रॉकी और राणीकी कायकी प्रेमकहाणी

रॉकी और राणीकी प्रेमकहाणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी
बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं ,
लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं आजोबांच्या. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडते.

एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलत बोलत 'कांटो सें खिंच के ये आचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती त्या गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.

आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. त्या अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.

रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटी पर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.

जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं पडद्यामागे तर जमतं तुला आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका.

रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!

रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारी भारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.

मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.

(अवांतर - यामिनी-जामिनी नाव आठवून
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौंन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥

मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. :) )

©अस्मिता

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle