रेड, व्हाइट अँड रॉयल ब्लू

गेल्या शुक्रवारी, म्हणजे साधारण दहा दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला. पुस्तकाविषयी, कथेविषयी अगदी काहीच माहित नव्हतं. चित्रपट त्या दिवशी प्राइमवर रिलीज झाला होता. सहज बघायचं ठरवलं आणि पाहिला. आणि आता +१ च्या मते मला झपाटलं आहे या गोष्टीनं. मी एकदम सुपरफॅन झाले आहे.  1 एकतर ताबडतोब शनिवारी (दोन्ही कुटुंबीय मंडळी क्रिकेट खेळायला गेल्यावर, नीटपणे, एकटीनं, सलग) परत सिनेमा पाहिला. मग रविवारी किंडलवर पुस्तक घेतलं आणि रविवारचा दिवसभर, सोमवारची रात्र, मंगळवारची रात्र घालवून ते भराभर वाचलं. मग परत पहिल्यापासून परत वाचलं. आणि आता तिसर्‍यांदा वाचते आहे. मधे मधे ट्रेलर, डिलीटेड शॉट्स वगैरे तर बघतेच आहे. आज मंडळी खेळायला गेलेली असताना, मी जेवताना परत सिनेमा सुरू केला. (मी सहसा जेवताना काही बघत नाही!) घरी आल्यावर +१ला लक्षात आलं की मी चक्क टीव्ही लावला होता (कारण त्याने अर्धवट सोडलेल्या जपानी सुतारकामाच्या व्हिडियो ऐवजी रेड, व्हाइट अँड रॉयल ब्लू!) त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि मला टीन्समधे अभ्यास सोडून टीव्ही बघताना सापडल्यासारखं वाटलं. थोडक्यात म्हणजे काय की या गोडमिट्ट सिनेमाने मला परत विशीत आणून सोडलं आहे. होपलेस क्रेझी रोमँटिक.

ट्रेलर

गोष्ट तशी नेहमीचीच, काही सस्पेन्स नाही त्यात. वरच्या ट्रेलरमधे सगळंच सांगितलंय - स्पॉयलरच स्पॉयलर. आधी दोघांचं एकमेकांवर खार खाऊन असणं, मग परिस्थितीवश एकत्र वेळ घालवल्यावर मैत्री आणि मग अटळ सत्य, प्रेम. मग खानदान की इज्जत - आणि जागतिक स्तरावरचं एकमेवाद्वितीय खानदान - ब्रिटिश राजघराणं. कारण यापैकी एकजण ब्रिटिश राजपुत्र. आणि दुसर्‍या बाजूला अमेरिकन राजकारण आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचा मुलगा. डायव्हर्सिटीबाबतीत यांनी बहुतेक यादी घेऊन एकेक टिक मारली आहे. अ‍ॅलेक्स ब्राउन मुलगा. हेन्री निळ्या डोळ्यांचा प्रिन्स चार्मिंग. अ‍ॅलेक्सची मैत्रीण नोरा अमेरिकन काळी मुलगी; हेन्रीचा मित्र पर्सी नायजेरियन. अ‍ॅलेक्सची बॉडीगार्ड ट्रान्सजेंडर अ‍ॅमी चेन आणि हेन्रीचा इक्वेरी भारतीय शान श्रीवास्तव. वगैरे वगैरे. तरी सगळे आपापल्या जागी जिगसॉच्या तुकड्यांसारखे आहेत. इतरांना खरं तर फार काम नाही तरी ते बरोबर वेळी येतात मदतीला. सिनेमा अर्थात पूर्ण आपल्या दोन हिरोंभोवती फिरतो. आणि या दोघांची केमिस्ट्री एकदम जमून आली आहे. कॉर्नेटो सीनमध्ये हेन्री दिल थामके अ‍ॅलेक्सकडे बघतो, की कसा हा इतका भावखाऊ, उर्मट तरी आत्मविश्वासानं काठोकाठ माणूस आहे. भावना चेहर्‍यावर दिसणार नाहीत याची काळजी घेतो तरी डोळ्यात त्या दिसतात. निकोलस गॅलत्झैनला टोपीकाढू सलाम (आणि खरं तर ... ). आणि नंतर अ‍ॅलेक्सची पाळी येते प्रेम सगळं डोळ्यात साठवून शब्दात काही न आणण्याची. टेलर झकार पेरेझनं ही भावखाऊ भूमिका सहजपणे केली आहे. बाकी मंडळी, जसं अ‍ॅलेक्सची आई, हेन्रीचे आजोबा वगैरे एकदम चुनचुनके शोधलेले असल्यानं फिट्ट बसतात. एकूण पात्र योजना करणार्‍या मंडळींचं जाम कौतुक आहे.

चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे गे-बायसेक्शुअल लोकांची प्रेमकहाणी. पण जाणीवपूर्वक, नीटपणे तुमचं नि आमचं सेम असतं हेच त्यात दाखवल्यामुळे लक्षात येत नाही ते. हे खरं तर सगळ्यात मोठं यश म्हणायला हवं. आमच्या इंजिनियरिंग प्रोसेसबद्दल माझं आवडतं वाक्य आहे की 'बेस्ट प्रोसेस इज इन्विजिबल'. उठून काही वेगळं करतोय असं न वाटता आपण सहज काही करतो, आणि ते बरोबर असतं - ती खरी बेस्ट प्रोसेस. या चित्रपटाचं असं झालंय. या मुलांच्या प्रेमात इतकं गुंगून जायला होतं की हे गे आहेत, वेगळं आहे काही हे मुळात लक्षात यायलाच वेळ लागतो. निक आणि टेलर असे एकमकांकडे पहातात की आपल्या पोटात खड्डा पडतो. प्रिन्स हेन्रीची काळजी वाटते. आणि अ‍ॅलेक्स त्याला वेढून झोपी जातो तेव्हा आतून बरं वाटतं. एकेका टप्प्यानं ते नात्यात पुढे पुढे जातात; एकमेकांची वेगवेगळ्या पातळ्यांवर ओळख करून घेतात; एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि छोटी छोटी पत्र लिहितात. फॉरेवर रिलेशनशिप आहे की नाही त्याचा अंदाज घेतात आणि सावकाश एकमेकांच्या विश्वासात आपलं एक विश्व तयार करतात. आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला आनंद भरून टाकतो.

मी बहुतेक अजून दोनदा तरी पाहीन हा चित्रपट. (प्राइमवर आहे ते एक बरंय.)

rwrb

आणि आता पुस्तक. कोणत्याही पुस्तकावर चित्रपट म्हणजे काही काटछाट होणार हे तर आहेच. पुस्तकात बरीच जास्त पात्र आहेत. एकूण गोष्टच जरा पसरट आहे. तरी धरून ठेवणारी आहे. अजून थोडं संपादन करता आलं असतं असं पहिल्या वाचनात वाचलं, पण दुसर्‍यांदा वाचताना काही गोष्टी आणखी पसरून लिहायला हव्या होत्या असं वाटलं! शुद्धलेखनाच्या चुका (माझ्या किंडल कॉपीत) होत्या त्याचा सुरुवातीला जरा वैताग वाटला होता. शिवाय सगळी गोष्ट वर्तमानकाळात लिहिलेली आहे. तेही जरा आवडलं नव्हतं. पण गोष्टीनं वेग घेतल्यावर सवय झाली आणि दुसर्‍या वाचनात वर्तमानकाळात वाचताना मजाच आली.

पुस्तकात आणखी भरपूर घटना आहेत; जास्तीचे प्रेमप्रसंग आहेत; आणि थोडी जास्तीची गोष्टही आहे. तरी सगळ्यात बेष्ट आहे ते म्हणजे अ‍ॅलेक्स आणि हेन्रीची पत्रं. इमेल. टाइमस्टँपवरून अगदी त्या त्या दिवशी उत्तर दिलेली अशी ही इन्स्टंट इमेल असली तरी ती खरोखर पत्रं आहेत. हेन्रीचं साहित्यिक असणं अ‍ॅलेक्सला दिसतं तसंच आपल्यालाही दिसतं. अ‍ॅलेक्स राज्यशास्त्र आणि इतिहासाचा विद्यार्थी आहे हे दिसतं. ते एकमेकांना लिहिताना मधून मधून प्रसिद्ध साहित्यिकांच्या, इतिहासकारांच्या, राजकारण्यांच्या पत्रांमधली वाक्य पाठवतात. एकमेकांची पत्रं परत परत वाचतात आणि फोन, मेसेज असं सगळं असताना पत्र लिहीत राहतात. ती लिहिण्यासाठी अ‍ॅलेक्स रीसर्च करतो. सुरुवातीच्या एका पत्रात हेन्री लिहितो, "The phrase 'see attached bibliography' is the single sexiest thing you have ever written to me." आणि आपल्या डोक्यात दिवा लागतो, की हे प्रेमात पडणं नुसतं दोन मदनाच्या पुतळ्यांचं एकत्र येणं नाही. शारीर प्रेमाची वर्णनं पुष्कळ आहेत पुस्तकात; मंडळी एका भेटीत किमान तीन ऑर्गॅझम तरी हवेत असा नियम असल्यासारखी वागतात. तरी अ‍ॅलेक्सच्या यादीत पहिल्या नंबरावर हेन्रीची बुद्धिमत्ता आहे. बाकी अ‍ॅलेक्स सतत याद्या करतो, आणि अगदी पहिल्यांदा हेन्रीनं किस केल्यावरच्या यादीत 'एक. याचे ओठ मऊ आहेत. ..' असा विचार करतो, हे मला व्यक्तिशः फार भिडलं.

पुस्तकात मुख्य मुद्दा अ‍ॅलेक्सला स्वतःची ओळख होण्याचा आहे. शिवाय राजकारणात, तो डेमोक्रॅट असल्यानं डीएनपी एकदम जगात भारी दाखवली आहे. पुस्तक अ‍ॅलेक्सच्या दृष्टीनं लिहिल्यानं ते ठीक आहे. पण त्यामुळे जरा एकांगी झालं आहे. रिपब्लिकन सगळे नाझी आणि नि केकेके असं नाव काळं केलं आहे त्यांचं. इथल्या हुजूर नि मजूर पक्षाकडे बघता दोन्ही कडे काळे गोरे असणार असं मला वाटलं. तसंच ब्रिटिश राजघराण्याला सरधोपटपणे जुन्या नव्यांमधे विभागलं आहे. थोडक्यात म्हणजे पार्श्वभूमीवर असलेल्या पात्रांना फार खोली नाही. तसंच पुष्कळ सशक्त स्त्री पात्रं असली तरी एकेका कप्प्यात त्यांना विभागून टाकलं आहे. अ‍ॅलेक्सची आई, आदर्शवादी, नियमांना बांधून राहणारी, त्याला याद्या नि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन देणारी. (त्यापेक्षा मला चित्रपटातली त्याला कुशीत घेणारी आई जास्त आवडली.) मैत्रीण नोरा हॅकर, प्रोग्रॅमर, डाटा अ‍ॅनलिस्ट. बहीण जून कलासक्त, फॅशन सॅवी, राजकारणापासून लांब राहणारी वगैरे. त्यांना एकूणच जास्त स्कोप नाहीये. माझी तशी काही तक्रार नाही - तरी आपली नोंद.

पुस्तक आणि त्यावरून सिनेमा असं झाल्यावर त्यांची तुलना होणं अपरिहार्य. मला दोन्ही आवडले तरी सिनेमा जर्रासा जास्त आवडला. त्यात दोघांची अटीतटीची आणि संपूर्णपणे गृहित धरलेली समानता दिसते. (अंगठी <-> किल्ली ते पहिल्या वेळी इकडे तिकडे पडलेले दोन कंडोम!) शिवाय अ‍ॅलेक्सचं कार्यकर्ता म्हणून वावरणं, राजकारणात जाण्याचा प्रवास दिसतो. तरी मला वाटतंय मी जितका वेळ सिनेमा नि त्याचे शॉर्ट्स बघण्यात घालवला त्याहून खूप जास्त पुस्तकातली पत्रं, पत्रांमधली पत्रं परत वाचण्यात, त्यावरून इथे तिथे ड्रॅक्युला आणि अ‍ॅलेक्झांडर हॅमिल्टन आणि पहिल्या जेम्सबद्दल वाचण्यात घालवला आहे गेल्या दहा दिवसात. खरंतर पुस्तक नि सिनेमा दोन्ही फार अभिजात कलाकृती वगैरे नाहीत. पण ते म्हणजे आंबटगोडतिखट पाणीपुरीत जीवनसत्व शोधण्यासारखं होईल. शेवटी जिभेवर पसरणारा आनंद महत्त्वाचा. तसंच ते.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle