आईसलँड

आईसलँड हे नाव मी सुमेधकडून ऐकल्याचं मला आठवतंय ते साधारण ३-४ वर्षांपूर्वी. तो म्हणाला होता की मला आईसलँडला जायचं आहे. त्याला इज्राईलपासून तर केनिया, अफगाणिस्तान किंवा अजून कुठे कुठे जायचं असं तो एरवीही म्हणतो, त्यामुळे या आईसलँडकडे मी त्यावेळी नुसतंच एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडुनही दिलं. मग कधीतरी फेसबुक वर फोटो पाहिले, तेव्हा अजून थोडी माहिती शोधली, छान दिसतंय सगळं, शेंगेन देशांमध्ये असाल तर वेगळा व्हिसा लागत नाही या नोंदी मात्र नकळतपणे घेतल्या गेल्या, पण विषय तिथेच संपला. एक तर माझा भूगोल कच्चा, त्यामुळे हे आईसलँड नेमकं कुठे, तिथे पर्यटनासाठी काय आहे हे काहीच मला माहीत नव्हतं. फिरायला आवडत असलं तरी अमुक ठिकाणी मला जायचं आहे, विश लिस्ट आहे असं काही माझं नाही, किंवा नव्हतं म्हणूयात. त्यातून माझा फिरण्याचा प्रांत मुळात जरा सावध असा, खूप साहस, धाडस जमत नाही. पण तरीही पर्यटकांची कमी गर्दी असलेली थोडी वेगळी अशी ठिकाणं शोधून तिथे जायचं हे मात्र मला आवडतं. तर या जुन्या नोंदी आणि अगदीच जुजबी माहितीवरून मला आईसलँड तेवढं सहज आवाक्यातलं नाही असं (उगाच) वाटत होतं.अजूनही तिथे जायचं, जाऊयात, जायलाच हवं असं का ही ही झालं नव्हतं.

पण यावर्षी आमचे आणि आईसलँडचे योग ठरलेले असावेत.

Keywords: 

आईसलँड - भाग १ - पूर्वतयारी

आईसलँड हे नाव मी सुमेधकडून ऐकल्याचं मला आठवतंय ते साधारण ३-४ वर्षांपूर्वी. तो म्हणाला होता की मला आईसलँडला जायचं आहे. त्याला इज्राईलपासून तर केनिया, अफगाणिस्तान किंवा अजून कुठे कुठे जायचं असं तो एरवीही म्हणतो, त्यामुळे या आईसलँडकडे मी त्यावेळी नुसतंच एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडुनही दिलं. मग कधीतरी फेसबुक वर फोटो पाहिले, तेव्हा अजून थोडी माहिती शोधली, छान दिसतंय सगळं, शेंगेन देशांमध्ये असाल तर वेगळा व्हिसा लागत नाही या नोंदी मात्र नकळतपणे घेतल्या गेल्या, पण विषय तिथेच संपला. एक तर माझा भूगोल कच्चा, त्यामुळे हे आईसलँड नेमकं कुठे, तिथे पर्यटनासाठी काय आहे हे काहीच मला माहीत नव्हतं. फिरायला आवडत असलं तरी अमुक ठिकाणी मला जायचं आहे, विश लिस्ट आहे असं काही माझं नाही, किंवा नव्हतं म्हणूयात. त्यातून माझा फिरण्याचा प्रांत मुळात जरा सावध असा, खूप साहस, धाडस जमत नाही. पण तरीही पर्यटकांची कमी गर्दी असलेली थोडी वेगळी अशी ठिकाणं शोधून तिथे जायचं हे मात्र मला आवडतं. तर या जुन्या नोंदी आणि अगदीच जुजबी माहितीवरून मला आईसलँड तेवढं सहज आवाक्यातलं नाही असं (उगाच) वाटत होतं.अजूनही तिथे जायचं, जाऊयात, जायलाच हवं असं का ही ही झालं नव्हतं.

पण यावर्षी आमचे आणि आईसलँडचे योग ठरलेले असावेत. दरवर्षी होतं तसं सुट्ट्यांचं प्लॅनिंग, भारतवारी कधी यावर विचार, त्यात आता सृजनच्या डेकेअरच्या सुट्ट्यांचा विचार हे सगळं बघून सहलीचे काही बेतही डोक्यात होते, त्यात आईसलँड नव्हतंच. पण बेत ठरवू ठरवू म्हणत ते रहित होत जाणे हेही झालंच. आणि ते बरंच झालं इतकी माझी आणि सृजनची आजारपणं निघाली. मग त्यामुळे पुन्हा सुट्ट्या बदलल्या आणि कुठे जायचं पुढच्या सुट्टीत हे प्रश्नचिन्ह परत डोक्यात फिरायला लागलं. आणि अगदी अचानक मला आठवलं, आईसलँड. मग माहिती शोधायला सुरूवात केली. आईसलँडबद्दल माहिती शोधताना गुगल किंवा इंटरनेट कृपेने सुमेधची स्वप्नं माझी होत गेली आणि चर्चा चालू झाल्या. आइसलँड विथ टॉडलर, विथ किड्स, आईसलँड इन जून असे सर्च चालू झाले. काही व्हिडीओ बघितले, मग "तुम एक व्हिडीओ देखो हम दस व्हिडीओ दिखाएंगे" म्हणत अनेक रिलेटेड व्हिडीओ आपोआप दिसायला लागले. मग गेम ऑफ थ्रोन्सचं थोडं शूटिंग झालंय, दिलवाले मधल्या गेरुआ गाण्याचं पण शूट झालंय, २०१० मधला ज्वालामुखी आणी त्याबद्दल वाचलेल्या बातम्या, टुंड्रा प्रदेश, मध्यरात्रीचा सूर्य असे बरेच संदर्भही लक्षात आले. इथली सगळी प्रमुख स्थळांची नावं आपल्या अजिबात सवयीची नसल्याने की काय, फार वेगळी वाटत होती. शेवटी काही लोकांचे ब्लॉगवरील अनुभव, फोटो आणि तिकीटांचा अंदाज एवढ्या बाबींवर Iceland it is!! यावर शिक्कामोर्तब झालं. एकदाची विमानाची तिकीटं बुक झाली. हुश्श्य!!

आमच्याकडे प्रवासाचे वगळता ११ दिवस होते. सर्वसाधारणपणे इथल्या प्रमुख जागा बघायला हे अगदी पुरेसे आहेत. पण त्यात बरीच धावपळ होते. शिवाय मधला काही भाग हा बराच विराण आणि लांब प्रवासाचा आहे. आम्हाला नुसतं भोज्याला हात लावून पळायचं नव्हतं. शिवाय सृजनच्या दृष्टीने विचार करताना फार हेक्टिक नको असं वाटत होतं. शेवटी आम्ही एक रिजन ठरवला आणि संपुर्ण देश होणार नाही हे पक्कं केलं. त्याप्रमाणे मग काही स्थळं शॉर्ट्लिस्ट झाली, कुठून कुठे कसं जाता येईल, हॉटेल्स शोधणे असं चालू झालं. या सविस्तर शोधाशोधीत गंमत अशी असते की अति जास्त बघायला नको, नाहीतर प्रत्यक्ष फिरण्यातली मजा कमी होईल. पण अशा जरा वेगळ्या जागा, तेही सृजन सोबत असताना सगळी माहितीही हाताशी हवी. आमच्या मागच्याच ट्रिप मध्ये रात्री नाक बंद होऊन त्याला धाप लागून मध्यरात्री अर्धा तास आम्ही जे काही घाबरलो होतो, ते अजून डोळ्यासमोर होतं. जे काही वाचत होतो त्यात इथे मैलोनमैल एक गाव लागत नाही, गाव म्हणजे अगदी १० घरांचा पाडा असंही असू शकतं, पेट्रोल वेळेत भरा नाहीतर अडचण येऊ शकते, दुकानं लवकर बंद होतात हे सगळं बघता ही माहिती काढणं अजूनच गरजेचं वाटत होतं. पण कशाचाच अतिरेक नको. हा विचार करताना अजून दहा वर्षानंतरचा टुरिझम ही कन्सेप्ट कशी असेल सारखे काहीच्या काही प्रश्न ते किती वेळ आपण या शोधाशोधीत घालवणार याचा थोडा वैताग असे अनेक मनाचे खेळ चालू होते. पण मग ही आधीची सगळी पूर्वतयारी करण्यात फार मजा येते हे नेहमीच अनुभवलं होतं.

या सगळ्या शोधप्रक्रियेत फार कमी वेळा आम्ही बाकी किमती पाहिल्या किंवा सुरूवातीला महाग हॉटेल्सच दाखवतात म्हणत नजरेआड केल्या. स्विसमधली महागाई अनुभवली होती, नॉर्वे पण महाग हे ऐकून माहीत होतं, पण आईसलँड हा या सगळ्यांच्या वरताण आहे याची इतकी कल्पना आमच्या डोक्यात नव्हती. अर्थात ते बरंच झालं कारण मग कदाचित हा बेत पुढे गेलाही नसता. आता राहण्यासाठी जागा शोधताना खिसे इतके जास्त कापली जाणार याची जाणीव होऊन पोटात खड्डे पडायला सुरूवात झाली. सगळी मजा विसरायला लावणार्‍या या किमती होत्या, अखेर त्यातल्या त्यात आवाक्यातले म्हणावे असे काही शॉर्ट्लिस्ट करत ते बुक झाले. तरीही हे एवढं वर्थ असेल ना अशी शंका मधूनच येत होती.

इथल्या उन्हाळ्यातून तिथला उन्हाळ्यात, पण ऊन म्हणजे किती, तर जास्तीत जास्त तापमान १५ डिग्रीज. मग थंडीचे कपडे, तिथल्या अतिप्रचंड लहरी हवामानामुळे पावसाचे कपडे, एक सेल्फी स्टिक, सृजन हात सोडून कुठेही पळू शकतो म्हणून एक सेफटी लीश, त्याच्यासाठी एक बॅग अशी किरकोळ खरेदी चालू झाली. खाण्याचे काही ऑप्शन्स मिळणार नाहीत हे दिसत होतंच. पुढची ट्रिप भारतात करायची आणि आयतं खायचं फक्त तिथे जाऊन असं पुन्हा एकदा ठरलं. पण या ट्रिप साठी ही एक मोठी तयारी होती. एरवीही आम्ही शक्यतोवर बरंच सामान घेऊन जातो. सृजनसाठी लागतंच, पण रोज ब्रेड आणि सलाड हे काही दिवसांनंतर त्रासदायक होतं. त्यात आईसलँड मधल्या किमती आणि अनेकांचे अनुभव वाचून इथे आपली पोटोबाची सोय बघावीच लागणर होती. मग थोडं रेडी टू इट, थोडं आपलं मसालेदार असावं म्हणून कोरडा खाऊ भेळ आणि बाकरवड्या, मॅगी, महत्वाची औषधं, कपडे असं एकेक बॅगमध्ये जागा मिळवायला लागलं. हे सामान तिथे चार जागांवर हलवायचं आणि तिथे रेंट केलेल्या गाडीत हे बसायला हवं ही मुख्य कंडिशन होती. मग काही गोष्टी कमी जास्त करत शेवटी सगळं भरलं आणि त्या बॅग्ज विमानतळाकडे जाण्यासाठी गाडीत जाऊन बसल्या.

आपण जून मध्ये विमानानी जाणार आहे असं आम्ही सतत सृजनला सांगितलं होतं. मागचे विमान प्रवास त्याच्या लक्षात नव्हते. यावेळी गाडी फारच खुशीत होती. मग विमान कसं उडतं याची अ‍ॅक्शन तो सतत करून दाखवत होता. तिकडे जाऊन आपण घोडे बघणार, बा बा ब्लॅक शीप बघणार, बर्फ आणि धबधबे बघणार असं बरंच काय काय आम्ही त्याला सांगत होतो ते तो रिपीट करत होता. म्हणता म्हणता तो दिवस उजाडला आणि संध्याकाळी ठरल्या वेळी आम्ही विमानतळाकडे निघालो. तिथे गाडी पार्क केली, सगळं सामान, सृजनचचं कार सीट असा लवाजमा घेऊन निघालो आणि सृजनला एक विमान दिसलं. हेच आपलं विमान हे त्या बालमनाने पक्कं केलं आणि तिकडेच चला म्हणून हट्ट धरला. मग आधी थोडं सामान द्यायचं, कार सीट द्यायचं, अजून पुढे जायचं, तिकीट चेक करायचं असं काय काय त्याला सांगत आम्ही एक एक स्टेप पुढे जात होतो. त्याच्या बिचार्‍याच्या चेहर्‍यावर हे नेमकं किती वेळ चालणार असं प्रश्नचिन्ह होतं. इतक्या दिवसांपासून विमानात जायचं, मग परवा, मग उद्या, मग आज आणि आता इथे आलो तरी अजून वेळ आहेच याचा वैतागही होता. सामान चेक ईन झालं, त्याची नवीन बॅग त्याला मिळाली आणि मग तो जरा शांत झाला. मग आपण केक खाऊ असं आश्वासन मिळालं. केक घ्यायला गेलो तर तिथल्या बाईने ९ वाजता आमचं दुकान बंद होतंय, सोबत घेऊन जा असं सांगितलं. अजून विमानाला ३ तास होते, पण सगळीच बाहेरची दुकानं बंद होण्यात होती. तसं हे जर्मनीत राहून सवयीचं आहे, पण तरी चिडचिड झालीच. मग तिथेच बाहेर सृजनने मस्त फतकल मांडली आणि चीज केक वर ताव मारला. आता पुन्हा विमानात कधी जायचं चालू झालं. मग ड्युटी फ्री दुकानांमधल्या खेळण्यांनी लक्ष वेधलं, ते आम्ही पुन्हा प्रयत्नपूर्वक वळवलं. मग इकडेतिकडे भरपूर पळून त्याने नेहमीप्रमाणे लोकांचं लक्ष वेधून घेतलं, त्याच्यामागे आम्ही पण केकच्या कॅलरीज जिरवत होतो.

रात्री साडे-अकराचं विमान. धावपट्टीवर अनेक विमानं दिसत होती. अंधार झाला होता. आम्ही पण आता थकून घ्या आम्हाला आत म्हणत वाट बघत होतो. थोडी काळजी होती, कदाचित nervousness. उद्यापासून हा असा अंधार आपल्याला दिसणार नाही, मध्यरात्रीपण उजेडच असेल हे माहीत असलं तरी नेमकं कसं असेल, ज्या फोटोंनी आपल्याला भुरळ घातली ते सगळं प्रत्यक्षात कसं असेल, काय काय नवीन बघायला मिळेल अशी अनेक स्वप्नं बघतच आम्ही शेवटी विमानात बसलो आणि The land of fire and ice कडे जायला विमान हवेत झेपावलं...

क्रमशः

भाग २

आईसलँड - भाग २ - Reykjavik

भाग १

विमान आकाशात झेपावलं आणि मग आईसलँड कसं असेल यापेक्षा सृजन कधी झोपतो आणि पर्यायाने आम्ही कधी झोपू शकू यावर आमचं लक्ष केंद्रित झालं. मोजून ३ तासांचा प्रवास होता. तिथे उतरल्यावर परत सगळं सामान घेणे, गाडी घेणे, सिम कार्ड घेणे आणि हॉटेलवर पोहोचणे हे सगळे टास्क रांगेत उभे होते. आमच्या रात्री उशीरा निघून तिथल्या मध्यरात्री आम्ही पोचणार होतो. झोपेचं खोबरं होणार हे गृहित धरलेलं होतंच, पण त्यापूर्वी किमान तासभर डोळा लागला तर बरं असं वाटत होतं. पण सृजन अतीव चेकाळला होता आणि झोपायला तयारच नव्हता. तेवढ्यात हवाईसुंदर्‍या आल्या केक आणि सँडविच घेऊन. मग तो केक खाऊन आता झोपेल, मग झोपेल हे सगळं स्वप्नच राहिलं. अर्धा प्रवास होत नाही तोवर बाहेरचा उजेड दिसायला लागला. थोड्या वेळाने समुद्र दिसायला लागला आणि आम्ही उतरलो सुद्धा. उतरतानाच एका जागी जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर मी हेच ते प्रसिद्ध गीझर असं ठरवून टाकलं. प्रत्यक्षात ते वेगळंच होतं, त्याबद्दल नंतर. तर उतरून सामान घेऊन आता गाडी मिळायला बराच वेळ लागेल अशा मानसिक तयारीत आम्ही बाहेर आलो आणि समोरच आमच्या रेंटल कंपनीचं ऑफिस दिसलं. गर्दी पण नव्हती. सहसा बरंच चालून मग कुठेतरी या रेंटल गाड्यांचं ऑफिस शोधा, मग तिथून पुन्हा पायपीट करून गाडी शोधा हे सवयीचं. पण लगेच गाडी मिळाली आणि शिवाय ती आपण घरासमोर पार्क करू, तशी ज्या जागेवर आम्ही बसलो होतो, तिथून अवघ्या काही फुटांवर पार्क केली होती.

युरोपातली सिम कार्ड इथे चालायला हवीत पण आमचं काही चालत नव्हतं. याचा अंदाज होता आणि नेव्हिगेशन साठी नेट आवश्यक होतं त्यामुळे सिम कार्ड बद्दल माहिती काढून ठेवली होती. सृजनसोबत तिथेच तळ्यात-मळ्यात खेळून मी त्याला रमवलं, तोवर सुमेध सिम कार्ड घेऊन आला. गाडी कुठली बुक करायची यावर आमच्या बर्‍याच चर्चा झाल्या होत्या. या लहान गाडीत सामान बसलं नाही तर अशी मला शंका होती आणि सामान बसेल नक्की अशी सुमेधला खात्री होती. त्याचं म्हणणं खरं ठरलं आणि मीच सुटकेचा निश्वास टाकला.

हा होता Keflavik airport. Reykjavik ही आईसलँडची राजधानी. मुख्य शहरापासून अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर airport आहे. अवघे साडे-तीन लाख लोक अशी या देशाची लोकसंख्या. त्यातलेही बहुतांशी लोक हे Reykjavik आणि दक्षिण दिशेचा काही भाग यातच राहणारी. उत्तरेकडे अगदीच विरळ लोकवस्ती. युरोप आणि अमेरिका खंडाच्या मध्ये असलेला हा देश, तसाच आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरांनी वेढलेला. भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय दृष्टीने हा देश युरोपात गणला जातो आणि शेंगेन करारांतर्गत येतो. पण जिऑलॉजि च्या दृष्टीने या देशाचं वेगळं महत्व आहे. युरोप आणि अमेरिका यांच्या Tectonic plates इथे विभागल्या जातात. अनेक हिमनद्या आणि तिथेच जमिनीच्या आत दडलेले अनेक ज्वालामुखी अशा दोन अगदी विरुद्ध भौगोलिक परिस्थितीत इथले लोक राहतात. यासोबतच मिळालेलं Geothermal Energy चं वरदान. उत्तरेकडे असल्यामुळे इथल्या उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही आणि इथल्या हिवाळ्यात नावाला काही तास उजेड दिसतो. याबद्दल वेगवेगळ्या स्थळांच्या अनुषंगाने पुढच्या पोस्ट्स मध्ये अधिक माहिती येईलच.

गाडी मुख्य रस्त्याला लागली. अजिबातच गर्दी नव्हती, क्वचित एखादी गाडी आजूबाजूने दिसली. एका बाजूने समुद्र होता. त्याच्या पलीकडे सूर्य मावळल्याचं नाटक करायला चालला होता, तो लगेच परत उगवणार होता. एका बाजूला चंद्रकोरही अगदी स्पष्ट दिसत होती. समुद्राच्या बाजूने मोठाले डोंगर आणि त्यावर आदळणार्‍या लाटा किंवा वाळूचे किनारे या पेक्षा अतिशय वेगळे असे इथले किनारे दिसत होते. मातीची ढेकळं असावीत तसे दिसणारे. ओबडधोबड, रखरखीत. ईथल्या ज्वालामुखींची साक्ष देणारे. Lupin ही जांभळी फुलं ठिकठिकाणी वार्‍यावर डोलत होती. हवा फ्रेश होती. उंच गर्द झाडी कुठेच दिसत नव्हती. थोडीशी झुडपं फक्त. हा एक उगाच गाडीतून काढलेला फोटो.

.

अर्ध्या तासात Reykjavik मधल्या आमच्या हॉटेलवर पोचलो. ब्रेकफास्ट हॉटेल मध्येच होता आणि त्यासाठी ठराविक वेळेत उठणं होतंच, सृजनने ते काम चोख बजावलं. हवामानाचा अंदाज बघता अगदीच छान वाटत होतं. ब्रेकफास्ट केला आणि मग आवरून निघालो पहिल्या ठिकाणी - Hallgrimskirkja या Church कडे. भव्य आणि आधुनिक आणि इतरत्र कुठेही चर्चसाठी न पाहिलेलं स्थापत्य. हे चर्च उंचावर बांधलं आहे. या भागातून फिरताना सहज कुठूनही दिसू शकेल असं. लाव्हा थंड होऊन षटकोनी असे basalt rock तयार होतात, त्याच्याशी साधर्म्य दाखवणारी या चर्चची रचना आहे.

.

.

बाहेरच्या जागेत सृजनला पळायला मोकळं रान मिळालं आणि तो मनसोक्त इकडून तिकडे करत पळत होता. मध्येच एक मराठी लोकांचा घोळका उभा होता, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. चार पाच कुटुंबं आणि त्यांची मुलं. "अरे गाढवा, इकडे बघ ना" असं एक जण मुलांना म्हणत होती, काहींच्या क्रिकेट, कोहली अशा गप्पा रंगात आल्या होत्या. अमेरिका आणि युरोपातल्या भारतीय लोकांमध्ये सध्या आईसलॅंड पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे हे पुढेही अनेक वेळा दिसलं. थोडा वेळ खेळून आम्ही त्या चर्च मध्ये आत जाऊयात म्हणून गेलो तर ते प्रार्थनेची वेळ झाली म्हणून बंद केलं होतं. (ईथे नंतर येऊ म्हणत हे राहिलंच नंतर. पण आतली रचना ही फार सुंदर आहे असं वाचलं होतं.) मग तिथूनच डाऊनटाऊन मध्ये चक्कर टाकू म्हणून निघालो. आधी एक सुपरमार्केट दिसलं म्हणून तिथे गेलो, अंदाज घ्यायचा होता की काय मिळेल. तिथे उगाच पेकन पाय वालं एक चॉकलेट घेतलं, हा प्रकार तसा जर्मनीत दिसत नाही, म्हणून आम्हाला अप्रूप.

इथून दोन-तीन गल्ल्या जातात ज्या आपल्याला थेट समुद्रापाशी घेऊन जातात. या गल्ल्यांमध्ये बरीच दुकानं, रेस्टॉरंट्स आहेत. आता फोटो बघताना मला लक्षात येतंय की इथले फार कमी फोटो काढले पण हा फेरफटका फार आवडला. पर्यटकांची गर्दी अगदीच कमी होती. मधूनच एक साडीतली बाई पण दिसली, घाईत कुठेतरी चालली होती, अजूनही काही भारतीय चेहरे दिसले जे तिथेच राहणारे लोक असावेत असं वाटलं.

.

.

.

इथल्या दुकानांच्या गल्लीत फिरत पुढे समुद्रापाशी आलो. आणि विशेष लक्ष गेलं या उंच इमारतींकडे. युरोपातल्या जुन्या स्थापत्याला डोळे तसे सरावले आहेत, या आधुनिक इमारती कदाचित त्यामुळेच आमच्या अगदी मनात भरल्या.

.

.

.

.

इथे सृजनला दगड घ्यायचे आणि समुद्रात फेकायचे एवढंच करायचं होतं (हे पुढे माझ्या प्रत्येक पोस्ट मध्ये येईल.) किंवा मग या उंच दगडांवरून चालायचं होतं. चालत चालत मग पुढे या कलाकृतीपाशी आलो. Solfar Sun Voyager - a dreamboat, or an ode to the Sun.

.

थोडा वेळ थांबून भूक लागली आणि चर्च आता पुन्हा उघडलं असेल तर तिथे पण जाऊ म्हणून निघालो. काहीतरी खायला घेऊ म्हणून बघत होतो पण सृजन आता अर्धवट झोपेमुळे चिडचिडा झाला होता. एका ठिकाणी सहज मेन्यू पाहिला तर ईंडियन व्हेजीटेबल्स सूप दिसलं. नंतरही भारतीय पदार्थांची नावं सतत दिसली, कदाचित ब्रिटन आणि कॅनडा दोन्ही तसं जवळ असल्यामुळे की काय असं वाटलं. व्हेज पिझ्झा पण होता. इथे थांबून खाऊ असा विचार केला. पण तेवढ्यात सृजनची अवस्था बघून आम्ही फक्त ज्यूस पिऊन सरळ हॉटेलकडे मोर्चा वळवून आराम केला. उठून मग निघालो या Perlan Museum कडे.

.

एका टेकडीवर उभं असलेलं हे संग्रहालय. ईथून संपूर्ण Reykjavik शहराचा देखावा बघता येतो. शिवाय तुमच्या हातात असणार वेळ आणि आवडीप्रमाणे आतलं Planetarium, आईस केव्ह्ज, आईसलँडच्या निसर्गाबद्दल रोचक माहिती देणारी काही प्रदर्शनं यातून काही ठराविक कॉम्बिनेशन निवडता येतात. आम्ही Planetarium चं तिकीट काढून ठेवलं होतं. ईथे २० मिनीटांची एक फिल्म दाखवली जाते. सृजनसोबत मोठ्या स्क्रीनवर काही बघण्याचा हा पहिलाच अनुभव, त्यातही ती अर्धगोलाकार स्क्रीन. ऑरोरा लाईट्स, ज्वालामुखी, बर्फ या सगळ्याबद्दल मनुष्याला आकर्षण आहे, आईसलँडचा निसर्ग, त्यातलं टोकाचं वैविध्य याबाबत यात माहिती दिली जाते. मोजून दहा बारा लोक होते. एका जागी सृजन बसेल का असा प्रश्न होता, पण फिल्म गुंतवून ठेवणारी होती, चांदण्या, चंद्र, आकाश, बर्फ हे त्याच्या ओळखीचं जग अशा स्क्रीन वर बघायला त्यालाही आवडलं. सगळ्यात शेवटी क्रेडिट्स मध्ये Lead Actor म्हणून The mother nature असं दिसलं ते तर फारच आवडलं. त्यानंतर इथल्या टेरेस वर गेलो, तिथून दिसणारा शहराचा देखावा पण छान होता. पण भयंकर वार्‍यामुळे फार वेळ थांबलो नाही. घरी येऊन सोबत आणलेल्या खाऊवर पोटोबा भरले. इथूनही डावीकडे दूरवर Hallgrimskirkja Church दिसत होतं.

.

.

.

मग वेळ होता म्हणून पाट थोडा वेळ या समुद्रापाशी टाईमपास केला. एका बाजूला Harpa सेन्टर आहे. तिथे सहज एक चक्कर मारून आलो. इथे काही Guided Tour असतात पण आम्हाला त्यात फार रस नव्हता. याच्याही स्थापत्यात basalt column ची प्रेरणा आहे.

.

.

हे सगळं म्हणजे आइसलँडची तोंड ओळखही नव्हती. प्रवासातला थकवा असल्याने रात्रभर दिसणाऱ्या सूर्याने आमच्या झोपेवर अजून फार परिणाम झाला नव्हता. वेळेचा बदल आता जरा सवयीचा झाला होता. थंडी पण फार वाटत नव्हती. उद्यापासून आता खरी रोड ट्रीप चालू होणार होती. Icelandic Magic म्हणजे काय याचा प्रत्यय आता पुढे येणार होता.

क्रमशः

भाग ३

आईसलँड - भाग ३ - गोल्डन सर्कल

भाग २

आजपासून प्रवासाचा मोठा टप्पा चालू होणार होता. हॉटेलमध्ये नाश्ता करून निघालो. सगळं सामान परत गाडीत भरून जायचं होतं पण आता गाडी आपल्याच हातात आहेत म्हटल्यावर सामान कसं ही त्यात भरून निघायचं असं सोपं काम झालं होतं. पहिलं ठिकाण होतं - Þingvellir National Park.

Reykjavik च्या जवळची तीन प्रमुख आकर्षणं म्हणजे - Þingvellir National Park, the Geysir Geothermal Area, and Gullfoss waterfall. Reykjavik हून ही तिनही ठिकाणं बघून परत Reykjavik ला यायचं, अशी टूर होऊ शकते ज्याला मिळून गोल्डन सर्कल असं नाव आहे. अगदी दोन दिवसांची धावती भेट असेल तरी हे गोल्डन सर्कल सगळ्यांच्या लिस्ट मध्ये असतंच. आईसलँड मध्ये सार्वजनिक वाहतूकीची वेगळी काही सोय नाही. बर्‍याच टूर कंपनीच्या बसेस आहेत, त्यांच्या सोबत फिरू शकता किंवा मग आपली गाडी रेंट करणे हा पर्याय. आम्ही Reykjavik हून निघून मुक्काम वेगळ्या ठिकाणी करणार होतो. ही तीन ठिकाणं दोन दिवसात करायची असा बेत होता.

रस्त्याला लागलो आणि आईसलँडची वैशिष्ट्ये जाणवायला लागली. आजवर कधीही न पाहिलेल्या Landscapes दिसत होत्या. इथल्या प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असूनही रस्त्यावर अगदीच कमी गाड्या होत्या. थोड्या वेळाने एका बाजूला Þingvallavatn हा लेक दिसायला लागला. नितळ स्वच्छ पाणी आणि त्यातलं डोंगरांचं प्रतिबिंब, शांतता, पक्षांचे आवाज हे सगळं बघून ट्रिप सार्थकी लागणार याची हळूहळू खात्री पटायला लागली.

.

.

3

गाडी पार्क करून पुढे निघालो. इथल्या पार्किंगची सिस्टीम वेगळी होती, गाडीच्या नंबर प्लेट्स कॅमेर्‍याने ऑटोमॅटीक स्कॅन केल्या गेल्या आणि मग तो नंबर तिथल्या मशीन वर टाकून तिकीट काढायचं होतं. पण आत येताना कुठेच गेट नव्हतं त्यामुळे हे नक्की करायचं कसं हे समजायला जरा वेळ गेला. तिकीट काढलं आणि थोडं खाऊन निघालो. ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. इथेच युरोशियन आणि नॉर्थ अमेरिकन या दोन टेक्टॉनिक प्लेट्स विभागल्या जातात. आतला पूर्ण भाग फिरायला साधारण २-४ तास लागतात. याचाच उच्चार Thingvellir असाही होतो त्यामुळे नेटवर माहिती शोधताना पण दोन्ही संदर्भ दिसतात.
इथे फार पूर्वीची आईसलँडची पार्लमेंट होती, ते ruins जतन केले जावेत म्हणून हा आईसलँडचा पहिला नॅशनल पार्क अस्तित्वात आला.

4

5

.

.

.

आईसलँडला अनेक लोक कॅम्पिंग करतात. या पार्क जवळच बर्‍याच कॅम्पिंग्च्या जागा आहेत. पुढे चालताना ठिकठिकाणी झरे दिसत होते. काही लहान मोठे धबधबे पण दिसत होते. सगळीकडे अगदी शुभ्र पाणी दिसत होतं. पण मुलांना घेऊन जाताना बरीच काळजी घ्यावी लागते कारण नीट फेन्सिंग केलेलं असेलच असं नाही, आणि काही जागा धोकादायक आहेत. हे सगळं बघत रमत गमत, सृजनच्या गतीने आम्ही चालत होतो. तो मधूनच इतका जोरात पळायचा की आम्हाला त्याच्या मागे पळून धाप लागायची आणि मधूनच मग एखादं फुल, धबधबा, पाणी, पक्षी हे बघण्यात इतका रमायचा, मग त्याचे त्यावरचे प्रश्न, बडबड यातच आम्ही पण रमायचो. असंच चालताना अचानक मला डोळ्यात कचरा गेला असं वाटलं, तेवढ्यात लक्षात आलं की माझी डोळ्यातली लेन्स हलली असावी. मी चेक करेपर्यंत तर ती वार्‍याने उडून खाली पडली आणि मातीमोल झाली. हे सगळं व्हायला फारतर एखादा मिनीट लागला. माझी प्रचंड चिडचिड व्हायला लागली. इतक्या वर्षात कधीही असं झालेलं नाही, शिवाय मी जास्तीच्या लेन्सेस सोबत घेतल्या नव्हत्या. चश्मा होताच सोबत पण हा ट्रिपचा तिसराच दिवस आणि पुढचे सगळे फोटो चश्म्यावर येतील हा विचारही मला तेव्हा त्रासदायक होता. आत्ता ईथेच का? याला काही उत्तर नव्हतं. मग ट्रिप संपल्यानंतर 'मी माझ्या हृदयाचा एक तुकडा ईथे ठेवला आहे' ऐवजी 'मी माझी एक काँटेक्ट लेन्स आईसलँडमध्ये सोडून आले आहे' असं मला म्हणता येईल असं म्हणून मी तात्पुरतं समाधान करून घेतलं. या गडबडीत इथल्या काही जागांचे फोटो काढायचे राहून गेले. Sad

आधल्या दिवशी थंडी वाटत होती, निघताना सगळे जॅकेट्स घेऊन निघालो, थोड्याच वेळात ऊन वाढलं आणि ते ओझं उगाच बाळगायचा कंटाळा आला. पण मुळात इथे इतकं गरम होऊ होईल अशी अजिबातच कल्पना नव्हती. आता ऊन्हाचे चांगलेच चटके बसत होते. मग आलो या Oxifoss जागी. आईसलँड मध्ये ठिकठिकाणी धबधबे आहेत. त्यातला हा आमच्या ट्रिपमधला पहिला मोठा असा धबधबा.
इथल्या जवळच्या परिसरात गेम ऑफ थ्रोन्स चं बरंच शुटिंग झालं आहे.

.

इथे बराच वेळ निवांत बसलो. पांढरं शुभ्र पाणी आणि ते दगडांवर आदळतानाचा आवाज अनुभवत असताना माझी लेन्स पडली याबद्दलचा सगळंच दु:ख विसरायला या निसर्गाने भाग पाडलं. आता सृजनला इथे स्विमिंगच करायचं होतं. या पाण्यात स्विमिंग करायला जागा नाही, किती दगड आहेत, शिवाय इथे कुणीच स्विमिंग करत नाही, चालत नाही अशी अनेक खरी कारणं होती, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अजून त्याला स्विमिंग येतही नाही, पण त्याला पटवून घ्यायचं नव्हतं. मग एका दगडावरून पाण्यात पाय सोडून बसल्यावर त्याचं त्यातल्या त्यात समाधान झालं. तसंही त्या तळपत्या उन्हात ते गारेगार पाणी फार छान वाटत होतं. गर्दी कमी असल्यामुळे इथेही आम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ बसून मग परत निघालो. आता तर ऊन असह्य व्हायला लागलं होतं. आम्ही पुढच्या दहा दिवसांसाठी घेतलेले थंडीचे सगळे कपडे उगाच आणलेत की काय असं वाटायला लागलं. सृजनही भरपूर चालून दमला होता. परत गाडीपाशी येऊन तिथल्या दुकानातून थोडंफार खायला घेतलं. खाण्याचे मर्यादित पर्याय होते, शाकाहारी लोकांसाठीच असं नाही, एकूणच कमी उपलब्धता असते हे दिसत होतं. पण फळं, सँडविचेस, आईसक्रीम हे अगदीच पुरेसं होतं. मग निघालो आमच्या मुक्कामाच्या जागी - laugarvatn च्या जवळच असलेलं एक होस्टेल. प्रचंड थकलेलो असल्यामुळे थोडा आराम केला. दुकानं लवकर बंद होतात म्हणून एका ग्रोसरी शॉप मधून थोडंफार सामान घेऊन आलो. इथे कॉमन किचन होतं, त्यामुळे तूप मेतकूट भात खाऊन सृजनचे आणि सोबत आणलेली भेळेची पाकिटं फोडून मस्त कांदा, टोमॅटो घालून आमचेही पोटोबा शांत झाले. मग निघालो Geysir Geothermal Area बघायला.

या ठिकाणी गरम पाण्याचे अनेक झरे इथे आहेत. त्यापैकी काही अगदी लहान तर काही अतिप्रचंड मोठे आहेत. मुख्य नाव असलेला Geysir हा आता शांत झाला आहे, पण Strokkur नावाचा एक झरा किंवा उद्रेक खरंतर, जिथून दर काही मिनीटांनी उकळतं पाणी वर हवेत उसळतं तो बघता येतो. मुख्य ठिकाणाच्या आधीपासूनच रस्त्यावर लाल-पांढर्‍या रंगाची वेगळी माती, वाहणारं पाणी आणि काही ठिकाणी जमिनीतून येणार्‍या वाफा दिसायला लागतात. सल्फर चा रंग सगळीकडे पसरलेला दिसतो. आम्ही रात्री गेल्यामुळे सगळी दुकानं बंद झाली होती, ढळढळीत उजेड होताच पण रात्री गेल्यामुळे एरवीची गर्दी अजूनच कमी होती. ईथल्या प्रवेशासाठी पैसे लागत नाही ही आईसलॅंडच्या महागाईत दिलासा देणारी बाब होती. आत जाताक्षणी एक पाटी दिसली त्यावर धोक्याच्या सूचना दिल्या होत्या, सगळ्यात महत्वाचं होतं की या पाण्याचं तापमान जवळपास १०० डीग्रीच्या आसपास आहे, आणि सगळ्यात जवळची वैद्यकीय सुविधा ही ६२ किलोमीटरवर आहे. बाजूलाच लहान सहान जागेतून वाफा बाहेर पडताना दिसत होत्या, वाहणारं पाणी पण गरम असेल याचा अंदाज येत होता.

.

.

.

.

काही ठिकाणी अशा सतत उकळ्या फुटताना दिसत होत्या.

इथले व्हिडीओ अपलोड करायला मला जमले नाही. तात्पुरती ही माझ्या ब्लॉगची लिंक - इथे बघता येतील. जर नंतर अपलोड करता आले तर मग ही लिंक उडवेन.

पुढे आलो, एका ठिकाणी गर्दी दिसली त्यामुळे हाच तो Strokkur असा अंदाज आला. आणि पाचच मिनीटात त्या दुरून वरवर शांत वाटणार्‍या पाण्यातून अतिप्रचंड प्रमाणात उकळत्या पाण्याचा उद्रेक झाला आणि २ मिनीटात परत शांतही झालं. याबद्दल जे काही वाचलं होतं, ते वाचून नेमकी कल्पना आली नव्हती. आता याची देही याची डोळा ते बघणे हा वेगळा अनुभव होता. मग त्यातल्या त्यात जवळून जिथून हा बघता येईल अशा ठिकाणी गेलो. आता त्या पाण्याच्या हालचाली, आधी शांत, मग हळूहळू थोड्या उकळ्या फुटून अचानक ते पाणी वर फेकलं जातं ते बघत बसावंसं वाटत होतं. भूगर्भात काय आणि कशा घडामोडी चालू असतात असा प्रश्न पडला. ईथूनच दूरवर बर्फही दिसत होता, एका बाजूला इंद्रधनुष्यही दिसत होतं आणि इथे हे इतकं गरम उकळतं पाणीही होतं. निसर्गाचे अद्भुत चमत्कार असं लिहीताना ते अगदीच साधंसरळ, तेचतेच वाक्य वाटलं तरी अशा ठिकाणी त्याची जाणीव सतत होत राहते. दर ७-८ मिनीटांनी हा उद्रेक होत होता.

.

त्यांनी ती सूचना लिहिली नसती तरी समोर उकळतं पाणी बघून नॉर्मल कुणाचीही हिम्मत होणार नाहीच हात लावण्याची, पण इतकं स्पष्ट लिहिल्यामुळे अतिधाडसी लोक किंवा आगाऊपणा म्हणूनही कुणी हिम्मत करणार नाही.

इथली परिस्थिती बघता सृजनची सेफटी लीश बांधली होती, हातकडीच म्हणूयात ज्याचं एक टोक माझ्या हाताला आणि एक त्याच्या हाताला होतं. आम्हीही हे पहिल्यांदाच वापरत होतो, पण आजूबाजूच्या प्रत्येकाच्या नजरेत कुतूहल, प्रश्न, असं कसं मुलाला बांधून ठेवतात, बरं आहे बांधून ठेवता येतं, चांगला पर्याय आहे हा, काय काय नवीन गोष्टी येत राहतात बाजारात असे अनेक हावभाव आम्ही टिपू शकत होतो. काही जण बोलून दाखवत होते, काही जणांचा चेहराच सांगत होता. इतकं गरम पाणी आजूबाजूला असूनही ईथे फेन्सिंग लहान मुलांच्या दृष्टीने अगदीच नाममात्र आहे. हे खूप गरम पाणी आहे हे आम्ही सृजनला सांगत होतोच, तरी ते बांधून ठेवल्यामुळे आम्हाला सेफ वाटत होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं होतं. तरीही त्याला धबधब्यात दगड फेकले तसेच ईथे पण फेकायचे अशी इछा होतीच, पण ती थोपवण्यात आम्ही यशस्वी झालो.

बराच वेळ हे लहान.मोठे उकळत्या पाण्याचे झरे बघत बसलो. मग आधीचा उद्रेक मोठा की हा, आता होणार, मग होणार म्हणत त्या पाण्याच्या वेगवेगळ्या अवस्था बघून अंदाज बांधणे, कॅमेर्‍यात हे कैद करणे, नजरेच्या टप्प्यातले नवीन झरे शोधून बघणे या सगळ्यात बराच वेळ गेला. आता परत निघूयात म्हणून पार्किंग कडे निघालो तेव्हा ४-५ भारतीय लोकांचा एक ग्रुप दिसला. तेही निघतच होते. आम्ही सृजनला गाडीत बसवून निघालो तेव्हा पाहिलं तर या लोकांनी बीअरच्या बाटल्या तिथेच बाहेर टाकून दिल्या होत्या आणि ते गेले होते. Sad प्रत्येक ट्रिप मध्ये असा एखादा अनुभव येतोच याचं वाईट वाटलं.

Þingvellir National Park आवडलंच, पण Geysir Geothermal Area आणि Strokkur हा त्यापेक्षाही अतिशय विस्मयकारक आणि अफाट अनुभव होता. गोल्डन सर्कल मधली दोन ठिकाणं झाली होती. यातलं शेवटचं ठिकाण म्हणजे Gullfoss waterfall. तिथे जायचं आणि मग आईसलँडच्या रिंग रोडवर पुढे दौरा न्यायचा असा बेत होता.

क्रमशः

भाग ४

आईसलँड - भाग ४ - गोल्डन सर्कल (Gullfoss) आणि पुढे...

भाग ३

Laugarvatn लेक जवळचं म्हणून Laugarvatn नाव असलेलं एक लहानसं गाव जिथे आम्ही हा एक दिवस राहिलो. Laugarvatn Fontana हा इथला एक जिओथर्मल स्विमिंग पुल. आईसलँडच्या बर्‍याच भागात गरम पाण्याचे अनेक झरे असल्यामुळे इथले हे नैसर्गिक स्विमिंग पूल हे पण एक खास आईसलँड वैशिष्ट्य. शिवाय या पाण्यात आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असलेली अनेक मिनरल्स आहेत. या सगळ्याचा पर्यटकांना आस्वाद घेता यावा म्हणून याच्यासोबत आता आधुनिक स्पा ट्रीटमेंट्स, सोबतीला खाणे-पिणे, कुठे या जिओअथर्मल एनर्जीवर चालणारी बेकरी तर कुठे त्यांच्या अजून काही स्पेशल टूर्स अशी विविध आकर्षणं आहेत. त्यामुळे हे पूल्स्/लगून्स हे आईसलँड ट्रिपमध्ये बहुतेकांच्या लिस्ट वर असतात. Reykjavik मधला ब्लू लगून यासाठी प्रसिद्ध आहे, पण सध्या कमी गर्दी असलेला आणि Laugarvatn लेक जवळ असल्यामुळे त्यातही स्विमिंगची सोय असणारा Fontana हा पण बर्‍याच लोकांच्या यादीत असतो. आता पुढे Gulfoss ला जायचं होतं, मग त्यापूर्वी या Fontana ला जाऊन बघावं असा विचार चालू होता. पण शेवटी एवढ्या गरम हवामानात आत्ता नको असं वाटलं आणि सरळ Gullfoss कडे गाडी निघाली.

जाताना फोटो साठी थांबू असं वाटायला लावणारया अनेक जागा होत्या.

.

गाडी पार्क करून पुन्हा सृजनच्या हाताला लीश बांधली आणि त्यामुळे सगळ्या पर्यटकांचं लक्ष वेधत निघालो. दुरूनच सगळं दृष्य बघून आहाहा वाटलं. अगदी दुरून या पाण्याचा आवाज ऐकून पण दडपायला होत होतं. दोन टप्प्यांमध्ये कोसळणारा हा धबधबा. या ठिकाणी हायड्रॉलिक पॉवर प्लँट बांधायचा विचार चालू होता, तेव्हा या धबधब्याच्या तेव्हाच्या मालकांकडून तो पॉवर प्लँट साठी भाड्याने दिला जाणार होता. पण त्यांच्या मुलीने हे होऊ नये म्हणून धमकी दिली आणि त्यामुळेच ही जागा वाचली अशी कथा याबद्दल सांगण्यात येते. पुढे हा धबधबा आईसलँड सरकारच्या ताब्यात आला.

एक उंचावर, एक अगदी धबध्ब्याच्या जवळ असे पर्यटकांसाठी काही चौथरे बांधले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या बाजूने सगळं अनुभवता येतं. ईथेही लहान मुलांच्या दृष्टीने फेन्सिंग पुरेसं नाही, त्यामुळे काही जागा धोकादायक आहेत. सृजनला सांभाळण्याची कसरत होतीच. पाण्याचा फोर्स प्रचंड आहे, बर्‍याच ठिकाणी तुषार अंगावर येतात, ते शुभ्र पाणी काटकोनात असलेल्या दोन टप्प्यात खाली पडतं. पुढचे २-३ तास फक्त फोटो काढणे चाललं होतं. हवामान अगदी आल्हाददायाक होतं, ना गरम ना खूप थंडं असं. यापूर्वी युरोपात पाहिलेले सगळेच धबधबे आठवले तर त्यांच्या मानाने हा फारच भव्य, रौद्र आणि सुंदर होता. Gullfoss पण खास आवडलेल्या ठिकाणांच्या यादीत आला.

.

.

.

.

.

.

इथल्या रेस्टॉरंट मध्ये चांगलं सूप, सँडविच आणि केक खायला मिळालं. किमती बघून महागाई दिसत होतीच, पण जर्मनी किंवा बहुतांशी युरोपीय देशांपेक्षा इथे पाणी फुकटात होतं हा पुन्हा दिलासा होता. आता पुढचा दिवस तसा मोकळा होता. आम्हाला फक्त आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचायचं होतं, तेही अंतर २ तासांच्या आत होतं. मग बद्दल एका ब्लॉग वर Faxifoss बद्दल वाचलं होतं, तेवढा प्रसिद्ध नसलेला अजून एक धबधबा, तिथे जायचं ठरवलं.

इथे पोचलो तेव्हा सृजन झोपला होता. म्हणून गाडी लावून सुमेध आधी बघून येतो म्हणाला. तो परत आला तो आपण इथेच थांबतोय अजून तासभर तरी असं म्हणतच, त्याच्या चेहर्‍यावरूनच ठिकाण छान आहे हे कळत होतं. मग सृजन ऊठल्यावर आम्ही सगळेच निघालो आणि हा बघून सुखावलो.

.

.

.

.

एखाद-दोन लोक वगळता इथे कुणीही नव्हतं. हाही धबधबा सुंदर होता. आईसलँडबद्दल वाचताना सगळीकडे अनेक वॉटरफॉल्स बद्दल वाचलं होतं, पण ते इतके सुंदर आहेत याची प्रचिती आता रोज येत होती. इथेही उन फार वाढलं होतं, मोबाईल मध्ये २६ डिग्रीज दाखवत होता. आईसलँड साठी हा म्हणजे कधीही न अनुभवलेला उन्हाळा. मुळात २६ हे आपल्यासाठी नॉर्मल तापमान, पण आईसलँडचं भौगोलिक स्थान वर असल्यामुळे खरंच त्या उन्हाचा चटका सहन होत नव्हता. पण छान गार वारं होतं, धधब्यातले तुषार अंगावर येत होते आणि पाणी तर गोठवणारं होतं.

आता पुन्हा सृजनची स्विमिंगची टूम निघाली. एका बाजूला वाहतं पाणी होतं, आणि पाण्याचा फोर्सही खूप होता, पण जिथे किमान पाण्यात उभं राहता येईल अशाही काही जागा दिसत होत्या, त्यामुळे स्विमिंग ऐवजी पाण्यात जाऊ फक्त थोडा वेळ अशी दिलं झाली. आम्हाला दोघांनाही त्या थंड पाण्याचा त्रास होत होता, पण हा पठ्ठा तिथे कितीही वेळ उभा राहायला तयार होता. डोक्यावर अति प्रचंड ऊन आणि पायाखाली थंड वाहतं पाणी दोन्ही अनुभवत शेवटी आईसक्रीमचं आमिष दाखवून सृजनला तिथून हलवलं.

ही पण एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आईसलँड मध्ये असे बरेच क्रेटर्स, धबधबे हे लोकांच्या स्वतःच्या मालकीचे आहेत. मग तिथे येणार्‍या पर्यटकांसाठी पार्किंग, प्रवेश फी हे सगळं ते ठरवतात. इथेही आम्ही पार्किंग केलं तेव्हा तिथलीच एक मुलगी होती, त्याच लोकांचं एक रेस्टॉरंट होतं, खायला फक्त काही ब्रेड, कुकीज, आईसक्रीम, कोल्डड्रिंक असं मोजकंच. आम्ही आत गेलो तेव्हा बाकी कुणीही पर्यटक नव्हते. रेस्टॉरंट वाल्यांचे चेहरे लालेलाल झाले होते आणि एकदम 'गरमीसे परेशान' परिस्थिती दिसत होती. आईसक्रीम खाताना त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिथली मुलगी म्हणाली मी आयुष्यात पहिल्यांदा हे इतकं गरम हवामान अनुभवते आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही आता कागदावरची समस्या नाही, दिवसेंदिवस सगळं कठीण होतंय याचं वाईटही वाटत होतं. त्यातले काही जण मूळचे लाटव्हियाचे होते, जे आता आईसलँडला सेटल झालेत. एक जण मग लाटव्हिया मध्येही बरेच भारतीय आहेत, आयटी किंवा कंप्युटर मध्ये तुमच्या देशातले खूप लोक आहेत याबद्दल बोलत होता.

आता छान तरतरी आली होती, निघताना या धबधब्यातलं पाणी आमच्या बाटल्यांमध्ये भरून घेतलं. आईसलँडच्या पाण्याबद्दल - आईसलँडिक स्प्रिंग वॉटर ही त्यांची खास ओळख आहे. आम्ही अनेक ठिकाणी याबद्दल वाचलं होतं की कुठेही पाणी विकत घेऊ नका. आम्ही पाण्याच्या काही रिकाम्या बाटल्या सोबत ठेवल्या होत्या आणि त्या सगळीकडे टॅपवॉटरने भरून घेत होतो. आता इथे सरळ या धबधब्यातलं, नदीचं पाणी भरून घेतलं. हेही पिण्यायोग्य आहे असं वाचलं होतं.सगळ्यात वरच्या फोटोत जशी नदी दिसते आहे, तशाही ठिकाणी पाणी भरून घेतलं. त्यात आमच्याकडे सुमेध म्हणजे सॅनिटायझर घेऊन सगळीकडे फिरणारा, पाण्याबाबत नेहमी सावध असणारा, त्यामुळे त्याने स्वतःसोबत सृजनलाही हेच पाणी दिलं याचं मलाही सुरुवातीला आश्चर्य वाटत होतं. पण पूर्ण प्रवासात कुणालाच काहीही त्रास झाला नाही.

आता मात्र सरळ निघालो मुक्कामाच्या ठिकाणाकडे. फोटोसाठी थांबे होत होतेच.

.

.

पुढच्या ३ रात्री तिथे असल्यामुळे रोजचे कपडे आवरा, सामान बॅगेत भरा हे करायचं नव्हतं. आता रिंग रोड या आईसलँडच्या मुख्य रस्त्याला लागलो आणि तासाभरात Hella गावातल्या रंगा नदीच्या काठावर असलेल्या आमच्या केबिन्स पाशी पोचलो. ही जागा बघून पुन्हा सगळा थकवा दूर पळाला. सामान आत टाकून लगेच थोडं सामान घ्यायला बाहेर पडलो. इथे एक सुपरमार्केट होतं आणि १५ किलोमीटर पुढे अजून एक होतं. काय मिळतं याचा अंदाज घेऊन ठेवला, फळं घेतली आणि मग पुन्हा या नदीकाठाने पायी फिरून आलो. ही जागा मी शोधली म्हणून भाव खाऊन घेतला. नदीत दगड फेकायला बराच वाव आहे याचा साक्षात्कार होऊन सृजन पण खूश झाला होता.

.

.

.

या लहानशा केबिन्स मध्ये किचन होतं, त्यामुळे आज जरा घरचं खाल्ल्याचं समाधान पण मिळालं. दुसर्‍या दिवसाचं हवामान कसं आहे, कुठे जाता येईल हे बघून ठेवलं. आता प्रवासाचे ३ दिवस होऊन गेल्यामुळे वेळांचा बदल सवयीचा झाला होता. या केबिन्सच्या खिडक्यांमधून उजेडाला आत यायला भरपूर वाव होता आणि आता इतक्या उजेडात झोप येत नाही याची जाणीव व्हायला लागली. शेवटी थकव्याने झोप आलीच, पण मध्यरात्रीच्या सूर्य असा चार दिवस बघायला कितीही आकर्षक वाटला, तरी रोज इथे राहणार्‍या लोकांना किती अवघड जात असेल असंही वाटत होतं. आईसलँड तीनच दिवसात फार आवडलं होतं, पण अजून अनेक गोष्टी आमच्यासमोर यायच्या होत्या. Westman Islands बद्दल आता पुढच्या भागात -

क्रमशः

आईसलँड - भाग ५ - Westman Islands

भाग ४

Westman Islands बद्दल मी एका ब्लॉगवर वाचलं होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर अवश्य जा असं त्यात लिहीलं होतं. पण तिथे काय आहे याबद्दल त्यात विशेष माहिती नव्हती, पफीन (Puffin) हा एक खास समुद्री पक्षी आईसलँड मधल्या बऱ्याच भागात आढळतो, हे पफिन्स Westman Islands वर बघता येतील अशी किरकोळ माहिती होती. वेळ मिळाला तर बघू असं डोक्यात होतं त्यामुळे खूप काही माहिती काढली नव्हती. आज कुठे जायचं याचा विचार करताना हे ठिकाण डोक्यात आलं, हवामान पण चांगलं होतं, पण तिथे जाणारी फेरी आधीच बुक करावी लागते असं मला वेबसाईट वरून वाटलं. तरीही जाऊन बघू म्हणून आम्ही निघालो. जांभळी ल्युपिनची फुलं, ठिकठिकाणचे लहान धबधबे असं गाडीतूनच बघत Landeyjahöfn म्हणजे जिथून फेरी निघते तिथे पोचलो.

.

.

.

बरीच गर्दी दिसली, गाडी पार्क करेपर्यंत मी आधी तिकीटं आणि फेरीच्या वेळा विचारून येते म्हणून गेले तर लगेच एक फेरी निघणार होती आणि तिकीटंही वेळेवर मिळत होती.

त्या बेटावर जाऊन नेमकं काय करायचं, किती वेळ घालवता येईल याबद्दल काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे सोबत आणलेला खाऊ, थंडीचे कपडे असा सगळाच लवाजमा घेऊन निघालो. बोटीने जायचं हे आधी सांगून मग तिकीटं मिळाली नसती तर सृजन नाराज होईल, म्हणून आधी त्याला काहीच सांगितलं नाही. पण आता बोटीने जायचं हे समजल्यावर तो प्रचंड खूश झाला आणि अगदी निमूटपणे आमच्यासोबत निघाला. सुरूवातीला उत्साहाने बाहेरच्या डेकवर येऊन बसलो आणि मग थोड्याच वेळात झोंबणार्‍या वार्‍याने वाट लागली. आत बसायला अजिबातच जागा नव्हती.

मग थोडावेळ आत उभं राहून तर थोडावेळ बाहेर कोपर्‍यात थांबून समुद्र, आजूबाजूचे खडक, त्यातल्या कपारीतले आणि आकाशात विहरणारे अनेक पक्षी बघत, फोटो काढत वेळ छान जात होता.

.

.

.

.

.

.

.

आत एका केबिन मध्ये काही लोक दिसत होते, त्यात प्रेसचे लोकही दिसत होते, तिथे जागा रिकामी होती पण ते केबिन्स लॉक केले होते. आत कुणीतरी व्हीआयपी गेस्ट असावेत असा अंदाज आला. बेटावर उतरताना कळलं की तिथे जर्मनीचे प्रेसिडेंट Frank-Walter Steinmeier आहेत. आम्ही तिकीटं काढली तेव्हा तिथे पोलीसांच्या दहा-बारा गाड्या दिसल्या होत्या, त्यामागचा उलगडा आता झाला. आपण जर्मनीच्या प्रेसिडेंट सोबत एकाच बोटीने प्रवास केला याची गंमत वाटली. उतरल्यावर पुन्हा जर्मनीचे झेंडे दिसत होते, सगळे उतरल्यावर प्रेसिडेंट आणि त्यांचा ताफा बाहेर आले, त्यांच्यासाठी बस उभीच होती बाहेर. हे एवढं सगळं नाट्य बघत आमचं चांगलंच मनोरंजन झालं.

.

हा बंदरावर स्वागत करणारा पफीन -
.

मग पुन्हा काय करायचं म्हणून पाहिलं तर समोरच एक रेस्टॉरंट दिसत होतं. थंडी पण होती, मग आत जाऊन कॉफी घेऊ आणि पुढचा प्लॅन ठरवू म्हणत तिथे शिरलो. मेन्यू कार्ड मध्ये पुन्हा भारतीय पदार्थ होते बरेच, आम्ही खाऊन निघालो होतो, त्यामुळे फक्त केक आणि कॉफीच घेणार होतो, त्याचीच किंमत अल्मोस्ट जेवणाइतकी झाली. तेवढ्यात एक शेफचा अ‍ॅप्रन घातलेला भारतीय माणूस आमच्याकडे आला. हॅलो, नमस्ते म्हणत आणि हिंदीतून बोलायला लागला. कुठून आले, फिरायला आले का अशा गप्पा झाल्या. तो मूळचा दिल्लीचा, लाटव्हियाला होता आणि दोन महिन्यांपूर्वीच आईसलँडला आला असं सांगत होता. मग तो म्हणाला "तुम्हाला भारतीय खायचं असेल तर छान तिखट बनवून देतो. इथल्या लोकांसाठी, म्हणजे खरंतर स्थानिक नाही मुख्य पर्यटकच, सगळं कमी तिखट, कमी मसालेदार बनवावं लागतं. पण तुमच्यासाठी स्पेशल तिखट बनवेन." बहुधा बाहेरच्या वेट्रेसेस पैकी कुणीतरी त्याला जाऊन सांगितलं की बाहेर इंडियन गेस्ट आहेत, मग तो आला. आमच्या पोटात अजिबातच जागा नव्हती, आम्हाला काहीच नको हे सांगताना वाईट वाटलं, पण एका डिशची किंमत २५ युरोच्या आसपास असल्याने केवळ त्याच्यासाठी घेऊन बघू अशीही हिंमत नव्हती. पण तो बोलायला आला हे खूप छान वाटलं, त्यालाही सांगितलं. असे लोक प्रवासात वेगळे रंग भरतात, त्याचं अगत्य नेहमीसाठी लक्षात राहील. मग एकीकडे कॉफी पीत जरा शोधाशोध केली. समोरच एक पफिन वॉचिंग टुर्स चं ऑफिस दिसत होतं. तिथे चौकशी केली त्यांची बस फुल झाली होती. इतर काही बोट टूर्स होत्या, पण सृजन सोबत जरा कठीण होत्या. मग एक Beluga Whale Sanctuary दिसलं. शिवाय जवळच एक डोंगरावर जाणारा रस्ता दिसत होता, तिथेही काही लोक पायी जाताना दिसत होते. मग आधी या Whale Sanctuary मध्ये जाउ, म्हणजे सृजनला पण आवडेल आणि मग हवं तर त्या डोंगरावर जाऊ असा विचार करून बेलुगा मध्ये शिरलो.

हे खरंतर पफिन रेस्क्यू सेंटर आणि aquarium पण आहे, तिथल्या एका बाईच्या हातात नुकतंच जन्माला आलेलं एक पफिनचं पिल्लू होतं, इतकं लहान की ते तिने मुठीत झाकून ठेवलं होतं, झाकली मूठ पफीन पिल्लाची असं म्हणू शकू. :P
आम्ही तिथे होतो त्या पूर्ण वेळात तिने ती मफिन तसंच धरून ठेवलं होतं. मला स्वतःला प्राणी-पक्षी हे दुरून बघायलाच बरे वाटतात, पण इतक्या प्रेमाने त्यांना सांभाळणार्‍या लोकांबद्दल आदर वाटतो. फार काही मोठं नाही हे, शाळेच्या वयाची मुलं असतील तर त्यांना कदाचित कंटाळा पण येऊ शकेल कारण अगदी पंधरा-वीस मिनीटात पूर्ण बघून होऊ शकतं. त्यामानाने तिकीटाचे पैसे जास्त वाटू शकतात, पण यांच्या तिकीटाचे पैसे हे देखील या पफिन्स आणि इतर समुद्री प्राणी-पक्षी यांच्या काळजी आणि देखभालीकरता वापरले जातात हा एक आनंद आणि सृजनच्या वयाला अगदीच आवडेल असं होतं. आणि खरं तर आम्हाला पण खूप आवडलं. एक तर गर्दी अजिबातच नव्हती, त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी बराच वेळ थांबून मग वेगवेगळ्या माशांचे रंग, हालचाली टिपत बसलो होतो.

सृजनसाठी हाही पहिलाच अनुभव होता. फिश, स्टारफिश, आणि हे पफिन (जे त्याच्या मते क्वॅक क्वॅक बदकच होते) ते सगळेच पुस्तकात/टीव्हीवर पाहिलेले किंवा खेळण्यातले, इथे प्रत्यक्ष तो पहिल्यांदाच बघत होता. त्यांची जागा उंचावर होती, आणि आम्ही उभं राहून सहज त्यांना पाण्यात खेळताना बघू शकत होतो. त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये बघण्याइतकंच इथेही आवडलं. दर थोड्या वेळाने ही पफिन्स पाण्यात यायची, फडफड पाय हलवून पाण्यात डुंबायची आणि परत पाण्याबाहेर यायची. मग पंख फडफडवून स्वतःला सुकवून पुन्हा पाण्यात डुंबायला यायची. हा खेळ बघत आम्ही फारच रमलो.

.

.

काही व्हिडीओ पण इथे बघता येतील.

इथे आमच्यासोबत अजून २-४ लोक होते फक्त, त्यामुळे सगळा होल वावर इज अवर्स म्हणत छान बघता आलं. इथेच १९ जूनला २ मोठे बेलुगा व्हेल्स येणार होते, त्याची तयारी चालू होती, त्यांना इथे आणणे, त्यामागची कहाणी आणि इथलं त्यांचं adaptation याबद्दल माहिती लिहीलेली होती. हे दोन्ही व्हेल्स हे मग इथलं मुख्य आकर्षण असेल.

बराच वेळ घालवला तरी अजून ३ च वाजले होते. मग आता आजूबाजूला फिरू असा विचार करून निघालो. इथेही ठिकठिकाणी ल्युपिनची जांभळी फुलं होती. इतर फुलंही होती. हाही पूर्ण लाव्हाच होता. इथे ज्या पायवाटा केल्या आहेत, त्यावरूनच चाला हे लिहीलेले आहे. कारण हा खडक वेगळा आहे, त्यावर उगवणारं मॉस (एक प्रकारचं गवत) उगवायला वर्ष लागतात पण आपल्या पायांनी ते क्षणात उध्वस्त होतं, आणि पुन्हा अनेक वर्षं मग तिथे काही उगवत नाही. त्यामुळे इथेच नाही, संपूर्ण आईसलँड मध्ये या मॉस वर न चालण्याबाबत नियम आहेत आणि ते पाळायला हवेत. १९७३ मध्ये या बेटावर जवालामुखीचा उद्रेक झाला होता. सुदैवाने यात फक्त एक माणूस गेला, बाकी सगळे लोक सुखरूप राहिले. बहुतांशी लोक बेटावरून मुख्य आईसलँडकडे गेले, पण इथल्याच काही लोकांनी अनेक प्रयत्न करून, पाण्याचा मारा करून तो लाव्हा फार पुढे येण्याच्या आत आटोक्यात आणला आणि हे बेट पूर्ण उध्वस्त होण्यापासून वाचवलं. शिवाय लाव्हा थंड झाल्यावर सगळे स्थानिक परत या बेटावर राहायला आले. या लोकांची ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची जी सकारात्मकता आहे ती वाखाणण्यासारखी आहे.

.

.

.

.

.

.

.

डोंगरावरून ही एक जागा दिसली, ज्यात एक चर्च दिसत होतं आणि बसायला बाक पण होते, मग खाली उतरून मोर्चा तिकडे वळवला.

.

हे नॉर्वे कडून भेट मिळालेलं चर्च असं काहीसं याबद्दल लिहीलं होतं. या चर्च जवळ काही जण फॅमिली फोटोशूट करत होते. पण नंतर तेही गेले. एकीकडे समुद्र होता, बंदरावर बोटींची ये-जा चालू होती, पाण्यात बदकं खेळत होती, कितीतरी वेगळे पक्षी दिसत होते. पाणी किनार्‍यावर आदळून होणारा आवाज, या पक्षांचे मधूनच येणारे आवाज याशिवाय निव्वळ अतीव शांतता होती. कुणा चित्रकाराच्या हातून इथे नक्कीच काही चित्र रेखाटली गेली असती किंवा कुण कवी-कवयित्रीने कविता रचल्या असत्या. बाजूचं चर्च बंद होतं, पण तरीही मनात तिथल्या घटांचा आभासी आवाज घुमत होता. या अशा जागा, तिथला हा असा म्हटलं तर अगदी साधा, सहज पण अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळाला याबद्दल कृतज्ञता वाटत होती.

.

नंतर समोरच्या डोंगरावर काही मेंढ्या चढल्या होत्या, त्या तिथे कशा चढल्या माहीत नाही पण त्या इकडे तिकडे बागडत पळत होत्या आणि इतक्या उतारावरून त्या पडल्या तर काय अशी भीती पण वाटत होती.

.

.

.

आता थंडी वाढत होती, मग सरळ लवकरच फेरीसाठी येऊन थांबलो. एका ठिकाणी हे दिशादर्शक पफिन्स दिसले.

.

.

येताना पुन्हा तो भारतीय शेफ दिसला, तेव्हा तो इथे लोकच नाहीत, कुणी बोलायला नाही, शिवाय हे आईसलँड पासूनही तेवढं जवळ नाही, पाऊण तासांची फेरी, त्यामुळे खूप कंटाळा येतो असं तो म्हणत होता. भारतातून युरोपातल्या अगदी गजबजलेल्या शहरात जरी आलो, तरीही सुरूवातीला हे होतंच. त्यात आईसलँड सारखा अजूनच कमी लोकसंख्येचा देश, त्यातल्याही एका वेगळ्या बेटावर तो आल्यामुळे त्याच्या भावना नक्कीच समजू शकत होत्या. त्याला पुन्हा बाय करून निघालो.

परत जाताना काहीच गर्दी नव्हती. इथल्या स्थानिक बायका फेरीतही विणकाम करत होत्या. आईसलँडची लोकर पण प्रसिद्ध आहे, पर्यायाने विणकाम हा एक महत्वाचा उद्योग पण.

Westman Islands म्हणजे अजिबात माहिती न काढता जाऊन मिळालेला अतिशय सुखद धक्का होता. शिवाय नेहमीप्रमाणे टिपीकल स्थळांपेक्षा एक वेगळं ठिकाण बघायला मिळाल्याचा आनंद पण होता. फेरीतून उतरल्यावर तिथे आम्ही फक्त अर्धा किलोमीटर परिसरातच फिरलो, पण त्यातच खूप समाधान मिळालं होतं. दुसर्‍या दिवसाचा बेत ठरलेला होता, पुढच्या भागात Reynisfjara आणि skogafoss बद्दल.

तळटीपः
अनेक लोक इथे मुक्कामाला येतात, पफिन्स बघण्यासाठी इथल्या अंतर्गत भागात ट्रेल्स आहेत किंवा बोट टुर्स आहेत, ते करता येतात. यातल्या काही ठिकाणी लहान मुलांना नेता येत नाही, पण खास वेळ काढून या ठिकाणी जायला हवंच.
इथल्या १९७३ सालच्या ज्वालामुखी बद्दल नंतर पाहिलेल्या एका documentary ची लिंक लवकरच अपलोड करेन. त्यात अजून माहिती बघता येईल.

भाग ६

आईसलँड - भाग ६ - Reynisfjara & Skogafoss

भाग ५

Reynisfjara हा ब्लॅक सँड बीच सुरुवातीपासून जायचंच या यादीत होता. सकाळपासून ढ्गाळ हवामान होतं, पण हातात हा एकच दिवस होता. दुपारहून ऊन पडेल अशी शक्यताही दिसत होती. त्यामुळे मग निघालो. Vik हे एक त्यात्यला त्यात मोठं गाव आणि तिथूनच पुढे हा बीच.

.

.

मध्ये एका ठिकाणी थांबलो ते म्हणजे - Eyjafjallajökull. २०१० साली इथेच बर्फाच्या खाली खोलवर ज्वालामुखी भडकला आणि त्याची राख बाहेर फेकली जाऊ लागली. उत्तर अमेरिका आणि युरोप यांच्यातल्या सगळ्या विमानसेवांना याचा फटका बसला त्यामुळे याबद्दलच्या बातम्या वाचल्या होत्या. पण तिथेच जे लोक राहात होते त्याबद्दल तेव्हा काही फार वाचल्याचं आठवत नव्हतं. शेती, तीही मुख्यत्वे उन्हाळ्यात आणि पशुपालन हे इथल्या लोकांचे मुख्य व्यवसाय. लोकांच्या घरादारात ही राख आली, जनावरं हैराण झाली आणि सगळंच जनजीवन विस्कळीत झालं. इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, पण त्यांची गुरं ढोरं इथेच सुरक्षित ठिकाणी बंदिस्त करून ठेवली आणि ठराविक वेळा हे लोक येऊन त्यांना फक्त खायला देऊन परत जात होते. शेतांमधलं सगळं पीक यात गेलं. हे सगळं किती दिवस चालेल, पुढे काय होईल या सगळ्यांचीच अनिश्चितता. अनेक दिवसांनंतर ही राख थांबली आणि इथले लढवय्ये लोक परत तिथेच राहायला आले. त्यांचं शेत, त्यांची गुरं यांच्यासाठी, आणि त्यांनी येऊन पुन्हा सगळं वसवलं, शेती पुन्हा चालू केली. याबद्दलची माहिती देणारे फलक इथे लावले आहेत. आम्हाला पुढे जायचं होतं त्यामुळे फार वेळ इथे थांबलो नाही, पण या जागेची आठवण नेहमीच प्रेरणादायी असेल.

आईसलॅंड मधल्या बऱ्याच जागांचे उच्चार आपल्याला वेगळे वाटतात, पण Eyjafjallajökull म्हणजे याचं खास उदाहरण. हा उच्चार तुम्हाला जमतो का अशा अर्थाचे टी शर्ट्स, मग्ज आईसलॅंडच्या सुवेनिअर मध्ये नेहमीच दिसतात. (आता मी या लेखमालिकेत बरीच नावं देवनागरीत का लिहीत नाही याचा अंदाज तुम्हाला आला असेल :winking: काही जागांचे त्यातल्या त्यात बरे उच्चार सतत ऐकून जमायला लागले होते पण वाचकांच्या सोयीसाठी मी इंग्रजी नावं लिहिते आहे असंच तुम्ही समजून घ्या Heehee )

.

.

.

Reynisfjara (रेयानीसफेरा हा उच्चार सोपा आहे अगदीच असं दाखवायला इथे लिहिलंय :P ) आधी कॉफी घ्यावीशी वाटत होती. शिवाय मग तिथल्याच रेस्टरुम्स वापरता येतात हाही विचार असतोच. तिथे गेल्यावर सृजनला समोरच मफिन दिसलं, ते खाऊन आम्हाला जर्मनीची फारच आठवण आली, तिथल्यापेक्षा दुप्पट किंमत आणि चवीला अगदीच सुमार. पण पुन्हा पाणी फुकटात मिळत होतं हा दिलासा होताच आणि मुख्य चांगली कॉफी मिळाली. किंबहुना पूर्ण आईसलॅंड मध्ये फक्त इथेच कॉफी आवडली.

ज्वालामुखीनंतर नैसर्गिक रीत्या तयार झालेले उंचच उंच बसाल्ट कॉलम आणि लाव्हा समुद्रात येऊन तयार झालेली काळी वाळू ही इथली आकर्षणं. तेवढाच हा बीच धोकादायक पण समजला जातो. इथे समुद्राच्या लाटा हळूवार भासत असतानाच मधूनच अचानक मोठ्या लाटा येतात आणि मागे पळायलाही अवकाश मिळत नाही. त्यामुळे दर वर्षी जीवीतहानीच्या काही घटना घडतात असं अनेक ठिकाणी वाचलं होतं. समुद्रकिनार्‍यांवरची सोनेरी वाळू, निळं पाणी, आजूबाजूला रिसॉर्ट्स आणि सनबाथ घेत बसलेले लोक असं एक सर्वसाधारण चित्र असतं युरोपातल्या समुद्रकिनारी. पण इथे सगळंच वेगळं, यांचा उन्हाळा पण तरीही ती थंडीच, त्यामुळे सनबाथ काय, वाळूचे किल्ले करू असंही शक्य नाही इतकी गार ती वाळू, लाव्ह्यासोबत आपलं रंगरूप पूर्ण बदलवून घेतलेली, आणि एका बाजूला उंच असे हे बसाल्ट कॉलम, नैसर्गिक रीत्या तयार झालेले पण मानवाने बांधले असावेत असा भास देणारे, रंग माझा वेगळा चा नारा मिरवणारे इतरही काही कपारीतले दगड, दूरवर दिसणाऱ्या cliff आणि किनार्‍याला धडकून परत फिरणार्‍या दुधासारख्या पांढर्या शुभ्र फेसाळत्या लाटा.

.

.

.

.

.

.

.

इथे आल्यावर पुन्हा लक्षात आलं की जर लाटा आल्याच अचानक जोरात, तर काही ठिकाणी मागे पळायला जागाच नाही फार. आणि लहान सहान लाटा येत असताना मधूनच फार आतपर्यंत लाटा येतात हेही दिसत होतं. भरतीच्या वेळी हे अजूनच धोकादायक होत असेल. आम्ही उभं असतानाच एक बाई आम्हाला सांगायला आली की मुलाला सांभाळून ठेवा, हात सोडू नका. ती म्हणाली मी गाईड आहे एका टूरची, नेहमीच इथे येते आणि मला जुळीमुलं आहेत याच वयाची, त्यामुळे एका क्षणात ही मुलं काय करू शकतात याचा अंदाज आहे आणि इथल्या लाटांचा पण अनुभव आहे. आम्ही बारकाईने लक्ष देत होतोच, मग थोड्या वेळाने या दगडांवर येऊन फोटो काढले. पुन्हा हे दृष्य मनात भरून घेतलं आणि इथून निघालो. या एकुलत्या एका रेस्टॉरंट मध्येही बटर चिकन सारखे भारतीय पदार्थ दिसले, पण किमती बघता आम्ही सगळं खायचं घेऊन आलो होतो हेच बरं वाटलं.

येताना Dyrhólaey ला फक्त फोटो काढण्यासाठी थांबलो. इथूनही हेच दृश्य पण वेगळ्या बाजूने दिसतं.

.

.

.

आता अजून एक ठिकाण हॉटेलवर परतीच्या रस्त्यात डोक्यात होतं - Skogafoss. आज किंवा उद्या पुढच्या प्रवासात असा बेत होता. पण ऊन पडलं होतं त्यामुळे आज आत्ता ताबडतोब म्हणत निघालो. जाताना आईसलँड चे वेगळे लँडस्केप्स बघताना पुन्हा पुन्हा हा देश वेगळा आहे याची रोज नव्याने जाणीव होत होती.

.

.

.

अमुक काही मला दिसलंच पाहिजे, अमुक ठिकाणी गेलंच पाहिजे असं मला फार कमी वेळा अगदी तीव्रतेने वाटतं. या स्कोगाफॉसला इंद्ररधनुष्य दिसावा असं मला सतत वाटत होतं आणि दुपारनंतर सूर्य डोक्यावर आलेला दिसत होता, त्यामुळे मनात ते इमले बांधतच इथे पोचलो आणि या अप्रतिम धबधब्याकडे बघत बसलो. पाणी कोसळण्याचा नादमय आवाज, उडणारे तुषार, खाली वाहणारी नदी हे रमणीय दृश्य होतं.
थोडं जवळ गेलो तेव्हा एक पुसटसं इंद्रधनुष्य दिसत होतं. आणि थोड्याच वेळात खाली अजून एक आधी एक इंद्रधनुष्य दिसलं. हे इतकं खाली होतं की ओंजळीत भरून घेता येईल इतक्या खाली होतं. मग इथे फोटो काढण्यासाठी अनेकांची चढाओढ चालू झाली.

.

.

.

पाणी खाली पडल्यावर वाहणारी नदी अगदीच लहान आणि सेफ आहे. त्यामुळे इथेही सृजनने पाण्यात दगड फेकणे हा उद्योग चालूच ठेवला. आपण वर्षभर इथे राहिलो तर आईसलँडचे नकाशे बदलावे लागतील, नदीच्या जागी दगडं आणि इतरत्र पाणी अशी परिस्थिती तयार होईल अशी भीती मला वाटत होती. रोजच हॉटेलवर पोचल्यावर "मजा आली का सृजन आज?" या प्रश्नावर, "या, आज मी दगड फेकले" हे एकच उत्तर मिळायचं. :haahaa: इथेही गर्दी कमी होती.

इथेही वर बरेच पक्षी दिसत होते. गेरुआ गाण्यात जेव्हा ते पक्षी पाहिले तेव्हा हे स्पेशल इफेक्ट्स असतील असं वाटलं होतं. आधी कधी हे गाणं पाहिलं नव्हतं, या ट्रिपच्या निमित्ताने तो अभ्यास झाला. :ड इथे बघितल्यानंतर त्यातले काही नक्कीच खरे असतील असं वाटलं. या पूर्ण सहलीत विविध पक्षी बघायला मिळाले. पक्षीनिरीक्षकांसाठी निश्चितच इथे पर्वणी असेल.

इथेच पायर्‍या पण होत्या जिथून वर पर्यंत जाता येतं. तिथे जाऊन पुन्हा हे दृश्य दिसत होतं. दूरवर पुन्हा समुद्र पण दिसत होताच. इथेही वर फेन्सिंग अगदीच कमी आहे त्यामुळे मुलं असतील तर फार जपून राहावं लागतं. नदीकाठाने चालत जाऊन काही ट्रेल्स करता येतात असंही दिसलं, पण आमच्याकडे आता वेळ नव्हता.

गेम ऑफ थ्रोन्स मध्ये हा धबधबा पण दाखवला गेला आहे, पण त्यात बरेच इफेक्ट्स वापरून दोन तीन टप्प्यात कोसळणारा दाखवला आहे असं वाचलं. आईसलँड बद्दल माहिती काढत असताना स्कोगाफॉस बद्दल जे काही वाचलं होतं, त्यावरून अनेक ठिकाणांपैकी एक अशी कल्पना डोक्यात होती. प्रत्यक्ष बघून हा अपेक्षेपेक्षा खूप जास्त आवडला आणि हायली रेकमंडेडच्या यादीत आला.

.

.

.

खाली येऊन इथल्याच गवतावर बसलो, इथून उठण्याची इच्छाच होत नव्हती. काही जण इथे कॅम्पिंगच्या गाड्या घेऊन आले होते आणि काहींचा स्वयंपाक चालू होता.आम्हाला पण ते बघून मग मॅगी खाण्याची इच्छा झाली. आज घरी जाऊन तेच करू असं म्हणत शेवटी निघालो.

मधूनच या पोझ देणार्‍या मेंढ्यांना नाराज न करता त्यांचा फोटो काढला.

.

पुढचा पूर्ण दिवस मोठ्या प्रवासाचा होता आणि बरंच लांब जायचं होतं. इथला शेवटचा दिवस म्हणून इथे पुन्हा एक चक्कर मारून आलो

.

रात्रभर असणारा प्रकाश या केबिन्सच्या खिडक्यांमधून सहज आत येत होता, पण तो कमी करायला कुठे खिडकीत टॉवेल लाव, इकडच्या कोपर्‍यात काहीतरी अडकवून ठेव असे उपाय आता आम्हाला जमायला लागले होते. धबधब्यातलं इंद्रधनुष्य बघून मला एकदम आईसलॅंड ट्रिप सुफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटत होतं, पण अजून कितीतरी गोष्टी पडद्याच्या आतच होत्या. या देशाबद्दल रोज काहीतरी नवीन उलगडत जाणार होतं. आईसलँडचा आईस आणि ग्लेशियर्स, थोडं उदास करणारं विराण जग आणि बरेच नवीन अनुभव घ्यायला आता निघायचं होतं.
क्रमशः

आईसलँड - भाग ७ - Hella to Höfn

भाग ६

सकाळ झाली, आई बाबा उठले, बॅग्ज भरल्या, मला तयार केलं आणि म्हणाले "चला परत नवीन ठिकाणी, या घराला बाय बाय करा, थँक्यू म्हणा आणि गाडीत बसून पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हणून पुढे चला." की आम्ही निघालो. रोज नवीन काहीतरी दिसतं म्हणतात, मला सांगत असतात आपण हे बघू, ते बघू, हे खेळू, ते खेळू, तरी अजून बर्फ दिसलाच नाहीये मला...... असं काहीसं सृजनच्या मनात या प्रवासाविषयी आता येत असेल का? अशा कल्पना करतच आम्ही चेक आउट केलं. आईसलँड मध्ये येऊन पाच दिवस होऊन गेले होते, राहण्याच्या जागा बदलत होत्या आणि आज तर प्रवास पण लांबचा होता.
हेला (Hella) ते Höfn असा आईसलॅंड च्या दक्षिण किनार्यावरचा आजचा प्रवास. आमच्या ट्रिप मधलं हे शेवटचं ठिकाण. तिथे ३ दिवस राहून पुन्हा परतीचा रस्ता घ्यायचा होता.

.

साडे चार तास - गुगलने वेळ दाखवली. पण मधली फोटोग्राफी, खाण्याचे ब्रेक हे आम्ही त्यात अ‍ॅड केले तर अक्खा दिवस प्रवासात जाणार असं दिसत होतं. शिवाय आता लोकवस्ती विरळ होत जाणार म्हणजे पुढच्या मुक्कामाला पोचेपर्यंतची खाण्याची सोय आणि नंतरही तिथे जवळपास उपलब्धता अगदीच मर्यादित असेल तर जातानाच पुढच्या दोन दिवसांची सोय करून ठेवावी लागेल म्हणून आधी सुपरमार्केट मध्ये थांबलो, पोटोबा भरले आणि निघालो. आईसलँड मध्ये हायवेवर ९० किमी प्रतीतास ही कमाल मर्यादा आहे. आम्हाला जर्मनीत किमान १२० ने चालवायची सवय असल्यामुळे मधूनच फार हळू चाललो आहोत आपण असं वाटायचं, शिवाय तिथला हायवे म्हणजेच मुख्य रिंग रोड, हा देखील अगदीच लहान आहे. दोन्ही बाजूनी एक वाहन जाऊ शकेल एवढीच जागा, ना मध्ये डिव्हायडर ना फार मोठ्या पाट्या. पण त्यामुळेच आजूबाजूचं सगळं छान बघता येतं. तर या रस्त्यावरून पुढे प्रवास चालू झाला. सुरूवातीचा एक तासाचा रस्ता मागच्या ३ दिवसात ओळखीचा झाला होता. तीच सगळी ठिकाणं दुरून बघत, काल आपण इथे हे पाहिलं, परवा हे केलं, हा अजून एक धबधबा बघायचा राहिला पण आता उशीर होईल म्हणून नको अशा चर्चा घडत, काही ठिकाणी फोटोंसाठी थांबत जात होतो. आईसलँड मधले घोडे हेही त्यांचं वैशिष्ट्य. जर्मनी आणि युरोपातही आईसलँडिक पोनीज या विशेश मानल्या जातात. स्विस मध्ये जशा सतत गायी दिसतात तसे इकडे घोडे, मेंढ्या दिसतात. त्यामुळे फोटो घेता येतील अशी जागा दिसली तर थांबणं क्रमप्राप्त होतं. अतिशय देखणे, उमदे असे हे घोडे. किती ते वेगळे रंग, त्यांचे ते सुंदर केस, उंचीला तसे कमीच, पण काय तो रुबाब.

.

.

.

.

Vik (विक) हून पुढे निघालो आणि पुन्हा वेगळे लँडस्केप्स दिसायला लागले. रहदारी अगदीच कमी झाली, मागे पुढे क्वचितच एखादी गाडी दिसायची, शिवाय ऊनही नव्हतं, अगदीच ढगाळ हवामान झालं होतं. दर थोड्या वेळानी लहान नद्या, ओढे हे रोजच दिसत होते. पर्वतांच्या कडेकपारीतून वाहणारे अगणित धबधबे, मधूनच दिसणाऱ्या घळी, त्यातल्या हिरव्या रंगाच्या अनेक छटा आणि मग हे सगळं बघतानाच रंगरूप बदलून गेलेल्या ज्वालामुखी अनुभवलेल्या जागा, त्यावर उगवलेलं मॉस जे नजरेला सुखावह नसलं तरी तेवढंच लक्ष वेधून घेणारं आणि त्याच उजाड जमिनीवर मधूनच दिसणारी फुलं असं प्रचंड व्हेरिएशन दिसत होतं.

.

.

.

.

.

Hof जवळ ब्रेक घेऊ म्हणून थांबलो. पेट्रोल भरलं, खायला काहीतरी घेऊ म्हणून दोनच पर्याय दिसले, एक सूप होतं आणि एक ओनियन रींग्ज. या सहा रिंगची किंमत होती ६ युरो. शिवाय सूप घेतलं तर त्यासोबतचे ब्रेड संपलेत म्हणे. नशीबाने सोबत खाऊ होताच, पुढच्या तीन दिवसांची परिस्थिती डोळ्यासमोर आली. The most expensive food you ever had याचं निर्विवाद उत्तर हेच.

.

वन वे ब्रिजेस आईसलँड मध्ये दिसतील असं वाचलं होतं. ते आता दिसायला सुरुवात झाली. पूर्ण प्रवासात अनेक लहान सहान नद्या आपल्या मार्गात दिसत राहतात. त्यावर बऱ्याच ठिकाणी असे पूल आहेत. पलीकडून येणारी गाडी दिसली तर आपण थांबायचं किंवा आपण पुढे असू तर तिकडचा माणूस थांबेल अशा अलिखित नियमावर हे चालतात.

.

मध्ये हा एक रस्त्यालगत वाहणार्‍या झर्‍याचाच हा एक धब्धबा दिसला, इथे पुन्हा पाणी भरून घेतलं.

.

.

आता अजूनच विराण पण तरीही तेवढाच नयनरम्य प्रवास चालू झाला. सलग काही किलोमीटर हिरवेगार डोंगर, ल्युपिनच्या जांभळ्या फुलांचे भरगच्चं फिल्ड्स आणि मधूनच कितीतरी किलोमीटर फक्त ज्वालामुखीच्या खुणा असणारी मातीची ढेकळं, त्यावरचं ते अत्यंत उदास रंगाचं मॉस. पक्षी, प्राणी किंवा माणूस यांचं अस्तित्व इथे असूच शकत नाही असं वाटायला लावणारा हा सगळा भाग, मग हे संपून परत थोडी फुलं, हिरवाई, दोन-चार घरांचं गाव आणि मग नंतर पुन्हा मैलोन्मैल ही उध्वस्त जमीन. तरीही तिथेच वाहणारे अनेक झरे, छोट्याशा तळ्यापाशी उडताना दिसणारा एखादा पक्षी, विविधरंगी घेरदार झगा घातल्यासारखे डोंगर आणि या सगळ्यांपुढे इथून प्रवास करणारे आपण. हे निसर्गावर आपण केलेलं आक्रमण म्हणावं की इतक्या कठीण परिस्थितीत पाय रोवून उभी असलेली इथल्या लोकांचं कौतुक करावं? असे अनेक प्रश्न मनात येऊन गेले. थोड्या वेळाने हिमनद्या दिसायला सुरुवात झाली. एका बाजूने पूर्ण समुद्र होता, बराच वेळ इतकं धुकं होतं की केवळ नेव्हिगेशन मध्ये समुद्र दिसतोय म्हणजे तो आहे एवढंच, प्रत्यक्षात काहीच कळत नव्हतं.

.

.

.

.

.

.

.

या सगळ्यात आता पुढे अजून किती वेळ आणि आपण केव्हा पोचणार असं वाटायला लागलं. सृजन गाढ झोपला होता म्हणून ती काळजी नव्हती. कुठलीही हिमनदी दिसली की इथेच आपले ग्लेशियर व्ह्यू केबिन्स असतील असं आम्हाला वाटायचं पण प्रत्यक्षात नेव्हिगेशन अजून लांब दाखवत होता. ही ट्रिप प्लॅन करताना सुरुवातीला पूर्ण रिंग रोडची ट्रिप करायची इथपासून आम्ही सुरुवात केली आणि मग शेवटी फक्त साऊथ कोस्ट यावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयाचा या प्रवासात अतिशय आनंद झाला. कारण इथून पुढच्या प्रवासात हे आजच्यासारखं अजून जास्त तीव्रतेनी जाणवलं असतं, स्थानिकांची लोकवस्ती अजूनच कमी होत जाते आणि पर्यटकही कमी होतात. खरंतर या इतक्या निर्जन जागीसुद्धा सगळीकडे उत्तम इंटरनेट सेवा आहे त्यामुळे म्हटलं तर जगाशी कनेक्टेड होतो आम्ही, चित्रपटात पाहिलेल्या, चित्रात पाहिलेल्या अशा सुंदर जागा होत्या, ही सगळी रूपं भारावून टाकणारी होती, सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबातच भीती नव्हती आणि तरीही इथे एक वेगळेपण होतं ज्याचा मानसिक थकवा आला होता.

शेवटी एका ठिकाणी जरा गर्दी दिसली, टुरिस्ट बसेस, गाड्या दिसल्या आणि इथल्या डायमंड बीचची एक झलक दिसली.
अर्धा तास राहिला असेल तेव्हा पुन्हा धुकं कमी झालं, थोडी लोकवस्ती दिसायला लागली आणि शेवटी एकदाचे पोचलो. हे केबिन्स पाहिले आणि या प्रवासाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

.

.

प्रवासाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राहायला मिळतं. त्या घरातली रचना, तिथली भांडी, शोभेच्या वस्तू हे सगळं बघणं हाही माझ्या एक आवडीचा भाग असतो. आजवरच्या अनेक सहलीतले पहिले दहा लोकेशन्स आठवून पाहिले, तर त्यात ही केबिन्स अग्रक्रमी आली.

सामान टाकलं आणि लगेच बाहेर पडलो. थंडी चांगलीच जाणवत होती,समोरच ग्लेशियर दिसत होतं, घोडे, बदकं, मेंढ्या, कोंबड्या दिसत होत्या. सृजनला खेळायला ट्रॅम्पोलिन दिसलं त्यामुळे इतक्या वेळ प्रवासात आखडलेले पाय त्याने मोकळे केले. तेवढ्यात थोडं ऊन आलं म्हणून मग इथेच या गवतात सगळे लोळत पडलो, आजूबाजूच्या सगळ्या केबिन मधले लोकही बाहेरच होते. सूर्य आणि ढगांचा पाठशिवणीचा खेळ बरोब्बर या ग्लेशियरच्या वर चालू होता, रात्रीचे अकरा वाजून गेले होते, थंडी वाढली होती पण हे इतकं सुंदर सोडून आत जाण्याची कुणाचीच इच्छा होत नव्हती.

.

.

.

.

.

शेवटी सूर्याने माघार घेतली आणि आम्हाला पण प्रवासाचा थकवा पुन्हा जाणवला त्यामुळे फायनली झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशीच्या एका टूर ची तिकीटं आधीच काढून ठेवली होती, त्याशिवाय डायमंड बीच ला जायचं डोक्यात होतं, महाकाय बर्फ आणि हिमनग याबद्दलचा अनुभव पुढच्या भागात.
क्रमशः

आईसलँड - भाग ८ - Jokulsarlon Glacier Lagoon & Diamond Beach

भाग ७

हे केबिन्स आम्हाला फारच आवडले होते. उठून बाहेर बघितलं तर समोरच दिसणारे ग्लेशियर दिसले. चहा घेऊन मग जवळ एक फेरफटका मारून आलो.

.

आदल्या दिवशी भरपूर स्वयंपाक केलेला होताच, त्याचाच पोटभर नाश्ता करून मग निघालो Jokulsarlon Glacier Lagoon कडे. ग्लेशियर आणि समुद्र यांच्या मध्ये हा लहानसा लगून. बर्फाचे मोठे तुकडे ग्लेशियर मधून समुद्रात जातात, त्यात विविध आकाराचे तुकडे आणि प्रकाश जसा असेल त्याप्रमाणे त्याचे रंग बदलत जातात. ढगाळ हवामान असेल निळसर छटा जास्त दिसतात. पुढे हे समुद्र किनाऱ्याजवळ जातात तेव्हा त्यातले स्फटिकासारखे तुकडे सूर्यप्रकाशात चमकतात आणि डायमंड सारखे दिसतात म्हणून याचं नाव डायमंड बीच. या लगून मध्ये आधी बोट टूर जी ग्लेशियर जवळ घेऊन जाईल आणि मग डायमंड बीच असा प्लॅन होता.

पंधरा मिनिटात तिथे पोचलो आणि गाडी पार्क करून आमच्या आधीच बुकिंग केलेल्या बोटींसाठी काउंटर शोधून तिथे रिपोर्टींग केलं. वेळेवर बुकिंग मिळत नाहीत असं ऐकलं होतं, प्रत्यक्षात बरेच जण वेळेवर तिकीट घेत होते, पण उगाच रांगेत उभं राहण्यापेक्षा आधीच तिकीटं काढलेली होती ते सोयीचं होतं.

या जमिनीवर आणि पाण्यावर चालणार्‍या Amphibian बोटींचे भरपूर टूर्स आहेत. ही त्याची लिंक. या बोटीने ग्लेशियरच्या जवळ जाता येतं.

.

दर दहा ते पंधरा मिनिटांनी बोट टूर्स आहेत. सगळ्यांना लाईफ जॅकेट्स देण्यात आले. जागेवर बसून राहा आणि आम्ही सांगू तेव्हाच उठा अशा सूचना देण्यात आल्या. कोण कुठून आले आहेत याची चौकशी झाली आणि बोटीची गाडी निघाली. पाण्यात शिरल्यावर ही पूर्ण बोट झाली आणि हळूहळू ग्लेशीयरच्या दिशेने जाऊ लागली. ग्लेशियरच्या जवळ आणि वेगवेगळ्या कोनातून हिमनगाचे तुकडे बघणे हा अतिशय छान अनुभव होता. मग मध्यावर एका ठिकाणी बोट थांबली आणि आता तुम्ही उभं राहून पण बघू शकता असं सांगण्यात आलं.

.

.

.

.

.

.

प्रत्येक तुकड्याचे रंग वेगळे, आकार वेगळे. एकीकडे समुद्र आणि एकीकडे बर्फाचे थर. दुरून ग्लेशियर बघताना डोंगरावर बर्फाचा थर असेल असं काहीसं वाटतं पण जवळ गेलो की त्याची भव्यता जाणवायला लागते, काहीशी अंगावर येते म्हणता येईल. आइसलँड का बघायलाच हवं याचा पुन्हा पुन्हा नवीन अनुभव मिळत होता. एका दुसऱ्या लहान बोटीतून मग या बोटीवर बर्फाचा एक मोठा तुकडा आणून दिला आणि हा काही वर्षं जुना बर्फ आहे असं सांगितलं, मग तिथेच त्याचे तुकडे केले आणि सगळ्यांना हाताळायला, खायला दिले. बर्फ खायला मिळतोय म्हणून सृजन आणि इतरही लहान मुलं खुश झाली.

.

मधूनच दूरवर एक सील दिसला, म्हणजे आम्हाला सहजी दिसला नाही, त्या बोटीवरच्या माणसाने दाखवला. त्याच्या त्या संथ अ‍ॅक्शन्स, रांगणे, लोळणे सगळंच बघायला मजा येत होती. एका बाजूने थोडं पुढे चालत गेलात तर अजून बरेच सील दिसतील असं तो म्हणाला, पण नंतर आमचं जाणं झालं नाही.

.

बोटीत बसायचं आहे हे आम्ही सतत सृजनला सांगत होतो. एकदाचं ते बोटीत बसणं झालं त्यामुळे गडी शांत झाला होता. बाहेर येऊन सृजनने पुन्हा दगड पाण्यात फेकणे हा त्याचा उद्योग पुढे चालू ठेवला. मोठी मुलं ज्या पद्धतीने हे करत होते तसाच तोही प्रयत्न करत होता. बरेच व्यावसायिक फोटोग्राफर्स इथे मोठमोठे कॅमेरे घेऊन होते, कुणी झोपून तर कुणी कोपऱ्यात दगडावर बसून वेगवेगळे फोटो टिपत होते.

इथेच किनाऱ्यावर या बोटींसाठी वापरलं जाणारं ऑइल सगळीकडे दिसत होतं, पाणी गढूळ झालेलं दिसत होतं. ते बघून पर्यटनाच्या या हौशीपायी आपण अप्रत्यक्ष पणे निसर्गाची हानी करत आहोत ही बाब ते बघून बराच वेळ डोक्यातून जात नव्हती.

मग रस्त्याच्या पलीकडे डायमंड बीच वर गेलो. जून महिना असल्यामुळे तिथल्या हवामानाप्रमाणे खूप हिमनग नव्हते, म्हणजे जसे फोटो पाहिले होते तसे नव्हते. पण जे होते तेही सुंदरच दिसत होते. हाही काळ्या वाळूचा किनारा आहे. इथेही ज्वालामुखीच्या खुणा आहेत. एका बाजूला इतका प्रचंड बर्फ, एकीकडे समुद्राचं गार, गोठवणारं पाणी, त्या लाटा, ग्लेशियर मधून वाहत येणारे मोठे हिमनगाचे तुकडे आणि मग वेगवेगळे आकार आणि रूपं घेत, कधी पारदर्शक स्फटिकासारखे तर काही निळसर छटांचे, आणि लाटांच्या माऱ्याने मग हळूहळू पाण्यात मिसळून जाणारे, असा सगळाच आगळावेगळा निसर्ग. संध्याकाळी, किंवा उन्हाळ्यात मध्यरात्री सूर्य मावळताना हे सगळं दृष्य अजूनच सुंदर दिसतं. आत्ता उन्हाळ्यामुळे हे बर्फाचे हिरे तसे कमी दिसले, पण दृष्य सुंदर होतं.

.

.

.

.

इथे लहान बर्फाचे तुकडे हातात घेऊन फोटो काढले, नवर्‍याने बघ मी दिलेला डायमंड वगैरे विनोद केले आणि ते मी योग्य शब्दात परतवून लावले. सृजन इथेही दगड उचलत होता. मग त्यातले दोन तीन छान दगड मी आईसलँडची ही खास आठवण म्हणून उचलले.

ही जागा म्हणजे महाबळेश्वरचा वेण्णा लेक आठवला. सगळं कमर्शियल झालेलं, गर्दी, गडबड असं. सृजनने इथे भरपूर मजा केली, कधीचा बर्फ बघायचा होता तो जवळून बघता आला, बोटीत बसता आलं, बर्फाशी खेळता आलं त्यामुळे छान वाटत होतं.

भूक लागली होती आणि थंडीचाही त्रास होत होता, त्यामुळे सरळ पुन्हा केबिन्स मध्ये परत आलो आणि आराम केला.

मग पुन्हा केबिन्सच्या परिसरात पायी फिरून आलो. तिथून दुसऱ्या एका ग्लेशियर कडे जाणारा एक रस्ता सुमेधला सतत खुणावत होता. केबिन मध्ये काही माहितीपत्रकं दिली होती ती वाचून मग तिथल्या मालकाकडे त्या रस्त्याची जरा चौकशी केली, तो म्हणाला की तुम्ही गाडी घेऊनही जाऊ शकता किंवा पायी पण, आणि सहज जाता येईल. पण आईसलँड मध्ये काही रस्ते हे एफ रोड म्हटले जातात, थोडक्यात कच्चे डोंगरातले रस्ते, जिथे जाण्यासाठी वेगळ्या गाड्या लागतात. रेंट करून घेतानाच हे ठरवावं लागतं. आम्ही घेतलेली गाडी तशी नव्हती, पण तो माणूस म्हणाला की या गाडीनेही जाता येईल. रेंटची गाडी असल्यामुळे कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती, मग थोडा अंदाज घेऊन येतो म्हणून सुमेध गाडीने अगदी २ किलोमीटर जाऊन त्या बाजूला जाऊन बघून आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पायी जाउ शकतो हे लक्षात घेऊन परत आला. आम्ही मायलेक झोपू आणि तू जाऊन ये निवांत असं ठरवून सगळे झोपलो. हा दिवस अजूनच नवीन काही अनुभव देणार आहे हे तेव्हा डोक्यातही नव्हतं.

क्रमश:

आईसलँड - भाग ९ - Fjallsárlón

भाग ८

सकाळी ठरल्याप्रमाणे सुमेध उठून तयारीत निघाला. आई बाबांचा त्याच दिवशी भारतात व्हिजा इंटरव्ह्यू होता, दरवर्षीची सवय असली तरीही सगळं नीट झालं हे कळेपर्यंत मलाही स्वस्थ झोप लागत नाही, त्यामुळे मीही जागीच होते. तर अचानक सुमेधचा फोन, "सगळा पोपट झाला. मी परत येतोय". मला कळेचना की हे काय चाल्लंय. इथे खूप पक्षी आहेत आणि ते सतत माझ्यावर घिरट्या घालून कधीही हल्ला करतील अशा आविर्भावात आहेत, आल्यावर बोलू. आता झोप येणं शक्यच नव्हतं, आईबाबांचा एकीकडे व्हिजा अप्लिकेशन झाल्याचा मेसेज आला तोवर सुमेधही परत आला. सुमेध त्या रस्त्याला लागल्यापासून काही पक्षी त्याच्या मागावर होते. जसा तो जास्त पुढे निघाला, तसे ते याच्या डोक्यावर घिरट्या मारायला लागले आणि जोरात आवाजही करत होते, डोक्याच्या अगदी जवळ येत होते. याआधी कधीही न पाहिलेले हे पक्षी आणि हा अनुभव पण नवीनच होता. आजूबाजूला बाकी कुणीच नव्हतं, पक्ष्यांचा काही अंदाज येत नव्हता. शेवटी सुमेधने माघार घेतली आणि तो परत फिरला. त्यानंतरही तो रस्ता संपेपर्यंत ते पक्षी सतत त्याच्या मागे होते. त्यांची चोचही टोकदार होती आणि आवाज भयानक होते. मुख्य रस्त्याला सुमेध लागला आणि ते पक्षी मागे फिरले. इतकी इच्छा असूनही जाता आले नाही म्हणून वाईट वाटत होतं, पण त्या पक्ष्यांनी काही हल्ला केला नाही हे जास्त महत्वाचं होतं.

आता दिवसभराचा काहीच प्लॅन नव्हता. नाश्ता करून मग काल गेलो तसंच अजून एक आईसबर्ग आणि लगून पुढे आहे हे पाहिलं होतं, म्हणून तिथे जायचं ठरवलं.रोज काहीतरी कारणाने मी गाडी चालवत नव्हते, तो मुहूर्त शेवटी निघाला. वाहतूक अगदीच कमी होती आणि एकाच रस्त्याने प्रवास होता, कुठे फार वळणं नाहीत की दहा वेगळे नियम नाही, ९० च्या पुढे स्पीड जाऊ द्यायची नाही हेच महत्वाचं, त्यामुळे सोपं वाटलं सगळं. जाताना डायमंड बीच दिसला, कालच्या पेक्षा नवीन आणि मोठे काही हिमनग दिसले, सगळे आकार बदलले होते आणि उद्या हे दृश्य अजून वेगळं कसं दिसेल याची कल्पना करत पुढे गेलो.

Fjallsárlón - इथे आलो आणि पहिलाच नजारा बघून खुश झालो. गर्दी पण फार नव्हती, मोजके लोक आणि कमालीची शांतता.

.

कितीतरी वेळ आम्ही इथे शांत बसून सगळं बघत होतो. नवीन हिमनग, त्यांचे आकार, रंग आणि नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा बर्फच बर्फ. याआधी अनेक वेळा बर्फ पाहिला आहे, पण ही ग्लेशियर्स त्यापेक्षा खूप मोठी आणि धडकी भरवणारी होती. एकाच वेळी अतिशय सुंदर पण समोर सगळा असा बर्फ बघून यापलीकडे आता काहीच नाही असंही मनात येत होतं. एक हिमनग एका अजस्त्र माशासारखा दिसत होता तर समोरच एक अगदी बदकाच्या आकाराचा होता. सील दिसले नाही पण काही बदकं होती, काही पक्षीही होते. परतीची घाई नव्हती आणि इथून उठावंही वाटत नव्हतं, त्यामुळे थंडीचा त्रास होत नाही तोवर इथेच बसलो.

.

.

.

.

.

.

आईसलँडमधल्या बर्‍याच जागांवर ड्रोनसाठी परवानगी नाही, पण इथे असावी कारण बरेच ड्रोन फिरताना दिसले. बर्फ बघून सृजनने आईसक्रीमचं दुकान टाकलं होतं, त्याने दिलेला बर्फ आम्ही खात होतो, मग पुन्हा नवीन खेळ चालू होत होता. सुमेधचा एक जुना सहकारी पण इथे भेटला. आईसलँड मध्ये येऊन असं कुणी ओळखीचं भेटेल असा विचारही केला नव्हता, तर अचानक इथे हा भेटला. इथेही ग्लेशियर जवळ घेऊन जाणार्‍या बोटी होत्या. चौकशी केली तर दुसर्‍या दिवशीसाठी बुकिंग करता येईल असं कळलं. या बोटींवर ६ वर्षानंतरच्या मुलांनाच नेता येतं त्यामुळे सृजनला नेता येणार नव्हतं. मला पुन्हा जाण्यात इंटरेस्ट नव्हता पण इथे लहान बोट, कमी लोक आणि अजून आत नेतात हे बघून सुमेधला जाण्याची इच्छा होती. मग त्याने दुसऱ्या दिवशीचं बुकिंग केलं आणि छान वेळ घालवल्याच्या समाधानात आम्ही परत गेलो. पेट्रोल भरायचं होतं ते एक काम केलं आणि परत येऊन बॅग आवरायला घेतल्या.

उद्याचा परतीचा दिवस होता, अजून दोन दिवस होते जर्मनीत परतायला, पण आईसलँड मधल्या आमच्या सगळ्यात लांबच्या ठिकाणाहून ते परत सुरुवातीला आलो तिथे विमानतळा जवळ, असा हा मोठा प्रवास करायचा होता. शिवाय मधला स्टॉप होता सुमेधच्या ग्लेशियर भेटीसाठी. ठरल्या वेळेत आवरून, इथे आवडलं हा फीडबॅक केबिनच्या मालकाला देऊन मग निघालो. सुमेध एकटाच बोटीने जाणार आहे यासाठी सृजनची मानसिक तयारी करवून घ्यायला सुरूवात केली. आधी तो हो हो म्हणाला, बाबा वेगळ्या कपड्यात आला म्हटल्यावर पुन्हा हट्ट चालू केला. चॉकलेट ब्राउनीने तो हट्ट पुढे ढकलण्यात मी यशस्वी झाले, पण खाऊन झाल्यावर त्याला पुन्हा आठवलं. मग आम्ही बोट जिथे परत येते तिथे गेलो. पुन्हा हिमनगांचे वेगळे आकार फोटोत टिपणे, दगड फेकणे, तळ्यात मळ्यातचे खेळ, गाणी, आईस्क्रीमचं दुकान असा टाइमपास केला. इथपर्यंत बाबाची आतुरतेने वाट बघणं चालू होतं, पण जेव्हा सुमेधला बोटीतून उतरताना पाहिलं तेव्हा सृजनने रंग बदलले आणि मला का नेलं नाही, बाबा एकटा का गेला, मला परत घेऊन चल अशा सगळ्या आर्त विनवण्या चालू केल्या, थोड्याच वेळात त्याचा आवाज प्रचंड वाढला. मला पण जायचं हा धोशा त्याने चालू ठेवला आणि आमच्या कुठल्याच प्रयत्नांना तो बधत नव्हता. त्याचं आकांडतांडव चालू होतं. सोनाराकडून कान टोचून घेऊ म्हणून त्या बोटीवरच्या माणसाला बोलायला सांगणे हाही पर्याय नव्हता, कारण त्याचं इंग्लिश याला समजणार नाही आणि आम्ही जे सांगतो आहे ते चुकीचंच आहे हा समज कायम राहणार हे लक्षात आलं. ( मोठा झाल्यावर सृजन जेव्हा हे वाचेल तेव्हा सगळं काय जगजाहीर करतेस माझ्याबद्दल असं बरंच काही ऐकून घ्यावं लागेल असं हे लिहीताना वाटतं आहे) शेवटी कसं बस उचलून घेऊन त्याला परत आणलं आणि गाडीत बसवून निघालो. त्यानंतर आजतागायत बोट दिसली की मी सहा वर्षाचा झाला की त्या आईसलँड मधल्या बोटीने जाणार हे आम्हाला ऐकवलं जातं.

सुमेधने मग बोटीतला वृत्तांत सांगितला. गाईड म्हणून एक मुलगी होती, तिने सांगितल्याप्रमाणे या बर्फाच्या खाली आजही जिवंत ज्वालामुखी आहे आणि जमिनीखालच्या हालचालींमुळे हे ग्लेशियर सतत मागे जात आहे, म्हणजेच बर्फ कमी होतोय. याला फक्त ग्लोबल वॉर्मिंग हे कारण नाही तर बरंचसं नैसर्गिकच आहे. या सगळ्याचे जवळून घेतलेले फोटो. हे फोटो बघून गेम ऑफ थ्रोन्स फॅन्स ना नॉर्थ वॉल ची आठवण येईलच.

.

.

.

.

.

.

.

.

काही जागा या मनाच्या अतिशय जवळच्या असतात. तशी ही जागा मला प्रचंड आवडली. प्रवासाबाबत माझ्या काही खास विशलिस्ट नाहीत, अमुक एखादी जागा मी बघितलीच पाहिजे असंही फारसं नाही, पण या इतक्या सुंदर जागा बघायला मिळाल्या यासाठी अशा वेळी खूप कृतज्ञ वाटत होतं. आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत असे अनेक अनुभव आहेत, येत राहतील, पण या अशा मनात नसलेल्या आनंदी गोष्टीही घडत असतात हे लक्षात ठेवायला हवं. अध्यात्म वगैरे मला उमगत नाही, पण मला कधी शांत बसायचं असेल तर मी या जागेवरचे क्षण आठवून शांत होऊ शकते, मनाने परत त्या जागी पोचू शकते, ते परत अनुभवू शकते. प्रवासातल्या अशा काही मोजक्या जागा आहेत ज्या आवडल्या म्हणण्यापेक्षाही काहीतरी वेगळ्या आहेत, त्यामागचं नेमकं कारण माहीत नाही पण आहेत, त्यातली ही एक खास.

ग्लेशियर्स, थंडी, बर्फ हे सगळंच थकवणारं होतं. आता पुढचा परतीचा आणि सगळ्यात मोठा प्रवास होता. पुन्हा ज्वालामुखींचे दूरवर पसरलेले फील्ड्स दिसायला लागले. सतत डोळ्याला दिसणाऱ्या पांढऱ्या आणि करड्या रंगातून बाहेर येऊन धबधबे, उंच हिरवे डोंगर, लहान सहान नद्या, निळं आकाश असं सगळं दिसायला लागलं.

.

.

.

.

.

.

.

.

.

जेवायला ब्रेक घेतला, मागचे तीन दिवस सतत घरी बनवून खाल्लं होतं, इथे आयतं खायला मिळणे हेच सुख वाटत होतं आणि तसे चांगले पर्यायही मिळाले.

परतीचा सगळा रस्ता आणि त्यावरचे बरेच स्पॉट्स ओळखीचे झाले होते. Seljalandfoss हा एक धबधबा बघायचा राहिला होता. इथलं वैशिष्ट्य हे की धबधब्याच्या धारेमागे आपल्याला जाता येतं. पण आता थकवा आला होता त्यामुळे गाडीतूनच दुरून फोटो काढले आणि आपण इथे येऊन गेलो हे समाधान मानलं. इथे जाताना रेनकोट घालून जा असं वाचलं होतं, तशी खरेदी पण केली होती पण प्रत्यक्षात कशाचीच गरज पडली नाही. याच रस्त्यावरची अजून एक जागा म्हणजे Sólheimasandur, इथे १९७३ मध्ये क्रॅश झालेल्या एका विमानाचे अवशेष आहेत. पण त्यासाठी गाडी पार्क करून त्यांच्या बसने जावं लागतं किंवा मग पायी, वर्णन वाचून ही जागा टाळली तरी चालेल असं वाटलं त्यामुळे तिथेही गेलो नाही.

थोड्या वेळाने फोटो काढण्याचा सुद्धा कंटाळा आला होता, संध्याकाळचे आठ वाजले तरी आम्ही पोचलो नव्हतो. उत्तम इंटरनेट असल्यामुळे मोबाईलवर गाणी बघणे हा पर्याय होता पण तरीही सृजनला कंटाळा येणं स्वाभाविक होतं, त्यामुळे त्याची पण कुरकुर चालू झाली. शेवटी ९ च्या सुमारास एकदाचे पोचलो. इथे हॉटेलची खोली बरीच मोठी होती, भरपूर कपाटं आणि सामान ठेवायला चिक्कार जागा, मोठं स्वयंपाकघर इत्यादी. मागचे ६ दिवस आम्ही अगदीच पिटुकल्या केबिन्स मध्ये राहिल्यामुळे एकदम चाळीतून राजमहालात आल्यासारखं वाटत होतं. त्या केबिन्समध्ये बॅगच कशाबशा मावायच्या, बाकी जागा अशी काहीच नसायची. मला तर घरी लावतो तसं पटापट बॅग रिकाम्या करून आवरून ठेवू असंही वाटलं पण हे आपलं घर नाही हेही माहीत होतं. त्यामुळे इथे मनसोक्त सगळं सामान पसरून ठेवलं. मॅगी खाऊन पोट भरलं, खरं तर मॅगी नाही पण आइसलँड मध्येच घेतलेल्या इन्स्टंट नूडल्स, पण छान मसालेदार होत्या त्यामुळे आम्ही त्यांना मॅगी म्हणूनच खाल्लं. आता उद्या अजिबात लवकर उठायचं नाही असं ठरवून झोपलो.

आईसलँडमधले शेवटचे २ दिवस राहिले होते. त्याबद्दल आता पुढच्या भागात -

क्रमश:

आईसलॅंड - भाग १० - Blue lagoon & last day in Iceland (अंतिम)

भाग ९

आईसलँडची सहल ठरवताना तिथले प्रमुख पर्यटन स्थळं शोधताना "ब्लू लगून" हे नाव पहिल्या पाचात येतं. मग हे काय आहे हे शोधताना समजलं की हा लगून म्हणजेच खरंतर एक स्विमिंग पूल, पण तिथल्या जिओथर्मल एनर्जी मुळे नैसर्गिक रीत्या हे गरम पाणी इथे आहे आणि त्यात अनेक सिलिका सारखी मिनरल्स आहेत जी त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त ठरतात किंवा एकूणच त्वचेसाठी फायदेशीर आहेत. इथे गेलो नाही तर आइसलँड पाहिलं नाही असं वाटू शकतं इतकं हे आइसलँड च्या मस्ट व्हिजिट मध्ये येतं असं सगळीकडे वाचलं होतं. या भागात लिहिलं तसं इतरही काही सिक्रेट लगून आहेत जे यापेक्षा जास्त चांगले आहेत असेही वाचले होते पण तिथे जाण्याचा आमचा योग सहज जुळून आला नाही. हा ब्लू लगून तिथल्या विमानतळापासून अगदी जवळ आहे, त्यामुळे आमच्या शेवटच्या दोन दिवसात इथे जाऊ असा बेत होता. आधीच बुकिंग करून ठेवलं तर तिथल्या लांब रांगांमधला वेळ वाचतो पण आमचं नक्की नव्हतं, त्यामुळे आम्ही वेळेवर बघू या मोड मध्ये होतो. हॉटेल विमानतळ आणि ब्लू लगून दोन्ही ला जवळच होतं.

मला स्विमिंग येत नाही, सृजनलाही अजून नाही हा इथे जायचं की नाही यासाठी मुख्य मुद्दा होता. पण त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे स्विमिंग येत नसेल तरीही इथे जाता येतं, कारण पूल खूप खोल नाही. मग जाऊन बघू असं ठरलं. इथे या जिओथर्मल एनर्जी वर चालणारे पॉवर प्लांट्स आहेत आणि तिथेच शेजारी हा ब्लू लगून.

.

.

.

.

.

.

इथे प्रवेशासाठी काही नियम आहेत आणि स्विमिंग पूल साठी आधी शॉवर घेणे, तेही त्यांच्या शॅम्पूनेच असा नियम आहे. यामागे कारण आहे की त्या पाण्याने केस चिकट होऊ नये म्हणून. त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत ज्यात तुम्हाला स्क्रब, ड्रिंक्स, sauna असे विविध पर्याय मिळतात. बेसिक पॅकेज सुद्धा भरपूर महाग आहे, अर्थात हे आइसलँड मध्ये सगळीकडेच आहे. आम्ही बेसिक पॅकेज निवडलं आणि वेळेवर जाऊन प्रवेश मिळतो का हे बघायला गेलो. तर ते शक्य होतं, आधीच बुकिंग करून ठेवलं नाही तरी काही अडचण आली नाही. सृजन स्विमिंग ला जायचं म्हणून भयंकर खूश होता, ते येत नसलं तरी. आधी तिथेच जरा खाल्लं आणि मग शॉवर घ्यायला गेलो. पॅकेजप्रमाणे हातात घालण्यासाठी बँड मिळाले होते, पण त्यांची क्वालिटी काही विशेष आवडली नाही, सतत निघून येत होते. शॉवर आहेत त्या भागात सामान ठेवण्यासाठी असलेली कॅबिनेट्सची सिस्टीम पण जरा कन्फ्युज करणारी होती, त्यांचे volunteers ठिकठिकाणी होते तसे जे मदत करत होते, पण तरी तिथून पुढे लगून कडे जाणारा मार्ग पण पटकन दिसत नव्हता आणि हे बऱ्याच जणींचं होत होतं. हे खूप त्रासदायक नसलं तरी अजून सोपं करायला हवं असं वाटलं. शेवटी त्या लगून मध्ये डुंबायला गेलो, गर्दी फार नव्हती. तसेही एकेका स्लॉट मध्ये ठराविक लोकांनाच आत सोडतात. पाण्यात डुंबल्या नन्तर आम्ही एक ब्रेक घेतला, थोडं खाल्लं आणि मग परत थोडा वेळ पाण्यात गेलो. पाण्याचं तापमान अगदीच व्यवस्थित होतं शिवाय ते सिलिका मुळे निळसर किंवा दुधाळ निळ्या रंगाचं पाणी बघायलाही छान वाटत होतं. बाहेर बर्फ पडत असतानाही या पाण्याचं नैसर्गिक तापमानच गरम असतं.

बेसिक पॅकेज मध्ये मिळालेल्या सिलिका स्क्रबने चेहरा खरंच इतका छान वाटत होता की केवळ या कारणासाठी आलो ते बरं झालं असं वाटलं. तरी मला इथेही सगळीकडे डिसपोझेबल पेले, चमचे बघून वाईट वाटत होतं. थोड्या वेळाने भूक लागली म्हणून मी रेस्टॉरंट मध्ये आले. खायला चांगले पर्याय होते त्यामुळे पोटोबा सुखावले. सृजन परत थोडावेळ बाबासोबत स्विमिंगला गेला, मी बसून ही सगळी ट्रिप आठवत होते.

रात्री उशीरा पुन्हा एकदा गाडीने एक चक्कर मारून आलो.

.

.

.

हॉटेलवर परत आलो. बॅग भरून रेडी करून ठेवल्या. रात्री दीड वाजता हा असा इतका उजेड होता.

.

.

सकाळी उठून आवरून चेक आउट करून निघालो. हा पूर्ण दिवस हातात होता कारण विमान मध्यरात्री होतं. परतीचं विमान ठराविक दिवशीच होतं, आणि हा दिवस आजूबाजूला काहीतरी बघण्यात सहज जाईल असं आम्हाला वाटत होतं, पण प्रत्यक्षात आम्ही खूप थकलो होतो. त्यामुळे त्यातल्या त्यात एका व्हेल म्युझियम बद्दल वाचलं होतं तिथे जाण्याचा पर्याय निवडला. आईसलँड मधल्या समुद्रातल्या व्हेल वॉचिंग टूर्स बद्दल वाचलं होतं, पण व्हेल्स दिसतील याची खात्री नाही, शिवाय सृजनला अशा ठिकाणी फार सांभाळावं लागतं आणि नॉर्थ भागात व्हेल दिसण्याची शक्यता जेवढी जास्त आहे तेवढी Reykjavik मध्ये नाही हे बघून आम्ही ते केले नाही. मग निदान म्युझियम मध्ये कृत्रिम व्हेल्स बघू अशा विचाराने गेलो. सृजन खुश होता हे व्हेल्स बघून. मोकळी जागा होती बरीच आणि गर्दी अगदीच नाममात्र, त्यामुळे आम्ही इथे भरपूर वेळ घालवला, तसंही जास्तच वेळ हातात होता.

.

.

दुपारीच गाडी परत द्यायची होती, जेवण करून मग पेट्रोल भरलं आणि विमानतळावर पोचलो. इथे जाताना समुद्र किनाऱ्याजवळ, काळ्या खडकाळ जमिनीजवळ काही जण गोल्फ खेळताना दिसले. मग आठवलं की आम्ही वेस्टमन आयलंड ला गेलो तिथेही बरेच लोक होते ज्यांच्या हातात गोल्फ चं सामान होतं, जे बहुधा खास गोल्फ खेळायलाच फेरीने तिथे आले होते. Omg आईसलँड मध्ये पेट्रोल भरण्याबाबत पण मजेशीर किस्से वाचले होते, आम्ही शक्यतोवर unmanned पेट्रोल पंपावर गेलो नाही, पण इथे विमानतळाजवळ दुसरा पर्याय नव्हता, काही प्रॉब्लेम न होता हे काम झालं. आता विमानतळावर येऊन वेळ काढायचा होता. आपण हॉटेल अजून एक दिवस बुक करायला हवं होतं असं वाटलं, म्हणजे किमान झोप काढली असती. मग ज्यूस प्या, सँडविच खा आणि सृजनाच्या मागे पळा असं काहीतरी करत वेळ घालवला आणि अखेरीस विमानाची वेळ झाल्यावर निघालो. पहाटे जर्मनीत पोचून पुन्हा गाडी घेऊन घरी पोचाय्ला अजून बराच वेळ लागणार होता. घरी पोचून आता अजून आठवडा भर सुट्टी हवी असं वाटत होतं. दोन दिवसात भरपूर झोप काढली, बॅग आवरल्या गेल्या, परत नेहमीचं घर संसार ऑफिस रुटीन चालू झालं पण आईसलँडच्या आठवणी सतत सोबत होत्या. म्हणता म्हणता याही सहलीचे ९ भाग ब्लॉग वर लिहून झाले, हा शेवटचा दहावा भाग.

ट्रिप अविस्मरणीय झाली होती. याबद्दल लिहायलाच हवं असं डोक्यात होतंच. आईसलँड कुठे आहे, तिथे काय आहे अशी माझी सुरुवात झाली होती आणि आता आईसलँडला जाऊन आलो हा भूतकाळ झाला, वर्ष होईल आता खरंतर. पण आईसलँडचे फोटो बघताना, कुणाला प्रत्यक्ष सोबत दाखवताना अजूनही तेवढीच मजा येते. ते फोटो आणि या देशाबद्दल माहिती सांगताना, लिहिताना पुन्हा पुन्हा त्यांच्या युनिक अशा बाबी जाणवतात. इतर देशांपेक्षा असलेलं वेगळेपण अजूनच ठळकपणे जाणवण्या सारखी या देशाची जादू आहे, नशा आहे हे आजवर आम्ही वाचलेलं, व्हिडीओ मध्ये बघितलं होतं त्याची अनुभूती स्वतः घेता आली. काही व्हिडीओ बघताना अंगावर आताही काटा येतो. हा देश स्पेशल आहे हे सतत जाणवतं.

स्वित्झर्लंड बद्दल पण अनेक ब्लॉग पोस्ट लिहिल्या आहेत आणि स्विस मध्ये फिरायला अजूनही आवडतंच. तिथे फिरताना अनेक वेळा स्विस आणि इतर युरोपियन देशांची आठवण आलीच, पण स्विस सारख्या देशात निसर्गाइतक्याच, किंबहुना काही वेळा त्यापेक्षाही जास्त असं मानवनिर्मित सौंदर्य आणि पर्यटनाभिमुख गोष्टी आहेत तर आईसलँड म्हणजे फक्त "जात्याची सुंदरी" जिथला फक्त निसर्गच वेड लावायला पुरतो. पण आईसलँड खूप रॉ आहे. पर्वत, बर्फ, समुद्र हे सगळं आहेच पण ती ज्वालामुखीची फील्ड्स, हिमनग, सिक्रेट लगून, लहान मोठे असंख्य धबधबे, एकीकडे गीझरचे गरम पाण्याचे उद्रेक आणि दुसऱ्या क्षणी दिसणारा बर्फ, गोठवणाऱ्या पाण्याचा समुद्र आणि त्यात चमकणारे बर्फाचे तुकडे, अतिशय विरळ वस्ती, मध्यरात्रीचा सूर्य, इथे राहायला मिळालेली केबिन्स अशा असंख्य वेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या.

सुरूवातीला बुकिंग करत असताना महागाई बघून डोळे दिपले होते, त्यानंतर "पुन्हा कोण कशाला जाईल एवढा पैसा खर्च करून" असंही वाटलं, पण आल्यानंतर कुठेतरी सतत संधी मिळाली तर इथे परत जायला हवं असंही सतत वाटत असतं. तिथले बरेच साहसी प्रकार मला झेपणार नाहीत हे माहीत आहे, बाकी बरंच बघून झालंय पण तरी मनात सतत पुन्हा आईसलँड अशी घंटी अधून मधून वाजत असते. ते फोटो बघताना सगळा पुनर्प्रत्यय घेताना निशःब्द वाटतं. जगाच्या पाठीवर आईसलँड कुठे आहे हेही माहीत नव्हतं, आणि त्यानंतर भारतातून येताना विमानाचा रुट बाघत बसले होते तेव्हा दूरवर आईसलॅड, Reykjavik हे बघून एकदम ते जवळचं वाटत होतं. पुन्हा एकदा आईसलँडला जायला हवं ही इच्छाही वर उफाळून आली. प्रत्यक्ष जायला मिळेल, जमेल काही माहीत नाही पण हा आईसलँड फीवर कायमस्वरूपी असेल हे नक्की.

समाप्त

I have written 10 parts in my mother tongue, but had also some non-Marathi friends asking for details. So here it is -

Link to all 10 blog posts, although written in Marathi, you can have a look at photos -
Part1, Part2, Part 3, Part 4, Part 5, Part 6, Part 7, Part 8, Part 9

We did only south coast. Here is our Itinerary.

Day 1 - Arrive in Keflavik Airport (We arrived midnight, so had whole next day to explore) & roam around in Reykjavik
Day 2 - Parts of golden circle - Þingvellir National Park & Geysir Geothermal Area
Day 3 - Gulfoss from Golden Circle & Faxifall (Not so known but beautiful waterfall)
Day 4 - Westman Islands
Day 5 - Reynisfjara, Vik & Skogafoss
Day 6 - Travel to Höfn (Last point on Ring road for our trip)
Day 7 - Jokulsarlon Glacier Lagoon & Diamond Beach
Day 8 - Fjallsárlón glacier
Day 9 - Return to Reykjavik
Day 10 - Blue Lagoon
Day 11 - Whale Museum, Back to Home

We did not follow ring road in one go, like we stayed at one location for 2-3 nights and explored nearby, so this gave us good flexibility for weather conditions...e.g. we went to skogafoss when it was sunny and could experience wonderful rainbow there, but this also means that we drove same way multiple times.

Here is a list of Hotels we stayed in -

Grimur Hotel, Reykjavik - 2 nights
Laugarvatn Hostel, Laugarvatn - 1 night
Cafe Arhus, Hella - 3 nights
Lambhus Glacier View Cabins, Höfn - 3 nights
Mar Guesthouse, Grindavik - 2 nights

Hotel booking: We have used airbnb services in rest of Europe sometimes, but have mixed experiences. Iceland travel involving some remote places, we wanted to be very sure about accommodation to avoid last minute problems. So did everything via Booking.com, except one at Höfn via their Facebook page - A Note here: Make sure to check the hotel/Cabin website as well to check exact type of cabin/room (No. of beds, Kitchen availability, separate/Common washrooms / Kitchen etc.) as this information on Booking.com may not be accurate/detailed.

Many accommodations will have self check in systems.

Food Options - We prefer vegetarian food as far as possible. Food is also very expensive and hotels are located far away from any restaurants, so carrying your own food items, ready to eat items is always recommended. We took many items from home with us, with a toddler it was even more necessary and this helped us a lot. Most of the places offer common or private kitchen with some basic utensils. You can get some items in Supermarkets, but make sure to check their opening hours.

Language: The local language is Icelandic, but English is spoken everywhere.

Blue lagoon - I didn't find it that good personally, except for the scrub :) . They are super expensive if you buy later from their shop, but the two that we got in with basic package were really good.
Still, it remains a hyped place for me or not worth for money. This happened first time in Iceland and only at Blue lagoon, rest whole Iceland was worth for every single penny. But its really personal opinion. Our son had his first swim here so it is definitely a good memory for us.

Car renting - One of the very important part in Iceland Trip. If you are looking for adventure in Iceland, it offers some F Roads or non-paved roads to explore more interior of the country. You need to take this in consideration while booking. 4x4 Vehicle. There is possibility to book caravans & camping vehicles as well.

Sim card - we got it directly at airport, and used it also for navigation. It was very convenient and got excellent connectivity throughout Iceland.

Iceland is all about nature, all in raw form and is worth for money. It has so many unique things which we have never experienced before in other European countries. Happy Traveling..

One of the reference website i really loved - https://icelandwithkids.com/