स्पेन - अंडालुसिया - भाग २

स्पेन - अंडालुसिया - भाग १

सहलीसाठी स्पेनचा विचार करताना त्यात बार्सिलोना, माद्रिद सारखी शहरं, काही समुद्रकिनारे, शिवाय स्पेनचाच भाग असलेले काही बेटं असे बरेच पर्याय आहेत. आम्हाला मोठं शहर नको होतं आणि सगळ्यात कमी थंडी असलेलं ठिकाण असल्यास बरं असा विचार होता, त्यानुसार मालागा किंवा ग्रानाडा (Malaga/Granada) हे दोन पर्याय होते. दक्षिण स्पेनचा हा भाग म्हणजेच अंडालुसिया (Andalusia). विमानाची तिकिटं मालागा साठी स्वस्तात मिळाली, त्यामुळे तो पर्याय निवडला. मग कुठे राहायचं हा शोध चालू झाला, तर या गुहांमधील हॉटेलचा शोध लागला. हे बघताक्षणी आवडलं, पण मालागा पासून थोडं दूर होतं. मग मालागा जवळचे बरेच पर्याय पाहिले, पण सगळे रिसॉर्ट्स होते. एरवी जातोच अशा ठिकाणी, पण हे गुहेत राहायचं वेगळं वाटत होतं, त्यामुळे शेवटी त्यावरच शिक्कामोर्तब झालं. स्पॅनिश कारभाराचा पहिलाच अनुभव इथूनच चालू झाला. त्यांच्या वेबसाईट वर दिल्याप्रमाणे आम्ही बुक केले पण पेमेंट साठी लागणारी माहिती ईमेल करून कळवू असे त्यांनी दिले होते. उत्तर आलं ते पूर्ण स्पॅनिश मधून. मग गुगल ट्रान्सलेटर आणि एका स्पॅनिश कलीगच्या मदतीने भाषांतरीत केले, तरी काही नीट कळेना. मग ही कलीग म्हणाली, फोनवर बोलून बघ. सुमेधने फोन केला तर 'नो इंग्लिश' असं सांगितलं, आणि मग कसंबसं ५ नंतर फोन करा असं सांगितलं. आपण इथे राहणार आहोत आणि यांना काहीच इंग्रजी येत नाही तर कसे होणार, पण वेबसाईट तर अगदी छान आहे, त्यांच्या वेबसाईट वर आणि Trip Advisor वर देखील काही लोकांचे इंग्रजीतून अभिप्राय आहेत, त्यामुळे बघूयात काय होतंय ते असा विचार केला. मग या कलीगलाच फोन करायला लावू म्हणून ५ वाजता तिला विचारलं, तर ती हसून म्हणाली, स्पेनमधले ५ म्हणजे किमान साडेपाच. शेवटी साडेपाचला फोन केला तेव्हा बोलणे झाले आणि त्याप्रमाणे आम्ही पेमेंट केले. पण एकूण थोडा भोंगळ किंवा निवांत कारभार असणार याचा अंदाज आला. तिथे फिरण्यासाठी विमानतळाहून गाडी बुक केली, आणि शेवटच्या दिवसासाठी मालागाला विमानतळाजवळ हॉटेल बुक केले. विमान प्रवास असल्यामुळे मर्यादित सामान घेऊन शेवटी प्रवास चालू झाला.

सृजन विमानात सलग ३ तास कसा बसेल याचे प्रचंड टेन्शन होते, पण त्यामानाने त्याने काही त्रास दिला नाही आणि आम्ही समुद्राकडे बघत मालागा विमानतळावर उतरलो. बाहेर येता क्षणी हवेतला माफक गारवा, आकाशातला आल्हाददायक सूर्य आणि निरभ्र निळं आकाश यांच्यामुळे वाह! अशी पहिली प्रतिक्रिया आली. मग पुढे जाऊन सामान घेणे, गाडी घेणे ही कामे झाली. इथे गाड्या भाड्याने घेताना अत्यंत काळजी घ्या, कुठलीही लहानशी गोष्ट असेल तरी नोट करून ठेवा आणि तिथल्या लोकांशी बोला असे कळले होते. गर्दीमुळे गाडी मिळायला लागलेला वेळ आणि ती मिळाल्यावर नवऱ्याच्या नजरेतून तिचे बारीक परीक्षण होण्याचा वेळ मिळून, प्रत्यक्षात निघायला बराच वेळ लागला. एका पेट्रोल पंपावर थांबलो, इथे अगदीच भारतात असल्यासारखं वाटलं. एकतर बरेच दिवसांनी हिवाळी कपड्यांचे ओझे अंगावर नव्हते, उलट थोड्याच वेळात गाडीत खूप ऊन येतंय असं वाटत होतं, पाण्याच्या बाटलीपासून तर तिथलं सगळं वातावरण, आजूबाजूचे लोक, आणि ती हवा, माती हे सगळंच अगदी भारतात आहोत असं भासवणारं होतं. पाणी घेतलं, उत्तम कॉफी मिळाली आणि पुढचा प्रवास चालू झाला.

शहरातून बाहेर आलो आणि थोड्याच वेळात आजूबाजूला सगळा विराण डोंगराळ भाग दिसायला लागला. क्वचित कधी दिसली तर दूरवर थोडी वस्ती, काही ऑलिव्हची शेती, पण बाकी शोधूनही हिरवळ नव्हती. दिसली तरी लहान सहान झुडपं. हिरवळीच्या बाबतीत नेहमी कोकणात राहणाऱ्या लोकांना विदर्भ मराठवाड्यात जसं खूप वेगळं चित्र दिसतं, तसं वाटत होतं. त्यानंतर पुढे तर हेही चित्र बदलत गेलं आणि फक्त दूरवर लाल/भुरकट रंगाच्या मातीचे डोंगर, त्यात दिसणाऱ्या गुहा आणि मधूनच दूरवर दिसणारी विरळ वस्ती. आपण अफगाणिस्तानात आहोत की काय असं वाटावं इतकं हे सगळं वेगळं होतं, दूर दूर पर्यंत एकाही मोठ्या शहराची खूण नव्हती. या संपूर्ण भागात अशा अनेक गुहा आहेत ज्यात पूर्वी लोक राहायचे, आताही राहतात आणि आता त्यातल्या बऱ्याच लोकांनी पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. इथलं हवामान उन्हाळ्यात गरम आणि प्रचंड कोरडं आहे, तर हिवाळ्यात तेवढंच गार देखील. खास उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी या गुहा वापरल्या जात, कारण इथे थंड वाटतं. तर काहींसाठी नेहमीचाच निवारा म्हणून या गुहा वापरल्या जायच्या आणि अजूनही बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. युरोपातील इतर ठिकाणांपेक्षा सुसह्य हिवाळा असला तरीही बर्फवृष्टी देखील होते. समुद्रकिनारे, उंच डोंगर आणि अगदी विराण भाग हे सगळंच इथे बघायला मिळतं. खरंतर या सहलीतला सगळ्यात वेगळा अनुभव हाच होता, अशा भागातून पहिल्यांदाच प्रवास करत होतो. फोटो क्वालिटी यथातथाच आहे, त्यात बरेच फोटो व्हिडीओ मधून कॅप्चर केलेत.

.

.

.

.

.

.

तर आम्ही राहिलो ती अशा गुहांची एक वस्ती. त्या गावात पण असाच शुकशुकाट. संचारबंदी लागल्या सारखी सगळीकडे सामसूम. अगदी गावाच्या बाहेर आलो आणि त्यांच्या नावाची पाटी दिसली, तेव्हा कुठे शांत वाटलं, बाहेर २ गाड्या उभ्या दिसल्या त्यामुळे अजून हायसं वाटलं. आणि गाडीतून उतरून पुढे आलो तर पहिले दिसले २ गाढव. दर्शनी भागात स्वागताला गाढव! विचार करूनच हसू आले. मोठं फाटक, आतला दगडी रस्ता सगळंच पहिल्या भेटीत प्रेमात पाडणारं होतं. रिसेप्शनला कुणीच दिसलं नाही म्हणून पुढे गेलो, तर २ कुत्र्यांनी स्वागत केलं. माझ्या भीतीने आणि सृजनच्या आनंदाने एकाच क्षणी डोके वर काढले, पण त्यातल्या त्यात एकमेकांना सावरून घेऊन आम्ही पुढे जाऊन तिथल्या रेस्टॉरंट मध्ये विचारलं, आणि मग त्या मुलीने आम्हाला आमच्या गुहेत आणून सोडलं (हे सतत लिहिताना एकदम जंगल फील येतोय Wink ). हा सगळा परिसर फारच सुंदर होता. भरपूर मोकळी जागा, फुलझाडं, आजूबाजूला डोंगर आणि पानगळ झालेली झाडं, प्रत्येक गुहेबाहेर अंगणात टेबल-खुर्च्या, डोंगरातून वाहत येणारे झरे, दूरवर दिसणारं सिएरा नेव्हाडा हे शिखर (हे स्पेन मधलं सगळ्यात उंच शिखर) आणि थंडीतही उब देणारा सूर्य.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

इथे प्रत्येक गुहेचे फोटो बघता येतील.
आत जुन्या पद्धतीच्या फरशा होत्या, टीव्ही होता, जुनी लोखंडी भांडी होती आणि स्वयंपाक घरात वेगळी रोजच्या वापरातली भांडी होती. हिवाळ्यात थंडीचा त्रास कमी व्हावा म्हणून आत शेकोटीची जागा पण होती. शिवाय त्यांची सेंट्रल हीटिंग सिस्टीम पण होती. (ती त्या लोकांनी तिथे कुणीच नाही म्हणून एक दिवस संध्याकाळी ६ लाच बंद केली, त्यानंतर रोज तिथे जाऊन सांगायचो की आम्ही इथे आहोत, बंद करू नका.) मालागा पेक्षा इथे पुन्हा थंडी जाणवत होती, पण समोर सूर्यही तळपत होता, खिडकीतून उन्हं मस्त आत आली होती. हे सगळंच बघून छान निवांत ट्रिप होणार याची खात्री झाली. या टीओ टोबास नावाच्या हॉटेल परिसरात एकूण २०-२५ गुहांची घरं आहेत. घरगुती तत्वावर त्या कुटुंबाचेच लोक हे चालवतात. इथे बरीच पुस्तकं देखील होती पण बरीच स्पॅनिश असल्याने काही उपयोग नव्हता, नेमकं शेवटच्या दिवशी मला त्यात २ इंग्रजी पुस्तकं दिसली. आजूबाजूला कुणीही पर्यटक दिसत नव्हते, इथे फक्त आपणच आहोत आणि एवढा विराण भाग असा विचार करून क्षणभर भीती पण वाटली. पण अधून मधून रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज येत होते, आणि दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचे.

फ्रेश झालो, आराम केला आणि मग जवळच भटकून आलो. Guadix हे जवळचं त्यातल्या त्यात मोठं गाव, आमच्या हॉटेलपासून १५ मिनिटांवर होतं. आपल्याकडच्या तालुक्यासारखं वाटत होतं. इतर ठिकाणांपेक्षा वेगळं जाणवलं की आजवर बहुतांशी ठिकाणी दिसतात ती कपड्यांची किंवा कुठलीच ठराविक ब्रँडची दुकानं नव्हती, तर अगदी लहान सहान स्थानिक दुकानं होती, त्यातही बरीच बंद होती. लोक गाड्या कसेही पार्क करत होते हे तर बरेचदा दिसलं. Wink दूध आणि थोड्याफार खायच्या वस्तू घ्यायला म्हणून तिथेच सुपरमार्केट मध्ये गेलो. स्पेन मधून इतरत्र युरोपात भाज्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. तिथल्या भाज्या इतक्या ताज्या आणि सुंदर दिसत होत्या, की मला सगळ्या घेऊन रोज पोळी भाजी करायची खुमखुमी आली. मग आपण ट्रिपला आलो आहोत, तर जरा निवांत राहावं या विचाराने त्यावर मात केली, पण तरीही त्या भाज्या पुढे सतत मला खुणावत होत्या. केक आणि बेकरीचे पदार्थ यातही जर्मनीपेक्षा बरेच वेगळे प्रकार दिसले म्हणून ते घेतले आणि सगळेच आवडले. इथेही लोक मांस खाण्यात पुढे आहेत हे सुपरमार्केट किंवा हॉटेलच्या मेन्यू कार्ड वर सहज लक्षात येत होते. पण काही व्हेगन पर्याय पण दिसले, शाकाहारींसाठी सेफ पर्याय म्हणून तेही थोडे घेऊन पाहिले. इथे बऱ्याच काउंटर वर सामान भरायला मदत करणारे लोक होते, स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता होती. पार्किंगचेही गोंधळ होते आणि स्पेन बद्दल आजवर जे काही ऐकलं, वाचलं होतं ते सगळं प्रत्यक्षात बघायला मिळत होतं. इथल्या चर्च जवळ एक चक्कर मारली आणि परत आलो.

हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट मिळणार होता, आदल्या दिवशी तिथल्या मुलीने उद्या ८ नंतर या असे सांगितलेही होते. म्हणून सकाळी उठून तिथे गेलो, तर सगळं बंद, फक्त तिथले २ कुत्रे होते. किमान ते होते, नाहीतर काळं कुत्रं नाही नावाला असं म्हणता आलं असतं. रेस्टॉरंट मध्ये कुणी दिसत नाही म्हणून परत रिसेप्शन वर आलो, तर ती कालचीच मुलगी होती. गुडमॉर्निंग चे सोपस्कार झाले आणि मग ती म्हणाली "चला, जाऊयात ब्रेकफास्टला". "बाकी कुणीच नाही का इथे" विचारल्यावर "पुढच्या आठवड्यात सगळं भरलेलं असेल, पण आत्ता कुणीच नाही" असं उत्तर आलं. हे सगळंच नवीन वाटत होतं. आमच्यासोबतच येऊन तिने कुलूप उघडलं आणि आत गेल्यावर कॉफी घेणार का विचारलं. मग २ टोस्ट, क्रॉसॉ, फळं, ऑलिव्ह ऑइल आणि कॉफी आणून दिली. सगळं आओ जाओ घर तुम्हारा कारभार होता. आम्ही कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट डोक्यात ठेवून होतो, खूप नाही पण किमान २-३ पर्याय आणि फ्रेश असतील असे वाटले होते, इथे जरा निराशाच झाली, त्यात उद्यापासून रोजच हे क्रॉसॉ दिले, जे ताजे नाहीत, तर ब्रेकफास्टचा विचार करावा लागेल असं म्हणत कॉफी प्यायली, आणि किमान कॉफी घ्यायला रोज येऊ यावर शिक्कामोर्तब केले. सृजनला तिथे फुलांना हात लाव, टेबलवर चढून बस, शिवाय म्यांव आणि भूभू ला काचेतून बघणे असे बरेच उद्योग करायला वाव होता, त्यामुळे आम्ही (नेहमीप्रमाणेच) खाणे पिणे आटोपते घेतले आणि बाहेर पडलो.

एक दिवस आराम केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाणार होतो ग्रानाडा (Granada) च्या किल्ल्याला. रस्ते मोठे आणि उत्तम होते, पण रहदारी अजिबातच नव्हती, अर्ध्या-एक तासातून मोजून २ -३ गाड्या जायच्या बाजूने. हे पुढचे सातही दिवस सतत जाणवलं. हायवेने जात आहोत म्हणून मोठी गावं लागली नाहीत असे पहिल्या दिवशी वाटले, पण नंतर अगदी लहान लहान गावातून प्रवास करताना देखील अजिबात रहदारी नव्हती. एक तर ऑफ सीझनला गेल्यामुळे, आणि त्यातही जरा आडवळणाच्या भागात गेल्याने कित्येक गावं रिकामी होती. म्हणजे मोट्ठे रस्ते, उत्तम लाइटिंग, सुंदर सुशोभित केलेले राउंड अबाऊट्स वगैरे, पण नुसती रिकामी घरं. क्वचित काही ठिकाणी लोक होते, पण आपण ओसाड पडलेल्या भागात आलो आहोत असं वाटत होतं. नंतर स्पेन मधल्या या विषयाबद्दल स्पॅनिश कलीगशी बोलणे झाले आणि थोडे गुगल वर शोधले तेव्हा तिथली रीअल इस्टेट इंडस्ट्री सध्या बरीच तोट्यात आहे आणि हा सध्याचा मोठा प्रश्न असल्याचे समजले.

मधूनच अत्यंत खराब रस्ते, जुनी-पडकी घरं, जागोजागी कचरा अशीही खेडी दिसत होती. अगदी मोठ्या शहरातही प्रत्येक घराची रचना, आकार वेगळा हे सुद्धा नजरेला वेगळं वाटत होतं. मध्य युरोपात बहुतांशी एकाच उंचीची, एकसारखी दिसणारी आखीव रेखीव घरं जास्त वेळा दिसतात. हायवेवरून जाताना जी लहान गावं दिसतात, तिथे घरांची कौलं सुद्धा बहुतांशी एकाच रंगाची असतात. एखादं गाव पूर्ण लाल रंग मिरवणारं तर एखादं करडा. इथे ते चित्र लहान गावात काय किंवा शहरात, अगदीच वेगळं दिसत होतं. एक दोन मजली घर, त्याला चिकटून एखादं ४ मजली घर, एकाचा करडा रंग तर एकाचा भडक केशरी. कुठे मोकळी जागा आणि त्यात अस्ताव्यस्त वाढलेले गवत. मध्येच उभे असलेले विजेचे खांब, त्यावरून जाणाऱ्या तारा, कचऱ्याचे मोठे डबे आणि त्यात काही वेळा डब्याभोवती बाहेरच जास्त कचरा असं चित्र अनेक वेळा दिसत होतं.

.

ठिकठिकाणी पवनचक्क्या आहेत. अनेक ठिकाणी सोलर पॅनलही दिसतात. युरोपातील सर्वात मोठा सोलर प्लांट इथे जवळच आहे. सौर ऊर्जेचा अगदी सुयोग्य वापर करण्यात येतो.

.

.

.

.

त्यातून या सहलीत गाण्यांची पण मजा आली. तिथे जाऊन भाड्याने गाडी घेऊ तर गाणी असावीत म्हणून घरून घेऊन जाऊ असं डोक्यात होतं. आता सृजन आहे तर बालगीतं पण ठेवू सोबत, म्हणून खास भारतातून आणलेल्या सीडी घेतल्या. या अगदी घाईत घेतल्या होत्या, त्यातली एक चालतच नव्हती आणि दुसरीत शिवरायांच्या कथा ते राम जन्मला गं सखे सारखी गाणी होती. युंही चला चल राही सारखा रस्ता आणि मध्येच ही गाणी वाजली की करमणूक होत होती. सातही दिवस आम्ही ही मोजून १५-२० गाणी ऐकत होतो. यापुढे सहलीसाठी ना बघता बालगीतांच्या सीडी घाईत उचलायच्या नाही हा धडा घेतला.

तर Alhambra म्हणजेच हा ग्रानाडाच्या जवळ असणाऱ्या किल्ल्याला जाण्यासाठी निघालो. सकाळी लवकर आवरून निघालो, पण आमच्या नेव्हिगेशनने काहीतरी गडबड केली आणि आम्हाला ग्रानाडा शहराच्या मुख्य भागातून आणले. आणि इथे सगळ्यात मजा वाटली ती सिग्नलची. आजवर जगात सगळीकडे लाल, हिरवा आणि पिवळा हे सिग्नल पाहिले/ऐकले होते, पण इथली पद्धत फार वेगळी होती आणि बरेच ठिकाणी अगदी लहान आकाराचे सिग्नल होते. कधी लाल दिवे चालू बंद होत होते तर कधी फक्त पिवळा चालू बंद होत होता, कधी स्टेडी रेड किंवा ग्रीन असे मजेशीर प्रकार होते. शिवाय आजूबाजूचे बरेच जण नियम न पाळणारे आहेत असं वाटत होतं त्यामुळे कुणाला फॉलो करावं तेही नीट समजत नव्हतं. ते समजून घेत आणि नेव्हिगेशन गडबड करतंय हे लक्षात आल्यावर रस्त्यावरच्या पाट्या बघत किल्ल्यावर पोचायला बराच वेळ लागला. पार्किंग शोधून आता पहिले काहीतरी खाउयात असा विचार केला. पण तिथली सगळी रेस्टॉरंट्स, छोटी दुकानं बंद. एकच दुकान होतं, तिथे शाकाहारी म्हणून फक्त एक थंडगार बागेत आणि चीज मिळालं, आणि त्याच्या सोबत ऑलिव्ह ऑइल. इथे प्रत्येक ठिकाणी ऑलिव्ह ऑइल मिळायचं, सकाळी ब्रेकफास्टलाही ब्रेड आणि ऑलिव्ह ऑइल. पुढे किल्ल्याकडे जाताना एक हॉलंडची बाई भेटली, ती भारतात बरेचदा जाते आणि तिथे तिला खूप आवडतं. त्या ५ मिनिटात भारतीय अन्नपदार्थ या नेहमीच अग्रस्थानी असलेल्या विषयावर सुद्धा ती भरभरून बोलत होती. भारतात जाऊन आलेला कुणीही परदेशी माणूस आपली खाद्यसंस्कृती हमखास अनुभवतो, त्याबद्दल आवर्जून बोलतो, तर इथे आम्ही कुणी खायला देता का प्लीज म्हणत सतत इकडेतिकडे फिरत होतो या सगळ्याची गंमत वाटत होती. :)

युरोप आणि आफ्रिका या दोन्ही खंडांमधील संस्कृती अभिमानाने इथे नांदते असा हा किल्ला. किल्ल्याचा मुख्य भाग आणि बाहेर असलेली बाग याशिवाय Nasrid Palace हे एक दालन आहे ज्याची तिकिटे आधीच ऑनलाईन काढून ठेवली तर फायदा होतो. बाहेरची बाग, किल्ल्यावरून दिसणारे दृश्य छान आहेच, पण मुख्य हे दालन फार सुंदर आहे. बाहेर मोकळी जागा खूप होती म्हणून तिथे सृजन सोबत खेळत बसलो. इथेही खायची पंचाईतच होती, एक तर कॉफी किंवा मग तेच पुन्हा प्लेन बागेत आणि चीज. गेला बाजार हमखास कुठेही मिळणारया फ्रेंच फ्राइज सुद्धा दिसेनात, काही नाही तर चॉकलेट, चिप्स असेही काही प्रकार नाही. बरं इथे तसे बरेच पर्यटक होते, पण खायला काही विशेष मिळाले नाही. मग पुढे Nasrid Palace ला जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असूनही, इथे काही वेळा भाषेची अडचण आली. ठराविक लोकांच्या ग्रुपला दर अर्ध्या तासाने इथे आत सोडले जाते. हा फार सुंदर अनुभव होता, आत किती आणि काय बघू, कुठल्या नक्षीकामाचे कौतुक जास्त करू असा प्रश्न पडत होता. इथे बराच वेळ सगळं निवांत बघण्यात गेला आणि हा किल्ला बघण्याचा पुरेपूर आनंद मिळाला. बाहेर येऊन परत खायला शोधाशोध केली आणि पुन्हा काहीच मिळत नाही हे लक्षात आल्यावर तसेच परतीच्या रस्त्याला लागलो.

.

.

.

.

.

.

.

.

यानंतर परत एक दिवस जरा निवांत घालवला आणि मग Almeria आणि तिथून जवळच असलेलं लाईट हाऊस हे आमच्या हॉटेल मधल्या मुलीने सुचवलेले ठिकाण निवडले. इथे जाताना सुरुवातीला बर्फाच्छादित शिखरं, मग अगदी विराण डोंगर, गुहा आणि मग एखाद्या वळणानंतर दिसलेली समुद्राची झलक, मग अजून जवळून दिसणारा समुद्र, नंतर नजरेला सतत दिसणारी हिरवळ, उंच नारळाची झाडं असं निव्वळ २ तासात सतत बदलणारं निसर्गाचं रूप दिसत होतं. आम्ही अर्धा ते पाऊण तास समुद्रकिनाऱ्याजवळून जात होतो, अधून मधून घरांची वस्ती दिसत होती पण एकही माणूस तिथे नव्हता. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. मध्ये काही गावं लागली पण सगळीच सुनसान. एका गावात शाळेत मुलं दिसली, तिथे पार्किंग बघत होतो पण आजूबाजूला बाकी एकही हॉटेल, लहान रेस्टॉरंट, सुपरमार्केट काहीच नव्हतं. अनेक गल्ल्या फिरत शेवटी एक हॉटेल दिसलं, तिथे पुन्हा खायला शाकाहारी पर्याय काहीच नव्हते, अगदी चिकनचे पण नाही. अगदी समुद्रकिनारी लागून असणाऱ्या या ठिकाणी किंवा किनाऱ्यावर एकही माणूस नव्हता, शिवाय इंग्रजी विसराच. गर्दी नाही हा खरं तर फार चांगला योग, एरवी नकोशी होते ती, पण इथे अगदीच एकाट, भकास वाटत होतं. आम्ही हे बुकिंग करण्यापूर्वी जेव्हा माहिती शोधत होतो, तेव्हा कुठल्यातरी बेटांवरचा असाच अनुभव एकाने लिहिला होता, त्यांना एका जेवणासाठी कसं खूप फिरावं लागायचं आणि मग ते लोक जास्तीचे पैसे घ्यायचे, घोस्ट टाऊन फिलिंग कसं अनुभवलं वगैरे याबद्दल. सलग २-३ दिवस फिरल्यावर आम्हाला हे सगळं परत आठवलं. इथे हे असंच होणार याची आता मनाची तयारी झाली होती. मग थोडा वेळ वाळूत, पाण्यात खेळलो आणि परत निघालो. लाईट हाऊस पर्यंतचा रस्ता तर अप्रतिम होता. उंचावरून दिसणारा समुद्र, लाटा दगडांवर आपटून होणार आवाज आणि बाकी फक्त शांतता. इथे काय किंवा अगदी भरवस्तीच्या ठिकाणी काय, स्वच्छतागृह देखील सहजी कुठे दिसत नव्हते. थोडा वेळ थांबून आता अलमेरीया च्या मुख्य भागात जाऊ असा विचार केला आणि निघालो. आधीच्या कुणीच नसलेल्या हॉटेलात वायफाय मात्र होतं, त्यामुळे आम्ही काही हॉटेल शोधून ठेवले आणि तिथे पोचलो. इथे थोडे लोक दिसत होते आणि एका ठिकाणी फार उत्तम खायलाही मिळालं. स्पॅनिश तापास बार मध्ये खायची इच्छा पूर्ण झाली. वेटर लोकांना इंग्रजी येत नसलं तरी आजूबाजूच्या अनेकांनी मदत केली. खाल्ल्यामुळे ताजेतवाने झालो, पुन्हा एकदा समुद्राच्या वाळूत, किनाऱ्यावर खेळलो आणि परत आलो. इथे नकळत स्विसशी तुलना होतेच, कारण तिथेही बऱ्याच आडवाटेच्या, अजिबात वस्ती नसलेल्या ठिकाणी आम्ही गेलो आहोत, पण कुठलीच अडचण आली नाही आणि खाण्याचेही काहीतरी पर्याय उपलब्ध असतात हे पाहिले आहे.
एकूणच नजर जाईल तोवर दिसणारी समुद्राची निळाई, वाळू, लाटा हा अनुभव शब्दातीत असतो, त्यामुळे दिवसाच्या शेवटी ते सगळं आठवून छानच वाटतं. अतिशय सुंदर, पर्यटकांची फार कमी सावली असलेला हा भाग होता. स्वित्झर्लंड सारख्या देशात फिरताना बरेचदा प्रश्न पडतो की एवढ्या गर्दीत इथे आपले बॉलिवूडचे सिनेमे शूट करताना काय होत असेल? पण स्पेन मध्ये अजून तरी बऱ्याच भागात लोक अगदी निवांत, अज्ञातवासात राहून शूटिंग करू शकतील असं मनात येऊन गेलं. जिंदगी ना मिलेगी दोबारा नंतर भारतीय लोक स्पेनमध्ये जाण्यात बरीच वाढ झाली आहे (यात आम्ही पण आलोच) पण तरी अजून इतर देशांपेक्षा इथे मोकळीक दिसते आहे.

.

.

.

.

.

आता पुढे कुठे जायचं यावर विचार चालू झाला. अंडालुसिया मधली इतर काही प्रसिद्ध पर्यटन स्थळं म्हणजे Seville आणि Cordoba. पण हे सगळंच आम्ही राहत होतो तिथून किमान ३ तासांवर होतं. म्हणून शेवटी ते सगळे रद्द केले. दुसऱ्या दिवशी जवळच जाऊ म्हणून Guadix ला परत गेलो. इथलं चर्च फार सुंदर होतं. तिथे समोरच एक दिवस शाळेतल्या मुलींचा फ्लेमिंकोचा कार्यक्रम असावा, कारण बऱ्याच मुली सुंदर नटून थटून त्यांच्या पालकांसोबत दिसल्या. सृजन अगदीच लहान असल्यामुळे तो हे असं काही आम्हाला बघू देणार नाही हे माहीत होतं, त्यामुळे आम्ही याबद्दल आधीही काही शोधलं नाही. हे आता पुढच्या सहलीसाठी ठेवलं आहे. इथे मात्र तसं खास पर्यटन स्थळांमध्ये नाव नसतानाही, काही सुवेनियर शॉप्स, हॉटेल्स होती. शाकाहारींसाठी किमान ग्रिल्ड व्हेजिटेबल्स मिळाल्या आणि त्याच्याही सोबत ऑलिव्ह ऑइल आले. आपल्याकडे जसे ऑर्डर दिली की हॉटेल मध्ये कांदा, लोणचं आणून ठेवतात अगदी तसंच. पण या सगळ्या ठिकाणी लोक फार अगत्याने बोलत होते. आमच्याशी बोलताना भाषेची अडचण होती, पण तिथले बाकीचे लोक आपसात अगदी मोकळेपणाने बोलताना वाटले.

डिसेंबर मध्ये जर्मनीत आणि मध्य युरोपात सगळ्या घरांच्या बाहेर, रस्त्यावर, दुकानात सगळीकडे नाताळमय वातावरण असतं, त्यामानाने इथे कुठेच काहीच दिसत नव्हतं. अगदी विमानतळ, आम्ही राहिलो ते ठिकाण, सुपरमार्केट्स, जवळच्या गावातून फिरताना कुठेच आता नाताळ तोंडावर आलाय याची वर्दी मिळत नव्हती. फक्त इथल्या चर्च समोर सुंदर लायटिंग केले होते.

.

.

.

.

.

शेवटच्या दिवशी Nerja (नेरया) ला गेलो, रिक स्टीव्हजचे युरोपातील भटकंती बद्दलचे बरेचभाग आम्ही बघतो. त्यातच त्याने स्पेन बद्दलच्या भागात या ठिकाणाबद्दल सांगितले होते, आणि ते बघून गेल्याचं सार्थक झालं. ही जागा फारच आवडली. एक तर इथे बरेच पर्यटक दिसत होते, सगळीकडे हॉटेल्स, सुवेनियर शॉप्स चालू होते. कुठेही आता काही खायला मिळेल की नाही अशी चिंताजनक परिस्थिती नव्हती. आणि गर्दी म्हणावी इतके लोकही नव्हते. इथे समुद्रकिनारा आहे, आणि मुख्य शहराच्या जवळच थोडी उंचावर एक जागा आहे, हिला Balcón de Europa म्हटलं जातं. मोकळी जागा, जवळच काही हॉटेल्स, व्हायोलिनचे सूर आणि सुंदर फुलांची सजावट आणि दूरवर दिसणारा अथांग समुद्र असं उत्साही वातावरण होतं. खाऊन पिऊन जवळपास भरपूर पायी भटकून आलो. हे ब्रिटिश लोकांचं फार आवडतं ठिकाण आहे असं ऐकलं होतं, आणि आजूबाजूला सतत इंग्रजी ऐकू आलं तेव्हा हे जाणवतही होतं. एक दिवस जाऊन निवांत समुद्रकिनारी बसायला अगदी आयडियल ठिकाण वाटलं. इथल्या गुहा आणि लेण्या पण प्रसिद्ध आहेत पण तेवढा वेळ नव्हता म्हणून तिथे गेलो नाही, पण पुन्हा कधी या भागात आलो तर इथे यायचंच हे पक्कं ठरवलं.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

आता परतीचे वेध लागले होते. प्रत्येक सहलीत काही अविस्मरणीय अनुभव येतात, काही ठिकाणं आवडतात तर काही नाही. यात संपूर्ण दक्षिण स्पेन किंवा अंडालुसिया बघून झालं नाही. आम्ही राहायचं ठिकाण जरा दूरचं ठरवलं हे एक कारण, शिवाय आधीचे २ दिवसात सगळीकडे जी परिस्थिती दिसली, त्यामुळे अजून कुठे एवढ्या दूर जाऊन सगळं बंद असेल तर कशाला, असा विचार करून जरा कंटाळा पण केला. अलमेरियाच्या लाईट हाऊसला गेलो त्यादिवशी, इथे या सुनसान जागेपेक्षा आपण मुख्य मालागा मध्ये रिसॉर्ट बुक करायला हवं होतं असंही थोडावेळ वाटलं. पण मग या गुहा, प्रवासात दिसलेला अतिशय वेगळा परिसर, दूरवर भुरकट रंगाचे डोंगर आणि माती, गुहा, मग क्षितिजावर दिसणारा समुद्र आणि मग त्याच्या सोबतीने प्रवास हे विलक्षण आणि आजवर कधीच अनुभवलेलं नव्हतं, त्यामुळे हा सगळा अनुभव बघता हे पारडं जड वाटलं. इतरत्र दिसणारी हिरवाई, लाल कौलारू घरं, नद्या, तळी याच्या अगदी उलट दिसणारं हे चित्रही मनात तेवढंच कायमस्वरूपी कोरलं गेलं. शेवटी प्रवास करताना हे असे अनुभव पण हवेच असतात. पण शक्य असेल तर उन्हाळ्यात किंवा जरा कमी थंडीच्या दिवसात जाणे जास्त चांगले असे वाटले. बाहेर खाण्याची उपलब्धता अगदीच कमी असल्याने घरीच रांधा वाढा उष्टी काढा प्रकार सहलभर करायचे आहेत याची जाणीव वेळोवेळी होत होती. मागच्या काही वर्षात बहुतांशी सहली स्वतःच्या गाडीने केल्यामुळे आम्हाला हवं तेवढं सामान घ्यायची सवय झाली आहे. नाही लागलं तर परत आणू घरी म्हणून जरा जास्तच गोष्टी भरल्या जातात. यावेळी विमान प्रवास आणि सृजन साठी म्हणून खाण्याचे सामान भरताना नाकी नऊ आले होते. पण तरीही त्यातल्या त्यात शक्य तेवढं सामान आणलं हे बरं झालं असं वेळोवेळी वाटलं, कारण खाण्यासाठी बहुतेक वेळा घरून आणलेल्या सामानानेच निभावून नेले. हायवे वर कुठे पेट्रोल पंप किंवा हॉटेल बघून थांबायचं ठरवलं तर तिथेही एखादं सँडविच मिळायचं, तेही फक्त दोन ब्रेड, मेयॉनीज आणि लेट्युस असं. बाकी युरोपात फिरताना हायवे रेस्ट स्टेशन्स वर बहुतांशी इथली चेन रेस्टॉरंट्स, एखादं कॉफी शॉप, बेकरी असे पर्याय नेहमीच असतात. त्यामुळे काहीही झालं तरी काहीतरी ब्रेड, केक, सलाड असं काही ना काही मिळतंच. ते इथे फारच वेगळं वाटत होतं. शेवटच्या दिवशी मालागाला आलो आणि पहिले एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाऊन पोटभर आयतं खाऊन शांती मिळाली.

परत येताना मालागा विमानतळावर आलो तेव्हा हा स्पॅनिश भोंगळ कारभार पुन्हा पुरेपूर अनुभवला. सिक्युरिटी साठी इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि नीट रांगा नाही, माहिती नाही, लोक मध्येच घुसत आहेत, लहान मुलं सोबत असली तर त्यांच्या स्ट्रोलर साठी जागा या कशाच बाबतीत शिस्त नव्हती आणि सगळेच लोक वैतागले होते. पण तरीही स्पेनची पहिली भेट फार आवडली आणि इतर अनेक गोष्टी अनुभवण्यासाठी परत यायला हवं हे पक्कं केलं. शेवटी एकदाचे परत विमानात बसलो, विमानातून सर्वत्र परत बर्फाचे डोंगर दिसायला लागले

.

.

याच सगळ्या आठवणीत रेंगाळत जर्मनीत सुखरूप पोहोचलो.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle