रक्ताची चटक लागलेले चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.

रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत...

रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.

रुपाली..श्रद्धा.. आणि
उजेडात न आलेली सावजं किती तरी
आईवडिलांशी भांडून घर सोडलेल्या, पळून गेलेल्या किती तरी
इतक्या भाळल्या? कशाला भुलल्या?
जिवावर अशा कशा उदार झाल्या?

रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.

पण चाकू सुरे लाचार आहेत.
त्यांना हाताची गरज आहे.
शोधत आहेत ते एक हात
जो धरेल त्यांना
आणि उगारेल तरुणींच्या अंगावर
रक्ताच्या चिळकांड्या उडतील
चाकू सुऱ्यांना आनंद होईल
.......
पुढे खरे तर लिहायला हवे..
की मिळू देउ नये त्यांना तो हात..

पण माहितीये मला .. हे असे कवितेत लिहिणे सोपे आहे.
रोज घडणाऱ्या घटना काही वेगळेच संकेत देत आहेत.

रुपालीच्या रक्ताचे डाग पुसले जायच्या आत होत आहेत श्रद्धाचे तुकडे तुकडे
एक समाज म्हणून, पालक म्हणून का नाही जात आहे आपले लक्ष ह्याकडे?
प्रतिभा, सरस्वती, गीतांजली, सानिया, राजेश्वरी, वैशाली
किती नावे लिहावी?अजून किती श्रद्धा.. किती रुपाली???
ज्यांची तरुण शरीरं आधी हैवानाची तहान भागवतील ..
मग त्या मुलं उपजवणारी “जमीन” होतील.
त्या नंतर कुठे चाकू सुऱ्याना संधी मिळेल.
त्या संधीची.. त्या वेळेचीच वाट पाहत
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.
-वृंदा टिळक.
दिनांक १५/११/२२

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle