स्पेन - अंडालुसिया (Andalusia) - भाग १

कुठल्याही सहलीबद्दल त्या त्या वेळी लिहिलं गेलं की त्यात जी उत्स्फूर्तता असते ती नंतर राहत नाही. स्पेन ट्रिप दरम्यान बऱ्याच गोष्टी तुकड्या तुकड्यात लिहून ठेवल्या होत्या पण त्यात एकसंधता नव्हती. पण आज सहज म्हणून स्पेन मधले फोटो बघताना काही गोष्टी आठवल्या आणि पुन्हा लिहायला घेतलं. आधीची दोघांची भटकंती आणि आता सृजन सोबत असताना फिरणे यात फार मोठा फरक आहे याचा अंदाज होता. पण तरीही तो ७ महिन्यांचा असताना आम्ही उत्साहाने इटलीला गेलो आणि ट्रिप चे ७ दिवस, जायची तयारी ७ दिवस आणि आल्यावर आराम आणि आवराआवर यात ७ दिवस असा सगळा हिशोब बघता, आता कुठेही मोठ्या ट्रिपला जायला नको असं ठरवून टाकलं. पण डिसेंबर मध्ये भारतात जायचा बेत रद्द झाला आणि आम्ही पुन्हा नवीन बेत आखायला लागलो. आधीच्या सहलीचे अनुभव बघून आता अटी एवढ्या जास्त होत्या की कुठे जायचं या प्रश्नावर उत्तर काही मिळेना. अक्खा युरोप तर होताच डोक्यात पण पार दुबईलाही मोबाईलवरून उड्या मारून आलो. पण जर्मनीतल्या थंडीपासून दूर, डिसेंबर मध्ये त्यातल्या त्यात स्वस्त आणि आपण स्पेनला कधीच गेलो नाही या बाबींवर स्पेनचा, त्यातही दक्षिण स्पेन किंवा Andalusia चा नंबर लागला. जायच्या आधी माझं लायसन्सचं घोडं गंगेत न्हालं आणि शेवटी निघालो. त्याचाच हा वृत्तांत - या भागात सृजनच्या नजरेतून मला जाणवलेला वृत्तांत लिहिला आहे. तर पुढच्या भागात तिथली स्थळं आणि खाद्यसंस्कृती, प्रवासात भेटलेले लोक आणि अनुभव याबद्दल लिहिणार आहे. त्यासोबत भरपूर फोटो येतीलच.

स्पेन - सृजनच्या नजरेतून -
आई बाबा मला जेव्हा भुर जायचं म्हणतात, तर मला वाटतं की लगेच भुर जायचं, मग मी मागे लागतो आणि बूट काढून त्यांना दाखवतो की आता चला, त्या क्षणी मी फक्त भुर जायचं या एकाच गोष्टीत रमलेला असतो की बाकी मला काही सुचत नाही. खरं तर कधी कधी ते भुर लगेच जायचं नसतं, उद्या, परवा, नंतर असं ही असू शकतं पण ते मला आत्ताच्या आत्ता असं च वाटतं. तर या सगळ्यामुळे ते आजकाल मला काही नेमकं सांगत नाहीत. पण माझ्या पुस्तकातलं विमान बघून आई म्हणत होती की आता आपण अशाच विमानाने जायचं आहे, सृजन कसा त्यात बसणार वगैरे... मला ते काही नीट समजत नव्हतं. मग एक दिवस मोठ्या बॅग काढून आई बाबा बसलेले, तेव्हा मी तिथे जाऊन प्रत्येक गोष्टीला हात लावला आणि मी जागा असताना हे काम होणार नाही हे त्यांना पुन्हा एकदा समजले. आता पर्यंत माझी दहशत कमी होती का की त्यांनी हे काम काढलं, पण माझी मज्जा झाली, मी मस्त पसाऱ्यात मनसोक्त खेळून मग दमून झोपलो. (तसा मी दमत नाहीच आणि मला झोपायचं नसतंच, पण रात्री एका स्टेजला नाईलाज होतो, मग मी झोपतो आणि अधून मधून उठून आई बाबांना दमवतो, पण ते असो) तर मी झोपल्यावर बहुतेक आई बाबांनी बॅग्स पॅक केल्या आणि अचानक अलार्म लावून ते उठले. एरवी मीच अलार्म क्लॉक असतो, त्यांना किती वाजता आणि किती वेळा उठवायचं हे मी ठरवतो) तर त्या दिवशी पहाटे ३ वाजताच आईने मला उठवलं आणि मोठं जॅकेट, टोपी घालून दिलं, मी झोपेत काहीतरी बघत होतो. मग आम्ही गाडीत बसलो आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत निघालो. मला पुन्हा झोप लागली आणि जाग आली तेव्हा आम्ही विमानतळाच्या पार्किंग मध्ये होतो. थोडी कुरबुर करताना माझ्या लक्षात आलं की आता बहुतेक आपण भुर आलो आहोत आणि नवीन काहीतरी दिसणार आहे, शिवाय थंडी पण होती. मग मी लगेच पवित्रा बदलला. निमूट पणे स्ट्रोलर मध्ये बसलो, आईने मला शांत करायला म्हणा किंवा बक्षीस म्हणा, ना मागताच क का म्हणजेच खाऊ दिला होता. आम्ही अंधारातून आलो आणि मग दिवे दिसायला लागले, खूप लोक पण होते. मग आई बाबा काहीतरी बॅग देणे, कशाला टॅग लावणे वगैरे करत होते, मी सगळीकडे बघत होतो. इतका वेळ शांत कसा बसलाय हा असं आई बाबांना वाटत असतानाच, मग मी त्रास द्यायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी मला स्ट्रोलर मधून बाहेर मोकळं केलं. आता तर काय, मज्जाच मज्जा. आपलं आणि परकं असं मला काही समजत नसल्यामुळे मी कुठेही हात लावतो, लहान मुलं तर मला इतकी आवडतात की मी त्यांच्या मागे पळत जातो आणि आई बाबा माझ्या मागे येतात. "सृजन, हे आपलं नाही, त्याला हात लावू नको म्हणतात". पण मग घरात सगळं आपलं असतं तरीही हे तुला लागेल, तू काचेचं भांडं उचलू नको वगैरे सांगतात. मला काही समजत नाही त्यांचं हे. तर मी माझे कारभार चालू ठेवले एकीकडे. डायपर बदलून आलो आणि मग आई बाबांनी कॉफी घेतली त्याला हाsss म्हणत गम्मत केली. मग आम्ही गेट्स कडे गेलो, लहान मुलं दिसली की मी त्यांच्याकडे धाव घ्यायचो. शेवटी विमानात चढेपर्यंत माझी पळापळ चालू होती. मग मी आईच्या मांडीवर बसलो, बेल्ट बांधला आणि विमान उडेपर्यंत झोपलो सुद्धा. थोड्या वेळाने उठून मग माझी पुस्तकं, खेळणी बघत, बाहेर बघत होतो, एकाच जागी कंटाळा आला होता पण आई बाबा सगळे प्रयत्न करून मला थांबवत होते. मग मी सतत विमानाची खिडकी म्हणजे ते शटर खाली वर करत बसलो. एकदाचे आम्ही उतरलो आणि मला मोकळं वाटलं. मग आम्ही गाडी घ्यायला निघालो, तिथे मला एका काकांनी फुगा आणून दिला आणि मी मग भरपूर खेळलो. खूप वेळाने गाडी मिळाली आणि आम्ही निघालो. या गाडीत कार सीट असलं तरी मला ते मोकळं वाटत होतं, शिवाय आई मला शांत ठेवायला पटकन खाऊ देत होती, माझं ऐकत होती म्हणून मी पण शहाण्यासारखी पुन्हा झोप काढली.

मग आम्ही एका ठिकाणी पोचलो, तिथे आत गेल्यावर सगळं नवीन होतं. म्हणजे आई बाबा म्हणत होते की हे सगळं जुनं असून किती छान ठेवलं आहे असं, पण मला कारभार करायला नवीन वस्तू, नवीन जागा बघून मी खुश झालो. लग्गेच तिथला एक लॅम्प पाडला, तो फुटला नाही, पण एवढ्या प्रवासातून येऊन आई बाबांना आधी सगळं नीट हलवून आवरून मगच जरा दम घेऊ दिला. कधी नव्हे ते, ते दोघंही मला गाणी लावून देऊ म्हणत होते, पण इंटरनेट नव्हतं म्हणे तेवढं चांगलं, मग मी मस्त सोफ्यावर चढलो, इकडे तिकडे उड्या मारल्या आणि नंतर थकून झोपलो. तिकडे दोन भू भू होते, ते मला खूप आवडले. एक दिवस आम्ही एक किल्ला बघायला गेलो होतो, तिथे खूप मांजरी होत्या. मी त्यांच्या मागे पळालो आणि त्या घाबरून पळून जात होत्या. आईला सगळ्या पाळीव प्राण्यांची भीती वाटते, पण इथे त्यांनाच माझी भीती वाटत होती आणि मला मज्जा येत होती. आई बाबांनी माझ्यापुढे हात टेकले होते. एक दिवस आम्ही समुद्रकिनारी गेलो. पाणी दिसलं की मी 'पापा पापा' म्हणत ओरडत होतो, मग बाबानी मला हात धरून हळू हळू वाळूवरून पाण्यात नेलं, पाणी खूप गार होतं पण मला मज्जा वाटत होती. एकदा जोरात लाट आली तर मी घाबरलो एकदम, पण बाबानी मला घट्ट धरलं होतं. आईनी आमचा छान खेळतानाचा व्हिडीओ काढला . नंतर मी वाळूत आलो आणि पालखट मांडून बसलो (हा माझ्या आईचा शब्द आहे, बाबा म्हणतो फतकल मांडून बसलो.) आणि मनसोक्त खेळलो, शिंपले दगड उचलले, फेकले आणि हात पाय पूर्ण खराब केले. आई बाबा काही म्हणाले नाहीत, फक्त नंतर सगळे कपडे बदलले आणि हात पाय पुसून दिले. एक दिवस आम्ही एका चर्च मध्ये गेलो होतो आणि तिकडे मेणबत्त्या बघून मी दि, दि म्हणून दिवे दाखवले. आमच्या हॉटेल मध्ये मोठे भोपळे होते, त्याला पण हात लावला.

तिकडे गाडीत जे कार सीट होतं ते थोडं मोकळं होतं, मला त्यात जरा हात पाय पसरता येत होते, आणि गाडीतून रोज कुठेतरी जायचं होतं त्यामुळे मी आनंदाने गाडीत बसायचो. म्हणजे सकाळी उठून मी सारखं त्यांना गाडीकडे हात दाखवून म्हणायचो की बाहेर चला.

शेवटच्या दिवशी आम्ही पुन्हा समुद्र पाहिला, तिथे खूप कबुतरं होती, आमच्या घरी हॉलच्या खिडकीसमोर एक झाड आहे, तिथे पण खूप कबुतरं येतात आणि मी नेहमी ती बघतो, आता इथे तर अजून जास्त आणि अगदी जवळ होती, मी प्रत्येकाच्या मागे पळत होतो आणि त्यांना उडवून लावत होतो. तिकडे एक ताई सुंदर व्हायोलिन वाजवत होती, आम्ही ते ऐकत होतो, मग झाल्यावर आईनी मला टाळ्या वाजवायला सांगितल्या, मी टाळ्या वाजवल्या तर तिला खूप छान वाटलं. तिथे मी एक केक खाल्ला तो एकदम मस्त होता, मी सगळा फस्त केला.

आणि मग आम्ही परत घरी आलो. मी येताना पण विमानात झोपलो, त्यामुळे आई बाबा रिलॅक्स होते. मला ट्रिप ला खूप मज्जा आली. सतत सगळीकडे नवीन लोकं भेटतात, ते माझ्याकडे बघून हसतात, माझ्याशी बोलतात, माझं कौतुक करतात ते मला खूप आवडतं. मी फक्त स्माईल देतो त्यांना. शिवाय आई बाबा माझं ऐकतात, घरात जरा शिस्त असते, सतत टीव्ही वर गाणी नाही, केक बिस्कीट सारखा खाऊ रोज रोज नाही मिळत, पण ट्रिपला सगळं करता येतं. तिकडे गेल्यावर गाण्यांची मला आठवण आली नाही जेवढी घरी येते, घरी दिवसभर मला कंटाळा आला की मग तेच बघावं वाटतं. शिवाय तिकडे थंडी नव्हती, मोकळं खेळता यायचं. इथे मला मोकळं सोडलं तर मी रस्त्यावर जातो. तिथे खूप मोकळी जागा होती, गाड्या वगैरे नसल्या की जरा निर्धास्त असायचं. पण घरी आल्यावर मला माझा टेडी भेटला, माझी खेळणी दिसली जी अचानक पुन्हा मला आवडायला लागली. आई बाबांना आता खात्री झाली आहे की मी बाहेर जायला कधीही तयार असतो, आणि मला ते खूप आवडतं. ते करतीलच काहीतरी प्लॅन आता, तेव्हा मी अजून थोडा मोठा झालेला असेन, मग मी सांगेन पुन्हा तुम्हाला काय काय गंमत केली मी ते, तोपर्यंत टाटा...

क्रमशः

स्पेन - अंडालुसिया (Andalusia) - भाग २

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle