कोकणातील काळे मोती ... करवंद

मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी असते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की. बीचं कवच काढून आणि आतली बारकीशी चारोळी एकसंध मिळवली की काहीतरी खूप मोठं मिळवल्यासारखं वाटतं. बी बोटात पकडणं , हातोडीने बी वर करेक्ट प्रेशरचा घाव घालून बीचे दोन भाग करणं आणि मग ती नखएव्हढी चारोळी मिळवणं.. म्हटलं तर खूप कठीण.. एक दोन तास बिया फोडत बसलं तरी अर्धा वाटी चारोळी ही मिळत नाही.

मे महिन्यातच मिळणारा माझा दुसरा आवडता रानमेवा म्हणजे डोंगरची काळी मैना म्हणजे काय सगळ्यानाच माहितेय ... म्हणजे करवंद... आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत कातकरी स्त्रिया दुपारच्या वेळी दारावर करवंद विकायला घेऊन येत असत. तेव्हा पाच आणि दहा पैशाला हा एवढा मोठा वाटा मिळत असे पण त्यासाठी ही आम्हाला आईकडे हट्ट करावा लागे तेव्हाच दोन चार दिवसातून एखाददा घेत असे आई. त्याकाळी खेळाची साधन जास्त नसल्याने करवंद खाताना आमचा कोंबडा की कोंबडी हा खेळ रंगत असे. काही करवंद आतून पांढरी असतात तर काही लाल. म्हणून ते खायच्या आधी समोरच्याने करवंद आतून पांढर ( कोंबडी ) निघेल की लाल ( कोंबडा ) हे गेस करायचं. आपला अंदाज बरोबर निघाला तर आपल्याला समोरचा एक करवंद देणार आणि चुकला तर आपण त्याला द्यायचं. असा तो खेळ. कोंबडा आहे की कोंबडी यावरून आमची भांडण होत पण असत. थोडक्यात काय कारवंदांमुळे आमची उन्हाळ्यातली दुपार त्या लाल लाल करवंदांसारखी रंगीन होत असे.

लहानपणी कधी ट्रेन ने पुण्याला गेलो मे महिन्यात तर कर्जतचा वडा खाऊन झाला की मग पळसदारी पासून पार लोणावळ्या पर्यंत आदिवासी बायका करवंद विकायला घेऊन येत डब्यात . घाटामध्ये खिडकीशी बसून बाहेरची शोभा बघत द्रोणातली करवंद खाण्यात , मध्येच माकडं दिसली तर त्यांना टाकण्यात लोणावळा कधी आलं ते कळत ही नसे.

लग्न झाल्यावर सासर कोकणातलं खेडेगाव असल्याने करवंद अगदी जवळून बघता आली. एकदा मे महिन्यात कोकणात गेले होते. संध्याकाळी पाय मोकळे करायला आणि आंब्याच्या बागा बघायला म्हणून सड्यावर निघालो होतो. तर वाटेत अचानक “ जालीमंदी पिकली करावंद “ समोर आली आणि मी हरखूनच गेले. करवंदाची जाळी ( करवंदाच झुडूप ) मी प्रथमच बघत होते. एकाच वेळी काही पिकुन काळीभोर झालेली, डेखाकडे लालट होऊन पिकायच्या मार्गावर असलेली, काही अगदी हिरवी आणि काही फ़ुलं असं सगळंच होतं एकाच वेळी त्या जाळीवर. करवंदाच फ़ुलं साधारण जाईच्या फुलासारखचं दिसत आणि त्याला एक प्रकारचा गोड वास ही येतो. करवंदाची पान बेताच्या आकाराची गोलसर आणि थोडी जाड असतात. आमच्या बरोबर आलेल्या मुलांनी त्याची पिपाणी करून ती वाजवली देखील . सड्यावरच्या शांत वतावरणात कृष्णाच्या बासरी सारखी भासली मला ती. आमच्याकडे असा समज आहे की चैत्रातल्या अमावस्येच्या रात्रीच करवंद पिकतात आणि काळी होतात. आणि हो .. त्या बाबतीत ही करवंदाची जाळी प्रसिद्ध आहेच. म्हणजे बघा अमावस्या पौर्णिमेला कोणाला ही जाळीकडे फिरकायला ही परवानगी नसते. हं तर काय सांगत होते ... पिकलेली करवंद तर मला गोड लागत होतीच पण हिरवी कच्ची असलेली ही झाडावरून डायरेक्ट तोंडात टाकताना फारच गोड लागत होती. हाताल्या लागलेल्या चिकाची आणि तोडताना लागणाऱ्या काट्याची पर्वा न करता मी ती गोळा करतच होते. शेवट हातात मावेनाशी झाली तेंव्हा यजमानांनी त्याच्याच जरा मोठ्या पानांचे त्याचेच काटे टोचून सुंदरसे द्रोण करून दिले . त्या हिरव्यागार द्रोणात ती पिकलेली काळी भोर करवंद फारच खुलून दिसत होती. मग काय मी खूप गोळा केली आणि द्रोण एकावर एक ठेवून घरी घेऊन आले.

फ़ुलं आणि कच्ची करवंद

IMG_20170313_175505148.jpg

ही पिकलेली

18443464_1252873821506273_533402296411750400_n.jpg

कच्च्या करवंदाच मेथांब्या सारखं गोड लोणचं करतो आम्ही. फक्त त्याना चिक खूप असल्यामुळे दोन तीन वेळा पाण्यातून नीट धुवावी लागतात. ते गोड लोणचं खूपच छान लागत. कच्ची करवंद थोडी ठेचून त्यात नेहमीच मसाला घालून तिखट लोणचं ही छान होतं. तसच आंब्याच्या तात्पुरत्या लोणच्यात ही कच्ची करवंद घालतो थोडी . ती दिन चार दिवस मुरली की आतल्या बियांसकट खायला छानच लागतात.

ह्या बिचाऱ्या करवंदाची ना कोणी लागवड करत , ना कोणी त्यांची मशागत करत, ना कोणी त्याना कधी खत पाणी देत. पण निसर्गच त्यांची काळजी घेतो आणि दर वर्षी उन्हाळ्यात आपल्याला गोड गोड फळं ही देतो. असो. त्याच्या सुकलेल्या फांद्याचा त्यावर असलेल्या मोठ्या मोठ्या काट्यांमुळे कुंपणासारखा उपयोग करता येतो .तसेच अलीकडच्या काळात काही ठिकाणी बागेला कुंपण म्हणून म्हणून ही करवंदाची झाडं लावल्याचं ही पाहिलं आहे.

एकदा मे महिन्यात आम्ही घरातल्या सगळ्या मुलांना घेऊन सड्यावर जात होतो. वाटेत करवंदाच्या जाळ्या बघून मुलं त्यावर तुटून पडली. मुंबईच्या मुलांच्या अंगात तर वारं च भरलं होतं. ती जाळी तशी खूप मोठी आणि गोल होती. मुलं चारी बाजूनी करवंद तोडत होती, खात होती. चिकामुळे चिकट झालेले हात दुसऱ्याच्या गालाला मुद्दाम लावून त्याला चिडवत होती, अशी सगळू मजा मजा चालली होती. परंतु त्या जाळीत लाल डोंगळ्यानी केलेलं एक भलं मोठं पानांचं वारूळ होतं. आत हजारोंच्या संख्येनी असतील डोंगळे जे चावले की अंगाला चिकटून बसतात आणि जिथे चावतात ती जागा भयंकर लाल होऊन खाज ही खूप सुटते. कुतूहलाने एक मुलगा ते काय आहे हे बघण्यासाठी त्यात हात घालतच होता पण तेवढ्यात यजमानांच लक्ष गेलं आणि त्याला अक्षरशः मागे खेचलं. खेचताना काटे लागले पण डोंगळ्यांपासून तरी वाचला. त्याने त्यात हात घातला असता तर काय झालं असत ह्या विचाराने आज ही अंगावर काटा येतो.

करवंदांची एक खूप मजेशीर, चांगल्या अर्थाने कायम लक्षात राहील अशी ही एक आठवण आहे. ती इथे शेअर केल्या खेरीज रहावत नाहीये. मे महिन्यात दुपारी आम्ही सगळ्या जणी मागच्या अंगणात काही तरी काम करत बसलो होतो. धनगराने सड्यावरून सकाळीच पिकलेली गोड करवंद आणून दिली होती, ती खात बाजूलाच मुलांचा खेळ ही रंगला होता. कारवंदांमुळे ओठ आणि जीभ लाल झालेली मुलं फार गोड दिसत होती. काम करता करता आमच्या गप्पा ही रंगात आल्या होत्या.

अचानक घरातला एक अगदी छोटा तीन चार वर्षाचा मुलगा माझ्या जवळ आला, आपलं नाजूक मऊ, नाजूक छोटसं बोट माझ्या ओठावर चोळून माझे ओठ ही लाल करून गेला. पिकलेलं लाले लाल करवंद त्याने आधी स्वतः च्या बोटावर चोळलं आणि मग माझ्या ओठावर ! वरती म्हणाला ही , " बघ, तुला लिपसिक लावली असं." त्याचा त्यातला निरागसपणा नितांत सुंदर होता. हे सगळं घडलं क्षणार्धात आणि अचानक पण त्यामुळे किती तरी वेळ सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. त्या मऊ, कोवळ्या, निरागस, निष्पाप, निर्व्याज स्पर्शाची आठवण आज ही माझ्या मनावर मोरपीस फिरवते आणि एवढया जणी आजूबाजूला असून ही त्याने ह्यासाठी माझीच निवड करून मला एक अविस्मरणीय अनुभव दिला म्हणून मी स्वतः ला खूप भाग्यवान ही समजते.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle