डेली सोपच्या कॅमेरामागे

लेखकांच्या बाजूने बोलायचे तर रोजच्या रोज एक अख्खा एपिसोड लिहून द्यावाच लागतो. अगदी लिहायला काही सुचत नसले तरी, मूड लागत नसला तरी, एखाद्या पारंपारिक घरातलया बाईला बरे नसले तरी कसा स्वयंपाक करावा लागतो, अगदी तसेच.

कधी कधी ऐन वेळी शूट शेड्युल बदलते आणि मग सकाळी 7 च्या शिफ्ट च्या पहिल्या सिन साठी सकाळी सहा ला उठून संवाद लिहावे लागतात, कधी कधी तर स्क्रीनपले पण लिहावा लागतो आणि मग ताजा ताजा स्क्रीनपले आला की त्यावर ताजे ताजे संवाद. असे झाले की सकाळी 7 ला शूट सुरू करायचे असले तरी अरे बाबा पाच मिनिटं दहा मिनिटं करत सववा सात पर्यंत संवाद ई-मेल केले जातात. अशा वेळी अख्खा एपिसोड न लिहिता फक्त जो सिन हवा तोच लिहून दिला जातो आणि या प्रेशर मध्ये अक्षरशः काहीही चुका होऊ शकतात अर्थात प्रोफेशनल म्हणून काम करताना या चुकांचे समर्थन नाही केले जाऊ शकत. (सुदैवाने आजवर माझ्या कडून तरी कधिच झाल्या नाहीत पण माझ्या कडून टायपोज झाल्यात कधी कधी) शूट इनचार्ज, दिगदर्शक, असि दिग्दर्शक , अभिनेते यांच्यापैकी कोणीही जर सेन्सिबल असेल तर सेट वरच्या सेट वर टायपोज किंवा त्यातून होणाऱ्या लहान मोठ्या चुका दुरुस्त केल्या जातात, पण त्यासाठीही हातात थोडा वेळ असावा लागतो. शूट करायला उशीर म्हणजे पुढे एडिट ला उशीर, बॅकग्राउंड म्युझिक ला उशीर पूर्ण एपिसोड एकत्र बांधायला उशीर, चॅनेल ला पाठवायला उशीर... आणि एपिसोड चॅनेल ला पाठवायला जर उशीर झाला तर त्यावर मस्त फायनान्शियल पेनलटी बसते, किती उशीर झालाय आणि चॅनेल कोणते आहे, सिरीयल प्राईम टाइम मधली आहे की कसे यावर पेनलटी ठरते. त्यामुळे लहान मोठी चूक चालेल पण पेनलटी नको यामुळे चुकांसकट एपिसोड दिसतो. तसेच शिवाय कधीतरी क्वचित एडिट मध्ये काही पार्ट उडतो आणि मग पुढच्या मागच्या संवादाचा काही संबंधच लागत नाही... आणि कधी कधी अभिनेते सुद्धा लिहून दिलेलं न बोलता स्वतःच्या मनाने तोडमोड करतात, जी त्याक्षणी ओके वाटते पण एपिसोड समोर आला की काय हे असे होते.
पण पुन्हा एकदा हे नक्कीच की प्रोफेशनल म्हणून काम करताना या चुकांचे समर्थन नाही केले जाऊ शकत. तरी अशा चुका दिसल्या तर या सगळ्या कारणांचा विचार करून समस्त टीव्ही workers ना माफी असावी _/\_

 तासाची शिफ्ट असते. त्यात साधारण नऊ सीन्स म्हणजे 22 मिनिटांचा कंटेंट शूट व्हायलाच लागतात. नाहीतर ते प्रोड्युसर ला परवडत नाही. कुठलीही सिरीयल एपिसोड वाईज शूट नाही होत. साधारण आठ एक एपिसोड मधले कॉमन लोकेशन एकत्र करून शूट करतात. त्यामुळे आठ ते दहा एपिसोडसच्या स्क्रीन प्ले आणि डायलॉग्ज ची बँक तयार ठेवायलाच लागते. सिरीयल मध्ये दिसतात ते काही लोकेशन्स पूर्ण वेळेसाठी बुक केलेले असतात तर काही लोकेशन्स जे अगदीच कमी वापरात येतात ते महिन्यातून एक दोन वेळा किंवा आठ्वद्यातून एकदा वगैरे लागतात त्यांचे इतक्या एपिसोडमध्ये जास्तीतजास्त इतके आणि कमीतकमी इतके तरी सीन्स लिहा असंही रिस्ट्रीकशन असतं. त्यात कधी कधी हा ऍक्टर नाहीये तर त्याला ऍडजस्ट करा असेही असते. अर्थात या अडजस्टमेंट स्क्रीनप्ले रायटर करतो.

आपण बरेचदा म्हणतो की सिरीयल मध्ये हा बस स्टॉप बोरीवलीचा असं म्हटलं आहे पण हा बस स्टॉप खरं तर ठाणेचा आहे. तर केवळ लोकेशन औठेंटिक वाटावे म्हणून बोरीवलीला जाऊन शूट करणे शक्य नसते. कारण बाकी सगळं शूटिंग युनिट कॅमेराज वगैरे ठाण्यात असते. आणि या सगळ्यांच्या ट्रान्सपोर्ट ला खूप खर्च येतो. हे ही एक कारण की सिरीयल मध्ये मोजकी लोकेशन असतात किंवा जास्तीत जास्त जवळ जातील अशी मेक बिलिव्ह लोकेशन असतात. बस स्टॉप ला बस स्टॉप दिसल्याशी कारण तो बोरिवली मध्ये आहे की ठाण्यात याने सिरीयलच्या गोष्टीला फरक नसतो पडत.

सिरियलचे मेकिंग किंवा कॅमेरामागचे जग सांगायला खुप मजा येतेय मला.

हे सगळे कधीच कोणाला कळत नाही कारण अभिनेते सोडून इतर कोणीचीही सामान्य लोकांसमोर मोठी मुलाखत घेतलीये असे वगैरे होत नाही. मग अभिनेता आणि फक्त अभिनेताच (अभिनेत्रीला सुद्धा अभिनेता म्हणून संबोधते आहे) ग्रेट होतो. मग लोकांना वाटतं काय भारी डायलॉग मारलाय त्या अमुक तमुक ने. तेव्हा कोणी हे नाही म्हणत की काय भारी डायलॉग लिहिलाय लेखकाने जो त्या अभिनेत्याने भारी परफॉर्म केलाय... मुळात हा एवढा भारी डायलॉग लेखकाने लिहिला नसता तर अभिनेत्याने कशावर परफॉर्म केले असते हा मुद्दा कोणाच्याच डोक्यात येत नाही (हे लेखकाचे दुर्दैव). अर्थात प्रत्येक डिपार्टमेंट खूप महत्त्वाचे असते आणि लेखकांच्या इतकीच ती डिपार्टमेंट सुद्धा झाकोळलेलीच राहतात.

सिरीयल असो की फिल्म कुठल्याही प्रोजेक्ट वर लेखक सर्वात आधी काम करायला सुरवात करतो, तुम्हाला स्क्रीन वर जे दिसत ते जग तो आधी स्वतः डोळ्यासमोर उभं करतो आणि मग तुम्हाला ते दाखवण्यासाठी इतर डिपार्टमेंटच्या हवाली करतो. पण तरीही लेखक दुर्लक्षित राहतो, इतका की स्पेशली फिल्मच्या पोस्टर वर लेखकाचं नावही नसतं कित्येकदा (पूर्वीच्या काळातल माहीत नाही पण सध्याच्या काळात तरी) ते यावं म्हणून मराठीतल्या दिग्गज लेखकांनाही प्रोड्युसर बरोबर भांडावं लागतं. इतकंच नव्हे तर पैसे बुडवले जाण्याच्या सर्वात जास्त घटना लेखकांबरोबरच होतात (गीत लेखक included). या सगळ्या कारणामुळेच लेखकानी संघटित व्हावे या विचाराने मानाचि ची स्थापना केली गेली.

to be continued

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle