पणजीआज्जीच्या रेसिपीज - साबुदाण्याची खिचडी

आत्ता आत्तापर्यंत असलेल्या माझ्या आजेसासुबाई काय खिचडी बनवत. एखाद्या तान्ह्या बाळाचे करावेत तसे लाड करायच्या अगदी त्या खिचडीचे...

रात्री साबुदाणा धुवून मग रोवळीत उपसून ठेवायच्या. दुसर्‍या दिवशी सकाळी चितळेच्या फुल फॅट दुधाचा हबका द्यायच्या त्यावर. मग मोठ्या लोखंडाच्या कढईत, घरी कढवलेल्या भरपूर तुपाची, जिरे व मिरच्यांचे लांब तुकडे ( हो, म्हणजे हवे तो खाईल व नको तो काढून टाकेल) घालून ( शिवाय थोडे जिरे, मिठ व मिरची खरंगटून)
मग त्यातच उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, त्याला तेवढ्यापुरतंच मिठ चोळून ( म्हणजे चव जिथल्यातिथे रहाते) मग झाकण ठेवून एक वाफ. तोवर सुरकुतलेल्या पण तुकतुकीत हातांच्या लाल-गोर्‍या बोटांनी थोडं सायीचं दही, मिठ, गोडसर चव येइल एवढी साखर, व भरपूर प्रमाणात घरचं दाण्याचं कूट (दाणे घरीच वाळूवर लालबुंद रंगावर भाजून, मग एकेक मुठ दाणे घेऊन त्याची अगदी निगुतीनं सालं काढून, खलबत्यानं तयार केलेलं कूट) एकत्र मिसळून मग ती खिचडी फोडणीस टाकायच्या. लोखंडी लांब दांड्याच्या उलथन्याने खरपूस होईपर्यंत परतून मग वरून परत थोडं साजूक तूप व नंतर खोबरं कोथिंबीर घालून वर लिंबाची चंद्रकोर ठेवून ती गुलाबी दिसणारी आंबट-गोड चवीची लुसलुशीत खिचडी सगळ्यांना मायेनं खाऊ घालायच्या. आता नाही मिळणार तशी खिचडी.

पाककृती प्रकार: