अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ

दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान, कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा थोडाफार आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखांमधून केला आहे.

Keywords: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग १)

दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान, कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा थोडाफार आढावा घेण्याचा प्रयत्न मी काही लेखांमधून करणार आहे.

------

१४९२ मध्ये युरोपमधून अशियाच्या शोधात निघालेला कोलंबस उत्तर अमेरिकेजवळील बेटांवर पोहोचला, आणि त्यानंतर जवळपास १०० वर्षं अनेक युरोपियन या नवीन जगाच्या सफरीकरता, अधिक जागेच्या शोधाकरता येतच राहिले. पण त्यांचा हेतू हा सोने, मसाल्याचे पदार्थ यांचा शोध, लूट, धर्मांतर, काही स्थानिकांना गुलाम म्हणून परत आणणे इथपर्यंतच असे. या नवीन जगात राहण्याच्या हेतूने कोणीही येत नसे. खरं तर कोलंबसच्या आधीही उत्तर अमेरिकेत अनेक खलाशांच्या सफरी झाल्याचे पुरावे आहेत. कोलंबसच्या आधी ५०० वर्ष नॉर्वेमधून Leif Eriksson नावाचा खलाशी कॅनडाच्या उत्तर पूर्व किनार्‍यावर पोहोचला होता. पण तिथे तो किंवा त्याच्यानंतर आलेले खलाशी/प्रवासी फारशी वस्ती करुन राहिले नाही. कोलंबसनंतर स्पेनमधून हर्नन कॉर्टेझ मेक्सिकोला पोहोचला, आणि तिथल्या अ‍ॅझ्टेक साम्राज्याबरोबर लढाईत गुंतला. परंतू स्पेनमधील लोकांनी मेक्सिकोमध्ये स्थलांतर केले नाही. स्थानिकांवर सत्ता चालवणे, त्यांचे धर्मपरिवर्तन करणे आणि मोठी लूट आपल्या देशात घेऊन जाणे हेच सर्व युरोपियनांनी पसंत केले. सोळाव्या शतकात ब्रिटिश, फ्रेंच, स्पॅनिश लोकांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील काही ठिकाणी मिलिटरी पोस्ट्स स्थापन केल्या आणि स्थानिकांबरोबर थोडाफार व्यवहार सुरु केला.

सतराव्या शतकात युरोपातली परिस्थिती चिघळत होती. सतत चालणारी युद्धं आणि त्यात सुरु असलेला कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट हा वाद याने तेथील प्रोटेस्टंट लोक पिचून गेले होते. प्रोटेस्टंट पंथाला पाठींबा देणार्‍या, सहानुभूती बाळगणार्‍या लोकांची धरपकड आणि कत्तल या काळात सुरु झाली. सर्वसामान्यांची आर्थिक स्थितीही आशादायी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये १६०७ मध्ये एका नवीन जगात (न्यू वर्ल्ड) एक नवी सुरुवात करण्याकरता उत्सुक असलेल्या १०५ पुरुषांना (सैनिक,'जंटलमेन', कारागीर आणि मजुर) घेउन एक जहाज इंग्लंडमधून अमेरिकेला (सध्याच्या व्हर्जिनिया राज्यातील) जेम्सटाउन या ठिकाणी पोहोचले. किनार्‍याचा हा भाग तोपर्यंत युरोपियनांकडून फारसा 'एक्स्प्लोअर' केला गेलेला नव्हता. सुरुवात आशादायक झाली असली तरी काही काळातच रोगट हवामान, दुषित पाणी, आजार (टायफॉइड, डिसेंट्री), मूळ रहिवाश्यांशी संघर्ष यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आणि ही वसाहत फारशी यशस्वी ठरली नाही. नंतरही काही अयशस्वी वसाहतींचे प्रयत्न झाले. १६२० मध्ये इंग्लंडमधील प्लिमथ या ठिकाणाहून प्युरिटन पंथाचे (इंग्लंडमधील प्रोटेस्टंट्स) साधारण १०० लोक आणि ३० खलाशी इंग्लंडमधील छळाला कंटाळून आणि धरपकडीला घाबरुन मेफ्लावर नावाच्या जहाजातून नवीन जगाकडे जायला निघाले. साधारण २ महिन्यांच्या प्रवासानंतर मॅसेच्युसेट्स राज्यातील एका किनार्‍यावर त्यांच्या जहाजाने नांगर टाकले. ही इंग्लिश लोकांची उत्तर अमेरिकेतली पहिली अधिकृत यशस्वी कॉलनी. या नवीन ठिकाणाचे नाव त्यांनी प्लिमथ असेच ठेवले.

यानंतर हळूहळू इंग्लंडमधून, आणि युरोपातील इतर भागांमधून लोकांचे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर स्थलांतर सुरु झाले. या लोकांनी झाडं, जंगलं साफ करुन राहण्याची व्यवस्था, शेती इत्यादी करता जागा बनवायला सुरुवात केली. यातील काही लोकांनी तेथील मूळ रहिवाश्यांबरोबर (नेटिव्ह/इंडियन्स) सलोख्यात राहायचा प्रयत्नही केला, आणि काही वेळा ते यशस्वीही झाले. पण अचानक आलेले हे लोक आपल्या जागेवर अतिक्रमण करताना, शिकार करताना, नासाडी करता पाहून नेटीव्ह अमेरिकन त्यांना विरोध करत आणि त्यातून चकमकी होत. बंदुकांनी लढत असल्याने युरोपियन हे बहुतेक वेळा या चकमकीत जिंकत असत. नेटिव्हज गनिमी काव्याने, रात्री हल्ला करुन नासधूस करत असत. जसे लोक वाढायला लागेल तसे अतिक्रमण, आणि संघर्ष वाढायला लागला. अनेक मूळ रहिवाश्यांच्या जमातीला पूर्वी आलेल्या खलाश्यांचे चांगले अनुभव नव्हते, कित्येकदा त्यांनी केलेल्या चांगुलपणाचा मोबदला हा फसवणूक आणि लुटीत झालेला होता त्यामुळे आलेल्या या लोंढ्याबद्दल ते साशंक होते. तरी व्यापार करण्याच्या हेतुने किंवा नाइलाजाने अनेक जमातींनी या नवीन पाहुण्यांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या भागात सुपीक जमीनीची कमी नव्हती, शेती करण्यास भरपूर वाव होता, पण ही शेती करायला मनुष्यबळ मात्र नव्हते, आणि तिथून सुरु झाली उत्तर अमेरिकेतील स्लेव्हरीला सुरुवात!

स्लेव्हरी किंवा गुलामगिरी ही युरोपियनांकरता नवी नव्हती. स्लेव्हरीचा इतिहास हजारो वर्षं जुना आहे. ग्रीक, रोमन साम्राज्यात अफ्रिकेतून गुलाम आणणे, किंवा पराजितांच्या योद्ध्यांना गुलाम बनवणे हे सर्वमान्य होते. लढाई, रानटी खेळ, राजेरजवाड्यांचे सेवक इत्यादी करता गुलामांची नेमणूक व्हायची. बरेच गुलाम नंतर मुक्त केले जायचे. त्यांच्या शौर्यावर सैन्यामध्ये त्यांची बढती होत जायची. अनेकदा गुलामांनी त्यांच्या लायकीप्रमाणे राजदरबारात काही महत्त्वाची पदे पण भूषविली आहेत. पण युरोपियन अमेरिकेत आले, आणि या स्लेव्हरी किंवा गुलामगिरीचा एक वेगळा आणि दु:खप्रत अध्याय सुरु झाला.

शेतीकरता मदत म्हणून १६१९ मध्ये २० गुलामांना अफ्रिकेतून आणले गेले ही अमेरिकेतील स्लेव्हरीची पहिली नोंद आहे. पण सुरुवातीला आणले गेलेले स्लेव्हज हे Indentured slaves होते, म्हणजे ते काही दिवसांच्या करारावर आणले गेलेले होते. कराराच्या मुदतीचा काळ संपल्यावर ते मुक्त होत. केलेल्या कामाबद्दल त्यांना पैसेही मिळत. ते गुलाम म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध, कुटुंबापासून तोडून जबरदस्तीने आणले गेलेले असले तरी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांवर जे कोसळले त्या मानाने ते भाग्यवान होते. यातील काही स्लेव्हजनी करार संपल्यावर जमिनी घेऊन स्वतःकरता शेती केल्याच्या नोंदीही आहेत. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ही पद्धत चालू राहिली. या काळात करिबियन बेटांवरील कापुस, तंबाखु आणि इतर पिके तर ब्राझिल आणि इतर पोर्तुगिज, स्पॅनिश कॉलनींमध्ये शेती, खाणव्यवसाय वाढायला लागले आणि कामगारांची मागणी प्रचंड वाढली. त्यांना पगार देणे, ठराविक काळानंतर मुक्त करणे हे मोठ्या बागायतदारांकरता फायदेशीर ठरेना. माणूस स्वार्थापायी किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तर-दक्षिण अमेरिकेत युरोपियनांनी अफ्रिकेतील दलालांसमवेत सुरु केलेला गुलामांचा व्यवसाय! जशी जशी युरोपियनांनी अमेरिकेतील मूळ रहिवाश्यांकडून अधिकाधिक जागा हिसकावून घेऊन शेतीची व्याप्ती वाढवली, तशी तशी अफ्रिकेतून गुलामांची आयात वाढत गेली आणि पुढची अडीचशे वर्षे या गुलामांच्या अनेक पिढ्यांकरता कमालीची क्लेशकारक ठरली.

transatlantic
(स्रोत - news.emory.edu)

अफ्रिकेतून उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत गुलाम आयात करण्याचा जो व्यापार होता होता त्याला 'ट्रान्स अ‍ॅटलांटीक स्लेव्ह ट्रेड' असे नाव पडले. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात करिबियन बेटे, दक्षिण आणि उतर अमेरिकेत गुलामांची मागणी वाढायला लागल्यावर अफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर गुलामांचा पुरवठा करणारे दलाल वाढत गेले. या दलालांच्या सशस्त्र टोळ्या आतल्या देशांमध्ये जाउन लोकांना बळाने, साखळ्या बांधून आणत आणि मोठमोठ्या जहाजांमधून उत्तर/दक्षिण अमेरिकेला, करिबियन बेटांवर पाठवत असत. यात स्त्रिया, पुरुष आणि मुलांचाही समावेश असे. एकदा का या दलालांनी पकडले की हे लोक कुटुंबांपासून नेहेमी करता तुटले जात, पळून जाणेही त्यांच्याकरता जवळपास अशक्यच असे. जहाजातही हे लोक कमी जागेत, एकमेकांना खेटून, साखळीत जखडून ठेवले जात. या जहाजातील परिस्थिती इतकी भयंकर असे ही बरेच लोक हे तिथेच आजारी पडून मरत. पण त्यांच्या जिवाला काही किंमत नव्हती. फुकट मिळालेले लोक अतिशय स्वस्तात अफ्रिकेतील दलाल विकत असत, आणि मग अमेरिकेला आणले की तेथील पुरवठादार त्यांची जास्त पैसे देऊन विक्री करत. एकदा एखादा गुलाम विकत घेतला की ती घेणार्‍याची मालमत्ता होत असे. मग तिचा वापर कसा करायचा हे मालक ठरवीत असे. विकत घेणारे लोक त्यांना विविध कामांकरता विकत घेत. गुलामाच्या वय, लिंग, तब्येत यावर त्याची किंमत ठरे. यात भरपूर घासाघीस चाले. या सर्वात गुलाम हा एका निर्जीव वस्तुप्रमाणे वागवला जाई. १८व्या शतकात अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर गुलामांच्या विक्रीकरता मोठी केंद्रे स्थापन झाली होती.

SlaveMarket
(स्रोत - http://historynet.com/)

SlaveMarket
(स्रोत - https://www.nationalgeographic.org/)

अमेरिकेत आलेले हे स्लेव्ह्ज सुरुवातीला गांगरलेले असत. भाषा, चालीरिती सगळेच वेगळे. सुरुवातीला त्यांना बाप्तिस्मा देऊन खिश्चन बनवण्यात येत असे. त्यांना नवीन नाव देण्यात येई. त्यांचे आडनाव मात्र मालकाप्रमाणे बदलत असे. त्यामुळे एकाच गुलामाचे आयुष्यात अनेकदा आडनाव बदलू शकत असे. या गुलामांचे पूर्वायुष्य पूर्णपणे पुसून टाकून त्यांचे मूळभूमीशी असलेले नाते हरप्रकारे लवकर तोडण्याचा प्रयत्न होत असे. स्लेव्हज ही मालमत्ता असल्याने त्यांना अक्षरशः निर्जिव वस्तूंसारखे वागवण्यात येई, त्यांचा भावनांना काहीही किंमत नसे. त्यांच्याकडून फक्त काम करुन घेणे, जास्तीत जास्त पिळवणूक करुन फायदा करुन घेणे, कुठलीही छोटी चूक (बहुतेक वेळेला फक्त मालकाची गैरमर्जी) झाल्यास चाबकाने फटके, सतत अपमान, खच्चीकरण, कमालीची जरब अशा परिस्थितीत हे स्लेव्ह्ज राहत. त्यांच्यात आपासात लग्ने होत. जास्तीत जास्त मुले होणे हे मालकाच्या फायद्याचेच असे, कारण मुलांवरही मालकाचा हक्क असे. मुले सुरुवातीची १०-१२ वर्षं आईवडीलांजवळ राह्त. त्यानंतर अनेकदा मालक त्यांना दुसरीकडे विकून टाकत असे. यात मुलांच्या, आईवडीलांच्या आर्त किंकाळ्यांना काहीच किंमत नसे. गुलाम हे मालमत्ता असल्याने ते एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत केले जात किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना भेटवस्तू म्हणूनही दिले जात. तिथेही गुलामांच्या कुटुंबाची ताटातूट होते असे. स्त्रियांचे आयुष्य अजुन भयंकर असे. जर मालकाची वक्रदृषी पडली तर तिला कोणीही वाचवू शकत नसे, कारण ती मालकाची मालमत्ता असल्याने तिचा नवरा किंवा बाप यांचाही तिच्यावर काही हक्क नसे व ते तिच्याकरता काहीही करु शकत नसत. 'तुम्ही काहीतरी पाप केलेले असल्याने तुम्हाला देवाने ही शिक्षा दिली आहे, तुम्ही कनिष्ठ, दुय्यम आहात, तुम्ही वाईट आहात, देवाचा तुमच्यावर कोप आहे' वगैरे गोर्‍या धर्मगुरुंकडून त्यांच्या भोळ्या मनावर बिंबविले जात असे. त्यांना शिक्षण घेण्यास मज्जाव असे. कुठलाही स्लेव्ह हा चोरुन शिक्षण घेताना दिसला तर जबर शिक्षा केली जाई. पळून जाताना आढळलेल्या स्लेव्हची अवस्था तर अतिशय भयंकर होत असे, जेणेकरुन इतर त्यातून धडा घ्यावा. बर्‍याच स्त्री गुलामांना मालकांपासून मुले झालेली असायची. अडीचशे वर्षात अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात मिक्स्ड ब्रीडींग झाले. मात्र या सर्व मुलांमध्ये अफ्रिकन रक्त असल्याने ते गुलामच रहायचे, आणि शेवटी विकले जायचे.

अमेरिकेला १७७६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तोपर्यंत अमेरिका ही इंग्लंडची कॉलनी म्हणून ओळखला जायचे आणि त्यांना इंग्लडच्या तिजोरीत कर भरावा लागायचा. थोडी स्वायत्तता असली तरी महत्त्वाचे निर्णय हे इंग्लंडचा राजाच घ्यायचा. अमेरिकेतील बुद्धीजीवी नेत्यांना, लोकांना हे सहन होत नव्हते, आणि तिथे त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात झाली. खरं तर अमेरिकेत आलेले लोक हे तिथल्या मू़ळ (नेटिव्ह) लोकांची जमीन बळकावून राहत होते, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्लेव्हरी कमी न होता वाढतच होती. पण याच राज्यांना इंग्लंडची त्यांच्यावर चाललेली सत्ता मात्र मान्य नव्हती. इंग्रज सैन्यावर निर्णायक विजय मिळाल्यावर ४ जुलै १७७६ अमेरिकेने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. स्वातंत्र्यानंतर १३ राज्यांनी बनलेल्या अमेरिकेत स्लेव्हरीच्या प्रश्नावर मात्र मुळीच एकमत नव्हते. व्हर्जिनिया आणि त्याच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये स्लेव्हरीला पाठींबा तर व्हर्जिनियाच्या उत्तरेला असलेल्या राज्यांचा स्लेव्हरी बंद करण्याकडे कल होता.

13-colonies.gif
(स्रोत - https://subratachak.wordpress.com/)

अमेरिकेचे फाउंडींग फादर्स अतिशय विद्वान, धोरणी लोक होते. त्यांच्यातल्या काहीजणांचा स्लेव्हरी बंद किंवा हळू हळू कमी करत नेऊन बंद करण्याकडे कल होता (आणि बर्‍याच जणांकडे स्वतःचे स्लेव्ह्जही होते). उत्तरेकडील राज्यांमध्ये काही लोक उघडपणे स्लेव्हरीला विरोध करायला लागले होते. अमेरिका स्वतंत्र झाल्यावर स्लेव्हरी बंद करावी याकरताही काही जणांचा आग्रह होता. पण अमेरिकेच्या दक्षिण भागातील राज्यांचा याला विरोध होता. दक्षिणेत अनेक मोठमोठे बागयतदार (प्लँटेशन ओनर्स) होते आणि त्यांची प्रचंड मोठी शेती ही या स्लेव्हरीच्या जीवावर चालत होती. या गुलामांमध्ये त्यांची मोठी आर्थिक गुंतवणूक होती. स्लेव्हरीचा अंत म्हणजे या स्लेव्ह कष्टकर्‍यांना पगार द्यायला लागणार, आणि त्याने व्यवसायातला नफा कमी होणार त्यामुळे स्लेव्हरी बंद करण्यास त्यांनी कडा विरोध केला. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरुवातीच्या १३ राज्यांमधील युनियन टिकवून ठेवण्याकरता स्लेव्हरीच्या प्रश्नावर काहीही निर्णय घेतला गेला नाही. अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटिटीव्ह मध्ये राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या राज्याला प्रतिनिधी मिळतात. स्लेव्हना मालमत्ता म्हणून समजले जात असल्याने मतदानाचा अर्थातच हक्क नव्हता पण त्यांना लोकसंख्येत धरण्याची दक्षिणेतील राज्यांची इच्छा होती जेणेकरुन संसदेत राज्याचे प्रतिनिधी म्हणजे वर्चस्वही वाढणार. उत्तरेतील राज्यांना हे दुट्टपी धोरण मान्य नव्हते. त्यामुळे तोडगा म्हणून प्रत्येक स्लेव्हला लोकसंख्येत तीन पंचमांश (३/५) धरले गेले. स्लेव्ह मालमत्ता असल्याने त्यांच्यावर कर भरला जात असे, कर भरतानाही माणशी हाच तीन पंचमांश आकडा धरला गेला. एका मनुष्यप्राण्याला गणताना त्याला पूर्ण माणूस म्हणून नाही तर ३/५ गणणे या पेक्षा अजून मानहानीकारक आणि लाजिरवाणे काय असू शकेल! स्लेव्हरीचा सगळा अध्यायच माणुसकीला काळीमा फासणारा होता.

अमेरिकेतील उत्तरेतल्या राज्यांमध्ये ही अमानुष पद्धत बंद करण्याकरता चळवळ जोर धरत होती आणि शेवटी १८०४ पर्यंत उत्तरेतील राज्यांनी स्लेव्हरी ही संपुष्टात आणली. इंग्लंड आणि युरोपातही ती या काळापर्यंत हद्दपार झाली होती. उत्तरेत संपूर्ण अमेरिकेत स्लेव्हरी संपवण्याकरता अ‍ॅबॉलिशनिस्ट मूव्हमेंट सुरु झालेली होती. पण दक्षिणेत मात्र ती जास्त अमानुष होत होती. याचे एक कारण म्हणजे १८०३ मध्ये अमेरिकेने फ्रांसकडून लुइझियाना पर्चेस कराराखाली मिळवलेला जमिनीचा खूप मोठा तुकडा! या करारानुसार थॉमस जेफरसनने मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला पसरलेला विस्तीर्ण, सुपीक जमिनीचा तुकडा फ्रांसकडून विकत घेतला. लुइझियानाची दमट हवा आणि कमी काळ असणारी थंडी यामुळे तिथे कापसाच्या पिकाची लागवड चांगली व्हायला लागली. काही वर्षांपूर्वी कॉटन जिन या यंत्राचा शोध लागला होता आणि कापूस हे अतिशय नफादायक पीक ठरायला लागले होते. अमेरिकेतील दक्षिणेतून कापूस उत्तरेतील राज्यात, आणि तेथील कारखान्यांमधून कपड्याच्या रुपांतरात सर्व युरोपमध्ये निर्यात होऊन जायला लागला. तंबाखु, कापूस, ऊस यांची प्रचंड मोठी शेती जॉर्जिया, अ‍ॅलाबामा, मिसिसिपी, लुइझियाना राज्यांमध्ये वाढली आणि स्लेव्हचे आयुष्य कमालीचे हालाखीचे झाले. या प्लँटेशन्स मध्ये स्लेव्ह्जकडून प्रचंड काम करुन घेतले जायचे. अपुरे खाणे, पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जबरी शिक्षा, राहायला हालाखीची परिस्थिती, प्लँटेशनचा मालक, मुकादम यांच्याकडून मारहाण... प्राण्यांपेक्षाही खालच्या पातळीवर या लोकांना वागविले जाई. या राज्यांमध्ये प्लँटेशन्सवर काम करण्याकरता विकले जाणे ही स्लेव्ह्जकरता सर्वात भयावह गोष्ट होती.

लुइझियाना पर्चेस नंतर पश्चिमेला वाढलेली अमेरिका
Louisianapurchase-1.gif
(स्रोत - https://www.enchantedlearning.com_)

अमेरिका स्वतंत्र झाल्यावर १७९० च्या आसपास अमेरिकेत साधारणपणे ७ लाख स्लेव्हज होते तोच आकडा १८६० पर्यंत ४० लाखापर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तरेत अ‍ॅबॉलिशन मूव्हमेंट जोर धरत होती, पण दक्षिणेच्या हातात बर्‍याच आर्थिक नाड्या असल्याने, आणि त्यांचा स्लेव्हरी बंद करण्यास कडवा विरोध असल्याने सरकार अजुनही स्लेव्हरी अधिकृतरित्या बंद करु शकत नव्हते. त्याकरता उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांचे एक मोठे युद्ध आणि प्रचंड रक्तपात होणे बाकी होते...

-------

स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim - ११ पुस्तकांचा संच
The Life and Times of Frederick Douglass - Frederick Douglass
12 Years a Slave - Solomon Northup
Incidents in the Life of a Slave Girl - Harriet Jacobs
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग २)

अमेरिकेतील स्लेव्ह ट्रेड बंद करणारा कायदा १८०७ मध्ये लागू झाला. या कायद्यानुसार अफ्रिकेतून अमेरिकेत गुलामांची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली. १८०३ मधल्या लुइझियाना पर्चेस करारानुसार मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला असलेली जवळपास ८,२७,००० स्क्वेअर मैलाची जमीन अमेरिकेने फ्रांसकडून विकत घेतली. मिसिसिपी नदीच्या किनार्‍यावरची दक्षिणेकडील जमीन खूप सुपीक होती. एवढ्या प्रमाणात सुपीक जमीन उपलब्ध झाल्यामुळे दक्षिणेतील प्लँटेशन्स/शेतामध्ये वाढ झाली. विविध पिकांची लागवड वाढली आणि शेतातील कामांकरता जास्त लोकांची गरज भासू लागली. स्लेव्ह ट्रेड वर बंदी आल्यानंतरही फ्लोरिडा आणि टेक्सास (जे तेव्हा अमेरिकेचा भाग नव्हते) मधून गुलामांची चोरटी आयात चालू राहिली. या गुलामांना आणणार्‍या जहाजांच्या कॅप्टन्सना पकडले तरी फारशी कडक शिक्षा होत नसे. नवीन कायद्यानुसार गुलामांच्या आयातीवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी अंतर्गत व्यापारावर मात्र बंदी नव्हती. या काळात स्लेव्ह्जची वाढलेली मागणी आणि बाहेरुन स्लेव्ह्ज आणण्यावर आलेली बंदी यामुळे अंतर्गत व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उत्तरेतील स्लेव्ह्ज हे मुक्त झालेले होते, कुटुंबाबरोबर एकत्र राह्त होते. या "फ्री" झालेल्या गुलामांना अनेकदा फसवून पळवून आणून दक्षिणेत दूर कुठेतरी विकून टाकले जात असे. त्यांचा परतीचा मार्ग जवळपास बंदच होऊन जाई. एक तर त्यांच्यावर विकत घेणारे कोणी विश्वास ठेवत नसत, आणि खरे बोलल्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अनेकदा दलालांकडून मारहाण व्हायची त्यामुळे ते सत्य सांगायला घाबरत असत. पळून जाणार्‍या स्लेव्हजना पकडण्याकरता शिकारी कुत्रे, बंदुकधारी पोलीस, मालकाची माणसे ही मागावर असायची आणि २ पायांवर पळण्याशिवाय त्यांना पर्याय नसायचा. जाउन जाउन एवढ्या मोठ्या देशात किती दूर जाणार!

collage1.jpg
(स्रोत - http://abolition.e2bn.org/ , www.downtoearth.org.in)

या काळात कापुस, ऊस, गहु, कणीस या पिकांची लागवढ वाढली त्याचबरोबर स्लेव्ह्जची मागणी आणि किंमतही वाढली. इलाय व्हिटनीने कॉटन जिन या यंत्राचा शोध लावल्यावर कापसातून सरकी (बी) काढणे सोपे आणि वेगवान झाले. पूर्वी ते काम गुलाम हाताने करत, आणि त्यात खूप वेळ जात असे. पण कॉटन जिनने कापसावर प्रक्रिया करण्याच पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणला आणि कापसाची मागणी प्रचंड वाढली. शेतीत दिवसरात्र काम करण्याकरता चिवट, कामसू स्लेव्ह्ज लागत. निरोगी पुरुष गुलामाची किंमत स्लेव्हरीच्या सुरुवातीला सतराव्या शतकात १० डॉलर्सपर्यंत होती, ती "डीप साउथ"मध्ये (लुइझियाना, मिसिसिपी, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, साउथ कॅरोलिना) एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत १२००-१५०० डॉलर्सपर्यंत वाढली. किंमत वाढली तशी जास्त कामाची अपेक्षा ठेवली जाऊ लागली. दक्षिणेतील बागायतदार अतिशय श्रीमंत होते. कापसाच्या पिकाने तर त्यांच्या संपत्तीत फार मोठी भर पडली होती. पण त्या श्रीमंतीचं वारंही कधी त्यांच्या स्लेव्ह्जना लागलं नाही. त्यांना दरवर्षी मालकाकडून कपड्यांचा जोड, मोजे, बूट आणि थंडीकरता कोट मिळे. हे त्यांना वर्षभर पुरवून वापरावे लागे. लहान मुलांना बहुतेकवेळा काहीच कपडे मिळत नसत त्यामुळे ते उघडेच असत. या स्लेव्ह्जना दर शनिवारी कणसाचे भरडलेले पीठ, थोडासे डुकराचे मास, काकवी, एखाद्या दोन भाज्या वगैरे अशी आठवड्याभराकरता शिधा मिळत असे. सगळे पदार्थ निकृष्ट दर्जाचे असत, प्रमाण कमी असे आणि ते एक आठवडा पुरवावे लागे. ही शिधा दर माणशी मिळत असे. पुरुषांना जास्त, आणि स्त्रिया-मुलांना कमी. राबणार्‍या माणसांना हे जेवण पुरत नसे त्यामुळे त्यांचे पोषण नीट होत नसे. शेतावर काम करणार्‍या स्लेव्ह्जना सूर्योदयाच्या आधी घर सोडावे लागे त्यामुळे रोज भल्या पहाटे त्यांना स्वयंपाक करुन, जेवणाचा डबा घेऊन निघावे लागे. थोडी मोठी परंतु अजुन कामावर न जाणारी भावंडे लहानांच्या जेवणाची, संगोपनाची जबादारी घेत. सूर्यास्तानंतरच दिवसाच्या अतीव श्रमानंतर हे स्लेव्ह्ज घरी येत. कुपोषणामुळे बालमृत्यूदर जास्त तर स्लेव्हजचे आयुर्मानही कमी असे.

नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया येथील स्लेव्ह्जची परिस्थिती ही "डीप साउथ" मधल्या राज्यातील स्लेव्ह्जपेक्षा जरा बरी होती. क्वचित काही जणांचे मालक त्यांना माणुसकीनेही वागवत. काम संपल्यावर इतर मार्गाने अर्थाजन करु देत, जवळपास विकल्या गेलेल्या मित्रमंडळी किंवा कुटुंबियांना अधुन मधुन भेटू देत. अर्थात गुलाम हा त्यांचा हा दर्जा तसाच असे, आणि परिस्थिती कधीही बदलू शकते याची त्यांना सतत जाणीव असे. कधी काही दयाळू मालक त्यांना मृत्यूनंतर मुक्तही करत असत. पण स्लेव्ह मुक्त करणे म्हणजे पैशावर पाणी सोडण्यासारखे असल्याने ते फार कमी प्रमाणात केले जायचे. स्वयंपाकघरात, बागेत, घोड्याच्या पागेत, दाई, नोकर, मदतनीस म्हणून काम करणार्‍या स्लेव्हचे आयुष्य शेतात काबाडकष्ट करणार्‍या त्यांच्या बांधवांपेक्षा थोडे बरे असायचे. परंतु स्लेव्ह्जना त्यांची जागा दाखवून देण्याकरता त्यांच्यावर वचक ठेवणे आवश्यक आहे आणि त्याकरता त्यांना नियमितपणे मारहाण, अपमान, खच्चीकरण करणे गरजेचे आहे अशा विचाराचे मालक आणि मुकादम सर्वच स्लेव्ह राज्यात जास्त होते.

माणूस हा मोठा चिवट प्राणी आहे, आणि ते या गुलामांच्या बाबतीत वेगळे कसे असेल! या अशा मानहानीकारक जीवनातही कसं पुढे चालत रहायचं, आनंदी रहायचं हे ते शिकले होते. किंबहुना याशिवाय वेगळे आयुष्यच त्यांना महिती नसल्याने असेल त्या परिस्थितीतून चांगल्या गोष्टी घडवण्याचा ते प्रयत्न करीत. चार ठिकाणी विकले जाऊन वेगळं आयुष्य जगून आलेले स्लेव्ह्ज हे बाकीच्या ठिकाणची इतरांना माहिती द्यायचे. रविवार हा त्यांचा सुटीचा दिवस. इतर दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत व्यस्त असलेले हे लोक रविवार सकाळ ही चर्चमध्ये घालवायचे. जवळच्या शेतातील स्लेव्ह्जशी, तिथे विकल्या गेलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींशी भेट होईल. गप्पांना उधाण येई. भक्तीसंगीतात या लोकांना विशेष रस होता. वेगवेगळ्या प्रकारची गाणी रचून, त्यांना संगीत देउन ती मिळून गाणे हे त्यांच्या गेलेल्या आठवड्याचा शीण घालवण्याचे साधन असे. हे अफ्रिकन अमेरिकन गुलाम मूळतः भाविक होते. सगळ्या चिंता येशूवर टाकून ते जीवन जगत. याच रविवारच्या कार्यक्रमात बरेचदा चोरुन लिहावाचायला शिकवण्याचा कार्यक्रमही चाले. उत्तरेतून आणली गेलेली मुक्त माणसे ही शिक्षित असत, तसेच काही स्लेव्ह्जही चोरुन लिहावाचायला शिकलेले असत. या रविवारच्या चर्च भेटीमध्ये मग चोरुन लिहावाचायची शाळा चाले. स्लेव्हजच्या झोपडीमध्ये (छोटेसे लाकडी कॉटेज) कुठल्याही प्रकारचे लिहावाचनाचे साहित्य सापडल्यास, तसेच कुठेही ते शिकताना आढळल्यास त्यांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा होत असे. या लोकांना अशिक्षित ठेवणे हे त्यांच्या मालकांच्या फायद्याचे होते. पण तरीही त्यांचे शिकणे थांबत नसे. शिकायची, वाचायची, जगात काय चालले आहे हे जाणून घ्यायची, या परिस्थितीमधून बाहेर पडण्याची त्यांची धडपड चालू असे.

अमेरिकन ब्लूज या संगीत प्रकाराचा जन्म हा दक्षिणेतील शेतांमध्ये झाला आहे. दक्षिणेतल्या शेतात जेंव्हा अनेक स्लेव्हज एकत्र काम करत तेंव्हा शीण कमी व्हावा, उत्साह वाटावा म्हणून ते समूहाने गाणी गात, तोंडानेच वाद्यांचा आवाज काढीत. या गाण्यांचे विषय हा बहुतांशी येशू, निसर्ग, काम, त्यांची परिस्थिती वगैरे हे असत. ही गाणी सकारात्मक असत. बरेचदा त्यांचे शब्द हे ऐनवेळेला बनत. बरेचदा त्यांच्यातल्याच एखादा आघाडीचा गायक आणि मागे त्याचे शब्द कोरसमध्ये गाणारी इतर मंडळी असा हा कार्यक्रम चाले. या दक्षिणेतल्या गुलामांच्या गाण्यांमधून ब्लूज उदयास आले. जाझ या संगीतप्रकाराचा उदयही न्यू ऑर्लियन्समधील अफ्रिकन अमेरिकन लोकांच्या संगीतातून झाला. R&B, हिप-हॉप, रॅप, सोल या सर्व संगीतप्रकारांवर अफ्रिकन अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव आहे. स्लेव्ह्जनी अफ्रिकेतून ड्रम्स, बाँगो, झायलोफोन आणि इतर अफ्रिकन वाद्य अमेरिकेत आणली. शेतात, चर्चमध्ये किंवा समुहात गाणी गाताना, नाचताना थोड्या काळापुरते ते आपले कष्टप्रत आयुष्य विसरुन जीवनाचा आनंद घेत. संगीत त्यांना सर्व विवंचनांपासून क्षणीक मुक्ती देत असे. या गुलामांनी आपली खाद्य संस्कृतीही अफ्रिकेतून आपल्याबरोबर आणली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं असं एक जग हे या गुलामांनी अमेरिकेत निर्माण केलं.

Music.jpg
(स्रोत - gorhamschools.org)

एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात अमेरिकेत अ‍ॅबॉलिशन मूव्हमेंट सुरु झाली. या चळवळीच्या अंतर्गत उत्तरेतील अनेक श्वेतवर्णीय लोकांनी स्लेव्हरीला विरोध आणि ती रद्द करण्याकरता कायदा करण्यास आग्रह करायला सुरुवात केली. अमेरिकेच्या फाउंडींग फादर्सपैकी बेंजामिन फ्रॅ़कलिन, थॉमस जेफरसन यांचे मत हे स्लेव्हरी बंद करण्याला अनुकुल होते, पण अमेरिका स्वतंत्र झाल्यावर दक्षिणेतील राज्यांच्या दबावामुळे असा काही कायदा बनू शकला नाही. जेफरसनने १८०७ झाली स्लेव्ह ट्रेड बंद करणारा कायदा आणला, पण त्याचे इतर प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. स्लेव्हरीला विरोध आणि बंद करण्याकरता प्रयत्न इतरही काही नागरिकांकडून होत होते. १८१६ साली स्लेव्हरी बंद करणे, आणि गुलामांना परत अफ्रिकेत पाठवणे या विचाराने एकत्र येऊन काही नेते आणि नागरिक यांनी American Colonization Society ची स्थापना केली.

१३ राज्यांना घेऊन स्वतंत्र झालेल्या अमेरिकेत एकोणीसाव्या शतकात नवीन राज्यांची भर पडत होती. कोणत्या राज्यात स्लेव्हरी चालू ठेवायची आणि कोणत्या राज्यात तिच्यावर बंदी आणायची यावरुन सतत राजकारण होत होते. उत्तरेतली राजे स्लेव्हरीच्या विरोधात होती तर दक्षिणेतल्या राज्यांना स्लेव्हरी हवी होती. कोणालाही दुसर्‍याला वरचढ होऊ द्यायचे नव्हते त्यामुळे नवीन राज्य देशात सहभागी झाले की ते स्लेव्ह स्टेट ठेवायचे की फ्री यावरुन वातावरण तापत असे. १८२० साली मिझुरी हे राज्य जेंव्हा देशात सामील होणार होते तेंव्हा मात्र परिस्थिती चिघळली. मिझुरी जेंव्हा राज्य झाले तेंव्हा दक्षिण आणि उत्तर दोघांनीही त्या राज्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करत होते. या राज्याने स्लेव्ह स्टेट बनण्याकरता परवानगी मागितली. पण त्यामुळे अमेरिकन संसदेत स्लेव्ह राज्यांची संख्या वाढली असती, त्यांचे वर्चस्व वाढले असते, त्यामुळे उत्तरेकडील राज्ये मिझुरी राज्याला स्लेव्ह स्टेटचा दर्जा देण्यास सहमत नव्हते. बरेच राजकारण होऊन शेवटी एक तोडगा काढण्यात आला.या तोडग्या नुसार (मिझुरी काँप्रमाइज) स्लेव्ह आणि फ्री राज्यांची संख्या सारखी ठेवण्याकरता मेन (Maine) या राज्याला फ्री तर मिझुरीला स्लेव स्टेट म्हणून परवानगी देण्यात आली. तसेच देशाच्या मध्यातून एक काल्पनीक पूर्व पश्चिम रेषा आखून (अक्षांश ३६° ३०') यापुढे या रेषेच्या उत्तरेला सामील होणारे राज्य फ्री स्टेट तर दक्षिणेतील राज्य स्लेव्ह स्टेट असेल असा कायदा मंजुर करण्यात आला. तोडगा काढून मिझुरीला स्लेव्ह राज्य बनविल्यामुळे उत्तरेत दक्षिणेबद्दल कमालीची नाराजी आणि असंतोषाची भावना निर्माण झाली. 'मिझुरी काँप्रमाइज' करारामध्ये अमेरिकेतल्या यादवीची बिजे रोवली गेली. या करारानंतर अ‍ॅबॉलिशन मूव्हमेंट जास्त शिस्तबद्द, प्रखर झाली. विल्यम गॅरिसन लॉइड याने आपल्या काही साथीदारांबरोबर ही चळवळ सुरु केली. लॉइड हा स्वतः मोठा सुधारक होता आणि त्याच्या वर्तमानपत्रामधून स्लेव्हरीच्या विरोधात सतत लिहायचा. स्लेव्हरी तातडीने रद्द करुन सर्व गुलामांना मुक्त करण्याचा अ‍ॅबॉलिशनिस्ट्सचा आग्रह वाढायला लागला. तात्वीक पातळीवर त्यांचा माणसांना गुलाम म्हणून वागवण्यास विरोध होता, आणि एकही नवे राज्य स्लेव्ह स्टेट बनू नये अशी त्यांची इच्छा होती. न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्समध्ये सुरु झालेल्या या चळवळीला संपूर्ण उत्तरेकडून पाठींबा मिळायला लागला. १८३० साली अ‍ॅबॉलिशन मूव्हमेंट स्लेव्हरी रद्द करण्यामागील अधिकृत चळवळ बनली.

Missouri-Compromise-1820-map.jpg

(स्रोत - http://www.compromise-of-1850.org/missouri-compromise-1820/)

स्वतःच्या फायद्यासाठी स्लेव्हरी सुरु ठेवण्याकरता दक्षिणेकडील राज्ये करत असलेले राजकारण हे उत्तरेकरता क्लेषकारक होते. दक्षिणेकरता स्लेव्ह्ज ही त्यांची मालमत्ता होते, त्यात त्यानी प्रचंड पैसा गुंतवला होता आणि त्यापासून त्यांना फारकत घ्यायची नव्हती. त्यात त्यांचा मोठा तोटा होता. मिझुरी काँप्रमाइज या करारानंतर उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील अविश्वासाचे आणि तिरस्काराचे वातावरण तीव्र झाले. या सगळ्याचे मूळ असलेले गुलाम यापासून अनभिज्ञ होते का? उत्तर दक्षिणेच्या सीमेवर असलेल्या राज्यातील गुलामांना याची कुणकुण लागलेली होती. पण याबद्दल अक्षरही काढण्याची मुभा नव्हती. डीप साऊथमधील गुलामांना तर अशा काही चळवळीची, त्यांना मदत करु इच्छीत असणार्‍या लोकांबद्दल काहीही कल्पना नव्हती. एक तर त्यांचे आयुष्य शेतामध्ये राबण्यात जायचे, त्यांच्यापर्यंत कुठल्याही बातम्या कोणत्याही मार्गाने पोहोचत नसत, आणि बहुसंख्य गुलाम हे अशिक्षित होते, जे शिक्षित होते त्यांना काहीही वाचण्यास मनाई होती. हे स्लेव्ह्ज उत्तर दक्षिणेच्या मोठ्या राजकारणात फक्त प्यादे होते.

पळून जाउन स्वतःला मोकळे केलेल्या गुलामांमध्ये फ्रेडरिक डग्लस याचे नाव फार मोठे आहे. हा गुलामीच्या जाचाला कंटाळून उत्तरेला फक्त पळून गेला नाही तर तिथे गेल्यावर तो अ‍ॅबॉलिशनिस्ट चळवळीमध्ये भरती झाला आणि लॉइडबरोबर ठिकठिकाणी दक्षिणेतील गुलामांच्या आयुष्याबद्दल बोलू लागला. प्रभावी वक्तृत्वाची त्याला देणगी होती. या पूर्वी फक्त श्वेतवर्णिय लोक या चळवळीत भाग घेऊन स्लेव्हरी रद्द करण्याबद्दल भाषणे देत पण डग्लसच्या रुपाने लोकांना थेट माजी गुलामाकडून त्यांच्या जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवर जगत असलेल्या जीवनाबद्दल कळायला लागले. डग्लसच्या आगमनाने अ‍ॅबॉलिशन चळवळीचे रुप पालटले आणि लोकांचा पाठींबा अजुन वाढला. सोजर्नर ट्रुथ, हॅरिअट टबमन ही देखील या चळवळीतील मोठी नावे आहेत. दोघीही जन्मतः गुलाम होत्या आणि पळून जाऊन त्यांनी स्वतःला मुक्त करवले. त्यानंतर सारे आयुष्य त्यांनी इतर गुलामांना पळून जाण्यास मदत करण्यात वेचले. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा याकरता चालू असलेल्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत श्वेतवर्णीयांबरोबरच अनेक कृष्णवर्णीय अ‍ॅबॉलिशनिस्ट्स या चळवळीत सहभागी झाले आणि त्यांनी मिळून ही चळवळ पुढे नेली. पळून आलेल्या गुलामांना सुखरुपपणे सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी 'अंडरग्राउंड रेलरोड' म्हणजेच सुरक्षित घरांनी बनलेल्या मार्गाची दरतूद या अ‍ॅबॉलिशनिस्ट्सनी केली. या ठिकाणचे लोक पळून आलेल्या स्लेव्ह्जना आपल्या घरी लपवून ठेवत आणि पुढे सुरक्षितपणे पाठवत. अनेक लोकांनी स्वतःला होत असणार्‍या त्रासाची तमा न बाळगता स्लेव्हनजा पळून जाण्यास मदत करण्याकरता या योजनेत भाग घेतला.

फ्रेडरिक डग्लस, सोजर्नर ट्रुथ, हॅरिएट टबमन

Leaders_0.jpg

(स्रोत - en.wikipedia.org)

ब्रिटनने १८३३ मध्ये आणि फ्रांसने १८४८ मध्ये स्लेव्हरी रद्द करणारा कायदा आणला. अमेरिकेतही स्लेव्हरी रद्द करण्याबद्दल दबाव येत होता, पण त्याकाळात सत्तेवर असणारे प्रमुख हे दक्षिणेतील राज्यांच्याबाबतीत मऊ धोरण असणारे आणि दक्षिणेच्या विरोधात जायला घाबरणारे होते. अशात १८६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन याची नेमणून झाली. स्लेव्हरीला विरोध करणारा आणि त्याकरता काहीतरी परिणामकारक उपाययोजना करण्याची मनापासून इच्छा असणारा हा नेता अमेरिकेच्या लोकांनी निवडून आणला हे गुलामांचेच नव्हे तर अमेरिकन लोकांचे भाग्य होते. लिंकनच्या कारकिर्दीतली पुढील ५ वर्षे निर्णायक आणि झंझावती असणार होती.

-------

स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
The Life and Times of Frederick Douglass
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ३)

दक्षिणेतील प्लँटेशन्समधील प्रचंड मेहनतीला, जाचाला, खच्चीकरणाला कंटाळून स्वतःच्या जिवावर उदार होऊन काही स्लेव्ह्ज पळून जाण्याचा प्रयत्न करीत. काही जण उत्तरेतील मुक्त राज्यात पळून जाण्यात यशस्वी ठरत. आपल्या कुटुंबाला कसे तरी करुन आणण्याची त्यांची धडपड सुरु होई. उत्तरेतील अ‍ॅबॉलिशनिस्ट्स आणि त्यांच्या समर्थकांनी 'अंडरग्राउंड रेलरोड' नावाखाली या गुलामांना फ्री स्टेट्स आणि कॅनडमध्ये पळून जाण्याकरता सुरक्षित घरांची साखळी सुरु केली. या घरातील लोक पळून आलेल्या गुलामांना आपल्या घरी आसरा देऊन फार मोठी जोखीम पत्करायचे. रात्री, अंधारात लपून छपून हे गुलाम एका घरातून दुसर्‍या घरी हलवले जायचे. मुख्यत्वे उत्तरेतील राज्ये आणि कॅनडा इथे सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास त्यांना मदत केली जाई,.काही मार्गाने स्लेव्ह्ज हे पळून मेक्सिकोतही गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात छोट्या प्रमाणात सुरु झालेल्या अंडरग्राउंड रेलरोडने १८५० पर्यंत जवळपास एक लाख गुलामांना पळून जाऊन मुक्त होण्यास मदत केली. अनेकदा हे गुलाम किंवा त्यांना मदत करणारे लोक अशस्वी होत आणि गुलामांना पकडून परत मालकाकडे पाठवले जाई. या गुलामांच्या डोक्यावर मोठे इनाम ठेवले जाई. त्यांना पकडायला सशस्त्र पोलिस, शिकारी कुत्री आणि घोड्यावरुन माणसे रवाना होत. इतरांना जरब बसावी म्हणून आणि गेलेल्या वेळेचा आणि पैशाचा अपव्ययाने चिडून मालक पकडल्या गेलेल्या गुलामाची हालत भयानक करत असे. पण तरीही जीवावर उदार होऊन गुलाम पळून जाणण्याचा प्रयत्न करीत असत. यावरुन हे गुलाम कुठल्या प्रकारचे आयुष्य कंठीत होते याची कल्पना येते. पळून गेलेल्या गुलामाचे कुटुंब त्याच्या आणि इतरांच्या मदतीने स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करीत. कधी कधी ते यशस्वी होत, पण बरेचदा त्यांची नेहेमीकरता ताटातूट होई. राहीलेल्या व्यक्तींना अजुन जास्त त्रासास तोंड द्यावे लागे. १८५० मध्ये अमेरिकन सरकार दक्षिणेतील राज्यांचा दबावाला झुकले आणि त्यांच्याबरोबर तडजोड म्हणून 'Fugitive Slave Act' नावाचा कायदा केला गेला. या कायद्यानुसार उत्तरेतील नागरिकांवर पळून आलेल्या गुलामाला दक्षिणेत त्यांच्या मालकाकडे परत करण्याची सक्ती करण्यात आली. तसे न केल्यास त्यांना कायद्याने शिक्षा होत असे. हा कायदा उत्तरेतील वादग्रस्त ठरला, अनेक लोकांना तो अमान्य होता. कायद्याच्या धाकामुळे गुलामांना पळून जायला मदत करणे खूप अवघड झाले पण तरीही अनेकांनी जोखीम पत्करुन ते काम चालूच ठेवले.

Underground-Railroad-map.jpeg
(स्रोत - harriet-tubman.org)

क्वचित वेळेला गुलामांनी उठाव करुन मालकांविरुद्ध सशस्त्र लढाही दिलेला आहे. या उठावाची परिणीती ही मृत्यूदंडातच होत असे. गुलामांवर प्रचंड वचक असल्याने ही प्रकरणे फार जास्त आणि मोठ्या प्रमाणात होत नसत. १८३१ साली मात्र व्हर्जिनियामध्ये अशी घटना घडली ज्याने सारे दक्षिण हादरले. दक्षिण व्हर्जिनियामधील काही प्लँटेशन्समधुन नॅट टर्नर नावाच्या गुलामाने आणि त्याच्या ७० साथीदारांनी सशस्त्र बंड केले. अनेक दिवस ही योजना ते आखत होते. जवळपास ७० गोर्‍या मालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ठार मारले. २ दिवसांनी हा उठाव तिथल्या गोर्‍या अधिकार्‍यांनी चिरडून टाकला. या उठावाचा हिस्सा असलेल्या गुलामांला शोधून तात्काळ फासावर दिले. परंतू या घटनेने दक्षिणेतील गोरे मालक चवताळून उठले. गोर्‍यांचा हत्येने निर्माण झालेल्या प्रचंड जनक्षोभात या उठावात कुठल्याही प्रकारचा भाग नसलेल्या जवळपास २०० निरपराध गुलामांचीही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक राज्यातील गुलामांवरील निर्बंध अतिशय जास्त वाढले. जमावबंदी, चर्चमध्ये गोरा मिनिस्टर असल्याशिवाय प्रार्थनेला मज्जाव, प्रत्येक हालचालीवर कडक नजर अशा परिस्थितीत स्लेव्ह्जचे आधीच पिचलेले जीवन अजुन जास्त अवघड झाले.

बहुतांशी अ‍ॅबॉलिशनिस्ट्स हे शांततापूर्ण चळवळ, वर्तमानपत्रातून लिखाण, दबावतंत्र, निदर्शने, भाषणे, जनजागृती, परदेशातून चळवळीस पाठींबा मिळवणे इत्यादींचा वापर करुन स्लेव्हरी रद्द करण्यासाठी लढत होते. पण अ‍ॅबॉलिशनिस्टसचा असा एक गट होता जो स्लेव्हरी रद्द करण्याकरता सशस्त्र बंडखोरीचा वापर करण्यास अनुकुल होता. जॉन ब्राउन हा अशा गटाचा पुरस्कर्ता होता. 'मिझुरी काँप्रमाइझ' झाल्यापासून उत्तरेतील अ‍ॅबॉलिशन चळवळ जास्त तीव्र झालेली होती. १८५४ मध्ये कँसस आणि नेब्रास्का ही राज्ये जेंव्हा देशात सामील होणार होती तेंव्हा राज्य हे स्लेव्ह किंवा फ्री स्टेट यापैकी काय असावे या करता त्यांनी तेथील रहिवाश्यांचे मत विचारात घेण्याचे ठरवले. यानंतर कँससमध्ये स्थायिक होण्याकरता अचानक उत्तर आणि दक्षिणेतून खोर्‍याने लोक धडकू लागले. सार्वमताच्या निकालामध्ये कँसस फ्री किंवा स्लेव्ह राज्य म्हणून घोषीत व्हावे या करता आग्रही असलेल्या दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये मतभेत, चढाओढ आणि हिंसा वाढू लागली. अशा परिस्थितीत जॉन ब्राउन आणि त्याच्या सहकार्‍यांनी स्लेव्हरीच्या पुरस्कर्त्या ५ स्थानिकांची हत्या केली आणि पूर्ण राज्यात स्लेव्हरीला पाठिंबा देणारी आणि विरोध करणारी लोकं एकमेकांना भिडली. दोन्ही गटांमध्ये हिंसा सुरु झाली आणि कँसस पेटले, परिस्थिती चिघळली. हिंसेने दहशत वाढली आणि दोन्हीही गटांमध्ये जिवीत हानी होऊ लागली. परिस्थिती शांत होण्यास ३-४ वर्षे लागली. या सर्वात आणि उत्तर आणि दक्षिणेतले वैर अजुन वाढले.

BleedingKansas.jpg

(स्रोत - student.ucps.k12.nc.us)

एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात उत्तरेतील फ्री स्टेट्स आणि दक्षिणेतील स्लेव्ह स्टेट्स यामधील असंतोष खदखदत होता. त्यात १८५९ मध्ये अजुन एका घटनेची भर पडली. अमेरिकेत यादवी किंवा सिव्हिल वॉर सुरु होण्यात कारणीभूत असलेल्या अनेक घटनांमध्ये जॉन ब्राउनने १८५९ साली व्हर्जिनियामधील हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर घातलेला छापा ही निर्णायक घटना ठरला. हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर छापा मारुन, तेथील शस्त्रे लुटून स्थानिक गुलामांना त्यांचा पुरवठा करायचा, आणि त्यांच्या सशस्त्र लढ्यात मदत करायची अशी योजना जॉन ब्राउन आणि त्याच्या सहकार्‍यांनी आखली. गुलामांना हीन आणि अपमानकारक अशा स्लेव्हरीच्या जोखडातून मुक्त करणे, त्याकरता मदत करणे हे जॉन ब्राउनच्या आयुष्याचे ध्येय बनले होते. १७ ऑक्टोबर १७५९ साली हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर पूर्वनियोजनानुसार ब्राउन आणि त्याच्या सहकार्‍यांनी छापा घतला मात्र नंतरच्या गोष्टी नियोजनानुसार घडल्या नाही. शस्त्रागार लुटल्याची बातमी पसरल्यावर आलेले अमेरिकन सैनिक आणि जॉन ब्राउनचे सहकारी यांच्यामध्ये चकमक घडून जॉन ब्राऊन पकडला गेला. त्याच्यावर घाईघाईत खटला भरला गेला आणि दक्षिणेतील अधिकार्‍यांनी २ डिसेंबर १८५९ रोजी त्याला फासावर चढवले. जॉन ब्राउन हा कोणी स्लेव्ह नव्हता, तो स्लेव्ह्जना मुक्त करण्याच्या कार्याला वाहुन घेतलेला एक अ‍ॅबॉलिशनिस्ट होता. त्याचा मार्ग काही अबॉलिशनिस्ट्सना जरी पटत नसला तरी त्याला अशा प्रकारे फासावर चढवल्यामुळे उत्तरेतील असंतोष कमालीचा वाढला. जॉन ब्राउन हा मोठा हिरो ठरला आणि त्याच्या मृत्यूने उत्तर आणि दक्षिणेतील दरी अजून वाढली. दक्षिणेतही अ‍ॅबॉलिशनिस्ट्स बद्दल राग वाढला. तसेच या घटनेपासून स्फूर्ती घेऊन गुलामांना मुक्त करण्याकरता अशा प्रकारचे अजून छापे मारले जातील, त्यांना पळून जाण्यास मदत केली जाईल असे तर्कवितर्क वाढू लागले.

या सर्व घडामोडींमध्ये १८६० मध्ये झालेली निवडणुक रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार अब्राहम लिंकन याने जिंकली. लिंकन हा मवाळवादी रिपब्लिकन होता. त्याचा स्लेव्हरीला विरोध होता. नोव्हेंबर १८६० मध्ये झालेल्या निवडणुकीत उत्तर आणि पश्चिमेतील बहुतांशी राज्ये लिंकनने जिंकली (त्यावर्षी निवडणुकीत ४ उमेदवार होते), पण दक्षिणेत मात्र त्याने सपाटून मार खाल्ला. पण एकुण मतांनुसार (electoral college) लिंकनने १८६० ची निवडणूक जिंकली. रिपब्लिकन पार्टी आणि अब्राहम लिंकन यांची स्लेव्हरी बद्दलची मते माहिती असल्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये कमालीचे अविश्वासाचे आणि चिंतेचे वातावरण पसरले. लिंकन जिंकल्यानंतर एक महिन्यातच साउथ कॅरोलिना या राज्याने एकसंघ देशातून फुटण्याचा निर्णय जाहीर केला. साउथ कॅरोलिना पाठोपाठ जॉर्जिया, अ‍ॅलाबामा, मिसिसिपी, लुइझियाना, टेक्सास आणि फ्लोरिडा या राज्यांनी देशातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यांना जसा देशात (युनियन) सामील व्हायचा हक्क आहे तसा त्यांना देश सोडण्याचाही हक्क आहे असा युक्तिवाद त्यांनी मांडला. हा युक्तिवाद अमेरि़केच्या संस्थापकांच्या एकसंघ देशाच्या हेतूच्या विरोधात आहे असे मत उत्तरेच्या राजकारण्यांनी दिले. एकसंघ देशामधून अशी राज्ये फुटून बाहेर पडणे हे देशाच्या एकात्मतेकरता चांगले नव्हते. देशाचे तुकडे करण्यास, तो तोडण्यास उत्तरेतील लोक आणि राजकारणी तयार नव्हते.

licoln.jpg

(स्रोत - britannica.com)

या फुटलेल्या राज्यांमध्ये असलेल्या मोठमोठ्या सैनिकतळांचे भवितव्य या फुटीरतेने धोक्यात आले. साउथ कॅरोलिनामधील चार्ल्स्टन येथे असलेल्या फोर्ट समटर येथील तळावर लिंकनने शस्त्रपुरवठा पाठवला, पण दक्षिणेच्या ताब्यात असलेल्या जहाजांनी पुरवठा करणार्‍या जहाजांना परतवले, आणि फोर्ट समटरवर सतत ३४ तास दारुगोळ्यांनी हल्ला केला. शेवटी फोर्ट समटरने दक्षिणेतील जहाजांसमोर शरणागती पत्करली. इथुन अमेरिकेतील सिव्हिल वॉरला तोंड फुटले. लिंकनने सर्व राज्यांना सैनिक पाठवण्यासाठी आवाहन केले, आणि व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलिना, टेनिसी आणि आर्कंसा यांनी देशातून फुटण्याची घोषणा केली. सर्व फुटलेल्या राज्यांनी मिळून नवीन कन्फेडरेट (confederate) राष्ट्राची स्थापना केली, अमेरिकेपासून स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषीत केले आणि तेथुन अमेरिकेत यादवी सुरु झाली. उत्तर आणि दक्षिण यांच्यात स्लेव्हरी आणि सत्तेची चढाओढ यामुळे मतभेद होतेच, त्याकरता पुढे कधी तरी युद्ध झाले असते. पण लिंकनच्या राष्ट्रध्यक्षपदी नेमणुकीमुळे युद्धाचा क्षण जवळ आला. हे युद्ध उतरेच्या दृष्टीने राष्ट्र संयुक्त ठेवण्याकरता, तर दक्षिणेच्या दृष्टीने स्लेव्हरीच्या विरोधात असलेल्या उत्तरेचे वर्चस्व झुगारुन देण्याकरता आणि स्वतःचे स्वातंत्र्य, स्लेव्हरीचा हक्क अबाधित ठेवण्याकरता सुरु झाले. स्लेव्हरीच्या बाबतीत सिव्हील वॉरचे महत्त्व म्हणजे या युद्धाचे कारण जरी स्लेव्हरी रद्द करणे नसले तरी त्याची परिणिती स्लेव्हरी रद्द होण्यात झाली.

CivilWar.jpg
(स्रोत - civilwar1860s.weebly.com)

युद्ध सुरु झाल्यावर राष्ट्राध्यक्ष अब्राहन लिंकनने सुरुवातीला स्पष्ट केले होते की हे युद्ध स्लेव्हरी रद्द करण्याकरता नाही तर अमेरिकेचे एकसंघ राज्य टिकवून ठेवण्याकरता आहे. लिंकनला हे २ मुद्दे एकत्र करायचे नव्हते. युद्धाच्या सुरुवातीला कृष्णवर्णियांना उत्तरेच्या सैन्यात भरती होण्याची मुभा देखील नव्हती. पण जसे युद्ध पुढे सरकत गेले तशी सैन्याची गरज भासत गेली, आणि मुख्य म्हणजे स्लेव्हरीला पाठींबा देणार्‍या राज्यांना हरवण्याकरता सेनेत दाखल होण्याकरता उत्तरेतील कृष्णवर्णीयांचा आग्रह वाढू लागला. उत्तर दक्षिण सीमेवरील राज्यातील स्लेव्ह्जही पळून उत्तरेत येऊन या कार्याकरता आपला जीव देण्यास तयार होते. Antietam येथील सप्टेंबर १८६२ मधील विजयानंतर लिंकनने Emancipation Proclamation म्हणजेच सर्व गुलामांना मुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आणि हा कायदा १ जानेवारी १८६३ सर्व दक्षिणेतील राज्यांना लागू होईल हे जाहीर केले. तसेच सैन्यात कृष्णवर्णीयांची भरती करण्याची घोषणाही केली. त्यानंतर सेनेत भरती होण्याकरता कृष्णवर्णीयांची रीघ लागली. या युद्धात जवळपास १,८०,००० कृष्णवर्णीयांनी उत्तरेकडून भाग घेतला. १८६१ ते १८६५ असे ४ वर्षे सुरु असलेले हे युद्ध अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्ध आहे. कन्फेडरेट आर्मी आणि युनियन आर्मी यांचे पारडे सतत खालीवर होत असे. या युद्धात दोन्हीही बाजुंचे मिळून सहा लाखाच्या वर सैनिक, आणि जवळपास ५०,००० नागरिक यांचा बळी गेल्यावर शेवटी ९ एप्रिल १८६५ साली कन्फेडरेट सैन्याने युनियन आर्मीसमोर व्हर्जिनियामध्ये शरणागती पत्करली. युद्ध हरल्याची बातमी दक्षिणेकडे सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. युद्ध संपल्यावर काही महिने उत्तरेकडचे युनियनचे सैनिक दक्षिणेतील सर्व राज्यात फिरुन गुलामांना मुक्त करीत होते. या युद्धाच्या सुरुवातीला काही महिन्यातच उत्तरेच्या सैन्याला हरवू अशा वल्गना करणार्‍या दक्षिणेची मोठी नाचक्की झालेली होती. हा अपमान ते कधीही विसरु शकणार नव्हते. सततच्या ४ वर्षाच्या युद्धामुळे आणि आता स्लेव्ह्ज फ्री झाल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोसळली. एकेकाळी सुबत्तेचे प्रतीक असलेले दक्षिण हे यातून कधीही वर येऊ शकले नाही.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत (Declaration of Independence) एक वाक्य आहे. "We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness." अतिशय प्रभावी आणि वजनदार असलेले वाक्य किती दांभिक होते! २५० वर्षे गुलामीचे जोखड वागविणार्‍या कृष्णवर्णीय पुरुषांना (आणि स्त्रियांना) कुठल्याही प्रकारच्या आयुष्य (Life), स्वातंत्र्य (Liberty) आणि सूख मिळवण्याचा (pursuit of Happiness) हक्क नव्हता. राष्ट्राच्या प्रगतीचा, अर्थव्यवस्थेचा कणा असलेली दक्षिणेतील प्लँटेशन्स फक्त गुलामांच्या जोरावर चालत होती. त्यांच्या अनेक पिढ्या या देशात राबल्या होत्या. पूर्वजांच्या मातृभूमीशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. पण ज्या देशात ते राहत होते तिथे ते फक्त इतरांची मालमत्ता होते, त्यांना त्या देशाचे नागरिकत्त्व किंवा तिथे कुठलाही अधिकार नव्हता. १८६५ साली, जवळपास अडीचशे वर्षांनी पहिल्यांदा या गुलामांनी मोकळा श्वास घेतला. परंतु पुढे काय होणार याबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. लवकरच त्यांच्या लक्षात आले की मुक्त झाल्यावरही कोणतेही हक्क मिळवण्याकरता त्यांना यापुढे खूप झगडावे लागणार होते.

कित्येकांच्या विरोधात जाउन त्यांना मुक्त केलेला त्यांचा रक्षणकर्ता अब्राहम लिंकन याची युनियनच्या विजयानंतर एका आठवड्याच्या आतच १५ एप्रिल १८६५ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुक्त केलेल्या गुलामांच्या पुनःस्थापनेकरता लिंकनने तपशीलवार योजना बनवलेली होती, आणि त्याच्या हयातीत त्याची कदाचित प्रभावीपणे अंमलबजवणी झाली असती. पण तसे होणे नव्हते. मुख्य प्रवाहात येण्याच्या दॄष्टीने पुढचे एक शतक या मुक्त झालेल्या स्लेव्हज करता अतिशय कठीण असणार होते. याचे दूरगामी परिणाम त्यांच्या येत्या अनेक पिढ्यांवर होणार होते...

--------

स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
A People's History of the United States - Howard Zinn
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ४)

९ एप्रिल १८६५ साली व्हर्जिनियामध्ये कन्फेडरेट सैन्याचा सेनापती जनरल रॉबर्ट इ ली याने शरणागती पत्करली आणि अमेरिकेत ४ वर्ष सुरु असलेले उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील युद्ध संपले. या युद्धाने जवळपास सहा लाखांच्या वर सैनिकांचा आणि हजारो नागरिकांचा बळी घेतला. पराभवाबरोबरच लाखो मुलगे, वडील, भावंडे यांचे मृत्यू, जप्त झालेली जमीन, बेचिराख झालेली शहरे, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था याने दक्षिणेतील राज्ये पोळून निघाली, संतप्त आणि हतबल झाली.या पराभवाचे खापर कोणावर तरी फोडणे क्रमप्राप्त होते. ते साहजिकच नवमुक्त गुलामांवर फोडले गेले. त्यांचा सुरुवातीला युद्धात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी गुलामी सुरु ठेवणे किंवा गुलामांना मुक्त करणे हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे या मुद्द्यांवरुनच तर दक्षिणेतील राज्यांनी युनियनमधून फुटण्याचा निर्णय घेतलेला होता. हे गुलाम अप्रत्यक्षरित्या युद्धाचे मुख्य कारण बनले होते. एकेकाळी सुबत्तेचे प्रतीक असलेली दक्षिणेतील राज्ये या युद्धानंतर कधीही त्यांचे गतकाळाचे वैभव मिळवू शकली नाहीत, किंबहुना काही काळातच ती आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत अमेरिकेतील सर्वात मागासलेली राज्ये बनली.

अब्राहम लिंकनने १ जानेवारी १८६३ रोजी अमेरिकेतील सर्व राज्यांमधील गुलामांच्या मुक्ततेची घोषणा करणार्‍या Emancipation Proclamation वर सही केली. पण दक्षिणेतील राज्यांनी ह्या घोषणेला मान्यता दिलेली नव्हती. युद्धही सुरु होते, त्यामुळे 'डीप साउथ'मधील गुलामांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नव्हता. उत्तर दक्षिण सीमेवरील राज्यांमध्ये मात्र अनेक गुलाम उत्तरेकडे पळून जात होते आणि गुलामीतून बाहेर येत होते. बरेच जण उत्तरेतील सैन्यामध्ये भरती होऊन धारातीर्थी पडत होते. युद्ध संपल्यानंतर काही महिने उत्तरेकडील सैनिकांनी दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये फिरुन गुलाम मुक्त झाल्याची खात्री करुन घेतली. अडीचशे वर्षानंतर अमेरिकेतील गुलाम शेवटी मुक्त झाले होते. अमेरिकेच्या इतिहासातील हा एक फार मोठा मैलाचा दगड होता. पण या मुक्तीच्या शिल्पकाराला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. उत्तरेत जसे स्लेव्हरीला विरोध असणारे लोक होते तसे दक्षिणेशी सहानुभूती बाळगणारे, दक्षिणेत पाळेमुळे असणारे, स्लेव्हरीला पाठींबा असणारे लोकही होते. दक्षिणेचा अपमानकारक पराभव या लोकांना अतिशय खुपला होता. लिंकनच्या यापुढील धोरणांनी दक्षिणेवर कशा प्रकारे परिणाम होईल याबद्दल त्यांच्यात संदिग्धता होती. युद्ध संपल्यावर लगेच काही दिवसातच, १४ एप्रिल १८६५ रोजी, दक्षिणेविषयी सहानुभूती बाळगणार्‍या John Wilkes Booth या स्टेज अ‍ॅक्टरने वॉशिंगटन डिसी येथील फोर्ड थिएटरमध्ये नाटकाचा खेळ बघण्यास आलेल्या अब्राहम लिंकनची गोळ्या घालून हत्या केली.

Lincoln_murder.jpg
(स्रोत - en.wikipedia.org)

लिंकनच्या अकाली मृत्यूनंतर त्याचा उपराष्ट्रपती अँड्र्यू जॉन्सन हा अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. १८६३ च्या गेटीसबर्गच्या विजयानंतर दक्षिणेतील राज्यांच्या पुनर्बांधणीच्या आणि गुलामांच्या पुनर्वसनाच्या योजनेवर लिंकनने काम सुरु केले होते. त्याच्या मृत्यूनंतर ते काम जॉन्सनला पुढे न्यावे लागले. या योजनेबद्दल लिंकनच्या रिपब्लिकन पार्टीमध्येच मतभेद होते. लिंकन हा दक्षिणेतील राज्यांच्या, कन्फेडरेट अधिकार्‍यांच्या बाबतीत क्षमशीलतेच धोरण ठेवून त्यांना परत युनियनमध्ये आणण्याच्या मताचा होता. शिक्षा देऊन आपण दक्षिणेतील लोकांना अजून दूर लोटू आणि त्यांना देशात सामावून घेण्याच्या प्रक्रियेत त्यामुळे अडथळे येतील असे त्याचे मत होते. पण काही रिपब्लिकन्स (यांना रॅडिकल रिपब्लिकन्स असे म्हटले जाते) या सर्व परिस्थितीला दक्षिणेला जबाबदार ठरवून त्यांना शिक्षा, दंड देण्याच्या मताचे होते. दक्षिणेतील लोकांच्या स्वार्थीपणामुळे हे युद्ध सुरु झाले होते. कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी, तोडग्यांना त्यांनी नकार दिलेला होता, आणि त्याची परिणिती लाखो लोकांच्या मृत्यूमध्ये झाली होती. रॅडिकल रिपब्लिकन्सच्या मते या करता कुठल्यातरी प्रकारे त्यांना शिक्षा मिळणे गरजेचे होते. तसेच ते श्वेतवर्णीय अमेरिकनांना मिळणारे सर्व अधिकार मुक्त झालेल्या कृष्णवर्णीयांना मिळावे या मताचेही होते. दक्षिणेतील राज्यांची पुनर्बांधणी आणि मुक्त झालेल्या गुलामांचे पुर्वसन हे कमीत कमी काळात पूर्ण करुन त्यांना मुख्य धारेत आणण्याच्या मताचा लिकंन होता. सर्वांना एकत्र आणून, काही तोडगा काढून या पुनर्बांधणीच्या कामाला लिंकनने सुरुवात केली असती, परंतू त्याच्या अकाली मृत्यूमुळे या योजनेवर जॉन्सनला काम करावे लागले. लिंकनचा दूरदर्शीपणा, सर्वांना एकत्र आणून काम करण्याची हातोटी जॉन्सनमध्ये नव्हती. या काळात दक्षिणेतील नेत्यांना माफी देणे आणि गुलामांचे पुर्वसन याबाबतीत रिपब्लिकन पक्षातील मदभेत ठळक होऊ लागले. सिव्हिल वॉरनंतर दक्षिणेतील राज्यांच्या पुनर्बांधणीच्या काळाला Reconstruction Era असे म्हटले जाते. १८६३ ते १८७७ असे तब्बल चौदा वर्ष हे काम सुरु होते. या पुनर्बांधणीच्या काळाच्या सुरुवातीला कृष्णवर्णीय अमेरिकनांनी थोडा काळ नागरी हक्क उपभोगले मात्र जसा Reconstruction Era चा कालावधी संपत गेला आणि सैनिक उत्तरेत परतू लागले तशी दक्षिणेतील राज्यकर्ते आणि दहशत पसरवणारे गट यांच्यामुळे त्यांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर अधिकाधिक गदा येत गेली.

लिकंनचा मृत्यूने उत्तरेत जनक्षोभाचे वातावरण निर्माण झाले आणि सुरुवातीला जॉन्सनने कन्फेडरेट्सच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्याने कोणत्याही कन्फेडरेट अधिकार्‍यांवर खटले भरले नाहीत, किंबहुना त्यांच्यावर कोणतेही खटले न भरता त्यांना माफीच दिली. मोठमोठ्या जमीनदारांची हजारो एकर जमीन ही युद्धानंतर जप्त केली गेलेली होती आणि त्यातला काही हिस्सा आणि एक खेचर हे त्यांच्या मुक्त झालेल्या गुलामांना देऊन त्यांच्या पुर्वसनास मदत करण्याची योजना करण्यात आलेली होती, पण प्रत्यक्षात जॉन्सनच्या कारकिर्दीत ही जमीन परत जमीनदारांना देण्यास सुरुवात झाली. जॉन्सन दक्षिणेतील राजकारणी, अधिकारी, जमीनदार यांच्याशी नरमाईने वागत असल्याची त्याच्यावर टिका होऊ लागली. दक्षिणेतील राज्ये ही त्यांच्या अखत्यारीत जाचक नियम निर्माण करुन मुक्त झालेल्या गुलामांचे जीवन अवघड करतील याबद्दल उत्तरेतील बरेच लोक आणि राजकारणी चिंतीत होते, पण जॉन्सनने या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले नाही. जॉन्सनच्या धोरणांमध्ये कृष्णवर्णीयांना राजकारणात आणण्याबद्दल, विविध पदे देण्याबद्दल काहीही भूमिका नव्हती. त्याचे आणि संसदेचे (काँग्रेस) पुनर्बांधणीच्या अंमलबजावणीबद्दल खटके उडायला लागले. जॉन्सनच्या काळात त्याने दक्षिणेतील राज्यांना युनियनमध्ये आणून त्यांना नवीन राज्यपाल निवडण्यास सांगितले. सर्व राज्यातील नवीन राज्यपाल हे कन्फेडरेट समर्थक, स्लेव्हरी, वर्णभेद यांचे समर्थन करणारे होते. त्यांनी ताबडतोब त्यांच्या अखत्यारीत नवीन कायदे करण्यास सुरुवात केली. कुठलाही नियम हे गुलामाचे स्वातंत्र्य परत हिरावून घेऊ शकणारा नसला तरी हे सर्व नियम कृष्णवर्णीयांकरता जाचक असेच होते. १८६६ मध्ये कृष्णवर्णीयांच्या हक्कांचे संरक्षण करणारे, काँग्रेसने मंजुर केलेला मसुदा जॉन्सनने फेटाळला आणि त्याचे काँग्रेसबरोबरील संबंध अधिक चिघळले. १८६८ साली जॉन्सन रिपब्लिकन्सकडून निवडणूक लढला नाही. डेमोक्रॅट्स त्याला त्यांच्या बाजूने निवडणूक लढू देतील हा त्याचा अंदाजही चुकला. १८६८ साली झालेल्या निवडणूकीत लिंकनच्या युनियन सैन्याचा जनरल युलसिस एस ग्रँट हा राष्ट्राध्यक्ष झाला आणि यापुढे दक्षिणेतील राज्यांना मुख्य प्रवाहधारेत आणून त्यांना पुर्नबांधणीस मदत करणे आणि कृष्णवर्णीयांना त्यांचा हक्क मिळवून देणे याची जबाबदारी काँग्रेसने घेतली.

सिव्हील वॉरनंतर अमेरिकेच्या घटनेत केल्या गेलेल्या दुरुस्त्यांना सिव्हील वॉर अ‍ॅमेंडमेंट्स असे म्हटले जाते. यातील १८६५ साली मंजूर झालेल्या तेराव्या घटनादुरुस्तीनुसार अमेरिकेत स्लेव्हरी अधिकृतरित्या संपुष्टात आली. १८६८ मंजुरी मिळालेल्या चौदाव्या दुरुस्तीनुसार मुक्त झालेल्या, अमेरिकेत जन्मलेल्या सर्व गुलामांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आणि १८७० साली मंजुर झालेल्या पंधराव्या दुरुस्तीनुसार सर्व कृष्णवर्णीय पुरुषांना मतदानाचा हक्क मिळाला. (अमेरिकेत सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळेपर्यंत १९२० साल उगवावे लागले) या तीन घटना दुरुस्त्यांमुळे सर्व घटकांना प्रवाहात आणण्यास, लोकशाही पुढे नेण्यास मदत झाली.

ammendments.jpg
(स्रोत - mshaugheysclass.blogspot.com)

१८६८ नंतर काँग्रेसने रिकन्स्ट्रक्शनचे (याला Congressional Reconstruction असेही म्हणतात) धोरण राबविण्यास सुरुवात केली आणि मुक्त झालेल्या गुलामांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता अनेक योजनांची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी दक्षिणेतील राज्यांवर १४वी घटनादुरुस्ती पाळण्याची सक्ती करण्यास सुरुवात केली. १८६८ सालानंतर दक्षिणेत झालेल्या विविध राज्यांतर्गत निवडणूकांमध्ये कृष्णवर्णीयांनी मतदान केली आणि निवडणूकही लढवली. काही कृष्णवर्णीयांनी निवडणूका जिंकून विविध पदे भूषविण्यास सुरुवात केली. परिस्थिती कदाचित बदलायला लागेल अशी थोडीशी आशा कृष्णवर्णीयांमध्ये निर्माण झाली. परंतु अगदी काही वर्षांपूर्वी आपले गुलाम असणारी लोकं सरकारी पदे भूषविताना, निर्णय घेताना पाहणे हे अजुनही वर्णद्वेषी असलेल्या दक्षिणेतील बहुसंख्य लोकांकरता सोपे नव्हते. शेकडो वर्षे दक्षिणेत गोर्‍या लोकांचे वर्चस्व होते, ते स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजत. या white supremacy च्या भावनेतून दक्षिणेतील राज्यांमध्ये Ku Klux Klan, White Brotherhood, Knights of the White Camelia अशा वर्णद्वेषी संघटनांचा उदय झाला. कृष्णवर्णीयांमध्ये हिंसात्मक मार्गाने जबर दहशत निर्माण करणे हे या संघटनांचे मुख्य कार्य होते. शारीरिक इजा, प्रसंगी हत्या यामधून दहशत निर्माण करुन मतदान करण्यापासून रोकणे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना काम करण्यापासून परावृत्त करणे, कृष्णवर्णीयांना जागा विकत घेणे/व्यवसाय करणे यामध्ये अडथळे आणणे, गोर्‍या लोकांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करण्यापासून त्यांना मज्जाव करणे अशा आणि इतर अनेक गोष्टींची सुरुवात त्यांनी केली. या संस्थांच्या स्थापनेमध्ये पराभवामु़ळे दुखावलेले माजी कन्फेडरेट जनरल्स, सैनिक आणि समर्थक यांचा मोठा हात होता. यातल्या अनेक जनरल्सना जॉन्सनने माफी दिलेली होती.

यात सर्वात दरारा असलेल्या Ku Klux Klan ची स्थापना १८६५ साली टेनेसी राज्यात झाली आणि लवकरच दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये त्याचे सदस्य आणि समर्थक वाढीस लागले. या संस्थेचा उदयास्त ३ वेगवेगळ्या कालखंडात झालेला आहे. सुरुवातीचा कालखंड म्हणजे १८६० आणि १८७० चे दशक. वर लिहिल्याप्रमाणे सर्व दक्षिणेतील राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांमध्ये दहशत निर्माण करुन त्यांच्यात कुठल्याही प्रकारची समानतेची भावना निर्माण न होऊ देणे हा सुरुवातीला क्लॅनचा मुख्य हेतू होता. जसा त्यांचा हिंसाचार वाढायला लागला तसे काँग्रेसने काही कायदे आणून त्यांच्यावर वचक बसवला. कृष्णवर्णीयांविरुद्धची दडपशाही जरी वेगळ्या मार्गाने सुरुच राहिली तरी क्लॅनच्या कार्याला उतरती कळा लागली. क्लॅनचा दुसरा अध्याय १९१५ मध्ये सुरु झाला. तोपर्यंत थोडेफार सदस्य सोडले तर क्लॅन संपुष्टात आलेली होती, लोकांच्या स्मृतीपटलावरुन जवळपास पुसली गेली होती. तेवढ्यात आला १९१५ साली क्लॅनच्या पहिल्या कारकिर्दीचे, गोर्‍यांच्या वर्चस्वाचे, क्लॅनचे उदत्तीकरण करणारा 'द बर्थ ऑफ अ नेशन' नावाचा सिनेमा. हा सिनेमा दक्षिणेतील राज्यात अतिशय लोकप्रिय झाला. या चित्रपटावरुन प्रेरणा घेऊन अ‍ॅटलांटा जवळील स्टोन माउंटन या ठिकाणी विल्यम जोसेफ सिमन्सने क्लॅनची पुनःस्थापना केली. ह्या कारकिर्दीत क्लॅनची लोकप्रियता कमालीची वाढली. १९२४ पर्यंत जवळपास ४० लाख लोक क्लॅनचे सदस्य बनले. या वेळची क्लॅन ही कमालीची कट्टर होती. त्यांचा विरोध फक्त कृष्णवर्णीयांनाच नव्हे तर समलिंगी, ज्यू, कॅथलिक लोकांनाही होता. अर्थातच कृष्णवर्णीय हे मुख्य लक्ष होते. क्लॅनचा हा काळ दक्षिणेतील कृष्णवर्णीयांकरता कमालीचा दहशतीचा होता. कधी जीव जाऊन शकेल याची शाश्वती नव्हती. हजारो कृष्णवर्णीयांची या काळात लिंचींगद्वारे (जमावाने एकत्र येऊन हत्या) हत्या झाली. १९५० ते १९६० काळात वाढीस लागलेला क्लॅनचा तिसरा अध्याय हा प्रामुख्याने सिव्हिल राईट्स मुव्हमेंटच्या काळात जास्त फोफावला. या काळात कृष्णवर्णीय/श्वेतवर्णीय निदर्शक, समर्थक यांच्यात दहशत निर्माण करणे, मारहाण, लिंचिंग वगैरे मार्गांनी त्यांनी चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेतील पोलिसांचा ही याला पाठिंबा असल्याने या गुन्हेगारांना अगदी बोटावर मोजण्याइतपत वेळा कोणत्याही प्रकारची शिक्षा होत असे.

reconstruction.jpeg
(स्रोत - learning.hccs.edu)

विविध राज्यांमध्ये रिकन्स्ट्रक्शनच्या काळ वेगवेगळा होता. काही राज्यात ते कमी काळ तर काही राज्यात अधिक काळ चालले. केंद्र सरकार आणि सैनिक हे सरकारी कायदे पाळले जात आहेत की नाही याची शाहनिशा करत असत. या काळात उत्तरेतून अनेक शिक्षक, मुक्त गुलाम, स्वयंसेवक, चर्चचे मिनिस्टर्स, छोटे व्यवसायिक हे दक्षिणेत येऊन शाळा उघडणे, शिक्षकाचे काम करणे, छोटे उद्योग सुरु करुन कृष्णवर्णीयांना रोजगार मिळवून देण्यास मदत करणे, त्यांच्या पुनर्वसनास मदत करणे इत्यादी प्रकारे नवमुक्त गुलामांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु दक्षिणेतील राज्यांची सत्ता ही कृष्णवर्णीयांच्या द्वेष करणार्‍या white supremacist लोकांकडे होती. नवमुक्त गुलामांना मुख्य प्रवाहात येणे अधिक अवघड होईल अशा प्रकारचे कायदे ते हळूहळू मंजुर करुन घेत होते. क्लु क्लक्स क्लॅन आणि त्याप्रकारच्या इतर संघटना राजकारण्यांच्या आश्रयाखाली कृष्णवर्णीयांमध्ये जबर दहशत निर्माण करुन त्यांना मतदानापासून रोखत होते. अमेरिकेतील लोकशाहीमध्ये राज्यांना खूप जास्त स्वायत्तता आहे. राज्ये स्वत:चे कायदे बनवून आपापल्या राज्यात त्यांच्या अंमलबजावणीची सक्ती करु शकतात. जसे जसे सरकारने विविध राज्यांमध्ये पुनर्बांधणीचे काम संपवले आणि सैनिक परत जायला लागले तसे तसे (आणि त्या आधीही) दक्षिणेतील राज्य कृष्ण आणि श्वेतवर्णीयांना विभक्त ठेवण्यासाठी कायदे करु लागले. दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये सेग्रिगेशन म्हणजेच विभक्ततेला पाठिंबा देणारे सरकार आले होते. १८७०च्या दशकात कृष्णवर्णीयांच्या विभक्तीकरणास सुरुवात झाली. या काळात वांशिक म्हणजेच racial segregation करता जे कायदे केले गेले त्यांना Jim Crow Laws असे नाव पडले. या कायद्यांनुसार दक्षिणेतील राज्यांमध्ये segregation हे कायदेशीर झाले, आणि त्यांचे पालन न केल्यास अटकेपासून ते मृत्यूदंडापर्यंत कडक शिक्षांची तरतूद करण्यात आली. जिम क्रो कायदे हे मुख्यत्वे कृष्णवर्णीयांना मतदानापासून, कुठलीही सरकारी नोकरी करण्यापासून, शिक्षणापासून किंवा उन्नत्ती करण्याची कुठलीही संधी मिळण्यापासून वंचित ठेवण्याकरताच निर्माण केले गेले होते. दक्षिणेतील राज्यसरकार, कायदेपंडीत, पोलिस आणि दहशत निर्माण करणारे गट मिळून कृष्णवर्णीयांना त्यांच्या स्वातंत्र्याची जबर किंमत मोजायला लावत होते.

जिम क्रो कायद्यांनुसार कृष्णवर्णीयांवर वेगळ्या किंवा विभक्त सरकारी शाळा, रेल्वेत वेगळे डबे, वेगळी प्रसाधनगृहे, पाण्याचे नळ, प्रार्थनाघरं, खानावळी, प्रेक्षागृहं आणि इतर अनेक विभक्त सुविधा वापरण्याची सक्ती करण्यात आली. अनेक सरकारी कचेर्‍यांमध्ये त्यांच्याकरता वेगळे प्रवेशद्वार असे. दवाखाने, जेल, बस आणि अनेक ठिकाणी segregation कडक झाले. कृष्णवर्णीयांना श्वेतवर्णीय लोकांच्या वसाहतीत किंवा जवळपास राहण्यास मज्जाव करण्यात आला. हे कायदे तोडणार्‍यांना ताबडतोब शिक्षा केली जाई. कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय जोडीला लग्न करुन किंवा त्याशिवाय एकत्र राहण्यास बंदी करण्यात आली.

seggregation.jpg
(स्रोत - encrypted-tbn0.gstatic.com, history.org, bridgemi.com, scencyclopedia.org)

ग्रामीण भागात हे कायदे जास्त कठोरपणे पाळले जायचे. एखाद्या छोट्या चुकीकरता, किंवा चूक नसतानाही फक्त वचक ठेवण्याच्या हेतूने कृष्णवर्णीयांना मारहाण, घर जाळणे, मॉब लिंचिंग हे प्रकार होत. १४ व्या घटना दुरुस्ती नुसार केंद्रसरकारने जरी कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क दिलेला असला तरी मतदानाकरता नोंदणी करण्याचा किंवा मतदानाचा हक्क बजावण्याच्या प्रयत्न करणार्‍या लोकांना क्लॅनसारखे दहशत पसरवणारे गट मतदान करण्यापासून मज्जाव करत. कोणी जायचा प्रयत्न केलाच तर मारहाण ते मॉब लिंचींगसारख्या मार्गाने धडा शिकवला जात असे. दक्षिणेतील सर्वच नागरिक या विचारांचे आणि भावनाशून्य होता का, तर नाही. पण या नागरिकांना आवाज नव्हता, प्रस्थापितांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत नव्हती. पुढची जवळपास १०० वर्षे दक्षिणेतील राज्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती आणि या मुक्त झालेल्या गुलामांचे आयुष्य त्यांच्या पूर्वायुष्याएवढेच किंवा कधी कधी त्यापेक्षा क्लेषकारक होते. या १०० वर्षात दक्षिणेतून लाखोच्या संख्येनी कृष्णवर्णीयांनी उत्तर आणि पश्चिम अमेरिकेत स्थलांतर केले. याचा फटका दक्षिणेतील राज्यांना बसला. तो काळ अमेरिकेत औद्योगिक क्रांतीचा काळ होता, पण नवीन व्यवसायिकांनी दक्षिणेत न येणे पसंत केले, दक्षिण अजुनही शेतीप्रधान भागच राहिला. मोठा कामगारवर्ग कमी झाल्याने या काळात दक्षिणेतील राज्यांची आर्थिक प्रगती खुंटली. अजुनही शिक्षण, आर्थिक संधी, उद्योगधंदे या बाबतीत दक्षिणेतील काही राज्ये इतर पुढारलेल्या राज्यांची बरोबरी करु शकले नाही आहेत.

------

स्रोत -
पुस्तके
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
Us and Them: A History of Intolerance in America - Jim Carnes
वेबसाईट्स
http://history.org
https://en.wikipedia.org

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ५)

होमर प्लेसी हा लुइझियाना राज्यातील न्यू ऑर्लियन्स शहराचा रहिवाशी होता. तो वंशाने एक अष्टमांश अफ्रिकन अमेरिकन होता. त्याचे मूळचे फ्रेंच असलेले आजोबा हे अठराव्या शतकात न्यू ऑर्लियन्सला आले. तिथे त्यांनी अफ्रिकन अमेरिकन वंशाच्या 'फ्री' स्त्रीशी लग्न केले. होमरच्या आईच्या बाजूचा सगळा परिवार हा श्वेतवर्णीय होता. त्याच्या उजळ त्वचेमुळे त्याच्या पूर्वजांविषयी माहिती नसलेल्या लोकांमध्ये तो श्वेतवर्णीयच समजला जायचा पण सेग्रिगेशनच्या नियमानुसार, एका अफ्रिकन पूर्वजामुळे त्याला कृष्णवर्णीयांना लागू होणारे सर्व नियम लागू व्हायचे, पाळावे लागायचे. असे विभक्त ठेवणे हे कृष्णवर्णीयांना कमी लेखणारे आणि अपमानकारक होते. कृष्णवर्णीयांना हे नियम मान्य नव्हते आणि जमेल तेंव्हा त्यांच्यातले काही या नियमांना आपल्या पद्धतीने विरोध करत. ७ जून १८९२ रोजी न्यू ऑर्लियन्सहून रेल्वेने प्रवास करताना प्लेसीने प्रथम वर्गाचे तिकीट काढून श्वेतवर्णीयांकरता राखीव असलेल्या डब्यात प्रवेश केला. तिकीट तपासनिसाला याची कुणकुण लागताच त्याने प्लेसीला डब्यातून खाली उतरवले आणि कायदा मोडल्याबद्दल अटक केले. प्लेसीने लुइझियाना राज्यावर खटला भरला. त्याच्या वकीलाने असा युक्तीवाद केला की तेराव्या आणि चौदाव्या घटनादुरुस्तीनुसार कृष्ण आणि श्वेतवर्णीयांना (अमेरिकेच्या सर्व नागरिकांना) समान वागणूक दिली जाणे अपेक्षित आहे, त्यामुळे रेल्वे कंपनीने श्वेतवर्णीयांच्या डब्यातून प्लेसीला काढणे हे या घटनादुरुस्तीचा भंग आहे. पण न्यायाधीश जॉन हॉवर्ड फर्ग्युसन याने 'रेल्वे कंपनीला त्यांच्या अखत्यारीत प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचे कायदे बनविण्याचा अधिकार आहे' असा निवाडा देऊन प्लेसीला दंड ठोठावला. या निर्णयाविरुद्ध प्लेसीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. १८ मे १८९६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ७-१ मताधिक्याने प्लेसीच्या विरोधात निकाल दिला. '१४ व्या घटनादुरुस्तीनुसार दोन्हीही वंशांच्या लोकांना समान दर्जा देण्याची तरतूद केली गेलेली आहे, परंतु रंग किंवा वंशानुसार सर्वांनी एकत्र यावे अशी कुठलीही तरतूद त्यात नाही, त्यामुळे दोन्ही वंशांच्या लोकांना समान पण वेगळी (segregated) वागणूक देणे हे कायद्याला धरुन आहे. वेगळ्या/विभक्त असल्या तरी जोपर्यंत कृष्णवर्णीयांना समान सुविधा मिळत आहेत तो पर्यंत कुठल्याही कायद्याचा भंग होत नाही' असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला. सेग्रिगेशनचे समर्थन करुन दक्षिणेतील राज्यांमध्ये त्याला पाठबळ देण्यात 'प्लेसी व्हर्सेस फर्ग्युसन' खटला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे मानले जाते. या खटल्यातील 'Separate but Equal' निवाड्याने विभक्तीकरण हे बेकायदेशीर नाही आहे यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर दक्षिणेतील विभक्तीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. प्रत्येक गोष्ट कृष्ण आणि श्वेतवर्णीयांकरता कायद्याने विभक्त झाली. सर्वोच्य न्यायालयानेच विभक्तीकरण कायदेशीर आहे असा निर्णय दिल्यामुळे यापुढे दाद मागणार तरी कोणाकडे! दक्षिणेतील कृष्णवर्णीयांची परिस्थिती यापुढे अजून बिकट झाली.

कायद्याने दोन्हीही वंशांच्या लोकांना दिल्या गेलेल्या सुविधा जरी 'separate' असल्या तरी 'equal' दर्जाच्या असाव्यात असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात कृष्णवर्णीयांच्या शाळा, रेल्वेचे डबे, वस्त्या आणि इतर सर्व सुविधा या नेहेमीच अतिशय कनिष्ठ दर्जाच्या असायच्या. त्यांच्या शाळांना अनुदान मिळायचे नाही, जिथे दोन्हीही वंशाचे लोक एकत्र काम करु शकायचे तिथे त्यांना कमी दर्जाचे काम मिळायचे, त्यांच्या वस्त्यांच्या विकासाकरता निधी मिळायचा नाही. कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळालेला असला तरी दहशतीने त्यांना मत देण्यापासून रोकले जायचे. त्यामुळे सरकार, पोलिस, शाळा आणि इतर विकास समित्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पूर्णपणे थांबले होते. १८९६ सालापासून सेग्रिगेशन अधिक कडक झाले आणि शिक्षण, सुविधा, चांगल्या संधीची कमतरता यामुळे कृष्णवर्णीय समाजाची पिछेहाट वाढीस लागली.

पण याच समाजातून पुनर्बांधणीनंतरच्या काळात, प्रतिकूल परिस्थितीतूनही अनेक कृष्णवर्णीय लोक पुढे आले, आपल्या (आणि एकंदरीत अमेरिकन) समाजाच्या उन्नतीकरता झटले, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृष्णवर्णीयांवरच्या अन्यायाला वाचा फोडत राहिले. असाच एक युवक होता 'बूकर टी वॉशिंग्टन'. १८५६ साली स्लेव्हरीमध्ये जन्मलेला वॉशिंग्टन शिक्षण घेण्याच्या ध्येयाने इतका भारुन गेलेला होता की छोट्या वयात वेस्ट व्हर्जिनियामधील दिवसभर खाणकामगार म्हणून काम करुन तो रात्रीच्या शाळेत जायचा. कॉलेजमध्ये शिकण्याची तीव्र इच्छा, जिद्द आणि खिशात पैसे नाही, अशा परिस्थितीत अंगावर पडेल ती कामे करुन त्याने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या भाऊबंदांनाही व्हावा या हेतूने वयाच्या २४-२५ वर्षी वॉशिंग्टनने अ‍ॅलाबामा राज्यामध्ये कृष्णवर्णीयांकरता Tuskegee Institute ची स्थापना केली. १८८० च्या दशकामधील दक्षिणेतील राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांकरता पोषक वातावरण नव्हते, पण खडतर परिस्थितीत वॉशिंग्टनने थोड्या सहकार्‍यांना घेऊन ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. १८८१ मध्ये जमिनीच्या एका तुकड्यावर, एका खोलीमध्ये सुरु केलेल्या या कॉलेजमध्ये वॉशिंग्टनने पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना हर प्रकारचे व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वयंभू बनावे, इतरांवरील अवलंबित्व कमी करावे याकरता त्यांना शेती, माळीकाम, पाककला, हस्तकला, सुतारकाम, बांधकामाशी निगडीत सर्व कामे आणि इतर अनेक जोडधंद्यांचे शिक्षण दिले जायचे. टस्किगी इन्स्टिट्युटच्या सर्व इमारती या तेथील विद्यार्थ्यांनी स्वतः बांधल्या. विद्यार्थ्यांना लागणारा सर्व भाजीपाला, फळे, पिके ते स्वतः उगवायचे. स्वयंपाकाची जबाबदारीही विद्यार्थ्यांचीच असायची. स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा यावरही खूप भर दिला जायचा. सुरुवातीला सतत आर्थिक चणचण, अनुदानाची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरु झालेले टस्किगी इन्स्टिट्युट बूकर टी वॉशिंग्टन, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे खूप मोठे झाले. वॉशिंग्टनने बर्‍याच दयाळू, पुढारलेल्या मताच्या श्वेतवर्णीयांशी, राजकारण्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करुन, युरोपातील देशांमध्ये फिरुन संस्थेकरता अनुदान मिळवले. या कामाकरता तो सतत फिरतीवर असायचा. दक्षिणेतील सर्व भागांमधून येणार्‍या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांकरता टस्किगी इन्स्टिट्युट शिक्षणाचे माहेरघर ठरले. लवकरच टस्किगी इन्स्टिट्युटचे रुपांतर टस्किगी युनिव्हर्सिटीमध्ये झाले आणि तिथे वेगवेगळे शैक्षणिक विभाग सुरु झाले. तिथल्या शेतीविभागाचा प्रमुख होता अजुन एक असामान्य तरुण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. शेतीविषयक शास्त्रामध्ये संशोधक असलेला कार्व्हर हा १८६० साली स्लेव्हरीमध्ये जन्मला होता. त्याच्या आई आणि बहिणीला धाड घालून पळवून देऊन दूर विकण्यात आल्यावर त्याला त्याच्या मालकानेच मोठे केले. अतिशय कुशाग्र बुद्धीच्या कार्व्हरने प्रतिकूल परिस्थितीत, वर्णद्वेषाचा सामना करत कॉलेज शिक्षण पूर्ण केले आणि तिथेच शिकवण्यास सुरुवात केली. १८९६ साली बूकर वॉशिंग्टनने कार्व्हरला टस्किगी युनिव्हर्सिटीमध्ये शेती विभागाचा जबादारी घेण्याकरता आमंत्रण दिले आणि कार्व्हरनेही ते स्वीकारले. पुढील ४७ वर्ष कार्व्हरने तिथे अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले. दक्षिणेतील राज्ये ही शेतीप्रधान होती. वर्षानुवर्ष जमिनीवर कापूस, तंबाखु, ऊस, गहू या पिकांची लागवड व्हायची. जमिनीची काळजी न घेतली गेल्यामुळे ती निकृष्ट दर्जाची बनली होती. पिके फिरवणे (Crop rotation) ही संकल्पना शिकवून, जमिनीचा कस वाढवणारी पिके लावायला शिकवून कार्व्हरने अक्षरशः एकहाती दक्षिणेतील शेतजमीन वाचवली म्हटले तर वावगे ठरणार नाही. कार्व्हरच्या हयातीत आणि नंतरही त्याला कित्येक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्व्हर, वॉशिंग्टन यांच्याप्रमाणेच कृष्णवर्णीयांच्या उन्नतीसाठी झटलेले त्या काळातील अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे ड्ब्ल्यू. ई. बी. डु बॉइस (W. E. B. Du Bois). १८६८ मध्ये मॅसॅच्युसेट्स राज्यात जन्मलेला डु बॉइस हा हार्वर्ड विद्यापीठात डॉक्टरेट मिळविणारा पहिला कृष्णवर्णीय आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग त्याने आपल्या बांधवांवर होत असणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याकरता केला. जिम क्रो कायद्यांच्या विरोधात आवाज उठवणे, वर्णभेदाला कडा विरोध करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे, नागरी हक्क चळवळीची (civil rights movement) सुरुवात करणे, कृष्णवर्णीयांना संघटीत करण्याकरता, त्यांच्या विकासाकरता National Association for the Advancement of Colored People (NAACP) ची स्थापना करणे याकरता डु बॉइसने आयुष्यभर कष्ट घेतले. काही महिने डु बॉइसने टस्किगी इन्स्टिट्युटमध्ये विद्यार्थ्यांनाही शिकवले, परंतु कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क कोणत्या पद्धतीने मिळवून द्यावेत याबद्दल बूकर वॉशिंग्टन आणि डु बॉइस यांची विचारसरणी वेगळी होती आणि त्याबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले, त्यामुळे पुढे वेगळे राहून दोघांनीही हे कार्य आपल्या पद्धतीने सुरु ठेवले. या काळात अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या हजारो कृष्णवर्णीयांनी आपल्या परिस्थितीकरता इतरांना दोष देत बसण्यापेक्षा शाळा-कॉलेजमध्ये जाऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वत:च्या, आपल्या बांधवांच्या विकासाकरता करण्यास सुरुवात केली.

बूकर टी वॉशिंग्टन, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, ड्ब्ल्यू ई बी डु-बॉइस
PeopleCollage.jpg
(स्रोत - en.wikipedia.org)

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत निरपराध कृष्णवर्णीयांच्या समुहाद्वारे हत्या (lynching) किंवा सामुहिक हत्येच्या (massacres) घटना वाढीस लागल्या होत्या. या काळात दक्षिणेतून अनेक कृष्णवर्णीयांनी उत्तरेस आणि पश्चिमेस स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले. १९१६ ते १९७० सालामध्ये कृष्णवर्णीयांनी केलेल्या स्थलांतरास 'The Great Migration' असे म्हणतात. सहा दशकांच्या कालावधीमध्ये चांगल्या संधीकरता, शिक्षणाकरता, दहशतीपासून, लिंचिंगपासून वाचण्याकरता जवळपास ६० लाख कृष्णवर्णीयांनी दक्षिणेतून स्थलांतर केले. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. उत्तरेत मोठमोठे कारखाने वाढत होते, संपूर्ण अमेरिकेत रेल्वेचे जाळे पसरत होते. कच्चा माल आणि तयार उत्पादनाची वाहतूक सोपी झालेली होती. दरवर्षी लाखोंच्या संख्येने युरोपातून अमेरिकेत लोक स्थलांतर करत होते, त्यामुळे कामगारांची कमतरता नव्हती. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरु झाले आणि युरोपातून येणारा लोंढा कमी झाला. कारखान्यात काम करणारे अनेक तरूण युद्धाकरता देशाबाहेर पाठवले गेले. याकाळात अमेरिकेत स्थलांतराकरता नवी धोरणे राबविल्यामुळे आधीपेक्षा स्थलांतरदेखील कमी झाले. युद्धाकरता लागणार्‍या मालाकरता नवे कारखाने उघडले पण लोकांची कमतरता भासायला लागली. दक्षिणेतील कृष्णवर्णीयांकरता उत्तरेत मोठी संधी उपलब्ध झाली. विभक्तीकरण आणि हालाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या लोकांनी मिळेल त्या साधनाने उत्तरेतील राज्यांमध्ये जायला सुरुवात केली. न्यूयॉर्क, शिकागो, डेट्रॉइट, फिलाडेल्फिया या शहरात मोठ्या संख्येने कृष्णवर्णीय लोक दाखल झाले. बरेच जण कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टन राज्यातही गेले. मिळेल ते काम करण्याची या लोकांची तयारी होती. १९७० पर्यंत कमी अधिक प्रमाणात सतत उत्तरेस आणि पश्चिमेस स्थलांतर सुरुच होते. १९१० सालापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कृष्णवर्णीय हे दक्षिणेत राहायचे, १९७० पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले. या पूर्वी कृष्णवर्णीयांची वस्ती ही ग्रामीण भागात जास्त होती, १९७० पर्यंत प्रमाण बरोबर उलटे झाले, आणि अमेरिकेतील शहरांमध्ये कृष्णवर्णीयांची संख्या जास्त वाढली.

या नवीन जागेवर कृष्णवर्णीयांकरता सर्वच काही अलबेल नव्हते. गरीब युरोपियन लोकांच्या सततच्या आगमनामुळे, औद्योगीक क्रांतीनंतर संधी निर्माण झाल्याने सुरु झालेल्या स्थलांतरामुळे उत्तरेतील शहरे अतिशय गजबजलेली होती. कृष्णवर्णीयांच्या स्थलांतरामुळे शहरांमध्ये कामाकरता स्पर्धा वाढली. घरांची कमतरता भासायला लागली. कित्येक गावांमधील रहिवाशी त्यांच्या आगमनाने खुष नव्हते. त्यांचे आणि या नवीन आलेल्या लोकांचे संघर्ष व्हायचे, कधी कधी ते विकोपालाही पोहोचायचे. उत्तरेत जरी विभक्तीकरणाचा सामना करावा लागला नाही तरी पूर्वग्रह, भेदभाव याचा सामना कृष्णवर्णीयांना तेथेही करावा लागलाच. त्या काळात आयरिश, जर्मन, इटालियन, चायनिज आणि इतर देशांमधून आलेले लोक आपापली वस्ती करुन राहायचे. स्थलांतरीत कृष्णवर्णीयांनी नव्या शहरात आपली वस्ती करुन राहायला सुरुवात केली. या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधांची कमतरता असायची, अतिशय कमी जागेत लोकांना दाटीवाटीने रहावे लागायचे. ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात गजबलेल्या शहरांमधील प्रत्येक गरीब वस्तीमध्ये होती. सेग्रिगेशन नसले तरी दुर्लक्षित शाळा, अस्वच्छ वस्त्या यांचा सामना त्यांना नवीन ठिकाणही करावा लागला. कृष्णवर्णीयांकरता आयुष्य हे कधी सोपे नव्हतेच. पण त्या काळात ते बहुतांशी गरीब अमेरिकन लोकांकरता नव्हते. १९३० च्या जागतिक मंदीचा धक्का सर्व अमेरिकन जनतेला बसला. नोकरी गेली, पैसे गेले, वस्तुंच्या किमती वाढल्या, जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला. पण या मंदीचा धक्का श्वेतवर्णीयांपेक्षा कृष्णवर्णीयांना जास्त बसला. बरेच कृष्णवर्णीय हे 'unskilled workers' होते. मंदीच्या काळात त्यांच्या नोकर्‍यांवर गदा आली. नोकरी गेल्यामुळे आणि बचत नसल्याने त्यांचे आयुष्य आणखी हालाखीचे झाले. १९३२ मध्ये जवळपास ५० टक्के कष्टकरी कृष्णवर्णीय हे बेरोजगार होते. दक्षिणेत त्यांची परिस्थिती अजुन बिकट होती. नोकरीवरुन काढण्यात येणे किंवा त्यांची नोकरी श्वेतवर्णीय अमेरिकन व्यक्तीला दिली जाणे यामुळे मंदीच्या काळात तिथे गोर्‍या लोकांच्या दुप्पट, तिप्पट कृष्णवर्णीय बेरोजगार झाले.

migration.jpg

(स्रोत - www.communitiescount.org)

शिक्षणाचा अभाव, पैशांची कमतरता, अपमानाची भावना यामुळे कृष्णवर्णीय तरुणांमध्ये बंडखोरीची भावना वाढीस लागायला सुरुवात झाली होती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मोठ्या संख्येने कृष्णवर्णीय तरुण सैन्यात भरती झाले. आपल्या श्वेतवर्णीय देशबंधुंच्या खांद्याला खांदा लावून शौर्याने लढले, कित्येक जण मृत्यूमुखी पडले. सैन्यात असताना थोड्या काळाकरता दक्षिणेतून सैन्यात भरती झालेले अनेक कृष्णवर्णीय सैनिक पहिल्यांदा समानता अनुभवत होते. युद्ध झाल्यावर ते परत आले आणि त्यांचा फार मोठा भ्रमनिरास झाला. अर्थातच त्यांच्या राज्यातील परिस्थिती मुळीच बदलेली नव्हती. देशाच्या विजयाकरता प्राणाची आहुती द्यायला निघालेल्या या सैनिकांना परत आल्यावर तीच अपमानास्पद वागणूक, तेच विभक्तीकरण याचा सामना करावा लागला. १९५० च्या दशकात दक्षिणेतील कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये असंतोष वाढत होता. कित्येक जण आपापल्या पद्धतीने अन्यायाला विरोध करत होते, वाचा फोडायचा प्रयत्न करत होते. पण शेवटी त्यांचे सर्व प्रयत्न हे कमीच पडायचे. राज्यात त्यांच्या शब्दांना किंमत नव्हती. जनजागृती करणे, संघटित प्रयत्न करणे आणि मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे हेच त्यांचे मुख्य शस्त्र होते. त्यांच्याकडून विफलतेतून निर्माण झालेली हिंसा ही फार वाईट पद्धतीने चिरडली जायची, जेणेकरुन असा प्रयत्न परत कोणी करु नये. राजकारणी, पोलिस एकत्र मिळालेले असल्याने हे सहज शक्य व्हायचे. या काळात अनेक कृष्णवर्णीयांनी कायद्याचे शिक्षण घेण्यास, अमेरिकेच्या राज्यघटनेचा बारीक अभ्यास करण्यास सुरुवात केली. याच राज्यघटनेतील दुरुस्तीमध्ये पळवाट काढून सर्वोच्च न्यायालयाने १८९६ पासून त्यांना श्वेतवर्णीयांपासून विभक्त ठेवण्यास सुरुवात केली होती. आता कित्येक कृष्णवर्णीयांचे खटले त्यांच्या बांधवांनी लढ्ण्यास सुरुवात केली. बरेच खटले लढण्याकरता NAACP (National Association for the Advancement of Colored People) ही संघटना आर्थिक मदत करायची. उत्तरेतील काही श्वेतवर्णीयांचाही त्यांना पाठींबा होताच. आपण संघटीत होऊन कायद्याच्या आणि चळवळीच्याद्वारेच स्वतःला न्याय मिळवूण देण्याशिवाय पर्याय नाही हे कृष्णवर्णीयांच्या लक्षात आले होते.

१८९६ मध्ये 'प्लेसी व्हर्सेस फर्ग्युसन' निवाड्याने जसे सेग्रिगेशन किंवा विभक्तीकरणावर शिक्कमोर्तब केले तसे सेग्रिगेशनला खिंड पाडणारा पहिला महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १९५४ साली 'ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन' या खटल्यात दिला. कँसस राज्यामधील टोपेका जिल्हात ऑलिव्हर ब्राऊन याला आपल्या तिसरीत असलेल्या मुलीला घराजवळच्या सार्वजनिक शाळेत (पब्लिक स्कूल) पाठवायचे होते. पण सेग्रिगेशनच्या नियमाखाली शाळेने त्याची मागणी फेटाळली. दुसरी शाळा ही घरापासून बरीच दूर होती. ब्राऊन आणि त्याच्यासारख्याच परिस्थितीत सापडलेल्या इतर १२ कृष्णवर्णीय कुटुंबियांनी मिळून २० मुलांना शाळेत भरती करुन घेण्याबद्दल स्कूल बोर्डाला विनंती केली आणि ती फेटाळल्यावर शाळेच्या बोर्डावर खटला दाखल केला. त्या काळात इतर राज्यांच्या न्यायालयांमध्येही विभक्त शिक्षणाबद्दल असे खटले आले होते. शाळांचा कनिष्ठ दर्जा, अनुदानाचा अभाव आणि विभक्तीकरणाला प्रामुख्याने विरोध या आणि इतर कारणाने कित्येक राज्यातील कृष्णवर्णीय पालक शिक्षणपद्धतीत बदल आणण्याकरता आग्रही होते. 'प्लेसी व्हर्सेस फर्ग्युसन'चा दाखला देत डिस्ट्रिक्ट कोर्टाने 'ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन'चा निकाल 'बोर्ड ऑफ एज्युकेशन'च्या बाजूने दिला. पुढे हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. बोर्ड ऑफ एज्युकेशनशी संबंधित असलेले ५ खटले त्या वेळी एकत्रित 'ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन' नावाखाली सर्वोच्च न्यायालयात लढले गेले. या खटल्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण अमेरिकेचे डोळे निकालावर लागले होते. आतापर्यंत सेग्रिगेशनला आव्हान देणारा कुठलाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला नव्हता. पण या खटल्याचा निकाल एकमताने (९-०) सर्वोच्च न्यायालयाने ब्राऊनच्या बाजूने दिला. १८९६ साली निर्णय दिला गेलेला 'Separate but Equal' नियम शा़ळांच्या बाबतीत असंवैधानिक (unconstitutional) आहे आणि 'separate' शैक्षणिक संस्था या मूलतः 'unequal' असतात असा निवाडा देऊन त्यांनी यापुढे शा़ळेतील विभक्तीकरण बेकायदेशीर ठरवले. ९-० निकाल देण्याकरता पडद्यामागे बरेच नाट्य घडले, पण सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे जवळपास ६० वर्ष चालवलेल्या धोरणातला फार मोठा बदल होता. हा निर्णय येणार्‍या बदलांची नांदी देणारा होता. दक्षिणेचा अपवाद वगळता देशभरातील लोकांनी या निर्णायाचे स्वागत केले. मात्र दक्षिणेतील राजकारण्यांनी, अनेक लोकांनी हा निकाल फेटाळून लावला. फक्त एका निर्णयाने कृष्णवर्णीयांबरोबर आपल्या मुलांना एकत्र शाळेत पाठवणे हे दक्षिणेतील गोर्‍यांच्या पचनी पडणे अवघड होते. पण आता सार्वजनिक शाळांमध्ये कृष्णवर्णीयांना नोंदणी करण्यापासून ते कायद्याने रोकू शकत नव्हते. कित्येक महिने (काही प्रकरणांमध्ये वर्षभरही) बर्‍याच सार्वजनिक शाळा बंद ठेवल्या गेल्या. ज्या शाळा सुरु झाल्या त्यातील बर्‍याच शाळांमध्ये तिथे येणार्‍या कृष्णवर्णीय मुलांना टोमणे, मारहाण, दगडफेक, थुंकणे, दहशत या मार्गाने शाळेत येण्यापासून थांबवण्याचे प्रकार घडले. पण जिथे शक्य होते तिथे मुले शाळेत जातच राहिली. काही ठिकाणी सैनिकांच्या संरक्षणाखाली गेली, पण मुलांनी शाळेत जाणे थांबवले नाही. अमेरिकेत लवकरच सुरु होणार्‍या कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क चळवळीमध्ये (civil rights movement) या निवाड्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही केस ब्राउनच्या बाजूने लढलेला NAACP चा प्रमुख सल्लागार थरगूड मार्शल हा अत्यंत निष्णात वकील पुढे १९६७ साली सर्वोच्च न्यायालयाचा प्रथम कृष्णवर्णीय न्यायाधीश बनला.

Brown.png

(स्रोत - en.wikipedia.org)

या काळात अमेरिकन राजकारणात अजुन एक बदल घडत होता तो म्हणजे अमेरिकेतील राजकारणामधील २ प्रमुख पक्ष रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटीक पक्षांच्या विचारसरणीमधील अदलाबदल. १८६५ साली सुरु झालेल्या रिपब्लिकन पार्टीची सुरुवात उदारमतवाद, गुलामीला विरोध, स्थलांतरीतांकरता मुक्त धोरण, सार्वजनिक शिक्षणामध्ये गुंतवणूक, समाजाच्या सर्व घटकांना एकत्र पुढे नेणे या धोरणांवर झाली. अब्राहम लिंकन सारखा लायक नेता त्यांना पक्षाचे पुरोगामी विचार पुढे नेण्याकरता मिळाला. उत्तरेत या पक्षाला जबरदस्त पाठींबा होता. याउलट १८२८ साली सुरु झालेला डेमोक्रॅटीक पक्ष हा पुराणमतवादी (conservative) विचारसरणीवर सुरु झाला होता. स्लेव्हरीला, वर्णभेदाला पाठिंबा आणि १८०० साली सुरु झालेल्या Democratic-Republican पक्षाच्या उदारमतवादी धोरणांना तसेच प्रस्थापितांना विरोध हे डेमोक्रॅटीक पक्ष स्थापन होण्याचे मुख्य कारण ठरले. या पक्षाचा पहिला राष्ट्राध्यक्ष अँड्र्यु जॅकसन आणि त्यानंतर जेम्स पोल्क या राष्ट्राध्यक्षांनी वर्ण/वंशभेदी योजना अजून पुढे नेल्या. सिव्हील वॉर नंतर त्या जास्त कट्टर झाल्या. डेमोक्रॅटीक पक्ष दक्षिणेतील राज्यांमध्ये फोफावला. मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन्हीही पक्षांच्या विचारसरणीतील अदलाबदलाची सुरुवात झाली, १९३० च्या दशकात तो बदल जास्त ठळक झाला, आणि १९५० आणि १९६० च्या दशकात तो बदल पूर्ण झाला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समान हक्क मिळवून देण्यात डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर तो हक्क दिला जाऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी प्रयत्न केले. हा बदल आता आपल्याला जरी आश्चर्यकारक वाटत असला तरी राजकारणात धोरणे आणि समर्थक कसे बदलू शकतात याचे हे मोठे उदाहरण आहे. १९६० सालानंतर उत्तरेतील राज्ये डेमोक्रॅटीक पक्षाला पाठींबा देऊ लागली तर दक्षिणेतील रिपब्लिकन पक्षाला. ज्या डेमोक्रॅटीक पक्षाने गुलामगिरीला पाठिंबा दिला होता, दहशत निर्माण करणार्‍या संघटनांना पाठीशी घातले होते, कृष्णवर्णीयांचे आयुष्य कमालीचे खडतर केले होते त्याच पक्षाला १९६० नंतर कृष्णवर्णीयांचा मोठा पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली.

खालील नकाशा १८९६ आणि २००० साली पार पडलेल्या निवडणुकांमधील निकाल दाखवतो. इथे निळ्या रंगात डेमोक्रॅटीक पक्षाला बहुमत मिळालेली राज्ये तर लाल रंगात रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळालेली राज्ये दिसून येतात. पक्षाच्या धोरणातील बदलामुळे तसेच स्थलांतरामुळे बदललेल्या समीकरणामुळे काही राज्यांचा अपवाद सोडता १८९६ आणि २००० साली या दोन पक्षांना पाठिंबा देणारी राज्ये पूर्णपणे पलटलेली दिसत आहेत.

DemocratRepublicanFlipCollage.jpg
(स्रोत - www.270towin.com)

१९५० आणि १९६० ची दशके ही अमेरिकेच्या सिव्हिल राइट्स चळवळीमधील अतिशय महत्त्वाची दशके आहेत. विभक्तीकरणाच्या नियमांना जरी लोकांनी आपापल्या पद्धतीने विरोध सुरु केला असला तरी १९५० च्या दशकामध्ये या विरोधाला संघटीत चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरच्या नेतृत्वाखाली कृष्णवर्णीयांमध्ये चैतन्य प्राप्त झाले. हजारो कृष्णवर्णीयांनी (आणि त्यांच्या श्वेतवर्णीय समर्थकांनी) समानतेकरता या चळवळीद्वारे शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्यास सुरुवात केली. कृष्णवर्णीयांना विभक्त ठेवणारे, त्यांची प्रगती रोखून ठेवणारे कायदे बदलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची वेळ आता जवळ आलेली होती.

तळटीप -
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटीक पक्षांच्या विचारसरणीमधील अदलाबदल हा या लेखाशी संबंधित विषय नसल्याने यावर जास्त खोलात लिहीले नाही आहे. मात्र ज्यांना या विषयी जास्त माहिती हवी आहे त्यांनी खालील लिंक्स नक्की पाहाव्यात.

डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रवास - व्हाईट सुप्रिमसी ते ओबामा

रिपब्लिकन पक्षाचा प्रवास - लिंकन ते ट्रंप

(स्रोत -
पुस्तके
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
Up from Slavery - Booker T. Washington
A People's History of the United States - Howard Zinn
वेबसाईट्स
http://history.org
https://en.wikipedia.org)

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ६)

मे १९५४ मधील ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन खटल्यातील निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने शाळेमधील सेग्रिगेशन रद्द केले आणि दक्षिणेत कृष्णवर्णीयांना आशेचा किरण दिसला. वर्णभेद, विभक्तीकरण, असमानता या बाबतीत फारसा बदल झाला नसला तरी शहरांमध्ये कृष्णवर्णीयांनी त्याबद्दल आपापल्या परीने निषेध नोंदवण्यास सुरुवात केली होती. मात्र १९५५ च्या ऑगस्ट महिन्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे वर्णभेदी दक्षिणेत कृष्णवर्णीय समाज न्याय या गोष्टीपासून किती दूर आहे हे सार्‍या देशाने परत पाहिले. १९५५ साली उन्हाळ्याच्या सुटीमध्ये एमेट टिल नावाचा १४ वर्षांचा मुलगा शिकागोहून आपल्या नातेवाईकांना भेटायला मिसिसिपी राज्यातल्या एका छोट्या खेड्यात गेला. जायच्या आधी एमेटच्या आईने त्याला शिकागो आणि मिसिसिपीमधील परिस्थितीतील फरक सांगून तिथे जास्त काळजीपूर्वक वागायला सांगितले होते. तिथे असताना एके दिवशी एमेट आपल्या मित्रांबरोबर किराणा मालाच्या दुकानात गेला आणि कॅरोलाईन ब्रायंट या दुकानदाराच्या गोर्‍या पत्नीने एमेटवर तो छेडछाड करत असल्याचा आरोप केला. दक्षिणेत कृष्णवर्णीयाने गोर्‍या स्त्रीशी कोणत्याही प्रकारची सलगी करण्यास पाहणे हा फारच गंभीर गुन्हा होता. त्या दुकानात नक्की काय घडले हे कधीच स्पष्ट झाले नाही. पण तो आरोप एमेटने ठामपणे नाकारला. या घटनेनंतर कॅरोलाईनचा पती रॉय आणि त्याच्या भावाने एमेटचे घरातून जबरदस्तीने अपहरण केले, आणि हाल करुन शेवटी त्याला गोळी घालून ठार मारले. तीन दिवसांनी एमेटचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला. दक्षिणेतील वर्णभेदी, दडपशाही करणार्‍या समाजाने एमेटचा जीव घेतला. शिकागोला त्याच्या अंत्यविधीला हजारो लोकांनी गर्दी केली. कित्येक वार्ताहरांनी ही घटना त्यांच्या वृत्तपत्रांद्वारे देशासमोर आणली. १४ वर्षीय एमेटच्या कृर हत्येने सारा देश हादरला. त्याच्या हत्येने दक्षिणेतील राज्यांमधील असलेला भयंकर वंशभेद आणि कृष्णवर्णीयांची बिकट परिस्थिती परत एकदा संपूर्ण देशासमोर आली. सप्टेंबर महिन्यात गोर्‍या लोकांच्या ज्युरीने रॉय आणि त्याच्या भाऊ निर्दोषी असल्याचा निर्णय दिला. कृष्णवर्णीयांना ज्युरीची भूमिका पार पाडण्याचा हक्क दक्षिणेत दिला जात नसे त्यामुळे न केलेल्या गुन्ह्याकरता कृष्णवर्णीयांना दोषी ठरवून शिक्षा देणे आणि केलेल्या गुन्ह्याकरता गोर्‍या व्यक्तीला निर्दोषी ठरवणे हे गोर्‍या ज्युरीच्या गटाला सहज शक्य होत असे. खरी साक्ष देण्याकरता कृष्णवर्णीय पुढे येण्यासही घाबरत असत. कायद्याचे भय नसल्याने दक्षिणेतील गोरे कित्येकदा कायदा आपल्या हातात घेत. कृष्णवर्णीयांविरुद्ध गुन्हा कबूल केला तरी त्यांना शिक्षा होत नसे. या खटल्याच्या निकालाकरता देशभरातून कित्येक वार्ताहर मिसिसिपीत पोहोचले होते आणि सर्वांनीच दक्षिणेतील न्यायदानाची पद्धत पाहिली. एमेट टिलच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशातील कृष्णवर्णीय चिडले, हतबल झाले आणि जास्त संघटीतही झाले.

याच काळात अमेरिकेतील अ‍ॅलाबामा राज्यातील माँटगोमेरी गावातील एका छोट्या चर्चमध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर नावाचा २५ वर्षाचा तरुण धर्मोपदेशकाचे काम करण्याकरता दाखल झाला. थिऑलॉजी या विषयात उच्चशिक्षण घेतलेल्या मार्टिनसमोर खूप उज्जव भवितव्य होते, पण मोठ्या गावात काम करण्यापेक्षा छोट्या गावातील चर्चमध्ये काम करुन जनजागृती करण्याची त्याची इच्छा होती. अ‍ॅलाबामा राज्यात मोठ्या प्रमाणात कृष्णवर्णीय लोक राहत आणि दक्षिणेतील सर्वात जास्त सेग्रिगेटेड राज्य म्हणून अ‍ॅलाबामा कुप्रसिद्ध होते. रोझा पार्क्स ही माँटगोमेरीमध्येच NAACP (National Association for the Advancement of Colored People) च्या शाखेची सचिव म्हणून काम करत असे. तिचा रोजचा प्रवास बसने असे. दक्षिणेतील इतर गावांप्रमाणेच माँटगोमेरीतल्या सार्वजनिक बसेस सेग्रिगेटेड होत्या, बसमध्ये समोरची बाजू श्वेतवर्णीयांकरता तर मागची कृष्णवर्णीयांकरता राखीव असे. १ डिसेंबर १९५५ साली काम संपवून आपल्या राखीव जागेवर बसून घरी जात असताना श्वेतवर्णीयांच्या जागा भरल्याने बसचालकाने रोझाला तिची जागा श्वेतवर्णीय प्रवाशाकरता खाली करायला सांगितले. अशी घटना काही पहिल्यांदा घडत नव्हती. कृष्णवर्णीयांना त्याच्या राखीव जागा श्वेतवर्णीयांना द्यायला लागायचे प्रसंग अधुन मधुन घडायचे. माँटगोमेरीमध्ये काही महिन्यापूर्वीच असा प्रसंग घडला होता आणि नकार दिल्यामुळे एका शाळकरी कृष्णवर्णीय मुलीला अटकही करण्यात आली होती. रोझाने तिची जागा देण्यास नकार दिला आणि तिला अटक झाली. मितभाषी, सौम्य स्वभावाच्या रोझाला अटक झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि सर्वांनाच तिच्या या धाडसाचे फार आश्चर्य वाटले. असमनतेच्या वागणुकीमुळे, श्वेतवर्णीयांच्या दांभिकतेमुळे कृष्णवर्णीय समाज चिडलेला होता. न्यायाने वागणार्‍या रोझाच्या अटकेचा निषेध करण्याकरता माँटगोमेरीतल्या कृष्णवर्णीय समाजाने एकत्र येऊन तिला पाठिंबा देण्याचे आणि तिच्या अटकेला आव्हान देण्याचे ठरवले. येत्या आठवड्यातील सोमवारी रोझावर कोर्टात खटला भरला जाणार होता. तिच्या अटकेचा निषेध करण्यासाठी त्या दिवशी सर्व कृष्णवर्णीयांनी सार्वजनिक बस वर बहिष्कार टाकावा असे ठरवण्यात आले. रातोरात पत्रकं छापून सर्व कृष्णवर्णीयांमध्ये वाटली गेली. रविवारी कृष्णवर्णीयांच्या वेगवेगळ्या चर्चमध्ये धर्मगुरुंनी याबद्दल लोकांना माहिती दिली. डिसेंबरचा महिना होता, भरपूर थंडी पडलेली होती आणि बहुतांशी कृष्णवर्णीय गरीब असल्याने कामाच्या ठिकाणी जाण्याकरता सार्वजनिक बसवर अवलंबून होते, तरीही चालत आणि शक्य होते त्यांनी एकत्र गाडीने जाऊन त्या दिवशी सर्व बसेस वर बहिष्कार टाकला. माँटगोमेरीतले गोरे यामुळे आश्चर्यचकित झाले, कृद्ध झाले पण लोकांनी काही बेकायदेशीर काम न केल्याने सुरुवातीला गप्प बसले. त्या आठवड्यात गुरुवारीही हेच घडले, आणि कोणीही बसने गेले नाही. पुढचा पूर्ण आठवडा हेच घडले. लोक एकमेकांना मदत करत, कित्येक मैल चालत कामाच्या ठिकाणी जात राहिले, पण रोझाला पाठींबा देण्याकरता सेग्रिगेटेड बसने जाणे सर्वांनी बंद केले. आठवड्याचे महिने झाले आणि महिन्याचे एक वर्ष पण माँटगोमेरीतल्या कृष्णवर्णीयांमध्ये क्रांतीचे वारे शिरले होते. ३८५ दिवस बसमध्ये एकही कृष्णवर्णीय चढला नाही. त्या काळातल्या दक्षिणेत हे फार धैर्याचे काम होते. कृष्णवर्णीयांच्या शांत, शिस्तबद्ध निषेधाची बातमी पूर्ण देशभर झाली आणि त्यांना पाठिंबा मिळू लागला. बसकंपनीचे मुख्य प्रवासी हे कृष्णवर्णीय असल्याने त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. शेवटी कृष्णवर्णीयांच्या या शांततापूर्ण दबावतंत्राचा विजय झाला आणि १९५६ मध्ये जिल्हातील कोर्टाने निवाडा देऊन माँटगोमेरीतील सार्वजनिक बसमधील सेग्रिगेशन बंद केले. त्या काळात ही फार अद्भूत घटना होती. सर्वोच्च न्यायालयाला मध्ये न आणता फक्त चळवळीच्या मार्गातून, जिल्हा कोर्टाच्या माध्यमातून कृष्णवर्णीयांनी हा विजय मिळवला होता. या शांततामय पद्धतीने चालवल्या चळवळीचे नेतृत्व मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरने केले. या काळात कित्येक कृष्णवर्णीयांना मारहाण झाली, घरे जाळली गेली, रोझा पार्क्सला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या, किंगच्या घरावर हल्ला झाला, त्याला अटकही करण्यात आली, पण कुठल्याही दबावतंत्राला बळी न पडता संघटित आणि अहिंसावादी मार्गाने माँटगोमेरीतील कृष्णवर्णीयांनी आपला हक्क मिळवला.

rosaparks_collage.jpg
(स्रोत - blackoutloud.wordpress.com)

हा अहिंसावाद आणि सविनय कायदेभंगाचे (civil disobedience) तत्त्व अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क चळवळीत (Civil Rights Movement) आले कुठून? अहिंसावादी मार्गाने चळवळ पुढे नेण्याचे श्रेय हे पूर्णपणे मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरचे आहे. कॉलेजमध्ये असताना किंगने महात्मा गांधींनी भारतात सुरु केलेल्या अहिंसावादी चळवळीविषयी वाचले आणि त्याने तो भारावून गेला. त्याच्या जीवनावर गांधीजींच्या अहिंसावादी तत्त्वाचा फार मोठा प्रभाव पडला. कृष्णवर्णीयांनी सुरु केलेल्या चळवळीचे रुपांतर जर शांततामय, अहिंसावादी चळवळीमध्ये केले तर ती पुढे नेण्यास याचा खूप फायदा होईल याची किंगची खात्री होती. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीमध्ये सविनय कायदेभंग, अहिंसावाद आणून त्याने या चळवळीचे स्वरुपच पालटले. या आधी समान हक्क मिळवण्याकरता झालेल्या चळवळींमध्ये लोकांचा सहभाग तसा कमी प्रमाणात असायचा. पण लोकांना चळवळीचे नवे स्वरुप पसंत पडले आणि अधिकाधिक लोकांनी अशा प्रकारच्या शांततामय चळवळीमध्ये सामील व्हायला सुरुवात केली. माँटगोमेरीमधील यशस्वी चळवळीनंतर या मार्गाने आपल्याला आपला हक्क मिळवता येईल याबद्दल कृष्णवर्णीयांना विश्वास वाटायला सुरुवात झाली होती. त्या काळात वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन यामुळे त्यांची चळवळ देशातील सर्व लोकांसमोर पोहोचली होती, तिला देशभरातील लोकांची सहानुभूती मिळाली. एका छोट्या गावात जनजागृती करण्याच्या हेतूने आलेला किंग माँटगोमेरीतील अहिंसावादी चळवळीनंतर पूर्ण राष्ट्रात प्रसिद्ध झाला. जगातील इतर देशांमध्येही त्याच्याबद्दल, बदलेल्या स्वरुपातील नागरी हक्क चळवळीबद्दल लिहून यायला लागले.

त्या काळात नागरी हक्क चळवळीद्वारे कृष्णवर्णीयांच्या हक्कांकरता लढणारे नेते हे वेगवेगळ्या विचारसरणीचे होते. NAACP करता वर्षानूवर्ष काम केलेले नेते हे कोर्ट आणि कायद्याद्वारे हक्क मिळवण्याच्या मताचे होते. कोर्ट आणि कायद्याद्वारे जाण्याची प्रक्रिया जरी कायमस्वरुपी बदल आणणारी असली तरी ती संथ, वेळखाऊ होती. तसेच ती कुशल वकिलांवर अवलंबून असे. थरगूड मार्शल, फिलीप रँडॉल्फ वगैरे नेते या मार्गाचा अवलंब करणारे होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, रॅल्फ अ‍ॅबरनॅथी आणि त्यांचे सहकारी हे सर्व कृष्णवर्णीयांनी एकत्र येऊन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करुन, अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळवून अन्यायाला आव्हान द्यावे या मताचे होते. या मार्गात अनेक धर्मोपदेशक सहभागी होते आणि ते चर्चद्वारे सर्वसामान्यांमध्ये चळवळीबद्दल प्रबोधन करत. कृष्णवर्णीय लोक हे मूळतः भाविक, नियमितपणे चर्चमध्ये जाणारे असल्याने या मार्गाबद्दल जनजागृती करणे धर्मगुरुंना सोपे जाई. परंतु हा ही मार्ग काही लोकांकरता संथ होता. ३०० वर्षाच्या इतिहासात दबून राहिल्याने आतापर्यंत काही फायदा झाला नाही, किंबहुना आपल्यावरील दडपशाही वाढतच आहे, त्यामुळे आपला हक्क आता ओरबाडून घेतल्याशिवाय पर्याय नाही हे या गटातील लोकांचे मत बनले होते. पण मार्ग कोणताही असो, आपल्याला समानतेची वागणूक मिळावी, विभक्तीकरण रद्द व्हावे आणि अमेरिकेन घटनेने दिलेले सर्व हक्क आपल्याला मिळावेत हाच सर्वांचा हेतू होता. त्यामुळे शांततामय आंदोलनाकरता या तिन्हीही गटातील लोक या काळात एकत्र आले.

मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरच्या आगमनानंतर नागरी हक्क चळवळीमध्ये चैतन्य आले. तो अतिशय प्रभावशाली वक्ता होता. त्याने आणि त्याच्या सहकार्‍यांनी मिळून ही चळवळ संपूर्ण दक्षिणेत सर्वसामान्यंपर्यंत पोहोचली. १९५५ ते १९६५ च्या कालावधीत दक्षिणेत विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शांततामय मोर्चे, बहिष्कार, संप या गोष्टी सुरु झाल्या. काही चळवळींमध्ये कृष्णवर्णीयांबरोबर त्यांचे उत्तरेतील श्वेतवर्णीय समर्थकही सामील होत होते. पण त्याचबरोबर दक्षिणेतील श्वेतवर्णीयांचा संयम सुटत होता. 'इतकी वर्ष आपल्या वर्चस्वाने दडपून टाकलेल्या या लोकांमध्ये एवढे धैर्य आले कुठून? आणि समानतेची भाषा करताहेत म्हणजे काय? श्वेतवर्णीय नेहेमीच सर्वश्रेष्ठ होते आणि आहेत, आणि ही काळी लोक कधीही त्यांची बरोबरी करु शकणार नाहीत!' अशा विचारांचे दक्षिणेतील गोरे ही आंदोलने बघून खवळून जायचे. हिंसा केली तर विरोध चटकन चिरडून टाकता येतो, पण शांततापूर्ण आंदोलनाने नवा प्रश्न उभा राहिला. चिरडून टाकायचे तरी कसे. तरीही कित्येक आंदोलकांवर नियमितपणे दगडफेक, लाठीचार्ज होत असे. पण परत नव्या जोमाने नवीन ठिकाणी आंदोलने सुरु होत. तो काळ दक्षिणेत कमालीचा तणावाचा होता. नागरी हक्क चळवळीतील नेते हे शांततामय आंदोलनांव्यतिरिक्त केंद्रातील राजकारण्यांबरोबर, वकीलांबरोबर नागरी हक्क कायदा पास करुन घेण्याकरता काम करत होते. यावेळेला आपला हक्क मिळवण्याकरता त्यांची सर्व बाजूंनी तयारी सुरु होती. १९६० साली जॉन एफ केनडी हा डेमोक्रॅटीक पार्टीचा उमेदवार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडून आला. केनडीचा वर्णभेद, विभक्तीकरण याला आधीपासूनच विरोध होता. दक्षिणेतील नागरिकांच्या, पोलिसांच्या निर्दयी वागणूकीचा तो वेळोवेळी निषेध करत असे. केनेडीच्या कारकिर्दीत दक्षिणेतील कृष्णवर्णीयांना मुख्य धारेत आणण्याकरता काही सकारात्मक तरी बदल होतील अशी आशा सर्वांना वाटायला सुरुवात झाली.

अ‍ॅलबामा राज्यातील बर्मिंगहॅम हे त्या काळी देशातील सर्वात जास्त सेग्रिगेटेड शहर होते. जानेवारी १९६३ साली राज्यपालपदाची शपथ घेतलेला जॉर्ज वॉलेस याने तर “Segregation now, segregation tomorrow, segregation forever!” असे त्याच्या शपथविधीच्या भाषणातच म्हटले होते. खरं तर १९५८ साली वर्णभेदाविरुद्ध जरा मवाळ भूमिका घेतल्याने तो राज्यपालपदाची निवडणूक हरला होता. अ‍ॅलबामामध्ये निवडणूक जिंकण्याकरता काय करायला हवे हे व्यवस्थित कळल्यामुळे, पुढील ४ वर्ष कट्टरतेच्या सर्व पातळ्या पार करत, निवडणूक जिंकून १९६३ साली तो राज्यपालपदी रुजु झाला. अ‍ॅलाबामामधील परिस्थिती त्या काळात खूप तणावाची होती. सेग्रिगेशनला विरोध करण्याकरता प्रत्येक आठवड्यात राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी शांततामय मोर्चे निघत. एप्रिल १९६३ मध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरला बर्मिंगहॅममधील सार्वजनिक सुविधांमधील विभक्तीकरण रद्द व्हावे या करता केलेल्या शांततामय मोर्चाच्या दरम्यात अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी मे महिन्यात सेग्रिगेशनला विरोध करण्यासाठी बर्मिंगहॅममधील उच्चमाध्यमिक आणि कॉलेजच्या मुलांनी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कुत्री सोडली, उच्च दाबाचे पाण्याचे फवारे सोडले. अ‍ॅलाबामाच्या राज्यपालाचा, राजकारण्यांचा, पोलिसांचा या सर्व दडपशाहीला पाठींबाच होता. थोड्याच वेळात आपल्या हक्काकरता लढणार्‍या विद्यार्थ्यांवर कुत्री सोडल्याची घटना घरोघरी लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिली. दुसर्‍या दिवशी ही बातमी वर्तमानपत्राद्वारे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. शांततामय मार्गाने जाणार्‍या मुलांविरुद्ध पोलिसांचे क्रौर्य पाहून देशातल्या लोकांना धक्का बसला.

birmingham-collage.png

(स्रोत - apushcanvas.pbworks.com)

केनडीने सर्वसमावेशक नागरी हक्क कायद्याचा मसुद्यावर (Comprehensive civil rights legislation) काम सुरु केलेले होते, मात्र मे महिन्यातील बर्मिंगहॅमच्या घटनेनंतर मात्र त्याने जाहीर केले की आता मात्र हा मसुदा तो तातडीने अमेरिकेतील काँग्रेसकडे मंजुरीकरता पाठवणार आहे. बर्मिंगहॅममधील घटनेनंतर चक्रे फिरली आणि सर्वसमावेशक नागरी हक्क कायद्याचा मसुदा काँग्रेसकडे मंजुरीसाठी गेला.

ऑगस्ट १८६३ मध्ये लिंकनने गुलामांना मुक्त केले आणि त्यानंतर शंभर वर्षांनीदेखील ह्या मुक्त झालेल्या गुलामाचे वंशज समानतेचा दर्जा मिळवण्याकरता झगडत होते. १९६३ मधील ऑगस्ट महिन्यात सर्व अमेरिकेतून अडीच ते तीन लाख कृष्णवर्णीय आणि त्यांचे श्वेतवर्णीय समर्थक वॉशिंग्टन डिसी येथील लिंकनच्या स्मारकासमोर जमा झाले. कित्येक लोक हालअपेष्टा सहन करुन, अनेक दिवस प्रवास करुन कृष्णवर्णीयांविरुद्ध होणार्‍या अन्यायाचा निषेध करण्याकरता एकत्र जमले होते. या दिवशी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरने दिलेले भाषण इतिहासातल्या प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे. लिंकन स्मारकाच्या पायथ्याशी उभे राहून किंगने दिलेले 'I have a dream' हे भाषण ऐकून लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. (या भाषणाची एक झलक इथे पाहता येईल). किंगचं स्वप्न फार मोठं नव्हतं. अमेरिकेच्या संस्थापकांनी जवळपास २०० वर्षांपूर्वी 'All men are created equal' म्हटलं होतं आणि तीच समानता त्याला अमेरिकेच्या सर्व कृष्णवर्णीय नागरीकांकरता हवी होती. त्याला रंग, वंश याची तमा न बाळगता सर्व छोटी मुले एकत्र खेळायला, शाळेत जायला हवी होती. प्लँटेशनचे मालक आणि त्यांचे गुलाम यांचे वंशज खांद्याला खांदा लावून एकत्र काम करताना पाहायचे होते. दक्षिणेतील राज्यांमधील दडपशाहीचे रुपांतर हे स्वातंत्र्य आणि समानतेत झालेले बघायचे होते.

MLK-at-March-on-Washington-crop.jpg
(स्रोत - today.tamu.edu)

केनडीने अमेरिकेन काँग्रेसमध्ये मंजुरीकरता पाठवलेल्या Comprehensive civil rights legislation वर काम चालू असतानाच २२ नोव्हेंबर १९६३ रोजी टेक्सास राज्यातील डॅलस शहरात मारेकर्‍याने त्याची गोळी घालून हत्या केली. केनडीच्या हत्येने देश शोकात बुडाला. सिव्हील राईट्स चळवळीला पाठिंबा हे जरी हत्येचे कारण नसले तरी केनडीच्या हत्येने या मसुद्याच्या मंजुरीकरता उशीर होतो की काय अशी शंका लोकांना वाटायला लागली. परंतु जुलै १९६४ साली हा मसुदा मंजूर होऊन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्यानुसार देशभरात वंश, रंग, धर्म, लिंग किंवा राष्ट्रीय उत्पत्तीच्या आधारे भेदभाव करण्यावर बंदी घालण्यात आली. नोकरीचे ठिकाण, सार्वजनिक ठिकाणे, अनुदानीत कार्यक्रम आणि इतर अनेक ठिकाणी लिंग आणि वंश यानुसार कोणत्याही भेदभाव करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले. या कायद्यानंतर मतदानाच्या वेळी केली जाणारी दडपशाही आणि शाळांमधील विभक्तीकरण यांच्याविरोधात कारवाई करणे केंद्रसरकारला सोपे झाले. या कायद्याने अमेरिकेतील सर्व राज्यांमधील सेग्रिगेशन हे नेहेमीकरता बंद झाले. १८६८ साली अमेरिकेचे नागरीकत्व मिळालेल्या दक्षिणेतील कृष्णवर्णीयांना शेवटी १९६४ साली कायद्याने समानता मिळाली.

अमेरिकेतील नागरी हक्क चळावळीमधील मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरचे योगदान वादातीत आहे. त्याच्या अहिंसावादी तत्त्वाने या चळवळीला नवे स्वरुप मिळाले. दक्षिणेतील राज्यांमध्ये लोकांच्या बरोबरीने तो स्वतः सतत चळवळीत सामील झाला. किंगने ही चळवळ शिस्तबद्ध केली. कायदेतज्ञांना बरोबर घेऊन नवीन कायदे आणण्याकरता धडपड केली. त्याच्या योगदानामुळे लाखो लोकांचे आयुष्य कायमचे बदलले. किंगच्या या महान कार्याकरता त्याला डिसेंबर १९६४ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

MLK_Nobel.jpg
(स्रोत - greenvilleonline.com)

कायद्याने संपूर्ण अमेरिकेतील सेग्रिगेशन बंद झाले असले तरी दक्षिणेत अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरु झाली नव्हती किंवा अतिशय संथपणे सुरु होती आणि तो हक्क पूर्णपणे मिळेपर्यंत दक्षिणेत आंदोलने सुरु होतीच. अनेक वर्षे दक्षिणेतील कित्येक राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांना दहशतीने मतदानाकरता नोंदणी करण्यापासून मज्जाव केला जायचा. अ‍ॅलाबामामधील सेल्मा आणि जवळपासच्या गावात मिळून ५०% कृष्णवर्णीय लोक राहत पण त्यांच्यातले फक्त २% लोक मतदानाकरता नाव नोंदवू शकले होते. कृष्णवर्णीयांना मतदान करण्यापासून थांबवण्याकरता अ‍ॅलाबामामध्ये अनेकदा दहशतीचा मार्ग वापरला जात असे. १९६४ च्या सेग्रिगेशन बंद करण्याच्या कायद्यानंतरही कृष्णवर्णीयांना जेंव्हा मतदानाकरता नोंदणी करण्याकरता अडथळे आणले जाऊ लागले तेंव्हा त्याचा निषेध करण्याकरता २५ वर्षीय जॉन लुईस याने सेल्मातील रहिवाश्यांना घेऊन शांततापूर्ण आंदोलन करण्याचे ठरवले. जॉन लुईसने मार्टीन ल्युथर किंग ज्युनियरबरोबर काही वर्षे काम केले होते. त्याला अशा प्रकारचे मोर्चे नेण्याचा अनुभव होता. सेल्मापासून ५४ मैलावर असलेल्या माँटगोमेरी या राजधानीच्या शहरी मोर्चा नेऊन राज्यपालासमोर हा मुद्दा नेण्याचे लोकांनी ठरवले. ७ मार्च १९६५ हा दिवस नागरी हक्काच्या इतिहासात 'Bloody Sunday' म्हणून ओळखला जाईल याची तेंव्हा कोणालाही कल्पना नव्हती. ६०० मोर्चेकर्‍यांना घेऊन सेल्मा गावातून या मोर्चाची शांततेत सुरुवात झाली. असा मोर्चा निघणार आहे याची राज्यसरकार आणि प्रसारमाध्यमांना आधीच कल्पना होती. जसे मोर्चेकर्‍यांनी अ‍ॅलाबामा नदीवरील मोठा पूल ओलांडायला सुरुवात केली तसे त्यांना पुलापलिकडे पोलिसप्रमुख, अनेक पोलिस, घोड्यांवर स्वार असलेले राज्य सैनिक, आणि इतर श्वेतवर्णीय लोक कन्फेडरेट झेंडे घेउन उभे असलेले दिसले. पोलिसांकडे मोठ्या काठ्या, दंडुके, गॅस मास्क आणि इतर शस्त्रे होती. जसा हा स्त्रिया, पुरुष आणि मुले असलेला लोंढा संथगतीने पुढे सरकू लागला तसे पोलिस त्यांना मारायच्या पावित्र्यात उभे राहिले. सर्व लोकांना परतायची आज्ञा देऊन लोक जेंव्हा शांतपणाने पुढे येत राहिले तेंव्हा कोणालाही थोडीही संधी न देता ते या आंदोलकांवर धावून आले. नि:शस्त्र मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यावर काठ्या, लाठ्या, दंडुके यांनी हल्ला करुन, स्वतःला वाचवण्याकरता पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांवर घोड्यावरुन गाठून हल्ला करुन त्यांना रक्तबंबाळ केले. जॉन लुईसलाही त्यांनी जबर मारहाण केली. या वेळी हजर असलेल्या वर्तमानपत्र, टिव्ही छायाचित्रकारांनी ही घटना चित्रीत केली, आणि टिव्हीवर चालू असलेला कार्यक्रम थांबवून ती देशातील लोकांना दाखवली. या क्रौर्याने लोकांना चिडले, व्यथित झाले. कायद्याने हक्क मिळूनही दक्षिणेत कृष्णवर्णीयांचे आयुष्य अजुनही बदलत नव्हते. त्यानंतर मात्र ४ दिवसांनी परत पोलिसांच्या आणि राजकारण्यांच्या नाकावर टिच्चुन सेल्मा ते माँटगोमेरी असा मोर्चा काढण्यात आला ज्यात जवळपास २५,००० लोक सामील झाले. केंद्रसरकारने लोकांच्या संरक्षणाकरता सैनिक तैनात केले. लोकांच्या दबावाखाली अ‍ॅलाबामाच्या राज्यपालाला झुकावे लागले, आणि अ‍ॅलाबामा राज्यात कृष्णवर्णीयांना शेवटी मतदानाकरता नोंदणी करता येऊ लागली. या घटनेनंतर दक्षिणेत हळूहळू बदल येण्यास सुरुवात झाली.

सेल्माचा मोर्चा

selma-collage_1.jpg

(स्रोत - history.com)

हा बदल पूर्ण झालेला पाहणे मात्र या चळवळीच्या शिल्पकाराच्या नशिबी नव्हते. एका शांततामय मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी टेनिसी राज्यातील मेंफिस या शहरात आलेल्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरची ४ एप्रिल १९६८ साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष्यभर शांतता, अहिंसावादाची शिकवण देणार्‍या किंगचा शेवट मात्र हिंसेने झाला. किती तरी काम बाकी होते. आता दक्षिणेनंतर किंगने त्याचा मोर्चा उत्तर आणि पश्चिमेतील राज्यांकडे वळवला होता. तिथे विभक्तीकरण जरी नसले तरी गरिबी, चांगल्या शिक्षणाचा, संधींचा अभाव यामुळे कृष्णवर्णीयांचा विकास खुंटला होता. किंगला आता फक्त कृष्णवर्णीयांकरताच नव्हे तर सर्व गरिबांना समान संधी मिळावी याकरता काम करायचे होते. त्याच्या मृत्यूने ते काम अर्धवट राहिले. जसे लिंकन जिवंत असता तर कदाचित दक्षिणेची पुनर्बांधणी वेगळ्या प्रकारे घडली असती आणि देशाचे चित्र वेगळे असते असे म्हटले जाते, तसेच जर किंग जिवंत असता तर कृष्णवर्णीयांची, दुर्बल आर्थिक घटकांची परिस्थिती कदाचित सध्यापेक्षा वेगळी असती असे म्हटले जाते. उण्यापुर्‍या ३९ वर्षांच्या आयुष्यात मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरने किती लोकांचे आयुष्य बदलले होते! कृष्णवर्णीयांना समानता मिळवून देण्याच्या ध्येयाने तो झपाटला होता. कित्येकदा जिवे मारण्याच्या धमक्या मिळूनही किंगने आपले कार्य चालूच ठेवले होते. आपल्या ध्येयाकरता तो जगला आणि त्याच करता त्याने स्वतःचे बलिदान दिले.

किंगच्या मृत्यूने देशभर शोककळा पसरली. समानतेचा हक्क मिळाल्यावर शिक्षण आणि आर्थिक विकास यातूनच आपल्या समाजाची उन्नती होऊ शकते हे वेळोवेळी कृष्णवर्णीयांना सांगून त्याने त्यांच्यासमोर पुढचा मार्ग आखून दिला होता. १९७० च्या दशकात सर्व राज्यांमधील सेग्रिगेशन पूर्णपणे बंद झाले होते, कृष्णवर्णीयांचा मतदानातील सहभाग वाढला होता. १९७० च्या दशकापासून अमेरिकेतील दक्षिणेतील राज्यांमधील कृष्णवर्णीय मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात झाली. पांढरपेश्या नोकर्‍यांमध्ये कृष्णवर्णीयांचे प्रमाण वाढले. विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढले. राजकारणात कृष्णवर्णीयांचा सहभाग वाढला. कला, विज्ञान, लेखन, मनोरंजन, राजकारण, कायदा आणि इतर अनेक क्षेत्रात कृष्णवर्णीयांची संख्या वाढायला लागली. १९८० च्या दशकामध्ये कृष्णवर्णीय हे अनेक कार्यक्षेत्रात श्वेतवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. अजूनही काम बाकी होतेच, पण मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरचे स्वप्न सत्यात उतरायला सुरुवात झाली होती...

(स्रोत -
पुस्तके
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
Us and Them: A History of Intolerance in America - Jim Carnes
A People's History of the United States - Howard Zinn
वेबसाईट्स
http://history.org
https://en.wikipedia.org)

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ७)

१९६० चे दशक हे कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्काकरता निर्णायक होते. १९६४ साली सिव्हील राईट्स कायद्यानुसार अमेरिकेतील सेग्रिगेशन संपले, १९६५ च्या वोटींग राईट्स कायद्यानुसार मतदानाकरता नोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबींमध्ये पारदर्शकता आणण्यात आली, १९६८ च्या फेअर हाउसिंग कायद्यानुसार घराकरता कर्ज घेताना, घर विकत/भाड्याने घेताना, विकताना कृष्णवर्णीयांविरुद्ध वर्णभेद करणे बेकायदेशीर झाले. कृष्णवर्णीय समाज मुख्य धारेत आणण्याकरता हे तिन्हीही कायदे महत्त्वाचे ठरले. १९६८ साली शर्ली चिझम ही अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडली गेलेली पहिली अफ्रिकन अमेरिकन महिला ठरली. या दशकात शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक पातळीवर समानतेसाठी कृष्णवर्णीयांचा प्रवास सुरु झाला. काही गट आपला हक्क मिळवण्याकरता हिंसेचे समर्थन करणारे असले तरी नागरी हक्क हे प्रामुख्याने शांततापूर्ण चळवळीतून प्राप्त झाले. १९६८ साली शांततेच्या पुरस्कर्त्या मार्टीन ल्युथर किंग ज्युनियरची हत्या झाली आणि त्याचे पडसाद मात्र अमेरिकेच्या सर्व भागात उमटले. गेल्या १५ वर्षात कृष्णवर्णीयांनी कमालीचा संयम दाखवून, पदोपदी हिंसेला सामोरे जाऊन आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र किंगच्या हत्येचा निषेध करण्याकरता आणि आपला उद्वेग, राग, अगतिकता बाहेर काढण्याकरता देशभर त्याच्या समर्थकांनी मोर्चे काढले आणि त्यातल्या बहुतेक मोर्चांना हिंसेचे गालबोट लागले. शिकागो, वॉशिंग्टन डिसी, बाल्टीमोअर, न्युयॉर्क, डेट्रोईट, पिट्सबर्ग आणि इतर अनेक ठिकाणी संतापलेल्या जमावाने जाळपोळ, तोडफोड करुन मालमत्तेची हानी केली. हा त्यांनी दाखवलेला पहिला हिंसक उद्रेक होता आणि या उद्रेकाला साडेतीनशे वर्षांचा इतिहास कारणीभूत होता.

१९६८ साली National Advisory Commission on Civil Disorders (उर्फ कर्नर कमिशन) ने राष्ट्राधक्ष लिंडन जॉन्सनसमोर एक अहवाल प्रस्तुत केला. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर कृष्णवर्णीय तोंड देत असलेल्या विविध प्रकारच्या असमानतेचा अभ्यास करुन त्याची विस्तृत आकडेवारी त्यांनी या अहवालाद्वारे मांडली. आज ५० वर्षांनंतर एकत्रित समाज म्हणून अमेरिका कुठेपर्यंत पोहोचली आहे याची तुलना करण्याकरता हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे.

शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाने गेल्या ५५ वर्षात खूप प्रगती केली आहे. राजकारणाचे उदाहरण घ्यायचे झाले तर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर याचा शिष्य आणि सहकारी जेसी जॅक्सन १९८४ आणि १९८८ साली राष्ट्राध्यक्षपदाकरता डेमोक्रॅटीक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याकरता उभा राहिला. सर्वात जास्त मते न मिळाल्यामुळे त्याला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, परंतु दोन्हीही वेळा त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. २० वर्षात ज्या लोकांना शेजारी बसवून घ्यायला दक्षिणेत परवानगी नव्हती त्यांचाच एक प्रतिनिधी राष्ट्राध्यक्ष बनण्याची स्वप्ने बघतो आणि त्यात त्याला अनेक श्वेतवर्णीय लोकांचाही पाठींबा मिळतो ही मोठी बाब होती. १९८९ साली जॉर्ज एच डब्ल्यू बुशच्या मंत्रीमंडळात कॉलिन पॉवेल याने Joint Chiefs of Staff चे अध्यक्षपद भूषविले. या महत्त्वाच्या पदाकरता निवडला जाणारा तो पहिला कृष्णवर्णीय होता. थरगूड मार्शल याच्या मृत्यूनंतर १९९१ साली क्लॅरेन्स थॉमस याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली. रॉन ब्राउन याने १९९३ साली बिल क्लिंटनच्या मंत्रीमंडळामध्ये वाणिज्यमंत्र्याचे पद भूषविले. २००१ साली जॉर्ज डब्ल्यू बुशच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कॉलिन पॉवेल याने 'Secretary of State' हे मंत्रिमंडळामधील सर्वात महत्त्वाचे पद भूषविले. काँडोलिझा राईसने २००१ साली सुरक्षा सल्लागार सहाय्यकाचे काम केले. ५० वर्षांपूर्वी या प्रकारची पदे कृष्णवर्णीय भूषवितील याची कोणी कल्पनाही करु शकत नव्हते. पण हा बदल यायला सुरुवात झालेली होती. २००७ साली अमेरिकेतील सिनेटमध्ये निवडला गेलेला (फक्त) तिसरा कृष्णवर्णीय असलेल्या बराक ओबामाने जेंव्हा २० जानेवारी २००९ साली अमेरिकेच्या ४४ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेंव्हा जगाने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. हा क्षण अनुभवायला १८ लाख लोक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डिसी येथे पोहोचले होते. अमेरिकेच्या इतिहासात कमालीचा कठीण प्रवास केलेल्या कृष्णवर्णीयांकरता हा क्षण स्वप्नवत होता. ओबामाचा विजय कृष्णवर्णीयांबरोबरच अनेक श्वेतवर्णीयांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला होता. वंशभेदाच्या वर येऊन समाज एकत्र येतोय याचे हे उदाहरण होते. राजकारणाबरोबरच संगीत, क्रिडा, मनोरंजन, लेखन, शिक्षण या क्षेत्रातही कृष्णवर्णीयांची घोडदौड सुरु होती. संगीत आणि क्रिडा या क्षेत्रात आधीपासून अनेक कृष्णवर्णीय लोकांच्या मनावर राज्य करत होते. यापूर्वी अनेक वेळा त्यांना फक्त रंगामुळे भेदभावाचा सामना करावा लागला होता, पण आता हा भेदभाव मागे पडल्याची चिन्हे दिसत होती. विविध क्षेत्रातील कृष्णवर्णीयांची यशोगाथा पाहता अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाज आता श्वेतवर्णीयांचा पंगतीत येऊन बसलेला आहे असे चित्र दिसून येत होते. पण समाजाच्या सर्वच पातळ्यांवर खरोखरच अशी परिस्थिती होती का? का हे चित्र फसवे होते?

५० वर्षांपूर्वीची आणि आताची कृष्णवर्णीयांची परिस्थिती असा जर अभ्यास केला तर जवळपास सर्वच क्षेत्रात त्यांची प्रगती झालेली दिसते, पण कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांच्या परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास केला तर असे लक्षात येते की कित्येक महत्त्वाच्या बाबींमध्ये ते श्वेतवर्णीयांपेक्षा अजुनही कितीतरी मागे आहेत. आर्थिक व शैक्षणिक विकास, बेरोजगारी, घराची मालकी, आरोग्यसेवा (healthcare) या बाबतील सर्वसाधारण मध्यमवर्गीय श्वेतवर्णीय कुटुंबीयाची तुलना त्याच स्तरावरील कृष्णवर्णीयाबरोबर केली तर हे विषम चित्र स्पष्ट होते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अजुनही मोठी तफावत आहे. श्वेतवर्णीयांच्या जवळपास अडीचपट जास्त कृष्णवर्णीय दारिद्र्यरेषेखाली राहतात आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय श्वेतवर्णीय कुटुंबाचे उत्पन्न त्या स्तरावरील कृष्णवर्णीय कुटुंबाच्या १० पट जास्त दिसून येते. बहुसंख्य कृष्णवर्णीय लोक जगण्याकरता १९६८ मध्येही सरकारी कल्याणकारी (social welfare) योजनांवर आणि इतर मदतीवर अवलंबून होते आणि २०१८ मध्येही ही परिस्थिती फार बदललेली नाही आहे. हे प्रमाण अमेरिकेतील इतर कुठ्ल्याही वांशिक गटापेक्षा (लॅटिनो, अशियायी अमेरिकन, श्वेतवर्णीय) जास्त आहे. मोठ्या शहरांमध्ये कृष्णवर्णीयांच्या गरीब वस्तीमध्ये (inner city) कित्येक कुटुंबे ही पूर्णपणे कल्याणकारी योजनांवर जगतात. वर्षानुवर्ष गरीब कृष्णवर्णीय समाज त्याच परिस्थितीत अडकलेला दिसतो आणि त्यांची प्रगती ही अतिशय संथ गतीने होताना दिसून येते. गरीबी, उच्च शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी यामुळे मोठ्या शहरांमध्ये तरुणाईला ड्र्ग्ज, टोळी युद्ध, हिंसा याचा विळखा बसलेला आहे. समस्येच्या मुळाशी न जाता कृष्णवर्णीयांनाच अनेकदा त्यांच्या परिस्थितीकरता दोष दिला जातो. त्यांच्याकडे पूर्वग्रहदुषित नजरेने पाहिले जाते. पण त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास हे लक्षात येते की त्यांच्याविरोधात असलेला वर्णभेद हा अजुनही त्यांच्या विकासाकरता मारक ठरत आहे.

Screen Shot 2021-02-20 at 1.21.17 PM.png

(स्रोत - Kerner Commission)

कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांना दिल्या जाणार्‍या वागणूकीमधली मोठी तफावत आढळते ती म्हणजे पोलिसांकडून थांबवले जाणे, दंड, तुरुंगवास आणि शिक्षा या बाबींमध्ये. अमेरिकन तुरुंगामधील कृष्णवर्णीयांचे प्रमाण हे श्वेतवर्णीय आणि इतर कोणत्याही वंशाच्या लोकांपेक्षा तुलनेने जास्त आहे. त्यांच्या अटकेत, खटल्यामध्ये आणि तुरुंगातही त्यांना अनेकदा पूर्वग्रहदुषीत वर्णभेदाला सामोरे जावे लागते. १९६८ साली दर एक लाख कृष्णवर्णीयांमागे ६०४ जणांना कुठल्या न कुठल्या प्रकारच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. खरं तर ५० वर्षात उंचावलेला आर्थिक स्तर, शिक्षण, पांढरपेशी नोकरी आणि सर्वंकश प्रगती या निकषांवर हे प्रमाण कमी व्हायला हवे. मात्र २०१८ मध्ये कृष्णवर्णीयांच्या अटकेचे प्रमाण २६८ टक्क्यांनी वाढून लाखामागे १७३० वर आले. काहीतरी नक्कीच चुकतंय आणि या विषयाचा अभ्यास केल्यास लक्षात येते की या प्रश्नामागेच ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळीचे मूळ लपले आहे.
PoliceRisk.png

(स्रोत - https://www.pnas.org/content/116/34/16793)

अमेरिकेतून वंशभेद हा कधीच हद्दपार झालेला नव्हता. काही बदलेल्या कायद्यांनी अनेक लोकांच्या मनात पिढ्यानपिढ्या रुजलेला वंशभेद नष्ट होणे शक्य नव्हते. श्वेतवर्ण हा सर्वश्रेष्ठ आणि इतर सर्व वंश हे कनिष्ठ ही शिकवणूक अनेक गोर्‍यांना लहानपणापासून मिळालेली होती. कृष्णवर्णीयांना मिळालेली समानतेची वागणूक ही त्यांना पटत नव्हती आणि फक्त कायद्याच्या धाकामुळे तिचा स्वीकार करावा लागत होता. प्रमाण कमी असले तरी कृष्णवर्णीयांना मिळणार्‍या समान वागणुकीचा द्वेष करणारी लो़कं ही राजकारण, कायदा आणि सुव्यवस्था, मनोरंजन, शिक्षण, चर्च आणि इतर विविध क्षेत्रामध्ये काम करणारी होती. हा द्वेष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही रुजला होता आणि कधी कधी तो उफाळून बाहेर येत असे. १९८०-१९९० चे दशक एकूणच शांततेचे आणि कृष्णवर्णीयांच्या विकासाचे असले तरी अधुन मधुन वांशिक भेदभावामधून तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि अशा प्रत्येक घटनेची परिणिती ही कृष्णवर्णीय समाजामध्ये संशयाचे, अविश्वासाचे आणि असंतोषाचे वातावरण निर्माण होण्यात झालेली आहे. १९९२ मध्ये मात्र याचा उद्रेक झाला. मार्च १९९१ मध्ये रॉडनी किंग या २६ वर्षीय कृष्णवर्णीयाला दारु पिऊन गाडी चालवल्याबद्दल (जे नंतर सिद्ध झाले नाही) लॉस एंजेलिसमधील पोलिसांनी पाठलाग करुन थांबवले. त्यानंतर ४ पोलिसांनी नि:शस्त्र रॉडनीला जमिनीवर पाडून जबर मारहाण केली. ही घटना एका व्यक्तीने त्याच्या बाल्कनीमधून चित्रीत केली आणि एका टेलिव्हिजन चॅनलला पाठविली. या घटनेत रॉडनीची कित्येक हाडे तुटली आणि तो जबर जखमी झाला. ही घटना प्रक्षेपित झाल्यावर लोकांना पोलिसांच्या या कृर वर्तणूकीचा धक्का बसला. रॉडनीला मारहाण केलेल्या पोलिसांची काही महिन्यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ लॉस एंजेलिसमध्ये मोठी दंगल उसळली, अमेरिकेतील इतर शहरातही मोर्चे आणि दंगली झाल्या. पोलिस खाते कृष्णवर्णीयांबरोबर अधिक बळाचा वापर करते आणि त्यांच्या कृष्णवर्णीय आणि इतर वंशाच्या, खास करुन गोर्‍या लोकांबरोबरच्या, वागणूकीमध्ये कमालीचा फरक आहे याची चर्चा वर्तमानपत्रे आणि टिव्हीवर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. यानंतरही कमीअधिक प्रमाणात कृष्णवर्णीयांबरोबर पोलिसांच्या अत्याचारांच्या घटना घडतच राहिल्या. तो काळ सेलफोन आणि सोशल मिडीयाचा नसला तरी बर्‍याच घटना टिव्ही, वर्तमानपत्राद्वारे लोकांसमोर येत राहिल्या. १९९६ साली फ्लोरिडामधील सेंट पिटर्सबग या ठिकाणी १८ वर्षीय नि:शस्त्र टायरॉन लुईस याला पोलिसांनी ट्रॅफिक सिग्नलवर गोळ्या घातल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे दंगे उसळले. या घटनेतील पोलिसांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. २००१ साली ओहायोमधील सिनसिनाटी या ठिकाणी १९ वर्षीय नि:शस्त्र टिमथी थॉमस यालाही अशाच प्रकारे पोलिसांकडून गोळ्या घालून मारण्यात आले. अमेरिकेतील दक्षिणेतील राज्यांमध्ये जेंव्हा सेग्रिगेशन होते तेंव्हा उत्तरेत राहणार्‍या अनेक कृष्णवर्णीयांना सेग्रिगेशन नसले तरी नियमितपणे वर्णभेदाचा सामना करावा लागे. अनेक शहरांमध्ये गरीबी, त्यामुळे अर्धवट शिक्षण, बेरोजगारी आणि त्यावर वर्णभेद यामुळे तेथील युवकवर्ग गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत होता. याचे मूळ शोधून त्यावर काम करण्याऐवजी त्यांच्या वस्त्यांवर पोलिसांच्या अधिक गस्ता आणि बळाचा सर्रास वापर केला जात असे. कृष्णवर्णीयांच्या उत्तर आणि पश्चिमेतील मोठ्या प्रमाणातील स्थलांतरानंतर (The Great Migration) त्यांना नेहेमीच श्वेतवर्णीय पोलिसखात्याच्या वर्णभेदाचा, संशयाचा सामना करावा लागला आहे. कृष्णवर्णीय हे गुन्हेगारी वृत्तीचे असतात हे पोलिसखात्याचे पूर्वग्रहदुषित मत बनलेले होते. त्यांना सरळ ठेवण्याकरता धमक्या, अपमान, बळाचा वापर, मारहाण या गोष्टी नियमितपणे वापरल्या जाऊ लागल्या. दक्षिणेतील पोलिस हे तर बहुतांशी सेग्रिगेशनला पाठिंबा देणारे होते. जसा दक्षिणेतील कृष्णवर्णीय समाज मोठ्या प्रमाणात मुख्य धारेत येत गेला तशी पोलिसांनी वर्णभेदी वागणुकीतून आपली नापसंती दाखवण्यास सुरुवात केली. कृष्णवर्णीयाविरुद्ध गुन्हा केलेल्या श्वेतवर्णीयाला सोडून देणे किंवा सौम्य शिक्षा देणे हे पूर्वापार चालत आले होते, त्याचीही पुनरावृत्ती या काळात होत राहिली. वेगवेगळ्या काळामध्ये अमेरिकेतील विविध जातीधर्माच्या, वयाच्या, लिंगाच्या लोकांना पोलिसांच्या अतिरिक्त बळाला तोंड द्यावे लागले आहे. पण यात सर्वात जास्त सामना नेहेमीच कृष्णवर्णीय समाजाला करावा लागला आहे. कृष्णवर्णीय व्यक्ती पोलिसांकडून हटकली जाणे, अटक केली जाणे किंवा पोलिसी अत्याचाराला बळी पडणे याची उदाहरणे जशी वाढत होती तसा कृष्णवर्णीय समाजात असंतोष वाढत गेला.

२०१२ मध्ये फ्लोरिडामधील एका गावात १७ वर्षाच्या ट्रेव्हॉन मार्टीन याला संशयास्पद वागणूकीच्या नावाखाली जॉर्ज झिमरमन या माणसाने हटकले, आणि थोडी बाचाबाची झाल्यावर गोळ्या घालून ठार मारले. ट्रेव्हॉन हा तिथे फक्त आपल्या कुटुंबियांना भेटायला आलेला होता. जॉर्ज झिमरमनची या गुन्ह्याकरता निर्दोष मुक्तता झाली. या घटनेनी व्यथित होऊन अलिशिया गार्झा हिने सोशल मिडीयावर #BlackLivesMatter या हॅशटॅगखाली एक संदेश लिहिला. तो पट्रिस कुलर्स आणि ओपल टोमेटी या तिच्या मैत्रिणींनेही वापरला. त्यानंतर हा हॅशटॅग वापरुन अनेक लोकांनी जॉर्ज झिमरमनच्या निर्दोष मुक्ततेचा निषेध केला. २०१२ पासून ते २०१४ पर्यंत कृष्णवर्णीयांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अमानुष वर्तणुकीचा निषेध करण्याकरता BlackLivesMatter हा हॅशटॅग सोशल मिडियावर नियमितपणे वापरला जाऊ लागला. जुलै २०१४ मध्ये एरिक गार्नर या कृष्णवर्णीयाला अटक करताना पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केल्याने त्याचा गुदमरुन मृत्यू झाला. महिन्याभरातच ऑगस्ट २०१४ मध्ये मिसुरी राज्यातील फर्ग्युसन या ठिकाणी मायकल ब्राउन या १८ वर्षीय तरुणाची पोलिसाने ६ गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसाने स्वतःचा बचाव करण्यासाठी गोळ्या झाडल्या असा निर्णय देऊन त्याच्यावर खटला ही दाखल करण्यात आला नाही. मायकर ब्राउन नि:शस्त्र होता. या आधी पर्यंत ब्लॅक लाइव्हज मॅटर ही चळवळ फक्त इंटरनेटवर सक्रिय होती, पण गार्नर आणि ब्राउनच्या मृत्यूनंतर ती रस्त्यावर आली. पोलिसांच्या कृष्णवर्णीयांप्रती पूर्वग्रहदुषित, अमानुष वागणुकीला वाचा फोडण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. संपूर्ण अमेरिकेत विविध गावांमध्ये BlackLivesMatter नावाखाली मोर्चे निघाले, दंगलीही झाल्या. कृष्णवर्णीय समाजाच्या हतबलतेतून हा उद्रेक झालेला होता. ४०० वर्ष झाली तरी त्यांच्या जीवाला किंमत नव्हती. आमचेही जीवन मौल्यवान आहे हे या चळवळीद्वारे त्यांना जगाला सांगायचे होते. प्रत्येक नि:शस्त्र कृष्णवर्णीयांच्या हत्येने त्याचे कुटुंब उध्वस्त होत होते आणि प्रत्येक वर्षी पोलिसांच्या अतिरिक्त बळामुळे अशी कित्येक कुटुंबे उध्वस्त होत होती. पोलिस कोठडीत होणार्‍या कृष्णवर्णीयांच्या मृत्यूंवरही BlackLivesMatter चळवळीने प्रकाश पाडण्यास सुरुवात केली. २०१४ पासून BlackLivesMatter चळवळीखाली प्रत्येक वर्षी पोलिसांच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शेकडो मोर्चे निघाले. सोशल मिडीयावर #BlackLivesMatter हा टॅग वापरुन कोट्यावधी लोकांनी आपला निषेध, आपले अनुभव मांडायला सुरुवात केली. जगभरात या चळवळीला पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली. पोलिसांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याबरोबरच कृष्णवर्णीयांना सामोरे जाव्या लागणार्‍या भेदभावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या चळवळीद्वारे करण्यास सुरुवात झाली. राजकीय दबाव, प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखती, लोकांमध्ये या विषयावर जागरुकता निर्माण करणे, तसेच पोलिस प्रशिक्षणात बदल, गैरवर्तनाकरता जबाबदार ठरवून शिक्षा, पोलिसांच्या मानसिक स्वास्थ्यावर काम, पोलिसखात्याचे बजेट कमी करणे इत्यादी गोष्टींची मागणी आणि त्याकरता दबाव आणणे हे या चळवळीचे उद्दिष्ट बनले.

२०२० ची सुरुवात जॉर्जिया राज्यात २५ वर्षीय अहमद आर्बरी याच्या खुनाने झाली. आर्बरीला ३ गोर्‍या माणसांनी गोळ्या घालून ठार मारले. हे तीनही लोक (ज्यातील एक जण निवृत्त पोलिस ऑफिसर होता) ७४ दिवस कोणत्याही खटल्याशिवाय मुक्त फिरत होते. मार्च महिन्यात ब्रिओना टेलर हिचाही पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला. या घटनेतील पोलिसाची निर्दोष मुक्तता झाली. अमेरिकेत पोलिसांना स्वसंरक्षणाकरता गोळी झाडण्याचा हक्क आहे, आणि बहुतांशी वेळेला गरज नसताना गोळी झाडल्याचे निदर्शनास आल्यावरही पोलिस निर्दोष सुटतात. पोलिसांच्या कृष्णवर्णीयांविरुद्ध अमानुष वागणूकीबद्दल संताप वाढत होता आणि तेवढ्यात जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वार्‍यासारखा पसरला. मे २०२० मध्ये मिनियापोलिस या ठिकाणी जॉर्ज फ्लॉइड या नि:शस्त्र कृष्णवर्णीयाची गळ्यावर पायाने दाब देउन अतिशय क्रुर पद्धतीने एका पोलिसाने हत्या केली. जॉर्ज फ्लॉइडवर दुकानदाराने २० डॉलरचे खोटी नोट वापरल्याच्या आरोप केला होता. या घटनेत जॉर्ज फ्लॉइड नि:शस्त्र होता, त्याने कुठ्ल्याही प्रकारे प्रतिकार किंवा उलट हल्ला केला नव्हता. पोलिसाने गळ्यावर पाय ठेवल्यावर जॉर्ज फ्लॉइड त्याला श्वास घेता येत नाही आहे असे सांगत होता, पण बघ्यांना कुठल्याही प्रकारची मध्यस्ती करण्यास पोलिसांनी मज्जाव केला, शेवटी श्वास घुसमटून तो मेला. त्याच्या अटकेचा आणि मृत्यूचा बघ्यांनी व्हिडीओ काढला आणि तो कोट्यावधी लोकांनी सोशल मिडीयावर जगभर पाहिला. जॉर्ज फ्लॉइड जर गोरा असला असता तर त्याच्यावर हा प्रसंग आला नसता हा विचार बघणार्‍या प्रत्येकाच्या मनात आला, तो बोलून दाखवला गेला. कोव्हिड-१९ ची पर्वा न करता देशभर मोर्चे आणि दंगली झाल्या. समाजाच्या सर्व स्तरांमधून या धक्कादायक, कृर घटनेचा निषेध झाला. कृष्णवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून श्वेतवर्णीयही प्रत्येक ठिकाणी मोर्चात सहभागी झाले. जगभरातून BlackLivesMatter चळवळीकरता पाठिंबा वाढला.

जगाच्या इतिहासात स्वतःला श्रेष्ठ समजणार्‍या घटकांनी अल्पसंख्यांकांवर, दुर्बल घटकांवर अन्याय केल्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत, घडत आहेत. अमेरिकेत २१ व्या शतकातही स्वतःला श्रेष्ठ समजणार्‍या, पूर्वग्रह बाळगून भेदभाव करणार्‍या श्वेतवर्णीयांच्या विचारसरणीत जोपर्यंत बदल घडत नाही तोपर्यंत कृष्णवर्णीयांना कधीही समानतेची वागणूक मिळणार नाही. कृष्णवर्णीयांनी गेल्या ५५ वर्षांमध्ये खूप प्रगती केलेली आहे. त्यात त्यांचे अथक परिश्रम आहेत. या प्रवासात कुठलाही दुजाभाव न ठेवता अनेक श्वेतवर्णीयांनीही त्यांना साथ दिली आहे. मात्र कृष्णवर्णीयांच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना फक्त यशस्वी चेहेरे न पाहता या समाजातील सर्व घटकांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. विकासाच्या फूटपट्टीवर अजुनही मागे राहिलेल्या घटकांच्या प्रगतीकरता, त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याकरता वर्णभेदी गोर्‍या लोकांच्या मानसिकतेत बदलाची आवश्यकता आहे. सामाजिक, सरकारी पातळीवरुन धोरणे आणि स्वतः कृष्णवर्णीयांकडून कॉलेज शिक्षणावर भर, हिंसाचार, ड्रग्ज समस्या यावर काम हे ही तेवढेच महत्वाचे आहे. आपल्या बांधवांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध् आवाज उठवण्यासाठी कृष्णवर्णीयांनी BlackLivesMatter चळवळ सुरु केली. बहुतांशी शांततामय निदर्शनांच्या स्वरुपात सुरु असलेल्या मोर्चांना अगतिकता, राग, अन्यायाची भावना यांचा कडेलोट झाल्यावर अनेक वेळा हिंसक वळण लागले. हिंसा ही कधीही समर्थनीय नसली तरीही या उद्वेकामागे ४०० वर्षांचा इतिहास आहे. कित्येक लोकांना तो माहितीच नसतो. मग पोलिसांच्या अत्याचारावरुन लक्ष हटून ते चळवळीतील जाळपोळ, लुटालूट यावर केंद्रित केले जाते आणि त्यावरच टिका होते. मूळ मुद्दा दूरच राहतो. आता या सोशल मिडियाच्या जमान्यात BlackLivesMatter चळवळ जगभरात पोहोचली आहे, सर्व वंशांच्या लोकांकडून तिला पाठिंबा मिळत आहे, या चळवळीच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या वागणुकीच्या निषेधार्थ समाजाच्या सर्व स्तरांमधून अनेक जण आवाज उठवत आहेत. या सर्वाचा त्यांना हवे ते बदल घडवून आणण्याकरता कितपत उपयोग होईल आणि कृष्णवर्णीय समाजातील प्रत्येक घटक खरोखर अमेरिकेतीत इतर वंशांच्या लोकांच्या पंक्तीला कधी येऊन बसेल हे मात्र येणारा काळच सांगू शकेल.

------

२०२१ सालचा Black History Month साजरा करण्यासाठी या लेखांद्वारे कृष्णवर्णीयांचा इतिहास, त्यांची चिकाटी, सहनशक्ती, संयम, धैर्य, त्यांचे प्रश्न आणि त्यांचा संघर्ष मला मराठी वाचकांसमोर आणायचा होता. हा इतिहास फार मोठा आहे आणि माझ्याकडून अनेक गोष्टी सुटल्या आहेत याची मला कल्पना आहे. पण या लेखांद्वारे थोडाफार इतिहास आणि BlackLivesMatter चळवळीमागची भावना समजून घेण्यास लोकांना मदत झाली तर त्याचा मला आनंदच होईल.

-------

स्रोत -
https://en.wikipedia.org/
https://www.britannica.com/
https://www.history.com/

Keywords: 

लेख: