जर्मनीतलं वास्तव्य

२०१२ साली जर्मनीत नवीन संसार चालू करायचा म्हणून आले, तेव्हा आनंदा बरोबरच एक अनिश्चितता होती. इथे आयुष्यभर राहायचं नाही असं पक्कं ठरवूनच आले होते, पण हा अनुभव घ्यायला तेवढीच उत्सुक होते. भाषा शिकणे, नोकरी, युरोपात फिरणे, मग सृजनचा जन्म असे एकेक टप्पे पार झाले. घराबाहेर अनेक वर्ष राहत असूनही, देशाबाहेर राहणं ही पूर्ण वेगळी गोष्ट होती हे बरंच नंतर जाणवलं. कल्चर शॉकच्या नियमाप्रमाणे सुरूवातीला खूप आवडलेल्या काही गोष्टी नंतर अगदीच नावडत्या झाल्या, तर काही पूर्ण उलटे अनुभव पण आले. मधल्या काळात मग काही वेळा टोकाची मतं बनत गेली आणि पुन्हा काही नवीन अनुभवांनी ती थोडी मवाळही झाली. चांगले वाइट अनुभव घेत आम्ही इथे रुळत गेलो. इथे येऊनच हौस म्हणून ब्लॉग चालू केला होता. २०२० मध्ये इथल्या अनुभवांबद्दल जरा सलग लिहून काढूयात असा विचार केला. मला माझ्या मर्यादित आवाक्यातून समजलेलं जीवनमान, इथे भेटलेले लोक, कामाच्या पद्धती, सण-संस्कृती, आवडत्या जागा, ऋतूमान, शिक्षणपद्धती या आणि इतरही प्रवासाबद्दलची ही लेखमालिका.

---------

बरोब्बर आठ वर्षांपूर्वी याच दरम्यान, म्हणजे १५ जुलैला मी जर्मनीत पोचले. जर्मन भाषा शिकतानाच्या सुरुवातीलाच "तुम्ही जर्मनीत का आलात?" हा प्रश्न हमखास असतो. मी आले ते लग्नाच्या निमित्तानेच. हे त्याचं साधं सरळ उत्तर होतं.

परदेश काही माझ्यासाठी नवीन नव्हता. पूर्वेकडचा जपान तर युरोपातलाच राणीचा देश, यांची महिना-दोन महिन्यांच्या वास्त्व्यात तोंडओळख झाली होती. हे दोन्ही देश बरेचसे परस्पर विरोधी अनुभव देणारे होते, पण भारताच्या तुलनेत बघायला गेलं तर त्या दोन्हीकडे बरंच साम्य सुद्धा होतं. त्यामुळे स्वच्छता, कमी रहदारी हे बघून एकदम दचकायला होत नव्हतं. जर्मनीला एका सुट्टीत महिनाभर राहिले होते, पण तेव्हा नवर्‍याच्या होस्टेल आणि स्टुडंट लाइफमध्ये सगळं वेगळं जग होतं. मग २०१२ ला इथे आल्यानंतर हा पूर्ण वेगळा प्रवास चालू झाला, कारण तेव्हा भारतातली नोकरी सोडून, इथे नवीन संसार चालू करायचा म्हणून आले, तेव्हा आनंदा बरोबरच एक अनिश्चितता होती. इथे आयुष्यभर राहायचं नाही असं पक्कं ठरवूनच आले होते, पण हा अनुभव घ्यायला तेवढीच उत्सुक होते.

२०१२ मध्ये आताच्या तुलनेत अगदीच कमी भारतीय होते. सुमेधचं ब्रेमेन मधलं शिक्षण संपवून, मग नोकरीसाठी म्हणून 'मानहाइम' हे आमचं पाहिलं वास्तव्याचं गाव. तिथे कुणीही ओळखीचं नव्हतं, सुमेध त्या कंपनीतला पहिलाच भारतीय होता. फेसबुक, ऑर्कुट किंवा इतरही ओळखींमधून या गावात किंवा आजूबाजूला राहणारी एकही व्यक्ती 'तेव्हा' माहीत नव्हती. नवऱ्याचं शिक्षण पूर्ण इंग्रजीतून आणि त्याच्या सोबत असलेले काही भारतीय विद्यार्थी, इतरही आंतर्राष्ट्रीय लोक यांच्याशीच तोवर त्याचा संबंध जास्त आला होता, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी नवीनच असणार होत्या. इथे येताना खास जर्मन संस्कृती, इथले लोक, वेगवेगळी गावं याची मलाही तशी विशेष माहीती नव्हती. जर्मन लोकांचा वक्तशीरपणा, अफाट प्लॅनिंग, तांत्रिक क्षेत्रातलं वर्चस्व, महायुद्ध याबाबतीत थोडंफार वाचून, ऐकून होते, नंतर सुमेध कडून त्याचे युनिव्हर्सिटीतले अनुभव ऐकले होते.

लग्न म्हणजे दोन कुटुंबियांचं नातं यासारख्या लग्नपत्रिकेतल्या गोष्टी बघताना वाटतं, की कुठल्याही मुलीने सासरी राहताना सुरुवातीला येणारं दडपण म्हणा किंवा हळूहळू ते घर, गाव आपलंसं करून घेणं ही प्रोसेस हळूहळू चालू असते. जेव्हा तुम्ही नव्या देशात संसार करायला जाता, तेव्हा हा देश हेही एक पूर्ण नवीन नातं असतं, इथले लोक, इथेच भेटणारे भारतीय मित्र मंडळ जे नंतर तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग होतात, इथल्या जीवनमानाच्या पद्धती, हवामान, हेही सगळं अंगवळणी पडायला वेळ जावा लागतो. इथे अर्थात बरेचदा हे सगळं नवरा-बायको दोघांसाठीही नवीन असतं, आणि या सगळ्यात रुळायला प्रत्येकालाच कमी-अधिक वेळ लागू शकतो, ते व्यक्तीप्रमाणे बदलतं.

मला भाषा जुजबी येत होती, पण अजून शिकावं लागणार हेही माहीत होतं. अनेक वर्षांची आमची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप संपण्याचा आनंद होता. आजवर दोघंही स्वतंत्रपणे राहात होतो, तर आता जरा काही जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलू असा विचार होता. माझ्या दोन बॅग्ज, सुमेधच्या २ बॅग्ज आणि थोडंफार फर्निचर असलेलं एक घर इतक्यावर संसार चालू होणार होता. हे म्हणजे मला अगदी जुन्या काळात कुणीतरी आजी आपल्याला तिच्या संसाराची गोष्ट सांगते आहे असं वाटत होतं.

घराबाहेर अनेक वर्ष राहत असूनही, देशाबाहेर राहणं ही पूर्ण वेगळी गोष्ट होती हे बरंच नंतर जाणवलं. भाषा, घरशोध, सोशल लाइफ, भारतीय ग्रोसरी, अनेक प्रश्न होतेच. कल्चर शॉकच्या नियमाप्रमाणे सुरूवातीला खूप आवडलेल्या काही गोष्टी नंतर अगदीच नावडत्या झाल्या, तर काही पूर्ण उलटे अनुभव पण आले. मधल्या काळात मग काही वेळा टोकाची मतं बनत गेली आणि पुन्हा काही नवीन अनुभवांनी ती थोडी मवाळही झाली.

इथे येऊनच हौस म्हणून ब्लॉग चालू केला. त्यात योगायोगाने प्रवासवर्णनं जास्त लिहीत गेले, काही पोस्ट मधून कधी इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर कधी भाषेच्या गमती, वेगवेगळ्या पोस्ट लिहील्या. आठ वर्ष झाले म्हणून मागच्या आठवड्यात जेव्हा हा भूतकाळ आठवत बसले, तेव्हा त्यातले अनुभव, तेव्हापासून तर आतापर्यंत माझ्यातलेच झालेले अनेक बदल हे सगळं ओघाने आठवलं. तेव्हा इथल्या अनुभवांबद्दल जरा सलग लिहून काढूयात असा विचार केला. मला माझ्या मर्यादित आवाक्यातून समजलेलं जीवनमान, इथे भेटलेले लोक, कामाच्या पद्धती, सण-संस्कृती असे अनेक विषय डोक्यात आले. अजून दहा वर्षांनी मलाच वाचता येईल पुन्हा हा एक स्वार्थ. (चुकाही दिसतीलच त्यातल्या कारण हे माझं नेहमीच होतं की जुनं काही वाचताना कधी शुद्धलेखन तर कधी लिखाण यातले दोषच दिसतात) पण त्या निमित्ताने माझा आळस दूर सारून, स्वतःलाच काही डेडलाईन घालून देऊन हे करूयात असा विचार केला, त्याचीच ही पाल्हाळिक सुरुवात...भेटूयाच पुढच्या पोस्ट मध्ये...

क्रमशः

Keywords: 

जर्मनीतलं वास्तव्य - स्कूल चले हम - जर्मनीतला शाळाप्रवेश - Einschulung

जर्मनीत आल्यानंतर काही वर्ष इथल्या शिशूवर्ग ते पुढे माध्यमिक शिक्षण, या शैक्षणिक व्यवस्थेची काही विशेष माहिती नव्हती. सुमेध आला तो उच्च शिक्षणासाठी, त्यामुळे तो अनुभव पूर्ण वेगळा होता. सृजन मुळे या सगळ्याबद्दल हळूहळू शोधाला सुरूवात झाली, मग त्यातून नवीन माहिती, अनुभव येत गेले. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरूवात कशी होते, काय नियम आहेत, शाळांचे कसे प्रकार आहेत इथपासून तर मग प्रवेशप्रक्रिया, भाषा, विषय कोणते, लोकांची मानसिकता अश्याही विविध बाजू कमी अधिक प्रमाणात समजायला लागल्या, आणि नव्याने समजत आहेत. आधी डे केअर आणि मग किंडरगार्टन असा प्रवास करून, आता यावर्षी सृजन पहिलीत गेला. या आधीच्या प्रवासाबद्दल पण शेअर करण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याबद्दल लेख पूर्ण झालेला नाही. पण पहिलीतला प्रवेश हा इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याबद्दल तरी वेळच्या वेळीच लिहावं म्हणून शाळाप्रवेशाबद्दल -

किंडरगार्टन (Kindergarten) म्हणजेच वय वर्ष तीन ते सहा यासाठी असलेली शैक्षणिक संस्था. किंडर म्हणजे लहान मुलं (मुलं मुली सगळेच) आणि गार्टन म्हणजेच गार्डन. थोडक्यात लहान मुलांचे खेळण्याचे ठिकाण असंही म्हणू शकतो. वय वर्ष तीन नंतर मुलं इथे जाऊ शकतात, पण हे ही कंपलशन नाही. काही मुलं जी त्या आधी डे केअर ला जातात, ती तीन वर्षांची झाली की किंडरगार्टन मध्ये जातात. तर काही मुलं तीन वर्षापर्यंत घरीच थांबून मग किंडरगार्टन मध्ये जातात, काही थोडी उशीरा सुद्धा. यात पण अर्धवेळ, पूर्णवेळ अश्या विभागण्या असतात. या तीन ते सहा वर्ष दरम्यान सुद्धा तिथे मुख्य उद्देश हा मुलांचा अभ्यास, शिकवणे हा नसून, फक्त खेळणे बागडणे आणि त्यातून हसत खेळत शिक्षण असाच असतो. नुसतं कसेही खेळ असं नाही, ठरलेल्या वेळेत तिथे नेऊन सोडलं की त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम असतात, ज्यात मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात, हवामान कसंही असेल तरी रोज बाहेर खेळवलं जातं. पण एका वर्गात बसून शिकवणे, फळ्यावर काही शिकवणे, गृहपाठ, लिखाण, पाठांतर, मूळाक्षरं गिरवणे यातलं काहीच नसतं. पण रोज चित्र रंगवणे, गाणी, गोष्टी, मैदानी खेळ या सगळ्या केल्या जातात.

सहा वर्ष पूर्ण झाले की खरी शाळा सुरू होते, पहिली ते चौथी ही प्राथमिक शाळा. (यात प्रत्येक राज्यांचे नियम वेगळे आहेत आणि काही ठिकाणी साडे पाच तर काही ठिकाणी सहाच्याही नंतर मुलांना पहिलीत प्रवेश मिळतो). मग एका जागी बसून सलग तास सुरू होतात, मुळाक्षरं, भाषा, गणित या विषयांचं शिक्षण सुरू होतं, गृहपाठ दिला जातो. आणि पहिलीतला शाळा प्रवेश हा मुलांसाठी खूप मोठा टप्पा मानला जातो, कारण विद्याभ्यासाची सुरूवात पहिलीत होते. बालपण संपून विद्यार्थीदशा सुरू होते.

मुल शाळेत जाण्यासाठी रेडी आहे का यासाठी त्यांना किती लिहीता येतं, किती आकडे येतात, किती पाठांतर आहे यातलं काहीही बघितलं जात नाही. त्या ऐवजी मुलं स्वतःचे स्वतः कपडे घालू शकतात का, नीट खाऊ शकतात का, चित्र काढताना पेन्सिलची ग्रिप नीट आहे का, मोटोरिक स्किल्स वयाप्रमाणे योग्य आहेत अश्या सगळ्या बाजू बघितल्या जातात. त्यासाठी बर्‍याच ठिकाणी आरोग्य विभागातून लहान मुलांचे डॉक्टर पण नेमले जाऊ शकतात किंवा मग किंडरगार्टन मधल्याच लोकांकडून हे केलं जातं. तिथले सगळेच कर्मचारी यासाठी प्रशिक्षीत असतात. भाषा हा एक आमच्या सारख्या बाहेरून इथे आलेल्या लोकांसाठी महत्वाचा मुद्दा असतो, काही मुलांना जर्मन भाषा तेवढी नीट येत नसेल तर त्यांना थोडी मदत पण केली जाते. पण हे प्रत्येक गाव, शहराप्रमाणे बदलू शकतं. यातले अनुभव वेगवेगळे असू शकतात.

किंडरगार्टन मध्येच असताना एक वर्ष आधीपासून या मुलांना शाळेची पूर्वतयारी म्हणून मिळून काही प्रोजेक्ट्स, काही activities घेतल्या जातात. हे सुद्धा आठवड्यातून एक दिवसच. म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची तयारी होते, पण त्याच बरोबर मूळ किंडरगार्टन मधल्या बाकी उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहतो. या मुलांना आता तुम्ही मोठे आहात, लवकरच शाळेत जाणार याची पूर्वतयारी केली जाते. यातलं कोणतंच काम घरी पालकांना दिलं जात नाही, जे काही आहे ते सगळं तिथेच होतं.

प्रत्येक गावात जवळपास प्राथमिक शाळा म्हणजेच पहिली ते चौथी इयत्ता या शाळा असतात. आपण जिथे राहतो तिथून सगळ्यात जवळची शाळा आपल्याला अलोकेट होते. जर कुणाला मुलांना प्रायव्हेट शाळेत घालायचं असेल, किंवा ऑफिस जवळ आहे म्हणून वेगळी शाळा निवडण्याचं स्वातंत्र्य असतं, पण मुख्यत्वे जवळचीच शाळा घेण्याकडे पालकांचाही कल असतो. यातल्या बहुतांशी शाळा या सरकारी शाळा असतात. तिथे कोणतीही वेगळी फी आकारली जात नाही. शाळेतच शाळा संपल्यानंतर पुढचा काही वेळ तिथेच थांबायचं असेल, तर त्यासाठी आणि जेवण हवं असेल तर त्याचे पैसे प्रत्येक शाळा, गाव या प्रमाणे बदलतात. प्रायव्हेट शाळा अगदी कमी, त्यांची फी वेगळी असते. आणि इंटरनॅशनल शाळा अजून वेगळ्या, त्यांच्या फीज, प्रवेशप्रक्रिया हे पूर्ण स्वतंत्रपणे केलं जातं.

शैक्षणिक वर्ष प्रत्येक राज्याच्या नियमांप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर या दरम्यान सुरू होतं. जुलै-ऑगस्ट दरम्यान उन्हाळी सुट्ट्या आणि त्या झाल्या की मग नवीन शाळेचं वर्ष चालू होतं. आपण राहतो तिथल्या नियमांनुसार त्या वर्षी शाळेत जाणार असेल, तर तसं पत्र घरी येतं. शाळा आपण निवडली की मग तिथेच अ‍ॅडमिशन होते. कोणतंही डोनेशन लागत नाही. या सगळ्या नियमांना काही अपवाद सुद्धा असतात, पण तो या लेखाचा विषय नाही.

किंडरगार्टन मध्येही या शाळेत जाणार्‍या मुलांना सेंड ऑफ दिला जातो. गिफ्ट्स दिली जातात. आजी आजोबा मावश्या आत्या अश्या सगळ्याच परिवारात याबाबत उत्सुकता असते. शाळा प्रवेशाचा पहिला दिवस जोरदार साजरा होतो. याला Einschulung म्हणजेच शाळाप्रवेश असा शब्द वापरला जातो. त्या दिवसाच्या काही खास प्रथा आहेत. ज्या सोमवारपासून शाळा चालू होणार, त्याच्या आधीचा शुक्रवार किंवा शनिवार हा या सेलिब्रेशन साठी असतो. शाळेकडून तसं निमंत्रण येतं.

त्या आधीपासून दुकानांमध्ये शाळेची तयारी म्हणून एकेक सेक्शन्स भरायला लागतात. सगळ्या शाळासामानाच्या गोष्टी असतातच, पण अनेक खास या पहिल्या वर्गासाठीच्या गोष्टी पण असतात. मोठ्या पेन्सिली, A, B, C लिहिलेल्या अनेक गोष्टी, या पार्टीच्या डेकोरेशनच्या गोष्टी, एक ना अनेक. या थीम चे केक केले जातात. याच थीम वरची चित्र असलेली पुस्तकं दिसतात. वेगवेगळ्या गोष्टींच्या पुस्तकातून शाळेबद्दल मुलांना माहिती दिली जाते.शाळेच्या तयारीसाठी लागणार्‍या वस्तूंची यादी मिळते, तीही खरेदी होते. शाळेची मुख्य बॅग असतेच, ती खरेदी हा पण एक मोठा कार्यक्रम असतो. या बॅगच्या किमती बघून धडकायला होतं, त्या खरंच महाग असतात, पण मग योग्य वेळी ऑफर वर लक्ष ठेवून त्यातल्या त्यात चांगली आणि तरी वाजवी किमतीत मिळणारी बॅग शोधावी लागते. दुकानांमध्ये त्या बॅग घेण्यासाठी, कोणती बॅग घ्यावी यासाठी मार्गदर्शन करणारे लोक पण असतात.

पण पहिल्या दिवसासाठी सगळ्यात महत्वाची असते ती शूलट्युटं (Schultüte). एक कागदी कोन शेप बॅग किंवा पुडा म्हणूयात. याला पूर्वी ZuckerTüte म्हणजेच साखरपुडा पण म्हणायचे, आणि मुलांना शाळेत जाताना छान वाटावं म्हणून त्यात गोड चॉकलेट गोळ्या भरून दिले जायचे. काळाच्या ओघात त्यातही बदल झाले, आणि अनेक वर्षांपासून ही Schultüte म्हणूनच ओळखली जाते. अगदी सुरूवातीला इथे दुकानात हे नुसते कोन बघून मला या वाढदिवसाच्या टोप्या इतक्या मोठ्या का आहेत असा प्रश्न पडला होता. मग कुठेतरी वाचून याबद्दल कळले तेव्हा उलगडा झाला. ही शाळाप्रवेशाचं एक प्रतिक आहे. त्यात शाळेच्या गोष्टी, गोळ्या बिस्कीटं चॉकलेट्स असं काय काय भरलं जातं. आताच्या मुलांची आवडती कार्टुन कॅरेक्टर्स असलेल्या बॅग पण मिळतात. काही प्लेन मिळतात ज्या मग मुलांसोबत मिळून सजवता येतात. मग यात चॉकलेट्स, इतर गोड पदार्थ, शाळेत लागणार्‍या वस्तू हे मुलांच्या अपरोक्ष आई बाबा आणि इतरही परिवाराकडून आलेली गिफ्ट्स एकत्र करून भरले जातात.

तर यावर्षी सृजन पहिलीत गेला. तशी तयारी मागच्या वर्षीपासूनच किंडरगार्टन मध्ये सुरू झाली. जून जुलै मध्ये किंडरगार्टन मधले सेंड ऑफ झाले. मग सुट्ट्या लागल्या आणि आम्ही पण शाळेची बॅग, Schultüte या तयारीला लागलो. त्याच्याच आवडीने त्याने एक कोन निवडला, प्लेन निवडून तो आपण रंगवू, सजवू असं माझ्या डोक्यात होतं, म्हणजे त्यालाही त्यात मजा वाटेल. पुढच्या वर्षीपासून काही हे सगळं नसेल, मग यावर्षी हौस पुरवून घेऊ म्हणून त्यात भरायला मी अगदी उत्साहाने भरपूर खरेदी केली. स्टिकर्स वापरून त्याच्यासोबत आम्ही ती शूलट्युटं बाहेरून सजवली. सृजनला आमच्या जर्मन शेजार्‍यांकडून पण खास गिफ्ट्स मिळाले होते, तेही मग या Schultüte मध्ये टाकले. उरलेल्या मी आणलेल्या सगळ्या वस्तू त्या बॅगेत भरून मग शाळेत निमंत्रण होतं त्या दिवशी सृजन सोबत आम्ही ठरलेल्या वेळी शाळेत गेलो. सगळी मुलं आपापल्या मोठ्या बॅग घेऊन मिरवत होती. जायच्या एक दिवस आधी थोडी भीती वाटते असंही सृजन म्हणाला होता, पण उत्सुकता त्यापेक्षा खूप जास्त होती. यात तुम्ही काय भरलं आहे हा प्रश्न आधी हजार वेळा विचारून झाला होता आणि ती हातात घेऊन निघाल्यावर दुसर्‍याच मिनिटाला सृजनने Schultüte खूप जड आहे असं सांगितलं. कार्यक्रमाला पालक तर होतेच, पण खास यासाठी आलेले आजी आजोबा आणि इतरही कुटुंबातले जवळचे लोक तिथे होते. पालकांच्या डोळ्यात मुलांविषयीची स्वप्नं होती. फोटोंचे क्लिकक्लिकाट होत होते. जन्मापासून ते आता सहा वर्ष पूर्ण आणि विद्यार्थी म्हणून सुरूवात हा प्रवास नकळत पूर्ण आठवत होता.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी एक काहीसे रटाळ भाषण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. मग मुलांसाठी मजा म्हणून जादूचे प्रयोग सादर केले गेले आणि मग आम्ही सगळे मुख्य शाळेत गेलो. तिथे मुलांचा वर्गशिक्षिकेसोबत फोटो झाला. मग सगळी मुलं पुढे आणि मागून पालक त्यांच्या वर्गात गेले. तिथे पुन्हा एकदा फोटो काढून मग पालक बाहेर आले. Schultüte घेऊन मग आई बाबांनी पण फोटो काढून आपली हौस पुरवून घेतली. तेवढ्या वेळात मुलांचा पहिला वहिला तास झाला, वीस मिनीटांचाच, पण मुहूर्तमेढ रोवली गेली. एक चित्र रंगवायला मिळालं, गृहपाठ म्हणून. संध्याकाळी घरी आम्ही एक केक पण केला, आजी आजोबा अनायसे इकडे असल्यामुळे त्यांना पण या कार्यक्रमात सहभागी होता आलं, शाळा बघायला मिळाली. मुलांना चर्च मध्ये पण नेतात या दिवशी शाळेकडूनच, पण सध्या करोना मुळे या सगळ्या गोष्टी बरेच ठिकाणी कॅन्सल करून चर्च मधून एक जण शाळेतच मुलांना शुभेच्छा द्यायला आले होते. कार्यक्रम झाल्यावर घरी येऊन लगेच Schuletüte उघडून मग त्यातलं सामान बघून झालं आणि गोड चॉकलेट्स रोज थोडे खाणं चालू आहे.

आता Schuletüte फक्त शोपीस म्हणून आहे. पण मला स्वतःला हा सोहळा आवडला. मुलांना या सगळ्या प्रोसेस मधून आनंद मिळतोच, पण या नवीन वाटेवर चालताना थोडी जबाबदारी आहे हेही त्या निमिताने त्यांच्यावर बिंबवलं जातं. निदान तसा प्रयत्न करता येतो.

सोमवार पासून शाळेचं दप्तर घेऊन सृजन रोज शाळेत जातो आहे. या मुलांना अजून शब्द, वाक्य वाचता येत नाही त्यामुळे रंग, चित्र या माध्यमातून त्यांना त्यांचे वर्ग ओळखता यावे अशी सोय केली आहे, सुरूवातीचे दोन आठवडे त्यांना आतल्या खोल्या समजाव्या म्हणून त्यांच्यासोबत शिक्षक मदतीला आहेत. शाळा चालत निवांत गेलो तरी पाच मिनीटांच्या अंतरावर आहे. पहिला दिवस तर मस्स्त गेला असं आल्यावर सांगितलं. मुलांना एकदम चार तास बसायची सवय नाही म्हणून शाळेतही सुरूवात तशी निवांत आहे. पुढे दुसरी तिसरीत किंवा कोणत्याच वर्गात असं कोणतंच सेलिब्रेशन होणार नाही. शाळा सवयीची होऊन कधी कंटाळवाणीही वाटेल. रोज सकाळी त्याला उठवण्यासाठी आमचे आवाज वाढतील. रोजचा गृहपाठ नकोसा होईल. आम्हीही त्याच्यासोबत नवीन गोष्टी शिकू. पण मोठं होत असताना सुरूवातीचा हा सोहळा आमच्या कायम आठवणीत राहील.

1

2

3

4

8

5

6

7

9

10

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

जर्मनीतलं वास्तव्य - जर्मन भाषेचा प्रवास - १

जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.

मी ही भाषा शिकायला सुरूवात केली ती नोकरी लागल्यानंतर, त्यालाही आता पंधरा वर्ष होऊन गेली. तेव्हा काहीतरी शिकूयात वेगळं असा विचार चालू होता. तेव्हाच सुमेध जर्मनीत आला, मग आपोआपच काय शिकायचं या प्रश्नाला 'जर्मन' हे उत्तर मिळालं. मधल्या काही वर्षात भारतातले, अनेक लोक जर्मन भाषा शिकलेत, शिकत आहेत. पुण्या मुंबईत जर्मन भाषा शिकणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. कोथरुड हे कसं दुसरं जर्मनीच आहे आणि तिथे कसं सगळ्यांनाच जर्मन येतं यावर अनेक विनोद आणि मीम्स पण व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असतात. पुण्यात गोइथे इन्स्टिट्यूट आणि रानडे इन्स्टिट्यूट या दोन्ही नावाजलेल्या संस्था आहेत. पण वेळेच्या बंधनामुळे मी एका वेगळ्या ठिकाणी सुरूवात केली, त्यात अधून मधून खंडही पडला, पण तिथे या भाषेची तोंडओळख झाली. इथल्या व्हिजा साठी लागणारं एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षा दिली, खरी परीक्षा तर इथे आल्यावरच होती.

येऊन लगेचच जवळ कुठे भाषेचे कोर्सेस आहेत हे शोधायला सुरुवात केली. बर्‍याच गावांमध्ये Volkshochschule (फोक्सहोखशुलं) ही एक संस्था असते, ज्याला अगदीच शब्दश अर्थ घेतला तर लोकशाळा म्हणू शकतो. तिथे संगीत, कुकिंग, मेकअप अश्या विविध विषयातले कोर्सेस असतात. तिथेच जर्मन भाषा देखील शिकवली जाते. आमच्या जवळच्या अश्याच एका ठिकाणी एक कोर्स नुकताच चालू झाला होता म्हणून तिथे गेले, मी आधी एवढं एवढं शिकले आहे, त्यामुळे आता पुढच्या लेव्हल पासून सुरूवात करू शकेन, हे ही सांगितलं. पूर्ण जर्मन भाषेतून अडखळत, त्यांचं बोलणं दोन दोन वेळा ऐकून समजून घेत, एक दोन इंग्रजी शब्द वापरून ते संभाषण पार पडलं आणि दुसर्‍या दिवसापासूनच खर्‍या क्लासला सुरूवात झाली.

जर्मन भाषा शिकण्यासाठी खरंच उत्सुक असलेले, काही नाइलाज म्हणून शिकणारे, नोकरीसाठी गरजेचं आहे म्हणून शिकणारे, जर्मनीत काही काळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्याची इच्छा असणारे असे वेगवेगळ्या उद्देशाने आले नॉन जर्मन लोक तिथे होते. क्लास सुरू झाला त्यादिवशी मला पहिले दिसली ती मोनिका. गोरी, उंच, मोकळे केस सोडलेली आणि चुणचुणित तरूण मुलगी. मुख्य म्हणजे टीचर येईपर्यंत ही कुणाशीतरी इंग्रजीतून बोलत होती म्हणून मला अजून लक्षात राहिली, तो एक आपलेपणा वाटला. मी नवखी होते. इतर अनेक जण या बॅचमध्येच सुरूवातीपासून होते, त्यामुळे ओळखत होते. वय २० ते पार चाळीशीच्या पुढचे लोक, अल्बेनिया, टुंगा या कधी नावंही न ऐकलेल्या देशातले लोक यांच्यासोबत हा भाषा शिकण्याचा प्रवास सुरू झाला. शिक्षिकेची ओळख झाली. मग कुठून आलीस, कशासाठी आलीस, भाषा का शिकायची आहे, आधी कुठे शिकले, व्यवसाय काय असे ठराविक प्रश्न आले. तिथे अजून दोन भारतीय मुलं बघून जरा हायसं वाटलं. ब्रेक मध्ये या भारतीय क्लासमेट्स सोबत बोलताना आधीचेच कोण कुठली हे प्रश्न देशावरून राज्यांपर्यंत आले. पहिल्या दिवशी, अगदी पहिला आठवडा सुद्धा मला काहीच समजत नव्हतं. एक तर माझ्या शिकण्यात बराच खंड पडला होता आणि त्यातून इथली शिकवण्याची पद्धत वेगळी होती. दोन-तीन आठवड्यात लोक ओळखीचे झाले, मी पण त्यांच्यातलीच एक झाले.
भाषा शिकण्याच्या निमित्ताने इथे कचरा व्यवस्थापन कसं केलं जातं, काही गावांची माहिती, खाण्याच्या पद्धती, वेगवेगळे व्यवसाय, महिलांचं आयुष्य, इथल्या सणांची माहिती असेही अनेक विषय असायचे. भाषा आणि त्यानिमित्ताने मग या देशातले नियम, इथल्या पद्धती, जीवनशैली या सगळ्यांची आपोआप या निमित्ताने सांगड घातली जायची. याशिवाय इथे राहताना, भविष्यात भविष्यासाठी मदत व्हायला हवी म्हणून रेल्वे स्टेशनवर असणार्‍या उद्घोषणा समजून घेणे, पेपर मधल्या जाहीराती समजून घेणे, नोकरीसाठी पत्र लिहायला शिकणे अश्याही बाबी यात अंतर्भूत होत्या. मग कधी कानगोष्टी खेळल्या जायच्या. फळांची नावं सांगा, फुलांची नावं सांगा असे अनेक खेळ खेळत शब्दसंग्रह वाढायचा. त्याच वेळी इथेच राहात असल्यामुळे मुख्य फायदा व्हायचा की वर्गात जे काही शिकलो त्यातलं बरंचसं रोज अनुभवता यायचं. रोज ट्रामने या क्लासला जाताना, प्रत्येक स्टॉपचा उच्चार आपोआप कानावर यायचा. ट्राम मध्ये लोकांची बोलीभाषा ऐकू यायची. ट्रेन प्रवासावेळी तिथल्या घोषणा ऐकून मग एक पद्धत लक्षात यायची, त्याचा परीक्षेत फायदा व्हायचा. सुपरमार्केट मध्ये अनेक वस्तू दिसायच्या त्यावरची नावं समजायला लागायची. थोडक्यात अभ्यासेतर असं शिक्षणही रोजच व्हायचं.

क्लास मधली मोनिका होती ग्वाटेमालाची, बारावी होऊन पुढे मेडिकल शिक्षण सुरू होण्याच्या आधी तिनी आणि तिच्या घरच्यांनी मिळून एक वर्ष ब्रेक घ्यायचं ठरवलं. इथे तिच्या मावशीकडे राहून ती भाषा शिकत होती. हे सगळंच मला अगदी वेगळं आणि कौतुकास्पद वाटलं होतं. त्याच वेळी तिला मावशीच्या घरात राहायचं येणारं दडपण, इथला खर्च खूप आहे त्यामुळे करावी लागणारी काटकसर याही बाबी तिच्याकडून समजायच्या. तिला तिच्या देशाबद्दल अफाट प्रेम होतं. ग्वाटेमाला सांगितलं की समोरच्याच्या चेहर्‍यावर बरेचदा प्रश्नचिन्ह असायचं, मग ही पण अक्खा दक्षिण अमेरिकेचा नकाशा घेऊन समजावून सांगायची. मी पुण्यात असताना बुलढाणा सांगायचे तेव्हा असंच "शेगाव जवळ, अकोला माहिती आहे का, मग लोणार?" असे जवळचे संदर्भ देऊन समजावून सांगायचे. तेच इथे दिसत होतं. मोनिकाने आम्हाला अ‍ॅपल पाय शिकवला होता. मी तिला पुर्‍या, पाव भाजी खायला बोलावलं होतं. एका जॅपनीज मुलीने क्लास मधल्या प्रत्येक मुलीला सगळ्यांसमोर 'तुझ्या नवर्‍याचं अफेअर असेल तर काय करशील?' असा प्रश्न विचारला तेव्हा आम्ही बाकी सगळ्या आश्चर्याने बघत बसलो होतो, म्हणजे असे प्रश्न बेधडक क्लास मध्ये विचारणं हा कल्चर शॉकच होता. याच मुलीने कचरा वर्गीकरण बाबत बोलताना 'मी गेल्या सहा महिन्यांपासून जर्मनीत आहे पण मला काहीच माहीत नाही, कारण कचरा टाकणे हे माझ्या बॉयफ्रेंडचंच काम आहे' असंही बाणेदारपणे सांगितलं होतं. दोन नवीन लोक भेटले की कश्या पद्धतीने ओळख करवून घेतात, यात आपापल्या देशातल्या पद्धती काय अशी चर्चा चालू होती. क्लास मधल्या दक्षिण भारतीय मुलाने, मोठे लोक भेटले तर नमस्कार कसा केला जातो हे तिथे साष्टांग नमस्काराचं लोटांगण घालून त्या टीचरला समजावून सांगितलं होतं. काही शिक्षकांच्या पुढे पुढे करणारे, त्यांना ब्रेक मध्ये जाऊन भेटणारे असेही लोक होते. सगळ्यांनी मिळून आणलेलं गिफ्ट फक्त स्वतःच आणलंय अशा आवेशात एकटीनेच एकीने दिलं होतं. असे काही देशोदेशीचे नमुने तर काही अवली लोक यांच्यासोबत तीन महिने रोज दुपारी दोन ते सहा या वेळात मी वर्गात बसून भाषा शिकत होते. बुलढाण्यातून पुण्यात आले तेव्हाही अशा कक्षा रुंदावत गेल्या, त्या आता जागतिक पातळीवर बदलत होत्या. सगळ्यांचे आपापल्या देशातले अनुभव आणि त्यामुळे जर्मनीकडे सुद्धा बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन, इथल्या आवडत्या आणि नावडत्या गोष्टी सुद्धा वेगळ्या असायच्या. भाषा शिकण्याइतकाच हा नवीन देश या सगळ्यांच्या मार्फत अनुभवणे हेही रोचक होतं.

दोन्ही शिक्षकांकडून परीक्षेची चांगली तयारी करवून घेतली गेली आणि शेवटी परीक्षा होऊन अजून एक मोठा टप्पा पार पडला. "पहिला आठवडा तू खूप दबकून होतीस, दोन दोन शब्द बोलायला सुद्धा खूप विचार करायचीस पण आता तीन महिन्यात मला तुझ्यात खूप फरक दिसतो आहे, सहज बोलू शकते आहेस, त्यामुळे परीक्षेत चांगलेच गुण मिळवशील याची खात्री आहे" हे एका शिक्षिकेने केलेलं कौतुक त्या परीक्षेइतकंच महत्वाचं वाटलं होतं. मग नोकरी सुरू झाली आणि रोजच ही भाषा वापरताना खर्‍या अर्थाने व्यावहारिक संबंध यायला लागला. इथलं वास्तव्य पण एक दशकाहून जास्त झालं. त्यातून अजून नवीन गमतीजमती घडल्या, तशीच नवीन आव्हानं पण येत गेली. ही भाषा पूर्ण आपली अशीही कधी वाटली नाही, पण तरी सरावाची झाली, या भाषेशी, शब्दांशी मैत्री होत गेली. त्या टप्प्याबद्दल पुढच्या भागात...
क्रमशः

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - जर्मन भाषेचा प्रवास - २

शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं. बाहेर दुकानांमध्ये कामचलाऊ भाषेवर सहज निभाव लागायचा. पण पहिला मोठा बदल होता तो नोकरी सुरू झाली तेव्हा.

नोकरी शोधताना मूळ माझ्या फिल्ड मधला अनुभव जेवढा महत्वाचा होता, तेवढाच मी जर्मन शिकत होते हाही मुद्दा महत्वाचा होता. मला अस्खलित भाषा यावी ही कुणाची अपेक्षा नव्हती, पण मुलाखती दरम्यान तेवढा अंदाज त्यांना आला असावा. पण सुरुवातीलाच सकाळी आठ ते दुपारी चार सतत जर्मन भाषेतून जेव्हा ट्रेनिंग घ्यायचं होतं, तेव्हा रोज संध्याकाळी मी प्रचंड वैतागलेली असायचे. आधीच तांत्रिक बाबी, त्यातून समोर कंप्युटरवर सगळं जर्मन मधून दिसतंय आणि सगळं नीट समजावं म्हणून दुप्पट लक्ष देऊन एकून ते समजून घेणे, असं सलग तीन आठवडे आणि मग काम सुरू झालं तेही पूर्ण जर्मन मधून. मग टीम मिटींग पूर्ण जर्मन मधून, त्यात इथे बोलली जाणारी बोलीभाषा आणि सगळे बोलायचे पण फास्ट, रोज तारेवरची कसरतच वाटायची. एक सहकारी जर्मन कुठे शिकलीस वगैरे विचारत होता. तर मी सहज उत्तर दिलं की 'इथे राहायचं असेल तर ते आवश्यकच आहे' असं उत्तर दिलं. तेव्हा माझ्या डोक्यात साधा शिकायला हवा असाच विचार होता, पण त्याने माझा "आवश्यकच" हा शब्द खोडून काढला आणि शिकलीस ते चांगलं आहे पण असा काही नियम नाही असं मला उत्तर दिलं. एकेक शब्द इतका महत्वाचा ठरू शकतो हे माहीत आहे, पण तरी त्यादिवशी त्रासच झाला. मग एकदा 'नाही' या शब्दासाठी जर्मन शब्द आहे 'नाईन'. तर हा त्याऐवजी 'नेट' म्हणाला. नेट चा खरा अर्थ होतो नाईस. मी बराच वेळ विचार केला, मग लक्षात आलं की हा स्थानिक शब्द आहे नाही साठी आणि इथल्या भागात सर्रास वापरला जातो. जेवायला जाताना तो सहकारी माह्ल त्साइट (Mahl Zeit) असं म्हणून उठला. यावर काय रिअक्शन द्यायची असते हेच मला माहित नव्हतं, हा शब्दच नवीन होता. मग आजूबाजूला हेच आवाज ऐकू आले, जेवायला जाताना भेटणारे लोक पण हॅलो म्हणू त्या पद्धतीनं एकमेकांना Mahl Zeit म्हणत होते. मग समजलं की ही पद्धत आहे, लंच टाईम झाला की त्या दरम्यान सगळे Mahl Zeit म्हणतात, थोडक्यात जेवणाची वेळ झाली असं. पूर्वी जेव्हा बहुतांशी प्रोडक्शन फॅक्टरी होत्या, तेव्हा जेवायची वेळ झाली की घंटा वाजवून सगळे जेवायला निघायचे, आणि त्यातून ही माह्ल त्साइट म्हणण्याची पद्धत रुळत गेली जी आजही आहे. पुस्तकी जगातून हळूहळू असे अनुभव बाहेर घेऊन आले.

या भाषेत एक तर प्रत्येक पुल्लिंगी, स्त्रीलिंगी रुपं आहेत प्रत्येक शब्दाला, जो इंग्रजी आणि जर्मन मधला फरक आहे. आणि मराठीशी तुलना करायला गेलो तर आपली बस तर यांच्यासाठी तो बस, आपली खुर्ची तर यांचा तो श्टुह्ल असे अनेक वेगळे शब्द. आपल्याकडे पारसी लोक कसे मराठी बोलतात, तसे आम्ही सुरूवातीला जर्मन बोलताना दिसत असू कारण हे गोंधळ हमखास व्हायचे. वाक्य जर्मन, पण ती बस असं ग्रूहित धरून इतर शब्दरचना जमायची. शिवाय तू, तुम्ही, आपण याप्रमाणे बदलणारी क्रियापदांची रुपं. हे मराठीत पण आहे, फक्त मराठीत आपल्याला त्यावर विचार करावा लागत नाही. एका पहिली दुसरीतल्या मुलाशी मी एकदा "तुम्ही" वापरून बोलत होते. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव "मला 'तुम्ही' का म्हणत आहात" असे आहेत हे मला जरा वेळाने लक्षात आलं .पण तुम्ही वापरणं तेव्हा सगळ्यात सोपा आणि कुणाचा अपमान होऊ नये असा सेफ पर्याय होता. ऑफिस मध्ये सगळे तूच वापरायचे, मग तेही सवयीचं झालं. Fabrik म्हणजे फाब्रिक, हे कारखाना या अर्थाने वापरलं जातं. हे समजलं असलं तरी वाचताना पहिले कारखाना डोक्यात येत नाही, कापडच येतं. किंवा कापड हा शब्द वापरायचा असेल जर्मन मध्ये, तर fabric पहिले आठवतो, मग त्याचा या भाषेतला अर्थ वेगळा आहे हे आठवून पुन्हा मूळ शब्दाचा प्रतिशब्द शोधायला लागतो. अनेक इंग्लिश आणि जर्मन शब्द वाचायला सेमच आहेत असं वाटू शकतं, कारण स्पेलिंग सारखं किंवा एखाद्या अक्षराचा फरक, पण उच्चार पूर्ण वेगळे असतात. ही अगदी मोजकी उदाहरणं आहेत, असे अनेक शब्द नेहमीच बुचकळ्यात पाडतात. अनेक जर्मन शब्द हे खूप मोठे आहेत, याबाबत टीका आणि विनोद पण केले जातात. पण बरेच शब्द हे जोडशब्द आहेत. ती शब्दांची फोड जमली की ते खूप सोपे वाटतात.

ऑफिस ही भाषा शिकण्यासाठीची प्रमुख जागा असली, तरी त्याशिवायही सरकारी कार्यालयं, दुकानं, रेस्टॉरंट्स, घराचा भाडेकरार, बँक, दवाखाने, सार्वजनिक वाहतूक अश्या सगळ्याच ठिकाणी भाषेचे धडे आपोआप मिळत होते. स्थानिक बोलीभाषा, त्यांचे काही वेगळे शब्द कळायला लागले. त्यातून इथे प्रचंड प्रमाणात पत्र येतात घरी, प्रत्येक लहान सहान बाबीसाठी पत्र हेच मुख्य संपर्काचं माध्यम असतं. मग ती वाचून कागदोपत्री सरकारी भाषेचा अंदाज यायला लागला. ऑफिसात वार्षिक मिटींग मध्ये परफॉर्मन्स बद्द्लचे जे कागद होते, ते वाचताना बॉसच म्हणायचा की ही भाषा आम्हालाच अवघड वाटते, तुम्हाला अजूनच वाटेल. बोलण्याचा आत्म्वविश्वास आला तरी इमेल लिहीणे बरेच दिवस नको वाटायचं. आता इंटरनेट कृपेने गुगल (चुकीचं पण भाषांतर होतं कधी त्यावर तरी) आणि इतरही बऱ्याच ऑनलाइन सर्व्हिस उपलब्ध आहेत आणि यात सतत नवीन गोष्टींची भर पडते आहे. त्यामुळे इमेल लिहीताना 'प्लीज फाइंड अटॅच्ड डॉक्युमेंट' हे एवढं लिहीतानाही सगळं चेक करून मगच पाठवायचे. आता मात्र तेवढी भीती वाटत नाही.

सृजनचा जन्म झाला तेव्हा बाळंतपण, बालसंगोपन या विषयातली भाषा शिकणं झालं. मग त्याच्या डे-केअर आणि किंडरगार्टन मधून नवीन विषय समजले. आता शाळेत जातो आहे तेव्हा शब्दसंपदा आमचीही वाढलीच, पण त्याच बरोबर आता पहिल्यांदाच तो ही भाषा एक विषय म्हणून शिकतो आहे. एकच भाषा असली तरी पहिलीतल्या मुलांना शिकवायच्या पद्धती, अभ्यासक्रम आणि मोठेपणी आम्ही एक परदेशी भाषा म्हणून शिकलो, ही तफावत कशी आहे हे नवीन समजतं आहे. आम्ही थिअरी मध्ये शिकलेल्या काही गोष्टी, त्याने खूप आधी फक्त किंडरगार्टन मधून ऐकून कश्या आत्मसात केल्या हे लक्षात येतं, आम्ही त्याच्याकडून असं अप्रत्यक्ष बरंच काही गेल्या काही वर्षात शिकलो आणि शिकत आहोत. अर्थातच आम्ही पहिलेपासून सृजनशी घरी मराठीच बोलतो. त्यामुळे मराठी तो नीट बोलतोच. कधी दोन भाषांची सरमिसळ होते, मराठी वाक्य पण जर्मन वाक्यरचना असं होतं, त्यातून गमतीजमती सुद्धा खूप घडत असतात.

मनापासून फार कौतुक करण्यात जर्मन लोक आखडू आहेत, पण भाषेच्या बाबतीत मात्र बहुतांशी कौतुक होतं. इथेच चाळीस पन्नास वर्ष राहूनही जर्मन अजिबातच बोलू न शिकणारे अनेक जण असतात, त्या पार्श्वभूमीवर असेल की आम्ही भाषा शिकलो, बोलतो याबद्दल त्यांना विशेष वाटतं.
पण हेही आहे, की समोरच्याला भाषा येते म्हणजे सगळं समजेलच असं आम्हाला गृहीत धरलं जातं. आपणही संभाषणात वाहवत जाऊन एखादा शब्द अगदीच चुकीचा वापरला जातो आणि गैरसमज होऊ शकतात. एखादा शब्द नाही समजला तर तो तेवढा तरी सांगावा ना इंग्रजी मधून, पण तसं कमी वेळा होतं. तांत्रिक शब्द असतील तर हे अजूनच अवघड वाटतं. घर घेतलं तेव्हा घराचे आणि बँकांच्या व्याजाचे कागदपत्र वाचणे हे एक डोकेखाऊ काम होतं. एक तर त्यात पुन्हा सरकारी न्यायालयीन भाषा, अनेक नवीन शब्द आणि हे करार असायचे शंभर दीडशे पानांचे. काही वेळा एकेक पान वाचून समजून घ्यायला दुप्पट वेळ जायचा.

पण एकूण भाषेला सरावण्याचा काही काळ गेला की मग त्यात आपण वेगळं काही करतो आहोत असं वाटत नाही. आपोआप लोकांशी बोलताना याच भाषेतून संभाषणाला सुरूवात होते. प्रत्येक शब्द समजला नाही तरी पूर्ण बोलण्याचा अर्थ समजतो तेवढंही पुरेसं वाटतं. काही जर्मन शब्द हे रोजच्या बोलण्यातला भाग होतात, जर्मनाळलेलं मराठी इंग्रजी म्हणता येइल असं. जसं ऑलिव्ह ऑइल ला ऑलिव्ह तेल म्हणणं रुचत नाही, तसेच काही शब्द त्या त्या भाषेतच छान वाटतात, तर कधी सोपे वाटतात. अपॉइंटमेंट या शब्दापेक्षा सहजच टर्मिन (Termin) हा शब्द जास्त वापरला जातो. कापुट (Kaputt) हा शब्द तुटले, खराब झाले, गंडले अशा अनेक अर्थांनी वापरला जातो आणि आम्ही पण तोच वापरतो. आता युट्युब वरचे अनेक व्हिडीओ आम्ही सहज बघू शकतो. एक दोन जर्मन सिनेमे पण पाहिले आहेत. जर्मन मधून पाककृती वाचणे, बघणे हे खूप अवघड वाटत नाही. घरी आठवड्याला येणारं वृत्तपत्र, दवाखान्यात वेटिंग रूम मध्ये असताना तिथली मासिकं चाळणं, काही माहिती हवी असेल तर गुगल वर जर्मन भाषेतूनच शोधून जर्मन मधून थोडं वाचणं हे आता सहज घडतं. आता काही वाक्य बरोबर येतात, पण तेव्हा व्याकरणायला नियमांची उजळणी करावी लागत नाही, ते सवयीने जमतात.

याच सगळ्याचा एक भाग म्हणजे इंग्रजी भाषा जी काही येत होती, ती बिघडायला लागणे. अजूनही जर्मन आणि इंग्रजी यात इंग्रजीच जवळची वाटते. ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाला की 'चला बरं आहे आता' म्हणून हायसं वाटतं. पण मग नेमकं खरंच काही लिहीताना अनेक वेळा जर्मन शब्दच डोक्यात राहतो, इंग्रजी प्रतिशब्दच आठवत नाही. कधी इंग्रजी शब्द लिहीताना पण स्पेलिंग मात्र जर्मन प्रमाणे केलं जातं. आधी इंटरनेटवर फक्त जर्मन शब्दाचा अर्थ शोधला जायचा, आता काही वेळा इंग्रजी अर्थ शोधावा लागतो. एकदा dumb charades खेळताना जर्मन शब्दच आठवत होता, पण त्याचा रोजच्या वापरातला मराठी आणि इंग्रजी शब्द त्या क्षणी पूर्ण विसरले होते. आता कधी कधी अनोळखी कुणी माणूस स्वतःहून इंग्रजीत बोलला तरी आम्ही जर्मन मधूनच बोलतो आणि मग आम्हाला येतं समजलं की तोही जर्मन मधून बोलतो. अश्या वेळी मला दहा वर्षांपूर्वी असे लोक का भेटले नाही कधीच, असं पण वाटतं, कारण तेव्हा जास्त अडचण व्हायची. आता तेवढं अडत नाही. पण ज्या इंग्रजीतून आपण सहज उत्तम लिहायचो, बोलायचो, त्यात आता येणार्‍या अश्या लहान अडचणी मोठ्या वाटतात.

इंग्रजी शब्द विसरण्याबद्दल जे लिहिलं आहे वर, तेच मराठी शब्दांबाबतही होतं कधी कधी, पण त्याच बरोबर आपली मातृभाषा उत्तम यायलाच हवी यासाठी मग स्वतःहून जास्त प्रयत्नही केले जातात. असं म्हणतात की तुम्ही जेव्हा एखाद्या भाषेत विचार करू शकता का, की आधी एका भाषेत विचार करून मनातल्या मनात भाषांतर करता यावरून ती भाषा किती सवयीची झाली आहे याचा अंदाज येतो . यावर मला अजून माझ्याबाबतीत एक असं नेमकं उत्तर कळलेलं नाही. पुस्तक वाचताना मला अजूनही इंग्रजी अवघड वाटतं, मराठी वाचनच सगळ्यात जास्त आवडतं. लिहायला बोलायला आधी मराठी आणि मग इंग्रजी, कामासंबंधित काही असेल तर आधी इंग्रजी असा क्रम येतो, आणि मग जर्मन. इंग्रजीतून काही डॉक्युमेंट असेल तर लगेच जर्मन पेक्षा ते बरं असं वाटतं. पण शेजार्‍यांशी नेहमीच संवाद जर्मन मधून होत असल्यामुळे, त्यांच्याशी अचानक इंग्रजी बोलता येणार नाही. त्यामुळे त्या त्या स्थळकाळा नुसार मराठी, इंग्रजी आणि जर्मन सगळ्याच भाषा सोयीच्या वाटतात, आणि त्या त्या क्षणी बहुतांशी त्याच भाषेत विचार चालू असतात.

अमेरिका किंवा इंग्लंडला जाणार्‍यांनाही इंग्रजीचे अ‍ॅक्सेंट्स हा प्रश्न येतो, पण त्यापेक्षा वेगळ्या देशांमध्ये, जिथे इंग्लिश ही प्रमुख भाषाच नाही, तिथे हा प्रश्न मात्र जास्त अवघड प्रश्न असतो. मी ही सुरुवातीला जुजबी आलं तरी ठीक अश्या विचारात होते. पण कधी गरज म्हणून, कधी खरंच वेगळं शिकायला मजा येते आहे म्हणून, मग सवयीचा भाग झाला म्हणून पण जर्मन भाषेशी गट्टी होत गेली. पण शेवटी एका मर्यादेपर्यंतच तो आपलेपणा वाटतो. त्यांच्या भाषाप्रेमाचं कौतुक आहेच, तरी काही वेळा अजूनही सहज इंग्रजी बोलणारा देश का नाही हा, याचा त्या त्या क्षणी त्रास पण होतो. दिवसभर जर्मन मधून लोकांशी बोलावं लागलं तर घरी आल्यावर, एक शब्द जर्मन मधून बोलायला लागू नये अजून अशीच स्थिती असते. डॉक्टरकडे जायचं असेल तर मूळ दुखण्याइतकंच, त्यासाठीचे जर्मन शब्द शोधून ते सांगणे हे पण संकटच वाटतं. कामासंदर्भात किंवा इतरत्रही कुठे जर काही प्रतिवाद घालायचा असेल, तर आपली बाजू बरोबर असून सुद्धा ते केवळ या भाषेत नीट मांडता आलं नाही की वाइट वाटतं. आमच्या जर्मन बोलण्यावर इथल्या बोलीभाषेचा प्रभाव आहे . प्रमाण जर्मन ज्या भागात बोलली जाते तिथल्या लोकांना इथलंही अवघड वाटतं. हेच इथून बायर्न राज्यात गेलो तर त्यांचा भाषेचा लहेजा पूर्ण वेगळा आहे. इथले स्थानिक लोक सुद्धा आम्हाला त्यांची भाषा समजत नाहीत असं स्पष्ट सांगतात. मग त्यांच्यापुढे आपण कोण असा प्रश्न पडतो. आपल्याला एखादी गोष्ट नीट जमत असूनही केवळ भाषेमुळे मागे पडलो, तर त्याचाही त्रास होतो. खूप दिवसांचा खंड पडला की पुन्हा ही भाषा पण विसरायला लागतो. पुन्हा जमतं नंतर, पण ते ब्रेक नंतरचे काही दिवस दर वेळी ठळकपणे जाणवतात.

भारतातच एखाद्या वेगळ्या राज्यात असतो तर इतके प्रयत्न करून तिथली भाषा शिकलो असतो का? हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि त्याचं उत्तर नकारार्थीच येतं. गरज नाही, चालून जातंय ना, मग कशाला असाच विचार केला असता. कदाचित थोडं गरजेपुरतं बोलायला शिकले असते, असं वाटतं पण नक्की सांगू शकत नाही. हे लोक कसे इंग्रजीला अजिबात थारा देत नाहीत आणि आपण कसे आपली मातृभाषा विसरून चाललो आहोत याबद्दल बरेचदा टोकाची मते वाचायला मिळतात. काही प्रमाणात मला दोन्ही बाजू पटतात, आपण आपल्या मातृभाषेपासून लांब जायला नको हे मला वाटतं, आणि शक्य तिथे मराठी हीच माझी अजूनही पहिली भाषा आहे आणि राहील. इंग्रजीचा उदोउदो नको हेही खरंच आहे, पण इंग्रजी कडे फक्त एक भाषा म्हणून परीक्षेपुरतं ते शिकायचं ही वृत्ती इथेही थोडी बदलण्याची गरज आहे, असं देखील वाटतं. शिवाय यात भारत, भारतातली राज्य, इथले देश आणि प्रत्येकाची स्थिती बघता सरळ सरळ तुलना सुद्धा करता येणार नाही. पण हा पूर्ण विषयच इथे खूप अवांतर होईल. मला इंग्रजी नीट येतं, अजूनही दुसरी भाषा म्हणून इंग्रजीशी जवळीक जास्त वाटते आणि इंग्रजी येत असण्याचा कामाशिवाय, मला अगदी जर्मन भाषा शिकताना सुद्धा फायदा झाला असं वाटतं.

इथेही काही प्रत्येकाचं या भाषेशिवाय अडत नाही. मोठी शहरं, जिथे वेगवेगळ्या देशातले लोक आहेत, ज्यांच्या कामासंदर्भात पण भाषेशिवाय काही अडत नाही असे अनेक जण वर्षानुवर्ष इथे राहात आहेत. अश्या शहरात एक तर बरेच लोक कामापुरतं इंग्रजीतून सुद्धा बोलतात, आता तर प्रत्येकाच्या हातात उपलब्ध असणारा फोन आणि इंटरनेट यामुळे दैनंदिन जीवनात फार काही अडत नाही. कुणी जबरदस्ती केली नाही, तरी या ना त्या प्रकारे ही भाषा इथे राहताना डोक्यावर आदळतेच आणि त्यातून कामापुरती भाषा आपोआप समजायलाही लागते. सरकारी कार्यालयात अजूनही सगळीकडे जर्मनच वापरली जाते पण अशी वेळ कमी येते, जर्मन भाषा येणारे कुणी ओळखीतले लोक असतील तर त्यांच्या मदतीने ही कामं निभावली जाऊ शकतात. पर्यटक म्हणून ठराविक जागी जायचं असेल तर तिथे लोक इंग्रजीतून व्यवस्थीत बोलतात.

पण एकंदरीत पूर्ण देशातल्या लहान मोठ्या ठिकाणांचा विचार केला, तर बहुतांशी ठिकाणी, इंग्रजीसाठी लोक अजिबातच उत्सुक नसतात, अगदी नाइलाज म्हणूनच बोलतात. कामाची भाषा ही पूर्णपणे जर्मनच आहे अश्या अनेक कंपनीज आहेत. अश्या ठिकाणी पाय रोवून उभं राहायचं असेल तर भाषा आवश्यक ठरते. गरजेप्रमाणे इंग्रजीचा वापर केला गेला तरी तो शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जातो. कितीतरी वेबसाइट्स सुद्धा गेल्या काही वर्षात दोन भाषांचा पर्याय दिसायला लागले आहेत, पण आम्हीच सुरूवातीला आलो, तेव्हा फक्त एका बँकेचे ऑनलाइन व्यवहार इंग्रजीतून करता येत होते. पैशांच्या बाबतीत रिस्क नको म्हणून आम्ही ती बँक तेव्हा निवडली. आता हे प्रमाण वाढलं आहे आणि आम्ही सुद्धा या भाषेत आर्थिक व्यवहार करू शकतो याची खात्री आता आहे. इंजिनियरिंगला असताना इंग्रजी वर्तमानपत्र लावा, सिनेमे बघा म्हणजे इंग्रजी सुधारेल असं फॅड पूर्ण हॉस्टेल मध्ये होतं. आम्ही मैत्रिणीनी पण ते सगळं केलं, पण मला अजूनही वाटतं की खरं इंग्रजी सुधारलं ते नोकरी सुरु झाल्यावर, निदान माझ्यापुरतं तरी. तसंच हे नीट धडे गिरवून व्याकरण समजून घेणे हे जितकं आवश्यक आहे, तितकंच ते रोजच्या वापरात येणं सुद्धा गरजेचं आहे याचा प्रत्यय नेहमीच येतो.

इथे ही भाषा शिकवण्यासाठी या देशातच नाही, तर जगभर अनेक संस्था आहेत, त्यांचे ठराविक आखलेले अभ्यासक्रम आहेत, जागोजागी ते उपलब्ध करून देण्यातून अधिकाधिक लोकांना भाषा शिकण्यासाठी प्रवृत्तही केलं जातं. अनेक विद्यार्थी आधी भाषा पूर्ण शिकून, मग इथे त्यांचं उच्चशिक्षणच पूर्ण जर्मन भाषेतून घेतात, अश्यांचं मला प्रचंड कौतुक वाटतं. आवड म्हणून, व्यवसाय म्हणूनही अनेक जण भाषा शिकतात, शिकवतात. आमच्यासारखे काही जण थोडं शिकून, थोडं सरावाने या भाषेशी, जागेशी जोडण्याचा प्रयत्न करतात.

फक्त गरज बाजूला ठेवली, तरी जिथे राहतो आहोत तिथली भाषा शिकण्यातून एक प्रकारचं स्वातंत्र्य अनुभवता येतं हे आता जास्त जाणवतं. आणि ते मला स्वतःला खूप महत्वाचं वाटतं. इथल्या लोकांशी जोडण्यात भाषा हाच सगळ्यात मोठा दुवा असतो. भाषा येत असेल तर ऑफिस मधले कामाशिवायचे लोकांचे अनेक कंगोरे, लोकांचं आपसातले बोलणं आपल्याला समजणं यानेही फरक पडतो. संगीतात जसं एखादी जागा घेणे असा शब्दप्रयोग केला जातो, तसं इथल्या वास्तव्यात, विविध माध्यमातून ऐकून, वाचून, समजून त्या भाषेतल्या जागा सापडायला लागतात, लय पकडता येते. इथली माणसं ओळखायला, त्यांची वैशिष्ठ्य ओळखायला मदत होते. हे कुठे व्यावहारिक जगात रोज उपयोगी होईल असं नाही, पण काही गोष्टी समजण्यातून वेगळा आनंद मिळतो, समाधान मिळतं. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन अश्या सगळ्याच भाषा आमच्या पद्धतीने आम्ही प्रवाहात पुढे नेत राहतो.

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - ख्रिसमस

पंचवीस डिसेंबरची सुट्टी यापलीकडे लहानपणी कधीच नाताळशी फार संबंध आला नाही. जपानला गेले तेव्हा विमानतळावर अगदी सिनेमात पाहिल्यासारखं सजलेलं ते ख्रिसमस ट्री प्रत्यक्ष बघून एक फोटो काढला होता. जर्मनीत आल्यापासून तर ख्रिसमस आणि त्याआधीपासूनची दिसणारी तयारी सगळं जवळून अनुभवलं, त्यातही खास जर्मन लोकांच्या परंपरा समजत गेल्या. गणपती, दिवाळीसोबतच ख्रिसमसच्या पण दर वर्षीच्या आठवणी आता जमा झाल्या.

ऑक्टोबर मध्ये एकीकडे थंडीची सुरूवात होते, पानगळ म्हणून झाडांचे रंग बदलताना दिसतात. तेव्हा मुख्य वाट असते ते हॅलोवीनची. घरांवरची सजावट, दुकानातलं सामान सगळीकडे भुतं आणि भोपळे दात दाखवत नाचत असतात. मग त्यातलं उरलेलं सामान ऑक्टोबरच्या शेवटी पुन्हा गुंडाळून आत जातं. नोव्हेंबर मध्ये हिवाळ्याची सुरूवात म्हणून एक लाइट फेस्टिव्हल असतो, आपली दिवाळी आणि इकडे हा सण साधारण एकाच वेळी येतात, पण या सणाचं मुख्य सेलिब्रेशन लहान मुलांपुरतंच असतं. आणि मग हळूहळू दुकानात लाल पांढरा रंग आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात करतात. अनेक प्रकारचे पॅकिंग पेपर्स, ख्रिसमस थीमची डिझाईन असलेल्या पिशव्या, ग्रीटिंग कार्ड्स, सॅन्टाच्या आकारातल्या अनेक वस्तू, स्टिकर्स, ख्रिसमस ट्री वर सजावट करण्यासाठीचं सामान, विविध आकारातल्या आणि रंगातल्या लाइट्सच्या माळा हे प्रत्येक दुकानात दिसायला लागतात . स्नो आणि ख्रिसमस हे नातं गेल्या अनेक वर्षात दुरावलंच आहे, पण मग निदान दुकानातल्या वस्तूंमधून स्नो मॅन, बर्फ पडलेली घरं अशा रुपातूनच फक्त व्हाइट ख्रिसमस अनुभवता येतो. 

अ‍ॅडव्हेंट आणि अ‍ॅडव्हेंट कॅलेंडर हा एक खास जर्मन प्रकार, यांची एक परंपरा म्हणूयात. ख्रिसमस आधीचे चार रविवार हे ख्रिसमसची पूर्वतयारी म्हणून धरले जातात, थोडक्यात दार वर्षी ख्रिसमसची मुहूर्तमेढ रोवली जाते. दुकानांमध्ये चार मेणबत्त्या ठेवता येतील असे wreath दिसायला लागतात. ख्रिसमस पूर्व चार रविवार धरले, तर त्या पहिल्या रविवारी एक मेणबत्ती लावून मग लोक तयारीला लागतात. मग ख्रिसमस केक करणे, कुकीज बेक करणे, गिफ्ट्स घेणे, ते पॅक करणे, भेटीगाठी अश्या गोष्टीना सुरुवात होते. दर रविवारी एक मेणबत्ती लावली जाते, असे चार रविवार झाले की मग येतो नाताळ. तयारी साठी आताच्या काळात एवढं काटेकोर पाळलं नाही, तरी रविवारी आवर्जून एकेक मेणबत्ती सगळे जण लावतात. याशिवाय अजून एक असतं ते म्हणजे ऍडव्हेंट कॅलेंडर. फार फार पूर्वी जर्मनीतच, गेरहार्ड नावाच्या कुणा मुलाच्या "अजून किती दिवस राहिलेत ख्रिसमसला?" या प्रश्नाच्या उत्तरावर उपाय, म्हणून त्याच्या आईने एक कॅलेंडर तयार केलं, त्यावर एक डिसेंबर पासून ते चोवीस पर्यंतचे काउंट डाऊनचे नंबर्स होते आणि दर दिवशी मग एक कँडी त्याला मिळायची. मग ही प्रथा सगळी कडे पसरली. आता या सगळ्याचं खूप मार्केटिंग झालं आहे, प्रत्येक दुकानात चोवीस चॉकलेट्स भरलेल्या कॅलेंडरचे असंख्य प्रकार मिळतात. आता त्यात चॉकलेट शिवाय दर दिवशी नवीन खेळणं मिळेल असेही अनेक प्रकार येतात. सध्या प्रसिद्ध असलेल्या कार्टुन प्रोग्राम्सशी संबंधित असे अनेक प्रकार दिसतात. दोन चार युरोपासून ते पन्नास पन्नास युरो पर्यंत यांच्या किमती दिसतात. मुलांना या ठिकाणी न नेणे हाच पर्याय दिसतो. जरी मुलांना जरा संयम शिकवायला याचा उपयोग होईल असं वाटलं, तरी प्रत्यक्षात आधी शाळेतून ऐकून अमुक प्रकारचं कॅलेंडर हवं अश्या मागण्या असतात, शिवाय एखाद्या दिवशी खाऊ दे की दोन चॉकलेट्स, मग उद्या नाही खाणार अश्या युक्त्या पण असतात. डीआयवाय प्रकारातल्या, अगदी क्रिएटीव्ह अशी घरी करण्याच्या कॅलेंडरने पिंटरेस्ट सारख्या साईट्स भरलेल्या दिसतात.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात गावागावातल्या ख्रिसमस मार्केट्सची तयारी सुरू होते. गावातला मुख्य चौक, प्रसिद्ध जागा अशा ठिकाणी तंबू ठोकले जातात. मुलांसाठी आकाशपाळणे, मेरी गो राउंड, ट्रेन्स असे खेळ उभे राहतात. बर्‍याच लहान गावात फक्त एक विकेंडचही मार्केट्स भरतात, पण मोठ्या शहरात मात्र नोव्हेंबरच्या शेवटापासून तर २२-२३ डिसेंबर पर्यंत ही मार्केट्स असतात. एका गावात सँटाची गाडी जाते ठराविक वेळी वरून, ते बघायला मजा येते. दर वर्षी तीच तीच दुकानं असतात असं अनेक वेळा गेल्यावर लक्षात येतं. इथे मेड इन चायना माल भरपूर असतो, स्पेशली वेगवेगळे दिवे, काही क्रोकरी अश्या दुकानात जास्त. यावर्षी तर गणपतीच्या पितळी मूर्ती सुद्धा ख्रिसमस मार्केट्स मध्ये दिसल्या. अर्थातच अनेक स्थानिक लोकांची दुकानं पण असतात. मध, मेणबत्त्या, विणकाम केलेल्या वस्तू, मातीच्या वस्तू, हाताने बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, सिरॅमिक, क्रोकरी असे विविध प्रकार घेऊन जवळच्या लहान सहान गावातले व्यावसायिक या ठिकाणी आपला माल विकायला येतात. अनेक वेळा या वस्तूंच्या किमती बर्‍याच जास्त असतात, त्यांच्या कारागीरीची ती किंमत असते त्यामुळे त्या त्यांच्या जागी योग्य असल्या, तरी खास विकत घ्याव्या असं सहज होत नाही, अगदीच काही वेगळं वाटलं तर घेतलंही जातं. बरं गंमत अशी की हे दुकानदार लोक अगदीच निवांत बसलेले असतात. लॉट है सेल है असं कुणी ओरडत नसतंच, पण स्वतःहून काही म्हणजे काहीच मार्केटिंग सुद्धा करत नाहीत. त्यावेळी एकीकडे उगाच आपल्याला भरीस पाडत नाहीत हे जसं बरं वाटतं, तसंच अश्या सेम ठिकाणी भारतात अश्या ठिकाणी लोक किती जास्त खप करू शकतील असंही वाटतं.

खाण्यापिण्याबाबत म्हणायचं तर या मार्केट्समधली सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे म्युल्ड वाइन/ग्लु वाईन. वाइन आणि त्यात थोडी साखर, काही खडे मसाले घालून ती उकळली जाते आणि मग गरमच दिली जाते, त्यात लिंबाचा तुकडा किंवा संत्र्याचा लहान तुकडा पण असतो, म्हणजे तोही स्वाद उतरतो. वाईन घेताना वाईन आणि कपचे डिपॉझिट द्यायचे, कप परत देताना मग डिपॉझिट परत मिळतं. प्रत्येक गावातल्या या मार्केट्समधले कप हे तिथले सुवेनियर म्हणून पण बरेच जण घेतात. सहसा प्रत्येक ठिकाणी काही ठराविक खाण्याचे स्टॉल्स असतात. एक म्हणजे फळांवर चॉकलेट कोटिंग करून देणारं दुकान, एक क्रेप्स/पॅनकेकचं दुकान जिथे काही गोड तर एक दोन चीज, टोमॅटो अश्या प्रकारचे क्रेप्स मिळतात. एक गरम मश्रुम आणि ब्रेड असा पदार्थ मिळतो ज्यात जरा मसाले असतात, कधी एखादा सूप आणि ब्रेडचा स्टॉल, एक दोन जर्मन ब्राट वुर्स्ट (Brat Wurst) म्हणजे सॉसेजेसचे स्टॉल्स असतात. हल्ली एखाद्या ठिकाणी व्हेगन पदार्थांची गाडी असते. फ्रेंच फ्राईज शिवाय जर्मनीतलं कोणतंच मार्केट नसतं, ते असतातच. स्पॅनिश चुरोज, ग्रीक लांगोस हे काही प्रकार असतात. याशिवाय जर्मन ख्रिसमस केक, विविध प्रकारचे नट्स साखरेत आणि अजून वेगळ्या फ्लेवर्स मध्ये घोळवून ते नट्स असे काही स्टॉल्स हमखास असतात.

ठिकठिकाणी लोकांना उभं राहून वाईन प्यायला, खायला म्हणून लाकडी टेबल असतात, पण गर्दी इतकी असते की जागा सहज मिळतच नाही. सुरुवातीला भारतातून आल्यावर जेव्हा इथे लोकच दिसत नाहीत असं वाटत असतं, तेव्हा ख्रिसमस मार्केट एकदा बघितले की इतकी गर्दी होऊ शकते याची कल्पना येते, धक्का बुक्की नाही होत, पण एकूण सतत लोकांना बाजूला करत रस्ता शोधातच पुढे जावं लागतं.

पहिल्या काही वर्षात नव्याची नवलाई म्हणून पदार्थ घेऊन पाहिले, तरी नंतर तेच ते चार प्रकार आहेत असंही वाटतं. या सगळ्यात शाकाहारींसाठी पर्याय अगदीच मोजके असतात, त्यातून या सगळ्या प्रकारात भाजीची मजल जाते फक्त टोमॅटो पर्यंत. एकदा फुलकोबी, मश्रुम, ब्रोकोली यांचे भजे दिसले होते, पण ते म्हणजे नुसता मैदा किंवा कॉर्न फ्लोअर मध्ये तळलेले, त्याला भज्यांची सर येऊच शकत नाही. आपल्याकडे दहा प्रकारच्या भाज्या घालून क्रेप्स, ब्रेडचे प्रकार दिसले असते असं वाटतं. शिवाय गोड खाऊन पण कंटाळा येतो. आम्ही दर वर्षी ख्रिसमस मार्केट्स मध्ये वडापावची गाडी चालवण्याची स्वप्नं बघतो. इतक्या थंडीत मस्त गरमागरम सूप पासून तर पाव भाजी, भजी, दाबेली हे सगळंच खपेल असं वाटतं.

आता गेल्या काही वर्षात जर्मनी सोडून इतरही देशात अशी मार्केट्स भरतात, पण तरी मूळ जर्मनीत चालू झालेली म्हणून जर्मन लोकांना त्याचा फार अभिमान वाटतो. केवळ हेच नाही तर आपापल्या गावात भरणारी मार्केट्स, तिथली वाईन याचाही अभिमान असतो. खास डिसेंबरमध्ये आलेले पर्यटक सुद्धा हा अनुभव चुकवत नाहीत. आम्हाला पण दर वर्षी तेच प्रकार असले असं वाटलं तरी दर वर्षी जावंच वाटतं. दार वेळी नवीन गावांमध्ये जाऊन तिथले मार्केट्स आणि नेहमीचे आता माहिती असलेले अश्या दोन तीन ठिकाणी तरी जाणं होतं, आणि ते झालं नाही तर ख्रिसमस सेलिब्रेट केल्यासारखा वाटत नाही. मागची दोन वर्ष मार्केट्स बंद होती, त्यामुळे यावर्षी लोक जास्त उत्साहात होते, तरी युद्धामुळे वाढलेल्या महागाई मुळे सगळ्या किमती वाढलेल्या जाणवल्या आणि लोकांची गर्दी पण थोडी कमी होती. ख्रिसमस मार्केट्स चे म्हणावे तसे फोटो नाहीत, मुख्य तिथे मिळणाऱ्या पदार्थांचे तर नाहीतच, हे लेख लिहिताना लक्षात आलं, आता पुढच्या वर्षी खास फोटो साठी जाणं होईल.

या सगळ्या शिवाय नोव्हेंबर मध्येच प्रत्येक गावातल्या सरकारी कार्यालयातर्फे गावातल्या मुख्य रस्त्यावर, चर्च जवळ, एखाद्या पार्कात ख्रिसमस ट्री उभी केली जातात, त्यावार लाइट्स लागतात. शिवाय रस्त्यांवर लायटिंग लागतं. प्रत्येक गावात वर्षानुवर्षे एकाच पद्धतीचं लायटिंग असतं, जे मग हळूहळू सवयीचं झाल्यामुळे वेगळं वाटत नाही. पण दुपारी साडेचारलाच जेव्हा अंधार व्हायला लागतो, तेव्हा बाहेर दिसणारे हे दिवे, सजावट बघूनच बरं वाटतं. प्रत्येक गावागावातलं डेकोरेशन वेगळं असतं, त्यामुळे मग जवळच्या एखाद्या गावात चक्कर मारली की पूर्ण वेगळं वातावरण अनुभवता येतं. लोकांच्या घरात, बागेत फार सुरेख रोषणाई असते. याचे फोटो व्हिडीओ काढणं सहज जमत नाही, कारण नुसतं बघत बसावं वाटतं. कुठे लाइट्सचा रेनडीअर, कुठे सॅन्टाक्लॉज बागेत उभे दिसतात. स्पेशली लोकांच्या खिडक्यांमध्ये कापडी सॅन्टाक्लॉज चढतो आहे हे एक चित्र अनेक घरांमध्ये दिसतं. घरांच्या खिडक्यांमध्ये दिवे दिसतात. ऑफिस, किंडर गार्टन, शाळा सगळ्या ठिकाणी ख्रिसमस ट्री आणि त्या खाली रिकामेच पण सुंदर पॅक केलेले बॉक्सेस ठेवले जातात. लहान मुलांच्या शाळेतल्या ऍक्टिव्हिटी, क्राफ्ट्स सगळ्याला ख्रिसमस ट्री, स्नो मॅन हे मुख्य विषय असतात. ख्रिसमसची गाणी मुलांसोबत शाळेत म्हटली जातात.

जर्मनीत सहा डिसेंबरला निकोलाउस टाग (Nikolaus Tag) असतो, हा लहान मुलांचा आवडता दिवस. त्या दिवशी सुट्टी नसते, पण लहान मुलांसाठी निकोलाउस येतो. निकोलाऊस आणि सॅन्टा हे दोन्ही वेगळे नाही, संत निकोलाऊसचेच वेगळे नाव पुढे सॅन्टाक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाले, इतर बऱ्याच देशात तो ख्रिसमसच्या आदल्या दिवशी आणि ख्रिसमसला गिफ्ट्स वाटप करतो, जर्मनीत निकोलाऊस खास सहा तारखेला येतो, सहा डिसेंबर हा निकोलाउसचा स्मृतीदिन म्हणून. पाच तारखेला रात्री मुलं मोठे स्टोकिंग/मोजे/बूट बाहेर ठेवतात, निकोलाउस त्यात गिफ्ट्स ठेवतो, ती मुलांनी सकाळी उघडायची. किंडरगार्टेन मध्ये या दिवसासाठी आधीच आम्हाला मोजे देऊन ठेवा असं सांगायचे, हे मुलांचे नेहमीचे नाही तर खास ख्रिसमस साठी मिळणारी मोठी मोज्यांच्या आकाराची पिशवीचा म्हणू शकतो. आणि निकोलाऊस तिकडे मुलांना एखादं फळ, चॉकलेट्स द्यायला यायचा. आता शाळेत यावर्षी मुलांनी पिझ्झा केला, गोल चेहरा कापून मग त्यावर एक टोपी आणि हवं तसं त्यावर मग चीज, भाज्या टाकून निकोलाऊस पिझ्झा तयार करून खाल्ले. त्या दिवशी मुलांना निकोलाऊसची लाल टोपी घालून शाळेत येण्याची परवानगी होती, त्यामुळे सगळी मुलं अजूनच गोड दिसत होती. शेजार्‍यांकडून यावर्षी पण आधी निकोलाउस टाग म्हणजेच सहा डिसेंबरला गिफ्ट्स मिळाली, दारात ठेवलेली होती. आणि नंतर मग पुन्हा चोवीस डिसेंबरला पण काही मिळाली. 

सहा तारखे नंतर मग पुन्हा चोवीसची संध्याकाळ म्हणजे इथल्या लोकांच्या खास फॅमिली गेट टुगेदर साठी महत्वाचा दिवस. हेही पुन्हा जर्मनी आणि काही युरोपीय देशांचं वेगळेपण. बऱ्याच देशांमध्ये सॅन्टाक्लॉज या दिवशी येतो, पण इथे जर्मनीत निकोलाऊस आधीच येऊन गेल्यावर, मग ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लहान मुलांसाठी angel किंवा Christ-kind येऊन गिफ्ट्स देऊन जातो. चोवीस तारखेला कुटुंबातले लोक एकत्र येऊन प्रार्थना करून मग सोबत डिनर करतात. पंचवीसला अनेक जण सकाळी चर्च मध्ये जातात आणि नंतर पुन्हा कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतात. हे सगळं असलं तरी या दोन दिवसात सगळीकडे नुसती शांतता असते. एकतीस डिसेंबरला जसा जल्लोष, फटाके, गोंधळ असतो तसं ख्रिसमस ला होत नाही. सगळे कौटुंबिक कार्यक्रम असतात आणि रस्त्यावर तशी खूपच शांतता असते.  

चोवीसचा अर्धा दिवस आणि पंचवीस सववीस हे अडीच दिवस आणि मग एकतीस एक या सुट्ट्या सगळ्यांना असतात. बऱ्याच कंपनीज ख्रिसमस ते नवीन वर्ष या दरम्यान पूर्ण कामकाज बंद ठेवतात. म्हणजे तेव्हा तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सुट्टीतून दर वर्षी त्या सुट्ट्या टाकाव्या लागतात. चोवीस तारखेला दुपारी एक दीड पासून ते सव्वीस तारखेपर्यंत सगळी दुकानं, म्हणजे एकूण एक दुकान, मॉल, सरकारी कार्यालयं, काही रेस्टॉरंट्स चालू असतात, पण तीही कमीच आणि सगळीकडे गर्दी असण्याची शक्यता असते. ट्रेन, बस, संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच चोवीसच्या संध्याकाळ पासून नेहमी पेक्षा पूर्ण वेगळ्या टाइम टेबल प्रमाणे चालते, मोजक्याच बस ट्राम चालू असतात. या सगळ्यामुळे आधीचे काही दिवस दुकानात प्रचंड गर्दी असते. पोस्ट आणि कुरिअर वाल्यांचं काम या शेवटच्या काही दिवसात अनेक पटींनी वाढतं. परवा एक कुरिअर आलं तेव्हा तो माणूस इतका थकलेला होता, त्याला पाणी दिलं तेव्हा तो सांगत होता, की मी आज अर्ध्या दिवसात साडे तीनशे घरी पार्सल दिलेत, आणि अजून पन्नासएक द्यायचे आहेत. अजून दोन दिवस हे चालेलच. दोन तीन दिवसात काही कमी पडू नये म्हणून जास्तच सामान आणून ठेवलं जातं. सुरुवातीला इथे आल्यावर दर ख्रिसमसच्या सुट्टीत बहुधा आम्ही कुठेतरी फिरायला जायचो. वेगळ्या ठिकाणी जाऊन बर्फ बघणे, तिथला ख्रिसमस अनुभवणे या सगळ्याची हौस आता फिटली आणि आता सुट्ट्या असल्या तरी घरीच बसू निवांत असं वाटतं. त्या कडाक्याच्या थंडीत, लवकर अंधार होतो अश्या वेळी फार कुठे जाण्याचा उत्साह आता कमी झाला आहे. शिवाय चोवीस तारखेला संध्याकाळीच जेव्हा अनेक रेस्टोरंटस सुद्धा बंद होतात, तेव्हा कुठे बाहेर खायला शोधण्यापेक्षा घरीच खाऊ असं वाटतं.

सृजनला किंडरगार्टन मधून जेव्हा ख्रिसमस बद्दल हळूहळू समजायला लागलं, तेव्हा त्या वर्षी ख्रिसमस ट्री आणलं, खरंच झाड. हायवे वर ठिकठिकाणी आणि प्रत्येक दुकानात सुद्धा ख्रिसमस ट्री विकायला असतात. लहान, मोठ्या साईज प्रमाणे किमती असतात, आणि गाडीतून आणता यावं म्हणून ते पूर्ण गुंडाळून ठेवलेलं असतं. ते कव्हर काढलं की मग ते आपले हातपाय पसरतं. ते खाली ठेवण्यासाठी एक स्टँड असतो हेच आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही नुसतंच झाड आणलं आणि ते काहीतरी जुगाड करून उभं केलं. हे झाड नंतर पूर्ण वाळलं, पण ते नेण्यासाठी खास एक दिवस कचर्‍याची गाडी येते हेच माहीत नव्हतं. आम्ही बरंच उशीरा ते मग कचर्‍यापाशी ठेवलं, तेव्हा ते सुकून सगळी पानं टोचत होती. मग ही बाकीची माहिती शोधून पुढच्या वर्षी तो स्टँड आणला, मग ते झाड नीट उभं राहिलं. आता त्याच स्टँड वर आमच्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमात भगवा झेंडा फडकतो आणि डिसेंबर मध्ये ख्रिसमस ट्री सुद्धा. ते झाड नेण्यासाठी कचऱ्याची एक वेगळी गाडी येते, जेणेकरून तो कचरा वेगळा जैविक कचऱ्यात दिला जाऊन त्याची नीट विल्हेवाट लावली जाईल. यावर्षी आम्ही झाड आणलं तेव्हा फक्त साईज आणि किंमत बघून घेतलं. तिथल्या बाईने आम्हाला अनेक वेळा तुम्हाला हे उघडून बघायचं नाही का हा प्रश्न विचारला आणि आम्ही नाही म्हणालो. ती पुन्हा एकदा उघडून दाखवून पुन्हा पॅक करून देईन असं म्हणाली, पण आम्ही त्यात काय चिकित्सा करायची म्हणून सरळ एक घेऊन आलो. पण त्यामुळे इथले लोक ख्रिसमस ट्री घेताना कसे घेतात हे आम्हाला समजलं. 

जर्मन शिकत असताना तिथली एक मैत्रीण मला म्हणाली होती की माणूस कसाही असो, ख्रिसमस दरम्यान तो चांगलाच वागतो, या दरम्यान लोक मदतीला एरवी पेक्षा जास्त तत्पर असतात. पहिल्याच वर्षी मला हे मी तिच्याकडून ऐकलं, तेव्हा काही समजलं नव्हतं. पण मग हळूहळू या दरम्यान लोक दान जास्त देतात, कुठे अनाथ मुलांना मदत, कुणी गरीब मुलांना मदत करतात या बद्दलच्या पोस्ट पाहिल्या तेव्हा लक्षात आलं. या सणाच्या निमित्ताने खास चर्च मधून, विविध संस्थांमधून देखील वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते असं ऐकलेलं आहे. यावर्षी इथल्या लोकल ग्रुप वर एक पोस्ट होती, की बरेच ट्रक ड्रायव्हर असतात ज्यांना या सुट्टीत काम नसलं, तरी ते प्रवासात मध्येच दोन दिवस थांबून असतात, त्यांचे कुटुंबीय सोबत नसतात. म्हणून काही लोकांनी मिळून त्यांना एक दिवस खायचं सामान आणि प्रेझेंट्स नेऊन दिली.

इथले स्थानिक ओळखीचे लोक आम्हाला 'तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करता का?' असं विचारतात. आम्ही कोणतीच खास परंपरा म्हणून ख्रिसमस सेलिब्रेट करत नाही. खरंतर भारतीय सण साजरे करताना सुद्धा त्यातल्या आम्हाला जमतील, पटतील तेवढ्याच गोष्टी करतो, त्याचं दडपण न घेता, त्यातून आनंद मिळेल हे बघतो. गणपती गौरीच्या वेळी आता आमच्या भारतीय मित्र मैत्रिणींसोबतच इथलीही काही मंडळी घरी येतात आणि आमच्यासोबत उत्साहाने सहभागी होतात. तेच ख्रिसमसला सुद्धा, एक ट्री उभं करणे आणि सृजनला गिफ्ट्स देणे या गोष्टी आम्ही करतो, मित्रांना शुभेच्छा देतो. शेजाऱ्यांकडून सृजन साठी गिफ्ट्स मिळतात, म्हणून आज सृजन सोबत त्यांच्या साठी ग्रीटिंग कार्ड तयार केलं आणि त्यांना दिलं. दिवाळीला लायटिंग लावलं की त्या माळा आम्ही ख्रिसमस पर्यंत तश्याच ठेवतो. ते खास ख्रिसमस मय झालेलं, भारलेलं बाहेरचं वातावरण बघून आपसूकच उत्साह वाटतो. भारतातल्या दिवाळीची हमखास आठवण येते. ख्रिसमस निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी, कुटुंबीयांनी एकत्र येणे, घराची सजावट, स्नो मॅन, ख्रिसमसची गाणी, निकोलाऊस, नवीन खरेदी, दर वर्षीचे खरेदीचे ट्रेंड अशी विविध रूपातली नवीन देशाची संस्कृती समजत जाते. आपलं भारतीयत्व जपून, दोन संस्कृतींचा मिलाप होण्यात आमचाही खारीचा वाटा असेल असं म्हणून नवीन वर्षाची आतुरतेनी वाट बघतो. 

मेरी ख्रिसमस - Frohe Weihnachten 

ख्रिसमस मार्केट

1

2

3

4

5

6

7

8

मॉल मधली सजावट

9

10

घरचे ट्री
11

12

किंडरगार्टन मधली तयारी

13

14

15

शेजार्‍यांकडून आलेले गिफ्ट्स
16

गिफ्ट्स आणि सृजनने तयार केलेलं ग्रिटींग
17

अ‍ॅडव्हेंट कॅलेंडर
18

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - भारतीय रेस्टॉरंट्स

बाहेर खाण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांमध्ये दोन प्रकारचे लोक दिसतात, एक ज्यांना इथेही बाहेर रेस्टॉरंट मध्ये भारतीय जेवण आवडतं आणि दुसरे ज्यांना ते आवडत नाही. जे इथे बाहेर भारतीय नको असे म्हणणारे असतात, त्यांची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुणी म्हणतात की घरी ते खातोच, पुन्हा बाहेर काय तेच? कुणी म्हणतात की इथे भारतीय म्हणजे फक्त पंजाबी, त्याच चवी सगळीकडे त्यापेक्षा ते नको, किंवा अजून काही आपापली कारणं असू शकतात. तर काहींना भारतीय पदार्थ आवडतात म्हणून, घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून तिथे जायला आवडतं. इथल्या स्थानिक ओळखीतल्या लोकांना भारतीय पदार्थ खायचे तर त्यांना सोबत म्हणून त्या निमित्ताने सुद्धा अनेक जण जातात. आम्ही घरी प्रामुख्याने भारतीय स्वयंपाक करतो, इतरही वेगवेगळे प्रकार करतो, तरी सुद्धा बाहेर जाऊन भारतीय पदार्थ खाणे हेही आम्हाला आवडतं. कारण घरी तसा मराठी पद्धतीचा स्वयंपाक होतो तर बाहेर पंजाबी मिळतं, जे घरी क्वचितच केलं जातं. शिवाय घरकामात इतर कोणतीही बाहेरून मदत नसते, मग दोघानांही आयतं हवं असेल आणि भारतीय चव हवी असेल तेव्हा आम्ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये जातो किंवा आता पार्सल आणतो. या अनुभवांची ही कहाणी. 

बारा वर्षांपूर्वी जपान मधल्या एका अगदी लहानशा खेड्यात जेव्हा होते, तेव्हा पहिल्यांदाच तिथल्या एका मूळ नेपाळी माणसाच्या रेस्टॉरंट मध्ये गेले. ठराविक सात आठ भाज्यांचे प्रकार आणि नान, भात असा शाकाहारींसाठी असलेला मेन्यू. मी घरी रोज करायचेच, पण ऑफिस मधलं अखंड काम आणि इतर ठिकाणी असलेली शाकाहारी पदार्थांची उपलब्धता बघता, बाहेर तेवढेच पदार्थ मला पंचपक्वान्न वाटले होते, तोच एक आधार होता. एकदा तर माझा वाढदिवस आहे हे समजल्यावर त्याने डेझर्ट पण दिलं होतं. एवढ्या दुरून हे लोक इथे येऊन भाषा शिकून हा व्यवसाय करतात, त्यांचं प्रचंड कौतुक वाटलं होतं.
 
मग यु.के. मध्ये असताना इतकी खाण्याची आबाळ होत नव्हती आणि मी पण अभारतीय पदार्थाना सरावले होते. त्यामुळे तिथे भारतीय रेस्टॉरंट मध्ये क्वचित जाणं झालं. तरी एकदा पौंड ते रुपये असा हिशोब करत तिथली पाणी पुरी सुद्धा खाल्ली होती. आता सर्वाना भवन हे जे नाव अगदी माहितीचं झालं आहे, ते दहा अकरा वर्षां पूर्वी माहीत नव्हतं, पण तिथे साऊथ इंडियन पदार्थ खाल्ले होते. इतरत्र पायी चालताना जी काही भारतीय रेस्टॉरंट्स दिसायची, ती तेव्हा (दुरून) खूप हाय फाय वाटायची. नंतर ऐकीव माहिती, सोशल मेडिया यातून तिथली बरीच ठिकाणं कळली, पण महिना दोन महिन्याच्या तिथल्या वास्तव्यात फार कुठे जाणं झालं नाही.

जर्मनीत आले आणि इथल्या स्थानिक बेकरीज, रेस्टॉरंट्स यांच्यासोबतच भारतीय रेस्टॉरंट्स मध्ये सुद्धा जायला लागलो आणि तिथे मिळणारे भारतीय पदार्थ, फक्त तिथेच मिळणारे भारतीय पदार्थ, जर्मनांची भारतीय चवीची आवड निवड अशा गोष्टींची माहितीत भर पडली. 

पहिल्यांदाच एका ठिकाणी गेलो होतो, मेन्यू कार्ड बघून एक भाजी आणि नान अशी ऑर्डर दिली. सगळ्यात आधी मिळाला मात्र भात, जिरा राईस नाही, पण तसाच मोकळा शिजवलेला भात. आम्ही ऑर्डर केला नाही असं आम्ही सांगितल्यावर हो, पण भात येतोच प्रत्येक भाजी सोबत असं सांगितलं. ते मेन्यू कार्ड वरही बारीक अक्षरात कुठेतरी लिहिलेलं होतं, फक्त आम्ही वाचलं नव्हतं. तिथे भाजी आणि नान दोन्ही काही विशेष आवडलं नाही, बरेच टेबल रिकामेच होते, त्या ठिकाणावर काट मारली. इथेच पहिल्यांदा मँगो लस्सी हा प्रकार मेन्यू कार्ड वर पाहिला, ती इथे (आणि इतरही देशात) किती प्रसिद्ध आहे हे मात्र तेव्हा माहीत नव्हतं.
 
नंतर एका ठिकाणी गेलो तर तिथे दोन लोक शेअर करू शकतील असा थाळीचा प्रकार होता, तो घेतला. त्यात रोटी मात्र एकच होती, बाकी भात आणि भाज्या. आम्ही पोळी प्रेमी लोक, ती एक रोटी इतकी पटकन संपवली की आता एक्स्ट्रा ऑर्डर करायची का असा विचार करत होतो. तेवढ्यात त्याने एक रोटी आणून दिली आणि ही कॉम्पलिमेन्टरी आहे म्हणाला. आपल्या पोळी खाण्याच्या स्पीड वरून त्याने ओळखून आपल्याला आणून दिली पोळी याचं आम्हाला नंतर अनेक वेळा हसू यायचं. पण चव चांगली होती, त्यानंतर आम्ही तिथे गेलो की पोळी आणि भाजी अशीच ऑर्डर द्यायचो. भात उरायचाच, त्याचा घरी आणून दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात करायचा अशी पद्धतच रूढ होत गेली.

मग अजून बऱ्याच ठिकाणी गेलो. समस्त जर्मनीतल्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये अनेक कॉमन गोष्टी आढळतात. इंडिया, ताज, हाऊस, पॅलेस, प्रिन्स, महाराजा, नमस्ते, गांधी, बॉंबे अशा ठराविक शब्दांचे विविध कॉम्बिनेशन करून तयार होणारी नावंच नव्वद टक्के वेळा असतात, नवीन ट्रेंड मध्ये नान, करी, मसाला वगैरे. हात जोडून नमस्कार करणाऱ्या साडीतल्या बाईचा, जिने खूप दागिने घातलेले आहेत आणि स्वागत करते आहे असा फोटो, ती साडी पण बहुतांशी लाल रंगाची, याला दुसरा पर्याय म्हणजे स्वागताला एखादा राजाचा पुतळा. आत लाकडी कोरीव काम केलेलं डार्क ब्राऊन रंगाचं पार्टिशन, जे सगळीकडे अगदी एकाच कारागिराकडून करवून घेतलेत असं भासवणारे, एकच रंग आणि डिझाईन सगळीकडे आणि त्याच मुशीतून घडवलेली वॉलपिसेस. कमानीचे डिझाईन असलेलं इंटेरियर, गणपतीची मूर्ती, नटराजाची मूर्ती, बुद्धाची मूर्ती, हत्ती, पंजाबच्या ग्रामीण जीवनाचं एखादं चित्र, अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा फोटो, राजे राजवाडे यांची काही चित्र, पालखी घेऊन निघालेला हत्ती, टेबल वर ठेवलेली एक फुलदाणी, सुरेख कोरीव काम केलेले दिवे, टेबल वर ठेवलेली फुलदाणी, त्यात खरी किंवा खोटी फुलं, पितळी मेणबत्ती स्टॅन्ड आणि बॅकग्राउंडला सदैव चालणारं इंस्ट्रुमेंटल म्युझिक. हे इंस्ट्रुमेंटल म्युझिक नव्वदच्या काळातल्या बॉलिवूड गाण्यांचं, काही थोडी जुनी. काही ठिकाणी एखादा टीव्ही, त्यावर बॉलिवूडची गाणी लागलेली असतात नाहीतर आता युट्यूब वरून रेसिपीजचे व्हिडिओ सुद्धा असू शकतात किंवा क्रिकेटची मॅच पण असू शकते. काही ठिकाणी झगझगीत वॉलपेपर, लाल रंगाच्या पूर्वी लग्नात असायच्या तश्या खुर्च्या हेही दिसतात. काउंटर मागे बीअर आणि वाईनचे ग्लास आणि बाटल्या ठेवलेल्या असतात, तिथेही काही मूर्ती आणि भारताचा झेंडा. एका ठिकाणी तर साडीचं डेकोरेशन केलं होतं, कसं तर भिंतीला झेंडूच्या माळा लावू त्या पद्धतीने छताला साड्या लावल्या होत्या. त्याही जुनाट. आवड असते प्रत्येकाची, पण हे अगदीच ऑड दिसत होतं. रिसायकल वगैरे ठीक आहे पण ते अश्या ठिकाणी आणि असं? त्या इमारतीच्या आसपास येणारा खास एक वास असतो, कितीही धुराडी लावली तरी बाहेर आणि आत पण तो वास भरून राहिलेला असतो.

मेन्यू कार्ड पण साधारण एकाच पद्धतीची, त्यावर भारतीय मसाल्यांची माहिती, मेंदी रांगोळीची असतात तश्या डिझाईनची बॉर्डर किंवा मसाल्यांच्या चित्राचं बॅकग्राऊंड. पाणी तर इथे जर्मनीत फुकट मिळत नाही, त्यामुळे पहिल्या दोन तीन पानांवर पाणी, विविध पेय, किंगफिशर बियर आणि सुला वाईन या खास भारतीय म्हणून, बाकी इथले लोकल प्रकार, सोबत सॉल्टी लस्सी आणि मँगो लस्सी. स्टार्टर्स म्हणून पापड (मसाला पापड नाही) भाज्यांची भजी, पनीर भजी, कांदा भजी आणि चिकन भजी, काही ठिकाणी समोसा. मग पुढे मांसाहारी पदार्थ त्या त्या प्राण्यानुसार वर्गीकरण करून, सगळ्यात ग्रेव्हीचे तेच चार पाच प्रकार. शाकाहारी म्हणून छोले, बटाटा, पनीरच्या त्याच चार ग्रेव्ही. डिशची नावं. भाजीच्या वर्णनात मँगो, मद्रास, कढाई, मोगुल, मसाला असे शब्द.
 
ऑर्डर दिली की तीन वाट्या आणि तीन लहान चमचे असं ठेवलेला एक ट्रे येतो. एकात लोणचं असतं, एकात आंबट गोड चटणी आणि एकात पुदिन्याची चटणी भरपूर दह्यात मिसळून ती. थोडं कॉम्बिनेशन बदललं तरी बहुतांशी हे असतंच. साधारण सगळ्यांकडची भांडी पण एकाच पद्धतीची असतात. मँगो लस्सी ऑर्डर केली जातेच, ती आधी येते, अगदी काठोकाठ भरू द्या प्यालाच्या थाटात. सोबत अजून काय मागवले असतील ती पेयं. मग भाज्या ठेवायला एक गरम स्टॅन्ड येतो, आधी भात आणि मग भाज्या, रोटी असं एकेक येऊन मग सुरुवात होते. या सगळ्या ग्रेव्ही मध्ये क्रीम बदाबदा टाकलेलं असतं. पालक पनीर मध्ये फ्रोझन पालक, त्यातही फ्रोझन पालक आणि क्रीम यांची जी एक प्युरी मिळते तीच वापरून केलं असेल तर ती पालक पनीरची चवच येत नाही. तिखट इथल्या लोकांना मानवेल इतपत, पण जरा तिखट करा सांगितलं तर वरून नुसत्या मिरच्या, एखादा तिखट सॉस असं टाकून ते तिखट म्हणून देतात. बिर्याणी म्हणून दोन भाज्या टाकलेला फोडणीचा भात सुद्धा एकदा पाहिला आहे, पुलाव सुद्धा नाही. 

बहुतांशी ठिकाणी सोमवार ते शुक्रवार सकाळी बुफे असतो. त्यात पापड, भजी, सूप, दोन भाज्या, एक चिकन करीचा प्रकार आणि भात, नान असे पदार्थ असतात आणि या बुफे साठी लोकांची गर्दी असते. एक तर बुफेची किंमत तशी कमी आणि त्यामानाने बरेच प्रकार चाखून बघता येतात, म्हणून आपोआप जास्त गर्दी होते. स्थानिक जर्मन लोकांना भारतीय जेवण खूप मनापासून आवडतं. बुफे मध्ये लोक पापड, लोणचं, भजी यावर तुटून पडतात. ते पोळी आणि भाजी असं खात नाहीत, भात, करी आणि सोबत नान असं, त्यातूनच इथे ही भात देण्याची पद्धत आली असावी. मँगो लस्सीची डिमांड बघता भारताने तो राष्ट्रीय पदार्थ म्हणून जाहीर करावा असं चित्र दिसतं. त्याच त्या चार भाज्या बघून आम्हाला कंटाळा येतो. रोजच्या स्वयंपाकाशिवाय इतरही थोड्या वेगळ्या भाज्या घरी केल्या जातातच, पण कधीतरी बाहेरची चव हवी असते, अश्या वेळी बाहेर तर जावं वाटत आहे पण तिथे पुन्हा तेच सगळं म्हणून मग पुन्हा घरीच करू असं पण होतं. जेव्हा सुरुवातीला इथे खूप मर्यादित भाज्या, मसाले मिळायचे तेव्हा ठीक होतं. पण आता काळानुसार त्यात बदल करायला कुणी फार उत्सुक नसतात असं वाटतं. आता कच्चा माल तसा सहज उपलब्ध असतो, पण मेन्यू कार्डमधल्या किमती फक्त वाढतात, बाकी काहीच बदल दिसत नाहीत. मग ज्या ठिकाणी ज्या भाज्या चांगल्या मिळतात तेवढ्याच फक्त मागवल्या जातात. चाट, पुऱ्या, भाजीचा एखादा वेगळा प्रकार, गुजराती, मराठी पदार्थ हे सहज कुठे दिसत नाहीत, भाताचे काही वेगळे प्रकार मिळत नाहीत. मोठ्या शहरात नक्कीच फरक पडतो, तशी मागणी सुद्धा असेल, पण सर्वसाधारण चित्र हे दिसतं. अगदी तिथे वर्षानुवर्षे ऐकू येणारी तीच इन्स्ट्रूमेंटल गाणी ऐकून आम्ही नेहमी यांना आता आपण नवीन सीडी भेट देऊयात का असं वाटतं.
 
एका ठिकाणी गेलो तेव्हा तिथले पांढरे दिवे बघूनच मी खुश झाले. शिवाय त्यांनी कांदा पातीची एक चटणी दिली होती सोबत, आणि एक मटारचं सारण भरलेली स्टफ नान/पराठा प्रकार पण मिळाले, चवही थोडी वेगळी होती. त्यामुळे ते आपोआप आवडत्या यादीत आले, आता तिथून बरंच लांब राहत असल्याने जाणं होत नाही. सर्वाना भवन मध्ये संमिश्र अनुभव आहेत. तिथे कधी चव चांगली असते तर कधी नाही, कधी सर्व्हिसच वाईट तर कधी आंबट सांबार. पण पंजाबी खाण्याच्या कंटाळ्यातून शरण जायला ती एकच जागा आहे, त्यामुळे बरंच लांब असूनही तिथे जाणं होतं. एवढ्यात एक जरा वेगळा मेन्यू असलेलं नवीन ठिकाण कळलं. चव चांगली होती, मुख्य जरा वेगळ्या भाज्या होत्या, आणि भात कंपलसरी नव्हता, भाजीसोबत नान, रोटी किंवा भात तुम्हाला हवं ते असा पर्याय होता, हे आम्हाला फार आवडलं. एकदा दिवाळीत काही मित्र मंडळी मिळून एका ठिकाणी गेलो, दिवाळी म्हणून गुलाबजाम दिले त्यांनी, पण तिथल्या काकांनी दिवाळीच्या प्रथा आणि दंतकथा यावर आमची परीक्षाच घेतली, गुलाबजाम नको पण प्रश्न आवरा अशी आमची स्थिती होती. आता जवळच्याच गावात तीन भारतीय बायकांनी मिळून एक रेस्टॉरंट चालू केलेलं म्हणून आम्ही पण आवर्जून तिथे गेलो. तेही दाक्षिणात्य पदार्थ, उत्साहाने आम्ही गेलो. सुरुवातीला ठीक होतं, त्यांचं कौतुकही केलं पण नंतर मात्र शिळेच पदार्थ ताजे करून दिले, चटणीला वास येत होता, डोसे आणि इडल्या आम्ही घरी जास्त चांगले करू असे, सांबार तयारच नाही असे एकेक अनुभव बघून आता तिथे जाणं बंद केलं. कधी कधी भारतीय म्हणून स्पेशल ट्रीटमेंट मिळते. जिथे आता अनेक वेळा गेलो आहे ते मालक, त्यांची बायको या सगळ्यांची ओळख झाली आहे. ते आम्हाला पाणी आणि सलाड आणून देतात, ऑर्डर शिवाय. पार्सल असेल तर आम्ही आधीच भात कमी द्यायला सांगतो. त्याबदल्यात आम्ही न मागता ते स्वतःहून एक रोटी जास्त देतात. त्या मालकीण भाभी, त्यांच्या लहानपणी पुण्यात खडकीला होत्या. त्या तिथल्या पोह्यांची नेहेमी आठवण काढतात. मी प्रेग्नंट असताना जेव्हा गेले, तेव्हा त्या खास काय हवं ते सांग, हवं तर तुला हवी तशी भाजी बनवायला सांग असं येऊन सांगायच्या. एकदा सृजन कडून मँगो लस्सीचा ग्लास सरकला आणि सांडली तेव्हा त्यांनी आम्हाला नवीन आणून दिलीच, शिवाय त्याला रागावू नका, होतं असं मुलांकडून हे चार चार वेळा सांगितलं.
 
इटलीत एका ठिकाणी गेलो तिथे मालकीण बाई पण पुण्यात ओशोंच्या आश्रमात येऊन गेल्या होत्या. स्पेन मध्ये शेवटच्या दिवशी मालागा मध्ये गेलो, तिथे गर्दी नव्हती. शिवाय त्याने salty लस्सी जरा नीट ग्लास मध्ये आणून दिली, ग्लासचा आकार वेगळा हे बघून सुद्धा मला बरं वाटलं, इतके ते बाकी ठिकाणी एकाच पद्धतीचे होते. गप्पा मारताना तो मुलगा पुण्यात पण शिकला होता हे कळलं. आम्ही तिथेच शिकलो या गप्पा झाल्या आणि त्याला एकदम घरचं कुणी भेटल्याचा आनंद झाला. 
 
या व्यवसायात प्रामुख्याने इथे पंजाबी लोक आहेत. पण गेल्या काही वर्षात काही तरुण मंडळी, विविध प्रांतातली मंडळी या व्यवसायात येत आहेत. दाक्षिणात्य रेस्टॉरंट्सचं प्रमाण वाढतं आहे.मोठ्या शहरात रेस्टॉरंट्स वाढत आहेत. विद्यार्थी, नोकरी करणारी तरुण मंडळी यांच्या सोयीसाठी त्यातल्या त्यात माफक किमतीत उपलब्ध होतील असे पर्याय दिसायला लागले आहेत. मोठ्या रेस्टॉरंट शिवाय काही अगदी लहान जागेत काही ठराविक पदार्थच मिळतील अशी सोय असणाऱ्या जागा पण आता बऱ्याच आहेत.काहींनी आता चाट, वेगळ्या भाज्या, विविध स्टार्टर्सचे प्रकार, इंडियन चायनीज पदार्थ अशीही सुरुवात केली आहे आणि त्यांना उत्तम मागणी पण आहे. 

आमच्या परीने आम्हाला जे रेस्टॉरंट्स आवडले, त्याबद्दल आम्ही आमच्या भारतीय आणि स्थानिक मित्रांना सुद्धा सांगतो. केस कापायला गेले की तिथल्या बायका ते ऑफिसातले सहकारी, शेजारी असे अनेक जण आम्हाला तुम्ही कोणतं रेस्टॉरंट रेकमंड कराल असं विचारतात, तेव्हा त्यांना सुचवतो. तेच ठराविक पदार्थ आणि त्यांच्या चवीतला तोच तोच पणा, कधी मिळणारी वाईट सर्व्हिस हे कंटाळवाणं वाटलं, काही कटू गोड अनुभव असले, तरी हे नक्की की या लोकांमुळे इथे आमच्यासारख्या भारतीय लोकांना आपले पदार्थ खायला मिळतात. कधी मित्रांची गेट टुगेदर तर कधी पार्टी साठी खूप मदत होते. आपले पदार्थ या पाश्चिमात्य देशातल्या कानाकोपऱ्यात पोचवण्यात त्यांचा फार मोठा हातभार आहे. इथे वेगळी भाषा शिकावी लागते, हा व्यवसाय सुरु करणे, चालवणे हे नक्कीच आव्हानात्मक असेल याची कल्पना आहे. इथली ब्युरोक्रसी अतिशय वेळखाऊ आणि किचकट आहे, पण तरी असे अनेक जण इथे पाय रोवून उभे आहेत, नवीन सुरुवात करत आहेत. अजून काही वर्षात बरेच पदार्थ मिळायला लागतील आणि कुणाकुणाच्या रूपात भारतीय पदार्थ जगभर पोचत राहतील. 

ता.क. - इतके वेळा कुठे कुठे जाऊन सुद्धा कधीच पदार्थांचे फोटो काढले नाहीत हे लेख लिहिताना लक्षात आलं. मग काल फक्त तेवढ्या साठी जाऊन फोटो काढले, गर्दीमुळे इंटेरियरचे फोटो काढता आले नाहीत.

1

2

3

4

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - बॉलीवूड आणि भारत

जर्मनीतलं वास्तव्य - बॉलीवूड आणि भारत

भारताबाहेरच्या लोकांशी भारत या विषयावरील संवादात काही हमखास येणारे मुद्दे असतात, त्यात खाद्यसंस्कृती, लोकसंख्या, ठराविक पर्यटन स्थळं, बॉलीवूड, कपडे, भाषा, सणसमारंभ, स्त्रियांची स्थिती असे काही विषय अगदी आघाडीवर असतात. त्यातल्याच बॉलीवूड या विषयावर ज्या गप्पा रंगतात त्याबद्दलचे आमचे हे अनुभव.

स्थळ जर्मन भाषेचा क्लास - एक रशियन मुलगी होती तिथे. भारत हे ऐकताक्षणी तिने ह्रितिक रोशन तिला खूप आवडतो, त्याचा वाढदिवस, त्याला सहा बोटं आहेत वगैरे सगळी त्याची विकिपीडिया तिने मला ऐकवली. मग त्याचे सिनेमे आणि इतरही बॉलीवूड बद्दल ती नेहमीच बोलायची.

तेव्हाच मी इथे केस कापण्यासाठी कुठे जाता येईल ही माहिती शोधात होते. क्लास मधल्याच मुलीकडून एक ठिकाण समजलं, जवळच होतं, मग तिथेच गेले. अनेक तुर्किश (तुर्कस्तानातले) लोक वर्षानुवर्षे जर्मनीत राहतात, तर या दुकानात बहुतांशी तुर्किश लोक होते. एकीकडे त्या माणसाने जुजबी बोलायला सुरुवात केली, कुठून आलात वगैरे ठराविक प्रश्न. आणि मग म्हणे तुम्हाला शाहरुख खान माहीत आहे का? म्हणजे काय, हा प्रश्न असू शकतो? पण तेव्हा इतकं हजरजबाबी पणे जर्मन येत नव्हतं. मी पण हो माहीत आहे ना असं सांगितलं. मग पुढे पूर्णवेळ त्याने त्याला शाहरुख आणि बॉलीवूड याबद्दल किती प्रेम आहे याचंच वर्णन केलं. बहुतेक काही गाणी पण सांगितली पण उच्चार मला न समजल्यामुळे मी नुसतं हो हो केलं.

वर्षभराने आम्ही एका घरातून दुसऱ्या घरी शिफ्ट होणार होतो. त्या घरमालकाला तशी नोटीस दिली. मग लोकांचे ते घर बघण्याचे कार्यक्रम चालू झाले. त्यात एक बाई आली, तिच्यासोबत तिची लहान मुलगी होती. त्या घरात ती राहणार नव्हती, तिच्या कुणा मैत्रिणीसाठी ती बघायला आली होती. दोन मिनिटात घर बघितलं, घराबादल जुजबी विचारपूस झाली. आम्ही पाणी वगैरे विचारलं आणि मग पुढे तिच्या ज्या काही गप्पा चालू झाल्या, विषय होता फक्त बॉलिवूड आणि बॉलीवूड सिनेमे. तिलाही शाहरुखच सगळ्यात जास्त आवडायचा आणि तिचा सगळ्यात आवडता सिनेमा कोणता तर देवदास. ऐश्वर्या (तिचा उच्चार आयषवऱ्या होता ) किती छान दिसते, काय सुंदर कपडे आहेत याबद्दल प्रचंड कौतुक केलं. मी आणि माझे सासरे आम्ही दोघांनी हा सिनेमा किमान दहा वेळा पाहिला आहे आणि मी प्रत्येक वेळी किती रडले हे सांगताना सुद्धा तिला रडू येईल असं वाटत होतं. तिला भेटलेलो आम्ही बहुतेक पहिलेच भारतीय होतो, ते घर तिच्या मैत्रिणीला आवडो न आवडो, ती तिचं बॉलिवूड प्रेम व्यक्त करू शकली याचाच बहुतेक तिला आनंद झाला होता.

एकदा एका मॉल मध्ये गेलो होतो, कॉफी प्यायला स्टारबक्स मध्ये गेलो. माझा नंबर येणार तेवढ्यात पलीकडच्या काउंटरवर असलेल्या मुलीने आधीच्या कस्टमरची अगदी घाईत ऑर्डर घेऊन मला हात दाखवून तिच्या काउंटर वर बोलावलं. आम्ही ऑर्डर दिली, तिथे नाव लिहितात ग्लास वर, मी सवयीने नाव आणि स्वतःहून पुढे स्पेलिंग सांगणार तेवढ्यात तिने या या आय नो म्हणून लिहीलं व्यवस्थीत. मग पैसे दिले आणि तिनी माझ्या चेहऱ्यावरून वरून हात फिरवून तिच्या कपाळावर बोटं मोडली आणि काहीतरी पुटपुटली सुद्धा, जे हिंदी नव्हतं पण नजर ना लगे या अर्थाचं असावं. इथे मराठी हिंदी मालिकांसारखा माझ्या चेहऱ्यावर तीन वेळा फोकस यायला हवा होता इतकी मी अवाक झाले होते. मला माधुरी दीक्षित माहीत आहे, तिचा डान्स खूप आवडतो आणि तू मधुरा म्हणाली, मला माधुरी सारखं तुझं नाव पण खूप आवडलं म्हणून, पाहिलं आहे मी हे असं सिनेमात असं करतात ते, हेही सांगितलं. अगदी आजीने प्रेमाने दृष्ट काढल्यावर वाटेल तसंच वाटलं. हे सगळं झालं, आम्ही बाहेर येऊन कॉफी घेत बसलो तर ही पुन्हा आली, एका लहान कपात अजून काहीतरी डेझर्ट प्रकार घेऊन, हे माझ्याकडून तुला असं म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामावर निघून गेली. मी आपली थँक्यू थँक्यू म्हणत होते फक्त, शिवाय इतकं प्रेमाने कुणी अनोळखी व्यक्ती येऊन आपल्या साठी काही करते आहे यासाठी बॉलिवूड आणि माधुरीचे पण मनातल्या मनात आभार मानले.

एका लायब्ररी मध्ये गेले तेव्हा तिथे अनेक सिनेमांच्या डीव्हीडी होत्या, त्यात कभी अलविदा ना केहना, परदेस, करण जोहरचे अनेक चित्रपट होते. त्यामानाने यश चोप्रांचे चित्रपट ज्यांनी आपल्याला युरोप दाखवला ते तेवढे प्रसिद्ध आहेत असं वाटलं नाही. पण उलट बाजूने मैं प्रेम की दिवानी हूं किंवा हॅप्पी न्यू इअर सारखे अगदीच पडलेले चित्रपट पण डब करून जर्मन भाषेत उपलब्ध आहेत. झी वन हे एक पूर्ण बॉलीवूड चित्रपट आणि गाणी, अर्थात पूर्ण जर्मन भाषेतून दाखवणारं एक चॅनेल पण चालू झालं होतं, शाहरुख खान त्याच्या उदघाटनाला आला होता हेही ऐकलं होतं, पण चार वर्षात हे चॅनेल बंद झालं. त्यापूर्वी एका चॅनेल वर आठवड्यातून एक बॉलीवूड सिनेमा दाखवला जायचा, त्यात पण असेच कोणतेही सिनेमे दाखवायचे.

हायडेलबर्ग हे इथेच जवळ असणारं एक प्रसिद्ध गाव. या गावात बरेच पर्यटक असतात. इथल्या ओल्ड स्ट्रीट वर अगदी टिपीकल युरोपियन वातावरण असतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं, हॉटेल्स, प्रत्येक हॉटेलबाहेर बसलेले लोक, फ्रेंच फ्राईज ते आईसक्रीम ते कॉफी ते केक अशा अनेक पदार्थांचे नाकात शिरणारे स्वाद, जुन्या मोठ्या खिडक्यांची घरं, फुलांनी सजवलेल्या खिडक्या, दगडी रस्ता, मधूनच पाण्याचे कारंजे, दोन तीच चर्च, सुवेनियर शॉप्स, मागे दिसणारा इथला किल्ला, व्हायोलिन किंवा कोणतंही वाद्य वाजवत बसलेले लोक, सुरेख लॅम्पपोस्ट असं चित्रातलं दृष्य असतं. आम्ही दोघं आणि अजून एक मित्र मैत्रीण असे इथून गप्पा मारत चाललो होतो. अचानक एक धून ऐकू आली, आम्ही सगळ्यांनी ओळखीचं गाणं म्हणून मागे वळून पाहिलं आणि ही कोणती धून हे आठवत होतो, ते क्षणभरात आठवलंच, प्यार हुआ इकरार हुआचे ते सूर होते. एक म्हातारे पांढऱ्या दाढीवाले आजोबा होते, आम्ही मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं याचा त्यांना इतका आनंद झाला होता, मला वाटलंच होतं तुम्हाला समजेल असं म्हणून मग त्यांनी पुन्हा वाजवायला सुरुवात केली. मग राज कपूर माझा खूप आवडता होता, मला अजूनही त्याची अनेक गाणी वाजवता येतात हेही सांगितलं. या पूर्ण गावात असे अनेक वादक गायक नेहमीच दिसतात, पण हे आजोबा विशेष लक्षात राहिले.

जिथे व्हिजाची कामं होतात त्या फॉरेनर्स ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी ओळखीची झाली होती. तिच्या खोलीत शाहरुखचं भलं मोठं पोस्टर लावलेलं होतं. त्याबद्दल थोड्याफार गप्पा पण व्हायच्या. तिच्यासाठी भारतातून अजून दोन पोस्टर आणू आणि पुढचं काम लवकर करवून घेऊ असं आम्ही गमतीने म्हणायचो.

सृजनची एक शिक्षिका होती तिलाही शाहरुख खानच आवडायचा. सृजनच्या किंडरगार्टेन मधला एक मित्र होता, त्याची आई आणि माझी भेट ही बहुतांशी तिथे सोडताना फक्त व्हायची, तेव्हा बोलणं व्हायचं नाही. एकदा आम्ही दोघी पण ट्रेन मध्ये भेटलो अचानक, आणि मग भारताबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. तिने मग तिला पण बॉलीवूडची गाणी किती आवडतात असं सांगून बरीच गाणी म्हणून दाखवली. बोले चुडियां बोले कंगना तर फार आवडतं आणि माझ्या मुलांना पण आवडतं त्यावर नाचायला हेही सांगत होती. आता पुन्हा भेटली तेव्हा म्हणे तिचा मुलगा सृजनची गाणी लाव असं तिला सांगतो, कारण सृजन जी भाषा बोलतो ती हीच असं त्याला वाटतं. त्यांना कुणालाही हिंदीचा गंध नाही, सृजनला पण नाही आणि तरी ही सगळी गाणी तिला आणि तिच्या मुलाला सृजनची आठवण करून देतात हे गमतीशीर वाटतं.

भारतातल्या राज्याप्रमाणे बदलणाऱ्या भाषा हे इथे कुणाला माहीत नसतं आणि सांगितलं तरी त्यांना खूप आश्चर्य वाटतं. मग या संवादात जेव्हा अजून पुढे बोलणं होतं, तेव्हा मी हिंदी भाषा म्हणजे बॉलीवूडची भाषा असा संदर्भ सांगते, अजून सविस्तर काही सांगण्यापेक्षा ते सोपं वाटतं. तसंही माझ्यासाठी तरी हिंदी भाषा समजण्यात चित्रपटांचाच हातभार मोठा आहे.

सिनेमे आवडीने बघत असलो तरी आम्ही अगदी सिनेमावेडे गटात मोडत नाही, प्रत्येकच सिनेमा आवर्जून जाऊन बघूच असं होत नाही. इथे तर बाहेर चित्रपटगृहात हिंदी सिनेमे क्वचितच लागतात, त्यातून सगळं जुळून येऊन ते बघायला जमणं हे अजूनच अवघड होतं, युट्युब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरून जमेल तेवढं पाहिलं जात असलं तरी आमच्या डोक्यातली सिनेमा आणि चित्रपटसृष्टी ही तशी जुनी आहे असं म्हणू शकतो. वयाच्या टप्प्याप्रमाणे पण आवड निवड बदलत जाते. त्यामुळे कधी कधी काय हे लोक असे इतके वेडे आहेत आपल्या हिरोंसाठी, कोणतेही रडके सिनेमे काय एवढे आवडीने बघतात असं पण वाटतं. भारताची काय इमेज होत असेल या सगळ्या उगाच श्रीमंती किंवा अति उच्चवर्गीय चित्र दाखवणाऱ्या सिनेमातून असं सुद्धा वाटतं. पण तरी बॉलीवूड आणि भारत ही ओळख तशी बहुतांशी अभिमानास्पदच वाटते. भारताबाहेर भारताची ओळख करवून देण्यात बॉलीवूड आणि पूर्णच सिनेमासृष्टीचा फार मोठा वाटा आहे हे नाकारता येणार नाही. गेल्या काही वर्षात हिंदी सिनेमे पण अधून मधून इथल्या सिनेमागृहात लागतात. जागतिकीकरणाच्या लाटेत हे अजून वाढत जाईल आणि. इतर भाषिक चित्रपट आता ओटीटी कृपेने सहज उपलब्ध आहेत तसेच आपले भारतीय चित्रपट जागतिक पातळीवर पोचत राहावेत. फक्त केवळ हे फॅमिली ड्रामा आणि दोन तीनच हिरो हिरोईन एवढीच ही ओळख मर्यादित राहायला नको, बॉलीवूड मधल्याच अनेक सशक्त कलाकृती, कलाकार आणि विविध भारतीय भाषांमधल्या कलाकृती सुद्धा इथल्या लोकांपर्यंत पोचाव्या असं अजून मनापासून वाटतं. तेव्हा अजून जास्त लोकांशी भारतीय, मराठी म्हणूनही या विषयांवर संवाद होतील आणि आम्ही अभिमानाने याबद्दल अधिकाधिक बोलत राहू.

Keywords: