु नये असे वाटत होते पण सामान बांधायला घेतले. मॅपवर नजर टाकली. ज्या रस्त्याने परत आले तो साधारण १४/१५ मैलांचा रस्ता किंवा फाट्यावरुन Waterton Canyon कडे जाणारा ९ मैलांचा रस्ता हे दोन पर्याय होते. कालचे गवत, दरया , डोंगर आठवले आणि परत ते सगळे करावे की दुसर्‍या नवीन रस्त्याला जावे कळत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे माझी गाडी Roxborough च्या पार्किंगमध्ये होती. मी जर Waterton ला गेले तर नवर्‍याला तेथे बोलवावे लागेल. आणि साधारण १५ मैल गाडी चालवुन माझी गाडी आणायला उलट जावे लागेल. काय करावे? शेवटी Waterton ने जायचे ठरवले. त्या रस्त्याला फोनचे नेटवर्कही लवकर मिळायची शक्यता होती.

tea_0.jpg

तयार होताना पाठी उतारावर काहीतरी हालचाल जाणवली. चटकन पोल हातात घेतला, स्प्रे कंबरेला लावला आणि निरखुन पाहु लागले. अर्धवट भरलेली बॅकपॅक पाठीला लावली. बॅकपॅकमुळे आपण आहोत त्यापेक्षा मोठ्या आकाराचे दिसतो. जंगली प्राणी हे आपला आकार पाहुन आपल्या बलाचा अंदाज लावतात. त्यामुळे जंगलात फिरताना उगीच ओणवे वाकु नये, खाली बसु नये. कायम उंच उभे रहावे. प्राणी दिसल्यास दोन्ही हातही डोक्यावर न्यावेत. मी वाचलेल्या, ऐकलेल्या काही सुचना अशा आहेतः

1. Stay calm, do not run, scream, or turn your back
2. Make yourself look as large as possible. Open your jacket and hold it over your head or lift your backpack over your head
3. If you have nothing, wave your arms slowly above your head
4. Speak firmly and back away slowly
5. Avoid eye contact (Animal can take it as a challenge)
6. If a bear suddenly appears in your path, give him room to leave. Step off his path. He might just go his own way quietly.
6. Fight back if attacked. Both bears and lions have been driven off by people fighting back.

तर आवाजाकडे पहात उताराच्या बाजुला जरा जवळ गेले तर हा peeping Tom दिसला. असला गोड आणि धीट होता. बरेच फोटो काढु दिले त्याने. त्याला विचारले मी, रात्री तुच आलेलास का रे डँबिस? मवाली कुठला!

Peeping tom.jpg

जेथे मी एक रात्र राहिले, सुरक्षीत राहिले त्या जागेकडे वळून वळुन पाहत तेथुन निघाले. थोडीशी अ‍ॅटॅचमेंट झालीच त्या जागेशी. जाताना खात्री केली की ईथे कुणी राहुन गेले असे बिलकुल वाटता कामा नये. 'Leave no trace'.

पुढच्या भागात Waterton Canyon च्या वाटेची गंमतजंमत.

स्टेट, नॅशनल पार्क्स - ६. 'Beginner's Luck' - Waterton Canyon

सुचना:
तिसर्‍या पॅराग्राफनंतर एक सापाचा फोटो आहे. तसा काही भयावह नाही पण कुणाला पहावत नसल्यास म्हणुन आधी सांगतेय. मला पुर्वी सापांचे फोटो पाहुनही त्रास व्हायचा. मी फेबु, इन्स्टा स्क्रोल करताना सापाचा फोटो दिसला तर फोन फेकुन देते कधीकधी घाबरुन. लहान असताना आमच्या घरी एक प्राणीमित्र यायचा. एकदा त्याने हौसेने एक फोटो अल्बम आणलेला आम्हाला दाखवायला. मी पान उलटल्यावर सापाचा फोटो पाहुन दचकुन अल्बम उघड्या दाराबाहेर फेकुन दिलेला. फारच लाईव्ह फोटोग्राफी होती त्याची. माझी तेवढी नाहीच पण आता निदान थांबुन सापांचे फोटो वगैरे काढण्याइतकी प्रगती आहे.
view.jpg

हा निघाल्यावर एक असाच मागे वळुन काढलेला फोटो आहे. मी रात्री कुठेतरी याच परिसराचा एक छोटा भाग होते याची आठवण म्हणुन.

Waterton Canyon च्या हद्दीत पोचायला अजुन २.५ मैल पार करायचे होते आणि त्यापुढे साधारण ६.५ मैल पार्किंगपर्यंत पोचायला. २.५ मैलांनंतर वाट मोठी मोठी होत जाते आणि Waterton Canyon च्या रस्त्याला लँडस्केप पार बदलतो. झाडी विरळ होत जाते. खडकाळ प्रदेश सुरु होतो. अर्थातच त्या प्रदेशाला अनुकुल असे सरपटणारे प्राणी (सरडे, पाली, रॅटलस्नेक्स) मुबलक दिसतात. सरपटणारे प्राणी आहेत म्हंटल्यावर गरुड पक्षी आलेच, घारीही आहेत. एक मोठी नदी कॅनयनमधुन वाहते आणि तिचा उपयोग करुन घेण्यासाठी तेथे एक धरण बांधले आहे. या धरणातुन डेन्वरच्या काही भागांत पाणीपुरवठा होतो. फार सुंदर परिसर आहे. येथे लोक डॅम पहायला तर येतातच पण त्याचबरोबर सायकलिंग आणि फिशिंगही जोरात चालते. पाण्यात अनेक प्रकारचे खाण्यायोग्य मासे आहेत. जंगलातुन अस्वले येथपर्यंत मासे पकडायला येतात. मी अजुन बरीच लांब होते धरणाच्या पण आता माझ्याकडील पाणी संपत आले होते त्यामुळे पाय भराभर चालत होते. धरणाचे पाणी भरुन घ्यायची उत्सुकताही होती.

वाटेत 'Lenny's Rest' नावाचे स्मारक आहे. स्मारक म्हणजे एक बेंच आणी त्यावर अक्षरे कोरलेली एक लोखंडी पाटी आहे. 'लेनी' नावाचा एक १८ वर्षांचा बॉय स्काऊट त्याच्या ट्रुपबरोबर १९९५ च्या मे महिन्यांत या जंगलात ट्रीपसाठी आला होता तेव्हा एका दुर्घटनेमध्ये त्याने आपला जीव गमावला. नेमके काय झाले त्याची माहिती मला आंतरजालावरही मिळाली नाही. मॄत्युसमयी त्याचा स्काऊट रँक 'Eagle' म्हणजेच highest होता.

Eagle is the seventh and highest rank of Boy Scouts. sequence (Scout, Tenderfoot, Second Class, First Class, Star, Life, and Eagle). (Wikipedia)

वाईट वाटले. हात जोडुन पुढे निघाले. एव्हाना ११ वाजले असावेत.

अचानक माझ्या वाटेवर हा दिसला. पाय लटपटु लागले. पोटात गोळा आला. साधारण तीन फुटच असावा पण माझी चांगलीच तंतरली. ऊन खाण्यासाठी असा बाहेर येऊन पसरला असावा. जारे बाबा, निघ इथुन, मला जाऊदे पुढे. मनात धावा चालु केला. त्याने मला पाहिले असावे, किमान माझी चाहुलतरी लागलीच असावी पण तरीही जायचे नाव घेईना. किंवा तोही मला टरकला असावा आणि मेल्याची अ‍ॅक्टींग करत असावा. पोल हलकेच आपटुन पाहिला तर त्याने जरासे डोके वर केले. माझी********* Fill in the blanks as per your vocabulary.

'तु मेरे सामने, मै तेरे सामने' अशा अवस्थेत पाचेक मिनिटे गेली मग मी बाजुला नीट नजर टाकुन एका उंच दगडावर चढले आणि त्याच्यावर नजर ठेवत ठेवत झाडीतुन सरकत त्याच्या पलयाडच्या दिशेला जायचा प्रयत्न करु लागले. माझी बॅकपॅक झाडीत अडकु लागली आणि पानांचे नुकसान होत होते पण ईलाज नव्हता. कशीबशी पलयाड पोचले. कपाळावरुन घाम गळ्यापर्यंत आला होता. त्याला पाहिले तर तिथेच होता तो, फक्त तोंड माझ्या दिशेला वळवले होते. एवढी मेहनत केलेय तर एक फोटो काढु लेकाला दाखवायला म्हणुन पटकन जमला तसा एक फोटो काढला आणी पळत सुटले. पळता पळता वळुन पाहत होते. आजुबाजुलाही पहावे लागत होते. चांगलीच कसरत झाली. Waterton Canyon चा रस्ता निवडल्याचा पश्चात्ताप होऊ लागला.
snake.jpg

पश्चात्ताप फार काळ टिकला नाही. धरण लागले एकदाचे. धरण जेथे सुरु होते तेथे पाण्यात उतरण्यास मनाई होती, त्यामुळे पाणी भरायला मला अजुन अर्धा मैलाचा रस्ता चालावा लागला. पाणी पिऊन तेथेच टेकले जरा. मधल्या रस्त्यात फोनवर दाणदाण मेसेजेस येऊन आदळले होते. ९०% नवर्‍याचे होते, आदल्या दिवशीचेही होते. एक माझ्या चांगलाच लक्षात आहे, तो म्हणजे की "अलार्म लावुन झोप". याला वाटलेच कसे की मी ढाराढुर झोपु शकेन! जंगलात कधीच अलार्म लावायची गरज नसते!. असो, त्याला मेसेज केला की Waterton च्या पार्किंग लॉटला ये ४ च्या सुमारास आणि काहीतरी खायलाही आण. माझ्याकडचा खाऊ जवळजवळ संपत आलेला. एखादा प्रोटीन बार असावा शिल्लक. आता मन अगदी शांत होते. घरी कळवले होते, गाडीची सोय झाली होती आणि अक्खा कॅनयनचा रस्ता पार करायला ४ तास होते. भरपुर फोटो काढले धरणाचे, प्राण्यांचे आणि स्वतःचेही. एक 'बिग हॉर्न शीप' दिसले. नंतर कळाले की त्यांची भली मोठी जमात Waterton परिसरात आहे. गरुडाचे दर्शन काही झाले नाही. ते फार उंचावर असतात आणि त्यासाठी चांगला कॅमेरा हवा.

Bighorn Sheep.jpg

मायलेकराची ही जोडीही दिसली
mommy's kiddo.png

वाटेत बरेच थांबे घेतले. काही सायकलस्वार, हौशी पब्लीक दिसले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी वाटेवर कुठे कुठे साप दिसले ते सांगितले आणि त्या भागातुन सावधपणे जायला सांगितले. पार्किंगला ४ च्या आतच पोचले. नवरा, लेक आल्यावर फोटोसेशन झाले. गाडीत भरपुर गप्पा झाल्या. ही ट्रीप बर्‍यापैकी सक्सेसफुल झाल्याने मी पुढच्या ट्रीपचे मनोरे रचायला सुरुवात केली पण नवर्‍याने एकच वाक्य ऐकवले की "It could very well have been just a beginner's luck, consecutively and consequently may not always hold ". त्याचे म्हणणे मला तेव्हा पटले नाही पण दोनच आठवड्यात मी त्याचे भाकित खरे करुन दाखविले.

पुढची ट्रीप पुढच्या भागात. नाव असेल,"शुभ बोल नार्‍या".
just kidding, काहीतरी चांगले नाव ठेवेन.

स्टेट, नॅशनल पार्क्स - ७. 'तसं नव्हं, असं'- Golden Gate Canyon

Aspen.jpg
सोमवारपासुन रहाटगाडे चालु झाले. पहिल्या ट्रीपच्या विरहानंतरची घरातल्या आम्हा चौघांची 'तुझ्या गळा, माझ्या गळा' फेज लगेच संपली आणि मला ट्रीपचे वेध लागले. परत सुरु झाले, कशाला ग जंगलात जातेस, थोडी कळ काढ मग सगळेच फिरु मस्त. कोविडकाळात सगळीकडे निर्बंधच निर्बंध होते एक निसर्ग सोडुन आणि मला “तसं फिरायला जायचं नव्हत, असं फिरायला जायचं होतं”. सगळं काही बंद असताना फक्त पार्क्सचेच दरवाजे माझ्यासाठी हात पसरुन उभे होते. मग काय, माझे पुढच्या शनिवारी Golden Gate Canyon State Park ला रहायला जायचे नक्की झाले.

या पार्कमध्ये कधीच गेले नव्हते मी. एवढेच काय, कधी नावही ऐकले नव्हते. गोल्डन गेट म्हंटले की सॅन फ्रॅन्सिस्कोच आठवते. अशा नावाचे पार्क आपल्या कोलोरॅडोत आहे हे वाचुन नवल वाटले. त्यांच्या वेबसाईटवर लगेचच बॅककंट्री कँपिंगची माहिती काढायला सुरुवात केली. हे पार्क साधारणपणे १२००० एकरांचे आहे. Aspen झाडांची विशाल झाडी आहे. वर फोटो दिलाय तेथलाच. ॠतुंप्रमाणे या झाडाचे रंग फार सुंदर बदलतात. पाइन्सही आहेत.
बॅककंट्रीमध्ये शिरायला अनेक ट्रेल्सवरुन वाटा आहेत आणि बॅककंट्री साईट्सचे बुकिंगही ऑनलाईन करता येते. एकुण २० पैकी मला एकुलती एक बॅककंट्री साईट उपलब्ध दिसत होती. मागचा पुढचा कसलाही विचार न करता घाईघाईत ती साईट मी शनिवार रात्रीसाठी बुक केली. हो, हातची जायला नको. मॅपवर ती साईट धड दिसत नव्हती पण लोकेशन साधारण मार्क केले. त्या साईटपर्यंत पोचायला किती माइल चालावे लागेल हा अंदाज बांधला. फक्त साडेतीन मैल वन वे? वॉव, हे तर काहीच नाही असं म्हणुन भारी खुष झाले. पर बाबु, ये तो उडते पंछी के पर गिनने बराबर हुआ. खासकरुन पार्क कधीच पाहिले नसेल तर.

कुणीतरी नक्कीच खो खो हसले असेल तेव्हा.

दुसरी चुक, साईटवर वाचले की काही ट्रेल्सवर सायकल नेता येते. त्यामुळे ही बया बरोबर घ्यायचे ठरवले. हा पहा एका हताश क्षणी बयेचा काढलेला फोटो,
फोटो का काढला याचे उत्तर येईलच पुढे त्या भागात.
 

 cycle.jpg

विचार होता की सायकलवरुन जास्त अंतर कापता येईल. इतर एकदोन ट्रेल्सही करु जमल्यास. इमर्जन्सीला पळही काढता येईल. झालेच तर सामानही सायकलवरुन वाहता येईल आणि फोटोतही छान दिसेल. हो, फोटोत छान दिसायचे काम व्यवस्थित केले तिने.

या पार्कच्या काही काही भागांत शिकारीस परवानगी आहे. परवानाधारी शिकारी बॅककंट्रीत शिकार करु शकतात. अनेक नियम आहेत त्यांच्यासाठी. मला ठाऊक होते की शिकारी लोक हे फ्ल्युरोसंट नारिंगी रंगाचे जॅकेट, कपडे वगैरे घालतात. म्हणजे तसा नियमच आहे. मला हे ठाऊक नव्हते की कोलोरॅडोत एक असाही ठराव पास झालाय की शिकारी फ्ल्युरोसंट गुलाबी रंगाचेही कपडे घालु शकतात. मला कशाला माहीत असेल. मी कशाला शिकार्‍यांसाठीचे ठराव, कायदे वाचु? मी त्या ट्रीपला मस्तपैकी 'ए गुलबदन' क[पडे घालुन गेले नेमकी. ही चुक नंबर ३.

खाली फोटो आहे. या फोटोत मी बरीच निवांत आहे, छान पोझही दिलेय. अज्ञानातले सुख! फोटोच्या पाठी जे बांबु दिसतायत ना ते कुणा शिकारी किंवा ट्रेकरने कधीतरी मुक्काम केला असावा तेव्हा उभारलेले असावेत. या अशा बांबुंवर प्लॅस्टीक टार्प घातले आणि सिक्युअर केले की झाले शेल्टर तयार. मस्त जागा आहे ना! अर्थात मला नक्की हे तेव्हा कळाले नव्हते. तेव्हा मी विचार करत होते की हे बिगफुटचे तर काम नसेल?
posey.jpg

साइटचे बुकींग झाल्यावर 'Cabela' तुन थोडी खरेदी केली. स्टोअरची अ‍ॅन्युअल मेंबरशीपच घेतली ज्यायोगे डिस्काउंट्स मिळतात. विकेंड्सना काही फ्री अवेअरनेस इवेंट्सही असतात मेंबर्ससाठी. कोविडमुळे इवेंट्स बंद होते पण खरेदीला गेल्यावर विक्रेते छान गप्पा मारायचे. नवीन नवीन गॅजेट्सची ओळख करुन द्यायचे. खिशाला कात्री लावली आणि हेड्लँप, फॅनी पॅक, इमर्जन्सी फ्लेअर लाइट्स, काही पिटुकले कुकवेअर, सिलिंडर्स अशी खरेदी केली. कँपिंग आणि हायकिंगचे इतके सुंदर सामान दुकानांत मिळते की मुलांना खेळण्यांच्या दुकानात जसे हे हवे , तेही हवे असे होते त्याचा प्रत्यय येतो.

हेडलँप डोक्यावर घट्ट बसतो. हात रिकामे राहतात आणि काळोखातही कामे करता येतात. फॅनी पॅक फार उपयोगी पडतो. कधी जर सर्व सामान टाकुन पळायची वेळ आली तर फॅनी पॅक मात्र कंबरेभोवती असल्याने आपसुकच आपल्याबरोबर येतो. त्यात बहुमुल्य सामान जसे की एक कप पाणी का होईना पण मावेल अशी प्लास्टीकची बाटली, लायटर, एखादा प्रोटीन बार, झिपलॉकमध्ये आयकार्ड, मॅप, कंपास, लिप बाम, कागद, पेन, वीसेक डॉलर्स वगैरे ठेवते. एमर्जन्सी फ्लेअर लाईट्स हे काळोखात हरवल्यास कुणी आपल्याला शोधत आलेच तर सिग्नल द्यायला उपयोगी पडतात.

आतुरतेने शनिवारची वाट पाहु लागले. मागच्या वेळसारखी बाकबुक नव्हती यावेळेस. सायकल्ची ट्युब, चाके, ब्रेक्स, लाइट्स नीट तपासले. झटाक गुलाबी स्पोर्ट्सवेअर विकत घेतले Dash 1 यावेळेस जरा फक्कड कुकिंग करु असे म्हणुन एक अंडे, मीठ मसाला, कच्चा तांदुळ भरला बॅगेत. सुपची पाकीटे, चहा, कॉफी होतीच. बारकासा कॉफी फिल्टरही घेतला. खायेंगे, पियेंगे, ऐश करेंगे. नवरा आणि लेक चक्क जेलस दिसत होते यावेळेस. काळजीबिळजी दुरच. तरी नवरयाने एक पॉवरबँक आणि 7 in 1 toolkit दिला निघताना तेव्हा बरे वाटले. लेक म्हणाला पुढच्यावेळेस येईन मी बरोबर (ये चिंग्ज और मॅगी के पॅकेट्स बोल रहे थे). आपली मॉम जंगलात मज्जाच करायला जाते असे त्याला एव्हाना वाटु लागले होते. नवर्‍याने नाही म्हणुन लांबलचक मान हलवली. और हम चल पडे!

उद्या ट्रीपला जातेय त्यामुळे पुढील भाग दोन दिवसांनी. हे Golden Gate Park चे काही फोटो देतेयः पार्क बरेच उंचावर आहे. काहीकाही ट्रेल्स १०,००० फुट एलेवेशनवर आहेत. त्यामुळे पाईन ट्रीज असे आभाळाला भिडतात. पाण्याचे साठे अप्रतिम ठिकाणी आहेत. याला गोल्डन गेट नाव का आहे ठाऊक नाही पण येथुन स्वर्गाचे दार नक्की असेल असे वाटत राहते फिरताना.
Golden Gate 1.jpg />
Golden Gate.jpg

स्टेट, नॅशनल पार्क्स - ८. 'कुछ तो गडबड है दया'- Golden Gate Canyon

पार्कच्या वाटेवर एका फुड जॉइंटमध्ये जाऊन पॅक्ड सुशी घेतली. कमी मेसी आणि हेल्दी म्हणुन. शहराबाहेर पडायच्या आधी अशा बर्‍याच टिवल्याबावल्या केल्या. का? तर आज काही जास्त अंतर कापायचे नाहीए तर कशाला घाई. निवांत पेट्रोल भरत, स्टारबक्समध्ये कॉफी पीत अशी चालले होते. शहर सोडले आणि मी अपेक्षा केली नव्हती इतका मोठा घाट लागला. या वाटेवर मी कधी आलेले नव्हते त्यामुळे घाटात गाडी चालवायची आहे ही कल्पना नव्हती. पाठी लावलेली सायकल पडत तर नाही ना हे सारखे आरशात बघत होते. किती वळणे आली आणि गेली. प्रत्येक वळणावर दरीचे रम्य दृष्य होते. मध्ये मध्ये फलक दिसत होता पार्कचा, तो फॉलो करत राहिले आणि पोचले एकदाची.

या पार्कला प्रवेशद्वार असे नाही. विझीटर सेंटरही झाडांत लपलेले आहे त्यामुळे मला दिसलेच नाही. एका फाट्यावर यु टर्न घेऊन परत आले आणि मग मला दिसले ते. आत गेले. कॅम्पसाईट बुक केलेली त्याचा नोंदक्रमांक दिला. ती क्लर्क कुणी टीन कन्यका होती. तिला काही साईट नेमकी कुठे वगैरे माहीत नव्हते. तिने मला एक बॅककंट्री मॅप दिला आणि साधारणपणे कुठल्या कुठल्या ट्रेल्सने ती साईट येईल ते सांगितले. अर्थातच तिच्याकडे अनुभवाचे असे काहीही बोल नव्हते. तिने माझ्या स्पोर्ट्सवेअरवर कॉम्प्लिमेंट्स दिले मात्र. मग आम्ही कुठलया दुकानातुन घेतले, काय काय रंग आहेत, सेल, डिस्काउंट अशा महत्त्वाच्या गप्पा मारल्या. अगदी न्हाव्याच्या दुकानात बसुन माराव्यात तश्या.

विझीटर सेंटरचा परिसर सुंदर आहे. भोवताली एक तळे आहे आणि त्यात रंगीबेरंगी मासे आहेत. फुलझाडे आणि बर्ड फीडर्सही आहेत, त्यामुळे सुंदर सुंदर पक्षी, पिटुकले प्राणीही आहेत. तिथल्या दगडावर बसुन सुशी फस्त केली आणि निघाले. निघण्यापुर्वी तेथे काढलेले काही फोटो पहा. चक्क उडणारा humming Bird पकडला मी फोटोत. फारच खुष झाले स्व्तःवर आणि फोनवर. ससुला आणि खारही आहे फोटोत.

Creatures.jpg

कन्यकेने दाखवलेल्या ट्रेलच्या पार्किंग लॉटमध्ये पोचले. सवयीप्रमाणे आजुबाजुच्या गाड्यांची टेहळणी केली. दोन SUV ट्रक्स होते, पाठची बाजु ओपन असलेले. त्यात अगम्य असे सामान होते. लांबुन पाहुन काही कळत नव्हते की नेमके काय आहे. एक स्पोर्ट्स हॅट घातलेला इसम एका ट्रकच्या साईडने उगवला आणी त्याने माझ्याकडे पाहुन हसुन हात हलवला. अमेरिकेत तसे कुणीही कुणाकडेही पाहुन हसते. त्यात विशेष काही नाही. एरवी मीही शिष्टाचार पाळते पण आजुबाजुचा परिसर पाहुन मी जरा खडुसपणे मान हलवली. नो स्माइल. मनात म्हंटले हा शिकारी असावा, शिकार करुन परत चाललाय की आताच आलाय देव जाणे. मी सायकल काढुन घेतली, सामान बाहेर काढले. तोवर तो गायब झालेला. एक दोन पायी फिरणारे हायकर्सही दिसले म्हंटले चला कंपनी आहे. ट्रेलची वाट ओबडधोबड होती त्यामुळे लगेच सायकलवर बसले नाही. हाताने ओढत नेऊ लागले. जरा बरी वाट आल्यावर सायकलवर बसले पण शरीर आणी बॅकपॅक काही त्या सायकलवर नीट बॅलेंस होत नव्हती त्यामुळे जरा ब्रेक लावला की तोल गेल्यासारखे वाटत होते. खडकाळ वाट आली की सायकल ओढत आणी एरवी ती चालवुन एक दीडेक मैल अंतर कापले असावे. एव्हाना ते दोन हायकर्स कुठे गेले काही कळेना. जंगलात अनेक वाटा फुटतात आणि कुणी कुठल्याही ट्रेलवर जाते. एक फलक दिसला.

Mountain Lion Trail.jpg

फलकानुसार कॅम्पसाईट आता जेमतेम २ मैलांवर होती. फारच खुष झाले. साइन्सनुसार येथे शिकारीही असणार होते. असेना बापडे, मला काय करायचेय म्हणत निघाले. परत सायकलवर बसले. या नवीन ट्रेलवर कुणी दिसेना आजुबाजुला. एका वळणावर काय झाले न कळे जरासा ब्रेक लावला आणि तोलच गेला. मी , बॅकपॅक, सायकल सगळेच आपटलो. डावे कोपर एका दगडावर आपटले आणी सण्णकन कळ गेली डोक्यात. बाकी तळहाताला आणि पोटाला खरचटले. जरासे रक्त आले. धडपडत उभी राहिले. बयेला उभे केले. इंपॅक्टमुळे बयेचे पुढचे चाक डावीकडे वळलेले. प्रयत्न करुनही ती काही माझ्याकडे सरळ पाहेना. आली का पंचाईत? वा़कड्या नाकाची बया आता काही कामाची नव्हती. फोनला नेटवर्क नव्हतेच. काय करावे? उलट्या दिशेने एक कपल येताना दिसले. आता मात्र मी तोंडभर हसुन त्यांना हात केला. मी पडले हे कळताच त्यांना वाईट वाटले. माझी विचारपुस केली. त्यातल्या बाप्याने ठोकुन दाबुन चाक सरळ करायचा प्रयत्न केला. फार तर फार मी ती ओढत नेऊ शकेन पण चालवणे अशक्य आहे या वरआमचे एकमत झाले. पण कॅम्पसाईट आता फारतर मैलभर लांब असेल त्यामुळे मी ओढत न्यायचे ठरवले. कपलही म्हणाले की हो आता तुझी साईट काही फार लांब नाही. सावकाश जा. टाटा बायबाय करुन ते उल्टया दिशेने गेले.

मी कशीबशी दुखर्‍या अंगाने निघाले. बयेला ढकलुन चांगलाच घाम निघालेला. अर्ध्याच्यावर पाणी संपले होते. पाण्याचा स्त्रोतही नव्हता जवळपास. साइटजवळ पाण्याचा ओढा आहे हे वाचले होते. पुढे हा फलक दिसला आणि येथेच माझा घात झाला

Misleading.jpg

याआधीचा फलक परत पहाल तर कळेल का ते. कॅम्प्साईट आणि Quarry हे एकाच दिशेला आहेत असेच वाटते की नाही दोन्ही फलकांची सांगड घातल्यास? पण तसे नव्हते आणि मी Quarry चा टर्न घेतला. फलकानुसार ०.६ मैलाच्या आत कॅम्पसाईट यायला हवी होती पण मी पोचले ते या Dead End ला. तीनचा सुमार होता.

Quarry.jpg

हे धुड चढुन जाणे शक्यच नव्हते. "कुछ तो गडबड है दया!" CID फेम डायलॉग आहे हा. आता एखाद्या शहाण्या डोक्याने परत फिरायचा निर्णय घेतला असता की नाही, पण नाही, मी ठाम होते की साईट इथेच असणार. जरा शोधु आजुबाजुला. ही एक वाट दिसली. हीला वाट तरी का म्हणावे? पायवाटेसारखी मुळीच नव्हती. कधी कधी प्राणी चालुन चालुन ओबडधोबड वाट निर्माण होते किंवा ओढ्याचे पाणी आटले कीही वाट तयार होते, तसलीच असावी. कळत होते पण वळत नव्हते.

Dead end.jpg

अंतर्मनाच्या सुचनाही चुकतात कधीकधी. तेव्हा मला मुक्कामाला पोचायची इतकी घाई होती की मी स्वतःलाच समजावले की याच वाटेने साईट असणार. थ्रील म्हणुन मुद्दाम अशा आड ठिकाणी उभारलेली असणार वगैरे वगैरे. या वाटेन कुच करण्यापुर्वी बयेचे काय करावे हा विचार केला. दुष्काळात तेरावा महिना कशाला आणखी? Quarry पर्यंत आले त्या वाटेवर बयेला सोडायचा निर्णय घेतला. यापुढे तिला ढकलणे शक्य नव्हते. मी पार दमलेले. डावा हात दुखत होता आणि कंबरेची एक बाजुही दुखत होती. जरा मुका मार असावा. तंबु बांधुन जरा फ्रेश वगैरे झाले की बघु, परत येऊ हिला न्यायला असा विचार केला. तसेही या वाटेवर कुणीही नव्हते आणि आलेच तरी वाटेवरचा चोरही नेईल असे काही तिचे रुपडे राहिले नव्हते. निघण्यापुर्वी एक फोटो काढला तिचा , गरज पडल्यास असावा म्हणुन.

वाट चांगलीच गर्द झाडांतुन आणि काट्याकुट्यांतुन होती. पाठी फिरावेसे वाटु लागले. अर्ध्या मैलापर्यंत जर साईट दिसली नाही तर परत फिरायचे ठरवले. या वाटेवर अनेक ठिकाणी, अनेक प्रकारची विष्ठा होती. फोटो आहेत पण टाकत नाही येथे. कुणाला यक्क वाटु शकते. माझ्या animal poop study नुसार मी अंदाज बांधत होते. हे कोल्ह्याचे, हे एल्कचे, हे नक्की कुणाचे? जाउदे. अर्धा मैलभर पोचले आणि तरीही निवारा का दिसेना? वळावे आता, बास झाले. तोच दुरवर एक नारिंगी ठिपका दिसला.

आणि त्या नारिंगी ठिपक्यालाही हा गुलाबी ठिपका दिसला होता.

स्टेट, नॅशनल पार्क्स - ९. 'Once is a mistake,'- Golden Gate Canyon

नारिंगी ठिपका पाहुन थबकले आणि त्याच वेळेस एक जाणीव झाली की सगळे काही चिडीचुप झालेले आहे. भयाण शांतता म्हणतात तसे. एकाही पक्ष्याचा आवाज नाही, झाडीत खारींची सळसळ नाही, काहीच नाही. वाचुन ठाऊक होते की अशी अचानक शांतता जेव्हा पसरते तेव्हा आजुबाजुला काहीतरी धोका असतो. मोठा जंगली प्राणी किंवा पक्षी किंवा अजुन काही. नारिंगी रंगाचा कुठलाच प्राणी इकडच्या जंगलांत नसतो त्यामुळे तो ठिपका म्हणजे शिकारीच होता हे नक्की झाले. पण तो बराच दुरवर आहे तर मग इथे स्मशानशांतता का? नक्कीच प्राणी असावा आसपास. हृदयाचे ठोके वाढले. स्प्रेवर हात गेला. बाजुला नजर गेली तर तेथे ही गुहा दिसली. रिकामीच असावी, संध्याकाळच्या वेळी कधीकधी प्राणी गुहा सोडुन बाहेर पाणवठ्याला जातात. फोटो काढला. कधी जंगलातील गुहा पहायला मिळेल असे वाटले नव्हते.

Den.jpg

हळुच दबक्या पावलाने उलटे फिरायचे ठरवले. जेमतेम ४ पावले पाठी गेले आणि पाठुनच जरा लांबुन 'ठप ठप' असा आवाज येऊ लागला. थांबले आणि ऐकु लागले. पुढचा नारिंगी ठिपका आता जरा मोठा झालेला आणि पाठुन कुणीतरी येत होते नक्कीच. अचानक पाठचा आवाज थांबला. काय करावे. पाठी जायला हिम्मत होत नव्हती. शिकार्‍याच्या दिशेने जाणेच जास्त शहाणपणाचे ठरेल असे वाटुन पुढे सरकु लागले. अगदी सावधपणे. चौफेर नजर टाकुन नारिंगी ठिपक्याच्या दिशेने निघाले. जर ईथे प्राणी असेल तर शिकारीही त्यालाच धुंडाळत असेल का? मी गायला सुरुवात केली. उगीचच काहीतरी हय्या हो हय्या वगैरे. आवाज चांगलाच कापत होता. वीसेक पावले पुढे गेले आणि पाठचा 'ठप ठप' आवाज परत चालु झाला. मागे वळुन पाहिले आणि नारंगी जॅकेट दिसले. आयला, पाठी पण शिकारी? झाडांच्या फांद्यांमुळे मला अक्खा शिकारी दिसत नव्हता आणी तो माझ्यापासुन १०० फुट तरी लांब असावा. मी आता तेथेच उभे राहिले. म्हंटले या पाठच्या माणसाला पास होऊ द्यावे आणि मग आपण आपला परतीचा मार्ग धरावा. पण मी थांबले तसा तोही तेथेच थांबला. पुढचा ठिपकाही झाडीत तेथेच दुरवर थांबलेला. मी पाठी वळुन चालु लागले तसे ते जॅकेटही पाठी पाठी जाऊ लागले. त्याने विचित्र शिट्टी वाजवली. एकदोन पाखरे फडफडली. अगदी संशयास्पद वाटु लागले. हा कुणी स्टॉकर तर नाही? सिरिअल किलर, ट्रॅफिकिंग असे नाही नाही ते आठवु लागले. 'मन चिंती ते वैरी न चिंती'.

धैर्य एकवटुन पाठीच चालत राहिले. जॅकेटही पाठी जात राहिले आणि एका क्षणी तो माणुस वस्स्कनओरडला, "Hey, what are you doing?". मनात म्हंटले हा असा काय. माझ्यावर काय ओरडतोय. तो थांबला वाटेत आणि हातवारे करु लागला. "Move, Move" ओरडु लागला. मी आता नीट पाहु शकत होते त्याला. तो पार्किंग मधलाच स्पोर्ट्स हॅटवाला इसम होता. हा माझ्या मागे आला की काय? मग आला तर असा काय ओरडतोय. काहीतरी करणे भाग होते. मी पण तारस्वरात शिट्टी वाजवली आणि ओरडले, "wait there, stay there!". त्याच्याजवळ पोचले आणि आणि उसने अवसान आणुन विचारले काय प्रॉब्लेम काय आहे? पुढचा संवाद साधारण असा:

H: "Are you hunting?"
Me: "No, I am just hiking the trails." (तोरयातच)
H: "Is that your bike out there?"
Me: "Yes?"
H: "Are you lost?, there's no trail here."
Me: विचार करतेय एकीकडे की याला खरे सांगावे की खोटे? हा कशावरुन माझा फायदा घेणार नाही. "No, I had heard there are campsites here, so came to look around"
H: "No campsites here, its all thick woods"

तेवढ्यात त्याचा वॉकीटॉकी का कायसा डिवाइस होता तो खरखरला. हा बोलु लागला. "No buddy, she is not a hunter. Think she is lost. You stay there. No worries, all good"

तो म्हणाला की पुढे माझा मित्र आहे. तुला बघुन तो थांबलाय केव्हाचा. तु शिकारीला आल्येस असे वाटले त्याला. का? तर तु हे फ्ल्युरोसंट गुलाबी कपडे घातल्येस ना. मग त्याने मला कलर कोड बद्दल सांगितले. मला काही विश्वास बसेना पण जरा हसलो एकमेकांशी पहिल्यांदाच. त्याला विचारले मी की असा दबा धरुन का आलास माझ्या पाठी? तर म्हणे, शिकार्‍यांनी एकमेकांत किमान ७५ फुट अंतर राखायचे असते. तुला काहीच ठाऊक नाही? मी शिट्टी पण वाजवली पण तु काही रिस्पॉन्स दिला नाहीस म्हणुन कन्फ्युज झालो. मला मनात हसु येत होते आणि घोर अज्ञानाची शरमही वाटु लागली. परत मध्येमध्ये त्याचा मित्र खरखर खरखर करुन त्याच्याशी बोलु पाहत होता. माझ्या गोंधळामुळे त्यांचा चांगलाच वेळ घालवलेला मी. कदाचित त्यांचे टार्गेटही एव्हाना पसार झाले असेल कारण जंगलातील आवाज पुर्ववत झाले होते. मी तेथुन सटकायचे ठरवले, म्हंटले सॉरी, निघते मी, बाय. तो म्हणाला की कॅम्पसाइट शोधतेयस का रात्रीसाठी? माझा खडुसपणा जागृत झाला, म्हंटले नाही आता पर्किंगला जाऊन घरीच जाणार डायरेक्ट. थेट घरी चालली मी (आर्ची फेम). याला कशाला सांगा उगीच माझा प्लॅन. अशा प्रकारे त्यांच्या शिकारीचा चांगलाच विचका करुन तेथुन निघाले. तो त्याच्या मित्राशी बोलतबोलत त्याच्या मार्गाने निघाला. दोघांनी मिळुन नंतर मला चांगलयाच शिव्या घातल्या असणार.

बाहेर सायकलजवळ पोचले तेव्हा ढगाळ हवा होती. सुर्यास्त होईलसे वाटु लागले. कॅम्पसाईट शोधावी का खरेच पार्किंगला जावे या संभ्रमात सायकल घेऊन रेटु लागले. जरा मनाने खचले होते. परत त्या फलकापाशी पोचले जेथे Quarry चा टर्न घेतला होता. आणि क्लीक झाले की काय चुकले ते. क्लर्कने दिलेला मॅप परत नीट पाहिला आणि खात्री वाटु लागली की दुसर्‍या दिशेने नक्कीच कॅम्प्साईट मिळेल. पार्किंगच्या दिशेने तंगडतोड करण्यापेक्षा हा चान्स घेऊन पाहु. फार तर अजुन अर्धा तास नाहीतर मग जाऊ परत. "Once is a mistake, twice is a choice"

यावेळेस मात्र माझा अंदाज खरा ठरला. अर्ध्या मैलभरातच कॅम्पसाईटचे फलक दिसले. कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. तंबु उभारायची ताकद नव्हती. अंग दुखत होते, मुका मार बोंबलत होता आणि मानसिक थकवाही खुप होता. शिकारयाशी पार्किंगमध्येच नीट बोलले असते तर त्याने तेव्हाच मला गुलाबी रंगाबद्दल सावध केले असते असे राहुनराहुन वाटत होते. खडुसपणा चांगलाच नडला.

असो, तंबु उभारण्याआधी दगड मांडुन स्टोसाठी आडोसा केला. उथळ ओढ्यातुन पाणी आणले, ते चांगले उकळवुन सुप आणि कॉफी बनवली:

cooking.jpg

फर्स्ट एड किट काढुन हाता, पोटाला बँडेड लावले. तंबु उभारला आणि सगळ्यात आधी ते भडक गुलाबी कपडे बदलले. मुक्या मारावर औषध चोळले. अगदी त्रागा त्रागा झालेला जीवाचा. आकाशात अंधारु लागलेले, ढगाळ हवेमुळे सुर्यास्ताची नेमकी वेळ कळेना. मध्येच एखादा ढग गडगडत होता. बिचारे शिकारी! त्यांना दुसरे सावज गावले असेल का? जो प्राणी माझ्यामुळे वाचला तो रात्री मला थँक्यु म्हणायला येईल का? मी पाहिलेली ती गुहा येथुन जेमतेम दीड मैलांवर होती आणि आजुबाजुला अश्या अजुन गुहा असण्याची शक्यता होतीच. दगड, काठ्या जमवायला मी सुरुवात केली. शिट्टी गळ्यातच अडकवुन ठेवली. फोन झाडावर ठेउन एक फोटोही काढला

ye mera ghar.jpg

शारिरीक आणि मानसिक रिकव्हरीसाठी शांत झोपेची नितांत गरज होती आज. पण बादल नुसतेच गरजु नव्हे तर बरसुही लागलेले आता.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १०. 'बुंदों से बाते'- Golden Gate Canyon

सुप आणि कॉफी पिऊन तरतरी आली. पाऊस पडु लागला तसा एका झाडावर प्लास्टिक ओढुन जरा आडोसा तयार केला आणि दगडावर पाऊस पहात बसले. सुरुवातीला पावसाचा वैताग वाटला. डोंबिवलीत मोठे झालेले कधी पाऊस एंजॉय करतात काय? डोंबिवलीकरांचा पाऊस म्हणजे वैताग, आणि चिखल एवढेच. शिवाय माझ्या फक्कड कुकिंग प्लॅनचे बारा वाजले. बरोबर आणलेले तांदुळ, अंडे, मीठमसाला आता काही उपयोगाचे नव्हते. या पावसात काहीही शिजवणे नको वाटले. नुसतेच भांडेभर पाणी उकळुन ठेवले. रेडीमिक्स खाऊ जरा वेळाने म्हणुन. कोलोरॅडोचा पाऊसही नुसता गारेगार असतो. बर्फाचे पाणी पडावे असा.

थोड्या वेळाने मात्र उमगले की हा पाऊस उबदार आहे. असा स्वच्छ हिरवागार पाऊस आपण कधीच पाहिलेला नाही! आ करुन प्यावे इतके स्वच्छ पाणी! तसेच पावसात प्राणीही आडोसा घेऊन गप राहतात त्यामुळे प्राण्यांचेही भय नाही. सध्यातरी. मग हा पाऊस एकदम आवडून गेला. काळोख पडु लागला तसे सामान आवरायला घेतले. तंबु, स्लीपिंग बॅग गार होऊ लागलेले. अंगात गरम कपडे घातले.

साईटपासुन साधारण १०० फुट लांब हा 'बेअर बॉक्स' होता. रात्री यात सगळे अन्न, क्रीम्स, खरकटी भांडी वगैरे ठेवुन लॉक करायचे असते. एका विशिष्ट प्रकारचे हँडल असते याला जे कुठल्याही प्राण्याला उघडता येणार नाही. माझी झाडाला पिशवी टांगायची कसरत वाचली यावेळेस. फोटो निघायच्या वेळेस काढलाय.

Bear Box.jpg

सर्व सामान यात लॉक करुन तंबुत परतले. एव्हाना पाऊस ओसरलेला. नऊ साडेनऊला आडवी झाले आणि एक पेन किलर घेतलेली असल्यामुळे की काय न जाणो पण झोप लागली. झोपेत विचित्र स्वप्ने पडत होती. मला एरवीही पुष्कळ स्वप्ने पडतात पण ही जरा जास्तच विचित्र होती. साधारण चार साडेचार तासांनी जाग आली. 'खुडबुड खुड्बुड!'. बाहेर काहीतरी होते. मी जेथे स्टोसाठी दगडाचा आडोसा मांडलेला तेथुन आवाज येत होता. तंबुची खिडकी किलकिली उघडुन पाहिले तर काही दिसत नव्हते पण आवाज चालुच. मी जे काही झोपायच्या आधी शिजवायचे त्याचा वास रेंगाळत रहात असावा आणि त्या वासानेच प्राणी आकर्षित होत होते. मग काय, बसले फ्लॅशलाइट घट्ट पकडुन आणि जप करत. रात्र जागवणार हा प्राणी म्हंटले. बिगफुटची बिलकुलही भिती वाटत नव्हती यावेळेस. दिवसभर माझे झालेले हाल त्याने पाहिले असतीलच. याउप्पर तो काही मला छळायला यायचा नाही. तेवढा नक्कीच चांगला असेल तो.

पण परत पाऊसच मदतीला धावुन आला. पावसाची रिपरिप सुरु झाली आणि थोड्यावेळाने खुडबुडही बंद झाली. खिडकीबाहेर पाहिले तर छान चांदणे होते. आकाश उघडत होते. एक पाय हळुच तंबुबाहेर टाकला. चारही बाजुने लाईट मारला. ऑल क्लीअर. दुसरा पायही बाहेर टाकला आणि उभी राहिले. डोळे हळुहळु अंधाराला सरावले आणि चांदणप्रकाशात आजुबाजुचा परिसर दिसु लागला. आडोशाला १ नंबरला जाऊन आले आणि झोपले परत. आता जी उठले ती चांगली उन्हे आल्यावरच. साईट मस्त उंच भागात बांधलेली होती त्यामुळे सुर्याची पहिली किरणेही येथे पोचत होती.

फ्रेश वाटत होते. चहा केला आणि निवांत फिरत फिरत प्यायले. बरोबर आणलेले एकुलते एक अंडे सत्कारणी लावले:

breakfast.jpg

छान आवरुन सामान पॅक केले आणि 'Windy Peak' पाहुन यायचे ठरवले. येथुन फक्त २ मैलांवर होता तो पॉइंट. सामान, सायकल साईटवरच ठेवले. फक्त फॅनी पॅक आणि एक लहानशी सॅक घेतली. तासा, दीडतासात परत येऊ आणि मग लागु परतीला.

Peak ची वाट खुप सुंदर आहे. आजुबाजुला अनेक फळांची झाडे दिसली. नावे ठाऊक नाहीत मात्र रंग खुप सुंदर आहेतः

fruits.jpg
fruits 1.jpg

cross.jpg

तीसरा फोटो नीट पाहिल्यास दिसेल की लाकडे क्रॉस डिझाईनमध्ये आहेत. असे ठीकठीकाणी बिगफुटची आठवण करुन देणारे नमुने दिसतात. एवढ्या ट्रीप्सनंतर माझा त्या आख्यायिकेवर थोडा विश्वास बसु लागलाय. भरदिवसाची वेळ असल्याने उत्साहात भरभर Peak ला पोचले. परतीच्या वाटेवर काही हायकर्स भेटले. माणसांत आल्यासारखे वाटले. साईटवरुन सामान घेऊन पार्किंगकडे निघाले. परतीचा प्रवास छान झाला. काहीही अडचण न येता घरी पोचले.

मोडलेली सायकल, बँडेड पाहुन घरच्यांना बरेच काही कळाले. जे नाही कळाले ते आळीमिळी गुपचिळी!

त्या रात्री झोपताना विश्वास बसेना की आपण हे सगळं करुन सुखरुप घरी आलोय. मऊमऊ पांघरुणात शिरुन जंगलाच्या आठवणींची उजळणी करण्याचा एक वेगळा 'मझा' असतो. आता हे काही थांबणार नाही हे मनाने नक्की केले.

नवीन पार्क, नवीन भागात :)

स्टेट, नॅशनल पार्क्स - ११. 'भातुकली ते शिमगा'- Chatfield & Staunton

Staunton State Park ट्रीप करण्यापुर्वी लेक मागे लागलेला म्हणुन मी लेकाबरोबर Chatfiled State Park ची ट्रीप केली. त्याबद्दल थोडक्यात लिहिते.

View.jpg

आधीच्या एका भागातल्या Waterton Canyon मधुन जी नदी वाहते ती आणि अजुन दोन लहानश्या नद्या या पार्कमध्ये एकत्र येतात आणि त्यामुळे चॅटफिल्ड स्टेट पार्कमध्ये एक मोठे तळे तयार झाले आहे. या तळ्यात मासेमारी, बोटिंग, पॅडलबोर्डिंग, कायाकिंग वगैरेस परवानगी आहे. साहजिकच हे पार्क लहान मुलांचे आवडते ठिकाण आहे. लेकाला माझ्याबरोबर कँपिंगला यायचे होते त्यामुळे मी हेच पार्क निवडले. येथे RV (Recreational Vehicles) घेऊन मंडळी दिवसेंदिवस राहतात. त्यासाठी वीजजोडणी असलेले कॅम्पसाईट्स असतात. सुसज्ज बाथरुम्स, न्हाणीघरे, वॉशिंग मशिन्सही आहेत.

मोठे जंगली प्राणी जवळपास नाहीतच. हरणे, कायोटीज, ससे, क्वचित सरपटणारे प्राणी दिसतात. ट्रेल्सही साध्यासुध्या लहान अंतराच्या आहेत. मात्र परिसर फार सुंदर आहे. सायकलिंग, घोडस्वारीही करता येते. सुर्यास्तावेळी घोड्यांच्या सफरी असतात. पैसे भरुन त्यांच्याच घोड्यावरुन गाईडसोबत फिरता येते. हा एका ट्रेलचा फोटो:

Trail_0.jpg

थेट कॅम्पसाईटपर्यंत गाडी नेता येते त्यामुळे हवे तेवढे सामानही न्यायची मुभा आहे. पंखा, कुलर, अंथरुण, पांघरुण, मोठा फॅमिली टेंट, सायकली, टोस्टर, राइस कुकर! कँपिंग कसले, पिकनीकच झाली ती. पण मज्जा आली. तंबु उभारणे, शेकोटी करणे, चुलीवरचा स्वयंपाक, चहा, कॉफी, ऑम्लेट, कँपिंग बेसिक्स वगैरे लेकाला शिकवले. त्याला भातुकली खेळल्यासारखे वाटले. दोघांनी मिळुन चुलीवर चिकन भाजले, राइस कुकरमध्ये नुडल्स शिजवल्या. डेझर्टसाठी स्मोर्स शेकले.

रात्री जागुन अंधाराची, शेकोटीची मजा घेतली. रात्रीच्या मिट्ट काळोखात कंदील घेऊन रेस्टरुममध्ये गेलो. कॅम्पसाईटपासुन रेस्टरुम्स दहामिनिटाच्या अंतरावर होत्या. येताजाताना मीच विचीत्र आवाज काढुन लेकाला घाबरवले. रात्री भुताखेताच्या गोष्टी सांगितल्या. दुसर्‍या दिवशी पॅडलबोर्डिंग केले. पॅडलबोर्ड्स आणि पॅडल्स भाड्याने मिळतात. थोडावेळ सायकलवरुन फिरुन हरणे पाहिली. दमलो तसे परतीला लागलो. लेकाचे समाधान झाले आणि उरलेल्या सीझनपुरते त्याने घरी गप्प बसणे निवडले.

chatfield.jpg

तर हे असे लुटुपुटु कँपिंग झाले आणि मग पुढच्या आठवड्यात मी निघाले Staunton State Park ला. या पार्कला स्टेट पार्क हा शिक्का २०१३ मध्ये मिळाला. तत्पुर्वी ही सर्व प्रायवेट प्रॉपर्टी होती. आता पार्कचा एरिआ जवळजवळ चार हजार एकरांचा आहे. त्यापल्याडही जंगल आहेच पण ते स्टेट पार्कच्या हद्दीत येत नाही. शेकडो वर्षांपुवी येथे नेटीव अमेरिकन्स (Indigenous Americans) रहात होते आणि एक डॉक्टर जोडपे वर्षांतुन काही महिने येथे चक्कर टाकुन त्या नेटीव्हसना वैद्यकीय सेवा पुरवत असे. या जोडप्याने येथे एक होम्स्टे (homestead) उभारले होते.

विसाव्या शतकात कधीतरी जंगल विभागाचे काही अधिकारी, कर्मचारीही येथे मुक्कामास होते. त्यांचीही घरे, वर्कशॉप्स आहेत जी आता मोडकळीला आलेली दिसतात. पार्कचा बराचसा भाग गच्च हिरवागार आहे. पाइन्स आणि अ‍ॅस्पेनची झाडे मुबलक आहेत. दुरवर बर्फाच्छादित शिखरे दिसतात.

Staunton.jpg

पार्कमध्ये साधारण १०/१२ मैलांवर खोल जंगलात एक धबधबा आहे असे ऐकले होते. तेच टार्गेट हाइकसाठी निश्चीत केले. पार्कचा मॅप वाचुन धबधब्याला जाणारया ट्रेल्स पाहुन ठेवल्या. बाकी नेहमीप्रमाणे इतर तयारी होतीच. आता मी बरेचसे कँपिंगचे सामान गाडीच्या ट्रंकेतच ठेऊ लागले होते. अन्न सोडले तर बाकीचे सामान, अगदी गरम कपड्यांसकट कायम गाडीतच असायचे त्यामुळे कुठेही कॅम्पिंगला निघायचे की झट की पट निघु शकत होते. तर त्या शुक्रवारीच कामाला अर्धा दिवस दांडी मारुन निघाले.

या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे कॅम्प्साईट्स पार्किंगपासुन अगदी पाव मैलांच्या आत आहेत. म्हणजे फारशी तंगडतोड करावी लागत नाही. एकदा का बस्तान बसवले की आपण भटकंतीला मोकळे. पार्क उंचावर आहे आणि कॅम्पसाइट भोवती पाइन्सचे भलेमोठे वृक्ष आहेत. माझ्या कॅम्पसाइटवर मी पोचले आणि तेथे बाजुलाच हे असले दृश्य दिसले: कुणीतरी फस्त केलेली शिकार आणि मागे उरलेली हाडे. या हाडांसाठी कुणी रात्रीचे यायला नको म्हणुन मी ती हाडे उचलली आणी दुरवर नेऊन टाकली.

bones.jpg

सगळे आवरुन झाले होते. जेमतेम ३ वाजले होते आणि त्यामुळे मी एखादी ४/५ मैलांची हाइक करायची ठरवले आणि निघाले. धबधब्याची मोठी हाइक दुसर्‍या दिवशी असणार होती. खरेतर मी त्या संध्याकाळी नुसताच आराम करायला हवा होता पण काय तो अति उत्साह आणि फाजील आत्मविश्वास! निघालेच कडमडत.

आता हल्ली हल्ली तर मला वाटते की ट्रीप्स नीट सरळमार्गी झाल्या तर मलाच मज्जा येत नाही आणि म्हणुन मी असे वाबरट निर्णय घेते. सुखाचा जीव धोक्यात. अशा निर्णयांचा कितीही त्रास झाला तरी जे काही पाहायला मिळते, अनुभवायला मिळते त्यासाठी अशा अनेक चुका माफ!

स्टेट, नॅशनल पार्क्स - १२. 'Only the paranoid'- Staunton

Woods_0.jpg

ट्रेलवर निघाले तेव्हा उन्हे जरा कलली होती. सुर्यास्ताची वेळ ७.३० होती त्यादिवशी. म्हणजे मुक्कमास परतण्यास ४ तास तरी होते सहजच. ट्रेल म्हणजे एक लुप होते. डाव्या बाजुने वर डोंगरावर जाऊन मग उजव्या बाजुने दुसर्‍या ट्रेलवरुन परतीचा उताराचा रस्ता असणार होता. छोटी सॅक, त्यात थोडासा खाऊ, पाणी घेऊन निघाले. वाटेत हा फोटो काढला मी कारण जी हिरवळ दिसतेय ना फोटोत ती अगदी गालिच्यासारखी वाटली, मऊ मखमली! अगदी सुखद स्पर्श होता तिचा.

जरा पुढे गेले तर हे पहा काय दिसले. कसला ब्लेंड झालाय तो त्या परिसरात. अगदी डोळे चोळुन चोळुन पाहिले की नक्की हा प्राणीच आहे की पुतळा? याला Buck Elk म्हणतात. Buck म्हणजे हरिण, एल्क, आणि तत्सम प्रजातींमधला नर. पठ्ठ्या ढिम्म हलत नव्हता. मीही फार जवळ गेले नाही. हे जर आक्रमक झाले तर ती जी वर दोन फुटांची शिंगे दिसतायत ना ती पोटात खुपसुन कोथळा काढु शकतात. त्यामुळे हरिणाशी जसे आपण लाडेलाडे बोलत बसतो तसे न करता यांना लांबुन नमस्कार करुन कल्टी मारावी.

Buck Elk.jpg

चढ जरासा दमवत होता पण फार सामान नसल्याने तसा त्रास नव्हता. शिवाय यावेळेस एक मोठा दिलासा होता की आपला कॅम्प खाली ऑलरेडी मस्त सेट झालाय. ट्रेल संपवुन खाली पोचले की नुसता आराम!
एका वळणावर हा/ही तारस्वरात ओरडत होती. टिटवीसारखे ओरडणे असते या पक्ष्याचे पण जरा भेसुर. तो काहीतरी मला सांगु पहात होता का? न कळे. पुढे पाणवठ्याची जागा होती आणि कुणीतरी एक फळकुट मांडले होते. त्यावर बसुन पेटपुजा करु लागले. साधारण ५.३० ची वेळ असावी.

bird.jpg
snack_0.jpg

आणि झाडामागे एक डोके दिसले. फोटो काढला आणि ते काय आहे हे लगेच कळाले. गर्भगळीत अवस्था म्हणजे काय हेही कळाले. थरथरत्या हाताने डबा बाटली सॅकमध्ये कोंबली आणि स्प्रे हातात घेतला. स्प्रे कधीच उगीचच फवारायचा नसतो. प्राण्याने हल्ला केला तर आणि तरच. मला एक दोन क्षण स्प्रेचे तोंड कुठे हेही आठवेना, चांगलीच भंबेरी उडाली. काय ही दुर्बुद्धी झाली मला या ट्रेलवर येण्याची! आता काय होईल! खाण्याच्या नादात गाणी गायचे, पोल आपटायचे राहुनच गेले होते. माणुस complacent झाला की संपले. एरवी मी जितकी जागरुक असायचे, यावेळेस तेवढी राहिले नाही आणि काळ हा बेसावध क्षणीच बाके प्रसंग पेरतो. ती काहीशी म्हण आहे ना इंग्रजीमध्ये:

"Success breeds complacency. Complacency breeds failure. Only the paranoid survive"

Capture.JPG

उंच उभी राहिले आणि मुख्य वाटेपासुन लांबच होते पण तरीही जरा पाठी सरकले अलगद. त्याने माझ्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले आणि जरा पुढे आला. तो वाटेतले, आजुबाजुचे दगड पंजाने उलटवत होता आणि काहीतरी चाटत होता. दगडाखाल्चे किडे असावेत बहुधा किंवा शेवाळे. आपण कुरमुरा उलटावा तसा तो दगड उलटवत होता. त्याच्या पंजाची ती ताकद पाहुन एक कळले की हा मला पण फुटबॉलसारखे सहज आडवे पाडु शकतो. मुंगीच्या पावलाने पाठी पाठी सरकत राहिले. तो अक्खा दिसला तेव्हा जीव मुठीत धरुन एक फोटो काढलाच. अजुन पाठी सरकावे तर पाणी आणि चिखल होते. ट्रेलवर तर हा उभा होता मग काय करावे?

Bear first.jpg

पाण्यात पाय टाकुन उलटी उलटी चालत चिखलात पोचले. लांबुन ट्रेल्वर नजर होतीच आणि अजुन एक शॉक बसला. अस्वल ट्रेलवर उलट्या दिशेला वळले होते आणि एका झाडाकडे वर मान करुन बघत होते. 'तो' नाही 'ती' आहे आणि पिल्ले झाडावर चढुन बसलीयत. ३ काळे गोळे दिसले. राम राम! पिल्ले जवळपास असली की अस्वल विनाकारणही चांगलेच आक्रमक होऊ शकते हे वाचले होते. भितीने ठार मेले.

Bear.png

Cub.png

वर झाडावर जे काळे आहे ना ते cubs . अजुन जवळुन फोटो काढुन शहीद व्हायचे नव्हते त्यामुळे आहे तो फोटो गोड मानुन घ्या. पिल्ले झाडावरुन वर खाली पळत होती. कसली भरभर चढतात ती! विडिओ करायचा अतोनात मोह झाला पण ती माता माझ्यावर नजर ठेवुन होती आणि मलाही तिच्यावर सावध नजर ठेवणे भाग होते. पिल्लांना पाणी प्यायचे असावे आणि माझ्यामुळे ती त्यांना परमिशन देत नसावी, असा माझा आपला अंदाज. प्रचंड गोड दृष्य समोर आणि धड त्याचा आस्वादही घेता येऊ नये? एक बारका विडिओ केलाच. त्या विडिओतला एक फोटो क्रॉप करुन टाकतेय पिल्लाचा. विडिओची लिंक जमल्यास देते उद्यापर्यंत.

Cub2.png

पहिल्यांदाच cubs बघितल्याचा सुक्ष्म आनंदही होत होता. आणि टरकलीही होती. काळोख पडायच्या आत डोंगर उतरायचा होता. बचेंगे तो खुब याद रखेंगे. भावनांची सरमिसळ चालु होती. तिच्या डोक्यात काय चालले होते? माझा परतीचा रस्ता तर तिनेच अडवलेला.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १३. 'भित्यापाठी ब्रम्हराक्षस'

एक विडिओ अपलोड केलाय बारका:

https://youtube.com/shorts/583fw-sVAtk?feature=share

उभी होते त्यापेक्षा पाठी सरकणे मला शक्य नव्हते. पाठी जंगल होते. ती झाडाखाली फेर्‍या मारत होती आणि पिल्ले सतरा वेळा झाडावरुन खाली उतरत होती. ती काहीतरी त्यांच्या भाषेत त्यांना सांगत असावी, "खबरदार खाली उतरलात तर, तंगडं तोडेन" आणि ती पिल्ले वांड मुलांसारखीच तीला जुमानत नव्हती. सगळी फौज आलीच पाण्याकडे. आता माझ्यापासुन ते जेमतेम १०/१२ फुट लांब होते. मी पाहत होते. पिल्ले पाणी पिण्यापेक्षा त्याचा खेळ जास्त करत होती. पाठीवर लोळण घेत होती. एकमेकांना पंजे मारत होती. त्यांची आई माझ्यावर नजर ठेवुन होतीच पण पिल्लांनाही ढकलुन स्वतःच्या कक्षेत ठेवत होती.

डिस्कव्हरी सारख्या चॅनलमध्ये पाहिलेले दृष्य माझ्यासमोर होते आणि मी पार टेन्शनमध्ये होते. फोनही खिशात सरकवलेला. इतक्या जवळुन फोटो काढती तर कदाचित तिला रुचले नसते. माझ्या हालचालींनी ती कदाचित माझ्या अंगावर धावुन आली असती आणि तिच्यावर, तिच्या गोंडस बाळांवर स्प्रे मारण्याची वेळ माझ्यावर कधीच येऊ नये अशी मी प्रार्थना करत होते. मी ते करुच शकले नसते.

त्यांचा चिखलातला खेळ पहायला फार गोड वाटत होते. एखादे पिल्लु उचलावे आणि अगदी आवळुन चिवळुन लाड करावेत असे फार वाटत होते. लुटुलुटु लोकरीचे गुंडे! एक गुंडा दमला आणी दगडावर पसरला. बाकीचे दोन त्याला ढुशा मारत होते. आई दगड उलटुन खायला शोधत होती. काळोखाची लक्षणे दिसु लागली. दाट जंगलात लवकर काळोख होतो. मला चिंता वाटु लागली. ही फौज कधी निघणार आणि मी खाली केव्हा पोचणार? अस्वलांच्या झोपायच्या छान जागा असतात जंगलात. जमिनीत खड्डा करतात किंवा एखाद्या गुहेत झोपतात. विशेषतः cubs असतील तर नक्कीच ते असेच कुठेही उघड्यावर झोपत नाहीत. त्यामुळे कधीतरी ही फौज जाईलच या आशेवर होते.

फायनली दोन पिल्ले झाडांआड पळाली पण एक झाडावर चढले. त्याने खाली उतरायला जो वेळ घेतला त्याने माझा पेशन्स संपलाच. मी अस्वल असते तर झाडावर चढुन चांगला फटका दिला असता पण त्याची आई कुल होती. ती झाडाखाली दगड उलटत राहिली. हा विडिओ पहा. वर पिल्लु आहे आणि खाली झुडुपाआड त्याची आई.

https://youtube.com/shorts/Tip03xzst2k?feature=shares

ट्रेलचा मार्ग माझ्यासाठी अजुनही बंद होता. अंधारु लागल्यामुळे बाकीचे दोन cubs नेमके कुठल्या झुडुपात आहेत हे कळत नव्हते. मी काही ट्रेलवर जाण्याची रिस्क घेणार नव्हते. काही वेळाने झाप झाप उड्या मारत आई जंगलात पसार होताना दिसली. झाडावरही बराचवेळ काही हालचाल दिसली नाही. हुश्श! तरीही पाचदहा मिनिटे थांबुन मग निघालेच माझ्या वाटेला. हो, दुसरे कुणी यायचे नाहीतर पाणी प्यायला.

आता अर्ध्या वाटेत मला नक्कीच दाट काळोख लागणार होता. डोंगर उतरायचे आव्हानच वाटु लागले. एकाजागी उभे राहुन पाय आखडले होते आणि हायकिंग बुट भिजल्यामुळे जरा जड झालेले. सॅकमधला हेड्लॅम्प काढुन डोक्याला लावला. आता गाणी गाणे भागच होते त्यामुळे शक्य तेवढा आरडाओरडा करुन गाऊ लागले.

Before sunset.jpg

एक तासाचा रस्ता असावा. धावत सुटले तर अंतर लवकर कापुन होईल असा यडचॅप विचार मनात आला आणि धावु लागले. उतारावरुन धावल्यास गुडघ्यांवर ताण येतो, कधीच असे करु नये. अर्थात मी हा धडा नंतर शिकले. माझ्या थेरपिस्टने मला सांगितले की चढापेक्षा, उतारावर जास्त ईजा होते स्नायु आणि हाडांना. त्यावेळेस मात्र मी वेड्यासारखी धावत उतरत होते, ठेचकाळत होते आणि काळोखाने गाठलेच मला. डावा गुडघा त्याच वाटेवर दुखावला मी. अजुनही पायर्‍यांवर किंवा सायकल चालवताना डाव्या गुडघ्यात दुखते. हेडलॅम्पच्या प्रकाशात पायाखालची वाट दिसत होती पण तरीही मी बरोबर वाटेवर आहे की नाही, मध्येच कुठला चुकीचा फाटा तर घेत नाही ना हे पाहणे आवश्यक होते. मग गाढवासारखे धावणे सोडुन चालु लागले.
बाजुला किर्र काळोख आणि कीटकांचे काही विचीत्र आवाज सोबतीला होते. आकाशाचा एक फोटो काढला

stars_0.jpg

अंधार माझा जन्मजात शत्रु आहे. मी घरातल्या अंधारालाही घाबरते आणि येथे तर अगदीच वाईट स्थिती होती. सगळे वाईटातले वाईट विचार मनात. माझा पाठलाग चालु आहे, आजुबाजुला असंख्य डोळे माझ्यावर खिळलेत, भुताटकी पण आहे, बिगफुटपण येतोच आहे आता कुठल्याही क्षणी. सगळे अभद्र आजच होणार होते. नकळत परत धावुही लागलेले. कॅम्पसाइट नजरेच्या टप्प्यात आली तेव्हा तर सुटलेच जोरात. हार्ट्बीट्स प्रचंड वाढलेले.
तंबुजवळच्या रस्त्यावर जाताना एक तंबु अजुन दिसला. माझ्या तंबुपासुन साधारण तीनशे फुट लांबवर.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १४. ' जाऊ तेथे खाऊ' Staunton

मन विचीत्र असते. एरवी एकटेपणामुळे भिती आणि काळजी असायची आणि आता कुणीतरी आहे म्हणुन चिंता वाटु लागली. त्या तंबुत बारकासा लाइट दिसत होता. एक किंवा दोघंजण असावेत आत. माझ्या तंबुमधुन फ्लॅशलाइट घेतला आणि पार्किंगला गेले. तेथे रेस्टरुम्स आहेत. फ्लशवाली नाहीत पण वॉल्ट टॉयलेट्स आहेत. गाडीत अशीच असावी म्हणुन ठेवलेली सळई बरोबर घेतली, एक केक स्लाइस घेतला आणि तंबुकडे परतले.

गारठा पसरत होता हवेत. केक आहे तर कॉफी प्यायचा मुड झालाच. तंबुबाहेर सोलर लाइट्स लावुन गेले होते जाताना. ते आता उजळत होते. त्या प्रकाशात इंस्टंट कॉफी केली पटकन आणि तंबुत शिरले. खाऊन पिऊन दात घासले. कपडे बदलले आणि हीटर लावला. यावेळेस मी प्रोपेनवर चालणारा पिटुकला हीटर विकत घेतलेला. हा चालु असताना तंबुची खिडकी जरा किलकिली का होईना पण उघडी ठेवायची असते म्हणजे प्रोपेन रिलीजचा त्रास होत नाही. कार्बन बाहेर जातो. एक बॅटरीवाला कंदील आणलेला बरोबर. त्याच्या प्रकाशात पुस्तक वाचु लागले. मनात मात्र Mama Bear आणी cubs चा विचार येत होता सारखा. मग त्यांचे फोटो पहात बसले. अगदीच अनपेक्षीत अनुभव मिळाला होता आणि खुप कॄतज्ञ वाटत होते त्याबद्दल. घरी फोटो पाठवले. लेकाचा उत्स्फुर्त आनंदी रिप्लाय आणि +१ चे टिपीकल काळजीयुक्त, सल्लेबाज मेसेजेस आले.

inside_0.jpg

कुत्रा भुंकल्याचा आवाज आला. खिडकीतुन पाहिले तर त्या तंबुबाहेर एक माणुस कुत्र्याबरोबर उभा होता. हायसे वाटले उगीचच. कुत्रा बरोबर आणणारी माणसे जास्त भित्री असतात अशी समजुत घातली स्वतःची आणि जरा रिलॅक्स झाले. यावेळेस तंबुत अगदी घरासारखे वाटत होते. सवय झाली होती, शिवाय गाडी जास्त लांब नसल्याने काय हवे ते अंथरुण, पांघरुण, उश्या, पुस्तके आणता आले होते. कम्फर्ट कँपिंग झाले मस्त. सकाळी धबधब्याच्या ट्रेलवर जायचे होते तो मॅप पाहत बसले झोपायच्या आधी.

आजुबाजुला काळोख होता पण त्या कुत्रावाल्या माणसामुळे भिती वाटत नव्हती. काय उगीचच मगाशी धावत आले. आता आठवुन गंमत वाटत होती. माझे ओरडत ओरडत गात पळणारे ध्यान पाहुन बिचारे प्राणीच घाबरले असतील. किंवा एखादा माझ्यासारखाच हायकर असेल आजुबाजुला तर तोही घाबरला असेल. मीच बिगफुट म्हणुन प्रसिद्द व्हायचे अश्याने. अर्ध्याअधिक भुताखेतांच्या गोष्टी या अशा गैरसमजांमुळेच पसरतात बहुतेक. काही असो, निर्धास्त झोपी गेले त्या रात्री.

सुर्योदयाच्या वेळी उठले. पक्ष्यांनी नुसता आरडाओरडा चालवलेला. बहुतेक त्या कुत्र्यामुळे असेल. तो माणुस त्याच्या साइटवरच्या बेंचवर काही शिजवत होता, लांबुन हात केला त्याने. मीही केला. चहापाणी आवरले. आलं किसायची छोटी किसणी लेकाच्या भातुकली सेटमधुन ढापलेली. मस्त आलं बिलं घालुन चहा केला. तिखटच झाला जरा. मग गोड म्हणुन ब्रेड जॅम, मार्मालेड खात बसले. जुजबी सामान आवरुन पार्किंगला गाडीत ठेवले. गाडीतल्या कुलरमधुन डबा घेतला आणि धबधब्याच्या ट्रेलवर निघाले. डब्यात सोडे, भाकरी, कांदा. डिझर्ट म्हणुन चॉकलेट्स. दुपारी चांगले जेवायचे आमिष असले की पावले पटापट पडतात.
आज चांगलेच चालायचे होते आणि डावा गुडघा दुखत होता अधुनमधुन. तुरळक हायकर्स दिसत होते. दोन रेंजर बायापण दिसल्या. त्यांनी जरा एक शॉर्टकट रुट सांगितला. थोडा चिखल असेल पण सुंदर ट्रेल आहे आणि त्या ट्रेलवर सायकल, कुत्रे अलाऊड नाहीत त्यामुळे मोकळी वाट असेल असं म्हणाल्या दोघी. मग त्यांनी सांगितलेल्या दिशेने चालु पडले. वाटेवर छान छान फुले होती. एक घरटेही दिसले झाडावरः

pretty_0.jpg

हरणे, एल्क्सही मुबलक दिसले. वाटेत अजस्त्र अशा शिळा आहेत. अखंडच्या अखंड दगड एकेका ट्रकच्या आकाराचे आहेत. काही भागांत तर इतके उंच कडे आहेत की तेथे rock climbing ला परवानगीही आहे. एकुणच परिसर हा थोडासा कडेकपारीवाला आणि बराचसा हिरव्या जंगलाचा आहे. वाटेत छोटे छोटे पाण्याचे ओढे वाहतात. कोलोरॅडोत हिवाळ्यत मुबलक बर्फ पडला की उन्हाळा संपुन पानगळीचा सीझन येईपर्यंत असे ओढे खळाळत असतात. थंडीत ते परत गोठतात.

Boulders.jpg

Mule Deer_0.jpg

वाटेत ब्रेक्स घेत घेत दुपारनंतर एका तळ्यापाशी पोचले आणि पाण्यात पाय टाकुन बसले जरा. बरोबर आणलेला खाऊ खाल्ला. उन्हामुळे रुम टेंपरेचरला आलेले जेवण. पाणी संपत आलेले ते धबधब्याच्या वाहत्या पाण्यात भरुन घेणार होते. तळ्याकाठी वाळु होती. या पार्कमध्ये एकुणच असे कुठेही काहीही आहे. लाल माती, काळी माती, खडक, वाळु, शेवाळी. जमिनीचे अनेक नमुने पहायला मिळाले त्या एका दिवसात. असे म्हणतात की लक्ष वर्षांपुर्वी कोलोरॅडो आणि इतर शेजारची राज्ये ही समुद्राखाली होती. लाखो वर्षांच्या जमिनीच्या हालचाली, भुकंप, ज्वालामुखी अशा अनेक प्रलयांनंतर आता जशी ही राज्ये दिसतात त्यात कुठेकुठे असे समुद्राखाली असल्याचे पुरावे मिळतात.

Pond.jpg

येथुन पुढची वाट घनदाट जंगलातुन आहे. दुपारची वेळ असुनही येथे गारवा जाणवत होता. शांत परिसर अगदी. धबधब्याचा आवाज येऊ लागला पण वाट सापडेना. येथे वाट नीट आखलेली नाही आणि फलकही लावलेले नाहीत त्यामुळे शोधत शोधत पोचले एकदाची. पोट भरलेले असल्यामुळे चाल मंदावलेली. तसा चिमुकलाच आहे धबधबा. आजुबाजुला गोल सपाट शिळा होत्या. तेथे आडवी झाले मस्त! सोडे भाकरी अंगावर आलेली. नंतर कुणी हायकर्स येताना दिसले तेव्हा उठले. पाणी भरुन घेतले. हात पाय तोंड धुवुन फ्रेश होऊन निघाले परतीला. यावेळेस इतर हायकर्सच्या मागेमागे जात राहिले. आयती कंपनी मिळाली. साइटवर पोचल्यावर तंबु आवरला आणि तेथुन डायरेक्ट घरी.

Waterfall.png

आता विकेंड जवळ येऊ लागला की पाय घरात टिकेना. कडक थंडीचा सिझन चालु व्हायला अजुन महिनाभर होता. तेवढ्या अवधीत अजुन एकदोन पार्क्स करायची ठरवली आणि बॅककंट्री बुकिंग्स करुन ठेवली.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १५. 'ॠणानुबंधांच्या गाठी' - Mueller

Mueller State Park चांगले ९६०० फुट उंचीवर आहे आणि मी गेले होते नोव्हेंबर महिन्यात, त्यामुळे बर्फच होता काही काही भागांत. या पार्कमधुन उत्तर अमेरिकेतील Continental Divide दिसते. Continental Divide म्हणजे पर्वतरांगा, ज्या उत्तर अमेरिकेतील नद्यांचे दोन भागांत विभाजन करतात. पॅसिफीक सागराला जाऊन मिळणार्‍या नद्या आणि अटलांटिक सागराला मिळणार्‍या नद्या येथे वेगळ्या होतात असे कायसे. ही पर्वतरांग अलास्कापासुन चालु होऊन थेट मेक्सिकोपर्यंत जाते. या पार्कमधुन Continental Divide चा जो हिस्सा दिसतो, तो म्हणजे ' Rocky Mountain National Park' च्या पर्वतरांगांचा. हा एक फोटो काढला मी. दुरवर दिसतायत ती शिखरे म्हणजेच Divide :

Continental divide.jpg

या पार्कमध्ये साधारण ५५ मैल अंतराच्या ट्रेल्स आहेत. मी काही १० मैलांच्या वर चालणार नव्हते. भर थंडीत जात होते त्यामुळे इलेक्ट्रीक साइटचे बुकींग केले आणि एक छोटासा इलेक्ट्रीक हीटर घेतला. हा खास कॅम्पिंग हीटर असतो. तंबुत चालु असताना चुकुन पडला किंवा आडवा झाला की बंदच पडतो. सेफ्टी फीचर्स चांगले असतात. लावुन बिनधास्त झोपावे.

शनिवारी निघणार होते. शुक्रवारचे शिजवलेले मटण एका स्टीलच्या तांब्यात भरुन डीप फ्रीझमध्ये ठेवले होते, कँपिंगला बरोबर न्यावे म्हणुन. तांब्यात मटण ठेवायचा पहिलाच प्रसंग. तांब्यात अशासाठी की तो न गडगडता माझ्या छोट्या स्टोव्हवर बसतो. ते बरोबर घेऊन निघाले. फ्रीझ झालेले त्यामुळे सांडलवंडीचा प्रश्न नव्हता. नवर्‍याने तरीही ताशेरे ओढलेच. तांब्यात मटण घेऊन कुणी केंपिंगला गेलेय का कधी? नसेलही नेत कुणी. पण मला दमल्यावर चमचमीत खावेसे वाटते त्याला मी काय करु?

२.३० तासांची ड्राइव्ह आहे. पार्कच्या पायाशी छोटे गाव आहे 'Divide' नावाचे. अगदी एखाद दोन रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स, एक पोलीस स्टेशन दिसले जाताना. कॅम्प्साइटजवळच हा नजारा होता:

Pond 1.jpg

झाडांच्या मधोमध असलेले तळे गोठले आहे पहा. पटापट तंबु ठोकुन ट्रेलवर निघाले. नोव्हेंबर असल्याने काळोख संध्याकाळी ६ च्या आत पडत होता. रेंजरकाका जीपमधुन फिरत होते. मी हात केल्यावर ते थांबले. चांगलेच गप्पीष्ट होते ते. त्यांचे सासरे पण रेंजर होते म्हणे. इथे रिटायर झालेली बरीच मंडळी स्टेट, नॅशनल पार्कमध्ये जॉब करताना दिसतात. थोडाफार पगार, कधीकधी रहायला क्वार्टृस, कॅबीन्स, फेर्‍या मारायला जीप, गॉल्फ कार्ट्स वगैरे मिळतात त्यांना. बरेचदा मी रेंजर्सकडे बंदुकही पाहिलेली आहे. तर त्यांच्या सल्ल्याने मी एक कमी बर्फ असलेली ट्रेल निवडली. २.७ मैल वन वे म्हणजे राउंड ट्रीप साधारण साडेपाच मैलांच्या जवळपास. अर्थात चढ उतार होतेच वाटेत. जमेलसे वाटले. स्नो जॅकेट, ग्लोव्ह्ज, कानटोपी घालुन निघाले

डोंगराच्या रस्त्याला लागले. एक डोंगर चढल्यावर काहीतरी scenic view आहे असे कळले होते रेंजरकडुन. चढ असल्यामुळे घाम येत होता भर थंडीतही. जॅकेट काढुन कंबरेला बांधले. वाटेवर हे टर्की धावताना दिसले. भुकच लागली एकदम. मटण आठवले. फक्त परतल्यावर थोडा भात शिजवायचा होता. सुंदर जेवणाची स्वप्ने पहात पहात उरलेला टप्पा संपवला. टर्कीने मला बराच रस्ता सोबत केली. मी Overlook पहायला चाललेले. हा कुठे चाललेला काय माहीत. भटक्या! पण खरेच Overlook सुंदर होता. अप्रतिम असा सुर्यास्त पाहिला त्या संध्याकाळी:

Turkey.jpg

Sunset.jpg

सुर्यास्त पुर्ण होतो न होतो तोच लगेच उलट पावली निघाले आणि ठार मिट्ट काळोख पडण्याआधी व्यवस्थित तंबुत परतले. नवलच झाले! रेंजरकाकांनी चांगली सुरक्षीत वाट दाखवलेली. त्यांच्या शब्दांवर भरवसा ठेवुन सुखरुप प्रवास झाला त्याबद्दल मनात त्यांचे आभार मानले. उद्या सकाळी लांबची ट्रेल करु असे ठरवले.

कंदिलाच्या प्रकाशात खुडबुडत मटण चांगले रटारटा उकळुन घेतले. या पार्कमध्येही सुसज्ज वॉशरुम्स आहेत. त्यांचा उजेडही जरासा येत होता माझ्या कॅम्पसाइटपर्यंत. एकीकडे भात शिजवला राइस कुकरमध्ये. कांदालिंबु होतेच. जेवल्यावर भांडी वॉशरुममध्ये जाऊन धुतली. तेथे भांडी धुवायला वेगळे सिंक होते. आंघोळीसाठी कॉइन शॉवर्स होते. दीड डॉलरमध्ये चार मिनिटांची आंघोळ. मी काही आंघोळ केली नाही तेथे. थंडी खुप होती. उद्याची ट्रेल झाल्यावर पाहु म्हंटले. चार मिनिटांत काय आंघोळ करणार, कप्पाळ!

कपडे बेअर बॉक्समध्ये लॉक केले. ज्या कपड्यांमध्ये अन्न शिजवतो ते बदलुन झोपायचे हा एक महत्त्वाचा कँपिंगचा नियम आहे. आपल्या आजुबाजुला, तंबुत खाद्यपदार्थांचा वास राहता कामा नये. सकाळी लवकर उठायचे होते. उद्याच्या ट्रेलची स्वप्ने पहात झोपी गेले पण घडायचे वेगळेच होते.

Mutton.png

उठले तीच क्रॅम्प्स जाणवल्यामुळे. पिरिअडची डेट २/३ दिवस लांब होती पण यावेळेस काहीतरी गडबडलेले. पहिल्या दिवशी चांगलेच दुखते ओटीपोटात. पेन किलर घ्यावीच लागते. ती फर्स्ट एड बॉक्समध्ये होती पण आता काही ट्रेलवर चालणे शक्य नव्हते. चांगलीच खट्टु झाले. नाश्तापाणी करुन, गोळी घेऊन सरळ घरी जायचे ठरवले, येऊ परत कधीतरी निवांत आणि फिरु पार्क म्हंटले. सगळा संसार बॅगेत भरायला घेतला आणि निघाले घरी.

खालच्या ‘Divide' गावात पोचले आणि पोलिस स्टेशनजवळुन जाताना एक पाटी दिसली. अनाथ कुत्र्यांचे शेल्टर होते ते. गाडी पुढे जात होती पण ती पाटी मनातुन जाईना. बरेच दिवस लेक कुत्रा पाळायचा म्हणुन मागे लागलेलाच. पुढे जाऊन पहिला यु टर्न येताच वळाले आणि शेल्टरच्या पाटीकडे वळले.

आत गेले तेव्हाही दोलायमान स्थितीत होते की आता घरी जायचे सोडुन हे काय मध्येच. आत ८/१० कुत्रे होते. घ्यायचा तर अनाथ कुत्राच घ्यायचा हे आधीपासुन ठरवलेले होतेच. लेकालाही तसेच समजावलेले. फारसा विचार न करता एक पिल्लू फायनल केले आणि त्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज पुर्ण करुन गाडीत बसले. अर्थातच पिल्लु घरी न्यायची काहीही तयारी नसल्यामुळे त्याला मागच्या सीटखाली माझ्या पायजम्यावर झोपवले. आणि हा आमच्या आयुष्यात समाविष्ट झाला. आताच्या घडीला दीड वर्षाचा आहे तो आणि आता माझा कँपिंग बडीही झालाय.

first pic.jpg

Mueller ची ट्रीप अर्धवट राहिली कारण त्यादिवशी हा आमच्याकडे येणार होता. पुढच्या वर्षी परत गेले मी त्या पार्कला आणि उरलेल्या काही वाटा फिरले. पण त्यादिवशी जर ट्रेलवर गेले असते तर संध्याकाळी परतीचा रस्ता धरेपर्यंत शेल्टर बंद झालेले असते. सो, हे सर्व नियतीने घडवुन आणले हे नक्की.

बडीला पहिलावहीला जंगलाचा अनुभव देण्यासाटी तो जेमतेम वर्षभराचा झाल्यावर मी त्याच्याबरोबर 'Golden Gate Canyon State Park' ला गेले. त्याच्यासाठी एक डॉगी बॅकपॅक घेतली, ज्यात तो स्वतःचे खाणे, पाणी, पूप बॅग्स वाहुन नेऊ शकेल अशी. म्हणजे बडीचे मला काहीच जादा ओझे होणार नाही. बॅककंट्रीत कुत्रा सांभाळणे म्हणजे मोठी जबाबदारी आहे. मोठ्या जंगली प्राण्यांना त्याचा वास सहज येऊ शकतो आणि कुत्रा आकाराने लहान असल्याने त्याच्यावर हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे यावेळेस मी जंगलातील एका शेल्टरचे बुकींग केले.

गोल्डनच्या जंगलात अशी एकुण ४ शेल्टर्स आहेत आणि ती एकमेकांपासुन १० ते १५ मैलांच्या अंतरावर आहेत. शेल्टरच्या तीन बाजु बंद असतात आणि वर छप्पर असते. चौथी बाजु मात्र सताड उघडी असते. बडी जेमेतेम वर्षभराचा असल्याने फार टिवल्याबावल्या करायचा ट्रेल्सवर, त्याला हरणांशी खेळायचे असे, खारी पकडायच्या असत. कधीच न मिळाल्यासारखे ओढ्यांचे पाणीच पित बसायचे असे. एक ना दोन. प्रत्येक ट्रेलला जवळजवळ दीडपट वेळ वाढायचा त्याच्यामुळे.

Shelter.jpg

क्रमशः

स्टेट, नॅशनल पार्क्स - १६. - 'Step back in Time' - Forgotten Valley

गोल्डन स्टेट पार्कमध्येच मी जेथे शेल्टर बुक केले होते त्या भागाचे नाव आहे 'Forgotten Valley'. नाव कसे पडले ठाऊक नाही पण त्या परिसरात आजुबाजुच्या ट्रेल्स केल्यावर मी जे अवशेष पाहिले त्यावरुन वाटते की पुर्वी म्हणजे साधारण १०० वर्षांपुर्वी येथे कुणीतरी वास्तव्यास होते. त्यांनी एक Homestead बांधलेले आहे तळ्याकाठी. मी जवळ जाऊन पाहिले तेव्हा जरा पडझड झालेले दिसले. तरीही सुंदरच दिसते. तळ्याकाठी असे १०० वर्षांपुर्वी राहण्यास त्या लोकांना किती मजा आली असेल! तेव्हा प्राणीही जास्तच असतील.

वॅली चांगलीच उंचावर आहे, जवळजवळ आकाशाला भिडलेली. नुकताच पाऊसही पडुन गेलेली त्यामुळे असे धुंद फोटो आलेत. अशा वातावरणाची नशा चढतेच. अमेरिका नाही तर एखाद्या युरोपमधल्या गावात आहोत असे वाटले मला. पाय निघता निघेना.

Homestead.jpg

शेल्टरची वाट पार्किंगपासुन साधारण १.५ मैल आहे. अवघड मुळीच नाही पण ठिकठिकाणी माउंटन लायनच्या अस्तित्त्वाच्या खुणा दिसत राहतात आणि सगळीकडे त्याचाच भास होतो. म्हणजे मला तरी झाला. गुहा, पाण्याचे प्रवाह इतके आहेत की हे ठिकाण जंगली प्राण्यांचे आवडते नसेल तरच नवल. पाऊस पडुन गेल्यामुळे ओढे जास्तच खळाळत होते. कुठुनही पाण्याचा आवाज आला की बडी धावतोच पाण्याच्या शोधात. काय वेड आहे पाण्याचे कोण जाणे पण पुर्ण भिजवुनच घेतो स्वतःला. कुत्रा कितीही स्वच्छ असला तरी तो भिजल्यावर त्याला एक विशिष्ट वास येतो आणि हा वास जंगली प्राण्यापासुन लपुच शकत नाही त्यामुळे मला सततचे टेन्शन.

एका ओढ्यातुन मोठी १ गॅलनची पाण्याची बाटली भरुन घेतली. शेल्टर नजरेच्या टप्प्यात आले तेव्हा एक ससा फॅमिली तेथे पहुडलेली दिसली. आमची चाहुल लागल्यावर शेल्टरखालच्या खाचेत ती गायब झाली. चला काहीतरी सोबत आहे आपल्याला! बरे वाटले.

शेल्टरची पहिलीच वेळ असल्यामुळे संसार कसा मांडावा काही कळेना. आधी प्रत्येक कानाकोपर्‍याचे, छताचे निरिक्षण केले, कुठे पिटुकला पक्षी, प्राणी वास्तव्यास नाही ना याची खात्री केली. हो, रात्री झोपेत काही अंगावर पडायला नको. बडीने त्या कामात मदत केली मला. त्याला मुंगी, चिलट असले प्रकारही दिसतात आणि त्यांचा तो लगेच चट्टामट्टा करतो.

शेल्टरच्या छ्ताला काही खिळे ठोकलेले दिसले. मी त्यावर प्लास्टीक ठोकुन आडोसा तयार केला. आजुबाजुला फिरुन सुकलेली खोडे गोळा करुन आणली आणि प्लास्टीक उडुन जाऊ नये म्हणुन मांडुन ठेवली. एका खिळ्याला कंदील टांगला. एका खिळ्याला जॅकेट. मज्जा आली घर मांडताना. एकुणच शेल्टरमध्ये आपल्यापुरता तात्पुरता निवारा कसा आणि कितपत करायचा हे प्रत्येकाच्या आवडीवर, कुवतीवर आहे. काहीही आडोसा न करता, तंबु न मांडता नुसतेच झोपलात तरी जंगलात कोण विचारणार आहे!. पण मला चौथी बाजु सताड उघडी असताना झोप लागली नसती त्यामुळे मी तंबु आत मांडुन कवर केला.

Valley_0.jpg

कॉफी पिऊन भटकायला निघालो. एक राउंड ट्रीप ३ मैलांची ट्रेल होती. अर्धाअधिक रस्ता गेल्यावर माणसांचा आवाज आला. बडी भुंकु लागला. दोन हायकर्स पास झाले. काही शब्दांची देवाणघेवाण झाली. त्यांच्या अंगाखांद्यावर बरेच सामान होते. त्यावरुन तेही रात्री जंगलातच राहणार असावेत असा माझा कयास. मी आपले सांगुन टाकले, शेल्टर आम्ही बुक केलेय. बाकीचा ग्रुप येतोय थोड्याच वेळात. अमक्या रेंजरचे नातेवाईक. अशा थापा मारते मी एकटी फिरताना. भित्रेपणा, सावधपणा जे काही असेल ते पण डोक्यात उगीच काळजीचा भुंगा राहत नाही.

जंगलात काही ठिकाणी 'Natural Springs' आहेत. Natural Springs म्हणजे जमिनीखालचे पाणी जे जमिनीतील काही दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे जमिनीखाली साठत राहते आणि एखादा उगमस्त्रोत निर्माण होऊन ते पाणी जमिनीवर येऊन वाहु लागते. नैसर्गीक स्त्रोत. शेल्टरमध्ये पाण्याचा गॅलन होताच पण फॅनी पॅकमधली छोटी बाटली त्या पाण्याने भरुन घेतलीच चव पहायला. दुसर्‍या फोटोत बारका झारा आहे दिसेल न दिसेलसा. बरोबरचे सोंग लांब ठेवले त्या पाण्यापासुन. एक दणकट लीश घेतलेय मी. ती वापरुन त्याला झाडाला बांधता येते.

Natural Spring.jpg

ट्रेलवर फिरताना मी गाणी गाते म्हणुन बडी मध्येच एखादी तान घेतो. काहीतरी भुंकण्याचा किंवा विव्हळण्याचा सुर लावतो. बारीक लक्ष असते त्याचे आजुबाजुला. जे मला ऐकु येत नाही तेही त्याला ऐकु येते. तो थांबुन जर एखाद्या दिशेला एकटक बघत राहिला, किंवा नाक वर करुन हुंगत राहिला की मलाही साधारण कुठल्या दिशेला विशेष लक्ष ठेवायचे याचा अंदाज येतो. असे म्हणतात की जंगलात कुत्रा जर एखाद्या वाटेवर पुढे जाण्यास कांकूं करु लागला तर त्याचे ऐकावे. आपल्यापेक्षा त्याचे इंस्टिंक्ट्स जास्त पक्के असतात. वाईटाची चाहुल लागते प्राण्यांना. यांत तथ्य कितपत आहे हे ठावुक नाही पण मला पटते. ट्रेल काही विघ्ने न येता पार पडली आणि शेल्टरला परतलो.

रात्रीचे जेवण काय शिजवलेले ते आठवत नाही पण काहीतरी रेडीमेड सुपच असेल. पावसाळी हवा होती त्यामुळे सुप्स, चहा, कॉफी हेच जास्त घेतले असावे. मी खाणेपिणे करेपर्यंत बडीने इकडेतिकडे पहात गुरगुरण्याचे काम केले. अलर्ट शिपाई. माझ्याकडेही बरेचदा संशयाने पाहिले त्याने. कुठे आणलेय हिने! कभी कभी तो मुझे इसपेभी शक होता है टाइप्स (आठवा, जॉनी लिवर - बाझीगर)

विडिओज टाकलेत दोनः

https://youtube.com/shorts/jo-fd73evHg?feature=share

https://youtube.com/shorts/enc9owL42Xk?feature=share

झोपायच्या आधीची एक गंमत. एका कोपर्‍यात एका पेटीत नोटपॅड आणि पेन होते. शेल्टरमध्ये राहुन गेलेल्या पुर्वीच्या काही हायकर्सच्या नोंदी होत्या त्यात. लेटेस्ट नोंद ३ महिन्यांपुर्वीची होती. अर्ध्याहुन अधिक पाने भरलेली होती. वाचु लागले. काही गिचमीड अक्षरे कळेनात, काही चित्रेही काढलेली होती. कुठले प्राणी पाहिले शेल्टरमधुन, रात्री कसे आवाज येतात ते काहींनी लिहिले होते. काहींनी नुसताच चावटपणा केलेला. कुणा वात्रट माणसाने तर रात्री बिगफुट येऊन गेल्याचे लिहिले होते. त्याला मनात दोन शिव्या घातल्या. एकुणातच सगळ्या प्रकारचा मसाला तेथे वाचावयास उपलब्ध आहे. दोन नोंदी मात्र थेट काळजाला भिडल्या:

१. दोन मैत्रिणी येथे राहुन गेल्या होत्या. ती त्यांची दुसरी वेळ होती. पहिल्या वेळी त्या आल्या तेव्हा कॉलेजकन्यका होत्या आणि दुसर्‍या वेळेस मात्र वेगवेगळ्या शहरात कामानिमित्त राहत असुनही एक ट्रीप आखुन येथे आलेल्या. रियुनियन टाइप्स.

२. एक इमिग्रंट वर्कर, ज्याचा विसा संपत आलेला काहीतरी ८/१० दिवसांत. पुन्हा कधी अमेरिकेत यायला मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे या पार्कमध्ये निवांत काही घटका घालवायला आलेला तो. बरेच काही लिहिलेले त्याने. आता ओळी आठवत नाहीत पण सगळा आशय फार उदासवाणा होता. त्याच्या निराश मनाची कल्पना येत होती. आशा आहे की येथुन जाताना तो काहीतरी नवीन उमेद घेऊन गेला असावा.

Notepad.jpg

रात्री पाऊस पडला. डोंबिवलीच्या सवयीप्रमाणे एक रिकामे स्वच्छ भांडे भरत ठेवले पावसात. उगीचच वापरायला लागले तर म्हणुन. पावसामुळे कुणी प्राणी आश्रयाला यायची शक्यता होतीच, त्यामुळे सगळी आयुधे तंबुत हाताशी घेऊन झोपले. एरवी शेल्टर रिकामे असताना मोठे प्राणी येथे राहत असतील का, कोण जाणे! पण एखादा रोज रात्री येत असेल तर सवयीने फिरकायचाही.

बडीची सोबत होते पण जबाबदारीही जास्त वाटते. असे आपले मी आता लिहितेय पण त्या रात्री मात्र काहीही आले तरी बडी मला सावध करेल या खात्रीने मस्त ताणुन दिली होती. एकदोनदाच उठले (एकदा नं १) आणि जरा कानोसा घेउन परत झोपले. बडीही मध्येच एकदा जाऊन सु करुन आला. झोपेतही त्याला लीश लावुन ते तंबुच्या आत सिक्युअर केलेले असते. त्याने सु चा सिग्नल दिला की मी त्याला तंबुची चेन उघडुन देते मग तो झाडाझुडपांत जातो. फ्लॅशलाइट मारुन लक्ष ठेवावे लागते. सकाळी त्याला बिलकुल उठायची इच्छा नव्हती. मग मी बसल्या बसल्या माझीही नोंद केली नोटपॅडमध्ये.

good morning.jpg

बाकी नेहमीचेच. उठुन चहापाणी, एक ट्रेल आणि मग घरी. 'Step back in routine'.