पाँडीचेरी आणि अंदमान : भाग २ अंदमान

अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.

रस्ते छोटेच पण छान आहेत. अगदी गुळगुळीत. वाहन भाड्याने घेऊन पॉइंट टू पॉइंट फिरावे लागते. काही ठिकाणी जाण्यासाठी आधीच बुकिंग करावे लागते. उदा, हॅवलॉक बेटावर जाण्यासाठी १-२ दिवस आधीपासून बुकिंग केलेले बरे. मध्यंतरी झालेल्या बोटीच्या अपघातानंतर सगळ्या खासगी बोटींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी बोटीत मर्यादित जागा उपलब्ध असतात.

वरील चारही फोटो आमच्या हॉटेलच्या डेक वरून घेतले आहेत. ती एक नितांत सुंदर जागा होती. समोर समुद्र बघत गार वार्‍यावर बसलो की समाधी लागलीच म्हणून समजा. याच डेकच्या खाली रेस्टॉरंट होते. त्याबाहेर फारच मजेशीर माहिती लावली होती. वीस रुपयाच्या नोटीवर जे चित्र आहे ते त्या ठिकाणाहून दिसते. तिथूनच जवळपासच्या कोणत्यातरी ठिकाणाहून काढला आहे तो फोटो!

हे ते दृश्य

आणि हा तो माहितीफलक :

इंग्रज जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांनी ज्या बेटावर वस्ती केली ते हे रॉस आयलंड.

नंतर १९४२ साली इथे एक भुकंप झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी इथली वस्ती उठवून स्मिथ आयलंड वर आणली. या स्मिथ आयलंडवरच पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे. रॉस आयलंडवर आता भग्नावशेष उरले आहेत पण ते ही बघायला फार छान वाटते. ढासळलेल्या इमारतींमधून प्रचंड मोठी मोठी झाडे वाढली आहेत. इथे अनेक हरणं आणि मोर दिसतात. हे आयलंड आता नेव्हीच्या अखत्यारीत आहे आणि इथे कोणी रहात नाही. मात्र इथे खूप छान निगा राखली जाते. अतिशय स्वच्छता आहे. पण रात्री मात्र एकदम अमानवीय वाटेल हां. रामसे बंधूंनी हे बेट कसं काय मिसलं देव जाणे!

इथे हरीण आणि मोर शोधा :

जुने चर्च :

मूळ चर्चचा फोटो आणि माहिती :

बेटावरील तळे आणि सिट- आऊट्स :

इतर बघण्यासारखी बेटे म्हणजे हॅवलॉक आणि नील. हॅवलॉकला सुंदर राधानगर बीच आहे. तिथे जाण्यासाठी एक दिवसीय सहली देखिल आहेत पण खरी मजा अनुभवायची असेल तर तिथे जाऊन राहिलेले उत्तम. नील बेटावर स्कूबा डायव्हिंग, हायकिंग वगैरे अ‍ॅक्टिविटीज करता येतात. बाराटांग भागात मड व्होल्कॅनो आहे आणि चुनखडीच्या गुहा आहेत. बॅरन आयलंडवर जिवंत ज्बालामुखी आहे. अर्थात तेथे जाण्यास परवानगी नाही.

त्या वीस रुपयाच्या नोटीबद्दलचा जो माहितीफलक आहे त्यावर दाखवलेल्या माउंट हॅरियेट या उंचावरील व्हू पॉइंटवरून अतिशय सुंदर दृश्य दिसते. या बेटावर जाण्यासाठी आपले वाहन बोटीवर घालून नेता येते. :

तेच ते रु. २० च्या नोटवरील दीपगृह वेगळ्या कोनातून. दिसलं का? :
<

माउंट हॅरीयेटवरून बोट सुटली. :

आणि पुन्हा पोर्टब्लेअर कडे जाऊ लागली :

अंदमानात सकाळी पाचवाजता सुर्यदेव ड्युटीवर हजर असत. आमच्या रूममधून समोरच समुद्र दिसत असे. अशीच एका सकाळी चहाचा कप घेऊन बाल्कनीत आले तर समोरच एक क्रूझलायनर अंदमानात त्या दिवसाकरता मुक्काम करण्यासाठी येत होती :

अंदमानमध्ये अनेक म्युझियम्सही बघण्यासारखी आहेत. चाथम सॉ मिल मधील म्युझियम, समुद्रिका म्युझियम (अजिबात चुकवू नका आणि येथिल डॉक्युमेंटरीही नक्की पहा), अँथ्रोपोलीजिकल म्युझियम, अंदमान फिशरीज म्युझियम (हे स्किप केलं तरी चालेल). त्यातील काही निवडक फोटो :

सी अ‍ॅनिमोन्स

स्टार फिश. किती सुंदर रंग आहेत ना!

सी-अर्चिन्स

अत्यंत सुंदर सुंदर आणि विविध प्रकारची प्रवाळेही होती समुद्रिकामध्ये पण त्यांचे फोटो काढण्याची परवानगी नव्हती.

पाँडीचेरी आणि अंदमान : भाग १ पाँडीचेरी

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle