भाग ४: चौकोरी ते मुन्सियारी

मुन्सियारी TRH वर गेलो. रुममधून थेट हिमालय दर्शन झालं पण अगदी थोड्या वेळाकरीता !

M4-himalaya1.jpg

संध्याकाळी नंदादेवी मंदिरात गेलो तिथून छान पंचचूली दिसत होतं पण तिथेही लगेच ढग आल्याने रूमवर आलो. पाऊस असेल तर भजी खाल्लीच पाहिजेत, शास्त्र असतं ना ते.....लगेच किचनला फोन! गरमागरम कुरकुरीत भजी मस्तच होती ती आयती मिळाल्याने जास्तच चविष्ट लागली. भज्यांचा आस्वाद घेत मॅच बघत बसलो.

M4-himalaya2.jpg

मुन्सियारी खलिया टाॅप ट्रेकसाठी प्रसिध्द आहे. खलिया टाॅपवर पण TRH आहे. एक दिवस चढून जायचं मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी उतरायचं. आरामात उठून नाश्ता करून एक छोटासा ट्रेक करून गायत्री मंदिरात गेलो. छान मंदिर आहे. देव दर्शनाचा पाच वर्षाचा कोटा ह्या पाच दिवसांत पूर्ण करून घेतला.आजचं मुख्य आकर्षण होतं - आर्य फॅमिलीकडचं पारंपारिक कुमांऊ जेवण!

M4-trek.jpg

आर्य फॅमिलीकडे एक वाजता जेवायला जायचं होतं तोवर निव्वळ टाईमपास म्हणून कुमांऊ म्युझीयम बघायला गेलो. आम्ही तिघंच पर्यटक. तिथला कर्मचारी लोळत टीव्ही बघत होता. गाईड बिईडची भानगड नसावीच असं समजून आम्ही बघायला सुरूवात केलेली पाहून कर्मचार्‍याला काय वाटले माहीत नाही तो म्हणाला की, दारापासून सुरुवात करा. मी कॅसेट लावतो. कॅसेट लावून तो परत आडवा झाला. ही कॅसेटची आयडीया भारी वाटली. त्यामुळे नुसतीच नजर न टाकता प्रत्येक वस्तु बारकाईने पाहिल्या गेली.

M4-angat_pangat 2.jpg

आज जी मंडवाची रोटी व भट्टका डुबका खायचा होता त्या धान्याचे सॅम्पल्स लावलेले होते. मंडवा म्हणजे नाचणीच, जे मला वाटत होतं त्यावर शिक्कामोर्तब झालं. भट्ट की दाल म्हणजे आपल्या चवळीचं भावंडं! हा प्रदेश तिब्बेटला लागून असल्याने त्यांच्याशी व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायचा त्यामुळे तिथल्या जीवनमानावर तिब्बेटचा प्रभाव खूप आहे. भारत चीनच्या सरहद्दीवर असलेलं मिलाम हे गांव. ह्या गावाचे बासष्टच्या युध्दापूर्वीचे व नंतरचे फोटो लावलेले आहेत. युध्दाच्या काळात लोकं विस्थापित होऊन आजूबाजूच्या गावात विखुरल्या गेली. आता मिलाम नव्याने वसवल्या व विकसीत केल्या जातंय एक प्रमुख पर्यटनस्थळ व गिर्यारोहकांसाठी बेसकॅम्प म्हणून. बरेच जुने दस्तावेजही जतन करून ठेवले आहेत. परंपरेतून आलेली माहिती व ज्ञान जतन करणारं हे छोटसंच म्युझीयम छान आहे.

काल ठरलं होतं की सौ. आर्या माझ्यासमोर काही पदार्थ करतील. म्युझीयम बघण्यात अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ गेल्यामुळे आमची वाट पाहून त्यांनी अर्धा स्वयंपाक करून टाकला होता. आमच्यासमोर भांग व अंगणातून तोडून आणलेल्या पुदीन्याची चटणी ( त्यांनी लिंबाचा अर्क भांगेच्या चटणीत टाकला होता. त्याची प्रक्रिया व साहित्य म्युझीयममध्ये ऐकलं, पाहिलं होतं. तांब्याच्या कढईत लिंबाचा रस घट्ट होईपर्यंत उकळवून बाटलीत भरून ठेवायचा. वर्षानूवर्षे हा रस टिकतो) पाट्यावर वाटली व मंडवाची रोटी हातावर थापून केली.

M4-angat_pangat 1.jpg

आर्यांची मुलगी हल्द्वानीला कायद्याचं शिक्षण घेतेय. तिच्याशी भरपूर गप्पा झाल्या. तिच्या शिक्षणाचा तिच्या गावात फारसा उपयोग नाही. एक तर तिथे भांडणं, चोऱ्यामाऱ्या, दरोडे, खुन ह्याचं अत्यल्प प्रमाण आहे आणि असलेच तर पंचायत निवाडा देते किंवा 'गोलूबाबाला' साकडं घातल्या जातं. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात इथे लोकांना जायची फारशी गरज पडत नाही. डाॅक्टरच्या दवाखान्याचीही चढत नाहीत का? चढायला ना डाॅक्टर दिसले ना इस्पितळं. फक्त एक सरकारी दवाखाना. शुध्द हवा, शुध्द आहार ( बहुतेक लोकं नैसर्गिक शेती करतात) व कंपल्सरी व्यायाम (रोज डोंगरावरची चढउतार ) म्हणून फिट असावेत. सौ आर्या फक्त सहावीपर्यंत शिकलेल्या आहेत . मुलांनी चांगलं शिकावं म्हणून त्या संसाराला हातभार म्हणून रेडिमेड कपड्यांच दुकान चालवतात. मुलगा आयआयटीची तयारी करतोय दिल्लीला व गीता लाॅ करतेय. सुखी, समाधानी व मनमिळाऊ कुटुंब !

M4-angat_pangat 3.jpg

डोंगरावर असलेल्या घराच्या अंगणात आमची अंगतपंगत मस्त जमली. त्यांच्या खाण्याच्या पध्दतीप्रमाणे मि. आर्य मंडवाच्या रोटीवर भांग चटणी पसरवून आम्हाला देत होते. अंगणातलाच मुळ्याचा पाला व कोवळ्या राजमाच्या शेंगाची भाजी, डुबका व भात. बेत एकदम फक्कड!

आम्ही जेवायला येणार म्हणून सौ आर्यांची आई शेजारच्या गावाहून खास आली होती घरचं तूप घेऊन! काय लिहू? शब्द नाहीयेत भावना व्यक्त करायला..... डोळे पाणावले....या महिन्यातला उत्तम आदरातिथ्याचा व चविष्ट जेवणाचा हा दुसरा अनुभव.

अतिथी देवो भव! अतुल्य भारत!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle