रूपेरी वाळूत - २

भाग - १

नोरा आंघोळ करून केसांना टॉवेल गुंडाळून बाहेर आली तेव्हा कुठे जरा तिच्या जीवात जीव आला. आज गायीने खूपच दमवले होते. गर्मीने जीव जात होता म्हणून तिने शॉर्ट्स आणि एक क्रॉप टॉप चढवला. घरातले सगळे बेकरीतल्या सामानाची आवराआवर करायला गेले होते. आज काही लाईट यायचा सवालच नव्हता त्यामुळे तिने मेणबत्ती लावून खिडकीत ठेवली आणि बेडवर आडवी झाली. एकदम तिच्या डोळ्यासमोर दारात उभा राहिलेला पलाश आला. त्याच्यात काहीही बदल नव्हता, अगदी लहानपणी होता तसाच! उंच, गोरा, थोडे कुरळे वेव्ही केस आणि लाडावलेला गब्दुल! शेवटचा पॉईंट मात्र आता चांगलाच बदलला होता. सगळं बेबी फॅट जाऊन आता एकदम चीझल्ड बॉडी दिसत होती. ऍब्ज तर आहा!

श्श.. नोरा स्टॉप! म्हणून तिने स्वतःलाच चिमटा काढला. लहानपणी नाईकांच्या कुंपणाच्या भिंतीवर चढून तिने कितीतरी कैऱ्या पळवल्या होत्या. ती हलकी म्हणून तिला वर चढवून मायकल खाली थांबून कैऱ्या कॅच करायचा. कोणी पाहिलं की पहिला तो पळून जायचा आणि पाठोपाठ नोरा! पकडणाऱ्याला ती कधीच सापडायची नाही पण एकदाच ती दगडाला अडखळून पडली आणि अलगद पलाशच्या हाती लागली. तिचा हात धरून तिला उभी करून मग त्याने पाठीत दोन सणसणीत धपाटे घातले होते. तेव्हापासून ती परत कधीच कैऱ्या पाडायला गेली नाही. शाळेतसुद्धा तो कुठे दिसलाच तर ती त्याला मुद्दाम वेडावून किंवा तोंड वाकडं करून दाखवायची पण त्याचं कधी तिच्याकडे लक्षच गेलं नाही. आठवीपासून तर तो मुंबईच्या शाळेत शिकायला गेला त्यामुळे नंतर काहीच ओळख राहिली नव्हती. सगळे प्रसंग आठवता आठवता झोप लागून ती चक्क घोरायला लागली.

नोss रा, नोss रा कुठून तरी परग्रहावरून आवाज येत होता. ती डोळे चोळत उठली. संध्याकाळ झाली होती आणि वादळ थांबले होते. खालून दार जोरजोरात ठोकल्याचा आवाज येत होता. खिडकीतून वाकून पाहिले तर खाली डॅडी, ममा हातात सामानाच्या पिशव्या घेऊन उभे होते आणि माया जोराने दार वाजवत होता. "अगे बाय माझे, लवकर ये. पाय मोडले माजे." ममा तिच्याकडे वर बघून ओरडली. ती भानावर येऊन आलेंss ओरडत खाली गेली. "काय झोपली का काय डॉक्टरीण बाई?" माया आत येताच ओरडून म्हणाला. " खराच झोपले होते." ती ममाच्या हातून पिशव्या घेत म्हणाली. मायकल हातातलं सामान खाली ठेऊन सोफ्यावर जाऊन आडवा झाला.

"ममा जेवायला काय आहे?" त्याने पडल्या पडल्या विचारले.

"आंब्याचा सासम, मच्छी कडी, भात. पायजे तर मच्छी बरोबर एक पोई खा." ममा घाम पुसत सोफ्यावर बसत म्हणाली.

"व्हॉट मॅन! सेम दुपारचाच." तो वैतागून म्हणाला.

"हां इते पावसात तुजा आजा येनार हां वरसून जेवण करायला! गपचिप खा." ममाच्या वाढलेल्या आवाजाने लगेच काम केलं आणि सगळ्यांची जेवणं झाली. नोराने डॅडीबरोबर बसून बेकरीतल्या पुढच्या ऑर्डर्स आणि उपलब्ध कच्च्या मालाचा हिशेब केला.

"माया, येत्या बुदवारला ब्लू लगूनची ऑर्डर आहे. विसरू नको. जाशील ना?" डॅडी नेहमीप्रमाणे कामापुरते बोलले.

"मला आता गॅरेजमध्ये मोप काम असेल, नाय जमणार." मायकल बेसिनवर हात धुता धुता म्हणाला.

"अरे पण अजून आठवडाभर तर कोण गडी नाय, पोदेर पण नाय. सगळे आपापली घरा नीट करत असतील." ते विचारात पडले आणि अचानक त्यांनी नोराकडे पाहिले.

"चेडवा, तू जाशील काय? प्लीज!" त्यांनी म्हटल्यावर ती जरा विचारात पडली. परत पलाशचं माजोरडं तोंड बघावं लागणार.. शेवटी हो नाही करत ती हो म्हणाली.

"तुमी दोगे ट्वीन असून एवढे वेगळे कशे झालात रे!" डॅडी हसून म्हणाले.

नोरा हसायला लागली आणि माया नॅपकिन खुर्चीवर फेकून तरातरा त्याच्या खोलीत निघून गेला.

---

पुढचे पाच दिवस वादळानंतर विस्कळीत झालेले जीवन ठीकठाक आपापल्या जाग्यावर आणण्यात कुठेच निघून गेले. रात्री डॅडीने ब्लू लगूनच्या ऑर्डरची यादी तिच्या हातात ठेवली तेव्हा तिला उद्याचा बुधवार आठवला. सकाळी लवकर उठून सहा वाजता बेकरीत जाऊन तिने ऑर्डरचे प्रत्येकी तीस बर्गर बन्स, उंडो आणि पोई खाकी कागदात बांधून दोन कॅरीबॅगमध्ये ठेवून त्या बुलेटच्या हँडलला दोन्ही बाजूना अडकवल्या. टॉप बॉक्स आधीच तिच्या मेडिकल किटने भरलेला होता. तिच्या व्हाइट हिमालयनला मॅचिंग हेल्मेट मायाने गिफ्ट केले होते. हेल्मेटवरचे पाणी निपटत तिने डोक्यात घातले आणि एक खोल श्वास घेऊन किक मारली. पाऊस नुकताच थांबल्यामुळे अजून फार कोणी रस्त्यावर उतरले नव्हते.

खूप दिवसांनी असा निवांत, पावसाने धुवून काढलेला नितळ डांबरी रस्ता तिला सापडला होता. एकीकडे हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला फुफाणलेला समुद्र असताना थंड, खाऱ्या वाऱ्यात तिची बुलेट मजेत वळणे घेत जात होती. सकाळीच शॅम्पू केलेले सरळ रेशमी केस वाऱ्यावर उडत होते. ती ब्लॅक ट्रेगिंग्ज, वर ब्लॅक रेसरबॅक आणि त्यावर नेहमीप्रमाणे बाह्या फोल्ड केलेला शेवाळी रंगाचा शर्ट, पायात ब्राऊन लेदरचे फ्लॅट सँडल्स अश्या तिच्या रोजच्याच युनिफॉर्ममध्ये होती. फक्त आज तिने कॅज्युअली शर्टची बटन्स उघडी ठेवली होती त्यामुळे तो केपसारखा तिच्या मागे उडत होता.

ब्लू लगूनचा किनाऱ्यावर काँक्रीट आणि काचांनी बांधलेला निळा गोल तिला टेकडीच्या खाली दिसायला लागला. एका वळणाचा रस्ता संपताच ती ओल्या पांढऱ्या वाळूत गेटपाशी आली. तिने बाईक थांबवायच्या आतच गार्ड गेट उघडताना दिसला म्हणून तिने आत पाहिले. लांबून तिला पलाशची थार वेगात येताना दिसली. तो गेटबाहेर येताच तिने अचानक वेग वाढवून बुलेट त्याच्या गाडीसमोर आडवी नेऊन थांबवली आणि आरामात खाली उतरून हेल्मेट काढून स्वतः सीटला टेकून उभी राहिली. पलाशने कच्चकन ब्रेक लावून गाडी थोडी स्लीप होताहोता वाचवली, त्याचे कपाळ आठयांनी भरून गेले होते. अतिशय चिडून त्याने जोरात दोनतीनदा हॉर्न वाजवला. समोर ती खांदे उडवून तशीच उभी राहिली. मुंबईहून सेमिनारसाठी येणाऱ्या पंचवीस लोकांच्या ग्रुपला रिसिव्ह करायला तो निघाला होता. ही पोरगी मध्येच आल्याने राग अनावर होऊन तो खाली उतरला. पटकन तिच्या समोर पोहोचून काही बोलणार तोच तिने नजर बुलेटपलीकडे फिरवली. तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याने वाळूत ती बघत असलेल्या ठिकाणी पाहिले. लहान मुलाच्या तळहाताएवढी गुटगुटीत पन्नासेक कासवाची पिल्ले ओल्या वाळूतून समुद्राच्या दिशेने लुटुलुटू चालत जाऊन लाटेत उडी घेत स्वतःला समुद्रार्पण करत होती. "ऑलिव्ह रिडले." ती कासवांवरची नजर न हटवता म्हणाली.

तो राग विसरून आश्चर्याने पिल्लांकडे पहात राहिला. रिसॉर्ट सुरू होऊन एक वर्ष झालं तरी त्याला या पाहुण्यांचा पत्ताच नव्हता. नकळत कासव पकडायला त्याने पाऊल पुढे टाकलेच होते पण तिने पटकन त्याचा हात धरून मागे ओढला आणि घट्ट धरून ठेवला. एकामागोमाग एक सगळी पिल्लं गायब झाल्यावर त्याने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले. न कळून काही सेकंद ती त्याच्या नेव्ही ब्लू शर्टचे प्रतिबिंब पडलेल्या नितळ राखाडी डोळ्यात पहात राहिली आणि त्याने तिरकस हसत तिची लांबसडक बोटे गुंतलेला हात वर करून दाखवला तेव्हा घाईघाईने हात सोडवून घेऊन त्याच्याकडे अजिबात वळून न बघता पावांच्या पिशव्या घेऊन गेटच्या आत शिरली.

ती आत जाऊन रिसेप्शनमधल्या गुबगुबीत सोफ्यावर बसली तरीही तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके जागेवर यायचं नाव घेत नव्हते. अजूनही तिला त्याने लावलेल्या डार्क मिस्टीरिअस पर्फ्यूमचा सुगंध जाणवत होता. मोस्ट प्रॉबब्ली ब्लॅक ओपियम असणार. शीट! किती मूर्खपणा.. शरमेने आरक्त झालेले गाल दोन्ही तळव्यांनी चोळून ती नॉर्मलला यायचा प्रयत्न करत होती. रिसेप्शनमागे कोणीच नव्हते. तिने हळूच दाराबाहेर पाहिले तेव्हा बाहेर एकुलता एक गार्ड सोडता चिटपाखरूही नव्हते.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: