आईसलँड - भाग १ - पूर्वतयारी

आईसलँड हे नाव मी सुमेधकडून ऐकल्याचं मला आठवतंय ते साधारण ३-४ वर्षांपूर्वी. तो म्हणाला होता की मला आईसलँडला जायचं आहे. त्याला इज्राईलपासून तर केनिया, अफगाणिस्तान किंवा अजून कुठे कुठे जायचं असं तो एरवीही म्हणतो, त्यामुळे या आईसलँडकडे मी त्यावेळी नुसतंच एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडुनही दिलं. मग कधीतरी फेसबुक वर फोटो पाहिले, तेव्हा अजून थोडी माहिती शोधली, छान दिसतंय सगळं, शेंगेन देशांमध्ये असाल तर वेगळा व्हिसा लागत नाही या नोंदी मात्र नकळतपणे घेतल्या गेल्या, पण विषय तिथेच संपला. एक तर माझा भूगोल कच्चा, त्यामुळे हे आईसलँड नेमकं कुठे, तिथे पर्यटनासाठी काय आहे हे काहीच मला माहीत नव्हतं. फिरायला आवडत असलं तरी अमुक ठिकाणी मला जायचं आहे, विश लिस्ट आहे असं काही माझं नाही, किंवा नव्हतं म्हणूयात. त्यातून माझा फिरण्याचा प्रांत मुळात जरा सावध असा, खूप साहस, धाडस जमत नाही. पण तरीही पर्यटकांची कमी गर्दी असलेली थोडी वेगळी अशी ठिकाणं शोधून तिथे जायचं हे मात्र मला आवडतं. तर या जुन्या नोंदी आणि अगदीच जुजबी माहितीवरून मला आईसलँड तेवढं सहज आवाक्यातलं नाही असं (उगाच) वाटत होतं.अजूनही तिथे जायचं, जाऊयात, जायलाच हवं असं का ही ही झालं नव्हतं.

पण यावर्षी आमचे आणि आईसलँडचे योग ठरलेले असावेत. दरवर्षी होतं तसं सुट्ट्यांचं प्लॅनिंग, भारतवारी कधी यावर विचार, त्यात आता सृजनच्या डेकेअरच्या सुट्ट्यांचा विचार हे सगळं बघून सहलीचे काही बेतही डोक्यात होते, त्यात आईसलँड नव्हतंच. पण बेत ठरवू ठरवू म्हणत ते रहित होत जाणे हेही झालंच. आणि ते बरंच झालं इतकी माझी आणि सृजनची आजारपणं निघाली. मग त्यामुळे पुन्हा सुट्ट्या बदलल्या आणि कुठे जायचं पुढच्या सुट्टीत हे प्रश्नचिन्ह परत डोक्यात फिरायला लागलं. आणि अगदी अचानक मला आठवलं, आईसलँड. मग माहिती शोधायला सुरूवात केली. आईसलँडबद्दल माहिती शोधताना गुगल किंवा इंटरनेट कृपेने सुमेधची स्वप्नं माझी होत गेली आणि चर्चा चालू झाल्या. आइसलँड विथ टॉडलर, विथ किड्स, आईसलँड इन जून असे सर्च चालू झाले. काही व्हिडीओ बघितले, मग "तुम एक व्हिडीओ देखो हम दस व्हिडीओ दिखाएंगे" म्हणत अनेक रिलेटेड व्हिडीओ आपोआप दिसायला लागले. मग गेम ऑफ थ्रोन्सचं थोडं शूटिंग झालंय, दिलवाले मधल्या गेरुआ गाण्याचं पण शूट झालंय, २०१० मधला ज्वालामुखी आणी त्याबद्दल वाचलेल्या बातम्या, टुंड्रा प्रदेश, मध्यरात्रीचा सूर्य असे बरेच संदर्भही लक्षात आले. इथली सगळी प्रमुख स्थळांची नावं आपल्या अजिबात सवयीची नसल्याने की काय, फार वेगळी वाटत होती. शेवटी काही लोकांचे ब्लॉगवरील अनुभव, फोटो आणि तिकीटांचा अंदाज एवढ्या बाबींवर Iceland it is!! यावर शिक्कामोर्तब झालं. एकदाची विमानाची तिकीटं बुक झाली. हुश्श्य!!

आमच्याकडे प्रवासाचे वगळता ११ दिवस होते. सर्वसाधारणपणे इथल्या प्रमुख जागा बघायला हे अगदी पुरेसे आहेत. पण त्यात बरीच धावपळ होते. शिवाय मधला काही भाग हा बराच विराण आणि लांब प्रवासाचा आहे. आम्हाला नुसतं भोज्याला हात लावून पळायचं नव्हतं. शिवाय सृजनच्या दृष्टीने विचार करताना फार हेक्टिक नको असं वाटत होतं. शेवटी आम्ही एक रिजन ठरवला आणि संपुर्ण देश होणार नाही हे पक्कं केलं. त्याप्रमाणे मग काही स्थळं शॉर्ट्लिस्ट झाली, कुठून कुठे कसं जाता येईल, हॉटेल्स शोधणे असं चालू झालं. या सविस्तर शोधाशोधीत गंमत अशी असते की अति जास्त बघायला नको, नाहीतर प्रत्यक्ष फिरण्यातली मजा कमी होईल. पण अशा जरा वेगळ्या जागा, तेही सृजन सोबत असताना सगळी माहितीही हाताशी हवी. आमच्या मागच्याच ट्रिप मध्ये रात्री नाक बंद होऊन त्याला धाप लागून मध्यरात्री अर्धा तास आम्ही जे काही घाबरलो होतो, ते अजून डोळ्यासमोर होतं. जे काही वाचत होतो त्यात इथे मैलोनमैल एक गाव लागत नाही, गाव म्हणजे अगदी १० घरांचा पाडा असंही असू शकतं, पेट्रोल वेळेत भरा नाहीतर अडचण येऊ शकते, दुकानं लवकर बंद होतात हे सगळं बघता ही माहिती काढणं अजूनच गरजेचं वाटत होतं. पण कशाचाच अतिरेक नको. हा विचार करताना अजून दहा वर्षानंतरचा टुरिझम ही कन्सेप्ट कशी असेल सारखे काहीच्या काही प्रश्न ते किती वेळ आपण या शोधाशोधीत घालवणार याचा थोडा वैताग असे अनेक मनाचे खेळ चालू होते. पण मग ही आधीची सगळी पूर्वतयारी करण्यात फार मजा येते हे नेहमीच अनुभवलं होतं.

या सगळ्या शोधप्रक्रियेत फार कमी वेळा आम्ही बाकी किमती पाहिल्या किंवा सुरूवातीला महाग हॉटेल्सच दाखवतात म्हणत नजरेआड केल्या. स्विसमधली महागाई अनुभवली होती, नॉर्वे पण महाग हे ऐकून माहीत होतं, पण आईसलँड हा या सगळ्यांच्या वरताण आहे याची इतकी कल्पना आमच्या डोक्यात नव्हती. अर्थात ते बरंच झालं कारण मग कदाचित हा बेत पुढे गेलाही नसता. आता राहण्यासाठी जागा शोधताना खिसे इतके जास्त कापली जाणार याची जाणीव होऊन पोटात खड्डे पडायला सुरूवात झाली. सगळी मजा विसरायला लावणार्‍या या किमती होत्या, अखेर त्यातल्या त्यात आवाक्यातले म्हणावे असे काही शॉर्ट्लिस्ट करत ते बुक झाले. तरीही हे एवढं वर्थ असेल ना अशी शंका मधूनच येत होती.

इथल्या उन्हाळ्यातून तिथला उन्हाळ्यात, पण ऊन म्हणजे किती, तर जास्तीत जास्त तापमान १५ डिग्रीज. मग थंडीचे कपडे, तिथल्या अतिप्रचंड लहरी हवामानामुळे पावसाचे कपडे, एक सेल्फी स्टिक, सृजन हात सोडून कुठेही पळू शकतो म्हणून एक सेफटी लीश, त्याच्यासाठी एक बॅग अशी किरकोळ खरेदी चालू झाली. खाण्याचे काही ऑप्शन्स मिळणार नाहीत हे दिसत होतंच. पुढची ट्रिप भारतात करायची आणि आयतं खायचं फक्त तिथे जाऊन असं पुन्हा एकदा ठरलं. पण या ट्रिप साठी ही एक मोठी तयारी होती. एरवीही आम्ही शक्यतोवर बरंच सामान घेऊन जातो. सृजनसाठी लागतंच, पण रोज ब्रेड आणि सलाड हे काही दिवसांनंतर त्रासदायक होतं. त्यात आईसलँड मधल्या किमती आणि अनेकांचे अनुभव वाचून इथे आपली पोटोबाची सोय बघावीच लागणर होती. मग थोडं रेडी टू इट, थोडं आपलं मसालेदार असावं म्हणून कोरडा खाऊ भेळ आणि बाकरवड्या, मॅगी, महत्वाची औषधं, कपडे असं एकेक बॅगमध्ये जागा मिळवायला लागलं. हे सामान तिथे चार जागांवर हलवायचं आणि तिथे रेंट केलेल्या गाडीत हे बसायला हवं ही मुख्य कंडिशन होती. मग काही गोष्टी कमी जास्त करत शेवटी सगळं भरलं आणि त्या बॅग्ज विमानतळाकडे जाण्यासाठी गाडीत जाऊन बसल्या.

आपण जून मध्ये विमानानी जाणार आहे असं आम्ही सतत सृजनला सांगितलं होतं. मागचे विमान प्रवास त्याच्या लक्षात नव्हते. यावेळी गाडी फारच खुशीत होती. मग विमान कसं उडतं याची अ‍ॅक्शन तो सतत करून दाखवत होता. तिकडे जाऊन आपण घोडे बघणार, बा बा ब्लॅक शीप बघणार, बर्फ आणि धबधबे बघणार असं बरंच काय काय आम्ही त्याला सांगत होतो ते तो रिपीट करत होता. म्हणता म्हणता तो दिवस उजाडला आणि संध्याकाळी ठरल्या वेळी आम्ही विमानतळाकडे निघालो. तिथे गाडी पार्क केली, सगळं सामान, सृजनचचं कार सीट असा लवाजमा घेऊन निघालो आणि सृजनला एक विमान दिसलं. हेच आपलं विमान हे त्या बालमनाने पक्कं केलं आणि तिकडेच चला म्हणून हट्ट धरला. मग आधी थोडं सामान द्यायचं, कार सीट द्यायचं, अजून पुढे जायचं, तिकीट चेक करायचं असं काय काय त्याला सांगत आम्ही एक एक स्टेप पुढे जात होतो. त्याच्या बिचार्‍याच्या चेहर्‍यावर हे नेमकं किती वेळ चालणार असं प्रश्नचिन्ह होतं. इतक्या दिवसांपासून विमानात जायचं, मग परवा, मग उद्या, मग आज आणि आता इथे आलो तरी अजून वेळ आहेच याचा वैतागही होता. सामान चेक ईन झालं, त्याची नवीन बॅग त्याला मिळाली आणि मग तो जरा शांत झाला. मग आपण केक खाऊ असं आश्वासन मिळालं. केक घ्यायला गेलो तर तिथल्या बाईने ९ वाजता आमचं दुकान बंद होतंय, सोबत घेऊन जा असं सांगितलं. अजून विमानाला ३ तास होते, पण सगळीच बाहेरची दुकानं बंद होण्यात होती. तसं हे जर्मनीत राहून सवयीचं आहे, पण तरी चिडचिड झालीच. मग तिथेच बाहेर सृजनने मस्त फतकल मांडली आणि चीज केक वर ताव मारला. आता पुन्हा विमानात कधी जायचं चालू झालं. मग ड्युटी फ्री दुकानांमधल्या खेळण्यांनी लक्ष वेधलं, ते आम्ही पुन्हा प्रयत्नपूर्वक वळवलं. मग इकडेतिकडे भरपूर पळून त्याने नेहमीप्रमाणे लोकांचं लक्ष वेधून घेतलं, त्याच्यामागे आम्ही पण केकच्या कॅलरीज जिरवत होतो.

रात्री साडे-अकराचं विमान. धावपट्टीवर अनेक विमानं दिसत होती. अंधार झाला होता. आम्ही पण आता थकून घ्या आम्हाला आत म्हणत वाट बघत होतो. थोडी काळजी होती, कदाचित nervousness. उद्यापासून हा असा अंधार आपल्याला दिसणार नाही, मध्यरात्रीपण उजेडच असेल हे माहीत असलं तरी नेमकं कसं असेल, ज्या फोटोंनी आपल्याला भुरळ घातली ते सगळं प्रत्यक्षात कसं असेल, काय काय नवीन बघायला मिळेल अशी अनेक स्वप्नं बघतच आम्ही शेवटी विमानात बसलो आणि The land of fire and ice कडे जायला विमान हवेत झेपावलं...

क्रमशः

भाग २

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle