घरावर वस्तीला यायचे तर आधी वहिवाटीची सोय बघायला हवी . वसंत ग्रीष्माच्या सीमारेषेवर इथे आले त्यामुळे सगळीकडे फुलापानांचा बहर होता . दिवस बऱ्यापैकी मोठा त्यामुळे उशिरापर्यंत उजेड असायचा . बाहेर लोक दिसायचे , बऱ्यापैकी चाहूल होती आणि पहिले काही दिवस सामान टाकून ऑफिसच्या वाऱ्यांसाठी मी बाहेरच होते. एक दिवस मध्यरात्री नंतर पोहोचले , असंही सगळं सामसूम असतंय , त्यादिवशी गडद अंधार , गाडी ते घराचे दार ५-७ मिनिटं लागतात, त्यात चढ, मग लागणारा दरवाजा आणि मग घराचं दार, काहीच दिसत नव्हते. सोलर लाईटस मिणमिणते प्रकाशायला पण सूर्यप्रकाश मिळत नव्हता. वाट आणि प्रकाशाची सोया करणं क्रमप्राप्त होतं.
लंडनला पहिल्यांदा आले तेव्हा हातात नोकरीचे पत्र आणि चार दिवस राहायची एका बेड आणि ब्रेकफास्टच्या ठिकाणी सोय एवढेच होते. ना कोणी ओळखीचे आणि जे कोणी ओळखीच्यांच्या ओळखीचे त्यांचीही फार काही मदत करायची तयारी नव्हती. त्यामुळे तिथे पोहोचल्यावर बघुयात असा विचार म्हणण्यापेक्षा दुसरा पर्यायच नव्हता. नावाला शासकीय नोकरी, पण तोपर्यत सरकारी कर्मचारी या प्राण्याबद्दल भारतात जे काही माहित होते, ते काहीच या देशात लागू पडत नाही, हे कळू लागले होते. सुरुवातीचे काही दिवस, आठवडे इकडे तिकडे काढल्यावर एक आत्येभाऊ इथे असल्याचा शोध लागला.