रूपेरी वाळूत - ४४

तो डेस्कला टेकून उभा राहिला. "बघ, एक तर हे सगळं खूप वर्षांपूर्वी झालं. तेव्हाचा मी वेगळा होतो, तू वेगळी होतीस. केतन फार काही वेगळा असेल वाटत नाही. तेव्हा त्याच्या बोलण्यातून तुझा उल्लेख असायचा तो फक्त तू एक टिपिकल वाइफ होशील, त्याच्या पेरेन्ट्सना सांभाळशील, जेवणखाण करशील आणि तो नंतरही पहिल्यासारखीच ऐश करत राहील कारण तो तुला पूर्ण कंट्रोल करेल अश्या पद्धतीचा असायचा.

मला तू कोण आहेस हे माहिती नव्हतं, फक्त त्याच्याबरोबर दोन चार फोटोत तुला पाहिलं होतं. नोरा नाव ऐकलं असलं तरी ही माझ्या गावातली, लहानपणची नोरा असेल असं वाटायचा काहीच संबंध नव्हता." ती खुर्चीत बसून अविश्वासाने त्याच्याकडे पहात होती.

"अजून कॉलेजमध्ये असणाऱ्या लहानश्या मुलीला हा कसं ट्रीट करतोय ते पाहून मला वाईट वाटत होतं. त्याच्यापासून तुला काही करून सोडवायचं म्हणून मी त्याला हे किती चुकीचं आहे ते सांगायला लागलो. तरीही न ऐकल्यावर एकदा एका पार्टीत नशेत मी ती बेट लावली. अर्थात त्याने तुला सोडायच्या आधीच तू त्याला पाहिलास आणि लांब गेलीस. त्यावेळी येऊन त्याने तुला सोडून दिलं असं मला सांगितलं. ब्रेकअप झाला आणि नंतर त्याने तुला काहीही त्रास देऊ नये म्हणून मी त्याला पैसे दिले." त्याने टेबलावरच्या जगमधून ग्लासमध्ये पाणी ओतले आणि घटाघट पिऊन टाकले.

"काहीही! मला अजिबात विश्वास बसत नाही. माझी एवढी दया येऊन तू त्याला दोन लाख दिलेस? काय संबंध? मी तुझ्या ओळखीचीही नव्हते. आयम नॉट सम चॅरिटी केस! माझं ब्रेकअप करायचा हक्क तुला कोणी दिला?" तिचा आवाज वाढला होता.

"ही एकच गोष्ट बरोबर आहे. आय अग्री, माझा काहीच राईट नव्हता. पण तरीही मी तसं केलं. तो एक नालायक माणूस होता आणि मी एका लहान, नाईव्ह मुलीला त्याच्या तावडीतून वाचवत होतो. हे तू, तू होतीस म्हणून नाही तर एका निरागस मुलीचं आयुष्य त्याच्या हातून वाया जाऊ नये म्हणून मी करत होतो."

तिने न पटल्यासारखी मान हलवली.

"एनिवे, मी तुला पहिल्यांदा घरी बघितलं तेव्हा मला तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं, पण प्लेस करता येत नव्हतं. तू लग्नानंतर जेव्हा केतनबद्दल मला सांगितलंस तेव्हा ही सगळी लिंक लागली."

"आणि ? अजून काही बाकी आहे?"

"फोटो व्हायरल झाल्यावर मी जी FIR फाईल केली ती केस अजून कोर्टात पेंडिंग आहे त्यात केतनचं नाव आहे. तेव्हापासून अधूनमधून तो मला कॉल करून केस काढून घेण्यासाठी विनवण्या, धमक्या सगळं करतोय. मी ऐकत नाही कळल्यावर, शेवटचा काहीतरी धक्का द्यायचा म्हणून त्याने तुला सांगितलं."

"पण तरीही पुढचं सगळं तुला हवं तसंच घडत गेलं. आता तर जमीनही तुझ्या नावावर झाली. तेवढ्यापुरतंच होतं हे लग्न. मी तुझ्यात अडकत गेले, इमोशनल झाले ही माझी चूक झाली." तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबलं नव्हतं.

"नोरा.. प्लीज इतका स्ट्रेस घेऊ नको. इट्स नॉट हेल्दी." तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून म्हणाला.

"डोन्ट! अजून काळजीचं नाटक करू नको." ती मागे सरकत म्हणाली. "तू मला सांगितलं होतं, माझ्या प्रेमात पडू नको. ते लिहूनसुद्धा मी पडले. इट्स ओके, चूक सुधारू. आपलं कॉन्ट्रॅक्ट एक वर्षाचं होतं पण तुझा पर्पज आधीच सॉल्व्ह झालाय."

"मी तुला फोर्स केला नव्हता नोरा. लग्नाची आयडिया तुझी होती." त्याला तिचे हात हातात घ्यावेसे वाटत होते पण तो गप्प राहिला.

"हो, आयडिया माझी होती. मी विचारलं, पण तो विचार का करावा लागला? ते फोटोज वगैरे, तुझाही त्यात काही हात असू शकेल."

त्याने फक्त नकारार्थी मान हलवली.

"धिस इज इट. मी थकलेय आता. मला अजून काही डिस्कस करायचं नाही." ती उठली आणि खिशात हात घालून दारात गेली.

"नोरा!" मागून त्याची हाक आल्यावर ती वळून थांबली. "यू कॅन ऍट लीस्ट से सॉरी.." ती म्हणाली.

"मला ज्या गोष्टींचा पश्चात्ताप होत नाही, किंवा ज्या मी केल्याच नाहीत, त्यांच्यासाठी मी सॉरी म्हणणार नाही. लग्नानंतर आपल्यात जे काही घडलं ते काहीच मी प्लॅन केलं नव्हतं. आपलं आपलं काम करू आणि वर्षभराने आपापला रस्ता पकडू हाच प्लॅन होता. But you happened. मी तुझ्यापासून लांब राहायचा पूर्ण प्रयत्न केला पण तू नेहमी माझ्या आजूबाजूला होतीस. मी जितका तुझ्याबरोबर राहिलो, तुझ्याबरोबर जेवढा वेळ घालवला.. लांब राहणं शक्य नव्हतं.

मी तुझ्या प्रेमात पडलो. जेव्हा मला स्वतःबद्दल हे रिअलाईज झालं तेव्हा मी ठरवलं की मला जमेल तितकं, मिळेल तेवढा वेळ तुला सुखी ठेवायचं. फ्युचर कोणी बघितलंय.. मी तुझ्या प्रेमात पडणं हा प्लॅन नव्हता, सो आयम नॉट ऍट ऑल सॉरी अबाउट इट.  पुन्हा चान्स मिळाला तर मी तेच करेन. तुझ्याबरोबर घालवलेला एकही क्षण मी पुसून टाकणार नाही.

"मी तुला माफ करू शकत नाही." ती वळली आणि तिच्यामागे दार बंद झाले.

तिचे आरोप आणि निघून जाणे यातले जास्त वेदनादायी काय होते, ते त्याला कळत नव्हते. तो हळूहळू खुर्चीत जाऊन बसला आणि समोरचे काचेचे पेपरवेट उचलून भिंतीवर भिरकावले.

---

रात्रीपर्यंत त्याने स्वतःला कामात बिझी ठेवले. शरीराने, मनाने पूर्ण थकल्यावर शेवटी नऊ वाजता तो निघाला. दार उघडायला ती आत नसणार ही त्याला खात्रीच होती, तरीही त्याने दोन तीनदा बेल वाजवली. शेवटी दार उघडून तो आत शिरला. सोफ्याशेजारी मोठ्या टॅंकमध्ये मासा कुठेतरी लपून बसला होता. किचनमधून काहीतरी बेक केल्याचा गोडसर वास जाणवताच तो तिकडे वळला. किचन रिकामेच होते, फक्त टेबलावर झाकून ठेवलेल्या मोल्डमध्ये तळाला चिकटलेला एक चॉकलेट केक होता. आजूबाजूला डेकोरेशनच्या ऍक्सेसरीज पडलेल्या होत्या. त्याने नकळत रोजच्या सवयीने फ्रिजमधून फिश फूडची बरणी काढून बाहेर आणली. मासा अजूनही दिसत नव्हता, तरीही त्याने चमच्याने बरणीतले आठ दहा तुकडे काढून पाण्यात सोडले. घरी असतानाही कंटाळा घालवायला तिने फिश फूड बनवून फ्रीझ करून ठेवले होते. तो घरी आल्यावर त्याला क्यूब्ज भरलेली बरणी दाखवताना आनंदाने तिच्या डोळ्यात आलेली चमक त्याला आठवली.

तो पायऱ्या चढून वर तिच्या बेडरूममध्ये गेला, जी सध्या दोघांची बेडरूम झाली होती. टेबलावरून तिचे नाईट क्रीम नाहीसे झाले होते. कपाट रिकामे होते. बाथरूममधून तिच्या वस्तू गायब होत्या. सगळी खोली मरगळलेली दिसत होती. काही तासात तिने तिच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा पुसून टाकल्या होत्या. टेबलवर फक्त तिची रिंग आणि कपाटात मंगळसूत्राबरोबर त्याच्या आईने दिलेले इतर दागिने होते. त्याने रिंग उचलून खिशात टाकली आणि पुन्हा खाली गेला. टीव्हीसमोर बसल्यावरही त्याला समोरचे काही दिसत नव्हते.

तो तिच्याशिवाय राहू शकला असता, तिच्याशी शब्दही न बोलता आयुष्य काढू शकला असता, जगू शकला असता - भले दयनीय अवस्थेत, पण जगला असता - जर ती खूष असती तर. तो चालत राहिला किंवा थांबला तरी आयुष्य चालतच राहणार होते. पण त्याला ते तिच्या सोबतीशिवाय चालायला नको होते.

त्याने निर्णय घेतला. त्याला फक्त लांबून तिच्याकडे बघत आयुष्य घालवायचे नव्हते. तिच्याशेजारी उभे राहायचे होते, तिचा हात धरून तो तिच्यावर किती प्रेम करतो ते सांगत, जोपर्यंत ती त्याच्याशिवाय राहूच शकणार नाही. कितीही दुखले तरी आता काही जखमांवरची खपली खरवडून काढायला पर्याय नाही. नोराला भेटण्यापूर्वी त्याला अजून काही गोष्टी कराव्या लागणार होत्या. मनावर असलेली सगळी ओझी फेकून तिला मोकळ्या मनाने भेटायचे होते. तो सोफ्यावरच आडवा झाला, खिडकीतून सूर्य उगवण्याची वाट बघत...

क्रमशः

Keywords: 

लेख: