नभ उतरू आलं - २५

पलोमा

घरी पोहोचेपर्यंत बोलता बोलता मी समरच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि एकदम झोपच लागली. जुहूच्या त्याच्या बे व्ह्यू अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरल्यावर त्याने मला हलकेच जागं केलं. आम्ही लॉबीच्या दरवाजासमोर उतरलो आणि ड्रायव्हर कार पार्किंगमध्ये घेऊन गेला. तेवीस मजल्यांच्या त्या बिल्डिंगची लॉबीसुद्धा मार्बलने मढवलेली आणि सगळीकडे दिव्यांचे झोत सोडल्यामुळे चकाकत होती.

समरने एका छोट्या पॅनलसमोर चेहरा दाखवून लिफ्टचा दरवाजा उघडला. लिफ्टला तीनच बटन्स होती. 23, -3-पार्किंग आणि लॉबी. "ओह, प्रायव्हेट लिफ्ट?" मी आपसूक विचारलं. तो जरा हसला. "हम्म, इथे जास्त प्रायव्हसीची गरज पडते. सेलिब्रिटी लाईफचे तोटे! म्हणूनच कोल्हापूरला आल्यावर एकदम रिलॅक्स वाटतं. बिंधास कुठेही फिरता येतं." टॉप फ्लोरवर त्याचं 4 BHK पेंटहाऊस होतं. लिफ्ट उघडताच आम्ही त्याच्या भल्यामोठ्या लिव्हिंग रूममध्ये पाय ठेवला.

डावीकडची अख्खी भिंत फ्लोअर टू सीलिंग काचेची होती. पडदे उघडून बाजूला केलेले होते आणि समोर चंद्रप्रकाशात चमकणारा समुद्र दूरवर पसरलेला दिसत होता. काळ्या पाण्यावरच्या होड्यांचे बारीक बारीक दिवे काजव्यांसारखे टिमटिमत होते. "सकाळी जाग येताच हे बघायला किती भारी वाटत असेल.. अर्थात आपल्या कोल्हापूरचा व्ह्यू काय कमी नाही!" मी हसत त्याच्याकडे वळून म्हणाले. "माझा विश्वासच बसत नाहीये की हे तुझं घर आहे! इट्स ब्युटीफूल!!"

त्याने माझा हात हातात घेतला. "मी कुठे राहतो ते फायनली तू बघायला आलीस, म्हणून मला बरं वाटतंय."

"दिवसा हे अजून सुंदर दिसत असेल."

"हम्म. चल, तुला बाकी घर दाखवतो." म्हणून तो हात धरून मला आत घेऊन निघाला. खूप मोठी जागा होती. मी ते मॉडर्न, स्लीक किचन बघून जरा थांबले. व्हाईट मार्बलचे काऊंटर्स, ग्रे कॅबिनेटस, साताठ जण बसतील एवढं भलंमोठं आयलंड, त्यावर टांगलेले स्टायलिश लाइट्स... तिथून निघाल्यावर त्याने मला त्याचं स्टेट ऑफ द आर्ट होम जिम दाखवलं. दोन गेस्ट बेडरूम आणि एक त्याची बेडरूम. भिंतींवरची मोठमोठी ॲबस्ट्रॅक्ट पेंटींग्ज, एक दोन हिरवी झाडं सोडता सगळीकडे ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट. सगळं खूप मॉडर्न, खूप ग्लॉसी!

"हे घर तू नक्की डेकोरेट केलेलं नाहीय, है ना? इथे 'तू' अजिबात दिसत नाहीस." मी बेडवर बसून म्हणाले.

"हा बिल्डरचा शो फ्लॅट होता आणि फर्निचरसकट होता तसा मी विकत घेतला. वेळच नव्हता काही विचार करायला." तो शेजारी बसत म्हणाला.

"आपल्या दोघांची वेगळी दोन आयुष्य आहेत, एकमेकांना माहीत नसलेली. हे किती वीअर्ड वाटतंय ना?" मी त्याचा हात हातात घेत म्हणाले.

"पलो ऐक, तू माझा पास्ट आहेस आणि फ्यूचरपण! प्रेझेंटशी कॅचअप करायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीय. मला तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत, आत्ताच्या तुला जास्तीत जास्त समजून घ्यायचंय." तो माझ्या हातावर थोपटत म्हणाला.

"मग तू लकी आहेस, कारण तुला खूप प्रयत्न नाही करावा लागणार. कोल्हापूरला येताना मी मुंबईतला रेंटल फ्लॅट सोडला होता. बाय द वे, गेली दोन वर्ष, मी बोरिवलीला रहात होते. सो, सध्या कोल्हापूरचं घर, माझं एकमेव घर आहे." मी हसले." पण तुला दिल्लीला घेऊन जायला, माझी युनिव्हर्सिटी, माझी आवडती ठिकाणं दाखवायला मला खूप आवडेल."

त्याने हसून मान हलवली. "आपल्याला आधी रिलॅक्स व्हायची गरज आहे." म्हणत त्याने कपडे काढून एक टीशर्ट आणि शॉर्ट्स घातल्या. मीही साडीमधून मुक्त होऊन त्याचा एक टीशर्ट अडकवून बाथरूममध्ये शिरले. केसांतल्या पिना काढून केस मोकळे सोडले आणि सगळा मेकअप बेबी ऑइलने पुसून काढला. मी बाहेर आले तेव्हाच तो हातात कॉफी मग्ज ठेवलेला ट्रे घेऊन दारातून आत येत होता. "माईंड रीडिंग कुठे शिकलास रे!" मी खूष होत म्हणाले. त्याने टीशर्टला नसलेली कॉलर ताठ केली. आम्ही मांडी घालून समोरासमोर बसलो. "समर, तू ट्रस्टचा विचार कसा काय केलास? तू खूप मनापासून बोलत होतास.. आय मीन, तुझ्या ओळखीत असं कोणी मूल आहे का? इट सीम्ड अ बिट पर्सनल, म्हणजे मला तरी असं वाटलं." मी कॉफीचा घोट घेत सहज विचारलं.

माझ्याकडे बघता बघता त्याचे डोळे गढुळले. कपाळावर आठ्या आल्या. हातातला मग ट्रेमध्ये ठेवताना थोडा हिंदकळून सांडलाच. "माझा बाप!" नकळत त्याच्या मुठी वळल्या होत्या. मला धक्काच बसला.

मी आ वासून त्याच्याकडे बघताना तो पुढे बोलू लागला. "पप्पा नाही. माझा खरा बाप! तू म्हणालीस ना आपली वेगळी आयुष्य आहेत, हे माझं अजून एक आयुष्य आहे जे बाहेर कुणालाच माहीत नाही." तो माझ्यामागच्या काचेतून दूरवर उसळणाऱ्या लाटांकडे बघत बोलत होता. " माझे वडील सुरेंद्र काळे, सिंधुदूर्गातल्या एका गावात तलाठी होते. माझी आई तिथेच झेडपीच्या शाळेत शिक्षिका म्हणून जॉईन झाली. आई गगनबावड्याची. लहान गाव, वस्ती कमी. रोज एकमेकांना बघता बघता ते प्रेमात पडले आणि लग्न केलं. ते ब्राम्हण, आई मराठा, त्या काळाप्रमाणे घरच्यांचा विरोध वगैरे. लगेच एक दोन वर्षात माझा जन्म झाला.

सुरुवातीला सगळं चांगलं सुरू होतं मग हळूहळू त्यांना गावातली वाईट संगत लागली, जुगार, दारू त्यासाठी लागणारे पैसे, ते मिळवण्यासाठी आणखी आणखी भ्रष्टाचार हे नेहमीचं झालं. हळूहळू सगळ्याची भडास आईवर आणि माझ्यावर निघायला लागली. रोज संध्याकाळ झाली की आम्ही घाबरून थरथरत असायचो. दिवसा माझ्याशी प्रेमळ असणारा बाप, रात्री दारू पिऊन आला की आईवर नाही नाही ते संशय घेऊन शिव्या देत, तिला बडव बडव बडवायचा. मी मध्ये आलो तर मलाही हाणायचा.
आई आणि मी कायम शाळेत आमच्या जखमा लपवत असायचो. मी तर तेव्हा फक्त दुसरीत होतो आणि समजायला लागल्यापासून हेच पहात होतो. सकाळी गालावर उमटलेली बोटं, सुजलेली पाठ बघून बाप कॅडबरी द्यायचा आणि इतकं होऊनसुद्धा मी कॅडबरी खात त्याला पापी द्यायचो." तो विषादाने हसला.

माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मी फक्त डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होते.

"तो संपूर्ण काळ माझ्या आत फक्त राग भरलेला होता आणि त्या रागाचं काय करायचं ते समजत नव्हतं. जून महिना होता, शाळा नुकतीच सुरू झाली होती. व्यसनापायी घरात पैसे नसणं आणि भांडणं, शिव्या, मारहाण सुरूच होती. त्यातच आई पुन्हा प्रेग्नंट होती. मी संध्याकाळी शाळेतून आलो तेव्हा सगळीकडे आभाळ भरून आलं होतं. मला आईने पटापट वरणभात खायला सांगितला आणि बाहेर खेळायला जा, अजिबात लवकर घरी येऊ नको म्हणून सांगितलं. तिला काहीतरी कुणकुण लागली होती. मी जायला तयार नसतानाही तिने ढकलूनच मला बाहेर पाठवलं.

मी समुद्राच्या दिशेने चालत राहिलो. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. मी समुद्रावर पोचलो आणि पावसाची जोरदार सर आली. मी पाऊस झेलत, ओल्याचिप्प वाळूत काटकीने रेघा ओढत फिरत राहिलो. काळोखात उधाणाचं लाल पाणी समोर उसळत होतं. किती वेळ गेला काय माहीत.. समोरून एक होडीवाला लडखडत माझ्याकडे येताना दिसला, तेव्हा घाबरून मी घराच्या दिशेला पळालो. घराबाहेर पोचलो तेव्हा गर्दी जमली होती. लोक कुजबुज करत होते. गावातला पोलीस पाटील वहीत काहीतरी लिहीत होता. शेजारच्या एका काकीने मला बघताच धरून ठेवलं पण मी तिला झिडकारून घरात पळालो. पंख्याला साडीचा फास घेऊन लटकलेल्या माझ्या बापाचं प्रेत दोन जण खाली उतरवत होते. शेजारी माझी आई रक्ताच्या थारोळ्यात भिंतीला टेकून बसली होती. एक नर्स तिच्या हाताला बँडेज करत होती. बापाने तिच्या दोन्ही हातांच्या नसा कापल्या होत्या. मी थिजून उभा होतो, काय करावं हेच माझ्या छोट्याश्या मेंदूला सुचत नव्हतं. त्या रात्री काय झालं मला काहीच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी पोलिसाने मला आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्या पोटातलं बाळ आधीच गेलं होतं पण नशिबाने ती जिवंत होती. नंतर मोठा झाल्यावर कधीतरी आईने मला सांगितलं. त्या दिवशी बाबांना नोकरीवरून काढून टाकलं होतं आणि घरी येऊन ते आमच्यावर सगळा राग काढतील याची तिला कल्पना होती. त्याप्रमाणे तिला मारुन त्यांनी दारूच्या तारेतच स्वतःला फास लावून घेतला. त्यानंतर आईलाच दोषी मानून कोर्टात केस सुरू झाली पण पुरावे नसल्यामुळे ती वाचली. पण गावात बदनामी इतकी झाली होती की तिथे राहणं शक्यच नव्हतं. मग तिने कोल्हापूरला बदली करून घेतली, तिचं माहेर लग्नामुळे आधीच तुटलं होतं.

तिथं येऊन ती झेडपीची नोकरी आणि थोडंफार पार्लरचं काम करायला लागली. म्हणजे असंच बारीकसारीक आयब्रो, मेकअप, मेहंदी, साडी नेसवणे वगैरे. तिसरीत मी कोल्हापूरच्या शाळेत आलो. पार्लरमुळे तिची पद्माआत्याशी ओळख झाली.  पप्पांची पहिली बायको दोन वर्षांपूर्वी मुलासह बाळंतपणात वारली होती. आत्याला दोघांची माहिती होती, तिने आईला विचारलं आणि लग्न झालं.

पप्पा पहिल्या दिवसापासून माझे एकदम घट्ट मित्र झाले. त्यांनी बाळंतपणाची इतकी धास्ती घेतली होती की दुसरं मुल त्यांना नकोच होतं. मीच त्यांचा खरा मुलगा असल्यासारखं मला वाढवलं. माझ्या मनावर झालेले आघात, भरून राहिलेला राग त्यांना कळत होता. मिरजच्या एका डॉक्टरांना आम्ही दोन तीनदा भेटून आलो. त्या काळी काय असे थेरपिस्ट वगैरे नव्हते कोल्हापुरात, तर त्यांना समजलं ते त्यांनी आर्मी स्टाईल करून टाकलं. मला फुटबॉलच्या क्लासला घातलं! अंगातली रग जिरली की डोकं शांत होईल म्हणून." त्याचे ओठ थरथरत होते आणि डोळे काठोकाठ भरून आता ओघळायला लागले होते. मी स्वत:चे डोळे पुसत पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि डोकं थोपटत राहिले.

आता मला एकेका गोष्टीची लिंक लागत होती. चौथीच्या आधीची त्याची कुठलीच गोष्ट माहीत नसणं, त्याच्या दिसण्यातला आईपप्पांहून वेगळेपणा, त्याचे अँगर इश्यूज, मॅचेसमध्ये फोकस कमी होणं, रिलेशनशिप्स न टिकवता येणं, सेक्समध्ये गुंतून मनातले विचार विसरायचा प्रयत्न, नशिबाने त्याने व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे नाहीतर कठीण होतं.

तो थोडा शांत झाल्यावर मिठी सोडवून मी त्याचे हात धरून बसले. "कोरोनाच्या पहिल्या लाटेत आई पप्पा दोघेही ॲडमिट होते. ते बरे झाले पण आईचं हार्ट एन्लार्ज झालंय. आम्ही डाएट, औषध सगळी काळजी घेतो पण काहीही होऊ शकतं. मला तेव्हापासून खूप इन्सिक्युरिटी, अँग्झायटी वाटते. वाईट स्वप्न पडतात, कधी फिल्डवर पॅनिक अटॅक येतात... भीती वाटते की माझ्या डीएनएमध्ये बाबांचा जास्त वाटा असेल तर काय... मी हा भूतकाळ इतकी वर्ष कधीच ओठावर आणला नाही, ना घरात आम्ही काही बोलत."

मी घशात दाटलेला आवंढा गिळला. "मला इतके दिवस, एवढं बोलूनसुद्धा तुझ्यात काहीतरी कमी जाणवत होतं पण बोट ठेवता येत नव्हतं. तुला चाईल्डहूड ट्रॉमा होताच, तो खूप वेळ गेल्यामुळे हळूहळू कमी झाला पण तो सप्रेस करून ठेवल्यामुळे जी PTSD तयार झाली, ती आता तू थोडा व्हल्नरेबल झाल्यावर डोकं वर काढतेय. धिस इज माय ॲनालिसिस." मी एक खोल श्वास घेतला. " बघ, काहीही त्रास झाला तर आपलं मन आणि शरीर त्यातून बरं होण्याचा प्रयत्न करत असतं. मनाचे तीन रिस्पॉन्स असतात, फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. लहानपणीचे त्रास मन शक्यतो फ्रीज करून ठेवते. डीसोसिएटिव ॲम्नेशिया, म्हणजे त्या ठराविक त्रासदायक आठवणी विसरून जाणं, दाबून ठेवणं हे होतं. कधी कधी लोक त्यांच्या आयुष्यातील वर्षच्या वर्ष विसरतात. हा बॉडीचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण त्या आठवणी विसरल्या तरी त्याचा शरीरावर, मनावर परिणाम होतोच. तरुणपणी भरपूर प्रकारच्या सोशल, सायकॉलॉजीकल आणि फिजीकल हेल्थ कंडिशन्स होऊ शकतात.

"ह्याच्यावर काही उपाय आहे, की?" त्याने दुःखी डोळ्यांनी माझ्याकडे बघत विचारलं.

"ऑफकोर्स उपाय आहे. मी आहे ना! बऱ्याच थेरपी आहेत ज्या वापरून आपण तुझ्या सप्रेस्ड मेमरीजवर काम करू. काही माईंड एक्सरसायझेस आहेत, ते करावे लागतील. ह्या सगळ्याला खूप वेळ लागेल, कदाचित काही वर्ष लागतील पण तुला बरं नक्की वाटेल. तसाही तू आत्ता खेळायला फिट आहेसच.." मी त्याच्या कपाळाला कपाळ टेकत श्वास सोडला.

त्यानंतर आम्ही एकमेकांना गोष्टी सांगतच राहिलो. लहानपण, त्याचे अनुभव, माझे अनुभव... पुन्हा आम्ही चौथीतले समर पलोमा झालो. रात्रभर बाकी काही न करता फक्त रडत, हसत, पुन्हा रडत मी त्याला कुशीत घेऊन सूर्य उगवताना कधीतरी झोपले.

------

तरीही तासाभरात जाग आली तेव्हा त्याच्या डोळ्यातल्या पाण्याने माझा खांदा भिजला होता आणि तो कोपर टेकून, तळहातावर डोकं ठेवून माझ्याकडे बघत होता. "पलो, एकदा सगळं नीट ठरलं आणि आपल्याला कोचपासून लपायची गरज नसेल तेव्हा आपण मुंबईत खूप फिरू, मी तुला सगळीकडे घेऊन जाईन पण आज इथे फिरणं आणि ते लपवणं शक्य नाही. सो, चल दिल्लीला जाऊया!"

"काय?" मी उठून डोळे चोळत त्याच्याकडे बघितलं.

"बघ, दिल्लीत मास्क आणि कॅप घालून फिरलो तर मला फार कोणी ओळखणार नाही. तू मला DU आणि तुझ्या सगळया आवडत्या जागा दाखवू शकतेस. तू कुठे होतीस, तुझं स्वप्न पूर्ण करायला कुठे गेलीस ते सगळं बघायचंय मला." तो हसत म्हणाला.

"सिरीयसली म्हणतोयस?" माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.

"कालच्या भल्यामोठ्या सेशननंतर, वी डिझर्व अ ब्रेक. उठ, उठ आवरायला घे, दोन तासात फ्लाईट आहे."

"पण मी कपडे, बॅग काहीच नाही आणलं.." मी चक्रावून म्हणाले.

"दिल्लीत दुकानं असतात.. आय थिंक!" तो हसता हसता म्हणाला.

"मॅss डेस तू!" मी गळ्यात हात टाकून त्याला किस करत म्हणाले.

क्रमशः

Keywords: 

लेख: