जिल्हा : नांदेड (स्मार्ट सिटी)

महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची ओळख ह्या मालिकेत घेवुन येत आहे नांदेड जिल्हा!

screen_shot_2023-04-09_at_9.31.54_pm.png

बरीचशी माहिती अंतरजालावरुन साभार घेतली आहे.

मराठवाड्यातील नांदेडच्या सीमेला लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा - हे सगळे प्रांत जोडून आहेत. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो.

महाराष्ट्रातले दहावे मोठे शहर - नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री नांदेडमधले होते. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते. असेही सांगण्यात येते की येथील गोदावरी नदीच्या किनारी नंदी या महादेवाच्या वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले.

तालुके -
१)मुखेड २) लोहा ३) नायगांव ४)बिलोली ५) देगलुर ६) धर्माबाद ७) कंधार ८)हिमायतनगर ९)हदगाव १०)मुदखेड ११)माहूर १२)किनवट १३)भोकर १४) उमरी १५)अर्धापूर १६) नांदेड तालुका

नद्या -
गोदावरी , पैनगंगा , मांजरा , आसना, सीता, दूधणा, सरस्वती , मन्यार, लेंडी, कायाधू, मन्याड.

यातील पैनगंगा नदीवर ईसापुर या लहानशा गावी एक मोठा डॅम आहे. याचे बांधकाम आणि डिझाईनसाठी माझ्या डॅडना तिकडे बोलावले होते आणि म्हणुन आम्ही काही दिवस / महिने या ठिकाणी रहात होतो. गाव फारच मागासलेले असल्याने शाळा म्हणजे सगळा आनंद होता. ( शिक्षणासाठी मला त्यावेळी आजीकडे सोलापुरला ठेवले होते).

माझ्या लहानपणी आठवते ते तिथल्या पाण्यासाठी जागोजागी असलेल्या बोर / हातपंप/बोअरिंगमुळे. बहुतेक लोक त्याला 'हापसा' म्हणत होते कारण हापसुन पाणी येते असे मला सांगण्यात आले.

भाषा -
प्रामुख्याने मराठी ही इथली बोली-भाषा असली तरी उर्दू, हिंदी, लांबडी आणि तेलगू भाषा बोलणारी नांदेडवासीय आहेत. उर्दू मुख्यतः नांदेड शहरात बोलली जाते तर गोंडी ही भाषा माहूर आणि किनवट या जिल्ह्यांमध्ये वापरात आहे.

नांदेड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे -
दैनिक गोदातीर समाचार, दैनिक प्रजावाणी, दैनिक भूमिपुत्र, दैनिक लोकपत्र, दै.उद्याचा मराठवाडा, दैनिक सत्यप्रभा.

शैक्षणिक स्थान -
नांदेड जिल्ह्यामधे अनेक महाविद्यालये असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी इथे येत असतात. इ.स. १९९४ साली नांदेड विद्यापीठाची (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.व तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे विभागीय केन्द्र नांदेडला आहे. नरहर कुरुंदकरांसारखे पुरोगामी-अभ्यासू लेखक-विचारवंत नांदेडने महाराष्ट्राला दिले आहेत.

धार्मिक स्थान -
नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. या ठिकाणी मी लहान असताना काही वेळा गेलेले आहे. गुरु गोविंदसिंह यांनी येथेच शेवटचा श्वास घेतला. शिख समाजात या स्थानाला खुप महत्व आहे. लहान असताना प्रामुख्याने लक्षात राहिली होती ती म्हणजे तिथली स्वच्छता आणि गरम प्रसाद.
screen_shot_2023-04-09_at_9.42.53_pm.png

माहूर गड हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. बहुतेक यालाच मातापुर असेही म्हणतात. याला महाराष्ट्रातील शक्तीपीठ म्हटले जाते. येथे रेणुका देवीचे मंदीर असून ते नैसर्गिक डोंगरात वसलेले आहे. हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. येथे दसऱ्यानिमित्त दरवर्षी मोठा मेळावा भरतो. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची रेणुकामाता होय. माहूर हे भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान म्हणूनसुद्धा ओळखले जाते.

screen_shot_2023-04-09_at_9.41.04_pm.png

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle