माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग १

खूप दिवसांपासून युरोप ट्रिप करायचं डोक्यात घोळत होतं. निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या सफरींचे कार्यक्रम बघत होते. तो पंधरा-वीस दिवसांत अक्खा खंड पहायचा चिवडा काही पसंतीला येईना. मला चित्र,शिल्प,संस्कृती,निसर्ग सगळंच अनुभवायचं होतं. त्यातच मीना प्रभूंचं रोमराज्य वाचण्यात आलं आणि मायकेल अ‍ॅन्जेलो लिओनार्दो बरोबरच अजून काही चित्रकार शिल्पकारांची माहिती झाली. त्यातल्या कार्व्हाज्जीओच्या चित्रांनी तर वेडंच केलं. आणि इट्लीला जायचं नक्की केलं. मग ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू, तिथलीच लोकल ट्रीप बूक करू, असे मनात मांडे रचायला सुरुवात केली. माझ्या सख्ख्या मैत्रीणीला प्लॅन सांगितला आणि नवर्‍याला! मैत्रीण असल्याने ती अर्थातच लगेच तयार झाली, नवर्‍याने मात्र सुट्टी मिळेल का नाही सांगता येत नाही, वगैरे रडायला सुरुवात केली. मग मी 'आलास तर तुझ्यासोबत न आल्यास सुनीता आहेच' असं बाणेदारपणे सांगून माझ्या इटलीप्रवास शोधाचा अभ्यास सुरु केला! इटलीबाबत विचारणा केल्यावर जऊन आलेल्या प्रत्येकाने चोर्‍यांची भिती घालायला सुरुवात केली. ते ऐकुन मला कुठेही कधीही काहीही करायला नाही न म्हणणार्‍या नवर्‍याने(तसं प्रशिक्षण दिलंय त्याला Wink )अजिबात एकटी जायचं नाही, जायचं तर ग्रूपने जा, निदान पासपोर्ट वगैरे चोरीला गेला तर आधार होईल म्हणून, मी पाहिलेलं, पाठीवर पडशी टाकून मी हातात नकाशा घेऊन हिंड्तीये वगैरे स्वप्न मोडून टाकलं Sad

मग मी कोणत्या प्रवासी कंपन्या फक्त इट्ली दाखवतात त्या शोधाला लागले. मला हवी असणारी दुसरा कोणताही देश न दाखवता पूर्ण इटलीची सफर फक्त एका प्रवासी संस्थेकडे होती. मग त्यांच्या वाशी ऑफिसला जाऊन थडकले. तिथल्या मुलीने मला या सफरीचे पत्रक देऊन व्हिसाला लागणार्‍या कागदपत्रांबद्दल सांगितले. सोपं दिसत होतं! त्यांच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे फोटो, फॉर्म भरायचा, बँकेचे स्टेटमेंट्, गुंतवणूकीसंबंधी कागदपत्र इ .म्हंट्लं बरंय हे, मला काही कटकट नाही. सहलीच्या एक महिना आधी त्यांच्या यादीप्रमाणे कागदपत्र घेऊन गेले. त्याआधी त्यांच्या व्हिसा सल्लागाराला अजून काही नको ना विचारले होतेच, फोन करून.
तिथे गेल्यावर त्याने आधी बँक स्टेटमेंट्वर नजर टाकली.
'इतकेच आहेत सेव्हिंग्जला?' असे विचारून माझा माझ्या सांपत्तीक स्थितीबाबत असलेल्या कल्पनेला सुरूंग लावला.
'हे कमी आहेत का??' माझा प्रश्न!
'हम्म्म,ठिक आहेत पण शेंगेनसाठी सेव्हिंगला पाच सहा लाख असले तर बरे दिसतात' .इति व्हिसा सल्ला गार!!
'आता?'
'तीन महिन्यापासून महिना पन्नास हजार टाकायचे ना.'
'तुम्ही सांगितलं नाहीत तेव्हा' .त्याचे मौन!
'शेंगेनला तगडा बँक बॅलन्स लागतो मॅडम!'
'आहे त्यात तुमच्या सहलीचा येऊन जाऊन खर्च निघेल की. आणि बाकीच्या गुंतवणूकी आहेत ना?'
'एक काम करा आता. जरा पन्नास हजार तरी वाढवून आणाच यात!'
'एवढच लागेल ना की अजून काही?'
'नाही. एवढंच!'
झालं! तिसर्‍या दिवशी मी त्याच्यापुढे परत हजर. तो आला,त्याने पहिले आणि...
'मॅडम, तुम्ही पन्नास हजारच्यावर का टाकलेत?'
'का? आता काय झालं?'
'आता तुम्हाला स्पष्टिकरण द्यावे लागेल्, इतके पैसे कुठुन आणलेत!!!'
'मग देईन की.'
'अहो, पन्नासच्या वर ट्रॅन्झॅक्शन दाखवायचं नाही असं अचानक.'
'हे मला आधी सांगायचं ना मग.' त्याचं मौनव्रत!
'आता हा एक फॉर्म भरून द्या. पैशाचा सोर्स काय लिहू? भेट ? '
'अजिबात नाही. मला कोण एवढे पैसे भेट देणारे? लिहा की व्यवसायातून मिळालेले. दुसर्‍या बँकेतून एफ डी तोडून टाकलंय.'
'व्यवसायातून? '
'का हो, आम्हाला मिळत नसतील असं वाटतं का!!! हेच कारण लिहा. खोट्या भेटी नको!!'
'ठिक आहे. जशी तुमची मर्जी. अरे, तुम्ही मिस्टरांचे लेटर नाही आणलं का?'
'ते इथे नसतात. काय लेटर लागणार आहे?'
'काही विशेष नाही. त्यांनी या ट्रिपला जायला तुम्हाला परवानगी दिली आहे, त्यांना माहिती आहे असं!!'
हे ऐकून माझ्यातली अनाहिता जागी झालीच!
'हे पत्र एकट्या जाणार्‍या नवर्‍यालाही बायकोकडून घ्यावे लागते का? '
'नाही. त्यांना नाही लागत.'
'मग एखाद्या बाईने नवर्‍याला सोडले आहे तर तिला व्हिसा मिळत नाही?' ...मौन
'हा कागद वकीलाकडून शंभर रुपयाच्या बॉण्डपेपरवर लिहून नोटरी करून आणा आता!
'अहो, पण सहीला नवरा?' ( एनाराय नवरा हा कुंकवाचा तसाच सहीचा देखील धनी लागतो!! प्रवासाने चातूर्य येते ते असे!)
'ते आपण मॅनेज करू!'
'आँ! पण मी असा कागद द्यायला तयारच नाहीये. शुद्ध अपमान आहे हा स्त्रियांचा. माझा प्रवासखर्च माझा मी करणार. नवरा कोण टिकोजी मला परवानगी देणार??'
'मॅडम, मिस्टरांनी परवानगी दिली तरच जाणार ना तुम्ही?? मग एक पेपर द्यायला काय प्रॉब्लेम?'
'प्रश्न तत्वाचा आहे ! मी काही असलं नवर्‍याकडून लिहून घेणार नाही.'

माझ्या बरोबर येणारी मैत्रीण पण याच गोष्टीने हैराण झालेली. प्रगत समजला जाणार्‍या युरोपला जायला असा पेपर लागावा? मग आम्ही कंपूबाजी (ह्यॅ ह्यॅ ह्यॅ) करायची ठरवली! घरी येऊन शेंगेनची वेबसाईट चेक केली. त्यात असा उल्लेख मिळाला नाही. माउथशट डॉट कॉम वर अगदी आमच्यासारखंच हा पेपर खटकल्याने इटालीयन कॉन्स्युलेटशी पत्रव्यवहार केलेल्या एकीचं वाचायला मिळालं आणि हुरूप आला. तिला अशा पेपरची ती स्वतः खर्च करत असताना गरज नाही, असं सांगितलं गेलं होतं. ते वाचून परत प्रवासी संस्थेला फोन केला, हे असं वाचलंय सांगायला. तो आमच्यावर उखडला. म्हणे, 'मी इतकी वर्ष काम करतोय व्हिसाचं. तुम्हाला काय प्रॉब्लेम एक लेटर मिस्टरांकडून घ्यायला? असं कोणीच करत नाहीत.' त्याला आमचं दोघींचं नवर्‍याशी बरं नाही असं वाटायला लागलेलं एकूण!

आम्ही म्हंटलं असं पत्र न देता होत असेल तर बघा, नाहीतर या आम्ही चाललो! कंपूबाजीचा विजय असो!!
त्याने मी बघतो काय ते, म्हणून बाकीची कागदपत्रं घेतली. नवर्‍याचे पत्र त्यातली परवानगीची भाषा बदलून दिलं. युरोमधले चलन भरले आणि व्हिसाची वाट बघायला लागलो!

माझं एक आहे. पुलंनी अनेक योग लिहिलेत त्याप्रमाणे, माझी गाडी टोलला रांगेत असेल ती रांग सगळ्यात हळू जाते, मी इमिग्रेशनच्या रांगेत असेल ती संपतच नाही. त्याला अनुसरून माझ्या मैत्रीणीचा व्हिसा आठ दिवसात आला! त्यानंतर एक आठवडा झाला तरी माझा नाही! दुसरा झाला, तरी नाही! मला वाटलं कंपूबाजी केली तर कॉन्स्युलेट फार तर कविता करेल, विडंबन टाकेल पण व्हिसा नाही म्हणजे बॅन केल्यासारखं वाटतं राव Wink थ्री इडियटमध्ये एक डायलॉग आहे, 'अपना दोस्त फेल होता है तो दुख होता है; लेकिन फर्स्ट आता है तो जादा दुख होता है!!' अगदी अस्संच मैत्रीणीच्या लगेच झालेल्या व्हिसाने मला वाटायला लागलेलं!! शेवटी जायला दहा दिवस असताना आला बाबा व्हिसा! आणि निघाले की मी इटलीला!!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle