आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Keywords: 

भाग १ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

हा ट्रेक घडायला तशी बरीच कारण घडली. एक कारण म्हणजे सिनेमातल्या हिरॉईनिंना जसा ‘आपले बालवय संपून आपण तारुण्यात प्रवेश केला आहे’, हा शोध अचानक लागतो, तसा मला आणि माझ्या मैत्रिणींना आपण आता चाळीशी पार केली आहे, असा महत्त्वपूर्ण शोध एका महान दिवशी लागला. आता आपल्याला ट्रेकिंग करायला थोडीच वर्षे राहिली, दरवर्षी एक तरी ट्रेक झाला पाहिजे, असा ठराव एकमताने मंजूर झाला.

अजून एक कारण म्हणजे माझा मुलगा तसचं बाकी मैत्रिणींची मुलं, ह्या सुट्टीत मोकळी होती. सगळ्यांची १० वी- १२ वी अशी महत्त्वाची वर्षे नुकतीच संपली होती. सुट्टीतले क्लासेस आणि तत्सम अडचणी नव्हत्या. त्यामुळे मुलांच्या आघाडीकडून एकदा सगळे मिळून ट्रेकला जाऊया, अशी मागणी जोर धरायला लागली.

आमची परदेशी वास्तव्यास असलेली बालमैत्रीण, अश्विनी, भारतात त्याच सुमारास सुट्टीवर येणार होती. ती सुट्टीवर आली की आम्ही नेहमीच भेटतो. पण तसा थोडाच वेळ. ह्यावेळेला ती आणि तिची मुलगी अनुजाही आमच्या बरोबर येणार, अस ठरल्यावर आम्ही मार्च महिन्यात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायच्या बेतात होतो. पुणे मनपाच्या इमारतीवर रोषणाई करण्याचा बेत, आचारसंहिता लागू झाल्यामुळे नाईलाजाने रद्द करावा लागला!!

एकदा हे सगळ ठरल्यावर नक्की कुठे जायचं हा विचार सुरू झाला. २०१३ च्या जून महिन्यात उत्तराखंड आणि परिसरात निसर्ग कोपला होता. बरेच ट्रेक-रूट बंद झाले होते. तिथे जाता येईल की नाही, ह्याबद्दल थोडी अनिश्चितता होती. आत्तापर्यंत केलेल्या भटकंतीत काही ट्रेक माझे तर काही मैत्रिणींचे झालेले होते. त्याच त्याच जागी पुन्हा जाण्यापेक्षा नवीन जागा पहावी, अस वाटत होत.
आमच्या ग्रुपमधले काही मेम्बर हिमालयातला ट्रेक प्रथमच करणार होते. अश्विनी तिच्या सुट्टीच्या भरगच्च कार्यक्रमात हा ट्रेक अक्षरशः कोंबणार होती. शाळेपासूनच्या मैत्रिणींबरोबर असे आणि इतके दिवस घालवण, ही कल्पना सगळ्यांसाठीच खूप छान असली, तरी तिचे सुट्टीचे दिवस मोजलेले होते. तिच्या माहेर-सासरचे लोकं तिच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असणार. त्यात किती दिवस ट्रेकमध्ये घालवायचे? हा एक महत्त्वाचा पण अवघड प्रश्न होताच.

ह्या सगळ्या कारणांमुळे हा ट्रेक थोडा सोपा असावा आणि फार दिवस लागतील असा नसावा, अस वाटलं. सोपा असला म्हणजे कँपवर पोचल्यावर गप्पा मारायला, पत्ते खेळायला वेळ आणि ताकद शिल्लक राहील, अस वाटत होत. हिमालयातल्या ट्रेकला बेस कँपला पोचायला आणि परतीला दोन-दोन दिवस जातातच. ते कमी करायचे, तर विमानाने दिल्लीपर्यंत आणि रात्रीचा ट्रेनचा प्रवास, हीच आयडिया करायला लागणार होती. एकदा हे नक्की झाल्यावर बऱ्याचशा जागा आपोआपच रद्द झाल्या. शेवटी चर्चांच्या असंख्य फेऱ्या पार पाडून उत्तराखंडमधील ‘पिंढारी ग्लेशियर’ ही जागा नक्की झाली. तो रुट काहीसा बदलून पुन्हा सुरू झाला आहे, अस समजल्यामुळे सगळे उत्साहाने तयारीला लागले.

खरं तर आम्ही काय पहिल्या ट्रेकला जात नव्हतो. पण इतके दिवस गेलो होतो ते यूथ हॉस्टेल किंवा तत्सम संस्थांच्या, ज्याला ट्रेकच्या भाषेत ‘सर्व्हायव्हल’ ट्रेक्स म्हणतात अश्या ट्रेकना. तिथे आपल्या बाजूने ठरवा-ठरवी करायला फारशी संधी नसते. त्यांच्या बॅचेस आणि वेळापत्रक ठरलेलंच असत. आपण आपल्या सोयीची बॅच निवडायची, पैसे भरून आपली जागा पक्की करायची, की संपल. फक्त घर ते बेस कॅम्प आणि परतीच्या प्रवासाची जुळणी करावी लागते.

इतकचं ठरवायचं असल, तरी त्या निमित्ताने आम्ही असंख्य पर्यायांचा विचार करतो आणि त्याबद्दल भरपूर चर्चाही! ट्रेन की विमान, ही ट्रेन की ती, चेअरकार की स्लीपर, एक न दोन.. बर, कोणाची कशाला हरकत असते, असही नाही. थोडे जास्त पैसे खर्च झाले किंवा ह्या सगळ्यात काही गडबड झाली, तरी तक्रार नसते. पण चर्चा झाल्या नाहीत, तर आम्हाला काही मजा येत नाही, हे मात्र खर!!

बऱ्याच चौकशा केल्यावर ह्या ट्रेकला कुमाऊँ मंडळ विकास निगम बरोबर जायचं, अस ठरल. युथ हॉस्टेल्सपेक्षा महाग , पण सोयी जास्त. राहण्याच्या, खाण्या-पिण्याच्या सोयी चांगल्या. ट्रेकिंगच्या भाषेत चैनच. अशाही संस्था असतात, हा शोध तसा नवीनच होता. आपला ४-५ लोकांचा ग्रूप असला, तरी राहणे, जेवण तसेच सामानासाठी पोर्टर किंवा खेचर, गाईड ही सगळी सोय ह्या संस्थेमार्फत केली जाते. ह्या प्रकाराच्या ट्रेकला 'टी-हाऊस' ट्रेक म्हणतात, अशी आमच्या ज्ञानात कोणीतरी भर घातली.

सुरवातीला ओळखीतल्या, नात्यातल्या बऱ्याच लोकांनी ‘आम्ही येणार’ अस भरघोस आश्वासन दिल होत. पण काहीना काही कारणांनी एक-एक जण गळत गेले. कधी १५ तर कधी ७ अश्या बेरजा वजाबाक्या होत होत अखेर आमचा ९-१० लोकांचा ग्रुप पक्का झाला. त्यात चाळीसच्या वरच्या चार बायका आणि वीसच्या खालची पाच मुल असा ग्रुप पक्का झाला. त्यातले सात मेम्बर पुण्यातले आणि दोन अमेरिकेतले होते!

ह्या ट्रेकमध्ये तर गोष्टी ठरवायला आम्हाला अमाप संधी होती. कुमाऊँ वाल्यांच्या काही ठरलेल्या बॅचेस आणि वेळापत्रक नव्हत. आम्ही म्हणू त्या तारखा, आम्ही ठरवू ते वेळापत्रक. अर्थातच चर्चा करायला प्रचंड वाव होता. कधी भेटूया हे ठरवायला भेटणे इत्यादी गमतीदार प्रकार सुरु झाले. घरी / ऑफीसमध्ये / रेस्तराँमध्ये अश्या चर्चांच्या फेऱ्या झाल्या. मुलांच्या परीक्षांच्या, आमच्या रजांच्या, अश्विनीच्या सुट्टीच्या वेळापत्रकाची असंख्य वेळा उजळणी झाली. कामाच्या मिटींगमध्ये पुढचं काही नियोजन करताना, ‍त्यातल्या काही तारखांचा उल्लेख झाला, तर ‘हो, म्हणजे मुक्ताची परीक्षा संपेल, त्या दिवशी बांधकाम संपेल’ अश्या गोष्टी मनात येऊन, पुढच्या कामाकडे लक्ष लागेना! ते उल्लेख अनवधानाने क्लायेंट किंवा सहकाऱ्यांसमोर होऊ नयेत, अशी काळजी घ्यायला लागत होती!!

मला हा ट्रेकच्या प्लॅनिंगचा काळ अगदी मनापासून आवडतो. थोड्याच दिवसात आपलं नेहमीचं ‘उठा- स्वैपाक करा-तयार व्हा-ऑफिसला जा-स्वैपाक करा-झोपा’ हे रुटीन सोडून लांब जायचं असत. तिथे ना मोबाईल चालत, ना टीव्ही असतो. त्यामुळे दिवसभर चालणे आणि नंतर गप्पा मारणे, हाच करमणुकीचा कार्यक्रम! जवळच्या पाठपिशवीत असेल, तेवढीच आपली संपत्ती. उठायचं आणि चालायचं, जेवायचं आणि झोपायचं. साधा-सरळ कार्यक्रम. सतत उद्याच्या काळज्या, पुढच्या तयाऱ्या करून गळून गेलेल्या मनाला अगदी भरपूर विश्रांती मिळणार असते. त्या आनंदात आधीपासूनच अगदी मोकळ-ढाकळ वाटत असत. ट्रेकच-ट्रेनच नुसत बुकिंग चालू असतानाच तिकडची स्वप्न पडायला लागतात.

ह्या वेळी सोबतही फार छान होती. समजायला लागायच्याही आधीपासूनच्या मैत्रिणी, त्यांची मुलं आणि माझा मुलगा बरोबर होते. म्हणजे माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही होते! ज्यांच्या सहवासात कुठलाही आव आणावा लागत नाही, हिशेब करावे आणि द्यावे लागत नाहीत, असा हा ग्रुप होता. रोजच्या धकाधकीत एका गावात राहूनही मैत्रीणीना भेटायला जमत नाही. मग सातासमुद्रापलीकडे गेलेल्या मैत्रिणीला किती भेटता येणार? ह्या निमित्ताने १०-१२ दिवस सतत बरोबर राहता येणार!! ह्या कल्पनेने झालेल्या आनंदाने अगदी वेडावून टाकलं होत. त्या मैत्रिणींच्या सहवासात परत एकदा लहान व्हायची सुवर्णसंधी होती.

पृथ्वीप्रदक्षिणा करायची असेल तरी पडू शकणार नाहीत, असे असंख्य प्रश्न आम्हाला पडायचे. मग फोनाफोनी. तेवढ्याने नाही भागलं, तर शंकासमाधान करण्यासाठी कुमाऊँच्या ऑफीसमध्ये फेरी! आम्ही ट्रेकला निघाल्यावर ‘गेल्या ह्या बायका एकदाच्या,’ ह्या आनंदात कुमाऊँच्या पुणे ऑफिसने नक्की पार्टी केली असेल. अस करता करता शेवटी एक-एक करत सगळी बुकिंग, रिझर्वेशन्स झाली, सर्वसाधारणपणे सगळ्या शंकांच निरसन झालं आणि सात जूनला आमचा हा नवरापात्र-विरहीत ट्रेक सुरु होणार हे नक्की झाल!

Keywords: 

भाग २ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

पुणे - मुंबई सेंट्रल - दिल्ली - काठगोदाम (७ आणि ८ जून २०१४)

सात जूनला सर्व पुणेकर मंडळी स्वारगेटला जमली. प्रवासाला जाणारे जास्त आनंदात की सोडायला आलेले, ह्याचा निर्णय होत नव्हता! भारतात एशियाड झाल्याला आता तीस वर्षे होऊन गेली, तरी राज्य परिवहनने ‘एशियाड बसच्या’ स्वरुपात ती स्मृती सांभाळून ठेवली आहे. तश्या एशियाड बसमध्ये आमचं रिझर्वेशन होत. सिंहगड एक्प्रेसच तिकीट डेक्कन एक्सप्रेसला वापरलेलं रेल्वेवाल्यांना आजिबात, मुळीच, कधीही चालणार नाही. पण रा.प. वाली मंडळी दयाळू असतात. साडेअकराच्या बसचं तिकीट काढलेलं होत. पण साडेअकराला इथे जी बस उभी होती, ती वेळापत्रकाप्रमाणे पावणेअकराची होती. मास्तरांनी आम्हाला त्या बसमध्ये आमच्याच सीटवर बसून घ्यायला सांगितलं!! कुठल्यातरी बसचं तिकीट काढलंय ना, झालं तर मग.. असा उदार दृष्टीकोन ठेऊन त्यांनी आमची व्यवस्था केली.

बसची रिझर्वेशन्स मी केली होती. स्वारगेटला येऊन मी समजा ‘अग, मी तिकीट घरीच विसरले’ असं म्हटल असतं, तर मैत्रीणी ‘हो का, असुदे. आपण परत काढू तिकीट.’ असं म्हटल्या असत्या ह्याची पूर्ण खात्री होती, इतका मोकळेपणा वाटत होता. पुढचे दहा-बारा दिवस कितीही गोंधळ, बावळटपणे करायला मोकळीक होती. शहाण्यासारखं, जबाबदारीने वागायचं ओझं नसल्याने हलकं-मोकळं वाटत होत!

पुणेकर सोडून उरलेली मंडळी ठाण्याहून यायची होती. कितीही आधीपासून तयारी केली, तरी बसमध्ये बसल्यावर आठवणींचे कोंब मेंदूला फुटतातच. मग फोनाफोनी झाली. जास्तीचे सेल, क्लोरिनचे ड्रॉप्स, सुईदोरा, कॅरीबॅग्ज अश्या असंख्य ऑर्डर गेल्या. त्या दोघी ठाण्याहून निघाल्या, अस कळल्यानंतर ऑर्डर थांबवाव्याच लागल्या.

मुंबई सेंट्रलला अश्विनी व तिची कन्या भेटल्या. अश्विनी तब्बल दोन वर्षांनी भेटत होती. त्यामुळे भरतभेटीसारखा एक छोटासा कार्यक्रम झाला! रेल्वेच्या कृपेने सर्वांची रिझर्वेशन्स एकाच डब्यात आली होती. नाहीतर सांस्कृतिक सरमिसळ व्हावी व नवीन लोकांच्या ओळखी करून घ्यायला उत्तेजन मिळाव म्हणून रेल्वेवाले शक्यतो ग्रूप मोडून सगळ्यांना वेगवेगळ्या डब्यात नाहीतर कंपार्ट‌चमेंटमध्ये तरी विखरून टाकतात.

सर्व मुल एका कंपार्ट‌ मेंटमध्ये आणि महिला मंडळ दुसऱ्या कंपार्ट‌तमेंटमध्ये अशी व्यवस्था झाली. राजधानीने वेग घेतला. आमच्याही साठलेल्या गप्पा जोरात सुरू झाल्या. चौघींपैकी आम्ही तिघीजणी एका शाळेतल्या, एका वर्गातल्या, एका गल्लीतल्या मैत्रिणी. कॉमन मित्र-मैत्रिणी, ओळखीचे प्रचंड लोकं. ह्या गटातली नसलेली मैत्रीण होती मंजिरी. ती कंटाळून जाणार, ह्याची गॅरेंटी होती. त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही तिघींनी तिला कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूल, कल्याण, येथील माजी विद्यार्थी संघाचं ‘मानद सदस्यत्व’ समारंभपूर्वक दिल! संपूर्ण ट्रेकभर आम्ही तिला शाळेतल्या इतक्या स्टोऱ्या ऐकवल्या, की आता तिला कधी आमच्या शाळेतलं कोणी भेटलं, तर हीच त्यांना चार गमतीच्या गोष्टी ऐकवू शकेल!

मुंबईतील एकेक स्टेशन्स मागे जात होती. कॉलेजला असताना हा नेहमीचा प्रवास होता. त्या आठवणी ताज्या होत होत्या. हल्ली वेळेच्या अभावी बरेच प्रवास हवाई मार्गानीच होतात. पुष्कळ वर्षांनी रेल्वेचा लांबचा प्रवास घडत होता. पाय लांब करून बसणे, बाहेरची पळती दृश्य पाहणे, सगळ्यांची रिझर्वेशन असली तरी बऱ्याचशा जागा रिकाम्या ठेवून सगळ्यांनी थोड्या जागेत दाटीवाटीने बसणे, ही सुखं विमानप्रवासात मिळत नाहीत. ह्या सगळ्याची मजा घेत होतो. वसई सुजाताच्या मामाचं गाव आणि डहाणू माझ्या मामाचं गाव. त्यामुळे हा प्रवास नेहमी ‘मामाच्या गावाचा’ प्रवास असायचा. वसईच्या मोठ्या, रुंद पात्र असलेल्या खाड्या पार केल्या, की डहाणू जवळ आलं अस वाटत असे. पण आता सुजाताचाही मामा नाही आणि माझाही. संपलच ते सगळं....

प्रवासाचा हा पहिलाच टप्पा होता, अजून पुढे बराच पल्ला गाठायचा होता. ती थोडी हुरहूर असतेच. पण तरी मस्त वाटत होत. अश्विनीशी आत्तापर्यंत फोन किंवा मेलवरच संपर्क झाला होता. तिला पुढची माहिती देणे व तिच्या प्रश्नांना थोडक्यात किंवा सविस्तर उत्तरे देणे हा एक कार्यक्रम झाला. राजधानीत खाण्या-पिण्याची चैन असल्यामुळे मेथीचे पराठे, बटाट्याची भाजी, गोड शिरा, दहीभात हे प्रवासी जेवणाचे डबे बरोबर घेणे, ते बॅगेत सांडणे, पदार्थ उरणे; इत्यादी नेहमीच्या (अ)यशस्वी कार्यक्रमातून सुटका झाली होती. राजधानीवाले दर अर्ध्या तासाने काहीतरी खायला आणून देत होते. आम्ही इतकं सगळं खाऊ नाही शकलो, तरी पाच तरूण आणि अत्यंत खादाड मुलं बरोबर होती. त्यांना ‘पोट भरल्याने खाता न येणे’ असले क्षुल्लक प्रश्न पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी मजा करून घेतली.

एव्हाना एकमेकांच्या मोबाईलची माहिती घेऊन झाल्यामुळे मुलांनी उनो खेळणे सुरू केलं होतं. त्यांच्या हसण्याच्या आणि बोलण्याच्या टीपेच्या आवाजामुळे वैतागून राजधानीतून आपल्याला नक्की कुठच्या स्टेशनवर उतरवून देतील? अशा पैजा आम्ही लावत होतो. ह्या मुलांना न्यायचं असेलं, तर दुरांतो इतकी चांगली (मध्ये थांबतच नसल्याने!) दुसरी गाडी नाही, ह्यावर आमचं एकमत झालं.
सहप्रवासी सहनशील असल्याने आम्हाला दिल्लीपर्यंत प्रवास करता आला! आम्ही ह्या राजधानीतून त्या राजधानीत पोचलो. पुढची ट्रेन पाच तासांनी होती. हजरत निजामुद्दीन ते पुरानी दिल्ली असा एक टप्पा पार पडायचा होता. आमचे मुंबईकर संस्कार उफाळून आल्याने, तो प्रवास आम्ही लोकल ट्रेनने करायचा ठरवला.

मुंबईतल्या लोकांना तिथल्या(च) लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असते, असा अभिमान असतो. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे, की त्यांनी दिल्लीच्या लोकलने एकदातरी प्रवास करून पहावा. ह्या प्रवासाची चव वाढवण्यासाठी मीठमसाला म्हणून आमच्याबरोबर प्रत्येकी दोन असे सामानाचे डागही होते. मग काय विचारता, तुंबळ गर्दीत आम्ही मनात ‘हरहर महादेव’ असा गजर करून आत शिरलो. ती ट्रेन ‘पुरानी दिल्ली’ स्टेशनला जाते की नाही, ह्याबद्दलच पब्लिकला खात्री नव्हती. शेवटी बरेच एका वाक्याचे, सविस्तर स्पष्टीकरणाचे असे निरनिराळे प्रश्न सोडवून, ट्रेन ‘पुरानी दिल्ली’ला जाणार असा निर्णय झाला. ट्रेनमध्ये पाण्याचे पाऊच, खोबऱ्याचे तुकडे, तळलेले पापड असे चमत्कारिक पदार्थ विकायला येत होते. अश्या अर्ध्या तासाच्या रोमांचकारी प्रवासानंतर आम्ही पुरानी दिल्लीच्या फलाटावर ढकलले गेलो.

सगळीकडे प्रचंड गर्दी होती. भीषण उकाडा. माणसं, प्राणी आणि वस्तूंच्या वासाच्या मिश्रणातून तयार झालेला रेल्वे स्टेशनवरचा एक खास भारतीय वास. असा बराच वेळ काढायचा होता. प्रतीक्षागृहात मुंग्यांना सुद्धा आत शिरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, इतकी गर्दी होती. मग आम्ही एका वातानुकुलीत खान-पान गृहाला आमचं प्रतीक्षागृह बनवलं! एका वेळेला एकाने एकच डीश मागवायची. ती संपली की दुसऱ्याने. अस करत तो कंटाळवाणा वेळ ढकलला.

पुढची काठगोदामपर्यंत जाणारी ट्रेन एकदाची फलाटाला लागली. त्याच्या कुर्सी-यान मध्ये स्थानापन्न झालो. बाहेरची दृश्य झरझर बदलत होती. आता मोठ्या इमारती मागे पडून बसकी घर, शेत दिसत होती. हिमालयाचा मात्र अजून पत्ता नव्हता. कधी एकदा ह्या त्रस्त करणाऱ्या उकाड्यातून गारव्यात जातोय, अस झालं होत. रात्री उशीरा काठगोदामला पोचलो. हे त्या मार्गावरील शेवटचे स्टेशन आहे. कुमाऊँ मंडळाचा माणूस इतक्या रात्री आम्हाला घ्यायला रेल्वे स्टेशनवर आला होता. त्याने हसतमुखाने ‘नमस्ते’ म्हणत आमचे मनापासून स्वागत केले आणि त्याचा तो हसरा, उत्साही चेहरा पाहून आपण पुणे, मुंबई, दिल्ली सगळं मागे टाकून देवभूमी उत्तराखंडात पोचल्याची खात्री वाटली!

Keywords: 

भाग ३ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

काठगोदाम – बागेश्वर – लोहारखेत (९ जून २०१४)

२०११ मध्ये कैलास-मानस यात्रा केली तेव्हा कुमाऊँ मंडळाच्या ह्याच गेस्ट हाऊसमध्ये जाता-येता दोन्ही वेळा जेवायला थांबलो होतो. जाताना यात्रा कशी होईल ह्या विचाराने काळजी दाटून आली होती आणि येताना ‘आज यात्रेचा शेवटचा दिवस’ ह्या कल्पनेने गलबलायला झालं होत. परत येताना एका छोट्या पण अत्यंत हृद्य कार्यक्रमात यात्रा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे इथेच मिळाली होती. त्याच जागी तीन वर्षानंतर आले होते. यात्रेच्या, सहयात्रींच्या आठवणी येत होत्या. जागा तीच असली, तरी ह्या वेळेला ग्रूप, जायची जागा आणि प्रवासाचा मूड.. सगळच वेगळ होत.

आज आम्हाला बागेश्वर पर्यंत जीप किंवा बसने जायचं होत. तिथे पोचल्यावर कुमाऊँ मंडळाच पॅकेज सुरू होणार होत. तिथे पोचल्यावर दुपारच जेवण आणि जास्तीच सामान जमा करणे हा कार्यक्रम उरकला, की पुढे जीपने ‘सॉंग’ ह्या गावापर्यंत जायचं होत. तिथून आमची चालायला सुरवात होणार होती. तीन किलोमीटर चालल्यावर लोहारखेत ह्या गावी मुक्काम होता.

रात्री सगळी बच्चा कंपनी ‘लवकर उठवू नका’ अस (रोजच्या सारखच) सांगून झोपली होती. पण प्रवास आणि ट्रेकच्या उत्सुकतेने कोणी फार उशीरापर्यंत झोपू शकले नाहीत. भराभरा जागे होऊन आणि पुढे बाथरूम्स कधी आणि कश्या मिळतील, ह्याची खात्री नसल्याने अंघोळी उरकून सगळे चकाचक तयार झाले.

बसअड्डा गाठतो, तर बागेश्वरला जाणारी बस आमची वाटच पाहात असल्यासारखी थांबली होती. बसच्या वाहकाने घाईघाईने आमच सामान टपावर चढवल सुद्धा. लगेच बस मिळाल्यामुळे आम्ही अगदी आनंदात आतमध्ये शिरलो. मात्र बसायला जागाच दिसेना. कंडक्टरने जादू करून त्या गच्च भरलेल्या बसमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी, मागे अश्या विविध ठिकाणी जागा निर्माण केल्या आणि आम्ही तिथे स्थानापन्न झालो. आमच्या नऊ जणांच्या गँगमधे हमखास बस लागणारे, आजिबात बस न लागणारे, आणि वेळ-प्रसंग बघून ह्या पार्टीतून त्या पार्टीत जाणारे ‘आयाराम-गयाराम’ असे तीन प्रकार होते. पहिल्या गटातल्या लोकांना सन्मानाने चांगल्यात चांगल्या जागा (आणि प्लास्टीकच्या पिशव्या!!) दिल्या गेल्या. तिसऱ्या गटातले लोक ‘मन्नू, तेरा हुआ, अब मेरा क्या होगा,’ अशा विचारात केविलवाणे चेहरे करून बसले होते. दुसऱ्या गटातले लोकं आरामात उर्वरीत जनांचे आंबट चेहरे बघत होते!

थोड्याच वेळात सपाट रस्ता संपून वळणा-वळणाचे पहाडी रस्ते सुरु झाले. ही बस अगदी ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ ह्या प्रकारातली असल्याने दारोदार थांबून प्रवासी चढत- उतरत होते. खच्चून भरलेली बस, डिझेल आणि अन्य वास, गैरसोयीच्या सीट, सगळच नकोनकोस होत. आम्हाला पुण्यात कळलं होत, की काठगोदाम ते बागेश्वर ४-५ तास लागतात. जेवायच्या वेळेपर्यंत पोचू, अस वाटत होत. निघताना वेळेवर निघालोही होतो. पण बस फारच हळूहळू जात होती. दुपारपर्यंत पाच तास प्रवास झाला, तरी आम्ही फक्त अल्मोड्यापर्यंतच आलो होतो. म्हणजे साधारण अर्धच अंतर पार झाल होत.

उशीर होणार, अस लक्षात आल्यावर बागेश्वरला फोन केला, तर त्या लोकांनी ‘टॅक्सीने न येता बसने आल्याबद्दल आम्हाला रीतसर मूर्खात काढल. किती वेळ लागेल, ही चौकशी केली नाही, हे चुकलच होत आमच. त्यातून बस लागणाऱ्या मंडळींची अवस्था बिकट झाली होती. शेवटी सर्वानुमते आम्ही मधल्या एका गावात बसमधून उतरलो, आणि टॅक्सी करून बागेश्वरला पोचलो. बसचं तिकीट बागेश्वरपर्यंत काढलेलं होत. वर टॅक्सीचे वाढीव पैसे देऊन आम्ही आमची आधीच बाळसेदार असलेली अक्कलखाती अजून जरा गुटगुटीत केली!!

ठरलेल्या वेळेपेक्षा बराच उशीर झाला होता. आता आणखी हे लोक काय काय ऐकवणार? अशी भीती वाटत होती. पण तस काही झालं नाही. आमच्या बरोबर गाईड म्हणून येणार असलेले देवेन सर तिथे कधीचेच आलेले होते. त्यांनी भराभर सूत्र हातात घेतली. त्यांनी आम्हाला सगळ्यात आधी जेवून घ्यायला लावल. मग जमा करायचं सामान देणे, हे काम उरकलं. ‘आता सॉंग पर्यंत न जाता सरळ लोहारखेतपर्यंत जीपनेच जाऊया. काळोखात चालायला त्रास होईल’ असा सोपा पर्याय त्यांनीच सुचवल्याने आमचं टेन्शनच संपलं!

दोन जीपमध्ये आम्ही सगळे, आमचं सामान आणि शिधा असे लोहारखेतकडे निघालो. संध्याकाळ होत होती. जिकडे तिकडे डोंगर रांगा दिसत होत्या. कैलास यात्रेनंतर तब्बल तीन वर्षांनी हिमालयाची गळाभेट होणार होती. त्या दरम्यान एकदा सिक्कीमला फिरायला गेले होते. पण तो हिमालय नुसता दिसला होता, भेटला नव्हता. हिमालयातल्या नद्यांचे आवाज ऐकणं, तिथली शांतता मनात-कानात साठवणं, टुरीस्टी स्पर्श नसलेला निसर्ग डोळ्यात भरून घेणं, म्हणजे हिमालयाची खरी भेट. ती भेट उद्यापासून होणार होती.

पहाडातल्या वेड्यावाकड्या, अरुंद रस्त्यांवरून आमच्या जीपचा चालक वेगात गाडी चालवत होता. जोडीला शेजारच्या देवेन सरांशी गप्पा, मोबाईलवर बोलणेही चालू होतच! ड्रायव्हरच्या उजव्या हाताशी येईल अशी एक छोटीशी घंटा गाडीत बसवलेली होती. रस्त्यावर देऊळ दिसलं, की तो इथे घंटा वाजवायचा. व्हीलवरचे हात सोडून नमस्कार करण्यापेक्षा ही कल्पना नक्कीच बरीच सुरक्षित होती!

एखाद्या क्रॉसकंट्री ड्रायव्हरला लाजवेल अश्या वेगाने आणि कौशल्याने गाडी चालवत त्याने आम्हाला लोहारखेतला पोचवल. हा कँप अतिशय देखणा आहे. लांबवरचे डोंगर, दऱ्या दिसाव्यात अश्या बेताने ह्याची जागा योजली आहे. काळोख झाला होता. चंद्र उगवला होता. पौर्णिमा जवळ होती. कृत्रिम दिव्यांच जग आम्ही आता मागे टाकल होत. दृष्टीपथात येणारे सगळे डोंगर चंद्रप्रकाशात मऊ, मवाळ दिसत होते. रात्र बरीच झाली. उद्याला चालायला सुरवात करायची आहे, हा विचार डोक्यात होताच. त्यामुळे नजरबंदी करणारा तो नजारा डोळ्यात साठवून आम्ही उबदार खोल्यांमध्ये गुडूप झालो.

लोहारखेत – धाकुरी (१० जून २०१४)

ज्या साठी गेले २-३ महिने आम्ही अट्टाहास करत होतो, तो ट्रेकचा दिवस एकदाचा उजाडला! इतके दिवस ‘कधी हा दिवस उजाडतोय’ अशी आतुरतेने वाट बघितली होती. पहाटे उठून पुन्हा तशीच वाट बघितली, पण सूर्याची! कँपची जागाच इतकी छान होती, की बस. रात्रीच चंद्रप्रकाशातल दृश्य जास्त छान की पहाटेच कोवळ्या उन्हातल? इतकाच प्रश्न पडू शकत होता.

काल रात्री डोंगरांच्या फक्त बाह्यरेषा दिसल्या होत्या. आता दिवसाच्या उजेडात त्यांची प्रचंड उंची डोळ्यात भरत होती. ह्या कँपपर्यंत गाडीरस्ता आहे, त्यामुळे म्हातारपणीही इथे पोचता येईल. हे लक्षात घेऊन आम्ही, अजून वीस-पंचवीस वर्षांनी मैत्रिणींच संमेलन ह्या जागी करायचं, असा निर्णय पहाटेला घेऊन टाकला. ह्या पहाटेची स्वप्ने खरी होतात, अस म्हणतात. पहाटेच्या तीव्र इच्छा खऱ्या होतील, अशी आशा आहे!!

ह्या ट्रेकला जी बरीच चैन होती. राहण्यासाठी सुसज्ज खोल्या होत्या. जेवायला सुग्रास जेवण होत. जेवल्यावर ताट-वाट्या-डबे घासायचे नव्हते. जड सॅक आपण उचलायची नाही ही सगळ्यात मोठी चैन होती. प्रत्येकी १० किलो सामान खेचरावरून जाणार होत. त्यामुळे सगळ्यांनी आधीच ‘पोर्टर सॅक’ आणि ‘डे सॅक’ वेगळ्या करून ठेवल्या होत्या. चालायच्या अंतराचे आकडेही फार घाबरवणारे नव्हते.

सकाळची सगळी आन्हिके आवरून आम्ही चालायच्या तयारीने खाली आलो. देवेन सर तयारच होते. महाराष्ट्रातून पिंढारीला बरेच ट्रेक ग्रूप जातात. देवेन सर अशा कितीतरी ग्रूप बरोबर गाईड म्हणून गेले होते. त्यामुळे त्यांना जुजबी मराठी येत होत.

त्याच कँपवर कलकत्ता इथून आलेला ग्रुप मुक्कामाला होता. रात्रीच्या गप्पांमध्ये तो ग्रुपही हाच ट्रेक करणार असल्याच समजलं. त्या सगळ्यांनी एकसारखे पिवळे टी-शर्ट घातले होते. त्या ग्रूपच नामकरण आम्ही ‘पिवळा ग्रूप’ अस केलं. खरतर ह्या नावात काहीही कल्पनाशक्ती लढवली नव्हती. पण देवेन सरांना हे नाव फारच आवडलं. ते सगळ्यांना ‘हमारे बच्चोंने क्या बढिया नाम रखा है ‘पिवळा ग्रूप’..अस हसत ज्याला-त्याला सांगायचे.

सगळ्यांचा नाश्ता, चहा झाला. पाण्याचा बाटल्या भरणे हा एक रोमांचकारी कार्यक्रम झाला. रोमांचकारी का? ते पुढे येईलच. ट्रेकिंगचे बूट, टोप्या, गॉगल्स सगळा साजशृंगार करून झाल्यावर आम्ही चालायला सुरवात केली.

ट्रेकिंग ग्रूप बरोबर येणारे गाईड लोकं, आपण चढून चढून अगदी मरायला टेकू, असा चढ असला, तरी कध्धीही, चुकुनही तसं सांगत नाहीत. ‘शुरूमें थोडीसी चढाई है, उसके बाद तो कँपतक ढलानही ढलान है’ असं तोंडभर आश्वासन मिळालं होत. आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हतो. ‘सोप्पच तर आहे ना, मग अगदीच सावकाश येतो’ असं म्हणून चालायला सुरवात केली. आजचा टप्पा धाकुरीपर्यंत होता. नऊ किलोमीटर चालायचं होत.
सगळी मुलं झपाझप चालत कधीच पुढे निघून गेली. त्यानंतर रोज चालताना अशीच विभागणी व्हायची. मुलं पुढे आणि आम्ही मागे. ‘बच्चे लोग और दिदी लोग’ असं आमचं नामकरणही झालं होत.

मागचे दोन दिवस एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसणे आणि वेळ घालवायला खात राहणे, असे गेले होते. आता चालताना शरीर आनंदाने कुरकुरत होत. सुदैवाने हवाही चांगली होती. पाउस नव्हता. अगदी कडक, चटके देणार ऊनही नव्हतं. आसपास सुरेख अशी झाडी होती. मोकळ्या, स्वच्छ, प्रदुषणमुक्त हवेत श्वास घेतानाही किती चांगल वाटत. हिमालयातली ही करकरीत हवा आणि नीळभोर आकाश मला अतिशय आवडतं. इथली हवा नुकतीच तयार झाल्यासारखी, अस्पर्श असावी अस वाटत राहत!

चढाच्या रस्त्यामुळे मधेमधे थांबावं लागत होत. आमच्यासारख्या लोकांची सोय म्हणून ठीकठीकाणी ‘रेसटिंग पिलेष’ बांधल्या होत्या. तिथे नाही थांबलं, तर बांधणाऱ्यांना किती वाईट वाटेल, अशा विचाराने आम्ही प्रत्येकच ठिकाणी पाच मिनिटे टेकून त्यांना दाद देत होतो!

काही ट्रेकरूटवर ट्रेकर्स, स्थानिक लोकं ह्यांची वर्दळ असते. लहान लहान वस्त्या, गावे असतात. पण आजच्या रस्त्यावर असं काहीही नव्हत. आमचा ग्रूप आणि पिवळा ग्रूप इतकेच लोकं होतो. आम्ही ‘दिदी लोग’ जरी सावकाश चालत होतो, तरी पिवळ्या ग्रुपच्या पुष्कळ अंतर पुढे निघून गेलो होतो. डोळ्यावर गुंगी यावी, इतकी निरव शांतता होती. पक्ष्यांची शीळ ऐकू येत होती. लहान लहान झरे-ओढे वाहत होते. थोडक्यात म्हणजे अगदी यश चोप्रांच्या चित्रपटात शोभून दिसेल अशी जागा होती.

कधी अगदी गर्द झाडी, तर कधी हिरवीगार गवताची कुरणं असा सुरेख रस्ता होता. हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा डोळे तृप्त करत होत्या. सपाटी मात्र नव्हती. चढ होता. पण तोही फार थकवणारा नव्हता. आम्ही फार मागे तर पडत नाहीये ना, ही खात्री करायला देवेन सर अधूनमधून थांबत होते. आम्ही दिसलो, की पुन्हा भराभर चालून मुलांना गाठत होते.

आज माहितीपत्रकाप्रमाणे आम्हाला नऊ किलोमीटर चालायच होत. पण ती माहिती चुकीची होती, हे सिद्ध करणारा एक बोर्ड दिसला. त्यावर लोहारखेत पाच आणि धाकुरी पाच किलोमीटर असं लिहिलेलं होत! अर्थात ह्या आकड्यांना तसाही काही अर्थ नसतो. ते आपले असेच माहितीफलकाची शोभा वाढवण्यासाठी असतात. आपण आकड्यांचा विचार न करता एका पावलानंतर दुसर टाकत राहणे, हे उत्तम धोरण असतं.

थोड्याच वेळात आम्ही एका खोपट्याजवळ येऊन पोचलो. हिमालयन पद्धतीप्रमाणे इथे मॅगी, चहा-कॉफी, शीतपेयांची सोय होती. मुलांनी अर्थातच मॅगी आणि कोल्ड्रींक्स घेतली! घरच्या मॅगीपेक्षा पहाडात मिळणार मॅगी खूप चांगलं लागत, हे त्या पाचही मुलांनी इतक्या जोरात पटवून दिल, की आम्हाला ते पटावचं लागलं! पण ट्रेकिंगला गेल्यावर इतपतच मागण्या करता येतात, बाकी काही मिळतच नाही. त्यामुळे ही मागणी वाटाघाटींशिवाय मंजूर झाली.

मॅगी पॉइंटनंतर थोड्याच वेळात चढ संपला. त्या जागी एक चिमुकलं देऊळ होत. कोणीतरी भाविक पूजा-अर्चा करून गेला होता. नवस फेडायला बांधलेल्या घंटा वर टांगल्या होत्या. पताका फडफडत होत्या. साध-सरळ निरागस असं देऊळ आणि तसेच तिथले भक्त! श्रद्धा होती पण बाजार नव्हता.

इथून कँप तीन किलोमीटर आहे, अशी बातमी देऊन देवेन सर पुढे गेले. तिथे मोबाईलला रेंज मिळत होती. त्यामुळे घरी फोन करून सर्वांनी ‘आम्ही अजून आहोतही, आणि ठीकही आहोत’ अशी बातमी दिली. पुढे सगळा उताराचा रस्ता होता. आम्ही निवांत होऊन गप्पा मारत रस्ता उतरायला लागलो. थोड्याच वेळात कँप दिसायला लागला. आमच्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही जेवायच्या वेळेआधी पोचलो सुद्धा!

धाकुरी कँप

तिथे जाऊन पाहतो, तर पाचही मुलं हिरवळीवर एकीकडे खिदळत लोळत होती! काय झालं, ते सांगायलाही त्यांना हासणं थांबवता येत नव्हतं. बराच वेळानंतर हास्याच्या ह्या उकळ्या शांत झाल्या. कारण कळल्यावर आम्हीही हसायला लागलो. ते कारण असं होत की, मुलांना पोचून बराच वेळ झाला होता. आल्याआल्या मिळालेलं स्वागत-सरबत पिऊन ते लोळत होते. डोळ्यांवर गॉगल होते. अचानक मुक्ता म्हणाली,’ ए, आभाळात दिसतोय, तो सूर्य आहे की चंद्र?’ वाजला होता दुपारचा एक. आत्ता कुठला आलाय चंद्र? मग हा इफेक्ट नक्की कसला? सरबताचा की रस्त्यात खाल्लेल्या स्ट्रॉबेरीजचा? नक्की काय चढलं होत काय माहिती? हा विनोद ट्रेकभर तर पुरलाच पण अजूनही घरी काही विचित्र बोललं की ‘स्ट्रॉबेरी खाल्ल्या का?’ असा प्रश्न येतोच!

सूप अॉन द रूफ

हा कँपची जागाही सुरेख होती. आमच्यासाठी लगत बाथरूम्स असलेल्या दोन खोल्या होत्या. बसायला छानसा व्हरांडा होता. समोर मस्त लॉन होत. पिवळा ग्रूप आणि आम्ही एकाच कँपवर होतो, तरी राहण्याच्या जागा दूर होत्या. जवळच एक नवीन बांधलेलं गेस्ट-हाउस होत. चौकशी केल्यावर ‘वो डिलक्स गेस्ट-हाऊस बनाया है, उधर बॉयलर वगैरा सब है, अशी माहिती मिळाली. पण इथे जनरेटरची वीज संध्याकाळी दोन तास मिळते. बॉयलरचं काय करणार कोण जाणे?

आमच्या शेजारच्या खोलीत हा ट्रेक संपवून आलेल एक जोडपं होत. त्यांच्याशी गप्पा झाल्या. ते उत्तराखंडातच राहणारे होते. अनेक वेळा ह्या ट्रेकला येऊन गेलेले होते. त्यांचा प्रत्येक कँपवर आरामात थांबत थांबत जायचं, असा हेवा वाटण्यासारखा प्लॅन होता.

मुलांनी व्हरांड्यात पत्त्यांचा डाव मांडला. बदाम सातचा डाव सुरू झाला. कँपवरचे मदतनीस त्यांचा खेळ बघत होते. मुलांनी आग्रह केल्यावर खेळ समजून घेऊन तेही सामील झाले. पुढचे सगळेच्या सगळे डाव ही नवी मंडळीच जिंकली!!! मुलांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

रात्री जेवण झाल्यावर गाणी-बजावणी झाली. ‘संगीsssत-सरिता, भुले-बिसरे गीत आणि चित्रलोक- गाने नये जमानेके’ अशी विविधभारती झाली. झोपायची वेळ झाल्यानंतर टॉर्च, पाण्याची बाटली, कोल्ड क्रीम, लोकरी पायमोजे, स्कार्फ इत्यादी वस्तुंच्या शोधाशोधीत सॅक उपसल्या आणि परत भरल्या गेल्या, प्लास्टिक पिशव्यांचे कुरकुर आवाज करून झाले, दिवसभरातल्या मजेदार गोष्टींमधलं काहीतरी आठवून खुसूखुसू हसून झालं. आता करण्यासारखं अगदीच काही उरल नाही, तेव्हा नाईलाजाने सगळे झोपून गेले.

Keywords: 

लेख: 

भाग ४ - आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

धाकुरी-खाती (११ जून २०१४)

हा ट्रेक ट्रेकिंगच्या अवघडपणाच्या पट्टीवर फार वर नसावा. कागदोपत्री (तरी!) ह्या ट्रेकला तसा सोपा मानतात. त्यामुळे ज्यांना घाई असते, असे ट्रेकर्स दोन-दोन कँप एका दिवशी करून अगदी कमी दिवसांमध्ये ह्या ट्रेकचं गणित बसवतात. आम्ही मात्र ह्या फंदात पडलो नव्हतो. आम्ही जाताना निवांतपणे एक-एक कँप करत जाणार होतो. जाताना चार ज्या अंतराला चार दिवस लागले, ते येताना दोन दिवसांमध्ये संपवणार होतो. ह्याचा फायदा म्हणजे अगदी भल्या पहाटे उठा, भराभर आवरून निघा असं शेड्यूल नव्हतं. घराबाहेर, त्यातून अशा निसर्गरम्य जागी असल्यावर तशीही फार उशीरापर्यंत झोप लागत नाही. आदल्या दिवशी संधीप्रकाशात पाहिलेलं दृश्य आता पहाटेच्या कोवळ्या उजेडात कसं दिसेल, ह्या उत्सुकतेने लवकर जाग येतेच. पण उठल्यानंतर व्हरांड्यात बसून एकट्याने किंवा मैत्रिणींबरोबर आरामात कॉफी प्यायला, गप्पा मारायला वेळ मिळत होता! नक्की किती वर्षांपूर्वी ही मजा घेतली होती, ते देखील आठवत नव्हतं. मैत्रिणींच्या घरी गेलं, तरी जिच्या घरी गेलेलो असू, तिला तिची कामं असतात. इथे सगळेच रिकामे होते. डब्याच्या भाज्या, कुकर लावणे, कामवाल्या बाईंच्या वेळा, स्वैपाक, ऑफिसचे फोन आणि तिथल्या डेडलाइन्स..... काहीही नव्हतं.

4-1_0.JPG

आज काहीही न ठरवता आम्ही ‘दिदी लोग’ बाहेर कॉफीचे कप हातात घेऊन बसलो होतो. नुकतं उजाडलं होतं पण ऊन मात्र नव्हतं. भल्या पहाटे थोडासा पाऊस झाला होता. त्याचे थेंब समोरच्या लॉनवर चमकत होते. पक्ष्यांच्या सुरेल हाका सोडल्या, तर बाकी सगळी शांतता होती. त्या शांततेमुळे आपल्या मनातला, डोक्यातला सतत चालू असलेला कोलाहल थांबला नाही, तरी थोडा कमी व्हावा अस वाटत होत. जरा वेळाने मुलांना जाग आली. त्यांची आवराआवरी, चहा-पाणी, हसणं-खिदळणं सुरू झालं. आम्हीही आमची कॉफी-समाधी संपवून आवरायला लागलो. आवरून, पोर्टर सॅक आणि डे सॅक वेगळ्या करून, चालायचे बूट चढवून आणि किमान सतरा वेळा कँपवर काही विसरलो नाही, ह्याची खात्री करून बाहेर आलो, तर एक आश्चर्य आमची वाट पाहत होतं. लख्ख ऊन पडलं होत. कँपसमोरच्या झाडांच्या मधून एक उंच, बर्फाच्छादित शिखर दिसत होत! सगळ्यांना इतका आनंद झाला. जणू काही आम्ही ते शिखर सर करून आलोय!! तातडीने त्या शिखराचे आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे सर्वांचे फोटो काढले गेले. आमची ही घाई पाहून देवेन सर हसत होते. ‘मॅम, ऐसे बहोत सारे नजारे दिखाई देंगे, फिकर मत किजीयेगा.’ असं म्हणून आमचा उत्साह आणि पुढच्या दिवसांबद्दलची उत्सुकता वाढवत होते.

4-02.JPG

देवेन सर म्हणजे अगदी शांत लीडर होते. संपूर्ण ट्रेकभर त्यांनी आम्हाला निघण्याची, चालायची, पोचायची घाई केली नाही. सगळं आमच्या वेगाने करू द्यायचे. ‘ आपलोग जहांसे आते हो, हर दिन जलदीही होती है. पहाडोमें आये हो, उसका मजा लिजिये, कोई दिक्कत नही हे’ अस म्हणायचे. नाहीतर बरेच लीडर ‘घाई’ संप्रदायातले असतात. ‘हल्या-हल्या’ करण्यात त्यांना फार आनंद मिळतो. एकदा लोकांना पुढच्या कँपवर पोचवलं, म्हणजे झालं. अशी साधारण मनोवृत्ती असते.

काही वर्षांपूर्वी ह्याच ग्रुपमधले आम्ही पाच लोकं गोव्याच्या ट्रेकला एका संस्थेबरोबर गेलो होतो. मोठा, चाळीस लोकांचा ग्रुप होतं. त्या ग्रुपमधल्याच एका व्यक्तीला लीडर नेमलं होत. त्यांनी तर अगदी नकोनको केलं होत. ‘बॅचच्या सुरवातीला बायका नंतर पुरुष असंच चालायचं, फक्त नवरा-बायको असले, तरच बरोबर चालू शकतात’, असे तालिबानी फतवे काढले होते. आम्ही ‘मुलाबरोबर चाललं तर चालेल का? भाच्याबरोबर चाललं तर परवानगी आहे का?’ असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडलं होतं. त्या बॅचमधल्या कोणीही त्यांनी सांगितलेलं काहीच ऐकलं नाही. पण अशा वेळेला भांडण, वाद, बोलाचाली होते, त्यामुळे ट्रेकची मजा जाते. इथे मात्र असा काही त्रास नव्हता. सर बहुतेक वेळा मुलांबरोबर चालायचे. अगदी अवघड वाट असेल किंवा रस्ता चुकायची शक्यता असेल, तर आमच्यासाठी थांबायचे. ‘आप लोगोंका स्पीड बढिया है. आरामसे आईये’ अशा पाठिंब्यावर आमचं एकंदर मजेत चालू होतं. आज चालायला सुरवात केल्यावर चांगल्यापैकी उताराचा रस्ता होता. येताना हा रस्ता चढून यावं लागणार होतं. वर्तुळाकार ट्रेकरूटमध्ये हा प्रॉब्लेम नसतो. हा ट्रेकरुट ‘आल्या रस्त्याने परत’ ह्या प्रकारचा असल्याने जातानाचा प्रत्येक उतार येतानाचा चढ होणार होता!

थोड्याच वेळात आम्ही एका छोट्या गावात पोचलो. रस्ता दगडाच्या उभ्या कपच्या लावाव्या तसा होता. दगडाने बांधलेली, पत्र्याच्या उतरत्या छपरांची घरं, सावलीला बांधलेली जनावरं दिसत होती. लहान मुलं खेळता खेळता थबकून आमच्याकडे आश्चर्याने बघत होती. देवाजीच्या करुणेमुळे गव्हाची शेत पिकून पिवळी झाली होती. गावातल्या बायका-पुरुष कापणीच्या घाईत होते. जनावरांचा, फुलांचा, उन्हाचा आणि गवताचा असा संमिश्र वास येत होतं.

4-03.JPG

समोर दरी, त्यातून वाहणारी नदी, पलीकडच्या डोंगरांवरची लहान गावं दिसत होती. लहान मुलांनी पाटीवर गिरगुटया काढाव्या, तश्या रस्त्यांच्या रेघा दिसत होत्या. क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिमालयाची शिखर दिसत होती. हे सगळं दृश्य, तो गावातला वास आणि ताजी स्वच्छ हवा. मन अगदी शांत होत निवत जात होत. नजर बांधली गेली होती. एक हुरहूर वाटत होती. पण अजून बरंच अंतर चालायचं आहे, हे ठाऊक असल्याने आम्ही वाट कापायला सुरवात केली. थोड्याच वेळात अजून एका मॅगी पॉइंटला पोचलो होतो. प्रथेप्रमाणे मुलाचं मॅगी खाणे चालू होत. छान सारवलेल्या चुलीवर स्वैपाक चालू होता. बसायच्या जागेच्या आसपासच्या भिंती असंख्य पोस्टर्सने भरलेल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतल्या राजकीय पोस्टर्सपासून ते देवी-देवता, निसर्गदृश्ये काय म्हणाल ते होतं! थोडा वेळ त्याच रसग्रहण झाल्यावर पुढे चालायला सुरवात झाली.

4-04.JPG

4-05.jpg

नंतरचा रस्ता ‘कधी चढ तर कधी उतार’ असा, म्हणजेच ‘कधी धाप लागणे तर कधी गुढघे दुखणे’ असा होता. कालच्या रस्त्यावर खेडी-वस्त्या अजिबात नव्हत्या. आजचा रस्ता मानवी स्पर्श असलेला होता. पायऱ्या-पायऱ्यांची शेत, घरं होती. गायी, बैल, मेंढ्या रस्ता अडवत होते. न बांधलेला कुत्रा एक मैलाच्या परिघात असला, तरी सुजाताची घाबरगुंडी होते. ह्या ट्रेकमध्ये तर ह्या कँपवरची कुत्री पुढच्या कँपपर्यंत सोबत करायची. ती कुत्री सारखी आमच्या पुढे-मागे बागडत असायची. त्यामुळे मुलं तिला नुसतं ‘सुजातामावशी...’ अस जरी म्हटली, तरी कुत्र्याच्या भीतीने तिची पळापळ सुरू व्हायची. तिची किंचाळी ऐकून कोणालातरी अडगळीत गेलेला ‘अस्फुट किंचाळी’ हा शब्द आठवला. तिथून पुढे सगळ्या किंचाळ्या ‘अस्फुट’ झाल्या! ‘सुजाता-कुत्रा-अस्फुट किंचाळी’ ह्या समीकरणाला ह्या ट्रेकच्या विनोदांमध्ये अग्रस्थान मिळालं..

4-06.JPG

4-07.JPG

अशी मजा करत करत आम्ही खाती गावात पोचलो. तिथे एका गेस्ट-हाउस मध्ये पिवळ्या ग्रुपचा कँप होता. धाकुरीला दोन्ही ग्रुपचा कँप एकाच जागी होता. इथे त्यांचा कँप दिसल्यावर आपणही पोचलो, असं आम्हाला वाटलं. पण नाही. पुढे चांगल्यापैकी थकवणारा असा दोन किलोमीटरचा चढ होता! तो चढताना सगळ्यांची अगदी वाट लागली. आजच्या रस्त्यावर इतरही चढ चढलो होतो, पण इथे मनाची तयारी नसल्याने चढ भयानक वाटला. कुमाऊँच्या कँपचं डिझाइन एव्हाना ओळखीचं झालं होत. मध्ये खोल्या आणि दोन्ही बाजूंनी व्हरांडे अशी रचना दिसल्यावर ‘आला एकदाचा कँप!’ असं म्हणत आम्ही व्हरांड्यातच बसकण मारली.

कँपवर पोचल्यावर काय लाडच लाड होते. आल्याआल्या लगेच सरबत, पाठोपाठ गरमागरम जेवण, दुपारी चहा-कॉफी, संध्याकाळी सूप, रात्री जेवण अशी चैन होती. चालून भरपूर भूक लागत होती, अधेमधे विशेष काही खायलाही मिळत नव्हतं. शेतातून आणलेल्या ताज्या भाजीची चव मोकळ्या हवेत फारच खुलायची. घरी ज्या भाज्या खायला मुलं खळखळ करतात, त्याही भाज्या तिथे अगदी आनंदाने, चवीने खायची.

दुपारचं जेवण झाल्यावर बराच वेळ मोकळा होता. मग पत्ते बाहेर आले. आम्ही लहान असताना कल्याणला ‘कॅनिस्टा’ हा प्रकार फार लोकप्रिय होता. फार वर्षात न खेळल्यामुळे आता कसा खेळायचा ते विसरायला झालं होतं. अश्विनीने सूत्र हातात घेऊन सगळ्यांची शिकवणी घेतली. एक-दोन डाव चुकत माकत खेळल्यावर सगळे अगदी अट्टल जुगाऱ्यांसारखे खेळायला लागले. कल्याणला एकदा धो-धो पावसाची झाड लागली होती, तेव्हा अश्विनीच्या माजघरात, भर दुपारी मेणबत्त्या लावून तिच्या घरच्यांबरोबर आम्ही दुपारभर कॅनिस्टा खेळलो होतो, ती आठवण येत होती. एकुणात फार जुन्या मैत्रिणी बरोबर असल्यामुळे नोस्टॅल्जियाचे झटके उठता-बसता येत होते. आमचं जवळपास सगळं लहानपण बरोबर गेलं होतं. त्यामुळे आई-वडील-भावंडेच काय पण शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळे माहितीचे. ह्या सगळ्या गप्पा मारायला लागलो की मुलांच्या आघाडीकडून ‘झाल्या ह्यांच्या कल्याणच्या गप्पा सुरू’ असा निषेध व्हायचा. पण सगळ्याच मुलांना आपल्या आई-बापाचे लहानपणाचे किस्से ऐकायची खूप उत्सुकता असते. सदैव मोठेपणाचे ओझे डोक्यावर असलेली आपली आई सुद्धा शाळेत शिक्षकांची बोलणी खायची, उनाडक्या करायची हे मुलांना गमतीशीर वाटायचं.

काळोख झाला, पत्ते दिसेनासे झाले, तसा कॅनिस्टा थांबला. मुक्ता आणि अभिराम दोघं शास्त्रीय संगीत शिकतात आणि सुंदर गातातही. जेवणानंतर टॉर्चच्या उजेडात मैफिल जमली. त्या सुरांमध्ये तरंगतच सगळे स्वप्नांच्या राज्यात पोचले.

खाती – द्वाली (१२ जून २०१४)

जोपर्यंत बऱ्यापैकी शहरी भागात, महामार्गावरून जात असतो, तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोपा असतो. बाटलीबंद पाणी सगळीकडे विकत मिळते. ट्रेकमध्ये, प्रवासात पोट बिघडून सगळ्या वेळापत्रकाची वाट लागू नये, म्हणून आपल्यातले बहुतेक लोकं ह्या पाण्यात पैसे घालवतात. पण आता आम्ही ज्या भागात होतो, तिथे दुकान हा प्रकार दुर्मिळ होता. पाणी विकत घेणार तरी कुठून? पैसे किती निरुपयोगी होऊ शकतात, ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी प्रत्येकाने हिमालयाच्या कुशीत जायला हवं!
तर, अशा रीतीने पाणी प्रश्न अशा जागी नेहमीच बिकट होतो. एरवी पाणी तिथल्या झऱ्याच भरून घ्यायचं आणि त्यात क्लोरीनचे ‘दो बुंद’ गंगाजलासारखे घालून त्या पाण्याच शुद्धीकरण करायचं, अशी पद्धत असते. पण ह्या वेळेला आधुनिक युगाचे पाच प्रतिनिधी बरोबर होते. शिवाय अश्विनी आणि तिच्या लेकीला ट्रेक संपल्यावर चारच दिवसात अमेरिकेत परतायचं होतं. पोट बिघडणे, आजारी पडणे ह्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे जास्तीची काळजी घेणं भागच होतं.

4-08.JPG

आता बाजारात फिल्टर बसवलेल्या बाटल्या मिळतात. त्यांची खरेदी निघण्याआधी झाली होती. त्या बाटल्यांमध्ये स्थानिक पाणी भरून आम्ही उरलेल्या बाटल्यांमध्ये ते ‘डाउनलोड’ करायचो. फिल्टरवाल्या बाटल्या दाबून दाबून हे काम करावं लागायचं. त्यामुळे ह्या कामाला ‘बाटल्या पिळणे’ असं यथायोग्य नावं पडलं! रोज सकाळ – संध्याकाळ आम्ही हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारायचो. हे काम कंटाळवाणं वाटायचं. पण हे शुद्ध पाणी आणि स्वाईनफ्लूपासून प्रसिद्ध झालेल्या हँड-सॅनिटायझरचा मुबलक वापर ह्यामुळे कोणीही आजारी पडलं नाही, हेही तेवढंच खरं आहे.

आज जो रस्ता चालायचा होता, तो मागच्या वर्षीपर्यंत ह्या ट्रेकमधला सगळ्यात सोपा रस्ता होता. पण जून २०१३ मध्ये काफनीगंगा नदीला प्रलयकारी पूर आला, प्रचंड प्रमाणात दरडी कोसळल्या, पाण्याच्या लोंढ्यामुळे नदीवरचे पूल वाहून गेले. रस्ता अक्षरशः होत्याचा नव्हता झाला. स्थानिक लोकांना आमच्यासारखे प्रवासी हे उत्पन्नाचे साधन. त्यामुळे त्यांनी बरेच कष्ट घेऊन तो मार्ग चालण्याजोगा केला आहे. ह्याची कल्पना आम्हाला देवेन सरांनी आदल्या दिवशी दिली होती. तेव्हा सर्वानुमते सकाळी लवकर म्हणजे साडेसहा – सातला निघायचं, असं ठरलं. कँपवरचा एक मदतनीस आमच्या नाश्त्याची पुरी-भाजी घेऊन आम्हाला गाठेल, अशी सोय झाली होती. दाट जंगलातल्या रस्त्याने आमची वाटचाल सुरू झाली. सुरवात चढाच्या रस्त्याने झाली, पण खूप सुंदर, वनराईने समृद्ध असा भाग होता. नदीचा ध्रोन्कार सतत ऐकू येत होता. तो आवाज, ते सौंदर्य, जंगलाचा ओलसर वास, सुखद असा गारवा, पुढे चालणाऱ्या मुलांच्या गप्पांचा-हसण्याचा आवाज आणि बरोबर मनासारखी सोबत... पंचेंद्रियांबरोबर मनही तृप्तीने काठोकाठ भरून वाहत होते.

4-09.JPG

4-10.JPG

लवकरच पहिली लँडस्लाईडची जागा आली. देवेन सर, इतर मदतनीस ह्यांच्या मदतीने ती जागा पार झाली. इथून पुढे बऱ्याच जागी ही कसरत करावी लागणार होती. ह्या जागेपर्यंत आमचं सामान खेचराच्या पाठीवरून येत होतं. आता ह्या अश्या रस्त्यावर खेचरं येणं अशक्य होतं. त्यामुळे त्या सॅक पोर्टरच्या पाठींवर चढल्या. ह्या स्थानिक लोकांना ह्यातून रोजगार मिळतो, रोख पैसे त्यांच्या खिशात पडतात म्हणून आनंद मानावा की आपण पैसे मोजून दुसऱ्याचे श्रम विकत घेतो, ह्याची लाज वाटावी हा त्रासदायक प्रश्न दरवेळेप्रमाणे आताही टोचायला लागला. त्या पोर्टरमध्ये एकाचं नावं ‘स्वरूप’ होतं. गप्पा मारायची खूप हौस असल्याने हा आमच्यात लगेचच मिसळून गेला. पाठीवर दोन-तीन सॅक लीलया तोलून तो आम्हाला अवघड रस्ते पार करायला मदतही करायचा.

अर्धा रस्ता चालून झाल्यावर एका जागी थांबून आम्ही पुरी-भाजी खाल्ली. नदीच्या अगदी जवळ होतो. तिचा अविरत असा नाद अजूनही कानात भरलेला आहे. डोंगरांवरून वाहणारे धबधबे आवेगाने नदीला येऊन मिळत होते. ढग नसले की नंदादेवी शिखराच दर्शन होत होत. आतापर्यंत पावसाच्या बाबतीत आम्ही नशीबवान होतो. मी कैलास-मानस यात्रा करून आलेली आहे, हे देवेन सरांना गप्पांमधून कळलं होत. त्यामुळे ‘आप सब डीव्होटी लोग हो, आप देखियेगा आपको बढिया मौसम मिलेगा’ असं देवेन सरांचं म्हणणं, तर ‘’फॉरेनर आके उलटा-सिधा खाते है, मा नंदादेवी नाराज होती है, तो मौसम खराब हो जाता है’’ असं स्वरूपच लॉजिक होत!

4-11.JPG

4-12.JPG

4-13.JPG

कधी नदीच्या वाळवंटातून, कधी जंगलातून तर कधी कोसळलेल्या दरडीच्या रस्त्याने आजचा रस्ता होता. अगदी भयानक अवघड नसला तरी थोडा त्रासदायक मात्र आहे. नदीच्या वाळवंटातून चालताना दगड पायांना टोचत राहतात. आसपास सगळीकडे उद्ध्वस्त झालेले डोंगर बघताना त्याचेही एक दडपण मनावर येतं. तरी आम्ही हा सगळा विध्वंस एका वर्षानंतर बघत होतो. तेव्हा ह्या परिसरात जे लोकं अडकले असतील, त्यांचं काय झालं असेल, ही कल्पनाही अस्वस्थ करणारी होती. पण जगरहाटी कोणाही करता थांबत नाही, हेच खरं. पूर ओसरला, पाणी वाहून गेलं, पुढचा दिवस उजाडला की पुढे बघावंच लागत. इथल्या लोकांना पर्यटक हे उत्पन्नाचं साधन. स्थानिक लोकांनी पर्यटकांच्या सोयीसाठी जुने, विसरलेले रस्ते पुन्हा शोधून काढले. संध्याकाळी नदीपात्रात दिशा कळणार नाही, म्हणून वाटेच्या कडेने खुणेसाठी दगड लावून ठेवले. जंगलातली जी वाट धोक्याची झाली आहे, तिथे चुकून कोणी जाऊ नये, म्हणून तिथे काटेरी झाडं टाकून ठेवली. आता सरकारनेही ह्या मार्गावर परत पूल बांधण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. काही वर्षात इथली ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा आहे.

सापशिडीच्या खेळाप्रमाणे आम्ही सारखे नदीजवळ यायचो, चढून डोंगरावर जायचो, लँडस्लाईड मधून जपून जपून पावलं टाकत उतरून पुन्हा नदीजवळ!! असा खेळ अनेकवेळा खेळलो. पिवळ्या ग्रुपचे काही सदस्य आमच्यापेक्षा पुढे तर काही मागे असायचे. कँपच्या दोन किलोमीटर आधी आजची शेवटची आणि सगळ्यात मोठी लँडस्लाईड आली. मुलं भराभर खाली उतरली आणि आमची वाट बघत खालच्या एका दगडावर थांबली होती. घाटात एखादा ट्रक अडकून सगळी वाहतूक अडकून राहावी, तश्या पिवळ्या ग्रुपमधला एक सदस्य मध्येच अडकला होता. पोर्टर त्यांना धीर देऊन, हात धरून उतरायला सांगत होता. पण पुढे पाऊल टाकायची त्यांची हिंमत होईना. बरं, बाकीचे आपापला जीव मुठीत धरून तिथे उभे, ते काय मदत करणार, कपाळ? शेवटी त्या पोर्टरने त्याच कसब पणाला लावत हळूहळू त्यांना खाली नेलं. घाटाचा रस्ता मोकळा झाला! वाहतूक सुरळीत होऊन आम्हीही खाली पोचलो.

डावीकडून पिंढारी गंगा आणि उजवीकडून काफनी गंगा वाहताना दिसत होती. इथे त्यांचा संगम होतो. फार छान दृश्य होतं. काफनी गंगा पार करून आम्हाला कँपकडे जायचं होत. पूर्वी पिंढारी गंगेवरचा पूल पार करावा लागायचा. तो मागच्या वर्षी वाहून गेला. म्हणून आता काफनी गंगेवर तात्पुरता पूल बांधला आहे. तो अगदीच कमकुवत असल्याने एका वेळेला एकच माणूस जाऊ देतात. वाहतूक नियमनाचं काम स्वरुपने स्वखुशीने स्वीकारलं होतं. नंबर लागायची वाट बघत असताना, सुजाता मध्य रेल्वेवाली आणि पिवळा ग्रुप पूर्व रेल्वेवाले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. पिंढारी व काफनीच्या संगमाच्या साक्षीने पूर्व आणि मध्य रेल्वेचाही संगम घडून आला!

नेहमीप्रमाणे पिवळ्या ग्रुपचा कँप आधी आणि आमचा अजून एक चढ चढल्यावर होता. ह्याचा तीव्र निषेध देवेन सरांकडे करत आणि धापा टाकत आम्ही कँपवर पोचलो. मुलाचं तोवर सरबत पिऊन झालं होत. अश्विनी दिसताच एका स्वरात त्यांनी ‘कॅनिस्टा- कॅनिस्टा’ असा गजर सुरू केला. कालची पत्त्यांची चावी त्यांना फारच बसली होती. भराभर जेवून त्यांनी पत्त्यांचा डाव मांडला.
ह्या खेळाला समसंख्येतले खेळाडू लागतात. आम्ही होतो नऊ लोकं. मग मी खेळात गेलेच नाही. शेजारच्या व्हरांड्यात बसून राहिले. समोर उंच डोंगर दिसत होते. दोन्ही नद्यांचा खळखळाट आसमंतात भरून राहिला होता. सगळ्या डोंगरउतारांवर मागच्या वर्षीच्या लँडस्लाईडच्या खुणा दिसत होत्या. आम्हाला धाकुरीच्या कँपवर भेटलेल्या काकांनी ‘खातीपासून पुढे तुम्हाला निसर्गाचा कोप किती भयानक होता, त्याचा अंदाज येईल,’ असं सांगितलं होतं. ते किती खरं होतं ह्याचा प्रत्यय कुठल्याही दिशेला नजर फिरवली तरी येत होता.

मी एकटीच बसलेय, हे पाहून स्वरूप गप्पा मारायला आला. २०१३ च्या प्रसंगाची आठवण सांगू लागला. तेव्हा तो पन्नास लोकांच्या मोठ्या ग्रुपबरोबर इथेच होता. भयानक पाऊस, थंडी, दरडी कोसळण्याचे भयप्रद आवाज अशा वातावरणात तीन दिवस सगळे अडकले होते. कँपवरचं रेशन कधीच संपून गेलं, त्यामुळे खायला काही नाही, जीवाची शाश्वती नाही, घर दूर राहिलेलं... त्यांची काय मन:स्थिती झाली असेल, ह्याची नुसती कल्पना करूनच थरकाप होत होता. सुदैवाने गोष्टीचा शेवट चांगला झाला. पाऊस ओसरल्यावर नदीचा पूरही कमी झाला. मग ते लोकं चिखल, पाणी तुडवत कसेबसे खातीला पोचले. तिथे जीप आल्या. जीपमधून बागेश्वरपर्यंत गेले आणि पुढे सुखरूप आपापल्या घरीही पोचले. हाल झाले पण निदान जीवित हानी झाली नाही. परमेश्वराची कृपाच ती.

ह्या कँपवर थंडी होती. रात्रीचं जेवण झाल्यावर तर आणखीनच हुडहुडी भरायला लागली. देवेन सरांनी शेकोटी पेटवली. सगळे त्याच्या भोवती शेकत बसले. ‘जबभी कभी महाराष्ट्रासे ग्रुप आता है, एक गाना जरूर गाते है, आपलोग पेहेचानके गाईये’ अस कोडं त्यांनी घातलं. पण ह्याचं उत्तर ‘चाल तुरुतुरु’ असणार हे आम्ही लगेचच ओळखलं. पैज हरल्याची शिक्षा म्हणून त्यांनाच सगळ्यांनी गाणी म्हणायला लावली. पोर्टर लोकांनी त्यांची स्थानिक गाणी गायली. पौर्णिमा उद्यावर आली होती. आभाळात चंद्र, शेकोटी, डोंगर आणि नदी म्हणजे अगदी बॉलीवूड सेटिंग होतं!

हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जरा उशीरापर्यंत रंगला. त्यामुळे रोज रात्री होणारा सॅक उपसायचा कार्यक्रम सर्वानुमते रद्द करण्यात आला!!

Keywords: