काझीरंगा - मेघालय दिवस ३ - काझीरंगा हत्ती सफारी, उमियम लेक, शिलाँग

दिवस ३ -

पहाटे उजाडल्याने ४:३० पासून जाग होती. चहा पाणी करून हत्ती सफारीसाठी तयार झालो. आज वेस्टर्न रेंजमधे जायचं होतं.

एका हत्तीवर ४ ते ५ जण घेतात असं कळलं होतं. प्रत्येक माणसाचे १००० रूपये. ७ च्या आधीच पोचलो. एकेक करून हत्ती आधीची सफारी करून माणसांना उतरवत होते. हत्तींच्या उंचीचा मनोरा केलेला आहे, आपण तिकडे पायर्‍यांनी चढून जायचं आणि हत्तीवर बसायचं. ४ माणसं पाठीला पाठ लावून बसतात. २ माणसं बसल्यावर हत्ती तिथल्या तिथे व्यवस्थित वळला. आम्ही बसलो ती हत्तीण ३४ वर्षांची होती - लक्ष्मी नाव. माहूताशी गप्पा मारल्या त्यावरून कळलं की प्रायव्हेट मालकीचे हत्ती आहेत. मी समजत होते वनविभागाचे असतील. प्रत्येक हत्ती म्हणे २०-२५ लाखाला विकला जातो.

आपल्याला बसण्यासाठी बाकासारखं केलेलं असतं ते हत्तीच्या पाठीवर दोरीने मागे शेपटीतून घातलेलं असतं. आपलं एवढं वजन घेऊन चिखलातून बिचारा मार्ग काढत होता. २ वेळा हत्ती सफारी नाही केली ते बरं वाटलं ते ह्यासाठी.

ही सफारी तशी कमी जागेत आहे. २-३ गेंडे चरत होते. पाणथळ जागा होती बरीचशी. हत्ती चढ उतारावरून आरामात जात होता. घट्ट धरून बसावं लागत होतं. त्यामुळे दुर्बिण काढणं शक्य नव्हतं. समोर दिसेल तेवढचं बघणे. आमचा आवडत्या रोलर ने इथेही दर्शन दिले.

elaphantsafari1.jpeg

hattivar.jpeg

हा एक व्हिडिओ - गेंडे डुंबताना

हा एक पॅनोरमा

सगळे फोटो नवर्‍याने काढले आहेत. हत्ती इतका हलत होता की माझी काही हिम्मत झाली नाही फोन बाहेर काढायची.

एक तास तेवढ्या भागात फिरवून हत्तीने उतरवलं. आमच्या लक्ष्मीला जाता जाता हात लावला.

हॉटेलवर परत येऊन नाश्ता पाणी केलं आणि शिलाँगच्या प्रवासाला लागलो. हा प्रवास बराच होता. २५० किमी जायचं होतं. मेघालयात जायचं तर ई-पास लागतो. तो आधीच ऑनलाईन घेऊन ठेवला होता त्यामुळे आसाम-मेघालयाच्या सीमेवर वेळ वाचला.

वाटेत १-२ थांबे घेऊन उमियम लेकला पोचलो. इथे स्पीड बोट आहे. सगळा प्रवास उन्हातून झालेला पण ह्या तळ्यापाशी इतका छान गार वारा होता. एका बोटीत १०-११ जण घेतात.

umaimlake1.jpeg

तळ्याचा पॅनोरमा

इथून शिलाँग अगदी अर्ध्या तासावर होतं. इथे आम्ही एअर बीनबी बुक केलं होतं. हे घर

जो ओनर होता तो मागच्या बाजूच्या घरात राहतो. जुन्या खासी पद्धतीचा बंगला आहे. स्वच्छता होती. फ्रिज, वॉशिंग मशिन, स्वयंपाकघरात गरजेच्या सगळ्या वस्तू होत्या. ओनरही बोलका होता. घरी पोचायच्या आधीच जेवण करून घेतलं. रविवारचा दिवस असल्याने ५:३० ला नंबर लावला तो तासाभराने लागला आणि जेवण होईस्तो ८ वाजले.

दुसरा दिवस शिलाँगच्या आसपास फिरायचं होतं त्यामुळे उठायची तशी घाई नव्हती. प्रवासाने अंग आ़खडून गेलेलं. घरात शिरलो तर एकाही खोलीत पंखा नाही. झोप कशी लागणार असं वाटलेलं पण हवा छान गार होती.

दिवस ४

Keywords: