रेशीमगुंता - भाग ४

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

रेशीमगुंता - भाग ४

“मिथिला किती खूष दिसतेय ना आता?” तिच्या पाठमोऱ्या प्रतिमेकडे बघता बघता मी सुमेधला विचारलं

“हो ना. काही वर्षांपुर्वी कशी झाली होती?आत्मविश्वास हरवलेली, निराश आणि एकलकोंडी.इतकं वाईट वाटायचं तिच्याकडे बघताना. आजची मिथिला आपली जुनी मिथिला आहे, कॉलेजमधे होती तशीच हसरी, ड्रामेबाज”

“आणि मुख्य म्हणजे या सगळ्याच्या जोडीने पुर्वीपेक्षा जास्तं मॅच्युअर आणि सेन्सेटिव्ह वर्जन आहे हे” मी त्याच्या उत्तरात माझं वाक्य जोडत म्हंटलं.

“आयुष्यात आनंदी व्हायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. खरय ती काल म्हणाली ते”

“हो रे एकदम खरय तिचं वाक्य. पण आपल्या हातात कुठे असतात सगळ्या गोष्टींचे कंट्रोल्स? आता आई आणि ताईचच उदाहरण घे. त्यांच वागणं बदलणं तरी कुठे आहे माझ्या हातात. नकार येतात ही नेहमी माझीच चूक वाटते त्यांना. ’आई ताई एक पार्टी आणि मी कायमच एकटी”

 

“स्वरा, सोडून दे ना या गोष्टी. त्यांना तुझा दृष्टीकोन कळत नाहीये असं म्हण आणि सोडून दे. तू इतरांना नाही बदलू शकत. तू फ़क्तं तुझ्या रिऍक्शन्स कन्ट्रोल करु शकतेस. त्यांचं त्यांच्यापुरतं बरोबर असतं आणि आपलं आपल्या बाजूने करेक्ट असतं. हसून सोडून देण्याने ना तू बदलणार ना त्या पण पुढची ताणाताणी तर टळेल” त्याचं हे बोलणं पटलच एकदम मला.

“हो आणि माझं तर लग्नं होणार नाहीच आहे खात्रीने,त्यामुळे त्यांचं बोलणं हसून टाळण्यातच शहाणपण आहे” मी म्हंटलं तसं त्याने टपली मारत म्हंटलं“माणसाने नेहमी आशावादी रहायला तर हरकत नाही ना?”

“बरं आशावादी माणसा हे सांग कालच्या प्रोफ़ाईलचं का बिनसलं? मी विषय माझ्याकडून त्याच्यावर न्यायला विचारलं

 “माहित नाही. पण एकूणच तिच्या बॉडी लॅन्ग्वेज वरुन कळलं की तिने मला रिजेक्ट केलय”

“ती बोलली का असं काही डायरेक्ट?”

“असं सगळेच जणं बोलून नाही दाखवत ग पण आता मला अनुभवाने कळतं नकार येणार असेल तर. बरेच नकार दिले घेतलेत मी”

“हम्म ! हे मी पण अनुभवलय.”

“मुलांना आखुड शिंगी बहुदुधी गाय हवी असते. गोरी,सुंदर,हुशार,गृहकृत्यदक्ष,मनमिळावू,सुशील आणि काय काय लिस्ट असते अनसेड. मी ना गोरी ना सुंदर.वागणं बोलणं असं की थोडं जास्तच थेट, स्पष्टं. मी बसत नाही त्या अनसेड लिस्ट मधे मग वेगवेगळी कारणं योग नाही, पत्रिकाच जुळत नाही वगैरे वगैरे”

“आणि मला नकार यायचं अनसेड कारण माझं बॅन्गलोरला स्वत:च घर नाही. कल्याणमधलं घर आई बाबांचं आहे आणि तसही कल्याण इज सो डाऊन मार्केट आजच्या मुलींच्या भाषेत.”

आमच्या गप्पांमधे घर कधी आलं कळलच नाही.त्याला म्हंटलं घरी येऊन जातोयस का? पण काल संध्याकाळपासून त्या फ़ॉर्मल्स मधे अडकल्याने घरी जाऊन फ़्रेश व्हायचे वेध त्याला लागले होते म्हणून मला घरापाशी सोडून त्याने कॅब पुढे स्टेशनला नेली.

घरी आल्यावर आईला सगळा वृत्तांत ऐकण्यात रस होता कारण कॅबच्या खिडकीतून डोकावत मला बाय करणाऱ्या सुमेधला तिने गॅलरीमधून बघितलं होतं.पण रात्रभराच्या जागरणाने माझा झोंबी झाला होता.घरी गेल्यागेल्या मी सगळ्यांना व्हॉट्स ऍप वर, ’घरी पोहोचल्याचा आणि फ़ोन सायलेंटवर टाकून झोपतेय’थोडक्यात डु नॉट डिस्टर्ब असा मेसेज पोस्ट केला आणि अंघोळही न करता कपडे बदलून मी ब्लॅन्केट मधे गुडूप होऊन जे झोपले ते डायरेक्ट जेवायला उठले.

आईने तांदळाची भाकरी आणि मसाल्याची वांगी केली होती. माझ्या भाकरीवर लोणी वाढून आई घुटमळली तेव्हाच लक्षात आलं की आता व्रुत्तांत ऐकल्याशिवाय हिला चैन पडणार नाही. सुमेधचा उल्लेख आला तेव्हा तिचा चेहरा एकदम खुलला.

“आई, कूऽल! लगेच त्याला मुंडावळ्या बांधून स्वप्नरंजन नको करायला लागू तू”

“ह्याऽऽ बाई! मी सोडून दिली हो ती सवय आता. पण काय गं त्याने अजून लग्नं नाही केलय म्हणे?”

नाही नाही म्हणत आई पुन्हा तेच करत होती हे बघून मी कपाळाला हात लावला.

“हो मुलगी बघायलाच आलाय तो इथे सध्या. कालच झाला एक कार्यक्रम. त्याला पसंत आहे मुलगी.” मी हे ऐकवताच तिच्या उत्साहाच्या फ़ुग्याला टाचणीच लागली.

“त्याच्या लग्नातच मिळेल तुलाही” तिचं स्वप्नरंजन परत सुरू झालं

“आऽई, अगं अजून मुलीने हो नाही काहीच कळवलं नाही आहे.”

“त्याने कळवलेय ना पसंती मग होकारच येणार.”

“अरेच्या ! का म्हणे असं? त्याला का नकार येऊ शकत नाही?” या माझ्या प्रश्नावर तिने मलाच उलट विचारलं “तुला करायचं आहे का त्याच्याशी लग्नं?मग केलं स्वप्नरंजन तर काय बिघडलं तुझं?”

या आईचं ना काहीही होऊ शकत नाही.

“ताईकडे जाणार आहे आज मी. येतेस का तू पण?”मी विषय बदलत म्हंटलं.

ताईकडे जायचं म्हंटल्यावर आईसाहेबांचा चेहराच खुलला. मी चिडवून पण घेतलं तिला, “लाडक्या लेकीला भेटायचं, लाडक्या नातवाला भेटायचं म्हणून चेहरा बघ कसा खुललाय तुझा.” यावर “तू लांब गेलीस लग्नं करुन की तुझ्या भेटीच्या विचारांनी पण असाच खुलेल चेहरा” असं ऐकवत तिने मला परत निरुत्तर केलं.

“लांब कुठे? ठाण्यातल्या ठाण्यात तर रहाते ताई.फ़क्तं इस्टला रहाते इतकच.”

यावरही तिचं उत्तर तयार होतं, “बाजूच्या घरात जरी लग्नं होऊन गेली असती ती तरी लांबच वाटली असती हो मला. ती बिचारी इतक्या मोठ्या कुटूंबात व्यस्तं. नोकरी करा, घर बघा, मुलाचं करा. जरा म्हणून आराम नाही तिला.”

आई बुडाली ताईच्या कौतुक सोहळ्यात. तुपाचे डबे पळवायला हक्काने आईचं घर आणि तिच्या आजारपणात एकत्र फ़ॅमिलीत बोलता येत नाहीची ढाल. तरी ताईच गुणाची. ’चालायचच स्वरा. ये जालिम दुनिया है ही ऐसी.’ मिथिलाच्या आवाजात हे वाक्य ऐकू आलं कानात.

ताईकडे गेल्यावरही आई आणि ताईने मिळून लग्नं,अपेक्षा या सगळ्यावर मला एक मोठ्ठं लेक्चर दिलं एरव्ही असं काही झालं की मी तोल जाऊन काहीबाही ऐकवायचे त्यांना ज्याचा नंतर मलाच त्रास व्हायचा. पण आजच सकाळी कॅबमधे सुमेधशी या विषयावर झालेलं बोलणं आठवून मी हसून सोडून दिलं त्यांचं बोलणं.

रात्री त्याला व्हॉट्स ऍप करुन हे सांगितलं तेव्हा त्याने थंप्सअपची स्मायली दिली पाठवून.

नंतरचा पंधरवडा ऑफ़िसच्या कामात पुर्ण बिझी गेला. मिथिलासोबत शॉपिंगला जायलाही अजिबात जमलं नाही. तिला एक सॉरी मेसेज पाठवला तर तिचा ’इट्स ओके डिअर’ असा रिप्लाय वाचून उडालेच होते मी. मला वाटलं होतं ती माझ्यावर उखडणार आणि पुन्हा काही फ़िल्मी डायलॉग मारणार.

फ़ेसबूकवर “फ़िलिंग लव्ड विथ राहुल” असा स्टेट्स आणि त्याखाली त्या दोघांनी केलेल्या शॉपिंगचा फ़ोटो बघितला तेव्हा तिच्या न उखडण्याचं कारण मला कळलं. मी तसा मेसेज तिला व्हॉट्स ऍप केला त्यावर फ़क्त जीभ बाहेर काढलेली स्मायली तिने पाठवून दिली.

“आय एम हॅप्पी फ़ॉर यु” असा रिप्लाय तिला पाठवून दिला आणि फ़ोन बाजूला ठेवून कामाला लागले. चहा आल्यावर फ़ोनची आठवण झाली म्हणून बघितलं तर तिच्याकडून मला भरपूर बदाम आणि पप्प्या आल्या होत्या. मेसेज उघडून न बघताच त्या दिसत होत्या.'क्रेझी गर्ल' म्हणत मी ही तिला रिप्लाय मधे एक पप्पीच द्यायला गेले पण माझ्या जाड्याजुड्या बोटांचा दोष माझा मेसेज तिला न जाता चकून सुमेधला गेला.डिलीट करायला गेले पण त्याआधीच ब्ल्यु टिक्स आल्या होत्या. त्याने गोंधळून ’प्रश्नचिन्ह’ टाकलं

मग त्याला सगळं स्पष्टीकरण द्याव लागलं. अगदी स्क्रिनशॉट्सच टाकले तिच्याशी केलेल्या संभाषणाचे.त्यावर त्याचा रिप्लाय आला “अगदी पुराव्याने शाबीत करीन वाला हरितात्या मोड ऑन नसता केलास तरी मानलं असतं मी खरं”

विषय बदलायला मग मी त्याला नवीन आलेल्या प्रोफ़ाईल लिस्ट बद्दल विचारलं. आता पुन्हा कधी कोरम? या प्रश्नावर त्याने मधल्या काळात ३ सिसिडी कार्यक्रम झाल्याचं सांगितलं.

“वॉव ! जोरदार आहे की मग. मिथिलाच्या नंतर तुझाच नंबर लागणार तर” मी खुष होत लिहीलं त्यावर त्याचा वॉईस मेसेजच आला की “अजून नन्नाचा पाढाच सुरू आहे. तुझे किती सिसिडी झाले ते सांग आधी”

“माझा एकच. तिथेही नकारच. कारण काय तर माझा पगार मुलाच्या पगारापेक्षा जास्तं आहे.”

थोडक्यात नाकापेक्षा मोती जड नको आमच्या आईच्या भाषेत.

“होतं असं. मला मुलीपेक्षा कमी पगार म्हणून सुरवातीला काही नकार आले होते. आता मीच आधी असे प्रोफ़ाईल रिजेक्ट करतो नंतर नकार ऐकण्यापेक्षा”

“सेम हिअर. मी ही आता माझ्याहून उंच, पगार जास्तं असच प्रोफ़ाईल शॉर्टलिस्ट करते बाकीचे कटाप.आधी माझा उंची, रंग, पगार क्रायटेरिया नव्हता प्रोफ़ाईल निवडताना पण सगळे नकार असल्याच कारणाने यायला लागल्यावर म्हंटलं का उगाच वेळ एनर्जी खर्च करा त्यावर”

“मी तर पालकांची जबाबदारी नसलेलीच स्थळं बघतो आता. पुर्वी आई बाबांची जबाबदारी आहे माझ्यावर या कारणाने नकार आलेत. आता मीच ठरवलं माझे पालक नकोत तर तिचेही नकोत. नकोच ते पालकांमुळे वाद होणं.”

मी त्याच्या या मेसेजला गोंधळात पडलेली स्मायली टाकली तर त्याचाच पुन्हा रिप्लाय आला, ’थांब कॉलच करतो टाईप करण्यापेक्षा.

कॉल केल्यावर मला म्हणे ’इट्स सो ट्रू. बरेचसे वाद दोघांकडचे पालक जास्त इन्टरफ़िअर करायला लागले की होतात. पटेल तुलाही. माझे आई बाबा म्हणतात आम्ही कल्याण सोडून कुठेही जाणार नाही.आमच्यातला एक आधी गेला तरी उरलेला कल्याणलाच राहील आणि अगदीच होईनासं झालं की सरळ वृद्धाश्रम गाठेलं. आम्ही फ़क्तं सणावारी चार दिवसाच्या पाहुणचाराला येऊ. मला तर आता त्यांचा हा विचार खरच पटायला लागलाय. बेस्ट इन द इन्टरेस्ट ऑफ़ बोथ पार्टिज.

"काहीही हा तुझं" मी म्हंटल त्यावर "अरे सिरियसली . कधी पालक मुद्द्यावरुन तर कधी घर मुद्द्यावरुन मी आजवर बरेच नकार ऐकलेत. शिवाय माझा रंग सावळा, उंची ५.५ आणि पगार ६० के म्हणजे माझी मार्केट वॅल्यु कमीच. आता तिकडचीच मुलगी पटवावी म्हणतो. तिकडे माझा रंग गोऱ्यात जमा होतो”

“कर कर तू तिकडचीच मुलगी कर. आम्ही येऊ तुझ्या लग्नात सांबार भातम खायला” मी असं म्हंटल्यावर तो म्हणे की “तुझ्याही करता बघू का एखादा ’यन्ना रास्कल्ला’?“

“नको रे बाबा मी आपली सिंगलच बरी आहे मग.मला नाही वाटत मला कोणी मिळेल या जन्मात. मी तर ठरवलय मुलगी दत्तक घ्यायची आणि मग आम्ही तिघी मस्तं जगभर फ़िरू पैसे साठवून.”

यावर त्याने ’हि आयडीया भारी आहे माझं नाही ठरलं तर मी ही येईन तुमच्यासोबत’ असं म्हंटलं.

त्याला म्हंटल मित्र म्हणून आलास तर आवडेलच मला पण आमच्या मातोश्रींना ज्यात त्यात लग्नच दिसतं.

आणि मिथिला बाईंच्या म्हणण्या नुसार “एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते” त्याने माझ्या वाक्यावर रि ओढत त्याचं वाक्य ऐकवलं.

“हो ना आणि हे फ़क्तं आता आपल्यालाच लागू आहे हा कारण आपणच दोघे सिंगल उरलोय गृपमधे.नाहीतर ती एक मुलगी असून सुद्धा ती तुझी निव्वळ मैत्रिण असण्याला कोणाचच ऑबजेक्शन नाही”

“बघ की. लोकांना ना जोड्या लावायची फ़ार सवय असते. दिसले सिंगल की चिकटवली जोडी. वर ऐकवतील की काय हरकत आहे मैत्रिणीशीच लग्नं करायला? कांदेपोहे प्रपोजल म्हणून करायचा म्हणे विचार जर प्रेमात नसाल पडला एकमेकांच्या तर”

“याला ना काही लॉजीकच नाहीये खरतर. ह्म्म !म्हणजे ज्यांना हे असं करायचं आहे त्यांनी करावं त्यात चूक काहीच नाही पण एक मुलगा आणि एक मुलगी जर चांगले मित्र असतील आणि सिंगल असतील तर त्यांनी “कपल” व्हायलाच हवं हा का अट्टाहास? ते नुसते चांगले मित्र म्हणूनही राहूच शकतात ना? इतका विअर्ड थॉट आहे का आपला?”

“अजिबात नाही. त्यांचं चूक नसेल तर आपलही चूक नाहीच आहे. आपण एकमेकांचे मित्रच रहाणार हा आपला चॉईस आहे. प्रत्येकच प्रेम फिजीकल नसतं.मित्राच्या नात्याने आलेलं प्रेम, काळजी हिला शारिरीक ओढ नसली तरी ते प्रेम आणि काळजी तितकीच खरी असते. लोकांच्या आणि आपल्या मतात फ़रक असला तर असला ना? आपण का त्याचं टेन्शन घ्यायचं. चल बाय फ़ोन ठेवतो.

हो बाय.चक्कं पाऊणतास बोलतोय आपण

हो ना

पण परत एकदा हेच सांगेन की मगाशी जे लग्नच होणार नाही वगैरे जे बोलत होतीस तसं परत परत निगेटिव्ह बोलू नकोस. आपल्याला नक्की मिळेल आपल्या अपेक्षांमधे बसणारा जोडीदार. बघ मार्क माय वर्ड्स आणि जेव्हा मिळेल तेव्हा मला पत्रं पाठवून कळवायचं फ़ोन आणि व्हॉट्स ऍप नाही. जसं आपण पुर्वी सगळे एकमेकांना पत्रं पाठवायचो तसं. आणखी एक ’विश मी लक’ आजही माझा सिसिडी कार्यक्रम आहे. फ़क्तं आजचं सिसिडी बॅन्गलोरमधलं आहे”

“आज फ़ॉर्मल्स घालून नको जाऊस” माझ्या या वाक्यावर दोघांनी भरपुर हसून घेतलं.

“आणि सांबार भात पसंत केलास तर मलाही डिटेल्ड वृत्तांत फ़ोनकरुन नाही, तर पत्रं पाठवून सांगायला हवा तू. डिल?”

“डिल” दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलं होतं दोन महिन्यांपुर्वी आणि आज माझ्या नावाचा लिफ़ाफ़ा बॅन्गलोरहून आला होता. त्याने त्याचं प्रॉमिस पाळलं होतं. फ़िलिंग सोऽऽऽऽ मच हॅप्पी ऍन्ड पॉझिटिव्ह.

लिफाफा उघडून अधाशासारखं त्याच पत्रं वाचून काढलं. 'प्रत्येकाला आनंदी रहायचा पुर्ण हक्क आहे' या वाक्याने सुरू झालेलं पत्रं कधीच नकारात्मक विचार नको करुस. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. 'तुझ्यासाठी एक सरप्राईझ पाठवलय. वेटिंग फॉर युवर रिप्लाय' या नोटवर संपलं.
सरप्राईझ काय असेल बघायला पुन्हा लिफाफ्यात हात घालून बघितलं तेव्हा त्यातून अजून एक लिफाफा निघाला. रिकामा लिफाफा. त्यावर 'To' म्हणून त्याचा आणि 'From' म्हणून माझा पत्ता होता.
इतकं भरून आलं ते बघून की माझा सगळा मुडच बदलला. त्याला फोन लावला.. आज मला ' कस्टमर यु आर ट्राईग टू स्पिक टू इज नॉट आन्सरिंग द कॉल' वाली टेप वाजू नये वाटत होत पण नेमकं तेच ऐकू आलं. आळस झटकून तयार झाले. आई पण बघतच बसली. तिला म्हंटल कोरमला जातेय सिसिडी मधे.आणि निघता निघता त्याला एसएमएस केला 'wish me luck'

(समाप्त)

 

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com