असं असं घडलं ...१. सुरुवात

वेगवेगळ्या मैत्रिणींशी बोलताना अनेकदा इतिहासावर बोललं गेलं. अनेकदा इतिहासावर चर्चा झाली. तर ती चर्चा, बोलणं लिहून ठेवावं असं वाटलं. त्यासाठी हे लेख. जसे जमतील तसे लिहित जाईन. कधी माहिती, कधी माझी टिपण्णी, कधी एखाद्या समाजसुधारकाचे व्यक्तीचित्रण, कधी एखाद्या तत्ववेत्याचे विचार, कधी एखादी विचारप्रणाली,कधी एखादे युद्ध,...

प्रथमत: हे स्पष्ट करते की या लेखमालिकेत अभ्यासपूर्ण वैचारिक लेख असले तरी संशोधनपर नसतील. त्यामुळे माझी मतं इतकच यात अपेक्षित आहे. अर्थातच ही मतं अशीच उठली आणि मांडली अशी नाहीत, तर त्यांना पुरावे देत, स्पष्टिकरणं देत, इतिहासकारांची मतं सांगत मी काही लिहावं असं ठरवलय. पण कोणत्याही वादासाठी वाद यात मी पडणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीचे मी स्पष्टिकरण, विवेचन केलच पाहिजे असे माझ्यावर बंधनही घालून घेत नाहीये. वुई अॅग्री टू डिफर हा मुख्य स्टँड असेल माझा.

तर इतिहास! नक्की काय म्हणजे इतिहास? अनेक काळ चर्चिला गेलेला हा विषय. त्याच्या सैद्धान्तिक चर्चेत मी इथे घुसणार नाही, आधीच म्हटलय की हा संशोधनपर लेख नाही. पण सर्वसामान्य जनतेत इतिहासाबद्दल असणाऱ्या समजांबद्दल, नावडीबद्दल, अतिरेकी आवडी बद्दल, नको इतक्या आग्रहीपणाबद्दल मला जरा बोलावसं वाटतय.
तर,

1. इतिहास म्हणजे सनावळ्या, इतिहास म्हणजे गाडलेली मढी उकरून काढणं, इतिहास म्हणजे राजांच्या गोष्टी, .....

2.इतिहास का शिकायचा? तर भूतकाळावरून काही शिकायचं, भविष्यकाळाचा अंदाज घ्यायचा, वर्तमान काळ जगताना मागील चुका न करण्याची खबरदारी घ्यायची, इतिहास म्हणजे शास्त्र/ कला/ गोष्टी,....

3. इतिहास कोणाचा? जेत्यांचा( जे विजयी झाले त्यांचा), संघर्षांचा, समाजांचा, समाजाने नाकारले त्यांचा, देशांचा, जगाचा, विचारप्रणालींचा,.....

4. इतिहास कसा लिहावा? देशप्रेमातून, विशिष्ठ समाजाच्या भूमिकेतून, विशिष्ठ विचारप्रणालीतून, एखाद््या व्यक्तिमहात्म्यातून....

बापरे किती ते प्रश्न, किती त्या चर्चा, किती ती मतांतरे! बिचारा इतिहास गुदमरून मरेल की हो :winking:

तर ही सगळी चर्चा देऊ बासनात गुंडाळून. आपण साधं, सोेपं काहीतरी बोलुयात, कसं?

इतिहास या शब्दाचा अर्थ इति + ह + आस - असं असं घडलं. History = His + story
आता काय घडलं कसं बरं सांगणार? काल मी पंतप्रधानांना भेटले असं मी म्हटलं तर समोरची व्यक्ती सहज थोडाच विश्वास ठेवणारे? माझ्या सांगण्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा तर मला त्यासाठी पुरावे दिले पाहिजेत. मग मला फोटो दाखवावे लागतील, वृत्तपत्रातली कात्रणं दाखवावी लागतील, पंतप्रधानांनी केलेली स्वाक्षरी असलेलं पुस्तक दाखवावं लागेल,.... मगच लोकं यावर विश्वास ठेवतील, हो न?

तसच काल, 10 वर्षांपूर्वी, 1000 वर्षांपूर्वी काय घडलं सांगायचं तर त्यासाठी तसेच पुरावे हवेत. मग 30.000 वर्षांपूर्वीची भिमबेटका येथील गुहेतली चित्र असतील. 4500 वर्षांपूर्वीची सिंधुसंस्कृतीतली वीट असेल, 1000 वर्षांपूर्वीचा विजयनगरचा किल्ला असेल, 400 वर्षांपूर्वीचा होन असेल नाहीतर 100 वर्षांपूर्वीचा कागदी दस्ताएेवज असेल.
ह्या पुराव्यांच्या आधारे मी त्या काळात काय घडले हे सांगू शकते.

पण माझा पंतप्रधानांबरोबर असलेला फोटो म्हणजे माझी त्यांची घनिष्ट मैत्री आहे हे स्पष्ट करत नाही. किंवा त्यांची स्वाक्षरी माझ्याजवळ असणं ही फार काही सांगू शकत नाही. फोटो, स्वाक्षरी, ती स्वाक्षरी असलेल्या कागदातला मजकूर, वृत्तपत्रे अशा शक्य त्या सगळ्या पुराव्यांचा नीट अर्थ लावला तरच खरं काय ते कळेल.

म्हणजेच एेतिहासिक पुरावे म्हणजे इतिहास नाही. प्रसिद्ध इतिहासकार इ एच कार म्हणतात, " इतिहास केवळ असा प्रकारच्या बाबींसाठी ( पुरावे) इतिहासाच्या सहाय्यक समजल्या जाणाऱ्या पुरातत्वविद्या, पुराभिलेखशास्त्र, नाणकशास्त्र, कालनिर्णयशास्त्र इ. शास्त्रांवर अवलंबून असतो. पण यातून मिळणारी तथ्ये म्हणजे इतिहासकारांचा जणू कच्चामाल, तो इतिहास नव्हे"
केवळ दस्तएेवज आणि पुरावे म्हणजे इतिहास नव्हे तर " समोर असलेल्या सर्व पुराव्यांचा नीट अभ्यास करून, त्यातून ध्वनित होणाऱ्या विविध अर्थपूर्ण घडामोडींची सुसूत्र कहाणी मांडणं म्हणजे इतिहास"

तर असा प्रयत्न करून बघावा म्हणतेय. आवडेल वाचायला?

सध्या डोळ्यासमोर असलेला आकृतीबंध असा आहे. :
मानवी इतिहासाची तोंडओळख
महाराष्ट्राचा इतिहास - प्राचीन, मध्ययुगीन, प्रबोधन काळ
भारताचा इतिहास - प्राचीन, मध्ययुगीन, प्रबोधन काळ, स्वातंत्र्य लढा.
जगाचा इतिहास - काही प्राचीन संकृती, मध्ययुग, प्रबोधन काळ, स्वातंत्र्य-समता-बंधुता, औद्योगिकीकरण, दोन महायुद्ध, शीतयुद्ध.

काही तुम्हाला हव्या असलेल्या माहिती/ विषयां बद्दलही अभ्यास करून लिहेन, तसे विषय जरूर सुचवा.

( पुढचा भाग )

लेख: