आईसलँड - भाग २ - Reykjavik

भाग १

विमान आकाशात झेपावलं आणि मग आईसलँड कसं असेल यापेक्षा सृजन कधी झोपतो आणि पर्यायाने आम्ही कधी झोपू शकू यावर आमचं लक्ष केंद्रित झालं. मोजून ३ तासांचा प्रवास होता. तिथे उतरल्यावर परत सगळं सामान घेणे, गाडी घेणे, सिम कार्ड घेणे आणि हॉटेलवर पोहोचणे हे सगळे टास्क रांगेत उभे होते. आमच्या रात्री उशीरा निघून तिथल्या मध्यरात्री आम्ही पोचणार होतो. झोपेचं खोबरं होणार हे गृहित धरलेलं होतंच, पण त्यापूर्वी किमान तासभर डोळा लागला तर बरं असं वाटत होतं. पण सृजन अतीव चेकाळला होता आणि झोपायला तयारच नव्हता. तेवढ्यात हवाईसुंदर्‍या आल्या केक आणि सँडविच घेऊन. मग तो केक खाऊन आता झोपेल, मग झोपेल हे सगळं स्वप्नच राहिलं. अर्धा प्रवास होत नाही तोवर बाहेरचा उजेड दिसायला लागला. थोड्या वेळाने समुद्र दिसायला लागला आणि आम्ही उतरलो सुद्धा. उतरतानाच एका जागी जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर मी हेच ते प्रसिद्ध गीझर असं ठरवून टाकलं. प्रत्यक्षात ते वेगळंच होतं, त्याबद्दल नंतर. तर उतरून सामान घेऊन आता गाडी मिळायला बराच वेळ लागेल अशा मानसिक तयारीत आम्ही बाहेर आलो आणि समोरच आमच्या रेंटल कंपनीचं ऑफिस दिसलं. गर्दी पण नव्हती. सहसा बरंच चालून मग कुठेतरी या रेंटल गाड्यांचं ऑफिस शोधा, मग तिथून पुन्हा पायपीट करून गाडी शोधा हे सवयीचं. पण लगेच गाडी मिळाली आणि शिवाय ती आपण घरासमोर पार्क करू, तशी ज्या जागेवर आम्ही बसलो होतो, तिथून अवघ्या काही फुटांवर पार्क केली होती.

युरोपातली सिम कार्ड इथे चालायला हवीत पण आमचं काही चालत नव्हतं. याचा अंदाज होता आणि नेव्हिगेशन साठी नेट आवश्यक होतं त्यामुळे सिम कार्ड बद्दल माहिती काढून ठेवली होती. सृजनसोबत तिथेच तळ्यात-मळ्यात खेळून मी त्याला रमवलं, तोवर सुमेध सिम कार्ड घेऊन आला. गाडी कुठली बुक करायची यावर आमच्या बर्‍याच चर्चा झाल्या होत्या. या लहान गाडीत सामान बसलं नाही तर अशी मला शंका होती आणि सामान बसेल नक्की अशी सुमेधला खात्री होती. त्याचं म्हणणं खरं ठरलं आणि मीच सुटकेचा निश्वास टाकला.

हा होता Keflavik airport. Reykjavik ही आईसलँडची राजधानी. मुख्य शहरापासून अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर airport आहे. अवघे साडे-तीन लाख लोक अशी या देशाची लोकसंख्या. त्यातलेही बहुतांशी लोक हे Reykjavik आणि दक्षिण दिशेचा काही भाग यातच राहणारी. उत्तरेकडे अगदीच विरळ लोकवस्ती. युरोप आणि अमेरिका खंडाच्या मध्ये असलेला हा देश, तसाच आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरांनी वेढलेला. भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय दृष्टीने हा देश युरोपात गणला जातो आणि शेंगेन करारांतर्गत येतो. पण जिऑलॉजि च्या दृष्टीने या देशाचं वेगळं महत्व आहे. युरोप आणि अमेरिका यांच्या Tectonic plates इथे विभागल्या जातात. अनेक हिमनद्या आणि तिथेच जमिनीच्या आत दडलेले अनेक ज्वालामुखी अशा दोन अगदी विरुद्ध भौगोलिक परिस्थितीत इथले लोक राहतात. यासोबतच मिळालेलं Geothermal Energy चं वरदान. उत्तरेकडे असल्यामुळे इथल्या उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही आणि इथल्या हिवाळ्यात नावाला काही तास उजेड दिसतो. याबद्दल वेगवेगळ्या स्थळांच्या अनुषंगाने पुढच्या पोस्ट्स मध्ये अधिक माहिती येईलच.

गाडी मुख्य रस्त्याला लागली. अजिबातच गर्दी नव्हती, क्वचित एखादी गाडी आजूबाजूने दिसली. एका बाजूने समुद्र होता. त्याच्या पलीकडे सूर्य मावळल्याचं नाटक करायला चालला होता, तो लगेच परत उगवणार होता. एका बाजूला चंद्रकोरही अगदी स्पष्ट दिसत होती. समुद्राच्या बाजूने मोठाले डोंगर आणि त्यावर आदळणार्‍या लाटा किंवा वाळूचे किनारे या पेक्षा अतिशय वेगळे असे इथले किनारे दिसत होते. मातीची ढेकळं असावीत तसे दिसणारे. ओबडधोबड, रखरखीत. ईथल्या ज्वालामुखींची साक्ष देणारे. Lupin ही जांभळी फुलं ठिकठिकाणी वार्‍यावर डोलत होती. हवा फ्रेश होती. उंच गर्द झाडी कुठेच दिसत नव्हती. थोडीशी झुडपं फक्त. हा एक उगाच गाडीतून काढलेला फोटो.

.

अर्ध्या तासात Reykjavik मधल्या आमच्या हॉटेलवर पोचलो. ब्रेकफास्ट हॉटेल मध्येच होता आणि त्यासाठी ठराविक वेळेत उठणं होतंच, सृजनने ते काम चोख बजावलं. हवामानाचा अंदाज बघता अगदीच छान वाटत होतं. ब्रेकफास्ट केला आणि मग आवरून निघालो पहिल्या ठिकाणी - Hallgrimskirkja या Church कडे. भव्य आणि आधुनिक आणि इतरत्र कुठेही चर्चसाठी न पाहिलेलं स्थापत्य. हे चर्च उंचावर बांधलं आहे. या भागातून फिरताना सहज कुठूनही दिसू शकेल असं. लाव्हा थंड होऊन षटकोनी असे basalt rock तयार होतात, त्याच्याशी साधर्म्य दाखवणारी या चर्चची रचना आहे.

.

.

बाहेरच्या जागेत सृजनला पळायला मोकळं रान मिळालं आणि तो मनसोक्त इकडून तिकडे करत पळत होता. मध्येच एक मराठी लोकांचा घोळका उभा होता, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. चार पाच कुटुंबं आणि त्यांची मुलं. "अरे गाढवा, इकडे बघ ना" असं एक जण मुलांना म्हणत होती, काहींच्या क्रिकेट, कोहली अशा गप्पा रंगात आल्या होत्या. अमेरिका आणि युरोपातल्या भारतीय लोकांमध्ये सध्या आईसलॅंड पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे हे पुढेही अनेक वेळा दिसलं. थोडा वेळ खेळून आम्ही त्या चर्च मध्ये आत जाऊयात म्हणून गेलो तर ते प्रार्थनेची वेळ झाली म्हणून बंद केलं होतं. (ईथे नंतर येऊ म्हणत हे राहिलंच नंतर. पण आतली रचना ही फार सुंदर आहे असं वाचलं होतं.) मग तिथूनच डाऊनटाऊन मध्ये चक्कर टाकू म्हणून निघालो. आधी एक सुपरमार्केट दिसलं म्हणून तिथे गेलो, अंदाज घ्यायचा होता की काय मिळेल. तिथे उगाच पेकन पाय वालं एक चॉकलेट घेतलं, हा प्रकार तसा जर्मनीत दिसत नाही, म्हणून आम्हाला अप्रूप.

इथून दोन-तीन गल्ल्या जातात ज्या आपल्याला थेट समुद्रापाशी घेऊन जातात. या गल्ल्यांमध्ये बरीच दुकानं, रेस्टॉरंट्स आहेत. आता फोटो बघताना मला लक्षात येतंय की इथले फार कमी फोटो काढले पण हा फेरफटका फार आवडला. पर्यटकांची गर्दी अगदीच कमी होती. मधूनच एक साडीतली बाई पण दिसली, घाईत कुठेतरी चालली होती, अजूनही काही भारतीय चेहरे दिसले जे तिथेच राहणारे लोक असावेत असं वाटलं.

.

.

.

इथल्या दुकानांच्या गल्लीत फिरत पुढे समुद्रापाशी आलो. आणि विशेष लक्ष गेलं या उंच इमारतींकडे. युरोपातल्या जुन्या स्थापत्याला डोळे तसे सरावले आहेत, या आधुनिक इमारती कदाचित त्यामुळेच आमच्या अगदी मनात भरल्या.

.

.

.

.

इथे सृजनला दगड घ्यायचे आणि समुद्रात फेकायचे एवढंच करायचं होतं (हे पुढे माझ्या प्रत्येक पोस्ट मध्ये येईल.) किंवा मग या उंच दगडांवरून चालायचं होतं. चालत चालत मग पुढे या कलाकृतीपाशी आलो. Solfar Sun Voyager - a dreamboat, or an ode to the Sun.

.

थोडा वेळ थांबून भूक लागली आणि चर्च आता पुन्हा उघडलं असेल तर तिथे पण जाऊ म्हणून निघालो. काहीतरी खायला घेऊ म्हणून बघत होतो पण सृजन आता अर्धवट झोपेमुळे चिडचिडा झाला होता. एका ठिकाणी सहज मेन्यू पाहिला तर ईंडियन व्हेजीटेबल्स सूप दिसलं. नंतरही भारतीय पदार्थांची नावं सतत दिसली, कदाचित ब्रिटन आणि कॅनडा दोन्ही तसं जवळ असल्यामुळे की काय असं वाटलं. व्हेज पिझ्झा पण होता. इथे थांबून खाऊ असा विचार केला. पण तेवढ्यात सृजनची अवस्था बघून आम्ही फक्त ज्यूस पिऊन सरळ हॉटेलकडे मोर्चा वळवून आराम केला. उठून मग निघालो या Perlan Museum कडे.

.

एका टेकडीवर उभं असलेलं हे संग्रहालय. ईथून संपूर्ण Reykjavik शहराचा देखावा बघता येतो. शिवाय तुमच्या हातात असणार वेळ आणि आवडीप्रमाणे आतलं Planetarium, आईस केव्ह्ज, आईसलँडच्या निसर्गाबद्दल रोचक माहिती देणारी काही प्रदर्शनं यातून काही ठराविक कॉम्बिनेशन निवडता येतात. आम्ही Planetarium चं तिकीट काढून ठेवलं होतं. ईथे २० मिनीटांची एक फिल्म दाखवली जाते. सृजनसोबत मोठ्या स्क्रीनवर काही बघण्याचा हा पहिलाच अनुभव, त्यातही ती अर्धगोलाकार स्क्रीन. ऑरोरा लाईट्स, ज्वालामुखी, बर्फ या सगळ्याबद्दल मनुष्याला आकर्षण आहे, आईसलँडचा निसर्ग, त्यातलं टोकाचं वैविध्य याबाबत यात माहिती दिली जाते. मोजून दहा बारा लोक होते. एका जागी सृजन बसेल का असा प्रश्न होता, पण फिल्म गुंतवून ठेवणारी होती, चांदण्या, चंद्र, आकाश, बर्फ हे त्याच्या ओळखीचं जग अशा स्क्रीन वर बघायला त्यालाही आवडलं. सगळ्यात शेवटी क्रेडिट्स मध्ये Lead Actor म्हणून The mother nature असं दिसलं ते तर फारच आवडलं. त्यानंतर इथल्या टेरेस वर गेलो, तिथून दिसणारा शहराचा देखावा पण छान होता. पण भयंकर वार्‍यामुळे फार वेळ थांबलो नाही. घरी येऊन सोबत आणलेल्या खाऊवर पोटोबा भरले. इथूनही डावीकडे दूरवर Hallgrimskirkja Church दिसत होतं.

.

.

.

मग वेळ होता म्हणून पाट थोडा वेळ या समुद्रापाशी टाईमपास केला. एका बाजूला Harpa सेन्टर आहे. तिथे सहज एक चक्कर मारून आलो. इथे काही Guided Tour असतात पण आम्हाला त्यात फार रस नव्हता. याच्याही स्थापत्यात basalt column ची प्रेरणा आहे.

.

.

हे सगळं म्हणजे आइसलँडची तोंड ओळखही नव्हती. प्रवासातला थकवा असल्याने रात्रभर दिसणाऱ्या सूर्याने आमच्या झोपेवर अजून फार परिणाम झाला नव्हता. वेळेचा बदल आता जरा सवयीचा झाला होता. थंडी पण फार वाटत नव्हती. उद्यापासून आता खरी रोड ट्रीप चालू होणार होती. Icelandic Magic म्हणजे काय याचा प्रत्यय आता पुढे येणार होता.

क्रमशः

भाग ३

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle