सॅन फ्रन्सिस्को च्या वाटेवर ...भाग - ४

भाग – ४
सेन फ्रांसिस्को ची रोमांचक सफर
सकाळी ६:३० ला हॉलिडे इन मधून चेक आउट केले आणि उबर ने एअर पोर्ट जवळच्या कार रेंटल ला गेलो. तिथून Mid Size SUV सेन फ्रांसिस्कोला जाण्यासाठी घेतली .सकाळी ८ ते दुसर्या दिवशी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सेन फ्रांसिस्को एअर पोर्ट च्या त्याच कार रेंटल ऑफिस ला ही कार अमुक एक पेट्रोल भरून –म्हणजे कर घेताना जितके पेट्रोल असेल तितके – परत द्यायची होती.कार अपडेट असल्याची कागदी कार्यवाही करुन त्याबाबत चा एक फॉर्म सह्या शिक्के मारून सेन फ्रांसिस्को ऑफिस साठी देण्यात आला.गाडीच्या किल्ल्या हातात मिळाल्या बरोबर आम्ही तिथून पुढील प्रवासाला निघालो.
पुढचा मुक्काम एल.ए.जवळ असलेल्या “ गेटी आर्ट म्युझियम “ इथे होता.सन १९७४मध्ये जे.पॉल.गेटी. ने ब्रेंट वूड येथे एक प्रायमरी म्युझियम उघडले. ब्रिटीश अमेरिकन गेटी पेट्रोल इंडस्ट्री चा मालक आणि १९५७मध्ये १:२ बिलियन ची संपत्ती असलेला ,अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.त्याला कला जगतातल्या उत्तमोत्तम वस्तू संग्रह करण्याचा नाद होता. इथे मध्य युगापासून सध्याच्या काळाचे पेंटींग्ज जतन केले आहेत.मोठे ३-४ हॉल आहेत. तिथे गेटी परिवारातील व्यक्तींची चित्र आणि संपूर्ण माहिती दिली आहे. एका हॉल मध्ये तासाभराची ध्वनी-चित्रफीत दाखवतात.इथून वर मालिबू डोंगरावर ,कला.स्थापत्य आणि बाग ह्यांचे अप्रतिम दर्शन घडविणारे गेटी म्युझियम आहे. गेटीने आपल्या अधिपत्याखाली ह्या अप्रतिम म्युझियम ची उभारणी केली आहे. आर्किटेक रिचर्ड मेलर ने इटालियन वास्तुरचनेचा सुंदर अविष्कार उभा केला आहे. ब्रेंट वूड पासून मालिबू जाण्यासाठी केबल कार ची सोय केली आहे. वळणा-वळणाने जाणारी कार संपूर्ण एल.ए. चे मोहक दर्शन घडविते.म्युझियम पहायला समूहाने प्रवेश दिला जातो त्या पूर्वी प्रत्येकाला एक इअर फोन सेट दिला जातो. टूर गाईड सूचना देवून प्रत्येकाने कानाला ईअरफोन लावून बेटरी स्वीच ओंन केल्याची खात्री करून घेते. आता गाईड च्या मागोमाग आम्ही जाउ लागलो. गाईड प्रत्येक चित्राची विशेषता सविस्तर वर्णन करुन सांगत होती .तसेच चित्राविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत होती.सन १५२८ पासून १८९५ पर्यंतची उत्तमोत्तम चित्रे इथे संग्रहित केली आहेत. इतक्या उत्तम दर्जाचे रंग तेव्हा वापरले होते ,थ्री डायमेन्शन ची चित्रे तर अप्रतिम आहेंत. सीमित साधने असूनहीइतक्या सुंदर ,बेजोड कलाकृती निर्माण करणार्या कलाकारांना वंदन.लिओ नारडो डा विंची,मोने,रन ग्रेम चे ओरिजिनल पेंटीग पाहिले. यामध्ये “ न्यूड एक्सिबित्स “ हे चित्र फ्रांस च्या म्युझियम मधून पहिल्यांदाच बाहेर पडून ह्या गेटी म्युझियम ला आले आहे. थोड्याच दिवसांत ते परत पाठविले जाणार होते. तिथे भरपूर फोटो काढले.
NUDE.jpg
NUDE + Me
Painting - 1.jpg
Painting-2.jpg

म्युझियम च्याच आवारात असलेल्या केफेटेरीया मध्ये सलाद आणि पीनट बटर सेन्दवीच खाल्ले. तिथे देशोदेशीचे विद्यार्थी अभ्यास सहली साठी आले होते. गेटी द्वारे कला आणि संस्कृती जतन संस्थांसाठी विशेष ग्रांट देण्यात येते. गेटी म्युझियम मेनेजमेंट रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात.तर इतर देशाविदेशातून विशेष शिक्षणासाठी विद्यार्थी येतात.इथले स्थापत्य विस्मयचकित करणारे आहे. दोन बिल्डींग मध्ये त्याचे उत्तमोत्तम नमुने होते.त्याशिवाय अप्रतिम गार्डन ही होते.
IMG_9060.jpg
पण पुढचा प्रवास लक्षात घेता आम्ही तिथे न जाता परतण्याचे ठरविले. व्यवस्थित पाहण्यासाठी इथे एक दिवस ही कमी पडेल इतके गेटी म्युझियम अप्रतिम आहे. केबल कार ने आम्ही खाली आलो. खाली बेसमेंट मध्ये विस्तीर्ण पार्किंग आहे.
२:३० वाजता मुख्य रस्त्याला आलो. गूगल मेप वर हाय-वे टाकले होते.पण एल.ए.चा ट्राफिक जास्त होता म्हणून गूगल बाईने आपल्या मनाने १०१` ची वाट दाखवली. तिथे गर्दी कमी होती. आम्हाला समुद्र काठावरून जायचे होते. समुद्र दिसेना .तेव्हा बाई चा घोळ लक्षात आला . म्हणून एक्झिट घेतली व जी.पी.एस.मध्ये हायवे १ चा पोइंट घातला. आम्ही समुद्र सोडून आत शिरलो होतो .तिथून बाहेर यायला अर्धा तास लागला .ह्यामुळे १८ मैल लांबचा प्रवास घडला.
आता समुद्राकाठावरून आमचा प्रवास सुरु झाला .
IMG_9159.jpg
डावीकडे सुंदर खळखळत्या लाटांचा समुद्र तर उजवीकडे हिरवीगार वनराई समोर हिरवाई ल्यायलेल्या डोंगरांची रांग आणि त्याच्या पायथ्यावरून जाणारे घुमावदार रस्ते.एक डोंगर ओलांडला कि लगेच दुसरा समोर तिसरा लांबवर दिसायचा. खूप छान दिसत होते. आकाशाचा निळा मधेच गुलाबी तर कुठे पांढरा शुभ्र रंग मन मोहून टाकत होता. पण थोड्याच वेळात दृष्ट लागल्यासारखे उजवीकडचे चित्र पालटले.
IMG_9085.jpg
उजवीकडे केलीफोर्नियाचे जळालेले जंगल दिसु लागले.सगळीकडे उंचच उंच आडवे-उभे काळे वृक्ष ,जमीनही काळी,उभे डोंगरही काळे बोडके. कित्येक मैल हे च दृश्य दिसत होते. २०१८ च्या ऑगस्ट आणि तदनंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर मध्ये लागलेल्या वणव्या मुळे केलीफोर्नियाचे हे नंदनवन बेचिराख झाले.त्याची आग पुढे कित्येक महिने धुमसत होती. वातावरणातील लाक्षणिक बदल म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग मुले तापमानात झालेली विलक्षण वाढ, आग लागल्यावर भस्म झालेली नैसर्गिक रीत्या वाळलेली वृक्ष संपदा हे एक मुख्य कारण होतेच त्याशिवाय कित्येक मानवी कारणे उदा. केम्प फायर, आतिश बाजी ,सिगारेट्स ,वीजवाहक तारा वगेरे गृहीत घेतली गेली. ह्या भीषण आगीचा अंदाज येण्यासाठी –एका मोजणीनुसार ह्यां समग्र भागात एकूण १२९ मिलियन वृक्ष जाळून खाक झाले. इथे अधून मधून पावसाचे शिंतोडे पडत होते.त्यामुळे हवेत एक बारीकसा जळका दर्प जाणवत होता.
उजवीकडचा मनमोहक समुद्र तर डावीकडे बेचिराख झालेले जंगल .मनाची अवस्था फार बिकट झाली होती. भविष्यात इथे कधीतरी पुन्हा हिरवीगार जंगले निर्माण होतील अशी मनोकामना केली. एव्हाना दुपारचे ३:३० वाजले होते.मावळतीकडे झुकणारा सूर्य ही दिसत होता. पण समुद्राचे गार वारे वाहात होते.इथे संध्याकाळ लौकर होते.एक दोन ठिकाणी अगदी १० मिनिटे समुद्राचे विलोभनीय फोटो काढण्यासाठी थांबलो. बर्याच ठिकाणी हौशी पर्यटक ही दिसले.पर्यटकांच्या सोयींसाठी जागोजागी सुविधा सहित बीचेस बांधले आहेत. ह्या सोयी-सुविधांमुळे पर्यटकांची संख्या आणि उत्साह वाढतो.हे मात्र शतश: खरे.
एव्हाना पावसाला सुरुवात झाली होती.जवळच पसरलेला अथांग सागर , वेडावाकडा पाऊस आणि जोरदार वारे,अनोळखी वाट ,सोबतीला संध्याकाळ ..कार चे वायपर फिरतच होते.
एकूण चार तासाच्या वर सलग प्रवास झाला होता. थोडी विश्रांती,गरम कॉफी आणि काहीतरी मिळेल ते खावेसे वाटत होते. गुगल बाईने ४०मिनिटांवर Big Sur - Nepenthe Restaurant at Big Sur नेपेथी रेस्तारेंट असल्याचे दाखवले.त्यामुळे थोडे हायसे वाटले.बिग सर येथे १९२५ मध्ये एका टेकडी वर बांधलेल्या केबिन भोवती १९४९ मध्ये मिल आणि मेडलन या जोडीने हायवे १ वर हह्या रेस्तारेंट ला सुरुवात केली.आता त्यांचे नातू देखरेख करतात.नेपेंनथी समुद्राकाठी एका लहान डोंगरावर हिरव्यागार वनराईत दडलेले नैसर्गिक सुंदरता ल्यायलेले रमणीय रेस्तारेंत आहे. इथे भिंती,खांब , टेबल-खुर्च्या-बाकडे ,सगळं - धोबड पण टिकाउ लाकडाचे आहे .इथल्या एकूण ७ ० पायर्या खूपच उंच होत्या .पण डावीकडे आधारासाठी कठडा होता . इथे रिमझिम पाऊस सतत असतोच. रेस्तारेंत च्या आतून आणि बाहेरुन कुठूनही पाहिले तर अथांग समुद्र दिसतो. ज्या दिशेला पाहाल तिथे मिनिटा-मिनिटाला समुद्राच्या लाटांचे वेगळे दृश्य .कुठली मोह-माया अन कुठले ते नवरस ! सगळं काही विसरून भान हरपून टाकणार्या अथांग-विशाल पेसिफिक महासागर कडे एकटक नुसतं बघत रहावं असं वाटत होतं.
नेपेथीलाअमाप गर्दी होती. चौकशीसाठी राहुल गेला होता तो परत आला आणि पिझ्झा साठी ४५ मिनिटांचे वेटिंग असल्याचे म्हणाला. संध्याकाळ झाल्याने अंधार पडू लागला होता आणि पाऊस ही पडत होता.साधारण सव्वा तास इथे घालवणे योग्य वाटत नव्हते.म्हणून आम्ही नेपेथे चा कोरडा निरोप घेऊन निघालो .नेपेथे च्या खाली एक लहानसे पण खूप छान आकर्षक वस्तूंचे दुकान दिसले. दुकानात म्सार्व ओळीत फिरून पाय मोकळे केले आणि पुढे निघालो.पेट्रोल चा काटा ही पेट्रोल संपत असल्याचे दाखवत होता .लागलीच एक लहानसा पेट्रोल-पंप दिसला.तिथे मोठा बोर्ड लावलेला होता कि आता ह्यापुढे ४० मैलापर्यंत एकाही पेट्रोल पंप नाही. अडला हरी ! तिथे थोडे से पेट्रोल भरले.पेट्रोल चा भाव ही दुप्पट होता.पुढे ३-४ मैलावर डावीकडे आणि उजवीकडे पेट्रोल पंप दिसले अन भाव ही थोडा कमी होता. अशी ही” बनवा बनवी !”
शेवटी इथे बरोबर असलेली नानखटाई . तीळ पापड ,पोह्याचा चिवडा खाल्ले .पाणी प्यायलो.आता मात्र तुफान पाऊस येत होता सोबतीला काळाकुटट अंधार ,डावीकडे समुद्र रस्त्याची रुंदीही कमी झालेली. उजवीकडे तर काहीच दिसत नव्हते.सरळ रस्ता .एकाही गाव नाही ,त्यामुळे दिवा नाही. अंदाजा-अंदाजाने गाडी चालवावी लागत होती.कुणीतरी सराईत ,ह्या वाटेला माहितगार गाडी ड्रायव्हर अचानक वेगाने मागून यायचा आणि पुढे जाण्यासाठी वाट द्यावी म्हणून सिग्नल द्यायचा .रस्ता रुंदीचा अंदाज नव्हता त्यामुळे गाडी खाली उतरवणे ही धोक्याचे वाटत होते.शेवटी रस्त्याच्या कडेला गाडी स्लो करुन जाणाऱ्याला वाट द्यायची.पुन्हा मार्गक्रमण करायचे. दोन्ही कडची रहदारी अगदीच कमी झाली होती. गाडी समोरच्या हेड लाईट मध्ये जेमतेम ८ ते १० फुटांचा रस्ता दिसत होता.एल.ए.-गेटी म्युझियम हून निघाल्यापासून च्या प्रवासात माझं बरंच काही “इथलं” सांगून झालं होत. गप्पा गोष्टी ही संपल्या होत्या .आणखी किती पुढे जायचे आहे ते समजायला मार्ग नव्हता कारण गूगल बाईने नेपेथे सोडल्यावर आमची साथ सोडली होती. एक च होते कि रस्ता अगदी सरळ होता.मोबाईल वर एकाच गाणे रिपीट लावले होते . “ मै रहूं या ना रहूं, भारत ने रहना चाहिये ! त्याच्या साथीने आम्ही अंदाजाने पुढे जात होतो. मधूनच वीज कडाडत होती तेव्हा समुद्र अन उजवीकडचा काही भूभाग दिसत होता.थोड्या वेळाने गूगल संपर्क चालू झाला. ४० मिनिटांवर एक गाव असल्याचे कळले.तिथे एका मोठ्या मोटेल मध्ये रात्री विश्राम साठी बुकिंग केले होते.पावसाचा जोर वाढला होता. विजांचा कडकडाट अधून मधून होताच. डावीकडे समुद्राची साथ होतीच उजवीकडे हे लहानसे गाव होते. मोटेल ला लागुउन एक रेस्तारेंत होते .तिथे पिझ्झा ऑर्डर केला तो पेक करून घेतला आणि आम्ही रूम वर गेलो .पोट पूजा करून निवांत झोपलो ते पहाटेच जाग आली .तेव्हा बाहेर पाहिले तर पाऊस कमी झाला होता इंग्रजी “सी “आकाराच्या दुमजली मोटेल मध्ये १२० पेक्षा जास्त रूम्स होत्या .मधल्या भागात ओपन कार पार्किंग होते तर रूम लगत मोठा स्विमिंग पूल होता. सकाळी ६:३० ला चेक आउट करून गावात निघालो.तिथे कॉफी बिन्स चे दुकान होते.आपल्या पसंतीची रोस्टेड कॉफी बिन्स ची आपल्या समोर विशेष मिक्सरमध्ये पावडर करुन त्याच ब्लेंड ची गरम कॉफी ही बनवून देत होते.तिथून कॉफी बिन्स व तयार कॉफी विकत घेतली.समोर च असलेल्या बेकरीतून ताजा केक विकत घेतला .कॉफी आणि केक चा आस्वाद घेऊन पुढच्या प्रवासासाठी ७:३० ला आम्ही निघालो .मस्त उजाडले होते. काल च्या संध्याकाळ च्या प्रवासाची आठवण करत पुढे निघालो. खरे तर आज डावीकडे असलेला समुद्र ही कालचाच होता ,उजवीकडचे अधून मधून दिसणारे वृक्ष आणि समोरचा सरळसोट रस्ता ही तो च होता.पण कालची रात्र नव्हती तर आजचा दिवस आमचा होता.मिनियापोलीस ते सन डी यागो आणि पुढे लास एंजेलिस हा प्रवास जितका रमणीय होता तितकाच लास एंजलीस ते सन फ्रांसिस्को चा हा कार चा प्रवास साहसी आणि उत्कंठा वर्धक झाला . आजच्या प्रवासाचा पुढचा टप्पा “Hearts Castle “ होता.
हे वर्णन आता पुढील भागात.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle