कृष्णडोहाच्या पैलतीरी

मुखबंधन : ही एक काल्पनिक कथा आहे. राधाकृष्ण यांच्या कित्येक कथा प्रचलित आहेत. पण गोपींच्या कथा फारशा ऐकिवात नाहीत. शरद पौर्णिमेच्या रासाच्या खेळापुरतेच त्यांचे जनमानसातले स्वरूप सिमीत आहे. सर्वच गोपगोपी कान्हावर जवळजवळ तितकेच प्रेम करायचे असे मला वाटते म्हणून ह्या काल्पनिक गोपीला नायिका करून मी कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य गोष्टींचा आदर रहावा तरीही काल्पनिक गोपीला सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचे आपसातले कमीत कमी संवाद कथेत येऊ दिले आहेत. ही खूप साधी सहज कथा आहे. मी स्वानंदासाठी लिहिली आहे आणि वाचून तुम्हालाही आनंद मिळावा एवढा सरळ हेतू आहे. काही संस्कृत शब्द पर्यायी म्हणून वापरले आहेत. गरज लागल्यास शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत. धन्यवाद !!

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी**प्रथम चरण..१

कथा क्रमशः आहे.

( मुखबंधन : ही एक काल्पनिक कथा आहे. राधाकृष्ण यांच्या कित्येक कथा प्रचलित आहेत. पण गोपींच्या कथा फारशा ऐकिवात नाहीत. शरद पौर्णिमेच्या रासाच्या खेळापुरतेच त्यांचे जनमानसातले स्वरूप सिमीत आहे. सर्वच गोपगोपी कान्हावर जवळजवळ तितकेच प्रेम करायचे असे मला वाटते म्हणून ह्या काल्पनिक गोपीला नायिका करून मी कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य गोष्टींचा आदर रहावा तरीही काल्पनिक गोपीला सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचे आपसातले कमीत कमी संवाद कथेत येऊ दिले आहेत. ही खूप साधी सहज कथा आहे. मी स्वानंदासाठी लिहिली आहे आणि वाचून तुम्हालाही आनंद मिळावा एवढा सरळ हेतू आहे. काही संस्कृत शब्द पर्यायी म्हणून वापरले आहेत. गरज लागल्यास शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत. धन्यवाद !! Happy )
**************

कृष्णडोहाच्या पैलतीरी प्रथम चरण

"आपल्याला उद्या पहाटे पहिल्या प्रहरी वृन्दावनी निघायला हवे पुत्री ! "

"नाही तात मला , मला इथेच रहायचे आहे , आपल्या या वाड्यात मातेच्या कित्येक स्मृती आहेत , त्याचा वियोग मला सहन नाही होणार ".

"बाळ नारायणी, मी समजू शकतो गं. तू एकुलती एक पुत्री आहेस मला, तुला दुखावण्याचे माझ्या स्वप्नीही होऊ शकत नाही , पण मथुराधीपती कंस महाराजांचा तसा आदेशच आहे बघं, त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे तर आपणही प्रजा म्हणून कृतज्ञता दाखवू. तुझ्या मातेला जाऊ एक संवत्सर उलटले आता. तरीही तू वियोगाच्या दुःखाला कवटाळून बसली आहेस. बाळ, आयुष्यात आता पुढे जायचा योग्य काळ आला आहे. मलाही वाटतं तू काही मास आपल्या आप्तांकडे रहावे. गुणवंती आणि देवदत्त तुला पुत्रीसमान स्नेह देतील. त्यांना स्वतःचे अपत्य नाही तर तूही त्यांना मातपित्यासम प्रेम दे. कंस महाराजांनी मला देशाटनासाठी व अश्वक्रयणासाठी दूरदेशी पूर्वेस श्रावष्टी नगरीस जाण्याची आज्ञा दिली आहे. शिवाय त्यांनी माझ्या चोखंदळ अश्वपरिक्षेसाठी गौरवाचे उद्गार काढले आहेत. राजाज्ञा म्हणजे साक्षात श्रीविष्णुंचीच आज्ञा. मला जावे लागेल पण हे सहा मास मला पळभरासारखेच वाटतील जर तू गुणवंती व देवदत्त यांच्याकडे गेलीस तर , नाहीतर वियोगाचा हरेक पळ मला षण्मासासारखा भासेल. वृन्दावनी गेल्यावर तिथल्या रीतीभाती शिकून घे. मोठ्यांचा आदर व लहानांचे कोडकौतुक कर. तुझ्या मातेचे उत्तम संस्कार तुझ्यात आहेतच. पण तू जरा हट्टी आहेस. आपला हा वियोग तुला तडजोड व विनाअट प्रेम करायला शिकवेल. हे समृद्ध वैचारिक आयुष्यासाठी खूप आवश्यक आहे पुत्री. तू इतकी गुणी, निष्ठावान आणि रूपवान आहेस की तुला सुयोग्य वरांची काहीच ददात नाही, आल्यावर तुला अनुरूप वाटणाऱ्या युवकाशी तुझा विवाह निश्चित करू. आता तू षोडशी आहेस पण मला मात्र बाळंच वाटतेस बघं म्हणून मी तुला इतके समजावतोय. तशी बांधाबांध झाली आहेच, उर्वरित प्रस्थानाची तयारी कर आता."

" किंतु पिताश्री ", क्षुब्ध झाली की नारायणी तातांना पिताश्री म्हणायची. हे तातांनाही माहिती होते. " माझ्या सख्या, माझ्या आवडीनिवडी, आपले परिचयाचे लोक सगळे आयुष्य इथेच रत्नपुरीत आहे. मला खात्री आहे की मला वृन्दावन आवडणारच नाही. ते तर रत्नपुरीएवढे विशाल नगर देखील नाही. केवळ एक छोटेसे ग्राम आहे. शिवाय मी तिथे कधी गेलेच नाही, गुणवंती मावशीच आपल्याकडे यायची नेहमी. तिच्याशिवाय मी कुणाकुण्णाला ओळखत नाही तिथे ! एवढा मोठा दिवस आणि एवढ्यामोठ्या रात्री तेही षण्मास. अशक्य.........!"
हे अशक्य वाटत असेल तर एक साहस म्हणून याकडे बघं किंवा हे मी देशाटनासाठी जातोय असे म्हणून नाही तर परमेश्वराची इच्छा आहे तू वृन्दावनी जावेस अशा दृष्टीने बघं.!"

" परंतु तिथली लोकं तिथले शिष्टाचार मला जमेल का ? "

" अगं बाळा, तिथली लोकं अत्यंत सरळ, भाबडी आणि प्रेमळ आहेत. ते तुला इतका जीव लावतील की तू मलाही विसरून जाशील. गुणवंती मावशी शिकवेल तुला , आणि माझाही विश्वास आहे की तू शीघ्र सर्व आत्मसातही करशील. "
हे आणि अशा आशयाचे संभाषण या पितापुत्रीत गेल्या दोन सप्ताहांपासून होत होते.

" मी जाण्यास तयार आहे पिताश्री, तरीही वाटते की दिवसाचा प्रत्येक पळ तर मी कामात नाही घालवू शकत नं. मगं मुक्त समयात मला तुमचे, आपल्या घराचे, रत्नपुरीचे, इथल्या परिचयाच्या स्थानांचे स्मरण होऊन मी व्याकूळ झाले तर मी काय करु ?"

"हो हो , अगदी सत्य आहे ते अगदी , पण ही तुझ्या आराध्य श्रीहरीविष्णुंची मनिषा आहे ना की तू वृन्दावनी गमन करावे, त्यामुळे जेव्हा जेव्हा तुझे मन स्मृतींनी व्याकूळ होईल तू त्यांचा जप कर. आता तरी झाले का समाधान माझ्या विदुषी पुत्रीचे."

"उचित आहे तात, तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. मी तुमची प्रतिक्षा करीन आणि वृन्दावनी तुमचा मान वाढवीन." असे म्हणून नारायणी निद्राधीन होण्यास स्वतःच्या कक्षात गेली.

लक्ष लक्ष विचारांनी मन अशांत झाले होते. कसे असेल वृन्दावन, रत्नपुरीइतके समृद्ध असेल का. गुणवंती मावशी तिला मातेसमान प्रेम देईल याबाबत ती निःशंक होती पण तिथे इथल्या सारखे भव्य वाडे, रम्य जलाशये व संगीत नृत्याचे कार्यक्रम होत असतील का ? सरिता यमुना कशी असेल, मेघवर्णी डोह आहे म्हणे तिचा. तात सहा मासात परतून येतील ना, का कंसमहाराज म्हणाले अजून करा देशाटन तर संवत्सरही लागायचे. नको श्रीहरी काय हे सगळे , आधी तू माझ्यामातेला माझ्यापासून हिरावून घेतले, आणि आता माझे तात व मत्प्रिय रत्नपुरीपासून मला तू दूर वृन्दावन ग्रामी पाठवत आहेस. कसली शिक्षा आहे ही. माझे तात अश्वपरिक्षेत व देशाटनात एवढे निपुण नसते तर ही आपत्ती माझ्या वर कोसळली नसती. का तू त्यांना निपुण केलेस श्रीहरी! का माघ महिन्यात माझे सगळे लक्ष माझ्या गायनाकडे होते व पौष महिन्यात सूर्य पुजनाला मला विलंब झाला होता. या सगळ्यामुळे मी ध्यानात चिंतनात कुठे कमी पडले, म्हणून तू मला शासन करत आहेस.वसंतोत्सवात रामायणावर सख्यांसोबत एक नृत्यनाटिका बसवायची होती. आता कशाचा वसंतोत्सव नारायणी देवी झोपा आता.....असे लाखो किंतु परंतुचे उसासे घेत नारायणी निद्राधीन झाली.

राजशेखर पंत त्यांच्या देशाटनाच्या तयारीत बाहेरील कक्षात अर्धा प्रहर शेवटची बांधाबांध करत होते. लेकीची काळजी होतीच. ती निद्रिस्त झाली आहे का पहायला ते तिच्या कक्षात येऊनही गेले. डोक्यावरून हात फिरवला, उगाच तिची शाल एकसारखी केली आणि मनोमन श्रीहरीला सोपवून तेही आपल्या कक्षात गेले.

राजशेखर पंत त्यांच्या पत्नी सुमतीदेवी व कन्या नारायणी असे त्यांचे सुखी कुटुंब होते. एक संवत्सरापुर्वी साध्याशा आजाराचे निमित्त होऊन सुमतीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला. तेव्हा पासून पंत आपल्या कन्येस पुष्पासम जपायचे. मथुराधीपती कंस महाराजांच्या विश्वासातल्या श्रेष्ठ व्यक्तींपैकी ते एक होते. हा विश्वास राजशेखर पंतांनी उग्रसेन महाराजांकडे अनेक वर्ष प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवला होता. काही गोष्टी कंसमहाराजांच्या त्यांना पटायच्या नाहीत पण ही सुद्धा श्रीहरीची इच्छा असे मानुण ते आज्ञापालन करायचे. ते अश्वपरिक्षेत प्रविण तर होतेच शिवाय त्यांना देशाटन करून वेगवेगळी राज्योपयोगी माहिती गोळा करण्याची हातोटी देखिल होती. सुमतीदेवी निवर्तल्यानंतर प्रथमच ते देशाटनास निघाले होते. रत्नपुरीत अगदी जवळचे नात्यातले व नारायणीला कन्येवत स्नेह देईल असे विश्वासाचे कुणी नव्हते. शिवाय एकिकडे पुत्रीबद्दलची ममता व दुसरीकडे कर्तव्यनिष्ठा यात ते अडकले होते. पण विवेकशील वृत्तीमुळे त्यांनी कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले. ही देखील श्रीहरीची इच्छा मानुण ते शांतचित्त राहिले. पुत्री नारायणीसुद्धा बुद्धीमती आहे हे ते जाणून होते व या पिता-पुत्री वाक्सभेची त्यांनी तयारी ही केली होतीच. ती कामी आली याचा सुद्धा त्यांना पुत्रीप्रेमापोटी अभिमानच वाटला. त्यांना तिला तिच्या गुणवंती मावशी व देवदत्त काकाश्रींकडे वृन्दावन ग्रामी सोडून लगोलग मथुरेला निघायचे होते , तेथील काही मंडळी सुद्धा त्यांच्यासोबत येणार होती. त्यांना घेऊन द्वितीय दिनी प्रातःकाळी त्यांच्या यात्रेला आरंभ होणार होता. सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
********************************************************************************************************************
शब्दसुचीः
संवत्सर...वर्ष
मास...महिना
आप्त.....नातलग
क्रयण...खरेदी
अश्व....घोडा
षोडशी... सोळा वर्षांची
प्रहर...साधारण तीन तासाचा एक प्रहर
------------------------------------------------------------------
क्रमशः
पाच सहा भाग होतील बहुतेक. कथा लिहून तयार आहे फक्त टाईप करणार आहे. एकदिवसा आड एक भाग येईल. पहिलाच प्रयत्न आहे कथा लिहिण्याचा तर चुका माफ करा. :)
धन्यवाद.

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण...२

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण

---------

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण

नारायणीच्या मनसरितेस मात्र पूर आला होता. मोठ्या कष्टाने तो तिला आवरावा लागला. तांबडे फुटायच्याही अर्धा प्रहर आधी ती सज्ज झाली होती. पुनःपुन्हा ती आपल्या कक्षातल्या भिंतींवरून हात फिरवत होती. त्यावर तिने व तिच्या मातेने काढलेले तिचे आवडते चित्र होते. फुलांच्या ताटव्यात बसलेली वीणावादन करणारी देवी श्री सरस्वती. त्यातल्या रंगांसाठी तिने आणि तिच्या मातेने रत्नपुरीहून कित्येक योजने दूर असलेल्या वनी जाऊन दुर्मिळ पुष्पे व पर्णं आणली होती. जाताना मातेच्या मधुर आवाजातील गीतं व सुभाषितं ऐकायला तिला फार फार आवडले होते.

अश्या कित्येक गोष्टी होत्या तिच्या या घरात. तिची जुनी खेळणी होती. एक लाकडी हत्ती होता. जो ती दशवर्षाची असताना तातांनी तिच्यासाठी इशान्येकडील राज्यातून आणला होता. एक क्षण नारायणीला वाटलं देखिल घ्यावा का हत्ती सोबत. नकोच ते हत्तीवरच्या झुलीवरून हात फिरवतं ती मनाशी म्हणाली. काय काय नेऊ मी ती चित्राची भिंत, हा हत्ती का माझे सर्व घर, तात , सख्या की मत्प्रिय रत्नपुरी. त्यापेक्षा काहीच नको. मातेची जुनी शाल तेवढी घेतली तिने. त्यातली मायेची ऊब तिला आत्ता या क्षणी फार हवीहवीशी होती.

शेवटी सगळे घर पुन्हा पुन्हा हिंडून झाले. सगळे सामान पुन्हा पुन्हा बांधून झाले की तातांची हाक तिच्या कर्णी आली. दोघाही पिता पुत्रीने गडबडीने न्याहारी उरकून घेतली. रथ द्वारी सज्ज होताच. श्रीहरीची मूर्ती नमस्कार करून आपल्या हातात घेऊन तिच्या अनंताच्या प्रवासाचा आरंभ झाला.

अनंताचा प्रवास अंतरायापासून सुरू होतो. हे एकदा तिला तातांनीच सांगितले होते. जो प्रवास किंवा किंवा आयुष्याच्या प्रवासातील एक भाग अत्यंत दुःखाचा व कष्टाचा वाटतो तो आपल्याला परमेश्वराच्या म्हणजेच अनंताच्या निकट नेतो. रथात बसून दोन प्रहर लागावेत इतक्या दूर असा प्रवास तिने कधीच केला नव्हता. हा प्रवास फार प्रदीर्घ वाटल्याने तिने मनात "अनंताकडे की अंताकडे नेतो आहे हा प्रवास मला " अशी चिडचिडही करून झाली. परत लवकर येऊ याची शाश्वती नसल्याने तिला यत्किंचितही उत्साह नव्हता. शिवाय काल झालेल्या मानसिक श्रमाने व वाहणाऱ्या शीतल वाऱ्याने तिला लवकरच झोप लागली.

जवळजवळ अर्धा-पाऊण प्रहर ती झोपूनच होती. रथाला वारंवार लागणाऱ्या धक्क्यांनी तिला जाग आली व तिला लक्षात आले की आता मार्ग लवकरच बदलणार आहे. वाटेवर एक बैलगाडी त्यांची प्रतिक्षा करताना त्यांना आढळली. त्यांनी सामानसुमान रथातून बैलगाडीत काढून रथवानाचे आभार मानून पुढचा प्रवास बैलगाडीतून आरंभ केला. पुढचा मार्ग यमुनेशेजारून जाणारा असल्याने
रथांच्या अश्वासाठी आव्हानात्मक होता म्हणून पंतांनी पूर्वसूचना देऊन तशी सोय करून घेतली होती. मागच्याच मासात त्यांच्या परिचयाचे गृहस्थ वृन्दावनी विवाह समारंभानिमित्त येऊन गेले होते. त्यांच्या हस्ते देवदत्त काकाश्रींना पत्र व निरोप गेलेला होताच. त्यांनीच प्रसन्नतेने ही तजवीज केली होती. गाडीवान मोठ्या आनंदाने त्यांना गुजगोष्टी सांगत रमवत होता. लवकरच यमुना नदीचे विशाल पात्र त्यांना दिसू लागले. आजूबाजूला तुळशीचे दाट बन, "अरे म्हणूनच तर हे वृन्दा-वन" नारायणीने मनाशी वदले. काही ठिकाणी गर्द आमराई शीघ्र ह्यांना छोटी छोटी आम्रफलेही लागतील असा विचारही आला. त्याखाली मोर विसावा घेत होते. तुळशीच्या सौम्य सुवासाने वातावरण अगदी आल्हाददायक झाले होते.

काही वेळात हाही रस्ता संपून यमुनेचा किनारा लागला. पूर्वीप्रमाणेच इथेही एक नौका त्यांची प्रतिक्षा करतच होती. त्यांनी गाडीवानाचे आभार मानले व ते सामानासह नावेत चढून बसले. नौकावान तर गाडीवानापेक्षाही गप्पिष्ट निघाला. तो रमणीय डोह आजूबाजूचे निसर्गसौंदर्य याचा आनंद घेताना नारायणीच्या मनात विचार आला की ह्याच कृष्णडोहाच्या पैलतीरी माझे गंतव्य आहे काय. वृन्दावन रमणीय आहे खरे !!

निरनिराळे वृक्ष व त्यावर विविध मोहकरंगी पक्षी त्याबाजूने मेघवर्णी कालिंदी खळाळणारी.
" यमुनाच ती बरंका पुत्री पण तिच्या मेघवर्णी डोहामुळे तिला कालिंदी असे सुद्धा म्हणतात. याठिकाणी तुझा काळ मोठ्या प्रसन्नतेने जाणार बघं." तातांनी सांगितले.

तो कृष्णवर्णी डोह, ते मोर, ते बहुरंगी व मधुर कुजन करणारे पक्षी नारायणीला संमोहित झाल्यासारखे वाटले. काही क्षण ती स्वतःला विसरून या सावळ्या निळाईस मंत्रमुग्ध झाल्यासारखी बघत राहिली. नौकावानाची भाबडी बडबड पण नको वाटली तिला त्या क्षणी.

"बरं का पंत, अहो एकदा या यमुनेच्या डोहात भलामोठा विषधारी नाग आला होता. आम्ही भयभीत होऊन इकडे येणे टाळत होतो. पण आमच्या मुख्यप्रधानांच्या मुलाने त्याला पिटाळून लावले. मोठा लाघवी कुमार आहे तो " इति नौकावान. नारायणीचा अर्थातच विश्वास बसला नाही व तिने विहङगम निसर्गाचा आनंद घेणे सुरुच ठेवले.

नौका यमुनेच्या पैलतीरावर पोहोंचल्यावर किनाऱ्यावर पाण्यात खेळणारी लहान मुले दिसली, काही गोप स्त्रिया धुतलेल्या कपड्यांचे वळे खांद्यावर घेऊन लगबगीने जाताना दिसल्या, काही गोपाळ हसतखिदळत आपल्या गायीवासरांना स्नान घालताना दिसले. सर्वांनी जुनी ओळख असल्यासारखे हसून चौकशी केली. कुठलाही अभिनिवेश नसलेले हे स्वागत नारायणीला फार आवडले. काही लहानग्या गोपाळांनी तर पळत पुढे जाऊन देवदत्त काकाश्रींना यांच्या येण्याची वर्दी देण्याची तयारी दाखवली.

त्यांच्या या भाबड्या उत्साहाची तिला मोठीच गंमत वाटली. तिचे काही किंतु परंतु या त्यांच्या उत्साहात कधी विरघळले तिच्या ध्यानातही आले नाही. ग्रामाच्या दिशेने चालताना तिचे मन नित्यासारख्या छोट्या छोट्या योजना बनवू लागले.

लवकरच मुख्य ग्रामाची कमान व अंबिकेचे मंदिर आले. तिथे दर्शनासाठी प्रतिदिन यायचे असे तिने मनोमन ठरवून टाकले. शिवाय यमुनेच्या डोहाच्या भोवताली असलेल्या वनसौंदर्याची तिथल्याच वल्लरीवरील सुरेख पुष्पांचे रंग बनवून विविधांगी चित्रे काढायची ह्याचेही स्वप्न ती पाहू लागली. नुकतेच तिने गोमलाने भूमी सारवणे शिकून घेतले होते. ते ती किती उत्तमरीत्या करू शकते हे गुणवंती मावशीस दाखवून तिला चकित करून सोडायचे हेही तिच्या मनात आले.

गुणवंती मावशीच्या वाड्यात पोचेपर्यंत बरेचसे वृन्दावनवासी भेटूनही झाले आणि अर्धे संवत्सर हा फार प्रदीर्घ काळ नाही असेही पळभर तिला वाटले.

गुणवंती मावशी पहाटे पासून यांची वाट बघत वाड्याच्या आतबाहेर करतच होती. शेवटी कंटाळून तिने गोवऱ्या थापायला घेतल्या की ही मंडळी दरवाज्यात उभी दिसली, तशी ती धावतच आली. गोमलाने बरबटलेल्या हाताने आपण प्रिय नारायणीच्या इडापिडा काढतोय हेही तिच्या लक्षात आले नाही. शेवटी नेत्र मोठे करून देवदत्त काकाश्रींना खूणवावे लागले मगं कुठे तिच्या लक्षात आले. तशी ती ओशाळत हात धुवून आली आणि परत स्वागताला लागली.

गुणवंती मावशीचे सुद्धा तिच्या सुमतीअक्काच्या स्मृतींनी नयन भरून आले. स्वतःवर नियंत्रण ठेवत ती पुन्हा पुन्हा नारायणीच्या मुखावरून हात फिरवतं राहिली. नारायणीलाही गहिवरल्या सारखे होऊन तिने 'माँ' असे म्हणून मिठीच मारली. "हो गं बाळा, आता तुझी माताही मीच आणि मावशीही मीच " असे म्हणून मावशी तिला थोपटत राहिली.

"चला बरं आत आता, सुस्नात होऊन घरात प्रवेश करा. अरे मुलांनो ही गाठोडी उचलायला तुमच्या काकाश्रींना सहाय्यता करा. ही पोरं ना तुम्हाला सांगते ,खव्याच्या पोळ्या खायला पुढं आणि गाठोडी उचलायला मात्र मागं !! आवरा बरं लवकरं, भुका लागल्या असतील, का हो भावोजी तब्येत का वाळलेली दिसते आहे तुमची, तुम्ही पण काय नाथ, पोरांना सांगा जरा काय कुठे ठेवायचे ते . कमs ळे ए कमs ळे पानं घ्यायला लाग हळूहळू , शुद्ध तूप शिंक्यावर वेगळे ठेवले आहे , ते घ्यायला विसरू नकोस. मी पण काय बोलत बसलेय, आत या बरं " असे वेगवेगळे संवाद वेगवेगळ्या व्यक्तींना उद्देशून मावशीने तिचा आनंद व उत्साह दाखवला.

शिळ्या भाकरीचा तुकड्याने ओवाळून घेऊन व पायावर पाणी घेऊन पाहुणे मंडळी अंगणात आली व स्नानादि उरकून घेऊन जेवायला बसली.
आज भोजनात सगळे पदार्थ नारायणीच्या आवडीचे होते. कढी, पातळ भाजी, वडे , दशम्या शिवाय खव्याच्या पोळ्या व घट्ट बासुंदी सुद्धा होती. सगळे वितृप्त झाले. जरावेळ आराम करायला बसले.

राजशेखर पंतांना मात्र परत गडबडीने मथुरेला निघायचे होते. त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेतला.

"काही चिंता करू नका भावोजी , हिच्या रूपाने मला अक्काचा व लेकीचा असा दोन्ही नात्यांचा सहवास मिळणार आहे. मला याचेच समाधान , श्रीहरीचा आशीर्वादच म्हणायचा हा. " मावशी पंतांना म्हणाली.

"हे आहेच हो गुणवंती , पण ही नारायणी जरा हट्टी आहे , तुमच्या अक्कासम, सांभाळून घ्या "

" हट्टी कुठली निग्रही म्हणा " असे मावशी म्हणाल्या तसे सर्वांच्या अधरावर हसू फुटले.

पुन्हा एकदा अश्रुभरल्या नेत्रांनी नारायणीला आशीर्वाद देत राजशेखर पंत मथुरेला प्रस्थान करण्यास निघाले. देवदत्त काकाश्रीं त्यांना निरोप द्यायला ग्रामाच्या मुख्य कमानी पर्यंत गेले.

****************************************************************************

टीप. सर्व हक्क लेखकाधिन .

*शब्दसुचि
योजन . साधारण बारा ते पंधरा किलोमीटर
अंतराय. विघ्न किंवा बाधा
आल्हाददायक. प्रसन्न
आम्रफल. आंबा
गंतव्य. मुक्कामाचे स्थान किंवा ध्येय
वल्लरी. वेल
पुष्प. फुलं
विहङगम . नयनरम्य
---------------------
धन्यवाद :) !

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी * तृतीय चरण

पहिले चरण : https://www.maitrin.com/node/4245
दुसरे चरण : https://www.maitrin.com/node/4246

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण

नारायणी व मावशी शिळोप्याच्या गप्पा मारत बसल्या. मावशीने तिला फिरून सगळा वाडा दाखवला. वाडा खूप भव्य नव्हता पण अंगण चांगले प्रशस्त होते. उजव्या बाजूला पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती . जुई , मालती, वासंती , कदंब, केवडा, चंपा, वैजयंती व तुळस याने सर्व अंगण बहरले होते. डावीकडे गोठ्यात चार पाच पुष्ट गायी, वासरे व बैलजोडी होती. श्रीमंती नव्हती पण टापटीप व स्वच्छतेचा स्नेहस्पर्श होता.

वाडा दुमजली होता. वरच्या मजल्यावर दोन मोठे कक्ष होते. एका कक्षाला लागूनच सज्जा होता. सज्जाच्या एका खांबाभोवती खालून वर चढत आलेला व तिथेच पसरलेला जुईचा वेल होता. सज्जात उभे राहिले असता दुरवर यमुनेची नागमोडी रेघ दिसायची. तो कक्ष नारायणीला आवडल्याचे गुणवंती मावशीला ध्यानात आल्यामुळे तिनेच नारायणीला तो कक्ष वापरावा असा आग्रह केला. नारायणीनेही आनंदाने त्याचा स्विकार केला.

आपल्या श्रीहरीसाठी आधीपासूनच स्वच्छ असलेल्या भिंतीतल्या कोनाड्याला तिने अधिकच निर्मळ केले. तिथे श्रीहरीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यासाठी तिने अंगणातील पुष्प व पर्ण आणून तो कोनाडा छान सजवला. तिने रत्नपुरीहून आणलेला चंदनाचा धूप लावून पुजन केले. शिवाय मनोमनी , या नुतन अनुभवास स्विकार करण्याची माझी तयारी आहे असे आर्तही केले. उर्वरित सामान तिने योग्य जागी लावले. मावशी व काकाश्रींना त्यांच्यासाठी आणलेले उपहार व भेटी दिल्या. संध्याकाळी थोडेसे भोजन करून ती निद्राधीन झाली.

भल्या प्रातःकाळी तिला जाग आली. अतिशय प्रसन्न मनाने ती जागी झाली. आज तिचा इथला प्रथम दिवस होता. तो कसा घालवावा व मावशीला कशी कशी सहाय्यता करावी हे विचार तिच्या मनात होते. तसेच घागरा सावरत ती सज्जात येऊन उभी राहिली. बाहेर थोडे धुके पसरले होते. यमुनामाई त्या निहारमय वातावरणात अदृश्य झाली होती. खालच्या गोठ्यातील बैलांच्या गळ्यातल्या घंट्यांची नाजूक किणकिण कानावर येत होते.

जुईचा मंद सुवास घेत , किणकिण ऐकत नारायणी कित्येक पळं धुकं कमी होण्याची प्रतिक्षा करत उभी होती. खूप खूप शांत वाटत होतं. अशी शांती तिने बाळपणी मातेच्या कुशीत अनुभवलेली. हळूहळू सुर्योदय होऊन धुके विरले यमुनामाईचे सुरेख वळण स्पष्ट दिसायला लागले. ते दृश्य पोटभर बघून ती खाली आली व आन्हिक उरकून मावशीने दिलेला गोरस पीत बसली.

गुणवंती मावशीने तिला अंबिकेच्या दर्शनासाठी लवकरच निघू असे सांगितले. कारण अंबिकेच्या आशीर्वादाने नारायणीचा इथला गृहवास सुखाचा होईल अशी श्रद्धा होती मावशीची. शिवाय रोज प्रातःसमयी पुष्कळ स्त्रिया व कन्या अंबिकेच्या दर्शनासाठी यायच्या. त्यांच्याशी नारायणीचा परिचय करून द्यावा असाही हेतू होता. तशा दोघी आवराआवर करायला लागल्या. नित्याची काम केली व स्वयंपाकाची सिद्धता करून , कमळाला जुजबी सूचना देऊन त्या निघाल्या.

अंबिकेच्या मंदिराला दगडी सोपान मार्ग होता. ह्या पायऱ्या चढून गेल्यावर काळ्या पाषाणाचे अंगण होते. फार विशाल किंवा फार लहानही नसलेले हे मंदिर अगदी पुरातन वाटत होते. आत गेल्यावर समोरच शीतल वाटावे असा गाभारा होता. काळ्याभोर पाषाणातच घडविलेला अंबिकेचा अर्चाविग्रह नारायणीला फारच रेखीव वाटला. अंबिकेच्या रजताच्या कुमुदिनीनेत्रात सर्व जीवसृष्टीसाठी जननीचा अपार स्नेह दाटून आला आहे असेही तिला वाटले.

सर्व स्त्रियांशी नारायणी मोकळेपणाने बोलली. काकी सुनंदिनी, काकी इंदूमतीने तर तिला भोजनाचे आमंत्रणही दिले. काकी शारदा व काकी सुभाग्या तिच्यासाठी उद्या येताना खर्वस आणते असेही म्हणाल्या. ती नको नको म्हणत असताना !

नारायणीची पूर्वपिठीका त्यांना मावशीकडून कळलेली होतीच. याकारणास्तव सर्व प्रौढ स्त्रिया मातेचा हरवलेला स्नेह तिला परत मिळावा यासाठी स्वपरिने धडपडत होत्या. सर्वांना तितकाच आदर ,स्नेह आपल्या आचरणातून व्यक्त करताना नारायणीचा गोंधळ उडाला. पण तातांचा तिला इथे आणून सोडण्याचा निर्णय कसा योग्य होता ह्याचे ही तिला आकलन झाले.

सगळ्या मातांच्या परिचयानंतर पुष्कळच मधुरभाषिणी कन्याही तिच्या सख्या झाल्या. कुणाला तिचे हास्य आवडले, कुणाला तिची वाणी तर कुणाला तिचे कानाचे डूल !! सर्वांशी परिचय झाला पण विशेष गट्टी जमली त्या तिघींशी. त्या होत्या सुचरिता , नित्यप्रभा व दीपगौरिका. या तिघींशी झालेला परिचय मात्र जन्मोजन्मीचे मैत्र वाटला . दुसऱ्या दिवशीच पुन्हा भेटायचे ठरवून सगळ्या स्वगृही गेल्या.

नारायणीची माता गेल्यापासून तिचा प्रसन्न स्वभाव कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता. आपल्या जीवनरथाचे चाक गहिऱ्या वालुकामय भूमीत रुतून बसलयं जे कितीही प्रयत्नांनी सुद्धा बाहेर निघत नाहीये असे बहुतांश वेळा तिला वाटायचे. अंतरायाशिवाय आयुष्यात अध्यात्मिक वा वैचारिक प्रगती नाही हेच खरं. नकळतच पण तिच्या इथे येण्याने तिच्या आयुष्याचा रथ मार्गस्थ झाला होता. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य समय येणे अनिवार्य आहे .

रत्नपुरीतल्या तिच्या सख्या , तिथल्या संगीत व नृत्यनाटिका हे सगळे ती स्वतःच्या करमणुकीसाठी नाही तर स्वतःच्या पीडेचे निराकरण करण्यासाठी करायची. कधी कधी यश मिळायचे, कधी विन्मुख व्हावे लागायचे.

नारायणीला असा आनंद हवा होता की जो आपोआपच ह्रदयातून येईल कुठल्याही मनधरणी व विमर्शनाशिवाय. जो चिरंतन असेल जो शाश्वत असेल व ज्याला स्थळाकाळाचे व योग्य परिस्थितीचे बंधन नसेल.

अशी प्रसन्नता तिला श्रीहरीची अर्चा करताना मिळायची. पण अर्चनविधी संपले की ती पुन्हा "तिच" नारायणी असायची. वियोगाचे दुःख बाभळीच्या काट्यासारखे रुततेय हे जाणवायचे. ह्यावर तिला प्रश्न पडले होते. उत्तरं हवी होती पण कुठे व कशी शोधायची कळत नव्हते. कधी तरी अशा आशंकाही मनात यायच्या की मुळात हे प्रश्न तरी आहेत की आपल्या मनाचेच खेळ. "मोठेच कृष्णकोहल आहे की हे मन आपले " असा विचार ती करायची. या सगळ्या विचिन्तेवरून कालिंदेचे पाणी वहायला लागले. क्लेशाचा बाभूळकाटा सैल होण्यास आरंभ झाला.

।।शुभं भवतु।।

क्रमशः
*************************************

शब्दसूचीःः

निहारमय. धुक्याचे आवरण असलेले
आन्हिके. सकाळची कामं
गोरस. दूध
सोपान. पायऱ्या
अर्चाविग्रह. मूर्ती
रजत. चांदी
कुमुदिनी. कमळ
नेत्र. डोळे
कृष्णकोहल: लबाड

टीप.सर्व हक्क लेखकाधिन.

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण

आता नारायणी वृन्दावनात रूळायला सुरवात झाली. तिच्या मनाप्रमाणे तिने तिची दिनचर्याही करून टाकली . त्यातील बराचसा वेळ सख्यांसोबत यमुनेकाठी जायचा. सकाळ सगळी मावशीला घरकामात मदत करण्यात जायची. नवीन नवीन पाककलेतील धडे घेण्यात व देण्यातही अर्थात हे मावशीचे मत होते. देवदत्त काकाश्री गायीवासरांच्या काळजी घेण्याबाबत बराच अभ्यास घ्यायचे. दर पौर्णिमेला भरणाऱ्या मथुरेच्या बाजारी जाताना तिला काही नवे वस्त्र किंवा अलंकार हवे असल्यास आवर्जून सांगावे असेही ते म्हणायचे. आताशा या अल्पसंतुष्ट तरीही कसलीही तक्रार नसलेल्या वृन्दावनवासींसोबत राहून नारायणीलाही भौतिक गोष्टींचा मोह राहिला नव्हता. त्याशिवायही जीवन परिपूर्ण व प्रसन्न असू शकते हे लक्षात यायला लागले होते.

चैत्र महिना बघता बघता सरला. वैशाखाचा उष्मा जाणवायला लागला. दिवसही दीर्घ झाले.
वसंत ऋतूच्या स्थिरावण्याने यमुनेकाठचा परिसर अगदी बहरला होता. छोट्या कैऱ्या आता मोठ्या झाल्या होत्या. त्या खात खात गप्पा मारत आम्रवृक्षाखाली प्रतिदिन सुचरिता, नित्यप्रभा व दीपगौरिका नारायणीला भेटायच्या.

लहानगे गोपाळ गाईवासरांसह परत निघाल्यानंतरही यांचे चरण काही तिथून निघायचे नाहीत. प्रतिदिन सख्यांशी बोलत पुष्प गोळा केल्यानंतर नारायणी तुळशीच्या बनात जाऊन बसायची. तिथल्या काही मंजुळा सुद्धा परडीत टाकल्या जायच्या. हे सगळे होत असताना फारच ऊष्णता जाणवल्यास यमुनाकाठच्या घाटावर असलेल्या पायदंड्यांवर बसून पाण्यात पाय सोडून उरलेले हितगूज व्हायचे. त्या नादात घागऱ्याचे काठ रोज ओले व्हायचे, पण कोण चिंता करतेय !! संध्यासमयी सुरभीगोत्रांच्या गळ्यातील घंट्यांची गोड किणकिण व गोपाळांचे आवाज ऐकून सर्व सख्या लगबगीने स्वगृही परतायच्या.

हे सगळे आता नारायणीला आवडायला लागले होते जणू ती नेहमीच इथे होती. आज गृही परतल्यावर मावशीने तात खुशाल असल्याचे व त्यांचे देशाटन आखल्याप्रमाणे निर्विघ्न होत असल्याचे पत्र आल्याचे कळवले. हे ऐकल्यानंतर हर्षित होऊन नारायणी नित्याप्रमाणे सायंपूजेला लागली. वनातून आणलेले कदंब पुष्प व मंजुळा तिने श्रीहरीच्या चरणी अर्पण केले व बाकीच्या वैजयंती पुष्पांची माला बनवून श्रीहरीच्या गळ्यात घातली.

आजचे वैजयंती पुष्प तिच्या उल्हसित मनाप्रमाणे स्मित करत होते. तिने ऐकू जाईल न जाईल इतपतच आवाजात प्रार्थना सुरू केली.

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोप..........

श्रीहरीचे पुजनविधी संपलेही नव्हते की तिचे चित्त एका बासरीच्या नादाने विचलित झाले. एवढे सुंदर, मोहक असे वेणूवादन तिने कधी रत्नपुरीच्या संगीताच्या कार्यक्रमी सुद्धा श्रवण केले नव्हते.

काय होते त्या वेणूत किंवा असे म्हणावे काय नव्हते त्या स्वरांत !!!

श्रीसृष्टीचे आर्त होते
अवनीचे गीत होते
युगाचे अभ्यादान होते
ओंकाराचे संवेदन होते

मोहक आमंत्रण होते
धुंद संमोहन होते
प्रार्थनेचे पावित्र्य होते
योग्यांचे वैराग्य होते

श्रीहरीचे भजन होते
मातेचे आलिंगन होते
प्रत्येका भासावे जणू
ममैव हे वादन होते

या आणि अशा कित्येक भावना तिच्या मनी दाटून आल्या. भावविभोर होऊन ती खाली धावत आली. त्या गडबडीत ठेचही लागल्याचे लक्षात नाही आले तिला ! तशीच भावावस्थेत ती मावशीला विचारू लागली , " कोण वाजवतोय गं पावा, अगदी स्वर्गीय माधुरी आहे ह्या सुरांत ?" . हे बोलताना तर तिला धाप लागली.

"अगं ते बासरीवादन रोज संध्यासमयी आमच्या मुख्यप्रधानांचा पुत्र करतो. "कृष्ण" नाव आहे त्याचं. मोठा गोड मुलगा आहे. वनातून गुरेढोरे घेऊन परतीच्या वाटेवर प्रतिदिनी वाजवतो तो. किमया आहे खरं त्याच्या स्वरांमध्ये."

" अगं पण प्रतिदिन वाजवतं असता तर मला नसते का ऐकू आले. मला तर एक मासाहून अधिक काळ लोटला इथे येऊन !! " नारायणीने विचारले.

" तू आज व्रजवासी झाली असशील म्हणून !"
असे काही तरी असंबद्ध बडबडत मावशी निरांजन लावायला देवघरात गेली.

नारायणीच्या मनात आले , आज मी व्रजवासी झाली म्हणजे नेमके काय झाले. मगं या आधी मी रत्नपुरीवासी होते आणि त्याचा या स्वर्गीय वेणूवादनाशी काय संबंध? तो या पूर्वी का नाही ऐकू आला. आता पुन्हा उद्या ऐकू आला तर बघू असा विचार तिने केला. संध्यासमयीच्या भोजनाच्या तयारीसाठी ती स्वयंपाकघरात गेली.

आजचा दिवसही कालच्या दिवसासारखाच गेला असता परंतु ही नवीन प्रतिक्षा तिच्या मनात होती. प्रातःकाळी कामं आटोपून लवकरात लवकर सख्यांना भेटून हे विचारायचे असे तिने ठरवले.

।। शुभं भवतु ।।
**************************************
क्रमशः
शब्दसुचीः
सुरभीगोत्र. गाय बैल
पायदंड्या. पायऱ्या
आम्रवृक्ष. आंब्याचे झाड
अवनी. प्रुथ्वी
अभ्यादान. आरंभ
ममैव. केवळ माझ्यासाठी

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.
धन्यवाद 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण

इथून पुढे.....
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण

त्या विचारांनी तिच्या हस्तांनाही वेग दिला. सकाळची कामं भराभर आटोपली पण मध्यान्ह काही होईना ! मगं गुणवंती मावशीला अजून कार्य सांगण्यासाठी टुमणे लावले, व लोणी काढायचे काम कमळेकडून आग्रहाने स्वतःकडे घेतले. मावशीला ही चलबिचल लक्षात येऊन त्या म्हणाल्याही "अगं तुझी आजची कार्यसंपन्न करण्याची गती बघता तू तर पहाता पहाता भांडभर नवनीत काढशील किंवा तेच भयाने तरंगायला लागेल क्षणभरात !"

या मावशीच्या बोलण्यावर कमळेला फिसकन् हसू आले . तशी मावशी कमळेला कृतककोपाने म्हणाली " तू बरं हसतेस गं , तुला तर कल्पांत लागला असता तरी आम्हाला लोणी काही मिळाले नसते. "

तशी कमळा नारायणीला म्हणाली, " तुम्ही आलात हे बरेच झाले ताई , घराला घरपण आले, कडुनिंबाच्या रसासारखे तुमच्या मावशीचे बोलणे मला कमी ऐकावे लागते आताशी. तुम्ही गेल्यावर तुमच्या मावशीचा नाही तर माझाच हात मोडल्यासारखं वाटणारे मला ."

ह्या सगळ्या संभाषणात नारायणी होतीच कुठे , तिचे मन पुनःपुन्हा कालच्या स्मृतींमध्ये रमत होते.

शेवटी एकदाची मध्यान्ह झाली . मावशीला सांगून नारायणी भराभरा पावलं यमुनेकाठीच्या पायदंड्यांवर पोहोचली सुद्धा. अर्थातच सख्यापैकी कुणीही आलेले नव्हते. तिने स्वतःचे मनातले अव्यक्त यमुनेपाशी मुक्त केले.

" कालिंदी , तू पण माझ्यासारखीच आहेस गं !
जिकडे आयुष्याने नेले तिकडे जायचे. केवळ तूच सरिता नाहीस. आपण दोघीही आहोत. तुला समुद्राकडे जायची ओढ व मला , मला कशाची ओढ, कशाची तरी निश्चितच आहे. पण नेमके कळत नाही. तुझ्या वाटेत पण वळणं, पाषाण, शिळा, अश्म. माझ्या मार्गात अनिश्चितता, किंतु, परंतु, संकटे. अचल व अभेद्य अशा अवरोध करणाऱ्या पाषाणालाही तू हळूहळू भेदून जातेस. तुझ्या वाटेतल्या छोट्या छोट्या उपलकांना तू मुदुल व गरगरीत करून टाकतेस. तुझ्या पदरासम शीतल तरीही ऊबदार प्रवाहाखाली ते निश्चिंतपणे सुखावलेले दिसतात. तुझ्या लहान लहान परिबाधांना तू तुझ्या मार्गाचा भाग बनवून अग्रकमण करत रहातेस. तेच कारण आहे का तुझ्या विशुद्धशील असण्याचे.............."

सख्यांच्या मधुर कोलाहलाने तिची विचारशृंखला तुटली. तिला तसे विचारात गढलेले बघून दीपगौरिका म्हणाली सुद्धा " आज शांत शांत का भासते आहे स्वरूप तुझे.

तसे नारायणीने खळाळणाऱ्या झऱ्याच्या वेगात कालचा प्रसंग सांगितला. कुठल्याही सखीला फार आश्चर्य वाटलेले दिसले नाही.

नित्यप्रभा उत्तरली , " नारायणी तू आमची प्रिय सखी आहेसच गं परंतु तू आता व्रजातील गोपी सुद्धा आहेस. तू वृन्दावनी यावे व आम्हा गोपींपैकी एक व्हावे. अशी त्या श्रीपद्मनाभाची सुद्धा इच्छा होती. जेव्हा तू या प्रसंगाचा स्विकार करण्यास तयार झालीस. तेव्हाच तो प्रसंग तुझ्या आयुष्यात आला. या आधी तुला वेणूवादन का नाही ऐकू आले याचे यापेक्षा अधिक स्पष्टीकरण नाही माझ्याकडे."

सुचरिता म्हणाली "दोन मासापूर्वी अंबिकेच्या मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम झाला होता. गर्गाचार्यांचे शिष्य आहेत कुणी राघवेंद्र स्वामी म्हणून त्यांचा. तेव्हा त्यांनी सांगितले की प्रत्येक नारी ही नारायणीचाच अंश आहे. जी श्रीहरीची रमा आहे, श्रीशंकराची उमा आहे. श्रीहरी रमेविना आणि श्रीशंकर उमेविना अपूर्ण आहेत. सत्य तर हे आहे की ते एकत्र आले की केवळ पूर्णत्व नाही तर ईश्वरत्व प्राप्त करतात."

तिचे उरलेले कथन नित्यप्रभेने पूर्ण केले " हो अगदी , आणि प्रत्येक स्त्री पुरुष त्या ईश्वराचे अंश आहेत. सद्भावनेने केलेले कुठलेही कृत्य तुमच्यातल्या "त्या" अंशाला आनंद देते व पूर्णत्वाकडे नेण्यास सहाय्य करते. आम्हा गोपींची अशी श्रद्धा आहे की आमचा लाडका कान्हाच साकार रूपातला ईश्वर आहे. त्याने बालवयात केलेले अचाट पराक्रम व त्याचे अवीट संभाषण ऐकल्यावर तुलाही हे पटेल.
आणि कालचे वेणूवादन ही त्याने तुला चिरंतन आनंदाकडे नेण्यासाठी घातलेली साद आहे ."

हे सख्यांचे बोलणे नारायणीला पटलेही व पटले नाहीही. कारण स्वतःचा पूर्ण विचार झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टी सुलभ वाटतात म्हणून स्विकाराव्यात या विचारांची नव्हती. या सर्व गोष्टींना वेळ देऊन पहावा असे तिला वाटले. तिने तर अजून त्याला पाहिले सुद्धा नव्हते.

वैशाखही असाच सरला. नित्याप्रमाणे तातांचा खुशालीचा निरोपही येऊन गेला. रोज संध्याकाळी श्रीहरीची पूजा आटोपून ती मनातल्या मनात श्रीहरीला विचारायची . "खरंच तूच आला आहेस का मनुष्यरूपात. हा कृष्ण तूच आहेस का श्रीहरी . तुझ्याशिवाय कुठल्याही दैवताच्या उपासनेत मन रमले नाही. तुझ्याशिवाय कुणालाही आराध्य मानता आले नाही, कुणासमोरही सुखदुःख उघडे करता आले नाही. तुझ्याशिवाय कुणीही ह्रदयाला जवळचे वाटले नाही. त्यावेळी तो पावा ऐकून प्रथमच तुझ्या पुजनविधीतून लक्ष कर्पूरासारखे उडून गेले."

"विशेष म्हणजे कसलीही खंत वाटत नाही. उलट या कर्पुराचा सुगंध हवाहवासा वाटतोय. जसे चंदन सहानेवर उगाळताना त्याचे झिजने ध्यानातही येत नाही. पण परिमळाने त्याचे मुग्ध अस्तित्व जाणवत रहाते तसेच काहीसे."

नित्याप्रमाणे आजही बासरीचा ध्वनी आला व तिची पावले सज्जाकडे वळली , तिथेच बांधल्या गेली. नेत्र मिटले आणि ती तिचीच उरली नाही. रोजचेच झाले होते हे.

तिला वाटलेही की जावे का दर्शनाला कृष्णाच्या आणि विचारावे त्यालाच. कोण आहेस तू, मी कोण आहे, मला असे का होते, कुठली माया आहे ही. याची उत्तरं दे नाही तर मान्य कर मी नाही तुझा श्रीहरी !! का त्याच्या दर्शनाने त्याचीच ह्रदयातील प्रतिमा विद्ध होईल.
यावर स्वतःच्या मनाचे निश्चित उत्तर मिळेपर्यंत जे होत आहे ते होऊ द्यावे व अजून थोडी वाट पहावी असे तिने ठरवले.

आषाढ व श्रावण या प्रमाणे प्रसन्नतेने व आर्त उत्कटतेने जात होते. पर्जन्यवृष्टीमुळे सख्यांशी घरातच गप्पा व्हायच्या. बहुतेक वेळा त्या कान्हाबद्दलच असायच्या. त्यातच एकदा आभाळ सरून सुरेख ऊन पडले असता त्यांनी दुसऱ्या दिवशीचा वनभोजनाचा बेत आखला. ताजा खरवस व मिठाया सोबत दशम्या , लोणी व नारळ तीळाच्या कोरड्या चटण्या नेण्याचे ठरवले.

दीपगौरिकेचा आग्रह होता की यमुनेच्या काठाकाठाने दूरवर जायचे व चरण दुखेपर्यंत थांबायचे नाही. ती म्हणाली , " छोटे मोठे सर्व गोपाळ गाईबैलांना चरण्यास याहीपेक्षा दूर जातात. मग आपण कन्या का नाही जाऊ शकत. "

त्याप्रमाणे सख्यांनी घरच्यांची अनुमती घेऊन मध्यान्हेनंतर अर्धा प्रहर निघायचे ठरवले.

।। शुभं भवतु ।।

**************************************
क्रमशः

शब्दसूची .
नवनीत . लोणी
कृतककोप . वरवरचा राग
कल्पांत. युगांत
शिळा, अश्म. मोठे व छोटे दगड धोंडे
उपलक. छोटे दगड, (नदीतले गोल )
कर्पुर. कापूर

टीप. सर्व हक्क लेखकाधीन.

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठं चरण

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठम् चरण

सर्व सख्या त्यांच्या भोजनसामग्रीचे वाडगे व स्वच्छ वस्त्राच्या गाठोडीत बांधलेल्या दशम्या घेऊन निर्धारित समयावर एकत्र निघाल्या.

मुग्ध व मधुर हितगूज करत त्यांची नाजूक पावलं यमुनेच्या काठाकाठानी पडत होती. प्रत्येकीने चौघींना पुरेल इतकी शिदोरी घेतली होती. उत्साहाने जरा जास्तच घेतल्या गेले हे त्यांना बोलताना लक्षात आले. कुणी बालगोपाल दिसले तर त्यांच्यासह हा खाऊ वाटावा असे त्यांच्या मनात आले.

सुचरितेच्या तातांनी तिला मथुरेहून नवीन वस्त्र आणले होते. चैत्र पौर्णिमेला आणले होते पण त्याचा घागरा सीवन करण्यात श्रावण उजाडला. पीत-हरी रंगाच्या घागऱ्याचे सर्व सख्यांनी कौतुक केले. त्यावर जपाकुसुमाच्या रंगाचे नक्षीकाम खूपच अप्रतिम जमले होते.

यावरून कुणाला कुठला रंग आवडतो याची चर्चा सुरू झाली. त्याची कारणेही सांगण्यात येऊ लागली. तसे नारायणी म्हणाली, " मला तर श्वेतरंग सोडून सर्वच रंग आवडतात. कारण श्वेतरंग हा रंगच नाही मुळी तो तर रंगाचा असणारा अभाव आहे. नीलवर्ण मात्र मला विशेष प्रिय आहे. जर माझ्या मनाला रंग असता तर ते नीलवर्णी असते !" तसे दीपगौरिका म्हणाली , " म्हणजे तुला आमचा नीलवर्णी कान्हाही खूप आवडेल ".

विषय कुठलाही असला तरी गप्पा नकळत कान्हाकडे वळायच्या. "कान्हा" अतिरिक्त दुसऱ्या गोष्टींविषयी बोलताना प्रयास करावे लागायचे , हे त्यांचे त्यांनाही माहिती नव्हते.

यमुनेला या वेळच्या पर्जन्यवृष्टीने भरपूर जलौघ होता. या गोपींच्या सारङगजमुखासमान चरणखुणा पळभरासाठी रेतीत उमटायच्या. कधी यमुनेच्या स्नेहल लाटा या चौघींच्या चरणांना अलवार स्पर्शून जायच्या. वातावरणात अवर्णनीय अनुराग होता. बरेच दूर आल्यावर व ठरल्याप्रमाणे चरण दुखू लागल्यावर त्यांनी विश्राम करून आपला वनभोजनाचा कार्यक्रम उरकायचे ठरवले.

शेवटी गर्द झाडी असलेल्या भाग लागला आणि एक भला मोठा वटवृक्ष दिसला. त्याच्या छायेत बसून भोजनाचा कार्यक्रम करण्याचे ठरले. त्याप्रमाणे गोपी सर्व शिदोरी मांडायला लागल्या क्षुधा लागलेली होतीच.

हसतखिदळत आस्वाद घेत गप्पा चालल्या होत्या. एकमेकांना आग्रह करत ताव मारणे सुरू होते. चिमणीचिमणी पोटं लगेच भरली. आता उरलेल्या भोजनसामग्रीला परत न्यायचे नाही हे ठरवल्याप्रमाणे त्या बाळगोपाळांना शोधणार तर त्यांनाच आवाज आला.

थोड्याशा दूरवर असलेल्या पिंपळवृक्षाच्या ओट्यावर काही बालगोपाल लपाछपी खेळताना दिसले. मधुमंगलवर राज्य आले होते. बाद झालेले काही गडी त्याला इतर गडी शोधण्यासाठी मदत करण्याचा आव आणून आणखी गोंधळ वाढवत होते. गोपसख्या उर्वरित सर्व शिदोरी त्यांच्यासाठी घेऊन तिथे गेल्या.

तशी ती भुकेली बाळं उत्सुकतेने धावतच आली त्यांच्याकडे. तेही अर्धा डाव व बरेच गुप्त गडी तसेच सोडून. मग 'अरे खर्वस पण आहे का, सुचरिता ताई मिठाई दे ना , काकी इंदुमतीच्या हातची खोबऱ्याची चटणी म्हणजे वाह , पूर्ण वृन्दावनात काकी गुणवंतीसारख्या मऊसुत दशम्या कुणी नाही बनवू शकत. ' असे वेगवेगळे संवाद ऐकायला आल्याने बाकीचे लपलेले गडीपण बाहेर आले.

बघता बघता भोजनाचा फन्ना उडायला सुरू झाला . सर्व सख्यासुद्धा पुनःपुन्हा आग्रह करत होत्या. अचानक कुणाला तरी लक्षात आले की कान्हाही लपला होता आपल्यासोबत . मगं काय प्रत्येक जण हाक मारतयं , 'अरे गोविंदा बाहेर ये, कान्हा खेळ संपला आता, मुकुंदा कुठे बरे लपलास , मोहना ये आता , मुरलीधरा येतोस का संपवू तुझा खर्वस ? '

नारायणीला वाटले एका मुलाला एवढी वेगवेगळी नावं , तिही अर्थपूर्ण त्याच्या वेगवेगळ्या गुणांमुळे , आश्चर्य आहे. आपण ज्याच्या वेणूवादनाने मंत्रमुग्ध होतो, स्वतःला विसरतो तो कसा बरा असेल. आपल्याला आवडणारा नीलवर्ण आहे म्हणे त्याचा ,खरे असेल का हे....

...तोच खळाळणाऱ्या झऱ्यासारखे हास्याचा आवाज येऊन त्याच पिंपळवृक्षाच्या वरच्या शाखेवरून कृष्णाने त्यांच्या पुढ्यात उडी मारली. दचकलेच सगळे !!

नारायणी तर पहातच राहिली. त्याचा सावळा निळसर वर्ण , भव्य कपाळ , खांद्यावर रूळणारे किंचित कुरुळे केस , केसात खोवलेले मोरपीस, कमरेला बांधलेली मुरली, मोती सांडावेत असे खट्याळ निर्व्याज हसू , असे नेत्र तर तिन्ही लोकी कुणाचेही नसतील असे तिला वाटले. सहस्त्रसूर्याचे तेज व सहस्त्रचंद्रांची शीतलता असलेले ते नेत्र होते. खरंच माझ्या श्रीहरीने जर साकाररूप घेतले तर ते असेच असेल याबद्दल तिला शंकाही राहिली नाही.

नित्यप्रभेने विचारले सुद्धा "तू इथेच लपला होतास तर आम्हाला आभासही कसा नाही झाला. मोठा द्वाड आहेस की कान्हा तू तर !"

त्यावर गालातल्या गालात हसत नारायणीकडे बघत कृष्ण म्हणाला " मी नित्य तुमच्या समीपच असतो पण कोणी मला समीप शोधतच नाही. जे माझे स्मरण करतात त्यांचा वियोग तर मलाच सहन होत नाही. ही निकटता मलाही तितकीच प्रिय आहे. जिथे मी असतो तिथे वियोग व दुःखाला थाराच नाही मुळी."

तशी सुरचिता म्हणाली , " बरं बाबा, खाऊन घे आधी , भुकेजला असशील नं, तूच राहिला आहेस खायचा. तुझे प्रवचन आपण एकादशीला अंबिकेच्या मंदिरात ठेवू मगं तर झालं. "

"माझ्या प्रियजनांनी खाल्ले की मी तृप्त होतोच गं , पण माझ्या मातांनी स्वहस्ते बनवलेल्या रूचकर भोजनाचा पण मी त्याग नाही करू शकतं." यावर सगळ्यांना हसू आले , नारायणीलाही.

हे मोहक दर्शन अत्यंत प्रिय वाटले नारायणीला, कितीही पाहिले तरी मन अतृप्तच रहात होते. सर्व शंका कुशंका त्या दैवी हास्यात विरघळून गेल्या. तिने स्वहस्ताने कान्हाला तिच्या श्रीहरीला भरविले.

आपल्या सर्व प्रतिक्षा संपल्या. उरले केवळ आनंद, प्रेम ,भक्ती, समर्पण. यातच वृद्धी करणे आपली नियती. प्रथमच आपले आयुष्य दिशाहीन नाही असेही तिला वाटले.

इथे पहिल्यांदा येताना ती नौकेत बसली होती , तेव्हा तात जे म्हणाले होते त्याचा गर्भितार्थ तिला कदाचित कळला होता किंवा कळणार होता. " कृष्णडोहाच्या पैलतीरी " , याच पैलतीरावर मला जायचे आहे ज्याचा मार्गही कृष्ण व गंतव्यही कृष्णच !!

तिच्या दिनचर्येत आता नित्य कृष्णदर्शनाचीही भर पडली. संध्यासमयी श्रीहरीचे पुजनविधी आटोपून सज्जात उभे रहायचे व नीलबिंदू दूरवर दिसतो आहे का पहायचे. तो दिसायचा, जवळ येत जायचा अधिक स्पष्ट व मोठा होत वळताना दिसले की खाली यायचे व अधिकच सुस्पष्ट दर्शन जास्तीत जास्त वेळ घ्यायचे. मनाचे समाधान होईपर्यंत !!

याआधीही ती इथे कैकदा उभी रहायची पण ज्ञात नव्हते की ह्रदयातील अस्वस्थता कुठल्या अपूर्णत्वामुळे आहे. नेमका कशाचा शोध लागल्यावर हे रणरण कमी होऊन जीवाला विसावा मिळणार आहे. कशाच्या दर्शनाची आस आहे. तात म्हणतात तेच उचित , 'योग्य समय यावा लागतो '.

नित्य ध्यान व दर्शन या क्रमाने तिचे मन शांत व शीतल झाले. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळत गेली. मातेच्या वियोगदुःखाचे तीक्ष्ण टोक बोथट झाले. जीव विसावला.

एकेदिवशी नित्यासारखे ताक घुसळत असताना तातांचे पत्र कुणीतरी घेऊन आला. त्यातील मजकूराप्रमाणे दोन सप्ताहानंतर तात येणार होते व ठरल्याप्रमाणे तिचा वृन्दावनवास संपत आला होता. तसेच नारायणीस निघण्याची तजवीज करण्याबाबत सूचनाही दिली होती. त्या पत्रासोबत काही वस्त्र, अलंकार व उपहार सुद्धा होते. त्या क्षणी ते बघण्याची तिची मनःस्थिती राहिली नाही.

या पत्राने नारायणीला आभाळ कोसळल्यासारखे वाटले. ती इथे काही मासांपूर्वी आली होती. अश्विनपौर्णिमा काही सप्ताहांवर आली होती. कृष्णदर्शनाशिवाय ती कशी प्रसन्न राहू शकेल असे तिला वाटायला लागले. काही तरी चमत्कार व्हावा व माझे जाणे लांबणीवर पडावे असे तिला वाटू लागले.

तिला स्वतःचाच क्रोध यायला लागला. इकडे येताना पण आपण स्वतःच्या मनाशी संघर्ष केला आणि आता जातानाही समान अस्वस्थता!! मावशी व काकाश्रींना सुद्धा उदास वाटले. कधी कधी काही घटना पूर्वनियोजित असूनही त्या प्रत्यक्ष व्हायला लागल्या की आपल्याला अप्रिय वाटतात.

धावतच जाऊन तिने ही बातमी सख्यांना दिली. त्या गोपींनाही नारायणी आधी आपली सखी नव्हती याचेच विस्मरण झाले होते. त्यांनाही उद्विग्न वाटले. परंतु दर पौर्णिमेला वृन्दावनी येऊन त्यांना भेटायचे हे वचन नारायणीकडून घेतल्यावरच त्या शांत झाल्या.

उर्वरित दोन सप्ताह नारायणीसोबत जास्तीत जास्त समय व्यतित करायचा हेही त्यांनी ठरवले.

।। शुभं भवतु ।।

**************************************

क्रमशः

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.

शब्दसूची .
जपाकुसुम. जास्वंद
जलौघ..पाण्याचा प्रवाह
सारङगजमुखा..हरणाच्या चेहऱ्यासारख्या
क्षुधा..भूक
नियती.. नशीब
**नीलबिंदू..अध्यात्मिक नेत्र (अधिक माहितीसाठी खाली बघू शकता )
पूर्वनियोजित..पूर्वनिश्चित

********************************************

** Neelbindu or blue pearl ...

Siddha yoga guru, Swami Muktananda, referred to the blue pearl as “the light that illuminates the mind, that illuminates everything.” It has also been described as containing the entire universe and divinity within the individual.

And

The Blue Pearl

… the Blue Pearl [is] the subtlest covering of the individual soul....

When we see this tiny blue light in meditation,
we should understand that we are seeing the form of the inner Self.
To experience this is the goal of human life.

[The Blue Pearl] is tiny, but it contains all the different planes of existence.

- Swami Muktananda (1)

Through meditation, some have experienced visions of the blue pearl outside of their bodies, while others have seen the light with their eyes closed. These visions are believed to be a glimpse into the innermost Self.

Thanks,

https://www.yogapedia.com/definition/6658/blue-pearl

https://www.souledout.org/healing/bluedot/bluedot.html

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंंतिम चरण

इथून पुढे......

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण

शरदपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी नारायणी परत जाणार आहे हे सख्यांना कळाल्यावर त्यांनी शरदपौर्णिमा नित्यापेक्षा अधिकच उत्साहाने साजरी करायचे ठरवले. त्यासाठी सर्वच सख्या स्वतःकडील सर्वात सुंदर वस्त्र व अलंकार नारायणीने परिधान करावा असा आग्रह देखील करू लागल्या. त्यांचे ते निष्पाप, निर्व्याज प्रेम पाहून नारायणीला गहिवरून आले. तिच्याकडे असलेल्या वस्त्रालंकारात ती संतुष्ट आहे हे त्यांना पटवून द्यायला तिला बरेच प्रयास करावे लागले.

पुढचे दोन सप्ताहांत गुणवंती मावशीने तिला एकाही कामाला हात लावू दिला नाही. उलट गोडाधोडाचे भरवून खूप लाड पुरवले. याच काळात तिने तातांनी पाठवलेल्या वस्त्रांपैकी एक श्वेतशुभ्र वस्त्र निवडून त्याचा घागरा सीवन केला.
दीपगौरिकेच्या आग्रहाप्रमाने त्याला चंदेरी-रजत रंगाचे काठही शिवले. शरदपौर्णिमेच्या रासाच्या कार्यक्रमात ह्या वस्त्रामुळे ती पौर्णिमेच्या चंद्रमासम लखलखणार होती.

ह्या रासाच्या कार्यक्रमाला सर्वच लहानथोर वृन्दावनवासीला आमंत्रण होते. तशी शरदपौर्णिमेची परंपराच होती वृन्दावनात. नारायणी सुद्धा त्यांच्या इतक्याच उत्साहाने त्यात सहभागी होणार होती. उर्वरित दिवसांच्या अविस्मरणीय स्मृती निर्माण करण्यासाठी ती झटत होती. रोज संध्याकाळच्या ध्यान व दर्शनाने तिचे जीवन नाही पण आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच बदलला होता. या नुतन दृष्टिकोनामुळे स्वतःच्या आव्हानांकडे त्रयस्थासारखे बघून त्यात मार्ग काढायला तिला हळूहळू जमू लागले होते. तिच्या आयुच्या मानाने हे मोठेच दिव्यावदान होते.

आनंदाचे दिवस हरणाच्या गतीने जातात म्हणून की काय बघता बघता शरदपौर्णिमेचा दिवस आला. तो संपूर्ण दिवस ती व तिच्या सख्या रात्रीच्या रासाच्या तयारीत व्यग्र होत्या.

पौर्णिमेचा चंद्र उगवला तशी ती नवे वस्त्र परिधान करून कार्यक्रमाच्या स्थानी आली. संख्यांच्या अंदाजाप्रमाणे खरोखरच चंद्रमाच तिच्या रूपाने तिथे आला आहे असे सर्वांना वाटले. सर्वांच्या विविधरंगी वस्त्रांमध्ये नारायणीचे रजतकाठाचे शुभ्र वस्त्र उठून दिसत होते.

हळूहळू रासाचा खेळ रंगायला लागला. दूर कुठेतरी कुणाशीतरी टिपऱ्या खेळणाऱ्या कान्हाकडे तिची दृष्टी वारंवार जाऊ लागली. या मोठ्या रिंगणात आपण कधी त्याच्यासोबत खेळू शकणार अशी प्रतिक्षा ती करू लागली.

कान्हा सर्वांना प्रिय असल्याने प्रत्येकाला त्याच्याशी खेळायचे होते. नवीन गोपगोपी येत गेल्या व रिंगण अधिकच मोठे होऊ लागले. तिचे धैर्य संपत आहे असे तिला वाटू लागले.

हळूहळू या प्रतिक्षेने व दर्शनाने तिचे मन इतके एकाग्र झाले की सर्व गोपगोपींमध्ये तिला तिचा श्रीहरी-श्रीकृष्ण परमात्मा दिसायला लागला. अगदी स्वतःतही तिने कान्हाला पाहिले. कान्हाशिवाय काही उरलेच नाही. ती खऱ्या अर्थाने परमानंदी झाली. प्रतिक्षा कायमची संपली. सच्चितानंद केवळ उरला. उद्याचा , कालचा काय काळाचाच विसर पडला. काही तरी कालातीत प्राप्त झाले. गोलोक वृन्दावनातली ती कायमस्वरूपी झाली. आता ती कोण , रत्नपुरी कुठे, मातेचा वियोग , उद्याचे प्रस्थान , नारायणी नावाची कुणी गोपी आहे आणि तिला तिचे जन्मोजन्मीची प्रिय व वृन्दावनभूमी , तिच्या इथल्या सख्या व तिचा अत्यंत प्रिय कान्हा यांना सोडून जावे लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी केवळ मिथ्या वाटू लागल्या.

या रासात हरवलेला तिचा श्रीकृष्ण शोधताना तिला तिच्यातला श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त झाला. आता कधीच वियोगाचे दुःख तिच्या श्रीहरीच्या वियोगाचे दुःख तिला जाळू शकले नसते , कधीच . एकरूपतेला कसला वियोग !!

त्या क्षणी तिच्याशी रास खेळणारा व तिच्यातील रास खेळणारा कान्हा म्हणाला.

"तुझ्या अंतरी मी असताना कसला वियोग. श्रीरंगाच्या रंगात रंगण्यासाठी आधी अंतरंग नितळ व्हावे लागते. शुद्ध शुभ्र व्हावे लागते. कारण श्रीरंगही आहे तुझ्या समीप व शुभ्रताही.
त्या शुभ्रतेला शोधा , "त्या" श्रीरंगाला शोधा. समीप आहे, स्वत्वातच आहे.
तू नर आहेस आणि नारायणीही ! तुझी माझी यात्रा नित्य आहे , अनंत आहे. सहज आहे, निर्धारितही आहे. तू यात्रेला आरंभ कर."

मार्ग मी गंतव्य मी !
स्वत्व मी ईश्वरत्व मी !
चिरंतन मी आणि काळ मी !
आरंभ मी आणि अंत मी !

व्यक्त मी तरी गुप्त मी !
आदी मी अनादी मी !
अंत मी अनंत मी !
सृजन मी भेदन ही मी !
निमित्त मी प्राक्तन ही मी !

सुक्ष्म मी आणि स्थूल मी !
नित्य मी अनित्य मी !
अ-क्षरही मी आकार मी !
ओंकार मी हुंकार मी !

नाद मी आणि गर्भ मी !
संगीत मी आणि नीरव मी !
उत्सवही मी एकांत मी !
गृहीही मी मंदीरीही मी !

अचिंत्य मी आणि नाम मी !
राघवही मी शबरीही मी !
नरही मी नारीही मी !
तूही मी आणि मीही मी !

तूही मी आणि मीही मी !

तूही मी आणि मीही मी !

तूही मी .................

।। शुभं भवतु ।।

**************************************
*******चिरंतनात विलीन/ समाप्त***********

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.

शब्दसूची .
आयु..वय
दिव्यावदान..दैवी कामगिरी किंवा यश ..divine achievement
व्यग्र..व्यस्त
परिधान..नेसणे
मिथ्या..असत्य
अ-क्षर.. अविनाशी
प्राक्तन..प्रारब्ध
सृजन..निर्मिती
अचिंत्य..ज्याचे चिंतन करणे अवघड
नीरव..शांतता

**************************************

धन्यवाद  !

लेख: