आज्जी आजोबांची डायरी: लेखमालिका २

आज्जी आजोबांची डायरी या लेखमालिकेचे ३१ हून जास्त भाग असल्याने त्याच नावाची दुसरी लेखमालिका तयार करत आहोत.
"आज्जी आजोबांची डायरी: लेखमालिका १" च्या पुढचे लेख या लेखमालिकेत वाचावयास मिळतील.

~ मैत्रीण टीम.

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३२

२६.०६.२०२० या दिवशी विस्कळीतपणे लिहिलेला हा मोठा भाग नीट लिहून नंतर प्रकाशित करावा, म्हणता म्हणता तो प्रकाशित करायचा राहूनच गेला. हा भाग खूप मोठा झाल्याने दोन भागात विभागून टाकत आहे.
(भाग:१)

डायरीच्या या भागात मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटीच्या निमित्ताने बराच काळ राहता आल्याने काय काय नवीन शिकता आले आणि अनुभवता आले, त्यातला काही भाग सांगणार आहे.

मुळातच माझ्यासाठी एकंदरीतच हा जॉब नवीन असल्याने बऱ्याच जणांच्या कामाचे स्वरूप नक्की काय आहे, हे मला माहिती नव्हते, ते ह्या फ्लोअरवर आल्यामुळे मला समजू शकले. जसे नर्स आणि स्पेशलाईज्ड नर्स, यांच्यातला फरक.. बॉस, ऍडमिन स्टाफ, रिसेप्शन आणि मी सोडून बाकी सर्व स्टाफला युनिफॉर्म आहे. टेक्निकल स्टाफ, वॉशिंग, क्लिनिंग, किचन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, नर्सेस या सर्वांना युनिफॉर्म आहेत.

नर्सेसचे दोन प्रकार आहेत आणि त्या दोघांनाही वेगवेगळे युनिफॉर्म्स आहेत. नर्सिंगचा कोर्स एक वर्षाचा तर स्पेशलाईज्ड नर्सिंगचा तीन वर्षाचा, असा तो फरक. नर्सचे काम आज्जी आजोबांच्या वेगवेगळ्या टेस्टस घेणे, त्यांना वेळच्यावेळी औषधे देणे, त्यांची रूम लावणे, त्यांना गरज असल्यास आंघोळ घालणे, जेऊ घालणे, कपडे बदलणे, त्यांना गरज असेल, ते सर्व पुरवणे.

तर स्पेशलाईज्ड नर्सचे काम आज्जी आजोबांना कोणती औषधं लागत आहेत, ती सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने उपलब्ध करून देऊन प्रत्येकाच्या नावांचे लेबल्स लावून बनवलेल्या ट्रे आणि ग्लासेसमध्ये ते रोज लावून ठेवणे, त्यांची फाईल मेंटेन करणे, कॉम्प्यूटरवर त्यांचे सगळे डॉक्युमेंटेशन करणे, त्यांची वागणूक, शारीरिक आणि मानसिक आजार, खाण्यापिण्याच्या सवयी, या सगळ्याची नोंद करणे. इत्यादी. हे नर्स आणि स्टाफ नर्स लोक इतके ऑक्यूपाईड असतात की त्यांना अक्षरशः जेवायलाही वेळ मिळत नाही. काहीतरी सटरफटर स्नॅक्स, चॉकलेट खात खात काम करतांना दिसतात हे लोक. जेवलात का, कधी जेवणार, यावर नेहमीचे उत्तर, वेळच मिळाला नाही. आता काम संपल्यावर घरी जाऊनच जेऊ..

ह्या फ्लोअरवर आल्यावर काहीही कामासाठी, खाण्यापिण्यासाठी इतर फ्लोअरवर जाणे म्हणजे कपडे बदलण्याचे भयंकर कंटाळवाणे सोपस्कार पार पाडावे लागत असल्याने सगळेच ते टाळतात.

एकदा नर्स ताईने मला उद्या ड्यूटीवर येतांना किचनमधून आपल्यासाठी एक जास्तीचा कॉफी कॅन आणशील का? सांगितल्यावर मग मी न विसरता रोजच हे काम करायला लागले आणि मग हे स्पेशलाईज्ड नर्सेस ह्या फ्लोअरवर कामासाठी आले की त्यांना 'कॉफी देऊ का' असे विचारत हवी असल्यास ती पुरवणे सुरू केले. एवढ्याशा गोष्टीने हरखून जाऊन एक जण मला 'यू आर ऍन एंजल' म्हणाली.

हे फ्लोअर अशा अनेक कारणांमुळे मला आता घरच्यासारखेच वाटते. एका घरातून उठून दुसऱ्या घरात गेल्यासारखे वाटते इकडे मला.

नर्सेसनाही गरज असल्यास हक्काने मला मदत मागा असे सांगितलेले असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो, तेंव्हा मला मदत मागतात. तसे काही नवीन आलेल्या आज्जी आजोबांचे सामान बॅगेतुन काढून रूममध्ये योग्य जागी लावण्याचे काम मी केले आणि त्यांना बाहेर फिरायला नेतांना सॉक्स, शूज घालण्याचे काम करायला दुसऱ्या कामात बिझी असलेल्या नर्सला न बोलवता मी ते पटकन करून टाकायला लागले.

तसेच ह्या फ्लोअरवर जास्त काळ घालवता आल्याने नक्की कोणकोणत्या प्रकारच्या रुम्स आहेत, त्यात काय काय सुविधा आहेत, हे नीट आतून बघता आणि समजून घेता आले. मागे संस्थेच्या इमारतीची रचना कशी आहे, यावर एक लेख लिहिला होता, त्यात काही गोष्टी नजरेतून सुटलेल्या होत्या, ज्या या फ्लोअरवर मला दिसल्या. जसे प्रत्येक फ्लोअरवर एक वेगळे प्रशस्त असे बाथरूम आहे, ज्यात मोठा बाथटब आणि टॉयलेट आहे. याला 'फ्लेगेबाद' म्हणजेच स्पेशल केअर बाथ असे नाव आहे. आज्जी आजोबा राहतात त्या प्रत्येक रूममध्ये ऍटॅच्ड बाथरूम-टॉयलेट आहेच, त्यातच त्यांची आंघोळ चालते. त्यामुळे ह्या स्पेशल रूममध्ये त्यांना कधी आंघोळ घालतात, त्याची कल्पना नाही. एकदा तो प्रश्न विचारून कळवेन.

दुसरं म्हणजे 'श्पूलराऊम' ह्या खोलीत डिश वॉशर्स आहेत, पण ते रेग्युलर भांड्यांसाठी नसून टॉयलेटच्या पार्ट्ससाठी. मागे एका भागात एक आजोबा ते वापरत असल्याचा उल्लेख केला होता, तेच हे. व्हीलचेअरवरच्या कमोडवरील धुण्याचा सेपरेबल पार्ट इथे धुण्यासाठी टाकला जातो आणि ४० मिनिटांचा प्रोग्रॅम रन करून स्वच्छ धुण्यात येतो. ही रूम अत्याधुनिक किचनसारखी चकचकीत लख्ख स्वच्छ दिसते. ते पार्ट्स छोटेच असल्याने मशीनही छोटेच आहे. ती व्हीलचेअरही अतिशय स्वच्छ दिसते. सांगितले नाही, तर कळतही नाही, हे एक टॉयलेट आहे म्हणून.. सर्व आज्जी आजोबा या प्रकारच्या टॉयलेटचा वापर करत नाहीत. ज्यांना शक्य आहे, ते सर्व रूममधले टॉयलेट वापरतात. काही स्वावलंबी आहेत तर काही नर्सेसच्या मदतीने उठतात बसतात.

असेच एक व्हीलचेअर असलेले वेईंगमशीन आहे. ज्यात आज्जी आजोबांचे ठरवलेल्या शेड्युलनुसार वजन केले जाते. एका व्हीलचेअरवरून ऊठवून दुसऱ्यात बसून पाय ठेवायला त्या चेअरला ऍटॅच्ड स्टॅन्डस आहेत, त्यावर पाय ठेवून वजन केले जाते. हे कामही नर्सेससोबत करायची ह्या फ्लोअरवर मला संधी मिळाली. एक आज्जी भूक लागत नसल्याने नीट खाल्ले गेले नाही की अधूनमधून उत्सुकतेने माझं वजन करशील का, हे विचारायच्या, मग मी त्यांना मदत म्हणून नर्सला न बोलवता स्वतःहून ते काम करायचे, त्यामुळे तेही शिकू शकले.

क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटी सुरू झाल्यावर सुरुवातीला फ्लोअरवरच्या वातावरणात जिवंतपणा आणण्यासाठी मी काय करू, हे विचारले असता आज्जी आजोबांसोबत निरनिराळे खेळ खेळण्यासाठी मला सुचवण्यात आले होतेच. त्यानिमित्ताने बहुतेक सर्व जर्मन लोकांना माहिती असलेला आणि त्यांच्यात पॉप्युलर असलेला 'मेंश एर्गेरे दिश निष्त' हा थोडा बुद्धिबळासारखा आणि थोडा सापशिडीसारखा अतिशय सोपा पण वेळ घालवायला मस्त असा कमीतकमी दोन ते जास्तीतजास्त चार जण बराचवेळ एक राऊंड खेळू शकतील, असा खेळ शिकले आणि काही आज्जी आजोबांसोबत खेळलेसुद्धा.

क्वारंटाईन फ्लोअरवर असल्याने आम्ही सर्वजण एकमेकांपासून सेफ डिस्टन्सवर बसून, (जनरली एकच फासा सगळे शेअर करतात, तर सेफ्टी म्हणून) प्रत्येकजण वेगवेगळे फासे घेऊन खेळलो.

उन्हाळा जसजसा वाढत गेला, तसतसा आता गच्चीवर बसता येणार नाही, एखादी बाल्कनीत वापरतात ती छत्री मिळेल का, असे विचारले असता गच्चीत बटनाने ओपन क्लोज करता येईल, अशी शेड ऑलरेडी आहे, जी सेम खाली गार्डनमध्येही आहे, ही माहिती मला टेक्निशियनने पुरवली. ती तिथे असूनही इतके दिवस मला कधी दिसली नव्हती, याची मला गंमतच वाटली. ही शेड खूप वारा सुरू झाला की आपोआप फोल्ड होते, हेही बघितले. पूर्ण बिल्डींगमध्येच असे शटर्स आहेत, जे प्रखर ऊन सुरू झाले की आपोआप उघडतात आणि सर्व रूम्समध्ये सावली आणतात, हेही मागच्या आठवड्यात अनुभवले.

गच्चीत खुर्चीवर बसता यावे म्हणून खालच्या गार्डनमध्ये असलेल्या कपाटातून सीटचे काही कुशन्स मी मागवले, ते ऑफिसमधून घरी जातांना न चुकता गच्चीतून परत आणण्याचे काम मी करायला लागले. तसेच गच्चीतल्या कुंड्यांमध्ये ठेवलेल्या रोपांना पाणी कोण घालते, विचारले असता, सध्या तसे कोणी त्या फ्लोअरवर नाहीत असे समजले, तेंव्हा हे काम मी केले तर चालेल का, विचारले असता बॉसने आनंदाने होकार दिला आणि त्या निमित्ताने क्लिनिंग स्टाफच्या रूममध्ये जाऊन बादल्यांनी झाडांना पाणी देण्याचे आनंददायी काम मी करायला लागले. आज्जी आजोबांनाही खूप छान वाटायचं हे काम बघतांना..

सुरुवातीला दोन खुर्च्या, मग टेबल, मग दोन टेबल्स आणि चार, ते आठ खुर्च्या गच्चीत वापरात यायला लागल्या. कधी दुपारची कॉफी आणि केक तर कधी लंचही गच्चीतच आज्जी आजोबांना सर्व्ह केले जाऊ लागले. आधी नर्स ताईने नकार दिला होता पण मग मी हळूहळू तिला कंव्हीन्स करून एकेक नियम सुरक्षितपणे रिलॅक्स करत गेले. आधी नर्सेसना नियम क्लियर नव्हते. आज्जी आजोबांना त्यांच्या त्यांच्या रूम्समध्येच आयसोलेट करायचे आहे, असे ठरलेले होते. ते नियम सुरक्षिततेची काळजी घेत बॉसची परवानगी घेत घेत शिथिल करत गेले.

आता आज्जी आजोबा गच्चीत आणि हवा खराब असते तेंव्हा फ्लोअरवरच्या कॉरीडॉरमध्येही टेबल खुर्चीवर बसून गप्पा, खेळ करतात.

बाकीच्या फ्लोअर्सवर ते ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर त्या त्या फ्लोअरवर असलेल्या डायनिंग हॉलमध्ये घेतच असतात. फक्त जे बेडरिडन आहेत, त्यांनाच त्यांच्या रूममध्ये अन्न सर्व्ह केले जाते. इथे मात्र सगळे आपापल्या रूममध्येच खात-पीत होते. आता त्यांना एकमेकांच्या क्लोज संपर्कात न येताही सोशलाईझज्ड जीवन जगणे शक्य झाल्याने ते आनंदात आहेत. उलट आता हा फ्लोअर सोडून जातांना त्यांना आणि ते आम्हाला सोडून जात आहेत, म्हणून आम्हाला वाईट वाटते, इतके छान बॉंडिंग झालेले आहे आणि होते आहे.

ह्या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांचे किस्से पुढच्या भागात सांगते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
०३.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३३

२६.०६.२०२० रोजी लिहिलेली डायरी नीट लिहून प्रकाशित करायचे काही ना काही कारणाने राहून गेले. हे लिहून झाल्यानंतर आता बरेच काही घडलेले आहे, पण हे वाचल्याशिवाय पुढचा संदर्भ लागणार नाही, म्हणून आधी हे २ भागात प्रकाशित करते आहे.
(भाग:२)

जगभरात काही देशांमध्ये करोना परिस्थिती सुधारते आहे, तर काही देशांमध्ये ती चिघळत चाललेली आहे, मात्र सगळीकडेच आता करोनासोबत जगायला सुरुवात करण्याविषयी एकवाक्यता व्हायला लागलेली असल्याने लॉकडाऊन शिथिल करत अनलॉकच्या फेजेस सुरू होतांना दिसत आहेत.

जर्मनीमध्येही आता रेस्टॉरंटस आणि तिथे सुरू झालेली वर्दळही दिसायला लागलेली आहे. हॅनोवर शहरात गेले काही महिने ट्रॅमचा प्रवास सुरु असतांना तिकीट चेकर दिसला नव्हता, त्याची मागच्या आठवड्यात एक चक्कर माझ्या ट्रॅममध्ये होऊन गेली.

मी जॉब करत असलेल्या सिनिअर केअर होममध्ये मार्चच्या उत्तरार्धात सुरुवातीला व्हिजिटर्सना पूर्णपणे बंदी, मग फक्त मरणासन्न अवस्थेतील आज्जी आजोबांना भेटायला परवानगी, तीही एकावेळी फक्त एकाला, अशी, मग गार्डनमध्ये एका फॅमिलीतील फक्त एक किंवा दोन जण पार्टीशन असलेल्या तंबूत सुरक्षित अंतरावरून भेटणे आणि मग तंबूबाहेरही भेटू देणे करता करता आता रूम व्हिजिट्सनाही परवानगी देण्यात आलेली आहे.

माझ्यासाठी सगळ्यात मोठा बदल ह्या आठवड्यात घडणार आहे, तो म्हणजे हा क्वारंटाईन फ्लोअर १ जुलैपासून नॉर्मल फ्लोअरमध्ये रूपांतरीत होणार आहे. दुसऱ्या फ्लोअर्सवर हलवले गेलेल्या आज्जी आजोबांना आता पुन्हा आपापल्या मूळ रूम्समध्ये परतता येणार आहे. पुढच्या आठवड्यापासून सुरक्षिततेसाठी घालत असलेला सगळा लवाजमाही बंद होणार असल्याने आम्ही सर्वजण एक्सायटेड आहोत. आता उन्हाळाही जास्त कडाक्याचा सुरू झालेला असल्याने रोज तापमान वाढत आहे आणि ह्या पूर्णपणे झाकलेल्या कपड्यांमध्ये फार उकडतेय. योग्य वेळेला हे सगळे संपणार, याचा आनंद आहेच, पण एकाच फ्लोअरवर दिवसभर थांबता येणे, निवडकच आज्जी आजोबा आणि नर्सेससोबत राहिल्याने निर्माण झालेले एक वेगळे इमोशनल कनेक्शन आता जोडणे अवघड असेल आणि रोज वेगवेगळ्या फ्लोअर्सवर अनेक जणांना भेटणे सुरू होईल याचा आनंद, त्याचवेळी कम्फर्टझोन झालेल्या ड्युटीचे स्वरूप बदलेल याचेही वाईट वाटते आहे.

गेल्या दीड महिन्यापासून हा फ्लोअर माझ्यासाठी अगदी सेकंड होमसारखाच झालेला होता. क्वारंटाईन मध्ये असलेल्या आज्जी आजोबांनासुद्धा इकडे आयसोलेटेड फील होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी मनापासून आणि जमेल तशी निभावण्याचा मी प्रयत्न केला. काहीवेळा त्यात यश आले आणि काहीवेळा त्यातून भलतेच उदभवले, असेही झाले आहे. त्यातील जमेल तितके आणि आठवतील तितके अनुभव आजच्या भागात आणि उरलेले नंतरच्या भागात लिहिण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

ह्या फ्लोअरवर बाहेरून येऊन नव्याने दाखल झालेल्या एक आज्जी, ज्या फ्लोअरवर आल्या, तेंव्हा त्यांना मीच अटेंड केले होते, त्यांचे बॅगेतले सामान काढून रूममध्ये लावण्यात मी नर्सला मदत केलेली होती. त्यांच्या तोंडात एकच दात होता आणि त्यामुळे त्या फक्त प्युरी असलेले अन्न खात असत. मात्र बुद्धीने अजूनही शार्प, डोळे आणि कानही व्यवस्थित चालू स्थितीत होते. त्या बेडवरच पडून होत्या पूर्णवेळ. त्यांना बाहेर नेऊ का विचारले असता, त्यांनी नकार दिलेला होता. त्यांची आंघोळ घालायला कदाचित नर्स त्यांना उचलत असावी पण मी ड्युटीवर असतांना मात्र त्या पूर्णवेळ बेडवरच पडून असत. त्यांच्याजवळ त्यांच्या मुलामुलींचे फॅमिलीसकटचे फोटो नर्सने ठेवले. बाकी काही फोटोज समोर टेबलवर ठेवले. सर्व फोटोंवर मोठया अक्षरात कोणाकोणाचे फोटोज आहेत, ते नावासकट लिहिलेले होते. आज्जींना हा कोणाचा फोटो, विचारले असता व्यवस्थित नाव वगैरे सांगितले.

मग टेबलकडे पॉईंटआऊट करत तो फोटो देतेस का म्हणाल्या. माझ्या मिस्टरांचा फोटो आहे तो, इकडे ठेवतेस का, विचारले. तो फोटो त्यांच्याजवळ ठेवून मिस्टरांना तुम्ही कधी आणि कुठे भेटलात असे विचारले असता त्यांनी मजेशीर गोष्ट सांगितली. पोलीस असलेले त्यांचे मिस्टर त्यांना म्हणे ट्रॅममध्ये पहिल्यांदा भेटले. लग्न करून किती वर्षे झाली, वगैरे डिटेल्स त्यांना आठवत नव्हते. मी ही मिस्टर कधी वारले, त्यांना काय झाले होते वगैरे काही प्रश्न न विचारता त्यांचे बोलणे ऐकत बसले.

ह्या आज्जी मोस्टली झोपूनच असत. पण बोलत, तेंव्हा हसून बोलत. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपून त्या खालच्या फ्लोअरवर त्यांच्यासाठी तयार केलेल्या रूममध्ये गेल्या, त्याच दिवशी रात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी इमेलमध्ये वाचली..

दुसरे एक आजोबा हॉस्पिटलमधून ह्या फ्लोअरवर येणार असल्याचे कळले आणि त्यांच्यासाठी रूम रिझर्व्ह करण्यात आली होती, तर ईमेल मधून समजले की त्यांना इकडे आणण्याचे कॅन्सल झालेले असून त्यांना हॉस्पिसमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. हॉस्पिस म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या लोकांसाठीचे हॉस्पिटल. असे हॉस्पिटल लहान मुलांसाठीही असल्याने नर्सकडून समजले. अगदी सुन्न झाले मी ही नवीन माहिती कळल्यावर...

क्वारंटाईन फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांना माझ्या आई बाबांसोबत, बहिणीसोबत व्हिडीओकॉलवर बोलायला लावून त्यांचे मन वेगळ्या गोष्टीत रमवायचा प्रयत्न करत असायचे. बहुतेक सर्व आज्जी आजोबांना इतक्या लांब कॉल करता येतो आणि माणसाला प्रत्यक्ष पाहून बोलता येऊ शकते, या अनुभवांनी हरखून जायला होत असायचे, हे मागे लिहिलेले आहेच. एकदा मात्र त्यातून भलतेच निष्पन्न झाले...

एका आज्जींना अचानक आपलेच आई वडील आणि भावंडं आठवायला लागली. आधी त्यांनी त्यांच्याविषयी सगळे कौतुकाने सांगितले. दुसऱ्या दिवशी मात्र त्या जुन्याच जगात हरवून गेलेल्या दिसल्या. त्यांना गच्चीत घेऊन जायला मी त्यांच्या रूममध्ये गेले, तर त्या म्हणाल्या, माझे मिस्टर आता मला भेटायला येणार आहेत. मी बाहेर आले, तर त्यांना मी सापडणार नाही. मग त्यांना बरं म्हणून मी दुपारी त्यांच्याकडे गेले, तर त्या लहानपणीच्या जगात गेलेल्या होत्या. मला घरी जायचं आहे, म्हणाल्या. घर कुठे आहे, घरी कोण आहे, विचारले असता माझी आई आणि बहिणी आहेत घरी, असे म्हणाल्या. वडील युद्धात वारलेले असल्याने आईच घर सांभाळते, बहिणी आणि मी शाळेत जाते. मला इकडे कुठे आणलं, घरी सोडा, म्हणायला लागल्या.

आता ट्रॅम्स नाहीत, उद्या सकाळी सोडू, सांगितलं तर चिडल्या. आरडाओरडा करायला लागल्या. मग नर्सने कसंबसं त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहार, सांगून खोलीत परत नेलं आणि झोपवलं. मग दुसऱ्या दिवशी मात्र त्या गप्प गप्पच झाल्या. त्यांची मूळ स्मृती परत आली असावी. नंतर मग मी कधीही त्यांच्यासमोर आणि एकूणच व्हिडीओ कॉल करणेच बंद करून टाकले.

मग गच्चीत बसलो असतांना आज्जी आजोबांना कोणती जर्मन गाणी आवडतात, ते विचारून फोनवर युट्युब वर लावणे सुरू केले. अधूनमधून भारतीय संगीत ऐकवणे, छान व्हिडीओज दाखवणे, हे ही करायला लागले.

गच्चीत बसलेलो असतांना एक चर्च दिसते. त्याच्याकडे बोट दाखवून एक ९३ वर्षांचे आजोबा ते चर्च म्हणजे जिथे माझा बाप्तिस्मा झाला, ती जागा, असे म्हणाले. हॅनोवर शहरातच जन्म आणि अख्खं आयुष्य घालवलेले ते आजोबा एकेकाळी ऑलिम्पियार्ड होते. वॉटर पोलो हया खेळाच्या मॅचेससाठी ते १९५६ साली ऑस्ट्रेलियाला गेलेले होते. त्यांनी सांगितले, त्या काळी फ्लाईट्स आत्तासारख्या फास्ट आणि मोठ्या नसत. इंधनाचा टॅन्कही लहान असल्याने ते भरण्यासाठी जागोजागी थांबत ९६ तासांनी ते ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते. ह्या आजोबांची उंची सहा फुटाच्या वर असल्याने ते बेडवर मावत नव्हते. त्यांना पाय फोल्ड करून झोपावे लागे. हे तेच आजोबा, पूर्वी जे खालच्या फ्लोअरवर आयसोलेटेड फ्लोअरवर होते आणि त्यांनी मला मास्क बाजूला करून चेहरा दाखवायला लावलेला होता आणि चेहरा दाखवल्यावर मी घाबरून गेले होते, मला काही होईल का आता, म्हणून.. आजोबांना मी त्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि मग आम्ही दोघंही खूप हसलो.

तशाच त्या रुममध्ये बाहुल्या असणाऱ्या आज्जी हॉस्पिटल वारी नंतर ह्या फ्लोअरवर आल्या. त्यांना क्वारंटाईन केले जाणार, हे त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं. त्या एकदम रडायलाच लागल्या. आज्जींना भेटून त्यांना मी सांगितलं, नका त्रास करून घेऊ. चौदा दिवसांचा तर प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या काही वस्तू, बाहुल्या हव्या असल्यास त्या वरच्या फ्लोअरवर आणण्याची व्यवस्था करता येईल. त्या नको म्हणाल्या. मग त्यांना हव्या असलेल्या बाकी काही वस्तू आणून देऊन, त्यांना टीव्ही देऊन, फोन ऍक्टिवेट करून देऊन त्यांना फ्लोअरवर फिरू शकता, फक्त बाकी लोकांपासून सुरक्षित अंतरावर थांबा, हे सांगितलं. त्यांना टेरेसमध्ये नेल्यावर त्या खुश झाल्या. इकडे त्या पहिल्यांदाच आलेल्या होत्या. मग त्या रोजच टेरेसमध्ये बसू लागल्या.

गेम खेळण्याचे त्यांनी स्वतः च इनिशिएट केले आणि आधी माझ्या सोबत आणि मग बाकीच्या सर्वांसोबत स्वतःहून खेळू लागल्या आणि माझे काम त्यांनी एकदम सोपे करून टाकले. ह्या आज्जी फ्लोअरवर असतांना अतिशय जिवंतपणा होता इकडे. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यावर त्या खूषच होत्या पण आम्हीच दुःखी झालेलो होतो.

दुसऱ्या एक आज्जी फ्लोअरवर दाखल झाल्यापासून अतिशय डिप्रेशनमध्ये होत्या. खालच्या मजल्यावर त्यांचे मिस्टर आणि ह्या वर, असे असल्याने दुःखी होत्या. कधी एकदाचा डिस्चार्ज मिळतो आणि आपल्या मूळ रूममध्ये परत जाते आणि मिस्टरांना भेटते, असे त्यांना झालेले होते. नुसत्याच झोपून रहात होत्या त्या.. रूमबाहेर जाण्याचा पर्याय उपलब्ध असूनही साध्या बेडवरूनही उठायला तयार नव्हत्या. रोज जाऊन मी त्यांना सांगायचे, चला आज्जी बाहेर जाऊया, तर त्या आपल्या नकोच म्हणत होत्या. मिस्टरांना कॉल केला होता, विचारले असता, त्या हो म्हणाल्या.

एक दिवस अशीच मी त्यांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी सांगितले, काल रात्रीपासून माझे पोट फार बिघडलेले आहे. लुज मोशन्स होत आहेत. खाण्याची इच्छा मेलेली आहे, जगण्याचीच इच्छा उरली नाहीये. हे काही जीवन आहे का? त्यावर त्यांना मी म्हणाले, आज्जी, तुम्ही हालचाल करत नाही, नुसत्याच पडून असता, मग त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही, मग तुम्ही खात नाही, वरून रोज ह्या कसल्या कसल्या स्ट्रॉंग गोळ्या औषधं खाता, मग तुमचं पोट बिघडणार नाही, तर काय होईल? बाकी काही जात नसेल, तर केळं खा, इतर फळं खा, रिकाम्यापोटी सफरचंद खाऊ नका पण बिटविन मिल्स तेही खा, थोडे चाला, फिरा, मग तुम्हाला नक्की बरं वाटेल. तुम्हाला मिस्टरांना भेटायला लवकर परत जायचे आहे की आजारी पडून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा क्वारंटाईन फ्लोअरवर यायचे आहे? असे विचारले असता हसायला लागल्या.

आज्जींसोबतचे बोलणे सुरू असतांनाच त्यांना आजोबांचा खालच्या मजल्यावरून फोन आला. त्यांना मोकळेपणाने बोलू द्यावं म्हणून ती तिकडून निघणार, तेवढ्यात त्यांनी फोन ठेवला पण. आजोबा म्हणे खाली क्रिएटिव्ह रूममध्ये बिंगो नावाचा खेळ खेळायला इतर रेसिडेंट्ससोबत निघालेले होते, आज्जींचा तेवढ्यात फोन आला आणि ते रूममध्ये सापडले नाहीत, तर त्यांना काळजी नको, म्हणून कळवायला त्यांनी कॉल केलेला होता.

मी आज्जींना म्हणाले, बघा आज्जी, आजोबा कसे सोशलाईझ करत आहेत, आनंदी आहेत, तसेच तुम्हीही करा ना. चला बरं माझ्यासोबत बाहेर. आज्जी कशाबशा उठल्या, पण त्यांच्यात काहीच शक्ती नव्हती. त्यांचा ब्रेकफास्ट तसाच बाजूला पडलेला होता. मग मी ब्रेडच्या एका पीसवर चीज, दुसऱ्यावर टोमॅटो, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार करून त्यांना खायला लावले. मग तिथले किवी,ग्रेप्स वगैरे फळंही त्यांना भरवली. आज्जी पटापट खात होत्या. त्यांनी बघता बघता सगळा ब्रेकफास्ट संपवला आणि त्या तरतरीत दिसायला लागल्या. त्यांना मग पाणी प्यायला देऊन मी म्हणाले, आता जाऊया का बाहेर? त्या हो म्हणाल्या.

त्यांच्या कॅथेटरची पिशवी बेडला लावलेली होती, ती तिकडून काढून मी वॉकरला जोडली आणि आज्जींना आधार देत सावकाश उठायला लावून मी त्यांना बाहेर घेऊन गेले. गच्चीत वातावरण माझ्या दृष्टीने गरमच होते, शिवाय अंगावर ते एप्रन वगैरे सर्व असल्याने वारा जाणवत नव्हता. पन आज्जींना थंडी वाजायला लागली. मग त्यांच्या रूममधून त्यांना एक शाल आणून दिली आणि मग त्या बराच वेळ गच्चीत बसल्या. दुसऱ्या दिवशी आज्जी एकदम फ्रेश दिसल्या. आज पोट कसं आहे, विचारलं असतं, एकदम बरं झालेलं आहे, असं त्या म्हणाल्या. मला थँक्यू म्हणत, चल, बाहेर जाऊया म्हणत बेडवरून उठल्या. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपून परत जाण्याचा दिवस आला, त्याच्या आदल्या दिवशी मला एका कलीगचा फोन आला आणि तिने सांगितलं की ह्या आज्जीच्या मिस्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. ते बरे आहेत, पण तू त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायला जा आणि आज्जींना मात्र यातले काही सांगू नकोस.

मी म्हणाले, ह्या आज्जी लवकर बऱ्या होऊन आजोबांकडे जाव्यात म्हणून मी जीवाचा आटापिटा करते आहे. त्यांना कशी बरं मी हे सांगेन? मग पटकन कपडे बदलून मी आजोबांना भेटायला गेले. आजोबा बेडवर पडलेले होते. दोन्ही मनगटांवर बँडेड्स लावलेले होते. आजोबांना भेटल्यावर मी विचारले, काय हे आजोबा, हे काय केलेत तुम्ही? तिकडे वर फ्लोअरवर मी तुमच्या आज्जींना बरं करून तुमच्याकडे पाठवायला जीव काढते आहे आणि तुम्ही इकडे हे उद्योग करत आहात? तुम्ही आत्महत्या करण्यात यशस्वी झाला असतात, तर आज्जींनी काय केलं असतं? त्यांचं काय झालं असतं असा थोडासुद्धा विचार तुमच्या मनात नाही आला का? तर ते हसायलाच लागले, पार ओशाळलेले होते. ते म्हणाले, मला फार कंटाळा आला होता एकटं राहण्याचा. म्हणून मी वैतागून जीव द्यायला निघालो होतो. आज्जींनी मला तुमच्या बद्दल सांगितलं आहे, रोज सांगत असतात, तुम्ही चांगले काम करताय, तुम्ही आज्जींना प्लिज मी जे केलं, त्याबद्दल सांगू नका.

मी म्हणाले, अर्थातच मी सांगणार नाहीये, पण असला वेडेपणा पुन्हा करू नका. आमचे बोलणे सुरू असतांनाच एक डॉक्टर आणि एक नर्स तिकडे आले. डॉक्टरनी येताच त्यांचे बँडेड्स उघडून जखम कितपत खोल आहे, ते चेक केले. आजोबांनी प्रत्येक मनगटावर किमान पाच सहा कट केलेले होते. नर्स त्यांच्या रूममध्ये काय काय शार्प गोष्टी आहेत, ते चेक करत होती. त्यांची फळं कापायची नाईफ, नेलकटर, अगदी पाकीट उघडण्यासाठी वापरतो, ती बोथट नाईफसुद्धा तिने ताब्यात घेतली. पुन्हा मी असं करणार नाहीये, तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही, असे आजोबा सांगत होते, तरी तिने काही ऐकलं नाही. आज्जी परत येईपर्यंत आम्ही तुम्हाला हे सगळं हँडल करू देणार नाही. फळं कापून हवी असतील, तर आम्हाला कॉल करा, असे सांगून ती निघून गेली.

डॉक्टरही मग मी आजोबांना बोलले, तेच फक्त वेगळ्या शब्दात समजवायला लागली. चला, तुम्हाला मी ऍडमिट करायला आलेले आहे, म्हणाली. काय? ऍडमिट? म्हणजे मग नंतर मलाही क्वारंटाईन करावे लागेल ना? नको ना प्लिज. मी पुन्हा असे करणार नाही, असे आजोबा गयावया करायला लागले. मग त्यांना थोडे समजावून डॉक्टर गेली. मी ही परत गेले. दुसऱ्या दिवशी आज्जी आपल्या मूळ रुममध्ये परत गेल्या. मागच्या आठवड्यात आज्जी एक्सरसाईज च्या 'फिट इन एज' सेशनसाठी क्रिएटिव्ह रूममध्ये दिसल्या. आजोबा नाही आले का, विचारले असता, त्यांना नाही आवडत ह्या व्यायामाच्या ऍक्टिव्हिटीज. ते रूममध्ये टीव्ही बघत बसलेले आहेत, असे म्हणाल्या. छान फ्रेश आणि मजेत दिसत होत्या त्या आज्जी.

हा भागही खूप मोठा झाल्याने इथेच थांबते. सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण ते पुढच्या भागात लिहिते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
०३.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३४

आयुष्य म्हणजे 'सापशिडीचा' खेळ किंवा जर्मन भाषेत 'मेन्श एर्गेरे दिश निष्त' हा खेळ तर नाही ना, असे वाटावे, इतक्या पटापट घडामोडी होऊन गोष्टी क्षणात होत्याच्या नव्हत्या होऊन पुन्हा शून्यापासून सुरू कराव्या लागत आहेत. करोनाने आयुष्याचा आपल्याजवळ काहीही कंट्रोल नाही, आपण प्लॅन करायचा आणि ह्या करोनाबाबाने उधळून लावायचा, असा जणू चंगच बांधलेला आहे, असे आता वाटायला लागलेय आणि हे दुष्टचक्र कधी संपेल, संपेल की नाही, असे निराशाजनक विचार मनात निर्माण होत आहेत, पण ते झटकून इतर निराश लोकांना सावरण्याची जबाबदारी निभावतांना आता माझ्या मात्र नाकी नऊ यायला लागलेले आहेत..

मागच्या भागात लिहिल्याप्रमाणे १ जुलैपासून क्वारंटाईन फ्लोअर बंद करून त्याचे नॉर्मल फ्लोअरमध्ये रूपांतर करायला २९ जून पासूनच सुरुवात झाली. सगळे आयसोलेटेड पार्टीशन्स काढून टाकण्यात आले, बाकी फ्लोअर्सवर ड्यूटी करणाऱ्यांना साधे मास्कस होते, तर आम्हाला FFP2 मास्कस वापरावे लागत होते, ते बंद करून नॉर्मल मास्कस देण्यात आले. मी प्रोटेक्शनचा लवाजमा असलेला ड्रेस घालणे बंद करून माझ्या नेहमीच्या कपड्यांमध्ये वावरायला लागले.

सगळ्यात वरचा क्वारंटाईन केला गेलेला फ्लोअर आता इतर फ्लोअर्सवर गेले ३ महिने मूव्ह झालेल्या मूळ रहिवाश्यांना परत येता यावे, म्हणून खुला करण्यात आला. त्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरुवात झाली. त्या फ्लोअरवरच्या आत्तापर्यंत लॉक असलेल्या सर्व रुम्स स्वच्छ करण्यात आल्या. ह्या फ्लोअरवरच्या डायनिंग रुम्स- ज्या इतके दिवस बंद ठेवलेल्या होत्या, त्या उघडून, साफ करून टेबलखुर्च्या पुन्हा नीट लावण्यात आल्या. तेथील जी चित्रं वगैरे काढून नेलेली होती, ती पुन्हा लावण्यात आली. कॉरिडॉरमध्येही पूर्वी चित्रं, शो पीसेस होती, ती सर्व परत आणून पुन्हा सर्व फ्लोअर सुशोभित करण्यात आला. फ्लोअरचा रंगच पालटला. अगदी जिवंत झाला हा फ्लोअर.

दोन्ही लिफ्टस वापरता यायला लागल्या असून माणसांचा या फ्लोअरवरचा राबताही सुरू झालेला बघून अतिशय मस्त वाटत होते. त्या चैतन्यपूर्ण वातावरणात मी वेगवेगळ्या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांना भेटायला गेले. त्यातले जे परत आपापल्या रूममध्ये मूव्ह होणार, त्यांच्यासोबत या विषयावर माझ्या उत्साहात गप्पा झाल्या. कोण वरच्या मजल्यावर जाणार, कोण नाही, इत्यादी माहितीही मी त्यांना पुरवली.

मी पूर्वी मला वाटेल त्या फ्लोअरवर मला वाटेल, तेंव्हा भेट द्यायचे. पण क्वारंटाईन फ्लोअरवर ड्यूटी करून मला एक लक्षात आले की एकाच फ्लोअरवर जास्त काळ थांबल्याने त्या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांसोबत नीट कनेक्ट होता येते, त्या त्या फ्लोअरवरच्या स्टाफसोबत जास्त संवाद करता येऊ शकतो आणि फ्लोअरचे कल्चर नीट समजून घेता येते. म्हणून मी ठरवले, दररोज एक विशिष्ट फ्लोअर ड्यूटीसाठी निवडून फक्त तेथेच दिवसभर थांबायचे, मात्र गरजेप्रमाणे इतर फ्लोअर्सवर जायचे, जसे एखाद्या आज्जी किंवा आजोबांना डिप्रेशनचा ऍटॅक आला, किंवा इतर काही कारणाने मानसिक आधाराची गरज असेल, तर त्यांना भेटायला जायचे.

मी माझा प्लॅनही जबाबदार व्यक्तीला कळवला आणि तिलाही माझी कल्पना आवडली. मग माझ्या प्लॅन प्रमाणे मी सोमवारी पहिल्या आणि मंगळवारी दुसऱ्या फ्लोअरवर ड्यूटीवर होते. बुधवारी, म्हणजेच १ जुलैला जेवणाच्या सुट्टीत दोन कलीग्ज FFP2 मास्क घालून येतांना दिसले, म्हणून विचारले, हे काय? तर ते म्हणाले, तुला माहिती नाही? दुसऱ्या मजल्यावरच्या एक आज्जी- ज्या नुकत्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्या, त्यांची हॉस्पिटलमध्ये टेस्ट करण्यात आलेली होती, त्यांचा रिझल्ट आत्ता मिळाला आणि त्या कोविड पॉझिटिव्ह आहेत!

त्यामुळे आता सर्व स्टाफला FFP2 मास्क वापरणे कंपल्सरी करण्यात आलेले असून त्या कोविड पॉझिटिव्ह आज्जींना सगळ्यात वरच्या मजल्यावर आयसोलेट करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत रूम शेअर करणाऱ्या आज्जींनाही त्यांच्यासोबतच वरच्या मजल्यावरती शिफ्ट करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या म्हणजेच 1.5 मीटर आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त अशा एम्प्लॉईजना घरी पाठवण्यात आले आहे आणि इतर रहिवाशांना जे त्यांच्या जवळून संपर्कात आले होते, त्यांनाही वरच्या मजल्यावरती शिफ्ट करण्यात आले आहे. याशिवाय दुसरा आणि चौथा मजला आयसोलेट करण्यात आलेला आहे.

मी नशिबाने त्या दिवशी तिसऱ्या मजल्यावर ड्युटीला होते. मात्र आदल्या दिवशी मी दुसऱ्या मजल्यावर होते आणि गंमत म्हणजे ह्या आज्जींच्या रूममध्येही जाऊन आलेले होते. नशिबाने या आज्जींशी मी बोलले नव्हते, कारण या आज्जींना भेटायला त्यांची मुलगी आलेली होती. त्या तिच्याबरोबर बोलण्यात बिझी होत्या आणि त्या ज्या दुसऱ्या आजी, ज्यांच्यासोबत मी बोलले, त्या म्हणजे मागे एकदा ज्यांची मी गोष्ट सांगितली, त्या सतत नर्व्हस राहणाऱ्या, मला दमवणाऱ्या आज्जीच होत्या!

संस्थेत गेल्या एका आठवड्यापासून त्या पुन्हा राहायला आलेल्या असून एका आठवड्यापुर्वीच त्या आपल्या लेकीसोबत गार्डनमध्ये आता नियम शिथिल केले गेलेले असल्याने कोणत्याही पार्टिशनशिवाय गप्पा मारतांना दिसल्या होत्या. जिच्यासोबत मी रोज आयसोलेटेड फ्लोअरवरून तिला आईसोबत कनेक्ट करून देण्याच्या निमित्ताने व्हिडीओकॉल वर बोललेले होते, तीच ही, हे लगेच ओळखले होते मी.. आणि तिनेही मला ओळखलेले होते. तिची आई रिहॅबिलिटेशन सेंटरला ट्रीटमेंट घेऊन आली होती, तरीही नर्व्हसच होती अजूनही. तिची रूममेट आज्जीही आपल्या लेकीसोबत समोरच्या बाकावर गप्पा मारत बसलेली होती. ही रूममेट आज्जी बऱ्यापैकी अंध असून तिला अगदी थोडे दिसते, असे समजले. मग आपल्या नर्व्हस आज्जींना प्रश्न पडला होता की वयोमानानुसार त्याही अंध झाल्या, तर आपल्या संस्थेत पूर्ण अंधांसाठी सोय आहे की त्यांना दुसरीकडे जावे लागेल?

मी अक्षरशः कपाळावर हात मारून घेत आज्जींना सांगितलं, आहो, आज्जी किती निगेटिव्ह विचार कराल? बास ना आता! पहिली गोष्ट, असे काही होणार नाही आणि झालेच तर आपल्याला बरोबर मार्ग सापडतो, त्याच्यासोबत जगण्याचा. तुम्ही विचार करून आत्ता काहीही साधणार नाहीये. परिस्थितीत कोणताही बदल झाला, तरीही वेगळाच काहीतरी विचार करून स्वतः टेन्शन घेऊन दुसऱ्यांनाही देणाऱ्या व्यक्तीचे क्लासिक उदाहरण म्हणजे आपल्या ह्या आज्जी.

मी आज्जींना अजून काही गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे, जसे मोबाईलची बॅटरी संपली की ती चार्ज करावी लागते, तशी आपल्या शरीराची बॅटरी आपल्या मेंदूत आहे. त्याला विश्रांती मिळाली नाही, तर आपण आजारी पडतो. विचारविराहित, शांत आणि पुरेशी झोप झालेले काळजीविरहित मन, सकाळी रिकाम्यापोटी भरपेट नाश्ता, अर्धा तास चालणे, सकारात्मक गोष्टी शोधून नकारात्मक गोष्टी जाणीवपूर्वक झटकून टाकणे, काहीतरी छंद जोपासणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेन चार्जिंगसाठी अत्यावश्यक आहेत. रोज ह्या करून आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. आज्जींपेक्षा त्यांची लेकच माझे लेक्चर जास्त आत्मीयतेने ऐकत होती. आज्जींच्या कानाच्या पडद्यापर्यंतसुद्धा ते झिरपले असेल की नाही, अशी मला त्यांचे एक्सप्रेशन्स पाहून शंका आलेली होती.

माझे बोलणे मध्येच तोडत त्या म्हणाल्या, ह्या समोरच्या आज्जी, ज्या माझ्यासोबत रूम शेअर करतात, त्या इकडे शॉर्ट टर्म केअर साठीच आहेत, बरं का. त्यांची मुलगी त्यांना घरी घेऊन जाणार आहे लवकरच. मला मात्र इकडेच राहावे लागणार आहे. आज्जींची लेक मग त्यांना म्हणाली, मी रोज कामावर जाणार, तुझी काळजी घ्यायला घरी कोण आहे? तू इकडे असतांना मला निश्चीन्त वाटते. मला डे केअरमध्ये बाळाला सोडून पोटापाण्यासाठी कामावर जाणारी आईच तिच्या लेकीत दिसली आणि आज्जी म्हणजे हट्ट करणारं एक लहान मूल, असं रोल रीव्हर्सल झालेलं दिसत होतं.

आज्जींना वाचन करायला आवडते पण वाचता येत नाही, चष्मा घालूनही नीट जमत नाही, असे त्यांनी सांगितल्यावर मी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला रिडींग स्क्रीन मिळू शकते, जिच्याखाली वाचण्याचे मटेरियल ठेऊन झूम करून समोर मोठ्या स्क्रीनवर वाचता येऊ शकते, मी असे मशीन दुसऱ्या रहिवाश्यांच्या रूममध्ये पाहिलेले असून रिसेप्शन काऊंटरवर जाऊन लगेच ते आज्जींना कसे मिळू शकेल, याची चौकशी केली.

मग त्यांना बाय करून घरी जायला निघाले. माझी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटी त्यावेळी अजूनही सुरूच असल्याने त्या आज्जींना मी त्यानंतर रूममध्ये जाऊन भेटू शकत नव्हते. त्या कोणत्या रूममध्ये आहेत, याची मला कल्पना नव्हती. मात्र मंगळवारी दुसऱ्या मजल्यावर गेले, तेंव्हा एका रुमचे दार उघडे दिसले, तिथे बेडवर ह्या आज्जी दिसल्या. मला आनंद झाला त्यांना बघून.

त्यांच्यासमोर भरपूर अंतरावर ह्या दुसऱ्या आज्जी आपल्या लेकीजवळ कॉटवर बसलेल्या होत्या. त्यांना मी लांबूनच हॅलो केले आणि आपल्या ऑल टाईम नर्व्हस आज्जींसोबत बोलायला सुरुवात केली. काय आज्जी, कशा आहात? नॉन आयसोलेटेड फ्लोअरवर चांगले सोशलाईझ करता येते, तरीही आज्जींना आता वेगळे दुखणे सुरू झालेले होते. मी बरी नाहीये. माझं पूर्ण अंग दुखत असून मला पेनकिलर्स हवे आहेत आणि बटन दाबले, तरीही कोणीही अजून माझ्याकडे आलेले नाही, असे सांगू लागल्या. मी, होका? थांबा हं, मी फोन करून बोलवते, म्हणून त्या फ्लोअरवरच्या स्पेशलाईज्ड नर्सचा नंबर फिरवायला लागले, तोवर ती तिकडे आलीच. ही नर्स म्हणजे मागे एकदा उल्लेख केलेली टुनिशियन मुलगी, जिची फॅमिली टुनिशियात असल्याने तिला डिप्रेशन आलेले होते. तिला ख्यालीखुशाली विचारून तिला आणि आज्जींना बाय करून मी त्या रूममधून बाहेर पडले.

एक तारखेला ह्याच आज्जींच्या रूममेटची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळल्याने मला धक्काच बसला.

बाकी नियम शिथिल केले असले, तरी चेहऱ्यावर मास्क मात्र होताच, नशीब, त्या समोरच्या आज्जींना खोकला किंवा शिंकही मी असतांनाच्या ५ मिनिटात आलेली नव्हती.
मी अगदीच शॉर्ट टाईम त्या रूममध्ये गेलेले असल्याने मी हा भाग सर्व्हरवर डॉक्युमेंट केलेला नव्हता. त्यामुळे मला संस्थेकडून कॉन्टॅक्टपर्सन म्हणून कॉल आलेला नसला, तरी मी माझी जबाबदारी स्वीकारून तडक जबाबदार व्यक्तीला कॉल केला. त्या मुलीने मला टेस्ट वगैरे करण्याचे सुचवले नाही. मात्र त्या दिवशी लंचनंतर आम्हाला कोणालाच कोणत्याही फ्लोअरवर मात्र जाऊ नका असे सांगितले गेले.

मी खालच्या मजल्यावर कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट करत बसलेले असतांनाच मला कॉल आला, एका आज्जींना मिस्टरांच्या फ्युनरलला जायचे नाहीये, त्या खूप रडत आहेत, तू प्लिज त्यांना जाऊन भेटशील का लगेच... ह्या आज्जींची खूप मोठी गोष्ट पुढच्या भागात सांगते. शिवाय बदललेल्या परिस्थितीमुळे आता संस्थेत किती गोंधळ उडालेले आहेत, याचेही किस्से पुढच्या भागात सांगते.

~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर
०३.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३५

मी खालच्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट करत बसलेले असतांनाच मला कॉल आला, एका आज्जींना मिस्टरांच्या फ्युनरलला जायचे नाहीये, त्या खूप रडत आहेत, तू प्लिज त्यांना जाऊन भेटशील का लगेच?

फ्युनरलला जायचे नाहीये? असे कसे होऊ शकते? आज्जींनी आजोबा गेले, हे अजूनही स्वीकारले नाहीये का? असे प्रश्न मनात असतांनाच मन दोन आठवडे मागे भूतकाळात गेले..

माझ्यासोबत अगदी जवळून संपर्क आल्यानंतर काही तासांतच निधन पावलेल्या एकूण तीन व्यक्तींपैकी हे आजोबाही एक. सगळ्यात पहिल्या होत्या, त्या आज्जी नं 1 , ज्यांचा मृत्यू पचवणे मला फार अवघड गेले होते, तो किस्सा मी मागे लिहिला होता. मग क्वारंटाईन फ्लोअरवरच्या आज्जी, ज्यांचा किस्सा मी भाग ३३ मध्ये लिहिलेला आहे, त्या मुळातच बेडरिडन असल्याने अपेक्षित असले, तरी इतक्या लवकर कसे, म्हणून दुःख तर झालेच होते.

आणि आता हे आजोबा.. ह्यांचा किस्सा प्रचंड वेदनादायी होता माझ्यासाठी. दोन आठवड्यापूर्वी मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्यूटी करत असतांना मला कॉल आला. एक आजोबा आज्जी जोडपं एकमेकांसोबत फार भांडत असून आजोबा आज्जींचं फारच डोकं खात असतात आणि आज्जींना त्याचा फार त्रास होतोय. आजच त्यांच्या लेकीसोबत त्या फ्लोअरवरच्या नर्सचं बोलणं झालं आणि तिने सांगितलं की सायकॉलॉजीस्टला ह्यांना दोघांना काउंसेलिंग करायला लावलं, तर बरं होईल. नर्सने ही गोष्ट सर्व्हरवर डॉक्युमेंट केल्याच्या पाचव्या मिनिटाला मला कॉल आला होता की प्लिज तू ह्या जोडप्याला भेट आणि आज्जींना फार त्रास होतोय, तर त्यांना सेपरेट रूममध्ये राहण्याविषयी सुचवून बघ. त्यांना कमी त्रास होईल.

काउंसेलिंग करणे मला पटले, पण त्यांना सेपरेट रूममध्ये राहण्यासाठी सुचवणे, मला अजिबातच पटलेले नव्हते, पण वरून ऑर्डर आल्यावर माझ्याकडे काही इलाज नव्हता, कारण ह्या केसमध्ये मी बोललेले मला डॉक्युमेंट करावे लागणार होते आणि खोटे बोलणे हा ऑप्शन नव्हता. मग मी आधी संपूर्ण परिस्थिती समजून घ्यायला आज्जी आजोबांचे पूर्वीचे डॉक्युमेंटेशन वाचायला सुरुवात केली. त्यात त्या त्या तारखेनुसार एका नर्सने लिहिलेले होते, "आज रूममध्ये गेले असता, आजोबा माझ्यावर चिडले आणि तुसडेपणाने बोलले, तुम्ही काय मेकअप आर्टिस्ट आहात का, इतका वेळ लावला माझ्या रूममध्ये यायला?" मग दुसऱ्या एका दिवशीच्या डॉक्युमेंटेशनमध्ये लिहिलेले होते, की नर्सने आज्जींना आंघोळ घातली, पण आजोबांना ते त्यावेळी उपलब्ध नसल्याने वेळ टळून गेल्याने आंघोळ घातली नाही तर, त्यांनी आज्जींना नर्सने माझी आंघोळ का घातली नाही, म्हणून दिवसभर पिडलं.

हे वाचून झाल्यावरही त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये राहायला सुचवणं माझ्या पचनी पडत नव्हतं. भांडणं कोणात होत नाहीत? एवढ्या तेवढ्या कारणावरून लगेच काय वेगळं राहायला सुचवायचं? असे विचार मनात येत होते. मग मी त्या फ्लोअरवर गेल्यावर आधी तिकडच्या नर्सला भेटून नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर तिने सांगितलं, आजोबा एकदा कशावरून तरी चिडले होते आणि त्यामुळे त्यांना जेवायला जायचे नव्हते, तर त्या दिवशी त्यांनी आज्जींनाही जेवायला जाऊ दिलं नाही. मग मी तिला ह्या सेपरेशनच्या सल्ल्याविषयी सांगितलं आणि विचारलं, तुला काय वाटतं या बाबतीत? तर ती म्हणाली, काही वेळेला त्रासदायक माणूस चोवीस तास डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा थोडा ब्रेक मिळाला, तर आयुष्य सुखकर होतं.

मग मी मला जिचा फोन आला होता त्या व्यक्तीला फोन करून विचारले की जर मी त्यांना सेपरेट रूममध्ये राहायचा सल्ला दिला, तर त्यांना शेजारी शेजारी रुम्समध्ये राहता येईल का, जेणेकरून हवे तेंव्हा एकमेकांना पटकन भेटता येईल. ती म्हणाली, हो, हे आपण नक्कीच करू शकतो. मग माझे जरा समाधान झाले आणि मी आज्जी आजोबांना भेटायला गेले. तेंव्हा दुपारचे ३ वाजलेले होते. ही वेळ दुपारच्या कॉफी आणि केकची असते. त्यामुळे ते त्यांच्या रूममध्ये नव्हते. ते टागेसराऊममध्ये (शब्दशः अर्थ डे रूम पण इथे डायनिंग हॉल) शेजारी शेजारी बसून कॉफी केकचा आस्वाद घेत आनंदात बसलेले होते. मला त्यांच्याशी बोलायला अपराधीच वाटायला लागलं. पण बोलण्याशिवाय पर्याय नव्हता.

मग हाय हॅलो करून मी विषय काढला, तुमच्यात खूप वाद होतात, हे खरे आहे का? आज्जी म्हणाल्या, हो होतात अधूनमधून.. आजोबा काही न ऐकल्यासारखे केक एन्जॉय करत होते. ते बोलण्यात भाग घेत नव्हते. मग मी पटकन बोलून टाकले, तुम्हाला सेपरेट रूममध्ये राहायला आवडेल का शेजारीशेजारी? किमान रात्रीची झोप तरी नीट लागेल व्यत्ययाशिवाय.. आज्जी म्हणाल्या, झोपेचा काही प्रश्न नाही. दिवसाच जरा वैताग असतो, पण ते जाऊदे, आपण त्यावर नंतर बोलूया. मग मी म्हणाले, आपण दोघी वॉकला जायचं का तुमच्या कॉफीनंतर? तुम्हाला मोकळेपणाने बोलता येईल. आज्जी म्हणाल्या, "नको नको, यांना मी एकटं नाही सोडू शकत. ते कुठेही जातील आणि रस्ता चुकतील." मग मी दोघांना बाय करून जाता जाता दोघांचे निरीक्षण करत होते. आजोबा आज्जींना केक छान आहे, तू खा वगैरे सांगत होते. आज्जीही 'हो' म्हणून हसून बोलत होत्या.

आधीच इकडे जोडप्यांची संख्या कमी, त्यामुळे जे आहेत, त्यांना बघितले की मला ते किती भाग्यवान असे वाटत असते. त्यांची 'जोडी सलामत रहे' अशी मनोमन प्रार्थना करून मी डॉक्युमेंटेशन करायला गेले. त्यात मी लिहिले, "आज्जी आजोबांची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज्जी थोड्या बोलल्या, आजोबा मात्र अजिबात बोलले नाहीत. त्यांना वेगळे राहण्याविषयी सल्ला दिला पण ते त्याबाबत विशेष उत्सुक दिसले नाहीत. आज्जी आजोबांमध्ये थोडे वाद होत असले, तरी ते एकमेकांसोबत खूप आनंदात असल्याचे जाणवले." मला पुन्हा हे सेपरेट रुमच्या सजेशनविषयीची विचारणा यायला नको होती, म्हणून मी जरा स्ट्रेस देऊनच ते फार आनंदी असल्याविषयी लिहिले.

मग माझी घरी जायची वेळ झाल्यावर घरी जायला निघाले, तेंव्हा लिफ्टमध्ये पुन्हा हेच आज्जी आजोबा दिसले. त्या दिवशी मस्त ऊन असल्याने संस्थेच्या गार्डनमध्ये बसायला ते दोघं निघालेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले, तर नेहमीप्रमाणे गेल्या गेल्या ईमेल चेक केल्यावर समजले की रात्री नऊच्या सुमारास आजोबांचे निधन झाले! आजोबांचा मृतदेह शवागरात नेण्यात आलेला आहे.

मी प्रचंड शॉकमध्ये गेले. काहीही न झालेला, फ्रेश दिसणारा माणूस असा अचानक कसा जाऊ शकतो? हा प्रश्न मला पडला.
मग मी जाऊन आजोबांचे डॉक्युमेंटेशन वाचले. नऊच्या सुमारास खुर्चीत बसल्या बसल्याच ते वारलेले होते. मग आज्जींचे डॉक्युमेंटेशन वाचले. त्यात वेगवेगळ्या नर्सेसने वेगवेगळ्या वेळी लिहिलेले होते,
"आजोबा गेल्यानंतर रात्री आज्जी खूप रडत होत्या."

"त्यांचे नातेवाईक संस्थेत येऊन त्यांच्यासोबत बराचवेळ थांबले."

"त्या रात्री आज्जींची मुलगी संस्थेत त्यांच्या रूममध्ये त्यांच्यासोबत झोपली."

"दुसऱ्या दिवशी आज्जी बराचवेळ म्हणत होत्या, "ये ना तू परत, मला स्वतःला दाखव ना.."

एकेक गोष्ट वाचून मला फार त्रास होत होता..

माझी ड्यूटी त्यावेळी क्वारंटाईन फ्लोअरवरच असल्याने कोणीतरी कळवल्याशिवाय, खरोखरच गरज असल्याशिवाय इतर फ्लोअर्सवर जाणे टाळायचे, असे सुरवातीलाच कळवले गेलेले असल्याने काही मोजके आज्जी आजोबा वगळता मी इतर फ्लोअर्सवर कोणालाही भेटलेले नव्हते, त्यांची गोष्ट नंतर सांगेन.

नंतर एक दिवस मी आज्जींना जाऊन भेटू का, असे विचारले असता, नको, त्या आता सावरल्या आहेत आणि आजोबांशिवाय अतिशय मजेत आहेत. त्यांची आठवणही काढत नाहीत आणि मोकळेपणाने सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत आहेत, असे मला सांगण्यात आले. एकदा आज्जी गार्डनमध्ये बसलेल्या दिसल्या. चेहऱ्यावरून त्या मजेत वगैरे वाटत नव्हत्या. सावरलेल्या मात्र दिसत होत्या. कशा आहात, विचारले असता, दिवस काढते आहे, म्हणाल्या. मी ही आजोबांचा विषय काढायचे टाळले.

त्यानंतर डायरेक्ट १ जुलैला अनपेक्षितपणे मला कॉल आला, आज्जी आजोबांच्या फ्युनरलला जायला नाही म्हणत आहेत, तू त्यांना जाऊन भेट. पटकन मी आज्जींच्या रूमचा नंबर सर्व्हरवर चेक करून त्यांना भेटायला गेले. आता आज्जी त्यांच्या प्रशस्त डबल रूममधून तुलनेने लहान अशा सिंगल रूममध्ये मूव्ह झालेल्या होत्या. मला बघून त्यांचा बांध फुटला. मला मिठी मारून त्या जोरात रडायला लागल्या. मी त्यांना सावरत म्हणाले, आज्जी, तुम्ही उद्या आजोबांच्या फ्युनरलला जायला नाही म्हणू नका. आजोबा लांबून तुम्हाला बघत असतील, तर त्यांना वाईट वाटेल, तुम्ही आला नाहीत, हे पाहिले तर.. आज्जी म्हणाल्या, मला जायचेच आहे गं, पण ह्या नव्या परिस्थितीत मला जाता येणार नाहीये. मग अजूनच रडायला लागल्या आणि म्हणाल्या, माझी मुलगी मला रोज संध्याकाळी भेटायला येते, तिलाही आता मला भेटता येणार नाही. मी कशी इथे एकटी राहू? हा करोना किती अंत पाहतोय.

मी गोंधळात पडले. मला कळेचना, आज्जींना फ्युनरलला जायचे नाहीये की त्यांना जायला परवानगी नाहीये? काहितरी मिस कम्युनिकेशन झाले असल्याची मला शंका आली. मग मी बाहेर जाऊन कॉल करून परिस्थिती नक्की काय आहे, हे विचारले, तेंव्हा मला समजले की संस्थेत पहिलीच करोना केस सापडली असल्याने बाहेरील कोणालाही संस्थेत येणे आणि आतून कोणालाही बाहेर जाणे यावर बंदी केली गेली आहे आणि हा निरोप आज्जींना कळवण्यात आला असून त्यांच्या मुलीला आज इकडे येता येणार नाही आणि आज्जींना उद्या फ्युनरलला जाता येणार नाहीये.

मग परत आज्जींकडे जाऊन मी सॉरी, मला चुकीचे कळले होते, असे म्हणून त्यांचे सांत्वन करायला लागले. तेवढ्यात त्यांच्या मुलीचा फोन आला. ती फार वैतागलेली होती. आईला फ्युनरलला येता येणार नाही, या गोष्टीचे तिला फार वाईट वाटत होते. तिला आत्ता आईला भेटावेसे वाटत होते, पण इकडे येता येणार नाही, म्हणून त्रास होत होता. मग मी तिला व्हिडीओ कॉल विषयी सुचवले आणि तिचा नंबर सेव्ह करून तिला तिच्या आईसोबत कनेक्ट करून देण्याचा प्रयत्न करू लागले.

तेवढ्यात कॉफी ब्रेक झाला आणि आज्जी डायनिंग रूममध्ये गेल्या. ह्यावेळी एकट्याच.. कनेक्शन जोडले जात नव्हते. आज्जींची एक मैत्रीण- दुसऱ्या रुममधली रहिवासी- माझ्याकडे येऊन म्हणाली, आज्जी विचारत आहेत, तू काय करतेयस? मी त्यांना सांगितले, व्हिडीओ कॉल करतेय त्यांच्या मुलीला.

मग एकदाचा कॉल लागला. आज्जींना फोन दिला तर लेकीकडे समोर बघण्याऐवजी सारखा त्या फोन कानालाच लावत होत्या. मोठ्या मुश्किलीने मी त्यांना समोर बघा, हे सुचवत राहिले. मग एकदाचे त्यांना समजले.

मी स्टाफमधील एका जबाबदार व्यक्तीला आज्जींना अपवादात्मक परिस्थितीत फ्युनरलला जाण्याची परवानगी देऊ शकाल का, विचारले असता, त्या त्यावर बॉससोबत चर्चा सुरू आहे, म्हणाल्या. मग जरावेळाने मला कॉल करून कळवण्यात आले की आज्जींना परवानगी मिळलेली आहे, तुम्ही त्यांच्या मुलीला फोन करून कळवा तसे. त्या त्यांना उद्या घ्यायला येऊ शकतात, पण त्यांना खालीच थांबावे लागेल, आज्जींना खाली तू घेऊन जा.

मग आज्जींच्या मुलीला हे कळवले असता, तिला आनंद झाला. तिने सांगितले, आज्जींच्या रूममध्ये आज्जींसाठी फ्युनरलसाठी एक ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक डॉट्स असलेला कॉफी कलरचा शर्ट आणि शूज दोरी बांधून हँगरला अडकवून ठेवलेले आहेत, ते घालून आज्जींना तयार करून उद्या अकरा वाजता खाली पाठवशील का? मी हो म्हणाले.

दुसऱ्या दिवशी साडेनऊच्या सुमारास आज्जींना भेटायला गेले, तर आज्जी ऑलरेडी तयार होऊन लिफ्टने खाली जायला निघालेल्या होत्या. मी त्यांना म्हणाले, आज्जी, तुम्ही इतक्यात तयार? त्या म्हणाल्या, आत्ता माझी मुलगी येईल घ्यायला. मी विचारले, ती तर अकराला येणार होती ना? त्या म्हणाल्या, नाही, आत्ताच येतेय. मग मी म्हणाले, आज्जी, थांबा, चला तुमच्या रूममध्ये. तिला एकदा विचारुया.

रूममध्ये जाऊन तिला फोन करून विचारले, तर ती म्हणाली, मी अकरालाच येणार आहे. आईला हल्ली वेळेचे भान उरलेले नाही. मग मी ठरवले, आज्जींसोबत अकरापर्यंत बसावे, त्यांना सोबत करावी. आज्जींनी पायात सॉक्स ऐवजी ब्लॅक टाईट्स घातलेले होते आणि ते फाटले. त्या रडायला लागल्या. आता मी काय करू, म्हणायला लागल्या. त्यांना धीर देत मी म्हणाले, तुमच्याकडे ब्लॅक सॉक्स आहेत का? त्या शोधाशोध करायला लागल्या. मी मदत केली. सॉक्स खुर्चीवरच होते. तुम्हाला मी घालून देऊ का, विचारले असता, तू हे काम करशील? असे म्हणून कृतज्ञतेने मला थँक्यू म्हणाल्या. मी सॉक्स आणि शूज नीट घालून दिल्यावर मला आज्जींनी मिठीच मारली. तू माझ्या मुलीसारखीच आहेस गं, किती प्रेमाने माझं करतेस, म्हणाल्या आणि रडायलाच लागल्या पुन्हा.

मग म्हणाल्या, "त्या दिवशी तू आम्हाला दोघांना भेटायला आली होतीस, तेंव्हा मी तुझ्याशी अजिबात नीट वागले नव्हते त्याबद्दल सॉरी बरं का." मी म्हणाले, "आज्जी, तुम्ही माझ्याशी नीट वागल्या नाहीत, असे मला जाणवले सुद्धा नव्हते, उलट मी तुम्हाला वेगळे राहण्याचा सल्ला दिला त्याबद्दल मलाच अपराधी वाटत होते आणि त्याच रात्री आजोबा गेल्याने तर खूपच वाईट वाटले मला.." मग आज्जींचा बांध फुटला. म्हणाल्या, "त्या दिवशी आम्ही बराच वेळ गार्डनमध्ये बसलो होतो. मग परत आलो. डिनर केलं. मी आवराआवरी करत होते, हे वाचन करत होते. मी जरावेळाने म्हणाले, झोपायचं नाही का, तर हुं नाही की चुं नाही. मला वाटलं, खुर्चीतच झोपले की काय, म्हणून हात लावला, तर मान अशी खाली कलंडली. मी ओरडून नर्सला बोलवले. नंतर समजले की हे गेलेले आहेत. असं माझ्या हातावर त्यांचं डोकं ठेवून पडले होते गं ते.."

आज्जींना खूप रडू यायला लागलं मग.. "मी त्यांच्या आधी का गेले नाही, मला हे दुःख सहन होत नाही", म्हणू लागल्या. मी त्यांना सावरण्यासाठी बोलत राहिले, "आज्जी, आजोबा भाग्यवान होते. कुठल्याही आजाराने बेडरीडन न होता गेले, आणि ते गेले, तेंव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होतात हे चांगले झाले कारण शिवाय डिमेन्शिया होता ना, ते तुमच्यामागे एकटे कसे राहिले असते.. हे ऐकून त्या सावरल्यासारख्या दिसल्या. त्या म्हणाल्या, "डिमेन्शिया असा विशेष नव्हता गं त्यांना.. थोडा रस्ता वगैरे चुकायचे, पण बाकी बऱ्याच बाबतीत फार शार्प होते ते. कितीतरी कामं हातोहात करत. बावन्न वर्षांचा संसार आमचा.. कशी जगू मी त्यांच्याशिवाय? तू येत जा ना गं मला नेहमी भेटायला. मला फार एकटे वाटते. आता लेकही नाही येऊ शकणार भेटायला पुढचे काही दिवस, ह्या करोनापायी.. मला तुझा नंबर मोठ्या अक्षरात लिहून दे. मी तुला कॉल करत जाईन. मी त्यांना माझा ऑफिसचा नंबर आणि मी संस्थेत असते, त्या वेळा मोठ्या अक्षरात लिहून दिल्या. आज्जींनी मला त्यांचे लग्नाचे आणि लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीचे फोटोजही दाखवले.

तेवढ्यात त्यांच्या लेकीचा फोन आला. आई ऑलरेडी तयार झालेलीच आहे, तर तिला ताटकळत बसवणे मला नको वाटते आहे. मी दहा वाजताच आईला न्यायला येतेय. मला व्हिडीओ कॉल करशील का? आई नीट तयार झालीये की नाही, मला बघायचं आहे. मग कॉल केल्यावर, "आई, लाईट जॅकेट नको, ते डार्क घाल, फ्युनरलला जात आहोत. असे म्हणून ते जॅकेट कुठे आहे, ते ती मला व्हिडीओ वरून पॉइंट आउट करून दाखवू लागली. ते देऊन आज्जींना मी खाली घेऊन गेले. त्यांची रहिवासी मैत्रीणही सोबत आली. पुढच्या पाचव्या मिनिटाला मुलगी संस्थेबाहेर दारात उभी होती. डिनरपर्यंत आईला परत आणून सोडते, म्हणाली. आईची काळजी घेतल्याबद्दल मला खूप धन्यवाद देत ती त्यांना घेऊन गेली. मी ही मग आता आज्जी लेकीसोबत संस्थेबाहेर गेलेल्या आहेत, आजोबांचे फ्युनरल आटोपून डिनरपर्यंत त्या परत येतील, ही माहिती डॉक्युमेंट करायला उदास मनाने ऑफिसरूमकडे वळले.

~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर
०५.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३६

मागच्या आठवड्याभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातली एक सकारात्मक म्हणजे ज्या आज्जींची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आलेली होती, त्यांची नंतरची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या रहिवाश्यांची आणि सर्व कर्मचाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आली.

तरीही त्या ज्या मजल्यावर राहत होत्या, तो मजला आयसोलेट करण्यात आला आणि ह्या आज्जी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर आज्जी आजोबांना चौथ्या मजल्यावर म्हणजेच जिथे मी गेले दोन महिने ड्यूटीला होते, तिथे शिफ्ट करण्यात आले आणि तो मजला पुन्हा एकदा आयसोलेट करण्यात आला.

त्या मजल्यावर आत्तापर्यंत राहत असलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या रहिवाश्यांना पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. त्यांनाही रूमबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले होते. जेवणही रुममध्येच सर्व्ह केले जाणार, असे समजले असल्याने त्यातल्या सोशल नेचरच्या आज्जी आजोबांमध्ये पॅनिक परीस्थिती निर्माण झाली.

१ जुलैला आजोबांच्या फ्युनरलाला जाऊन आलेल्या आज्जींची गोष्ट सांगितली आहेच, त्याच दिवशी सर्व आज्जी आजोबांना करोना परिस्थिती आणि दुपारच्या कॉफीब्रेकला सर्वांनी रूममध्येच थांबावे, असे सर्वांना कळवण्यात आल्यावर पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या बाहुलीवाल्या आज्जी पॅसेजमध्येच एकदम जोरजोराने रडायला लागल्या. एक नर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होती. ही परिस्थिती अवघड आहे, पण आपण शांतपणे ती स्वीकारून त्यातून मार्ग काढला पाहिजे, हे ती आज्जींना सांगत होती. माझी घरी जायची वेळ झाल्याने मी जायला निघाले होते, तेवढ्यात समजले की पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या आज्जी आजोबांना कॉफी, लंच, डिनर ब्रेक्समध्ये रूममध्ये बसण्याची गरज नसून ते दोन ग्रुप्समध्ये कॉफीरुम्स मध्ये सुरक्षित अंतरावर बसू शकतात. अर्ध्या तासांचे दोन टाईम स्लॉट्स बनवण्याचे मग त्या दिवशी ठरले.

अचानकपणे बनवलेल्या आणि बदललेल्या नियमांमुळे गोंधळ उडालेला असल्याने काही आज्जी आजोबांना त्यांच्या रूममध्ये कॉफी-केक सर्व्ह केला गेला आणि काही जण कॉमन डायनिंग रूममध्ये बसलेले दिसले. मी सहज एका रूममधल्या आजोबांना भेटून चौकशी केल्यावर समजलं, की ते कॉफीची वाट बघत बसलेले आहेत. मग त्यांच्या शेजारच्या रूममध्येही अशाच दुसऱ्या आज्जी कॉफीची वाट पाहत बसलेल्या दिसल्या. स्टाफला फोन करून विचारले असता, त्यांना ही गोष्ट माहिती नसल्याचे कळले. करोनामुळे बाकी फ्लोअर्सवरून ह्या फ्लोअरवर शिफ्ट व्हावे लागल्याने डबलबेड टाकून रुम्स शेअर करणाऱ्या आज्जी आजोबांमुळे त्या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांची संख्या आता 30 च्या वर होती. त्यामुळे कोणाची कॉफी पिऊन झाली आहे आणि कोण बाकी आहे, हे काम रूम टू रूम जाऊन चेक करणं आवश्यक होतं. किचनमध्ये आधीच मॅनपॉवर कमी असल्याने माझी घरी जायची वेळ झालेली असूनही मग मी प्रत्येक रूममध्ये जाऊन त्या त्या आज्जी आजोबांनी कॉफी-केकचा आस्वाद घेतला आहे की नाही, ते बघून, नसेल घेतला, तर फ्लोअरवरच्या डायनिंग हॉलमध्ये त्यांना जायला सांगून, स्वतःहून जमत नसल्यास त्यांची व्हीलचेअर रोल करून त्यांना तिकडे पोहोचवण्याचं काम केलं आणि मग घरी आले.

दुसऱ्या दिवशी मला फक्त पहिल्या फ्लोअरवरच परत ड्यूटी करायला सांगितले गेले. दुसरा आणि चौथा फ्लोअर आयसोलेट केला गेला असल्याने आता मला तिकडे न पाठवता पहिल्या फ्लोअरवरच थांबण्याचे सांगण्यात आले. मग तिसऱ्या फ्लोअरचे काय? असे विचारले असता एका केअर युनिट सहकाऱ्याला आज त्या फ्लोअरवर ड्यूटीसाठी नेमलेले असून इतर दोन फ्लोअर्सवरही या प्रकारची व्यवस्था केली गेली असल्याचं समजलं. आता कोणत्याही फ्लोअरवरचे एम्प्लॉयीज एकदा त्या फ्लोअरवर काम करायला लागल्यावर त्यांना इतर फ्लोअरवर जाण्याची बंदी करण्यात आली, जेणेकरून कमीतकमी सोशल कॉन्टॅक्ट.

शिवाय ईमेलमध्ये वाचून समजलं की आज्जी आजोबांच्या आंघोळीसुद्धा घालायला बंदी करण्यात आलेली आहे. जे काम १.५ मीटर पेक्षा कमी अंतर ठेवून किंवा १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊन करावे लागते, ते रद्द करण्यात आले असून त्यात आंघोळ येत असल्याने तिला बंदी करण्यात आली. अर्थात, जे आज्जी आजोबा स्वावलंबी आहेत, ते स्वतःच्या हाताने आंघोळ करू शकतील. जे नर्सवर अवलंबून आहेत, त्यांना मात्र फक्त झटपट स्पंजिंग केले जाणार असल्याचे कळले. हा नियम नुकताच आलेला असल्याने आधीच उकाडा आणि त्या दिवशी आंघोळ नसल्याने एका आज्जींची प्रचंड चिडचिड झाली आणि माझ्याजवळ त्या जरा चढ्या आवाजातच ह्या विषयी तक्रार करायला लागल्या. मी त्यांना शांतपणे सुरक्षित अंतर आणि वेळेचे नियम सांगायला लागले,
ते तोडून एक चिडलेली सहकारी मध्येच येऊन आज्जींना रागावलेल्या स्वरात सांगायला लागली, जे नियम बनवलेले आहेत, ते आहेत, त्यावर वाद नको. आहे, ते स्वीकारा. आज्जी मग परत चिडल्या. माझ्याकडे पॉईंट आऊट करून, 'मी हिच्याशी बोलते आहे. तू मध्ये मध्ये बोलण्याचं कारण नाही. तू गप्प बस', असे म्हणून माझ्याकडे बघून 'तू बोल गं' म्हणाल्या. मी त्या सहकारी मुलीला, 'मी त्यांना आंघोळ न घालण्याचं कारण नीट समजावून सांगते आहे. कारण कळलं की त्या नाही चिडणार', असे सांगितले. ती सहकारी दुखावलेली दिसत होती. काही न बोलता तिकडून ती निघून गेली आणि मग मी आज्जींना नीट पद्धतीने नियम समजावून सांगितले. आता आज्जी एकदम समजून घेण्याच्या मूडमध्ये होत्या, त्यामुळे त्यांनी माझं सगळं नीट ऐकून घेऊन मला 'थँक्स' म्हणून त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या.

ह्याच फ्लोअरवर बाहुलीवाल्या आणि इटालियन आज्जीही असल्याने आणि आमचे स्पेशल बॉंडिंग निर्माण झालेले असल्याने त्यांना मला ह्याच फ्लोअरवर जास्तवेळ थांबल्याचे बघून अतिशय आनंद झाला असल्याचे, दोघींनीही सांगितले. मागचा पूर्ण आठवडा मी पहिल्या मजल्यावरच ड्यूटीला असल्याने तेथील सर्व आज्जी आजोबांना व्यवस्थित भेटू शकले, त्यांना वेळ देऊ शकले. त्यातच ज्यांचे मिस्टर नुकतेच वारले, त्या आज्जीही आल्या. त्यांनाही मला रोज वेळ देता आल्याने, त्या फार खुश होत्या.

ह्या आज्जी मधूनच दुःख विसरतात आणि मधूनच त्यांना सर्वकाही आठवून एकदम रडायला येते, भावना अनावर होतात, हे लक्षात आले असल्याने मी त्यांना जास्तीतजास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला. एकदिवस हवामान पावसाळी आणि वादळवाऱ्याचे असल्याने त्या फिरायला गार्डनमध्ये गेल्या नव्हत्या. त्यांना मी आपण फ्लोअरवरच सोबत राऊंड मारुया, हे सुचवल्यावर त्यांना फार आनंद झाला. गेल्या चार वर्षांपासून त्या ह्या संस्थेत राहत असून सोशल नेचरच्या असल्याने त्यांना त्या फ्लोअरवरच्या बऱ्याच आज्जी आजोबांच्या गोष्टी माहिती होत्या, असे त्यांच्या बोलण्यातून समजले.

'ह्या ह्या रूममधल्या अमुक आज्जी आधी माझ्यासारख्याच मिस्टरांसोबत डबल रूम मध्ये राहत होत्या, बरंका! आता मिस्टर वारल्याने सिंगल रूममध्ये मूव्ह झाल्यात, अशी माहिती, तसेच एक आज्जी त्यांच्या एकेकाळी म्हणजे सिनियर केअर होममध्ये शिफ्ट होण्याआधी शेजारीण होत्या, अशी माहिती आणि इतरही बऱ्याच जणांविषयी त्यांनी मला सांगितले. एखाद्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत फिरते आहे, असे त्यांच्यासोबत चालतांना मला वाटत होते.

हीच गोष्ट बाहुलीवाल्या आज्जींची. खूप पूर्वी त्यांच्या रूममध्ये एकदाच जाऊन सगळ्या चित्रविचित्र बाहुल्या बघून अस्वस्थ झाले होते, हे मागे एका भागात सांगितले आहेच, नंतर त्या क्वारंटाईन फ्लोअरवर आल्यानंतर आमचे बॉंडिंग तयार झालेले होते, हेही मागे लिहिले होते, आणि आता आठवडाभर रोज भेटून आमच्या फार छान गप्पा झाल्या. त्या ओघात त्यांनी मला बऱ्याच गंमती जमती सांगितल्या, फॅमिली अलब्म्स दाखवले. आत्ता त्या जशा थुलथूलीत आहेत, तशा त्या एकेकाळी नव्हत्या. त्यांच्या मिस्टरांनी त्यांना बरीच मारझोड केली, मग त्यांच्या आजारी तब्येतीच्या कारणावरून मुलांची कस्टडी स्वतः कडे घेतली. त्यांची मुलं-मुलीही त्यांना रेअरलीच भेटतात, असे समजले. त्यांची एक मुलगीही दुसऱ्या एका अशाच संस्थेत नर्स असून एकदा तिथे आज्जी काहीतरी उपचारासाठी गेलेल्या असतांना ती त्यांना भेटली, तेवढीच त्यांची भेट, असे त्यांनी सांगितले. गंमत म्हणजे ह्या ७० वर्षांच्या आज्जींचा एक ५२ वर्षांचा बॉयफ्रेंड असल्याचे मला नवीनच समजले. आज्जी विभक्त झाल्यानंतर एकट्याच त्यांच्या घरी राहत असतांना हा ही त्याच बिल्डिंगमध्ये राहत होता- अजूनही राहतो आणि बिल्डिंगचा केअर टेकर म्हणून जॉब करतो. हा आणि आज्जी जमेल तेंव्हा भेटतात, असे कळले. त्या देखण्या 'तरुणाचा' फोटो त्यांनी टेबलवर ठेवलेला आहे.

आज्जींनी ह्या सगळ्या बाहुल्या कशा जमवल्या, ह्याचीही गोष्ट मला सांगितली. त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या त्यात फारच कमी, मात्र लोकांनी कचऱ्यात फेकलेल्या आणि त्यांना आवड आहे असे समजल्यावर संस्थेतल्या आज्जींनीही त्यांना काही आणून दिल्याचे कळले. एक बाहुली अगदी हुबेहूब छोट्या बाळाच्या आकाराची असून तिचा किस्सा आज्जींनी मला सांगितला. त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक जोडपं राहत होतं आणि त्यांना मूलबाळ होत नव्हतं, तर त्यातल्या जोडीदाराने त्याच्या जोडीदारीणीला ही बाहुली आणून दिली. त्याने ती फ्रस्ट्रेट झाली आणि जोरजोरात भांडायला लागली. मला बाहुली नको, खरंखुरं मूल हवं आहे. फेक ती बाहुली आधी जाऊन, असे सांगितल्यावर त्याने ती बाहुली खाली जाऊन कॉमन कचऱ्याच्या डब्यात टाकली. आज्जी तेंव्हा तिथेच होत्या. त्या म्हणाल्या, मी नेते ती, आणि उचलून घेऊन गेल्या आपल्या घरी. असे आज्जींकडून त्यांच्या बाहुल्यांचे एकेक किस्से ऐकण्यात मी पार रमून गेले.

तशाच इटालियन आज्जी. आमोरे मियो सकीना, लिबे सकीना म्हणत मला रोज एकेक गंमती जमती सांगत होत्या, माझे मनोरंजन करत होत्या. त्यांचे क्रोएशियन बॉयफ्रेंड आजोबा त्याच मजल्यावर राहत असल्याने ते दोघे रोज एकत्रच सर्व फूड ब्रेक्सना डायनिंग रूममध्ये बसत असत आणि रँडमली ग्रुप्स पाडल्यानंतर त्यांना दोघांना वेगवेगळे ग्रुप्स मिळाल्याने आज्जी एकदम डिस्टर्ब झाल्या. त्यांनी मला ही गोष्ट सांगितल्यावर मी हे काम जिने केलं आहे, तिला त्यांना एकच टाईम स्लॉट देण्याची विनंती केली. तिने ती मानून त्यांना एक स्लॉट दिल्यावर आज्जींचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ह्या आज्जी त्या क्रोएशियन आजोबांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या असून त्या स्वतः विधवा आणि आजोबा मात्र घटस्फोटित आहेत. ह्या मितभाषी आजोबांना सिगरेटी फुंकण्याचे व्यसन असल्याने ते सतत खाली गार्डनमध्ये जात असतात, ते बऱ्यापैकी फिट असून कसे चालले आहे, ह्या प्रश्नाचे जर्मनमध्ये उत्तर, 'इमर गुट', म्हणजे, 'नेहमीच चांगले' असे हसत सांगत असतात, तर ह्या बडबड्या आज्जी स्थूल असून सतत तक्रारी करत असतात आणि आज्जींना चालण्या फिरण्याची विशेष आवड नसल्याने त्या आजोबा रूमबाहेर गेले, की त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांचे बेडशीट नीट करणे, रूम आवरणे, हे काम करत बसतात. आजोबांना इकडे सर्व्हिस करणाऱ्यांचे काम आवडत नाही, मीच लावलेले, त्यांना आवडते, असे अभिमानाने मला एकदा सांगत होत्या. एकदा रात्री आजोबांना बेडशीटमध्ये शू झाल्याचे आज्जींकडून कळले. त्या आजोबांच्या रुममध्ये उभ्या राहून नर्सला सतत सूचना देऊन नाकी नऊ आणत होत्या. आजोबा फिरून यायच्या आत हे बेडशीट बदला, सगळे नीट स्वच्छ लावा, असे जरबीने सांगून स्वतःला चालता, वाकता येत नसूनही धडपडत तरीही मन लावून एखाद्या संसारी सुगृहिणीसारखे ते काम करत होत्या.

जनरलीच लंचनंतर मी गार्डनमध्ये एक दोन चकरा मारत असते, तेंव्हा हे आजोबा तिकडे बसलेले होते, मग आज्जीही आल्या. त्या दिवशी संस्थेत बाहेरील दुकानांतून वस्तू आणून आज्जी आजोबांना विकत घेऊ देण्याचा दिवस होता, जेणेकरून त्यांना बाहेर जाऊन सामान आणायला नको. ते घेण्याच्या निमित्ताने आज्जी तिकडे आल्या होत्या. मला पाहून त्या परत रूमकडे जाण्यासाठी लिफ्टमध्ये जाताजाता परत आल्या.

त्यांनी चोकोबार आईस्क्रीमची काही पाकिटं घेतलेली होती. आमोरे मियो सकीना, घे, हे खा म्हणून एक मला देऊन आजोबांनाही दिले, तर त्यांनी घ्यायला नकार दिला. मग मी आणि आज्जींनी बाकावर बसून त्या आईस्क्रीमचा आस्वाद घेत घेत गप्पा मारल्या. आज्जींना जर्मन विशेष येत नसल्याने त्या तोडक्यामोडक्या भाषेत व्यक्त होतात. माझेही जर्मन काही ग्रेट नसल्याने मला त्याने त्रास होत नाही, मात्र आजोबा आज्जींवर फार इरिटेट झालेले दिसले. त्यांनी थोडावेळ शांतपणे सिगरेट फुंकली, मग आज्जींना (अर्थातच जर्मन भाषेत) ओरडले, 'ए गप्प बस गं बाई, किती भुणभुण भुणभुण लावली आहेस कानाला, तू काय बडबडतेस, ते एकतर इथे कोणालाही समजत नाही. बंद कर ते थोबाड!" आजोबांचे हे रूप माझ्यासाठी नवीन होते. भाषा अतिशय तुसडी असली, तरी चेहऱ्यावरचे भाव आणि टोन प्रेमाच्या माणसाशी बोलतोय, असाच होता, त्यामुळे माझी आणि आज्जींची नजरानजर झाली आणि आम्ही दोघी प्रचंड हसलो. आज्जींनी बडबड काही थांबवली नाही. मग मीच जरावेळाने तिकडून उठून आज्जींना चोकोबारसाठी धन्यवाद देऊन फ्लोअरवर परत गेले.

एकंदरीतच आपल्या घरच्या माणसांसोबत राहत असल्याचा फील मला ह्या पहिल्या मजल्यावर मागच्या आठवड्यात आल्याने मी जॉब करते आहे की एका घरातून उठून दुसऱ्या घरी जाते आहे, असेच मला वाटत होते. थोडक्यात, हा आठवडा माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर ठरला!

~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर
१४.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३७

डायरी लिहिण्यात अधूनमधून गॅप होतच असतो, पण ह्यावेळेस जरा जास्तच गॅप पडला,हे खरंच.. सांगण्यासारख्या खूपच गोष्टी रोज घडत आहेत, पण ठरवूनही पूर्वीसारख्या लिहिल्या जात नाहीयेत. त्याला 'writer's block' असेही म्हणू शकत नाही, कारण लिहायला सुरुवात केली आणि सुचलेच नाही, असेही झालेले नाहीये. लिहायला बसण्यासाठी वेळ आणि मूड दोन्ही जुळून येणे ह्यावेळी काही ना काही कारणाने घडले नाही. असो.

डायरी नव्याने वाचायला सुरुवात करणाऱ्यांसाठी माहिती म्हणून सांगते. मी जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेले साडेपाच महिने जॉब करते आहे आणि जॉईन केल्यानंतर 3 आठवड्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. आज डायरीचा भाग 37 लिहायला सुरुवात केली आहे.

आता सगळे फ्लोअर्स क्वारंटाईन मुक्त स्वरूपातले असले, तरीही आज मी ज्यांची अतिशय नाट्यमय अशी गोष्ट सांगणार आहे, ते आजोबा मला क्वारंटाईन फ्लोअरवरच ओळखीचे झाले. हे आजोबा डॉ. असे प्रिफिक्स असलेले पहिलेच असल्याने ते मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे ते संस्थेत दाखल झाल्या झाल्या त्यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी मी त्यांच्या रूममध्ये गेले. उंचपुरे, धिप्पाड, पांढरी दाढीवाले, लांब नाक असलेले हे आजोबा एकदम अमिताभ बच्चनसारखेच दिसत होते. ते खुर्चीवर शांत बसलेले होते. त्यांचे संस्थेत स्वागत करून त्यांना मी माझे नाव आणि करत असलेले काम सांगून झाल्यावर आजोबांना मी त्यांच्याविषयी माहिती विचारायला सुरुवात केली. माझ्या मनात असलेला प्रश्न त्यांना सगळ्यात आधी विचारला, "तुम्ही मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट"? आजोबा म्हणाले, "तुम्हीच गेस करा". मग मी "डॉक्टरेट" असे उत्तर दिल्यावर अमिताभप्रमाणेच मात्र जर्मनमध्ये, "रिष्टीश" म्हणजेच "सही जवाब" म्हणाले. मग कोणत्या क्षेत्रात? असे विचारले असता, परत त्यांनी मलाच ओळखायला लावल्यावर सायन्सच्या सर्व शाखा, त्यानंतर आर्ट्सच्या आणि मग कॉमर्सच्याही विचारून झाल्यावर, Anthropology, Archeology, Architecture, Hotel management पैकी कोणत्याही क्षेत्रात त्यांनी पीचडी केलेली नसल्याने मी हार मानून त्यांनाच खरं उत्तर द्यायला लावले. शेवटी त्यांनी "रेष्ट अनवॉल्ट" म्हणजेच "कायदा" ह्या क्षेत्रात पीएचडी केले असल्याचे सांगितले.

मला फार आश्चर्य वाटले, हे उत्तर ऐकून.. ह्या क्षेत्रातही पीएचडी करता येऊ शकते, याविषयी मी कधीही विचारच केलेला नव्हता. कायद्यातला नेमका कोणता विषय, विचारले असता त्यांना काही नीट सांगता येत नव्हतं.

या सर्व प्रश्नांच्या ओघात आजोबांना त्यांच्या फॅमिलीविषयी विचारायचं राहूनच गेलं. आजोबांना अजून काही प्रश्न विचारणार, तेवढ्यात नर्स ताई तिकडे आली. आजोबांची बॅग लावशील का? असं तिने मला विचारलं. खरंतर, हे माझं काम नाही, पण मागे एकदा लिहिल्याप्रमाणे तो क्वारंटाईन फ्लोअर असल्याने आणि तिकडे मनुष्यबळ कमी असल्याने नर्सची दगदग कमी करण्यासाठी मीच तिला मदतीचा हात पुढे केलेला होता आणि गरज पडेल तशी ती मला तिची सोपी सोपी कामं सोपवून स्वतःचा भार हलका करत होती अधूनमधून.

मी आजोबांची बॅग लावायला सुरुवात केली. कपडे कपाटात, तर शॅम्पू, लिक्विड सोप, ब्रश, पेस्ट  वगैरे बाथरूममध्ये आणि लेदरचे इनडोअर शूज त्यांच्या टेबल-चेअरजवळ तर स्पोर्ट्स शूज वॉर्ड रॉबच्या तळाशी असे सगळे लावून रिकामी सुटकेस एका कोपऱ्यात ठेवून दिली.

नर्सने प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या टेबलवर एक फुलं असलेला फ्लॉवरपॉट, संस्थेचे माहितीपत्रक, मासिक, वेलकमचा बोर्ड, एक साध्या पाण्याची तर एक सोडा वॉटरची बाटली आणि एक ग्लास ठेवलेलाच होता. त्यांना मी पाणी विचारून होकार आल्यावर पाणी दिले. इतर बऱ्याच आज्जी आजोबांबाबत एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे ते हॉस्पिटलमधून संस्थेत दाखल झालेले होते. मात्र हे आजोबा डायरेक्ट घरून संस्थेत आले असल्याचं समजलं. मला वाटलं, त्यांच्या घरी त्यांची काळजी घेणारं आता कोणी नसेल आणि  स्वतःचं स्वतः करण्याची क्षमताही त्यांच्यात नसावी, म्हणून ते इकडे आले असावेत. कारण जनरली संस्थेत दाखल होणारे लोक शारीरिक किंवा मानसिकदृष्टीने स्वावलंबी राहण्यास सक्षम  नसतात. मी आजोबांना उत्सुकता असूनही त्यांच्या येण्याचं नक्की कारण विचारण्याचं टाळलं. अजून प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना पूर्ण क्वारंटाईन फ्लोअर फिरवून आणण्याचं ठरवलं. त्यांना इतर रहिवाश्यांसोबत गप्पा मारायला बनवलेला सिटिंग कॉर्नर, केअर युनिट एम्प्लॉयीज बसतात ते ऑफिस, किचन, छोटी आणि मोठी डायनिंग रूम आणि सगळ्यात शेवटी गच्ची दाखवून तिथे थोडावेळ त्यांच्यासोबत बसून त्यांना परत त्यांच्या रूममध्ये सोडून आले. आजोबा मला तर एकदम मस्त इंटरेस्टिंग व्यक्तिमत्त्व वाटत होते. मग लंचब्रेक झाल्यावर जेवून परत आले, तर हे आजोबा पॅसेजमध्ये उभे होते. मी विचारलं, "काय? कसं वाटतंय संस्थेत?" तर म्हणाले, "फारच छान वाटतंय. काय छान जेवण होतं.."
"काय जेवलात?", विचारलं असता, त्यांना सांगता येईना.. रोज जेवणात दोन मेनू असतात, त्यातला एक निवडायचा असतो, ते दोन्ही वाचून मी त्यातला एक निवडला असल्याने मी त्यांना विचारले, "स्पार्गल (ऍस्पॅरागसचे जर्मन नाव) विथ व्हाइट सॉस का?" तर "हो, बरोबर!" म्हणाले. मग एक आज्जी आल्या, तर त्यांनाही सांगायला लागले, "जेवण काय छान होतं ना? काय खाल्लं बरं मी?" मी पुन्हा सांगितलं, "स्पार्गल..." त्यानंतर आजोबा जे काही त्या आज्जींसोबत बोलत होते, ते असंच तुटक तुटक होतं. आजोबांना डिमेन्शिया (विस्मरणाचा आजार) तर नसेल ना? अशी मला शंका आली.

मग दुपारी १ ते ३ या वेळात सगळे झोपायला गेले आणि मी माझे ऑब्झरवेशन्स डॉक्युमेंट करायला ऑफिसमध्ये गेले. थोडं लिहून झालं, तेवढ्यात ऑफिसरूमच्या काचेच्या खिडकीतून हे नवीन आजोबा त्यांची रिकामी सुटकेस घेऊन फ्लोअरभर फिरतांना दिसले. आजोबांना काय झालं?" विचारलं असता, आजोबा म्हणाले, "मला घरी जायचंय, रस्ता कुठेय?" माझ्या घशात एकदम आवंढा दाटून आला. आजोबांना आता काय सांगावं? असा प्रश्न मला पडला. मी आपली, "आजोबा, चला तुम्ही रूममध्ये. आता झोपा थोडावेळ", असं म्हणून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत होते. पण आजोबा काही ऐकायला तयार नव्हते.

तेवढ्यात मागे उल्लेख केलेला इरिट्रीयन नर्स मुलगा आला. म्हणाला, "थांब, मी हँडल करतो परिस्थिती." मग त्याने आजोबांची सुटकेस स्वतःच्या हातात घेतली आणि म्हणाला, "चला, घरी जाऊया." आणि फ्लोअरवर सगळीकडे आजोबांसोबत सावकाश दोन राऊंड मारून त्यांना त्यांच्याही नकळत रूममध्ये परत घेऊन गेला आणि "आता झोपायची वेळ झाली, तुम्ही आता झोपा", म्हणून त्यांना बेडवर झोपायला लावून त्यांच्या रुमचे दार लोटून बाहेर आला.

मी आवाक होऊन हे दृश्य बघतच राहिले! काय सुंदर हँडल केली त्या मुलाने ही परिस्थिती खरोखरच! मी त्याचं मनापासून कौतुक केलं. आपल्याला बरेचदा असे अनुभव येत असतात ना? आपण ज्यात शिक्षण आणि करियर करतो, त्याचा विशेष गंधही नसलेले त्यातलं आपल्याला काहीतरी शिकवून जातात. मला तरी हा अनुभव फार वेळा येतो. मग जाणवतं, हे त्यांच्यातले उपजतच गुण आहेत. आपल्याला जे शिकूनही जमत नाही ते त्या व्यक्तीला न शिकताही- त्यातील औपचारिक शिक्षण न घेताही सहज जमून जातं...

त्या मुलाला म्हणाले, यापुढे असला चॅलेंजिंग प्रसंग आला तर तू ज्या फ्लोअरवर ड्यूटीवर असशील, तिकडून तुला कॉल करून बोलवून घेईन.. तो ही हसून म्हणाला, "हो! जरूर!"

असो, तर ह्या आजोबांनी दुसऱ्या दिवशी अजून वेगळीच गंमत केली. ते म्हणाले, "माझी सुटकेस सापडत नाहीये." मी म्हणाले, "तुम्ही तुमच्या रूममध्ये चेक केलंत का?" तर म्हणाले, "नाही, तिकडे नाहीये. इकडेच बाहेर कुठेतरी आहे." मी त्यांना आदल्या दिवशी दाखवलेल्या सगळ्या रुम्स चेक करून झाल्यावरही सुटकेस मिळत नाही, हे समजल्यावर कॉर्नरच्या एका दाराकडे बोट दाखवत म्हणाले, "तिकडे असेल." मी त्यांना सांगितलं, "ही टॉयलेटच्या पोर्टेबल पार्ट्स क्लिनिंगचे मशिन्स असलेली छोटीशी रूम आहे, वाचा तुम्ही.. "श्पूलराऊम..तिकडे सुटकेस बसूही नाही शकत." तर ते म्हणाले, "आहा! ज्या अर्थी तुम्ही रूम उघडत नाही आहात, त्या अर्थी माझी सुटकेस तिथेच असणार!" त्यांचं लॉजिक बरोबर होतं, नाही का? मनातलं हसू मनातच दाबत आणि डॉक्टर साहेबांच्या लॉजिकपुढे झुकत मी त्यांना ती रुमही उघडून दाखवली. आत काही नाही म्हटल्यावर आजोबांना विचारलं, "आता सगळीकडे चेक करून झालेलं आहे, तर एकदा तुमच्याही रूममध्ये चेक करायचं का?" त्यावर, "हो" असं म्हणून ते माझ्यासोबत त्यांच्या रूममध्ये गेले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांची सुटकेस त्यांना तिथे दिसली.

असे हे आजोबा दिवसेंदिवस जास्त जास्त गोष्टी विसरतांना दिसू लागले. कधी अर्धवट कपडे घालून बाहेर फिरू लागले, तर कधी स्वतः ऐवजी दुसऱ्याच कोणाच्यातरी रूममध्ये जाऊ लागले. त्यांना घाबरून बाकी रहिवासी आपल्या रुमचे दार आतून लॉक करून घ्यायला लागले. क्वारंटाईन फ्लोअर असल्याने एक लिफ्ट सोडून बाकी जिन्याने उतरण्याची सोय तिथल्या दरवाज्यांना अलार्म लावून बंद करण्यात आलेली होती. तर आजोबा तिकडून अनेकदा बाहेर पडून अलार्म ऍक्टिवेट करायला लागले. इतके झाले तरी आग लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर लोकांना जिन्याने खाली उतरता येण्याची शक्यता कायम राहिली पाहिजे या नियमानुसार दरवाजे कधीच लॉक केले जात नाहीत. रहिवाश्यांनी स्वतःहून आतून लॉक केले तर ठीक, नाहीतर त्यांच्या रुम्सही केवळ ते विस्मरणाचा आजार असलेले लोक म्हणूनही कधीच लॉक केले जात नाहीत, हे तर मागे एका भागात सांगितलं होतंच..(आणि त्यांच्या लॉक्ड दरवाज्यांना हॉटेलप्रमाणे मास्टर की ने एम्प्लॉयीज उघडू शकतात.) असे लिहिले आहे आता.

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३८

"कायदा" या क्षेत्रात डॉक्टरेट असलेले मात्र डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा आजार झाल्याने सिनियर केअर होममध्ये दाखल झालेले आजोबा करोना काळातील नियमानुसार क्वारंटाईन फ्लोअरवर दोन आठवडे राहून आणि भरपूर गोंधळ घालून संस्थेच्या तळमजल्यावर असलेल्या डिमेन्शिया वॉर्डमध्ये हलवले गेले. 

काही दिवसांनी त्यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या एक आज्जी संस्थेत दाखल झाल्याचे समजले. या त्यांच्या मिसेस तर नसतील ना? अशी शंका आली आणि तिचे निरसन करून घेतल्यावर समजले की माझी शंका बरोबरच होती आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता. कारण ज्या आजोबांशी माझे इतके छान ऋणानुबंध निर्माण झालेले होते, त्यांच्याविषयी खरंतर मला काहीच माहिती नव्हती. एखाद्या पझलचे तुकडे जोडतांना योग्य तुकडा सापडल्यावर आणि जोडल्यावर चित्र पूर्ण झाले की आपल्याला जसा आनंद होतो, तसाच मला कायम एखाद्या व्यक्तीला आधीच ओळखत असतांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना पाहिल्यावर होत असतो. मग ते त्यांचे जोडीदार असोत की मुलंबाळं, भावंडं असोत की इन-लॉ ज.. या संस्थेत नोकरी करायला सुरुवात केल्यापासून मला असे अनेक पझलचे तुकडे जोडतांना बघता आले आहेत आणि काही तुकडे मला स्वतःला जोडता आले, ते जोडण्यात मदत करता आली याचा फार आनंद वाटतो.

त्या आजोबांच्या मिसेसना भेटायला जातांना मनात प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. त्या दिसायला, बोलायला कशा असतील? माझ्या मनातल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आज्जी तशा मनमोकळेपणाने बोलणाऱ्या असतील का? त्या मानसिक दृष्ट्या फिट असतील का? 

त्यांच्या रुमचे दार वाजवतांना मनातला उत्साह आणि उत्सुकता यांच्या मिश्रणाने हृदयाचे ठोके वाढले होते. आज्जी डबल रुममध्ये होत्या. त्यांच्यासोबत अजून एका नवीन आज्जींनी संस्थेत प्रवेश घेतलेला होता. रूममध्ये पाऊल टाकले, तर एक आज्जी बेडवर पडलेल्या तर दुसऱ्या आज्जी त्यांना पाठमोऱ्या अशा टेबलवर वर्तमानपत्र वाचत बसलेल्या दिसल्या. दोन्ही आज्जींना "हॅलो" म्हणून मी ज्यांना भेटायला आलेले होते, त्या तुमच्यातल्या कोणत्या, हे विचारल्यावर त्या बेडवर पडलेल्या आज्जी असल्याचे समजले. 

अमिताभ बच्चन सारख्या दिसणाऱ्या आजोबांच्या आज्जी निळसर हिरव्या रंगाची डोळ्यांची शेड आणि धारदार नाक असलेल्या आणि वहिदा रेहमान जाड झाल्यावर कशी दिसू शकेल, तशा दिसणाऱ्या होत्या. चेहऱ्यावरून दुःखी जाणवत होत्या. गेल्या गेल्या मी आज्जींची जनरल चौकशी करून आणि माझी ओळख करून दिल्यावर जराही वेळ न दवडता आजोबांची आणि माझी कशी ओळख झाली, ते त्यांना सांगितलं आणि तुम्हाला भेटून मला फार आनंद झालेला आहे, हे ही.. आजोबांचा उल्लेख ऐकून आज्जींच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. डोळ्यातल्या पाण्यासोबतच आज्जींनी मनातल्या दुःखाला शब्दांनी वाट दाखवायला सुरुवात केली...

आज्जी बोलायला लागल्या, "दीड वर्षांपूर्वीपर्यंत आमचा संसार अतिशय सुरळीतपणे सुरू होता, मात्र अचानकपणे एक दिवस- मध्यरात्री हे उठले आणि काहीतरी विचित्र बरळायला लागले. मग त्यानंतर त्यांचे विस्मरण अतिशय वेगात व्हायला लागले, ज्याचा मला आणि माझ्या दोन्ही मुलांना खूपच त्रास व्हायला लागला. तरीही मी त्यांना कशीबशी सांभाळत होतेच, पण एक दिवस मीच घरात अडखळून पडले आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. मग हे इथे संस्थेत दाखल झाले आणि मी हॉस्पिटलमध्ये. ट्रीटमेंट झाली, तरीही मला अजूनही चालता फिरता येत नाहीये, त्यामुळे आता मी सुद्धा इथे संस्थेत दाखल झालेय. आयुष्य किती क्षणभंगुर असतं आणि क्षणात कसं होत्याचं नव्हतं होतं, कसं आपलं सगळं जगच उलटं पालटं होतं ना? मला प्रचंड एकटं एकटं वाटतंय..." असं बरंच काही बोलून झाल्यावर आज्जी शांत झाल्या. आज्जींचा मूड बदलण्यासाठी मी आज्जींना आजोबांचा संस्थेत प्रवेश झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पांपासून तर मी कशी त्यांची बॅग लावली आणि त्यानंतर ते कसे सुटकेस शोधत फिरत होते, त्यांनी मला कशी ती छोटी रूम उघडून त्यात सुटकेस चेक करायला लावली, कसे ते अलार्म प्रोटेक्शन असलेले संस्थेचे दार अनेकदा उघडून जिने उतरत, अर्धवट कपडे घालून फिरत आणि  स्वतः चे सोडून इतर रहिवाश्यांपैकी कोणाचेही दार उघडून आत शिरत वगैरे किस्से हसत हसत सांगितले. त्याचा खरोखरच छान परिणाम होऊन वातावरण एकदम हसरे झाले आणि आज्जीही जोरजोरात हसायला लागल्या. 

मी मग आज्जींना विचारलं, तुम्हाला आजोबांना भेटायचं आहे का? तर त्या 'हो' म्हणाल्या. मग उद्या मी आजोबांना तुमच्याकडे भेटायला घेऊन येते असं आश्वासन देऊन मी त्यांच्या मुलांबद्दल विचारायला सुरुवात केली. आज्जी म्हणाल्या, मला दोन मुलं आहेत, पण त्यांच्याशी संस्थेत आल्यापासून काहीच बोलणे झालेले नाही. आज्जी हॉस्पिटलमधून डायरेक्ट संस्थेत दाखल झालेल्या असल्या तरी त्यावेळी आता क्वारंटाईन फ्लोअर रेग्युलर फ्लोअरमध्ये रूपांतरीत झालेला होता आणि ह्या आज्जी तिसऱ्या मजल्यावरील एका रुममध्ये होत्या. मुलांशी संपर्क का नाही झाला, हे विचारले असता, त्यांचाच मला अजून कॉल आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. तो वर्किंग डे असल्याने दुपारी मुलं भेटायला येऊ शकणार नाहीत, ती नंतर येतील, असे त्या म्हणाल्या. पण मला त्यांची फार आठवण येते आहे आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे,  पण त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, म्हणाल्या. 

मी त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्ट पर्सन ची माहिती सर्व्हरवर चेक करून कळवते, असं सांगून तिथून त्यांच्या मुलांचे नंबर मिळवून आज्जींना आणून दिले. मग प्रत्येक रहिवाश्याच्या बेडशेजारी असतो, तसा आज्जींच्या बेडशेजारी असलेल्या साईड टेबलवरील संस्थेचा लँडलाईन फोन आज्जींना त्याचे नॉमिनल मंथली चार्जेस सांगून आणि ते मान्य असल्याचे त्यांनी सांगितल्यावर आज्जींच्या परवानगीने ऍडमिन दादांकडून ऍक्टिवेट करून घेऊन त्यांच्या दोन्ही मुलांना एका नंतर एक कॉल करून आज्जींना बोलायला दिले.  मुलांशी थोडावेळ बोलल्यानंतर आज्जी एकदम रिलॅक्स झाल्याचे जाणवले. आज संध्याकाळी दोघंही भेटायला येणार आहेत, अशी माहिती मला दिल्यावर आज्जी,
"आता मला जरा बरं वाटतं आहे, खूप खूप धन्यवाद", असं म्हणाल्या. 

त्यानंतर आज्जींच्या शिक्षणाविषयी आणि नोकरीविषयी विचारले असता त्या जर्मन साहित्याच्या प्राध्यापिका होत्या, असे समजले. त्यांनी नाटकांमध्येही कामं केली असून त्यांनी Oskar Wildeच्या एका नाटकातील Lady Augusta Bracknell नावाचे पात्र साकारले होते आणि त्यात त्यांच्यासोबत त्यांच्या एका मुलानेही भाग घेतला होता, हे सांगतांना त्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेल्या..

मग त्या आजोबांविषयी भरभरून बोलायला लागल्या. आजोबांचे नाव घेऊन हा अतिशय उमदा माणूस होता, असे सांगायला लागल्या. कितीतरी मुलांना त्यांनी शिक्षणात आणि एकूणच खूप मदत केलेली आहे. स्वतःच्या दोन्ही मुलांसोबतही ते खूप फुटबॉल खेळलेले आहेत, म्हणाल्या.  मग परत नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

मी आज्जींसोबत बराच वेळ बसलेले असल्याने त्यांना आता निरोप देऊन निघतांना इतकावेळ पाठमोऱ्या बसलेल्या त्या दुसऱ्या आज्जींची चौकशी करून त्यांच्याशी दोन शब्द बोलून मी निघाले.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दुपारी आजोबा आणि आज्जींची भेट घडवून देण्याच्या उत्साहात त्या फ्लोअरवरच्या नर्सेसना माहिती दिली की आता मी आता आजोबांना घेऊन येणार आहे, त्या म्हणाल्या, की आज्जींनी त्यांना सांगितले होते, की मला त्यांना भेटायचे नाहीये. मला त्यांना पाहिलं, तर त्रास होईल. मी त्यांना सांगितले, की आज्जी मला हे असं काहीच बोलल्या नाहीत. उलट उत्साहात त्यांनी मला त्या गोष्टीसाठी होकार दिलेला आहे. वाटल्यास आता आपण परत त्या गोष्टीची खात्री करून घेऊया. आज्जींचा मूड बदलला असल्यास मी आजोबांना आणणे कॅन्सल करून टाकेन.

मग आज्जींच्या रूममध्ये जाऊन त्यांना नर्सने दिलेली माहिती देऊन विचारले, तर त्या म्हणाल्या, नर्स म्हणते, ते खरं आहे. मी आधी असाच विचार करत होते, पण काल आपण त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर मला त्यांना आता भेटावंसं वाटतं आहे. आज्जी आज एकदम फ्रेश दिसत होत्या. त्यांच्याजवळ आज एक बेसिक मॉडेलचा मोबाईलफोनही दिसत होता. आदल्या दिवशी मुलं भेटून गेली, तेंव्हा त्यांनी आणून दिला असावा.

मग मी आजोबांच्या फ्लोअरवर- तळमजल्यावर गेले. आजोबा 'टागेसराऊम' (शब्दशः अर्थ 'डे रूम')मध्ये म्हणजेच डायनिंग हॉलमध्ये खुर्चीवर डोळे मिटून बसलेले होते. आजोबांना हाक मारली, तर ते काही उठले नाहीत. त्यांना अतिशयच गाढ झोप लागलेली होती. आता काय करावं? त्यांना नंतर येऊन घेऊन जावं का? असा विचार करून मी जाणार, तेवढ्यात मला एक ऑक्क्यूपेशनल थेरपिस्ट दिसला. त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, आजोबांना त्यांच्या मेडीसीन्समुळे झोप लागलेली आहे. लंचनंतर दुपारी रोज ते असेच पेंगलेले असतात. त्यांना आपण व्हीलचेअरवर बसवू आणि तिकडे आज्जींच्या रूममध्ये बसू देऊ. नंतर त्यांची झोप झाली की ते उठतीलच कॉफीब्रेकपर्यंत. मग आजोबांसाठी संस्थेतली व्हीलचेअर आणून त्यांना उठा एक मिनिट आणि इकडे बसा असे तीन चार वेळा सांगून झाल्यावर एकदाचे ते उठले आणि आमच्या मदतीने खुर्चीवर बसले. मग मी त्यांना लिफ्टने आज्जींकडे घेऊन गेले.

आजोबांना बघून आज्जी पुन्हा रडायला लागल्या. औषधांचा परिणाम म्हणून ते झोपले आहेत, हे आज्जींना सांगितलं. त्यांनीही समजून घेतलं. मग जरावेळ आम्हीच पुन्हा गप्पा मारत बसलो. जरावेळाने कॉफीब्रेक झाला. तेंव्हा नर्स ह्या दोन्ही आज्यांसाठी कॉफी आणि केक घेऊन आली, तिला आजोबांसाठीसुद्धा कॉफी आणि केक आणायला सांगून माझ्यासाठीही एक कप कॉफी आणायला सांगितली. मी खरं म्हणजे एम्प्लॉयीजसाठी वेगळ्या ठेवलेल्या थर्मासमधून कॉफी घेत असते, पण मला आजोबांना एकटं सोडणं शक्य नसल्याने मी त्या दिवशी तिथेच कॉफी घेतली. आजोबा मग कॉफी ब्रेकला उठवल्यावर उठले. बहुतेक औषधांचा इफेक्ट कमी झाला असणार. आज्जींना ओळखलंत का, विचारल्यावर "हो" म्हणाले, पण कोण ते त्यांना काही सांगता येईना. आज्जींनीही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हात धरून बसल्या. पण आजोबा काही बोलतच नव्हते. मग त्यांना कॉफी आणि केक खायला दिल्यावर, तो त्यांनी व्यवस्थित खाल्ला. आज्जी म्हणाल्या, मला मुलांना फोन लावून दे. फोन लावल्यावर स्वतः बोलून झाल्यावर आज्जींनी फोनवर बोलत असलेल्या मुलाचे नाव सांगून आजोबांना फोन दिला, तर आजोबाही मुलाचं नाव घेऊन थोडंसं बोलले. मग फोन ठेवून तसेच शांत बसून राहिले. आज्जी काहीतरी गप्पा मारायचा प्रयत्न करत होत्या, पण आजोबा काही रिस्पॉन्स देत नव्हते. आज्जींना पुन्हा रडू यायला लागलं.

मग मी आजोबांना परत घेऊन जाऊ का?, असं विचारलं असता आज्जी लगेच "हो" म्हणाल्या. आजोबांना परत न्यायला लागले, तर ते मात्र विरोध करायला लागले. "मला इथेच थांबायचं आहे घरात", असं म्हणायला लागले. मग नंतर आपण परत घरी येऊ, आता फिरायला जाऊ, असे सांगून मी आज्जींना विचारून आजोबांसोबतचा हातात हात घेतलेला एक फोटो काढून दिला. ज्यात आज्जी सुरुवातीला रडत होत्या, मग हसून पोझ दिली त्यांनी. त्याची प्रिंट आऊट काढून माझ्याकडून नंतर गिफ्ट देण्याचे ठरवले. जी मी त्यांना पुढच्या आठवड्यात देणार आहे. बाकीही काही आज्जी आजोबांसोबत असेच स्पेशल क्षण मी कॅमेऱ्यात बंद केले आहेत. त्यापैकी एका जोडप्याला मी एक फोटो दिलाय. त्यांची गोष्ट नंतर कधीतरी..

आजच्या आज्जींची गोष्ट मोठी आहे. ती अजूनही संपलेली नाही. ती पुढच्या भागात सांगेन. बायदवे, आज माझा जॉब सुरू होऊन बरोबर सहा महिने पूर्ण झाले, हे तारीख लिहितांना आठवले.

~सकीना वागदरीकर जयचंदर
१०.०९.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ३९

डॉक्टरेट आजोबा आणि जर्मन लिटरेचरच्या लेक्चरर आज्जींची भलीमोठी गोष्ट आता कन्टीन्यू करते.

आजोबा भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत या आज्जींना भेटले. त्या चांगल्या मूडमध्येच होत्या. त्या दिवशी आज्जींच्या हातात एक जर्मन पुस्तक होते. मला बघून अतिशय गोड हसून त्या म्हणाल्या, "तुमचे खूप खूप आभार! आता मला अजिबात एकटं आणि ऑड वाटत नाहीये." मग हातातलं पुस्तक दाखवत म्हणाल्या, "हे माझ्या बहिणीने मला पाठवलं आहे. ती दुसऱ्या गावी राहते. माझ्या वाचनाच्या आवडीबाबत तिला कल्पना आहे. आता माझ्याजवळ वेळच वेळ असल्याने तिने माझ्यासाठी हे पुस्तक आणि सोबत पत्रही पाठवलं आहे..."

त्यानंतर मग आज्जींनी माझ्याशी थोडावेळ गप्पा मारल्या, ज्यात त्या दुसऱ्या आज्जीही अधूनमधून सहभागी होत होत्या, मात्र त्यांनी एकदाही त्यांच्या व्हीलचेअरची दिशा आमच्याकडे वळवली नाही. आपले आपले वाचन त्या करत राहिल्या.

त्यानंतर साधारणपणे एक आठवडा मी ह्या दोन्ही आज्जींना भेटायला गेले नव्हते. याचे कारण म्हणजे मी ऑलरेडी त्यांना पुरेसा वेळ देऊन झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आता पुरत्या सावरलेल्या होत्या. त्यामुळे आता इतरही आज्जी आजोबांना भेटून त्यांना वेळ द्यायला हवा, हा विचार करून मी त्यांना नंतर कधीतरी भेटायचे ठरवले.

त्यानंतर एक दिवस सर्व कर्मचाऱ्यांना माहितीसाठी म्हणून येते, तशी एक कॉमन इमेल आली की ह्या आज्जींना दोन दिवसांनी सगळ्यात वरच्या मजल्यावर सिंगलरूममध्ये हलवले जाणार आहे. डबल रूम ही त्यांची तात्पुरती सोय होती. सिंगल रूम उपलब्ध झाल्यावर लगेच त्यांना तिकडे शिफ्ट केले जाणार, असे आधीच ठरलेले होते, मात्र हे मला आधी माहिती नव्हते.

मग त्या दिवशी मी त्यांना भेटायला गेले. नेहमीप्रमाणेच ह्या आज्जी अजूनही बेड रिडन तर दुसऱ्या आज्जी त्यांना पाठमोऱ्या अशा खुर्चीवर आणि पेपर वाचत बसलेल्या, हे जणू आपण एखादं दृश्य फोटो काढून फ्रीज करून ठेवतो, तसंच दिसत होतं. कदाचित मी त्यांना भेटायला जाते ती वेळ योगायोगाने त्यांच्या ह्या अशा ऍक्टिवीटीजचीच असावी, असं मला वाटलं.

भेटल्यावर त्यांच्या रूम शिफ्टिंगविषयी कळल्याचे सांगितल्यावर आज्जी हसून "हो" म्हणाल्या आणि त्या दुसऱ्या पाठमोऱ्या आज्जी मात्र, "हो ना गं, आता ही जाईल सिंगल रूममध्ये. मी इथे आता एकटीच राहणार. आम्ही दोघी किती छान गप्पा मारायचो. आता मला फार बोअर होईल." म्हणाल्या. माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं. ह्या दोन्ही आज्जी एकमेकांशी संवाद साधतांना मला या आधी दिसल्याच नव्हत्या.

मग मी त्या दुसऱ्या आज्जींना म्हणाले, "मला समजू शकतं, तुम्हाला कसं वाटतंय ते.. पण काळजी करू नका. आपण त्यांना भेटायला त्यांच्या रूममध्ये जात जाऊ. मी घेऊन जाईन तुम्हाला आणि त्या बऱ्या झाल्या, चालायला, फिरायला लागल्या, की त्यांनाही आणेन, त्या स्वतःहून येऊ शकेपर्यंत.. " शिवाय त्यांच्या बेडला लागून असलेले त लँडलाईन फोन इंटरकॉम फॅसिलिटी असलेले असून त्या दोघी एकमेकींशी गप्पा मारू शकतील, ही माहिती त्यांनी पुरवल्यावर त्यांना फार आनंद झाला.

त्यानंतर आज्जी सिंगल रूममध्ये चौथ्या मजल्यावर शिफ्ट झाल्याची इमेल आल्यावर मी त्यांना भेटायला गेले. त्यांच्या रूममध्ये गेले, तर मला एकदम साक्षात्कार झाल्यासारखे आठवले, अरे! ही तर एकेकाळी आजोबा जिथे क्वारंटाईन काळात चौदा दिवस राहिलेत, तीच रूम! आज्जींनाही ही माहिती पुरवल्यावर खूप आनंद झाला. काय एकेक योगायोग असतात ना? ह्या आज्जी आपल्या सिंगल रूममध्ये एकदम आनंदात दिसल्या. शिवाय ही रूम सगळ्यात वरच्या फ्लोअरवर असल्याने तिथे छताला असलेल्या दोन मोठ्या खिडक्यांमधून सुंदर, ब्राईट असा सूर्यप्रकाश येत होता. शिवाय समोरच्या खिडकीतून तिसऱ्या मजल्यावरून दिसत होता, तो जवळपास सेमच view इथूनही दिसत होता, कारण त्या सेमच दिशेच्या फक्त थोड्या अलीकडच्या मात्र एक मजला वरच्या रूममध्ये त्या आज्जी होत्या.

मग मी ह्या आज्जींशी जरावेळ बोलून त्यांच्या आधीच्या रुममेट असलेल्या आज्जींना त्या दिवशी पहिल्यांदा खास भेटायला गेले. त्या आज्जी नेहमीप्रमाणेच खुर्चीवर बसून टेबलवर पेपर ठेवून वाचत बसलेल्या होत्या. कसं काय वाटतंय, अशी चौकशी केल्यावर आज्जींनी मला रूममेट आज्जींशिवाय बोअर होतंय, पण आता मला हवं तेंव्हा आणि तेवढा वेळ कोणालाही डिस्टर्ब न करता टीव्ही बघता येईल, रेडिओ ऐकता येईल, शिवाय एकाकडे व्हिजिटर्स आले तर दुसऱ्याला उगाच झोपमोड वगैरेचा त्रास आता होणार नाही, अशी त्यातले वेगवेगळे पॉझिटिव्ह अँगल्स शोधून स्वतःच्याच मनाची समजूत करून घेऊ लागल्या.

ह्या आज्जीही गप्पा मारायला अतिशय इंटरेस्टिंग असल्याचं मला त्या दिवशी समजलं. इन्श्युरन्स कंपनीत ४० वर्षे नोकरी केलेल्या, ज्यांचा नवरा कस्टममध्ये जॉबला होता आणि आता जाऊन १० वर्षे झालेली असल्याने दुःखाचा डोंगर पचवला असलेल्या, स्वतःला एक हार्ट ऍटॅक येऊन गेलेल्या, दोन मुलं आणि एक मुलगी असलेल्या, जे तिघंही सरकारी नोकरीत सेटल्ड आहेत, त्यांना नातवंडंही आहेत, अशा या आज्जींना नियमितपणे मुलं, नातवंडं भेटायला येतात, फिरायला घेऊन जातात.

मी मागे ज्यांना मी भेटायला जाते, अशा आज्जी आजोबांची कॅटेगरी तयार केलेली होती, त्यात मला स्वतःला ज्या आज्जी आजोबांना भेटायची इच्छा होते, स्वतःलाच पॉझिटिव्हीटी मिळावी, यासाठी, त्या कॅटेगरीत ह्या नवीन आज्जी अचानकपणे जाऊन बसल्या. दिवसभर शांतपणे खुर्चीत बसून वाचन, सोबत रेडिओवरची गाणी आणि बातम्या आणि रात्री थोडावेळ टीव्ही बघत झोपणं, असा त्यांचा दिनक्रम असतो. त्यांना काहीश्या आजारामुळे स्वतःहून व्हीलचेअरवरून मदतीशिवाय हलताही येत नाही, एक हात सातत्याने दुखत असतो, पण काहीही तक्रार नाही की चिडचिड नाही.

त्यांना मी अधूनमधून त्यांच्या रूममेट आज्जींना भेटायला घेऊन जात असते. फक्त १५ मिनिटं जाऊयात बरंका, असं सांगून प्रत्यक्षात मात्र गप्पा मारत बसल्या आणि मी त्यांना तिकडे सोडून १५ मिनिटांनी घ्यायला गेले की एकमेकींना बाय बाय करून झाल्यावर परत थोडं थोडं बोलत पुढचे १० मिनिटं त्यांना रेंगाळतांना पाहतांना मला खूप मजा वाटते.

तर बॅक टु आपल्या इंग्लिश लिटरेचर वाल्या आज्जी. ह्या आज्जींशी इतके सुंदर सूर जुळलेत की त्यांच्यासोबतच्या गप्पा संपता संपत नाहीत. त्यांच्या लहानपणापासून तर लग्न, मुलं अशी संपूर्ण जीवनकथा त्या मला तुकड्या तुकड्याने सांगत असतात.

एकदा आज्जींनी सांगितलं, त्यांचं जीवन एका खेडेगावात गेलं. त्यांचे आजोबा शेतकरी होते. त्यांचं फार्मही होतं. त्यात वेगवेगळे प्राणी असत. वर्षातून एकदा सगळ्या मित्रमंडळींना त्यांच्या फार्ममधील प्राण्यांची फीस्ट दिली जात असे.

प्रचंड बर्फ पडण्याच्या दिवसात आजोबा घोड्याला जोडलेल्या स्लेमध्ये ७/८ जणांना एकावेळी बसवून गावभर फिरवून आणत, त्यात आज्जी आणि त्यांच्या २ बहिणीही असत. फार मजा यायची त्यात बसून फिरायला जायला..

एकदा त्यांच्या बहिणीची बाहुली हरवली. बहीण फारच अस्वस्थ झाली. आजोबा जरावेळाने येतो, म्हणून बाहेर गेले आणि अर्ध्या तासात परत आले, तर सोबत एक सुंदर बाहुली होती, जी त्यांनी कुठून मिळवली, हे सर्वांना कोडंच होतं म्हणे. कारण ते एका रिमोट व्हिलेजमध्ये राहत होते आणि जवळपास अशी दुकानं कुठेच नव्हती की अर्ध्या तासात जाऊन परत येता येईल.. आपले आजोबा जादूगार तर नाहीत? अशी त्यांना तेंव्हा शंका आलेली होती. बहीण अर्थातच अतिशय खुश झाली होती.

अशी आपल्या आजोबांची आठवण सांगतां सांगता आज्जी आपल्या आज्जीचीही आठवण सांगायला लागल्या. "माझी आज्जी गरमागरम असा काही सुंदर केक बेक करायची, त्या केकचा दरवळ अजून नाकात आणि त्या केकची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे..."

महायुद्धपूर्वीच्या काळात आपल्याकडे आहे तसंच कल्चर इकडेही होतं, असं इतरही काही आज्जींप्रमाणे यांनीही मला सांगितलं. तेंव्हा सगळं कुटुंब एकत्र राहत आहे. आज्जी आजोबा, आई वडील, नातवंडं, पतवंडं अशा सर्व पिढ्या. नंतर गोष्टी कशा बदलत गेल्या, ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही.

आपले डिमेन्शिया झालेल्या आजोबांमध्ये आणि आज्जींमध्ये एक साम्यस्थळ म्हणजे त्या दोघांचेही वडील दुसऱ्या महायुद्धात सहभागी होते. आज्जींचे वडील जखमी होऊन परत आले, मात्र आजोबांचे वडील तितके लकी नसल्याने ते युद्धाचे बळी ठरले. त्यामुळे ह्या आजोबांना भावंडं नाही... हे सांगतांना आज्जींच्या डोळ्यात पाणी आलं होतं.. "हा इव्हिल हिटलर.. याने आमचं आयुष्य नासवलं", म्हणाल्या..

भारताची लोकसंख्या किती जास्त आहे, त्या मानाने जर्मनीची लोकसंख्या किती कमी आहे, त्यामुळे आयुष्य सुटसुटीत आहे, असा एकदा आमचा विषय निघाला, तेंव्हा आज्जींना मी विचारलं होतं, जर्मनीने हे कसं काय साधलं असावं, असं तुम्हाला वाटतं, त्यावर , "साधलं कुठलं? या  महायुद्धाने आमची माणसंच इतकी मारली की आपोआपच लोकसंख्या कमी झाली. कितीतरी बायकांना या युद्धाने विधवा बनवलं", म्हणाल्या.

मागच्या आठवड्यात आज्जींना मी त्यांचा आजोबांसोबत काढलेला फोटो देणार आहे, हे लिहिलं होतं, त्याप्रमाणे सोमवारी तो फोटो त्यांना दिला, तेंव्हा आज्जींना पुन्हा एकदा गहिवरुन आलं.. त्यांच्या डोळ्यातूनच घळाघळा पाणी वाहू लागलं. मला अनेकवेळा धन्यवाद देत आज्जी फोटोकडे एकटक पाहत राहिल्या.

आज्जींचा मूड बदलायला मी त्यांना त्यांची लव्हस्टोरी सांगायला सुचवलं, तर आज्जी एकदम उत्साहात सांगू लागल्या... १९५८ साली फुटबॉल टुर्नामेंटसाठी त्यांच्या गावी प्लेयर्सची टीम आलेली होती. त्यांची टांटं म्हणजे इंग्लिशमध्ये आंट.. मराठीतली आत्या (किंवा मावशी) त्या फुटबॉल सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळात होती. त्या मंडळाचे आपापसात ठरले होते, की मॅचेस संपल्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी एकेका प्लेयरला जेवायला घेऊन जायचे आणि आत्याच्या घरी हे एकेकाळी तरुण असलेले आजोबा आले. आज्जींच्या आत्याने आज्जी आणि बाकीच्या नातेवाईकांनाही तेंव्हा घरी बोलावलेलं होतं. आजोबांना बघून आज्जी किचनमध्ये जाऊन आत्याला म्हणाल्या, "हे कोण येडं घरी जेवायला बोलावलं आहेस?" आणि मग पुढची गोष्ट सांगतांना आज्जी जोरजोरात हसायला लागल्या. म्हणाल्या, " आणि जेवण करता करता गप्पा मारतांना मी संध्याकाळपर्यंत त्या येड्याच्या प्रेमातच पडले.." रात्री आत्याकडे म्युझिक लावून आम्ही डान्स सुरू केला, तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरूच होता..तो दिवस इतका सुंदर होता की मी तो कधीच विसरू शकणार नाही..."

मग मॅचेस संपल्यावर आजोबा हॅनोवरला परत आले आणि आज्जी आपल्या गावीच राहिल्या. पण दोघेही संपर्कात होते. मात्र आज्जी तेंव्हा शिकत होत्या आणि आजोबा डॉक्टरल थेसिस लिहीत होते. दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याने ह्याला काही भविष्य नाही, असा विचार करून ही लॉंग डिस्टन्स लव्हस्टोरी हळूहळू मावळत गेली आणि थांबली.

त्यानंतर तीन वर्षे त्यांचा एकमेकांशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. मग आज्जी शिक्षण संपवून कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागल्यावर एक दिवस त्यांना अचानक आठवण आली, की त्याचा लवकरच वाढदिवस असतो. मग त्या दिवशी त्यांनी फोन केल्यावर कळले, आजोबाही डॉक्टरेट झाले असून प्रॅक्टिस करत आहेत, मग त्यांची लव्हस्टोरी परत सुरू झाली. लग्न मात्र त्यांनी १९६७ साली, म्हणजेच पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंत एकूण नऊ वर्षांनी केलं.

"लग्न उशीरा झालेलं असलं तरी (किंबहुना त्यामुळेच) आम्हाला मुल लगेच हवं होतं, मात्र आमचं पहिलं मूल लग्नानंतर ६ वर्षांनी झालं. माझी बहिण माझ्याहून छोटी होती, तिने लग्नही माझ्यानंतर केलं, मात्र तिला माझ्याआधी मूल झाल्याने तर मला अजूनच त्रास झाला", हे त्यांनी सांगितल्यावर, मी मध्येच त्यांना तोडून म्हणाले, "ह्या बाबतीत तर आपलं सारखंच आहे की! माझ्याही छोट्या बहिणीचं माझ्यानंतर लग्न होऊन माझ्या आधी तिला नुसतं बाळंच नाही, तर जुळी मुलं झाली! निसर्गदेवता चेष्टाच करते ना आपली काहीवेळा.."  यावर त्या मनापासून दाद देत हसल्या.

पहिल्या मुलानंतर मात्र लवकरच त्यांना दुसराही मुलगा झाला. आता दोघंही नोकरीत छान सेटल्ड आहेत.

मुलांवरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे, आज्जी एकदा म्हणाल्या, "आज मला माझा जावई भेटायला आला होता. बराच वेळ बसला होता माझ्याशी गप्पा मारत. चांगला मुलगा आहे.." तेंव्हा मी गोंधळात पडून आज्जींना विचारलं होतं, "तुम्हाला तर दोन मुलं आहेत ना?" त्यावर त्या शांतपणे म्हणाल्या होत्या, "हो, माझा एक मुलगा गे आहे." मग मी त्यांना विचारलं होतं, "तुम्ही ही गोष्ट पटकन पचवलीत का?" त्यावर, "हो हो, त्यात काय? प्रेम म्हणजे प्रेम असतं, सर्वांचंच सेम असतं.." असं पटकन आणि सहजतेने म्हणाल्या होत्या. मग त्यांनी सांगितलं, "तुला काय सांगू? यांच्या लग्नात केवढी मजा आली होती.. त्या दोघांनीही लग्नानंतर छान डान्स केला होता. सर्व नातेवाईक आले होते लग्नाला.." मग म्हणाल्या, "माझ्या मोठ्या मुलाचं आणि सुनेचं मात्र एकत्र राहूनही विशेष पटत नाही. पण गे मुलाचा मात्र संसार अगदी सुरळीत सुरू आहे. दोघंही स्टेबल जॉब करत आहेत आणि एकदम compatible आहेत एकमेकांना.."

अशा ह्या आज्जींसोबत  इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होत असतात आणि दरवेळी मला नवीनच काहीतरी खजिना सापडल्यासारखं समजत असतं, उमगत असतं की मला वाटतं तिथेच गप्पा मारत थांबून राहावं आणि बाकी फ्लोअर्सवर आपले क्लोन्स बनवून  माझ्या जॉबसाठी पाठवावेत.. अर्थातच हे मला अजूनही बऱ्याच आज्जी आजोबांबाबतीत वाटत असतं. 'रात्र थोडी आणि सोंगं फार',  याचा सकारात्मक अनुभव देणारा हा माझा जॉब मला दिवसेंदिवस जास्तच आवडत चाललेला आहे...

~सकीना वागदरीकर जयचंदर
१५.०९.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४०

माझ्या डायरीला आज एक वर्ष पूर्ण झालं पण! दिवस फारच पटापट पुढे सरकत आहेत.. जॉब सुरू होऊन मागच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं, तेंव्हाही असंच आश्चर्ययुक्त सुखद फिलिंग होतं. त्या दिवशी बॉस भेटल्या आणि त्यांनाही सांगितलं, की मला आज (११ मार्चला) इथे १ वर्ष पूर्ण झालं. त्यांनी 'हो ना गं! खरंच!' असं म्हणून मला (FFP2 मास्क दोघींनी लावलेला होता.) एकदम मिठीच मारली..

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जातांना सगळ्या डिपार्टमेंट्ससाठी चॉकलेट्स घेऊन गेले आणि सर्वांना (जर्मन भाषेत) एक कॉमन इमेल लिहिली,

"डियर फ्रेंड्स अँड कलिग्ज, बघता बघता माझा जॉब सुरू झाला, त्याला एक वर्ष झालं पण! मला अजूनही तो दिवस आठवतो आहे, ज्या दिवशी माझी नोकरी पक्की झाली आणि मी कामाला सुरुवात केली.

मला मनातून भीती वाटत होती की मला हे काम जमेल का? सगळे मला accept करतील का? पण तुम्ही सर्वांनी मला प्रेमाने फक्त स्वीकारलंच नाही, तर माझ्या सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरं दिली.

तुमच्यामुळेच मला ही नोकरी म्हणजे माझं दुसरं घरच वाटतं. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.

मी सोबत सर्व डिपार्टमेंट्स साठी चॉकलेट्स आणली आहेत, ती घेऊन मी लवकरच येते आहे. भेटूया लवकरच..

तुमची,
एम एफ जी( जर्मनमधल्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा)
सकीना वागदरीकर
सायको-सोशल कन्सल्टंट (रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट)
(कंपनीचे नाव आणि पत्ता)'

माझ्या इमेलनंतर मी लगेच चॉकलेट्स घेऊन सर्व डिपार्टमेंट्सला गेले. सर्वांसोबत गप्पा, गोड आठवणींना उजाळा दिला. दिवस फार भारावलेला गेला..

माझे डायरी लेखन मागे पडले आहे, याचे वाईट वाटते. खूप जण अधूनमधून डायरीची आठवण करून देतात. मी ही हो म्हणते, पण लिहिले जात नाहीये.

ह्या मेमरीच्या निमित्ताने आज लिहिले. कामाच्या ठिकाणी खूप काही रोज घडते आहे. अगदी नाट्यमय प्रसंगही घडत आहेत.

लवकरच लिहिण्याचा प्रयत्न करते. डायरीवर प्रेम केल्याबद्दल आणि लिहिण्याची प्रेरणा दिल्याबद्दल सर्व वाचकांचे खूप खूप आभार.

भेटूया लवकरच..

तुमची सकीना
एम एफ जी
६ एप्रिल २०२१

डायरी: भाग १: परत वाचण्यासाठी लिंक

https://sakhi-sajani.blogspot.com/2020/04/blog-post.html

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४१

डायरी लिहायला सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झालं, ह्यावर ६ एप्रिलला पोस्ट लिहिली आणि त्या वेळेपासूनच मन डायरी लेखनाकडे ओढ घेऊ लागलं होतंच आणि कालच अशा काही अजब, सुखद धक्के देणाऱ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ज्या सांगितल्यावर बहीण म्हणाली, "ताई प्लिज, लगेच हे लिहून काढ ना गं!" आईनेही त्याला दुजोरा दिला. मग आता हातातली सगळी कामं बाजूला ठेवून लिहायला सुरुवात केली.

खरं म्हणजे लेकाला केजीत सोडून परतीच्या ट्रॅमच्या प्रवासात लिहायला सुरुवात केली. आज मी घरी आहे. ५ दिवसांचे वर्किंग अवर्स ४ दिवसात संपवून १ दिवस घर आवरणे, कपडे २/३ राऊंडसमध्ये (मशिनमध्ये) धुवून (ड्रायरमध्ये) वाळवून, घड्या घालून जागच्या जागी ठेवून देऊन, स्वयंपाक करून, केजीतून दमून भागून, भुकेजून घरी आलेल्या लेकाची काळजी घेणे, त्याने दप्तर फेकताक्षणी सुरू केलेल्या गोड बडबडीला नीट प्रतिसाद देणे- जिच्यात दिवसभराचा आढावा असतो, काय काय खेळले, शिकले, खाल्ले, शी केली की नाही, या सगळ्या डिटेल्समध्ये मी गढून जाते. थोडक्यात त्याला एंटरटेन करत करत स्वतः एंटरटेन्ड होणे, हे माझे आजचे अत्यंत आवडते रुटीन असते. ह्या दिवशी मला माझे पूर्णवेळ होममेकर असतांनाचे सुंदर जुने दिवस अनुभवता येतात.

तर या रुटीनमधला सकाळच्या कामाचा रुक्ष भाग, जो मी कधी विविध भारतीचे रेडिओ स्टेशन ऐकत ऐकत, तर कधी पुणे एफ एम लावून, कधी हंगामा-एव्हरग्रीन बॉलिवूड ऐकत थोडा सुखावह करत असते, ते माझे रुटीन डिस्टर्ब करून लिहिण्याच्या आलेल्या जबरदस्त उर्मीला न थोपवता लिहायला लागलेले आहे.

नमनाला घडाभर तेल ओतून झालेले आहे. तर आता सुरुवात करते फायनली.

परवाचा स्ट्रेसफूल तरीही नोंदवायला हवा, असा दिवस आणि कालचा अनपेक्षित सुखद दिवस, असा मोठा भाग आज लिहिते आहे.

मोठ्या गॅपनंतर लिहायला लागलेले आहे, तर एक बदलही करते आहे. मागे मला काही जणांनी ह्या आज्जी आजोबांना काल्पनिक नावं देण्याचे सुचवले होते, जे मी लिखाणाचा फ्लो जातो, म्हणून केले नव्हते. तर मला अचानकपणे सुचले की काल्पनिक नावांना चांगला पर्याय असेल, आज्जी आजोबांच्या नावांची इनिशीयल्स. ह्याने मलाही कोणाविषयी लिहितेय, त्याची लिंक लागेल आणि वाचकांनाही समजायला सोपे होईल. ही इनिशियल्स नाव- आडनाव, अशी न घेता रँडम असणार आहेत, ज्यामुळे मला ती व्यक्ती आठवणे सोपे जाईल. उदा. गार्ब्ज आडनाव असल्यास जी आर आणि हामर आडनाव असेल तर एच आर, किंवा एच एम अशा कोणत्याही ऑर्डरने. (ह्या दोन्ही आडनावांचे कोणीही आज्जी आजोबा संस्थेत अजूनतरी नसल्याने ही आडनावे निवडली.)

तर, सुरुवात स्ट्रेसफूल आणि शेवट सुखद अनुभवाने, जसे घडले, तसे आणि त्याच ऑर्डरने लिहायचा प्रयत्न करते.

माझ्या कामाचे स्वरूप सतत इव्हॉल्व्ह होत असते. रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असतांना संस्थेत राहणाऱ्या बहुतेक रहिवाश्यांसाठी हे शेवटचे घरकुल असल्याने त्यांच्या मनातली उदासी, निराशा, जवळच्यांच्या मृत्यूचे दुःख, स्वतःच्या मृत्यूचे भय, जवळ आणि दूर राहणाऱ्या नातेवाईकांची येणारी आठवण, राहते घर विकून केअर होममध्ये राहावे लागले, या निर्णयाचे अतीव दुःख, आजार, अपंगत्व, यातून आलेले परावलंबीत्व अशा अनंत पैलूंमुळे त्रासलेल्या आज्जी आजोबांना आनंदी करण्यासाठी मला जमेल ते करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि तू हेच का केलं आणि ते का नाही? असं कर, तसं करू नकोस, इतक्याच लोकांना भेट, ह्याच लोकांना भेट, टार्गेट सेट कर आणि ते दिवसाला, आठवड्याला पूर्ण कर, त्याचं मला रिपोर्टिंग कर, असं कोणतंही प्रेशर माझ्या बॉस मला देत नसल्याने मी माझ्या मनाप्रमाणे काम करू शकते.

शिवाय माझ्या ह्या मेन बॉसना कायम माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला पुरेसा वेळ नसतो, तर त्यांनी माझ्यासाठी आमची एच आर हेड माझी इमिडीएट बॉस म्हणून नेमलेली आहे.  ती सकाळी मला चार पैकी कोणत्या मजल्यावर आज केअर गिव्हर्सची कमतरता आहे, हे सांगून मला त्या त्या फ्लोअरवर ड्यूटी लावत असते. कधी कधी सगळीकडेच कमतरता असल्याने मी चारही फ्लोअर्सचा दिवसभरात धावता आढावा घेते, तर कधी सकाळी एक मजला आणि दुपारी दुसरा तर कधी एकच मजला दिवसभर, असे करते. एकच मजला दिवसभर मिळाला की मला सर्वांना भेटणे आणि निवांत बोलणे शक्य होते म्हणून मला आनंद होतो तर ज्या दिवशी सर्व मजले फिरावे लागते, त्यादिवशी सर्वांची ओझरती का होईना, भेट होण्यामुळे मला आनंद होतो. थोडक्यात, आवडते काम असल्याने कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये मी खूशच असते. तर ही कॉम्बिनेशन्स मला नेमून देणारी माझी दुसरी बॉस माझ्या अनंत प्रश्नांना उत्तरं द्यायला कायम उपलब्ध असते. नसली, तरी मला ती उपलब्ध झाल्या झाल्या कॉल करून काय ते विचारते.

हो! मला रोज प्रश्न पडतात, खूप प्रश्न पडतात. आलेल्या प्रसंगाला कसे डील करावे, हे समजत नाही, कोणाकडे जावे, हे कळत नाही. मग ही आमची एच आर ची बॉस मला मार्ग दाखवते.

तिच्याशी मी कलिग्जसोबत झालेले वादही मोकळेपणाने शेअर करू शकते आणि आज्जी आजोबांच्या बाबतीत घडलेले नाजूक विषयांवरचे प्रॉब्लेम्स कोणत्याही आडपडद्याशिवाय डिस्कस करू शकते. तिच्याकडून मला अफाट सुंदर सोल्युशन्स मिळतात, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे धडे मिळतात.

डायरीच्या आधीच्या भागांमध्ये मी तिच्याविषयी काही लिहिलं नव्हतं कारण तेंव्हा माझ्या मनात तिच्याविषयी काही अनुभवांमुळे नकारात्मकता होती. जी मी तिच्याशीच बोलून क्लियर करून घेतल्यामुळे आमच्यातील मळभ आता दूर झालेले आहे. आमच्यात नक्की काय वाजले होते, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच, तर त्यातले एक, दोन फारसे पर्सनल नसल्याने उदाहरणार्थ सांगायला माझी हरकत नाही.

तर झाले असे. कुटुंबात विशेषतः लेकाला वाढवण्यात रमलेल्या मला, " आई कुठे काय करते?" असे सगळे करूनही सतावत असलेल्या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी अनेक वर्षांच्या गॅपनंतर मी नोकरीला लागले. अगदी अनपेक्षितपणे फार पटकन लागलेल्या ह्या नोकरीसाठी माझे जडत्व निर्माण झालेले शरीर आणि मनही तितकेसे तयार नव्हते.

सपोर्टिव्ह असा आणि इनिशिएटिव्ह घेऊन ऑफिसचे काम करून घरकामात हातभार लावणारा नवरा लाभलेला असूनही आणि लेकाला मिळून तयार करून दोघं मिळून एकत्रच केजीत सोडूनही मला कामाच्या ठिकाणी पोहोचायला आठवड्यातून 2 दा तरी कधी 10 मिनिटं तर कधी 15 मिनिटं उशीर व्हायचा. मग ही एच आर बॉस, "काय सकीना, आजही उशीर?!?" अशी रिसेप्शन काउंटरजवळ किंवा कुठेही कमेंट करायची. मी तिला आज हे झालं, तर परवा ते अशी सगळी खरीखुरी कारणं सांगायचे. मग ती 'ओके!' म्हणायची. यात माझीच चूक असली, तरीही मला सगळ्यांसमोर ऐकवणूक झाल्याने लाजिरवाणं वाटायचं. मूड जायचा.

हा एक अनुभव.

दुसरा म्हणजे एक दिवस आमची टीम मीटिंग होती. त्यात कळवल्या गेलेल्या एका ट्रेनिंग सेशनची अपॉइंटमेंट नोट करायला मी माझ्या फोनचे कॅलेंडर उघडले होते, हे बहुतेक न समजल्याने, "सकीना, इथे तू मोबाईल घेऊन का बसली आहेस? असे ती मला सर्व टीम मेम्बर्ससमोर रफली बोलली. इथेही चूक माझीच होती. पण मला वाईट वाटायचं, ते वाटलंच.

असे अजून एक दोन प्रसंग घडल्यावर मी न राहवून तिच्याशी बोलायला तिच्या ऑफिसरूममध्ये गेले. तिला म्हणाले, "सॉरी, मला शिस्त नाही, वेळेचे भान नाही आणि वर्क एथिक्सही नाहीत, हे मी मान्यच करते. तू मला शिस्त लावते आहेस, हे ही बरोबरच आहे आणि ते तू करच. पण एकच विनंती करते. तुला मला जे काही सांगायचे असेल, ते शक्य तेंव्हा नंतर प्रायव्हेटली सांगत जा. ते शक्य नसल्यास, हळुवारपणे बोलत जा. माझ्यावर प्लिज बॉसिंग करू नकोस. ह्या सगळ्या बेशिस्त वर्तनामागे माझी कामात पडलेली मोठी गॅप आणि थोडा स्वभावाचा भागही कारणीभूत आहे, जो मी हळूहळू बदलते आहे. पण त्यात माझी खूपच दमछाक होते आहे. मला थोडा वेळ दे. शिवाय अजून एक लक्षात ठेव की  माझं काम लोकांशी बोलणं, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देणं, हे आहे. जे हृदयाच्या आतून करावं लागतं.  ते व्यवस्थित करण्यासाठी माझा स्वतःचा मूड चांगला असणं आवश्यक आहे. तू जेंव्हा माझा असा जाहीर अपमान करतेस, तेंव्हा मी फार अपसेट होते आणि माझा अख्खा दिवस खराब जातो. चूक माझी असूनही मनात अढी मात्र तुझ्याविषयी निर्माण होते आहे.

मी स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतेच आहे, तू सुद्धा प्लिज मला जाहिरपणे न बोलता सेपरेटली मला हवे ते बोल, माझ्यावर संस्कार कर आणि माझं कौतुक मात्र सर्वांसमोर कर, हे तुला जमेल का? हे केलेस, तर फार बरे होईल. ती हसली आणि मला म्हणाली, "ओके! डन!"

मागच्या वर्षी मे मध्ये माझ्या वाढदिवसाच्या आठवडाभर आधी तिने मला विचारलं, आम्ही सगळे टीम मेम्बर्स मिळून तुला गिफ्ट देणार आहोत, तर तुला काही वेगळं हवं आहे का, त्यावर अगदी स्पॉंटेनियसली मी तिला म्हणाले, "मला बाकी काही नको, फक्त तुझं प्रेम हवं आहे." ते ऐकून ती खदाखदा हसली. मी ही अगदी लेस्बियन टाईपचे स्टेटमेंट झालेय की हे तर! हे जाणवून जोरजोरात हसले.

तेंव्हापासून ती माझ्याहून थोडी छोटी असली, तरी माझ्या मोठ्या बहिणीसारखी माझी गाईड कम बॉस झालेली आहे.

त्यानंतर काही महिन्यांनंतरची गोष्ट आहे. माझ्या नोकरीचा काँट्रॅक्ट एका वर्षाचा होता आणि मग माझ्या मेन बॉस तो पुन्हा एका वर्षाने एक्सटेंड करणार की नाही, त्यांच्या मनात माझ्याविषयी, माझ्या कामाविषयी काय इम्प्रेशन आहे, हे काही माहिती नव्हतं, पण त्या पुन्हा एकदा वर्षभरासाठीच एक्सटेंड करणार, असा अंदाज होता, इतर काहीजणांचे एक्सटेंड होणारे कॉन्ट्रॅक्टस बघता. त्याच दरम्यान माझा व्हीजा एक्सपायर होणार होता. तेंव्हा मी डिसेंबरमध्ये बॉसना माझा जॉब काँट्रॅक्ट अनलिमिटेड करता येईल का? जेणेकरून पर्मनंट रेसिडेन्स मिळेल आणि थोड्या थोड्या काळाने परत परत व्हीजा एक्सटेंड करण्याची प्रक्रिया टळेल, हे विचारले होते. त्यावर बॉसने विचार करून दोन दिवसांनंतर सांगते, तू अपॉईंटमेंट घेऊन भेटायला ये त्यादिवशी, असे सांगितले.

कंपनीच्या नियमानुसार असे निर्णय फक्त दोन व्यक्तींमध्ये न घेता सोबत अजून एक साक्षीदार लागतो म्हणून अपॉइंटमेंटच्या दिवशी बॉसच्या केबिनमध्ये माझी मेन बॉस आणि ही एच आर बॉस होती.

मला त्यांचा निर्णय सांगण्याआधी मुख्य बॉसने बोलायला सुरुवात केली, "सकीना, गेल्या काही महिन्यांपासून तू आमच्यासोबत काम करते आहेस. तुझे काम मला प्रत्यक्ष पाहायला मिळत नसले, तरीही तुझ्या डॉक्युमेंटेशनमधून मला ते वाचायला मिळते आहे, लोकांकडून ऐकून समजते आहे. तू सुंदर पद्धतीने आणि मनापासून काम करते आहेस, हे  जाणवते आहे..." मेन बॉसच्या बोलण्याला दुजोरा देत एच आर बॉस म्हणाली, .."आणि मला तुझी सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तू सर्व आज्जी-आजोबांना समान वागणूक देतेस. त्यांच्यात भेदभाव करत नाहीस."

मी त्यांना उत्तर देतांना म्हणाले, "माझ्यासाठी हे सगळे माझ्याच आज्जी आजोबांसारखे आहेत. माझी लाडकी आज्जी, जिची मी सगळ्यात पहिली नात होते, तिच्यासोबत माझे खूप सुंदर नाते होते. ती मला सोडून गेली, तेंव्हा मी तिच्यासोबत नव्हते, ह्याचे फार मोठे गिल्ट माझ्या मनात आहे. आज माझे सर्व आजी आजोबा अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांना इच्छा असूनही मी भेटू शकत नाही.  ह्या आज्जी आजोबांमध्ये मला ते सगळे दिसतात. त्यांची सेवा करतांना माझ्या मनातला अपराधी भाव थोडा कमी होतो. त्यामुळेच इथे येतांना मला माझ्या एका घरातून उठून माझ्या दुसऱ्या घरी आल्यासारखे वाटते. हे घर आणि ही माणसं दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार!"

माझ्या मेन बॉस त्यावर म्हणाल्या, "जरी ही संस्था मी चालवत असले, तरीही आणि अगदी मनापासून काम करत करत असले, तरीही मला हे माझे दुसरे घर आणि हे सगळेजण माझे आज्जी आजोबा असे काही वाटत नाही. असे न वाटणे हा कदाचित माझ्या जर्मन कल्चरचा आणि तुला तसे वाटणे, हे तुझ्या भारतीय कल्चरचा भाग असावे. कदाचित त्यामुळेच तुझे काम इतके चांगले आणि ह्या जॉबसाठी हव्या असणाऱ्या योग्य ऍटीट्यूडने होत असावे.

.. आणि म्हणूनच आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे, की आम्ही तुझा काँट्रॅक्ट अनलिमिटेड करत आहोत!"

ही आनंदाची बातमी ऐकतांना झालेले हे सगळे कौतुक ऐकून मला एकदम खूप काम करून थकल्यावर अचानक भरपूर मल्टिव्हिटॅमिन ज्यूस प्यायला मिळाल्यावर कसे ताजेतवाने, एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाटेल, तसे वाटले.

'पेराल तसे उगवते', ह्या म्हणीचा प्रत्यय आला. आपण लावलेल्या पॉझिटिव्हीच्या बी चा असा सुंदर पण माझ्यासाठी इनव्हिजिबल असा वृक्ष तयार होत होता आणि त्याचे गोड फळ मला चाखायला मिळाले, याचा आनंद अवर्णनीय होता..

मी सुरुवात काय केली आणि कंटेंट काय लिहिला, याची मजा वाटते आहे. जाऊन सुरुवात बदलावी का, असा विचार आला. पण विचारांच्या ओघात जे लिहिले ते बदलले तर नैसर्गिक ओघही तुटेल, म्हणून नाही बदलत.

मुळात जे लिहायचे होते ते पुढच्या भागात लिहिण्याचा प्रयत्न करते. आता मात्र थांबते. भेटूया, लवकरच.

एल जी (म्हणजे लिबे ग्रुझे- जर्मनमधील प्रेमपूर्ण शुभेच्छा)
तुमची सकीना
९.०४.२०२१

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४२

डियर ऑल,

"परवाचा स्ट्रेसफूल तरीही नोंदवायला हवा, असा दिवस आणि कालचा अनपेक्षित सुखद दिवस, असा मोठा भाग आज लिहिते आहे."

असं कालच्या भागात लिहिलं आणि विचारांच्या गाडीने ट्रॅक बदलला. आज मात्र तसं होऊ देणार नाही. प्रॉमिस! मात्र स्ट्रेसफुल भाग मोठा झाल्याने अनपेक्षित सुखद भाग पुढच्या भागात लिहीन.

परवा मी चौथ्या मजल्यावर ड्यूटीला होते. मागे एका भागात उल्लेख केलेला एक खेळ "मेन्श एर्गेरे दिश निष्त" काही आज्या तिथल्या सिटिंग कॉर्नरवर बसून खेळत होत्या.
माझाही खेळण्याचा मूड झाला, म्हणून मी त्यांना जॉईन झाले.

त्यातल्या एस के आज्जी खेळता खेळता एकदम सिरीयस दिसू लागल्या. काय झालं, विचारलं असता कॅथेटर लावलेले असल्याने क्रँम्प्स येत आहेत म्हणाल्या. हे नेहमीच होतं, असं त्या म्हणाल्या. त्यांचा एक पाय काही महिन्यांपूर्वी कुठल्यातरी आजारामुळे ऍम्प्युटेट करावा लागलेला होता. तेंव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे आता हे सिनियर केअर होम हेच घर झालेले आहे.

त्यांची माझी ओळख तिसऱ्या मजल्यावरच्या एका डबल रूममध्ये झाली. ह्या नवीन आलेल्या फ्राऊ (जर्मन भाषेत मिसेस ला फ्राऊ असे म्हणतात.) एस के फार निराश असतात आणि त्यांना कोणीतरी सतत त्यांच्यासोबत बोलायला लागतं. तू त्यांना भेटशील का? असं एका कलीगकडून समजल्याने मी त्यांना भेटले.

त्यावेळी त्या बेडवर पांघरूण घेऊन झोपलेल्या असल्याने त्यांच्या ऍम्प्युटेट केल्या गेलेल्या पायाविषयी मला काही माहिती नव्हतं. त्या थोड्या अवघडल्या स्थितीत झोपलेल्या होत्या, म्हणून मी त्यांना म्हणाले, थोडे सरकून सरळ झोपा ना! तेंव्हा त्या म्हणाल्या, मी हे नाही करू शकत. माझा एक पाय नाहीये! ही अनपेक्षित गोष्ट ऐकून मला एकदम धक्काच बसला. तो एक्सप्रेशन्स मध्ये दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत मी फक्त, "ओह! सॉरी टू हियर धिस" असं म्हणून शक्य तितक्या प्लेनली "काय झालं होतं नेमकं?" असं विचारलं.

पायाला कसलंसं इन्फेक्शन झाल्याने अचानकपणे त्यांचा पाय ऍम्प्युटेट करावा लागला, असं त्यांनी सांगितलं. "आदल्या दिवशी पर्यंत ज्या पायावर मी चालत होते, तो दुसऱ्या दिवशी सकाळी गेलेला पाहणे माझ्यासाठी किती यातनादायी असेल, याची तू कल्पनाही करू नाही शकत", असं म्हणून त्या रडायला लागल्या.

अतिशय बोलक्या अशा ह्या आज्जी ९० वर्षांच्या असून एकेकाळी जिम्नॅस्टिक ट्रेनर होत्या. २ वर्षांपूर्वीच त्यांचे मिस्टर वारलेले असल्याने ते दुःख कमी की काय, म्हणून हे नवीन त्यांच्या नशिबात आलेलं होतं.
त्यांनी त्या दिवशी मला सांगितले की त्यांची व्हीलचेअर अजिबात कम्फर्टेबल नाहीये आणि म्हणाल्या की तू या बाबतीत काही करू शकतेस का? मला व्हीलचेअर कंपन्यांविषयी काहीही माहिती नव्हतं.  मग मी ऍडमिन दादाला फोन करून विचारलं. त्याने आज्जींच्या व्हीलचेअर कंपनीचे नाव आणि नंबर देऊन मला त्यांच्याशी आज्जींना फोनवर कनेक्ट करायला लावलं.

मी ते केलं असता आज्जींनी भलीमोठी पार्श्वभूमी अगदी रागारागाने पलिकडच्या व्यक्तीला सांगायला सुरुवात केली. पलिकडच्या व्यक्तीला काहीही बोलायला गॅप न देता आज्जी बोलतच राहिल्या, जे बोलणंही अजिबात क्लियर नव्हतं. शेवटी एका क्षणी पलिकडून फोन कट केला गेल्यावर आज्जी दुःखी झाल्या.

त्यांना मग मी सांगितले, आपले म्हणणे शांतपणे आणि थोडक्यात सांगायचे. शिवाय समोरच्याला बोलायला जरा संधी द्यायची. मग त्या खजिल झाल्या आणि म्हणाल्या, मी चुकलेच. मी त्या मुलीची माफी मागते. परत त्यांना फोन लावून दिला, तर तो दुसरीने उचलला. जिने उचलला, तिच्याशी मीच बोलले. ती म्हणाली, फ्राऊ एस कें ना प्लिज फोन देऊ नकोस. मला त्यांचा प्रॉब्लेम कलीग कडून कळलेला आहे आणि आम्ही तो नोट करून घेतलेला आहे. आम्ही येऊन त्यांची व्हीलचेअर चेक करू लवकरच. मी तिला धन्यवाद दिले आणि तिला आज्जींना त्या दुसऱ्या मुलीची माफी मागायची होती, हे सांगितले, तेंव्हा तिने तिला फोन दिला.

हया वेळी मी फोन स्पीकरवर ठेवला. आज्जींनी तिची थोडक्यात आणि मनापासून माफी मागितली आणि तिनेही हसून त्यांना माफ केले आणि फोन ठेवला.

त्यानंतर त्यानंतर त्यांच्या मनात खूपच अपराधी भाव दाटून आलेला दिसला. त्या सतत मला म्हणत होत्या, "तुम्हाला मी बावळटच वाटत असेल ना? तुम्हाला माझा राग येत असेल ना?" मी त्यांना असं अजिबात काही वाटून घेऊ नका हो. मला खरोखरच असे काही वाटत नाहीये, असं सांगून त्यांना रिलॅक्स करण्याचा प्रयन्त केला.

एस के आज्जी ह्या एका प्रसंगामुळे माझ्या चांगल्याच लक्षात राहिल्या. मग थोड्याच दिवसात त्या सगळ्यात वरच्या मजल्यावर शिफ्ट झाल्या. भरपूर सूर्यप्रकाश आणि चांगला गार्डन व्ह्यू असलेल्या खिडकीची रूम त्यांना मिळालेली पाहून मला बरे वाटले.

आज्जींच्या आणि माझ्या भेटी आता वरचेवर होऊ लागल्या. वेगवेगळ्या कलिग्जकडून, "तू जरा त्या एस के आज्जींना भेटशील का? फार बोलायला लागते त्यांना" असे ऐकायला अधूनमधून ऐकायला मिळायचे. ह्या आज्जीही, "तू सायकॉलॉजीस्ट आहेस ना? तुला माझ्याशी बोलायला वेळ असेल, तेंव्हा येशील का?" असे सांगत. त्यामुळे मी त्यांना जास्त वेळा भेटायला लागले.

सुरुवातीला फक्त निराशाजनक विचार व्यक्त करणाऱ्या ह्या आज्जींचे गप्पांच्या ओघात मला अनेक चांगले पैलू समजायला लागले. 

हॅनोवर शहरातच जन्मलेल्या आणि संपूर्ण ९० वर्षांचं आयुष्य एकाच मोठ्या जॉईंट फॅमिली होममध्ये काढलेल्या ह्या आज्जींनी लग्नानंतर नवऱ्यालाही आपल्या राहत्या घरीच राहायला बोलावलं. आताही तेच तीन मजली घर, ज्यात तळमजल्यावर त्या स्वतः, दुसऱ्या मजल्यावर त्यांची भाची तिच्या कुटुंबासह आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांची बहीण राहतात. त्यांना स्वतःचं मूल  नाही.

आज्जींच्या घराच्या बाल्कनीत त्यांनी लावलेल्या सुंदर फुलांचे फोटो त्यांनी त्यांच्या संस्थेतील रूमच्या भिंतीवर लावलेले आहेत. ते बघून मी घराच्या आठवणीने किती व्याकूळ होते आहे, तुला काय सांगू? म्हणून त्या एकदा खूप रडल्या होत्या. आयुष्यभर जिथे राहिले, तिथे आता मी कधी परत जाईन? असे म्हणून रडत होत्या. मलाही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टविषयी, तब्येतीविषयी आणि एकूणच त्या इथे अजून किती काळ राहतील, या विषयी माहिती नसल्याने, नेमके काय सांगून सांत्वन करावे, ते समजत नव्हते. तरीही त्यांना मी धीर देण्याचा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आज्जी बाकी कोणत्याही विषयावर बोलत असल्या, तरी, व्हीलचेअर कम्फर्टेबल नाही, हेच तक्रार नेहमी शेवटी करत असत. चौकशीअंती मला असं समजलं, की  व्हीलचेअर कंपनीने आत्तापर्यंत ४/५ वेळा त्यांची व्हीलचेअर बदलून दिली, तरीही त्या अजून समाधानी नाहीत.

मला त्यांनी नवीन व्हीलचेअरही बसायला कम्फर्टेबल नाही, असे सांगून आत्ताच्या बदललेल्या व्हीलचेअर कंपनीचे नाव आणि नंबर मागितला. व्हीलचेअरवरच तो लिहिलेला असल्याने मी तो त्यांना लिहून दिला. मॉडेल नंबर, सिरीयल नंबर असे बाकी नंबर्सही लिहून दिले. त्यांना म्हणाले, करता का आता कॉल? तर त्या म्हणाल्या, आत्ता मी थकले आहे, नंतर बोलेन.

त्या नंतर त्या नंतरच्या आठवड्यात मला बघताच आज्जी पुन्हा व्हीलचेअर थीम वर बोलायला लागल्या. मी त्यांना विचारले, "तुम्ही कॉल केला का त्या कंपनीला?" तर त्या म्हणाल्या, "नाही". मग मात्र मी वैतागले. मी म्हणाले, जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा  असेल, तर त्यासाठी स्टेप्स तर तुम्हाला घ्याव्याच लागतील. नाहीतर तुम्ही तेच तेच बोलत राहणार आणि मी वेळ देऊनही तुम्हाला माझी मदत तर होणारच नाही. आत्ताच्या आत्ता फोन लावा, नाहीतर हा विषय विसरा.

आज्जींना त्या दिवशी मी दिलेला फोन नंबर्स लिहिलेला कागद मग त्या पर्समध्ये शोधायला लागल्या. त्यांना सापडला नाही, तर त्या पॅनिक झाल्या.  मी त्यांना म्हणाले, "हरकत नाही. मी परत लिहून देते." त्या म्हणाल्या, "थांब थांब, सापडेल", म्हणून त्यांनी गादीवर अख्खी पर्स रिकामी केली. गावभराचे सामान त्यात सापडले, हा कागद मात्र नाही. शिवाय पर्स आतून फाटलेली असल्याने बरंचसं सामान चोर कप्प्यात गेल्यासारखं आत लपलं होतं, ते मी बाहेर काढलं. (नंतर एकदा त्यांची फाटलेली पर्स मी सुईदोऱ्याने शिवूनही दिली.)

पर्समधला कचरा फेकून ती नीट लावून दिली आणि कागद मिळाला नसल्याने परत सगळं लिहून त्यांना व्हीलचेअर कंपनीला फोन लावून दिला. त्या जे बोलायचं ते थोडक्यात बोलल्या. कंपनीने पुन्हा एकदा भेटीची अपॉइंटमेंट दिली.

मग मला त्या म्हणाल्या, " मी माझ्या आयुष्यात खूप लोकांना मदत केली आहे. सिनियर सिटीझन्सनाही शक्य तेवढी मदत केलेली आहे, तरी माझ्या बाबतीत इतकं वाईट का व्हावं? मला का कोणाचीच मदत मिळत नाही?"

मी त्यांना म्हणाले, "असं कुठे आहे, फ्राऊ एस के? मी आहे, आम्ही सगळे आहोत ना तुमच्या मदतीला?"

त्यांनी एकदा सांगितले होते की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एका मोठ्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्यांचे शरीर खूप भाजले, तेंव्हापासून त्यांना हाफ बाहीचे शर्टही घालता येत नाहीत. ऊन पडले की त्रास होतो त्या भागातील स्किन वर.

आजोबांच्या(त्यांचे मिस्टर) आठवणी सांगतांना आज्जी म्हणाल्या होत्या की ते दोघंही जिम्नॅस्टिक ट्रेनर्स होते. खूप ऍक्टिव्ह होते. पायाच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत घरातलं सगळं त्या स्वतः करत असत.

आज्जींच्या एकेक गोष्टी ऐकून मन कधी सुन्न तर कधी आनंदी व्हायचे. आता आज्जींची आणि माझी चांगली मैत्री झालेली असल्याने आमच्या गप्पा वेगवेगळ्या विषयांवर होऊ लागल्या होत्या.

थंडीच्या दिवसात माझे थंड झालेले हात त्यांनी एकदा इतके मस्त आणि विशिष्ट पद्धतीने मसाज करून काही सेकंदात गरम करून दिले होते, तेंव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही तर जादूगार आहात की फ्राऊ एस के! तेंव्हा त्या हसून म्हणाल्या, "अगं, मी प्रोफेशनल ट्रेनर होते ना, हे मी आमच्या स्पोर्ट्स ट्रेनिंगमध्ये शिकलेले आहे. तू कधीही ये, मी तुला मसाज करून देत जाईन." तेंव्हापासून माझे थंडगार हात एका सेकंदात गरम करण्याचं काम ह्या आज्जी अगदी आनंदाने करतात.

तर परवाची गोष्ट. आम्ही तो खेळ खेळत सिटिंग कॉर्नरला बसलेलो असतांना त्यांना क्रँम्प्स सुरू झाले. "बेडवर पडले की ते बंद होतील. अजून पंधरा मिनिटांनी कॉफी ब्रेक आहे. तेवढा वेळ खेळून मग मी बेडवर जाऊन पडेन." असं त्या म्हणाल्या. त्यांचे क्रँम्प्स वाढू लागलेले पाहून मी स्पेशलाईज्ड नर्सला कळवले. तिने त्यांची चौकशी केली आणि काही नाही, वाटेल बरं, म्हणून निघून गेली.

आज्जींना जरा जास्तच त्रास व्हायला लागलेला बघून मी काळजीत पडले. तेवढ्यात दुपारच्या शिफ्टची नर्स आली. आफ्रिकन देशातली आणि वंशाची ही नर्स उंच, छान फिगर असलेली आणि अतिशय उत्साही अशी आहे. नाचतच ती लिफ्टमधून बाहेर पडली. तिचा नाच बघून नेहमी हसत तिला कॉम्प्लिमेंट देणाऱ्या आज्जी आज इतक्या शांत बघून ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना तिने "काय झालं", ते विचारलं, आज्जींनी क्रँम्प्सविषयी सांगताच तिला लगेच कळलं प्रॉब्लेम कुठे आहे ते!

तिने लगेच आज्जींना रूममध्ये नेलं आणि सांगितलं की मॉर्निंग शिफ्टच्या नर्सने तुम्हाला कॅथेटरची चुकीची पिशवी लावलेली आहे. ही पिशवी छोटी असून ती व्हीलचेअरवर बसणाऱ्यांसाठी नाही. ती चालणाऱ्यांसाठी सुटेबल आहे. ती पॅन्टमध्ये फोल्ड करून ठेवता येते. पण तुम्ही व्हीलचेअरवर बसता, तेंव्हा त्या चेअरला अडकवायची थोडी मोठी पिशवी तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्या छोट्या पिशवीची युरिन कॅरी करणारी नळी तुमच्या सिटिंग पॉझिशनमुळे कधीपासून फोल्ड झालेली आहे आणि तुमचे युरिन त्यामुळे ब्लॉक होऊन ते पिशवीपर्यंत पोहोचत नसून प्रत्येकवेळी ते बाहेर यायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला क्रँम्प्स येत आहेत.

हे सांगत सांगत तिने एका युरिन जमा करण्याच्या प्लॅस्टिक बॉटलमध्ये त्यांचे इतकावेळ ब्लॉक झालेले जवळपास ५०० मिली युरिन गोळा केले! आज्जी म्हणाल्या, नर्सने त्यांना चॉईस दिलेली होती आणि त्यांनी ही पॅन्टमध्ये छान लपली जाते, अशी सोयीची म्हणून ही पिशवी निवडली होती. त्यांना काही माहिती नसल्याने त्यांनी ही निवड केलेली होती.

ती पिशवी बदलून त्या नर्सने आज्जींना स्वच्छ पुसूनही काढले. तेंव्हा मी पाहिले, आज्जींचे नाजूक अवयव पार लालेलाल झालेले, त्यांची स्किन डॅमेज झालेली होती. शिवाय त्यांनी मला मागे जे सांगितलेले होते, दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब ब्लास्टमध्ये भाजल्याचे, त्याच्या खुणाही त्यांच्या शरीरावर दिसत होत्या. फार त्रास झाला मला ते सगळं पाहून.

नर्स म्हणाली ह्या आज्जींनी जास्तवेळ बसून राहणे अपेक्षित नाही. त्यांनी बेडवर पडायला हवे, जेणेकरून त्यांच्या शरीराला हवा लागेल आणि जखमा भरतील. पण त्या सगळ्या ऍक्टिवीटीजमध्ये भाग घेतात, दिवसभर व्हीलचेअरवर बसून राहतात, बेडवर पडायला नकार देतात आणि स्किन डॅमेज करून घेतात.

त्या क्षणी मला स्ट्राईक झाले, आज्जींचा कधीच न सॉल्व्ह होऊ शकणारा प्रॉब्लेम व्हीलचेअर हाच आहे, मात्र व्हीलचेअरमध्ये प्रॉब्लेम नसून त्यांच्या त्यात खूप वेळ बसून राहण्यात आहे!

त्या दिवशी मी त्यांचे जास्तवेळ व्हीलचेअरमध्ये न बसण्याविषयी कौंसेलिंग केले, मात्र त्यांनी बेडवर पडायलाही कम्फर्टेबल वाटत नाही, एकच पाय असल्याने हलता येत नाही. हे सांगितले. हे कारणही व्हॅलीड असले, तरी त्याला पर्याय नाही आणि त्यांनी जास्तीतजास्त वेळ पडून राहणे योग्य, यावर आता यापुढे त्यांना कौंसेलिंग करणे, हे माझ्यासाठी चॅलेंज आहे.

बाकी अनुभव घेऊन डायरीच्या पुढच्या भागात भेटतेच.

एल जी, ('लिबे गृझे' अर्थात, जर्मनमधील प्रेमपूर्वक शुभेच्छा)
तुमची सकीना
१०.०४.२०२१

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४३

(मी हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेली पावणेदोन वर्ष जॉब करत आहे आणि माझ्या तेथील अनुभवांवर डायरी लिहिते आहे. आज खूप गॅपनंतर हा भाग लिहिते आहे.)

जगात काहीही होवो, मात्र काहीजण जणूकाही अमरपट्टा घेऊनच जन्माला आले आहेत, असंच वाटत असतं आपल्याला, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा धक्का खूपच जोरात बसतो आणि तो पचवायला अवघड जाते..  त्यातल्याच एक म्हणजे हाई. आज्जी.. (खरे नाव माहिती संरक्षण नियमानुसार सांगता  येत नसल्याने इनिशिअल्सने संबोधले आहे.) ह्या हाई. आज्जी म्हणजेच  बाहुलीवाल्या आज्जी. त्यांचा उल्लेख मी मागे डायरीच्या एका भागात केलेला आहे. ज्या परवा हे जग सोडून अचानकपणे निघून गेल्या.

पावणेदोन वर्षांपूर्वी माझ्या डायरीच्या १७व्या भागात मी ह्या आज्जींचे वर्णन केले होते, ते असे:
****************************************
आयसोलेटेड रूम्समध्ये गेल्याने भीतीदायक फीलिंग आल्याचे दोन किस्से तर सांगून झालेले आहेतच, आज
नॉन आयसोलेटेड रूममधल्या एका आज्जींची गोष्ट सांगते, ज्यांच्या रुममध्ये जाताच मला भीती वाटली, कारण त्यांच्या रूमचा दरवाजा उघडताच मला दिसल्या बाहुल्याच बाहुल्या! लहानपणापासून पाहिलेल्या सिनेमांमधून अशा बाहुल्यांचे कनेक्शन ब्लॅक मॅजिकशी जोडले गेलेले पाहिल्याने साहजिकच भीती वाटली.

कारण त्यांच्या रूममध्ये शिरताच दाराजवळच्या कॉर्नरला हॅरी पॉटर मॅजिकल मूव्ही सिरीजमध्ये दिसणारा त्याच्या झाडूसारखा झाडू टांगलेला होता. कॉर्नरला जॅकेट्स आणि ड्रेसेस टांगून ठेवण्यासाठी बनवलेल्या फळीच्यावरही एक कोट सूट घातलेला बाहुला, अगदी जिवंत वाटेल असा उभा होता.. ह्या आज्जी ब्लॅक-मॅजिकवाल्या तर नाहीत? अशी शंका आली मला. एकदम चर्रर्रर्र झालं हृदयात.. आल्या पावली परत जावं, असं वाटायला लागलेलं होतं, पण असं बरं दिसणार नाही, हे लक्षात येऊन नाईलाजाने रूममध्ये गेले. शिवाय मनाला हेही समजवलं की आपण हे सगळं मानत नाही, तर घाबरण्याचं काय कारण? आपण एखाद्या घरात नसून संस्थेच्या एका रूममध्ये आहोत आणि या रूममध्ये दररोज क्लिनिंग स्टाफही येतच असतो. काही आक्षेपार्ह असतं तर एव्हाना सर्वांना कळलंच असतं.

"तुम्हाला बाहुल्या जमवण्याचा छंद आहे का?" असं विचारलं असता आज्जींनी हसून सांगितलं, "हो" आणि त्यांचा हा छंद माहिती असल्याने इतर काही आज्जींनी त्यांच्याकडच्याही बाहुल्या त्यांना भेट दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या रूममध्ये इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या बाहुल्या दिसल्या की त्यांना अक्षरशः ठेवायला जागा नाही. शोकेसमध्ये, टेबलवर आणि त्यांच्या बेडवरही कॉर्नरला लावून ठेवलेल्या आहेत. त्या कोणत्याही बाहुल्या त्यांना फेकून द्याव्याश्या वाटलेल्या दिसत नाहीत. आज्जी एकदम साध्या आणि फ्रेंडली होत्या, पण त्यांची रूम मात्र विचित्र वाटली मला खरोखरच.

जर्मन लोकांच्या काटेकोर स्वच्छ स्वभावाला अपवाद त्यांची रूम होती. बाहुल्यांशिवायही बाकी बराच पसारा होता खोलीत. एका बॉक्समध्ये घड्या न घालताच कोंबलेले भरपूर कपडे, टेबलवर मासिकं, वर्तमानपात्रांचा पसारा, असं सगळं होतं.

अशा विचित्र रूममध्ये राहणाऱ्या आज्जी दिसायला आणि बोलायला मात्र अतिशय साध्या होत्या.
व्हीलचेअरवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आज्जींच्या डोळ्यातील भाव लहान मुलांप्रमाणे निरागस होते.

आजारपणातून आलेलं थुलथूलीत जाडपण, हसऱ्या आणि गोड, स्वतःच्या बाहुल्यांच्या विश्वात रमलेल्या..त्यांचा चेहरा एकदम ओळखीचा वाटला मला. पाहिल्याबरोबर आठवलं, त्या कायम फिरत असायच्या आणि त्यामुळे मी त्यांना येता-जाता बघितलेलं होतं. भेटायला गेल्यावर त्या भरभरून बोलायला लागलेल्या होत्या, अतिशय फ्रेंडली आणि वेलकमिंग होत्या.

त्यांच्याशी बोलल्यावर समजलं की त्यांना 5 मुली असून त्या नवऱ्यापासून अनेक वर्षांपासून सेपरेटेड आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात बऱ्याच डिसॅबीलिटीज असल्याने त्यांना नोकरी वगैरे काही कधीच करता आलेली नाही.

गेल्या कित्येक वर्षात त्यांना त्यांच्या मुली भेटायलाही आलेल्या नाहीत आणि त्यांचा स्वतःचाही मुलींशी काही कॉन्टॅक्ट नाही. मधूनच विचित्र आणि मधूनच नॉर्मल असं वेगळंच फीलिंग मला त्यांच्या रूममध्ये येत होतं आणि त्या काय बोलतायत, त्यावरून माझं लक्ष सतत विचलित होत होतं.

दिसतं आणि आपल्याला वाटतं तसंच काही सगळं नसतं असं मनात घोकत मी शक्य तितकं नॉर्मल राहण्याचा आणि त्या काय सांगत आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिकडून लवकर बाहेर पडण्याची संधी शोधून पटकन बाहेर पडले. ह्या आज्जी मोस्टली रूमबाहेरच आपल्या व्हीलचेअरवरून फिरत असल्याने आणि आमची आता नीट ओळख झालेली असल्याने आम्ही बाहेरच गप्पा मारतो. पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाण्याची आणि गप्पा मारण्याची गरज मला अजूनतरी पडलेली नाही.

अशाप्रकारे मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीदायक अनुभवांना सामोरी गेलेय.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
२३.०४.२०२०

********************************************
आज पावणेदोन वर्षानंतर ह्या आज्जींच्या सानिध्यात नियमितपणे येत होते.  फ्लोअर्स वर राउंडला गेल्यावर जवळपास दररोज बोलणं झाल्याने त्यांच्यासोबत खूप घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले होते.

गेली काही महिने कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला लागल्याने पूर्ववत होत असलेली परिस्थिती अचानक पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने तणावपूर्ण झालेली असतांनाच आमच्या संस्थेतही काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यात ह्याही आज्जी निघाल्या. त्यांनी तब्येतीच्या काही कारणाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलेले नव्हते.

सर्व पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह असले तरीही आत्ता पॉझिटिव्ह आहेत अशांच्या संपर्कातल्या सर्वांना कॉरंटाइन मध्ये ठेवलेले असतांना मी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटता येत नसल्याने रोज फोनवरून संवाद साधते. त्यामुळे या आज्जींशीही मी फोनवरून बोलायचे.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर पहिले दोन दिवस त्यांना काहीच त्रास होत नव्हता. त्या म्हणाल्या, मला काहीही जाणवतही नाहीये. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे अचानकच त्यांना श्वासही घ्यायला त्रास व्हायला लागला, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. 

त्यांची परिस्थिती त्याच दिवशी इतकी खालावली की त्या आता परत येणार नाहीत, अशी माहिती समजली.. हृदयात एकदम चर्रर्रर्र झाले आणि मन भूतकाळात गेले..

ह्या आज्जींच्या रूमसमोरच एक नव्वदीच्या पुढच्या आज्जी राहतात, त्या आजारी पडून बेड रिडन झाल्या, की ह्या हाई. आज्जी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आणि त्या बऱ्या होऊन पुन्हा व्हीलचेअरवर बसायला लागल्या की मला सांगत, मी देवाशी भांडले, त्यांना आजारी पाडल्याबद्दल आणि देवाला धमकी दिली, त्यांना लवकर बरे करा, नाहीतर काही खैर नाही,  अशी. 

ते आठवून मी त्यांच्यासाठी रोज प्रार्थना करत होते. मनात कुठेतरी एक आशा होती, की त्या परत येतील.. पण....

परवा त्या हे जग सोडून गेल्या.. वयाच्या जवळपास सत्तरीत असलेल्या ह्या आज्जी तशा फिट असल्याने त्या इतक्या लवकर हे जग सोडून जातील, असं वाटलंच नव्हतं.

रोज त्या व्हीलचेअरवर बसलेल्या दिसत. कायम हसऱ्या, फ्रेश, टीव्हीवर कायम काही जुने जर्मन क्लासिक्स त्यांच्या व्हीसीआरवरून प्ले करणाऱ्या, बडबड्या, सगळ्या फ्लोअर वर काय काय सुरू आहे, याची डोळे, कान, सतत उघडे ठेवून असल्याने बारीक माहिती असणाऱ्या आणि ती मला आणि इतरही एम्प्लॉईजना सांगणाऱ्या, 5 मुलं असूनही त्यातल्या सर्वांशी काहीशा कौटुंबिक कारणाने संवाद बंद झाल्याने अधूनमधून ती सल व्यक्त करणाऱ्या, मग मी त्यांच्या मुलांपैकी एका मुलीचे ती कुठे जॉब करते, त्याची त्यांच्याकडेच चौकशी करून तिच्या कामाच्या ठिकाणी कॉल करून त्यांना तिच्याशी कनेक्ट करून दिल्यावर कित्येक वर्षांनंतर लेकीशी बोलायला मिळाल्याने खूप खुश होऊन मला स्वतःच्या हाताने विणलेले आणि आता तब्येत जाड झाल्याने वापरता येत नसल्याने आठवण म्हणून जपून ठेवलेले सुंदर स्वेटर मला भेट देणाऱ्या आणि माझ्याशी अतिशय गोड असे नाते निर्माण झालेल्या ह्या आज्जी गेल्याने मला सतत अश्रू अनावर होत आहेत.  त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यापासून रोज मी ते घालून बसत होते. त्या गेल्याचे समजल्यानंतर ते स्वेटर घातल्याने मला जास्त त्रास होतोय, हे लक्षात येऊन  मी ते आता घालायचे बंद करून कपाटात ठेवून दिलेय.

असेच मागच्या हिवाळ्यात त्यांनी मला त्यांच्या मुलांचे अनेक वर्षे जपून ठेवलेले अतिशय चांगल्या स्थितीत असलेले दोन स्टॉकिंग्ज माझ्या मुलाला वापरायला दिले होते. मुलं फार पटापट मोठी होतात ना, त्यामुळे नवीन विकत घेलेलेले कपडे जास्त दिवस त्यांना बसत नाहीत आणि  ते खूप चांगल्या स्थितीत असल्याने फेकायचीही इच्छा होत नाही. मग असेच जवळच्या, प्रेमाच्या माणसाला भेट दिले जातात. त्यातले हे इतकी वर्षे जपलेले त्यांनी मला दिले, त्यामुळे माझे मन भरून आले एकदम..

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या टीव्हीचा स्पीकर अचानकपणे बंद पडला आणि टेक्निशियनने चेक करूनही तो पुन्हा सुरू होईना, म्हणून त्यांना कंपनीकडून हेडफोन्स देण्यात आले. पण त्यामुळे त्यांना बेडवर पडून रात्री टीव्ही बघणे जमत नव्हते. कारण त्या हेडफोन्सची वायर तितकी लांब नव्हती. नवीन टीव्ही घेण्याची त्यांची ऐपत नव्हती म्हणून त्यांनी भाड्याने स्पीकर्स आणायचे ठरवले, पण त्यासाठी एका या आणि अशा कामासाठी नेमलेल्या एम्प्लॉईसोबत शॉपमध्ये जाणे काही ना काही कारणाने त्यांचे जमत नव्हते.

माझ्याकडे एक असा स्पीकर होता आणि त्याचा मी विशेष वापर करत नसल्याने मी त्यांना तो दिला. त्या हे जग सोडून जाण्याच्या दोन महिने आधी माझ्याकडून त्यांना हा छोटासा आनंद देता आला, याचं समाधान वाटतं..

ह्या आज्जींसोबत खूप छान आठवणी आहेत. त्यातली एक म्हणजे आम्ही एक जर्मन खेळ काहीवेळा एकत्र खेळलो होतो. त्याचे जर्मन नाव "मेन्श एर्गेरे दिश निश्त"ज्याचा उल्लेख मी डायरीच्या एका भागात केलेला होता.  ज्याचा अर्थ, 'माणसा, चिडू नकोस.. ' सोंगट्या टाकून पुढे पुढे जाऊन ध्येय गाठायचे असा साधा सोपा खेळ. तो खेळत असतांना, त्यांच्या फेव्हरमध्ये सोंगट्या नाही पडल्या, की त्या आभाळाकडे बघून म्हणायच्या, अहो 'पपा तुम्ही मला मदत करायचे सोडून काय झोपा काढताय? उठा, आणि मला मदत करा आणि मग त्यांच्या फेव्हरमध्ये सोंगट्या पडल्या, की म्हणत, उठले माझे 'पपा आणि आले धावून माझ्या मदतीला. आणि मग खुदूखुदू हसत.

अशा या संवेदनशील, विनोदी, बदबड्या आणि गोड आज्जींशिवाय संस्था ही कल्पनाच सहन होत नाहीये.

त्या आता वर आभाळात आपल्या 'पपांसोबत  खुदूखुदू हसत "मेन्श एर्गेरे दिश निश्त" खेळत असतील का?

सकीना वागदरीकर-जयचंदर
०२.१२.२०२१
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४४

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या सिनियर केअर होममध्ये आज एक नवीन जर्मन आज्जी दाखल झाल्या. वय वर्ष 98. डोळयांनी पूर्णपणे अंध. आज त्यांचा इथे पहिलाच दिवस असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांना माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल माहिती देऊन आज थोडक्यात संभाषण आटोपून उद्या सविस्तर बोलावे, असे ठरवून मी त्यांना भेटायला गेले.

कृश शरीरयष्टी असलेल्या या आज्जींचे संस्थेत स्वागत करून त्यांना मी इथे काय करते, हे सांगताच, त्या एकदम खूष झाल्या आणि दिलखुलास हसत मला म्हणाल्या, मी 98 वर्षांची आणि माझा नवरा 80 वर्षाचा. उद्या तो मला भेटायला येईल, तेंव्हा तो माझा मुलगा आहे असा तुमचा गैरसमज होऊ नये, म्हणून आधीच सांगून ठेवते.

त्या बरोबर माझ्या दिशेने पाहून बोलत असल्याने मी त्या अंध असल्याचे साफ विसरून गेले होते. माझ्या जर्मन बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांना मी परदेशी व्यक्ती असल्याचे समजले असणार. त्यामुळे त्यांनी मला मी कुठली, हे विचारले. मी भारतीय, हे सांगितल्यावर त्यांनी मला त्यांना इंग्रजी बोलता येते आणि फ्रेंचही येते हे सांगितले आणि त्यानंतरचे पुढचे सगळे संभाषण त्यांनी इंग्रजी मिश्रित जर्मनमध्ये केले.

इतक्या भाषा कुठे शिकलात, असे विचारल्यावर मी जर्मन सरकारी कर्मचारी होते, आणि मी खरं म्हणजे हे तुला सांगणे योग्य की नाही माहीती नाही पण आता इतक्या वर्षांनी त्याने काही फरक पडेल, असे वाटत नाही, असेही पुढे म्हणाल्या.

तुम्ही नक्की कोणत्या स्वरूपाचे काम करायचात, असे विचारल्यावर वेगवेगळ्या देशातील लोकांशी संपर्काचे आणि दुभाषिकांचे काम करायचे, हे त्यांनी सांगितले. त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना लहान असतांनाच इंग्रजीचा प्रायव्हेट क्लास लावला होता, त्यामुळे त्यांचे इंग्रजी शाळेतल्या इतरांपेक्षा कायम सरस असायचे. भरपूर भाषा शिकणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणत, हे ही त्यांनी सांगितले.

वडील काय करायचे, हे विचारल्यावर त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक ज्यूंना  समुद्र मार्गाने जहाजाद्वारे ट्रान्सपोर्ट करत वाचवले, हे सांगितले. अशा 3 बोटी यशस्वीरित्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतर चौथ्या बोटीवर रशियन सैन्याचा बॉम्ब पडला आणि वडील समुद्रातच मृत्यमुखी पडले, असे सांगितले. मी गेले की माझ्या अस्थी समुद्रातच विलीन व्हाव्या अशी माझी शेवटची इच्छा आहे. आता मी लवकरच जाईन आणि माझ्या बाबांना समुद्रात भेटेन, असे म्हणाल्या. मग माझे बाबा, माझे लाडके बाबा, असे म्हणत त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

मग, तुला पुतीन आवडतो का? असे मला विचारले. नाही, तो कोणाला कसे आवडू शकतो, असा मी प्रतिप्रश्न केल्यावर आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी त्या बोलायला लागल्या.

मग मी वातावरण हलके करायला तुम्ही तुमच्या मिस्टरांना कसे भेटलात, हे विचारल्यावर त्यांनी वडील पूर्वी इन्शुरन्स कंपनीत काम करायचे, तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये हा मुलगा भेटला आणि प्रेमात पडला हे सांगितले.  तुमच्या वयात 18 वर्षांचे अंतर असतांना कसा संसार झाला, हे विचारल्यावर माझ्या नवऱ्याला खूप त्रास झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून तो माझी सुश्रुषा करतो आहे, याचा मला त्रास होतो, आज मी इथे आणि तो घरी.. मात्र त्याने खूप आनंदाने माझ्यासोबत 60 वर्षं संसार केला, असे म्हणाल्या.

माझ्या फॅमिलीचे फोटो त्यांना दाखवायला फोन त्यांच्यासमोर नेला, तेंव्हा त्या म्हणाल्या, अगं, मला दिसत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून.. मी त्या अंध असल्याचे पुन्हा एकदा साफ विसरून गेले होते.

5 मिनिटे बोलू म्हणता म्हणता आज्जींसोबत जवळपास 40 मिनिटे गप्पा झाल्या.

मी त्यांना भेटायला आल्याबद्दल त्यांनी मनापासून माझे आभार मानले आणि मी उद्या पुन्हा भेटेन, हे सांगितल्यावर तुझी माझ्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत उद्या भेट होईल. नक्की ये भेटायला, असे सांगून त्यांनी माझा निरोप घेतला.

सकीना वागदरीकर-जयचंदर
07.07.2022

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५

जर्मनीतील हॅनोवर शहरात मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते त्या सिनियर केअरहोममध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक उंचपुरे धिप्पाड कोट-सूट घातलेले निळ्या डोळ्यांचे एक ८४ वर्षांचे आजोबा दाखल झाले.

एकेकाळी स्पोर्ट्स ट्रेनर आणि व्यवस्थापक असलेले पण आता माईल्ड विस्मरणाचा आजार डेव्हलप झालेले हे आजोबा फॅमिलीविषयी किंवा त्यांच्या जॉब विषयी विशेष काही सांगू शकत नसले, तरी आपले सर्व काही काम स्वतः करू शकतात.

त्यांची रूम तर एखाद्या ऑफिस रुमसारखी टापटीप लावलेली आहे. त्यातून ते दिवसभर कोट-सूट घालून वावरत असल्याने त्यांना भेटायला गेल्यावर अपॉइंटमेंट घेऊन कोणत्यातरी ऑफिसमध्ये गेल्यासारखा फील येतो.
आजोबा अतिशय प्रसन्न, हसरे आणि मितभाषी. आजोबांजवळ मरून कलरच्या दोन वॉकिंग स्टिक्स!

ते आल्यानंतरच्या पुढच्याच आठवड्यात एक नवीन आज्जी दाखल झाल्या. ह्या आज्जी त्या आजोबांहून 2 वर्षांनी मोठया. दिसायला अतिशय सुंदर! उंचीने आजोबांइतक्याच. त्यांच्याच शेजारच्या खोलीत दाखल झालेल्या. आज्जी स्वभावाने अतिशय प्रसन्न आणि गोड, त्याला जोडून त्यांचा ड्रेसिंग सेन्सही तितकाच गोड किंवा छान फिगर असल्याने त्यांना काहीही सूट होत असावं. आज्जींना विस्मरणाचा विशेष त्रास नाही, म्हणजे चावी विसरणं वगैरे किरकोळ. मात्र त्यांच्याहीकडे योगायोगाने मरून कलरच्याच दोन वॉकिंग स्टिक्स!

या दोन व्यक्तींच्या मी प्रेमात पडले, यात नवल नाहीच पण ते दोघंही एकमेकांच्या फार पटकन प्रेमात पडले, ही खरी बेस्ट आणि गोड गोष्ट! ज्यामुळे मलाच फार आनंद झाला.

ते सेम उंचीचे आणि सेम टू सेम रंगाच्या काठ्या घेऊन फिरतांना आणि एकमेकांसोबत गुजगोष्टी करत सतत बसलेले असल्याने त्यांच्याकडे पाहून अगदी 'रबने बनादी जोडी' असे सर्वांनाच वाटते.

त्यांना एकत्र राहायचे आहे का, असा प्रश्न विचारायचे काम मला बॉसने दिले. ह्या प्रश्नाने आजोबा आज्जींचे चेहरे अगदी उजळले. असे होऊ शकेल का? तुम्ही हे करू शकलात तर खूप आनंद होईल, असे उलट आज्जी म्हणाल्या.

त्यांना एकच डबल रूम न देता ते सध्या राहत असलेल्या सिंगल रुम्सपैकी एकाची लिव्हिंगरूम तर दुसऱ्याची बेडरूम करण्याचे ठरले. जेणेकरून त्यांचे पुढेमागे पटेनासे झाले तर परत त्यांना सिंगल रुममध्ये शिफ्ट करणे सोपे जावे. ठरल्याप्रमाणे व्यवस्था केली गेली आणि आता हे लव्हबर्ड्स अतिशय प्रेमाने आणि एलिगंटली वावरत आहेत.

सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या सिटिंग कॉर्नरला लागून टेरेस असल्याने भरपूर सूर्यप्रकाश आत येतो. त्यामुळे तिथले सगळे तिथेच राउंड करून बसतात. आज्जी आजोबा शेजारी शेजारी बसतात.

परवा मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलेले असतांना ९५ वर्षाच्या एक आज्जी त्यांच्या रूममधून आल्या आणि ग्रुपला जॉईन झाल्या. त्यांच्याकडे बोट दाखवत आपल्या ह्या आज्जी म्हणाल्या, ह्या बाई आणि मी एकाच वर्गात होतो.

मी विचारलं, कसं काय? तुमच्यात आणि त्यांच्यात तर ९ वर्षांचं अंतर आहे. त्यावर आज्जी उत्तरल्या, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आधीच मुलं कमी असल्याने एकाच वर्गात सगळी मुलं एकत्र बसायची आणि एकच शिक्षक असत.

आमच्याकडे वह्या पुस्तकं असं काहीही अभ्यासाला नसे. शिक्षक वर्तमानपत्र देत असत, त्यातीलच मजकूर वाचायचो आणि कॉलममध्ये असलेल्या मोकळ्या उभ्या-आडव्या जागांमध्ये आम्ही लिहायचो. असं झालं आमचं शिक्षण.

मग आज्जींनी त्यांच्या कुटुंबाविषयी सांगितलं. वडील युद्धात मारले गेलेले. आई आजाराने गेली. चार बहिणी एकट्या पडलेल्या. एक अतिशय श्रीमंत कुटुंब आपल्या ह्या आज्जींना दत्तक म्हणून आपल्या घरी घेऊन गेलं. आज्जी रड रड रडल्या. माझ्या भावंडांशिवाय मी नाही राहू शकत म्हणून त्यांनी आकांततांडव केला. शेवटी ह्या कुटुंबाने त्यांना परत घरी सोडलं. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्या बहिणी जगत होत्या. आज्जींचे नशीब चांगले असल्याने त्यांना पुन्हा एका कुटुंबाने दत्तक घेतलं, मात्र यावेळी फक्त शिक्षणासाठी. त्यांना आपल्या घरी स्वतःच्या भावंडांसोबत राहण्याची मोकळीक होती.

नंतर आज्जींचे शिक्षण पूर्ण झाले आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करत असतांना लग्नही झाले. आता नवरा नाही. एक मुलगा आहे. लांब कुठेतरी जॉब करतो आणि दर रविवारी आईला भेटायला येतो.

युद्धकाळात होरपळून निघालेल्या अनेक कुटुंबांपैकी आज्जींचेही एक. मात्र त्यांच्याकडे पाहून हे जाणवतही नाही. त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे आणि सकारात्मक विचारांमुळे त्यांच्या आयुष्यात येणारी सगळी वळणं कायम त्यांना सुंदर ठिकाणीच पोहोचवत असतील का? की त्या आज्जी तिथे असल्याने ती ठिकाणं सुंदर भासत असतील, हा प्रश्न मला त्यांच्याकडे बघितल्यावर पडतो.

सकीना वागदरीकर-जयचंदर
09.07.2022

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४६

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या जर्मनीतील सिनियर केअर होममध्ये मी दुपारच्या राउंडला गेलेले होते. दुपारची वेळ  वामकुक्षीची, त्यामुळे शक्यतो दरवाजा वाजवून कोणाची झोपमोड करणे, मी टाळते. जे जागे असतात, हे माहिती असते, त्यांनाच भेटते किंवा ज्यांचे दार उघडेच असते, तिथे हळुच डोकावून, जागे आहेत ही खात्री करून घेऊन मग भेटायला, बोलायला जाते.

अशाच एका दुपारी दुसऱ्या मजल्यावरच्या एका डबलरूमचे दार उघडे दिसले म्हणून मी चेक करायला गेले. एका बेडवरच्या आज्जी गाढ झोपलेल्या आणि दुसऱ्या वाचत बसलेल्या होत्या. झोपलेल्या आज्जींना डिस्टर्ब होऊ नये, म्हणून मी वाचत बसलेल्या आज्जींनाही हॅलो वगैरे न करता तिकडून निघाले. आज्जींची आणि माझी नजरानजरही झालेली नव्हती, त्यामुळे मला वाटलं, त्या वाचनात गढलेल्या आहेत. मात्र मी जशी बाहेर जायला वळले, तशा त्या म्हणाल्या, कोण आहे? मी कोण ते हळू आवाजात सांगितले आणि ह्या दुसऱ्या आज्जी झोपल्या असल्याने आपण नंतर बोलूया, असे म्हणाले.

त्यावर ह्या आज्जी वैतागून म्हणाल्या, त्या तर कायमच झोपलेल्याच असतात, मग तुम्ही माझ्याशी कधी बोलणार? मी ही माणूस आहे, मलाही कोणीतरी बोलायला लागतं. ह्या बाई बोलायचे तर दूरच, साधे हसत सुद्धा नाहीत. त्यांची मुलगी आणि नात इतक्या लांबून म्युनिकहून खास त्यांना मागच्या आठवड्यात भेटायला आली होती, पण ह्यांचा काही बोलण्याचा मूड कधीही नसतोच. मुलीसमोरही अशाच दुर्मुखलेल्याच राहिल्या.

आज्जींचे म्हणणे खरेच होते. त्या आज्जींचे नक्की काय बिनसलेले आहे, ते माहिती नाही. ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्यांचे एक ब्रेस्ट रिमूव्ह केलेले आहे. त्या बोलायला लागल्या की त्यांना शब्द फुटत नाहीत. त त त त करतात. फारच दुर्मिळ असे स्मितहास्य कधीतरी करतात. मी फिरायला घेऊन जाऊ का, हे विचारले तर कायम नाहीच म्हणतात. रेडिओ लावू देत नाहीत. ब्रेकफास्ट करायला जातात आणि येऊन झोपतात, जेवायला जातात आणि परत येऊन झोपतात.  मी गप्पा मारायला लागले की डोळे मिटून घेतात. त्यांनी स्वतःभोवती एक कोष विणलेला आहे आणि त्यात त्या कोणालाही शिरू देत नाहीत.

त्यामुळे ह्या नवीन आलेल्या दुसऱ्या बडबड्या आज्जींना त्यांच्याकडे बघून बोअर झाले नाही, तरच नवल.

मग त्या झोपी गेलेल्या आज्जींच्या झोपेची पर्वा न करता आम्ही बोलायला लागलो आणि एक वेगळेच आणि मस्त व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर उलगडत गेले.

किरकोळ अपघातामुळे तात्पुरते अपंगत्व आलेल्या ह्या आज्जींना एका महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीसाठी आणि देखरेखीखाली ठेवण्यासाठी इकडे दाखल केले गेलेले होते.

ऍनिमल रेस्क्यू वर्कर आणि फ्री लान्स लेखिका म्हणून आयुष्यभर जगलेल्या ह्या आज्जींना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांच्या राहत्या घरात रेस्क्यू करून आणलेल्या ४ मांजरी आहेत.

आज्जींनी इथे तिथे अडकून पडलेले प्राणीच फक्त वाचवले नसून दुःखी जाणवलेले कोणाच्याही घरातले कुत्रे, झू मधली माकडे इ. असे कोणत्याही प्राण्याची चोरून सुटका करून आणून त्यांना ऍनिमल शेल्टर नाहीतर जंगलात सोडलेले आहे. त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना ह्या सगळ्यात कायम मदत केली आहे.

तुम्हाला पोलिसांनी कधी पकडले नाही का? असे विचारले असता, आले होते ना पोलीस एकदा घरी.  असे म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एकदा त्यांना एक दुःखी कुत्रा दिसला आणि त्यांनी त्याला मालकाकडून विकत घ्यायचे ठरवले. मात्र मालकाने अव्वाच्यासव्वा किंमत सांगितल्यावर आज्जी त्यांच्या मैत्रीणीला घेऊन जाऊन मध्यरात्री त्यांच्या बंगल्याचे गेट तोडून कुत्र्याला सोडवून घेऊन आल्या होत्या.

दुपारीच मालकाला कुत्र्याची किंमत विचारलेली असल्याने त्याने आज्जींचे व्यवस्थित वर्णन करून पोलिसांना त्यांच्या घरी पाठवले असणार. पोलीस घरी आले, त्यांनी झडतीही घेतली पण घरात कुत्रा सापडला नाही. कसा सापडणार? त्याला ऑलरेडी शेल्टर होममध्ये पाठवलेले होते.  आज्जींना पोलिसांनी विचारले, खरे सांगा, कुत्र्याला कुठे लपवले, त्यावर त्या हसत हसत म्हणाल्या, माझ्या खिशात. या आणि घेऊन जा. पोलीस वैतागून निघून गेले.

मग आज्जींनी सांगितले की त्यांनी जसे अनेक प्राण्यांना वाचवले आहे, तसेच त्यांच्या मांजरीने त्यांना वाचवले. ही मांजर कुठेतरी अडकली होती आणि आज्जींना तिला वाचवून घरी आणले होते.

एकदा ती मांजर सतत त्यांचा ड्रेस ओढून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. आज्जींना शंका आली की तिला त्यांच्या शरीराचा वेगळा गंध तर येत नसावा? म्हणून त्या स्त्री रोग तज्ज्ञाकडे गेल्या.

त्यांनी टेस्टस केल्या आणि आज्जींना पहिल्या स्टेजमधला कॅन्सर असल्याचं निदान झालं. डॉक्टर म्हणाले एक ब्रेस्ट काढावं लागेल. आज्जी क्षणभरही विचार न करता अथवा दुःखी न होता म्हणाल्या होत्या की लगेच काढून टाका. अख्ख्या आयुष्यासमोर हे अवयव काही फार महत्वाचे नाहीत. लवकरच त्यांचं ऑपरेशन करून एक ब्रेस्ट काढून टाकण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचला.

एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन आज्जी, दोघीही ब्रेस्ट कॅन्सरच्याच पेशन्ट,  पण दोघी किती वेगवेगळ्या! एक डिप्रेशनच्या शिकार तर दुसऱ्या उत्साहाने ओथंबलेल्या..

मला माणसाच्या पिल्लांपेक्षा प्राणी आवडतात, त्यांच्यात मी रमते, त्यांना आनंदी, सुखी आयुष्य दिले की मला समाधान मिळते म्हणणाऱ्या.

त्यांना भेटायला गेलं की पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्याची खात्रीच.  आज्जींचा एक महिन्याचा स्टे संपून त्या गेल्याही घरी. आमचा निरोप घ्यायचा मात्र राहूनच गेला. पण त्या मला कायम आठवत राहतात, त्यांच्या रम्य प्राणी-कथा आणि आनंदी चेहऱ्यासह..

सकीना वागदरीकर-जयचंदर
११.०७.२०२२

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४७

"आजीच्या जवळी घड्याळ कसले, आहे चमत्कारिक, देई ठेवुनी ते कुठे अजूनही, नाही कुणा ठाऊक.."  माझे बाबा त्यांच्या नातवंडांना झोपवतांना गात असलेलं गाणं ऐकलं की मला माझी आज्जी-आईची आईच आठवायची कायम.

ह्या गाण्यातल्या आज्जीकडे कुठलेही घड्याळ नसूनही तिला दिवसाचा कुठला प्रहर आणि वेळ सांगता यायची, तशीच माझ्या कस्तुरा आज्जीलाही यायची.  ती निरक्षर होती. पण आता किती वाजले असतील, हे ढोबळपणे सांगू शकायची कायम. नाशिक पुणे रस्त्यावर येणाऱ्या स्टेशन्सची नावं आणि त्यांची ऑर्डरही तिला अचूकपणे सांगता यायची. इतकेच नाही तर ती हिशोबातही चोख होती.

आज हे गाणं आठवायचं कारण म्हणजे जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते, तिथे मला भेटलेल्या एक उत्साही आज्जी.  त्यांची गोष्ट मी आज सांगतेय.

केक आणि कुकीज बेकिंगमधल्या त्या एक्स्पर्ट.वेगवेगळ्या व्हरायटीचे केक बनवतांना त्या माप फक्त 'फील' करतात. टायमरही लावत नाहीत. ओव्हनमधल्या केककडे बघूनच त्यांना कळतं की तो बेक झाला असेल की नाही.

केक माझा लहानपणापासून आवडता. पण तो बेकरीत मिळणारा नाही तर माझ्या आईच्या हातचा. माझी आई आमच्या लहानपणी आणि नंतरही अनेक वर्षे लोखंडी कढईत वाळू गरम करून अंदाजपंचे गव्हाचं पीठ, तूप, साखर, दूध, व्हॅनीला इसेन्स घालून गॅसवर खरपूस भाजून केक बनवायची. अजूनही कधीतरी करते. त्याचा तो खमंग दरवळ आणि तोंडात विरघळून जाणारा चवदार तुकडा आठवला की मी नॉस्टॅल्जिक होते.  आईच्या ह्या बेसिक केकची चव आणि मागच्या वर्षी ख्रिसमसच्यावेळी आमच्या संस्थेतील ह्या आज्जींनी कंपनीतीलच ओव्हनमध्ये बेक केलेल्या कुकीजची चव डायरेक्ट कनेक्ट करता आली.

त्या चवीमुळे आज्जींचे आणि माझेही कनेक्शन जुळले. त्या दिवशी आज्जींकडे लगेच जाऊन त्यांच्या कुकीजचे कौतुक करून त्यांच्याकडून रेसिपी घेऊन मी तशाच कुकीज घरी बनवल्या. सगळ्यांना आवडल्याही.  चव सिमिलर आली, तरी पण मला त्यांच्यासारख्या तोंडात विरघळून जाणाऱ्या कुकीज जमल्याच नाहीत. मग कुठे चूक झाली असेल, हे त्यांनी मला स्टेप बाय स्टेप विचारून शोधून काढलं. ही चव तुमच्या हाताचीच असणार, असे म्हटल्यावर जोरात हसत माझा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, घे, आता तुझ्याही हातात ती उतरली बघ.

अशा ह्या आज्जी. मागच्यावर्षी त्या संस्थेत दाखल झाल्या तेंव्हा मला खासकरून सांगितलं गेलं होतं की त्यांना नक्की भेट, त्या डिप्रेशनमध्ये आहेत फार.

मी भेटले, त्यावेळी त्या दुसऱ्या मजल्यावर डबल रूममध्ये राहत होत्या. सिंगलरूमसाठी त्यांनी ऍप्लाय केलेलं होतं आणि वेटिंग लिस्टवर होत्या.

ह्या आज्जींचे मिस्टर वारलेले आणि एक मुलगा ह्याच शहरात आणि दुसरी मुलगी स्वीसमध्ये राहणारी. आमच्या कंपनीतच जॉब करणाऱ्या एकीच्या त्या नातेवाईक. तिच्याकडून समजलं की त्यांना सायकियाट्री वॉर्डमध्येही काही महिने ठेवावं लागलं होतं. इतकी त्यांची परिस्थिती बिकट होती.

आज्जींना भेटले, तेंव्हा त्यांनी रडत रडत बरंच काही सांगितलं, जे आता मला नीट आठवतही नाहीये. मी त्यांचे सांत्वन केले होते आणि त्यांनी त्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त केली होती, इतकेच आठवते. आमच्या अधूनमधून भेटी घडत राहिल्या. आज्जी हळूहळू सावरत असलेल्या जाणवत होत्या.

नंतर काही आठवड्यांनी त्यांना तिसऱ्या मजल्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी सिंगल रूम उपलब्ध झाली. तेंव्हा मी त्यांना भेटायला गेले. तर त्यांची रुम अगदी घरच्यासारखी सुंदर सजवलेली होती. एक गोष्ट मला त्यातली अतिशय आवडली ती म्हणजे खिडकी शेजारच्या भिंतीलाच पक्षी आणि झाडांचं चित्र असलेला हिरवा-गुलाबी पडदा लावलेला होता, ज्यामुळे त्यामागेही एक खिडकी असेल, असा भास निर्माण व्हावा.

आज्जींचे डिप्रेशन आता पार उडून गेले होते. त्यांच्या रुमसारख्याच त्या खूप फ्रेश आणि उत्साहात दिसत होत्या. त्यांनी सांगितले की त्या आता सर्व ग्रुप ऍक्टिवीटीजमध्ये भाग घेतात.

कुकीज खाऊ घातल्यानंतर त्यांनी एकदा कंपनीत एक मस्त केकही बेक केला आणि आम्हाला खाऊ घातला. त्यांची नातेवाईक आमच्याच डिपार्टमेंटला असल्याने आम्हाला तो मिळाला. नाहीतर शंभरएक एम्प्लॉईजसाठी केक बनवणे आणि सर्वांच्याच वाट्याला तो येणे अवघड आहे.

मग मी आज्जींना म्हणाले मलाही तसा केक बनवायला शिकायचे आहे. तुम्ही शिकवाल का? मी सगळे साहित्य आणेन, आपण इकडे बनवूया.

आज्जींनी आनंदाने होकार दिला. मी साहित्य आणले आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात आज्जी आणि मी पाऊण तासात तो केक बनवलासुद्धा! माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना दिला आणि घरीही चवीसाठी आणला. सर्वांनाच तो खूप आवडला.

केक बनवता बनवता आज्जींसोबत खूप छान गप्पा झाल्या. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने हसत हसत उत्तरं दिली. त्यांनी सांगितलं , की घरी असतांना दर आठवड्याला त्या एक वेगळ्या व्हरायटीचा केक बनवत. आता इथेही ते रुटीन चालू ठेवू शकत असल्याने त्यांना इथे घरच्यासारखेच, घरात राहिल्यासारखेच वाटते. आमच्या काही कलिग्जही त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या कलीग्जसाठी आज्जींकडून केक बनवून घेतात.

केक कुणाकडून शिकलात, हे विचारले असता, त्या म्हणाल्या, त्यांची आई एक ग्रेट कुक होती. ती स्वयंपाकबरोबरच केकही खूप छान बनवायची. वेगवेगळ्या व्हरायटीज करायची.  त्यामुळे केक बनवायला त्या त्यांच्या आईकडूनच शिकल्या. त्यांची आई वयाच्या ५० व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरने गेली आणि ह्या आज्जींनाही नेमका तोच आजार होता, ज्यातून आता त्या पूर्णपणे बऱ्या होऊन बाहेर आल्या आहेत. त्यांचे एक ब्रेस्ट काढावे लागले पण त्यांनी सिलिकॉन इंप्लान्ट केलेले असल्याने ते कळत नाही. ब्रेस्ट कॅन्सर होऊन ब्रेस्ट काढाव्या लागलेल्या आणि मला भेटलेल्या ह्या तिसऱ्या आज्जी.

तुम्ही यातून स्वतःला कसे सावरले, असे विचारले असता, काही नाही गं विशेष.. माझे एक ब्रेस्ट वॉर्म तर दुसरे कोल्ड इतकाच काय तो फरक असे जोरात हसत हसत त्यांनी मला सांगितलं आणि मला टाळी देत हसवलं सुद्धा!

काय एकेक माणसं असतात ना! खरोखर ग्रेट. मी थक्क झाले आणि मनोमन त्यांच्यासमोर हात जोडले.

सकीना वागदरीकर-जयचंदर
१६.०७.२०२२

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४८

दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीत हॅनोवर शहरात ज्या सिनियर केअर होममध्ये मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करतेय, तिथे भेटायला मिळालेल्या अविस्मरणीय व्यक्तीमत्त्वांपैकी एक अशा आजोबांची गोष्ट मी आता सांगणार आहे.

तांबूस पिंगट रंगाचे डोळे, कॉफी कलरच्याच पण लाईट आणि डार्क अशा वेगवेगळ्या शेड्सच्या पॅन्ट्स, वेगवेगळ्या रंगांचे पण कायमच चेक्सचे कॉलर असलेले फुल किंवा हाफ शर्ट घालणारे, छान उंची आणि बांधा असलेले असे एक आजोबा आमच्या संस्थेत दाखल झाले. नाकीडोळे खूपच रेखीव आणि सरळ रेषेत असलेले पांढरेशुभ्र दात ते हसले की चमकतांना दिसत. ते दात खरे होते की ती कवळी होती, याची कल्पना नाही.

ते ज्या रंगाचा शर्ट घालत, त्याचं प्रतिबिंब डोळ्यात पडल्याने त्यांचे डोळे कधी हिरवे तर कधी निळे असे वेगवेगळ्या रंगांचे दिसत.

असे हे गोड आजोबा, बोलायलाही तितकेच गोड. आमच्या पहिल्या भेटीतच त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. माझा हात हातात घेऊन म्हणले होते, "आह! सकीना! किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा रंग, तुमचा गंध..." मला गंमत वाटली हे ऐकून आणि मी फक्त हसले होते यावर. जर्मनीत आल्यापासून अशाप्रकारे कौतुक करणारी मंडळी मला भेटली आहेत बरेचदा.

एकदा आमच्या संस्थेतल्याच एक आज्जी तर माझा हात हातात घेऊन मला म्हणाल्या होत्या, मी जर मुलगा असते, तर तुझ्याशीच लग्न केलं असतं. खूप गंमत वाटते मला इकडच्या लोकांच्या प्रशंसेच्या, फ्लॅर्टिंगच्या पॅटर्नची. मनात येतं, ते मोकळेपणाने बोलून टाकतात, कुठलाही संकोच न करता.

तर हे आजोबा आणि त्यांच्याकडून हे असं माझं कौतुक नेहमीच व्हायचं. त्यांची मी फक्त एक दोनदाच रूम व्हिजिट केली होती. कारण ते कायमच फिरतांना दिसायचे आणि दुपारी कॉफी टाईमला मी त्यांना डे रूम (डायनिंग हॉल) मध्ये अधूनमधून भेटायला जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायचे. आमच्या गप्पा खूप रंगायच्या. 

मी ही त्यांच्या दिसण्याचं कौतुक करायचे. तुम्ही भारतात असता तर हिरो म्हणून नक्की खपून गेला असता असं म्हणायचे. ते त्यावर जोरात हम्म सकीना, सकीना म्हणत गोड हसायचे.

हे आजोबा मूळचे पोलंडचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत आश्रय घ्यायला तिकडून निघाले, तर जर्मनीत पोहोचल्यावर अमेरिकन लष्कराकडून पकडले गेले आणि दीड वर्ष त्यांच्या कैदेत होते. युद्ध संपल्यावर त्यांची सहीसलामत सुटका झाली. मग जर्मनीमध्येच ते स्थायिक झाले.

त्यांची मुलगी ह्याच शहरात राहते आणि ती त्यांना भेटायला कायम यायची. त्यांच्याशी गप्पा मारायला एकदा त्यांच्या रूममध्ये गेले असतांना आजोबा म्हणाले होते, माझ्या मुलीने मला येत्या ख्रिसमसला तिच्या घरी चार दिवस राहायला बोलवले आहे पण मी तिला 'येणार नाही', असे सांगितलेय. आता हेच माझं घर. इथे मला खूप कम्फर्टेबल वाटतं. चार काय, एका दिवसासाठीही मला माझं हे घर सोडून जायची आता इच्छा नाहीये, इतकं मला इथे आवडतं.

मग त्यांनी त्यांच्या रूमच्या कॉर्नरला असलेल्या बोटीच्या आकाराच्या स्टँडकडे बोट दाखवत मला सांगितलं, ते बघ. त्यात सगळी वर्तमानपत्रच होती. मी विचारलं, हवंय का यातलं एखादं? तर म्हणाले, 'ते नाही, त्याच्या मागे बघ'. त्याच्या मागे एक फ्रेम ठेवलेली होती. तिचं तोंड भिंतीकडे होतं. 'ती बघ', असं ते मला म्हणाले. फ्रेम समोर केली असता त्यात एक न्यूड पेंटिंग दिसले. मला हे अनपेक्षित होतं. पुढे ते म्हणाले, ही माझी रूम आहे ना? मग मला हवं ते मी इकडे ठेवू शकतो ना? तर माझी मुलगी मला ही फ्रेम लावू देत नाही. हे नका करू, ते नका करू, असं फार बोअर करते. मला इथे मोकळं वाटतं. कोणाचाही अंकुश नसतो, त्यामुळे. पण इथेही मला तिचेच ऐकावे लागते.

मी काहीही उत्तर न देता ती फ्रेम जिथे आणि जशी होती तिथे आणि तशीच परत ठेवून दिली. त्यांनाही माझ्याकडून काही उत्तर वगैरे अपेक्षित नव्हतंच. ते फक्त मन मोकळं करत होते, असं लक्षात आलं.

एरवी नॉर्मल वाटणारे हे आजोबा एकदा मात्र  कपडे न घालता दरवाजा उघडाच ठेऊन त्यांच्या रूममध्ये सहजपणे वावरतांना दिसले. कोणीतरी नर्सला कळवले असेल. त्यामुळे तेवढ्यात ती येतांना दिसली आणि तिने त्यांना लहान मुलांना सांगतो, तसे कपडे घाला बरं लवकर, असे फिरू नका, असे समजवले. त्यांच्या डोळ्यात काहीही भाव दिसले नाहीत. ना संकोच, ना आणखी काही. ते आपल्याच धुंदीत होते.

असेच ते पुन्हा एकदा भान विसरुन त्यांच्या रूमबाहेरील हॉलवे मध्येही फिरतांना दिसले. पुन्हा नर्सला हस्तक्षेप करावा लागला. हेच कारण असेल का त्यांना त्यांच्या मुलीने संस्थेत दाखल करण्याचे? अशी शंका माझ्या मनात आली त्याक्षणी.

हे दोन प्रसंग सोडता पुन्हा ते कधीही तसे वावरतांना दिसले नाहीत.

नंतर साधारण ८०-८५ वयाचे हे पोलिश आजोबा त्यांच्याच फ्लोअरवरच्या ९०दी च्या पुढच्या एका पोलिशच आज्जींसोबत सिटिंग कॉर्नरवर गप्पा मारतांना दिसायला लागले.

ह्या आज्जी खरतर विस्मरणाच्या पेशंट. कधी धड बोलतील आणि कधी फटकून, त्याचा काहीच नेम नाही. त्यांची गंमत म्हणजे त्या फक्त नर्स मुलांकडूनच सगळी सेवा करून घेत. मुली त्यांना आवडत नसत. मुलं समोर आली की गोड हसत आणि बोलत. मुलींना हिडीस फिडीस करत. एका एक्सटर्नल थेरपिस्टला, चल जा इथून. मला तुझी गरज नाही असं ओरडून बोलल्या होत्या. माझ्यासमोरच हे घडलं. त्यामुळेच कदाचित तिला एकदम लाजिरवाणं आणि अपमानास्पद वाटलं असावं. ती एकदम रडायलाच लागली. मी तिला सांगितलं की आज्जी सगळ्यांशी असंच वागतात. तिला ऑफिसरूममध्ये घेऊन जाऊन कॉम्प्युटरवर डॉक्युमेंटेशनही दाखवलं, ज्यात  इतरांसोबतच मी ही केलेली नोंद होती, आज्जींच्या ह्या तुसड्या वागणुकीबद्दलची. ते बघून ती जरा शांत झाली.

बाकी सगळ्या गोष्टीत मदत लागणाऱ्या ह्या आज्जी स्वतःचे स्वेटर्स मात्र स्वतःच धुवून वाळत टाकत. अगदी टापटीप. हँगरला वगैरे लावून. त्यांना त्यांच्या आई वडिलांची फार आठवण यायची. आई असती, तर तिने माझं हे काम केलं असतं, माझी काळजी घेतली असती, आपले आईवडीलच आपल्यावर खरं प्रेम करतात, असं म्हणायच्या.

ह्या आज्जींचे आणि आजोबांचे कायमच एकत्र गप्पा मारतांना दिसणे छान वाटत होते. आज्जींना जास्त चालता यायचे नाही. त्यामुळे त्या कायम बसूनच असत. त्यामुळे आजोबाही त्यांच्यासोबत बसूनच गप्पा मारत.

एकदा ह्या आजोबांचा चेहरा मला उतरलेला दिसला. काय झालंय, असं विचारलं असता, त्यांनी मला सांगितलं, सकीना, एक मोठाच प्रॉब्लेम झालाय. सांगायला सुद्धा लाज वाटतेय मला. पण सांगितल्याशिवाय राहवतही नाही. होप, तू मला समजून घेशील. मी त्यांना तसा ऍश्यूरन्स दिल्यावर त्यांनी सांगितलं, काल रात्री ते त्या आज्जींच्या रूममध्ये गेले होते. ते दोघंही बेडवर होते आणि रात्रीची नर्स राउंडला आली आणि तिने त्यांना नको त्या अवस्थेत बघितले. तेंव्हापासून त्यांचा पार मूड गेलेला आहे. इथे काहीच प्रायव्हसी नाही. दार लॉक केले, तरी नर्सेसकडे चावी असतेच ना!

मी आजोबांना सांगितले, काळजी करू नका आणि वाईटही वाटून घेऊ नका. आपण यावर सोल्यूशन शोधून काढुया.

माझ्या बॉसला मी हा प्रॉब्लेम सांगितला. तिला खूप वाईट वाटलं. तिने सांगितलं, आपण नाईट नर्सेसना कल्पना देऊ या बाबतीत आणि त्यांच्या दारावर 'डू नॉट डिस्टर्ब' चा बोर्ड लावायला सांगू या.

दुसऱ्या दिवशी भेटून आजोबांना ही गोष्ट सांगायला मी उत्सुक होते, तर त्यांचा फ्लोअर करोनाचे पेशन्टस आढळल्याने आयसोलेट केला गेला होता.

दोन आठवड्यांनी कॉरंटाईन पिरियड संपला की आपण आजोबांना भेटून हे सांगू, असे मी ठरवले, तर आजोबाही पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. त्यांच्या मैत्रीण झालेल्या आज्जीही पॉझिटिव्ह झाल्या असल्याने दोघंही आपापल्या रूममध्ये आयसोलेट केले गेले. ३० रहिवासी असलेल्या फ्लोअरवर बघता बघता निम्मे लोक पॉझिटिव्ह झाले.

'त्या फ्लोअरवर जे निगेटिव्ह आहेत, त्यांच्याशी किमान तू बोलायला जा. ते पार वेडे होतील नाहीतर', असा आदेश मला आठवड्याभरानंतर बॉसकडून आला आणि मला भीतीने धस्स झालं.

तसं मी आयसोलेटेड फ्लोअरवर करोनाच्या सुरुवातीला काम केलेलं होतं, पण तेथील रहिवासी बहुतेककरून हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्याने कॉरंटाईन असत, करोनाने नाही. त्यावेळी तसा नियम केलेला होता. हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या व्यक्तीला कंपल्सरी कॉरंटाईन केले जायचे दोन आठवड्यांसाठी.

नाही म्हणायला एकेका फ्लोअरवर २/३ करोना पेशन्ट्स असतही अधूनमधून, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर नसत. शिवाय करोनाने त्यावेळी आपलं अक्राळविक्राळ रूप दाखवायला सुरुवात केलेली होती. बरेच जण जीव गमावून बसल्याच्या बातम्या ऐकायला मिळायच्या. त्यामुळे तिथे काम करण्याच्या विचाराने मी पार घाबरून गेले होते. रडलेसुद्धा! हे काम नाकारावे, असेही मनात आले.

मात्र मी विचार केला, त्या फ्लोअरवरच्या नर्सेसना, सफाई कामगारांना, डॉक्टरांना दुसरा काही पर्याय आहे का त्यांना भेटण्याशिवाय? मग मी तरी का घाबरून मागे फिरावे? तसेही मला फक्त बोलण्याचे काम आहे, तेही निगेटिव्ह लोकांसोबत आणि संपूर्ण झाकणारे सुरक्षित असे करोना किट घालूनच मी भेटणार आहे. शिवाय करोनाची लागण तर सुपरमार्केट, ट्रॅम, अशी कुठेही होऊ शकते. मनाला असे समजवून आणि मनावर दगड ठेवून मी त्या फ्लोअरवर गेले. करोना न झालेल्या निगेटिव्ह लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलणे, त्यांना धीर देणे, हे करत होते.

त्या फ्लोअरवरच्या ऑफिसरूममध्ये डॉक्युमेंटेशनसाठी कॉम्प्युटरसमोर बसलेले असतांना त्यासमोरच्या ग्लासच्या भिंतीतून पाहिले असता, समोरच आजोबांची रूम होती.

त्यांना जेवण द्यायला नर्सने दार उघडलं, आणि मला ते दिसले. त्यांना आयसोलेट करून एखादा आठवडा झाला असेल कदाचित. आजोबा खूपच खंगलेले दिसत होते. नेहमी टापटीप दाढी केलेल्या त्यांच्या दाढीची खुरटं वाढलेली दिसत होती. त्यांनी पॅन्ट घातली होती पण शर्ट घातलेला नव्हता. त्यांच्या रुममधल्या खुर्चीवर ते शक्ती नसल्यासारखे कुबड काढून बसलेले होते. त्यांची पार रया गेलेली दिसत होती. मी त्यांच्याकडे बघत असतांनाच त्यांची आणि माझी नजरानजर झाली. मी ग्लासच्या भिंतीपलिकडे असल्याने मला त्यांचा आवाज येऊ शकत नसाल तरी त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून ते रडत रडत 'सकीना' असे म्हणाले असल्याचे मला जाणवले. मी त्यांना हात केला आणि नर्सने त्यांच्या रुमचं दार बंद केलं.

ह्या आजोबांना यातून लवकर बाहेर पडायला मिळू  दे, अशी प्रार्थना मी मनात केली, मात्र त्याच्या पुढच्या ४ एक दिवसातच त्या फ्लोअरवरील पॉझिटिव्ह असलेला/ली एकेक जण करोनाने जात असल्याच्या बातम्या यायला लागल्या. एकूण १२ जण गेले, त्यात हे आजोबाही होते!

त्या आज्जी मात्र त्यातून सहीसलामत बऱ्या होऊन बाहेर आल्या. आज्जींना विस्मरणाचा आजार असल्याने त्यांना आजोबा गेल्याचे लक्षातही आले नाही. मात्र कधीकधी तिकडे खिडकीबाहेरच्या रस्त्यावर माझा एक मित्र राहतो आणि तो मला नेहमी हाका मारतो,असं म्हणायच्या. त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी नैसर्गिक मृत्यू येऊन हे जग त्याही सोडून गेल्या.

त्या मजल्यावर गेले की या आज्जी-आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

सकीना वागदरीकर-जयचंदर
१८.०७.२०२२

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

एका वर्षाच्या वर झालं मला डायरी लिहून. आज एका मैत्रिणीने आठवण काढली डायरीची आणि परत लिहायला घेतलं. ज्यांनी माझी डायरी वाचलेली नाहीये त्यांच्यासाठी माहिती. मी जर्मनीत एका सिनिअर केअर नर्सिंगहोममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून गेली साडेतीन वर्षं काम करते आहे आणि तेथील अनुभवांवर डायरी लिहिते आहे. 

रोज इतके अनुभव येतात की किती लिहू, काय लिहू, कुठून सुरुवात करू असे झाले आहे. तर मग आजच्या दिवसाबद्दलच लिहावे म्हणते!

आजचा दिवस तसा युनिकच गेला म्हणायला हवं. एका भागात एका आजोबांविषयी लिहिलं होतं की ते बायको आयसोलेटेड विभागात असल्याने तिचा विरह सहन न झाल्याने त्यांनी हाताची नस कापून घेतली होती. त्या गोष्टीला आता एका वर्षापेक्षा जास्त झालंय. 

त्यानंतर त्या आज्जी परत आजोबांच्या रूममध्ये परत आल्या आणि नंतर आजारपणात एक दिवस वारल्या. रात्रीची वेळ होती, त्या गेल्या तेंव्हा. ती पूर्ण रात्र पूर्णवेळ आजोबा आज्जींजवळ बसून होते. दुसऱ्या दिवशी दुपारी फ्युनरल सर्व्हिसचे लोक आज्जींना घेऊन गेले, त्या वेळपर्यंत ते आज्जींसोबत बसून होते. त्यांनी आज्जींच्या हातात एक फुलही ठेवलं होतं. 

आज्जी आयसोलेटेड होत्या, त्यावेळी विरह सहन न झालेले आजोबा त्या गेल्यानंतर मात्र एकदम स्थितप्रज्ञ दिसत होते. हसून माझ्याशी बोलले. म्हणाले, आज्जींचे स्वेटर्स, जॅकेट्स, पुलोव्हर्स जे हवे ते घेऊन जा. माझ्या तर अंगावरच काटा आला ते ऐकतांना. मी हसून हो, नंतर बघते म्हणले. मग आजोबा सगळी कागदपत्रं नीट वाचून, अनावश्यक ती सगळी फाडून फेकायला लागले. आज्जी शेजारच्या सिंगल बेडवर आणि आजोबा शेजारी हे काम करत होते. 

त्यांची मुलं नातवंडंही अजून आलेली नव्हती भेटायला. सकाळी नऊ-दहाची साधारण वेळ होती. त्यानंतर मी त्यांना थोडावेळ कंपनी देऊन परत काही काही वेळाच्या इंटर्व्हलने भेटत राहिले. मधल्या काळात त्यांची मुलं नातवंडं येऊन गेली असतील. मला माहिती नाही, पण आज्जींना न्यायला फ्युनरल सर्व्हिसची व्हॅन आली, तेंव्हा आजोबांसोबत मी होते. त्यांनी आज्जीच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांचा किस घेतला आणि हसतमुखाने त्यांना निरोप दिला. 

त्यानंतर आजोबांना सिंगल रूममध्ये शिफ्ट केले. जसे डबल रूममध्ये त्यांचे सामान छान लावलेले होते तसेच सिंगलरूम मध्येही लावलेले होते. आजोबांना छान गार्डन फेसिंगची रुमही मिळाली ह्यावेळी. डबल रूम रोड फेसिंगची होती. 

आजोबांकडे छान फर्निचर आहे. जुना पण भारी रेडिओ आहे, त्यावर ते ओल्ड क्लासिक्स लावून झोपतात. दिवसभर मस्त फॉर्मल शर्ट आणि पॅन्टस घालून वावरतात. स्वच्छ, ऑर्गनायझज्ड आणि हसरे असलेले हे आजोबा कोणाच्या अध्यात्माध्यात नसतात. कंपनीकडून घेतल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स वगैरे ऍक्टिवीटीजमध्ये भाग घेत नाहीत. जेवण, थोडे चालणे आणि रूममध्ये येऊन झोपणे. हा त्यांचा दिनक्रम. जास्त गप्पाही मारत नाहीत. 

अधूनमधून त्यांना डिप्रेशनचे attacks येतात. मग खिडकीतून घड्याळ फेकले एकदा. स्वतःही उडी मारण्याची इच्छा स्टाफकडे व्यक्त केली, त्यामुळे भर उन्हाळ्यातही त्यांची खिडकी मात्र टिल्टेड स्वरूपातच  थोडीशी ओपन होईल पण उडी मारण्याइतकी पूर्ण नाही, अशी लॉक करून ठेवली आहे. 

हल्ली त्यांचे नवीन सुरू झाले आहे. पाय फारच दुखतात म्हणून ते कापून टाका अशी विनंती करत आहेत. बटर नाईफ, फ्रूट नाईफ ते जे काही हाताला लागेल त्याने पायाला इजा करत असतात. कितीही लपवा त्यांच्यापासून, ते मिळवतातच. परवा मलाही म्हणाले, काप ना माझे पाय. मी म्हणाले, ओके चला, मी आणते इन्स्ट्रुमेंट्स. तर क्षणभर चमकले आणि मग विनोद समजल्यावर भरपूर हसले. तुमच्याकडे भारतात करता का तुम्ही असं? करवत आणून कापता का माझा पाय? प्लिज कापा ना! मी हो हो म्हणत होते आणि हसत होते, तर माझ्यासोबतच तेही भरपूर हसले, गप्पा मारल्या. कारण बाकी कोणत्याही प्रकारचं काहीही कौंसेलिंग त्यांच्या बाबतीत शक्यच नव्हतं. विनोद केल्याने क्षणभर का होईना, त्यांना हसू तरी आलं. 

आज सकाळी कोणास ठाऊक का पण पहिल्यांदा त्यांनाच भेटायची इच्छा झाली. सगळे पडदे बंद करून आणि रूम डार्क करून झोपलेले होते गाणी ऐकत. पायाच्या एका बोटाला प्लॅस्टर लावलेलं होतं. ते बोट एकदम काळं दिसत होतं. तिथेच स्पेशलायझज्ड नर्स होता. मी काय झालं यांना म्हणून विचारण्याच्या आधीच त्यानेच सांगितलं. ह्यांनी कुठून तरी पकड मिळवली आणि बोट जोरात खेचायचा रात्रीतून बराच वेळ प्रयत्न केलेला दिसतोय. आता त्या बोटाच्या नर्व्हस मेलेल्या दिसतायत. ऍम्ब्युलन्स बोलावली आहे. आत्ता येईलच त्यांना  घेऊन जायला. त्यांची बॅग, डॉक्युमेंट्स पॅक करून झालेली आहेत. 

आजोबा जागेच होते पण डोळे मिटून पडलेले होते.त्यांना काही कोणाशी बोलायची इच्छा नव्हती.  

ती पकड त्यांनी आमच्या हाऊस टेक्निशियन्स कडून मिळविली असेल, असं वाटून त्यांना विचारलं. तर ते नाही म्हणाले, याचा अर्थ, त्यांनी विकत आणली असू शकते. वॉकर रोल करत जाऊन लांबून वस्तू विकत आणण्याइतके त्यांचे पाय फिट आहेत. 

जरावेळाने इमेल आली की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे पुढील ट्रिटमेंटसाठी. आता बाकी अपडेट्स वेळोवेळी कळतीलच. 

सकीना वागदरीकर/ जयचंदर

२१.०९.२०२३

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५०

डायरीच्या मागच्या भागात स्वतःच्या पायाच्या बोटाला इजा करून घेणाऱ्या ज्या आजोबांविषयी लिहिले, ते आजोबा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांचे काही अपडेट्स समजले नाहीत. पण आज काही आठवड्यांनंतर हॉस्पिटलमधून परतलेल्या आजोबांना भेटले आणि त्यांची गोष्ट आज लिहायलाच हवी, असं मनात आलं म्हणून काम संपल्याबरोबर लगेच लिहितेय.

काही महिन्यांपूर्वी एकत्रच आमच्या सिनिअर केअर होममध्ये जोडीनेच हे आज्जी आजोबा दाखल झाले.  ९३ वर्षं वयाच्या आज्जी बेड रिडन आणि विस्मरणाचा आजार जडलेल्या तर आजोबा आज्जींपेक्षा २ वर्षांनी मोठे पण अजूनही बऱ्यापैकी फिटनेस असलेले.. कसल्याही आधाराशिवाय चालू फिरू शकणारे आणि आपली सगळी कामं स्वावलंबीपणे करू शकणारे असे.

"मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे दाखल झालो आहे. ६७(की असाच काहीतरी आकडा) वर्षांचा आमचा संसार. कायम एकत्रच राहिलोय तर आता या टप्प्यावर तिला सोडून राहू शकत नाही, म्हणून इकडे दाखल झालो." असं कारण त्यांनी मला सांगितलं.

आज्जी विशेष काही बोलू शकत नव्हत्या, पण आमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोतच होतं आणि त्यांना समजतही होतं, असं त्यांच्या एकंदरीत हावभावावरून मला जाणवलं.

आजोबांनी आज्जींसोबत अनेक वर्षे बेकरी चालवली, हे कळताच याच संस्थेत, याच मजल्यावर दुसरे एक असेच त्यांच्या बायकोसोबत बेकरी चालवणारे, बायको विस्मरण असलेली पण संस्थेतच राहत असलेली अशा फार मोठ्या योगायोगाची मला आठवण झाली जी मी आजोबांना सांगितली. तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का, असे विचारले असता ते हो म्हणाले आणि मी लगेच त्या दुसऱ्या आजोबांना ह्या नवीन आजोबांच्या रूममध्ये त्यांना भेटायला घेऊन आले.

दोघांनी छान गप्पा मारल्या. आपापली बेकरी कुठे होती, बेकरीत काय काय बेक करत, कोण कोण कॉमन ओळखीचे वगैरे गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या. आता ओळख झाली आहे आणि रूमही कळली आहे, तर परत भेटा एकमेकांना, असं मी सांगितलं. तर दोघंही हो म्हणाले, मला धन्यवादही दिले त्यांनी. नंतर एकमेकांना भेटले की नाही, काही माहिती नाही.

मी मात्र अधूनमधून दोघांनाही सेपरेटली भेटी देत होते, त्यांच्यासोबत विचारपूस, गप्पा सुरु होत्या. बेकरीवाले जुने आजोबा आणि आज्जी वेगवेगळ्या रुम्समध्ये आणि मजल्यांवर राहतात. याचे कारण मी एकदा त्यांना विचारले असता, ते म्हणाले होते की माझ्या बायकोला स्वतः उठता बसता येत नाही, म्हणून ते बेल्ट बांधून लिफ्टर लावून उठवतात-बसवतात, तेंव्हा तिच्याकडे मला बघवत नाही. मला मान्य आहे की ते तिच्या सोयी आणि सुरक्षिततेसाठीच हे सगळं करतात, पण खरं सांगू का? ती त्यावेळेला कसायाकडे कापायला नेत असलेल्या डुकरासारखी दिसते आणि मला फार अस्वस्थ होतं ते दृश्य पाहिलं की..

मग म्हणाले होते की तू कोणाला सांगू नकोस, पण माझ्या तरुणपणी एकदा मी माझ्या एका नोकरीत एकदा एक जिवंत डुक्कर कापलं होतं. ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं आणि मला दु:स्वप्नं पडून माझी झोपमोड होते. त्या जागी आता ही माझी बायको मला दिसते, त्याने मी खूप डिस्टर्ब होतो. म्हणून मी वेगळं राहायला लागलो. पण तिला रोज दुपारी जेवणानंतर भेटून ४ तास कंपनी देतो.

हे ८८ वर्ष वयाचे आजोबा एक दिवस मला जवळच्याच एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला घेऊन गेले होते. तर आईस्क्रीम पार्लरवाला आणि रस्त्यावर येणारे जाणारे, आईस्क्रीम खाणारे  असे मिळून किमान साताठ जण त्यांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून गेले!

मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, आजोबा तुम्ही फारच फेमस दिसता! तर त्यांनी मला बोटाने एका दिशेला पॉईंट आउट करून दाखवलं आणि सांगितलं, इथे जवळच तर माझी बेकरी होती. ५० वर्षं मी आणि बायकोने ती चालवली. इथेच जवळपासच्या बिल्डिंगमध्ये राहायला होतो. त्यामुळे ह्या भागातले बरेचजण मला ओळखतात.

गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या आजारपणात झालेल्या मृत्यूविषयीही सांगितलं आणि सून आणि नात येतात भेटायला पण नातीची आमच्यासोबत विशेष ऍटॅचमेंट नाहीये. या गोष्टीचं त्यांना दुःख होतं.

ही गोष्ट माझ्या लक्षात राहून गेलेली होती. त्यांची सून एकदा संस्थेत आलेली असतांना मी आजोबांची ही बोच तिला बोलून दाखवली, तेंव्हा ती म्हणाली, ह्या गोष्टीला हे दोघंच जबाबदार आहेत. मी माझ्या मुलीला तिच्या लहानपणी यांच्याकडे पाठवायचा प्लॅन करायचे, तेंव्हा हे दोघं बिझी असायचे, त्यांचे त्यांचे प्लॅन्स असायचे, ज्यात ते माझ्या मुलीला वेळ देऊ शकत नसत, मग मी तिला माझ्या आई वडिलांकडे पाठवायचे. साहजिकच तिची माझ्या आई वडिलांसोबत जास्त ऍटॅचमेंट आहे आणि यांच्यासोबत कमी.. पेराल तसे उगवते, ह्या म्हणीची आठवण करून देणारा आणि काहीसा अंतर्मुख करणारा हा किस्सा. 

तर असे हे संस्थेत आणि ह्या एरियातही जुने असलेले बेकरीवाले आज्जी आजोबा.  आम्ही नेहमीच भेटतो आणि आणि गप्पाही मारतो.

तर ते दुसरे नवे बेकरीवाले आजोबा इतके गप्पीष्ट नाहीत. तेव्हढ्यास तेवढे पण नम्रतेने बोलणारे. त्यांनी म्हणे नर्सेसच्या नाकात दम आणला. सतत त्यांच्या बायकोला बेडवरून उठवा, तिला मला (व्हीलचेअरवरून) चालायला घेऊन जाऊ दे, असे म्हणत. आज्जींना झोपेची गरज असे, तरीही, अगं ऊठ, चल बाहेर जाऊ, गप्पा मारू, म्हणून उठवून टाकत. ह्या आज्जीही, दिवसा झोपत, रात्री जागत आणि आजोबांचीही झोपमोड करत. असं दोघंजण मिळून एकमेकांचं झोपेचं तंत्र आणि स्वतःच्या तब्येती बिघडवून घ्यायला लागले आणि नर्सेसनाही बरंच कामाला लावायला लागले, म्हणून नर्सेसने त्यांची सेपरेट रुम्समध्ये व्यवस्था केली.

ते दोघंही वेगवेगळ्या मजल्यांवर राहू लागले. ही गोष्ट आज्जींना काही सहन होईना. विस्मरण झालेते असले तरी आजोबा आणि त्यांचा सहवास त्यांना पक्का लक्षात होता, त्यामुळे सतत जर्मन भाषेत फाटर फाटर (म्हणजे फादर फादर) म्हणून हाका मारू लागल्या. आजोबाही तिन्ही वेळचे जेवण खाण आणि रात्रीची झोप सोडता बाकी पूर्णवेळ आज्जींसोबत राहू लागले. सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यांना व्हीलचेअरवर बसवून आपल्या रूममध्ये आणत आणि त्यांचा हात धरून बसून राहत तास न् तास. गार्डनमध्येही फेरफटका मारायला घेऊन जात रोज नियमितपणे.

एक दिवस अचानक त्यांची पाठ प्रचंड दुखायला लागली. ती वाढू लागल्याने आज्जींना स्वतः उठून भेटायला जाणे आणि त्यांना रूममध्ये घेऊन येणे त्यांच्यासाठी अशक्य झाले. पण त्यांचे हे काम मग त्या त्या शिफ्टच्या नर्सेस करू लागल्या. आज्जींना जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळांना त्यांच्या मजल्यावर नेणे आणि इतरवेळी आजोबांकडे आणणे, हे इमानेइतबारे करू लागल्या. पण इतकी वर्षे स्वावलंबी असलेले आजोबा अचानकपणे आलेलं हे परावलंबित्व सहन न होऊन डिप्रेशनमध्ये गेले. इतकी की ते एका नर्सला म्हणाले की मी आत्महत्या करायचा विचार करतो आहे. आधी खिडकीतून बायकोला ढकलून देऊन मग मी ही उडी मारेन म्हणतो. म्हणून त्या नर्सने मला तडक ही बातमी कळवून आजोबांना कौंसेलिंग करायची विनंती केली.

मी आजोबांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी छान गप्पाही मारल्या. मला त्यांच्या आत्महत्येच्या प्लॅनविषयी मात्र ते काही बोलले नाहीत. त्यामुळे मी ही त्यांना काही कौंसेलिंग वगैरे केलं नाही. तुम्ही आणि आज्जी किती मस्त कपल आहात. तुमचं फार कौतुक वाटतं वगैरे त्यांना जगण्याविषयी रस वाटेल, असं सकारात्मक, प्रेरणादायी बोलले.  आज्जी त्यांच्यासोबत होत्याच. पण अतिशय शांत.  मग लंचब्रेक झाला. आजोबांनी मला आज्जींना जेवायला त्यांच्या मजल्यावर घेऊन जाण्याची आणि त्यानंतर बागेत फिरवून आणून परत त्यांच्या रुम्समध्ये आणण्याची विनंती केली. जी मी अर्थातच मान्य केली.

आज्जींचे जेवण होईपर्यंत त्यांच्यासोबत थांबले, त्यांना गार्डनमध्ये एक राउंड फिरवून आणले आणि आजोबांकडे आणून सोडले. आजोबांकडे पटकन परत जायचं म्हणून आज्जी फार पटापट जेवल्या. गार्डनमध्ये राउंड मारतांनाही पटापट आवर आणि मला त्यांच्याकडे घेऊन जा, असं मला म्हणाल्या. आम्ही सगळं आवरून आजोबांकडे गेलो, तोवर ते जेवतच होते. म्हणून मी त्यांना जर्मनमध्ये "गुटन अपेटिट" म्हणजेच "आपल्या जेवणाचा आनंद घ्या"  असे म्हणाले. तर इतका वेळ शांतपणे माझ्याकडून सेवा करून घेतलेल्या आज्जी एकदम ओरडून मला म्हणाल्या, "एकटं सोड त्यांना आणि जा इथून". आज्जींना काय वाटलं असेल, याची कल्पना करून, ह्या वयातही त्यांचा पझेसिव्हनेस समजून घेऊन मी त्या गोष्टीचे वाईट न वाटून घेता खेळकरपणे ती गोष्ट घेतली.

दुसऱ्या दिवशी आजोबांना पाठीचा एक्स रे करण्यासाठी न्यायचे होते आणि अजून काही तपासण्या करण्यासाठी २ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे सांगितले होते, त्यामुळे नर्स म्हणाली की आता मेडिकल ट्रान्सपोर्टची गाडी आलेली आहे आजोबांना घेऊन जाण्यासाठी, तर आज्जींना परत त्यांच्या मजल्यावर घेऊन जाशील का? एकदम धर्म संकटात सापडलेल्या व्यक्तीसारखी माझी अवस्था झालेली होती. पण काम करणं भाग तर होतंच. मला बघताच, कपाळावर आठ्या आणून आजोबा अत्यंत तुसडेपणाने मला "लिव्ह अस अलोन" असं जर्मन भाषेत म्हणाले. "माफ करा, पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी आलेली आहे आणि ते लोक तुमची वाट बघत आहेत", असे सांगून एकमेकांचा हातात हात धरून बसलेल्या रोमँटिक जोडप्याला एकमेकांना निरोप देण्याचं काम सांगून, त्यांचा घट्ट हात शक्य तितक्या अलगदपणे सोडवून आज्जींना त्यांच्या मजल्यावर घेऊन जाण्याचं खलनायकी कार्य केल्याने आज्जींच्या नजरेत मी अजूनच वाईट झाले. तुम्ही असे का करत आहात,  माझ्याशी बोलूच नका आणि माझ्या डोळ्यासमोर उभ्याही राहू नका, अशी ताकीद त्यांनी मला दिली. त्यामुळे पुढचे काही दिवस "फाटर,फाटर" करत रडत बसलेल्या आज्जींना शांत करण्याचं, त्यांचं मन रमवण्याचं मुळातलं माझं काम नर्सेसना करावं लागलं.

आज्जींची व्हीलचेअर ओढून ओढून आजोबांच्या आधीच नाजूक असलेल्या पाठीच्या बरगाड्यांची काही हाडं खूपच दुखावली असल्याने त्यांना जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, असं समजलं.

विस्मरणाचा आजार असलेल्या आज्जी काही दिवसांनी  आजोबांना विसरल्या आणि त्यांची आठवणही काढेनाश्या झाल्या. शांत राहू लागल्या. माझ्याशीही नीट बोलू लागल्या.

आज आजोबा हॉस्पिटलमधून परत आले आणि मला गार्डनमध्ये दिसले. त्यांना भेटायला एक नर्स आज्जींना घेऊन आलेली दिसली. पण दुसऱ्याच क्षणी "आज्जी मला इकडून परत घेऊन जा" म्हणू लागल्या, म्हणून नर्स त्यांना नेऊ लागली. मी जाऊन आज्जींना अर्थातच जर्मनमध्ये म्हणाले, "युवर फाटर इज बॅक." मग त्यांना त्यांच्याकडे परत घेऊन गेले. आजोबांनी आज्जींचा पकडला, त्यांनी तो झिडकारला, तर त्यांनी माघार न घेता पुन्हा त्यांच्या हातावरून हळुवारपणे हात फिरवला. आता आज्जींना स्पर्श ओळखीचा वाटायला लागलेला असणार, म्हणून त्यांनी विरोध केला नाही. मग आजोबा म्हणाले, हिला माझ्या रुममध्ये आणून सोडाल का? हे काम त्या आज्जींना घेऊन आलेल्या नर्सने केले. माझे ऑफिस अवर्स तेंव्हा संपलेले होते, त्यामुळे मी तिला तशी विनंती केली.

रोमँटिक जोडप्याची अशाप्रकारे पुनर्भेट झाली. त्यांची ताटातूट आणि आज पुनर्भेटही माझ्या साक्षीने झाल्याने आज त्यांच्याविषयी लिहिल्यावाचून मला राहवलेच नाही! ट्रॅममध्ये लिहायला सुरुवात करून घरी येऊन लगेच लिहून पूर्ण केला आजचा ५० वा आणि मोठा भाग. शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे धन्यवाद!

सकीना वागदरीकर/ जयचंदर
२८.०९.२०२३

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com