भटकंती

लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास!
आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!!
.
.
.
.
काय पहायचं आहे, आणि कसं पहायचं आहे, ह्याच्या लांबलचक विशलिस्टा तयार झाल्या.
मनातल्या मनात त्या सफरी करणे हा मस्त विरंगुळा झाला.

मग एका टप्प्यावर लिस्ट मधे काही टीकमार्क आल्यावर वाटलं, हे लिहावं.

भटकंती -१

भटकंती -१

लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास!
आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!!

हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो. मला मनापासून आवडणारी गोष्ट , भटकंती!!

वय (महाविद्यालयात प्रवेश) वाढलं (अक्कल नाही) तेव्हां हे सगळं म्हणजे काय नक्की आवडतंय, हा विचार सुरु केला.

- ह्यासाठी मेंदू इतका का झिजवायचा
- नवीन माणसं /नग /वल्ली भेटतात
- नवीन जागा पहायला मिळतात.
- असेच भटके लोक भेटतात.
- घरी बसलं की अभ्यास हा नावडता विषय हाताळावा लागतो..

अशी आणि इतपत प्रगल्भ (?) उत्तरं मिळायला लागली.

पण आर्किटेक्चरला प्रवेश घेतला आणि नितळ दिसायला लागलं. आधीच्या भटकंतीचाही अर्थ उमगायला लागला. अगदी निरुद्देश केलेला प्रवास सुद्धा, थकून टेकल्यावर, रंगीबेरंगी काचा Kaleidoscope साठी देऊन जायला लागला. पाहिलेल्या व्यक्ती, इमारती, चौक, निसर्ग, कल्चर , चाखलेले चित्रविचित्र पदार्थ, ऐकलेले संगीत, माझ्या मनातले अल्बम समृद्ध करायला लागले.

काय पहायचं आहे, आणि कसं पहायचं आहे , ह्याच्या लांबलचक विशलिस्टा तयार झाल्या. मनातल्या मनात त्या सफरी करणे हा मस्त विरंगुळा झाला.

मग एका टप्प्यावर लिस्ट मधे काही टीकमार्क आल्यावर वाटलं, हे लिहावं.
फार नीटनेटकं आणि मुद्देसूद नसलं, तरी जसं मनाला भावलं तसं. Choreographed नाही, तर एकदम साळढाळ गप्पा. (कारण फार छान आणि प्रगल्भ लिहिण्याजोगी अक्कल अजून नाही )

आज एवढंच!
पण आता सुरुवात करतेय...

महत्वाच्या सूचना:
१) फार अपेक्षा ठेवू नयेत.
२) हे माझे अनुभव आहेत, आणि माझे रंग. चित्र मला सुंदर दिसतंय , एवढंच.
३) प्रचि साध्या camera ने अथवा मोबाइलवर काढलेत , content more imp than quality.

( अमांच्या लेखावर झब्बू द्यायचा म्हणून लिहायला सुरवात केली , पण वाटल आधी पुर्वीचे लेख मायबोलीवरून इथे आणावे . बहुतांश मैत्रीणीनी वाचले असतील्च , पुनरावृत्तीसाठी क्षमस्व. आधीचे सगळे टाकते अन पुढला लिहायला घेतलाय तो टाकते. )

भटकंती - २

भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे.

कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर.

अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं. माणसं भेटायला हवीत, तिथलं खाणं पिणं, गाणं, इतर कल्चर, इमारती, त्यावरुन होणारी त्या गावाची ओळख, सार्वजनिक ठिकाणं, पार्क्स, म्युझियम्स, रेल्वे, ट्राम, त्यामधे दिसणारी तिथली जनता, त्यांचा पेहराव , लोकल ते ग्लोबल फुटट्टीवर त्यांचा नंबर शोधणं हे माझे आवडते विषय.

नशिबाने माझ्या कामाचं स्वरुप असं आहे की भटकण्याची हौस पुरेपूर भागते. ह्या सगळ्या भटकंतीमध्ये बरेच चित्रविचित्र, मजेशीर, उद्बोधक(?) अनुभव आलेत, येतात. ते सगळं लिहावं असं ठरवलं. अर्थात, माझ्या भटकण्यासारखंच लिखाणही परीटघडीचं नाही, गबाळं आहे. माझा, "अबकचा प्रवास" या थाटात लिहिण्यापेक्षा आडवे छेद देऊन, मला जगभर (माझं जग बरंका, हे फारच लहान आहे.) भेटलेली माणसं, माझी खाद्ययात्रा, विविध छोट्या मोठ्या गावातले चौक, अनुभव असं मांडते.
______________________

या भागात, तुमच आणि आमच सेम असत.

_______________________

१० -१२ वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे हैद्राबाद प्रवास, ट्रेनमधून. सहप्रवाश्यांमध्ये एक पुणेकर आज्जी, त्यांची सून, नातू - वय वर्ष १४-१५, एक कानडी कुटुंब. इतर सोलापूरला उतरणारी गर्दी. माझी ३ वर्षांच्या लेकाला सोडून प्रवास करण्याची पहिलीच खेप. दौंडपर्यंत पोचेतो तुम्ही कोण, आम्ही कोण, कुंडल्या मांडून झाल्या होत्या. रीतसर गप्पा रंगल्या होत्या. बराच वेळ गप्प असलेल्या आज्जींनी एकदम रॅपिड फायर सुरु केलं.

"तू आर्किटेक्ट आहेस ना?"

"हो आज्जी, ४ वर्षं झाली, आता माझी प्रॅक्टीस करते"

"किती दिवस आहे काम?"

"दोन दिवस काम आहे, मग मी जुनं हैद्राबाद पहाणार आहे एक दिवस जास्त थांबून"

"कामासाठी ठीक आहे पण भटकायला पण जातेस बाहेरगावी? पोराला, नवर्‍याला टाकून?" पोराला, नवर्‍याला टाकून??? मी थक्क!!

मग आजी म्हणाल्या, "तसं कौतुक वाटतं तुम्हां आजकालच्या पोरींचं, आमच्या वेळी नवर्‍यावर मुलांची जबाबदारी टाकून बाहेरगावी जाणं अशक्य होतं."

मग पुढे रीतसर सासू काय करते, मुलाला सांभाळते का? हैद्राबादला एकटीने जायला घरची परवानगी असते का? -हैला! अशी परवानगी मागायची असते, हे पण माझ्या डोक्यात आलं नव्हतं! - नवरा काय करतो, मुलगा किती वर्षांचा, घरी अजून जबाबदारी काय? -म्हणजे गोतावळा किती मोठा, असं विचारायचं होतं बहुतेक! - सणवार करतेस का नाही? असा इंटरव्ह्यू झाला.

मला झाल्या गप्पांची मौज वाटली. आजीबाईंना भोचक चौकशा करायच्या होत्या. थोडं कौतुक, थोडी असूया होती, आमच्यावेळी आणि आजकाल अशी तुलना होती. कामासाठी ठीक आहे, पण भटकण्यासाठी एकटं जाण्यावर चक्क आक्षेप होता.

***

गेल्या वर्षी मी आणि माझी मैत्रीण बेल्जियम आणि नेदरलॅंड पहायला गेलो होतो. फक्त मुंबई ते ब्रुसेल्स आणि परत, ह्या प्रवासाच्या तारखा नक्की होत्या. बाकीचं आवडेल तसं पहायचं असं ठरवलं होतं. यूथहोस्टेलमध्ये रहायचं, सायकली भाड्याने घेऊन गावभर फिरायचं. त्या त्या गावात खास, ते खायचं, वगैरे. तिचा आणि माझा नवरा टूर कॅटॅगरीत मोडणारे, त्यामुळे त्यांना आणि मुलांना न घेता आम्ही दोघीच प्रवासाला निघालो होतो.

अ‍ॅंटवर्प ते ब्रुसेल्स, ट्रेनचा प्रवास. समोर एक बेल्जियन आज्जी. माझी मैत्रीण फ्रेंच उत्तम बोलते, त्यामुळे हळूहळू गप्पा सुरु झाल्या .

पहिला प्रश्न. "तुम्ही दोघी मैत्रिणी.. म्हणजे..?"

"नाही, आमच्या दोघींचे आपापले नवरे आणि मुलं आहेत. फक्त इथे बरोबर नाहीत."

मग आजीबाईंची कळी खुलली. पुढच्या गप्पा सुरु. ह्या शेतकरीणबाई लेकीकडे निघाल्या होत्या. शेतकरी काका मागच्या सीटवर .

"मग अश्या मुलाबाळांना सोडून दोघीच का फिरताय... ?"
घरी कोण कोण असतं? नवर्‍याने स्पॉन्सर केलं का तुम्ही कमावता? मुलं काय करतात... ?"

मैत्रिणीला म्हटलं, त्यांचं आणि आपलं अगदी सेम असतं नै? :)

भटकंती - ३

असंच काही बाही.

आयुष्यात काही भारी माणसं भेटतात. विविधरंगी, प्रसंगी चक्रावून टाकणारे, विचार करायला लावणारे अनुभव देऊन जातात.

ह्या उन्हाळी सुट्टीत मी आणि माझा मुलगा, वय वर्षं १४, जर्मनी भटकायला गेलो होतो. १२-१३ दिवसांत, बर्लिन, म्युनिक, स्टुटगार्ट, हायडेलबर्ग असा ढोबळ प्लॅन होता. जर्मन फुटबॉल आणि जर्मन गाड्या हे लेकाचं माझ्याबरोबर येण्याचं कारण.

ह्यावेळच्या दौर्‍याचं वैशिष्ट्य म्हणजे मुक्काम वेगवेगळ्या स्थानिक लोकांच्या घरी होता. बर्लिनमध्ये माझी आर्किटेक्ट मैत्रीण, म्युनिकमध्ये तिचा भाऊ, स्टुटगार्टमध्ये एक स्पॅनिश फॅमिली आणि हायडेलबर्गमध्ये एक मेक्सिकन. हा भारतातील वेदशाळा ह्या विषयावर पीएचडी करतो हायडेलबर्ग युनिवर्सिटीमध्ये.

बर्लिनमधली माझी मैत्रीण गेल्या महिन्यात ५० वर्षाची झाली. इथे पुण्यात कामासाठी आली की माझ्या घरी राहते. भारतीय लोक, त्यांचे सणवार आणि त्याना लहानपणापासून असलेली अध्यात्माची ओळख (?) हे तिच्या इंट्रेस्टचे विषय! नेहमी मीच येते तुझ्या घरी, तू पहिल्यांदाच आलीस, म्हणून हिने चक्क रांगोळी, तोरण वगैरे तयारी केली होती! हिच्याकडे राहताना एकूणातच नाती, त्यांना जपणं, लेबलं लावणं, मोडलेली नाती ह्याबद्दलच्या माझ्या बाळबोध अनुभवांना धक्का बसला. इस्ट जर्मनीत शिकताना वयाच्या २१व्या वर्षी हिचा मुलगा जन्मला, पण त्याच्या बाबाबरोबर त्या वयात राहणं ठीक होतं, नंतर पटलं नसतं म्हणून लग्न नाही केलं.
तिचा म्युनिकला राहणारा मोठा भाऊ त्या विकेंडला बर्लिनमधे होता, एका पार्टीसाठी आला होता. त्याच्या जुन्या मैत्रीणीचा ५० वा, म्हणून स्पेशल वाढदिवस साजरा करायला. पार्टी तिच्या नवर्‍याने आयोजित केली होती. त्यासाठी तिच्या आयुष्यातले सगळे महत्वाचे लोक आले होते. त्यात हा आणि अजून २ जुने मित्र! माझ्या झेपण्याच्या पलिकडे होतं हे. रात्रभर भरपूर गप्पा, खाणं, पिणं, नाचणं करुन कोणत्याही कडवटपणाशिवाय ह्या मंडळींनी आनंदाने वाढदिवस साजरा केला.

ही नवी जुनी नाती मनापासून वागवता, जपता येण्यासाठी मनाची किती प्रगल्भता लागेल, नाही का? माझ्याबरोबर एवढ्या प्रवासात हा बरोबर होता. मग आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. हे, स्वतःला कोणती वाट चालायची आहे हे ओळखणं, ते स्वतःशी मनोमनी मान्य करणं, मग त्या वाटेवरचे सहप्रवासी भेटणं आणि मग त्या वाटा वेगळ्या झाल्यावर सुद्धा, त्या वेळी, त्या वाटेवर तुझ्याबरोबर चालायला आनंद वाटला, अशी कबुली देऊ शकणं. अर्थात, हा सहजपणा आहे, कारण त्यासाठी तिथली सामाजिक परिस्थिती पूरक आहे. (हे मा वै म)

पहिल्या दिवशी हे सांस्कृतिक धक्के बसल्यावर मग एक चर्चासत्रच झडले रात्री जेवताना. मैत्रीण, तिची मोठी बहीण, मुलगा, अजून एक सहकारी वगैरे...

माझे बाळबोध प्रश्न विचारले मी त्याना. आणि त्या मंडळींनी सुद्धा कोणताही किंतु मनात न आणता मला उत्तरे दिली.

बर्लिनसारख्या मोठ्या शहरात एकेकटे आणि स्वतंत्र रहाणारे माय -लेक, भाऊ, बहीण, वर्षातून ४-५ वेळा एकत्र प्रवास करतात, धमाल करतात. भावनिकरीत्या एकमेकांवर फार अवलंबून असतात. घरी स्पेशल डिश बनली तर इतरांना डबे पाठवले जातात. ह्या सगळ्यांची मावशी , ८५ वर्षांच्या आजीबाई, ह्या भाचरांना वर्षाचे फ्रूट प्रिझर्व, सिझनिंग वगैरे करुन पाठवते. ह्या सर्वांची ही नाती वागवायची सहजता फार भावली मला. नाही म्हणायला, लेकाने एक लोडेड मत व्यक्त केलं दुसर्‍या दिवशी. "इन्ना, मला वाटतं खरं म्हणजे लग्न काही मॅंडेटरी नाही." अ ओ, आता काय करायचं
जगात वेगवेगळ्या ठिकाणी चालीरीती वेगवेगळ्या असतात, असं म्हणून मी पुढे सरकले.
पुढे त्याचाही प्रत्यय आलाच.

स्पॅनिश घरात आई, बाबा, दोन मुलं, वय वर्षं ४ आणि १.५, अजून एक येऊ घातलेलं. घरात शिक्षणासाठी आलेली दूरची नातेवाईक. एकुणात सीन आपल्याकडच्या चाकरमान्यांसारखा .

मग एका इटालियन आप्तांना भेटायचं होतं. तिथे तर माझी इंडियन लेक आली आहे तिच्या मुलाबरोबर म्हणून एक गटग झालं. फक्त फॅमिली म्हणून २०-२२ जण आले होते! काका, काकू, त्यांची लेक, तिचा मित्र. काकांचा सख्खा मित्र -म्हणजे फॅमिलीच ना!- त्याची पोरंबाळं, २ कुत्री, काकांची बहीण, भाचरं, आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत, अजून एक मित्राचा मित्र, -"तुझ्याशी ओळख करुन घ्यायची आहे भारतात काम करायचंय त्याला म्हणून" - आलेला.

बिग फॅट इटालियन लंच!! मग गप्पा, इटालियन इंग्लिशमधून!
"अगं, हे खाऊन बघ, अग हा पास्ता इथल्यासारखा अजून कुठ्ठे मिळणार नाही!"
पार्मसान चीज, त्यासाठी स्पेशल गवत खाणार्‍या गाई! फेरारी, लॅम्बॉर्गिनी!
"आमच्या इटलीतल्या समर हाऊसमध्ये खरं तर तू रहायला हवं होतंस!"
एक ना दोन! दुपारभर चालू असलेला हृद्य समारंभ संपताना पोट आणि मन, दोन्ही तुडुंब भरलं होतं आणि डोळे पाणावले होते.

युरोप, त्यातूनही जर्मनी जेव्हां कामानिमित्त समोर आला होता, तेव्हा त्यांचा उद्धटपणाकडे झुकणारा काटेकोरपणा, स्वतःखेरीज इतरांना दुय्यम लेखण्याची वृत्ती हेच रुपडं समोर आलं होतम. ह्या भटकंतीमुळे वेगळा माणूस पुढे आला.

अजून काय पाहिजे?

भटकंती ४

भटकंती ४

द वॉल

द वॉल , द्रविड ? नै हो अजून भेटला .
चीनची भिंत? हो त्यावर पण एकदा लिहीन. पण आजची भिंत बर्लिनची आहे.

ही पहिल्यांदा ऐकली /वाचली इतिहासाच्या पुस्तकात. दुसर्‍या महायुद्धानंतर चक्क एका मोठ्या शहराचे २ तुकडे करणारी भिंत. मग रिडर्स डायजेस्ट मधे १,२ कथा वाचल्या ग्रेट एस्केप नावाच्या. पुर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत केलेली पलायनं . तेव्हा फार उत्सुकता वाटाली होती या भिंतीबद्दल , इतकी की माझी एक पेन फ्रेंड होती जर्मनीची ,अर्थात पश्चिम जर्मनीची! पण ह्या माझ्या पत्रमैत्रीणीला ती अगदी स्विस बॉर्डर वर असल्यानी भिंतीबद्दल आस्था नव्हती ना खेद.

पुढे १९८९ मधे भिंत पाडली. वर्तमान्पत्रातून जर्मन एकीकरणाबद्दल बरच छापून आल. काही तरी ऐतिहासिक मोठ घडल ह्यापलिकडे फार काही कळाल नाही त्यावयात . माझ्या पुरता फरक पडला तो एवढाच की पुर्व जर्मनीच्या स्टँप्सच्या बदल्यात एका ऐवजी ३ एलिझाबेथ राण्या मिळायला लागल्या स्मित

पुढे शिकुन सवरून होइतोवर भिंत मनात मागे पडाली होती. कामानिमित्ताने काही जर्मन कंपन्यां शी संबंध आला. सगळ्या 'नाक वर ' जर्मन लोकांमधे एखाद दुसरा जरा मवाळ भेटला की माझा मित्र पैज लावायचा हा नक्की इस्टजर्मन असणार. भिंतबाई आल्या सरसावून पुढे! संधी मिळाली की एकदा पाहयचीच भिंत अस ठरवून टाकल. लिस्टीत तिच नाव नोंदवून टाकल.

संधी मिळायला पुढे बराच काळ गेला. २ वर्षा पुर्वी बर्लीन चा दौरा ठरला तेव्हा माझ्या जर्मन मैत्रीणीला सांगून ठेवल की मला भिंत पहायचीये ! त्या आठवड्यात खरी भिंत तर पाहिलीच, पण पुर्व जर्मन नजरेतून पाहिली , पश्चिम्जर्मन नजरेतून पाहिली, कलाकाराच्या , वास्तुविशारदाच्या, नव्या पिढिच्या ही नजरेतून पाहिली.

खर सांगू का कोणास ठाउक ,माझ्या कल्पनेत ही भिंत म्हणजे आपल्या भुइकोट किल्ल्यांच्या तटबंदी सारखी होती. जाड , दगडी , बुरूज वाली, बर्लीनमधली २ उपनगरांची वाटावाटी केलेली. पण तिथे भेटलेली भिंत आणि तिची विविध रूपं वेगळीच होती. सगळ्यात महत्वाच म्हणजे चक्क गजबजलेल्या शहराचे दोन तुकडे करणारी. ह्या खालच्या चित्रात दिसतेय ते जुन घर, अन त्याची भिंत . भिंतीच्या आत इस्ट अन बाहेर वेस्ट. ह्याच घराच्या खिडकीतून बाहेर उडी मारून सुरवातीला लोकांनी पलायन केलय.

11

मग तयार झाला हा १०० मि चा पट्टा ! दोन्ही बाजूला काँक्रीट्च्या भिंती , मधल्या मैदानात पेरलेले सुरुंग, अन पहारा देणार्‍या चौक्या.
2

रस्त्याच्या पलिकडे एक वॉल म्युझियम आहे. तिच्या कथा वाचून ,पाहून , ऐकून काटा येतो अंगावर. ह्या कथा न भिंतीत चिणलेल्या वेदना अगदी वॉच टॉवरच्या कठड्यावर पण भेटत रहातात.

33

पायर्‍या उतरताना, समोरच्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारणारा तरूण दिसतो, पुढे चौकात पुर्वेकडे अडकलेल्या आई वडिलांना भिंती पलीकडून जोडीदाराची ओळख करून देणारी नववधू दिसते , बेकरीच्या भट्टी खालून भुयार खणणारे बेकर काका दिसतात , डाव्या उजव्यांमधे भरडले गेलेले सामान्य जर्मन नागरीक दिसतात. सुन्न होउन आपण जमिनीवर पोचतो तेव्हा दिसते जतन केलेली भिंत. हे लोखंडी गज आता भिंतीच्या ठीकाणी उभे आहेत. त्या कटू इतिहासाची जाणिव , आठवण पुसली जाउ नये म्हणून ओळीत उभे हे गज! मज्जाव करणारी भिंत नाही , तर स्वतंत्र विचारांच आदान प्रदान ,अन लोकशाहीच वार खेळत ठेवणारी लोखंडी गजांची रांग.

#

पुढे शहरभर भेटत राहते ही भिंत! कलाकाराच्या नजरेतून .
!
येणारी अन जाणारी पावल रेखलेली.
66

नाहीतर अगदी फोटो अपॉर्च्युनीटी म्हणून राखलेला खर्‍या भिंतीचा तुकडा. ह्या फोटोतल्या पिढीला त्याभिंतीमागचे आक्रोश अन वेदना नसतील ऐकू येत कदाचित. 7

7

मला मात्र राहून राहून , बंदिस्त पुर्वेतून पलिकडे दिसणारं स्वातंत्र्य च दिसत राहिल.
8
8

भटकंती ५

लग्नाला गेले मी ओसाका पुरा..

माझ्या भटकेपणात मौज आणणारी, काही अनपेक्षित दिसलेली इंद्रधनुष्ये आहेत. उन पावसाचा खेळ पहाताना ,ओल्या मातीचा वास घेत , अचानक दिसलेली कमान , अजूनही 'हैला कस्ल भारी' अस वाटवते, तसेच हे भटकंतीत अचानक ठाकलेले प्रसंग !!

जपानात नविन काम मिळालं होते आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून तोक्यो हून ,ओसाका नावाच्या शहरात जायच होत. आदला आठवडा कामानी पिट्ट्या पडला होता, म्हणून ओसाकात पोचले की गुमान पडी मारायची अस ठरवल होतं. पण शिंकान्सेन नी जाताना सहज खिडकीतून पाहिले तर फुजी सान ! (एक जपानची वारी केली की सगळ्याना सान जोडायची सवय करून घ्यायची अस मला शिकवलय :winking: ) का कोण जाणे हे महाशय दिसले की आश्वस्त वाटत. सगळी मरगळ गेली . म्हटल ओसाका मधे मिळणारी रिकामी दुपार सत्कारणी लावायचीच.

1

बाडबिस्तरा मुक्कामी टाकून लगेच मी बाहेर पडले. ओसाका मधे जायची पहिलीच वेळ. त्यात तोक्यो, योकोहामा मधे तुरळक दिसणारं इंग्लिश इथे लापता होतं. हॉटेल लॉबी मधल्या मुलीला ,'हाताशी ४ तास आहेत इथे जवळ पास काय पहाता येइल " हे साभिनय ,जापनीज अ‍ॅक्सेंट्च्या इंग्लीश मधे , चित्र काढून विचारायचा प्रयत्न केला पण गाडी पुढे सरकेना.

शेवटी ओसाका कॅसल नावाची इमारत झळकवणारं ब्रोशर दिसल. ओसाका कासल हे शब्द सोडून उर्वरीत मजकूर अर्थात जपानीत , मी निरक्षर. मी ते चित्र दाखवून विचारल? त्यावर तिनी एका बस चा नंबर सांगितला . म्हटल, मुग्धाच्या रंगित गोष्टी सारख तिथवर पोचले की पुढचा पत्ता विचारता येइल. :)
2

बस मधून उतरून कॅसल च्या प्रवेश द्वारातून आत शिरले. पत्ता विचारण्यात वेळ घालवण्यापेक्षा रमत गमत फॉल कलर्स मधे रंगलेली पान पहात जाव असा विचार केला.

3

4

निंजा ड्रेसिंग ची परेड होती तिच्या बरोबर चालले थोडावेळ. सगळे बहुधा कॅसल च्या मुख्य प्रांगणातच चालले होते.

5

वाटेत एक पारंपारिक कपडे घातलेला घोळाका दिसला. मी परेड सोडून त्यांच्या मागे निघाले. :)
मंडळी एका देवळाअपाशी थांबली.

76

तिथे एक फोटोग्राफर दिसला. मोडक्या इंग्लिश मधे त्याला विचारल की नाटक आहे का ? का कल्चरल प्रोग्रॅम. तो म्हणाला लग्न आहे. आपुन खुश ! जपानी लग्न पहायला मिळणार! लग्नाच्या फोटोग्राफर ह्यापेक्षा अधिक चांगला वशिला कोण मिळणार मला . पण त्यानी माझ्या कडे 'येडी झाली का तू' अश्या स्वरूपाचा कटाक्ष टाकला आणि म्हणाला तूच काय मलाही आत एंट्री नाही ये. आता मी येझाकातू कटाक्षाची परतफेड करून टाकली. {) त्याला सांगितल आम्च्या इंडियात लग्नात , नवरा नवरीपेक्षा फोटोग्राफर महत्वाचा असतो. :)

ह्या गप्पा होइपर्यन्त वर्‍हाडी जमा व्हायला लागले. मुलीकडचे १०-१२ मुलाकडाचे तेवढेच. त्यातल्या एकाला विचारल , तुमची हरकत नसेल तर मला हा सोहाळा पहाता येइल का ? अत्यंत नम्र शब्दात त्यानी नकार दिला आणि समजावल. कुटुंबिय सोडून इतर कोणी देवळात येउ शकत नाही. पण तू नंतरच्या भोजनास अवश्य ये. मी मनातल्या मनात म्हटल माझा नवरा माझ्याबरोबर नाही हे बरय. माझ्या अश्या भोचकपणा (त्याच्या भाषेत गेटक्रॅशीग :ड ) करण्याबद्दल माझे त्याचे अगणीत वाद घडलेत. मी पडेल चेहेरा केल्यावर काका म्हणले ' देवळात नाही आलीस तरी खिडकीच्या उभ्या फटीतून पहा. आवाज मात्र करू नकोस, आणि फोटो काढू नकोस. ओक्के म्हणून मी आणि फोटोग्राफर खिडकीला नाक लावते झालो.

तेवढ्यात मुख्य प्रिस्ट आले. काय तो रुबाब!!

12

त्यांच्या मागुन दोघी असिस्टंट प्रिस्ट्स ! ह्या बासरी सद्रुश वाद्य वाजवून एव्हिल स्पिरिट्स (ह्याला भुताखेताना हा शब्द योग्य वाटेना) दूर ठेवतात.

8

ह्या तिघांचा मागोमाग नवरी आणि नवरा. नवरीचा लग्नाचा किमोनो ३२ किलो चा होता. आणि केसांचा टोप आणि त्यातल्या स्पेशल पिना ,मेकप तयारीला ३ तास लागतात म्हणे. ही माहिती पुरवणारा फोटो ग्राफर. आमच कस? तुमच कस? हो का? अगदी सेमच रे! अश्या स्वरूपाच्या गप्पा चालल्या होत्या.

दांपत्यापाठोपाठ नातेवाईक.

11

ही नक्की वरमाई आणि ती शेजारची तिची बहिण ! ह्यावर फोग्रा चकीत! तुला कस कळल? म्हटल तुमच आणि आमच सेम असत :) तोरा सेम :winking:

89

आतले विधी अत्यंत शांततेत गंभिरपणे चालू होते, हे मात्र आप्लया अगदी उलट गडबड आवाज गोंधळ नाही ते लग्न कसल? असो, इथे त्या दोघी बासरीवादक मुली मंद्र सप्तकात सूर लाउन होत्या. मुख्य भटजीबुवा एकदा नवर्‍यामुला समोर मग नवरी समोर उभे राहून मंत्र पुटपुटत होते. नंतर ३ ग्लासातून साके ठेवली गेली. नवरा नवरी नी ते प्यायले मग असेच ३ ३ सुंदर प्याले वर्‍हाडाचा समोर गेले त्यांनी ते प्यायले. आणि लग्न संपन्न झाले. इथे माझा नवा मित्र सरसावून उभा राहिला. अवजारं परजली आणि दरवाज्यासमोर पळाला. हे का ते कळलेच थोड्या वेळात. मुख्य भटजींनी दरवाजा उघडून नव दांपत्याला जगा समोर पेश केले.

13

915

टाळ्या वाजल्या. सख्यांचे मागुन अभिनंदनाचे चित्कार ऐकू आले. धार्मिक रितीरिवाज संपवून सोहाळा सुरू झाला. :) फोग्रा बिझी झाला , नवरीचा कपडेपट , मेकप , केशरचनाकार मुली सरसावल्या. तेवढ्यात ते परमिशन वाले काका दिसले. मुलाचे वडिल होते बहुधा. त्याना माझ्या पोतडीत असलेली छोटी गणपतीची मुर्ती दिली. एलिफंट गॉड पाहून काका खूष झाले. मी नवपरिणित दांपत्या चे अभिनंदन केले आणि काढता पाय घेतला.

एरवी कुठे जाणार असले की थोडीफार माहिती शोधलेली असते. पण हे अचानक दिसलेल इंद्र धनुष्य. नंतर,' समुराई लगिन' म्हणून गुगल देवाला साकड घातल तरी बरच कळल असत पण तस करावस वाटल नाही. फोटोग्राफर्शी मोडक्या इंग्लिश मधे मारलेल्या गप्पा, त्यातून हाताला लागलेले विविध रंग, समोर दिसलेला नव्या जोडप्याच्या डोळ्यातला आनंद , वरवधू पित्यांची कार्य सुखरूप पार पाडण्या साठी केलेली धावपळ, अन पार पडल्यावर चेहेर्‍यावर झळकणारी कॄतार्थता सगळे रंग झकास दिसत होते. मला अनपेक्षित दिसलेलं इंद्रधनुष्य!!

भटकंती ६

२०१२ च्या उन्हाळी सुटीत मी , माझा लेक , माझी मैत्रीण आणि तिची लेक असे जर्मनीच्या दौर्‍यावर गेलो होतो. टिनेजर मुल बरोबर ,त्यातही जर्मनी ला जातोय त्यामुळे गाड्या आणि फुट्बॉल अजेंडावर होतच. एक आर्कीटेक्ट म्हणून माझ्या लिस्टीत २ स्टेडियम होती . केव्हापासून पाहायची होती. फिरून अनुभवायची होती. हळूच मी , मैदानं बघायचीयेत ना ही पण दोन बघून टाकू म्हणून ऐनवेळी घुसवली.

जर्मनी मधे २ वेळा ऑलिंपिक होस्ट केल गेल. १९३६ आणि १९७२. नव्यानी स्टेडियम्स बांधली गेली. दोन्हीही त्या त्या काळात एक स्टेटमेंट करण्याकरता बांधले गेले.

१) पहिल स्टेडियम बर्लीनचे , खुद्द हिटलरनी फ्लॅगऑफ केलेले .त्याच्या राजकीय आय्डियॉलोजीज (विचारसरणी?) मांडण्याचे व्यासपिठ असा त्याचा वापर हिटलरला करायचा होता. सुप्रिम( सर्वोच्च?) सत्ता अन ताकद दाखवणारे रोबस्ट पिलर्स ( मजबूत खांब?) भव्य स्टेडियम! ऑलिंपिक कालावधीत प्रतिमा साफसफाई पण केली गेली, एका ज्यु अ‍ॅथलिट्चा जर्मन संघात समावेश अन शहरातील ज्युना प्रवेश्बंदीचे बोर्ड काढणे हे वानगी दाखल. (१९३६ ) .

मुळ बर्लिन शहरातून हॅकशयर मार्केट (उच्चार बहुधा बरोबर नसेलच :winking: ) नावाच सुंदर स्टेशन . तिथून ऑलिंपिक सिटीला जाणारी ट्रेन मिळणार होती. इतकं सुरेख जुन विटकाम होत की माझी फोटोग्राफी तिथेच सुरू. माझ्या लेकानी ' झालं हिच सुरू ' असा कटाक्ष टाकला. घरातल्या सगळ्यांचाच हिच्या फोटोत माणस शोधावी लागतात , हा आक्षेप आहे. असेना बापडे स्वतंत्र नागरिक आहेत. :winking:

1

हे त्या स्टेशनचे प्लॅटफॉर्म

c

तंगडतोड करायची तयारी होतीच . पण उतरल्यानंतर जवळ्जवळ २० मि चालून स्टेडियम पाशी पोचलो.
भव्य!! हा एकच श्ब्द सुचला पहिल्या दर्शनानंतर. ही प्रवेश कमान. ऑलिंपिक बोधचिन्ह मिरवणारी.

3
3

वास्तू कला हे एक माध्यम असत. बांधकाम करू इच्छीणार्‍याच्या मनात असलेल्या संकल्पना इमारतीच्या माध्यमातून पेश करायच्या. इथे तर टेबलापलिकडे खुद्द हिटलर. काळ १९३२ दर्म्यानचा , हितलरच्या राजकिय महत्वाकांक्षा थर्ड राइश च्या सुरवातीचा . पॉडबेल्स्की नावाचा प्लॅनर आणि वेर्नेर मार्च हा आर्किटेक्ट , यांनी हे शिवधनुष्य उत्तम पेललय. हे स्टेडियम नाझी आर्किटेक्चर्चा नमुना मानले जाते. कुठेही काहीही नजाकतीचं नाहीच, सगळ कस भव्य , मी सुप्रिम आहे हे जोरजोरात ओरदून ठसवणार. जागाही भरपूर असल्यानी ह्या वास्तूचा भव्यपणा ठसवायला आवश्यक अ‍ॅप्रिसिएशन सेट्बॅक पण भरपूर. ( मोठी असूनही पुर्ण इमारत कोणत्याही अडथळ्याविना नजरेत भरते. )

44

आत प्रवेश केल्यावर दिसतात ते कार्ल अल्बिकेर नावाच्या नाझी स्कल्प्टर ने केलेले हे खेळाडूंचे पुतळे.

4
5

मग मुख्य इमारत.

5
5

हे आतल मैदान,
6

6

आतल्या खेळ्पट्या व प्रेक्षकांच्या बैठकव्यवस्थेवरच छत वगळता इतर इमारत १९३६ मधिलच .

7
7

काही पहिल्यांदा घडलेल्या घटना, ह्या ऑलिंपिक बाबत, पहिला इलेक्ट्रॉनीक स्कोर बोर्ड! आणि पहिल्यांदा ग्रीस ला सुर्याच्या किरणांनी प्रज्वलीत करून ३०० रिले धावपटूनी बर्लिनला पोचवलेली ज्योत. ह्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्योत अश्याच प्रकारे आणली गेली.

8
l

मागे एका विस्तिर्ण पटांगणापलिकडे होता बेल टॉवर. बरोबरची मुलं आणि स्वतःचे पाय दोन्ही कुरकुरत असतानाही तेथवर जाउन ठेपलोच. टॉवरच्या वरच्या गॅलरीत टिकिट काढून जाता येतं . तिथून दिसलेल हे स्टेडियम .

9

6

क्षणभर डोळे मिटले तर, हेल हीटलरचे नारे, १०० मि. मधे सुवर्ण पदक जिंकलेला जेसी ओवेन्स, रंगसफेदीच्यामागे उमटणारे पिडीत ज्युंचे उसासे आणि नाझी भस्मासुराचे फुत्कार पण ऐकू आले.

10
n

२)दुसर स्टेडियम म्युनिक शहरातल. १९७२ ,साली जर्मनीला परत संधी मिळाली अन दुसर्‍या महायुद्धानंतर प.जर्मनीनी त्याचा उपयोग "जर्मनी हा देश लोकशाही तत्वावर चालणारा भविष्याबद्दल बद्दल आशावादी असणारा आहे " हे ध्वनित करणार स्टेडियम बांधून केला. इथेही गुन्थर बेनिश आणि फ्रेइ ओट्टो नावाच्या आर्किटेक्ट्नी झकास काम केलय. प. जर्मनीला द्यायचा संदेश इमारत स्वरूपातून पोचवायला पुर्ण यशस्वी. दुर्दैवानी , इझ्राईली संघाच्या संतापजनक कत्तलीनी हे ऑलिंपिक जास्त गाजले.
वजनाला हलक्या अश्या टेन्साइल स्ट्रक्चर्स चा (वन ऑफ द) जनक फ्रेइ ओट्टो. भल्या मोठ्या विस्तिर्ण अश्या कॅनॉपिज , प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेला पुर्ण आच्छदू शकेल असा एक्सपान्स असलेला , पारदर्शक अक्रेलिक काचांचा/प्लास्टिक चा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. जे स्वातंत्र्य, खुले पणा , लोकशाही जगासमोर मांडायची होती ती पुर्ण पणे जाणवत राहते ह्या प्रांगणातून फिरताना.
q
a

hs

d

जलाशय ,त्याभोवतालच्या पायवाटा, हिरवळ, ऑर्गॅनिक फॉर्म असलेले स्टेडियमचे छप्पर सगळे त्या ऑलिंपिकचे बोध वाक्य हॅप्पी गेम्स प्रतिध्वनित करत रहातात.

g
s
ह्याचाही कम्युनिकेशन टॉवर आहे. वर जाउन , ऑलिंपिक स्टेडीयमचा परिसर , दुर बायर्न म्युनिकच होम ग्राउंड, मधे पसरलेल म्युनिकच नेटक शहर दिसत.

h

k

s

दुसर्‍याबाजूला खेळाडूना रहाण्यासाठी बांधलेल्या डॉर्मिटरीज दिसतात.

इथे मात्र डोळे मिटायच धाडस झाल नाही. इज्राईली चमूची निर्दय कत्तल करून पॅलेस्टाइन नी गालबोट लावल होतं इथे, खेळ भावनेला.

असो ,
दोन्ही स्टेडिया एक विशिष्ठ विचारधारा ध्व्नीत करण्याकरता संयोजली गेली. वास्तूरचना ते ध्वनीत करण्यात यशस्वीही ठरली . ती मला जमतिल तशी मांडली.

टिपः कृष्ण धवल छायाचित्र नेट वरून साभार . इतर माझ्या मोबाईलवरून साभार. :)

भटकंती ७

विविध ठिकाणी पाहिलेल्या इमारती, वाचलेली पुस्तके , गंध, चाखलेले पदार्थ ,ऐकलेली गाणी याना एका माळेत बांधणार यडच्याप मन आहे माझ. वरवर पाहता एकमेकाशी काहीही संबध नसता देखिल एकामागे एक फ्रेम्स उलगडातात.

परवा 'तिरकी वाढलेली झाड' नावाच्या पुस्तकाचा उल्लेख झाला. थोर माणसं , आणि त्यांचे मातीचे पाय, किंवा आपाप्ल्या विषयात महामहिम पण माणूस म्हणून तोकडा, वगैरे मोजमाप अन फुटपट्ट्या ! अशी लाइन दोरी ओळंब्यात माणस बघावी का? सामान्यांचा अन थोरांचा ओळंबा वेगवेगळा असेल का? समतोल म्हणजे काय अन तो तराजू कोणाच्या नजरियाने पहायचा. वरवर ओळंब्यात दिसणार्‍या भिंती आभासी असतात का? असे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रश्न वर आले अन झर्कन डोळ्यासमोर आल्या फ्रेम्स एका मेमोरियलच्या . ओळंब्यात वाटणार्‍या समांतर ठोकळ्यांच्या फ्रेम्स , अन माणसाच्या अत्यंत टोकाच्या तिरकेपणाच एक ठोकळेबद्ध स्मारक !

६० लाख ज्युंच्या खुनाचे स्मारक! नावच अंगावर येतं .

राजधानी बर्लीन मधे ऐन मोक्याच्या, राइश्टाग (जर्मनी च संसदभवन म्हणाना) च्या शेजारी तब्बल पाच एकरा त निर्माण केलेल स्मारक.

बर्लीन ल जाताना नक्की पहायच्या यादीत, नॉर्मन फॉस्टर यांनी केलेल राइश्टाग च एक्स्पान्शन आणि पिटर आइन्मन यांनी केलेल हे स्मारक होतच. माझ्या जर्मन आर्किटेक्ट मैत्रीणीबरोबर हे पहायला मी गेले. निव्वळ तपशिल तर माहित होतेच. १९९५ पासून विविध स्तरांवर चर्चा , वाद विवाद होउन शेवटी ही ४.११ एकराची जागा नक्की करण्यात आली. पिटर आइन्मन ह्या आर्किटेक्ट नी ब्युरो हेपॉल्ड ह्या एंजिनियरिंग फर्म च्या मदतीने हे २७११ ठोकळ्याच स्मारक बनवल. ह्या तपशिलात काहीच खास नाही ,निव्वळ इमेजेस पाहिल्या होत्या त्यातही खडकीच्या वॉर सिमेटरी पेक्षा अद्भूत दिसल नाही. पण स्वतःला डिकन्स्ट्रक्टीव्ह म्हणवून घेणार्‍या आइन्मन यांच काम प्रत्यक्ष पहाण्याची /अनुभवण्याची उत्स्तुकता होती.

नाझींनी केलेल्या संहाराचा काळात सत्तेच केंद्र , अन हिटलर चा बंकर ह्यापेक्षा सुयोग्य दुसरी कोणती जागा सापडणार होती ह्या स्मारकाला! १९८९ मधे जर्मन एकीकरणाअनंतर , एक देश म्हणून , जनतेच्या ,नागरीकांचा आणि पर्यायाने राज्यकर्त्यांच्या मनात , नाझी भूतकाळ हा फार वेदनादायी, प्रसंगी डिफेन्सिव्ह व्हायला लावणारा इतिहास. बर्लीन मधे तर ठायी ठायी ह्याच्या खुणा दिसत रहातात. ह्या बाबतीतली आपली भूमिका काय हे उमजून ती भळभळ अशी खुनाच स्मारक म्हणून साकारणे हे खरतर धाडसाच आणि प्रगल्भ स्टेटमेंट आहे.

IMG-20120507-00236.jpg
ब्रॅन्डन बर्ग गेटाच्या थोडस पुढे गेल्यावर राइश्टाग इमारतीच्या शेजारी प्रथम दिसते ती जेमतेम तीन साडेतीन फुट उंचीच्या कॉन्क्रीटाच्या ठोकळ्यांची काटेकोर ग्रीड. ठीके ,हे अगदीच ढोबळ आहे , आइनमन च काहीच जाणावत नाहीये असा विचार करतच त्या ग्रीड मधे आपण शिरतो. दोन तिन ठोकळे मागे टाकले की ठोकळ्यांची उंची वाढल्यागत जाणवते. आत शिरताना तर सगळे ठोकळे एकसारखे वाटले होते की या संभ्रमात अजून एक दोन ठोकळे मागे टाकतो आपण .अजूनही आपण बुद्धी शाबुत आणि सिच्युएशन इन कंट्रोल याच विचारात . जरा डावीउजवीकडे वळून पाहू म्हणून काटाकोनात वळून पुढे सरकल की ,ठोकळे ,त्यांच्या टेक्श्चर मधे ही काहीच फरक नाहीये की ,आकार पण सेमच दिसतोय , काय बर सांगायच असेल यातून असा विचार करेपर्यंत ठोकळे आप्लयापेक्षा उंच होतात आणि शब्दशः पायखालची जमीन सरकते. पोटात पहिला खड्डा पडतो, चारी बाजूना पाहिल्यावर लक्षात येत की बाहेरच्या जगाशी आतापर्यंत असलेला व्हिज्युअल संबंध संपलाय आणि १० -११ फुटी अजस्त्र काँक्रीटाचे ठोकळे अंगावर येतात , दडापून टाकायला बघतात . ठोकळे ,आतापर्यंत जाणावलेला काटेकोरपणा अन तोल सोडून वेडेवाकडे दिसायला लागतात. एक शिरशिरी येते आणि भीती राज्य करायला लागते मनावर, इन अ मोमेन्ट यु आर नो मोअर इन कंट्रोल ऑफ द सिच्युएशन . पायाखालच पेव्हिंग खाली जाताना दिसत. तोवर उजवीकडे, डावीकडे, सरळ ,मागे करत आपण त्या गर्तेत शिरत जातो, प्रत्यक्षात संथपणे चालत असलो तरी मनातल्या मनात जिवाच्या आकांतानी बाहेर पडायच असत. ह्या जगातून बाहेर , माझ सुरक्षित , उबदार आणि प्रेडिक्टेबल जग. पाच एकरातून बाहेर दुसर्‍या टोकाला पोचेपर्यंत, ह्या थंड , अंगावर येणार्‍या ठोकळ्यां च्या माध्यमातून आइन्मन काकांच इंटर्प्रिटेशन अनुभवतो आपण. दुसर्‍या टोकाच्या जवळ जाताना बाहेरच जग , आपल जग दिसल की निश्वास सोडतो आपण , संपल हे स्वप्न म्हणून. रस्त्याच्या कडेला , सगळ्यात शेवटाल्या बुटक्या ठोकळ्यावर बसून उजळणी होते मनातच, नुकत्याच घेतलेल्या अनुभवाची, माहित असलेल्या इतिहासाची , आणि आज अजून काहीही नको म्हणत पावल घराकडे वळतात.

अत्यंत थंड डोक्यानी , पद्धतशिर यंत्रणे सारखा राबवलेला हा नरसंहार , वर्तमानात त्याबद्दलची जर्मनीची भूमिका, पश्चात्ताप, अजूनही जगात ह्या आणि ह्यासारख्याच नरसंहाराच्या बाजूनी मत देणारे जनसमुदाय, होलोकास्ट सारख्या घटना असलेली इतिहासाची पान पटकन उलटून पुढे जाउ पहाणारे , नाकारणारे लोक, ह्या सगळ्याना एका अमुर्त , अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीनी अनुभवायला लावत हे स्मारक. हा दुष्टावा, पराकोटीची क्रुरता , ह्याच तुमच्या जगाचा भाग होती, आणि अजूनही आहे हे जाणवून देत हे स्मारक. कोणतेही कूंपण नाहीये इथे , बस स्टॉप च्या बाकड्याच्या उंचीचे ठोकळे भर रस्त्यावर आणि ह्याच वर्तमाना चा भाग म्हणून तिथे उभे आहेत. ही कृरता , तिरकेपण , ह्याच रोजमर्रा जगाचा एक भाग आहे . अत्यंत सोयिस्कर पणे आपण ह्या तिरकेपणाकडे बोथट जाणिवानी पाहतो, आजूबाजूला तो असू देतो, हे प्रतिध्वनित होत राहत.

ह्या स्मारकाची ही काही प्रकाशचित्रे, पण ह्यातून काहीच उमजत नाही, त्या पिलर्स च्या जंगलात पायी फिरून घेतलेला अनुभव प्रतिध्वनीत होउन आदळात रहातो मनावर. एक समाज म्हणून ह्या इतिहासाला सोइस्कर्पणे गुंडाळून बासनात ठेवताना हेही लक्षात घेतल पाहिजे की हा तिरकेपणा अजूनही आहे आजूबाजूला . आणि जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.

2

3

IMG-20120507-00232.jpg

भटकंती ८

भटकंती - ८ तदाओ आन्दो .

आर्किटेक्चरला असताना कॉलेज ला दांडी मारून केलेले उद्योग पण समृद्ध करणारे होते.

उगाच एम८० वर डेक्कन वरून , मुळशी, कोंढवा, बाणेर वगैरे उन्हात भटकून तथाकथीत कंटेपररी ( पुण्यात चुकार एखाद दोनचार उदाहरण वगळता दुष्काळ होता तेव्हा ) आर्किटेक्चर चा अभ्यास! कंटेम्पररी , समकालीन हा शब्द आवडायला लागला होता. एक प्रकारच सबकल्चर/ कल्ट होउ घातलेले आम्ही काही बॅक बेंचर्स! पुण्यात काहीही नाही ह्यावर शिक्कामोर्तब करून, जगात इतर आर्किटेक्ट कसे विचार करतात , व्यक्त होतात , रुढ पायंडे मोडताना काय आणि कसा संघर्ष करतात. हे समकालीन नमुने बाकी कुठे कुठे काय आहेत? ह्याचा शोध चालू झाला.
हे असले प्रकार बॅक्बेन्चर्स च करू जाणतात. हाहा . नाहीतर कंटेम्पररी आर्किटेक्चर नावाच एकही विषय अभ्यासाला नसताना उगा मुर्खासारखी यातायात कोण करेल?

नव्वदच्या दशकात पुण्यात आर्किटेक्चर कॉलेज २ आणि तिथल्या लायब्ररीज अत्यंत बेसिक. मग सापडली ब्रिटिश काउंसिल ची लायब्ररी. ( फक्त ब्रिटिश पब्लिकेशन्स असायची पण त्यातही, कॉलेजला दांडी मारून , रेफरन्स सेक्शन च्या गार हवेत , चार्ल्स जेन्क्स आणि त्यांची पोस्ट मॉडर्निझम बद्दलची पुस्तकं , लॅन्ड्स्केप्स बद्दलची पुस्तकं , बॅनिस्टर फ्लेचर चा ठोकळा, फोटोग्राफीबद्दलची पुस्तकं ,असंख्य डिझाइन आणि आर्किटेक्चरची मासिक वाचलीत . अजूनही एखादा रेफरन्स आठवताना रेफरन्स सेक्शन मधील शांतता, गार हवा , कारपेटवर आवाज न करता सरकणार्या निळ्या खुर्च्या , अन सुशेगात वाचलेल ते पुस्तक असच आठवतं .

अश्याच एका निरुद्देश वाचनात अवचित सापडला तदाओ आन्दो नावाचा आर्किटेक्ट . ( तडाओ आन्डो अस म्हणायचे मी तेव्हा)
हैला हे भारीये ! अस मनातल्या मनात म्हणायच्या ऐवजी आवाजी बाहेर पडल्याने लायब्ररियन ने डोळे वटारले. मग मी रुपाली अन अतूल टपरीच्या चहाबरोबर आन्डो सान ना घेउन बसलो.

चर्च ऑफ लाइट नावाच सुबक लहानस स्ट्रक्चर! तिथुन ह्याच्या डिझाइन्स्च्या प्रेमात पडण सुरु झाल. नन्तर कामानिमित्त केलेल्या जपान प्रवासात, आवर्जून पाहिली त्यांची डिझाइन्स. वाचलेल अनुभवण तितकच मस्त.

जपान ला जायची पहिली संधी मिळाली तेव्हाच काय काय नक्की पहायच ह्याची लिस्ट करून ठेवली होती. काम फक्त तोक्यो मधे असणार होतं, त्यामुळे आन्डो सानची २१-२१ डिझाइन साईट पहायच ठरवल.

जपान मधल्या दहा पैकी आठ जण तोक्योत अस गमतीनी म्हटल जातं. जगातली सर्वात घनदाट लोकवस्ती असलेल महानगर. आकाशाला गवसणी घालणार्‍या इमारती अन दिवसाच्या कोणत्याही प्रहरी ओसंडून वाहणारे रस्ते. ह्यातल एक हॅपनिंग उपनगर आहे रोप्पोन्गी. बरेचसे ठिपके जुळत जुळत ही इमारत उभी राहिली. डिफेन्स च्या ताब्यातली एक मोकळी जागा होती. समकालीन कलाकाराना तथाकथीत अंगावर येणार्‍या विकासात जपानीपण हरवतय अशी खंत होती . एस्थेटिक्स /सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणार व्यासपीठ असाव ही मागणी होती. इसे मियाके नावाच्या अंतरराष्ट्रीय किर्तीच्या फॅशन डिझायनर नी आन्डो च्या सहाय्याने पहिला प्रस्ताव मांडला अन सगळे टिपके जुळायला सुरवात झाली. २००२ पासून सलग २- २.५ वर्ष एकामागोमाग एक संकल्पना सादर केल्या गेल्या. अन अखेर २००५ मधे कामाला सुरवात झाली . बर्याच अडचणी होत्या. जागा ,मैदान अथवा खुली जागा म्हणून आरक्षित होती. त्यामुळे बहुतांश भाग जमिनी खाली असण अपेक्षित होतं .आजूबाजूच्या उंच इमारतींच्या गर्दीत ही पिटुकली इमारत हरवण्याची भिती होती.

संकल्पना होती पिस ऑफ क्लॉथ , कापडी रुमाल. ओरिगामीच्या घडीची आठवण करून देणारा . मियाकी इसे यांच्या संकल्पने प्रमाणे एक साध कापड, जरुरीप्रमाणे, अन ते कापड वागवणार्या माणसाच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे, वेगवेगळी रुपडी धारण करतं. दोन चौकोन डायगोनली दुमडून उंच सखल मैदानावर, मावतील तसे ठेवले , इतक सोप आणि सहज .

2

वास्तुविशारदाच्या पुढे बरिच आव्हान असतात , एखाद्या शिल्पकारानी शिल्प घडवाव तशीच वास्तू विशारद इमारत घडवत असतो, पण संकल्पनेच्या पुढे जाउन त्या संकल्पने ला तांत्रीक चौकटीत बसवणे , नगरविकासाच्या जटिल आकडेमोडीत बसवणे , एक कंपोझिशन म्हणून आसपासच्या इमारती ,निसर्गाला पुरक असणे , त्या पलीकडे जाउन संकल्पने तली सहजता न हरवता ती इमारत म्हणून प्रत्यक्षात आणणे. ह्या सगळ्या आघाड्यांवर आन्दोसान पुर्णपणे यश्स्वी होतात.

एखाद्या वास्तुविशारदाच काम सुरु होतं ते जागेच्या वापराच नियोजन करण्यापासून. मग नियोजन आतलया जागेच, त्यांच्या एकमेकांशी संबंधाच , छायाप्रकाशाच. त्या बिल्ट अन्बिल्ट च्या गोफ विणत ,बांधकाम साहित्य कोणत ? त्याचा पट मांडणे, त्यांचे पोत , रंग कंपोज करणे . ह्या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ती वास्तू वापरणार्या , तीच्या असण्यानी ज्याना , किंवा तस असण्यानी कोणाकोणाला कसा कसा फरक पडतो त्याचा विचार , अभ्यास.

ह्या सगळ्या मुद्द्याना अत्यंत समर्थ पणे पेलत २१-२१ डिझाइन साईट साकारली आहे .
नियोजीत इमारती मागे उंच झाडांची रांग योजल्यामुळे , काँक्रीट अन काचेच्या टोलेजंग इमारतींच्या गर्दीच्या स्कायलाइन ऐवजी हा हिरवा बॅक्ड्रॉप बहार आणतो.

1

3

4

अत्यंत काळजीपुर्वक जोपासलेल्या हिरवळीच्या मैदानातून एका पायवाट आपल्याला ह्या सुबक ठेंगणीच्या दिशेनी नेते . इमारतीचा बहुतांश भाग जमिनी खाली असल्यानी सामोर्‍या येतात त्या दोन मोठ्या स्टीलच्या त्रीकोणी प्लेट्स.
b

हे रूफ! अलगद उतरत हिरवळीला येउन भिडणारं. आत प्रवेश केला की एक लहानसा स्वागत कक्ष आणि खाली उतरणा र्‍या पायर्‍या.

roof

खालचा उलगडलेला मजला अनपेक्षित मोठा हॉल आहे. ज्यात दोन गॅलरीज ( कक्ष म्हणा हव तर) आहेत. एक त्रिकोणी कोर्टयार्ड खाली उजेड पोचवत . आणि तळघरातल्या हॉल्स मधे असल तरी बंदिस्त वाटत नाही.

s
staircase to basement

मी दोनदा जाउन आले तिथे, प्रत्येक वेळी गॅलरीज मधे कॉन्टेपररी आर्ट , स्कल्पचर्स , पेंटिंग्स ची फिरती प्रदर्शने होती, होतकरू कलाकार आवर्जून हिरीरीने चर्चा करत होते . सर्व वयोगटातील, हौशी , व्यावसायीक , कलाकार समिक्षक , स्टुडन्ट्स चा सहभाग जाणवला .मला अगदी युटोपिअन वाटल हे सगळ.

6
exhibition

8

तिथे स्वागत कक्षामधे आन्दो सान च एक पत्र वजा निरोप आहे. हा प्रोजेक्ट का अन कसा केला ह्याबद्दलच . त्याचा थोडक्यात सारांश असा,

"माझी अशी ठाम समजूत आहे की जपान हे अस एक राष्ट्र आहे की त्याचा र्‍हास होण उर्वरीत जगालाही घातक होइल. ह्याचाच अर्थ जपानच जपानीपण , एस्थेटिक्स जतन केलं पाहिजे. इथे ,एस्थेटिक्स म्हणजे जबाबदारीची जाणीव, न्यायाची जाणीव, सभोवतालच्या वातावरणा बद्दल , लोकांबद्दल संस्कॄती बद्दल आदर हे सगळ आल . पर्यावरणाबद्दल , जगण्याबद्दल , जिवनाबद्दल कृतज्ञता आली. आणि हे सगळ जपानीपण जतन करायचय आपल्याला
१९६० नंतरच्या वाढत्या आर्थिक सुबत्तेबरोबर , नफेखोरी हे सुत्र बनत चालल आहे. ह्या नव्या जिवन शैलीत सुबत्ता , पैसा असणे हे महत्वाचे बनत चालले आहे, जिवनाची जुनी मुल्य नाहीशी होतायत, तोक्यो मधल्या कोणत्याही रस्त्यावर उभ्या टोलेजंग काचेच्या इमारती जपानी आहेत का? सुंदर आहेत का? आपल्या पुढच्या पिढीला आपण जपानीपण म्हणून काय देणार?
मला अशी सुंदर वास्तू रचायची आहे, ज्यात जपानी पण काय आहे , सौदर्य, त्याची समज , नवे विचार ह्यावर चर्चा होइल,
हा प्रोजेक्ट म्हणजे माझ्या त्या स्वप्नाचे मुर्त रूप आहे. सहज सरल जपानी समकालीन सौंदर्यवृत्तीच उदाहरण म्हणून आपण. आणि सभोवतालच्या सवंग प्रदर्शन करणार्‍या देखण्या फसाडस् वर उतारा पण. " - तदाओ आन्दो.

एक राष्ट्र म्हणून आपली ओळख , एस्थेटिक्स जपल पाहिजे, आणि तेवढच नाही तर ते जपणं म्हणजे जुनं ते राखून म्युझियम्स बनवणे नसून , समकालीन विचारानी ते समृद्ध करणे. आहे हे जाणणे, चळवळ बांधून त्यात नव्या पिढीलाही ओवणे हे महत्वाच काम आन्दो सान करतात. मला विद्यार्थी असताना भावलेले आन्दो सान , आता मी स्वतः प्रॅक्टीस करताना अजून मोठे भासतात !!

भटकंती साडेआठ.

भटकंती - ८.५

तदाओ आन्दो.

तदाओ आन्दो नावाच गारुड एखाद्या लेखात मावणारं नाहीच. म्हणून हा साडे आठवा लेख.

अवचित सापडलेला एखादा सिनेमा भावतो आणि त्या दिग्दर्शकाच झाडून सगळ शोधुन पाहाव लागत ना , तसच झाल ह्या आन्दो सान च. 'चर्च ऑफ लाईट ' चे फोटो अन लहानसा लेख सापडला अन शोधयात्रा सुरु झाली. विद्यार्थीदशेत जे सापडल ते अनुभवांती उमजायला लागल. आणि नंतर त्या इमारती प्रत्यक्ष पहाण्याचीही संधी मिळाली.

मला स्वतःला अस वाटत की प्रत्येकाची ; आजूबाजू, घटना, परिस्थिती ला रिअ‍ॅक्ट करण्याची पद्धत वेगळी असते. वाचलेल्या पाहिलेल्यातन काय उमजल त्याचे काय अन कसे पडसाद उमटले हेही वेगवेगळ असत. पुढे जाउन ते मनात चिंतले जातात, मनात ( माइंड अ‍ॅन्ड इंटलेक्ट) मोठे होतात, त्याचे कवडसे कामात , लिखाणात पडायला लागतात. ही प्रोसेस कशी झाली असावी हे उलगडून पहाणे मोठे रम्य असते. हे उलगडून पहाणे कुठेतरी आपल्यालाही समॄद्ध करत असते.

आन्दो सान च्या बाबतीत , त्यांच्या कामांमधील सहजता , सरलता आणि आशयाच्या मांडणीतला थेट्पणा भावणारा आहे. मुळात काय करू पहातोय हे सुस्पष्ट्पणे समजलेल असण हा भाग महत्वाचा . त्यानंतर ते तेवढ्याच स्पषपणे मांडता येणे . तो स्पष्टपणा क्लिष्ट नसण हे त्याच्या पुढे.

आन्दो सान थेट त्या इमारतीच्या प्रयोजनापर्यंत नेउन तो गाभा इतका सरल करून मांडतात की त्यावर अन्य काही भाष्य करायची गरजच पडू नये. अगदी ते अवकाश वापरणार्‍या सामान्य माणसापर्यंतही ते सहज पोचत.

आन्दो सान च्या बाबतीत ' आपण हे का आणि काय करू पहातोय ची उत्तर त्यांच्याच एका निबंधात मिळाली. शाळा कॉलेजातल्या फॉर्मॅटिव्ह वयात , बॉक्सिंग करणे ते अर्थर्जनासाठी ट्रक चालवणे ही काम करत असताना , तोक्यो युनिव्हर्सिटी मधील विद्यार्थ्यांच बंड त्यासाठी त्यांनी दिलेला लढा , त्याचे सगळ्या जपानात पसरलेले लोण अनुभवल . हे जपानातल्या बर्‍याच इतर युवकांप्रमाणे ह्यानीही पाहिल. त्यातली रुजलेली बाब म्हणजे, मुक्त आणि समान समाजासाठी झोकुन देउन दिलेला लढा. किंवा एखाद्या मनापासून पटलेल्या जिवनमुल्याप्रती प्रतिबद्ध (कमिटेड) असणे. समाजात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्त होण्याची गरज जाणावली पण माध्य्म कोणत हे मात्र कळत नव्हतं. १९६० च दशक . आर्किटेक्ट केन्झो तांगे ( जपानातील मॉडर्न आर्किटेक्चरचे जनक ) यांच्या कारकिर्दिचा सुवर्णकाळ. त्यानी डिझाइन केलेल हिरोशिमा पिस सेंटर. अण्विक हल्ल्याबद्दल चा संताप , गेलेल्यांबद्दल सद्भावनापुर्वक प्रार्थना , अन झाल्या घटनेबद्दलचा मानवतेच्या भुमिकेतून वाटणारा पश्चात्ताप ,हे सगळ त्या हिरोशिमा पीस सेंटर मधे लॅन्डस्केप च्या माध्यमातून माण्डलय . जे सर्व सामान्यापर्यन्त ही थेट पोचत. इथे आन्दो सान ना लख्ख पणे उमगल हे व्यक्त होण वास्तू रचनेच्या माध्यमातूनच करायच.

माध्यम ठरल्यानंतर चा भाग काय व्यक्त करायचय? कोणातही औपचारीक शिक्षण नसताना आन्दो सान नी स्टुडिओ थाटाला १९६८ मधे. हा काळ वेगानी आर्थिक प्रगती करणार्‍या , कामात झोकुन दिलेल्या समाजाचा काळ . ह्या वेगात वाढणार्‍या समाजाला बांधणार एक सोशल फॅब्रिक असाव ,सोशल कॅरॅक्टर , पब्लिक कॅरॅक्टर,उमटाव अस काम करायच . ह्याच सुत्राभोवती आन्दो सान नी काम केल .अगणित संकल्पना चित्रे बनली , अन इमारती उभ्या राहिल्या .

नुसती इमारतच नाही तर त्या इमारतीमुळे तयार होणार्या इतर अनबिल्ट जागा ह्याही परिसराला एक कॅरॅक्टर बहाल करतात. अन तश्या जागा जाणिवपुर्वक प्लॅन करून त्या परिसराला कॅरॅक्टर बहाल करणे , हे पब्लिक कॅरॅक्टर. इमारतीच्या लहान मोठेपणावर , तिने उमटणारा ठसा अवलंबून नाही ह्या ठाम विचारानी आन्दो सान नी . अगदे लहानस रो हाउस ते मोठमोठी म्युस्झियम्स , शाळा , लाय्ब्ररीज, कम्युनिटी सेंटर्स , प्रार्थना स्थळ. हाउसिंग कॉम्प्लेक्सेस देखिल साकारले आहेत.

असच एक लहानस प्रोजेक्ट - चर्च ऑफ लाइट.

इबाराकी नावाच्या लहान्श्या खेड्यातल्या लोकाना एक चर्च बांधायच होतं. लहानस . १२०० स्के.फुटाच. पैसे , चर्चच्या सदस्यांनी वर्गणी म्हणून गोळा केलेले. ह्या आधी केलेली चर्चेस मोठ्या आवारात , मानव अन निसर्गाच नात मांडू पहाणारी , जागा वापराच नियोजन पुर्णपणे आर्किटेक्ट वर सोपवणारी अशी होती . इथे मात्र , तुटपुंजे पैसे अन रस्त्यालगतची निमुळती आडनिड्या आकाराची लहानशी जागा . मात्र तिथल्या लोकाना , अश्या एका सार्वजनिक स्वरुपाची जागा ,प्रार्थना स्थळाची गरज अन त्यांची ते उभ करण्याची कळकळ पाहून आन्दो सान नी लगेच हे काम स्विकारल. जवळ पास वर्षभराच्या कामाच फलित म्हणजे हे चर्च. अत्यंत साध अन सोपं.

लहानशी जागा अन त्याहून लहान बजेट मधे एखादा आयताकृती हॉल तयार होईल पण त्यातून पावित्र्य , लिनता कशी प्रतीत करावी? ह्या लहानश्या गावातल्या उत्साही समुदायाला त्याना हव ते कसं द्याव ? त्यातून तयार झालेला आकृतीबंध हा असा .
एका ६ क्ष*१२ मि च्या आयताकृती कॉन्क्रीट्च्या भिंतीना एक तिरका छेद , तोही एका कॉन्क्रीटच्या भिंतीचाच.
आतल अवकाश (स्पेस) म्हण्जे एक मोकळा हॉल, तिथे (बांधकामाच्या साईट्स वर वापरल जाणार) सेडार लाकडानी बनलेले लाकडी बाक सोडून आत काहीच नाही. मिनिमलिस्टीक!!! बजेट लहान , तुटपुंज होत म्हणून नाही तर आशयाशिवाय कोणतीच अनावश्यक बजबज नसावी म्हणून!! समोरच्या भिंतीत क्रॉस च्या आकाराच्या स्लिट्स ! बास, कोणताही अलंकरण नाही. सजावट नाही. त्या क्रुसाच्या आकारा मधून झिरपणारा प्रकाश हे एकमेव प्रकाशाच माध्यम . आतल्या अन आतल्यांच्या तिमिराला दूर करणारा उजेड . "चर्च ऑफ लाईट"

एक साध्या काँक्रीटाच्या बॉक्स मधे , हा उजेडाचा क्रुस , नाट्यपुर्ण रितीने , निसर्गाच पावित्र्य भरून टाकतो.

1

2

3

4

5

6

7

टिप : हे चर्च त्या गावाच खाजगी आहे. ओसाका पासून बरीच मजल दरमजल करत पोचव लागत. पुर्व परवानगी घेउनच भेट देता येते अन फोटो काढ्ता येत नाहीत. त्यामुळे हे सर्व फोटो माझ्याकडच्या एका पुस्तकातून घेतले आहेत. २ आंतर्जालावरून.

भटकंती - १०

भटकंती -१०

भटकेपणा बर्‍याच प्रकाराचा असतो. प्रत्यक्ष पायपीट हा मनापासून आवडणारा प्रकार असला तरी मनातल्या आठवणींबरोबर केलेली भटकंती त्याहून मनाजवळची अन हृद्य!
अश्या बर्‍याच जागा आहेत जिथे फक्त मनातच जाता येतं. माझं लहानपणीचं घर. वर्तमानात जिथे आता एक अपार्ट्मेंट उभं आहे. तोक्यामधलं एक सुंदर तळं, त्यात पानगळीच्या सुंदर रंगांचं प्रतिबिंब पाहता पाहता मला मनाचा तळ दिसला होता. लहानपणीचे आजोळचे घर, लहानपणीचीच पर्वती! आठवणीतली सफर. :)

हे भटकणं म्हणजे फक्त ती निव्वळ जागा नसून, जागा, माणसं, आवाज, खादाडी, गंध ह्या सगळ्यांच्या आठवणींचं मस्त मिश्रण असतं! अश्या आठवणीतल्या जागा परत पाहायचा योग आला तर ते एकाच वेळी दुखरं अन तरीही हवंसं फिलिंग असतं!

अमदाबाद, अशीच एक मनातली जागा.

१९९३ फेब्रुवारी, टपरीवर चहा पिताना गप्पा झाल्या ट्रेनिंगला अमदाबादला जायचं, बोलीभाषेत अम्दाबादच! आर्किटेक्चरच्या चौथ्या वर्षाला एक टर्म कोण्या आर्किटेक्टच्या ऑफिसात काम करून, हवेत गेलेल्या कलाकारांना जमिनीवर आणायचा, हा युनिवर्सिटीचा स्तुत्य उपक्रम आहे! तर 'औकातीच्या बाहेर गमजा मारणे' हा आमचा आवडता टाईमपास चहाबरोबर नेहेमीप्रमाणे चर्चेला होता. स्वतःवर अत्यंत खूष असणे, जगात काहीच अशक्य नाही ,अन हे सुंदर जग आता आपलीच वाट पाहतंय, की ये अन मला पादाक्रांत कर, अश्या बाळबोध गोड गैरसमजूतींनी ओतप्रोत भरलेलं, उबदार घरट्यात सुखरूप बसून, उंच उडायची स्वप्न पाहणारे मस्त रंगीत वय अन दिवस होते ते. जायचं तर जगात भारी आर्किटेक्टकडेच हे ही नक्की होतं ( आपापलंच ! :dd: ) मी अन रुपालीनी लिस्ट केली अन सरळ पत्र पाठवून दिली. तेव्हा मेल पाठवणे वगैरे जमाना यायचा होता. माहितीचा स्त्रोत छापिल पुस्तके अन माणसे हा असायचा. दोन आठवडे उत्तर आलं नाही म्हटल्यावर प्रत्यक्ष जाऊन येऊ, असं ठरवलं. आता प्रवास करायचा म्हटल्यावर घरी सांगणे, विचारणे प्रकार आला. अहिंसा एक्स्प्रेस तेव्हा मंगळवारी अन शुक्रवारी धावायची. पुणे-अहमदाबाद. जायचं नक्की केलं तो सोमवार म्हणून शुक्रवारी जायचं ठरलं. पुणे स्टेशनला जाऊन तिकीटं काढली. अन कॉलेजात कर्मधर्मसंयोगानी भेटलेल्या एका प्रोफेसरांनी सुचवलं म्हणून त्यांनीच दिलेली रेकमंडेशन लेटर्स न्यायचं ठरवलं. तिथे शिकत असलेले सिनियर्स एखादा दिवस राहायला देतील, अशी कल्पना होती. नैतर लांबच्या नातेवाइकांचा पत्ता होता. (आज विचार करताना मला माझ्या पोकळ आत्मविश्वासापेक्षा, आईच्या धारिष्ट्याचं नवल अन कौतुक वाटतं). तिथे जाताना केलेल्या कामाचं बाड (पोर्ट्फोलिओ) बरोबर घेतला होता. एव्हाना टर्म संपत आली होती पण शेवटपर्यंत काम चालू, हा बाणा असल्यानी अपूर्ण शिट्स होती. मी अन रूपालीनी ती चक्क ट्रेनमधे रंगवून पूर्ण केली होती. आजूबाजूच्या प्रवाश्यांना करमणूक! कालूपूर स्टेशनावर पाठीवर सॅक अन काखोटीला पोर्ट्फोलीओचं बंडल, अश्या आम्ही उतरलो, अन तिथे आमच्या 'अमदावाद इरा'ला सुरवात झाली . :)

लिस्टप्रमाणे ६ आर्किटेक्ट्सकडे जाणार होतो, अन शेवटी बी. व्ही. दोशी यांच्या 'संगाथ' या स्टुडिओला भेट (इथे काय आपला पाड लागणार नाही, तेव्हा फक्त पंढरीला गेल्यावर विठूरायाला 'हाय' म्हणायचं इतकंच ठरलं होतं.) असा दिवसभराचा प्लॅन होता. माझ्या डोक्यात तेव्हा आर्किटेक्चरल जर्नॅलिझम वगैरे चालू होतं. यथावकाश मला अन रूपालीलाही एकेक आवताण मिळालं. दिवाळीनंतर रूजू व्हायचं होतं. काम संपून भटका मोड ऑन झाला. अन पहिलं ठिकाण सेप्ट (स्कूल फॉर एन्व्हेरॉन्मेंटल प्लॅनिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी), खुद्द दोशींनी प्लॅन केलेलं अन स्थापिलेलं बेस्ट आर्किटेक्चरल कॉलेज! तिथे आमचे काही सिनियर्स शिकत होते. गेटापाशीच भेटले अन त्यांनी सुचवलं आधी दोशींच ऑफिस पाहून या, मग इथे जरा आम्हाला सबमिशनला मदत करा. मग काय निघालो. ते पोर्टफोलीओचं बाड तिथेच ठेवायची बुद्धी सुचली नाही, हे बरं झालं. कारण संगाथ (दोशींच ऑफिस)ला हातातली बाडं पाहून आमची ही मुलाखत झाली. अन सिलेक्शन लिस्ट जाहिर होईपर्यंत बाहेर थांबायला सांगितलं. दोशींकडे इंटर्व्यु देऊन आलो यार!! हे पण मोठंच पुण्य कमवलं की! तेवढ्यात राधिकाबेननी, (दोशिंची मुलगी ही पण आर्किटेक्ट आहे) सिलेक्ट झालेल्यांची लिस्ट वाचली. चक्क माझं नाव झळकलं होतं त्यात. बातमी पचनी पडेपर्यंत आम्ही दोघी गेटाबाहेर. दोशींनी कार्बुसिएकडे काम केलंय म्हणजे आपले आजोबा गुरुजी झाले की ते आता! मी जवळपास ट्रान्समधे! विजय रस्त्यावरच्या एका पब्लिक टेलिफोनवरून आईला फोन करून बातमी सांगितली अन अस्मादिकांचा रथ चारंगुळे वरून ग्लाइड झाला म्हणा, पुण्याला येइपर्यंत.

पुण्याला कॉलेजात येऊन चालू सेमिस्टरची परिक्षा देणे, वगैरे निव्वळ फॉर्मॅलिटी! मी पोचले होते तिथे ऑलरेडी! ही जायची संधी मिळाली तेव्हाची युफोरिक परिस्थिती, अन त्यानंतर तिथे घालवलेले जवळजवळ ८ महिने!! कामाचा अनुभव मिळाला, हा निव्वळ छोटासा भाग म्हणावा इतका डोंगरभर जगायचा अनुभव, मिळालेलं मैत्र, माझी धन्नो (एम ८०) घेऊन केलेली भटकंती, केलेल्या प्रत्येक कृतीला मी अन मीच जबाबदार असणार आहे, ही भलतीच जबाबदारीची जाणीव, चार रुपये तास असा मिळणारा पगार अन शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ केलेली एक्स्कर्शन्स! माझा, आजवरच्या आयुष्यातला सगळ्यात आवडता कालखंड!

घरी, आधी माझे आईबाबा बहिणी, मग नवरा; बोलता बोलता डोळे चमकले की, आता अमदावादच्या सुरस कथा आख्यान लागणार, हे समजून घ्यायचे. :) त्यानंतर त्यापेक्षा मोठं जग पाहिलं, व्यक्ती म्हणून, आर्किटेक्ट म्हणून जबाबदार्‍यांचे विविध रोल निभावले. अन आता जवळपास २५ वर्षांनी, माझा लेक त्याच वळणावर उभा दिसला. घरट्याबाहेरचे स्वप्न घरट्यातून पाहणारा! एक अमदावाद ट्रीप झालीच पाहिजे, असं वाटलं... आमच्या ढीग गप्पा होतात नेहेमी, अन (ऑल्मोस्ट) कूल मॉम आहेस, असा किताबही आहे खात्यावर. पण, तेव्हाच्या इन्नाची स्टोरी सविस्तर सांगितलीच नव्हती कधी. मग एका विकेंडला ठरवून टाकली ट्रीप!

ट्रीप म्हणजे दोन समांतर ट्रॅक चालू होते मनात. पुणे एअरपोर्टला बोर्डिंगची वाट पहाताना, जहांगिर हॉस्पिटलच्या समोर, जलाराम ट्रॅव्हल्सची बस अन सॅक पाठीवर लावलेली एक मुलगी अन तिला सोडायला आलेलं खानदान आठवत होतं. आईनी फार सुचना दिलेल्या आठवत नाहित, तिनी तोवर जाणता (माझ्या) अजाणाता शिकवलेल्या, रुजवलेल्या गोष्टींवर अन बहुतेक माझ्यावरही विश्वास असावा! अहमदाबादला तेव्हा मला जागा शोधेपर्यंत रहायला, एका ओळखीच्यांच्या मुलाच्या मित्राच्या आजोळी बोलून ठेवलं होतं. लाल दरवाजा परिसरात त्या आजी रहायच्या. तिथे जाऊन जागा शोधणं, हे मी आपापलं करायचं होतं. आज विमानानी सव्वा तासात पोचताना, तेव्हा सापूतार्‍यात बंद पडलेली बस आठवली. जंगलातले काजवे पण. मनातला साउंड ट्रॅक म्युट केलेला होता. अन लेकाला सादर करायचं आख्यान साबरमतीच्या काठावरच, असं ठरवलं होतं.

उतरल्यावर रिक्षात बसून पहिल्यांदा सेप्टला गेलो. तिथल्या टपरीवर बन-मस्का अने बे मसाला चाय, हा सकाळचा ब्रेक फास्ट असायचा. अन तोच खायचा होता! चहा अन बनमस्क्याबरोबर केलेल्या चर्चा, घातलेले वाद, जुळलेली प्रकरणं सगळं आठवलं. तो टुटी फ्रुटीवाला बन तोही बचकभर मस्का लावलेला खाल्ला, अन अख्यानाचं पहिलं नमन सुरू केलं. पार आमचे कारनामे, घर शोधतानाची गंमत, रात्रंदिवस स्तुडिओत काम, फोटोग्राफी, पहिल्यांदा एकटीनी हॉटेलात जाऊन खाल्लेला पराठा, अन चक्क मी घरच्या आठवणींनी गाळलेले डोळे, बहिणींना, आईला लिहिलेली पत्रं, त्यांची पत्रं, भरपूर भटकंती, तेव्हा अचानक कळलेली जबाबदारीची व्याख्या, हुसेन वगैरे मंडळींबरोबर काम करायची संधी. बरीच बडबड केली. लेक म्हणाला, तू इन्टरेस्टिंग होतीस यार इन्ना, कूल एकदम. :ड

संगाथ, आमच्या पंढरीची वारी ही करणं, क्रमप्राप्त होतं लेकाबरोबर. टाइम लाइन नावाचं त्यांच्या आजवरच्या कामाचं प्रदर्शन तिथे एका नव्या दालनात लावलेलं दिसलं. मी ज्यावर तेव्हा काम केलं, ते दोन प्रोजेक्ट्सही झळकलेले दिसले त्यात. हुसेन दोशी गुफाच्या इनॉगरेशनच्या फोटोमधेही मी सापडले. तिथले आमचे गप्पा मारायचे कोपरे, तेव्हाचे ड्राफ्टिंग बोर्ड्स अन मोजके ५-६ कॉम्प्युटर्स, लायब्ररी, मॉडेल मेकिंग रूम कालानुरूप बदलल्या. पण तिथे काम करायला आलेल्यांचं स्पिरिट तेच, तसंच दिसलं!

बाकी ट्रीपमधे आमचे खादाडी अड्डे, खरेदीची ठिकाणं, ड्राइव्ह इन थिएटर, आय आय एम, कोरियांनी डिझाइन केलेला गांधी आश्रम, सरखेज रोजा, अडालजची स्टेप वेल दाखवणारे कार्यक्रम झालेच. पण महत्वाचा प्रवास, मला वाटतं, मी अहमदाबादला गेले तेव्हा माझी आई ज्या थांब्यावर उभी होती तिथवर, मी पोचणे, हा होता! स्वतःचं जग एक्सप्लोअर करायला, आपलं बोट सोडून जाणारी पोरं! अन स्वतःवर अन त्याहून जास्त पोरावर विश्वास असणारी आई. वन फुल सर्कल! भटकंती! आठवणीतली!

लेख: