सर्कस - द्राक्षासव- चित्रपट परीक्षण

download.jpeg-1.jpg

रोहित शेट्टीच्या मनाप्रमाणे वागणारा एक वेडसर डॉक्टर व त्याचा सगळ्याला 'हो हो' म्हणणारा तेलकट भाऊ असतो. त्याची कायकी थेअरी असते, ती तो टाईम शेअर पद्धतीने पिळतपिळत आपल्याला सांगत असतो. ती कायकी थेअरी म्हणजे खून क्या रिश्त्यापेक्षा परवरिशचा रिश्ता कायकी घट्टं असतो. तो ठरवतो की गोलमाल मधल्या जमनादास आश्रमातल्या दोन जुळ्यांची अदलाबदल करायची, जी एकाचवेळी जन्मलेली व एकाचवेळी गोलमालाश्रमात आलेली असतात. या सिनेमात सगळं रोहितच्याच मनाप्रमाणे घडतं, आणि रोहितनी ठरवलंय की प्रेक्षकांचे डोके पहिलीला सहामाहीत नापास झाल्याने शाळा सोडलेल्या प्रौढापेक्षाही कैकपट कमी आहे. (संदर्भ #हमाल दे धमाल) त्यामुळे तो त्याला हवे ते दाखवणार व आपण बघून हसणार.

त्यामुळे हे रॉय-जॉय बंधूद्वय त्या जुळ्या बाळांच्या दोन सेटची अदलाबदल करतात. हे एकदम १९४२ च्या काळातले दाखवलेयं , मधेच 'भारत छोडो' वगैरेचे नारे व मशाली घेऊन जाणारी लोकं इकडून कायकी तिकडं जातात. त्यांनी सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत व सिनेमातल्या मेन लोकांनी भडक रंगांचे ओव्हरसाईज सूट व मागून आणलेल्या साड्याब्लाऊज घातलंय. एखाद्या गरीब माणसाला लग्नाला म्हणून उधारउसनवारी करून श्रीमंताचे कपडे एक दिवसापुरते दिले तर तो कसं आखडल्यासारखं वागेल तसे सगळेच लोक कडकपणे वावरतात. अश्विनी काळसेकर तर उषा नाडकर्णीला भारीची साडी वर मोत्यांची माळ व भडक लिपस्टिक दिली तरी ती खानदानी श्रीमंत न वाटता फक्त गणेशमंडळाच्या नाटकात श्रीमंत बाईचं काम करतेयं वाटायची, अगदी तशीच वाटत होती.

ही पूर्ण टीमच बेगडी वाटते. सुलभा आर्याला सुद्धा कधी नव्हे ते जरा बरे कपडे व वर स्वेटर दिलेत. ही ऊठसूठ गोळ्या घालते व एकदम जोरात ड्रायव्हिंग करत भुरकन् जाते. हे स्टिरिओटाईप मोडल्यासारखं आहे असं म्हणावे का नाही कळत नाही. हे सगळेच बेगडी दिसल्याने व सगळ्यांनीच ओव्हरॲक्टींगचा भंडारा लुटण्यानी यात जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच फिट ईन झाली. लोकहो भानावर या , जॅकलिन खरी वाटू लागली , ये अपनेआपमें एक रेकॉर्ड हंय. हा सिनेमा बघताना पहिल्यांदा मला हिला पायात पाय घालून पाडावे वाटले नाही, म्हणजे 'स्वयं विचार किजिये'! माझी लेक हिला सारखं 'कायली जेनर' म्हणू लागली.

तर या आश्रमात येऊन दोन पालकांच्या जुड्या दोन बदललेली बाळं घेऊन जातात व चक्रम डॉक्टरला म्हणतात, तुमच्यावरून आम्ही आमच्या बाळांची नावं रॉय-जॉय ठेवू . हे सगळं दोन्ही पालकाच्या जुड्या चारी बाळांना बघत करतात तरी यांना जुळणारं जुळं हे नाही हे लक्षात येत नाही. मगं 'हेहेहे' करत घरी जातात, मुलं मूर्ख निघाली तर नवल ते काय..!

आता या ठिकाणी 'रॉय-जॉय' नावाच्या तीन जोड्या झाल्या आहेत. चक्रम डॉ. रॉय आपल्याकडे बघून म्हणतो की मी माझी कायकी थेअरी सिद्ध करायला ह्यांच्यावर तीस वर्ष लक्ष ठेवणार आहे. हा 'अगंबाई, सासूबाई'त ती सून कसं प्रेक्षकांकडे बघून 'अय्या-ईश्श' करायची, तसं आपल्याला एकांतात गाठत रहातो. तीस वर्षं तर सख्खे आईबाप पण लक्ष ठेवत नाहीत, पण हा पंपु रॉय म्हणजे परमपुज्य रॉय फार तळमळीने कधी ऊटीला तर कधी बेंगलोरला तडफडतो व आपल्याला 'अगंबाई, सासुबाई' सारखं प्रवचन देतो. ह्या सिनेमाची कथा अंगूर सारखीही नाही , अंगूरपेक्षा वेगळीही नाही. पण 'अंगूर' म्हणून द्राक्षासवात कडुलिंबाचा अर्क व भरपूर पाणी घालून काहीतरी मचूळ सरबत तीर्थं म्हणून दिलेले आहे. जे गिळताही येत नाही व थुंकताही. :फिदी:

यात कुणालाही अभिनय करावासा वाटलं नाही , सगळ्यांची पार 'जॅकलिन' झाली आहे. 'आम्ही सारे खवय्ये' सारखे 'आम्ही सारेच जॅकलिन' नाव द्यायला हवे होते या सिनेमाला. अरे, हे तर स्पॉयलर झाले Wink . ही उटीची रॉय-जॉय जोडी सर्कस करते म्हणे. पण बेंगलोरची रॉय-जॉय जोडी काय करते माहिती नाही. दोन्ही रॉयांवर विजेचा कायकी करंटचा परिणाम होत नाही म्हणे, एकाने तारेला हात लावला की दुसऱ्याला हात लावणाऱ्याला कायकी करंट लागतो. एक जोडी सर्कशीत काम करताना घालायचे कपडे बाहेरही घालते पण दुसरी जोडी सर्कशीत काम न करताही तसेच कपडे घालून गावोगाव फिरते. तेच कपडे हे लहानपणीही घालायचे व हे कपड्यांसगटच मोठे झाले. कहां मिलते है ऐसे कपडे !!

सर्कशीतल्या रॉयची बायडी पूजा हेगडे हिला कायकी मूल न होण्याचं दुःख आहे म्हणून ही अधूनमधून गळा काढते. पण साड्या मात्र 'काटें नहीं कटते दिन ये रात' मूडच्या घालते. ही एक प्रसिद्ध लेखिका आहे म्हणे व कर्नल विक्रांत या टोपण नावाने लिहिते. तिचा दीर-रॉय ह्या कर्नल विक्रांतचा फ्यान आहे. तो जेव्हा उटीला टिईस्टेटच्या व्यवहारासाठी येतो, ती याच्याशी उदास मनाने 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल' खेळते. दीररॉयला तर काही कळतंच नाही, तो फार भाबडा आहे. ती त्याला 'रंगमहाल' नाही तर नाही, निदान बाळ दत्तक घ्यायला जमनादास आश्रमात तरी चला म्हणून 'ऊं ऊं' करते. तो म्हणतो 'कायकी मै आपका पती नहीं हूं , मुझे कायकी जॅकलिन करके मैत्रीण आहे.'

यांच्या मागावर जॉनी लिवर व सिद्धार्थ जाधव आहेत. कारण तो अंगूरमधला 'हिरोंका हार' यांना चोरायचा आहे. त्या हारासाठी मौशमीला किती रडावं लागलं, अक्षरशः डोळ्यात ड्रॉप घालावे लागले, पण पूजाच्या डोळ्यात टिपूसही नाही. सोनाराचे काम टिकूने केलेयं व सोनाराच्या नोकराचे कुणीतरी केलेयं. हा नोकर बाष्कळ वाटतो, मूळ अंगूरच्या 'बिवी तो सालमें बासी होती है, कोई साली है क्या' म्हणणाऱ्या कारागिरासारखा हलकट वाटत नाही. याचा आधी मला इतका राग आला होता पण आता त्या पर्फेक्ट हलकटपणाला मिस केले मी. यात अरूणा ईराणी नाही , भांग घातलेले पकोडे नाहीत, ब्लाऊजमधून किल्ली काढायचा चढलेला सीन नाही, दीप्ती नवल सारखी चुरचुरीत मेहूणी नाही, प्रीतम आन मिलो नाही. काही काही नाही. सगळा आचरटपणा आहे, ज्याला विनोद समजून हसणारं जिवंत माणूस सापडणं कठीण आहे.

सिद्धार्थ जाधव याचा केसांचा भलामोठा कोंबडा आहे, त्यावरूनही विनोद केलेत. तो कधी पडद्यातून कधी दरवाज्यातून आधी कोंबडाच बाहेर काढतो. त्यामुळे मी 'शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, घालीन कोंडा पाजीन पाणी' ही बालभारतीची कविताच दोनतीनदा गुणगुणली. मगं सगळा आचरटपणा करत करत मधे उगाच संशयास्पद पार्श्वसंगीत देत ओढूनताणून काहीतरी होत रहाते. आपल्याला रिमोट उचलायची शक्ती सुद्धा रहात नाही म्हणून बघत रहातो. अशावेळी जे सिनेमा बघत नाहीयेत त्यांना हाक मारून बदलायला लावावे व 'क्लिफर्ड द बिग रेड डॉग' किंवा स्ट्रीट फूड व्हिडिओत घेवर करणारा भैया बघत बसावा. मगं दुसऱ्या दिवशीपर्यंत शक्ती गोळा करावी व उरलेला अर्धा(का ?) बघावा.

बिंदू-जॅकलिनचा बाबा संजय मिश्रा आहे हा प्राणची नक्कल करून आपल्याला निष्प्राण करतो. कारण सव्वादोन तासांच्या सिनेमात हा दीडतास बोलत होता. शब्दबंबाळ केलेयं याने. याचा मदतनिस काहीतरी गिरक्या घेत, गॉगल लावून मधेच पियानो वाजवत होता. असं का ते काही आदी शंकराचार्य सुद्धा सांगू शकणार नाहीत. त्यामुळे मला विचारू नका , जेवढं होईल तेवढं केलंय मी !

असं काही तरी होत होत बायांच्या मनात संशयाने जागा घेतल्यावर दोन्ही रॉय-जॉय जोड्या एकमेकांसमोर येतात. हे एकदम सर्कशीतच होतं. सर्कशीची काहीही गरज नव्हती, सुरवातीला आणि शेवटी उगाच सर्कससारखा लखलखाट दाखवलायं. हा लखलखाट बघून डोळे दिपतात, पण ते आश्चर्याने नाही, तर नकली धृतराष्ट्रासारखे व्हायला लागते. आपण 'ये क्या हो रहा है रोहित , ये क्या हो रहा है रोहित' म्हणत बसतो. रोहितचा फक्त पहिला गोलमाल चांगला होता, नंतरचे सगळे सिनेमे बेकार-बेकारेतर-बेकारोत्तम अशा चढत्या भाजणीत गेलेले आहेत. अधूनमधून त्याच्याचं सिनेमाचे संदर्भ, गाणी व संवाद येत रहातात. कथा नाहीच, त्यामुळे कथेवर पकड नाही हेही लिहिता येत नाही. अभिनय नाहीच, त्यामुळे काय लिहू हेही कळत नाही. गाणी लक्षात रहात नाहीत. सगळी हिरवाई, निळाई, सगळे सेट्स जलरंगांच्या बाटल्या सांडल्यासारखी वाटत रहाते. कपडे व मेकप अतिशय भडक. प्रत्येक गोष्ट वाईट करून दाखवणं खरंतर अवघड आहे. पण या टीमला ते शिवधनुष्य सहज पेलवले आहे. हा सिनेमा थेटरात बघणाऱ्या प्रेक्षकालाच ऑस्कर देऊन थोरवीची नवीन परंप्रा सुरू करायला हवी. सर्कसचं स्पेलिंग सुद्धा 'सिरकुस' (Cirkus) वाटतं. सोशिकांसाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध..!

©अस्मिता

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle