आज्जी आजोबांची डायरी : लेखमालिका १

जर्मनीतल्या हॅनोवर शहरात सिनियर केअर होममध्ये रेसिडेन्ट सायकॉलॉजीस्ट म्हणून मला नोकरी लागली. तिकडचे हे अनुभवकथन.
~ सानी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रस्तुत लेखमालिकेचे ३१ हून जास्त भाग असल्याने त्याच नावाची दुसरी लेखमालिका तयार करत आहोत. "आज्जी आजोबांची डायरी: लेखमालिका २" इथे पुढचे लेख वाचावयास मिळतील.

~ मैत्रीण टीम.

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग १

प्रिय मैत्रिणींनो,
एक आनंदाची बातमी..
जर्मनीतल्या हॅनोवर शहरात सिनियर केअर होममध्ये रेसिडेन्ट सायकॉलॉजीस्ट म्हणून मला नोकरी लागली. ती सुरू होऊन आता 3 आठवडे झाले. रोजचा दिवस वेगळा आणि अनेक आठवणींनी भरलेला असला, तरी
कालचा दिवस माझ्यासाठी स्पेशल होता.. त्यानिमित्ताने काल लिहिलेला लेख शेअर करते आहे.
खरं म्हणजे आज सोमवार. वीकएंडचं रिलॅक्सेशन आणि ते रूटीन बदलल्याने सर्वांना सोमवारी येणारा थकवा मलाही जाणवत होताच.. जावंसंच वाटत नव्हतं आज कामावर. पण तरीही गेलेच.. No matter how you feel, just get up, dress up and show up.. हे फेमस वाक्य आठवून तयारी करुन गेले कामावर. जवळपास सर्व( आयसोलेटेड रूम्स आणि डिमेन्शिया झालेले सोडले तर) आज्जी आजोबांना एकेकदा भेटून आता झालेले आहे. तरीही काही ना काही कारणाने भेट न झालेल्या काही जणांना आज भेटले. (बाकी सर्व भेटींबद्दल नंतर सविस्तर सांगेन. )
त्यांच्या भेटी तर अतिशय इंटरेस्टिंग होत्याच, पण ज्यांना आज दुसऱ्यांदा भेटले, त्या पैकी एका आज्जींचा मागच्या वेळी बोलण्याचा मूडच नव्हता, त्या आज एकदम खुलल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी न मागता त्यांना काय हवं ते बरोबर ओळखून पाठवत असते, असे अभिमानाने सांगतांना फळं पाठवतांना तिने फळं कापायला लागणारा कटिंग बोर्ड आणि नाईफही पाठवल्याचं दाखवलं. मी भारतीय आहे, हे समजल्यावर त्यांनी दिल्लीच्या दोन मुलांना आर्थिक दृष्ट्या कसे adopt केलेले आहे, त्या त्यांच्या कशा गॉड मदर आहेत, त्याची गोष्ट सांगितली. गेल्या 11 वर्षांपासून त्या त्या मुलांना पैसे पाठवत आहेत दरमहा आणि त्यांना कसे 1 बादली पाण्यासाठी 6-6 किमी चालावे लागते, त्याबद्दल दुःख व्यक्त केलं. माझ्या एकुलत्या एक आणि माझी अतिशय काळजी घेणाऱ्या साडे चार वर्षाच्या माझ्या मुला-नीलविषयी त्यांना सांगितल्यावर आणि आपण दोघेही मुलांबाबतीत किती लकी आहोत, हे सांगितल्यावर त्यांना फार छान वाटलं. त्यांनी मी बोलून झाल्यावर निघतांना नील साठी ईस्टर बनी चॉकलेट दिलं, जे त्यांच्या मुलीने त्यांच्यासाठी पाठवलेलं होतं.

दुसऱ्या एका आजोबांनीही आज आमची दुसरी भेट होती तर निघतांना मला छोटीछोटी 4-5 चॉकलेटस दिली.

एक आज्जी ज्या पहिल्या दोन भेटीत विशेष मोकळेपणाने बोलल्या नव्हत्या, आज त्यांनी बोलायला त्रास होत असूनही त्यांच्या 'लायब्रेरिअन' जॉब विषयी, त्यांच्या आयुष्याविषयी खूप गोष्टी सांगितल्या. त्यांचे मिस्टर त्यांना कसे लायब्ररीत पहिल्यांदा भेटले आणि आज दोघेही सिनियर रेसिडेन्स मध्ये आहेत, हे सांगतांना आणि आयुष्य किती पटकन संपून जातं, हे सांगतांना त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते. निघतांना त्यांनी मला फ्लाईंग कीस दिला.

आजचा दिवस एकूणच वेगळा आणि वेगवेगळ्या अर्थांनी माझ्यासाठी गिफ्टेड होता. मी तो कधीच विसरू शकणार नाही.
~सखी-सकीना वागदरीकर

आज्जी आजोबांची डायरी: भाग 2

आज्जी-आजोबांची डायरी: भाग १
एकूण ८३ आज्जी आजोबांना भेटून झालेले असले तरीही काहीजण अजूनही एकदाही भेटलेले नाहीयेत. आज त्यांना भेटायचे ठरवले होते. मात्र आज एका आजोबांचा वाढदिवस असल्याचे समजल्याने जरी त्यांची पूर्वी एकदा भेट झालेली असली तरी पुन्हा एकदा भेटून त्यांना शुभेच्छा देण्याचे ठरवले. त्यांच्या खोलीत गेले, तर ते एकटेच रूममध्ये जमिनीकडे पाहत बसलेले होते. त्यांना आमच्या बॉसने सकाळी स्वतः भेटून सुंदर फुलांचा गुच्छ दिलेला होता, तो त्यांच्या टेबलवर फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेला दिसत होता. त्या सर्व रहिवाश्यांबाबत हे करत असाव्यात. मी जॉईन झाले, त्या पहिल्याच दिवशी एका आज्जींचा वाढदिवस होता. माझ्या बॉस मला त्यांच्या सोबत त्या आज्जींना शुभेच्छा द्यायला घेऊन गेल्या होत्या.
आजोबांना शुभेच्छा दिल्या, तर ते एकदमच खुलले आणि त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःहुनच त्यांचे वय 85 असल्याचे सांगितले. ते लॉकस्मिथ होते. त्यांचा जन्म बर्लिनचा, हे समजल्यावर आपसूकच बर्लिनच्या भिंतीचा- पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पार्टीशनचा विषय निघाला. त्यांची आई वयाच्या 44 व्या वर्षी वारली आणि वडीलांना दुसरी जोडीदारीण मिळाली, तिच्यासोबत ते पूर्व जर्मनीत निघून गेले, ही अशी अनपेक्षित आठवण त्यांनी सांगितली. हे पार्टीशनच्या आधी की नंतर? त्यावेळी तुमचं वय किती होतं? वगैरे प्रश्न विचारून त्यांचा फ्लो मला तोडावासा वाटला नाही. नंतर नैसर्गिकपणे पुढच्या भेटीत त्यांनीच सांगितलं काही, तर समजेल. ते स्वतः अविवाहित असून त्यांना एक बहीण आणि एक भाऊ असल्याचे समजले. त्यांच्याहून 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या भावाशी त्यांचा काहीच संपर्क नसून 3 वर्षांनी मोठ्या बहिणीशी फोनवर बोलायचे असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आत्ता बोलणार का? विचारल्यावर, नाही, नंतर नंबर शोधून बोलतो, असं म्हणाले. तुमचे इकडे काही मित्र झालेले आहेत का, असे विचारल्यावर जेवण आणि कॉफी ब्रेक्समध्ये ज्यांना भेटतो, ते ओळखीचे काही जण आहेत, मात्र आमची मैत्री वगैरे नसल्याचे त्यांनी सांगितले.

इथे बरेच जण आणि बऱ्याच जणी अशाच एकट्याच असल्याचे जाणवले. गेल्या 3 आठवड्यात एकमेकांच्या रूम्समध्ये जाऊन गप्पा मारत बसलेले आज्जी आजोबा मला फक्त दोनदा दिसले. एका क्रोएशिअन आजोबांना मात्र ते राहतात त्याच मजल्यावरच्या एका इटालियन आज्जींमध्ये आपलं प्रेम सापडलं, असं त्यांनी अभिमानाने सांगितलं. ते आजोबाही साधारण असेच 80 च्या पुढेच वय असलेले आणि आज्जीही नक्कीच 75 च्या पुढच्या असतील, दोघांनाही चालायला त्रास होत असल्याने वॉकरच्या आधाराने चालावे लागतेय. पण दोघांनीही पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमाची गोष्ट मला सांगितली. प्रेमाला वय नसतं, हे या दोघांकडे पाहून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. ह्या आज्जींना फार फार गप्पा मारायच्या असतात. करोनामुळे त्यांच्या मुलां मुलींना त्या भेटू शकत नसल्याने मला पहिल्यांदा भेटल्यावरच त्यांना किती बोलू आणि किती नको असं झालेलं होतं. मी नंतर परत येते, असं प्रॉमिस करून ह्या आज्जींना आणि अजून एका माझी वाट पाहत बसणाऱ्या आज्जींना तेवढी मी जाता येता भेटून ख्याली खुशाली विचारून येत असते. सकीना लिबे सकीना(सकीना डियर सकीना) अशीच हाक मारतात त्या आता मला.. ह्या आज्जींच्या अजूनही काही गंमती आहेत. त्या आणि बाकी काही आज्जी आजोबांचे किस्से पुढच्या भागात सांगते.
~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर

आज्जी आजोबांची डायरी: भाग 3

आज दुपारनंतर आमच्या सिनियर केअर होममध्ये एका सॅक्सोफोन प्लेयर ला बोलावलं होतं. करोनामुळे इथल्या सर्व सोशल ऍक्टिवीटीज बंद झालेल्या असल्याने सर्व आज्जी आजोबा कमालीचे कंटाळलेले आहेत. म्हणून सर्वांनी संस्थेच्या बागेत सुरक्षित अंतरावर बसून किंवा आपल्या खोलीच्या खिडकीत उभं राहून संगीताचा आस्वाद घ्यावा, असं सर्वांना कळवण्यात आलं. सॅक्सोफोन प्लेयर काकांनी आधी रस्त्यावर उभं राहून 5 मिनिटे काही धून वाजवल्या. त्यानंतर ते गार्डनमध्ये आले. आज्जी आजोबा तिकडे जमलेले होतेच. काही खिडकीतून बघत होते. त्यांनी वाजवलेली सगळी गाणी प्रसिद्ध जर्मन क्लासिक्स असावीत. कारण सर्वांनाच ती माहिती होती आणि त्या ठेक्यावर ते आपल्या व्हीलचेअरवरून किंवा वॉकरवरून डोलत होते. जवळपास 15 मिनिटे हा कार्यक्रम चालला. संपल्यावर अरे! किती लवकर संपला, असंच सगळे म्हणत होते... करोनाने सगळी परिस्थिती किती बदलून टाकली आहे, छोट्याछोट्या आनंदांसाठी आपल्याला कशा शक्कली लढवाव्या लागत आहेत, हे प्रकर्षाने जाणवलं आणि मन फ्लॅशबॅकमध्ये( ३ आठवडे मागे) गेलं..

माझा जॉब सुरू झाला, त्याचा आनंद साजरा करणार होते, त्या पहिल्याच दिवशी दुपारी माझ्या बॉसने सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी मिटिंग बोलावली होती. विषय होता 'करोना'. ३ आठवड्यांपूर्वी हा विषय आत्ताइतका गंभीर नव्हता झालेला, त्याचे गांभीर्य टप्याटप्याने वाढत गेले. पण मी उपस्थित असतांना झालेली ती माझ्या नोकरीतल्या सर्वांसाठीचीच पहिली ह्या विषयावरची मिटिंग होती. आता यापुढे कामावर येतांना सर्वांनी रिसेप्शन काउंटरजवळ असलेल्या disinfectant ने हात निर्जंतुक करून मगच कामावर जायचे, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसांनी माझ्या बॉसने मला एक लेटर दिले. आता सिटी लॉकडाऊन होणार असून आपले मात्र काम चालूच ठेवावे लागणार आहे कारण ते अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे कोणी आपल्या येण्यावर, रस्त्यात दिसण्यावर हरकत घेतली, तर हे लेटर दाखवायचे, असे त्यांनी मला सांगितले. तेंव्हा ह्या गोष्टीचं गांभीर्य माझ्या लक्षात यायला लागलं.

जेवढ्या म्हणून आज्जी आजोबांशी ओळख करून घ्यायला त्यांच्या खोलीत गेले, त्यातले जे जे अजून बऱ्यापैकी फिट आहेत, त्या सर्वांच्या खोलीत टीव्ही नाहीतर रेडीओवर बातम्या सुरू होत्या आणि रोजचे अपडेट्स ते ऐकायला लागलेले होते. त्यामुळे आमच्या गप्पांच्या केंद्रस्थानी करोना हा एकच विषय होता.

त्यानंतर 2 दिवसांनी आमच्या इन्स्टिट्यूटच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर 3 जणांना करोनासदृश लक्षणे दिसल्याने त्यांना त्याच मजल्यावर आयसोलेट करण्यात आलं आणि बाकीच्या सर्व जणांची सोय इतर मजल्यांवरच्या सिंगल किंवा डबल रूम्समध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यांचे गप्पांचे विषय आपला वरचा सुंदर मजला सोडून खाली यावे लागले हा किंवा ज्यांना आता आपली रूम इतरांसोबत शेअर करावी लागते आहे, त्यामुळे वाटणारा व्यत्यय हा होता.

दरम्यान संस्थेच्या स्टोअर एरियातून disinfectants मोठ्या प्रमाणावर गायब व्हायला लागल्याचे समजले, त्यामुळे बॉसने अजून एक तातडीची मिटिंग बोलवून कृपया कोणी असे करू नका, करोनापेक्षा भयंकर आजार अस्तित्वात आहेत आणि नर्सेसना त्यासाठी ह्या गोष्टी इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे, हे सांगून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक छोटीशी बाटली आणि त्यात हे liquid टाकून देऊन बाकी बाटल्या लॉक करून ठेवण्यात आल्या.

दरम्यान सर्व रहिवाश्यांना भेटायला जातांना मास्क घालून जाणे अनिवार्य केले गेले आणि त्यामुळे मास्कचे शॉर्टेज निर्माण झाले. मग एका आज्जींच्या मुलीने थोडे मास्कस घरून शिवून पाठवते, अशा अर्थाचे एक गोड पत्र पाठवून सोबत सॅम्पल मास्कस पाठवले. त्यावरून इकडे बहुतेक कोणालातरी कल्पना सुचली असावी, दुसऱ्या दिवशी प्युअर कॉटनच्या तागाचा एक गठ्ठा मागवला गेला आणि कर्मचाऱ्यांपैकी ज्यांच्याकडे मिनी शिवण मशिन्स आहेत त्यांना ती आणायला सांगून ज्यांना शिवणकाम येते, त्यांना सर्वांना दुसऱ्या दिवशी शेकडो मास्कस शिवायला बसवले गेले. अजूनही ते मास्कस वापरण्याची आमच्यावर वेळ आलेली नाही. अजून one time use मास्कस उपलब्ध आहेत. जे आम्ही दिवसभर वापरून डिस्पोझ ऑफ करतो आहोत.

दोन आज्यांची करोनासदृश लक्षणे दिसताच मागच्या आठवड्यात तो संपूर्ण मजला आयसोलेट केला गेला. आता करोना आहे की नाही हे त्वरित समजू शकणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने 2 दिवसांत त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर तो मजला सर्वांसाठी खुला करण्यात आला.

मागच्या आठवड्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर आल्यावर लगेच शरीराचे तापमान तपासून जास्त निघाल्यास घरी पाठवण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे आता हे तापमानाच्या नोंदीचे सुरू झालेले आहे रोज, नियमितपणे.

ह्या सगळ्यात नातेवाईकांच्या सर्व भेटी बंद झालेल्या असल्याने आणि रोज मुलींना भेटायची सवय असल्याने काल ज्यांचा उल्लेख केला, त्या इटालियन आज्जी जबरदस्त कंटाळलेल्या आहेत, त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांना आज भेटायला गेले. तर त्यांनी घरून काही गोष्टी मागवल्या होत्या, त्यात माझ्यासाठी एक विक्सची गोळीसदृश खोकल्याच्या गोळीचं एक छोटं पॅकेट मागवून ठेवलेलं होतं. मी भेटायला गेले, तेंव्हा लगेच त्यांनी ते माझ्या हातात ठेवलं. अचानक झालेल्या वातावरण बदलाने हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झालेली असल्याने घसा थोडासा खवखवत आहेच. त्या गोळ्या किती योग्य वेळेवर आज्जींनी माझ्यासाठी मागवल्या, ह्या विचाराने गळा दाटून आला. काम सुरू झाल्यापासूनचे हे माझे तिसरे गिफ्ट..

आज्जींना आज मी ओमारो मियो.. अशा इटालियन ओळींनी सुरुवात होऊन हिंदी शब्द पुढे आलेले मूळ इटालियन आणि प्रसिद्ध हिंदी रिमेक गाणे:

"दो लाब्जों की हैं दिल की कहानी,
या हैं मुहोब्बत, या हैं जवानी"

.. म्हणून दाखवले. त्यांना हे गाणे माहिती नाहीये. पण त्या गाणे ऐकवल्याच्या बदल्यात मिठी मारता येत नसल्याने लांबून भरपूर फ्लाईंग किसेस देऊन आणि दहा वेळा आय लब्यू म्हणून आज्जींनी मला परत लवकर ये सांगितले, मी वाट बघत असते, असे पुन्हा एकदा म्हणून मला बाय केले. उद्या परत भेटायचे प्रॉमिस करून मी त्यांचा निरोप घेतला.

आज आणि इतर दिवशी भेटी झालेल्या आज्जी आजोबांविषयी नंतर बोलेन.

~ सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४

डायरीतले आज्जी आजोबा ज्या सिनियर केअर होममध्ये राहतात, त्या संस्थेविषयी अधिक माहिती दिल्याशिवाय त्यांच्या जीवनाविषयी पुरेसे चित्र उभे राहणार नाही, असे वाटतेय, म्हणून आज थोडे त्या संस्थेविषयी सांगते.

हे ओल्ड एज होम नसून सिनियर केअर होम आहे, ही पहिली आणि महत्वाची गोष्ट.

इथले रहिवासी कुठल्या ना कुठल्या आजाराने पीडित असून रोजच्यारोज वैद्यकीय सेवेची गरज भासणारे, आंघोळ किंवा नैसर्गिक विधीसाठी मदत लागणारे लोक आहेत. काही धडधाकट आहेत, स्वतःचं सर्व काही स्वतः करू शकणारे पण घर मेंटेन करायला लागणारे बळ त्यांच्यात नाही. जोडीदार गेलेला असल्याने एकटे रहावेसे वाटत नाही, इत्यादी बरेच पैलू आहेत त्यांच्या संस्थेत दाखल होण्याला.

वयाच्या १८व्या वर्षी इकडे मुलांना स्वावलंबी होण्यासाठी घराबाहेर पाठवण्याची पद्धत आहे. शिकत शिकत नोकरी करणं/ नोकरी करत शिकणं, याला इकडे स्टुडंट जॉब म्हणतात. ह्या कारणाने जे ते एकदाचे घराबाहेर पडतात, परत एकत्र राहायला येतच नाहीत. आई वडिलांचीही अशी काही अपेक्षा नसतेच. त्यांना निश्चितच वाईट वाटत असणार पण ते त्यांना थांबवत नाहीत.

त्यांच्याकडे बघून मला पिल्लांना उडण्यासाठी मदत करणारी चिमणी आठवते, जीची पिल्लं उडायला लागली की घरटं सोडून निघून जातात. तसं निसर्गनियम पाळणारं हे कल्चर मला वाटतं. अशा दृष्टीने त्याकडे बघितलं की ते नकारात्मक वाटत नाही. सगळेजण अधूनमधून तर काही जण रोजही भेटत असतील, पण एकाच घरात दोन पिढ्या विशिष्ट वय झाल्यानंतर शक्यतो अपवादात्मक परिस्थिती असल्याशिवाय कोणीही राहत नाही.

मी जिथे राहते, त्या बिल्डींगमधल्या ६० वर्षाच्या काकांचे उदाहरण सांगते. ते पेन्शनर आहेत. घरीच असतात आणि एकटेच राहतात सिंगलरूम अपार्टमेंटमध्ये. ते बायकोपासून वेगळे झालेले. तरुण मुलं आहेत त्यांना. ते अधूनमधून येऊन भेटत असतात. त्यांची साधारण ८५ वर्षांची आई एकटीच दुसऱ्या गावी राहते स्वतःच्या बंगल्यात. त्यांना घर सांभाळता येत नाही, मात्र ते सोडायचंही नाहीये.

आमच्या बिल्डिंगमधल्या काकांनाही त्यांची प्रायव्हसी प्रिय आहे. पण आईला मदत करणं हे कर्तव्य पार पाडण्यासाठी दर १५ दिवसांनी त्यांच्या गावी ड्राइव्ह करून जातात आणि लॉन चे ट्रीमिंग, कचऱ्याची विल्हेवाट वगैरे कामे करतात. इकडे वेगवेगळ्या वारी पेपर, रिसायकल वगैरे कचरा उचलणारे येतात. आईला तेवढंही करणं वयोमानानुसार जमत नाहीये. त्यामुळे ते हे करायला अनेक किलोमीटर ड्राइव्ह करून जातात. आता करोनामुळे लॉकडाउन झालेले असल्याने ते जाहीर झाल्या झाल्या आईकडे निघून गेले. आता हे सगळं करोनाचं संपल्याशिवाय मी परत येणार नाही, हे सांगून गेले. त्यांनी आईलाही जवळपास छोटं घर घेऊन रहा असं सांगितलं तर आईही त्याला तयार नाही. तर असं आहे साधारण इथलं कल्चर.

प्रौढावस्थेत असलेल्या सर्वांनाच आपली प्रायव्हसी प्यारी. तरुण, वयस्कर, सगळेच त्यात आले. त्यामुळे आर्थिक स्वावलंबनावर सर्वांचाच भर असतो. होममेकरही आहेतच भरपूर, पण तो भाग वेगळा. तो एका न्यूक्लिअर फॅमिलीचा भाग झाला. आनंदाने एकमेकांना सगळे अधूनमधून भेटून quality time एकत्र साजरा करतांना दिसतात.

हे पाश्चात्य देशातले लोक भावनिकदृष्ट्या कोरडे असतात का? तर मला तसं अजिबात जाणवलं नाही. जरी वेगळे राहत असले तरी एकमेकांवर भरभरून प्रेम करणारे कुटुंबवत्सल लोक आहेत हे. अर्थात त्याला अपवादही आहेतच. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो ना? तर असे आहे हे. आपल्यासाठी त्यांचे जीवन हा एक सांस्कृतिक धक्का असला तरी त्यांच्या वागण्याला आपण चांगले वाईटच्या तराजूत तोलू शकत नाही, त्यांना जज करू शकत नाही, कारण त्यांचे वागणे हा त्यांच्या कल्चरचा एक भाग आहे.

तर ह्या सिनियर केअर होममध्ये ८० च्या पुढच्या मंडळींची संख्या जास्त असली, तरी एक ५० वर्षांच्या बाई आणि एक ५१ वर्षांचे गृहस्थही इथे आहेत. ह्या बाईंना तुम्ही इकडे कसे आलात, हे विचारले असता, त्या या विषयावर संवाद साधण्यास तयार नसल्याचं लक्षात आलं. बाई अगदी धडधाकट आहेत. कायम इथल्या एका अपंग मैत्रिणीसोबत बागेत फिरत असतात.
पण ५१ वर्षांचे गृहस्थ मात्र फुफ्फुसाच्या विकाराने पीडित आहेत. ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर सतत सोबत बाळगूनच ते जगू शकतात. त्यांना दररोज वैद्यकीय दृष्ट्या मदत लागते, त्यामुळे इथे राहण्याशिवाय पर्याय नाही त्यांना. गेल्या ९ वर्षांपासून ते आजारी असून गेल्या ४ वर्षांपासून संस्थेत दाखल झालेले आहेत. जरी ते फक्त ५१ वर्षांचे असले तरी त्यांना ४ मुलं असून नातवंडंही झालेली आहेत. ते या सिनियर केअर होममधल्या रहिवासी युनियनचे सदस्य आहेत. रहिवाश्यांच्या अडचणी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात.

बाकी काही जणांविषयी आणि इतर पैलूंविषयी उद्या लिहिते.
~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
०९.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५

आज आज्जी-आजोबांचा संस्थेतला दिनक्रम आणि त्यांची व्यवस्था कशी आहे, हे सविस्तर सांगते.

ह्या सिनियर केअर होमचा आऊटलूक एखाद्या पॉश हॉटेलसारखा आहे. त्यातील बेडची रचना उंची कमी जास्त करता येईल अशी सोयीची केलेली आहे, जेणेकरून अपंग आणि वृद्ध व्यक्तींना कोणाच्याही मदतीशिवाय केवळ एक बटन दाबून चढता, उतरता यावे.

शिवाय बेडचा पाठीचा आणि पायाचा भाग वर खाली करता येईल, अशी सोय असलेला आहे. म्हणजे सिटिंग पोझिशन, स्लीपिंग पोझिशन, पाय उंच करता येणे, सपाट करता येणे, अशी रिमोटकंट्रोलच्या बटनांचा वापर करून हवी ती सोयीची रचना करता येते. हे रिमोटकंट्रोल बेडला स्टँडवर लावून ठेवलेले आहेत.

गरज असलेल्या प्रत्येकाजवळ वॉकर आणि व्हीलचेअर आहे. ज्यांना वॉकरच्या आधारेही चालता येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी बॅटरीवर चालणारा वॉकर आणि त्याच्या आधारे चालतांनाही ज्यांचा बॅलन्स जाऊ शकतो, अशांसाठी सीटबेल्ट प्रमाणे व्यवस्था त्या वॉकरला जोडलेली आहे.

प्रत्येक बेडला कॉल बेल असून बेल वाजवल्याबरोबर प्रत्येक फ्लोअरवर नर्सेसची टीम आहे, त्यातील कोणतीतरी एक नर्स तत्परतेने हजर होते.
फिजिओथेरपीस्टही आहेत, जे गरजेप्रमाणे राऊंडसाठी येतात. ही कॉलबेल प्रत्येक खोलीत असलेल्या टेलिफोनला जोडलेली आहे, तसेच ज्यांना तितकेही उठता येत नाही, त्यांच्यासाठी वायरलेस बेल घड्याळ घालतो तशी मनगटात बेल्टला लावलेली आहे. काहींना कुठेही वेळ पडू शकते, त्यांच्यासाठी त्यांच्या वॉकरला जोडून ठेवलेली आहे.

क्लीनिंग स्टाफ चोखपणे खोल्या आणि बाथरूम्स स्वच्छ करून जात असतो. रोजचे धुवायचे कपडे घेऊन जातो. जम्बो आकाराची २ वॉशिंगमशीन्स अविरत सुरू असतात, त्यात ते धुवून, लगेच ड्रायरमध्ये घालून वाळवून, घड्या घालून त्यांना नेऊनही देतात. आंघोळ, स्पंजिंग करणे, डायपरची गरज असल्यास ते उपलब्ध करून देणे, वेळच्यावेळी बदलणे, बेडशीट, उश्यांचे अभ्रे हेही वेळच्यावेळी बदलणे, रोज सगळे नाश्त्याला गेले की त्यांचे बेडशीट्स, पांघरूण नीट लावून ठेवणे, हे व्यवस्थित केले जाते, यामुळे प्रत्येक खोली स्वच्छ, वासविरहीत असते आणि फ्रेश दिसते.

प्रत्येक खोलीला जोडून बाथरूम टॉयलेट असले तरी प्रत्येक मजल्यावर बाहेरही गेस्टससाठीही 2 टॉयलेट बाथरूम्स आहेत आणि स्पेशल केअर बाथसाठी वेगळे बाथरूम्सही प्रत्येक मजल्यावर आहेत.

प्रत्येक खोलीत लख्ख सूर्यप्रकाश, खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिसणारं निसर्गरम्य आवार, इमारतीखाली चालायला हिरवळ असलेली बाग अशी छान व्यवस्था आहे.

प्रत्येक मजल्यावर डायनिंग हॉल आहेत आणि प्रत्येकाला बसायला रिझर्व्ह करून ठेवलेल्या टेबल खुर्च्या आहेत, ज्यावर प्रत्येकाची नावं लिहून ठेवलेली आहेत.

ज्यांना बेडवरून हलताही येऊ शकत नाही, त्यांना त्यांच्या खोलीत नाश्ता, जेवण दिलं जातं, ज्यांना खाता येत नाही, त्यांना भरवलं जातं.

खोलीत रोज पुरेश्या पाण्याच्या बाटल्या आहेत ना? धुतलेले ग्लास आहेत ना, हे बघितलं जातं.

रोज सकाळी कॉफी, नाश्ता, दुपारी जेवण, मधल्या वेळात रोज वेगवेगळ्या फ्लेवरचे केक आणि कॉफी, संध्याकाळी जेवण आणि लागेल तशी फळं, फळांचे ज्यूस यांचा पुरवठा केला जातो. जेवणाचा पूर्ण आठवड्याचा मेनू प्रत्येक फ्लोअरवर लावलेला असतो आणि त्या त्या दिवसाचा मेनू प्रत्येक टेबलवर स्टँडवर लावलेला असतो. मेनूत सलाड, मेनडिश आणि डेझर्ट रोज दिले जाते. मेनडिशमध्ये 2 पर्याय दिलेले असतात, जे ऐनवेळी निवडता येतात.

ह्या डायनिंग रूम्स मध्ये आजचा दिवस, वार आणि वर्ष कोणतं, आजचं तापमान किती, आपण कोणत्या शहरात आहोत आणि आजची कोणती ऍक्टिवीटी किती वाजता आणि कुठे आहे, याची नोंद केलेला एक मोठ्या अक्षरातला पेपर त्या दिवसाच्या मेनुकार्डसोबत एका स्टँडवर रोज लावला जातो, दररोज नियमितपणे बदलला जातो.

हे काम स्टुडंट जॉब करणारे म्हणजेच शिक्षण सुरू असतांना नोकरी करणारे ज्युनिअर फिजिओथेरपीस्ट आपल्या मुख्य कामासोबत रोज करतात.

करोनापर्व सुरू होण्यापूर्वी आठवड्यातून एकदा सर्वांना सुपरमार्केटला खरेदीसाठी घेऊन जाणं, हे होत असे, असं कळलं. आता आठवड्यातून एकदा हव्या असणाऱ्या गोष्टींची लिस्ट प्रत्येक खोलीत जाऊन विचारून घेऊन ते सगळं आणून त्यांना दिलं जातं आहे. चालता फिरता न येणाऱ्यांसाठी ही व्यवस्था आहेच आधीपासूनच.

बँकेत जाऊन पैसे काढणे शक्य नसल्यास ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसचा स्टाफ १०,२०,५० वगैरे युरोपर्यंत देतात. नंतर अर्थातच ते पैसे महिना खर्चातून वजा केले जातात. सिनियर सिटीझन्सना कोणत्याही प्रकारे दगदग, वणवण होणार नाही, याचा पुरेपूर विचार केला जातो.

याशिवाय सोशलायझेशनसाठी काही खेळ एकत्र खेळणे, सिनेमे एकत्र पाहणे, यासाठी दिवस नेमलेले आहेत, जे अर्थातच सध्या सगळं बंद आहे.

आठवड्यातून २ दिवस २ प्रकारचे फिटनेस सेशन्स असतात एक व्हीलचेअरवरच्या लोकांसाठी आणि एक चालू फिरू शकणाऱ्यांसाठी. ज्यांची स्मरणशक्ती चांगली नाही, त्यांना या ऍक्टिवीटीजसाठी जाऊन घेऊन येणे, जे रस दाखवत नसतील, त्यांना मोटिव्हेट करणे, हेही काम केले जाते. हे सगळं मी जॉब कॉन्ट्रॅक्ट साइन करण्याच्या 2 दिवस आधी माझ्या हॉस्पिटेशनच्या दिवशी प्रत्यक्ष बघू शकले. माझा जॉब सुरू झाल्यानंतर सगळ्याच ऍक्टिवीटीज बंदच झालेल्या आहेत. अजून किती दिवस हे बंद असेल, कल्पना नाही.

तर ही सगळी छान सोय असल्याने आज्जी आजोबा तसे आरामात असतात. तुम्हाला इकडे कसे वाटते, हे विचारल्यावर एका आज्जींनी "wie ein urlaub" म्हणजे "सुट्टीचा आनंद घेतांना वाटते, तसे फिलींग" असे सांगितले, तर एका आजोबांना मात्र घर 5 मिनिटांच्या अंतरावर असूनही केवळ दुसऱ्या मजल्यावर राहत असल्याने आणि इमारतीला लिफ्ट नसल्याने इथे राहावे लागत आहे, याचे दुःख व्यक्त केले. त्यांची बायको घरी आहे आणि ती रोज दिवसभर सोबत असते आणि रात्री घरी जाते, पण करोनामुळे त्यांची आता रोज भेट होऊ शकत नसल्याने त्यांना वाईट वाटत असल्याचे सांगितले. त्यांना मी व्हिडीओ कॉलचा पर्याय सुचवला, तर आम्हाला दोघांनाही त्यातलं कळत नाही, असं म्हणाले.

दुसऱ्या एका आज्जींनी "आता इस्टर आला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाचा वाढदिवस असतो, या दिवसांमध्ये आमचे कुटुंब एकत्र असते, त्यांना कोणालाही ह्यावेळी भेटू शकणार नाही" असे सांगून "लोक करोनापेक्षा डिप्रेशननेच जास्त मरतील" अशी भीती व्यक्त केली.
त्यांना मी, "कृपया अशा पद्धतीने विचार करू नका, जीव सलामत तर सेलिब्रेशन्स पचास" असे सांगून सकारात्मक विचार करण्याची दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही व्हिडीओ कॉल बद्दल सुचवले, तर त्या हे असं काही आम्ही करत नाही, असं म्हणाल्या.

एका आज्जींना जेवावेसेच वाटत नाहीये, कारण करोनासदृश लक्षणे काही जणांमध्ये दिसल्याने त्यांच्या राहत्या मजल्याला आयसोलेट केले गेले आणि बाकी नॉर्मल लोकांना त्या वरच्या मजल्यावरून खाली मूव्ह करण्यात आले, ज्यात या ही आज्जी होत्या आणि त्यांना हे बदल आवडत नाहीयेत. मला हे आवडत नाहीये काहीच, मी नाही जेवणार म्हणाल्या. त्यांना मी "आज्जी, असे करू नका. जगात किती गरिबी आहे, लोकांना जेवायला मिळत नाही, राहायला घरं नाहीत, आमच्या देशात गरीब लोक करोनामुळे मैलोनमैल चालत घरी जात आहेत, तुमची अवस्था कितीतरी छान आहे" असे सांगितले, तर त्या तडक उठल्या आणि "Ich bin so glücklich' म्हणजे मी खरोखरच किती भाग्यवान आहे, असे म्हणून जेवायला निघून गेल्या. त्यांची निराशा कुठल्याकुठे पळून गेली..

असे अजून काही आमचे संवाद आणि आज्जी आजोबांच्या खोल्या त्यांनी स्वतः कशा लावलेल्या आहेत, त्याविषयी आणि अजून काही पैलूंविषयी उद्याच्या भागात लिहीन..

~ सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१०.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ६

सिनियर केअर होममध्ये इतक्या सगळ्या सुखसोयी आहेत, हे बघितल्यावर मनात प्रश्न येणं सहाजिकच आहे की अशा ठिकाणी राहणं सर्वांना परवडत असेल का? तर वस्तुस्थिती ही आहे की या ठिकाणी गरीब, श्रीमंत असे सर्व लोक आहेत. प्रत्येकाला त्याच्या आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती नुसार पैशाची व्यवस्था करता आलेली आहे. तो प्रत्येक माणसाचा डेटा सर्व्हरवर सेव्ह केलेला आहे. मला पहिल्या दिवसापासूनच हा प्रश्न मनात असल्याने तो भाग मी सगळ्यात आधी वाचला.

शिवाय मी भेटलेल्या पहिल्या आज्जींना ओळख आणि गप्पा झाल्यावर आणि त्या माझ्यासोबत बोलण्यात कम्फर्टेबल आहेत हे समजल्यावर हा प्रश्न विचारला की तुमचा इथे राहण्याचा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता? त्यावर त्यांनी सांगितलं की माझी मुलं आणि नातवंडं यांनी माझा खर्च विभागून घेतलेला आहे.

मग मी ऍडमिनिस्ट्रेशनच्या लोकांनाही हा प्रश्न विचारला, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या खर्चाचा काही भाग त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स मधून कव्हर होतो, काही जणांनी स्वतः व्यवस्थित सेव्हिंग केलेले आहे, ते सेल्फ फायनान्स करतात. काहींची मुलं-नातवंडं त्यांचा खर्च करतात, काहीजण आपलं स्वतःचं राहतं घर विकून त्या पैशात इकडे आयुष्यातले शेवटचे दिवस जगण्यासाठी येतात, ज्यांच्याजवळ अशी सोय नाही त्यांना सरकारकडून फंडिंग मिळते.

अशाप्रकारे सगळी व्यवस्था जरी महाग असले तरी ज्यांना आवश्यकता आहे ते इथे राहणे निरनिराळ्या प्रकारे अफोर्ड करू शकतात. एकंदरीतच डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तयार असण्याच्या स्वभावामुळे त्यांना फार फायदे होतात आयुष्यात, हे तीव्रतेने जाणवते. त्यातच पैशाची मॅनेजमेंटही आलीच.

आता पैशाचा विषय निघालाच आहे तर थोडी वेगळी गंमत सांगते.
काही दिवसांपूर्वी एका आज्जींच्या लेकीने संस्थेला काही पैसे बक्षीस म्हणून दिले तर त्यात आमच्या बॉसने अजून तितकीच रक्कम टाकून सर्व कर्मचाऱ्यांसाठी लस्सीसारखे वेगवेगळ्या फ्रुट फ्लेवरचे एक छान योगर्ट ड्रिंक आणले.

आत्ता करोनामुळे कंटाळलेल्या आज्जी आजोबांसाठी त्यांच्यापैकी एकाच्या मुलाने अनेक बॅग्ज भरून स्नॅक्स आयटम्स पाठवले. मग ह्याची सगळ्यात जास्त गरज ज्यांना आहे, त्यांना ते देण्याचे ठरले.

मी जॉईन झाले, त्या पहिल्या दिवशी माझ्याकडून अनेक फॉर्म्सवर सही घेतली गेली होती, त्यातल्या एका फॉर्मवरचा मजकूर होता की अडीच युरोपेक्षा जास्त किंमतीचं बक्षीस रहिवाश्यांकडून मी घेणार नाही आणि त्यांनाही देणार नाही.

हे असं का? हे ऍडमिनिस्ट्रेशनच्या हेडला विचारलं, तर तिने सांगितलं, काहीवेळेस काही लोक या आज्जी-आजोबांशी जास्त कनेक्ट होऊ शकतात किंवा तसे भासवू शकतात, परिणामी हे रहिवासी त्यांची प्रॉपर्टी कर्मचाऱ्यांच्या नावावर करू शकतात. ह्या प्रकारची पैशाची देवाणघेवाण वेगवेगळ्या प्रकारे धोकादायक ठरू शकते. एकमेकांचा गैरफायदा घेणे, भ्रष्टाचार अशी गुंतागुंत त्यातून निर्माण होऊ शकते, म्हणून असा नियम बनवला आहे.

मला अतिशय कौतुक वाटलं ह्या जर्मन लोकांच्या दूरदृष्टीचं.. भ्रष्टाचार होण्याची शक्यता ओळखून त्यांनी आधीच अशाप्रकारची तजवीज करून ठेवलेली आहे, हे किती ग्रेट, हुशार आणि निर्मळ मनोवृत्तीचं लक्षण आहे!

अजून एक पण वेगळ्या पैलूचं उदाहरण देते. आठवड्यातून तीनदा- म्हणजेच विक डेज ना दर दिवसाआड बॉस मिटिंग बोलवतात, ज्यात सर्व डिपार्टमेंटचे प्रतिनिधी हजर असणे आवश्यक असते. त्यात काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यावर काय उपाययोजना, ह्यांची चर्चा होते. मग मिटिंगनंतर तिचे मिनिट्स ऍडमिनिस्ट्रेशनचे लोक सर्वांना इमेलने पाठवतात.

तर मागच्या आठवड्यात एक कर्मचारी मुलगी स्टूलवर उभी राहून कपाटतली एक वस्तू काढतांना पडली. त्या फ्लोअरवर मीच होते. कोणाच्यातरी कण्हण्याचा आवाज ऐकून मी बघायला गेले, तर ही मुलगी विचित्र अवस्थेत पडलेली दिसली. प्रत्येक कर्मचाऱ्याला एकेक वायरलेस लँडलाईन फोन दिलेला असला, तरी ती ट्रॉमामध्ये असल्याने कॉल वगैरे करण्याच्या अवस्थेत नव्हती. पटकन कॉल करून मी संबंधित व्यक्तींना बोलावून घेतले, त्यांनी योग्य ते उपाय करून तिला घरी पाठवले.

दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये हा विषय ऐरणीवर होता. प्रत्येक फ्लोअरवर शिडी असूनही तिचा वापर न करता स्टूल का वापरला गेला? लगेच नियम बनवला गेला की यापुढे कधीही स्टुलचा वापर करून वर चढण्याचे काम केले जाणार नाही. शिडीच वापरली जाईल. अशाप्रकारे एखादीही चूक घडताच तिची पुनरावृत्ती टाळून सातत्याने इव्हॉल्व्ह होत राहण्याच्या स्वभावामुळे सतत सोयीच्या आणि प्रगतीच्या दिशेने हे लोक वाटचाल करत असावेत, असे वाटते.

करोनामुळे नातेवाईकांना भेटू न शकणाऱ्या रहिवाश्यांना मी व्हिडीओ कॉलचे सुचवलेले होते, हे कालच्या भागात सांगितले आहे. तर दर मिटिंगला बॉस प्रत्येकाला काही सांगायचे आहे का ते विचारतात, तेंव्हा ही गोष्ट त्यांना सांगितल्यावर ताबडतोब त्या "किती चांगली कल्पना आहे! सुचवल्याबद्दल खूप खूप आभारी", असे म्हणून "तडक सर्व आज्जी आजोबांना हा प्रश्न विचार आणि कोणाला ही सोय हवी असल्यास आपण त्यांच्या नातेवाईकांना कळवू आणि व्यवस्था करू. कोणाकडे स्मार्टफोन नसल्यास मी माझा उपलब्ध करून देईन", असे म्हणाल्या.

काही रहिवाश्यांनी आपल्यासोबत आपला टीव्ही आणलेला आहे, पण न आणलेलेही बरेचजण आहेत. तशा प्रत्येक खोलीत चांगली मोठी स्क्रीन असलेला टीव्ही लावून देणे, त्यांचे मनोरंजन होत राहील, हे बघणे, हे विशेष काळजी घेऊन केले जाते. हे सगळे पाहता पैशापेक्षाही मनाने मोठा, दिलदार आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेला, अशाप्रकारच्या श्रीमंत लोकांचा हा देश आहे आणि म्हणूनच तो इतका विकसित आहे, हे पदोपदी जाणवते. अपवाद आहेत, नाही असे नाही, पण तुलनेने कमीच.. सुखी आयुष्याची गुरुकिल्ली यांना सापडलेली आहे, असे यांच्याकडे बघून मला कायम वाटते.

आज्जी आजोबासुद्धा आपले मन छान रमवत असतांना दिसतात. एकतर शंभर टक्के जनता साक्षर असल्याने वृत्तपत्र वाचन करतांना बहुतेकजण दिसतात. एका आजोबांच्या खोलीत मॉनिटर सदृश काहीतरी दिसले. हे काय आहे, असे विचारताच त्यांनी ते ऑन केले आणि खाली वर्तमानपत्र ठेवले. तर ते वर्तमानपत्र स्क्रीनवर दिसायला लागले. बाजूला स्क्रोल करण्याचे एक बटन होते, ज्याने झूम लेव्हल कमी जास्त करता येऊ शकत होती.

म्हणजे डोळ्यांना त्रास न होऊ देता मोठया स्क्रीनवर वर्तमानपत्राची हार्डकॉपी वाचता येण्याची व्यवस्था केलेली होती थोडक्यात.. नव्वदीच्या पुढची पिढी, जी इंटरनेट टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही किंवा त्या बाबतीत उदासीन असते, त्यांच्यासाठी शोधून काढलेला हा एक छान मार्ग!
तुम्हाला हे कुठे मिळाले, विचारले असता हेल्थ इन्शुरन्स कंपनीने फुकट दिले, असे सांगितले.

इकडे हेल्थ इन्शुरन्स घेणे अनिवार्य असते सर्वांना आणि तो चांगला हेवी असतो, दर महिन्याच्या पगारातून यासाठी मोठा भाग वजा होतो. शिवाय सरकारलाही भरभक्कम टॅक्स वजा होतो पगारातून. तर आपल्या पगारातून गेलेल्या कष्टाच्या कमाईचे वाईट वाटत नाही, कारण ते योग्य ठिकाणी जाणार, असा विश्वास असतो.

याच पैशांतून अपंगांसाठी व्हीलचेअर वगैरेंचीही सोय केली जाते. त्यामुळे आर्थिकदृष्टीने गरीब असूनही श्रीमंताचे जगणे बहुतेक लोकांना शक्य होते. मला शंभर टक्के डिटेल्स माहिती नाहीत. रस्त्यावर क्वचित काही भिकारी आणि रस्त्याच्या कडेला झोपणारे काही लोक दिसतात. ते कसे काय? शिवाय सर्वांनाच अत्याधुनिक सेवा मिळते की नाही? वगैरे प्रश्नांची उत्तरं नाहीत आणि कल्पनाही नाही. माझ्या डोळ्यांना दिसलेली आणि मला जाणवलेली निरीक्षणे मी नोंदवली आहेत. ती अचूक असतीलच, असे नाही.

बाकी पैलूंविषयी उद्याच्या भागात बोलूयात.
~ सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
११.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ७

सिनियर केअर होममधल्या माझ्या नोकरीला काल बरोब्बर एक महिना पूर्ण झाला! दिवस फारच पटापट संपले.. हा महिना मला अनेक अनुभवांनी श्रीमंत करणारा ठरलेला आहे. ही नोकरी मला कशी मिळाली, ह्याविषयी मी एक दिवस लिहीनच, पण एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी पहिल्या दिवसाची आठवण मात्र आज लिहिते.

माझ्या मुलाखतीच्या दिवशी म्हणजे जॉईन करण्याच्या काही दिवस आधी सगळं बोलणं पूर्ण झाल्यावर, "तुला काही प्रश्न असल्यास विचार", असं बॉस म्हणाल्या. त्यांना मी "संस्था दाखवू शकत असाल, तर बरं होईल", असं सांगितलं. त्यांना हे ऐकून फार आनंद झाला. "तुला इतका इंटरेस्ट आहे हे पाहून छान वाटलं", असं म्हणाल्या. मग त्यांनी मला सगळे फ्लोअर्स फिरवून दाखवले. सगळ्यात वरच्या मजल्यावर काही आज्जी सिटिंग एरियात आपापल्या व्हीलचेअर्सवर बसलेल्या होत्या. त्यांना बॉसने माझी ओळख करून दिली. तर एका आज्जींना मला पाहून फार आनंद झाला. त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच मला जवळ बोलवून मिठीच मारली एकदम.. "किती गोड मुलगी आहे", म्हणाल्या..

या निमित्ताने जर्मनीविषयी विश्वास बसणार नाही, अशी एक छान गोष्ट सांगते. इकडच्या लोकांना ब्राऊन स्किन, काळे केस, काळे डोळे हे फार सौंदर्याचं लक्षण वाटतं, याचा जर्मनीत आल्यापासून अनेक कॉम्प्लिमेंट्स मिळाल्याने मला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे यावेळी आश्चर्य नाही वाटलं, पण खूप छान मात्र वाटलं..

आपल्याला जसे त्यांचे निळे डोळे, ब्लॉन्ड केस पाहून काहीतरी वेगळे, सुंदर बघितल्याचे अप्रूप वाटते, तसेच त्यांना आपल्याकडे पाहून वाटते, हे लक्षात आले माझ्या.. ते नेहमी रंगाची तुलना करत असतात, पण ती अप्रूप याच भावनेने. काहीजणांना आपल्यापेक्षा वेगळा असा हा रंग आवडत नाही, हेही ऐकले आहे. मात्र मला या प्रकारचे अनुभव आलेले नाहीत, इतकेच.

म्युनिकला असतांना लोकल ट्रेन्सने प्रवास करतांना जर्मन आणि आफ्रिकन वंशाच्या अनेक जोडप्यांना आणि त्यांच्या सुंदर मिश्रण झालेल्या मुलांना पाहायला मिळाले आहेच, शिवाय एक आमचा जवळचा मित्रही आहे, जो भारतात टूरिस्ट गाईड होता आणि त्याची बायको जर्मन-सायकियाट्रीस्ट आहे. एक मराठी डॉक्टरेट आणि त्याची बायको जर्मन शिक्षिका अशी अनेक भारतीय जोडपीही बघितली आहेत. नुकत्याच एका ब्राऊन स्किनच्या तमिळ मुलीचं जर्मन मुलाशी लग्न झालेलं आहे.

तर ह्या सिनियर केअर होममध्येही गप्पा मारायला गेले असतांना पहिल्याच भेटीत मला दिसण्यावरून आज्जी आजोबांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत. पण मला मिळालेली ती मिठी आणि जॉब कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेले होते, त्या दिवशी वेटिंगरूममध्ये भेटलेल्या एका आज्जींची एक गोष्ट सांगणे फार आवश्यक आहे कारण ह्या दोन आज्जींमुळेच मला पहिल्याच दिवसापासून ह्या नोकरीत अतिशय कम्फर्टेबल वाटलं, 'ऍट होम' वाटलं.

ह्या आज्जी मला सगळ्यात पहिल्यांदा दिसल्या, ते हॉस्पिटात्सिऑनच्या दिवशी.. इंग्लिश हॉस्पिटेशनप्रमाणे स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा इंग्लिश अर्थ ऑबझर्वेशन.. मुलाखतीनंतर आणि जॉब कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापूर्वी एक पूर्ण दिवस सिनियर केअर होमची संपूर्ण व्यवस्था समजून घेण्यासाठी आणि मला जॉब नक्की आवडतो आहे का, हे स्वतःलाच कळावे, यासाठी मला बोलावले गेले होते, त्या दिवशी सगळ्यात आधी मला संपूर्ण इमारत फिरवून दाखवली गेली. मुलाखतीच्या दिवशी बॉसने माझ्या इच्छेसाठी दाखवली होतीच, पण ह्या दिवशी एकदम सविस्तरपणे सगळं समजवत दाखवली एका स्टाफमेम्बरने.

त्यानंतर आधीच्या एका भागात ज्याचा उल्लेख केलेला आहे, त्या फिटनेस वर्गातली फिटनेस सेशन्स मी आज्जी आजोबांसोबत ऍटेंड केली. एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट हे सेशन्स करवून घेत होता. त्याने वेगवेगळ्या अडथळ्यांनी भरलेले मार्ग बनवले होते आणि आज्जी आजोबांना त्यावरून चालायला लावले. असे अनेक हातापायांच्या हालचाली घडून येतील, असे व्यायाम प्रकार करवून घेतले. जे आज्जी आजोबांनी फार एन्जॉय केले. त्या सेशनमध्ये भेटलेल्या आज्जी आजोबांशी कोणाशीच मी बोललेले वगैरे नव्हते, पण त्यांचे चेहरे लक्षात होते.

दिवसभरात अनेक गोष्टी समजून घेतल्यानंतर मी घरी गेले आणि त्यानंतर ३ दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेले. सगळं घरी जाऊन वाचून ओके असल्यास साईन करेन, हे ठरवले होते. त्या दिवशी वेटिंग रूममध्ये एक आज्जी भेटल्या. त्यांचा चेहरा लगेच ओळखू आलाच मला. त्यांना मी त्या दिवशी फिटनेस सेशनच्या वेळी भेटलेले होते. त्यांनाही मी लगेच आठवले. त्या स्वतःहूनच माझ्याशी बोलायला लागल्या. "तुम्ही इकडे जॉईन झालात का?", असं त्यांनी मला विचारलं. "अजून नाही, पण दोन दिवसांनी होणार आहे. आज कॉन्ट्रॅक्ट घ्यायला आलेले आहे", असं सांगितल्यावर त्या म्हणाल्या, " अरे वा वा! अभिनंदन! खूप आनंद वाटला हे ऐकून. व्हा बरं का जॉईन नक्की. मी पहिल्या मजल्यावर राहते, हे हे माझे नाव आणि ही ही माझी रूम नंबर. मला आवडेल तुमच्यासोबत गप्पा मारायला.." आज्जींचे हे बोलणे ऐकल्यावर मला फार फार छान वाटले. मनावरचा ताणच निघून गेला एकदम..

जॉईन केले, त्या दिवशी बॉसना हा माझा अनुभव सांगितल्यावर त्या खूप खुश झाल्या. मुलाखतीच्या दिवशी मी त्यांना म्हणालेले होते, "बाकी मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त हे आज्जी आजोबा मला स्वीकारतील का? एवढीच एक शंका आहे" त्यावर त्या त्या दिवशी बोललेल्या होत्या, "जास्त विचार करू नकोस. मला तू आवडली आहेस आणि हवी आहेस. हे महत्त्वाचं.. बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतील. तू रिलॅक्स रहा." त्या म्हणाल्या आणि तसंच झालं अगदी. जणूकाही माझा ताण घालवायलाच त्या आज्जी वेटिंग रूममध्ये बसलेल्या होत्या.

बॉसने पहिल्या दिवशी कोणाकोणाला भेटायचे, याची सॅम्पल लिस्ट मला दिली. त्यात ह्या आज्जींचे नाव पहिल्या नंबरवर टाकले. मी त्यांच्या मजल्यावर गेले. तर त्या बरोब्बर लिफ्टसमोर उभ्या होत्या! वॉकला जायला निघाल्या होत्या! आमची थोडक्यात चुकामूक होता होता वाचली.

मला अशी अचानक समोर बघून आज्जींना सुखद धक्का बसला. त्यांना मी म्हणाले, "तुम्हालाच भेटायला आले हो! मी जॉईन झाले आजपासून! तुम्हाला वेळ असेल आणि इच्छा असेल तर आपण तुमच्या खोलीत जाऊन गप्पा मारुयात का?" त्यांनी लगेच आनंदाने होकार दिला आणि त्यांच्या रुममध्ये मला घेऊन गेल्या.

त्यांची रूम कशी होती आणि त्या पहिल्या दिवशी भेटलेल्या इतर काही आज्जी आजोबांचे अनुभव उद्याच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
१२.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ८

सिनियर केअर होममध्ये ज्यांना मी सगळ्यात आधी भेटायला गेले, त्या आज्जींनी माझं प्रेमाने त्यांच्या खोलीत स्वागत केलं..
त्यांची रूम कुठल्याही अँगलने सिनियर केअर होम वगैरे तत्सम ठिकाणची वाटत नव्हती. घरून आणलेला सोफा, बेडशीट्स, पांघरूण, उशा, कपाट, जमिनीवर सुंदर मॅट, भिंतीवर स्टुडिओत काढलेले अतिशय सुंदर फॅमिली फोटो फ्रेम्स, एक सुंदर घड्याळ ज्याच्या प्रत्येक नंबरच्या जागी एकेका फॅमिली मेम्बरचा फोटो. खिडकीत ८ नंबर लिहिलेले दोन मोठ्ठे सोनेरी फुगे दोन टोकांना लटकत होते. मागच्याच आठवड्यात त्यांचा ८८ वा वाढदिवस होऊन गेलेला होता आणि आमच्या बॉसने सुंदर बुके त्यांना भेट दिलेला होता, हे त्यांनी मला सांगितले. तो बुके फ्लॉवरपॉट मध्ये ठेवलेला होता. फुलं अजूनही फ्रेश दिसत होती. ते दोन सोनेरी फुगे त्यांच्या नातवंडांनी खिडकीत लटकवले असून मागच्या आठवड्यात पूर्ण फॅमिली इथे त्यांच्या सोबत होती आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस खूप सुंदर पध्दतीने साजरा केल्याचं त्यांनी मला सांगितलं.

फार फ्रेश वाटलं मला त्यांच्या रूममध्ये. एका सुंदर घरातली सुंदर, होमली फील असलेली रूम होती ती.. "तुम्ही इकडे कधीपासून आहात?", हे विचारल्यावर "पाच वर्षांपूर्वी ही संस्था सुरू झाली, तेंव्हापासून आहे", म्हणाल्या..
"मिस्टर सहा वर्षांपूर्वी गेले आणि पासष्ट वर्षाचा मुलगा त्याच्या बायकोसोबत घरी, दोन नातवंडं, तीही लग्न करून आपापल्या घरी आणि त्या नातवंडांना प्रत्येकी एकेक मुलं, म्हणजेच मला दोन पतवंडंही आहेत",असं त्या म्हणाल्या. मग त्यांनी मला त्या सर्वांचा मिळून असलेला एक फोटो दाखवला, जो भिंतीवर लावलेला होता. अतिशय सुंदर फोटो होता तो..

"तुम्हाला इकडे कसं वाटतंय?" विचारल्यावर, मला छान, एकदम कम्फर्टेबल वाटतं इकडे, असं म्हणाल्या. "मी इकडे आले, तेंव्हा बांधकाम सुरूच होतं, एकच मजला बांधून झालेला होता आणि आम्ही दहा- बारा जण होतो. आता चार मजले आणि शंभरच्या वर लोक आहेत", म्हणाल्या. "इथली सर्व्हिस, जेवण, सर्व काही छान आहे, मला झोपही छान लागते", अशी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर मी त्यांना माझ्या कुटुंबाविषयी माहिती सांगितली.

"माझी एक तुमच्याचसारखी अतिशय गोड आज्जी होती, जिची मी पहिलीच आणि त्यामुळेच फार लाडकी नात होते आणि आम्ही खूप गप्पा मारायचो, पण माझं बाळ- तिचं पतवंडं बघायच्या आतच ती हे जग सोडून निघून गेली. पण आता तुमच्याशी बोलतांना तिच्याशीच बोलतेय, असं मला वाटतंय आणि जॉब जॉईन केल्यापासून तुम्हालाच सगळ्यात आधी भेटलेय", हे सांगितल्यावर त्यांना फार आनंद झाला.

त्यांच्यासोबत मी बराच वेळ बसून होते. बॉसने सांगितलं होतंच की "वेळेची मर्यादा पाळायची गरज नाही, ज्यांना जितका वेळ तू हवीशी वाटतेस, तितका वेळ तू त्यांना देऊ शकतेस." त्या आज्जींच्या खोलीतून माझा पायच निघत नव्हता. पण मला बॉसने दिलेल्या लिस्टमधल्या बाकीच्या आज्जी आजोबांना भेटण्याची उत्सुकता लागून राहिलेली असल्याने मी आज्जींचा निरोप घेतला. त्यांनी मला "आलेस गुटे", म्हणजेच "सगळं छान होऊ दे तुझं" do well असं म्हणून मला पुन्हा ये बरंका, मी तुझी वाट बघेन, असे सांगितले. मी त्यांना आता नेहमीच भेटत राहू, असे प्रॉमिस करून बाहेर पडले.

बाहेर पडताच एक साधारण साठी-पासष्टीचे एक गृहस्थ पॅसेजमधून आज्जींच्या खोलीकडे येतांना दिसले. आज्जींच्या दारावर नॉक करण्याच्या बेतात ते होते. मला तिकडून बाहेर पडतांना आणि दार लावतांना बघून प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघू लागले. मी माझी ओळख करून दिल्यावर त्यांनीही स्वतःची ओळख करून दिली. आज्जी म्हणजे त्यांची आई! माझ्यासोबत इन्स्टंट कनेक्शन झालेल्या आज्जींच्या मुलालाही लगेचच भेटायला मिळालं, हे पाहून मला आनंद झाला. "तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य! आमच्या भारतात ज्याची आठवण काढतो, ती व्यक्ती समोर दिसली की असं म्हणायची पद्धत आहे", हे सांगितल्यावर, त्यांनी गोड हसून मला निरोप दिला.

पहिल्या आज्जींची भेट तर छान पार पडली. मुख्य म्हणजे त्यांना इथे छान वाटतंय आणि त्या अतिशय समाधानी आहेत, हे पाहून मला फार बरं वाटलं. ह्या आज्जींना दिलेल्या प्रॉमिसनुसार मी नेहमी आवर्जून भेटते. करोनामुळे कुटुंबियांना आता भेटता येत नाही, याची त्यांना खंत वाटतेय. त्या दिवशी मुलगा भेटून गेला, ते शेवटचंच होतं. आता कधी हे सगळं संपेल, असं त्यांना झालेलं आहे.

ह्या आज्जींना भेटल्यावर दुसऱ्या आज्जींच्या खोलीत गेले, तर तिथे काही विशेष फर्निचर नव्हते. संस्थेकडून मिळालेल्या बेसिक गोष्टी, जसे बेड, टीव्ही, टेबल आणि दोन खुर्च्या, इतकेच तिथे होते. माझी ओळख करून दिल्यावर आणि तुम्हाला इकडे कसे वाटतेय, विचारल्यावर मला फार एकटे वाटतेय, असे म्हणाल्या. त्यांना कोणीही नातेवाईक नसून त्यांना सतत रडू येत असतं, "झोपतांनाही मी रडत असते" असं म्हणाल्या. मला फार वाईट वाटलं. त्यावेळी करोना आणि सेफ डिस्टन्स प्रकार इतका तीव्रतेने सुरू झालेला नसल्याने मी बराचवेळ आज्जींचा हात धरून बसले होते. त्यांना सांगितले, की "तुम्ही एकट्या नाही आहात. मी आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. वाटेल तेंव्हा मला गप्पा मारायला बोलवा. तुमच्या मजल्यावरच्या इतर आज्जी आजोबांशी मैत्री करा. छान मजेत रहा. एकटे वाटून घेऊ नका.. " माझ्याशी बोलून त्यांना बरं वाटलं, हे मला जाणवलं.

एकाच मजल्यावरच्या दोन आज्जींचे दोन वेगवेगळे अनुभव आलेले असल्याने मी इमोशनली ड्रेन झालेले होते. बॉसने दिलेल्या लिस्टमधल्या दुसऱ्या आज्जींच्या रूमकडे निघाले होते, तर एक मस्त हसरे, उंच पुरे, छान ड्रेस घातलेले आजोबा चालतांना दिसले. त्यांनी मला स्माईल दिली. मी ओळख करून दिली आणि त्यांचे नाव विचारले. हे आजोबा लिस्टमधले नव्हते. पण त्यांच्याशी गप्पा मारायलाच हव्या, असे एकदम पॉझिटिव्ह फिलींग त्यांच्याकडे पाहून मला आले होते.

"आपण तुमच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारुयात का", असे विचारताच, "हो, मला आवडेल", असे म्हणून ते मला त्यांच्या रूमकडे घेऊन गेले. हे आजोबा म्हणजेच मागच्या एका भागात ज्यांचा उल्लेख केलेला आहे, ते क्रोएशिअन आजोबा! हेच ते, ज्यांनी सांगितलं की मला इथे माझं प्रेम सापडलं म्हणून..

बायकोपासून वेगळे झालेल्या आजोबांना कुटुंबीय आहेत पण त्यांचा त्या कुटुंबियांशी काही विशेष संपर्क नाही. मात्र ते दुःखी किंवा एकाकी अजिबात वाटले नाहीत. घरचं छान फर्निचर यांच्याही रूममध्ये आहे. छान व्यवस्थित लावलेली रूम असल्याने होमली वाटलं त्यांच्याही रुममध्ये. मात्र त्यात फॅमिली फोटोज दिसले नाहीत. तुम्हाला भेटून छान वाटलं, पुन्हा येईन गप्पा मारायला, असे सांगून मी त्यांच्या रूममधून बाहेर पडले.

हे आजोबा दिवसातला बराचसा वेळ गार्डनमध्ये घालवतात, मला आधी वाटलं की वॉक घेण्यासाठी, फ्रेश हवेसाठी येत असावेत. पण नंतर समजलं, खोलीत सिगरेट स्मोकिंगला परवानगी नाहीये आणि स्मोकिंग कॉर्नर बागेतच आहे, त्यामुळे ते इकडे सतत दिसतात.

त्यानंतर भेटले मी एका अरेबियन आज्जींना. त्यांच्याविषयी आणि एका जोडप्याला मी पहिल्या दिवशी भेटले, त्यांच्याविषयी उद्याच्या भागात सांगेन.

~ सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१३.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ९

पहिल्याच दिवशी पहिल्याच ३ आज्जी-आजोबांचे कम्प्लिटली ३ वेगळे अनुभव आलेले असल्याने मी मिक्स्ड मूडमध्ये होते. कोणत्याही आज्जी-आजोबांची नावं रिव्हील करणं प्रोटोकॉलमध्ये बसणारं नसल्याने आणि त्यांना टोपणनाव देऊन ते लक्षात ठेवणं अवघड असल्याने मी त्यांना आता नंबर्स देते, म्हणजे पुढच्या संदर्भांसाठी ते आपल्याला बरं पडेल.

तर सगळ्यात पहिल्यांदा भेटलेल्या आज्जींना आज्जी नं 1, दुसऱ्या आज्जींना आज्जी नं.2 आणि आजोबांना आजोबा नं. 1 असे म्हणूया..

ह्या ३ आज्जी आजोबांची मी मनात प्रत्येकी एक कॅटेगरी बनवून टाकली आणि त्यानुसार माझी स्ट्रॅटेजी ठरवली.

आज्जी नं.1 प्रकारच्या आज्जी-आजोबांना ठरवून भेटायचं, ते म्युच्युअल आनंदासाठी.. मायेची ऊब आणि प्रेमासाठी..

आज्जी नं. 2 प्रकारच्या आज्जी-आजोबांना न विसरता भेटायचं, ते त्यांना प्रेम आणि सकारात्मकता देण्यासाठी, पण ते देतांना त्यांच्यातली नकारात्मकता आणि उदासी आपल्यावर चढू द्यायची नाही. आपल्या दैनंदिन जीवनावर तिचा परिणाम होऊ द्यायचा नाही.

आजोबा नं. 3 प्रकारच्या आज्जी-आजोबांना अधूनमधून, जमेल तेंव्हा भेटायचं, ते आयुष्यात आनंद कसा शोधायाचा, वाळवंटात नंदनवन कसं फुलवायचं आणि स्वतःचा सकारात्मक ऑरा कसा निर्माण करायचा, ह्या प्रकारचं टॉनिक मलाच मिळावं, यासाठी.. म्हणजे काही कारणाने मनात उदासी, मरगळ निर्माण झाली असेल, तर ती क्षणात दूर होईल..

अशा कॅटेगरीज सुरुवातीलाच बनवणं माझ्यासाठी फार आवश्यक होतं, म्हणजे माझ्या रोजच्या कामाला एक दिशा आणि अर्थही निर्माण होईल.. नाहीतरी आयुष्य म्हणजे काय? आपण देऊ तसाच अर्थ त्याला लाभत असतो ना? आनंद, दुःख, फ्रस्ट्रेशन्स तर असतातच कायम सोबत.. आपण नेमका फोकस कशावर करतो, यावर आपलं जीवन अवलंबून असतं आणि मग ज्यावर फोकस जास्त, तीच गोष्ट आपल्याला भिंगातून बघितल्यासारखी मोठी किंवा छोटी दिसते, नाही का?

असो, तर काल लिहिल्याप्रमाणे पहिल्या दिवशी ज्या निवडक आज्जी आजोबांना मी भेटले, त्यात एक अरब आज्जीही होत्या. बॉसने आधीच कल्पना दिलेली होती की या आज्जींना काही जर्मन बोलता येत नाही, थोडं फार समजतं, पण एकूणच बोलता येण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांना काहीसा शारीरिक आणि मानसिक आजार आहे, त्यामुळे त्या हरवल्या-हरवल्यासारख्या असतात..

अरब आज्जींच्या रूमच्या दारावर नॉक केलं, आतून क्षीण "या" ऐकू आलं.. जर्मनमध्ये "ja" असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र मराठीतल्या या सारखा नसून इंग्रजीतल्या "yeah" सारखा आहे आणि या संदर्भात तुम्ही आत येऊ शकता, असा आहे. म्हणजे मराठीतल्या "या" सारखाच योगायोगाने झाला ना! सहज जाता जाता भाषेची गंमत.. कशा भाषा एकमेकांना जोडलेल्या आहेत, याची अनेक उदाहरणं आणि साम्यस्थळं नेहमी दिसत असतात, त्यातलं हे एक.. सहज शेअर करावंसं वाटलं..

या आज्जी रूमच्या कॉर्नरला सोफ्याच्या सिंगल चेअरवर बसलेल्या होत्या. त्यांचा वेषही अरबी होता. डोक्यावर रुमाल आणि वन-पीस गाऊन सदृश ड्रेस.. रंगाने माझ्यासारख्या.. मी भेटायला गेल्यावर आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर त्यांनी ताबडतोब त्यांच्याकडे असलेल्या टॅब्लेटवरून whatsapp कॉल केला कोणालातरी आणि अरबीत बोलायला लागल्या. त्यानंतर काही सेकंदांनी त्यांनी त्यांची टॅब्लेट माझ्या हातात देऊन मला बोलायला लावलं. समोरून त्यांचा मुलगा बोलत होता, " माझ्या आईला तुमच्याशी काहीच बोलत येत नाहीये, पण संवाद साधण्याची इच्छा मात्र आहे, म्हणून तिने मला कॉल केला",असं म्हणाला. मी माझी ओळख करून दिल्यावर त्याने मी त्यांच्या आईला भेटायला आल्याबद्दल माझे आभार मानले आणि "मी पुढच्या आठवड्यात आईकडे येणार आहे, तेंव्हा आपण भेटूया", म्हणाला. मी ही "हो, भेटूया", असे सांगून फोन बंद केला. आता करोनामुळे तो येऊ शकला नसल्याने आमची भेट पेंडिंग आहे.

******************************************
डियर ऑल, इथपर्यंत आज सकाळी आणि दुपारी लंचब्रेकमध्ये मी लिहीलं.. जनरली मी संध्याकाळी काम संपल्यावर ट्रॅममध्ये बसून लिहित असते आणि घरी पोहोचले की सगळ्यात आधी ते शेअर करून मग कामाला लागत असते. हे माझं आठवड्याभरापासूनचं रूटीन आहे. पण आज कुणास ठाऊक, सकाळीच लिहिण्याची इच्छा झाली.

आज आमची विकली मिटिंग होती. त्यात मला कळलं की आज्जी नं 1 ची तब्येत बरी नाही. त्यांचं बीपी एकदम लो झालंय आणि त्या झोपूनच आहेत. मिटिंग संपल्यावर लगेच मी त्या आज्जींना भेटायला गेले. नेहमी त्या पेपर वाचत बसलेल्या असतात किंवा लॅपटॉपवर आपल्या मुलाला इमेल करत असतात. आज बेडवर झोपून होत्या. मी त्यांना भेटायला गेल्यावर नेहमीप्रमाणे मला म्हणाल्या, "छान झालं तुम्ही आलात. मी म्हणाले, "मला कळलं, तुम्हाला बरं नाही, म्हणून लगेच भेटायला आले." त्या बेडवर पडूनच जाम ब्रेड बटर खात होत्या. "माझ्या तोंडाला चवच नाही.", म्हणाल्या. त्यांनी तो ब्रेड बाजूच्या टेबलवर ठेवून दिला आणि थरथरत्या हाताने ग्लास उचलून पाणी प्यायल्या.

गेले चार दिवस गुड फ्रायडे आणि आणि काल इस्टर मंडे असल्याने मी त्यांना गुरुवारीच भेटलेले होते, त्यांना इस्टरच्या शुभेच्छा देऊन घरी गेले, ते आजच भेटले होते. त्यांनी मला इस्टरची सुट्टी कशी गेली, हे विचारलं. मी ही सगळी लॉंग विकेंडची गंमत जंमत त्यांना सांगितली. त्या खूप गोड हसल्या.

मी त्यांना सांगितलं, "गेले आठवडाभर मी इकडच्या अनुभवांवर डायरी लिहिते आहे आणि तुम्ही माझ्या आज्जी नं 1 आहात. तुम्हाला मी आजच हे नाव दिलंय. खरं नाव लिहायची परवानगी नाहीये, म्हणून लिहू शकत नाही मी" मला मधेच तोडून त्या म्हणाल्या, माझं नाव लिहू शकता तुम्ही.."

मी हसले आणि बोलणं सुरुच ठेवलं, "मला जॉईन होऊन बरोबर एक महिना झाला आणि तुम्ही माझ्या पहिल्या आज्जी होतात, हे तर तुम्हाला आठवतच असेल ना?" त्यांनीही होकारार्थी मान हलवली.

मी त्यांना सांगितलं, "तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही मला माझ्या आज्जीसारख्या आहात आणि तुम्हाला खरं सांगू का, दिसतासुद्धा तुम्ही तिच्याच सारख्या.. दोन दिवसांनी माझ्या आज्जीला जाऊन बरोबर 5 वर्षे होतील.. तुमच्यात मला तीच दिसते कायम.. मला तिची फार आठवण येते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. तुम्हाला असं बेडवर पडलेलं पहायची मला सवय नाही.."

त्या पुन्हा गोड हसल्या आणि मला नेहमीप्रमाणे म्हणाल्या, "तुमच्यात एक चमक आहे सुंदर" आणि आज अजून एक गोष्ट म्हणाल्या, "तुमचे पांढरेशुभ्र दात तुमच्या डार्क स्किनवर किती सुंदर शोभून दिसतात, तुमचे काळेभोर डोळे आणि काळे केस.. तुम्ही एखाद्या सुंदर बाहुलीसारख्या दिसता.."

मी आज्जींना म्हणाले, "तुमच्या हया कॉम्प्लिमेंट्स मला अख्ख्या दिवसासाठी पॉझिटिव्ह एनर्जी देतात.. तुम्ही लवकर बऱ्या व्हा." करोनामुळे जवळ जाऊन हात हातात घेऊ शकत नसल्याने मी त्यांच्या पांघरुणातल्या पायांवरून हात फिरवला. नेहमीप्रमाणे त्या मला 'आलेस गुटे" म्हणाल्या आणि मी त्यांचा निरोप घेतला, उद्या भेटायच्या बोलीवर..

मग बाकीच्या आज्जी आजोबांना भेटायला गेले आणि लंच ब्रेक झाल्यावर बॉसला फोन केला.. नेहमी त्यांचं ऑफिसचं दार उघडं असतं, आज बंद होतं, नेहमी आम्ही एकत्र जेवत असतो, म्हणून बोलवायला कॉल केला, तर त्या म्हणाल्या, "तू जेव, आम्ही(त्या आणि अजून दुसरी कलीग) नंतर येतो." आज पहिल्यांदाच एकटी जेवत होते. म्हणून जेवता जेवता थोडा डायरीचा भाग लिहून काढला.

माझं जेवण झाल्यावर मी उठले, तर तिकडे बॉस आलेल्या. "तुझं जेवण झालेलं असलं, तरी जरावेळ बसशील का आज आमच्याबरोबर?" असं मला म्हणाल्या. मला वाटलं, सहजच बसायला बोलवत आहेत. म्हणून मीही बसले. तर त्यांनी मला न्यूज दिली. आज्जी नं 1 गेल्या..... मी जेंव्हा त्यांना जेवायला बोलवण्यासाठी कॉल करत होते, त्यावेळी नुकतंच हे घडलेलं होतं.. हे घडण्याच्या बरोबर पाऊण तास आधी मी आज्जींना भेटलेले होते, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं अवघडच होतं..

माझं आज्जींसोबतचं कनेक्शन माझ्या बॉसना माहिती असल्याने त्यांनी मला आधी जेवू दिलं आणि मग ही न्यूज दिली. मला भरपूर रडू दिलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला. मला आज्जींना शेवटचं बघायचं आहे का, विचारलं. मी हो म्हणाले. केअर युनिटच्या 4-5 जणींच्या टीम सोबत मला त्यांच्या रूममध्ये पाठवलं. आज्जी एका पायात सॉक्स घातलेल्या आणि दुसऱ्या पायात घालायचा आहे, अशा स्थितीत उघडे डोळे आणि तोंड अशा स्थितीत बसलेल्या होत्या. जणूकाही माझ्याकडे बघत होत्या.

"त्यांच्या कपाळावरून मी हात फिरवू का?" विचारलं, केअर युनिटने परवानगी दिल्यावर मी ते केलं.. माझ्या आज्जीला मी शेवटची भेटू शकले नाही, तिला हात लावू शकले नाही.. माझी ही इच्छा आज पूर्ण झाली...

माझा जॉब सोपा नाही, हे माहिती होतंच, पण इतका अवघड आहे, माहिती नव्हतं, ते आज प्रकर्षाने जाणवलं आणि मी इमोशनली असं इतकं कनेक्ट होणं बरोबर नाही, माहितीये मला.. पण पहिली वेळ आहे. होईल सवय हळूहळू..

आयुष्य हे एक रंगमंच आणि त्यातील आपण सगळ्या कठपुतळ्या, हे 'आनंद' सिनेमातलं राजेश खन्नाच्या तोंडचं वाक्य आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.. आता आजचा दिवस काम करणं शक्य नाही. म्हणून आता घरी निघालेय. हे प्रेशर सहन होत नसल्याने, लिहून वाट करून दिली.

सर्वांना सॉरी आणि थँक्यू सुद्धा.. आपली सुखं आणि दुःख आता एकच झाली आहेत, नाही का?
टेक केअर ऑल!!

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१४.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग १०

थँक्यू डियर ऑल.. आता मी खूपच सावरले आहे. आजचा दिवसच तसा होता. अतिशय वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला..
माझा आणि आपल्या सर्वांचाच मूड लाईट आणि हॅपी व्हावा असा माझा आजचा दिवस फार सुंदर गेला.
आज इतके अनुभव आलेले आहेत की किती लिहू आणि किती नको, असे मला झालेले आहे, पण रात्र थोडी आणि सोंगं फार, अशी माझी अवस्था झालेली आहे. आजचा लेख फार मोठा झाल्याने आणि ट्रॅमच्या प्रवासात संपू शकला नसल्याने घरी आल्यावर थोड्या थोड्या कामानंतर कन्टीन्यू केला आणि तरीही सगळ्या दिवसाचा वृत्तांत इच्छा असूनही पूर्ण करू शकलेले नाहीये.

आज ऑफिसला गेल्या गेल्या कलीगने सांगितले की तुझ्या लाडक्या आज्जींचे 2 फ्रेंड्स ह्या बिल्डिंगमध्ये होते, ज्यांना त्यांच्या जाण्याचा खूप त्रास झालेला आहे. तू त्यांच्याशी बोलू शकतेस जाऊन. त्यांनी त्या दोघांची नावं सांगितली आणि ती नोट करून घेऊन मी त्यांना भेटायला निघाले. त्यातले एक होते त्यांचे शेजारी आजोबा, म्हणजे त्यांच्या समोरच्या रूममध्ये राहणारे आणि दुसऱ्या होत्या, एक आज्जी ज्या त्यांच्या मिस्टरांबरोबर इथे आहेत.

आजोबांच्या खोलीकडे जात असतांना समोर बघितलं, तर आपल्या लाडक्या आज्जींचा गोड हसरा फोटो एका स्टूलवर ठेवलेला होता. खाली छान कव्हर अंथरलेलं होतं. फोटोजवळ प्रसन्न फुलं एका फ्लॉवरपॉट मध्ये ठेवलेली होती आणि समोर एक वही होती, ज्यात आज्जींचा फोटो एका बाजूला चिटकवलेला, त्याखाली एक सुंदर काव्यमय सकारात्मक संदेश आणि दुसऱ्या बाजूला आज्जींची जन्मतारीख आणि जाण्याची तारीख लिहिलेली होती आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून बऱ्याचशा लोकांनी आपापली नावं लिहिलेली होती. त्यात मी ही माझे नाव लिहून आले. त्या वहीतली अलीकडची पानं चाळली, तर त्यात आज्जींच्या वाढदिवसाच्या दिवशीही असाच त्यांचा एक फोटो डावीकडे आणि खाली छान मेसेज, उजवीकडे शुभेच्छुकांची नावं लिहिलेली होती. त्या अलिकडेही अशीच बरीच पानं होती. मला एकदम भरूनच आलं. मी काही मग ते वाचायला गेले नाही. तडक समोरच्या रूममधल्या आजोबांकडे गेले.

आजोबा खुर्चीवर बसलेले, खिडकीकडे चेहरा आणि टेबलवर काहीतरी लिहीत बसलेले होते. त्यांना विचारलं, येऊ का गप्पा मारायला? आमची ओळख तर आधीच झालेली होती. हे आजोबा म्हणजेच मागे मी एका भागात उल्लेख केलेले- त्यांचे घर संस्थेपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असूनही बिल्डिंगला लिफ्ट नसल्याने आणि ते पहिल्या मजल्यावर राहत असल्याने रोज व्हीलचेअर कशी खालून वर नेणार आणि रोजची मेडिकल हेल्प लागत असल्याने त्यांच्याहून ५ वर्षांनी लहान बायको कशी मॅनेज करणार, म्हणून इकडे गेल्या २ वर्षांपासून राहत आहेत. त्यांची बायको रोज दिवसभर त्यांच्या सोबत आणि झोपायला घरी जात असे. करोनामुळे दोघांची महिनाभरापासून भेट नाही. रोज फोनवर बोलतात. व्हिडीओ कॉल चे सुचवले होते मागच्याच भेटीत, पण दोघांनाही त्यातलं कळत नाही, म्हणून करू शकत नाही म्हणाले होते.

आजोबांशी आज बोलायला सुरुवात केली. आज्जी नं 1 ची आठवण काढली. आजोबा म्हणाले, "समोरच्याच रूममध्ये असल्याने येता जाता भेट व्हायची, गप्पा व्हायच्या. माझ्या शेजारच्या दोन्ही बाजूच्या रूममधले शेजारी गेलेच होते, आता समोरच्याही गेल्या.. सिनियर केअर होममध्ये आल्यावर आता हे अपेक्षितच आहे."

मी आजोबांना माझ्या आणि आज्जींच्या जुळलेल्या ऋणानुबंधाविषयी सांगितल्यावर आणि मला आज्जी माझ्या आज्जीसारख्या होत्या सांगितल्यावर ते म्हणाले, "आई वडिलांचे मुलांशी नाते वेगळे, ज्यात जबाबदारी असते, पण आज्जी आजोबा आणि नातवांचे नाते वेगळेच असते ना? माझेही आज्जी आजोबा आता या जगात नाहीत पण मला त्यांची फार आठवण येते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण मुलाने लग्न केले नाही आणि मुलीला मूल झाले नाही, त्यामुळे मी आजोबा होऊ शकलो नाही." मला अगदी भारतीय आज्जी/आजोबांशी बोलतेय, असा भास झाला, हे ऐकतांना..

बोलता बोलता त्यांच्या हातांकडे मी बघत होते. त्यांच्या नसा पारदर्शक हातांतून दिसत होत्या. मी सहज त्यांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि मी माझ्या आज्जीच्या सुरकुत्या असलेल्या स्किनशी खेळायचे, त्याची आठवण सांगितली, तर त्यांनीही आपल्या आज्जीच्या आठवणी सांगितल्या. ते विचारत, "तुला अशा सुरकुत्या कशा गं?" त्यावर त्यांची आज्जी म्हणायची, "वय झालं की सर्वांना येतात, तुलाही येतील" मग म्हणाले, "आता मला सुरकुत्या आहेत, पण त्या दाखवायला आज्जीच नाही माझी.."

माणसाचं वय कितीही झालं, तरी तो आपल्या लहानपणीच्या आठवणीतच रमतो नाही का? आणि आज्जी आजोबांसोबतचं आपलं नातं कायमच स्पेशल असतं, हो ना?

आजोबांनी मग त्यांच्या आज्जीच्या कितीतरी आठवणी सांगितल्या.. त्यांची आज्जी जमीन खोदून त्यात रोप लावत असे, आणि हे आजोबा ते उखडून टाकत असत, मग आज्जी सांगे, नको असं करुस, याच्यापासून पुढे झाड निर्माण होईल, मग ते तिचं ऐकत. अशा बऱ्याच आठवणींमध्ये ते रमले..

त्यांना निरोप दिल्यावर ते म्हणाले, तुम्ही येत जा माझ्याकडेही आता, जसे आज्जींकडे जात असत. त्या क्षणी आजोबांचा चेहरा निरखून बघितला तर ते मला माझ्या आजोबांसारखेच भासले, चेहरा अगदी तसाच! (वडिलांचे वडील) आणि तेही माझ्या आजोबांप्रमाणेच sudoku कोडे सोडवत बसलेले होते! ह्यांना आता आपण आजोबा नं 2 म्हणूया!

मग दुसऱ्या आज्जींकडे गेले, ज्या आज्जी नं 1 ची मैत्रीण होत्या. त्या तिसऱ्या मजल्यावरच्या आज्जी. त्या आपल्या मिस्टरांबरोबर रूममध्ये होत्या. आमची भेट आधी एकदा झाली होतीच. त्यांनी दोघांनी शेजारी शेजारी दोन रूम्स घेतलेल्या असून एकीचे हॉल आणि दुसरीचे बेडरूममध्ये रूपांतर केलेले आहे. ह्या आजोबांना डीमेन्शिया असून ते शांतपणे नुसतेच बसून असतात. बोलत काहीच नाहीत. आज्जी आजोबा गेल्या ७० वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत, हे आज्जींनी सांगितलं. त्यांची एकुलती एक मुलगी काही वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली. आज्जींनी सांगितले, आज्जी नं 1 माझी जुनी मैत्रीण. आम्ही सोबत कॉलेजला जायचो, इतकी जुनी मैत्रीण..आज्जींच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या मैत्रिणीच्या आठवणीने. मग वेगवेगळ्या विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आणि मी त्यांचा निरोप घेतला. ह्यांना आपण आज्जी नंबर 3 म्हणूया. आज्जी नं. 3 आणि आजोबा नं. 2 सोबत मी आज आज्जी नं 1 मुळे नकळत जोडली गेले..

आज मी अजून काही आज्जी आजोबांना भेटले आणि त्यात मागे उल्लेख केलेल्या लायब्रेरियन आज्जीही होत्या. त्यांच्या प्रेमकहाणीत आज मी कबुतराची भूमिका बजावली, त्याची अतिशय लांबलचक आणि सुरस कथा पुढच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
१५.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ११

आता मी पुढे काल घडलेला अतिशय गोड प्रसंग सांगणार आहे.

आज्जी नं. 1 च्या मित्रपरिवाराला भेटल्यानंतर मग मी ज्यांचा उल्लेख पहिल्या भागात केलेला आहे, त्या लायब्रेरियन आज्जींकडे सहज चक्कर मारली. त्यांचे मिस्टर दुसऱ्या मजल्यावर आणि त्या तिसऱ्या, असे का? हे मागे विचारले असता ऍडमिनिस्ट्रेशनच्या कलीगने सांगितले होते की आजोबा बेड रीडन आहेत आणि सतत त्यांना डॉक्टर, नर्स व्हिजिट सुरू असतात, त्यात आज्जींना डिस्टर्ब होऊ शकते, म्हणून ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आहेत.

ह्या आज्जी स्वतःसुद्धा बेडवरच दिसल्या मागच्या भेटींमध्ये. मात्र त्या सावकाश आणि वॉकरच्या आधारे चालू शकतात. त्यांचं जेवण मात्र त्यांच्या खोलीत त्यांना मिळत असतं.

काल भेटायला गेल्यावर, "मी तुम्हाला आठवतेय का?" विचारल्यावर आज्जी बेडशेजारच्या कॉर्नर टेबलवर ठेवलेली मासिकं, पेपर आणि पाकिटांचा गठ्ठा चाळायला लागल्या. त्यातून एक A-4 साईझचं पांढरं पाकीट बाहेर काढून त्यावर काहीतरी लिहिलेलं वाचू लागल्या. म्हणाल्या, "स की ना". मी जवळ जाऊन बघितलं, तर मीच मागच्या भेटीत तिथे मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, "SAKINA". आज्जींना माझं नाव नीट कळत नव्हतं, म्हणून त्यांनी मला ते त्या पाकिटावर लिहून त्यांना दाखवायला लावलेलं होतं आणि ते पाकीट त्यांनी अजूनही सांभाळून ठेवलेलं होतं!!!

सगळी ख्याली-खुशाली विचारून झाल्यावर मी आज्जींना विचारलं, "तुम्ही आजोबांना भेटलात का एवढ्यात?" तर त्या रडायलाच लागल्या. "मला भेटायचं आहे त्यांना", म्हणाल्या. पण मला ते कोणत्या मजल्यावर आहेत आणि कुठल्या रूममध्ये आहेत, हे काही आठवत नाहीये, म्हणाल्या. मी त्यांना म्हणाले, थांबा मी त्यांचा रूम नं. लिहून आणून देते तुम्हाला. सर्व्हरवरून आजोबांचा डेटा चेक करून त्यांचा रूम नं. मी आज्जींना आणून दिला. त्या तो नंबर पाठ करायला लागल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसत होतं. मी एकटी तिथे कशी जाऊ, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मी त्यांना म्हणाले, चला आज्जी, मी घेऊन जाते तुम्हाला त्यांच्याकडे. त्यांना वॉकरच्या आधारे खालच्या मजल्यावर नेलं, तर केअर युनिटच्या मुलीने आम्हाला हटकलं. "आज्जी त्या आजोबांना नाही भेटू शकत", म्हणाली. मी विचारलं, "का?" तर तिने सांगितलं, "तिला आज्जींची मेडिकल कंडिशन माहिती नाही, उगाच एकमेकांचा आजार एकमेकांना नको पसरायला.."

मला आणि आज्जींनाही अर्थातच वाईट वाटलं. इतक्या दिवसांनी- किती ते मला माहिती नाही, आजोबांच्या दरवाजाजवळ येऊनही त्यांची भेट होऊ शकली नाही. आज्जींना पुन्हा ३ऱ्या मजल्यावर त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले, तर त्या रडायलाच लागल्या. माझ्या मिस्टरांना माझे ग्रिटींग्ज कळव, म्हणाल्या. मी "हो" म्हणून "ताबडतोब तुमचा निरोप कळवते", असं सांगून तडक आजोबांना भेटायला गेले. आजोबा झोपलेले होते, म्हणून तिथेच उभी राहिले जरावेळ. त्यांची डोळे मिटलेल्या स्थितीतच हालचाल दिसल्यावर हळूच "हॅलो" म्हणाले, तर आजोबा जागेच होते!

त्यांना त्यांच्या बायकोचा निरोप दिल्यावर ते म्हणाले, "ती मला कधी येईल भेटायला? मला तिची आठवण येतेय. माझी बहीणही आज येणार होती भेटायला, तीही अजून आलेली नाही." (अतिशय आजारी रहिवाश्यांसाठी नियम थोडे शिथिल केलेले असल्याने आजोबांची बहीण रोज तिकडे येते आणि काही तास सोबत राहून घरी जाते, असं नंतर कळलं.)

मला फारच वाईट वाटायला लागलं, ह्या जोडप्याच्या ताटातूटीविषयी कळल्यावर.. आजोबा म्हणाले, "बायकोला माझेही ग्रिटींग्ज कळव." त्याक्षणी माझ्या डोक्यात कल्पना आली, आजोबांना आज्जींसाठी एक पत्र लिहायला लावायचे, तेवढीच आज्जींजवळ त्यांची आठवण. मग मी पेपर पेन घेऊन आले आणि त्यांना आज्जींना पत्र लिहायला लावले. आजोबांनी थरथरत्या हाताने काहीतरी खरडलं, जे अजिबात वाचता येत नव्हतं. मी त्यांना काय लिहीलंय, ते वाचून दाखवायला लावलं. त्यांनी जर्मनमध्ये लिहिलेल्या मजकुराचं भाषांतर असं, " प्रिय.. (आज्जींचं प्रेमाचं नाव) मला तुझी फार आठवण येतेय, लवकर भेटायला ये" मी ते नीट अक्षरात त्यांच्या मजकुराखाली लिहिलं आणि त्याखाली कालची तारीख टाकून आजोबांना सही करायला लावली.

मग आज्जींकडे तो पेपर घेऊन गेले. तर आज्जींना रडू अनावर झालं. आज्जींना म्हणाले, "तुम्हालाही पत्र लिहायचंय का आजोबांना?" आज्जी लगेच तयार झाल्या. थरथरत्या हातानेच पण अतिशय सुवाच्य अक्षरात त्यांनी जर्मनमध्ये उत्तर लिहिलं. त्याचा अनुवाद, "माझ्या लाडक्या.. (आजोबांचं नाव) मलाही तुला भेटायची फार इच्छा आहे. माहिती नाही कधी भेटता येईल. लव्ह यू. तुझीच.. (आणि त्यांचं टोपणनाव)

जाऊन मी ते पत्र लगेच आजोबांना देऊन आले. आजोबा कितीतरी वेळ पत्राकडे बघतच बसले. आजोबांना निरोप देऊन मी निघाले.

मला फार अस्वस्थ वाटत होतं. मी तिकडे एका क्लिनिंगस्टाफपैकी एकीला भेटले. तिला सगळं सांगितल्यावर ती म्हणाली, मास्क घालून तरी भेटू द्यायला हवं यांना.. मग मी स्टेशन हेड कडे गेले, त्याला सगळं सांगून मला दोन मास्कस दे आज्जी-आजोबांसाठी, असं सांगितलं, तर त्याने ते लगेच दिले.
पण त्याच वेळी लंचब्रेक झालेला असल्याने मी जेवून आज्जींकडे जायचे ठरवले.

लंचब्रेकमध्ये बॉससोबत बोलणं झालं. त्या म्हणाल्या, उगाचच अडवलं स्टाफने तुला. आज्जी आजोबांना एकमेकांना भेटायला मास्कचीही गरज नाही. ते इथेच तर राहतात! कुठे बाहेरही जात नाहीत. काही संसर्गजन्य आजारही नाही त्यांना. तू जा घेऊन आज्जींना आजोबांकडे. पुढच्यावेळी तुला काहीही शंका आली, तर लगेच मला कॉल करून क्लियर करून घे. मला हे ऐकून अर्थातच फार आनंद झाला.

मग जेवण झाल्यानंतर लगेचच मी आज्जींच्या खोलीत गेले. तिकडे त्यांची नणंद आलेली होती. मी त्यांना सगळी हकीकत सांगून "आज्जींना आजोबांकडे न्यायला आले आहे, तुम्हीही चला, तुमचा भाऊ तुमची वाट बघतोय", सांगितलं, तर त्या म्हणाल्या, "मला एकावेळी एकाच्याच जवळ थांबायची परवानगी आहे" मला ह्या अशा मजेशीर नियमांचे कारण काही कळले नाही. मी लगेच बॉसना फोन करून विचारले, तर त्यांनी विचार करून सांगितले, ठीक आहे, भेटू दे तिघांना एकत्र..

मग खरंतर माझं काही तिकडे काम नव्हतं, पण तुलाही सोबत यायचंय का, असं आजोबांच्या बहिणीने विचारल्यावर मी, "हो" म्हणाले. "माझं तिकडे काही काम नाही, पण मला तुमचं सर्वांचं रि-युनियन बघायचं आहे", असं म्हणून सोबत गेले. आजोबांच्या खोलीत पोहोचल्यावर आज्जींनी आजोबांना खूप उत्कटतेने खूप खूप कीसेस दिले.

आजोबा म्हणाले, किती छान, तुम्ही दोघी आलात. आज्जींनी मला सांगितलं की ही दोघं जुळी भावंडं आहेत.
मला तिथे इतकं छान वाटत होतं की पूर्णवेळ तिथेच थांबावंसं वाटत होतं, आज्जी आजोबा आणि बहिणीच्या गप्पा ऐकत. त्यांचा मायेचा ओलावा अनुभवत.. पण मी तिकडून थोड्यावेळाने निघाले. बाकीची आज्जी आजोबांना भेटायला हवे होते ना!

मी निरोप घेतल्यावर आज्जी आजोबांनी मला खूप वेळा थँक्यू म्हणून मला निरोप दिला. आज्जींनी पुन्हा एकदा काल मला खूप फ्लाईंग किसेस दिले. अशाप्रकारे मी काल कबुतर झाले! मानसिकरित्या प्रचंड थकवणारा आणि तरीही खूप समाधान देणारा हा जॉब आहे, याची परत एकदा जाणीव झाली.

दोन जवळच्या, एकाच गावात राहणाऱ्या दोन मैत्रिणींची अनेक वर्षांनी सिनियर केअर होममध्ये भेट झाली, त्यांची गोष्ट आणि अजून काही आज्जी आजोबांची गोष्ट उद्याच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१६.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग १२

आज्जी नं 1 गेल्या, त्या दिवशी सकाळी मी त्यांना भेटून झाल्यावर दुसऱ्या एका आज्जींना भेटले होते. ह्या त्याच आज्जी, ज्यांना उल्लेख मी मागच्या एका भागात केलेला आहे. ज्यांना पहिल्या भेटीत मी विचारले होते, "तुम्हाला इथे कसे वाटते?" ज्यावर त्यांचे उत्तर होते, "Wie ein urlaub" म्हणजेच "सुट्टीचा आस्वाद घेते आहे, असे फीलिंग" हया पॉझिटिवीटीने ओतप्रोत भरलेल्या आज्जींची रूम एका विशिष्ट कॉर्नरला येत असल्याने त्यांना आणि त्या बाजूला राहणाऱ्या प्रत्येक फ्लोअरवरच्या सर्वांना एक advantage आहे, तो म्हणजे बाहेर एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत. तिथेच मागे पॅसेजची कॉर्नरची खिडकी आहे. तिथून ह्या सीझनमध्ये सकाळचं कोवळं ऊन येत असतं. त्यामुळे त्या कायम रूमबाहेरच्या खुर्चीवर बसून बाहेरचं दृश्य बघत बसलेल्या असत. मी व्यायाम म्हणून लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये जा करत असतांना त्या मला येता जाता दिसायच्या.

अचानक एक दिवस त्या काही दिवस बाहेर दिसेनाश्या झाल्या. म्हणून त्यांच्या रूमकडे बघितले, तर त्यावर 'आयसोलेटेड' चा बोर्ड चिटकवलेला होता. मी ऍडमिनिस्ट्रेशनच्या कलीगला विचारले, "काय झालेय फ्राऊ (मिसेस)... (त्यांचे नाव) यांना? तर त्यांनी सांगितले, त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या काही कारणाने, त्यामुळे त्यांना क्वारंटाईन मध्ये ठेवलेले आहे, सुरक्षिततेच्या कारणाने..त्यांना काहीच झालेले नाहीये. करोना टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आलेली आहे त्यांची.."

कायम बाहेरच्या खुर्चीवर बसणाऱ्या आज्जींना आता कोंडून घावे लागलेले असल्याने मला तिकडून जातांना कायम वाईट वाटत होतं. मी त्यांच्याशी पहिल्यांदा गप्पासुद्धा त्या सिटिंग कॉर्नरवरच मारलेल्या होत्या.

त्या दिवशी त्यांच्या दारावरचा 'आयसोलेटेड' लिहिलेला बोर्ड काढलेला दिसला, म्हणून त्यांना रूममध्ये भेट दिली. त्यांची रूम अतिशय सुंदर लावलेली होती. छान फर्निचर, टेबलवर सुंदर फुलं, खिडकीतून मस्त view.. आणि त्या स्वतःसुद्धा रेडिएटिंग ब्यूटी.. मला प्रेमाने "बसा" म्हणाल्या.. "तुम्हाला मी काय देऊ बरं?" असं म्हणून उठून एक चॉकलेट दिलं खायला. माझ्या फॅमिलीविषयी चौकशी केल्यावर मला एक छोटा लेक आहे म्हटल्यावर इस्टर असल्याने त्यांनीही नीलसाठी एका टिश्यूत गुंडाळून ईस्टरबनी चॉकलेट मला दिलं.

मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांना आयसोलेटेड असतांना काही त्रास झाला असेल, असं मला त्यांच्याकडे बघून वाटलं नाही. त्यांचे मिस्टर ७७ साली वारले, मूल नाही.. त्यांच्या वयाचे डिटेल्स चेक करायचे विसरले मी. पण ८५ च्या आसपास असणार, हा माझा अंदाज.. कॉन्टिनेन्टल मध्ये नोकरी केलेल्या अनेक आज्जी आजोबांपैकी ह्या ही एक.

त्यांना विचारलं, इकडे काही ओळखी-मैत्री वगैरे झाली का कोणासोबत? तर त्यांनी सांगितलं, इकडे मला माझी अतिशय जुनी मैत्रीण भेटली." जुनी म्हणजे किती जुनी? तर त्या स्वतः १९ वर्षांच्या असतांना ह्या दोघी डान्सला एकत्र जात असत, इतकी जुनी मैत्री! दोघी एकाच गावात अनेक वर्षं राहिलेल्या.. नंतर त्यांचा काही कारणाने संपर्क तुटला. नंतर ह्या आज्जी ३ वर्षांपूर्वी इकडे संस्थेत आल्यानंतर त्यांच्या फ्लोअरवर त्यांनी नाव वाचलं आणि त्यांना सुखद धक्काच बसला. नावं एक असू शकतात, मात्र व्यक्ती वेगळी असू शकते, हा विचार करून त्यांनी चेक केलं, तर खरोखरच ती त्यांची मैत्रीणच निघाली!!

त्यांच्या मैत्रिणीचं नाव त्यांनी सांगितल्यावर मला आठवलं, ह्या सुद्धा एक अतिशय पोझिटीव्ह थिंकिंग असलेल्या आज्जी आहेत. ह्या आठवड्यातून ३ दिवस डायलिसिससाठी हॉस्पिटलमध्ये जात असतात. प्रत्येक डायलिसिस सेशन ५ तासांचे असते. "बाकी काही त्रास नाही, पण ते ५-५ तास नुसतंच पडून राहणं भयंकर कंटाळवाणं आहे", असं त्यांनी मागच्या भेटीत सांगितलेलं होतं.

इथे कशी सर्व्हिस आहे, विचारले असता, "फार छान काळजी घेतात माझी.. इकडे एक छोटीशी क्लिनिंग गर्ल येते, ती मला इतरही मदत करते. मी तिला प्रेमाने "माझी छोटीशी क्लिनिंग गर्ल" अशीच (जर्मनमध्ये) हाक मारते, म्हणाल्या.

"जेवण आवडतं का इथलं?" , विचारल्यावर. "कधी छान असतं, कधी नसतं.." म्हणाल्या. पण पुढे म्हणाल्या, "पण खरं सांगायचं, तर त्या बाबतीत माझी काही तक्रार नाही.. घरी तरी आपण काय रोज रोज बेस्टच बनवून खातो का? ते शक्य तरी असतं का?" अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघणाऱ्या आज्जी ह्या दुसऱ्या गोड आज्जींच्या जुन्या मैत्रीण आहेत, हे समजल्यावर मला कधी त्यांना भेटून मला कळलेली माहिती देते, असं झालं होतं.. पण दुर्दैवाने आज्जी नं.1 त्या दिवशी गेल्याची बातमी मिळाल्यामुळे मी त्यानंतर कोणालाच भेटले नव्हते.

दुसऱ्या दिवशी मात्र मी त्यांना आवर्जून भेटले. त्याही मागच्या वेळेप्रमाणेच फ्रेश-मूडमध्येच होत्या. हसऱ्या खेळकर.. बाकी काही न बोलता, डायरेक्ट मी त्यांच्या सख्ख्या मैत्रिणीला भेटल्याचे सांगितले. तर त्या एकदमच खुलल्या आणि जुन्या आठवणींत रमल्या.. "ही मुलगी माझ्यापेक्षा वयाने मोठी.. निर्वासित म्हणून जर्मनीमध्ये आलेली. देश कोणता, ते नाही आठवत. पण माझी छान मैत्रीण झालेली. आम्ही अगदी जवळ-जवळ राहायचो. हे दोघं नवरा बायको आणि मी, माझी मुलगी आणि नवरा.. मी माझ्या मुलीला शाळेतून घेऊन येतांना ही खिडकीतून बघायची आणि आम्ही गप्पा मारायचो. कधी ती खिडकीत आली नाही, तर माझी लेक विचारायची, "का गं आज खिडकीत ती मावशी नाही?"

आम्ही दोघी एकाच ट्रेनने रोज हॅनोवर शहरात यायचो. ती तिच्या कंपनीजवळच्या स्टेशनवर आणि मी माझ्या प्रिंटिंगप्रेसच्या जॉबला दोन स्टेशन पुढे उतरायचे. मला चांगले आठवतेय, आमची ट्रेन सकाळी ६.०२ ची असायची, पण ही आता म्हणतेय, नाही गं ६.०३.. आम्ही दोघी अशा जुन्या आठवणींना उजाळा देत इथे रमतो.."

अशाप्रकारे आज्जींनी माझ्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. म्हणाल्या, "मला मुलांची फार आवड..पण माझी मुलगी मला वयाच्या ३९ व्या वर्षी झाली. मला अजून मुलं हवी होती, पण नाही होऊ शकली. पण हरकत नाही, माझा जावई अगदी माझ्या लेकासारखाच आहे. माझ्यावर आईप्रमाणे प्रेम करतो. मुलगा आणि लेक म्हणतात, "आई तू का तिकडे संस्थेत राहतेस? इथेच रहा ना आमच्यासोबत."

"त्यांचं घर पहिल्या मजल्यावर आहे आणि खाली गार्डन. मी वर चढू शकत नाही, तर "खाली आपण तुझ्यासाठी रुम्स बांधूया.", असं म्हणतात. पण मीच नाही म्हणते. ते दोघं दिवसभर काम करणार आणि मी एकटीच तिकडे राहून काय करू? इकडे चार माणसांमध्ये माझं मन रमतं.."

"माझा एक गोड नातू आहे १९ वर्षांचा. तो घरापासून एक तास अंतरावर असलेल्या युनिव्हर्सिटीत शिकतोय. रोज २ तास प्रवासात घालवून घरी झोपायला येण्यापेक्षा त्याला आम्ही सुचवलं, तिकडेच रहा, त्या वाचलेल्या वेळेत अभ्यास कर.. मित्र-मैत्रीणी जमव. सोशलाईझ कर.. तो शुक्रवारी घरी येतो, रविवारी परत जातो. सगळे मला जमेल तसे भेटायला येतात, मला फिरायला, जेवायला घेऊन जातात अधूनमधून.."

आज्जींच्या गप्पा ऐकायला मला फार मस्त वाटत होतं. त्यांनाही खूप छान वाटलं गप्पा मारून, असं त्यांनी सांगितलं. करोनामुळे घरच्यांच्या भेटी बंद झालेल्या आहेत. पण आम्ही फोनवर रोज बोलतो, असं त्यांनी सांगितलं..

अतिशय समाधानी, गप्पीष्ट आणि प्रेमळ अशा दोन मैत्रिणींना भेटून माझा जीवही सुखावलेला होता. परत येते भेटायला, असं सांगून मी आज्जींचा निरोप घेतला आणि दुसऱ्या आज्जी-आजोबांना भेटण्यासाठी बाहेर पडले.

उद्या अशाच दोन पण संस्थेत मैत्री झालेल्या मैत्रिणींची गोष्ट सांगते.

~ सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१७.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग १३

कालच्या भागात सांगितलेल्या सुंदर कॉर्नरसाईडलाच पण दुसऱ्या मजल्यावरच्या एक आज्जी आणि त्यांच्या मैत्रिणीची गंमतीशीर गोष्ट आज सांगते.

त्या कॉर्नरला राहणाऱ्या आज्जींशी माझं एकदाच बोलणं झालेलं होतं. त्या कायम फिरताना दिसतात, पण पॅसेजमधल्या कॉर्नरचेअरवर विशेष बसत नाहीत.
एकदा मला त्या चेअरवर बसलेल्या दिसल्या. छान लाईट पर्पल कलरचा पुलोव्हर घातलेल्या, गळ्यात मोत्याची माळ आणि कानातही मोत्याचे कानातले. सुंदर, फ्रेश दिसत होत्या. अतिशय हसऱ्या आणि गोड आज्जी..

मी त्यांना विचारलं, "कशा आहात?" तर त्या म्हणाल्या, "मी ठिके, पण ही मोत्याची माळ मानेला काचते आहे." मी म्हणाले, "काढून ठेवा ना मग! मी करू का मदत काढायला?" तर त्या म्हणाल्या, "नको नको! माझे मिस्टर म्हणायचे, गळ्यात माळ नसेल, तर काहीच नाही घातलं, असं वाटतं.." (त्याचा मतितार्थ गळा ओकाबोका दिसतो, असा असावा, असं वाटतं.. ) थोडावेळ गप्पा मारल्यावर तिकडे एक केअर युनीटची मुलगी आली आणि आज्जींना भलत्याच नावाने हाक मारून त्यांच्या जवळ येऊन आपण कसं मांजराला कुरवाळतो, तसं करायला लागली. मला म्हणाली, "ह्या आज्जींना (फ्राऊ.. पुन्हा भलतंच नाव) हे असं केलेलं फार आवडतं." आज्जींनीही तिला 'माझं नाव का चुकीचं घेतलंस" असं करेक्ट वगैरे केलं नाही.

त्या दोघींच्या थोडावेळ गप्पा झाल्यावर ती मुलगी गेली आणि मी आज्जींना विचारलं, "हिने तुम्हाला वेगळ्याच नावाने का हाक मारली?" तर त्या म्हणाल्या, तेच तर माझं नाव आहे!" मी गोंधळात पडले. मी म्हणाले, "सॉरी, मी तर तुम्हाला फ्राऊ.. (त्यांचे नाव) समजत होते." त्या हसायला लागल्या आणि म्हणाल्या, ती तर रुममध्येच आहे अजून. मी तिचीच वाट बघत बसलेय इथे. दुपारच्या कॉफीब्रेकसाठी आम्ही दोघी सोबत जात असतो, ती अजून बाहेर आली नाही, जरा जाऊन बघतेस का?" मी "हो" म्हणून त्यांच्या खोलीत गेले, तर त्या आज्जी त्यांचा चष्मा शोधत बसलेल्या होत्या. "मी मदत करू का?", विचारले असता, त्या "हो" म्हणाल्या आणि मी त्यांची सगळी रूम पिंजून काढली, तरी सापडेना!

काहीतरी गडबड आहे, हे बघून त्यांची मैत्रीण आत आली आणि तिला काय झालंय ते सांगितल्यावर तिने सांगितलं, "अगं, आपण लंचला गेलेलो असतांना टेबलवर विसरली असशील, चल आपण तिकडे डायनिंग हॉलमध्ये चेक करू. आम्ही तिघी तिकडे गेलो, तर तिकडेही दिसला नाही, म्हणून केअर युनिटच्या एका मुलीला विचारलं तर तिने सांगितलं, "कालच ह्या आज्जींचा चष्मा तुटला म्हणून त्यांच्या मुलाला रिपेअर करायला दिलेला आहे. त्या विसरलेल्या दिसतात.."

आज्जींना हे काहीच आठवत नव्हतं.. आज्जींना त्यांचा चष्मा लवकर मिळो, हीच प्रार्थना मनातल्या मनात करून मी तिकडून बाहेर पडले. त्यांना सोबत करणाऱ्या मैत्रीण आज्जीसुद्धा सकारात्मक व्यक्तिमत्त्व आहेत. वय वर्षं ९३, पण वॉकर सोडता त्यांना बाकी काही त्रास नाही..

ज्यांना ज्यांना मी भेटते, त्यांच्यासोबत झालेल्या गप्पांमधला व्यक्तिगत भाग सोडता महत्त्वाचे ओब्झर्व्हेशन्स मला सर्व्हरवर रेकॉर्ड करायचे असतात रोज. जसे, त्यांचा ओव्हरऑल मूड कसा होता, त्या/ते डिप्रेशनमध्ये तर नाहीत ना? त्यांच्यात सुसाईडल टेंडन्सीज तर नाहीत ना? काही अलार्मिंग असेल, तर तो भाग. हे सगळे मी कामाचा भाग म्हणून रोज लिहिते पण याशिवाय माझ्या पर्सनल रेकॉर्डसाठी दर भेटीत आमच्या काय काय गप्पा झाल्या, त्या बोलून झालं की लगेचच ऑफिसमध्ये जाऊन आठवेल, ते सर्व लिहून काढते आणि मगच दुसऱ्या आज्जी आजोबांना भेटायला जाते, जेणेकरून दुसऱ्यांदा सेमच व्यक्तीला भेटल्यावर मागच्या गप्पांचा संदर्भ लक्षात असावा आणि गप्पांना एक दिशा मिळावी. शिवाय कोणाचे मिस्टर, मुलं, भावंडं काही कारणाने वारलेले असतील आणि तो भाग त्यांच्यासाठी सेन्सिटिव्ह असेल, तर आपल्याकडून चौकशी करतांना, गप्पा मारतांना ते उल्लेख टाळून वेगळे काही विचारले जावे. चुकूनही आपल्याकडून ती व्यक्ती दुखावली जाऊ नये...

ज्या आज्जींना मी केवळ कॉर्नर टेबलवर बसलेल्या असल्याने भलत्याच समजून बसले होते, त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीतल्या गप्पा त्यांना दुसऱ्यांदा भेटून झाल्यावर लगेच जाऊन वाचल्या, त्यात मी लिहिलेले होते, "ह्या आज्जींच्या रुममध्ये त्यांच्या नातीच्या लग्नाचा फोटो लावलेला आहे. त्या फोटोविषयी त्यांनी एक गोड आठवण मला सांगितली. तो फोटो हॅनोवर शहरातल्या एका प्रसिध्द बागेतला आहे. ही बाग वेडिंग फोटो शूटसाठी प्रसिद्ध आहे. (मी ही मागे तिकडे आई बाबा इकडे जर्मनीत आलेले असतांना त्यांच्यासोबत गेलेले होते आणि दोन जणांचे वेडिंग फोटोशूट तिकडे सुरू होते.) त्या फोटोमागे एक कारंजा आहे. आज्जींनी त्यांचे स्वतःचे वेडिंग फोटोशूट सेमच जागी केलेले होते. त्यांनी नातीलाही तिकडे एक फोटो काढायला लावला आणि त्यांच्या रूमच्या एका भिंतीवर तो लावला."

अजूनही बाकी नोंदी त्यात होत्या, जसे- "आज्जींना ३ मुली आहेत. त्या पैकी एक दुसऱ्या एका केअर होममध्ये नोकरी करते. आज्जी तिथेच होत्या आधी. पण मुलगी तिकडे नोकरीसाठी जॉईन झाल्यावर त्या म्हणाल्या, मी काही आता इकडे राहणार नाही. कारण माझी मुलगीच तिथे म्हटल्यावर मला सारखे तिला भेटत राहावेसे वाटेल. सतत तिच्याजवळ माझ्या तक्रारी, कुरबुरी करण्याचा मोह होईल, तिची मदत घेत राहावीशी वाटेल. तिच्या कामात तर त्यामुळे व्यत्यय येईलच, पण माझीही डिपेंडन्सी वाढेल.. नकोच ते! म्हणून मी इकडे शिफ्ट झाले.. ब्युटीपार्लरसाठी मात्र मी अजूनही तिकडेच जाते." (सिनियर केअर होम्समध्ये असे पार्लर्स इमारतीतच उपलब्ध करून दिलेले असतात आणि सर्व आज्जी आजोबा अगदी टिपटॉप ठेवतात स्वतःला. छान केस कापलेले असतात, मस्त मेकप आणि ड्रेसिंग केलेले असते. एक तर बेड रिडन आज्जी आहेत, त्यांनी मस्त चमकदार ऑरेंज कलरचा आय मेकप केलेला होता.)

मी पुढे आज्जींनी काय सांगितले, ते लिहिलेले होते, "हे दुसरे सिनियर केअर होम अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे लेक वरचेवर भेटायला यायची, मला फिरायला, रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जायची. पण आता सगळं बंद झालंय ह्या करोनापायी.. कधी भेटू आम्ही आता?"

ह्या आज्जींचीही गोष्ट बऱ्यापैकी कालच्या भागातल्या आज्जींसारखीच आहे ना? मला खरोखर कौतुक वाटलं या आज्याचं.. किती तो समजूतदारपणा आणि सकारात्मकता.. आपलंही वय झालं की आपलंही मन असंच समजूतदार होऊ दे.. हीच प्रार्थना मी मनोमन केली..

दुसऱ्या काही आज्जी आजोबांची गोष्ट उद्याच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१८.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग १४

(मला काही दिवसांपूर्वी दोन जणांनी ह्या आज्जी आजोबांचे खरे नाव सांगता येत नसेल तर काहीतरी काल्पनिक नाव दे, त्याने वाचायला मजा येईल, असे सांगितले होते, पण तसे केल्याने आणि मला त्यांची खरी नावं माहिती असल्याने माझा गोंधळ उडतो आणि मग माझा लिहिण्याचा फ्लो तुटतो, म्हणून मी हे करायला नकार दिला होता. आज पुन्हा एका वाचकाकडून तेच फार इन्सिस्ट करून सुचवले गेले, तेंव्हा मी एक आयडिया केली. आधी सगळा भाग लिहून घेऊन मग शेवटी प्रत्येकी एकेक काल्पनिक नाव ऍड केले आहे. आशा करते, सर्वांना हे लेखनशैलीतील बदल आवडतील.)

तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्यावरच्या कॉर्नरच्या सकारात्मक आज्यांची आणि त्यांच्या मैत्रिणींची गोष्ट सांगितली आहेच, तर त्याच ओघात पहिल्या मजल्यावरच्या आज्जींची गोष्ट सांगून मग रूम शेअर करणाऱ्या दोन आजोबांची गोष्ट सांगते.

रोजच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला- सर्व एम्प्लॉईजना इमेल चेक करणे कंपल्सरी असते. त्यातून कोण नवीन रेसिडेंट्स आले, त्यांचे नाव, रूम नंबर, कोण संस्था किंवा हे जगच सोडून गेले, कोण डिमेन्शिया वॉर्डमध्ये शिफ्ट केले गेले. आज काही मिटिंग्ज वगैरे असतील, कोणाचा वाढदिवस असेल आणि त्यांनी काही ट्रीट्स आणल्या असतील, तर सर्वांनी प्लिज त्याचा आस्वाद घ्यावा, अशाप्रकारच्या माहितीचे मेसेजेस असतात.

तशा एका इमेलमधून समजले की एक नवीन आज्जी इकडे दाखल झालेल्या आहेत. त्यांना आपण फ्राऊ ष्टाईन म्हणू, अर्थातच हे त्यांचे खरे आडनाव नाही. हे एक कॉमन जर्मन आडनाव आहे. ष्टाईन आज्जी म्हणजे इथल्या टेम्पररी रेसिडेंट.. आठवडाभराच्या पाहुण्या आणि मग घरी परत जाणाऱ्या. रुममध्ये त्यांना भेटायला गेल्यावर त्या अगदी वैतागलेल्या दिसल्या. "कशा आहात फ्राऊ ष्टाईन?" विचारले असता, "माझी पाठ भयंकर दुखते आहे. पेनकिलर्स घेतले, तरी थांबत नाहीये." म्हणाल्या.

मग त्यांना त्यांच्या मजल्यावरच्या केअर युनिट स्टेशनवर घेऊन गेले. तिथे एक केअर युनिट एम्प्लॉयी कॉम्प्युटरवर काहीतरी काम करत होता. त्याला आज्जींची कंडिशन सांगितली आणि फिजिओथेरपी ऍरेंज करता येईल का, असे विचारले, तर म्हणाला, "हो, त्यांची पाठ फार दुखते आहे, म्हणून पेनकिलर्स देतो आहोतच, पण ते अती घेणेही हानिकारक आहेच. फिजिओथेरपीसाठी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन मिळाले की ते ही ऍरेंज होईल." त्याला "Danke schön" म्हणजेच जर्मनमध्ये "थँक्स" म्हणून आज्जींना पुन्हा त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले.

मग त्यांना विचारले, "इकडे कशा आलात?" तर त्यांनी सांगितले, "बरं वाटत नसल्याने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. तिकडून आता इकडे आठवडाभरासाठी अंडर ओब्झर्वेशन ठेवलेले आहे. हे सगळे एकदम अचानक घडले. माझे धुवायचे कपडे घरी वॉशिंग मशीनमध्ये पडून आहेत. मला कधी घरी जाऊ, असे झालेले आहे."

"तुम्हाला कोणी नातेवाईक आहेत का?" विचारल्यावर, "एक मुलगा, एक डॉक्टर मुलगी आणि जावई आहे", म्हणाल्या. "तुम्ही एकत्र राहता का?", विचारल्यावर, "नाही." म्हणाल्या. "तुम्हाला इकडे बरे वाटतेय का? सर्व्हिस चांगली मिळतेय का?", विचारल्यावर, "हो, ते सगळं ठीक आहे, पण पाठच फार दुखते आहे आणि मला कपडे धुवायचे आहेत घरी जाऊन", असे पुन्हा एकदा म्हणाल्या.

मी आज्जींना म्हणाले, "फ्राऊ ष्टाईन, कपडे मुलांना धुवायला सांगता येईल का, ते विचारा आणि तुम्ही आधी थोड्या रिलॅक्स व्हा.. स्वतःला खूप अवघडून घेतले, तरी सुद्धा दुखणी जास्त जाणवतात. थोडावेळ पाठदुखी आणि कपडे, तुमचं घर, याकडे दुर्लक्ष करून इथे सुट्टीसाठी आला आहात, असे मानून इथे राहण्याचा आनंद घेता येईल का, ते बघाल का? इथल्या लोकांच्या ओळखी करून घ्या. खाली गार्डनमध्ये फिरा, ऊन, मोकळी हवा घ्या. मस्त खा, टीव्ही बघा, वाचा, काही छंद असतील तर सांगा, मी व्यवस्था करते त्यासाठी लागणारे मटेरियल आणून द्यायची." आज्जी "हो हो" म्हणाल्या खऱ्या, पण त्यांच्या मनातली अस्वस्थता तशीच होती, हे चेहऱ्यावर जाणवत होते.

आज्जी येता-जाता चालतांना दिसल्या दोन तीनदा. घरी परत जाण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा दिसल्या. पुन्हा अस्वस्थच होत्या. मला पाहताच म्हणाल्या, " मी उद्या इकडून घरी परत जाणार आहे, तर इकडून टॅक्सी ऍरेंज होणार आहे की माझ्या मुलाला घ्यायला बोलवायचे आहे, याची जरा चौकशी करता का?" मी त्यांना म्हणाले, "ह्या गोष्टी रिसेप्शन काउंटरला विचाराव्या लागतील. चला, आपण तिकडे जाऊन विचारुया." तिकडे चौकशी केल्यावर कळले, की आज्जी आपल्या मुलाला बोलवू शकतात, त्याला जमत नसेल, तर टॅक्सी ऍरेंज करून दिली जाईल, पैसे मात्र त्यांना द्यावे लागतील."

मग आज्जींना "तुम्ही एकट्या खोलीत जाल का? की मी येऊ सोडायला?" विचारल्यावर "जाते मी एकटी" म्हणाल्या. पहिल्या दिवशीची अस्वस्थता अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर तशीच होती.. उद्या त्या आपल्या घरी जातील, त्यांचा कम्फर्टझोन त्यांना सापडेल आणि लवकर बरं वाटेल, अशी आशा आणि प्रार्थना करून मी दुसऱ्या रहिवाश्यांकडे जायला निघाले.

त्यानंतर मी कोणाला भेटले, ते नाही आठवत, पण आता ३ आज्यांनंतर २ आजोबांविषयी सांगावे, म्हणून एक दिवस ज्या दोन आजोबांना भेटले, त्यांच्याविषयी आता सांगते. हे दोन आजोबा रूम शेअर करतात. एक बेड रिडन आहेत आणि दुसरे सतत फिरायला गेलेले असतात. बेड रिडन आजोबांना आपण हेर वेबर नाव देऊ या आणि फिरतीवरच्या आजोबांना हेर झिलिन्स्की म्हणूया. (हेर आणि फ्राऊ म्हणजे श्री आणि श्रीमती, हे लक्षात आलं असेलच.)

जितक्या वेळा मी वेबर आणि झिलिन्स्की आजोबांच्या रूममध्ये गेले, तितक्या वेळा वेबर आजोबा कायम झोपलेले तर झिलिन्स्की आजोबा कायम बाहेर गेलेले, त्यामुळे दिसलेच नाहीत, त्यामुळे झिलिन्स्की आजोबा नेमके कोण, हे मला बरेच दिवस कळले नाही.

एक दिवस त्यांच्या रूममध्ये गेलेले असता, तिकडे एक नर्स मुलगा त्यांच्या सलाईन्स बदलत होता, त्यामुळे ते जागे होते. त्याचे काम होऊन तो बाहेर गेला, त्यानंतर मी आजोबांशी बोलायला सुरुवात केली. "गुटन मॉर्गन(गुड मॉर्निंग) हेर वेबर! कसे आहात?" तर तोंडात एकही दात नसलेले कृश शरीरयष्टीचे वेबर आजोबा त्यांचं बोळकं दाखवत हसले. "मी छान आहे", म्हणाले.

त्यांच्या खोलीत त्यांच्या बेडमागे अनेक लहान मुलांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता आणि त्यात एक ३-४ वर्षांचा हाफ पॅन्ट आणि शर्ट घातलेला गोड मुलगा छोटीशी सायकल हातात घेऊन उभा होता. "ह्या फोटोत तुम्ही आहात का, हेर वेबर?" विचारले असता ते बेडवर पडूनच मागेही न बघताच म्हणाले, "हो!" तो सायकल हातात धरलेला मुलगा मी. आम्ही एकूण दहा भावंडं होतो. आम्ही स्वतःला वेबर बँड असं अभिमानाने म्हणायचो. काय सुंदर दिवस होते ते!" आता सगळं संपलं.. असं म्हणून जुन्या आठवणींमध्ये रमले.

"तुम्ही कुठे जॉब करायचात?", विचारले असता, "एका कंपनीत कन्स्ट्रक्शन इंजिनिअर होतो", म्हणाले. त्यांच्याशी गप्पा मारत असतांना काहीतरी बोलले त्यावर ते "ओके!" म्हणून फार गोड हसले. त्यांची मिसेस काही वर्षांपूर्वी वारली असून सहज ती सुद्धा जॉब करायची का, हे विचारले असता, "त्याची तिला गरजच नव्हती. मी पुरेसे कमवत होतो आणि गरजा आपण वाढवू तेवढ्या वाढत जातात. तिने माझ्या दोन मुलांचा आणि घराचा सांभाळ केला, हेच खूप काम झालं", असं म्हणाले. मला कोण्या भारतीय आजोबांशी तर आपण गप्पा मारत नाही आहोत ना? असा भास झाला हे ऐकून..

आमच्या गप्पा सुरूच होत्या, तोवर एक मस्त हसरे, त्या क्रोएशियन आजोबांसारखेच उंच, धिप्पाड आणि मस्त ड्रेस अप केलेले एक आजोबा खोलीत आले. त्यांना बघितल्याबरोबर मी त्यांना ओळखलं. हे आजोबाही क्रोएशियन आजोबांसारखेच बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर कायम गार्डनच्या स्मोकिंग कॉर्नरला असायचे. हेच ते झिलिन्स्की आजोबा, हे मला त्या दिवशी समजले.

झिलिन्स्की आजोबांना म्हणाले, "हॅलो! हेर झिलिन्स्की! तुमच्याशी गप्पा मारायला कितीवेळा तुमच्या रूममध्ये डोकावून गेले, पण तुम्ही कधी दिसलाच नाहीत. आत्ताच वेबर आजोबांशी गप्पा मारल्या, तुमच्याशीही बोलायला, ओळख करून घ्यायला आवडेल." त्यावर ते हसून म्हणाले, "हो हो! जरूर! या बसा. आणि त्यांच्या बेडशेजारच्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. वेबर आजोबांना गप्पा मारण्याबद्दल आभार मानून मी झिलिन्स्की आजोबांशी गप्पा मारायला सुरुवात केली.

मुळचे पोलंडचे असलेले हे आजोबासुद्धा इंजिनियरच, मात्र ब्रिज कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जॉब करत होते. त्यांच्या मिसेस काही वर्षांपूर्वी गेल्या आणि त्यांना एक मुलगा असून तो पोलिस आहे. आधी जर्मनीमध्ये पोलिस म्हणून जॉब केल्यानंतर एकदा तो कॅनडा देश बघायला गेला, तर तिकडेच त्याला त्याची जीवनसाथी सापडली आणि मग तो तिकडेच मूव्ह झाला. कॅनडातही पोलिस म्हणूनच आता तो जॉब करतोय. वर्षातून दोनदा वडलांना भेटायला तो येत असतो.

झिलिन्स्की आजोबांनी मग मला मी बसले होते, त्या मागच्या भिंतीवर चिटकवलेले वॉलपीस दाखवले. ते वॉलपीस म्हणजे एक ब्लॅंकेट होते, ज्यात एक अस्वल आई बाबा आणि मुलं असं चित्र होतं. हे चित्र त्यांच्या मुलाने कॅनडातल्या एका जंगलात काढून त्याचं प्रोसेसिंग केलेलं होतं आणि ब्लॅंकेटवर शिवून घेतलेलं होतं. पण ते अंगावर न घेता कायम दिसेल असं त्याच्या वडिलांनी भिंतीवर लावलेलं होतं.

ह्या आजोबांनी माझ्या सोबत खूप खूप भरभरून गप्पा मारल्या, मला कॉम्प्लिमेंट्सही दिल्या दिसण्यावरून, माझ्या स्माईलवरून आणि स्वभावावरून. मी ही त्यांना म्हणाले, "हेर झिलिन्स्की, तुम्ही सुद्धा किती हँडसम आहात." तर ते हसून म्हणाले, "खरंच? पण मी किती म्हातारा आहे!" मी म्हणाले, "छान दिसणं हे काही वयावर थोडीच अवलंबून असतं?" हे ऐकून त्यांना फार मस्त वाटल्याचं जाणवलं मला. गप्पा झाल्यावर निरोप दिल्यावर माझे त्यांनी भेटायला आल्याबद्दल आभार मानले आणि परत भेटायला ये, असेही ते म्हणाले. हे आता आजोबा बरेचदा गार्डनमध्ये दिसतात. आता आमची ओळख झालेली असल्याने आम्ही नियमितपणे हवापाण्याच्या गप्पा मारतो.

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंकवर क्लिक करा.
https://sakhi-sajani.blogspot.com

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१९.०४.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग १५

डियर ऑल,
मी माझे अनुभव लिहायला सुरुवात केली, माझी व्यक्तीगत डायरी म्हणून! रोज घरी आईबाबांना फोन केला, तरीही तितकं बोलायला वेळ मिळत नाही. अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात.
नीलचा जन्म झाल्यावर मी पूर्णवेळ घरीच होते. तो आता थोडा मोठा झाला आणि मला काही तास मोकळे मिळायला लागल्यावर, एखादा कोर्स करूया असं ठरवलं. आणि मनातही नसतांना मला जॉबच्या ऑफर्स यायला लागल्या... मी interview ला गेले आणि निवड झाली...

इतकं एकामागुन एक घडलं सगळं की मला विचार करायलाही संधी नाही मिळाली...

रोज बरीच धावपळ असते... घरचं, नीलचं सगळं आवरून ऑफिस गाठायचं, ऑफिसची चेकलिस्ट पूर्ण करायची आणि मग निघायचं...बराच डेटा मेंटेन करावा लागतो .. मी रुळतेय अजून. आत्ता फक्त एक महिना पूर्ण झालाय..

डायरी लिहायला घरी वेळ नाही मिळत म्हणून प्रवासात अर्ध्या तासात लिहिते. घरी गेले की घरची खूप कामं असतात. नीलला वेळ द्यायचा असतो. अजून लहान आहे तो.
माझे अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर केले की छान वाटतं.

बरीच suggestions ही येतात, पण डियर फ्रेंड्स मला आत्ता माझ्या flow ने लिहिणंच शक्य आहे. तसा कमी वेळ मिळतो मला डायरी लिहायला. अनुभव लिहून ठेवणे हेच प्रयोजन आहे सध्या.

थोडा निवांत वेळ मिळाला की ज्या काही गोष्टी सुचवल्या आहेत, त्यांचा नक्की विचार करेन मी!

सगळ्या आज्जी-आजोबांना नावं टोपणनावं दे, ही प्रतिक्रिया विचारात घेऊन मी प्रयत्नही केला तसं लिहिण्याचा, पण मला इतकी नावं देऊन ते references manage करणं सध्या अवघड आहे.

भविष्यात नक्की आवश्यक ते सगळे बदल करेन... तर आता मी माझ्या जुन्या लेखनशैलीकडे परत जातेय. म्हणजेच आज्जी आजोबांना कोणतेही काल्पनिक नाव न देता त्यांना फक्त आज्जी आजोबा असेच जनरल संबोधून फार फार तर काही विशेषणे द्यायचा प्रयत्न करेन, जसे लायब्रेरियन आज्जी, क्रोएशियन आजोबा, काल नावं दिलेल्या आज्जी आजोबांना दिलेल्या नावांनीच संबोधून ज्यांना नंबर दिलेत, त्यांना नंबर राहू देईन.

ज्यांचा संदर्भ आधी दिलेला आहे, त्यांचा परत एकदा उल्लेख करतांना त्यांचा शॉर्ट इन्ट्रो देईन, जेणेकरून वाचकांना मागे जाऊन वाचत बसावे लागणार नाही, संदर्भ लावत बसावा लागणार नाही, याची काळजी घेईन..

****************************************

मी जॉब करत असलेल्या सिनियर केअर होममध्ये जे आज्जी आजोबा आयसोलेटेड वॉर्डमध्ये आहेत, त्यांना करोना प्रकरण गंभीर वळण घेण्यापूर्वी मी भेटले होते, त्या दोन आजोबांपैकी एकाची गोष्ट आज सांगते. त्यापैकी पहिले आहेत इराणी आजोबा आणि दुसरे आहेत जर्मन आजोबा.

माझा जॉब सुरु झाला, त्या दिवशी स्टाफ मेम्बरने मला समजावून सांगितलेल्या गोष्टींपैकी एक होती, ती आयसोलेटेड वॉर्डमध्ये जातांना आणि जाऊन आल्यावर स्वतःची काळजी कशी घ्यायची.

अशा रुम्स ओळखायच्या कशा? तर ज्या रुम्स आयसोलेटेड आहेत, त्यांच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो. त्यावर (जर्मन भाषेत)लिहिलेले असते की रूम व्हिजिट करण्यापूर्वी केअर युनिटच्या एम्प्लॉयीजना भेटा. मास्क, ग्लोव्हज आणि एप्रन घालूनच खोलीत प्रवेश करा. त्या रुम्सच्या बाहेर बाजूला भिंतीला लागून एक रॅक ठेवलेली असते, तिच्यात एक डिसइन्फेक्टन्ट असलेली बाटली अडकवून ठेवलेली असते, एक मास्कस असलेला बॉक्स, घड्या घालून ठेवलेले, संपूर्ण शरीर कव्हर करतील असे कॉटनचे एप्रन्स आणि ग्लोव्हज असतात. आयसोलेटेड व्यक्तींना भेटून झाल्यावर त्यांच्या दरवाजाजवळ असलेल्या एका बकेटमध्ये एप्रन टाकायचा आणि शेजारी असलेल्या कचऱ्याच्या डब्यात ग्लोव्हज आणि मास्कस टाकायचे, मग दार उघडून बाहेर येऊन पुन्हा दार लावून घ्यायचे आणि भरपूर डिसइन्फेक्टंटने योग्य पद्धतीने हात आणि मनगट डिसइन्फेक्ट करायचे. माझ्या बॉसने इंटरव्ह्यूच्या दिवशी मला हात कसे धुवायचे आणि कसे डिसइन्फेक्ट करायचे, याचं ट्रेनिंग दिलं होतं.

आधीच बाहेर करोना आणि संस्थेत दुसऱ्या आजाराने आयसोलेट केले गेलेले आज्जी आजोबा, असे दुहेरी रिस्क फॅक्टर्स असतांना माझे मन काही ह्या रुम्समध्ये एन्ट्री करायला धजावत नव्हते. पण दुसरीकडे मात्र एक मन खात होते की ज्यांना गरज आहे, त्यांच्या जवळ आपण असायला हवे. पण स्वतःचा आणि पर्यायाने इतरांचा जीव धोक्यात टाकून खरोखरच हे करण्याची गरज आहे का? असे दुसरे मन मला जाब विचारत होते.

अशा द्विधा मनस्थितीत अडकलेले असतांना समोरून एक केअर युनिटची एम्प्लॉयी आली. तिला मी माझी मनोवस्था बोलून दाखवली. ती म्हणाली, "मानसिक आधाराची सगळ्यात जास्त गरज तर त्याच लोकांना आहे, असं मला वाटतं.." ते ऐकून माझं मन एकदम क्लियर झालं. केअर युनिटमध्ये जाऊन मी त्या इराणी आजोबांना भेटायचा माझा मानस सांगितला. तर एक आफ्रिकन वंशाचा एम्प्लॉयी म्हणाला, "तुला खरंच त्यांना भेटायचं आहे का? हा माणूस म्हणजे चेटकीणीसारखा आहे.." हे ऐकून मी एकदम चमकलेच! त्या एम्प्लॉयीशेजारच्या जर्मन एम्प्लॉयी मुलीने त्यावर ताबडतोब प्रतिक्रिया दिली, "हे हे! हे आजोबा एक चेटकीणीसारखे तर मी दहा चेटकीणींसारखी आहे!!" मला काही संदर्भच लागेना!

मी विचारले, "म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? हे जादूटोणा वगैरे करतात की काय?" तर ही मंडळी म्हणाली, "नाही! नाही! पण ते जरा ऍग्रेसिव्ह होतात अधूनमधून. वेड्यासारखे वागतात, मारायला धावतात.." (आता अशा माणसाला कोणी चेटकीण म्हणतात का? मजेशीरच एक्सप्रेशन होतं ते) तुला खरंच फारच गरज असेल, तरच त्यांना भेट, असे इन्सिस्ट केल्यावर, "हो! गरज आहे", असे सांगून काय काळजी घ्यावी, ते पुन्हा एकदा समजून घेऊन, स्वतःला व्यवस्थित कव्हर करून धडधडत्या अंत:करणाने मी आजोबांच्या खोलीत शिरले. "मौत के कुवें मे" उतरतांना सर्कशीतल्या मोटरसायकलवाल्याला पहिल्यावेळी जे वाटत असेल, तसेच काहीसे फीलिंग मनात होते.

इराणी आजोबांच्या खोलीत शिरले आणि आत डोकावूनही न पाहता आणि दरवाजा न लावता कॉर्नरवरूनच "हॅलो" म्हणाले. आतून कृश "हॅलो" असे उत्तर आल्यावर हळूच डोकावून पाहिले, तर आवाजाप्रमाणेच कृश व्यक्तिमत्व अंग आखडून पांघरूण न घेता कुडकुडत पडलेले होते. "कसे आहात?" असे विचारल्यावर आजोबा गोड हसून कुडकुडतच "मजेत" म्हणाले. "थंडी वाजते आहे का?, अंगावर पांघरूण टाकू का?" विचारल्यावर होकारार्थी मान डोलवली त्यांनी. मग त्यांच्या अंगावर ग्लोव्हज घातलेल्या हाताने पांघरूण टाकून आणि तो पूर्ण वेळ मास्क घातलेला असूनही श्वास रोखून धरून मी पटकन दूर झाले.

पांघरुणाची ऊब मिळालेले आजोबा आता थोडे रिलॅक्स दिसत होते. आजोबांना मी काही जनरल प्रश्न विचारले, त्यांची त्यांनी तोंडातल्या तोंडात पुटपुटत उत्तरं दिली, जी मला अजिबात समजली नाहीत. त्या प्रश्नांनंतर त्यांनी जे बोलायला सुरुवात केली, ती बडबड अव्याहतपणे पुढचे पाच मिनिट सुरू होती. मला काही कळत नव्हतं, पण मी ऐकत मात्र मनापासून होते. त्यांचे ऐकता ऐकता त्यांच्या रूमचे निरीक्षण केले, तर माझ्या पाठीमागे, आजोबांच्या बेडच्यासमोर एक फोटो होता, जो त्यांना पडल्या पडल्या दिसेल, असा लावलेला होता. त्यांचा बोलण्याचा फ्लो ब्रेक करून मी त्यांना "हा फोटो कोणाचा?" असे विचारले असता, ते एकदम खुलले. "ही माझी फॅमिली. माझी बायको, जी या जगात आता नाहीये, माझी मुलं आणि नातवंडं", असं सांगून पुन्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटणे मोडवर गेले. आपल्या जगात हरवून गेले. त्यांना बोलत बसू देऊन साधारणपणे दहा मिनिटांनी मी आजोबांना "आता जेवणाचा ब्रेक होईल ना इतक्यात?" असे म्हणून, "तुम्हाला भेटून, तुमच्याशी गप्पा मारून खूप मस्त वाटलं", असं म्हणून त्यांचा निरोप घेतला. आजोबांनी "मला भेटायला आल्याबद्दल आभार" मानून आणि "आलेस गुटे" (तुझे सर्व छान होवो), अशा शुभेच्छा देऊन गोड हसत मला "बाय" म्हटले.

त्यांच्या खोलीत कॉर्नरला बादलीत माझे एप्रन आणि कचऱ्याच्या डब्यात माझे ग्लोव्हज आणि मास्क टाकून देऊन मी बाहेर आले. डिसइन्फेक्टंट घेऊन ते नीट हाताला चोळून पीसासारख्या हलक्या झालेल्या आणि समाधानी अंत:कारणाने मी दुसऱ्या आयसोलेटेड वॉर्डकडे जायला निघाले..

दुसऱ्या आजोबांची गोष्ट उद्याच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
२०.०४.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे ब्लॉगवर वाचता येतील.
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग १६

सिनियर केअर होममधल्या एक आयसोलेटेड रूममधून समाधानाने बाहेर पडल्यावर एखाद्या गोष्टीला आपण फार घाबरत असतो पण प्रत्यक्षात केल्यावर 'अरे! हे तर काहीच विशेष नव्हते. उगाचच आपण इतके घाबरत होतो' , असेच वाटले मला. अर्थातच यात रिस्कही येतेच. पण डॉक्टर ती रोज घेतातच ना? शिवाय त्यांचे काम खरोखरच चॅलेंजिंग, स्किलचे आणि रिस्कचेही असते, त्याची तर माझ्या रूमव्हिजिटशी आणि लांबूनच दोन शब्द बोलण्याशी काहीही तुलना नाही होऊ शकत.

त्या दिवशी रिस्क घेण्याचे मनावर घेतलेले असल्याने माझा तो विचार बदलण्याच्या आत मी दुसऱ्या आजोबांच्या खोलीतही सुरक्षिततेची सगळी तयारी करून गेले. तर ते जर्मन आजोबा इराणी आजोबांसारखे नव्हते. व्यवस्थित शुद्धीत होते. चांगल्या मनस्थितीत होते. त्यांचा एकच प्रॉब्लेम होता की त्यांना माझ्या तोंडावर मास्क असल्याने माझ्या ओठांची हालचाल दिसत नसल्याने मी बोलतेय, ते नीट समजत नव्हते. मी मोठ्याने बोलायचा प्रयत्न केला पण तरी त्यांना काही नीट कळलं नाही. जे काही थोडंफार समजलं, त्या माझ्या प्रश्नांची त्यांनी मला व्यवस्थित उत्तरं दिली. ह्या आजोबांची पत्नी काही वर्षांपूर्वी जिन्यावरून पडून मृत्यू पावलेली होती. त्यांना दोन मुलं असून त्यांचे आयसोलेशन बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याने ते प्रचंड वैतागलेले होते. त्यांना "टीव्ही बघता का? रेडिओ ऐकता का?" विचारल्यावर ते म्हणाले, "नाही. मला तो आवाज नको वाटतो. शांतपणे पडून रहायलाच बरे वाटते". "फक्त सगळे लोक मास्क घालूनच येतात, त्यांचा चेहराही बघायला मिळत नाही, याचेच जरा वाईट वाटते", अशी खंत व्यक्त केली.

मग मला म्हणाले, "तुम्ही तरी चेहरा दाखवाल का तुमचा?" मी पटकन मास्क बाजूला करून श्वास रोखून धरून त्यांना माझा चेहरा लांबूनच दाखवला आणि लगेच बंद केला. मग त्यांचा निरोप घेऊन, सगळे सेफ्टी सोपस्कार पार पाडून आणि दुसरा फ्रेश मास्क घालून पळतच ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसला गेले. तिकडे माझे उद्योग दोन्ही कलिग्जना सांगितले आणि माझी चूक झाली का? आता काय होईल? आजोबांना नेमका कोणता आजार आहे आणि तो कितपत संसर्गजन्य आहे या प्रश्नांचा धडाका लावला.

ऍडमिन कलीगने आधी मला शांत केले आणि म्हणाला की तू त्यांच्या पासून लांब होतीस ना? आणि ते खोकले किंवा शिंकले नाहीत ना? मी म्हणाले नाही, मग काही इश्श्यू नाही. मग त्याने मेडिकल डिपार्टमेंटच्या कोणालातरी फोन करून माझ्या उद्योगाची माहिती दिली आणि आजोबांचा आजार समजून घेतला. आजार खूप काही सिरीयस नाही, असे समजले तरी मी असे भावनेच्या बळी पडून पुन्हा काही वेडेपणा करू नये, हे मला सुचवण्यात आले.

त्यानंतर करोनामुळे नियम जास्त कडक झाल्याने मेडिकल आणि स्वच्छता या अत्यावश्यक गरजांशिवाय अशा आयसोलेटेड रूम्समध्ये जायचे नाही, असा नियमच आल्यामुळे माझे ह्या वॉर्डसमध्ये जाणे बंदच झाले. हे आयसोलेटेड आज्जी आजोबा कसे जगत असतील, त्यांना किती बोअर होत असेल, हा विचार तिकडून जातांना नेहमीच मनात येतो आणि वाईट वाटत राहते. त्यांच्या खोल्यांचा निदान काही भाग तरी काचेचा बनवला तर बरे! असे वाटते. अर्थात त्यांना खिडकीतून छान व्ह्यू दिसतो, हे ही नसे थोडके!

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
२१.०४.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंकवर क्लिक करा.
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग १७

आज्जी-आजोबांची डायरी: भाग १७

डियर ऑल,
१६ दिवसांनंतर काल पहिल्यांदाच डायरी पाठवण्यात एका दिवसाचा ब्रेक झाला. त्याला कारणच तसं घडलंय. ह्या सोमवारी नेहमीप्रमाणे मी सिनियर केअर होममध्ये गेले. मंडे ब्लूज नेहमीप्रमाणे होतेच. विकेंडच्या रिलॅक्सेशन नंतर सोमवारी कामावर जातांना आलेला थकवा आणि कंटाळा अंगात होताच. तरीही गेले. करोनानिमित्ताने दररोज टेम्परेचर चेक केले जाते, ते केल्यावर नेहमी 35 ते 36℃ असलेल्या टेम्प्रेचरमध्ये एका डिग्रीने वाढ झालेली दिसली. हार्मोनल कारणानेही ही वाढ असू शकते, पण रिस्क नको, म्हणून बॉसने घरी जाऊन दिवसातून 3 वेळा टेम्प्रेचर चेक करत रहा आणि नेहमीच्या लेव्हलवर उद्या नाही आले तर फॅमिली डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेऊन हा आठवडा घरी रहा, असे सांगितले.

मंगळवारीही तेवढेच टेम्प्रेचर असल्याने डॉक्टरांकडे गेले, त्यांनी चेक करून सांगितले, काहीही झालेले नाही, कामाचा थकवा असू शकतो. थोडी विश्रांती घेऊन तुम्ही पुन्हा कामावर जाऊ शकता. डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिले आणि आता मी लेकाबरोबर दिवसभर घरी आहे हा आठवडा आणि माझे लॉकडाऊन एन्जॉय करते आहे.

कित्येक दिवसांनी माझे जुने आरामशीर, माझा कम्फर्टझोन असलेले रुटीन मला परत मिळाल्याने खूप छान वाटते आहे. नीलचा बाबाही हाफ डे ऑफिस आणि हाफ डे वर्क फ्रॉम होम करतोय. त्यामुळे मी आणि लेकच घरी असतांनाचा माझा बराचसा वेळ लेकासोबत खेळणे, स्वयंपाक, जेवण, आवराआवरी, यात जात असून त्यानंतरचा वेळ नेटफ्लिक्सवर सिनेमे, सिरीज बघणे, यातच (मजेत) जातो आहे. 'मच नीडेड' असे अखंड रिलॅक्सेशन खूप दिवसांनी लाभलेले आहे.

त्यामुळेच ट्रॅममध्ये मिळणारा अर्ध्या तासांचा अखंड 'मी टाईम' मला आत्ता मिळत नसल्याने लिहायला लागले की काहीतरी कारणाने फ्लो ब्रेक होतो आहे.

हा आठवडाभर हीच परिस्थिती कायम राहणार असल्याने जमेल तसे आता यापुढे लिहिनच, पण गेले दोन दिवस थोड्या थोड्या ब्रेकने लिहिलेले आता पोस्ट करतेय.

******************************************
आयसोलेटेड रूम्समध्ये गेल्याने भीतीदायक फीलिंग आल्याचे दोन किस्से तर सांगून झालेले आहेतच, आज
नॉन आयसोलेटेड रूममधल्या एका आज्जींची गोष्ट सांगते, ज्यांच्या रुममध्ये जाताच मला भीती वाटली, कारण त्यांच्या रूमचा दरवाजा उघडताच मला दिसल्या बाहुल्याच बाहुल्या! लहानपणापासून पाहिलेल्या सिनेमांमधून अशा बाहुल्यांचे कनेक्शन ब्लॅक मॅजिकशी जोडले गेलेले पाहिल्याने साहजिकच भीती वाटली.

कारण त्यांच्या रूममध्ये शिरताच दाराजवळच्या कॉर्नरला हॅरी पॉटर मॅजिकल मूव्ही सिरीजमध्ये दिसणारा त्याच्या झाडूसारखा झाडू टांगलेला होता. कॉर्नरला जॅकेट्स आणि ड्रेसेस टांगून ठेवण्यासाठी बनवलेल्या फळीच्यावरही एक कोट सूट घातलेला बाहुला, अगदी जिवंत वाटेल असा उभा होता.. ह्या आज्जी ब्लॅक-मॅजिकवाल्या तर नाहीत? अशी शंका आली मला. एकदम चर्रर्रर्र झालं हृदयात.. आल्या पावली परत जावं, असं वाटायला लागलेलं होतं, पण असं बरं दिसणार नाही, हे लक्षात येऊन नाईलाजाने रूममध्ये गेले. शिवाय मनाला हेही समजवलं की आपण हे सगळं मानत नाही, तर घाबरण्याचं काय कारण? आपण एखाद्या घरात नसून संस्थेच्या एका रूममध्ये आहोत आणि या रूममध्ये दररोज क्लिनिंग स्टाफही येतच असतो. काही आक्षेपार्ह असतं तर एव्हाना सर्वांना कळलंच असतं.

"तुम्हाला बाहुल्या जमवण्याचा छंद आहे का?" असं विचारलं असता आज्जींनी हसून सांगितलं, "हो" आणि त्यांचा हा छंद माहिती असल्याने इतर काही आज्जींनी त्यांच्याकडच्याही बाहुल्या त्यांना भेट दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या रूममध्ये इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या बाहुल्या दिसल्या की त्यांना अक्षरशः ठेवायला जागा नाही. शोकेसमध्ये, टेबलवर आणि त्यांच्या बेडवरही कॉर्नरला लावून ठेवलेल्या आहेत. त्या कोणत्याही बाहुल्या त्यांना फेकून द्याव्याश्या वाटलेल्या दिसत नाहीत. आज्जी एकदम साध्या आणि फ्रेंडली होत्या, पण त्यांची रूम मात्र विचित्र वाटली मला खरोखरच.

जर्मन लोकांच्या काटेकोर स्वच्छ स्वभावाला अपवाद त्यांची रूम होती. बाहुल्यांशिवायही बाकी बराच पसारा होता खोलीत. एका बॉक्समध्ये घड्या न घालताच कोंबलेले भरपूर कपडे, टेबलवर मासिकं, वर्तमानपात्रांचा पसारा, असं सगळं होतं.

अशा विचित्र रूममध्ये राहणाऱ्या आज्जी दिसायला आणि बोलायला मात्र अतिशय साध्या होत्या.
व्हीलचेअरवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आज्जींच्या डोळ्यातील भाव लहान मुलांप्रमाणे निरागस होते.

आजारपणातून आलेलं थुलथूलीत जाडपण, हसऱ्या आणि गोड, स्वतःच्या बाहुल्यांच्या विश्वात रमलेल्या..त्यांचा चेहरा एकदम ओळखीचा वाटला मला. पाहिल्याबरोबर आठवलं, त्या कायम फिरत असायच्या आणि त्यामुळे मी त्यांना येता-जाता बघितलेलं होतं. भेटायला गेल्यावर त्या भरभरून बोलायला लागलेल्या होत्या, अतिशय फ्रेंडली आणि वेलकमिंग होत्या.

त्यांच्याशी बोलल्यावर समजलं की त्यांना 5 मुली असून त्या नवऱ्यापासून अनेक वर्षांपासून सेपरेटेड आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात बऱ्याच डिसॅबीलिटीज असल्याने त्यांना नोकरी वगैरे काही कधीच करता आलेली नाही.

गेल्या कित्येक वर्षात त्यांना त्यांच्या मुली भेटायलाही आलेल्या नाहीत आणि त्यांचा स्वतःचाही मुलींशी काही कॉन्टॅक्ट नाही. मधूनच विचित्र आणि मधूनच नॉर्मल असं वेगळंच फीलिंग मला त्यांच्या रूममध्ये येत होतं आणि त्या काय बोलतायत, त्यावरून माझं लक्ष सतत विचलित होत होतं.

दिसतं आणि आपल्याला वाटतं तसंच काही सगळं नसतं असं मनात घोकत मी शक्य तितकं नॉर्मल राहण्याचा आणि त्या काय सांगत आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिकडून लवकर बाहेर पडण्याची संधी शोधून पटकन बाहेर पडले. ह्या आज्जी मोस्टली रूमबाहेरच आपल्या व्हीलचेअरवरून फिरत असल्याने आणि आमची आता नीट ओळख झालेली असल्याने आम्ही बाहेरच गप्पा मारतो. पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाण्याची आणि गप्पा मारण्याची गरज मला अजूनतरी पडलेली नाही.

अशाप्रकारे मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीदायक अनुभवांना सामोरी गेलेय.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
२३.०४.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंकवर क्लिक करा.
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग १८

आज्जी-आजोबांची डायरी: भाग १८

सिनियर केअर होममधल्या करोना स्टेटसविषयी, त्यांनी कसे सेफ्टी मेझर्स घेतलेले आहेत आणि घेत आहेत, याविषयी लिहिले आहेच, आज थोडे बाहेरच्या जगाविषयी लिहिते.

खरं म्हणजे लॉकडाऊन सुरू व्हायच्या मोजून काही दिवस आधी माझा जॉब सुरू झालेला असल्याने तेच आता माझे जग झालेय. त्यामुळे बाहेरच्या जगाचे विशेष निरीक्षण आणि चिंतन माझ्याकडून घडलेले नाहीये. पण आता हा आठवडा घरी असल्याने त्याविषयी लिहिते.

विकिपेडियावरील माहितीनुसार जर्मनीत करोनाचा प्रवेश २७ जानेवारी २०२० या दिवशी झाला असून आत्तापर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या साधारणपणे १ लाख ५५ हजार आहे. बऱ्या झालेल्या लोकांची संख्या साधारणपणे १ लाख ३३ हजार आहे. करोना बळींची संख्या ५ हजार ७६० आहे.

मी राहते त्या जर्मनीतल्या हॅनोवर शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सगळ्यात मोठा बदल घडला, तो रस्ते अचानकपणे ओस पडले. सिटी सेंटर, जे लोकांनी खचून भरलेले असायचे, तिथे चिटपाखरूही दिसेनासे झाले. मी स्वतः लॉकडाऊन काळात जॉब ते घर असे डोअर टू डोअर सोडता कुठेही गेलेले नाही, पण माझ्या ट्रॅमरूटवर हे सिटी सेंटर येत असल्याने झालेले बदल ताबडतोब नजरेस आले.

लॉकडाऊन डिक्लेअर व्हायच्या आधी आणि नंतरही मी ट्रॅमनेच कामावर जात होते आणि आताही जातेय, फरक इतकाच की तेव्हा पाऊण ट्रॅम भरलेली असायची आणि आता मोजून ४-५ लोक एकेका कंपार्टमेंटमध्ये दिसतात. सगळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून वावरतात. जर्मनीच्या सर्व शहरांमध्ये ट्रॅम नेटवर्क नाही, हॅनोवरमध्ये मात्र ते आहे आणि ते अतिशय सोयीचे आहे.

पूर्वी दर नऊ मिनिटांनी असलेल्या ट्रॅम्सची फ्रिक्वेन्सी मात्र सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या दरम्यान दर १५ मिनीटांनी आणि बाकी वेळी दर अर्ध्या तासांनी, असा बदल गेल्या महिनाभरात झालेला आहे.

ट्रॅमचे तिकीट प्रत्येक स्टेशनवर असलेल्या तिकीट मशीनने काढता येते, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून जाऊन घेता येते.

पूर्वी ट्रॅमचे दरवाजे बटन दाबले की उघडत, आता ते सेटिंग बदलून आपोआप उघडण्याचे केले गेले आहे, जेणेकरून बोटाचाही स्पर्श पब्लिक प्लेसेसमध्ये लोकांना करावा लागू नये आणि संसर्ग टाळला जावा.

ट्रॅम ड्रायव्हरचे कंपार्टमेंट पूर्णपणे वेगळे आणि काचेची खिडकी असलेले असल्याने त्यात काही बदल झालेला नाही मात्र बसेसविषयी बातम्यांमध्ये कळले की ड्रायव्हर आणि पॅसेंजर्स यामध्ये प्लॅस्टिकचे पार्टिशन टाकलेले आहे. बसचे तिकीट ड्रायव्हर देत असतो, तर ते आता शक्य नसल्याने पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून मल्टीपल सिंगल किंवा महिन्याचे, वर्षाचे तिकीट काढून प्रवास करता येतो.

गेला दीड महिना तिकीट काढले आहे की नाही, हे तपासायला कोणीही आल्याचे मला दिसलेले नाही.

कपड्यांची, शूजवगैरेची दुकानं सगळीच बंद आहेत आता. फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानं उघडी आहेत, जसे खाद्यपदार्थ, घरात रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि मेडिकल स्टोअर्स.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात आता लवकरच लॉकडाऊन जाहीर होऊन अनलिमिटेड काळ घरात घालवावा लागणार, या विषयाची माहिती ऍडव्हान्समध्ये समजलेल्या काही लोकांनी पॅनिक झोनमध्ये जाऊन टॉयलेट पेपर्स, तांदूळ, नॉर्मल तापमानात खूप दिवस चांगले राहू शकणाऱ्या डेअरी उत्पादनांचा घरात साठा करायला सुरुवात केल्याने ते सेक्शन्स एकदम रिकामे झाले.

बाकी कशाहीपेक्षा टॉयलेट पेपर्स नसणे, हे भयंकर पॅनिक निर्माण करणारे झाले. कारण इकडे हातांचा वापर करून खाणे आणि धुणे हे अनसिव्हीलाईज आणि अस्वच्छ असल्याचे लक्षण मानले जाते. ती सवय अनेक पिढ्यांपासून आता प्रगत देशांमध्ये बंद झालेली आहे. पेपरच्या वापरानंतर टॉयलेट वेट वाईप्स म्हणजेच सॅनिटाईझींग लिक्विड असलेले आणि पाण्यात विरघळू शकणारे पेपर यांचा वापर करून पुसणे आणि मग व्यवस्थित हात धुणे, असं बरेचजण करतात. काही जणांच्या घरात धुण्यासाठी वेगळे छोटे बेसिन बघितले आहे. त्याला टेलिफोन शॉवर जोडलेला असतो.

पब्लिक कमोडवर काही ठिकाणी वापरानंतर ती रिंग आपोआप सॅनिटाइज करण्याची सोय केलेली आहे, जिथे ती नाही, तिथे बसतांना बसण्याची रिंग टाकल्यावर बसण्याचा भाग टॉयलेट पेपर्सने बरेचजण कव्हर करतात. म्हणजे आधीच्या माणसाच्या स्किनवरील बॅक्टेरियाज आपल्या शरीरात जाण्यापासून रोखता येतील. अशाप्रकारे टॉयलेट पेपर्स हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.

तुलनेने देशात नव्याने आलेल्या माझ्या काही अरबी आणि भारतीय फॅमिली फ्रेंड्सने मात्र आपापल्या देशांतून जेट स्प्रे आणून टॉयलेटमध्ये बसवण्याचे स्मार्ट काम केलेले आहे आणि आपले काही देशी मगाचाच वापर करत असल्याचे या निमित्ताने कळले, त्यामुळे त्यांच्याकडे याबाबतीत पॅनिक परिस्थिती निर्माण झाली नाही.

इकडे टॉयलेट पेपर या थीमवर भरपूर जोक्स सोशल मीडियावर आले या काळात. जसे "आपल्या मौल्यवान वस्तू कारमध्ये दिसेल, अशा ठेऊ नका. काच फोडून चोरीला जाण्याची भीती" आणि त्या सोबत टॉयलेट पेपर रोल कारच्या खिडकीतून दिसेल असा एक फोटो..

ह्याच दरम्यान माझ्या बॉसचा वाढदिवस होता तर त्यांना इतर गिफ्ट्ससोबत गंमत म्हणून सुंदर गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळून टॉयलेट पेपर देण्यात आला.

टॉयलेट पेपर्सच्या किमती दुपटीने वाढल्या असून ज्या कंपन्या त्या बनवत, त्या कंपन्यांचे पेपर्स दिसेनासे झाले असून भलत्याच कंपन्यांचे दिसायला लागले अचानक.

सुरुवातीला चार लेयर्सचे १० टॉयलेट रोल्स उपलब्ध असत, नंतर रोल्सची आणि लेयर्सची संख्या कमी कमी होत गेली. जंग जंग पछाडूनही पेपर्स न मिळाल्याने माझी फिर्याद जवळच्या सुपरमार्केटच्या सेल्समनकडे मंडळी असता मला त्याच्याकडून टीप मिळाली, की टॉयलेट पेपर्स हवे असतील तर शॉप सुरू होतो, बरोब्बर त्यावेळी आलीस, तर मिळतील. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ७ चा अलार्म लावून पळत शॉपमध्ये पोहोचले, तर मोजून ४ पॅकेट्स शिल्लक होते. प्रत्येक माणसाला एकेकच पॅकेट घेण्याची परवानगी दिली गेलेली होती. काउंटरवर असलेल्या प्रत्येक माणसाने बाकी सामानासोबत एकेक टॉयलेट पेपरचं पॅकेटही घेतलेलं होतं..

मागच्या आठवड्यापासून परिस्थिती निवळली आहे. आता पुन्हा टॉयलेट पेपर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद आहेत, फक्त काही पार्सल सेवा उपलब्ध आहेत, मात्र त्यांना विशेष ऑर्डर्स मिळत नाहीयेत.

सुपरमार्केट्स आणि पोस्ट ऑफिसमध्येही प्लॅस्टिकचे पार्टीशन्स टाकूनच सर्व्हिस दिली जाते आहे.

सर्कस आणि थिएटर्स यांचे शोज कॅन्सल झालेले आहेत. लायब्ररीज बंद आहेत.

बागा ओस पडलेल्या आहेत. माझ्या परिसरातली मुलं आपापल्या घरातील गार्डन्समध्ये किंवा बिल्डिंगमधील ओपन स्पेसमध्ये २ ते ३ जणांच्या ग्रुपमध्ये किंवा एकेकटी खेळतांना दिसत आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कॉलेज, शाळा आणि किंडरगार्टन्सना सुट्टी दिली गेली असून अत्यावश्यक सेवा विभागात ज्यांचे पालक काम करतात, त्यांच्यासाठी इमर्जन्सी डे केअरची व्यवस्था केलेली आहे. ज्यात माझाही लेक जातो आहे. माझ्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार लॅपटॉपवर व्हिडीओ कॉलमार्फत वर्ग भरत आहेत. माझ्या लेकाच्या किंडरगार्टन टीचर्स आठवड्यातून किमान ३ इमेल्स पाठवून त्यात मुलांसोबत काय काय क्रिएटिव्ह खेळ खेळता येतील, रेसिपीज बनवता येतील, ते आणि मुलांनी त्यांना विसरून जाऊ नये म्हणून घरातून मजेशीर सेल्फीज काढून, त्यांचा एकत्रित कोलाज बनवून, खाली त्यांची नावं टाकून शेअर करत आहेत आणि पालकांना मुलांना ते दाखवा, असे इमेल्समधून सांगत आहेत. शिवाय स्वतःच्या आवाजात मुलांची गाणी रेकॉर्ड करून पाठवत आहेत, जी ते किंडरगार्टनमध्ये मॉर्निंग सर्कल दरम्यान एकत्र म्हणत असत. शिवाय मुलांकडून व्यायाम करून घेतांना जी गाणी लावत असत, तीही पाठवली आहेत.

अशी आहे साधारणपणे माझ्या नजरेला दिसलेली परिस्थिती. अजून जसे अनुभव येत जातील आणि शेअर करायचे सुचेल, तसे डायरीच्या मधून मधून टाकत राहीन.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
२५.०४.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग १९

सिनियर केअर होममधल्या जॉबची माझी एक आठवड्याची रजा अजून एक आठवडा वाढली आणि त्यामुळे घरी असल्याने डायरी लिहिली गेली नाही.

आज दोन आठवड्यांनी पुन्हा कामावर जाणे सहाजिकच जीवावर आलेले होते. मात्र आज्जी आजोबांना भेटण्याचीही उत्सुकता होतीच. आजपासून लॉकडाउनची बंधनं रिलॅक्स केलेली असल्याने रस्त्यावर आणि ट्रॅममध्येही थोडे जास्त लोक दिसले.

कामावर गेल्या गेल्या ऍडमीन कलीगने सांगितले, "बॉसना तुझ्याशी बोलायचे आहे, तर राऊंडला जाण्याआधी त्यांना जाऊन भेट."

त्यांना भेटल्यावर समजलं की आजपासून माझ्या कामाचं स्वरूप बदललं आहे. आजपासून मला सगळ्यात वरच्या मजल्यावर क्वारंटाईनमध्ये ठेवल्या गेलेल्या रहिवाश्यांजवळ अर्धा दिवस आणि लंच ब्रेकनंतर उरलेला दिवस गार्डनमध्ये फेऱ्या मारण्यासाठी, मोकळी हवा खाण्यासाठी आलेल्या आज्जी आजोबांना भेटायचे आणि त्यांच्यासोबत बोलायचे आहे आणि अर्थातच सगळे डॉक्युमेंटेशन करून मगच दिवसाचे काम पूर्ण करायचे आहे.

थोडक्यात, क्वारंटाईन केलेल्या मजल्यावर जाऊन आल्यानंतर आता बाकीच्या ३ मजल्यांवर जाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने सुरक्षित अंतरावर थांबून मी गार्डनमध्ये संवाद साधावा.

मला जामच टेन्शन आलं हे सगळं ऐकून. पण आता बॉसने सांगितलं म्हटल्यावर ऐकण्याला पर्याय नाही, तेंव्हा होकार दिला. शिवाय मलाही आयसोलेटेड लोकांची नेहमी काळजी वाटायचीच ना, आणि ती मी बरेचदा बोलूनही दाखवली आहेच, त्यामुळे आता माझं हे क्वारंटाईनमधल्या रहिवाश्यांसोबत क्वालिटी टाईम घालवणं, म्हणजे माझीच इच्छा पूर्ण करण्यासारखे आहे ना? हा विचार करून मनापासून त्या कामाकडे बघायचे ठरवले.

हे जे चार लोक क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यात एक आजोबा आणि तीन आज्या आहेत. त्यापैकी दोन आज्यांना इतर मजल्यांवरून इकडे हलवले असून बाकी दोघं नवीन आहेत.

नवीन आलेले दोघं आणि जुने दोघं असे चौघंही हॉस्पिटलमध्ये कुठल्यातरी उपचारासाठी जाऊन आलेले असल्याने क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांना खरंतर आयसोलेटेड खोलीत ठेवलेले होते, पण त्यातील एक जण स्मरणशक्तीच्या समस्येमुळे आणि बाकी तिघं नियम काटेकोरपणे पाळत नसल्याने ह्या मजल्यावर इतर रहिवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी हलवले गेले आहेत.

मग एका रिस्क मॅनेजमेंटच्या एम्प्लॉयीला माझ्यासोबत क्वारंटाईनवाल्या मजल्यावर पाठवून मी काय काय काळजी घ्यायची, ते समजवण्यात आले. त्यात पहिली गोष्ट म्हणजे मी घातलेला ड्रेस बदलून युनिफॉर्म घालायचा, मग एप्रन, डोक्यावरच्या केसांवर नेट, पायात बुटांच्या वरून प्लॅस्टिक आणि प्रत्येक हातात दोन प्लॅस्टिक ग्लोव्हज एकावर एक.

त्यानंतर चेंजिंग रूमशेजारी असलेल्या चेन लावून बंद केलेल्या पार्टीशनमधून त्या मजल्यावर चेन उघडून जायचे, पुन्हा चेन बंद करून तिथून डॉक्टर घालतात तसा हेवी मास्क घेऊन घालायचा, डोळ्यांवर डोळे नीट झाकणारा प्लॅस्टिकचा गॉगल घालायचा आणि मग प्रत्येक रूम व्हिजिट नंतर वरच्या लेयरमधले ग्लोव्हज काढून नवीन घालून दुसऱ्या व्हिजिटला जायचं.

प्रामाणिकपणे सांगते, मला भयंकर कंटाळवाणं वाटलं हे सगळं केल्यावर. पण तिथे हा सगळा लवाजमा घालून गेल्यानंतर एक केअर एम्प्लॉयी भेटली आणि मला पाहताच म्हणाली, "किती छान! आता मला कंपनी मिळाली तुझी! मी गेल्या आठवड्यापासून इकडे एकटीच काम करते आहे." हे ऐकून मला फार बरं वाटलं. ती एम्प्लॉयी रोज एकटीच त्या फ्लोअरवर सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत काम करत होती मागचा आठवडाभर. त्या आधी दुसरी एक जण हे काम करायची.

त्या चारही आज्जी आजोबांना आज थोडक्यात भेटले. उद्या मात्र त्यांच्यासोबत जास्त गप्पा आणि त्यांचे मन रमावे म्हणून त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळायचे ठरवले आहे. बॉसनेच तसे सांगितले आहे. सकाळी क्वारंटाईनमधल्या आज्जी आजोबांना भेटून आल्यावर लंच ब्रेकनंतर ओक्युपेशनल थेरपिस्टने मला क्रिएटिव्ह रूममध्ये नेलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दाखवले. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात सविस्तर सांगते.

आता माझी वाट पाहणाऱ्या इतर मजल्यावरच्या आज्जी आजोबांना मी कशी भेटू हा विचार सुरू असतांनाच इटालियन आज्जी सुट्टे पैसे घेण्यासाठी रिसेप्शन काउंटरला आलेल्या दिसल्या. मला पाहताच, "सकीना, किती वाट बघतेय मी तुझी कधीपासून, पण तू कधी परत येणार, हे कितीदा विचारूनही कोणीच मला सांगितलं नाही" म्हणाल्या. मग त्यांना मी माझ्या रजेविषयी आणि मग आता बदललेल्या जॉबच्या स्वरूपाविषयी सांगितलं. आपण यापुढे माहिती नाही किती दिवस पण किमान हा आठवडा तरी दुपारच्या जेवणानंतर गार्डनमध्ये गप्पा मारू , हे सांगितलं. मागच्या आठवड्यापासून व्हिजिटर्सना भेटायला परवानगी मिळालेली असल्याने त्यांच्या मुली येऊन भेटून गेल्याचं कळलं, त्यामुळे आज्जी खुश होत्या. आता रेग्युलर आज्जी आजोबांची काळजी नाही आणि म्हणूनच बहुतेक क्वारंटाईनमधल्या आज्जी आजोबांवर मी लक्ष केंद्रित करावं, असं बॉसना वाटलं असणार, असा साक्षात्कार मला झाला.

शिवाय कामाच्या बदलत्या स्वरूपामुळे मला जरा स्ट्रेसफुल वाटलं असलं तरी दुसरी एक छान गंमत मात्र आज घडली, ती आजच सांगायला हवी. तर लंचब्रेकनंतर गार्डनमध्ये ऊन खात बसलेल्या आज्यांच्या ग्रुपसोबत गप्पा मारण्याआधी, म्हटलं आई बाबांशीही थोडे बोलावे, आज दोन आठवड्यांनी कामावर आलेय, तर त्यांना सगळे अपडेट्स द्यावे.

इतरवेळी हे शक्य नसतं, कारण संस्थेच्या खोल्यांमध्ये फोन घेऊन जायला परवानगी नाही. गार्डनमध्ये फोनवर बोलू शकते. बोलतांना विचार आला, दोन मिनिटे व्हिडीओ कॉलच करावा त्यांना. फोन केला, तर आईने उचलला. तिच्याशी बोलत असतांना आज्या माझ्याकडे बघत होत्या, म्हणून त्यांना म्हटलं माझी आई बोलतेय, बघायचंय का तुम्हाला? तर त्या "हो"म्हणाल्या. आई त्यांना "हॅलो" म्हणाली आणि तिने त्यांना आमचं पुण्यातलं घर आणि बाहेरचा परिसर दाखवला. भाषा मेडीएटरचं काम अर्थातच मी करत होते. आज्ज्यांना मी इतक्या लांब भारतात आईसोबत लाईव्ह चॅट करते आहे, याचं फार म्हणजे फार अप्रूप वाटत होतं. फार इंटरेस्ट घेऊन त्या सगळं बघत होत्या. किती छान घर, असं म्हणाल्या. आईने त्यांना आमचे फ्रेममधले फोटोजही दाखवले, ज्यात एका फोटोत एक महिन्याच्या मला कडेवर घेतलेली आई आणि सोबत बाबा होते. त्यांना सगळे फोटो बघायला फार मजा वाटली. आईला बाय करतांना त्या तिला जर्मनमध्ये "च्युस ओमा" म्हणजे "बाय बाय आज्जी" म्हणाल्या. मला आणि आईलाही फार गंमत वाटली.

मग बाबांशी बोलले. बाबांची मोठी दाढी बघून "पापांची केवढी दाढी आहे!!!" असं म्हणून हसायला लागल्या आज्या.. मी सांगितलं, नेहमीच दाढी ठेवतात बाबा पण करोनामुळे सलून्स बंद असल्याने इतकी वाढलेली आहे. मग त्यांना अजूनच हसू आलं. अशा आमच्या छान रिफ्रेशिंग गप्पा झाल्यावर बॉसना सगळा किस्सा सांगून आले आणि "असे कॉल्स आई बाबांना पुन्हा केले तर चालेल का?" विचारले असता, "आज्या आणि तुझे आई बाबा कम्फर्टेबल असतील तर का नाही?" असे म्हणून मला हसत हसत परवानगी दिली.

आई बाबांनाही फार मस्त वाटलेलं होतंच.. एकूणच आजचा दिवस एकदमच स्ट्रेसबस्टर निघाला आम्हा सर्वांसाठीच..

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर

०४.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २०

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २०

सिनियर केअर होममधल्या माझ्या नोकरीचे स्वरूप ह्या सोमवारपासून बदलेले, हे मागच्या भागात लिहिले आहेच. तर त्यानुसार क्वारंटाईन केल्या गेलेल्या आज्जी आजोबांना वेगळ्या मजल्यावर ठेवले गेलेले असून आता त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं ही अर्ध्या दिवसाची माझी ड्युटी ठरवली गेली असून लंचब्रेकनंतर गार्डनमधल्या आज्जी आजोबांसोबत बोलणे असे माझे काम ठरले. सोमवारच्या कामाबद्दल मागच्या भागात लिहिले आहेच.

मंगळवारी कामावर गेल्या गेल्या आधी आज्जी आजोबांसोबत कोणते खेळ खेळायचे, त्यांना काय आवडते, ते समजून घ्यायला जर्मन कलिग्जना भेटले. त्या संवादामधून समजले की बहुतेक सगळ्यांचा आवडता खेळ आहे "मेन्श एर्गेर्न दिश निष्त" म्हणजे "लोक तुम्हाला त्रास देत नाहीत/ चिडीला आणत नाहीत".. असं मजेशीर नाव असलेला खेळ नक्की कसा असेल, हे बघण्याची मला उत्सुकता निर्माण झाली.

एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट मला क्रिएटिव्ह रूममध्ये घेऊन गेली. तिने हा खेळ मला दाखवला असता एक लाकडी बोर्ड, त्यात चार बाजूंना प्रत्येकी चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या आणि एक फासा हे सगळं त्यात होतं. फासा टाकून जो आकडा येईल, त्यानुसार एकेका प्लेयरने पुढे जायचं आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचं. मध्ये इतर प्लेयर्स तुम्हाला बुद्धिबळातल्या खेळाप्रमाणे मारू शकतात, तर मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. असा मजेशीर आणि सोपा, गुंतवून ठेवणारा सोपा गेम, ज्यात अगदी थोडेसे नियम आहेत.

दुसरा एक छान खेळ ज्यात वेगवेगळी चित्रे असून त्यांच्या मागे ऍक्टिव्हिटीज लिहून ठेवलेल्या आहेत. सोंगट्यावरील आकड्यानुसार प्लेयरने कोणती ऍक्टिव्हिटी करायची, हे समजणार. मग त्यात वाक्प्रचार, म्हण, जुन्या किंवा प्रसिद्ध गाण्याचे शब्द ओळखणे, व्याकरण बरोबर सांगणे, एखादी कृती करण्याची ऍक्शन करणे(जसे भाजी चिरणे, झाडांना पाणी घालणे, केक बनवणे असे काहीही) प्रत्येक कार्डावर अशा तीन चार ऍक्टिव्हिटीज असा तो खेळ आहे. असे भरपूर कार्ड्स असल्याने कितीही वेळ हा खेळ चालू शकतो.

अजूनही काही खेळ, त्यापैकी एकात लाकडी बॉक्स असून अक्षरं छापलेले ठोकळे सोबत असून त्यापासून शब्द तयार करून ते त्या बॉक्समध्ये ठेवायचे. कमीत कमी वेळात जास्तीतजास्त शब्द तयार करणारा/री अर्थातच जिंकणार.

अशा प्रकारच्या अनेक खेळांचे दालनच माझ्यासमोर उघडले गेले. मी ही ते बघण्यात गुंगूनच गेले. त्यात कार्ड गेम्स होते, बॉल्स, रिंग्ज वगैरे सारखे शारीरिक हालचालींना चालना देणारे गेम्स होते, शिवाय स्मरणशक्ती वाढवायला मदत करणारी चित्रे आणि माहिती असणारे गेम्सही होते. त्यातले निवडक काही घेऊन मी अतिशय उत्साहात आयसोलेटेड मजल्यावरच्या क्वारंटाईनमधल्या आज्जी आजोबांना भेटायला गेले. सोमवारी थोडक्यात भेटी घडलेल्या होत्याच. त्यांच्यासोबत खेळण्याची उत्सुकता होतीच पण त्यातल्या नवीन आलेल्या आज्जी आजोबांपैकी एका आज्जींची बायोग्राफी भरून घेणे, हे एक काम बाकी होते. ते काम मंगळवारी माझ्यावर सोपवले गेले. हे काम मी आधी कधीही केलेले नव्हते, ते त्या दिवशी पहिल्यांदा करणार होते. आधी ते करून घेऊन मग गेम्स खेळायचे ठरवले.

ह्या बायोग्राफी फॉर्मवरचे प्रश्न इंटरेस्टिंग होते. पहिल्या पानावर ह्या फॉर्मचा उद्देश लिहिलेला होता. "तुम्ही इकडे राहत असतांना तुमची व्यक्तिगत माहिती मिळणे तुमचा इथला स्टे सुखकर व्हावा, तुम्हाला त्या दृष्टीने मदत पुरवणे शक्य व्हावे, या हेतूने आवश्यक आहे. सगळी माहिती लिहिणे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक नाही." असा साधारण मतितार्थ त्याचा होता.

सुरुवात नाव जन्मतारीख वगैरे प्रश्नांनी होऊन मग शिक्षण, आई वडील, जोडीदार आणि मुलांच्या माहितीकडे गाडी वळवली गेली होती. ह्या सर्वांचा जन्म, शिक्षण, नोकरी व्यवसाय, जोडीदाराला कधी आणि कसे भेटलात, लग्न कधी झालं आणि मग परत स्वतःविषयी प्रश्न, जसे तुमच्यातले स्ट्रॉंग पॉईंट्स काय? तुम्हाला किती वाजता उठायला आवडते, ब्रेकफास्ट, लंच, डिनर किती वाजता घ्यायला आवडते, काही खास आवडीनिवडी किंवा नावडी आहेत का? ऍलर्जीज आहेत का? काही छंद आहेत का? तुमची जबाबदारी घेणारे बाहेर कोण आहेत, ज्यांच्याशी आम्ही वेळप्रसंगी संपर्क साधू शकू. तुमची बिलिफ सिस्टीम काय आहे, तुम्ही मरणासन्न अवस्थेत असाल, तेंव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारे ट्रीट केले जावे, त्यादृष्टीने काही माहिती, जसे आवडता रंग, गंध, संगीत, पुस्तक, गाणी.. अंत्यसंस्कार कसे असावेत(जाळणे, पुरणे, देहदान, अस्थी विसर्जन) या प्रकारची माहिती.

नवीन आज्जींकडून हा तीन पानी फॉर्म भरून घेण्यात बराच वेळ गेला. एकतर अचानकपणे मला ही जबाबदारी दिली गेली असल्याने फॉर्म वाचण्याइतकाही वेळ मिळालेला नव्हता. त्यात काही असे जर्मन शब्द आणि संकल्पना होत्या, ज्यांचे अर्थ मला माहिती नव्हते. आधी वाचला असता तर डिक्शनरीत अर्थ पाहून जाऊ शकले असते, जे शक्य नव्हते. मग नवीन आज्जींनाच मी ते सगळे शब्दार्थ मी विचारले आणि सोप्या भाषेत मला समजावून सांगा हे त्यांना सांगितले. हा फॉर्म भरून घेतांना आमची एकदम मस्त मैत्रीच झाली. इतकी सविस्तर ओळख मी अगोदर कोणाचीच करून घेतलेली नव्हती.

या प्रकारचे काम हे माझे खरेतर आवडते काम आहे. नाशिकला असतांना सकाळ वर्तमानपत्रातर्फे असे घरोघरी जाऊन सामाजिक, राजकीय कल जाणून घेण्याच्या दृष्टीने सर्व्हे करण्याचे काम केलेले होते. स्थानिक निवडणूकींच्यावेळीही काही जवळच्या उमेदवारांसाठी हे काम स्वयंसेवक म्हणून केलेले होते आणि मला या प्रकारच्या कामांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, लोकांना त्यांच्या घरी जाऊन भेटणे, गप्पा मारणे, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणे मला फार आवडते, हे अचानकपणे आठवले.

तर ह्या नवीन आज्जींसोबत एका तासाच्या वर वेळ मजेत घालवला, त्यातून त्यांच्याविषयी बरीच माहिती कळली. ह्या आज्जी मूळच्या हॅनोवर शहारातल्याच असून टेलरिंग काम करायच्या. कॉश्च्युम डिझायनिंग वगैरेही त्यांनी केलेले आहे. हा त्यांचा फॅमिली बिझनेस असून त्यांनी आई वडिलांकडून हे कौशल्य आत्मसात करून घेतले. त्यांचा भाऊ मात्र वेगळ्या क्षेत्रात काम करायचा. आता हे तिघेही या जगात नाहीत. मिस्टर सगळ्यात पहिल्यांदा कुठे भेटले, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी घराच्या डोअर स्टेपवर असे दिले. कसे ते काही त्यांना आठवत नाही पण चाळीस वर्षांच्या संसारानंतर तेही मरण पावले. आज्जींना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा परगावी राहतो, मुलगी गावातच राहते. त्यांची बिलिफ सिस्टिम कॅथॉलिक ख्रिश्चन असून बाकी बाबतीत त्यांचे काही स्पेसिफिकेशन्स नाहीत.

आज्जी मागच्याच आठवड्यात संस्थेत दाखल झाल्या असून त्या बाहेरून आलेल्या नवीन व्यक्ती असल्याने त्यांना असे आयसोलेटेड फ्लोअरवर क्वारंटाइनमध्ये ठेवले गेले असूनही त्या खूप हसऱ्या आणि सकारात्मक वाटल्या. त्यांचे बरेचसे दात तुटलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यांभोवती साकळलेल्या रक्ताची लाल वर्तुळे आहेत. हे कसे झाले, विचारले असता, "जमिनीवर जोरात अडखळून पडल्याने हे झाले आहे" असे त्यांनी उत्तर दिले. नंतर त्यांची कंडिशन 'हेमाटोमा' असल्याचे त्यांच्या पर्सनल डेटात शोधून वाचले. त्यात अशाप्रकारे रक्तवाहिन्या रप्चर होऊन रक्त बाहेर येऊन त्वचेच्या आत इंटर्नल ब्लिडिंग होते आणि ते असे बाहेरून दिसू शकते, हे समजले.

८५ वय असलेल्या ह्या आज्जींना काय छंद आहेत, हे विचारले असता पुस्तके वाचायला आवडते, असे त्यांनी सांगितले. तुमच्याकडे काहीच पुस्तके दिसत नाहीत, हवी आहेत का, विचारले असता आता मी सगळेच 'शट डाऊन' करते आहे, आता मला काही नको, फक्त शांत पडून राहावेसे वाटते, असे म्हणाल्या.

अशाप्रकारे ह्या आज्जींसोबत भरपूर वेळ थांबल्यानंतर एक गोड अशी नवीन मैत्रीण मिळाल्याच्या आनंदात मी दुसऱ्या आज्जींच्या खोलीकडे जायला निघाले. ह्या आज्जी स्वतः च एकेकाळी नर्स आणि सुईण हे काम केलेल्या असून त्यांच्या तुटलेल्या चष्म्याचा किस्सा पुढच्या भागात सांगते. दुसऱ्याही एक एकट्या पडलेल्या आणि मानवी संपर्कासाठी, स्पर्शासाठी आसुसलेल्या आज्जींचीही गोष्ट नंतर सांगते.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
०८.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २१

आयसोलेटेड फ्लोअरवरच्या मूळच्या टेलर असलेल्या ८५ वर्षांच्या आज्जींसोबत एका तासाच्यावर वेळ घालवल्यानंतर मी दुसऱ्या आज्जींना भेटायला गेले. ह्या आज्जींना सोमवारी थोडक्यात भेटले, त्याआधीही मी एकदा भेटलेले होते, पण ते त्यांच्या खोलीत खालच्या मजल्यावर.. तेंव्हा त्या आयसोलेटेड नव्हत्या.

त्यांच्या रूममध्ये घरून आणलेले छान फर्निचर होते. गप्पांच्या ओघात त्यांनी स्वतःविषयी बरीच माहीती त्यावेळी दिलेली होती. त्यांनी सुईण म्हणून आणि नर्स म्हणूनही अनेक वर्षे हॉस्पिटलमध्ये काम केलेले होते.

त्यांच्या त्या रूममध्ये गप्पा मारतांना त्या एकदम फ्रेश होत्या. पण आता ह्या आयसोलेटेड फ्लोअरवर मात्र त्या डल वाटत होत्या. सोमवारी भेटले, तेंव्हा कळले की त्यांच्या चष्म्याची काडी तुटलेली आहे. तो चष्मा वाचण्यासाठीचा असल्याने त्यांना टीव्ही बघणे, पेपर वाचणे, या सगळ्यावर बंधनं आलेली आहेत. त्यांना त्यामुळे अतिशय कंटाळा आलेला आहे. मी कधी माझ्या मूळ खोलीत परत जाईन, असं त्या मला विचारत होत्या. फक्त चौदा दिवसांचा प्रश्न असल्याने ह्या खोलीत त्यांचे काहीच फर्निचर शिफ्ट केलेले नव्हते. फक्त बेसिक गोष्टी होत्या. जसे बेड, बेडशेजारील टेबल, कॉर्नर टेबल, खुर्ची, कपडे ठेवायला कपाट आणि त्यांची व्हीलचेअर आणि वॉकर. त्यांच्या मूळ खोलीत त्यांचा सोफा, शोकेस, घरून आणलेल्या भरपूर वस्तू, खाली छान मॅट आणि त्यांच्या स्वतःच्या उश्या आणि छान कव्हर घातलेलं पांघरूण, थोडक्यात दोन्ही रुम्सची तुलना करता घरपण असलेली त्यांची ती रूम आणि हॉटेल रूमसारखी ही रूम असा हा जमीन अस्मानाचा फरक असल्याने त्यांना कंटाळा येणं साहजिकच होतं.

ते कमी की काय म्हणून त्यात ह्या तुटलेल्या चष्म्याची भर पडलेली होती. माझा चष्मा कधी दुरुस्त करून मिळेल, हेही त्या मलाच विचारत होत्या.

मी त्याच दिवशी- सोमवारीच त्या फ्लोअरवर जॉईन झालेली असल्याने मला काहीच माहिती नव्हती. लगेच फ्लोअरवरच्या केअर युनिट एम्प्लॉयीला विचारायला गेले, तर तिने सांगितले, आज्जींचा क्वारंटाईन पिरियड अजून आठ दिवस बाकी आहे. पुढच्या मंगळवारी त्या आपल्या खोलीत परत जातील. तुटलेल्या चष्म्याविषयी एका दुसऱ्या एम्प्लॉयीला कळवलेले आहे, जी ह्या प्रकारची सर्व कामे करते, ती रजेवर आहे नेमकी, पण उद्या येईल आणि काम करेल.

मंगळवारी कामावर जातांना रिसेप्शन काऊंटरवरून मला ह्या आज्जींसाठी विकत घेतलेले वर्तमानपत्र दिले गेले फ्लोअरवर घेऊन जायला, त्यांना मग मी विचारलं, आज्जींच्या तुटलेल्या चष्म्याविषयी तुम्हाला कळलं का? तर त्या हो म्हणाल्या. रोज प्रत्येक आज्जी आजोबांना वेगवेगळ्या कारणांनी भेट देणारे सर्वजण सर्व्हरवर महत्वाचं सगळं नोंदवून ठेवत असतात. मी सुद्धा काल हे केलेलं होतंच. हे लिहिलेलं सगळं काही जण रोज वाचत असतात आणि जबाबदार व्यक्तींना कळवत असतात. शिवाय फारच महत्वाच्या गोष्टी इमेलने सर्वांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे शक्यतो आम्ही सगळे रोजच्या घडामोडींबाबत सेम पेजवर असतोच.

तर चष्म्याचं काम जिच्यावर सोपवायचं होतं ती मुलगी मंगळवारीही आलेली नव्हती म्हणून दुसऱ्या मुलाला कळवलं होतं, पण तो ही आलेला नव्हता. आता मलाच अस्वस्थ व्हायला लागलं. ह्या इतक्या वाचन वगैरे करणाऱ्या आज्जी, ज्या आता आयसोलेटेड आहेत आणि चष्म्याअभावी अपंगत्व असं सर्व बाजूंनी अंधारात गेलेल्या आहेत. ह्यांचं कसं होणार?

ताबडतोब ह्या आज्जींनाच भेटायला गेले मग. कालपेक्षाही आज ह्या अजूनच डल दिसत होत्या. त्यांना म्हणाले, चला आपण टेरेसमध्ये जाऊया, तर म्हणाल्या, नको. इथेच बसते. म्हटलं, बाहेर छान ऊन आहे, बाहेरची हवा खाऊन छान वाटेल, तर त्यालाही नाही म्हणाल्या. मी त्यांना म्हणाले, मग गेम खेळूयात का मी आणलेले, तर चष्म्याशिवाय मला नाही खेळता येणार, म्हणाल्या. त्यांना म्हटलं, अहो, खेळता येतील, मी सांगेन ना, तर नाहीच म्हणाल्या. मग त्यांना आग्रह करून टेरेसमध्ये घेऊन गेले, तर भर उन्हात त्यांना थंडी वाजत होती, पांघरूण आणून देऊ का विचारल्यावर त्यालाही नाही म्हणाल्या, मला खोलीत घेऊन जा, असेच सांगू लागल्या, मग नेलं त्यांना खोलीत परत.

खोलीत जाताच माझा चष्मा आणि माझी खोली हेच पुन्हा त्यांनी सुरू केलं. परत चौकशी केल्यावर आज संध्याकाळपर्यंत तो मुलगा येऊन काम करेल, असं कळलं. आज्जींना तसा निरोप देऊन आले.

पेपर वाचून दाखवू का, म्हणल्यावर, हो म्हणाल्या. मग एक लेख वाचून झाल्यावर, कसं वाटतंय? विचारलं असता, छान, पण बास झालं, अजून नको वाचूस, म्हणाल्या. त्यांच्याशी जरावेळ गप्पा मारून झाल्यावर दुसऱ्या आज्जींकडे गेले.

दुसऱ्या आज्जीही त्यांच्या वेगळ्या फ्लोअरवरच्या रूममधून इकडे मूव्ह केल्या गेलेल्या होत्या. हॉस्पिटलवारी करून आलेल्या असल्याने करोना प्रोटोकॉलनुसार क्वारंटाईनमध्ये होत्या. ह्या आज्जींशी त्यांच्या मूळ रूममध्ये भेटलेले असले तरीही त्यांच्याशी जास्त गप्पा झालेल्या नव्हत्या. त्या कायम आपल्या जगात हरवलेल्याच असत. मात्र व्हीलचेअरवरून कायम फिरतीवर असत. आता क्वारंटाईनमध्ये असल्याने नुसत्या बेडवर पडून होत्या. सोमवार आणि मंगळवार, दोन्ही दिवस त्यांना खेळण्याविषयी, टेरेसमध्ये घेऊन जाण्याविषयी विचारले होते, पण त्यांनीही नकारच दिलेला होता.

एकतर ह्या फ्लोअरवर मोजून चार रहिवासी, त्यांनाही एकमेकांना क्वारंटाइन मध्ये असल्याने भेटण्याची परवानगी नाही. इथली जबाबदारी घेणारा/री एकावेळी फक्त एक एम्प्लॉयी काम करणार. तीन शिफ्टमध्ये त्या वेगवेगळ्या एम्प्लॉयीज येणार, वेगळी ती मी एकच जास्तीची इथे फिरकणारी. स्वच्छता काम करायला एक जण अधूनमधून येऊन जाणार आणि केअर युनिटवाले ते एखादे व्यक्ती मग त्या रहिवाश्यांच्या खाण्यापिण्याची, आंघोळीची, ब्लड शुगर वगैरे चेक करून योग्य ते मेडिसीन्स देण्याची जबाबदारी घेणार. आम्ही सगळे मास्क, चष्मा , ग्लोव्हज, एप्रन, हे सगळं घालून येणार. आमचं नखही कोणाला दिसणार नाही, असे सगळे असतांना वातावरणात उदासीनता येऊन ती आज्जी आजोबांवर रिफ्लेक्ट होणं साहजिकच होतं..

बुधवारी जेंव्हा मी फ्लोअरवर गेले, तेंव्हाही आज्जींच्या चष्म्याचं काम झालेलं नाही, हे समजल्यावर मात्र मी संबंधित लोकांना विचारले की आत्ताच्या आत्ता मी हे काम करायला तयार आहे. मला माहिती आहे की हे माझे काम नाही, पण आज्जींची अवस्था बघवत नाही. रोज ताजं वर्तमानपत्र घेणाऱ्या आज्जींना ते वाचताही येत नाही, टीव्ही बघता येत नाही, बाहेर कोणाला भेटता बोलता येत नाही, हे फार भयानक आहे. मी नाही हे सहन करू शकत. मला ऑप्टिशियनचा पत्ता द्या, मी काम करून येते.

ताबडतोब मला पत्ता दिला गेला. मी तडक निघाले आणि ऑप्टीशियनकडे पोहोचले. तिथे पोहोचताच तिथे काम करणाऱ्या मुलीने माझ्या हातावर डिसइन्फेक्टंट स्प्रे करून बसायला लावले. कोणाचा चष्मा विचारल्यावर सिनियर केअर होमच्या आज्जींचा आहे आणि त्या फार अस्वस्थ आहेत, लवकर मिळाला तर बरे, असं सांगितलं. त्या मुलीने अक्षरशः ५ मिनिटात चष्म्याचं काम केलं. चष्माकेस हवी आहे का, विचारलं असता मी हो म्हणाले आणि बिल किती झालं, ते विचारलं. मुलगी म्हणाली, तुम्ही नोबल सर्व्हिस करता आहात, तर आमच्याकडून हे मोफत. आमचीही सर्व्हिस!! फार कौतुक वाटलं मला त्या मुलीचं.. चष्मा सुंदर चकचकीत पुसून दिलेला होता. चष्मा केसही सुंदर लाल रंगाची आणि एकदम रोबस्ट होती.. अतिशय समाधानी मनाने मी सिनिअर केअर होममध्ये परत गेले. सर्वांना हा किस्सा सांगितला. फार कौतुक वाटलं त्यांनाही.

आता खरं माझी क्वारंटाईन ड्यूटी संपून लंचब्रेकनंतर गार्डन ड्यूटी सुरू होणार होती. पण आज्जींना भलेही माझा चेहरा दिसू शकणार नसला तरी मला माझ्याच हाताने चष्मा द्यायचा होता. अनेक दिवसांनंतर चष्मा मिळल्यानंतर आणि बघता आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायचे होते. त्यांच्यासोबत मला खेळ खेळायचे होते.

मग जेवल्यावर कलिग्जना माझी इच्छा सांगून पुन्हा त्या फ्लोअरवर गेले. आज्जींना माझ्या हाताने चष्मा दिला. आज्जी प्रचंड खुश झाल्या. किती पैसे झाले, असे त्यांनी विचारल्यावर, फ्री सर्व्हिस मिळाली आज्जी तुम्हाला. ही चष्माकेसही फुकट दिली, हे सांगितल्यावर त्यांनाही खूप छान वाटलं. माझे खूप खूप आभार मानून तडक पेपरच वाचायला लागल्या त्या.. त्यांचा निरोप घेऊन मग समाधानाने त्या सतत पडून असणाऱ्या आज्जींकडे गेले.

त्या आज्जींचा किस्सा पुढच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
११.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २२

सिनिअर केअर होममधल्या चष्मेवाल्या आज्जींना भेटून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंतर मी माझ्यावर सोपवलेल्या गार्डन ड्यूटीवर जायला हवे होते, मोकळी हवा, छान कडक पण बोचरे नसणाऱ्या उन्हाचा आस्वाद घेत आनंदी आणि हेल्दी आज्जी आजोबांसोबत गप्पा मारायला खाली गार्डनमध्ये असायला हवे होते, पण कुणास ठाऊक का, माझी पावलं नेहमी स्वतःच्या विश्वात हरवलेल्या एका आज्जींच्या रूमकडे वळली. रूममध्ये जाण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार वरच्या लेअरवरचे ग्लोव्हज कचऱ्यात फेकून दुसरे घातले.

त्या आज्जीं डोळे मिटून पडलेल्याच होत्या. त्यांना सांगितलं की वास्तविक माझी दुपारची ड्यूटी गार्डनमध्ये असते पण त्या दुसऱ्या आज्जींना चष्मा द्यायला आले, तर तुम्हालाही जाता जाता भेटायला आले. ते ऐकताच आज्जींनी माझा डबल ग्लोव्हज घातलेला हात हातात घेतला आणि अतिशय घट्ट पकडला. मग दुसरा हातही माझ्या हातावर धरला आणि एकदम गाढ झोपी गेल्या.

मी उभीच होते. वाकून उभ्या अवस्थेत तीन चार मिनिटं तशीच अवघडलेल्या अवस्थेत थांबल्यानंतर हळूच माझा हात सोडवून घेऊन जायला निघाले, तर आज्जी उठल्या आणि म्हणाल्या नको जाऊस गं.. बरं वाटतंय मला कोणीतरी सोबत आहे तर.. ह्या आज्जींना त्यांच्या मूळ रूममध्ये आणि कॉरिडॉरमध्ये २-३ वेळा भेटलेले होते, त्या कधीही इतके बोललेल्या नव्हत्या. कायम आपल्या तंद्रीत असत.

आज्जींनी थांबण्याची विनंती केली, म्हटल्यावर मी म्हणाले, ठीक आहे आज्जी, थांबते मग तुमच्याजवळ अजून थोडावेळ.

आता आज्जींनी माझा हात त्यांच्या कमरेवर ठेऊन दाबून द्यायला लावलं. मी जरावेळ त्यांची कंबर दाबून दिली, त्या पुन्हा झोपी गेल्या. आता परत मी तिकडून हळूच निघाले, तर पुन्हा त्या उठल्या. त्यांना म्हणाले, आज्जी खिडकी उघडू का? तर नको म्हणाल्या. रुमचे दार बंद, खिडकी बंद, तुम्ही बाहेर पडत नाही, तुम्हाला ऑक्सिजन कसा मिळणार? असे म्हटल्यावर फक्त पाच मिनिट उघड, मला थंडी वाजते, म्हणाल्या. मग पाच मिनिटांनी खिडकी बंद करून त्यांना उद्या भरपूर वेळ सोबत थांबण्याचं कबूल करून तिकडून बाहेर पडायला लागले, तर त्यांनी पुन्हा माझं नाव विचारलं, जे मी सुरुवातीला सांगितलेलं होतं आणि त्या विसरल्या होत्या. मी 'सकीना' सांगत होते आणि त्या 'साटीना' म्हणत होत्या.

मी म्हणाले, थांबा, लिहून देते, तर कागद, पेन, काहीही सोबत आणलेलं नव्हतं, जे मी इतर फ्लोअर्सवर काम करतांना सोबत बाळगत असते. मग चष्मेवाल्या आज्जींच्या रूममध्ये जाऊन, त्यांना विचारलं, कागद पेन आहे का, तर पेन त्यांनी पर्समधून काढून दिला पण कागद नव्हता. सगळी वर्तमानपत्रंच होती. मग त्यांच्या पर्सनल टॉयलेटमधून त्यांच्या परवानगीने टॉयलेट पेपर घेऊन त्यावर माझं नाव लिहून घेऊन गेले.

आज्जींना तो पेपर दाखवला, मग त्यांनी माझं नाव नीट वाचलं आणि उच्चारलं. त्यानंतर त्यांना 'बाय' करून निघाले, तर मला 'बाय' करून माझ्या नावाचा त्या जपच करत बसल्या.

ह्या फ्लोअरवर खरोखरच कोणाचीतरी, मनापासून वेळ देणाऱ्या व्यक्तीची गरज आहे, हे लक्षात येऊन त्या दिवशी ठरवले, की बॉसने परवानगी दिली तर पूर्ण वेळ क्वारंटाईन फ्लोअरचीच ड्यूटी मागून घ्यायची. गार्डनमधल्या आज्जी आजोबांची अवस्था चांगली आहे. तिथे त्यांना एकमेकांची सोबत आहे, शिवाय त्यांच्यासोबत ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात अधूनमधून, आता व्हिजिटर्सही येऊ शकतात आणि त्या भेटीही गार्डनमध्येच होतात, त्यासाठी वेगळा तंबू आणि प्लॅस्टिक पार्टीशन, दोन्ही बाजूला खुर्च्या, अशी करोनापासून बचावाची सुरक्षित सोय केलेली आहे. खरी गरज ह्या आयसोलेटेड फ्लोअरवर आहे, तिथेच आपण जास्तवेळ असायला हवे.

शिवाय ही चष्मा वगैरेसारखी अजूनही बरीच पेंडिंग कामं असू शकतात जी आता करोनामुळे मनुष्यबळ कमी पडत असल्याने कोणावर सोपवावी, हे कळत नसल्याने आज्जी आजोबांची आबाळ होत असेल, तर ती कामंही मला द्यावीत, हेही सांगावे.

मला अर्थातच ह्यासाठी होकार मिळाला. गार्डनमधल्या आज्जी आजोबांची आई बाबांशी व्हिडीओ कॉल वर घडवून आणली, तशी भेट या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांचीही घडवून आणू का? तेवढाच त्यांनाही काहीतरी चेंज, असे विचारले असता, मला होकार मिळाला. शिवाय त्या फ्लोअरवर सगळे मास्क, ग्लासेस घालूनच वावरतात, शिवाय एप्रन, ग्लोव्हज, आपलं नखही कोणाला दिसत नाही, तर माझा आणि तिथे काम करणाऱ्या इतरांचा फोटो प्रिंट आउट काढून सोबत नेला आणि बोलतांना दाखवला, तर चालेल का? हे विचारले असता बॉसना ही कल्पना अतिशयच आवडल्याचं त्यांनी सांगितलं.

जनरल फ्लोअरवरच्या आयसोलेटेड रुममधल्या आजोबांनी चेहरा दाखवायला लावला होता, त्या डायरीच्या भागाच्या प्रतिसादात माझ्या एका मैत्रिणीने(अंजुताईने) मला हे सुचवले होते, तेच बॉसना सांगितले. मनोमन अंजुताईचे आभार मानले. ताबडतोब मला माझा एक फोटो, जो प्रत्येक फ्लोअरवर सर्व एम्प्लॉयीजसोबत लावलेला होता, तो ए4 साईझ पेपरवर प्रिंट आउट काढून देण्यात आला, त्यावर मी माझं नाव मोठ्या अक्षरात लिहून सोबत घेऊन गेले. शिवाय एक छोटा फोटो लॅमीनेट करूनही दिला मला. हे काम करतांना रिसेप्शन काऊंटरवरची जर्मन सुंदरी मला 'किती गं तू सुंदर!' अशी कॉम्प्लिमेंट देत होती पूर्णवेळ..

एका प्लॅस्टिकच्या पिशवीत माझा फोन, वर्कप्लेसचा कॉर्डलेस लँडलाईन फोन, माझा मोठा आणि छोटा फोटो, एक डायरी आणि पेन, असा सगळा लवाजमा घेऊन क्वारंटाईन फ्लोअरकडे निघाले.
सकाळचा बराचसा वेळ इतर काही कामे करण्यात गेल्याने जेवण आटोपून फ्लोअरवर डायरेक्ट दुपारीच जाऊ शकले.

गेल्या गेल्या आधी सर्व्हरवर रिपोर्टस् वाचायचे काम केले. फ्लोअरवरच्या केअर एम्प्लॉयी(स्पेशलाईज्ड नर्सने) लिहिलेले होते:
१. फ्राऊ.. (त्यांचे नाव) चष्मा मिळाल्याने खुश आहेत. त्यांना आज आंघोळ घातली, कपडे बदलून दिले..

असेच इतरांचेही रिपोर्टस् लिहिलेले होते, ते वाचले. इमेल्स चेक केल्या. आज ह्या फ्लोअरवर एक नवीन आज्जी दाखल झालेल्या असून जे आजोबा होते त्यांना रिहॅबिलीटेशन क्लिनिकमध्ये हलवले असल्याचे कळले. म्हणजे आता एकूण चार आज्जी फ्लोअरवर होत्या. नर्ससोबत थोडावेळ गप्पा मारून, अपडेट्स घेऊन मग चष्मेवाल्या आज्जींना भेटले. खूप दिवसांनी पाणी दिल्यावर कोमेजलेलं फुल कसं टवटवीत दिसतं, तशा चष्मेवाल्या आज्जी त्या दिवशी दिसत होत्या. पेपर वाचण्यात मग्न अशा त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. माझ्याशी छान हसून गप्पा मारल्या त्यांनी. त्यांना माझा फोटो दाखवला, त्या अरे वा! मस्त! तुमचा चेहरा बघून छान वाटलं, असं म्हणाल्या.

मग आदल्या दिवशी माझ्या नावाचा जप करणाऱ्या आज्जींना भेटले. त्यादिवशी त्या फ्रेश दिसत होत्या. नर्सने त्यांनाही (आणि फ्लोअरवरच्या इतर सर्वांनाच) आंघोळ घालून, कपडे बदलून फ्रेश केलेले होते, केस छान विंचरून दिलेले होते. आदल्या दिवशीची उदासीनता आणि मरगळ गुरुवारी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. मात्र त्या बेडवरच पडून होत्या. त्यांना माझा मोठा फोटो दाखवला आणि काल तुम्हाला भेटून, तुमच्यासोबत गप्पा मारून गेले, ती मीच, असं म्हटल्यावर, विश्वास नाही बसत, इतके मोठे केस आहेत तुमचे? इतक्या छान दिसता तुम्ही? असे म्हणून हसल्या.

मग त्यांना माझ्या फोनवरचे माझे, माझ्या कुटुंबाचे फोटो दाखवले, आई बाबा दाखवले, त्यांच्याशी बोलणार का? एक गंमत दाखवते बघा, थेट भारतातून ते तुमच्याशी बोलतील, असे सांगितले.

फोन केला, तर फोनवर बाबा होते. त्यांची आज्जीशी ओळख करून दिली. बाबांनी आज्जींना काही प्रश्न विचारले, जसे तुम्ही किती वर्षांच्या, त्यावर त्यांनी चौतीस साली जन्मल्याचं सांगितलं. मिस्टर वारलेले असून दोन मुलं असल्याचं सांगितलं. त्या स्वतः होममेकर होत्या. जॉब कधी केला नाही, असं सांगितलं. आज्जींना खूप मजा आली बाबांसोबत गप्पा मारून.

मग त्यांचा निरोप घेऊन हेमाटोमा कंडिशनवाल्या, जमिनीवर पडून झालेल्या जखमेने डोळ्याभोवती साकळलेल्या रक्ताची वर्तुळे असलेल्या टेलर आज्जींकडे गेले. आता फोनवर आई उपलब्ध झालेली होती. तिने आणि बहिणीनेही आज्जींसोबत गप्पा मारल्या, अर्थातच मी अनुवादक होते. त्यांनाही खूप मजा आली. आईला त्या एकेकाळी टेलर होत्या सांगितल्यावर आईने तिलाही शिवणकामाची आवड असून तिनेही हे काम एकेकाळी छंद म्हणून (आणि अजूनही काही छोटे छोटे फाटलेले शिवण्याची गरज म्हणून आवडीने करते आहे आणि) केलेले आहे, हे सांगितले. आज्जींना छान वाटलं हे ऐकून.

मग चष्मेवाल्या आज्जींना दाखव, असे बहिणीने सांगितल्यावर(तिला तो किस्सा फोनवर आदल्या दिवशी सांगितलेला असल्याने तिला उत्सुकता होती.)
मग त्यांच्याकडेही फोन घेऊन गेले. त्यांनीही छान प्रतिसाद दिला गप्पांना. हे असं इतक्या लांब फोनवर दिसत लाईव्ह बोलता येणं, याचं फार अप्रूप सर्वांनाच वाटलेलं होतं.

नवीन दाखल झालेल्या एका आज्जींना आता नंतर भेटू, हे सांगून घरी जायला निघाले, तर नर्सने आजच भेट असे सांगितले. त्या भेटीचे कारण, त्यांच्यासोबतच्या भेटीचा आणि नर्सच्या प्रेमळ अनुभवाचा किस्सा पुढच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
१४.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २३

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २३
आज माझ्या बाबांचा वाढदिवस असल्याने आणि मी अशाप्रकारच्या सामाजिक कामाचा भाग होण्यामागे त्यांची खूप मोठी प्रेरणा असल्याने डायरीचा आजचा भाग बाबांना समर्पित Namaskar आणि त्यानिमित्ताने बाबांच्या स्वभावाचे काही पैलू सांगायला मला आवडतील..

सर्वप्रथम बाबांना ७२व्या वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा.

बाबांनी माझ्या लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मला आणून दिली. पण माझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी पुस्तकं बाबांनी आणली ती सकाळ वृत्तपत्र समूहाचे माजी संपादक उत्तम कांबळे, म्हणजेच ज्यांची मी मानसकन्या आहे, त्या कांबळे काकांच्या सांगण्यावरून.

'डायरी ऑफ ऍन फ्रँक' हे पुस्तक मला माझ्या चौदाव्या वाढदिवशी बक्षीस मिळालं. ज्यू कुटूंबाचा भाग असलेली ऍन वंशवादी हिटलरच्या विळख्यातुन निसटण्यासाठी दोन वर्षाइतक्या दीर्घ काळ आपल्या वडिलांच्या ऍमस्टरडॅम येथील ऑफिसच्या एका मजल्यावर आपल्या कुटुंबासहित लपून बसलेली होती, त्यांच्यासोबत अजूनही काही कुटुंबे होती. ह्या काळात तिला आपल्या बाराव्या वाढदिवशी मिळालेल्या डायरीत तिने आपल्या दैनंदिन आयुष्याची नोंद करायला सुरुवात केली आणि त्यावेळी तिचं वय तेरा होतं. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत- तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची छळछावणीत रवानगी होईपर्यंत तिने आपले लेखन सुरूच ठेवलेले होते. ह्या डायरीतील मला सगळ्यात अपील झालेला भाग म्हणजे ह्या कुटुंबाला जगण्यासाठी मदत करणारे जर्मन्स- ज्यांनी स्वतःचा जीव पणाला लावून हे काम केलं. ज्या दिवशी हे पुस्तक मला बक्षीस मिळालं, त्या दिवशीच मध्यरात्रीपर्यंत जागून मी ते वाचून काढलं आणि उरलेली रात्र रडत घालवली होती, हे अजूनही स्पष्ट आठवतं.

मग बाबांच्याच सांगण्यावरून मी सकाळ वृत्तपत्रात या पुस्तकाचा सविस्तर परिचय पाठवला होता आणि तो छापूनही आला होता. मला वाचण्याइतकेच लिहायलाही प्रोत्साहन देणारे असे हे माझे बाबा.. त्यांच्यासोबत आईही तितकीच सहकार्य करत आलेली आहे. वाचन करत बसलेल्या आपल्या दोन्ही लेकींना कितीही मोठ्या घोड्या झाल्या, तरी तोंडात फळांचे घास ती कायम भरवत असते. आता तिच्या हातून खाणारी तोंडंही वाढलीत..(तिची नातवंडं)

असेच दुसरे एक पुस्तक- काळे गाणे- मरियम मकेबाची आत्मकथा. काळ्या माणसांवर कसे घोर अन्याय झाले आणि त्यातून राखेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बाहेर पडून प्रसिद्ध गायिका झालेल्या मरियमची हृदय पिळवटून टाकणारी आत्मकथा, ही सुद्धा मला त्याच दरम्यान वाचायला मिळाली, जेंव्हा माझं नाजूक भावविश्व आकाराला येत होतं..

अशा अनेक पुस्तकांमधून मला जगातील वेगवेगळ्या अनुभवांची आणि जाणिवांची दालनं खुली करून देण्यात आणि ती खुली केल्यावर स्वतःला लेखन आणि कवितेच्या स्वरूपात व्यक्त करायला उद्युक्त करण्यात बाबांचा खूप मोठा हातभार आहे.

मी काहीही बोलले की तू लिही सकीना, असं बाबा मला सांगत असतात आणि मग मला लिहिण्याची प्रेरणा मिळते.

वाचनाने माझ्या जाणीवा जशा जागृत झाल्या, तशाच बाबांमुळे माझ्यात अजूनही काही संवेदना आकाराला आल्या. ज्यामुळे आज मी माझा सिनियर केअर होममधला जॉब इतका समरसून करते आहे.
आज्जी आजोबा ह्या समूहाविषयी बाबांना कायमच विशेष सॉफ्ट कॉर्नर वाटत आलेला आहे. माझ्या आजोबांना-नानांना म्हणजेच बाबांच्या बाबांना सोलापूरला भेटायला आम्ही कायम जात असू. नानांविषयी बाबांना अतिशय आदर.. नाना होतेही तसेच- आदर वाटावा असे. गणितात हुशार, कायम सुडोकु सोडवत बसलेले, सुवाच्य अक्षरात आम्हाला कायम पत्र लिहिणारे, लिहिलेल्या पत्रांना आठवणीने उत्तरं लिहिणारे. साध्या पिवळ्या पोस्टकार्डवर असो की निळ्या इनलँड लेटरवर, त्यांच्या पत्रांना कधीही जागा अपुरी पडत असल्याने रिकाम्या कॉर्नर्सवरही उभी वाक्य लिहून ते पत्र पूर्ण करणारे नाना, आमचा गणिताचा अभ्यासही घेत असत.

नाना असो की माझ्या आईची आई, माझी अत्यंत लाडकी आज्जी, माझे बाबा ह्या जुन्या पिढीचा खास आदर तर करत असतच पण त्यांची मनापासून काळजीही घेत असत. बाबा नेहमी म्हणतात, माणूस गेल्यावर अश्रू ढाळण्यात काही अर्थ नाही, तो जिवंत असतांना त्याला वेळ द्या. बाबांनी हे नात्यातल्याच नाही तर इतरही आज्जी आजोबांसोबत पाळले आहे, आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिले आहे कायम.

मी जर्मनीला मास्टर्ससाठी येणार होते, तेंव्हा माझी ऍडमिशन पक्की झाल्यावर बाबा मला एकूणएक नातेवाईकांच्या भेटीसाठी धावत्या दौऱ्यावर घेऊन गेले होते. माझ्या एका काकांची- लाडक्या आप्पा काकाची तेंव्हा माझी शेवटची भेट झाली. मी बाबांच्या शब्दाला मान दिला नसता, तर आयुष्यभरासाठी मनाला रुखरुख लागून राहिली असती. तीच गोष्ट माझ्या एका काकूच्या बाबतीत, जिचं मागच्याच आठवड्यात निधन झालं. अशाच एका भारतवारीत बाबांनी मला सर्वांना भेटून यायला सांगितलं आणि तीच माझी माझ्या लाडक्या काकूची शेवटची भेट ठरली.

जर्मनीत येण्यापूर्वी बाबांनी मला सांगितलं, आता तू विकसित देशात जाते आहेस, तर तुला आपल्या देशाविषयी, येथील गरिबीविषयी घृणा उत्त्पन्न होऊ देऊ नकोस. भरपूर एक्सपोजर मिळव, पण संवेदना कायम ठेव. पाय जमिनीवर असुदेत आणि तुला ते जीवन झेपलं नाहीतर फोर्सने राहू नकोस, ताबडतोब परत ये. आम्ही आहोतच तुझ्यासाठी इकडे. ते शब्द मला मोकळेपणाने जगण्यासाठी खूप दिलासा देणारे ठरले.

बाबांनी लहानपणापासून मनावर काही गोष्टी बिंबविल्या आहेत, जसे, कधीही नोकरी पैसा मिळवणे, हा फोकस ठेवून शिकू नकोस, ज्ञान मिळवणे, या उद्देशाने शिक. भरपूर शिक आणि शिकत रहा. अशी कोणतीही कामं, ज्यातून फक्त पैसे हा आऊटपुट मिळतो पण कोणत्याही प्रकारची अर्थपूर्ण सेवा घडत नाही, त्या प्रकारची कामं करायला बाबांनी कायम विरोध केला.

नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, हे वाक्य तर बाबा सतत ऐकवत. शिवाय शिक्षणाचे क्षेत्र निवडतांना जिकडे सगळे गर्दी करतात, तिकडे आपण न जाता आपण वेगळी क्षेत्रं आणि वाटा एक्सप्लोर कराव्यात, हे बाबांचे स्पष्ट मत आणि आग्रह होता.

शिक्षण हे मातृभाषेतूनच मोकळेपणाने घेता येते आणि नीट समजते, हे बाबांचे मत आता जर्मनीत आपल्याच भाषेत सर्वोच्च पातळीवरील शिक्षण घेऊन जगातील प्रगत देशांमध्ये स्थान मिळवणाऱ्या जर्मन लोकांकडे बघितल्यावर प्रकर्षाने जाणवते आणि पटते.

अनोळखी लोकांशी ओळख करून घेऊन बोलण्याची, मैत्री करण्याची विशेष आवड असलेल्या बाबांचा गुण माझ्यात उतरलेला असल्याने मला जर्मनीतील आज्जी आजोबांसोबत सहजपणे जुळवून घेता येते आहे, इतकेच नाही तर हे काम मनापासून आवडते आहे.

बाबांविषयी सांगावे तितके पैलू कमीच आहेत.. पण थोडक्यात सांगायचे तर आज मी जी काही आहे, आणि जशी काही आहे, ती त्यांच्यामुळेच.

अशा माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही मदर नेचरकडे- निसर्गदेवतेकडे प्रार्थना.. :dhakdhak:
१८.०५.२०२०
~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर

आज्जी आजोबांची डायरी: भाग २४

बॅक टू मागचा आठवडा.. सिनियर केअर होममध्ये नवीन दाखल झालेल्या एका आज्जींना आता नंतर भेटू, हे सांगून घरी जायला निघाले, तर नर्सने आजच भेट असे सांगितले. त्या भेटीचे कारण,
त्या फार घाबरलेल्या आहेत. त्यांच्या मुलीला करोना होईल का? ती जॉब करते, तिचा ह्या आजाराने इन्फेक्शन होऊन, जॉब जाईल का, या भीतीने त्यांना झोप लागत नव्हती. मग तडक त्यांना भेटायला गेले. ओळख करून घेऊन मोकळी हवा खायला गच्चीवर घेऊन गेले. 'घाबरू नका. नकारात्मक विचार करू नका. तुमच्या मुलीला काहीही होणार नाही, तुम्ही निश्चीन्त रहा, रिलॅक्स रहा. टीव्ही बघा, रेडिओ ऐकत झोपा, पेपर वाचण्यात मन गुंतवा', असे सांगितले. 'टीव्ही नको वाटतो. पेपर माझ्याकडे नाही आणि रेडिओही नाही', सांगितल्यावर चष्मेवाल्या आज्जींना ह्या नवीन आज्जींना 'तुमचा जुना पेपर देऊ का वाचायला?', विचारल्यावर, 'जुना कशाला, नवीन दे ना', म्हणाल्या. मी 'नको, तुम्ही नवीन वाचा आणि जुनाही उद्या आणून देते', सांगितल्यावर, 'काही घाई नाही. सावकाश वाचू दे', असे सांगून मोठ्या मनाने पेपर घेऊन जायला परवानगी दिली.

आज्जींशी गप्पा मारण्यात मला घरी जायला उशीर झालेला होता आणि आणि नर्सच्या शब्दाला मान देऊन मी जास्तवेळ थांबले, याची कृतज्ञता म्हणून नर्सने आमच्या दोघींसाठी कॉफी आणि केक किचनमधून मागवलेला होता, कशासाठी गं उगाच हे केलंस, मी माझं कर्तव्य केलं ना, असं म्हणाले, मात्र खातांना आणि कॉफी घेतांना मला खरोखरच भूक लागलेली होती आणि फार मानसिक थकवा आलेला होता, जो कॉफी आणि केकने एकदम दूर झाला, हे जाणवले आणि माझी गरज न सांगता ओळखून प्रेमाने मला ट्रीट देणाऱ्या नर्सला खूप धन्यवाद देऊन खूप समाधानी मनाने घराकडे निघाले.

नर्सच्या ह्या अनुभवाच्या निमित्ताने माझ्या इतरही सहकाऱ्यांविषयी सांगावेसे वाटते आहे. आज्जी आजोबांइतका सविस्तर वेळ त्यांच्यासोबत घालवायला मिळत नसला, तरी माणूस म्हणून त्यांच्यातला ग्रेटनेस, विनोदबुद्धी, माणुसकी आणि इतरही काही पैलूंचे वेळोवेळी दर्शन होत असते, ते सांगितले नाही, तर डायरी अपुरीच राहील.

सुरुवात बॉसपासून करते. वेळोवेळी त्यांचा उल्लेख आलेला आहेच, पण त्यांच्याविषयी अजूनही बरेच काही सांगण्यासारखे आहे. त्या कामावर रोज सायकलवरून येतात. जाऊन येऊन वीस किमीचा प्रवास करतात रोज. करोनानिमित्ताने झालेल्या एका मिटिंगमध्ये त्यांनी तापाच्या लक्षणांविषयी बोलतांना सहज सांगितले होते, की मला गेल्या वीस वर्षांत एकदाही ताप आलेला नाही. त्या रोज सलाड आणि फळांचा भाग जास्त खातात आणि कार्बोहायड्रेट्स अगदी मर्यादित.

करोनाविषयक प्रतिबंधक उपायांच्या मिटिंगमध्ये- जो माझा कामाचा पहिलाच दिवस होता, एका मुलीने म्हटले, आता आपण एकमेकांना किसेस, हग्ज देणे बंद करायला हवे. त्या दिवशी एका आफ्रिकन वंशाच्या बाईंनी बॉसजवळ कोणत्यातरी कारणाने मन मोकळं केलं, तेंव्हा बॉसने खूप प्रेमाने त्या बाईंना कुशीत घेऊन दिलासा दिला होता. त्या दिवसानंतर मात्र सोशल डिस्टन्सिंग स्ट्रिक्टली सुरू झाल्याने बॉसचा हा पैलू मला नशिबानेच बघायची संधी मिळाली, असे म्हणायला हवे.

एम्प्लॉयी आणि बॉस असं नातं त्या कधीच मानत नाहीत. आम्ही जेवायला सोबत बसतो, तेंव्हा त्यांच्यासाठी सोडा वॉटर आणि माझ्यासाठी नॅचरल वॉटरची बाटली त्या न विसरता आणतात, ग्लासमध्ये पाणीही ओतून देतात. किचन स्टाफ आम्हाला ऑर्डर केलेलं जेवण आणून देतो पण रिकामी ताटं, चमचे, ग्लास इत्यादी आम्हीच किचनमध्ये घेऊन जातो. ते काम करण्यातही त्या नेहमी पुढाकार घेतात.

या निमित्ताने अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे, इकडे जर्मनीत शिपाई वगैरे नसतात, अशी हाताखालची कामं करायला. सगळेजण- कॉलेजचे प्रोफेसर ते कंपन्यांचे बॉसेस- ब्रेक्समध्ये स्वतः उठून आपापली कॉफी घेणे, रिकामे कप जागेवर ठेवणे, ही कामं करतात.

माझा नवरा- जयच्या जुन्या बॉसची तर याहून ग्रेट गोष्ट. जय आणि इतर सहकारी ऑफिसमध्ये काम करत असतांना ते स्वतः कॉफी ब्रेक्समध्ये सर्वांसाठी कॉफी घेऊन जाऊन त्यांच्या केबिन्समध्ये सर्व्ह करत असत!!

माझ्या एका सहकाऱ्याची- टेक्निशियनचीही अशीच गोष्ट. तो कँटीनच्या हॉलमध्ये जेवत होता, मी त्यांच्या ग्रुपला जॉईन झाले. स्वतःसाठी स्टोअर एरियातुन पाण्याची बाटली घेऊन बसायचे मला लक्षात नव्हते. मी बसताच, 'तू पाणी नाही घेतलंस?' असं म्हणून 'मी आणते', सांगितलं तरी जेवता जेवता उठून माझ्यासाठी पाणी तर आणून दिलंच, शिवाय ते ग्लासात ओतूनही दिलं त्याने!

मिटिंगमध्ये एकदा त्याने असाच काहीतरी जोक केला, ज्याने सगळे खूप मोठ्याने हसायला लागले. बॉसना तर हसू आवरतच नव्हते बराच वेळ.. नंतर त्यांनी त्याला 'थँक्यू' म्हटलं, इतकं हसवल्याबद्दल. म्हणाल्या, "आज सकाळी कामावर येववतच नव्हतं, बेडमधून उठुच नये, असं वाटत होतं, इतका थकवा अंगात होता. आत्ताही मी अगदी थकलेले होते, तुझ्या त्या जोकने सगळी मरगळच निघून गेली."

असा हा टेक्निशियन कायम येता जाता काहीतरी मजेशीर करत असतो, ज्याने कोणालाही हसू यावे. जसे खुर्ची घेऊन येऊन बसायला जावे तर संगीत खुर्चीसारखा येऊन पकडणार ती खुर्ची आणि त्यावर बसणार आणि मग तिकडून उठून आता तू बस म्हणणार. असे काही ना काही गमतीशीर प्रकार करून वातावरण हलकेफुलके बनवत आणि ठेवत असतो.

तशीच एक सफाई कामगारांपैकी ताई आहे. ती एकदा मला म्हणाली होती, की ती चार्ली चॅप्लिनसारखी आहे. तिला लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य बघायला आवडतं. तिने सांगितलं, की माझं टार्गेट असतं, किमान दोन लोकांना रोज कॉम्प्लिमेंट द्यायची आणि किमान दोन लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं. हे तिने सांगितलं आणि तिकडून एक आजोबा चालतांना दिसले, त्यांना ती म्हणाली, मला तुमचं नाक फार आवडतं. किती धारदार, लांब आहे, तुमच्या चेहऱ्यावर ते शोभून दिसतं. आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. थँक्यू म्हणून ते पुढे चालायला लागले. ते गेल्यावर ती म्हणाली, बघ, जे मी ठरवलं होतं, ते केलं..

ती सर्वांना प्रेमानेच हाक मारते, जसे हनी, माय डियर, स्वीटी इ. कायम नाचत नाचत, गाणी म्हणत काम करत असते. मागे आज्जी नं १ गेल्या, त्यादिवशी अशीच नाचत, गात असलेली समोर दिसली. पण तिला कोणीही हसून प्रत्युत्तर करण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही त्याचवेळी आज्जींचे शेवटचे दर्शन घेऊन लिफ्टने खाली आलेलो होतो. ती घरी जायला निघालेली होती. मी बाहेर जाऊन तिला काय झाले आहे ते सांगून, सॉरी, तुला 'ह्या' कारणाने रिस्पॉन्स देऊ शकले नाही, हे सांगितल्यावर, ती एकदम मटकन खालीच बसली. मग जरावेळाने स्वतःला सावरून उठली. मग म्हणाली, मी आत्ता खूप दुःखी झालेले आहे, कारण आज्जी माझ्यासाठीही खूप जवळच्या होत्या. आम्हा क्लिनिंग स्टाफचे ह्या आज्जी आजोबांशी एक वेगळेच कनेक्शन जुळलेले असते. आम्ही रोज त्यांच्या रूममध्ये जात असतो, गप्पा मारत असतो, त्यामुळे त्रास होणार आज मला.. पण उद्या मात्र मी हे दुःख विसरून अशीच हसत, नाचत फिरणार आहे, बरंका!

एक टुनिशियन सुंदर तरुणी मी सायकॉलॉजीस्ट म्हणून नवीन जॉईन झाले आहे, हे समजल्यावर मला भेटायला आली होती आणि म्हणाली, मी इकडे एकटीच राहते. सगळं कुटुंब टुनिशियात आहे. मला फार सोशललायझिंगची सवय आहे, डान्स, डिस्को वगैरे. शिवाय जिममध्ये जात असते मी.. आता करोनापायी हे सगळं बंद झाल्याने फार फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. काहीतरी उपाय सुचव. तिला फॉरेस्टमध्ये एकटीने जॉगिंग, घरी नेटफ्लिक्सवगैरे सिरीज, व्हिडीओकॉलवर घरच्यांशी आणि मैत्रिणींशी संवाद, पुस्तकं, बाकी छंद काय असतील ते आठवून ते जोपासणं वगैरे सांगूनही ती विशेष आनंदी दिसली नाही, तेंव्हा तिचा एकंदरीत कल बघता म्हटलं, तुला पार्टनरची गरज आहे का? त्यावर हो म्हटल्यावर आता करोनामुळे ते शक्य नाही. ऑनलाइन डेटिंग वेबसाईटवरून शोध एखादा, असं सांगितल्यावर इन्टरेस्ट घेऊन कोणत्या वेबसाईट्स वगैरे विचारायला लागली. मग म्हटलं, चांगला कोणी सापडला, तर लवकर लग्नही करून टाक. एकटी नको राहुस. तर म्हणाली, अगं, लग्न झालेलं आहे. नवरा टुनिशियात असतो. एक मुलगाही आहे. (सगळं कुटुंब टुनिशियात आहे, या वाक्याचा अर्थ मी फक्त आई वडील, भावंडं, नातेवाईक असा लावलेला होता.) तिचं बोलणं ऐकून मी आणि बाकीचे सहकारी खूप हसलो. तिला म्हटलं, ते डेटिंग वगैरे वेबसाईट्स विसर. नवऱ्यावर प्रेम असेल, तर त्यालाच नंतर इकडे आणण्याचा प्रयत्न कर, नाहीतर स्वतः परत जा. असा आपला टिपिकल भारतीय मनोवृत्तीतील सल्ला दिला. तिनेही अगदी स्पोर्टिंगली घेतला.

आधी वेगवेगळ्या फ्लोअर्सवर असे थोड्या वेळेसाठी वेगवेगळे एम्प्लॉयीज भेटत असत. खूप लाइव्हली वातावरण असतं त्या फ्लोअर्सवर. शिवाय जवळपास २५/३० आज्जी आजोबा एकेका फ्लोअरवर असतात. त्यातले बरेचसे लिफ्टने खाली वर करतांना भेटत असत. मजल्यांची रचना तीन दिशांना रुम्स, मध्यभागी ऑफिसची खोली, तिला लागून काही सोफ्याच्या प्रशस्त खुर्च्या आणि समोर टीपॉय, जेणेकरून आज्जी आजोबांना इथे बसून सोशलाईझ करता येईल, अशी आहे.

त्यामुळे क्वारंटाईन फ्लोअर ड्युटी मिळाल्यावर सुरुवातीला खूप विचित्र वाटत होतं. सुनसान एकटेपणा. (क्वारंटाईन फ्लोअर असले तरी करोनाबाधित इकडे अजून एकही नाही, पूर्ण संस्थेतही कोणी नाही, हे नमूद करणे आवश्यक आहे. संस्थेबाहेर हॉस्पिटलमध्ये इतर कारणांनी दाखल केले गेल्यामुळे करोनाची शक्यता असू शकते, या कारणाने त्यांना आयसोलेटेड रूममध्ये ठेवले जाणार, त्या ऐवजी ह्या फ्लोअरवर त्यांना शिफ्ट केले गेलेले आहे. रोज टेम्परेचर आणि अधूनमधून इतर टेस्टस घेऊन त्यांना करोना नाही, हे नर्सेस सातत्याने सर्व्हरवर रिपोर्ट करतांना दिसतात.)

इथे- ह्या फ्लोअरवर काही तास काढून मग गार्डनमध्ये जायचे आहे, असा दिलासा सुरुवातीला मनाला देत होते. पण आता इथली गरज म्हणून क्वारंटाईन फ्लोअरवर फुलटाईम ड्युटी मागून घेतल्यापासून वेगळी गंमत अनुभवायला मिळते आहे.
इथे रोज तीन शिफ्ट्समध्ये काम करणारे एकूण तीनच केअर एम्प्लॉयीज(स्पेशलाईज्ड नर्सेस) येतात. त्यांच्या ड्युटीज सतत बदलत असतात. आज ह्या फ्लोअरवर तर उद्या दुसऱ्या, असे काम त्यांना असते. शिवाय क्लिनिंग स्टाफही रोज वेगवेगळा येतो इकडे. डॉक्टर्सही अधूनमधून येऊन जातात.

कॉन्स्टंट अशी मीच एकटी या फ्लोअरवर असते. त्यामुळे पहिल्या दोन शिफ्ट्सचे निरनिराळे नर्सेस आणि क्लिनिंगचे कर्मचारी मला रोज भेटतात. शिवाय त्यांच्यासोबत वन टु वन असे सविस्तर बोलणे रोज होते, जे इतर फ्लोअर्सवर जास्त लोक असल्याने शक्य नव्हते. माझ्याप्रमाणेच ह्या मंडळींनाही ह्याच फ्लोअरची ड्युटी आता जास्त आवडायला लागलेली आहे, असे बोलण्यातून समजले. कमी लोक असल्याने काम कमी आणि डोक्याला शांतता असते त्यांच्या. योगायोगाने इकडे दोन मेल नर्सेस इरिट्रीया या आफ्रिकन देशातील येतात. ही दोघंही वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये दिसतात. खूप गप्पीष्ट आहेत दोघंही. त्यांच्याशी बोलायला मला मजा येते. इरिट्रीयात आठ भाषा बोलल्या जात असल्याचे एकाकडून मला समजले. रमजानचा महिना असल्याने आत्ता त्यांचे रोजे सुरू आहेत. काहीही न खाता पिताही ते फ्रेश दिसतात, याचं कौतुक वाटतंय मला.

मोजून चार पाच आज्जी आजोबा फ्लोअरवर असल्याने माझे सर्व्हरवरचे सायकॉलॉजीकल रिपोर्ट्स ही मंडळी रोज वाचून माझ्यासोबत चर्चा करतात, आज्जी आजोबांविषयी.

ह्या फ्लोअरवर आज्जी आजोबा चौदा दिवसांचे पाहुणे असतात. ह्या काळात ते पार उदासीन झाल्याचे लक्षात आल्याने इकडे वातावरण लाईव्हली बनवणे, ही आता माझी जबाबदारी आहे. ती निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते आहे. त्यात ह्या नर्सेसना सहभागी करून घेते जमेल तसे. त्यांना काही आज्जी आजोबा इतर फ्लोअर्सवर भेटल्याने माहिती आहेत, पण सर्वच आज्जी आजोबांची सविस्तर बॅकग्राऊंड माहिती नसल्याने मी ती आधी सांगते. मग त्यांनाही सॉफ्टकॉर्नर निर्माण होतो.

आज्जी आजोबा ह्या फ्लोअरवर आल्यापासून नुसतेच स्वतःला खोलीत बंद करून घेऊन तब्येती खराब करून घेत आहेत, हे लक्षात आल्याने मी त्यांना भेटायला गेले की त्यांच्या रुम्सच्या खिडक्या उघडणे, त्यांना गच्चीत फिरायला घेऊन जाणे. तिकडे गप्पा मारत बसणे, हे काम करायला सुरुवात केली आहे. कोणाला कसली गरज आहे, टीव्ही रेडिओ रूममध्ये नसल्यास त्यांच्या मूळ रूममधून आणि नवीन मंडळींना संस्थेकडून तात्पुरता उपलब्ध करून देण्यासाठी मी रोज टेक्निशीयन दादांना त्रास देते आहे. ह्या फ्लोअरवर मनोरंजनाच्या साधनांची नितांत गरज असल्याचे त्यांना पटवून दिल्याने तेही न वैतागता ही जास्तीची कामं करत आहेत.

मागच्या आठवड्यापासून मी दोन आज्जींना त्यांच्या मुलांसोबत व्हिडीओकॉलवर कनेक्ट करून देण्यात यशस्वी झालेले आहे.

एका आज्जींसोबत सलग आठवडाभर जर्मन खेळ खेळले, खूप मज्जा आली आम्हाला दोघींना. त्यांचा क्वारंटाइन पिरियड उद्या संपेल. इतर दोघींचा संपला. त्या आपापल्या मूळ रूममध्ये परत गेल्या.

दोन जणी जास्त आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या. एक स्पॅनिश आजोबा ह्या फ्लोअरवर दाखल झाले.

असे बरेच काही गेल्या काही दिवसांपासून घडलेले आहे. ते सविस्तर अनुभव पुढच्या भागात सांगते.

सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर.
२२.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २५

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २५
सिनियर केअर होममधल्या माझ्या क्वारंटाईन फ्लोअरवरच्या ड्युटीमध्ये गेल्या आठवड्यापासून बरंच काही घडलं आहे.. बराच हॅपनिंग आहे हा फ्लोअर एकंदरीत.. मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं की चार पाच आज्जी आजोबांना रोज भेटणे, हे इंटरेस्टिंग काम असेल. उलट मला वाटत होतं की वेळ खायला उठेल की काय, त्यांना मला रोज रोज बघून बोअर होईल की काय.. पण सुदैवाने झालंय उलटंच.

त्या सतत नर्व्हस राहणाऱ्या आज्जींना थोडक्यात भेटून आणि दिलासा देऊन घरी आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, तर त्या अजूनही नर्व्हस स्थितीतच होत्या. एकतर त्यांच्यासाठी संस्थाही नवीन आणि वरून हे असलं आयसोलेशन, त्यामुळे त्यांची तब्येत अजूनच बिघडलेली. त्यांच्या रूममध्ये माझ्या सांगण्यावरून तातडीने रेडिओ पाठवलेला होता टेक्निशियनने, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतही त्या नव्हत्या. वाचायला दिलेलं वर्तमानपत्रही तसंच पडलेलं होतं टेबलवर.

आता आज्जींचा नर्व्हसनेस वेगळ्या कारणावरून सुरू झालेला होता. त्यांच्या लेकीने त्यांना एक बेसिक मॉडेलचा फोन दिलेला होता, त्यात सगळे कॉन्टॅक्टस सेव्ह केलेले होते, पण त्यांना कळत नव्हतं की कॉल करायचा कसा? त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांना लक्षात राहत नव्हतं. 'कॉल रिसिव्ह करायला हिरवं की लाल बटन दाबू?' हा गहन प्रश्न त्यांना पडलेला होता. टीव्ही लावतांना लाल बटन, मग कॉल रिसिव्ह करतांनाही लालच बटन दाबायला हवं, असं त्यांचं लॉजिक होतं. मग मी त्यांना सगळ्या कृती लिहून ठेवायला लावल्या एका पानावर. त्यांनी तातडीने ते केलं. तरीही त्यांना काही ते लक्षात राहीना.

मग त्यांना सांगितलं, तुम्ही नका ताण घेऊ, तुमच्या मुलीला कॉल करायचा असला की बटन दाबून नर्सला बोलवा. तर त्या म्हणाल्या, नर्सला बोलावते, पण तो येतच नाही. मग मी नर्सला विचारलं, असं का म्हणून, तर तो म्हणाला, आज्जी सारख्याच बोलवतात, मला इतरही कामं असतात, मी कितीवेळा तेच तेच काम करत बसू? मला आलेल्या एम्प्लॉयीजच्या अनुभवांच्या पुढे हा अनुभव एकदम विरुद्ध पातळीचा होता. हा नर्स नवीन असून बऱ्यापैकी तुसडा असल्याचे लक्षात आले. मग त्याला मी शांतपणे हसून आणि प्रेमाने समजावले, की ह्या आज्जी एकदम स्ट्रेसमध्ये आहेत, नवीन आहेत संस्थेत आणि त्यांना कशी करोनाची भीती वाटतेय, लेकीच्या काळजीने झोप लागत नाहीये, वगैरे सांगितल्यावर तो जरा नरमलेला दिसला.

मग मी आज्जींकडे परत गेले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही दिवसातल्या काही वेळा ठरवून घ्या आणि मुलीला कॉल करा. सारखे सारखे करू नका. मग लोक तुम्हाला वैतागतील अशाने आणि मग महत्वाच्या कामासाठी बोलवाल किंवा काहीतरी इमर्जन्सी असेल, तेंव्हा लोक तुमच्याकडे येणार नाहीत. शिवाय तुम्हाला चांगली ट्रीटमेंट हवी असेल, तर तुम्हीही समोरच्याच्या कलाने घ्या. तुम्ही इथे त्यांच्यावर अवलंबून आहात. सगळेच काही एकदम चांगले आणि सेवाभावी लोक तुम्हाला भेटतीलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो, तर जनरली सर्वांनाच पण स्पेशली असे तुसडे लोक ड्युटीवर भेटले, तर शक्यतो त्यांना इरिटेट करू नका आणि त्यांना ख्याली खुशाली विचारा. त्यांनाही समजून घ्यायचा प्रयत्न करा. सकाळच्या ड्युटीवरच्या मंडळींना लवकर उठावे लागते आणि कामाचे चार पाच तास झाले की थकवा आलेला असतो त्यांना, शिवाय ह्या फ्लोअरवर ते एकटेच किल्ला लढवत असतात, त्यामुळे त्यांच्या संयमाचा तुम्हीही अंत पाहू नका. गोड बोलून मदत मागा. मग आज्जी गोड हसल्या. म्हणाल्या, तू किती चांगली आहेस, किती छान समजवतेस. मी आज्जींना म्हणाले, तुमची काळजी वाटते, त्यामुळे प्रेमाच्या अधिकाराने समजवते आहे. त्यावर विचार करा.

मग आज्जींना म्हणाले, जोवर माझी ड्युटी आहे, तोवर तुम्ही मला अमर्याद वेळा बोलवू शकता. मी लावून देत जाईन तुमच्या लेकीला फोन. त्यांच्या मुलीचा आणि नातवाचा फोटो फ्रेममध्ये समोर होताच. आज्जींनी सांगितलं, लेक सिंगल मदर असल्याने तिची काळजी वाटते. जॉब गेला तर तिला कोण सांभाळणार? परत आज्जींनी करोना वगैरे काळज्या बोलून दाखवायला सुरुवात केली. आज्जींना म्हणाले, आता चिंता थांबवा. आपण लेकीशी बोलूया तुमच्या.

लेकीला फोन लावला, तर तिने दुसऱ्या रिंगला उचलला. म्हणाली, थँक गॉड, आई तू फोन केलास. मी माझी ओळख करून दिली. तिला आज्जींची परिस्थिती सांगितली, तर ती म्हणाली, हो, मला कल्पना आहे. आई असंच करते. तिला सकाळपासून ४ वेळा फोन केला, ती उचलतच नाहीये, तिला समजतच नाही कॉल कसा रिसिव्ह करायचा ते! कितीवेळा मी समजवलं, तरी तिला लक्षात येतच नाही.

आज्जींना म्हणाले, घ्या, लेकीशी बोला, तर त्यांनी फोन हातात न घेता ती फोटो फ्रेम उचलून कानाला लावली. ते पाहून मी त्यांच्या लेकीला म्हणाले, तुमच्याकडे whatsapp आहे का? ती हो म्हणाली. मग विचारले, तुम्हांला आईला व्हिडीओ कॉल करायचा असेल, तर माझा फोन आहे उपलब्ध. तिला फार आनंद झाला हे ऐकून. मग ताबडतोब आम्ही एकमेकींचे नंबर्स सेव्ह करून घेऊन आज्जींना व्हिडीओ कॉल लावला, तर आता आज्जी माझा फोन कानाला लावायला लागल्या. मोठ्या मुश्किलीने त्यांना समोर बघायला लावले, तर म्हणाल्या, चष्म्याशिवाय दिसत नाही मला, चष्मा शोधून दे. ड्रॉवरमधून त्यांचा चष्मा काढून दिला आणि मग तो डोळ्यावर लावून आज्जींना एकदाचे लेकीला बघणे शक्य झाले. इतका आनंदाचा क्षण, पण आज्जींनी बाकी काही न बोलता तिच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचायला सुरुवात केली. मला इथे नाही रहायचं, मला घरी घेऊन जा. मला तुमची खूप काळजी वाटते, झोप लागत नाही, बेड सारखा हलतो(असे काही होत नव्हते. त्या बेडवर बसतांना आणि आडव्या पडतांना जी हालचाल करत, त्याने बेड साहजिकच हलत होता. मी चेक केले नीट.)

लेकीने आज्जींना खूप समजवायचा प्रयत्न केला. क्वारंटाईन पिरियड लवकरच संपेल आणि मी तुझ्या कुशीत असेन, असं सांगून सुद्धा आज्जी काही शांत होईना. मग लेकीलाच एकदम रडू फुटलं आणि ती खूप रडायला लागली. मी म्हणाले, काय हे आज्जी? बघा, तुम्ही लेकीलाही रडवलंत! तुम्हाला खरंच इकडे काही त्रास आहे का? जेवण, क्लिनिंग, नर्सिंग सगळं नीट होतंय ना? लेकीला जॉब असतो तुमच्या. ती तुमची सेवा कशी करेल घरी? दिवसभर तुमच्याकडे कोण बघेल? इकडे बेल वाजवली की लोक सेवेला हजर होतात तुमच्या. घरी असे कोण करेल?

मग आज्जींना पटलं मी बोललेलं. त्या लेकीला म्हणाल्या, तू रडू नकोस. मी मजेत आहे. मला काही त्रास नाही. तू ही त्रास करून घेऊ नकोस. मला लवकर भेटायला ये. लव्ह यू, मिस यू आणि दोघींनी एकमेकींना फ्लाइंग किस दिला. मला लेक म्हणाली, आईशी बोलायला मी चोवीस तास उपलब्ध आहे. मला कधीही कॉल करु शकतेस. मला तिने खूप वेळा धन्यवाद दिले. आज्जींनीही मला धन्यवाद दिले. त्या दिवशी लंचब्रेकमध्ये बॉसला हा किस्सा सांगितल्यावर, त्या म्हणाल्या, बरं झालं, तू त्या मजल्यावर आहेस. माझी काळजी मिटली.

मग वरचेवर आज्जी आणि लेकीचे फोन माझ्या मदतीने व्हायला लागले. आज्जींचा स्वभाव तक्रारीचा असल्याने त्या कॉलवर तक्रारींचा पाढाच वाचत राहिल्या कायम, पण आता लेक मात्र त्याला सरावलेली होती. ती आता भावनिक होत नव्हती. मी आज्जींना परोपरी समजवायचा प्रयत्न करतच राहिले की अशा वागण्याने तुम्हालाच त्रास होतो आहे, याने तब्येतीवर परिणाम होईल, पण आज्जी काही बदलत नव्हत्या.

त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपायला तीनच दिवस उरलेले होते, त्या दिवशी लेकीने खूप आनंदाने कळवले, मी येतेय आई तुला भेटायला. अपॉईंटमेंट फिक्स केली मी. इतके इतके वाजता भेटूया. मी ही सांगितले की तुमच्या भेटीच्या वेळी आज्जींना खाली गार्डनमध्ये आणण्याचे काम मी करेन ह्यावेळी. हे असे रियुनियन्स बघणे म्हणजे ट्रीट असते माझ्या मनासाठी, ती मी सोडणार नाही. लेकही आनंदाने 'हो' म्हणाली.

आमचे बोलणे सुरूच असतांना नर्स आली, आज्जींचे शुगर सॅम्पल घ्यायला. तिने आज्जींचा कान पंच करून रक्ताचे सॅम्पल घेतले. रक्तात साखर अतिरिक्त प्रमाणात निघाली. इतकी, की त्या योग्य आणि तातडीची ट्रीटमेंट मिळाली नाही, तर कोमात जाऊ शकतात, असे समजले. त्या क्षणी चेकिंगसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने आज्जींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे ठरले. त्यांना पोटातून इन्स्युलीन दिले, तर आज्जी म्हणाल्या, किती कमी डोस दिलात! मला इतका इतका डोस लागतो. म्हणजे लेव्हल पटकन डाऊन होते. असे एकदम पटकन लेव्हल डाऊन करणेही धोक्याचे असते आणि आम्ही प्लॅननुसार जात आहोत, असे सांगूनही आज्जींनी तेच पालुपद सुरूच ठेवले.

मला प्लिज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू नका, मग मला परत क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल, असे सारख्या म्हणत होत्या त्या. पण त्याला आता काही इलाज नाही, हे त्यांना समजवण्यात आले. नर्सने मला सांगितले, तू प्लिज त्यांचे तीन दिवसांचे कपडे आणि आवश्यक सामान भरशील का त्यांच्या बॅगेत? मी 'हो' म्हणाले. बॅग भरतांनाही आज्जींनी हे दे, ते नको करत मला बरेच दमवले. नक्की मी तीनच दिवस जाणार की जास्त? खरं सांग, असं मला विचारत होत्या. मी सांगितलं, आज्जी, आत्ता तरी तीन दिवसासाठी जाताय. बरं वाटलं तर याल लवकर नाहीतर वेळ लागू शकतो. पण तुम्ही चिंता सोडा. तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना?

बॅग भरून झाली आणि स्ट्रेचर घेऊन ऍम्ब्युलन्स सोबत आलेले कर्मचारी समोर होते. एक डॉक्टर करोनापासून पूर्ण प्रोटेक्ट करणारा प्लॅस्टिक ड्रेस घालून आज्जींना चेक करत होता. मग आज्जींना निघण्यापूर्वी एकदा पुन्हा लेकीशी ब्रीफ व्हिडीओकॉल मी स्वतःहून घडवून आणला.

तीन दिवसांनी आज्जी परत येणार, असे मला वाटत होते, पण तीन दिवसांनी सर्व्हरवर कॉमन ईमेल आली, त्यांना हॉस्पिटलमधून रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये १५ दिवसांसाठी शिफ्ट केले जाणार असल्याने आज्जींचे सगळे सामना भरून ठेवा. त्यांची रूम रिकामी करा. ते सामान खाली रिसेप्शन काऊंटरला पाठवा. आज्जींची मुलगी येऊन घेऊन जाईल.

आता आज्जींची रूम रिकामी झालेली आहे. माहिती नाही, त्या परत इकडे येतील की नाही. बघूया!

~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर.
२२.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २६

दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटी असल्याने बाकी कोणत्याही फ्लोअरवर जाण्याची गेले काही दिवस मला संधी मिळालेली नव्हती. ती मागच्या आठवड्यात चालून आली. एका केअर एम्प्लॉयी(स्पेशालाईज्ड नर्स) ने मला कॉल केला आणि सांगितले की एक आज्जी हॉस्पिटलमधून परत आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्याच रूममध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. (जे आज्जी आजोबा स्वतःहुन रूमबाहेर पडत नाहीत, त्यांना त्यांच्याच रूममध्ये आयसोलेट केले जाते.) ह्या आज्जी सारख्या रडत आहेत आणि त्यांची जगण्याची उमेद नष्ट झालेली आहे. तू त्यांना भेटशील का?

मी अर्थातच होकार दिला. ह्या आज्जींना मी आधीही एकदा भेटलेले होते. तेंव्हाही अशीच कोणाच्यातरी सांगण्यावरूनच.. त्यांना तेंव्हाही असाच डिप्रेशनचा ऍटॅक आलेला होता. मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा गप्पांच्या ओघात समजलं की त्यांनी लाईफ बुक लिहिलेलं आहे. मला त्यांनी ते उत्साहाने दाखवलं. ते हस्तलिखित पुस्तक त्यांच्या नातसुनेने टाईप करून, त्याच्या अनेक प्रिंट्स काढून, स्पायरल बाईंडीग करून कुटुंबातील सर्वांना त्याच्या कॉपीज वाटल्या असल्याची माहिती आज्जींनी मला दिली. त्यातलीच एक कॉपी आज्जींकडे होती.

मी ते पुस्तक चाळत असतांना आज्जींनी मला सगळी माहिती सांगितली. त्यात आज्जींच्या आजोबा आज्जींचेही बालपणापासूनचे फोटोज असून त्यांच्या पणजोबा पणजीचेही लग्नाचे फोटोज होते. आज्जींचे वय ९७ म्हणजे जर्मनीमध्ये कॅमेरा सर्वसामान्य लोकांना किमान दीडशे-पावणेदोनशे वर्षांपासून नुसता माहितीच होता असे नाही, तर त्यांच्या तो वापरताही होता, हे पाहून मला आश्चर्य वाटले. प्रत्येक फोटोसोबत आज्जींनी त्या फोटोजना जोडून आठवणी लिहिलेल्या होत्या. त्यांच्या पणजोबा-पणजी पासूनच्या कथा सुरू होऊन त्यांच्या पणती-पणतूपर्यंतच्या नोंदी आणि फोटोज त्यात होते.

आज्जींनी काळाशी जोडून तुलनात्मक फोटोजही काढलेले होते, ज्याला आपण 'बिफोर-आफ्टर' असे म्हणतो. त्यांचे घर आणि ५० वर्षांनंतर 'डाऊन मेमरी लेन' म्हणून रिव्हिजिट करून तिथेच काढलेले फोटोज, शाळेचे असेच फोटोज, बहिणीसोबतचे, आई वडील, आज्जी आजोबा बाळ असतांना आणि मोठे झाल्यावर, त्यांचे कन्फर्मेशनचे काळ्या ड्रेसमधले फोटोज(त्या प्रोटेस्टंट असल्याने कन्फर्मेशन, कॅथॉलिक असत्या तर पांढऱ्या ड्रेसमधले कम्युनियनचे असते.) आज्जी आजोबा, आई वडील, त्यांच्या स्वतःच्या लग्नाचे, त्यांच्या एकत्रित ट्रिप्सचे फोटोज आणि माहिती, आणि फोटोज संपल्यावर अतिशय सविस्तर लाईफ स्टोरी लिहिलेली होती.

'मला ही कल्पना फार आवडली आणि मलाही असे लिहायला आवडेल', हे आज्जींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, 'जरूर लिही, अगदी आठवणीने लिही'. आमच्या गप्पा संपल्या, तेंव्हा आज्जी एकदम छान मूडमध्ये होत्या.

त्यावेळी मी ही डायरी लिहायला सुरुवात केलेली नव्हती. आता नर्सच्या माहितीवरून त्या आज्जींना पुन्हा भेटायला गेले, तर त्या बेडवर अतिशय उदासीन अवस्थेत पडलेल्या होत्या. तब्येतीच्या कारणाने हॉस्पिटलमधून ऍडमिट होऊन आल्यामुळे करोना प्रतिबंधक नियमानुसार त्यांना आयसोलेट केले गेले असल्याने जाम वैतागलेल्या होत्या.

'मला आयुष्य संपवायचं आहे, काहीतरी टोकदार वस्तू मला प्लिज आणून दे', असं म्हणायला लागल्या. 'असे का बोलता आहात आज्जी?', असे विचारल्यावर, 'इतक्या आयुष्याचं मी काय करू? नुसती जिवंत आहे, अवयव मात्र सगळे खिळखिळे झालेले आहेत.' असे सांगायला लागल्या.

मग त्यांना 'तुम्ही मला ओळखलंत का?'असं म्हणून माझा फोटो दाखवला, कारण माझ्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांनी नकार दिला. मी त्यांच्या लाईफ बुकची त्यांना आठवण करुन दिली आणि आपण आज परत ते वाचूयात का? असे विचारले असता, त्यांच्या चेहऱ्यावर एकदम तेज आले आणि सगळी मरगळच निघून गेली. ते पुस्तक कपाटात ठेवलेले आहे, ती जागा मला बेडवर पडल्या पडल्याच दाखवून मला ते काढायला सांगितले.

आज्जींच्या परवानगीने मी त्यांच्या बेडची स्लीपिंग ऍरेंजमेंट बटन दाबून बदलून ती सिटिंगमध्ये रूपांतरित केली. अतिशय उत्साहात आज्जी मला पुन्हा सगळे पुस्तक समजावून सांगू लागल्या. जुन्या आठवणींमध्ये त्या रमल्या. त्यांना मी त्यांच्या सल्ल्यानुसार लाईफ बुक नाही, मात्र आज्जी आजोबांची डायरी मात्र लिहिते आहे, हे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. आज्जींना 'मी हे त्यांचे लाईफबुक पुस्तकरूपात प्रकाशित करायला आवडेल का' असे विचारल्यावर, त्या 'नको' म्हणाल्या. 'कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले मला आवडेल' असे म्हणाल्या.

आम्ही बोलत असतांनाच त्यांच्या ७० वर्षाच्या मुलाचा त्यांना रूमच्या लँडलाईनवर फोन आला. फोनवर त्यांनी मुलाला त्या मला 'लाइफबुक वाचून दाखवत आहेत आणि आपण नंतर बोलूया' असे सांगितले. 'मी तुमच्या मुलाशी बोलू का?' असे विचारल्यावर त्या 'हो' म्हणाल्या. मुलाला मी सांगितले की आत्ताच तुमचे बाळ असतांनापासून तर लग्न आणि नंतरचेही फोटो बघितले आणि मला फार छान वाटलं. ते हसले आणि 'दांकेशून' म्हणजेच जर्मनमध्ये 'थँक्यू' म्हणाले.

'तुमच्या आईला भेटलात का एवढ्यात आणि पुन्हा कधी भेटणार आहात?' विचारल्यावर 'करोना प्रकरण संपल्याशिवाय नाही भेटू शकणार', असे म्हणाले. 'व्हॉट्सऍप व्हिडीओकॉल माझ्या फोनवरून करू शकते, अर्थात, तुमच्याकडे ती फॅसिलिटी असल्यास', असे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. त्यावेळी माझ्याजवळ नेमका फोन नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी परत येते आणि आपण बोलू असे सांगून त्यांचा नंबर घेऊन गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आज्जींना भेटायला गेले, तर त्या त्यांचे हेल्थ इन्शुरन्स कार्ड आणि रूमची चावी शोधत होत्या बेडवर पडल्या पडल्याच. मांडीचे हाड अत्यंत दुखत असल्याने आता मला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे आहे, त्यामुळे सगळे सामान शोधते आहे, असे त्या म्हणाल्या. 'मी त्यांना शोधायला मदत करू शकते का' असे त्यांनी मला विचारल्यावर मी होकार दिला, मात्र 'आधी आत्ता तुमच्या मुलासोबत बोला आणि त्याला आत्ता बघा', असे सांगितले तर त्या विशेष उत्साहात दिसल्या नाहीत. चावी आणि कार्ड शोधण्यातच मग्न होत्या. तरी मी फोन लावला. आज्जींच्या मुलासोबत ओळख करून घेतली. आज्जींना फोन हातात दिला, तर त्यांनी मी आता ऍडमिट होते आहे, नंतर बोलू म्हणाल्या आणि फोन माझ्या हातात देऊन पुन्हा शोधाशोध करायला लागल्या.

मुलाला आज्जींना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार असल्याविषयी काहीच कल्पना नव्हती. मलाही माहिती नसल्याने मी नर्सला बेल दाबून बोलवून घेऊन तिच्याजवळ फोन दिला. तिने सगळी माहिती त्यांना सांगितली. मग मला फोन परत देऊन ती निघून गेली. मुलाने मला खूप धन्यवाद देऊन फोन ठेवला.

मग आज्जींना चावी आणि कार्ड शोधायला मदत मी करायला सुरुवात केली. सगळीकडे शोधाशोध सुरू असतांना सहज त्यांच्या बॅगचे कप्पे बघू लागले, तर त्यात चावीही सापडली आणि पाकीटही, ज्यात इन्शुरन्स कार्ड होते. ते दोन्ही बघून आज्जी रिलॅक्स झाल्या. परत आता रिलॅक्स मूडमध्ये मुलाशी बोलता का, विचारले असता त्या 'आत्ता नको' म्हणाल्या. मग आज्जींच्या मुलाला त्यांच्या वस्तू सापडल्या असल्याचे मेसेज करून मी कळवून टाकले आणि नंतर परत केव्हांतरी आज्जी परत आल्या की तुम्हाला कनेक्ट करून देते, असे सांगून आज्जींना बाय करून त्यांच्या रूममधून बाहेर पडले.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
२९.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २७

मागच्या आठवड्यात सिनियर केअर होमकडे जातांना लॉकडाऊन शिथिल केला गेला असल्याचं अचानकपणे जाणवलं..
करोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे एरव्ही शुकशुकाट असणाऱ्या जर्मनीच्या हॅनोवर शहरातील रस्त्यांवर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही लोकांची गर्दी आता पुन्हा दिसायला लागलेली आहे.

लॉन असलेले गार्डन्स खुले झालेले असले तरी एकेका कुटुंबातील लहान मुलंच एकत्र खेळतांना दिसत आहेत. पब्लिक स्विमिंग पूल्स मात्र अजूनही बंदच आहेत. दरवर्षी ह्या स्विमिंगपुल्सवर तोबा गर्दी असते. पाय ठेवायला जागा नसते, इतके लोक तिथे येत असतात.

जर्मनीत उन्हाळ्याची चाहूल लागताच लोक आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी घराबाहेर पडतांना दिसतात. गार्डन्सच्या लॉन्सवर वाचत पडणे, पोहणे, जॉगिंग, खेळ, सायकल राईड, माउंटन क्लाइंबिंग, फॉरेस्ट वॉक, नॉर्डीक वॉक(दोन्ही हातांमध्ये स्टिक्स घेऊन चालणं) असं काही ना काही सुरू करतात. उन्हाचा पुरेपूर आस्वाद घेतात. हे सगळं लोक ह्या वर्षी लोक मोकळेपणाने करू शकतील की नाही?, हा उन्हाळा आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजशिवायच संपून जाईल की काय? हा विचार मनात असतांनाच शिथिल केलेल्या लॉकडाऊनमुळे आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत.

सिनियर केअर होममधल्या पब्लिक ऍक्टिव्हिटीजही हळूहळू सुरू व्हायला लागलेल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काही खेळ आणि संस्थेतील ब्युटीपार्लर आणि सलून आता मागच्या आठवड्यापासून सुरू झालेले आहे.

आज्जी आजोबांना भेटायला येणारे नातेवाईक- एकेका फॅमिलीतील एक किंवा दोन व्हिजिटर्स अपॉइंटमेंट घेऊन आता भेटू शकतात, मात्र फक्त अर्धा तास. ह्या भेटीसाठी मागे लिहिल्याप्रमाणे गार्डनमध्ये तंबू ठोकलेला आहे आणि दोन टेबल्सच्या मधोमध लाकडी पार्टीशन, दोन्ही बाजूंना खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या, ग्लासेस अशी व्यवस्था केलेली आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत नातेवाईक येऊन भेटून जाऊ शकतात. हे अर्ध्या-अर्ध्या तासांचं अपॉइंटमेंट कॅलेंडर कॉमन इमेल्समधून सर्व एम्प्लॉयीजना वाचायला उपलब्ध असल्याने सर्व अपडेट्स मला क्वारंटाइन फ्लोअरवरही समजत आहेत.

हे कॅलेंडर रोज एकदम गच्च भरलेले असते, हे पाहून बरे वाटते. मी रोज क्वारंताईन फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांना गच्चीवर ऊन आणि मोकळी हवा खायला घेऊन जाते, तेंव्हा गाडी पार्क करून गेटमधून आत येणारे आणि मग तंबूत आपली वाट बघत बसलेल्या आज्जी/आजोबांना भेटायला जाणारे व्हिजिटर्स दिसतात.

गेटच्या अलीकडे एक एम्प्लॉयी हातात एक फॉर्म, कॉटन मास्कस, हँड सॅनिटाइझर घेऊन उभी असते. व्हिजिटर्स आले, की चावीने गेट उघडून व्हिजिटर्सना आधी सॅनिटाइझरने हात निर्जंतुक करायला लावून मग त्यांना (आधीच लावलेले नसतील तर) मास्कस लावायला सांगून, माहितीचा फॉर्म त्यांच्याकडून भरून घेऊन मग भेटीसाठी आत सोडतात. चौथ्या मजल्यावरच्या गच्चीवरून मी आणि इतर आज्जी आजोबा हे दृश्य रोज बघतो. आमचे छान मनोरंजन होते. तुम्हीही आपली तब्येत जपून लवकर बरे व्हा आणि नॉर्मल फ्लोअरवर जाऊन आपल्या नातेवाईकांना भेटा, असे मी त्यांना सांगत असते, तेही हसून होकार देतात.

ह्या गार्डनमधल्या तंबूतल्या भेटीबाबत एक अनुभव मला एकदा पाहायला मिळाला. मी लंचब्रेकमध्ये ग्राऊंड फ्लोअरवर आलेले होते. किचनच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या लंच कम मिटिंग हॉलला जोडूनच बाहेर गार्डन असल्याने काचेच्या खिडक्या आणि दरवाजांतून बाहेरील ऍक्टिव्हिटीज बघणे शक्य असते. मी जेवता जेवता बाहेर बघत होते.

तेंव्हा गेटवर एका आज्जींच्या नातेवाईकांची वाट बघत एक एम्प्लॉयी ताटकळत बराच वेळ उभी होती. माझे जेवण संपले, तरी त्या नातेवाईकांचा गेटवर पत्ता नाही, म्हटल्यावर मला राहवले नाही, म्हणून मी तिला विचारायला गेले, तर समजलं, एका आज्जींना भेटायची अपॉइंटमेंट घेऊनही भेटायला न आलेल्या नातेवाईकाने येणं कॅन्सल झाल्याचं कळवलंही नव्हतं आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. मला त्या उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या एम्प्लॉयीची दयाच आली. तिला मी पाणी हवं आहे का विचारलं, ती हो म्हणाली आणि आणि ती नको म्हणत असतांना तिला खुर्चीही आणून दिली.

त्या बिचाऱ्या आज्जीही वाट पाहून नाराज होऊन रुममध्ये परत गेल्या. त्या आज्जींविषयी खूप वाईट वाटत होतं. नातेवाईकाने असं का केलं असेल बरं? ते विसरले असतील का? कुठल्यातरी कामात अडकले असतील का? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल का त्यांचा? हा विचार कायम मनात रेंगाळत राहिला. मग दोन तीन दिवसांनी त्या एम्प्लॉयीला विचारलं, काही समजलं का ह्या आज्जींच्या नातेवाईकांचा काय प्रॉब्लेम झाला होता ते? त्यावर तिने मजेशीर अनुभव सांगितला. ते नातेवाईक म्हणे काल फायनली भेटायला आले, तर आज्जींनी आता मला आंघोळ करायची असल्याने आता माझी भेटण्याची इच्छा नाही, असे त्यांना कळवून भेटायला गेल्याच नाहीत आणि त्यांच्याशी 'जशास तसे' वागल्या!!!

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
१ जून २०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग २८

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज फार दिवसांनी डायरी लिहिणे जमवू शकलेय... बरेच अनुभव साठलेले आहेत.. कुठून सुरुवात करावी आणि काय आधी सांगावे आणि काय नंतर हे मला समजेनासे झालेले आहे. गेले काही दिवस वेळ मिळाला तसा चार पाच लांबलचक नोट्स लिहून आता हे नको, ते आधी घेऊ करत पब्लिश करणे कॅन्सल केले. शेवटी कोणीतरी कधीतरी सांगितलेले वाक्य 'सुरुवातीपासूनच सुरुवात करावी' हे आठवून पुन्हा लिहायला लागले. नशीब, ते आज पूर्ण करू शकले. हा भाग लिहिलेल्या नोट्सपेक्षा पूर्णपणे वेगळाच झालेला आहे, हे लिहून झाल्यावर लक्षात आले. गंमत म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात केली खरी, पण लिहितांना मधूनच आठवले, ते लिहिले गेले.

आजच्या भागात काही उल्लेख आहेत, ते काहीजणांना 'ग्रोस' वाटू शकतात. तर आजची डायरी वाचणे, टाळायचे असल्यास, ते जरूर करावे.

सिनियर केअर होममधल्या माझ्या जॉबला मागच्या आठवड्यात 3 महिने तर क्वारंटाईन फ्लोअरवर माझी ड्युटी सुरू होऊन सव्वा महिन्याच्या वर झालाय आता. चौदा दिवसांचे पाहुणे असलेले अनेक आज्जी आजोबा वेगवेगळ्या दिवशी फ्लोअरवर आल्यामुळे रोज नवीन जण इकडे येत जात आहेत. त्यातील काहींसोबत फक्त ओळख, काहींसोबत मैत्री, तर काहींसोबत एकदम जिव्हाळ्याचे बंध निर्माण झालेले आहेत.

क्वारंटाईन फ्लोअर हा 'पोस्ट-करोना' काळात निर्माण केला गेलेला फ्लोअर आहे. सगळ्यात वरचा- गच्ची आणि बेस्ट व्हीयू असलेला हा फ्लोअर प्रि-करोना काळात रेग्युलर फ्लोअर होता. इथे जवळपास ३० आज्जी आजोबा राहत असत. संस्थेकडून मिळालेला बेड, साईड टेबल, खुर्ची, कपाट याशिवाय त्यांनी घरून आणलेल्या अनेक वस्तू सुबकपणे मांडून ठेवून सजवल्याने त्या प्रत्येक खोल्यांना घरपण देण्यात बरेच आज्जी आजोबा यशस्वी झालेले होते.
मी ह्या फ्लोअरवर अगदी सुरूवातीला मोजक्याच वेळी जाऊ शकले होते.

त्यानंतर जेंव्हा २/३ आज्जींमध्ये करोनासदृश लक्षणे दिसू लागली, तेंव्हा त्यांना त्या फ्लोअरवर एका नर्सिंग स्टाफ सोबत ठेवून बाकी सर्वांना इतर फ्लोअर्सवर उपलब्ध असल्यास सिंगल नाहीतर डबल बेड असलेल्या रुम्समध्ये शिफ्ट केले गेलेले होते.

नंतर त्या सर्वांच्या टेस्टस सातत्याने निगेटिव्ह आल्यानंतर आणि त्यांचा चौदा दिवसांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर त्या २/३ आज्जींनाही खालच्या फ्लोअर्सवर शिफ्ट करून मग हा फ्लोअर हॉस्पिटलमध्ये काही कारणाने जाऊन आलेल्या आज्जी आजोबांना काही करोनासदृश लक्षणे असो, नसो, त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला.

तिथेच संस्थेबाहेरचे काही आज्जी आजोबा- जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते, त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यासाठी घरी न पाठवता इकडे ह्या फ्लोअरवर चौदा दिवस, मग खालच्या रेग्युलर फ्लोअरवर अजून चौदा दिवस आणि मग घरी, असे करणे सुरू झाले. या बाहेरील आज्जी आजोबांची या विशिष्ट संस्थेत किंवा इतर कुठल्यातरी संस्थेत पाठवणी करण्यामागे नेमकी कोणती थॉट प्रोसेस किंवा प्रॅक्टिकल सोय सरकारची होती/ आहे, याविषयी मला कल्पना नाही, ती कल्पना प्रत्यक्ष आज्जी आजोबांनाही नसल्याचे मला त्यांच्याशी गप्पा मारतांना समजले.

हॉस्पिटलमधून अचानकपणे कुठेतरी येऊन पडलो, इतकेच काय ते त्यांना कळत होते आणि इतर फ्लोअरवरून वरच्या ह्या फ्लोअरवर येणाऱ्या आज्जी आजोबांना तर एकदम धक्काच बसल्याचे आणि मग काहींना एकदम रडूच फुटल्याचे अनुभवही आले, त्यामुळे ह्या फ्लोअरवर आज्जी आजोबा जरी कमी असले, तरी माझे काम मात्र एकदम वाढल्याचे मला लक्षात आले. एखाद्या आठवड्यातील काही दिवस ८/९ रेसिडेंट्स तर कधी - ४/५ असे रेसिडेंट्सचे नंबर्स बदलत आहेत.

यातील काही आज्जी आजोबा परिस्थितीतील बदलांना एकदम सकारात्मकतेने स्वीकारून स्वतः आनंदी राहून आनंद पसरवणारे, तर काही सतत नकारार्थी विचार करून तब्येत बिघडवून घेणारे, काही बेड रिडन, तर काही डीमेन्स- स्मरणशक्ती कमी झालेले त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीचे काहीच भान नसलेले असे आहेत.

त्यांच्याशी संवाद साधणे माझ्यासाठी जितके चॅलेंजिंग आहे, त्याहूनही जास्त ड्युटीवरील नर्सेससाठी आहे. किती वेगवेगळ्या पातळीवरची कामं करूनही चेहऱ्यावर कुठेही वैताग आणि आठ्या न आणता काम करणाऱ्या त्या ताया आणि छोट्या भावांचे मला कौतुक करावे, तेवढे थोडे वाटते.

उदाहरणार्थ, एक आज्जी संस्थेबाहेरून शॉर्ट टर्मसाठी आल्या, आल्या त्याच अगदी विस्मरणावस्थेत.. त्यांना ऍम्ब्युलन्समधून लिफ्टने स्ट्रेचरवरून दोन उंचपुरी, धडधाकट, रेडियम स्राईप्स असलेला ग्रीनिश-ब्लू युनिफॉर्म घातलेली दोन तरुण मुलं घेऊन आली, तो दिवस मला अजूनही आठवतो आहे. आज्जी एकदम हरवलेल्या होत्या. त्यांना रूममध्ये घेऊन गेल्यावर बॅगेतुन त्यांचे सामान काढुन लावण्याचे काम नर्स करत होती. तर त्यांना स्ट्रेचरवरून उचलून अलगदपणे व्हीलचेअरवर ठेवून ती मुलं निघत असतांनाच हाऊस टेक्निशियन आज्जींचा त्यांच्या घरच्यांनी पाठवलेला टीव्ही टेबलवर ठेवण्याचे आणि कनेक्शन जोडून रिमोटने तो नीट कनेक्ट झालेला आहे का, हे पाहण्याचे काम करत होता.

मी आज्जींच्या रूममध्ये त्यांचे स्वागत म्हणून संस्थेकडून त्यांना देण्यात आलेला- फ्रेश फुलं आणि पाणी असलेला फ्लॉवरपॉट एका बाजूला ठेऊन, वेलकमिंगचा संदेश असलेला एक बोर्ड आणि संस्थेची माहिती देणारं बुकलेट आणि एक मासिक तिथे जवळ ठेवून एक सोडा वॉटरची तर एक साध्या मिनरल वॉटरची बाटली आणि ग्लास टेबलवर ठेवण्याचे काम करत करत आज्जींचे निरीक्षण करत होते. आज्जी आपल्या जगात हरवलेल्या असल्या, तरी हसऱ्या आणि फ्रेश होत्या, सुंदर टी शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या होत्या. तोंडातल्या तोंडात काहीतरी बरळत होत्या. ते शब्द मला "आल्लं-माल्लं" असे ऐकू येत होते.

आज्जींच्या बॅगेतुन मोत्यासारख्या सुवाच्य अक्षरातली काही पत्रं नर्सने बाहेर काढून टेबलवर ठेवली, ती मी हातात घेतली. आज्जींच्या लेकी-मुलं, सुना-नातवंडा, पतवंडांची ती पत्रं होती. त्यावर जागोजागी बदाम काढून लाल स्केचपेनने ते रंगवलेले होते. "आमची लाडकी आई, आज्जी, पणजी, आम्ही तुला मिस करतो, लव्ह यू, लवकरच भेटू, वगैरे सिमीलर मजकूर सर्व पत्रांमध्ये होता. ती सर्व मी आज्जींना वाचून दाखवली. आज्जींचे मात्र "आल्लं-माल्लं" सुरूच होते. टीव्ही कनेक्ट करून झाल्यावर आणि फ्लॉवरपॉटकडे बघून "हे मला नको, फेकून द्या" असे काहीसे त्या बरळायला लागल्या. आता त्यांच्या घरून आलेला टीव्ही असल्याने तो कुठे ठेवणार, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून तो टेक्निशियन निघून गेला. आज्जींना बेडवर झोपवून नर्स आणि मग मी ही त्यांना विश्रांती द्यायला तिथून बाहेर पडले.

आज्जींच्या सोबत राहून मी त्यांच्याविषयी केलेल्या निरीक्षणाची नोंद सर्व्हरवरील सॉफ्टवेअरमध्ये नोंदवून मी सबमिट केल्यानंतर थोड्याच वेळाने दुसऱ्या रुममध्येही दुसऱ्या एक संस्थेबाहेरच्या नवीन आज्जी दाखल झाल्या. दोघींची येण्याची वेळ सिमीलर असल्याने त्यांची नावं अदलाबदल करून लावण्यात आलेली होती. त्या "आल्लं-माल्लं" करणाऱ्या आज्जींना आम्ही ज्या नावाने हाक मारत होतो आणि मी सर्व्हरवर ज्यांच्या नावाने नोंद केली, त्या खरं म्हणजे ह्या नवीन आलेल्या आज्जी होत्या. हे नवीन आलेल्या आज्जींना भलत्याच नावाने हाक मारल्यावर त्यांनी सांगितल्यामुळेच आम्हाला समजले. तडक जाऊन सर्व्हरवर अदलाबदलीची नोंद करून ऍडमीन ताई-दादांना ती माहिती कळवून मी नवीन आज्जींकडे परत आले.

नवीन आलेल्या आज्जी नॉर्मल होत्या. वॉकरच्या आधाराने चालू-फिरू शकणाऱ्या आणि स्टेबल होत्या. मात्र डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांच्या रूममध्ये टीव्ही नव्हता. तुमचा स्वतःचा नसल्यास संस्थेकडून मागवून आणून देऊ का, विचारले असता, नको, हे टीव्ही बघणे, वगैरे मनोरंजनाच्या साधनांचा वापर मी सोडून दिलेला आहे, असे सांगून त्याचे कारण विचारले असता चार वर्षांपूर्वी मिस्टर वारलेले असल्याने मला कशातच रस उरलेला नाही, असे त्यांनी सांगितले. त्या आणि त्यांचे मिस्टर कोर्टात क्लेरिकल जॉब करत असतांना एकमेकांना भेटले, त्यानंतर लग्न, मग स्वतःचं ऑफिस उघडून कायद्याच्या क्षेत्रातच काहीतरी व्यवसाय, अनेक वर्षांचा त्यांचा आनंदी संसार आणि आता मूलबाळही नसल्याने मागे त्या एकट्याच उरलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. नात्यातील काही लोक आहेत पण दोनशे स्क्वेअर मीटरच्या बंगल्यात त्या एकट्याच राहत असल्याचे त्यांनी सांगितले. हा क्वारंटाईन पिरियड संपून कधी एकदाची घरी जाईन, असे त्यांना झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आज्जींना म्हणाले, आज्जी, काळजी करू नका, आपण मस्त गप्पा मारू, खेळू, मजा करूया. छान ऊन पडलेलं आहे, तर चला, बाहेर टेरेसमध्ये जाऊयात, तर त्या म्हणाल्या, नको, नको! मला नुसतंच पडून रहावंसं वाटतंय आत्ता.. नंतर कधीतरी बघूया! मग त्यांना ओके म्हणून मी तिकडून निघाले.

ह्या ही आज्जींचे डॉक्युमेंटेशन करून झाले, तोवर त्यांचे लंच आले आणि ते सेपरेट लिफ्टमधून पिक अप करायला नर्स गेली. ही लिफ्ट किचनला जोडलेली आहे. तिचा आधीचा उपयोग काय होता, ते माहिती नाही, आता मात्र ती लिफ्ट ह्या आयसोलेटेड फ्लोअरवर ब्रेकफास्ट, लंच, टी टाईम ब्रेकसाठीचे स्नॅक्स, कॉफी, डिनर, पाण्याच्या बाटल्या इत्यादी एकेका रॅक्समध्ये ट्रेज ठेवून त्यामधून पाठवण्यासाठी वापरली जाते. इतर फ्लोअर्सवर मात्र किचन मधून अन्नपदार्थ प्रत्येक फ्लोअरवरील त्या त्या कामासाठी नेमले गेलेले एम्प्लॉयीज रॅक्समध्ये ट्रेज ठेवून त्यामध्ये नॉर्मल लिफ्टमधून घेऊन जात असतात.

लंच ब्रेक झाला, म्हटल्यावर मी ही नेहमीप्रमाणे आयसोलेटेड फ्लोअरवर असल्याने चेंजिंग रूममध्ये जाऊन घातलेला मास्क, माझा चष्मा काढून एका विशिष्ट जागी ठेवला. मग एप्रन आणि ड्रेस वॉशिंगसाठीच्या कॅनमध्ये टाकून मग युनिफॉमही काढून त्या वॉशिंग कॅनमध्ये टाकून ती नीट झाकली. मग ग्लोव्हज कचऱ्यात टाकून प्रोटोकॉलनुसार दोन शूजपैकी एका शूवरचे प्लॅस्टिक कव्हर काढून ते कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि मग तो कव्हर काढलेला पाय जमिनीवर टेकू न देता लंगडी घालत आयसोलेटेड पार्टीशनची चेन उघडून तो पाय बाहेर टाकला आणि मग दुसरा पाय वर उचलून त्यावरचे प्लॅस्टिक कव्हर काढून ते कचऱ्याच्या डब्यात टाकून पलीकडे हा ही पाय टाकला. मग केसांवरील कव्हरही कचऱ्याच्या डब्यात टाकून चेन बंद केली. आता आयसोलेटेड एरियाबाहेरील रूममध्ये जाऊन माझा ओरिजनल ड्रेस घालून, साधा मास्क घालून लिफ्ट बोलवून खाली जेवायला गेले.

जेवण झाल्यावर ही सेमच प्रोसेस उलट्या दिशेने करून मग पुन्हा वर ह्या फ्लोअरवर आले.

फ्लोअरवर पोहोचल्या पोहोचल्या नर्स काकुळतीला येऊन मला म्हणाली, आज माझ्यावर फार जास्त काम पडलंय गं... आणि माझी घरी जायची वेळही होत आलेली आहे, दुसरी नर्स थोड्यावेळाने येईपर्यंत मला बरीच कामं उरकायची आहेत. माझं डॉक्युमेंटेशन तू प्लिज आज करशील का? मी तुला पटकन काय काय घडलं, ते सांगते, आणि ते तू लिहिशील का? मी अर्थातच 'हो' म्हणाले. तिने तिचं लॉगिन करून देऊन कीबोर्ड माझ्या हातात दिला.

तिने सांगितलेला मजकूर साधारणपणे असा होता: "त्या विस्मरण झालेल्या आज्जींनी त्यांना संस्थेत वेलकम म्हणून मिळालेला फ्लॉवरपॉट फोडून टाकलेला होता, त्याच्या काचा सगळ्या रूमभर पसरल्या, त्या मी गोळा करून रूम स्वच्छ करून निघाले, तर त्या टीव्ही उचलून जमिनीवर फेकायला लागणार, तेवढ्यात मी त्यांना थांबवलं आणि बेडवर झोपवलं. मग जरावेळाने परत जाऊन बघते, तर आज्जींनी 'शी' करून ती सर्व बेडशीटभर पसरवून ठेवलेली होती. मग ते सर्व मी स्वच्छ केलं, त्यांना मी आंघोळ घातली. मग जेवण दिलं... "

नर्सचे काम किती अवघड असते आणि या क्षेत्राला इतकी डिमांड का आहे, हे त्या दिवशी मला प्रकर्षाने जाणवलं.

नर्सने मला दिलेलं डॉक्युमेंटेशन करून मी सुन्न अवस्थेत तशीच जरावेळ बसून राहिले. त्यावेळी ह्याच फ्लोअरवरील दुसऱ्या एका आज्जींचा अनुभव मला आठवला. ह्या आज्जींना मी एक दिवस भेटायला गेले तर त्यांच्या अंगात फक्त वरच्या भागात कपडे आणि खाली काहीही नव्हतं.. त्यांच्या शौचाच्या जागेतून रक्त वाहत होतं. नर्सने ते रक्त शोषायला खाली एक टर्किश टॉवेल ठेवलेला होता. अनपेक्षित असे हे भयाण दृश्य पाहून मी पटकन बाहेर पडले. माझ्या पोटात एकदम ढवळून आलेलं होतं. त्या दिवशी नर्सच्या ड्युटीवर एक तरुण मुलगा होता. मागे उल्लेख केलेल्या इरिट्रीशियन मुलांपैकी एकजण.. त्याच्याशी बोलले, तर तो एकदम कूल वाटला. आज्जींची ही ही कंडिशन आहे, असे कंडिशनचे नाव सांगून आता ऍम्ब्युलन्स येऊन आज्जींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, म्हणाला. त्याला मी आज्जींना असं उघडं का ठेवलं आहेस? सिनियर सिटिझन्ससाठीचं डायपर तरी लाव, असं सांगितल्यावर तो 'हो, लावतो', म्हणाला. त्याला जरी या प्रकारच्या कामांची सवय असली, तरी बहुतेक ही विशिष्ट कंडिशन त्यानेही बहुतेक पहिल्यांदाच पहिली असावी आणि अचानक काय करावं ते सुचलं नसावं, असं मला जाणवलं.

त्याचवेळी एक क्लिनिंग स्टाफची मुलगी तिथे आली. सुदैवाने ती मागे उल्लेख केलेली, सर्वांना हसवणारी, स्वतःला चार्ली चॅप्लिन समजणारी माझी मैत्रीण होती. तिने मला गरज असतांना ह्या फ्लोअरवर असणं, ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट होती. तिला मी झालेला प्रकार सांगून तिथे काही फळ वगैरे मागवून मला खाता येईल का? असे विचारले. माझ्या पोटात त्या पाहिलेल्या दृश्याने अजूनही ढवळत होते आणि पोटात एक मोठा खड्डा पडलाय, काहीतरी पोटात टाकले की बहुतेक बरे वाटेल, असे मला वाटत होते. ती म्हणाली, किचनमध्ये वेगवेगळ्या टी बॅग्ज आहेत, त्यातून पेपरमिंट टी निवड आणि वॉटर बॉयलरमध्ये पाणी गरम करून कपात ओतून तो चहा बनवून पी, तुला बरं वाटेल.

तिच्याशी बोलूनच मला एकदम बरं वाटायला लागलेलं होतंच. मानसिकच असेल कदाचित, पण तो चहा घेऊन मला खरोखरच बरं वाटलं. मी चहा घेऊन येईपर्यंत स्ट्रेचरवरून आज्जींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला दोन जण आलेलेच होते. ते आज्जींना घेऊन गेले.

अशाप्रकारचे अजूनही काही अनुभव आले आहेत, ते सगळे मी खरंतर टाळावेत का, असा विचार करत होते, पण मग ह्या जॉबची ही बाजू अंधारात राहिली तर एक मोठा आणि महत्वाचा पैलू सांगायचा राहून जाईल, शिवाय बोलल्याने, शेअर केल्याने माझेही मन मोकळे होते आहे, हा विचार करून मी ते लिहिले. अजूनही काही अनुभव लिहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्यानिमित्ताने नर्सचे काम करणाऱ्या सर्वांचे महत्व मला अधोरेखित करता येईल. नर्सेसबद्दल, ते ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे स्वीकारतात, हेही मी सर्वांशी बोलत असते. त्यावर त्यांनी दिलेली उत्तरं फार टचिंग आहेत, ती ही नंतर सांगते.

हा भाग वाचून त्रास झाला असेल, त्या सर्वांची मी माफी मागून आणि नर्सचे काम करणाऱ्यांना 'हॅट्स ऑफ' करून आजचा भाग संपवते.

~सखी(कुमुद-प्रमोद) जयचंदर
१५.०६.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग २९

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

भाग २८ किळस न येऊ देता वाचून मायेने मला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आणि खूप खूप आभार! ते प्रतिसाद वाचून माझ्या मनावरचे दडपण नष्ट होऊन मी एकदम रिलॅक्स झाले. आता यापुढे मी मोकळेपणाने जे आणि जसं घडलं, ते आणि तसं कुठल्याही आडपडद्याशिवाय लिहू शकेन.

त्या 'आल्लं-माल्लं' असं बरळणाऱ्या आज्जींनी दुसऱ्या दिवशी अजूनच मजेशीर प्रकार केल्याचे दुसऱ्या नर्स ताईकडून कळले. ह्या आज्जी म्हणजे आपलं लहानसं गोड बाळच वाटल्या मला त्यांच्या बाळलीला ऐकून. अर्थात नर्स ताई ते सगळं ज्या स्वरात आणि भावात सांगत होती, त्यामुळेच.. ती म्हणे त्यांच्या रूममध्ये गेली, तेंव्हा आज्जी बाथरूममध्ये होत्या. कमोडमध्ये तळाशी असलेलं पाणी दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन त्याने तोंड धुणे एन्जॉय करत बसलेल्या होत्या. त्यांना तिने सांगितलं, "आज्जी, अहो! हे पाणी तोंड धुण्यासाठी नाहीये. हे बेसिन बघा, इकडे तोंड धुवायचं असतं." मग नर्सने बघितलं, की कचऱ्याच्या डब्यात आज्जींनी शू करून ठेवलेली होती. तिने मग त्यांना हा कचऱ्याचा डबा त्यात कचरा फेकायचा असतो आणि शू कमोडवर बसून करायची असते, हे समजावून सांगितलं.

ह्या आज्जींना रूममध्ये बसायला आवडायचं नाही. त्या रूमच्या बाहेर पडून कोणाच्याही रूममध्ये जायच्या. शेजारच्या रुममधल्या दुसऱ्या नवीन आज्जींच्या रूममध्ये एकदा मध्यरात्री भुतासारखं शिरून त्यांना चांगलंच घाबरवलं होतं त्यांनी! तेंव्हापासून त्यांचा धसका घेऊन ह्या आज्जींनी आपली रूम लॉक करून घ्यायला सुरुवात केली. त्यांना आमची मास्टर की वापरून आम्ही भेटायला गेलो की परत जातांना दार लॉक करायला विसरू नका, हे त्या आठवणीने प्रत्येकवेळी सांगत असत. हे करूनही त्यांचा त्रास काही संपला नाहीच.. कारण त्या आज्जी लॉक केलेल्या दाराचे हँडल दुपारी आणि रात्री अपरात्री हलवत बसून उघडायचा जो प्रयत्न करत, त्यात ह्या दुसऱ्या नव्या आज्जींची झोपमोड व्हायचीच..

करोनाकाळात हा फ्लोअर आयसोलेट केला गेला असल्याने जिने वापरणे बंद ठेऊन त्यांच्या दरवाज्यांना सायरन बसवला आहे, जेणेकरून कोणीही दार उघडलं, की तो जोरात वाजेल. आज्जींनी तो कसा वाजतो, ह्याचे एकदा प्रात्यक्षिक दाखवण्यासाठीच जणू ते दार उघडून जिने उतरणे सुरू केले.

हे सगळे काही डॉक्युमेंट केले गेले आहे. मग आज्जींना ट्रँक्युलाईझर्स देऊन थोडे शांत करण्यासाठी उपचार देण्यात आले. मात्र कधीच आज्जींना बांधले नाही की त्यांची रूम लॉक केली नाही. त्यांच्यावर कोणीही ओरडले आणि वैतागले नाही. फक्त टेरेसचे दार आपण यापुढे बंद ठेवायला हवे, ह्या आज्जींनी वरून उडी मारायला नको, असे नर्स म्हणाली.

बाकी सर्वांना मी टेरेसमध्ये न्यायचे, ह्या आज्जींना मात्र त्यांच्याच सुरक्षिततेसाठी न नेण्याचे नर्सने सांगितल्याने मी ते कधी केले नाही. त्यांना कळो न कळो, काहीतरी गप्पा मारून येण्याचे काम नियमितपणे तेवढी करत राहिले.

एक दिवस ह्या आज्जी अशाच रूममधून बाहेर येत होत्या, तर नर्स ताई त्यांना म्हणाली, 'नका हो बाहेर येऊ, तुमचं येडं डोकं आहे..' तर आज्जीही लगेच आल्यापाऊली परत वळल्या आणि आज्ञाधारकपणे रूममध्ये जाऊन बसल्या. मी नर्सला म्हणाले, 'नको ना गं असं बोलूस.' तर ती म्हणाली, 'अगं, त्यांना फक्त हीच भाषा कळते. तुला तर माहितीच आहे, त्या कशा नाकी नऊ आणतात ते!' मलाही पटलं, बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष काम करणाऱ्याच्या संयमची मात्र परीक्षा असते, अधूनमधून त्यांचाही तोल सुटतो, तरी नर्स ताई जे काही बोलली, त्यात मला मायाच जाणवली. आज्जी सुद्धा तशा कूलच होत्या. 'बॅक ऑफ द माईंड' कदाचित त्यांना आपल्या उद्योगांची अधूनमधून पुसटशी कल्पना येत असावी, असं मला वाटलं..

आज्जींना 'येडं डोकं' बोलल्याच्या दुसऱ्याच दिवशी हीच नर्स ताई मॉर्निंग शिफ्टला होती. मी तिकडे गेल्या गेल्या मला म्हणाली, "अगं आपल्या 'आल्लं-माल्लं' आज्जींना मी आज फ्रेश हवेत गच्चीत फिरवून आणलं बरंका! त्याही बिचाऱ्या खोलीत पडून पडून कंटाळत असतील ना?' नर्सच्या प्रेमळपणाचं, आज्जींच्या सर्व बाळलीला पोटात घालून आईच्या मायेने त्यांचं केल्याचं, करत असल्याचं पाहून मन भरून आलं.. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यावर ह्या आज्जींना डिमेन्शिया फ्लोअरवर शिफ्ट करण्यात आलं. परवाच्या इमेलमध्ये वाचलं, ह्या आज्जी तिकडे आपल्या वॉकरवरून धडपडत दुसऱ्या व्हीलचेअरवरच्या आज्जींच्या अंगावर पडल्या आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड आहेत आता. बघूया, त्यांना वर क्वारंटाईन करतात की खाली त्यांच्याच रूममध्ये..

कालच्या भागात उल्लेख केलेल्या आज्जी- ज्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून माझ्या पोटात खड्डा पडला होता, त्या ट्रीटमेंट घेऊन दोन तीन दिवसांनी परत आल्या, त्याबरोबर त्यांचा क्वारंटाईन पिरियडही चौदा दिवसांनी वाढवण्यात आला. अर्थात ह्या आज्जी आता तब्येत आणि मानसिकदृष्टीने अशा स्टेजला पोहोचलेल्या आहेत की त्यांना काही फरक पडत नसणार त्याने. त्यांच्यासाठी सर्व रूम्स सारख्याच.. ह्या आज्जी बेडवरच कायम पडून असत. त्यांना फक्त जेवणा-खाण्यापुरते टेबल खुर्चीत बसता येत असे. तर जेवण झाले की मला लगेच बेडवर टाका, पाठ दुखते, म्हणून हाक मारून बोलवून घेऊन पडून घ्यायच्या. पडल्या की जरावेळाने मला आता उठायचे आहे, पाठ दुखते आहे पडून पडून, म्हणायच्या. बेड बटण दाबून वर उचलला की तोल जाऊन पडत. त्यांची कम्फर्टेबल पोझिशन सेट करून देणे, हे एक सातत्याचं आणि दुसरं एक संयमाची परीक्षा घेणारं काम होतं नर्सेससाठी. ह्या आज्जींना मला गच्चीत नेणे शक्यच नव्हतं. नर्सनेही त्यासाठी नकार दिलेला होता. मी कुठल्याही प्रशिक्षित स्टाफच्या मदतीशिवाय कोणत्याही आज्जी आजोबांना जमत असले तरी उचलणे, भरवणे वगैरे नियम मोडणारे ठरत असल्याने मी ते कधी केले नाही.

एक दिवस ह्या नर्सने त्या आज्जींना गच्चीत त्यांच्या व्हीलचेअर वरून फिरवून आणले. तेंव्हा आज्जी चक्क रडल्या म्हणे! किती छान फ्रेश हवा, सूर्यप्रकाश! आणि मग रोज तिथे बसायला लागल्या.

ही जर्मन नर्स ताई तिची ज्या ज्या दिवशी ड्युटी असते, त्या त्या दिवशी सकाळी साडेपाच/ पावणेसहाला पोहोचते आणि दीड दोनच्या सुमारास घरी जाऊन तिच्या आठ वर्षाच्या लेकासोबत जेवण करते. तुला ही नोकरी कशी लागली, तिच्याबद्दल कशी आवड निर्माण झाली, विचारले असता, काळजी घेणे हा माझा स्वभावच आहे. मला माझं काम मनापासून आवडतं, म्हणून मी ते निवडलं, आणि त्याचा कधीच पश्चाताप मला झाला नाही, असं तिने अगदी सहजतेने मला सांगितलं..

मी ह्या फ्लोअरवर ड्युटीला सुरुवात केली, त्या पहिल्या दिवशी हीच तिकडे होती. मला पाहून, "कोणीतरी आलं इकडे मला सोबत. किती छान!" असं म्हणून माझं प्रेमाने स्वागत करणारी आणि अजूनही निघतांना "तू उद्याही येणार आहेस ना? परवाही असणार आहेस ना इकडे? किती छान!" असे म्हणत असते आणि मला ही संस्था म्हणजे माझे दुसरे घर असल्याचा फील करून देते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
१६.०६.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३०

भाग २९ मध्ये लिहिले आहे, तिच्यासारखीच दुसरी पण जास्त सिनियर ताई, ही अतिशय गोड शब्दांचा बोलण्यात वापर करून मन सुखावून टाकत असते. सर्व सहकाऱ्यांना शाट्झी शाट्झी (इंग्रजीत अर्थ हनी, हनी) तर करतेच, पण आज्जी आजोबांसोबतही ह्याच भाषेत बोलत असते. आपण लाडाने कसं सोनूटली, बबडू वगैरे म्हणतो तसे जर्मनमध्ये प्रेमाच्या शब्दांना 'शन' असा प्रत्यय जोडतात. तर ती प्रत्येकाला प्रेमाने 'शन' जोडूनच संबोधते. उदा. आचाऱ्याला शेफ म्हणतात, तर ही संस्थेच्या आचाऱ्याला फोनवर माईन शेफशन(माझा शेफुला) असे संबोधून बोलते.

संस्थेच्या नियमात हे असे बोलणे बसत नाही. आमच्या बॉसने मी जॉईन केले, तेंव्हाच मला सांगितलेले होते की असे बोलू नको बरंका कोणासोबत. थोडे अंतर ठेवून वागायचे आणि प्रोफेशनॅलिझम जपायचा, हेच तिलाही सांगितले होते, हे तिने मला सांगून, मला म्हणाली की मी हे असं सगळ्यांशी बोलते, हे तू प्लिज बॉसना सांगू नकोस हं.. मी अर्थातच हो म्हणाले. मला मुळात असं काही सांगायचं डोक्यातही आलं नव्हतं. आलं असतं तरी मी सांगितलं नसतं, कारण कुठली गोष्ट कळवणं गरजेचं आहे आणि कुठली नाही, याचं मला भान आहे. अर्थात मी नवीन असल्याने तिला ते कळलं नसल्याने सेफ साईड तिने मला माहिती दिली होती. मी तिला नियम हे माणसांसाठी असतात, माणसे नियमांसाठी नाही आणि तू या शब्दांचा जाणूनबुजून कुठल्याही वाईट हेतूने वापर करत नसून तो तुझ्या स्वभावाचा भाग आहे आणि तुझ्या पोटात असलेल्या मायेतून ते आपसूकच झिरपतात, तू तशा भाषेत बोलली नाहीस, तर तुला चैनच पडणार नाही, याची मला कल्पना आहे, हे तिला सांगितल्यावर तिला खात्री पटली की मी बॉसला सांगणार नाही.

मात्र बॉसला कोणी सांगितलंच, तरी बॉससुद्धा मला नाही वाटत काही ऑब्जेक्शन घेईल. ती तशी सेन्सिबल व्यक्ती आहे आणि कुठल्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घ्यायचं आणि कुठल्या नाही, हे तिला नीटच माहिती आहे. नाहीतर शंभरच्या वर आज्जी आजोबा आणि जवळपास तितकेच एम्प्लॉयीज कोणत्याही मेजर क्लॅशेसशिवाय सांभाळणे आणि त्यांना जोडून ठेवणे हे सोपे काम नाही. शिवाय काम करणाऱ्या माणसावर पूर्ण विश्वास टाकून त्याला कधीही प्रेशराईझ न करता मोकळेपणाने त्याच्या पद्धतीने काम करू देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आपलेपणाने काम करावेसे वाटते. बाकीच्यांचे मला नेमके सांगता येणार नाही, पण मला मात्र हे प्रकर्षाने जाणवते. शिवाय माझा अनुभव असा आहे की जॉईन केल्यापासून बॉसने एकदाही मला विचारले नाही, तू रोज किती आज्जी आजोबांना भेटतेस आणि किती वेळ देतेस, असे बोलू नकोस, तसे बोल, डॉक्युमेंटेशन असे का केले, असे कधीही विनाकारण बॉसिंग केले नाही. त्यांची पॉवर कधीही दाखवली नाही. त्यामुळे काम करणाऱ्या कोणामध्येही कडवटपणा, उपरोधिक भाव, तुच्छ लेखले गेल्यामुळे अपमानास्पद मनस्थितीत नाईलाजने पैसे कमवायला काम करत राहणे, असे मला कधीही जाणवले नाही.

तर बॅक टू नर्स ताई नं २. ती जशी प्रेमाचे शब्द बोलते, तशीच आणि तितकीच प्रचंड प्रेमळ आहे ती... आज्जी आजोबांना तिचे ते शब्द किती सुखावत असतील, तिची सेवा मिळणे म्हणजे त्यांना नक्कीच पूर्वजन्माची पुण्याई वाटत असणार, असे वाटते. आपल्याकडे कसं एखाद्या गोंडस व्यक्तीला/ मुलाला ससूला म्हणतात, तसे जर्मनमध्ये माऊस ह्या प्राण्याचे नाव घेतात. कोणत्याही आज्जींना आणि आजोबांना भेटल्यावर त्यांची साईझ काहीही असो, माय डियर मॉइसशन, माय लव्ह अशीच वाक्याची सुरुवात आणि शेवट करण्याची तिची सवय असल्याने तिचे बोलणे म्हणजे संगीत ऐकतोय, असंच वाटत राहतं... भेटली, की फिल्मी हिरॉईनसारखी डोळे फडफड फडफड करून हाय करून हसवत असते. हिची एन्ट्री झाली की वातावरणात एकदम चैतन्य निर्माण होतं. ती ज्या भाषेत बोलते, त्याच भाषेत तिला सगळे उत्तरं देत असल्याने ती बदली नर्स म्हणून दुपारच्या शिफ्टला आली की गोडमिट्टं शब्दांची फार गंमत अनुभवायला मिळते.

ह्या ताईला बरीच मोठी ३ मुलं(मुलं म्हणजे त्यात मुलगीही आली) असूनही नवरा वारल्यापासून इकडच्या कल्चरप्रमाणे ती एकटीच राहते. एक कुत्री तिने पाळलेली आहे सोबत म्हणून.. एकटी का राहतेस, विचारले असता मला तसेच आवडते, मुलांसोबत राहायला नाही आवडत, असं म्हणाली. ती एकही दिवस सुट्टी न घेता रोज सेकंड शिफ्टवर कामाला येते आणि एकदम जोडून दहा-बारा दिवस रजा काढून नातेवाईकांना भेटायला जाते. तिची आईही वेगळ्या गावी सिनियर रेसिडेंटमध्ये राहते, तिला भेटते, तिच्यासोबत वेळ घालवते.

तू इतकी गोड आणि प्रेमळ कशी, विचारले असता तिने अनपेक्षित असे उत्तर दिले. तिने सांगितले, तिला तिच्या आई वडिलांनी फार बेदम मारलेले आहे, तो मार खाऊन जो त्रास झाला, तो अनुभवल्यामुळे तिने ठरवले की ती स्वतःच्या मुलांच्या बाबतीत हे कधीच करणार नाही, त्याप्रमाणे तिने आपल्या मुलांना कधीच रागावले, मारले नाही. आज्जी आजोबांच्याही कोणत्याही वागण्याचा तिला कधीच राग येत नाही. ते कितीही इरिटेट करत असले, तरी ती इरिटेट होत नाही.

त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आज्जींकडे पाहून मला झालेला त्रास तिला माहिती होता. त्या आज्जी हॉस्पिटलमधून परत आल्यावर बेड रिडन होत्या. तिने मला विचारले, तू आज त्यांना दुपारच्या कॉफीब्रेकला केक भरवशील का? मी तिला हे काम मी केले, तर चालले का? असे विचारले, कारण मागे एकदा दुसऱ्या एका फ्लोअरवर मी राऊंडला गेलेले असतांना एक आज्जी पाणी मागत होत्या, तेंव्हा नर्सेस वेगळ्या कामात बिझी होत्या, म्हणून मी त्यांना पाणी पाजले, तर स्टाफ नर्स तिकडे आली आणि तिने सांगितलं, हे काम तू नाही करू शकत, कारण तू त्या गोष्टीचे प्रशिक्षण घेतलेले नाही.

पण ती ताई म्हणाली, हरकत नाही, तू कर हे काम.. मी त्या आज्जींना केक भरवला, पाणी पाजलं, आणि एकदम त्यांच्याविषयी माझ्याही मनात माया दाटून आली. ह्या आज्जींचे डोळे एकदम वेगळ्याच रंगाचे होते, हे मला त्यांना जवळून पाहिल्याने जाणवले. फिकट निळ्या रंगाची फार सुंदर शेड असलेले त्यांचे डोळे बघतच राहावेसे वाटत होते मला. ह्या आज्जींना केक भरवतांना त्यांच्या ओठांना लागलेले क्रिम मी टिश्यूने पुसले की त्या प्रत्येकवेळी 'दांके' (जर्मनमध्ये 'थँक्यू' )म्हणत. त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञता ओथंबून वाहतांना दिसायची. त्यांना नीट ऐकू येत नसल्याने मोठ्याने बोललं, तरी त्यांना त्रास व्हायचा.

केक खाता खाता त्या अचानक म्हणाल्या, फार छान, टेस्टी केक आहे. आता मला नको देऊस अजून, नाहीतर सर्वांना पुरणार नाही. तू खाल्लास का? तू पण आठवणीने खा बरंका, असं प्रत्येक घासात सांगायला लागल्या. त्यांना सर्वांसाठी पुरेसा आहे केक, काळजी करू नका, तुम्ही खा, सांगितले तरी त्या तेच ते परत परत सांगत राहिल्या आणि मी ही 'हो हो' करत राहिले.

ती नर्स ताई रोजच मग मला हे काम द्यायला लागली. आज्जी पूर्ण बऱ्या होऊन टेबल चेअर वर खायला लागेपर्यंत आठवडाभर मी हे काम रोज केले. त्यातून आज्जींसोबत एक वेगळेच इमोशनल बॉंडिंग निर्माण झाल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्या मनात त्यांची विचित्र आजारी अवस्था पाहून जे चित्र निर्माण झाले होते, ते खोडून सुंदर नात्याचे चित्र निर्माण व्हावे, या उद्देशाने ताईने मला मुद्दामच हे काम दिले असल्याचे मला जाणवले. हे काम करायला लागल्यावर आपण आपोआपच आईसारखे कसे होऊन जातो, हेच तिला बहुतेक मला प्रत्यक्ष अनुभवातुन दाखवून द्यायचे असावे.

अशा ह्या ग्रेट ताईसारखाच मागे उल्लेख केलेल्या दोन इरिट्रीशियन मुलांपैकी एक जण. ही ग्रेट ताई रजेवर जाते, तेंव्हा अधूनमधून हा येतो. काहीही न बोलता कृतीतूनच त्याचा प्रेमळपणा जाणवतो. त्याचे वय हार्डली विशीतले असेल. सगळी फॅमिली देशात आणि तो एकटाच इकडे जर्मनीत असतो, जॉबसाठी. अतिशय संयमी मुलगा आहे. कष्टाळू आणि शांत वृत्तीचा आहे.

एक आजोबा मागे ह्या फ्लोअरवर होते, ते टॉयलेटसाठीची स्पेशल व्हीलचेअर वापरत. आपल्या बसण्याच्या व्हीलचेअरवरून उठून ह्या चेअरवर बसायला त्यांना मदत लागायची. सतत ते बटण दाबून बोलवत असत आणि हा मुलगाही न वैतागता जायचा.

त्या चेअरला मध्यभागी बेबी टॉयलेटप्रमाणे सेपरेट करता येणारा भाग होता. प्रत्येक वापरानंतर तो भाग रिप्लेस करून जुना भाग धुवायला टाकावा लागायचा. त्यासाठी एक वेगळे वॉशिंग मशीन आहे, डिश वॉशरसारखे. ते मजल्याच्या दुसऱ्या टोकाला आहे. त्यात त्याने तो पार्ट एकदा धुवायला टाकला, तर आजोबा पाचव्या मिनिटाला रिंग वाजवायला लागले. सगळेच रिप्लेसबल पार्ट्स आजोबांनी वापरून संपवल्याने आता चाळीस मिनिटांचा प्रोग्रॅम संपून एक पार्ट स्वच्छ होऊन येईपर्यंत कळ काढा, असे सांगितले, तर पुन्हा फार अर्जंटली जायचे आहे, असे सांगतले.

मग त्या नर्स मुलाला काही गत्यंतर उरले नाही. त्याने जाऊन प्रोग्रॅम अर्धवट बंद करून आजोबांना तो इनर पार्ट आणून व्हीलचेअर टॉयलेटवर बसवून दिले. हे आजोबा सतत बेल वाजवून बोलवत असतात. जराही बसू देत नाहीत. त्यांना कधीच आंघोळ करायची नसते.
मला करोना नाही झालेला, काही बॅक्टेरियाज नाहीत अंगात, असे सांगून आंघोळ टाळतात, कपडेही बदलू देत नाहीत. अंगावर सगळे अन्न सांडून ठेवतात, त्यामुळे त्यांच्या रूमची अवस्था लक्षात येत असेलच, शिवाय अंगाचाही वास येतो.

मी आज्जी आजोबांना गच्चीत नेण्यासाठी विचारायला जायचे, तेंव्हा हे आजोबा त्यालाही नकार देत. मात्र, बाकी जे आज्जी आजोबा होकार देत, त्यांना मी बाहेर नेतांना बघितलं, की जणुकाही ते सगळे बाहेर कुठेतरी पार्टीला निघाले आहेत आणि त्यांना नीट तयार करायला हवे, असा विचार करून हा नर्स मुलगा त्यांचे मस्त केस विंचरून त्यांना तयार करून देतो.

तुझ्या मनात इतकी माया, सेवाभावी वृत्ती कशी निर्माण झाली, हे विचारले असता, तो म्हणाला, जेंव्हा जॉबची भरपूर डिमांड असलेले क्षेत्र म्हणून त्याने ह्या जॉबचे प्रशिक्षण सुरू केले, तेंव्हा त्याच्या काकांनी त्याला सांगितले, हे काम करत असतांना तुझ्या आईची सेवा करतो आहेस, असा विचार करून सर्व आज्जी आजोबांना ट्रीट करत जा. त्याने हे वाक्य कायमचे लक्षात ठेवून तेच रोजच्या कामात ऍप्लाय करतो आहे, असे सांगून मला खरोखरच थक्क करून टाकले.

बाकीच्या नर्सेस थोड्या काळासाठी येत जात असतात. हे तिघं मात्र जास्त वेळ सहवासात असल्याने त्यांच्यासोबत बोलण्याची, त्यांचा ग्रेटनेस जवळून अनुभवायची संधी मला मिळाली. त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे, हे जाणवून मी अंतर्मुख झाले.

~ सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर.
१७.०६.२०२०

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३१

डायरीच्या आजच्या भागात मी गैरसमज कसे निर्माण होऊ शकतात आणि सुसंवादाने प्रश्न कसे सुटू शकतात, ह्याचा मला आलेला एक अनुभव सांगणार आहे.

मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी त्या दिवशी ड्युटी संपवून घरी गेले आणि क्वारंटाईन फ्लोअरवर एक नवीन आज्जी दाखल झाल्या. दुसऱ्या दिवशी माझ्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी सांगितले, त्यांना श्वासाचा आजार आहे आणि अजूनही त्यांचा पफ आणि औषधं पोहोचलेली नाहीत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे.

मी जाऊन नर्सला याचं कारण विचारलं, तर ती म्हणाली, हे काम स्पेशलाईज्ड नर्सेस बघत असतात. ते राऊंडला आले की ती त्यांना विचारेल. मी अस्वस्थ झाले आणि ह्या फ्लोअरची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना कॉल केला. ते म्हणाले, हॉस्पिटलमधून त्या आज्जी डायरेक्ट संस्थेत दाखल झालेल्या आहेत आणि त्या फ्लोअरवर नवीन असल्याने त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स, प्रिस्क्रिप्शन्स येणे, या सगळ्या प्रोसेसला जरा वेळ लागतो आहे. बाकीच्या लोकांसाठी ही सगळी रुटीन प्रोसेस असल्याने ते कॅज्युअल होते. ते त्यांचं त्यांचं काम रेग्युलर प्रोसेसनुसार करत होते, मात्र माझ्यासाठी हा अनुभव नवा होता आणि आज्जींची कंडिशन नुकतीच पाहून आलेले असल्याने मला मनात जरा टेन्शन होतं. आज्जींची काळजी वाटत होती. लंचब्रेकमध्ये जेवतांनाही आज्जींचा विचार मनात होता. त्याच टेन्शनमध्ये बॉसना न राहवून ही गोष्ट मी सांगितली. बॉसनेही तातडीने जेवण बाजूला ठेवून संबंधित व्यक्तींना कॉल करून अशी काही पटापट सूत्रं फिरवली की मी जेवण संपवून फ्लोअरवर जाईपर्यंत आज्जींची औषधं तिकडे पोहोचलेली होती. मला जबरदस्त सुखद धक्काच बसला ते बघून.

नर्सला सगळी गोष्ट सांगितली, तेंव्हा तीही म्हणाली, फारच छान झालं. मग आमचं बोलणं झालं की गोष्टींचं गांभीर्य ओळखून गरज असल्यास बॉसना कळवलं पाहिजे आणि त्याने गोष्टी स्पीड अप झाल्या, तर ते चांगलंच ना?

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे राऊंडला गेले, तेंव्हा तीच नर्स ह्या नवीन आज्जींच्या रूममध्ये त्यांच्यासोबत काहीतरी गंभीरपणे बोलत बसलेली दिसली. मला बघून खुणेनेच काही बोलू नकोस आणि आतही येऊ नकोस, असे सांगून तिने आज्जींसोबतचे बोलणे सुरूच ठेवले.

मग मी दुसऱ्या आज्जी आजोबांना भेटायला गेले. थोड्यावेळाने जेंव्हा ती आज्जींच्या रूममधून बाहेर आली, तेंव्हा अपसेट दिसली. काय झालं, विचारलं असता, आदल्यादिवशीच्या नर्सने आज्जींना नीट ट्रीटमेंट न दिल्याची तक्रार आज्जींनी तिच्याजवळ केली असल्याचे तिने सांगितले. नक्की काय झाले, हे तूच आज्जींशी बोल, असे सांगून ती तिच्या इतर कामासाठी निघून गेली.

मग मी आज्जींना भेटले, तेंव्हा त्यांनी सांगितले की संध्याकाळच्या जेवणात त्यांना व्हाइट ब्रेड मिळालेला होता आणि त्यांना ब्राऊन ब्रेड हवा होता, त्यांनी ही गोष्ट नर्सला सांगितली, तेंव्हा त्याने ब्राऊन ब्रेड स्लाईस आज्जींना हातात आणून दिला. वास्तविक त्याने दुसऱ्या प्लेटमध्ये तो देणे अपेक्षित होते आणि तो ब्रेड तुटलेला होता. त्याने तो हाताने कुस्करून त्यांच्या हातात दिला. आज्जींचा फ्लो ब्रेक करून मी त्यांना त्याने हातात ग्लोव्हज घातलेले होते का, विचारले असता त्या 'हो' म्हणाल्या. शिवाय त्यांनी पाण्याची बाटली मागितली, तर त्याने सांगितले की तुमची अर्धी बाटली अजून शिल्लक आहे, ती संपली की नवीन आणून देईन. ही अर्धी बाटली रात्रभर पुरणार नाही, मग ही संपली की पाणीच मिळणार नाही, ह्या भीतीने त्यांनी रात्रभर पाणीच प्यायले नाही, असे सांगितले. हे सगळे त्यांनी सकाळच्या ड्युटीवरील नर्सला सांगितल्यावर तिने तडक बॉसना कॉल करून आज्जींनाच त्यांच्याशी बोलायला लावले, अशी माहिती आज्जींनी मला दिली. ह्या नर्स ताईला मी कालच बॉसना इमर्जन्सी असलेल्या परिस्थितीत कॉल केला पाहिजे, हा दिलेला सल्ला तिने फारच मनावर घेऊन ताबडतोब अंमलात आणलेला दिसला.

आज्जींनी ज्या नर्स मुलाची तक्रार केलेली होती, तो म्हणजे डायरीच्या मागच्याच भागात शेवटी ज्याच्या सेवाभावी वृत्तीबाबत कौतुक केले, तो इरिट्रीयन मुलगा असल्याने मी अतिशय गोंधळात पडले. मनात हजारो विचार घर करू लागले. जसे:

'आपण एखाद्याला काय समजत असतो आणि तो माणूस काय असतो.. '

'माणसाचं खरं रूप तो एकटा असतांनाच दिसतं. लोकांसमोर तो गुडी गुडी मास्क घालून वावरत असू शकतो. आपण त्यावर लगेच डोळे झाकून विश्वास ठेवणे बरोबर नाही.'

'हा छोट्याशा आफ्रिकन देशातला काळा मुलगा.. भारतीयांना देशात तसेच देशाबाहेरही रंगावरून येतात, तसे त्याला वाईट अनुभव आलेले असू शकतात आणि त्यांचं उट्टं तो असहाय्य अवस्थेत असलेल्या गोऱ्या व्यक्तीवर काढत असेल का?'

'आपल्याकडे कसे सासू सुनेवर अन्याय करते, ते किस्से आपण ऐकत, वाचत असतो. त्यातली सासू स्वतः बरेचदा आपल्या सासूच्या छळाचा बळी असते आणि त्यातून शिकून आपल्या सुनेला चांगली वागणूक देण्याऐवजी तिचा छळ करून फिट्टमफाट करत असते.'

'शिवाय जनरलीच बरेच लोक आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला आपल्यापेक्षा दुबळ्या माणसाचा, प्राण्याचा छळ करून घेतांना दिसतात. हे लॉजिक मला कधीच समजलेलं नाही.. ज्याने त्रास दिला, त्याला धडा शिकवायचं सोडून भलत्याच कोणावर तरी राग काढून नेमके काय साधते? एक दुष्टचक्रच त्यातून निर्माण होते.'

'यावर एक गोष्ट वाचलेली आठवली. एक बॉस चिडला, त्याने त्याच्या सबॉर्डीनेटवर राग काढला. त्याने अपमानित झालेल्या त्या माणसाने घरी जाऊन बायकोला क्षुल्लक कारणावरून थोबाडीत ठेऊन दिली. बायकोने आपल्या मुलाला मग काहितरी कारणावरून ठोकून काढले. त्या चिडलेल्या मुलाने रागारागाने रस्त्यावरून चालत असतांना तिकडे बसलेल्या कुत्र्याच्या पेकाटात लाथ हाणली. तो कुत्रा विव्हळत पळायला लागला. तिकडून तो बॉस चाललेला होता, त्यालाच जाऊन तो रागारागाने चावला आणि एक दुष्टचक्र पूर्ण झाले.'

'ही गोष्ट इथे संपवली असली, तरी मग पुढे बॉसने काय केले असेल, हे आपण वाढवत नेऊ शकतो. हे दुष्टचक्र आपण ठरवले, तर चालूच राहू शकते, नाही का?'

आज्जींची गोष्ट ऐकता ऐकता मनात हे सगळे विचार तरळून गेले आणि मी आज्जींनाही ते सांगितले. त्यांना म्हणाले, मला नक्की माहिती नाही, हे असेच घडले असेल की नाही. मात्र आपण त्या मुलाला 'बेनिफिट ऑफ डाऊट' देऊया आणि त्याने असे का केले, हे समजून घेऊया. मी त्याला इतर आज्जी-आजोबांसोबत फार प्रेमाने वागतांना बघितलेले आहे, त्यामुळे मला तुमचा अनुभव ऐकून फार वाईट वाटलेले आहे.

आज तो दुपारच्या शिफ्टवर आला की मी त्याच्याशी बोलेनच, पण तुम्हीही त्याच्यासोबत बोला. त्याला विचारा, की तू माझ्याशी असा का वागतो आहेस? तुला गोऱ्या माणसांकडून काही वाईट अनुभव आलेले आहेत का? की जनरलच म्हाताऱ्या माणसांच्या सोबतच्या कामाने वैतागलेला आहेस आणि तुझा थ्रेशहोल्ड संपला आहे? की तुझ्या व्यक्तीगत आयुष्यात काही घडले आहे, ज्याने तू अपसेट आहेस?

मग आज्जींना सांगितले, की तुम्ही बॉसना कळवले, हे चांगलेच केलेत. आता त्या योग्य ती ऍक्शन घेतीलच. आपण गप्प बसून अन्याय सहन करणे चूकच आहे.

मात्र अजून एक दुसरी गोष्ट त्यांना सांगितली, जी मागे एका आज्जींनाही सांगितलेली होती , ती म्हणजे, तुम्ही आता वयाच्या एका असहाय्य टप्प्यावर आहात, तेंव्हा तुमची काळजी घेण्याची ज्या माणसावर जबाबदारी आहे, तो तुसडा निघाला, तरी त्याच्याशी सुसंवाद साधून त्याच्या वागणुकीमागचे कारण समजून घेऊन त्याच्याशी अधिक गप्पा मारण्याचा, तो कसा आहे, वगैरे चौकशी करण्याचा, त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचे जीवन सुसह्य आणि आनंददायी होईल. आज्जींना ते पटले आणि त्यांनी हसून मला होकार दिला.

दुपारी हा मुलगा ड्युटीवर आल्यावर नर्स त्याच्यासोबत ह्या विषयावर अवाक्षरही न बोलता काही घडलेच नाही, असे दाखवून त्याच्याकडे काम ट्रान्सफर करतांना काय काय केलेले आहे आणि काय बाकी आहे, वगैरे माहिती देऊन निघून गेली.

हा मुलगा शांत आणि अपसेट दिसत होता. तो स्वतःहून विषय काढेल, ही शक्यता दिसत नसल्याने मीच मग तो विषय काढला आणि त्याला आज्जींनी सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या आणि विचारले, तू असे का केलेस? तुझे मला किती कौतुक वाटत होते, की तू केवढ्या मायेने सगळं करतोस आणि हे काय आहे?
तो मला म्हणाला, मी असे काही केलेले नाहीये, आज्जींनी असे चुकीचे का पसरवले आहे, मला समजत नाही. आत्ता मी आमच्या डिपार्टमेंटच्या हेडलाच भेटून आलो. तिला बॉसकडून सगळी परिस्थिती कळली आणि तिनेही मला जाब विचारला. गेली अडीच वर्षं मी ह्या संस्थेत काम करतो आहे, एकदाही कोणी माझी अशी तक्रार केलेली नाही.

मग मी विचारले, नक्की काय झाले? आज्जी असे का बोलल्या? त्यावर त्याने मला सांगितले, चल, तुला मी प्रात्यक्षिकच करून दाखवतो. मग तो मला फ्लोअरवरच्या किचनमध्ये घेऊन गेला आणि त्याने दाखवले. हा व्हाईट ब्रेड स्लाईस. हा असा प्लेटमध्ये ठेवलेला होता. सोबत चीज, हॅम, सॅलड वगैरे प्लेटमध्ये होते. आज्जींनी सांगितले की मला हा ब्रेड नको, ब्राऊन हवा. एकच ब्राऊन स्लाईस ब्रेड शिल्लक होता, तो मी किचनमधून आणून त्यांच्या प्लेट झाकलेल्या कव्हरवर ठेवला. तो ब्रेड आधीच तुटलेला होता. मी हाताने नाही कुस्करून दिला. एक्स्ट्रा प्लेट का दिली नाहीस? हे विचारले असता, संध्याकाळी खालचे मेन किचन बंद असते. तिकडून एक्स्ट्रा मागवणे शक्य नसल्याने त्याने हा मार्ग निवडला. आज्जींना त्रास देणे, हा हेतू नव्हता, हे सांगितले.

त्यांना मागितले असतांनाही एक्स्ट्रा बाटली पाणी का दिले नाही, विचारले असता, एक संपल्यावर दुसरे द्यावे, त्यांची रूम एका टोकाला तर किचन दुसऱ्या, असे असल्याने विनाकारण चकरा कशासाठी मारत बसू मी, मला इतर भरपूर कामं असतात, असे सांगितले.

मग मी त्याला सांगितले, चल, आज्जींना सगळं समजावून सांग. त्यांचा गैरसमज दूर होईल. तोही लगेच तयार झाला आणि आज्जींना त्याने सगळी परिस्थिती समजावून सांगितली. आज्जी म्हणाल्या, त्यांना ते कव्हर ट्रान्स्परंट असल्याने दिसलं नसावं.

त्याने खरोखरच कव्हरमध्ये ब्रेड दिला नव्हता की आज्जींना तो दिसला नव्हता, हे मला माहिती नाही. एकतर आज्जींचा गैरसमज झाला असेल, किंवा त्यांनी माघार घेतली असेल, ह्या दोनच शक्यता दिसतात.

त्या मुलानेही आज्जींना ऍश्यूरन्स दिला की, आज्जी, यापुढे एक्स्ट्रा प्लेट्स आणि चमचे, फोर्क्स, नाईफ्स, जास्तीचे व्हरायटी असलेले ब्रेड्स वगैरे खालचे किचन बंद व्हायच्या आतच मागवून घेतले जाईल. शिवाय तुम्हाला मी दोन्ही व्हरायटीज वेगवेगळ्या प्लेट्समध्ये आधीच आणून देईन, म्हणजे तुम्हाला हवे, ते तुम्ही त्या त्या दिवशीच्या मूडनुसार निवडू शकाल. पाणी सुद्धा जास्तीच्या बाटल्या आणून ठेवेन, म्हणजे तुम्हाला झोपतांना असुरक्षित वाटणार नाही. आज्जी हसून म्हणाल्या, "कालच मला खालचे किचन बंद झाल्याने तुम्ही आहे त्यात सगळे मॅनेज करत आहात, हे सांगितले असते, तर मी अशी कटू मनस्थितीत रात्र काढली नसती ना.." नर्स मुलगाही हसून आज्जींना सॉरी म्हणाला.

मग मी आज्जींना त्याने त्याच्या काकांनी त्याला हे काम तू कसे करावेस, ह्याविषयी काय सल्ला दिला होता, ते सांगितले. प्रत्येक आज्जी आजोबांमध्ये तो आपले आई वडील बघत कसे प्रेमाने काम करत असतो, हे आज्जींना त्याच्यासमोर सांगून तो खूप प्रेमळ आहे, जे झाले, ते वाईट भावनेतून घडलेले नाही, मात्र यापुढे असे गैरसमज होणार नाहीत, या दृष्टीने योग्य ती काळजीही घेतली जाईल, अशी खात्री त्यांना त्याच्या आणि संस्थेच्या वतीने देऊन आज्जींना बाय केले.

आपण रोज वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो. आपल्या आयुष्यातही रोज काही ना काही प्रसंग घडत असतात. बरेचदा आपण आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या, मित्राच्या, नातेवाईकांच्याकडून ऐकलेल्या प्रसंगावर, अनुभवावर एखाद्या माणसाबद्दल मत बनवून ते बाळगत असतो. काहीवेळा ते अगदी अचूक असेलही, पण काहीवेळा कानगोष्टींप्रमाणे मूळ गोष्ट असते वेगळी आणि सांगितली जात असतांना ती वेगवेगळे व्हर्जन्स, रूपं घेऊन पसरत जाते. शिवाय कधीकधी बघणाऱ्या माणसाला ती दिसते एक, मात्र तिची पार्श्वभूमी अगदी वेगळी असू शकते. ही गोष्ट ध्यानात घेऊन आपण कोणाविषयी मत बनवण्याची, ते पसरवण्याची घाई करू नये. अगदी विश्वसनीय सूत्रांकडून- जसे वर्तमानपत्र- माहिती आलेली असली, तरीही जे वाचत आहोत, ती एक शक्यता आहे, बातमी मागची बातमी काही वेगळी असू शकते, हेच कायम लक्षात ठेवून डोळसपणे आणि पूर्वग्रहदूषित न राहता गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा जमेल तितका प्रामाणिक प्रयत्न करत गॉसिपिंग पासून दूर रहावे, हेच कायम मनाला समजावत असते. त्याचा मला या आणि अशा अनेक प्रसंगी दुष्टचक्र मोडतांना फायदा होतो आणि खूप आत्मिक समाधान लाभते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
२६.०६.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com