तरंगायचे दिवस!

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

लेख: 

तरंगायचे दिवस! भाग-१

तरंगायचे दिवस! भाग-१

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

प्रस्तावना

माझं सगळ लहानपण आणि तरुणपण कल्याणला गेल. कल्याण मुंबईपासून अगदी जवळ. माझ्या बाबांसकट शेजारपाजारचे, ओळखीतले सगळेजण लोकलने ये-जा करून मुंबईत नोकऱ्या करत असत. कल्याणच्या जुन्या भागातल्या एका वाड्यात आई-बाबा, माझा मोठा भाऊ आणि मी राहत असू.

कल्याणला बाकी काही फार अडचणी नव्हत्या. आसपास सुशिक्षित समाज होता, शाळा चांगली होती, मुली-बाळी सुरक्षितपणे एकट्या आनंदाने फिरू शकत होत्या. थोडक्यात एखाद्या लहान गावाची ऊब शाबूत होती. पण खेळाच्या किंवा करमणुकीच्या साधनांची मात्र वानवा होती. जिल्ह्याचे ठिकाण ठाणे. त्यामुळे नाटक बघायचे, तर ठाण्याला गडकरी रंगायतन गाठावे लागायचे. गडकरीला जाताना शेजारचा तरणतलाव दिसायचा. तिथून जाताना क्लोरिनचा तो टिपीकल वास यायचा. माझ्या बाबांची आम्ही दोघांनी पोहायला शिकावं, अशी फार इच्छा होती. दरवेळेला ठाण्याच्या स्वीमिंग पूलजवळून जाताना त्याबद्दलच्या गप्पा व्हायचा. मला लगेच मी ऐटीत पाण्यात सूर मारते आहे, सपासप हातपाय मारत वेगाने पोहते आहे, अशी स्वप्न पडायला लागायची.प्रत्यक्षात मात्र ते तितकस सोप नव्हत. घर, स्टेशन, तिकीट काढणे, ट्रेनचा प्रवास मग स्वीमिंग पूल. पोहण्याचा एक तास झाला की हीच सगळी तपश्चर्या उलट दिशेने. सगळ मिळून चार तास सहज लागले असते.

कल्याणला एक छान खाडी होती. पण तिथे पोहायला जाणे फार लोकमान्य नव्हते. खाडी बळी घेते, तिथे भोवरे-दलदल-खडक इ.इ. गोष्टी आहेत, अश्या बातम्या सगळीकडे चघळल्या जायच्या. कल्याणच्या खाडीचे पात्र चांगलेच म्हणजे जवळपास एक किलोमीटर रुंद आहे. डावीकडे बघितल की कल्याणच्या लोकांचा अभिमानाचा विषय असलेला दुर्गाडी किल्ला दिसायचा. समोर वीटभट्टी, तिथली उंचच उंच चिमणी होती. उजवीकडे बाकदार वळण घेऊन खाडी दिसेनाशी व्हायची.

माझ्या शाळकरी वयात आम्ही अधून-मधून खाडीवर फिरायला जायचो. वाळूचा व्यवसाय तेव्हाही तिथे चालू होता. त्या वाळूचे ढीग काठावर लागलेले असायचे. शहरात दुर्मिळ असलेला मोकळा वारा सुटलेला असायचा. एकूण काय नयनरम्य दृश्य होत! पाणी पाहून मला पोहायला शिकायची हुक्की यायची. अस वाटायचं, त्यात काय कठीण आहे? हात-पाय मारले की सरासर पुढे जायचं. काही लोक पोहत असायचे. एकदा बाबांना कोणीतरी ओळखीच भेटल. त्यांच्याबरोबर बाबाही पाण्यात उतरले. ते सगळे जण छान ऐटीत सफाईदारपणे पोहत होते. ते बघून मी बाबांवर इतकी खूष झाले, की विचारता सोय नाही! बाबांच्या काळजीने मनात बाक-बूक होत होत, तरी काठावर उभी राहून टाळ्या वाजवत होते.

घरी येता-येता बाबांनी ‘चला, ह्या सुट्टीत तुम्हाला इथेच पोहायला शिकवतो. इथे कोपऱ्यावर खाडी असताना काही नको ठाण्याला जायला..’ आईने ‘अहो, अजून एक-दोन वर्षे जाऊ देत, दोघही लहान आहेत अजून.’ असा विरोध करून बघितला. पण बाबा ऐकणार? शक्यच नाही. एकदा त्यांच्या डोक्यात आल, की संपल.

तेव्हा पोहायला शिकवण्यासाठी ‘फ्लोट’ इत्यादि वस्तूंचा उदय व्हायचा होता. दोन पत्र्याच्या डब्यांची झाकण झाळून बंद करून आणली, त्याला दोन्ही बाजूंना कड्या जोडल्या. माझ्या आणि भावाच्या पाठीला ते दोरीने गच्च बांधले, आणि आमच्या साध्या-सरळ, कृष्णधवल रंगातील मध्यमवर्गीय आयुष्यातल्या एका सोनेरी पर्वाला सुरवात झाली.

पोहण्याचे धडे

पहिल्या दिवशी मी आणि भाऊ दोघेही अमाप उत्तेजित झालो होतो. सकाळ होतेय कधी आणि आपण पाण्यात उडी घेतोय कधी, अशी घाई झाली होती. पण पाण्यात गेल्यावर मात्र हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही, ह्याची चांगलीच कल्पना आली. खाडीचे खारट पाणी नाकातोंडात गेल्यावर चांगली चविष्ट कल्पना आली, अस म्हटल तरी चुकीच होणार नाही...! पाठीला डबा बांधलेला असायचा. बाबा धरून हात-पाय मारायला शिकवायचे. आमचा जोरात आरडाओरडा आणि वेळप्रसंगी रडारडसुद्धा. आमच्या ह्या रडण्या-ओरडण्याचा बाबांवर काहीही परिणाम नाही. आई बिचारी होऊन काठावर बसून आमचा दंगा बघते आहे, असा साधारण सीन असायचा. वाड्यातल्या बायका आईला ‘कशाला खाडीवर पाठवताय, चांगली नाही हो खाडी लहान मुलांना.’ असे सल्ले देऊन तिला अजूनच हैराण करायच्या.

असे काही दिवस गेल्यावर हळूहळू आम्हाला तरंगायला यायला लागल. एव्हाना आमच्या पोहण्याची बातमी आसपास फुटली होती. माझी शाळेतली एक मैत्रीण, सुजाता, तिचा धाकटा भाऊ विजय, हेही आमच्याबरोबर यायला लागले. मग तर काय आनंदच आनंद! मुख्य रस्त्यापासून खाडीचा काठ दहा मिनिटांवर होता. आम्हाला पाण्यात उतरायची इतकी घाई व्हायची, की ते अंतर क्वचितच चालत गेलो असू. बहुतेक वेळा पळतच जायचो. खाडीचा काठ गाठला की हातातली कपड्यांची पिशवी, पायातल्या चपला वाळूवर कशातरी भिरकवायाच्या आणि तातडीने पाण्यात उडी मारायची!! उन्हाळ्याच्या सुट्टीभर हाच कार्यक्रम. रोज सकाळी दोन-दोन तास पाण्यात. इथे काही टॅंकसारख्या ठराविक वेळांच्या बॅचेस नसायच्या. शाळेच्या वेळेला सकाळी उठायला आईला छळणारे आम्ही, पोहायला जायला मात्र वेळेच्या आधी दहा मिनिटे हजर!

अस करता करता इतरही बरीच मंडळी आमच्या पोहण्यात सामील झाली. सगळ्यात मोठ्या सत्तरीतल्या आठवलेकाकांपासून तेरा-चौदा वर्षांच्या विजय वाडपर्यंत सगळ्यांची सकाळ खाडीवर साजरी होऊ लागली. ह्या सगळ्या गटात आम्ही तिघी मुली होतो. तिघीही एकाच वयाच्या. शाळकरी. तिघींचेही भाऊ, वडील सगळे बरोबर असल्याने एक छान कौटुंबिक स्वरूप होत.
इथे ना वयाच बंधन होत, ना बाकी आयुष्यातल्या कर्तबगारीच. एखादा उत्तम इंजिनिअर आमच्या सारख्या शाळकरी मुलांकडून पोहण्याचे प्राथमिक धडे गिरवायचा. कल्याणमधला नावाजलेला सी.ए. चपला हरवल्यामुळे अनवाणीच घरी जायचा. पण एकूण मजा इतकी यायची की आदल्या दिवशी काही मस्करी-फजिती झाली, तरी सगळे दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हायचे!!

Keywords: 

तरंगायचे दिवस! भाग-२

तरंगायचे दिवस! भाग-२

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

जल-आनंद!!

हे करता करता सगळ्यांनाच पोहण्याच व्यसन जडल. पोहायची वेळ चुकू नये म्हणून मग शिफ्ट ड्यूटी असणारे सेकंड शिफ्ट मागून घेऊ लागले. कुठल्याही कारणाने उन्हाळ्यात कल्याण सोडायला आम्ही कटकट करायला लागलो. आमच्या तिघींच्या आयांची मात्र बरीच तारांबळ व्हायची. दोन्ही वाढत्या वयातल्या मुलाचं अस मोठ्या प्रमाणातल पोहण, आंबे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे फारच वाईट समीकरण होत! आईनी दोन्ही वेळेच्या म्हणून करून ठेवलेल्या पोळ्या आम्ही एकाच जेवणात फस्त करायचो. पुन्हा दुपारी खायला तयारही असायचो!

आमचे तिघींचे केस चांगले लांब आणि दाट होते. खारट पाण्याने त्या केसांची अवस्था घोड्याच्या शेपटीसारखी व्हायची. पण केस कापावे, लहान केस स्वच्छ करायला सोपे जातील, हे कोणाच्या डोक्यातच आल नाही. आता तिघींनीही मस्तपैकी केस कापून टाकलेत. कल्याणला गेल्यावर तिघी मातांपैकी कोणीतरी ‘आमचे हात तुम्हाला न्हायला घालून घालून भरून यायचे. आता स्वतःच्या हातात आल्यावर इतके छान केस कापून कसे टाकलेत?’ असा तीव्र निषेध व्यक्त करतातच.

सगळ्या मुलगे वर्गाच्या केसांची अवस्थाही काही फार वेगळी नसायची. खाडीवरून येताना एक ‘मोहन केशकर्तनालय’ लागायचं. हे सगळे नाठाळ लोक त्याच्याकडे सगळे एकदम केस कापायला जायचे! त्यादिवशी मोहनच्या कात्रीची धार नक्की जात असणार.
‘पोहून आल्यावर अंघोळ केल्याशिवाय खायला मिळणार नाही,’ असा एक फतवा घरोघरी लागू होता. भूक तर मरणाची लागलेली असायची. त्यामुळे बाथरूममध्ये जाऊन इतक्या त्वरेने आम्ही बाहेर यायचो, की बादलीला सुद्धा नक्की काय घडल, ते कळायच नाही. भरपूर खाऊन आम्ही आमचे उद्योग करायचो. आई मात्र वाळूचा सडा पडलेलं बाथरूम स्वच्छ कर, वाळूने भरलेले कपडे धू अशी काम करायची. तेव्हा हा काही विचार करायची कुवतही नव्हती आणि अक्कलही.

आमचे सगळे गुरुजन गावठी पद्धतीच पोहण शिकलेले होते. पोहण्याचे स्ट्रोक्स वगैरे प्रकार त्यांनाच माहिती नव्हते, तर आम्हाला कुठून माहिती होणार? त्यामुळे पोहताना वेग वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणे, हे तिथल्या नियमात आजिबात बसत नव्हते. हात-पाय पाण्याच्या आतून मारायचे. फार गडबड करायची नाही, हे सतत बजावल जायचं. फ्री-स्टाईल स्ट्रोकसारखे पाण्यावरून हात मारायला लागल, तर त्याला ताबडतोब प्रतिबंध केला जाई. आपला स्टॅमिना सांभाळून हळूहळू जायचं, अशीच पद्धत होती.

‘फ्लोटिंग’ हा अजून एक प्रकार अत्यंत लोकप्रीय होता. श्वासाची लय सांभाळत पाण्यावर स्वस्थ पडून तरंगत राहणे म्हणजे फ्लोटींग! ह्यासाठी भरपूर उत्तेजन मिळायचं.’ थोड जरी दमल्यासारख वाटल, तरी लगेच फ्लोटिंग करा’ हा मंत्र सदैव जपला जायचा. खाडीच पाणी कधीच स्थीर नसायच, प्रवाहाबरोबर आपोआपच वाहात जाता यायचं. आम्ही जिथे पोहायचो, तिथून जवळच विजेच्या ‍किंवा दूरध्वनीच्या तारा ह्या काठावरून त्या काठावर गेल्या होत्या. का कोणास ठावूक, पण त्या तारांखालून जाताना सगळे फ्लोटिंग करत आडवे पडून त्या तारा जाताना बघायचे.

पुढे आमच्या एका लांब अंतराच्या मोहिमेत अश्याच एका तारांखालून जाण्याची वेळ आली. त्या मोहिमेत आम्हाला मदत आणि सोबत करण्यासाठी ठाण्यातले काही स्वीमर आमच्या बरोबरच्या बोटीत आले होते. तारा दिसल्याबरोबर सवयीप्रमाणे आम्ही सगळे तारांखाली पोहणे थांबवून आडवे झालो. ठाणेकरांना वाटल की तब्येतीचा काही प्रॉब्लेम झाला की काय? मदत करण्यासाठी ते बिचारे भराभर हात मारत आमच्यापर्यंत पोचले. तोपर्यंत आम्ही पुन्हा पोहायलाही लागलो होतो. त्यांना ह्या आमच्या अचानक घेतलेल्या ब्रेकची आईडिया कळेचना! आम्ही तरी काय करणार? इतक्या वर्षांची सवय..... दुसर काय?

कल्याणसारख्या लहानश्या गावात ह्या उद्योगांना प्रसिद्धी मिळाली नसती, तरच नवल! काही लोक टॅंकवर पोहायला शिकून आलेले असायचे. माझ्या भावाला अश्याच एका टॅंकरने विचारल ‘ तुम्ही किती खोल पाण्यात पोहता?’ सरळ उत्तर दिल, तर खाडीच्या पाण्यातल्या मिठाला न जागण्याच पाप माथी यायचं. त्यामुळे भावाने अगदी गरीब चेहरा करून ‘ नाही रे, आम्ही शिकाऊ लोक. पाण्याच्या वरूनच पोहतो. तुमच्यासारख तळाजवळून पोहत नाही, त्यामुळे खोली काही कळली नाही बुवा!’ अस उत्तर दिल. ते उत्तर नंतर बरच लोकप्रीय झाल्यामुळे सगळेजण वापरायला लागले.

पोह्ण्याबरोबरचे कारनामे!

खाडीवर मनसोक्त पोहता येत असल्, तरी स्वीमिंग टॅंकसारखा डायव्हिंग बोर्ड मात्र नव्हता. त्यामुळे उड्या, सूर मारता यायचे नाहीत. कधीतरी वाळूने भरलेल्या होड्या रिकाम्या करण्यासाठी म्हणून काठाला लागायच्या. दोन लपलपत्या फळ्यांवरून डोक्यावर वाळूची घमेली घेतलेल्या बायका ये-जा करायच्या. आम्हीही त्यांच्यात घुसून, होडीच्या पाण्याच्या बाजूने दणादण उड्या मारायचो. माझे बाबा तिथून अगदी रेखीव असे सूर मारायचे. मला सूर मारायला शिकवायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण त्यावाचून काही अडत नसल्याने, मी काही त्यांना दाद दिली नाही.

पोहण्यात बऱ्यापैकी प्रगती झाल्यानंतर आम्ही अगदी क्वचित खाडीच्या पुलाच्या खालच्या पट्ट्यांवरून उड्या मारायला जाऊ लागलो. खाडीवर एक ब्रिटीशकालीन पूल होता, ह्याचा उल्लेख मी वर केला आहेच. भरतीच्या प्रवाहाचा फायदा घेत आम्ही काही लोक त्याच्या खाली पोचायचो. दोन्ही बाजूंना हातांच्या कवेत न मावणारे गोल खांब आणि त्यांना जोडणाऱ्या आडव्या आणि तिरप्या पट्ट्या अशी रचना होती. त्या आडव्या पट्ट्यांवर आम्ही जाऊन बसायचो. वरून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीचा एक वेगळाच आवाज यायचा. बाकी ठिकाणी टळटळीत वाटणार ऊन इथे थोड सौम्य वाटायचं. पाण्यापासून दुसऱ्या-तिसऱ्या पट्ट्यांवरून उड्या मारायचा मान पोह्ण्यातल्या ज्येष्ठतेप्रमाणे मिळायचा! वरून पाण्यात उडी मारली की पाणी काळकुट्ट दिसायचं. क्षणभर नक्की कोणत्या दिशेला जायचय, हा गोंधळ व्हायचा. इतके विचार मनात यायला जितका वेळ लागायचा, त्याच्या आतच डोक पाण्याबाहेर यायचं सुद्धा! पुलाखाली पाण्याला प्रवाह जोरात असायचा. त्यामुळे काही जण वर आलेल्याचा हात पकडायला तयारच असायचे! भीती तर वाटायची, उंचावरून पाण्यात पडेपर्यंत पोटात खड्डा पडायचा, पण मजा खूप वाटायची आणि तो उड्या मारायला जायचा मोह काही आवरायचा नाही!

खाडीच्या त्या पुलाचे नऊ खांब म्हणजे आमच अंतराच माप होत. पाच खांब जाऊन परत आल, म्हणजे खाडी पार करायची तयारी झाली, अस समजण्यात येई. (ते अंतर साधारण एक किलोमीटर आहे, अशी ज्ञानप्राप्ती मला नुकतीच झाली आहे!) कोणीही पहिल्यांदा खाडी पार करणे, म्हणजे उत्सव असायचा. त्याच मानसिक धैर्य वाढवण्यासाठी सगळे पटाईत लोक बरोबर जायचे. त्याबदल्यात त्या भिडूने सर्वाना मग भेळेची पार्टी द्यायची, असा अलिखित पण कडक नियम होता.

आमचा एक अशोक दीक्षित नावाचा मित्र पुलाच्या पाच-सहा खांबांपर्यंत जाऊन परत यायचा. आता क्रॉस करायची तयारी झाली, म्हणून सगळे जमायचे. पण त्या दिवशी त्याला काय व्हायचं कोण जाणे? सात खांब गेला, की गर्रकन वळून मागेच फिरायचा. सगळे ‘अशोक, अरे तू ७५-८० टक्के आला आहेस, समोरचा काठ जास्त जवळ आहे.’ अस समजावायचे. पण नाही. हा हिरो परतच यायचा! सगळ्यांना भेळ खाऊ घालायचा. पुन्हा काही दिवसांनी तीच कथा.. अस दोन-तीन वेळा झाल्यावर मग एकदाची त्याने खाडी क्रॉस केली!! ह्या गोष्टीवरून आम्ही त्याला खूप चिडवायचो. त्याचा वचपा म्हणून की काय, आधी त्याने एकट्याने व नंतर लेकीबरोबर पॉवर लिफ्टिंग मध्ये बरेच विक्रम केले!

काही दिवसातच आम्हा तिघीही मैत्रीणींचीही खाडी पार करायची तयारी झाली. आदल्या दिवशी रात्री झोप लागेना! डोळ्यासमोर पाणीच पाणी दिसत होत. शिवाय आपल्याला टाकून बाकीचे लोक क्रॉस करतील की काय ही एक भीती होतीच. पण सुदैवाने तस काही झालं नाही. आम्ही सगळ्यांनी यशस्वीरीत्या ते टारगेट पूर्ण केल! कल्याणच्या एका संस्थेने आमचा नंतर ह्याबद्दल सत्कारही केला.
आता पोहण्यात आणखी आणखी रंगत यायला लागली. रोज रोज खाडी क्रॉस करायचं वेडच लागल. तेव्हाही वाळूचा उपसा व्हायचा. पण ड्रेझर अगदी कमी होते. त्यामुळे काठावरची दलदल शाबूत होती. खाडी क्रॉस करून पलीकडे गेल्यावर आम्ही दलदलीत उभ राहून थोडा वेळ टाईमपास करायचो. आता आठवून गम्मत वाटते, पण तो चिखल अंगाला फासायचो सुद्धा! खाडीच्या भरती-ओहोटीला जुळवून घेण्यासाठी पलीकडच्या काठावर काही अंतर चालतही जायला लागायचं. त्या काठावर विलायती चिंचांची भरपूर झाड होती. त्या चिंचा आम्ही तिथेच खायचोही आणि येताना खाडी क्रॉस करू न शकणाऱ्या अभागी लोकांसाठी खिसे भरून घेऊनही यायचो.

नेहमीच सकाळी अगदी लवकर, म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला पाण्यात असू, अश्या बेताने आम्ही पोहायला जायचो. मुंबईच्या त्या घामट उन्हाळ्यात थंड पाण्यात शिरल्यावर मनाला आणि तनाला होणारा आल्हाद शब्दात सांगण कठीण आहे. त्या सकाळच्या शांत वेळी हलके हलके वाहणाऱ्या पाण्यात सावकाश पोहताना स्वर्गसुख मिळायचं. वाळूच्या होड्यांवर काम करणाऱ्या काही मजुरांच्या झोपड्या काठावर होत्या. तिथेच एका झोपडीत सगळ्या महिलावर्गाची कपडे बदलायची सोय केली होती. बऱ्याचदा आम्ही पोहण संपवून तिथे जायचो, तेव्हा त्या मावशी चुलीवर भाकरी करत असायच्या. पोहून इतकी मरणाची भूक लागलेली असायची, की त्यांनी ‘खाता का भाकरी?’ अस तोंडदेखल म्हटल असत, तर आम्ही निर्लज्जासारख्या खाऊ, अशी भीती आमच्यासकट सगळ्यांनाच वाटायची!

कल्याणच्या त्या घामट उन्हाळ्यात बऱ्याच वेळा रात्री चक्कर मारायलाही आम्ही खाडीवर जायचो. तेव्हा थंडगार वारा सुटलेला असायचा. वाळूच्या ढीगावर रेलून वर बघितलं, की चमचम करणाऱ्या चांदण्यांनी भरलेलं आभाळ दिसायचं. झोप डोळ्यात दाटून यायची. परत घरी जाऊन दार उघडल, की गरम हवेचा झोत भस्सकन अंगावर यायचा. तेव्हा खाडीवरच झोपता आल असत, तर किती छान झालं असत, अस मनापासून वाटायचं. अश्या रीतीने, त्या काळात आमचा कायमचा पत्ता ‘खाडी आणि तात्पुरता पत्ता ‘घर’, अशी अवस्था होती. बऱ्याच जणांच्या घरचे लोक ह्यावर वैतागायचे. लग्नेच्छू मंडळींच्या घरचे तर फारच! ‘उद्या मुलगी बघायला सुद्धा खाडीवरच बोलावशील बाबा तू,’ असे डायलॉग्ज ऐकायला मिळायचे.

थोड्याच दिवसात पोहण्याव्यतिरिक्त इतरही कल्पनांच्या ग्रूपमध्ये फांद्या फुटू लागल्या. चार मराठी माणसं एकत्र आली, की गणपती बसवतात, अस म्हणतात. पण खाडीवर ते शक्य नसल्याने, दुसऱ्या क्रमांकाची कल्पना म्हणून एक कोजागिरी पौर्णिमा खाडीवर करायची ठरली. मसाला दुध, भेळ वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार होतेच. ‘काय, येताय का चार हात मारायला?’ राजू गुप्तेने नेहमीप्रमाणे माझ्या बाबांना विचारल. बाबाही तयार झाले! त्या काळोख्या रात्री दोघेही नेहमीसारखे पाण्यात उतरले. ‘बाकी काही नाही, पण आपल्याच सावल्या दिसतात, त्याने जरा बिचकल्यासारख झालं’ असा रिपोर्ट मिळाला. असे अत्रंगपणा करण्यात सगळे एकदम पटाइत होते!

त्या ग्रूपमध्ये मराठीचा एक वेगळाच अविष्कार निर्माण झाला होता. आमच्या ग्रुपचे सर्वात ज्येष्ठ मेम्बर आठवले काका, चालताना एक खांदा झुकवून चालायचे. म्हणून त्यांना ‘देवानंद’ आणि एका टकलू काकांना ‘कादरभाई’(संदर्भ : दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ ही मालिका’), राजू गुप्ते सगळ्या बारक्या पोरांना पोहायला शिकवायचा. म्हणून तो झाला गुप्ते गुरुजी किंवा गुगु! विजय वाड सगळ्यात छोटा, त्याला कायम ‘विजय द्वाड’! आता ह्यातले सगळे मोठे झाले. पोटामागे धावताना बऱ्याच जणांनी कल्याण सोडल. पण अजूनही ग्रूप भेटला की ह्या नावांची त्या सर्वांच्या बायकोमुलांसमोर उजळणी होतेच होते.

Keywords: 

लेख: 

तरंगायचे दिवस! (भाग-३)

तरंगायचे दिवस! (भाग-३)

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

व्यक्ती आणि वल्ली

ह्या आमच्या जमावात तऱ्हेतऱ्हेची व्यक्तीमत्व गोळा झाली होती. वैयक्तिक आयुष्यात ते खूप शिकलेले किंवा प्रचंड यश मिळवलेले होते, असही नव्हत. पण त्यांची स्वभाववैशिष्ट्ये अत्यंत गमतीदार आणि विशेष होती, हे नक्की! सगळीच व्यक्तिमत्त्व आपापल्या गुणांनी अलौकिक होती, पण उदाहरणादाखल त्यातली ही काहीच.........

राजू गुप्ते

हा आमच्या घरापासून अगदी दोन मिनिटांवर राहायचा. चांगला उंच, रंगाने अंमळ काळा आणि अंतरी नाना कळा असलेल अस हे एक वेगळच रसायन होत. खाडीवर अत्यंत आवडीने वापरल्या जाणाऱ्या मराठीला राजूने अनेक शब्दरत्ने बहाल केली होती! पोहून परत येताना उद्याला कोणकोण आहे ही चर्चा व्हायचीच. राजूने चुकुनही ‘हो, मी आहे’ अस सरळ उत्तर दिल नसेल. कायम ‘आय अॅम, आय अॅम’ नाहीतर ‘हुं छु’ अस उत्तर मिळायचं. आमच्या घराची एक खिडकी अगदी रस्त्यावर उघडायची. तिथून जाताना कायम राजू ‘चला, चार हात मारायला,’ अस ओरडायचा. मग ती सकाळ असो नाहीतर रात्र! रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याचदा बाबा आणि राजू कल्याणच्या सुप्रसिद्ध लाल चौकीपर्यंत किंवा खाडीजवळ रस्त्यांचा एक तिठा (तीन रस्ता चौक) होता, तिथपर्यंत चक्कर मारायला जायचे. त्या जागांचे मग ‘एल.सी.’ आणि ‘टी.सी.’ अस नामकरण झाल.

कल्याणची स्मशानभूमी आमच्या घरापासून जवळ होती. तेव्हा विद्युतदाहीन्या नव्हत्या. दत्त आळीजवळच्या एका वखारीतून वखारवाल्यांचा एक नोकर हातगाडीवरून लाकडे अंत्यसंस्कारांसाठी घेऊन जायचा. राजू जगमित्र असल्याने त्याची त्या नोकराशीही ओळख होतीच. त्या हातगाडीवाल्याला रस्तात अडवून राजू बिनदिक्कत ‘काय रे, कोण गेल?’ अशी चौकशी करायचा! तो हातगाडीवाला सावकाश गाडी टेकवून ‘ अरे, ते ..... वाड्यातले .......... गेले ना.’ अशी बातमी द्यायचा. दुसऱ्या मिनिटाला आम्हालाही ती बातमी पोचायची.

राजू गुप्ते म्हणजे मध्य रेल्वेच चालत-बोलत टाईमटेबल होत किंवा आजच्या भाषेत ते ‘गुगलमहाराज’ होते. रेल्वेच्या छापील टाईमटेबलमध्ये फक्त जायच्या यायच्या वेळा आणि गाड्यांचे थांबे असतात. राजूच्या माहितीत मात्र त्या गाड्यांचे गुणदोषही असायचे. ‘अमकी गाडी मुलुंडला थांबते पण माटुंग्याला नाही बर का...’ ही माहिती मध्य रेल्वे द्यायची. पण ‘ती कॅश लोकल आहे, त्याने जाऊ नको, प्रत्येक स्टेशनला कॅश घेत जात असल्याने कायम लेट होते’ ‘दीडच्या सुमारास व्ही.टी. वरून सुटणाऱ्या डबल फास्ट कर्जत ट्रेनला इंजिन लोकल म्हणतात’, इत्यादि माहिती राजूच देऊ शकायचा.

आम्ही त्या काळात कधीही टाईमटेबल हातात घेतल नाही. राजूला कुठे आणि कधी पोचायचय एवढ सांगीतल, की तो सुयोग्य अशी ट्रेन सुचवायचा. ट्रेकसाठी कर्जतला गेलो, की तो आम्हाला दिवाडकरचे बटाटेवडे खाऊ द्यायचा नाही. पळत जाऊन स्टेशनच्या बाहेरून कुठूनतरी गरम आणि चविष्ट वडे आणायचा. आता तो खोपोलीला नोकरी करतो. कोयना एक्सप्रेसने कर्जतहून कल्याणला परत जातो. त्या ट्रेनने जाणार असलो, की अजूनही आम्ही त्याला आधी फोन करतो. किती माणसे आहेत हे सांगीतल, की कर्जतला तेच वडे मिळतात.

मी अकरावी-बारावी ठाण्यात बांदोडकर कॉलेजमधून केल. प्रॅक्टीकलसाठी मी सकाळी लवकरची ट्रेन पकडून जायचे. त्या दरम्यान एकदा मध्यरात्री दिवा-मुंब्रा स्टेशन दरम्यान ट्रेनचा अपघात होऊन मध्य रेल्वेच्या चारही लाईन बंद झाल्या होत्या. राजूला पहाटे कोणाकडून तरी ही बातमी कळल्याबरोबर तो त्याच पावली आमच्या घरी आला. मी कुठेतरी अडकू नये, म्हणून दार वाजवून ‘आज जाऊ नको ग, गाड्या वाजल्या आहेत’ हा निरोप देऊन मग तो घरी गेला. आता वाटत, काय इतक अडल होत त्याच? पण आपल्याकडून ज्याला जी मदत होईल, ती करायचा त्याचा स्वभावच होता. कल्याण सोडून आता खूप वर्षे झाली. अजूनही ट्रेन-टाइमटेबल हातात घेतल, की राजूची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुंबईची जीवनरेखा असलेल्या ट्रेनने प्रवास तर कल्याणकरांना चुकला नाही. त्या तंत्राचे प्राथमिक धडे राजुकडे गिरवल्यामुळे आम्हाला त्या प्रवासाशी जुळवून घ्यायला कधीच अडचण आली नाही!!

बापू विद्वांस

हे ग्रूपमधल्या अगदी जुन्या मेम्बरपैकी होते. मध्यम उंची, चित्पावनी आडनावाला साजेसा वर्ण आणि डोळे. कल्याणला दुधनाक्याजवळ राहायचे. तरूण वयात पोहताना कानात पाणी जाऊन की कशाने तरी त्यांना ऐकू कमी यायचं. कुठल्याश्या सरकारी खात्यात चाकरी करायचे.

एवढ्या वर्णनावरून हा माणूस आपला नाकासमोर पाहून चालणारा, नोकरी लागल्या दिवसापासून ते निवृत्तीपर्यंत दहा ते पाच नोकरी करणारा असणार, अस वाटेल. तसे ते होतेही. पण अनपेक्षित असा एक वेगळाच रंग त्यांच्या व्यक्तीमत्वात होता. त्यांना उत्तमपैकी शिवणकाम करता यायचं. त्यांची मुलगी माझ्याच वयाची होती. ती कॉलेजला जाईपर्यंत तिचे सुंदर सुंदर कपडे ते स्वतःच शिवायचे. त्या कपड्यांच्या फॅशन आणि शिवण्यातली सफाई दोन्ही अप्रतीम असायचं. ह्यांना गड-किल्ले चढायचं वेड होत. ते आणि त्यांचे भाऊ दोघेच किल्ले चढायला जायचे. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ते दोघे पन्नास किलोमीटर चालून आले होते. त्यासाठी लागणाऱ्या सॅक, पाण्याच्या बाटल्या ठेवायला वेगळी पिशवी, हे सगळ ते आपल डोक चालवून आपणच शिवायचे. त्या पाण्याच्या पिशवीची एखादी विशिष्ट टीप उसवली, की त्यात दोन तीन बाटल्या मावू शकतील, अशी जादूही केलेली असायची. ट्रेकिंगमध्ये कुठले प्रश्न पडू शकतात, ह्याचा विचार करून त्यांनी ते आधीच सोपे केलेले असायचे.

बापूंनीच आमच्या ग्रुपला ट्रेकिंगच वेड लावल. तेव्हा बहुतेक सगळ्यांकडे पैशांची चणचण होती. पण फार पैसे खर्च न करता ट्रेकमध्ये खूप मजा करता येते, हे ज्ञान आम्हाला त्यांच्यामुळे मिळाल, आणि केवढातरी आनंदाचा खजिना उपलब्ध झाला. किल्लावर पोचल्यावर मुक्कामाची जागा ठरवणे वगैरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्हायचं. आसपास दिसणाऱ्या किल्ल्यांची माहिती हेच द्यायचे. किल्ल्यावर चहा, खिचडी इतपत स्वैपाक करण्यासाठी लागणारी भांडी-कुंडी, चुलीसाठी लागणारे केरोसीन इत्यादी जय्यत तयारी बापू करायचे.

एकदा राजमाचीला जाताना तयारीत हिरव्या मिरच्या घ्यायला सगळेच विसरले. कर्जत स्टेशनबाहेर वडापावाचा नाश्ता करताना त्यांनी सगळ्यांना हिरव्या मिरच्या द्यायला दुकानदाराला सांगितल्या. प्लेट समोर आल्यावर शांतपणे सगळ्यांच्या मिरच्या काढून घेऊन आपल्या सॅकमध्ये टाकल्या... संपला प्रश्न. आहे काय आणि नाही काय?

आनंदाचे डोही आनंद-तरंग

खाडीवर पोहायला बराच मोठा जमाव जमू लागला. काही लोक खरच पोहायला यायचे, तर काही टाईमपास करायला. मुलीसुद्धा बऱ्यापैकी येऊ लागल्या होत्या. पण दुर्दैवाने फार दिवस यायच्या नाहीत. घरचे नाही म्हणतात म्हणून, चेहरा काळा पडतो म्हणून किंवा जिद्द फार नव्हती म्हणूनही बऱ्याच मुलीचं पोहण थांबायचं तरी, किंवा लहानश्या मर्यादेतच रहायचं. बाकीच्यांचीही कथा काहीशी अशीच असायची. काठावर कंबरभर पाण्यात उभे राहणारे बरेच लोक असायचे.

केव्हातरी आमच्यातले तीन मेम्बर ‘चंद्रखणी पास’ ह्या यूथ होस्टेलच्या ट्रेकला जाऊन आले. तिथल वर्णन ऐकून आणि फोटो बघून सगळ्यांना ती हौस वाटू लागली. आमच्यातले बापू विद्वांस उर्फ गुरु हे गडकिल्ल्याचे माहीतगार. मग कर्नाळा, राजमाची, भीमाशंकर, चंदेरी, लोहगड अश्या जवळपासच्या ठिकाणावर स्वाऱ्या होऊ लागल्या. एका कोजागिरीला राजमाची किल्ल्यावरून पाहिलेल्या पूर्ण चंद्र आणि टिपूर चांदण्याच्या सौंदर्याची भुरळ अजूनही मनावर आहे.

आमच्या घरी त्याकाळात जे नातेवाईक राहायला म्हणून यायचे, त्यांनाही शक्यतो पाण्यात उतरून आणि ते अगदीच शक्य नसेल, तर काठावर बसून खाडीचा अनुभव घ्यावाच लागायचा! माझ्या दोघी मामेबहीणी त्यादरम्यान कल्याणला आल्या होत्या. त्यांनाही पोहायला शिकवायच बाबांनी ठरवल. मोठी मवाळ होती, ती गुमान शिकली. आमच्या सुप्रसिद्ध ‘जठार पॉइंट’ पासून पोह्ण्यापर्यंत तिने प्रगती केली. पुढे पुष्कळ वर्षानंतर तिच्या लग्नाच्या ठरवाठरवी दरम्यान माझ्या बाबांनी हा मुद्दा ठासून सांगून तिच्या सासरच्या मंडळींना चांगलच इम्प्रेस केल होत! एवढ अंतर पोहताना ती थकली, की आपोआपच जोरजोरात श्वास घेतल्या आणि सोडल्याचे आवाज येऊ लागत. तेव्हा अतुल, माझा भाऊ, तिला ‘हे बघ, तू हात-पाय मारायचं तेवढ बघ. आवाज काढायचं काम मी करतो तुझ्या वाट्याच....’ अस म्हणून पूर्ण वेळ चिडवत राहायचा!

धाकटी जरा नाठाळ होती. किनाऱ्यापर्यंत यायची. पण पाण्यात जायची वेळ आली, की मात्र पळत सुटायची. बाबांनी थोडे दिवस वाट बघितली-बघितली, आणि एक दिवस उचलून पाण्यात घेवूनच गेले. मग काय विचारता....’आई-बाबा-आत्या-काका-आजोबा’ सगळ्यांचा धावा करून झाला. पण कोणीही लक्ष दिल नाही. काही दिवसातच आरडाओरडा करायची स्टेज संपवून ती थोडेफार हात-पाय मारायला शिकली, आणि मग मात्र तिला ते व्यसनच लागल. सकाळी वेळेआधी उठून बाबांना ‘ काका, उठा ना, काका, उठा ना’ असे म्हणून त्रास द्यायला लागली. पोहायची वेळ संपली, की बाबांना घरी यायची घाई असायची. नवीन शिकलेल्या शिष्यांना ते स्वतःच्या आधी पाण्यातून बाहेर काढायचे. पण ही बयाबाई काही पटकन बाहेर यायची नाही. ‘ काका, फक्त पाचच मिनिट, एकच राउंड..’ अस म्हणत त्यांना लटकवायची! घरी आल्यावर त्यांच्या आधी अंघोळीला नंबर लावून, आत्याला गूळ लावून सगळ्यांच्या आधी नाश्ता करून चक्क झोपून जायची. ही आमची बहीण अगदी लख्ख गोरी. तिला लहान वयात त्याचा फार अभिमानही होता. आमचा खाडी-मित्र राजू एकदम काळा. तो तिला सारखा ‘मीच तुझ्यापेक्षा गोरा आहे, बघ’ अस चिडवायचा. ती वाईट भडकायची. त्याला मारायला धावायची. तो असेल तेव्हा पंचविशीतला. ती पाच-सहा वर्षांची. तो पुढे धावतोय आणि ही पांढऱ्या पेटीकोटमधली छोटी त्याच्या त्याला मारायला त्याच्या मागे धावतेय, हे दृश्य आठवून आत्ताही हसायला येतय!

साधारणपणे उन्हाळा जाणवायला लागला, की सगळ्यांना खाडीची स्वप्न पडायला लागायची. नोकऱ्या करणारे मोठे लोक तर फेब्रुवारी संपता-संपता ‘चार हात’ मारायला सुरवात करायचे. आम्ही शिकत असल्याने परीक्षा झाल्याशिवाय पोहायला परवानगी नसायची. त्यामुळे कधी एकदा परीक्षा होतेय, आणि पाण्यात उडी घेतोय अस व्हायचं. माझ्या आठवणीतल्या कितीतरी सुट्ट्यांची सुरवात मी सुजाताबरोबर पोह्ण्याने केली आहे. मग उन्हाळाभर तोच एक-कलमी कार्यक्रम! जूनच्या सुरवातीला ‘नभ मेघांनी आक्रमिले’ की उदास वाटायचं. पोहण बंद आणि शाळा सुरू. आमचे सगळ्यांचे चेहरे खाडीच खारट पाणी आणि भरपूर ऊन्हाने अक्षरशः रापलेले असायचे. ‘सनस्क्रीन’ असा काही पदार्थ आस्तित्वात असतो, ह्याची सुतरामही कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती. शाळेतल्या मैत्रिणी आमचे रंगीबेरंगी चेहरे, भयानक केस पाहून थक्क व्हायच्या. पण आम्हाला उन्हाळ्यात इतकी मजा यायची, की चेहऱ्याचा रंग, केसांचा पोत वगैरे गोष्टी कःपदार्थ वाटायच्या.

ह्याच दरम्यान कल्याणजवळ ड्रेझर ह्या वाळू उपसणाऱ्या महाकाय यंत्राचा वापर सुरू झाला होता. आमच्या काठाच्या डावीकडे कल्याणच रेतीबंदर होत. तिथल्या काही होड्या एखाद्या लॉंचला जोडून वाळू घेण्यासाठी त्या ड्रेझरकडे जायच्या. परतताना ओहोटीच्या प्रवाहाबरोबर वाहत यायच्या. कोणाच्या तरी सुपीक डोक्यात एक दिवस एक भन्नाट कल्पना आली. पुलापलीकडून होड्यांची माळ येताना दिसली, की आमची सगळी गँग वेगात पोहत त्या होड्यांच्या दिशेने जायची. लॉंच सोडून मागच्या रांगेतल्या साध्या होड्यांच्या सुकाणूला उसळी मारून पकडायच. जो पहिला पकडेल, त्याने हात लांबवून बाकीच्यांना मदत करायची. त्या होड्या पकडून लांबवर जायचं. येताना प्रवाहाच्या मदतीने लांब-लांब अंतर पोहत यायचं.

हळूहळू हे गणित सगळ्यांना जमायला लागल. होड्यावाले लोक आमच्या सोयीसाठी दोर सोडून ठेवायला लागले. काही लॉंचवाले आम्ही दिसलो, की थोडा वेग कमी करायला लागले. हे सगळ करायला फार म्हणजे फार मजा यायची. एरवी वेगात पोहायचा प्रयत्न केला, तर कोणीतरी ओरडणार हे नक्की असायचं. पण पुलापलीकडून होड्या येताना दिसल्या, की चैतन्याची लाटच उसळायची! सगळे काका, दादा आपापला सर्वोत्तम वेग अजून जरा वाढवायचा प्रयत्न करत पोहायला लागायचे. एकदा का त्या होड्यांना हात लागला, की सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्हायचा! जितक लांब जाऊ तितक दोन्ही काठांवरील दृश्य बदलत जायचं. तोपर्यंत कल्याणचा विस्तार तसा मर्यादेत होता. त्यामुळे लवकरच इमारती दिसेनाश्या व्हायच्या. सगळीकडून दिसणारा चित्रातल्या डोंगरासारखा त्रिकोणी डोंगर जवळ दिसायला लागायचा. खाडीवरचा पाईपलाईनचा पूल जवळ दिसायला लागायचा.

ठराविक अंतर गेल्यावर कोणीतरी ‘चला, मारा उड्या’ अशी आज्ञा द्यायचं. कोळीदादांचे आभार मानून आम्ही पंधरा-वीस जण होड्यांवरून दणादण उड्या मारायचो. आमची ही ‘छोटीसी कश्ती’ वेगाने लांब जाताना दिसायची. आम्ही पोहायला सुरवात करायचो. पुढे पुढे खाडीच पात्र खूप रुंद आहे. तीच खाडी असली, तरी अनोळखी वाटायची. आपला परिचयाचा काठ, तिथे पोहणारी माणस दिसली की जीवात जीव यायचा. तिथेपर्यंत पोचायला प्रवाहाची मदत असली, तरी हात-पाय मारावेच लागायचे. पुन्हा काठाला लागेपर्यंत पूर्ण गळून जायचो. पाण्यातून बाहेर पडल्यावर एक दहा-वीस फुटांचा चढ चढायचंसुद्धा जीवावर यायचं. कोरडे कपडे घालून कसेतरी पाय ओढत घरी पोचायचो. आमच्या सुट्टीमुळे दिवसभर तस काही काम नसायच. पण बरेच जण नोकऱ्यावाले होते. ते लोक कशी दिवसभर काम करत असतील कोण जाणे? ज्यांना लोकलमध्ये बसायला मिळायचं, ते तिथे झोपेची वसुली करायचे. ह्या होड्यांच्या नादाने तेव्हा आम्ही पाच-सहा किलोमीटर सहज पोहून जात असू.

Keywords: 

लेख: 

तरंगायचे दिवस! (भाग-४: अंतीम)

तरंगायचे दिवस! (भाग-४: अंतीम)

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

कल्याण ते मुंब्रा : एक धाडसी प्रयोग

पोहायला शिकलो, खाडी क्रॉस करून झाली. छान ग्रूप तयार झाला. पण पुढे काय? मग कल्याण ते डोम्बिवली आणि नंतर कल्याण ते मुंब्रा पोहत जायचं, अशी कल्पना कोणाच्या तरी डोक्यात आली. कल्पना तर छानच होती. पण हे नक्की कस करायचं, ह्याची कोणालाही सुतराम माहिती नव्हती. बऱ्याच वर्षांपूर्वी काही जण कल्याण ते डोम्बिवली हे सात-आठ किलोमीटर अंतर पोहून गेले होते, अशी आणि तेवढीच माहिती काही जण द्यायचे, पण आम्हाला तसा त्या माहितीचा काहीही उपयोग नव्हता. परमेश्वराच्या ‘गुगल’ ह्या अवताराचे आगमन अद्याप पृथ्वीतलावर झालेले नसल्याने, तो माहिती मिळवण्याचा तो पर्याय उपलब्ध नव्हताच.

मग इकडे-तिकडे चौकश्या आणि त्याबरोबर अत्यंत जोरात प्रॅक्टीस सुरू झाली. नियमित पोहायला येणारे आणि चांगल्यापैकी स्टॅमिना असलेले पंधरा-सोळा जण निवडले गेले. सुदैवाने आम्ही तिघी मैत्रिणी ह्या गटात होतो. तेव्हा आम्ही अकरावीतून बारावीत गेलो होतो. पोहण्याच्या आवडत्या कार्यक्रमात व्यत्यय नको, म्हणून आम्ही कधीही सुट्टीतले क्लास लावले नाहीत. जेमतेम परीक्षा दिली, की बास. मग खाडी एके खाडी!

माझी आई तेव्हा साधारण चाळीशीची होती. तिला काही पोहायला यायचं नाही. घरातली सकाळची काम आवरली, की ती कधीकधी आमच पोहण बघायला खाडीवर यायची. ते पाहून पाहून तिला ‘आपणही पोहायला शिकावं’, अशी अनावर इच्छा झाली. सुजाताची आईसुद्धा शिकायला उत्सुक होतीच. मग ह्या आई-बाबांच्या दोन जोड्या आणखी भल्या पहाटे खाडीवर पोचू लागल्या. दोघीजणी भराभर शिकल्या. आई मग आमच्याबरोबर डोंबिवलीपर्यंत पोहत आलीही होती. त्या दोघींच्या जिद्दीच सगळ्यांनी भरपूर कौतुक केल. आमची एकच पंचाईत झाली, की आता ‘एवढ पोह्ल्यावर असल दमायला होत’, वगैरे शायनिंग तिच्यासमोर मारण बंद कराव लागलं!!

ह्या आमच्या निवडक लोकांमध्ये अमाप व्हरायटी होती. कोणी शिकणारे, कोणी नोकऱ्या-व्यवसाय करणारे. स्वतःचा सध्याचा व्यवसाय नक्की सांगता येणार नाही, असेही काही लोक होते! पोहण्यात मात्र बहुतेक सगळे सिन्सियर होते. रोज पहाटेपासून दोन-दोन तास पोहायला जायचो. पण डोंबिवलीपर्यंत ८ आणि मुंब्र्यापर्यंत सतरा किलोमीटर पोहण, म्हणजे काही गंमत नव्हती. पोहण्याव्यतिरिक्त काही व्यायाम करायला हवे, हे कोणाच्या गावीही नव्हत. ती सोयही नव्हती. खेळासाठी आवश्यक विशेष आहारही कल्पनेच्या बाहेर होता. पण जिद्द आणि सरावात कमी पडायचं नाही, हे मात्र पक्क होत.

हे उपक्रम भरती-ओहोटीच्या वेळापत्रकासोबत जुळवण आवश्यक होत. कल्याणहून डोंम्बीवली/ मुंब्र्याकडे ओहोटीचा प्रवाह असायचा. ओहोटी सुरू होईल तेव्हा पोहायला सुरवात करायची, म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहाव लागत नाही, अस तंत्र होत. ही वेळ सकाळची असणही गरजेच होत. असा सगळा मेळ जमवून आम्ही एकदा डोंबिवलीपर्यंतची मजल मारली. हे अंतर साधारण सात-आठ किलोमीटर असाव. बहुतेकांनी हे अंतर आरामात पार केल. जे करू शकले नाहीत, ते प्रवेश परीक्षा पास न झाल्याने मुंब्रा ग्रूपमधून बाहेर झाले. काही स्वयंसेवक आमच्यासाठी जेवण, पाणी, कोरडे कपडे, चपला इत्यादी सामान घेऊन डोंबिवलीला आले होते. दिवा-वसई लाईन जिथे खाडी पार करते, तिथे भेटायचं ठरल होत. त्याप्रमाणे सगळे भेटले. कपडे बदलून, मजेत जेवण करून आम्ही घरी आलो. आता पुढच्या टप्प्याची तयारी करायची होती.

मुंब्र्यापर्यंतच्या सतरा किलोमीटर अंतरात पोहताना काही मदत लागली तर सोय असली पाहिजे म्हणून एक वल्हवायची होडी बरोबर घ्यायची, असा निर्णय झाला. ठाणे टँकवरच्या काही लोकांशी बाबांनी ओळख काढली. तिथले काही एक्स्पर्ट लोक यायला तयार झाले. कल्याणचा एक हौशी डॉक्टर आणि आमचा एक मेम्बर मित्र एवढ्यांची त्या होडीत वर्णी लागली. ह्या मित्राचा नंबर लागायचं कारण म्हणजे त्याला लांब ऐकू जातील अश्या शिट्ट्या मारता यायच्या!!! मोबाईलचा जमाना ध्यानी-मनीही नव्हता, तेव्हा ही फारच उपयोगी विद्या होती. प्यायचं पाणी आणि थोडा खाऊ बरोबर घ्यायचं ठरल. उरलेलं सामान घेऊन बाकी सपोर्ट टीम मुंब्र्याला येणार होती.

१मे चा दिवस नक्की झाला. काही दिवस आधी काही मंडळी मुंब्र्याच्या रेतीबंदराची पाहणी करून आली. तिथे ओळख काढून महिलावर्गाची कपडे बदलण्याची आणि बसून जेवायची सोय केली गेली. जेवणाची जबाबदारी मातृवर्गाने आपल्यावर घेतली. सगळे पोहणारे आणि त्यांच्या घरचे लोक ह्या कल्पनेने थरारून गेले होते. कल्याणच्या संस्कृतीत खाडीवर पोहणही वर्ज्य मानल जायचं, तिथे पंधरा ते साठ वयोगटातल्या मुल-मुली, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचा हा प्रयत्न भन्नाट वाटत होता.

सगळ्या चर्चा-सल्ले-सूचनांचा भार डोक्यावर घेऊन आम्ही लोक १ मेला पहाटे खाडीवर पोचलो. ठाण्याची मंडळीही वेळेवर पोचली. बरोबर न्यायची होडी, त्यातील सामान व माणसांसह सज्ज झाली. ठाण्याच्या लोकांनी अश्या दीर्घ अंतराच्या पोहण्यासाठी उपयुक्त अशी जेली आम्हाला अंगाला लावायला दिली. त्यामुळे पाण्याबरोबरचे घर्षण कमी होऊन वेग वाढतो. आम्हाला एकदम काहीतरी विशेष तंत्रज्ञान असाव, अस वाटत होत.

आठवले काकांनी खाडीची पूजा केली गेली. भरती संपून ओहोटी सुरू झाली, तशी पूजेची फुलं मुंब्र्याच्या दिशेने वाहू लागली. हा इशारा मिळताच आम्ही सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या. संथगतीने आमचा प्रवास सुरू झाला. अश्या वेळेला प्रवाहाचा फायदा मिळावा, म्हणून पाण्याच्या मध्यातून पोहतात. पण आम्हाला ‘दमल्यासारख वाटल, तर थांबता आल पाहिजे, म्हणून कडेनेच जा’ अशी आज्ञा मिळाली होती! हा गैरसमज ठाणेकरांनी दूर केला. मग आमची सगळ्यांची गाडी नीट मार्गाला लागली.

माझ्या बाबांनी सगळ्यात मागे रहायचं, आणि कोणी फार दमल्यास त्याला सोबत करायची, असा निर्णय आधीच झाला होता. आमचा एक मेम्बर माधव करंदीकर ह्याचे वडील तेव्हा बरेच आजारी होते. त्याला प्रॅक्टीस करायला जमल नव्हत. मानसिक ताण तर असणारच. त्याला काही वेग घेता येईना. मलासुद्धा सुरवातीला फार ताण वाटत होता. मी, बाबा आणि माधव सगळ्यात मागे राहिलो होतो. पण कुठल्यातरी क्षणी मला माझी लय सापडली, आणि मी त्या दोघांच्या पुढे निघून गेले. हळूहळू पुढे जाताना आठवले काका दिसले.

काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीपर्यंत मजल मारला असल्याने हा भाग ओळखीचा वाटत होता. मुंबईकडे धावणाऱ्या लोकल गाड्या, ठाकुर्लीच पॉवर हाउस दिसत होत. डोंबिवलीच्या त्या पुलानंतर मात्र अनोळखी भाग सुरू झाला. प्रत्येकाचा वेग कमीजास्त होतोच. त्यामुळे कधी ह्या मेम्बरबरोबर तर कधी त्या मेम्बरबरोबर अस मार्गक्रमण सुरू होत.

आमची मदत-होडी दिसली, की जीवाला जरा गार वाटायचं! स्पर्धात्मक पोहण्यामध्ये अश्या होडीला किंवा त्यातील लोकांना हातही लावायचा नसतो. पण आम्ही ‘गाव-खाता’ वाले लोक, आम्हाला हे काही माहीत नव्हत. ठाणेकरांना त्या दिवशी चांगलेच सांस्कृतिक धक्के बसले असणार! त्या होडीतून आम्हाला प्यायचे पाणी, थोडेफार खायला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आधार मिळत होता. ठाणेकरांपैकी काही जण आम्हाला सोबत म्हणून थोडा-थोडा वेळ पोहतही होते. त्यांचा उत्तम वेग पाहून सगळ्यांना तोंडात बोटं घालावी लागत होती.

इतक मोठ अंतर पोहण, मग ते आमच्या कमी वेगाने असल तरीही अवघडच असत. हातापायात पेटके येतात. पोटात खड्डा पडतो. डोळ्यांमध्ये खारट पाणी जाऊन-जाऊन पुढच नीट दिसेनास होत होत. पोहता पोहता लांबवरच्या डोंगरावर मुंब्र्याच्या देवीचे मंदीर, तिथला ‘नूतन’ ह्या नटीचा मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना सुपरिचित असा बंगला दिसू लागला. ‘अरे वा, आलच की मुंब्रा जवळ!’ ह्या विचाराने मनाने आनंदाने एक कोलांटीउडी मारली. ठाणेकरांपैकी मकरंद अभ्यंकर, आमचा धीर वाढवण्यासाठी आमच्याबरोबर पोहायला लागला.

थोड पुढे गेल्यावर मुंब्रा खाडीचा काठ दिसू लागला. तिथून आमची सपोर्ट टीम आम्हाला हात करत होती, ते दिसल्यावर आपण खरच पोचलो, असा भरवसा वाटायला लागला! काठावर पाय टेकल्यावर, काय वाटल, ते पंचवीस वर्षे उलटून गेली, तरी आजही मनात ताज आहे. किती वेळ नीट उभही राहता येत नव्हत. पाय लटलट कापत होते. डोळ्यांची इतकी आग होत होती, की डोळे बाहेर पडतील की काय, अस वाटत होत.

हळूहळू एकएक जण येऊन पोचत होता. मुंब्र्याच्या खाडीत मध्यभागी एक वाळूच बेट (तेव्हातरी!) होत. आमचा सगळ्यात लहान मेम्बर विजय आणि त्याच्याबरोबरचे दोघे त्या बेटावर पोचले. ओहोटीचा जोराचा प्रवाह कापून पुन्हा ह्या काठावर येण, आता त्यांच्या शक्तीबाहेरच होत. त्यांना घ्यायला आमची मदत होडी गेली खरी, पण सगळे बसले म्हणून, किंवा प्रवाहामुळे असेल, पण ती होडीच उलटली. ह्या काठावर एकदम आरडाओरडा झाला. नुकतेच कपडे बदलून बसलेल्या काही जणांनी कपड्यांसह पाण्यात उड्या घेतल्या. एकमेकांच्या आधाराने सगळे काठावर आले.

माझे बाबा सगळ्यात शेवटी होते. तेही पोचले. माधव करंदीकर फार थकल्याने डोंबिवलीलाच बाहेर पडला, अशी बातमी बाबांनी आणली. आठवले काका अजून आले नव्हते. ते बहुधा माधवला सोबत म्हणून डोंबिवलीला थांबले असावेत, असा अंदाज सर्वांनी केला आणि परत जाणाऱ्या होडीला त्या दोघांना कल्याणला घेऊन जायच्या सूचना देऊन सगळे पोटपूजा करायला लागले. आवरून ट्रेन पकडून घरी पोचलो. एक मोठ धाडस सगळ्यांनी नीटपणे पार पाडल होत, त्यामुळे सगळे खुशीत होते.

दुपारी घरी आल्यावर आम्ही सगळे मस्त ताणून झोपलो होतो. झोपेत आपल्या चारी बाजूंना पाणी आहे, असा भास होत होता. आम्ही सगळे गाढ झोपेत असताना दार वाजल. बघतो, तर माधव करंदीकर बाहेर उभा! तो ठरल्याप्रमाणे परतणाऱ्या होडीत बसून आला होता. त्याच्या चपला होडीतून पाठवायला आम्ही विसरलो होतो. त्यातल्या त्यात आमच घर जवळ, म्हणून मे महिन्याच्या त्या कडकडीत उन्हात अनवाणी चालत तो आमच्याकडे आला होता. 'आठवले काका घरी गेले का?’ असा प्रश्न विचारल्यावर तो बुचकळ्यातच पडला. ‘ते नव्हते माझ्याबरोबर, मी एकटाच तिथे थांबलो होतो’ ह्या उत्तरानं आम्ही थक्क झालो. आठवले काका त्याच्याबरोबर नव्हते, मुंब्र्यालाही पोचले नाहीत, मग गेले तरी कुठे? ह्या प्रश्नाने आणि त्यापाठोपाठ आलेल्या भीतीदायक शक्यतांनी आमचे चेहरे पांढरेफटक पडले. बाबा लगेच कपडे चढवून सुजाताकडे तिच्या वडिलांशी चर्चा करायला गेले. आठवल्यांच्या घरी हे सांगण अवघड पण आवश्यक होत.

धीर एकवटून हे दोघ त्यांच्या घरी गेले. त्यांच्या वयामुळे त्यांच्या घरून असले वेडे धाडसी प्रयोग करायला स्वाभाविक विरोध होता. त्यामुळे आजही ते ‘ज्येष्ठ नागरिक संघाच्या ट्रीपला जातोय’ अस सांगून बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांच्या सौ.ना किती तरी वेळ ते पोहायला आले होते, हे खरच वाटेना. कळल्यानंतर मात्र त्या हबकून गेल्या. त्यांचा मुलगा लगोलग पोलीस चौकीत जाऊन हरवल्याची तक्रार देऊन आला. जशी आमच्या ग्रूपमध्ये ही बातमी पसरली तस कोणालाच घरी स्वस्थ बसवेना आणि काय करायचं ते उमजेना. सकाळी आनंदाने फुललेले चेहरे आता केविलवाणे झाले होते. काही तासांपूर्वीच आपण जग जिंकल्याच्या आनंदात होतो, हे खरही वाटेना. विनाकारणच सगळे एकमेकांच्या घरी जाऊन बसत होते. रात्र झाली, तरी काही प्रगती नव्हती. कसेबसे चार घास खाऊन आम्ही झोपलो.

आठवल्यांचा एक मुलगा नोकरीनिमित्ताने बाहेरगावी होता. तो कल्याणला पोचला. आपले वडील असे पाहता पाहता नाहीसे झाले, ह्या कल्पनेने आठवले कुटुंबीय खूप काळजीतही होते, ह्यांनी आपल्या वडिलांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल असेल ह्या कल्पनेने त्यांना आमच्या ग्रुपचा रागही येत होता आणि आता कराव काय हेही सुचत नव्हत.

अश्या घटनाक्रमात सगळ्यांची डोकी जागेवर राहिली, तरच नवल होत. कल्याणसारख्या लहान गावात क्षुल्लक गोष्टींची घटना व्हायची आणि ती कितीतरी दिवस चघळली जायची. इथे तर काय एक जिवंत माणूस हवेत विरघळून जावा, तसा नाहीसा झाला होता. मोठी घटनाच होती ती. आधीच अस्वस्थ असलेल्या डोक्यात आग भडकवून देणारे लोक आसपास असतातच. आठवले कुटुंबीयांच्या डोक्यातली संतापाची आणि संशयाची आग चांगली धडधडून पेटली आणि मग सुरू झाला दमदाटी आणि वादावादीचा अध्याय!

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नीट जागे व्हायच्या आतच त्यांचे दोघे मुलगे आणि इतर आठ-दहा लोक घरी आले. ‘नक्की तुम्हाला काहीतरी माहीत असेल, ते सांगून टाका. त्यांना शेवटच कोणी आणि कुठे पाहिलं, सांगा’ वगैरे प्रश्नांची सरबत्ती जरा चढ्या आवाजातच सुरू झाली. पण दुर्दैवाने आम्हाला खरच काही माहिती नव्हती. आता प्रकरण हातघाईवर येणार की काय, अशी भीती वाटायला लागली. सुदैवाने कोणीतरी मध्यस्ती केली, आणि सामोपचाराने चर्चा सुरू झाली.

चोवीस तास उलटून गेले, तरी काही तपास न लागल्यामुळे आता काही आठवलेकाका जिवंत परत येणार नाहीत, ह्याची जवळपास सर्वाना खात्रीच झाली होती. सगळे प्रयत्न त्यांचा मृतदेहचा शोध घ्यायचा, ह्याच दिशेने चालू होते. कल्याण ते मुंब्रा ह्या टप्प्यात वल्हवायच्या होडीतून जाऊन शोध घ्यायचा, अशी एक कल्पना आली. कोणाला काहीच सुचत नसल्याने, सगळे काहीही करायला तयार होते. काही मेम्बर त्या होडीतून रवाना झाले. काही उलट दिशेने म्हणजे गांधारीच्या दिशेने गेले.

आदल्याच दिवशी आम्ही तिघे पोहून थकलो होतो आणि आई बाकीची हमाली करून थकली होती. पण आराम तर बाजूला राहिला, पण जेवण्याची सुद्धा पंचाईत झाली इतकी चौकशीला येणाऱ्यांची रीघ लागली होती. सगळ्यांना तीच तीच माहिती अगदी गळून गेलो होतो. दुपारपर्यंत दोन दिशांना गेलेल्या दोन्ही टीम हात हलवत परत आल्या. काहीही तपास लागला नाही. ती रात्रही भयानक अस्वस्थतेत गेली. आता हे सगळ संपणार कधी आणि कस? हेच समजत नव्हत. इतक्या भयानक अश्या मानसिक ताणाशी आमचा पहिलाच मुकाबला होता, आणि आम्ही सगळे चारीमुंड्या चीत झालो होतो.

तीन मेची सकाळ उजाडली. पुन्हा कालचीच तऱ्हा आज. लोकांचे तेचतेच प्रश्न, आमचे तेच निरुत्तर चेहरे, तीच काळजी आणि तीच हतबलता. बाबा आणि बाकीचे लोक ठिकठिकाणी चौकश्या करत हिंडत होते.आमच्या घराच्या रस्त्याकडेला असणाऱ्या खिडकीजवळ बसून मी उगीच बाहेर पाहत होते. डोक्यात काळजी आणि विचारांचं भिरभीर सुरूच होत. समोर एक रिक्षा थांबली, आणि त्यातून आठवले काका स्वतःच्या पायांनी खाली उतरले! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी जोरजोरात आईला हाका मारल्या. आई पळतच बाहेर गेली. चिखलाने बरबटलेले, अनवाणी, अंगावर फक्त पोहण्याचे कपडे असलेल्या काकांना आम्ही हाताला धरून घरात आणल. त्यांच्याकडे अर्थातच एकही पैसा नव्हता. रिक्षावाले आत येऊन ‘बाकीचे रिक्षावाले ‘वेडा दिसतोय’ म्हणून आणत नव्हते. म्हातारा माणूस दिसला, दया आली, म्हणून मी घेऊन आलो.’ अस म्हणाले. त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावे, हे कळत नव्हत. खरतर आनंदातिरेकाने घश्यातून शब्दच फुटत नव्हते. रिक्षाकाकांचे पैसे देऊन त्यांचे पुन्हापुन्हा आभार मानले.

आमच्या ग्रूपमधल्या एकाला जाऊन ही आनंदवार्ता सांगितली, तो पळतच बाकीच्यांकडे गेला. बाबा आणि इतर मोठे लोक गांधारी नदी पर्यंत जाऊन परत खाडीवर पोचले होते. त्याही दिवशी काहीच शोध लागला नसल्याने अगदी निराश होऊन ते खाडीवर बसले होते. तेवढ्यात त्यांना ही आनंदवार्ता कळली. ते सगळे जण घाईघाईने घरी आले. कोणीतरी जाऊन आमच्या नेहमीच्या डॉक्टरांना बोलावून आणल. आठवले काकांना डीहायड्रेशन झालं होत. डॉक्टरांनी घरीच सलाईन लावल.

प्रफुल्लीत चेहऱ्याने सगळा ग्रूप जमला. आठवले काकांच्या घरची मंडळी आली. काका जास्त काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतेच. कोणी फार काही चौकश्या केल्याही नाहीत. ते सुखरूप घरी आले, ह्यातच सगळ भरून पावल होत. अशक्तपणा कमी झाल्यावर ते त्यांच्या घरी गेले. आधीची महिनोन्महिने केलेली प्रॅक्टीस , मुंब्र्यापार्यान्तच पोहण आणि नंतरचे हे तीन भयंकर दिवस, ह्या सगळ्या अनुभवांनी आम्ही अगदी गळून गेलो होतो. एखाद्या खूप मोठ्या आजारातून उठल्यासारखी अवस्था झाली होती. किती तरी अस्वस्थ रात्रीनंतर आम्ही निर्घोर झोपू शकलो.

दुसऱ्या दिवशीपासून चर्चेच गुऱ्हाळ जोरात सुरू झालं. त्यातून माहिती अशी मिळाली की, डोंबिवलीनंतर पोहत असताना आठवले काका एकटे पडले. खूप थकवा आल्यामुळे मधल्या एका बेटावर थांबले. थकव्याने त्यांना तिथेच झोप लागली. जागे झाले, तोवर दुपार टळून गेली होती. सगळे जण आपली वाट पाहत असतील, काळजी करत असतील म्हणून त्यांनी पोहायला सुरवात केली खरी, पण ते फार लांब जाऊच शकले नाहीत. पुन्हा अश्याच एका बेटावर थांबले. रात्र झाली. अंगावर कपडे नाहीत, पायात चपला नाहीत, जवळ दातावर मारायला फुटका पैसाही नाही अश्या अवस्थेत त्या वृद्ध माणसाने अन्नपाण्याविनाच ती रात्र ढकलली. दूरवर मुंब्र्याच्या देवीच्या देवळातला उजेड तेवढा सोबतीला होता. दुसऱ्यादिवशीही असच काहीस झालं. आलमगड किंवा अश्याच काहीतरी नावाच्या गावात ते गेले, पण तिथे काही थारा मिळाला नाही. तीन तारखेला कसेबसे ते ट्रेन स्टेशनवर पोचले. ट्रेनने कल्याणला आणि रिक्षाने घरी आले.

अश्या रीतीने आमच्या ह्या मुंब्र्याच्या गोष्टीचा शेवट गोड झाला खरा, पण त्या घटनेचा एक चटका ग्रुपच्या जमून आलेल्या नात्याला लागला. एखाद्या सुरेख दिसणाऱ्या विणकामाचा एक धागा ओढल्यावर सगळी वीण विस्कटून जावी, तस काहीस झालं. कोणाची कोणाशी भांडणं, गैरसमज झाले नाहीत. पण आधी ज्या ओढीने सगळे खाडीवर यायचे, ती ओढ काहीशी कमी झालेली जाणवू लागली.

त्या सुमारासच कल्याणजवळ काही रासायनिक कारखाने सुरू झाले. त्यांनी बेदरकारपणे खाडीत सोडलेल्या पाण्याने खाडीच पाणी खूप प्रदुषित झालं. खाडीतले मासेही मरून गेले. पोहणाऱ्या काही जणांना त्या पाण्यामुळे त्वचेचा, डोळ्याचा त्रास होऊ लागला. त्याच दरम्यान ग्रूपमधल्या काही जणांचे विवाह झाले आणि ते संसाराला लागले, काही जण शिक्षण संपवून रोजीरोटीच्या मागे धावू लागले. आमची बारावी संपवून आम्ही अगदी थोडेच दिवस सुट्ट्या देणाऱ्या लांबच्या कॉलेजला जावू लागलो. एकूण काय ‘खाडीकाठी कल्याण आणि खाडीवर पोहणे आता पहिले उरले नाही’, ह्याची चरचरून जाणीव झाली. बाबांच्या खाडीवर पोह्ण्याने सुरू झालेला तो सोनेरी अध्याय माझं बालपण सोबत घेऊन संपून गेला..........

समारोप

ह्या पोहण्यात आम्ही कुठलेही विश्वविक्रम केले नाहीत. जग बदलून जाईल इतक महत्त्वाचही काही घडल नाही. एका शहरवजा गावातल्या लोकांनी त्यांच्या मजेसाठी केलेला हा उपक्रम, अस त्याच वस्तुनिष्ठ वर्णन होऊ शकेल. मग त्यात काय विशेष होत? म्हटल तर काही नाही आणि म्हटल तर खूप काही.

तेव्हा आमचं कुटुंब काय किंवा आमची मित्रमंडळी काय सगळे खाऊन-पिऊन सुखी ह्या गटात मोडत होतो. अगदी फी भरायला पैसे नाहीत किंवा उपाशी राहायला लागतंय अशी काही परिस्थिती नव्हती. पण वायफळ खर्चांना थारा नव्हता. पण ‘आपली मुलं कश्यात मागे पडू नयेत,’ अशी काहीशी जिद्दही होती. तेव्हा शक्य होत त्या असंख्य चांगल्या, आनंद देणाऱ्या छंदांची तोंडओळख आम्हाला आमच्या पालकांनी करून दिली.

लांब जाऊन पोहायला शिकता येत नाही का? खाडी आहे ना, तिथे शिका. सगळ्या कुटुंबाची तिकीटे काढून गायनाच्या कार्यक्रमांना जाण शक्य नाही का? सुभेदार वाड्याच्या गणपतीत उत्तमोत्तम कार्यक्रम होत असत, तिथे लहान असल्यापासून आवर्जून घेऊन जायचे. वातानुकुलीत रेल्वेच्या डब्यातले किंवा विमानाचे प्रवास तेव्हा स्वप्नातही नव्हते, पण ट्रेकिंग? त्याला तर काही अडचण नव्हती, मग त्याला सक्रीय उत्तेजन मिळायचं. मुलांची वाचनाची आवड ओळखून त्याला खतपाणी घातलं गेलं. किशोर, चांदोबा, रोजची वर्तमानपत्रे आणि वाचनालय ते कुटुंबाचे कायमचे सदस्य होते.

हे सगळ त्यांनी ठरवून, विचारपूर्वकच केल असेल, अशी नाही. पण झालं मात्र अस की ‘आनंद मिळवण्यासाठी खिशात खूप पैसे असावेच लागतात, अस नाही,’ हा धडा आम्ही लहान वयातच गिरवला. पैसा हे महत्त्वाचे साधन नक्कीच आहे, पण ते एकमेव साध्य होऊ शकत नाही, हे काहीश्या अमूर्त स्वरुपात मनावर बिंबल गेल.

ह्या आमच्या ग्रूपमध्ये मुलामुलींची संख्या विषम होती. मुली अगदी कमी आणि तरूण मुलांची संख्या भरपूर. मला सांगायला अभिमान वाटतोय की इतक्या दिवसात, कधीही कोणीही गैरवर्तन केल नाही. एकमेकांना ‘भाऊ-बहीण’ मानणे, इत्यादि फिल्मी प्रकार न करताही, ती मैत्री तेवढीच स्वच्छ, निर्मळ होती. एकमेकांची चेष्टा-मस्करी, चिडवा-चिडवी खूप चालायची, पण त्या मस्करीची कुस्करी होऊ नयेत, मर्यादा ओलांडली जाऊ नये, ही काळजी सगळ्यांकडून घेतली गेली. हा सगळा पोहण्याचा उपक्रम माझ्या आडनेड्या वयात झाला. तेव्हाच ही निर्मळ अशी मैत्री अनुभवायला मिळाल्यामुळे, पुढे सदैव जगात चांगली माणसच खूप असतात असा विश्वास निर्माण झाला. आपण सावध राहायला पाहिजे, हे तर नक्कीच. पण माणसातल्या चांगुलपणावरही भरवसा ठेवायला पाहिजे, अस ठामपणे वाटत राहील. आजच्या युगात महत्त्वाच्या ठरलेल्या ‘टीम बिल्डिंग’ चे धडेही ह्यात गिरवले गेले. कमी ताकदीच्या माणसाला प्रोत्साहन देऊन उत्तम कामगिरी करून घेणे, हे तिथे रोजच चालायच.

काळ कोणासाठीही थांबत नाही आणि काळाने कोणासाठी थांबूही नाही! उत्तमपणे चाललेला आमचा हा पोहण्याचा कार्यक्रम हळूहळू बंद पडला. कारणे काहीही असोत, त्याबद्दल विचार करण्यात काहीही अर्थ नाही. कोणताही उपक्रम, तो कितीही चांगला असला, तरी अविरत तर चालू शकत नाही. तशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल, पण तो उपक्रम कश्या पद्धतीने संपतो, ती पद्धत त्या उपक्रमाच्या मनात राहणाऱ्या आठवणी कडू की गोड हे ठरवते. चार डोकी एकत्र येणार आणि लांब जाणार, हा जगाचा नियमच आहे.

मग निदान दूर जाताना भांडण- गैरसमज-दुरावे नकोत. पुन्हा कधीतरी एकत्र येण्यासाठी, जुन्या आठवणींची उजळणी करण्यासाठी एकमेकांच्या मनात जागा असायला हवी. ह्या आमच्या खाडीच्या ग्रूपमध्ये सुदैवाने असच झालं! सगळ्यांच्या मनात गोड आठवणी राहिल्या. अजूनही अधूनमधून आम्ही सगळे कुटुंबियांसह भेटतो, हसतो, चिडवा-चिडवी करतो. जड पावलांनी पण प्रफुल्लीत मनाने आपापल्या उद्योगांना लागतो. पुढचे बरेच दिवस ह्या उर्जेने भरलेले असतात. एखादा उपक्रम सुरू कसा करावा, त्यात होता होईल तेवढी प्रगती कशी करावी आणि तो कसा चांगलेपणाने संपवावा, ह्या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्यात शिकलो.

वयाने वाढल्यावर सरावाच्या काठाची साथ सुटली. कधी संथ तर कधी खवळलेल्या पाण्यात उड्या घ्याव्या लागल्या. प्रत्येक वेळेला वेगात पुढे जाऊन पहिला क्रमांक मिळालाच, अस झालं नाही. कधी प्रवाहाबरोबर गेलो आणि कधी प्रवाहाविरुद्ध. कधी पाण्यातल्या न दिसणाऱ्या भोवऱ्यात अडकायला झालं, तर कधी नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटायला झालं. पण खाडीच्या पाण्यात मिळवलेल्या तरंगायच्या अनुभवाच्या शिदोरीवर निदान आपलं डोक पाण्याच्या वर ठेवून पलीकडचा काठ गाठता आला. कधी हा प्रवास आरामात झाला, तर कधी पार थकवणारा. पण पलीकडच्या काठावर नजर पक्की असली, की मग प्रवास कधीतरी नीटपणे संपतोच, हे शहाणपण खाडीत तरंगतानाच मिळाल.

असे हे आम्हाला जगरहाटीच्या अनोळखी पाण्यात पोहायला शिकवणारे, अविस्मरणीय ‘तरंगायचे दिवस’!!

Keywords: 

लेख: