बदतमीज़ दिल (लेखमालिका - १)

लायझॉलच्या फेक लॅव्हेंडर वासाने हवा भरून टाकत सफाईवाल्याचा मॉप पुढे सरकला. जिकडे तिकडे फक्त नर्सेसच्या चटचट चालणाऱ्या पावलांचा आवाज वगळता शांतता पसरली होती. कोपऱ्यातील एकुलत्या पामच्या झाडानेही दमून पाने जमिनीकडे झुकवली होती. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना डॉक्टरांच्या केबिन्स होता. एकेक दार पास करत सुबोध त्याला हव्या त्या काचेच्या दारासमोर थांबला आणि समोरच्या स्टील नेमप्लेटकडे बघून एक खोल श्वास घेतला.

Dr. Anish Pai
MS (Gen Surg.) M.Ch (Cardiovascular & Thoracic)

थरथरत्या हाताने त्याने दारावर हळूच नॉक केले.

images (1)-01_0.jpeg

बदतमीज़ दिल (लेखमालिका - १)
बदतमीज़ दिल (लेखमालिका - २)

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १

लायझॉलच्या फेक लॅव्हेंडर वासाने हवा भरून टाकत सफाईवाल्याचा मॉप पुढे सरकला. जिकडे तिकडे फक्त नर्सेसच्या चटचट चालणाऱ्या पावलांचा आवाज वगळता शांतता पसरली होती. कोपऱ्यातील एकुलत्या पामच्या झाडानेही दमून पाने जमिनीकडे झुकवली होती. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना डॉक्टरांच्या केबिन्स होता. एकेक दार पास करत सुबोध त्याला हव्या त्या दारासमोर थांबला आणि समोरच्या स्टील नेमप्लेटकडे बघून एक खोल श्वास घेतला.

Dr. Anish Pai
MS (Gen Surg.) M.Ch (Cardiovascular & Thoracic)

थरथरत्या हाताने त्याने दारावर हळूच नॉक केले.

"येस?" आतून आवाज आल्यावर कोरड्या पडलेल्या ओठांवर जीभ फिरवून तो आत शिरला.

"गुड मॉर्निं.. अं सॉरी... गुड आफ्टरनून डॉक्टर." त्याने बोलायला सुरुवात केली.

अनिशने फाईलमध्ये लिहिता लिहिता थांबून त्याच्याकडे पाहिले.

"अम्म्म, मला अ‍ॅक्चुली... रिझाईन करायचं आहे."

अनिशने आता मान नीट वर करून त्याच्या नव्या सर्जिकल असिस्टंटकडे निरखून बघितले.

"का?"

सुबोधच्या कपाळावरून घामाचा एक थेंब ओघळला. उत्तराची खरं गरजच नव्हती.

पण अनिशच्या मते त्यांचं बरं चाललं होतं. हा आधीच्या असिस्टंटइतका रडलाही नव्हता.

"तुम्ही एक चांगले सर्जन आहात."

अनिशच्या भुवया उंचावल्या.

"आय मीन बेस्ट सर्जन! खरंच. म्हणूनच मी हा जॉब स्वीकारला होता. मला निदान काही महिन्यांचा चांगला एक्सपिरीयन्स मिळेल म्हणून. तुम्ही किती टफ बॉस आहात, सगळे असिस्टंट तुम्हाला घाबरून असतात ते माहीत होतं."

"गेट टू द पॉईंट!"

त्याच्या कपाळावरच्या आठीकडे बघत सुबोधने आवंढा गिळला. "पॉईंट इज.. मी आता हे प्रेशर, एवढा स्ट्रेस सहन नाही करू शकत. मला रात्री झोप लागत नाही. मला वाटत होतं मला काम जमेल पण शक्य नाहीये." त्याने थांबून जमिनीकडे नजर टाकली.  "ही माझी टू वीक नोटीस" त्याने हातातला कागद डेस्कवर ठेवला.

काही बोलण्याआधीच सुबोधच्या मागे शुभदा हातात फाईल घेऊन येत उभी राहिली. ओह, म्हणजे पुढचा पेशंट हजर आहे. दोन वर्षांचा विहान. तो सहा महिन्यांचा असताना डॉ. अनिशनेच त्याच्या हृदयात शंट प्रोसिजरने रक्ताभिसरण सुरू ठेवले होते. आता विहान मोठा झाल्यावर ओपन हार्ट सर्जरी करून तो शंट बंद करायचा होता.

"दे आर इन कॉन्फरन्स रूम थ्री." ती नाकावरचा चष्मा वर करत म्हणाली. जाताजाता तिने सुबोधकडे रोखून पाहिले. अनिशने हॉस्पिटल जॉईन केल्यापासून शुभदा त्याची विश्वासू सेक्रेटरी होती. तिच्याइतकी एफिशियंट सेक्रेटरी आख्या हॉस्पिटलमध्ये कोणीही नव्हती.

"थँक्स शुभदा." अनिशने मान हलवली आणि खुर्ची मागे सरकवून उभा राहिला.

"डॉक्टर प्ली ssज मला रिलीज लेटरमध्ये चांगला रिव्ह्यू द्याल ना?" घाईत दार उघडून तो बाहेर पडताच सुबोध मागून ओरडला.

अनिश उत्तर देण्याची तसदी न घेता फाईल वाचत पुढे गेला. विहानचे रिसेन्ट स्कॅन रिपोर्टस काही कॉम्प्लिकेशन्स दाखवत होते. आधीच दोन डॉक्टरांनी त्याला ट्रीट करायला नकार दिला होता. तो कॉन्फरन्स रूमचा दरवाजा ढकलून आत गेला. विहानचे आईवडील जरा घाबरूनच बसले होते. त्याच्या आईच्या फिकुटलेल्या चेहऱ्यावर डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती. तिचा हात धरून विहानचे वडील तिला धीर देत होते. शेजारच्या खुर्चीत विहानला बसवलं होतं, त्याच्या नाकाखाली ऑक्सिजनची नळी होती.

"हॅलो डॉक्टर" त्याला बघून विहानचे वडील किंचित उठत म्हणाले. "विहान, बघ बघ डॉक्टरकाका आले!" विहान खुर्चीत सरळ होत त्याच्याकडे बघून खळी पाडून हसला पण तेवढ्यानेही त्याच्या श्वासाची घरघर वाढली. अनिशच्या मनात कालवा कालव झाली. गेल्या दहा वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्याने अश्या बऱ्याच केसेस हँडल केल्या होत्या तरी अजूनही लहान मुलांच्या केससाठी त्याच्या मनात ओलावा टिकून होता. यू डिझर्व समवन फायटिंग फॉर यू, मी करेन. सुबोधसारख्या घाबरटांची गरज नाही. मी नवीन चांगला असिस्टंट शोधून काढेन. जास्तीत जास्त चार दिवस!

----

विहानच्या अपॉइंटमेंटनंतर त्याला लंचसाठी वेळ मिळाला. डॉक्टर्स लाऊंजमध्ये जाऊन त्याने थोडं ग्रील्ड चिकन, करी आणि राईस वाढून घेतला आणि कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसला. डॉक्टर्स लाऊंज म्हणजे कॉलेज कँटीनचंच लग्झरी रूप होतं. एक भाग डायनिंग रूम आणि दुसरा भाग आराम करण्यासाठी बेड ठेवलेली चेंबर्स होती. ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पंधरा स्पेशालिटी कव्हर करणारे पन्नासेक सर्जन होते आणि प्रत्येकाची काही ना काही खोडी होती. इव्हन अनिश! तो पार्ट मासोशीस्ट आणि पार्ट परफेक्शनिस्ट आहे. त्याला स्वतःचा एक हिरो कॉम्प्लेक्स आणि भरपूर इगो आहे. जो प्रत्येक सर्जनला असावाच लागतो. नाहीतर कोणी आपलं हृदय दुरुस्त करायला एखाद्या डळमळीत माणसाहाती कशाला देईल.

"व्हॉट्स अप पै? परत असिस्टंट गायब?" डॉ. शेंडे त्याच्याजवळून पास होता होता थांबला. "मी ऐकलं त्या मुलाची केस तू घेतोयस, मी बघितले त्याचे रिपोर्ट्स. नॉट प्रिटी!"

शेंडे फक्त वयाने त्याच्या जवळपास होता पण बाकी त्यांच्यात काहीही साम्य नव्हतं. शेंडेचा पूर्ण फोकस जास्तीत जास्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणे एवढाच होता आणि कार्स आणि त्याची ती प्लास्टिक बायको.

अनिशने फक्त खांदे उडवले. हातातल्या आयफोनवर तो विहानसारख्या जुन्या केसेस वाचत होता.

"मग असिस्टंटशिवाय सर्जरीचं काय?" शेंडेने अजून नाक खुपसले. अनिश लक्ष देत नाही बघून तो बाकीच्या ग्रुपकडे वळून हसला. "तुम्हाला माहितीये, स्टाफ लाऊंजमध्ये डॉ. पैंच्या फोटोला डेव्हील हॉर्नस आणि शेपूट काढून नोटीस बोर्डवर लावलाय!"

"प्लेझर इज माईन, ऑलवेज." त्यांच्या हसण्यात हसू मिसळून अनिश उद्गारला.

कोपऱ्यात बसलेले डॉ. आनंद उठून त्याच्याशेजारी खुर्ची ओढून बसले. "माईंड इफ आय लुक?" ते टेबलवरच्या फाईलकडे बघत म्हणाले.

"गो अहेड." अनिश खाता खाता म्हणाला.

"यू इंटिमिडेट हिम! मुझे ये कहना नही चाहीये लेकिन इंटर्नशिप के लिये हमने उसे रिजेक्ट करके तुम्हे लिया था तबसेही उसे तुमसे प्रॉब्लेम है!" डॉ. आनंद त्यांच्या जाडजूड पांढऱ्या मिशीवरून हात फिरवत म्हणाले.

" आय डोन्ट नीड थेरपी डॉक्!" तो भुवया उंचावून बघत म्हणाला.

"ओके ओके!" ते हसत पुढे बोलू लागले. "ठीक है. फिर तुम्हारा दुसरा प्रॉब्लेम. इस साल कितने सर्जिकल असिस्टंटने धूल चाट ली? तीन?"

पाच. अनिश मनात म्हणाला.

"मेरे सर्जरीमे लास्ट सिक्स यर्ससे एकही असिस्टंट है. OT मे मुझे क्या चाहीये उसे पहले ही पता चल जाता है. बहोत पंक्चुअल अँड व्हेरी शार्प! दॅट मेक्स मी अ बेटर सर्जन. गेट माय ड्रिफ्ट?"

अनिशने कंटाळून त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. ते हॉस्पिटलमध्ये सिनियर असतील पण त्याचे बॉस नव्हते.

त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते बोलतच राहिले. "एक लॉयल टीम होना बहुत जरुरी है. तुम लोगोंको ट्रेन करनेमे कितना टाइम वेस्ट करोगे? सोचो फिक्स टीमके साथ तुम कितना कुछ अचीव्ह कर सकते हो."

अनिश आता वैतागला. त्यांचा मुद्दा बरोबर होता. त्यालाही तेच वाटत होतं पण प्रॉब्लेम तिथेच होता. त्याच्याबरोबर टिकणारा असिस्टंट त्याला अजून मिळायचा होता.

क्रमशः

--

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २

"दीss द, अजिबात टच करू नको. रिंकल्स पडतील.." नेहा तिचा गालाकडे जाणारा हात धरत ओरडली.

ओके ओके...  म्हणत तिने दोन्ही हात पुन्हा मांडीतल्या उशीवर ठेवले आणि समोर लॅपटॉपवर स्क्रब्ज घालून किस करणाऱ्या डॉक्टरांकडे लक्ष दिलं. किस जरा जास्तच स्टीमी व्हायला लागल्यावर तिने स्क्रीन खाली केली.

"नेहा, खरं तर मी तुला ग्रेज दाखवायला नको होती. एज अप्रोप्रिएट नाहीये. तुझे कोणी फ्रेंड्स बघतात का ग्रेज?"

"कमॉन दी! मी एटीन प्लस झाले आता. आपण हे सगळे सिझन्स हजारो वेळा बघितलेत. आणि तसेही याहून जास्त गोष्टी माझे क्लासमेट्स रिअल मध्ये करतात." नेहा नाक उडवत म्हणाली.

"नाक जास्त उडवू नको, रिंकल्स येतील!" म्हणून ती गालात हसायला लागली. "पण सिरियसली प्रॉमिस मी, कॉलेज संपेपर्यंत तू असं काही करणार नाही."

"उफ! यू नोs मी दीदा! पिंकी प्रॉमिस" म्हणत तिने लहानपणीसारखी करंगळी टेकवली.

"गुड!" दोघींच्याही तोंडावरचा नेहाने इंस्टावर बघून, हळद, कोरफड आणि बऱ्याच कायकाय गोष्टी घालून केलेला पिवळा, लिबलिबित पॅक आता वाळत आला होता. ह्याने जर पिंपल्स आल्या तर ते तोंड घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं तिला टेन्शन आलं होतं. अजून वेळ न घालवता ती उठून बेसिनकडे गेली. तोंड धुवून समोर आरशात बघताच मागे नेहा हजर होतीच.

" तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी मॅकड्रीमी, स्टिमी वगैरे असतील ना!" नळ पकडत नेहा मध्ये घुसली. "आणि असं होतं का, लॉकर रूममध्ये किसेस, सर्जरीमध्ये नजरोसे मिली नजरे वगैरे?"

"पळ! एकतर तिथे मोस्टली सगळे सर्जन म्हातारे आहेत. सगळे इतके बिझी असतात की किस काय स्माईल करायला वेळ नसतो आणि ग्रेज वगैरे सगळं स्क्रिप्ट आहे. टीव्हीसाठी फेक ड्रामा. असं काही खरंखरं होत नसतं."

"हम्म, तरीच तू सिंगल आहेस!" नेहा तिला वेडावून मारून पळाल्यावर ती किचनमध्ये गेली. "थांब तुला आज उपाशीच ठेवते." ती मोठ्याने म्हणाली.

"सॉरी दी, प्लीज तो अंडा मसाला कर ना.." नेहा चष्मा लावून लॅपटॉप पुन्हा उघडत ओरडली.

तिने एव्हाना गार झालेली अंडी सोलायला घेतली.

"पण सिरियसली, एकही मॅकड्रीमी नाही?"

"एक आहे तसा.. " कवचाचा टोकदार तुकडा नखात जाऊ न देण्याच्या प्रयत्नात तिच्या तोंडून निघून गेलं.

"कोण? कोण??" पटकन आत येऊन तिच्या हातातलं अंडं बाजूला ठेवत नेहा ओरडलीच.

"मला नाव नाही माहीत." पहिलं खोटं.

"कसा दिसतो? " नेहाने चष्म्यातून उत्सुकतेने डोळे मोठे करत विचारलं.

"ठीकठाक! उंच. ब्राऊनिश केस ब्राऊनिश डोळे.." तिने खांदे उडवले. दुसरं खोटं. प्रचंड हँडसम हे म्हणायचं तिने टाळलं. आणि प्रचंड उद्धट आणि खत्रूड हे शब्द कसेबसे तोंडाबाहेर येऊ दिले नाहीत.

"नेम? सरनेम?"

नाही माहीत. परत खोटं.

एव्हाना नेहा हॉस्पिटलची वेबसाईट उघडून प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर्स चेक करत होती.

"कुठलं डिपार्टमेंट?"

आता एकच हत्यार, डायव्हर्जन. "नेहा, तुझ्यासाठी मीठ मिरी घालून दोन अंडी वेगळी ठेवलीत. पटकन खा."

नेहा लॅपटॉप उचलून आतच आली आणि टेबलवर ठेऊन बसली. तिचे हात बटनांवर वेगात चालत होते. आणि शूअर इनफ जोरात श्वास घेतल्याचा आवाज आला. "सापडला!!" तिच्या पोटात खड्डा पडला.

"डॉ. अनिश पै" नेहा बायो वाचत सुटली. "ग्रँट मेडिकल मधून एम बी बी एस आणि एम एस पण तिथेच. नंतर अमेरिकेत जाऊन पण एकदोन डिग्री आहेत. ब्ला ब्ला. मला काय करायचंय.. पासपोर्ट सोडून दुसरा फोटो पण नाहीये."

"डॉ. पै? हम्म, असेल मेबी.." ती अभिनयाची परमावधी साधत म्हणाली.

"कार्डिऍकमध्येच आहे. आणि तुला माहीत नाही? गंडवू नको दी!"

नेहा डिटेक्टिव्ह बनून खणतच सुटली होती. ती इतकी मागे लागण्याचे कारणही तिला माहिती होते. बारावीच्या परीक्षेनंतर झालेला पपांचा अपघात, ते गेल्यावर मम्मी कोलमडून जाणं, त्यामुळे अचानक आलेले आर्थिक संकट, मेडिकलसाठी फीचे पैसे नसल्यामुळे बदललेला तिच्या शिक्षणाचा ट्रॅक. मेडिकल एन्ट्रन्सला परफेक्ट मार्क्स पडूनसुद्धा तिने बी एस्सी सर्जिकल टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेतली आणि डिग्री मिळताच हॉस्पिटल जॉईन करून कमावती झाली. मम्मी अशीच विझत विझत शेवटी गेलीच पपांना भेटायला वर. त्यानंतर गेली सहा वर्ष नेहाला तिचे मम्मीपप्पा दोन्ही होऊन वाढवण्यात घातल्यामुळे ना तिला काही सोशल लाईफ उरलं होतं, ना रिलेशनशिप्स. नेहाला या गोष्टींचं वाईट वाटत होतं की तिच्यामुळे मोठ्या बहिणीचं आयुष्य उदास होत चाललं आहे.

पण तिला असं वाटत नव्हतं, मम्मी पपा गेल्यानंतर तिच्यासाठी नेहाला व्यवस्थित वाढवणं एवढीच गोष्ट अग्रस्थानी होती. भले त्यामुळे तिला कोणी मित्र मैत्रिणी उरले नव्हते. तिचा सगळा वेळ हॉस्पिटल शिफ्टस आणि स्वयंपाक, कपडे, भांडी, किराणा, सफाई, बिले भरणे यातच संपत होता. एकच गोष्ट बरी आहे ती म्हणजे मुंबईत हे स्वतःचे लहानसे चार खोल्यांचे घर जे बाबा त्यांच्यासाठी ठेऊन गेले, निदान घरभाडं वाचलं.

पपांचे सेव्हिंग आणि इन्शुरन्सचे पैसे सगळे मम्मीची ट्रीटमेंट आणि तिच्या शिक्षणातच संपून गेले होते. आता तिचा पगार चांगला असला तरी बराचसा लोनचे इएमाय, इन्शुरन्स, नेहाच्या फीज, सेव्हिंग यातच संपून जात होता. तिच्या मते रोमान्स, रिलेशनशिप वगैरे सोडता तिचं चांगलं चाललं होतं. डॉक्टर झाली नाही तरी तिचं फिल्ड तिला आवडत होतं...

"इंस्टावर नाही.. च्च, सक्स! आणि ग्रँट मेडिकलच्या वेबसाईटवरपण कुठे फोटो नाही." म्हणत नेहाने पासपोर्ट फोटोच झूम केला.

तिने मुद्दाम डोळे चकणे करून फोटोकडे पाहिले.

"दिss दी! तुझ्यात थोडी जरी हिम्मत असेल ना तर ह्या माणसाला उद्या डेटसाठी विचार." नेहा हाताची घडी घालत म्हणाली.

"व्हॉट?!" ती हसायलाच लागली. "डॉक्टर्स वेगळ्या लीगमध्ये असतात आणि आम्ही वेगळ्या. मध्ये एक मोठी बॉर्डर असते. भारत पाकिस्तानसारखीच."

जेवण होऊन तिने कपड्यांचा मोठा लोड मशीनला लावला तरी तिला नेहाच्या बोलण्यावर हसू येत होतं. विचार करता करता पाठीवर रुळणारे रेशमी केस धरून तिने घट्ट हाय पोनीत अडकवून टाकले.

डॉ. पैना मी माहितीसुद्धा नाहीये. ते हॉस्पिटलमधले सगळ्यात तरुण आणि हुशार सर्जन आहेत पण तेवढेच रूड आणि अग्रेसिव्ह आहेत. त्यांना विचारण्यापेक्षा खुद्द मॅकड्रीमीला डेट करणंही सोपं आहे.

----

"बाssय! दुपारी कॉलेजमधून आल्यावर जेऊन घे, दार नीट लाव. झोपा काढू नको" शूज घालता घालता ती दारातून ओरडली आणि दाराबाहेरची ऍक्टिवा काढून निघालीसुद्धा. स्टाफ पार्किंग सहा वाजताही भरलेलं होतं. गाडी पार्क करून गुणगुणत ती लिफ्टमध्ये शिरली.

सकाळी आठच्या सर्जरीसाठी तिची शिफ्ट सहाला सुरू झाली. समोर असलेल्या दोन तीन नर्सेसना हाय म्हणत नेहमीप्रमाणे फोनवर बिझी असलेल्या शुभदाला हसून हात दाखवून ती आत गेली. स्टाफ लाऊंजमध्ये तिने कपडे बदलून नेव्ही ब्लू स्क्रब्ज चढवले. लांब पोनिटेल गुंडाळून घट्ट अंबाडा बांधून वर बारीक फ्लोरल डिझाईनची सर्जिकल कॅप घातली. कपडे लॉकरमध्ये टाकताना तिचं लक्ष समोर नोटिसबोर्डकडे गेलं. डॉ. पैंच्या फोटोला लाल मार्करने काढलेली शिंग नि शेपूट चमकत होते. दोन दिवसांपूर्वी लंच करता करता रडणाऱ्या सुबोधला शांत करत तिनेच केलेला उद्योग तिला आठवला आणि ओठ चावून ती वळली. दाराजवळ जाऊन स्टाफ बोर्डवर

सायरा देशमुख, सर्जिकल असिस्टंट

समोरचं हिरवं बटन दाबलं आणि ती बाहेर पडली.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३

"ठुमरी? डॉक प्लीज कुछ नया लगाते है ना.." सायरा जरा कंटाळून म्हणाली.

"नोप! बडे गुलाम अली साब.." कानाची पाळी पकडत डॉ. आनंद म्हणाले. मास्कवरून फक्त त्यांचे मिश्किल डोळे दिसत होते.

"चाहीये तो डॉ. शर्मा से पुछो? क्यू शर्माजी?" पेशंट पूर्णपणे ऍनेस्थेशीयाच्या अमलाखाली  गेला की नाही ते चेक करणाऱ्या डॉक्टरांकडे बघत ते म्हणाले.

"हां, ठीक है कुछ भी.." ते ह्या फंदात न पडता म्हणाले. सायराने खांदे उडवले.

त्यांनी नर्सकडे बघताच, लहान ब्लुटूथ स्पीकरवर मंद आवाजात 'सैय्यां बोssल, तनिक मोहसे... रहीयो न जाए' सुरू झालं. लगेच दुसऱ्या नर्सने त्यांच्या हातात सर्जिकल एप्रनच्या बाह्या चढवल्या. डॉ. आनंदनी स्टराईल ग्लव्ह्स घातले आणि कामाला सुरुवात केली. जुन्या क्लासिकल गाण्यांच्या तालावर त्यांना सर्जरीमध्ये जास्त चांगलं फोकस करता येत असे. ती शेजारी स्टराईल केलेला इन्स्ट्रुमेंट बॉक्स घेऊन उभी होती. पेशंटच्या छातीवर पहिला कट घेतल्यावर त्यांनी हात पुढे केला. "एट एमेम स्प्रेडर."

"आप हमेशा एट मांगते है और काम सिक्स से चलाते है. तो ये सिक्स है, फिर भी एट चाहीये तो कहिये." ती स्प्रेडर हातात देत म्हणाली.

शेजारच्या नव्या नर्सने दचकून तिच्याकडे पाहिले. दुसऱ्या ट्रेनी डॉक्टरला भीतीने घाम फुटला. कुठल्याही सर्जनला हे सहन झालं नसतं. झालं! आता डॉक्टर बरसणार हिच्यावर, म्हणून तो शांतपणे बघत उभा राहिला. पण डॉ. आनंदनी मान हलवली आणि ती देत असलेला स्प्रेडर घेऊन काम सुरू केलं.

सायरा मास्कमध्ये समाधानाने हसली. नेहमीप्रमाणे मनातल्या मनात तिच्या आवडीचं काम आणि परफेक्ट बॉस मिळाल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले. कुठलीही अडचण न येता सर्जरी व्यवस्थित चालू होती. दोन तासांनी सगळं झाल्यावर तिला शेवटचे टाके घालायला सांगून डॉक्टर बाजूला झाले.

"सायरा, तुम फ्री हो जाओगी तो मेरी केबिनमे मिलो." सर्जरीनंतर सर्जिकल ग्लव्हज टाकून तिच्या शेजारच्या बेसिनपाशी हात धुताधुता डॉक्टर म्हणाले.

तिने मान हलवली. येस्स! इतके दिवस ड्यू असलेला मोठा रेझ मिळणार बहुतेक! विचार करूनच ती खुश झाली. पगार वाढल्यावर पहिल्या पगारात नवं वॉशिंग मशीन घ्यायलाच झालंय, दुसऱ्या महिन्यात स्वतःसाठी चांगले वॉकिंग शूज, ते स्केचर्सचे ग्रे मस्त आहेत आणि नेहासाठी दोन जीन्स..

"मॅडम, बाजूला व्हा." तिचे खयाली पुलाव पकत असतानाच कडेने आवाज आला.

"ओह सॉरी" म्हणत तिने मॉप करणाऱ्या वॉर्डबॉयला जागा दिली. किती वेळ थांबला होता कोण जाणे.

ती खुषीत बागडतच केबिनपाशी आली. नॉक करून आत गेल्यावर डॉक्टर चक्क रिकाम्या टेबलमागे बसले होते. अरे, नेहमीचा फायलींचा डोंगर कुठे गेला!

"बैठो. मुझे कुछ बात करनी थी." डॉक्टर चष्म्यातून तिच्याकडे बघत म्हणाले.

ती उत्सुकतेने खुर्चीत बसली. मनात पुन्हा पगारवाढीचे डे-ड्रीमिंग सुरू झाले.

"आय होप दिस इज नॉट मच ऑफ अ सरप्राईज.." ते तिची तंद्री मोडत म्हणाले.

"अं? सॉरी? मैने लास्ट का सुना नही"

"आय थिंक तुमने कुछ भी नही सुना!" ते हसले. "मै रिटायर हो रहा हूँ!"

रिटायर! तिला शॉकने हार्ट अटॅकच यायचा बाकी होता.

"रिटायर? प्लीज डॉक्टर, डोन्ट फूल मी! आप अभी रिटायर नही हो सकते." ती त्यांच्याकडे निरखून बघत म्हणाली.

"चालीस साल प्रॅक्टिस मे हूँ, अब जस्सी कहती है, थोडा आराम करो, US जा कर ग्रँडकिड्स के साथ रहो, हॉलिडे पर चलो. और सच भी है, इतना सेव्हिंग करके काम करते करते मर गया तो क्या फायदा!!" ते हसत हसत म्हणाले.

हम्म.. ती कशीबशी हसली.

"आयल बी गॉन इन टू वीक्स. बट डोन्ट वरी. मै तुम्हे किसी टीममे फिट कर देता हूँ. अपने यहां और चार कार्डिऍक सर्जन्स है."

तिच्या डोक्यात एकदम कार्टून स्ट्रीपसारखे चार बबल पॉप झाले.

१. डॉ. साठे : अनुभवी, म्हातारे, कमी बोलणारे आणि वागायला कडक.
२. डॉ. भानुशाली : मध्यमवयीन, जास्त जेरियाट्रिक पेशंट्स बघतात, हे जरा बोअरिंग काम आहे.
३. डॉ. शेंडे : तरुण पण जरा जास्तच फ्लॅशी, फार स्लीझी वाटतात.
४. डॉ. पै : पीडियाट्रिक पेशंट्स जास्त असतात, एक्सपिरियन्स तगडा मिळेल पण माणूस अति खडूस. वैताग! नो वे.

"मुझे लगता है डॉ. साठे ठीक रहेंगे. ही इज मोर लाईक यू." ती विचार करत म्हणाली.

"हम्म, लेट्स सी. उधर वेकन्सी नही रहेगी तो बाकी देखता हूँ. टेन्शन मत लो." तिच्याबद्दल वाईट वाटलं तरी त्यांच्या हातात इतकंच होतं.

"प्लीज." ती गंभीर होत म्हणाली.

घरी गेल्यावरही तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. कुणाकडेच व्हेकंसी नसेल तर.. नोकरी गेली तर काय? जेमतेम दोन महिने पुरेल एवढंच सेव्हिंग आहे. इंटरव्ह्यू प्रेप सुरू करायला हवं. नाहीतर स्पेशालिटी तरी बदलायला हवी. थोडं ट्रेनिंग घ्यावं लागेल पण जॉब तरी टिकेल.

----

दोन दिवसांनंतर..

"सॉरी सायरा, साठे की अपनी टीम फुलप्रूफ है और भानुशाली के पास एक रेसिडेंट है. हम शेंडे या पै ट्राय कर सकते है."

डॉ. शेंडे. हम्म लेट्स सी. "ओके. डॉ. शेंडे."

"ठीक है, हम जा कर मिलते है फिर."

ती मान हलवून डॉ. आनंदबरोबर निघाली. डॉ. शेंडेंची केबिन सिल्वर क्रोमने झळाळत होती. डेस्कवर फक्त एक मॅकबुक उघडे होते. "आह, डॉ. आनंद! गुड मॉर्निंग!" म्हणत शेंडेनी मान वर केली. त्यांच्यामागे स्वतःचा हाताची घडी घालून शेजारी दोन तीन नर्सेस उभ्या असलेला पोस्टर साईज हसरा फोटो होता. समोर लेदर कुशनिंगच्या महागड्या खुर्च्या होत्या.

"गुड मॉर्निंग" डॉ. आनंद पुढे होऊन खुर्चीत बसत म्हणाले. मागोमाग सायरा शेजारच्या खुर्चीत बसली. शेंडेची नजर तिच्यावर पडली. फिमेल आणि अंडर 55 एवढं त्याचे डोळे चमकायला पुरेसं होतं. तिला एक चार्मिंग स्माईल देत त्याने नजर डॉ. आनंदकडे वळवली. नजर वळताच तिने तोंड वाकडं केलं.

आनंदनी आपला प्रॉब्लेम सांगितला.

"ओह, सॉरी पण आत्ता माझी टीम फुल आहे डॉक्टर. खरं सांगायचं तर सायरा माझ्या टीममध्ये मला आवडली असती." तिच्याकडे पहात तो म्हणाला.

क्रिन्ज! तिच्या पोटात ढवळलं. कोणीही मला ऍक्सेप्ट करत नाहीये. मी फक्त एक साधी सर्जिकल असिस्टंट आहे, सर्जनशिवाय. तिचं विचारचक्र सुरू होतं.

"अभी लास्ट ऑप्शन है, सायरा." केबिनबाहेर पडता पडता डॉक्टर म्हणाले.

"आज नही. वो ऑप्शन अभी डिस्कस नही करते. और क्या कर सकते है, मुझे एक दिन सोचने दिजीए." ती दुःखी चेहऱ्याने म्हणाली.

डॉक्टरांनी फक्त मान हलवली.

बिचारे! यात त्यांची काय चूक. मला पगार मिळावा म्हणून ते काही आयुष्यभर काम करत राहणार नाहीत. त्यांनी आता खरंच आराम करावा. तिने मान हलवली.

"कल कुछ ना कुछ ठीक होगा.. थँक्स फॉर युअर हेल्प डॉक्टर." म्हणून ती घरी निघाली.

नेहा कॉलेजला गेली होती. नाईट शिफ्टमुळे सायराचे डोळे चुरचुरत होते पण झोप लागत नव्हती. शेवटी फॅन बंद करून ती किचनमध्ये गेली. पटापट कुकरमध्ये दाल खिचडी लावली आणि सिंकमध्ये जमलेली भांडी घासून टाकली. ओटा पुसून घेतला. डायनिंग टेबल आवरलं. एक खुर्ची ओढून बसली आणि कापसाचा बोळा वाटीतल्या गार दुधात बुडवून दोन्ही डोळ्यावर ठेवला. शेवटचा ऑप्शन जो खरा ऑप्शनच नाही तो कन्सिडर करावा का...

डॉ. पै बरोबर काम करणे

द डेव्हील हिमसेल्फ!

सगळं स्टाफ तर त्यांना हेच म्हणतो. पण ते चित्र फक्त मी काढलं होतं. तो लाऊंजमधला फोटो. मी तर फक्त सुबोधचा मूड ठीक करायला, त्याला हसवायला काढली होती ती शिंगं. सगळे हसले आणि सुबोधपण रडायचा थांबला. पण मला लगेचच गिल्टी वाटलं होतं.

डॉ. पैंना त्या फोटोबद्दल कळलं तर? विचारानेच ती थरथरली.

नो. मी त्यांच्याबरोबर काम नाही करू शकत.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ४

अनिश त्याचा ठरलेला दिनक्रम अति काटेकोरपणे पाळतो. भले लोक कितीही नावं ठेऊ देत. चारच्या ठोक्याला उठणार, मशीनमध्ये कडक डबल शॉट एस्प्रेसो तयार होईपर्यंत आन्हिके उरकून इंडियन एक्सप्रेस वाचत आरामात कॉफी. नंतर अर्धा तास रिलिजिअसली वजने उचलून कार्डिओ.  मसल्स बनवण्यासाठी नव्हे तर मजबुतीसाठी. एखादा सर्जन जेव्हा OT मध्ये तासनतास उभा राहून ऑपरेट करतो तेव्हा मध्य लटपटीत असून चालत नाही. कोअर एक्सरसाईज इज अ मस्ट! पंधरा मिनिटे ध्यान आणि प्राणायाम. त्यानंतर आंघोळ आणि रोजचा ठरलेला ब्रेकफास्ट, मोठा ग्लास भरून पालेभाजी किंवा फळांची स्मूदी, ब्राऊन ब्रेडवर चार एग व्हाईट्स आणि भिजवलेले दोन चार बदाम.

नेहमी शार्प सहाला तो त्याच्या केबिनमध्ये असतो. जेव्हा टीममध्ये एखादा रेसिडेंट असतो तेव्हा त्यांना ह्याच वेळी भेटून शेड्युल आणि सर्जरी बद्दलचे अपडेट दिले जातात. कारण नंतर रिकव्हरीमध्ये असणाऱ्या रुग्णांना बघायला राउंडस सुरू होतात. त्यांचे आफ्टर केअर बद्दलचे प्रश्न, एखाद्या ठरलेल्या सर्जरीपूर्वी रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असत. बहुतेकदा आईवडील टेन्शनमध्ये असतात आणि छोटे पेशंट प्रश्न विचारत सुटतात.. जसे ऑपरेशन करताना मी बेशुद्ध असेन का, मला जराही कळणार नाही का, बेशुद्ध व्हायला किती वेळ लागतो, जागं झाल्यावर मला आईस्क्रीम देणार का, टॉन्सिल्स काढल्यावर दिलं होतं तसं वगैरे!

आज तो पाच वाजताच केबिनमध्ये आला होता. आणखीनच लवकर! आठ वाजता एक रुटीन प्रोसिजर  ठरलेली होती. त्याआधी थोडा वेळ त्याला विहानची फाईल डोळ्याखालून घालायची होती. त्याचे आईवडील ऑपरेट करण्याबद्दल साशंक होते. आधीच बऱ्याच डॉक्टरांनी त्यांना हे ऑपरेशन फेल होईल असं सांगितलं होतं. विहानची स्थिती दिवसेंदिवस खालावत होती त्यामुळे अनिशला कुठल्याही क्षणी सर्जरीसाठी तयार रहायचं होतं. शुभदाने नेहमीप्रमाणे त्याची ब्लॅक कॉफी आणि फाईल टेबलवर आणून ठेवली.

कॉफी घेताघेता तो आलेल्या आठ दहा व्हॉइस मेल, मदतीसाठी रिक्वेस्ट करणाऱ्या वेगवेगळ्या सर्जनच्या दहा बारा इमेल्स, हे सगळं ऐकून, वाचून त्यांना रिप्लाय करून शेवटी त्याने फाईल उघडली आणि वाचून वेगवेगळे रेफरन्स बुक्स धुंडाळू लागला.

"नॉक नॉक!" म्हणत डॉ. आनंद दरवाजा ढकलून हसऱ्या चेहऱ्याने आत आले. "डू यू हॅव अ मिनिट?"

"नो." तो वर न बघता म्हणाला.

"ये तो किसी मॅड सायंटिस्ट का लॅब लग रहा है!" ते तरीही आत येऊन टेबलवर पसरलेल्या फायली, कोपऱ्याला जुन्या टेक्स्टबुक्सचा गठ्ठा, मेडिकल मॅगझिन्स, स्टेशनरी, बाजूच्या सोफ्यावर पडलेली कार्डीऍक इक्विपमेंट ह्या सगळ्यावर नजर फिरवत म्हणाले.

"ये तो..."  त्याच्या खुर्चीमागे कॅबिनेटवर नुसत्या भिंतीला एकावर एक टेकून ठेवलेल्या डिग्री, डिप्लोमाच्या फ्रेम्स कडे बघत त्यांनी हात उडवले.

"इसी लिए मै पेशंट्स कॉन्फरन्स रूममे देखता हूँ!" तो अजूनही मान वर न करता तिरकस हसत म्हणाला.

"व्हॉट कॅन आय डू फॉर यू डॉ. आनंद?" पुढे त्याने पटकन विचारले, त्याचा महत्त्वाचा वेळ वाया जात होता.

" हम्म.." ते सुस्कारा सोडत समोरच्या खुर्चीत बसले. " आय नो हम सब कितने बिझी है. लेकिन मुझे जल्द ही छूटकारा मिलेगा. मैं रिटायर हो रहा हूँ!"

"ओह!" त्याने मान वर करून त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. अजून दोन तीन वर्षे ते सहज काम करू शकतात."व्हाय?"

"थक गया हूँ, और जस्सी बहुत पिछे पडी थी तो फायनली मन बना लिया. नेक्स्ट सॅटरडे विल बी माय लास्ट डे हिअर."

"काँग्रॅच्युलेशन्स!" तो पटकन म्हणाला. "यही बात करनी थी?" आता कटा! असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

"सॉर्ट ऑफ. मैने अपनी असिस्टंट के बारे मे तुम्हे बताया था, याद है?"  ते दोन्ही हात डेस्कवर ठेवत म्हणाले.

त्याने आठवायचा प्रयत्न केला. "हम्म तब मैने सुना नही होगा!"

"हाहा! तुम झूठ बोलना भी ट्राय नही करते!" ते हसायलाच लागले. " एनिवे, मेरी असिस्टंट है, सायरा देशमुख. काम मे बहुत स्मार्ट है. मेरे रिटायर होने से उसकी जॉब जा सकती है...

"इटस् नॉट माय प्रॉब्लेम!" तो बोलणं तोडत म्हणाला.

"नॉट युअर प्रॉब्लेम बट युअर सल्यूशन! अभी नेक्स्ट वीक तक सुबोध भी जा रहा है...

"वो बाय डिफॉल्ट जानेही वाला था. उसके बस की बात नही."

"सायरा के बस की तो है!"

"जो कहना है जलदी कहीये, शेंडे एक नया रेसिडेंट मेरी हेल्प के लिए भेज रहा है. उसके आने से पहले बहुत काम निपटाना है."

डॉ. आनंद नी समोरच्या फोनवर इंटरकॉमचे बटन दाबले. "शुभदा, एक मिनिट अंदर आओ."

शुभदा आल्यावर त्यांनी एकच प्रश्न विचारला. "क्या सुबोध की जगह किसी ने अप्लाय किया है?"

"नहीं. लेकिन आज हम ऍड देनेवाले है.." ती अनिशकडे हळूच कटाक्ष टाकत म्हणाली. त्याने सुस्कारा सोडून मान हलवली.

"बस तो फिर जाओ तुम."

केबिनमध्ये शांतता पसरली. त्यांनी भुवया उंचावून अनिशकडे पाहिले की बघ, तुझ्याबरोबर काम करायला कोणीच तयार नाहीये.

"ओके! गॉट इट! नाऊ लीव्ह."

चेहऱ्यावर मोठ्ठ हसू आणत डॉक्टर त्याच्या केबिनमधून बाहेर पडले.

---

शेवटी ती वेळ आलीच. डॉ आनंदचे शेवटचे चार दिवस उरले आहेत. त्यांच्या डेस्कवर सध्या फाईल्स ऐवजी ट्रॅव्हल कंपन्यांचे ब्रोशर्स पडलेत. तरीही माझ्या हातात अजून जॉब नाही.. सायराने मोठा श्वास टाकला. नौकरी वगैरे वेबसाईट्स वर ज्या व्हेकंसीज आहेत तिथे पगार बराच कमी आहे किंवा मग मुंबई सोडून बाहेर जावं लागेल जे परवडणारं नाही. ह्या पॉइंटला स्पेशालिटी बदलून इथेच राहणं जास्त सोयीचं वाटतंय.

लंच टाईममध्ये तिने डॉक्टरांना सगळ्या व्हेकंसीज दाखवल्या पण प्रत्येकात काही ना काही खोट होती. ती स्पेशालिटी बदलणार ऐकल्यावर डॉ. आनंदना काही बरं वाटलं नाही.

"जनरल ऑर्थो मे तुम बहुत बोर हो जाओगी. रोज सेम रुटीन प्रोसिजर्स रहते है, कुछ नया सीखने भी नही मिलेगा."

"इतना भी बुरा नही है, मेरी एक फ्रेंड है वहां.."

"लेकिन तुम डॉ. पै को क्यूँ कन्सिडर नही करती? टेल मी अगेन." त्यांनी डोळे बारीक करत विचारले.

"एक तो उन्होंने मुझे जॉब ऑफर नही किया."

"कॉझ तुमने अप्लाय ही नही किया!"

"प्लस मै उनके बारे मे सब हॉरर स्टोरीज सून चुकी हूँ!"

"एक बात बताऊं?" ते गंभीर होत म्हणाले.

"वो तो आप वैसेही बताएंगे! फिर पुछते क्यूँ हो!" ती थोडी हसत म्हणाली.

ते डेस्कवर पुढे झुकून बोलू लागले. "सी, हम सब जानते है रुटीन, सिम्पल सर्जरीज सक्सेसफुल होती है, उससे कमाई चलती रहती है, प्रॅक्टिस फ्लोट होती है. हॉस्पिटलमे ऐसे बहोतसे सर्जन है जो रुटीन काम करते है लेकिन डॉ. पै ऐसा नहीं सोचते.
वो सोचता है जब कोई प्रोसिजर रुटीन हो जाएगी, ही इज नॉट पुशिंग इनफ. वो OT मे इतना इंटेन्स होता है कॉझ ही स्ट्राइव्हझ टू बी बेटर एव्हरी टाइम. उसके साथ ऑपरेट करना इझी नही है, मैं भी नहीं करता. लेकिन सोचो क्यू इतने लोग उसकी सर्जरी देखने आते है, मेडिकल स्टुडंट्स, रेसिडंट्स, वो छोडो बाहर के डॉक्टर्स भी आते है. एक बार सोचकर देखो. नही तो ऑर्थो का ऑप्शन है ही!"

"सोचती हूँ!" म्हणून ती बाहेर गेली.

फोर्थ फ्लोरवरच्या आर्थोच्या रुटीन प्रोसिजर आठवून तिला खरंच भिंतीवर डोकं आपटायची इच्छा होत होती. किती बोरिंग आहे ते! डॉ. पै स्ट्राइव्हस हार्ड! ओके, पण बाकीच्यांचे काय. तो सुबोध बिचारा बहुतेक मेंटल ट्रॉमासाठी थेरपी घेतोय.

तरीही जर सुबोध सगळं वाढवून सांगत असेल तर... फक्त स्टाफ गॉसिपवरून त्यांना वाईट समजणं पण चूक आहे. प्रूफसाठी त्यांची एकतरी सर्जरी बघायला हवी. तिने शुभदाकडून पुढच्या सर्जरीची वेळ विचारून घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ती जाऊन OT पाशी थांबली. सर्जरी साडेसातला सुरू होणार होती. आत गेल्यावर एक ग्लास पार्टिशन होतं त्यामागे उभे राहून सर्जरी बघता येत असे. आत जाताच तिथे रेसीडेंटस् ची गर्दी दिसली पण चौथ्या सीटच्या मुंबईकर अनुभवाने घुसून तिने जागा मिळवलीच.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ५

आजूबाजूच्या गर्दीत कुजबुज सुरू झाली, लोक काल रात्रीच्या कुठल्या तरी इमर्जन्सी केसबद्दल बोलत होते. तिकडे लक्ष न देता सायरा एकटक समोर बघत होती. बरोबर सातच्या ठोक्याला पेशंट - साधारण सत्तरीचे एक आजोबा OT मध्ये आणले गेले. आय व्ही लावून नर्सने त्यात औषध सोडले.  अनेस्थेटिस्टने हार्ट रेट, बीपी वगैरे व्हायटल्स चेक करून भूल दिली आणि नर्सेस कामाला लागल्या. इन्स्ट्रुमेंट सेट्स उघडले गेले. ऑपरेशन टेबलच्या बाजूला स्टराईल केलेले ट्रे आणि हत्यारं ठेवली. पेशंटची छाती आणि पोट अल्कोहोल वाईपने पुसून बाकी शरीर झाकले होते.

आणि दार ढकलून डॉ. पै आत आले. सगळीकडे शांतता पसरली. सगळेजण डोळे फाडून समोर पाहू लागले. द नाईट किंग इज हिअर! सगळे व्हाईट वॉकर्स कामाला लागले. विचार डोक्यात येताच सायरा किंचित हसली. नेव्ही ब्लू स्क्रब्ज घालून त्यांनी धुतलेले हात नव्वद अंशात सरळ समोर धरले होते. स्क्रब्जमधूनही त्यांची सहा फूट उंची आणि ब्रॉड खांदे लपत नव्हते. त्यांच्या सिल्की ब्राऊन केसांवर घट्ट बांधलेली कॅप, चॉकलेटी डोळ्यांवरचा सर्जिकल गॉगल, परफेक्ट ओठ आणि खड्डा पडणारी हनुवटी झाकून टाकणारा मास्क असला तरी तिला त्यामागचा हंकी चेहरा आठवत होता. त्यांच्या किंचित वर केलेल्या हनुवटीतून त्यांची अथॉरिटी जाणवत होती.

असिस्टंटने पटकन एका स्टराईल टॉवेलने त्यांचे हात पुसले.

उफ! निमुळती लांब बोटं असलेले मजबूत हात! सायराने श्वास सोडला.

सर्जिकल एप्रनच्या बाह्या त्यांच्या हातात घालून, पाठीमागे जाऊन मानेपाशी गाठ बांधली. लगेच हातात ग्लव्ज चढवले. सर्जरीच्या सुरुवातीचा रोल कॉल झाला, प्रत्येक जण आपापल्या जागी आहे बघून ऍनस्थेशिओलॉजिस्ट बोलू लागले. "वी आर डूइंग अ जनरल आय सी डी रिप्लेसमेंट प्रोसिजर. अँटीबायोटिक्स ऍडमिनिस्टर्ड. जनरल ऍनेस्थेशीया ऍडमिनिस्टर्ड. टू युनिट्स ब्लड इज रेडी."

"पेशंट इज सेवंटी यर्स ओल्ड. व्हायटल्स ओके. वी आर रिमुविंग ऍन आय सी डी प्लेसड जस्ट वन मंथ बॅक, कॉझ इट हॅज सम ग्लिचेस अँड इन्फेक्शन. वी विल प्लेस अ न्यू आय सी डी अँड क्लिअर द इन्फेक्शन. एव्हरीबडी ऑन द सेम पेज?" OT मध्ये डॉ. पैंचा क्लिअर आवाज घुमला. "येस" सगळ्यांचा होकार आला.

सायराभवतीचे शिकाऊ डॉक्टर्स हातातल्या नोटपॅडवर  भराभर खरडू लागले. "आय सी डी मतलब एक डिव्हाईस है जो हाय हार्ट रेट कम करता है, वो बॉडी के अंदर फिक्स करते है." शेजारची एक नर्स दुसरीला म्हणाली. "डॉ. पै को देखने के बाद मुझेभी ये लगाना पडेगा!" दुसरी म्हणल्यावर दोघी खुसफुसत हसल्या. सायराने नाक वाकडं केलं.

ऍनस्थेशिओलॉजिस्टने गो अहेड दिल्यावर. डॉ. पै नी हात पुढे केला, असिस्टंट ने एक टेन ब्लेड दिलं. OT च्या लख्ख उजेडात त्याची धार चमकली. एक खोल श्वास घेऊन त्यांनी पोटाच्या सॉफ्ट टीश्यूमध्ये प्रीसाईज पहिला कट घेतला. स्किनच्या पॉकेटमधून त्यांनी लीड्स पासून जुना जनरेटर डिसकनेक्ट केला. पण त्याच्या आजूबाजूला सगळीकडे रक्त, पू आणि इन्फेक्शन स्प्रेड झालेलं होतं. ब्लीडिंगसुद्धा जास्त होत होतं.

खूप वेळ सर्जरी सुरू होती. "माय गॉड, इतक्या साध्या प्रोसिजरमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स आहेत." एक रेसिडन्ट म्हणाली. गेल्या तीन तासात सायरा आणि बाकी सगळे उभे प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसले होते. डॉ. पैंच्या भराभर दिलेल्या सूचना आणि त्यावर कोरिओग्राफ केल्यासारखी त्यांची घामाघूम टीम हलत होती.

एव्हाना पेशंटला रक्तही चढवून झालं होतं. शेवटी त्यांना लीड्सही चुकीच्या प्लेस केल्याचे आढळून आल्यामुळे त्या काढून टाकून नव्या लीड्स उजवीकडच्या व्हेनमधून हार्टला व्यवस्थित अटॅच झाल्यावर त्याना नवा जनरेटर जोडला. सिग्नल्स चेक केले. या सगळ्यात साडेपाच तास झाले होते. इन्फेक्शन क्लिअर करून त्यांनी मोठे कट्स बंद केले आणि रेसिडन्टला टाके घालायला सांगून कोपऱ्यात उभ्या डिव्हाईस कंपनीच्या रेप् ला उभा आडवा तासायला सुरुवात केली. बाकी लोक नर्व्हस होऊन फक्त पहात होते. रेसिडेंट महत्प्रयासाने कान बंद आणि हात स्टेडी ठेऊन टाके घालत होता. कंपनीचा माणूस फॉल्टी डिव्हाईससाठी आपली जबाबदारी टाळून इंजिनिअर्सची चूक आहे म्हणून सांगू लागला. "ओह प्लीज, तोंड बंद ठेव!" सायरा पुटपुटली. तिला कंपनीची चूक कळत होती पण डॉ. पैंचा राग आणि एकंदर अप्रोच पण पटत नव्हता.

डॉ. पै अजून चिडून लालभडक झाले. त्याची भरपूर शाळा घेतल्यावर ते जोरात दार ढकलून बाहेर पडले. स्तब्ध झालेल्या नर्सने जाग येऊन घाईघाईने बाहेर जात त्यांच्या एप्रनची गाठ सोडल्यावर त्यांनी एप्रन आणि ग्लव्ज काढून कचऱ्याच्या पेटीत फेकले. आत शेवटचा टाका घालून पेशंटला OT बाहेर नेईपर्यंत सायरा थक्क होऊन चिकटवल्यासारखी खुर्चीत बसून होती.

----

रविवार संध्याकाळ.

हॉस्पिटलच्या डिरेक्टर्सनी डॉ. आनंदसाठी ताज लॅण्डस् एन्डमध्ये रिटायरमेंट पार्टी ठेवली होती. डॉ. आनंदची फॅमिली आणि सगळी सर्जिकल टीम (त्यांच्या भाषेत 'मेरे बच्चे') सहा वाजताच जमले होते. शंभरेक लोकांना आमंत्रण होते. सायराने तिच्याकडचा एकुलता एक LBD घातला होता. सरळ, रेशमी केस एक क्लच लावून मोकळेच ठेवले होते. पायात खूप काळाने कपाटातून काढलेले ब्लॅक हिल्स घातले होते आणि मेकअपसाठी नेहाची थोडी मदत बस्स. तिने फिरणाऱ्या फिंगर फूड्समधून चीज चेरी पायनॅपल उचलून तिच्या प्लेटमध्ये ठेवले. तेवढ्यात समोर दुसरा वेटर क्रिस्पी कोकोनट प्रॉन्स घेऊन आला. शेजारी गार्लिक मेयो डिप ठेवलं होतं. तिची जीभ चवताळली! हेय, ती वेटरकडे पोचण्याआधी डॉ. आनंद तिच्या आणि प्रॉन्सच्या मध्ये येऊन उभे ठाकले.

"ओह, सॉरी डॉक्टर मैने आपको आते देखा नही!" ती पाय मागे घेत म्हणाली.

"बेटा, इतनी सॅड मत दिखो. तुम्हे नया सर्जन मिल जाएगा. डोन्ट वरी! तुम्हे हॉस्पिटलके बाहर पहली बार देख रहा हूँ. लूकिंग गुड!" ते तिच्या डोक्यावर हलकेच थोपटून म्हणाले.

"आप भी हँडसम लग रहे है डॉक्!" ती हसून त्यांच्याकडे बघून म्हणाली. पहिल्यांदाच ते कॅज्युअल शर्ट आणि जीन्समध्ये दिसत होते.

ते हसले. "आज तुम्हे डॉ. पै से मिलाता हूँ."

तिचे डोळे मोठे झाले. "ओह, ही'ज नॉट हिअर येट?" तिने उगीचच विचारले. ते अजून आले नाहीत हे तिला चांगलंच माहीत होतं. ती मुद्दाम दाराजवळच्या ग्रुपमध्ये गप्पा मारत थांबली होती. दोन कारणांसाठी १. तिथून बुफे काउंटर अगदी जवळ होता आणि २. डॉ. पैना आत येतानाच बघायचं होतं.

ती अजूनही वाटच बघत होती.

आता बहुतेक ते येत नाहीत. अश्या चिजी पार्ट्याना बहुतेक जातच नसावेत.

"लेकिन उसने कन्फर्म किया था. आयेगा!" डॉ. आनंद चष्मा नाकावर सरकवत म्हणाले. तेवढ्यात एका माणसाने दिलेला बुके घेत थँक्स म्हणून ते पुन्हा वळले.

"मैने कल उनकी सर्जरी देखी." ती कॅज्युअली म्हटल्यासारखं दाखवत म्हणाली.

"तो?" डॉक्टरांच्या भुवया उंचावल्या होत्या.

" फॉल्टी हार्डवेअर था, कॉम्प्लिकेशन्स भी थे. इट टूक अराउंड सिक्स अवर्स! और रेप् को बहुत सूनना पडा."

"आय हर्ड. लेकिन सर्जरी तो सक्सेसफुल रही."

"याह, बट आय डोन्ट लाईक द वे ही ट्रीटस पीपल. मेरी लाईफ मे ऑलरेडी इतना स्ट्रेस है, आय कान्ट टेक मोर." ती मान हलवत म्हणाली.

"बिलिव्ह इन युअरसेल्फ. तुम ही उसकी असिस्टंट बन सकती हो. यू हॅव दॅट काईन्ड ऑफ गट्स... ओह, ही'ज हिअर!" ते तिच्यामागे दाराकडे पहात उद्गारले.

तिच्या पोटात खड्डा पडला. डोळे विस्फारले आणि वळून बघायचं असूनसुद्धा पायांनी असहकार पुकारला. तिने हातातला पेपर नॅपकिन मुठीत आवळला. कमॉन सायरा, तो फक्त एक सर्जन आहे. नॉर्मल माणूस! तिने नॉक आउट व्हायच्या तयारीने हळूच मान वळवून मागे पाहिलं. पण ओह माय गॉड, ही इज अ ब्लास्ट! खाकीजवर क्रिस्प व्हाईट शर्ट आणि पायात ब्राऊन बोट शूज इतक्या सिम्पल गेटपमध्येसुद्धा हा माणूस कसला एलीगंट आणि हॉट दिसतोय. इथे येताना फ्रेश शेव्ह केलेलं दिसतंय. तिने त्या स्मूssद जॉलाईनवर बोट फिरवायची इच्छा दाबून टाकली.

डॉ. पै आत येऊन क्राऊड स्कॅन करत होते. इतक्यात डॉ. आनंदनी हात उंचावून त्याला बोलावलं. त्याची नजर डॉक्टर आणि सायरावर येऊन थांबली. तिला पटकन कुठेतरी लपावसं वाटलं पण तिने मान ताठ केली आणि त्याच्या नजरेला नजर मिळवली. पुढे येऊन त्याने हातातला बुके आणि वाईन बॉटल डॉक्टरांना दिली."एन्जॉय द रिटायर्ड लाईफ!!"

"तुम लेट हो!" डॉ. आनंद चिडवत म्हणाले.

"हम्म.. एक अर्जंट केस था." बोलता बोलता त्याने शर्टच्या बाह्या नीट घडी घालत कोपरापर्यंत फोल्ड केल्या. त्याचे वर्कआऊट केलेले हात आणि मनगटावरच्या शिरा पाहून तिने पटकन उघडलेलं तोंड बंद केलं. ओह गॉड, प्लीज स्टॉप धिस पॉर्न!

"डोन्ट वरी, डिनर अभी बाकी है." डॉ. आनंदनी जवळच्या वेट्रेसला बोलावून घेतले.

"थँक्स. आय एम लिटरली स्टार्व्हिंग" बोलताबोलता त्याने स्टिक खुपसलेले पेपर चिकनचे दोन तुकडे उचलून तोंडात टाकले. इतका वेळ वेट्रेस त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली होती. यप, आय नो द फीलिंग! सायराच्या मनात आलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ६

"मुझे लगा तुम पार्टी के बारे मे भूल गए..." डॉ. आनंदनी इशारा करताच वेट्रेस तिथून निघून गेली.

"कैसे भूलता, आपने शुभदाको तीन बार रिमाईंडर भेजा था." अजूनही ते दोघेच तिथे असल्यासारखे बोलत होते.

"हां! मैने तुम्हे मेरी असिस्टंट से मिलाना था. हमने बात की थी, यही है. सायरा देशमुख!"

ओह, मीच ती! सायरा एकदम गडबडली. तिने डॉ. पै ना एकदा कॉन्फरन्समध्ये बोलताना, एकदोनदा लॉबीमध्ये तिच्यापुढे चालताना पाहिलं होतं. कालच्या सर्जरीने तर आदर आणि भीती दोन्ही वाढलं होतं. आज त्यांच्या इतक्या जवळ उभी राहून ती थोडी तंद्रीत होती.

त्यांनी अगदी किंचितच हसून तिच्याकडे बघितलं. गडबडून तिने पटकन हात पुढे केला. "नाईस टू मीट यू डॉक्टर!" त्यांनी मान हलवून हात मिळवला आणि तिचा हात उबदार ब्लॅंकेटसारखा त्या मोठ्या हातात गुरफटून गेला. हाच तो हात ज्याने सकाळी स्काल्पेल चालवून एका माणसाचे प्राण वाचवले, त्याचं आयुष्य बदलून टाकलं आणि बघणाऱ्या इतक्या लोकांना इंस्पायर केलं..

ती पुढे काही बोलणार इतक्यात पाणी घेऊन वेटर आला आणि त्यांनी पटकन तिचा हात सोडून ग्लास उचलला. पुढे काही नाही. शांतता..

डॉ. आनंद जरा घसा खाकरून पुढे बोलायला लागले. "सायराने कल तुम्हारी सर्जरी देखी."

"फ*ग मेस! बायोट्रॉनका आय सी डी फॉल्टी था. मैंने कंपनी को मेरे OR से फॉरेव्हर बॅन कर दिया." आता कुठे नॉर्मल बोलणं सुरू होत होतं.

"अनिश? व्हॉट अ सरप्राईज! मला वाटलं तू पार्टीला येणार नाहीस! नो ड्रिंक?" डॉ. शेंडेनी मागून येऊन त्याच्या पाठीवर थाप मारली.

डॉ. पै नी त्याच्याकडे बघून नुसती मान हलवली.

"बहुत बहुत बधाई डॉ. आनंद!" हातातलं सोनेरी कागदात गुंडाळलेलं मोठं गिफ्ट त्यांच्या हातात सोपवत शेंडे म्हणाला. तेवढ्यात त्यांची नजर शेजारी उभ्या सायरावर वरपासून खालपर्यत फिरली. "ओह, अँड हू इज धिस स्मोकिंग ब्यूटी?"

स्मोकिंग ब्यूटी! यक.. तिचा मूडच गेला. "सायरा देशमुख, मी हॉस्पिटलमध्ये सर्जिकल असिस्टंट आहे." ती ताठ मानेने म्हणाली.

"ओह राईट! आपण भेटलो होतो. बॅड लक, माझी टीम फुल आहे. नाहीतर नक्कीच तुला जाऊ दिलं नसतं." अजूनही तिच्यावरून नजर न हलवता शेंडे म्हणाला. "बट लेट्स सी.. वी कॅन शफल अ लिटल..."

"नो नीड! शी विल बी वर्किंग विथ डॉ. पै फ्रॉम धिस कमिंग थर्सडे!" मध्येच डॉ. आनंद म्हणाले.

हं? व्हॉट? सायरा आणि पै दोघांनीही चमकून डॉक्टरांकडे पाहिलं.

" और शेंडे जरा मेरे साथ चलो, मेरी वाईफ को तुमसे मिलना था. लास्ट यर तुम जो क्रूझ पर गये थे.." बोलत बोलत पाठीवर हात टाकून ते शेंडेला घेऊन गेले.

डॉ. पै समोर सायरा एकटीच मनात डॉक्टरांना वैतागून उभी राहिली.

"आय डोन्ट नो, ते असं का म्हणाले.." ती जमिनीकडे बघत म्हणाली.

"डिड आय ऑफर यू द पोझिशन?" अनिशच्या कपाळावर आठया होत्या.

"नो. नो नो. डॉ. आनंद रिटायर होताना मला कुठल्या तरी सर्जनच्या टीममध्ये टाकून जाणार होते. फॉर सम रिजन, ही थिंक्स वी विल बी गुड टूगेदर."

अनिशने मान हलवली. "धिस इज न्यूज फॉर मी!"

"बिलिव्ह मी, मलाही हे पटत नाही. मी तुमची सर्जरी बघितली. पण त्या कंपनीच्या माणसाशी तुम्ही खूप क्रूर वागलात."

"तुझं काय म्हणणं आहे, मी त्याला सोडून द्यायला हवं होतं?" अनिश कडवट हसत म्हणाला. "त्याच्या खराब डिव्हाईसमुळे त्या माणसाच्या पूर्ण पोटात इन्फेक्शन स्प्रेड होत होतं. हार्ट रेट पुन्हा वाढत होता. ज्या गोष्टीने तो बरा व्हायला हवा तीच गोष्ट त्याला मारत होती. आणि तू मला क्रूर म्हणतेयस!"

त्याच्या डोळ्यात आग होती.

तिने एक पाऊल मागे घेतलं. आय सी डी मुळे इन्फेक्शन झाल्याचं तिला माहीत नव्हतं.

"क्रूर चुकीचा शब्द होता." ती हळूच म्हणाली.

"डू मी अ फेवर अँड टेल डॉ. आनंद धिस वोन्ट वर्क आउट. तुला दुसरा सर्जन शोधावा लागेल" तो तिथून जायला वळला. तिने पटकन पुढे होत त्याच्या दंडाला धरून त्याला थांबवलं. "आर यू जोकिंग? मी इतकी वर्षे डॉ. आनंदचा राईट हँड होते. हिज बेस्ट असिस्टंट. मी तुमच्यासाठी काम करणं हे तुमच्याच फायद्याचं होतं. आय अ‍ॅक्सेप्ट, मी मघाशी चुकून बोलले पण ते बोलणं चुकीचं नव्हतं. तुमची टीम याच कारणामुळे टिकत नाही. तुम्ही 'क्रूर' आहात. हाताखालच्या कुणालाही किंमत देत नाही. तुमच्या प्रत्येक असिस्टंटला मी रडताना बघितलंय." बोलता बोलता त्याचा दंड धरूनच ठेवलेला लक्षात आल्यावर तिने चटका बसल्यासारखा हात मागे घेतला.

"मला वाटायचं ते लोक तुमच्याबद्दल अती करून सांगतात. पण ते बरोबर होते. यू डू नॉट रिस्पेक्ट पीपल." तिच्या चेहऱ्यावर वैताग, चीड सगळं स्पष्ट दिसत होतं. "डोन्ट वरी, मी डॉ. आनंदना सांगेनच पण बुधवारी सर्जरी सुरू होताना तुम्हाला माझ्यासारख्या अनुभवी असिस्टंटची कमी नक्कीच जाणवेल. गुड नाईट डॉक्टर!" त्याला तिथेच सोडून ती तरातरा गेटच्या दिशेने निघाली. जाताजाता वेटरला बोलावून तिने भराभर दोन तीन प्रॉन्स तोंडात कोंबले. वर घटाघट एक ब्लडी मेरी पिऊन टेचात बाहेर पडली.

---

सकाळी अनिश त्याच्या केबीनमध्ये फाईल बघता बघता थांबला. सायरासारख्या टोनमध्ये त्याच्याशी आजवर कोणीच बोललं नव्हतं, ना त्याला सुनावलं होतं. सुरुवातीला तिला तसं बोलताना ऐकून त्याचा फ्यूज उडाला होता पण हे सगळं अचानक घडल्यामुळे त्याने सगळं ऐकून घेतलं होतं. तिने दंडावर घट्ट धरलेला नाजूकसा हात त्याला जाणवला होता आणि त्याहून जास्त तिचे तिखट शब्द. लडकीमे गट्स तो है! मानना पडेगा.

त्याने इंटरकॉमवर शुभदाला कॉल केला.
"सेंड मी एम्प्लॉयी फाईल ऑफ सायरा देशमुख."

फेमिना चाळताना शुभदा एकदम थबकली.
"व्हाय?"

"जस्ट डू व्हॉट आय से." तिकडून थंड आवाज आला.

"आय लाईक दॅट गर्ल, डॉक्टर प्लीज डोन्ट फायर हर." ती पांढऱ्या वेणीवरचा गजरा नीट करत म्हणाली.

चक्क शुभदा कोणाला तरी चांगलं म्हणतेय हे त्याच्यासाठी नवीन होतं.

त्याने रिसिव्हर ठेवला. शुभदाने आत येऊन फाईल आणि शेजारी त्याचा कॉफी मग ठेवला.

थँक्स. तो मान वर न करता म्हणाला. ती आता हे काय नवीन असा लुक देऊन बाहेर गेली.

त्याने फाईल उघडली. पूर्ण नाव, पत्ता.. हम्म बऱ्यापैकी सो सो एरिया आहे. वय अठ्ठावीस, ओह! बघून खूप लहान वाटली होती. मार्क्स थ्रू आउट चांगले आहेत. डिग्रीला डिस्टिंक्शन.. पानं उलटत तो शेवटच्या पानावर पोचला. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट मध्ये पुसट काहीतरी लिहायला सुरुवात करून खोडलं होतं. ती रिकामी रेघ कुठेतरी त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेली.

तितक्यात नवा रेसिडेंट आला आणि त्याने पटकन ती फाईल ड्रॉवरमध्ये कोंबली.

"गुड मॉर्निंग डॉक्टर! हॅड फन यस्टरडे?" रेसिडेंटने हसत विचारले.

"स्टॉप बीइंग माय फ्रेंड. हॅव यू स्टडीड द केस?" अनिश पेन खिशाला अडकवत म्हणाला.

रेसिडेंट गळपटून कामाचं बोलायला लागला. हम्म, सायरासारखं धाडस दिसत नाही.

सर्जरी संपली तेव्हा लंच टाइम झाला होता. अनिशला प्रचंड भूक लागली होती तरीही आधी एक महत्त्वाचं काम निपटायचं होतं. स्टाफ लाऊन्ज शोधून लिफ्ट येईपर्यंत दहा मिनिटे गेली. लिफ्टचं दार उघडताच हॉलमधून हसण्या- बोलण्याचे आवाज येत होते. उघड्या दाराबाहेर थांबून त्याने आत बघितले. ती गर्दीत ओळखू तरी येईल का, त्याला शंका होती.

दिसली.

टेबलाच्या मधोमध बसून आजूबाजूच्या हसणाऱ्या घोळक्याला ती काहीतरी सांगत होती. अचानक आजूबाजूचे सगळे हळूहळू शांत झाले. बोलता बोलता तिने डिशमधल्या गरम फ्राईजवर मीठ भुरभुरलं. कोणीतरी कोपर मारल्यावर तिचं दाराकडे लक्ष गेलं. एवढं मीठ बघून त्याच्या कपाळावर आठी आलीच होती. तिने मला काय त्याचं अश्या नजरेने नाक उडवलं.

त्याने जराशी मान हलवून इकडे बाहेर ये असा इशारा केला. तिची नजर भिंतीकडे गेली. लगोलग त्याने तिकडे पाहिले तर नोटीस बोर्डवर त्याचा डेव्हील फोटो झळकत होता आणि कुणीतरी त्याच्या डोक्यावर लिहिलं होतं, Red Hot Doc!

न राहवून त्याला मनापासून हसू आलं पण त्याने ओठ बंदच ठेवले.

ती येत नाही बघून शेवटी त्याने तोंड उघडलं आणि सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणाला, "सायरा, आय नीड टू स्पीक विथ यू."

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ७

ती अनिच्छेनेच उठून हळूहळू चालत बाहेर येऊ लागली.

"आजच आलीस तर बरं होईल!" तो त्रासिक आवाजात म्हणाला.

तिने त्याच्याशेजारून जाताना फक्त एक झणझणीत कटाक्ष टाकला आणि बाहेर दरवाजापासून जरा लांब कोपऱ्यात जाऊन थांबली. आता त्याला तिच्यामागे चालत जावंच लागलं.

तिने हाताची घडी घातली. "माझा लंच टाइम संपायला दहा मिनिटं बाकी आहेत. काय बोलायचंय ते लवकर बोला प्लीज." मान वर करून ती म्हणाली.

झाली परत हिची दादागिरी सुरू! एवढी वर्ष डॉ. आनंदकडे कशी काय टिकली ही? आश्चर्यच आहे.
माझ्याकडे जेमतेम चार दिवस टिकेल. त्याने तिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. पार्टीनंतर तो पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून बघत होता. गोरा गुबगुबीत चेहरा, लांब सरळसोट केसांची उंच पोनिटेल, हिरवट नितळ पाण्याच्या रंगासारखे डोळे, गुलाबी ओठ ज्यांची आता चिडून सरळ रेष बनली होती उंची कमी असली तरी सडपातळ असल्यामुळे ती बुटकी वाटत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा एक निरागस ताजेपणा होता. एखादया लहान मुलांच्या मुव्हीत ही नक्की खपून जाईल.

"हे चाईल्ड साईज स्क्रब्ज कुठे मिळाले?" अजाणता त्याच्या तोंडून निघालं.

"काय?" रागाने रोखून बघताना तिच्या डोळ्यांचा रंग अजूनच वेगळा वाटत होता.

तिच्या भुवया वर गेल्या. "तुम्ही हे विचारायला मला इथे बोलावलं?"

त्याने बोटांनी स्वतःचं कपाळ जरा चेपलं. काय करतोय मी, ऍम आय सिक? ऍम आय गोइंग सायको?

"डॉ. आनंदबरोबर तू किती वर्ष काम केलं आहेस?" त्याने जरा भानावर येत विचारलं.

"सहा!"

"ते तुझ्या कामाबद्दल चांगलं बोलत होते."

"हम्म आमचं टीमवर्क चांगलं होतं." ती त्याच्या खांद्यावरून पलीकडे बघत म्हणाली.

"सो तुला कार्डिऍक मध्येच रहायचं आहे, राईट?"

"येस. प्रीफरेबली."

"कधी पीडियाट्रिक केसेस हँडल केल्यात ?"

"नाही. डॉ. आनंद मोस्टली अडल्ट केसेस घेत होते."

त्याला ह्याच गोष्टीचा प्रॉब्लेम होता.

"त्यांच्या रुटीन सर्जरीज दोन तीन तासाच्या असायच्या. मला त्यांच्या डबल, ट्रिपल वेळ लागू शकतो. इतका वेळ तू मॅनेज करू शकशील?"

तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. आधी तडतड उडणारी ती आता शांत, ऑलमोस्ट कंटाळली होती. नक्कीच ही खोटी शांतता आहे. त्याला तिच्या गळ्याला बोट लावून बघावंसं वाटलं, पल्स नक्कीच ताडताड उडत असणार.

"मी कन्फ्युज झालेय, तुम्ही मला जॉब ऑफर करताय की वॉर्न करताय?" तिने शांतपणे विचारले.

क्वेश्चन ऑफ द डे!
एकीकडे त्याला ती सर्जरीमध्ये कितपत टिकाव धरेल शंका होती पण तेवढीच एका अनुभवी असिस्टंटची गरजही होती.

हम्म, हिला अनुभव तरी चांगला आहे.

त्याने एक खोल श्वास घेतला. "तुझी पहिली केस गुरुवारी सकाळी असेल. शुभदाकडून डिटेल्स घे. टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो आणि डी जॉर्ज सिंड्रोमचा शक्य तेवढा अभ्यास कर, सगळ्या स्टेप्स नीट समजून घे कारण एका लहान मुलाचं अख्खं आयुष्य आपल्यावर अवलंबून आहे. मी तुला एक चान्स देतोय." वळून तो भराभर तिथून निघाला. ती मागून काहीतरी ओरडून सांगेल वाटलं होतं पण काहीच आवाज आला नाही. लॉबीचं दार ढकलून तो लिफ्टसमोर थांबला.

ती गुरुवारी सर्जरीला हजर असण्याबाबत त्याला खात्री होती.

सो! मला एक नवी कोरी असिस्टंट मिळाली. फायनली! किंचित हसत तो लिफ्टमध्ये शिरला.

---

गुरुवारी सकाळी सायरा अगदी आत्मविश्वासाने पटापट चालत लिफ्टमधून बाहेर आली. तिच्या डोळ्यात चमक होती आणि ओठांवर आवडती डस्ट पिंक लिपस्टिक. सकाळीच शाम्पू केलेल्या केसांची पोनिटेल मस्त सुळसुळत होती. बाथरूमला जावं लागणार नाही पण डोकं शिस्तीत राहील इतकीच कॉफी पिऊन ती OT कडे आली. सर्जरी स्मूद पार पडत होती. फायनली सगळं संपलं आणि तिने डॉ. पैंच्या अपेक्षेपेक्षा उत्तम काम केलं. सगळ्या डीस्पोजेबल गोष्टी कचऱ्यात टाकून हात धुतल्यावर त्यांनी सायराला बाजूला घेऊन तिच्या कामाचं कौतुक केलं. त्यांचे डोळे आज नेहमीपेक्षा जास्त चॉकलेटी दिसतायत. त्यांचा चेहरा अजून जवळ आला. ओह नो, अजून अप्रिशीएट करायला किस करणार की काय.. ओके, आय हेट पै. बट आय डोन्ट हेट हिज लिप्स, ऑर फेस ऑर दॅट हेअर... तिने विचार केला आणि डोळे मिटून चेहरा वर केला. अचानक OT च्या दारामागून धाड धाड आवाज यायला लागला आणि तिचे डोळे उघडले.

"दी ss द, ऊठ ऊठ.." नेहा जोरात दार वाजवत होती.

"शिट! सात वाजले! साडेआठला सर्जरी आहे." ती पांघरूण उडवत उठून किंचाळली. दार उघडून बाथरूममध्ये जाऊन ब्रश करता करता ती नेहावर ओरडली. "मला आधी का नाही उठवलं बावळटss" गिझर आधीच ऑन होता. "कारण तू कधीच इतक्या उशिरा घरी नसतेस" किचनमधून नेहा ओरडली. "ठीक आहे, माझं पाणी घे आता अंघोळीला."

"थोर उपकार!" म्हणून पटापट आवरून सायरा बाहेर आली तर पार्किंगमध्ये ऍक्टिवा किकवर किक मारूनही सुरू होत नव्हती. "दीद मी नौकरीवर तुझ्यासाठी सर्च करायला घेते" नेहा खिडकीतून डोकं वर काढत हसत म्हणाली.

"शिट! आजच सगळं व्हायचं होतं." तिने ऍक्टिवाला लाथ मारली.

कशीबशी टॅक्सी मिळवून ती हॉस्पिटलकडे निघाली. रात्रभर अभ्यास करून तिने पूर्ण सर्जरी स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवली होती. तरीही एका लहान मुलांची सर्जरी म्हणून ती थोडी नर्व्हस होती. अक्षरं धुरकट होऊन तिला उशिरा कधी झोप लागली कळलंच नव्हतं. शिट! मला कधीच उशीर होत नाही, नेहमी मी अर्धा तास आधीच हजर असते आणि नेमकं आज... तिचं डोकं बधिर झालं.

शेवटी एकदाची टॅक्सी गेटपाशी येऊन थांबली. भराभर वर जाऊन OT च्या दारात डोकावताना तिला पैंच्या टिममधली नर्स दिसली. "सायरा, सर्जरी शुरू होने ही वाली है! डॉक्टर जानते है तुम लेट हो, पाच मिनिटमें चेंज करके आ जाओ. तब तक मै इधर सब हँडल करती हूं. सब तुम्हारा वेट कर रहे हैं, जस्ट फाईव्ह मिनिट्स, ओके?"

"थॅंक्यु सो मच!" म्हणत ती चेंज करायला पळाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ८

"अजून जास्तीत जास्त पंधरा मिनिटं" अनिश घड्याळात बघत म्हणाला.  विहानचे वडील खोलीत फेऱ्या मारत होते तर आई खुर्चीत नखं चावत बसली होती. आधीच त्यांना विहानला इथे आणायला उशीर झाला होता, हे ऑपरेशन सहा महिन्यांपूर्वीच व्हायला हवं होतं. सर्जरी कितपत यशस्वी होईल याची त्यांना शंका होती. "बिलिव्ह मी, ही'ज इन गुड हँडस." तो विहानच्या डोक्यावर थोपटत म्हणाला.

आधीच त्यांचा विश्वास नाही आणि त्यात हा होणारा उशीर त्यात भर घालतोय. तेवढ्यात खोलीचं दार उघडून नर्स आत आली. "सब रेडी है"
त्याने मान हलवून श्वास सोडला.

याचा अर्थ सायरा आली. कामाच्या पहिल्याच दिवशी ऊशीर! आजच्या सर्जरीत त्याला मदत करायला चेन्नईहून डॉ. कृष्णमूर्ती आले होते. त्याने याआधीही त्यांच्याबरोबर काम केले होते. ते निष्णात सर्जन होतेच पण तितकेच फटकळ! दोघांची टाइम टेबल ऍडजस्ट करून ही सर्जरी होणार होती. आज OT दिवसभरासाठी बुक होते अर्थात उशीर झाल्यामुळे सायरा फक्त त्याचा किंवा कृष्णमूर्तींचाच वेळ वाया घालवत नव्हती तर त्यांच्यानंतर येणाऱ्या टीमच्याही शेड्युलची वाट लावणार होती.

त्याने तिला तिथल्या तिथे फायर केलं असतं पण आज त्याच्यासाठी विहान ही प्रायोरीटी होती. सगळं लक्ष त्याला सर्जरीकडे द्यायचं होतं. त्याचा राग मनाच्या एका कप्प्यात दाबून टाकत त्याने विहानच्या वडिलांना पुन्हा एकदा समजावून सांगितलं. समोरच्या रिकाम्या खोलीत डॉ. कृष्णमूर्ती कॉलवर होते. "तीन बजे मेरा फ्लाईट हैं.आय होप शी वोन्ट कॉझ एनी मोर डीलेज."तो दार उघडून डोकावल्यावर त्याच्याकडे पाहून ते म्हणाले.

"वी विल गेट यू इन टाइम, डोन्ट वरी." त्यांना घेऊन तो OT कडे निघाला. एव्हाना विहानला OT मध्ये आणला होता. ते दोघेही स्क्रब्ज घालून तयार झाले. ऑपरेशन टेबलवर विहान एवढासा दिसत होता. एक नर्स त्याला हसवायचा प्रयत्न करत होती पण तो घाबरून इकडेतिकडे बघत होता. डॉ. गांधींनी ऍनेस्थेशीया दिल्यावर काही वेळ तो त्यांना टेन टू वन म्हणून दाखवत होता पण थ्री पाशी पोचताच तो आउट झाला.

टाइम टू रोल.

खांद्याने दार ढकलून तो आत आला. विहान घाबरू नये म्हणून इन्स्ट्रुमेंट्स अजून टेबलशेजारी मांडली नव्हती. त्याने टेबलपलीकडे नर्सशी बोलत इन्स्ट्रुमेंट सेट तयार करणाऱ्या सायराकडे पाहिलं. तिचा काही अपघात होऊन लागलं वगैरे असेल असा त्याचा अंदाज होता पण ती तर अगदी टवटवीत फुलासारखी दिसत होती. "सो हू'ज द कल्प्रिट?" के ने विचारलं.

"सॉरी डॉक्टर, दॅट्स मी.." ती हळूच म्हणाली.

"इफ आय हॅव टू बुक अ न्यू वन, यू विल बी पेईंग फॉर दॅट." ते खडसावून म्हणाले.

"आय हॅव ऑलरेडी अश्यूअर्ड यू. इट वोन्ट हॅपन." अनिश त्यांना गप्प करायला म्हणाला. त्याला सगळा फोकस फक्त सर्जरीवर हवा होता.

सायरा अजूनही स्टराईल केलेला इन्स्ट्रुमेंट बॉक्स धरून जागीच उभी होती. त्याने इशारा केल्यावर टीम पटापट कामाला लागली. नर्सने दोघांचे हात पुसले आणि डॉ. के ना एप्रन चढवला.

"सर्जरी आजच करायची आहे." त्याचे पुढे केलेले हात आणि थंड आवाज ऐकून ती पटकन एप्रन घेऊन पुढे आली. "डॉ. आनंदकडे हे काम नर्स करायची." ती हळूच म्हणाली.

"माझ्याकडे माझा असिस्टंट करतो." तो शांतपणे म्हणाला. तिचा हात पुरत नव्हता म्हणून तो जरासा वाकला. एप्रन चढवून कंबरेच्या दोऱ्या बांधताना तिच्या हातातून निसटल्या, पटकन चाचपून ती त्या बांधेपर्यंत त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. मागे जाऊन मानेवरची गाठ बांधताना तिचा हात पोचत नाही बघून तो जरासा वाकला. त्याला हळूच पुटपुटलेलं थॅंक यू ऐकू आलं. तरीही गाठ मारायला तिला लागणारा वेळ बघून तो वैतागलाच. एप्रन बांधून झाल्यावर ती बाहेर जाऊन पुन्हा ग्लव्हज बदलून आली आणि त्याच्या शेजारी तिच्या जागी जाऊन उभी राहिली. टेबल त्याच्या उंचीनुसार सेट केले होते. त्याने एकदा तिच्याकडे पाहिले आणि स्टूल मागवले. शेवटी एकदाची स्टुलावर उभी राहून ती त्याच्या आणि टेबलाच्या लेव्हलला आली. त्याने रोल कॉल सुरू केला. प्रत्येकाने आपापली पोझिशन सांगितल्यावर तिचा नंबर आला.

अनिशने मास्कवरून तिच्याकडे बघितले. तिने एकटीने सगळ्याला उशीर केला होता. डॉ. के ने एवढा अपमान केल्यावर कदाचित ही आताच पळून जाईल असं एक मन त्याला सांगत होतं. पण आनंदच्या म्हणण्यानुसार ही जर इतकी अनुभवी हुशार एम्प्लॉयी असेल तर नक्की यातून तरून जाईल.

तिचे रेशमी केस, तरतरीत नाक, ओठ सगळं झाकलेलं होतं तरी तिच्या डोळ्यांत त्याला  वेगळाच निर्धार दिसला. "वेल? आता काय करणार?" विचारल्यासारख्या त्याने भुवया उंचावल्या. तिने ताठ उभी रहात बोलायला सुरुवात केली. "सायरा देशमुख, डॉ. पै'ज सर्जिकल असिस्टंट. एव्हरीथिंग इज रेडी."

ती थांबल्यावर लगेच तो बोलू लागला, "टुडे वी आर ऑपरेटिंग ऑन अ टू यर ओल्ड. ही हॅज प्रिव्हीअस शंट इन हिज हार्ट. वी आर गोइंग फॉर ऍन ओपन हार्ट सर्जरी टू रिमूव्ह द शंट अँड करेकटिव् रिपेअर ऑफ टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो. ऑल सेट?" सगळीकडून होकार आल्यावर त्याने हात पुढे केला. "सायरा, टेन ब्लेड. हार्मोनिक स्काल्पेल."

---
आज काय फालतू नशीब आहे! कधी न होणारा उशीर आज झालाय त्यात डोक्यावर पै आणि त्याहून वैताग नवा सर्जन! पै परवडला इतका हा माणूस रिडिक्युलस आहे. पन्नाशीचा असला तरी फिट आहे. आल्यावर तयारी करताना दोनदा तरी त्याच्या सायकलिंगबद्दल बडबड केली. काम करता करता तिच्या डोक्यात विचार सुरू होते.

आल्या आल्याच त्याने तिचा इतका सार्वजनिक अपमान केल्यामुळे ती डॉ. के कडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करत होती. पहिल्या इंसीजननंतर अनिशने अँटिरिअर पेरीकार्डियमचा एक तुकडा तिच्याकडे दिला, तिने लगेच ग्लुटाराल्डहाईड! म्हणत तो सोल्यूशन मध्ये ट्रीट केला. हा तुकडा पुढे VSD पॅच म्हणून वापरायचा होता. हेपारीन! कॅनूलाज!! अनिश पटापट ऑर्डर देत पुढच्या स्टेपवर जात होता. सायराने  बायपास इन्स्टिट्यूट केल्यावर डॉ. के ने तोपर्यंत व्हेंट कॅथेटर बसवला. मधेच विहानच्या ओठांच्या आजूबाजूला निळसर टिंज दिसल्यावर ती ऑक्सिजन सॅच्युरेशन बघत होती.

तेवढ्यात मागून आवाज आला. "यू नो डॉ. पै, आय वुड नॉट पुट अप विथ ऍन असिस्टंट होल्डिंग उप धिस मच कॉस्टली सर्जरी." ती पुन्हा अनिशशेजारी उभी राहून सक्शन करत होती. ऐकताच तिचा चेहरा उष्ण झाला. ती खाडकन काहीतरी उत्तर देतादेता थांबली. "वेल, देन इट्स अ गुड थिंग दॅट धिस केस इज हॅन्डल्ड बाय हॉस्पिटल्स चॅरिटेबल ट्रस्ट!" अनिशने थंड आवाजात उत्तर दिले. "सायरा, पे अटेन्शन. आय नीड मोर सक्शन." तिने पूर्ण लक्ष सर्जरीवर केंद्रित केले.

पैंनी गप्प केल्यापासून डॉ. के फक्त कामापुरते बोलत होते. सर्जरी सुरू होऊन तीन तास होऊन गेले होते. अचानक भुकेने तिच्या पोटात गुरगुर झाली. ही माझ्या आयुष्यातली वर्स्ट सर्जरी असेल. थँक गॉड, कोणी ऐकलं नाही. "इज दॅट यू सायरा?" तिच्या हातून ब्लेड घेताना अनिशने विचारले.  तिने त्याची नजर टाळत होकारार्थी मान हलवली. "माझ्या OR मध्ये खाल्ल्याशिवाय कधीही पाऊल ठेवायचं नाही. हे काम खूप वेळखाऊ आणि टीडीअस आहे. आपल्याला कितीही तास इथे उभं राहावं लागतं. टाके घालता घालता तुला चक्कर आली तर काय करणार? माझ्या पेशंटचा जीव धोक्यात येईल. समजलं?" तो नेहमीच्या कडक आवाजात बोलला.

"येस सर." ती खालमानेने म्हणाली.

"सायरा, इज इट युअर फर्स्ट टाइम हिअर? आय हर्ड.." डॉ. के चा वैतागवाणा आवाज आलाच.

"येस, फर्स्ट विथ डॉ. पै." ती शांतपणे म्हणाली.

"हां! दॅट एक्सप्लेन्स! पै विल बी इन मार्केट फॉर न्यू असिस्टंट शॉर्टली." तो ख्या ख्या करत हसला.

बास हे सहन करण्या पलीकडे होतं. तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला. उफ, हेच बाकी होतं. सर्जरीमध्ये रडणं म्हणजे टोटल रिस्क.

"सायरा, कम्युनिकेट. माझं पूर्ण लक्ष पेशंटवर आहे. तुला ब्रेक हवा असेल तर तसं सांग." अनिश विहानवरचं लक्ष हलवता म्हणाला.

"येस, फाइव्ह मिनीट्स." ती नर्सला तिची जागा देऊन बाजूला झाली. अजून थोडं रडून ओला मास्क आणि ग्लव्हज बदलून ती पुन्हा जागेवर आली.

तिच्यासाठी आजचा दिवस कितीही वाईट असला तरी तिला कामात मजा येत होती. डॉ. पै एकहाती सगळं करत होते. खरं तर ह्या दुसऱ्या सर्जनच्या मदतीची काहीच गरज नव्हती. पहिल्याच सर्जरीत तिला खूप शिकायला मिळत होतं. शेवटी तिने भिंतीवरच्या घड्याळात बघितलं तेव्हा एक वाजला होता. डॉ. पैं नी भराभर काम करून सर्जरी वेळेत आटोपली. हुश्श, हा के माणूस वेळेत निघेल एकदाचा. अनिशने टाक्यांना सुरुवात करून सुई तिच्या हातात दिली आणि दोन्ही सर्जन बाहेर गेले. तिने बारकाईने व्यवस्थित टाके घातले की पुन्हा विहानच्या अंगावर त्या वाईट खुणा रहायला नकोत. "तुमने अच्छा काम किया" शेजारची नर्स म्हणाली. ती अर्धवट हसली "हां? और उसके पहले का क्या?" "सोचो, जो भी होता है अच्छे के लिए होता है!" नर्स हसत म्हणाली.

ती स्टाफ लाऊंजमध्ये एकटीच टीपं गाळत समोरच्या ताटातली पोळीभाजी खात बसली होती. नेमकी आज भाजीसुद्धा शेपूची! डोळ्यातून अजूनच पाणी आलं. हा माझा शेवटचा चान्स होता. शिट! आय टोटली स्क्रूड अप! तिची हकालपट्टी होणार हे एव्हाना तिचं ठाम मत झालं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ९

"अरे ही इथे आहे!" बाहेरून चंदा ओरडली. तिच्याबरोबर सगळा घोळकाच आत आला. चंदा, सोनाली आणि पूर्वा तिघीही सायरासारख्याच सर्जिकल असिस्टंट होत्या. तिच्या वर्कप्लेस फ्रेंड्स. चंदा आणि सोनाली कॉस्मेटिक सर्जरीमध्ये होत्या, फक्त सहा तासाची शिफ्ट, फ्री सॅम्पल्स, सेलिब्रिटी क्लायंट्स मजाच मजा! पूर्वा बिचारी जनरल सर्जरीमध्ये पिळली जात होती. सायराला निसटायचा चान्स न देता त्या लगेच तिच्या आजूबाजूच्या खुर्च्या घेऊन बसल्या.

"येस! वी हॅव अ सर्व्हायवर!" सोना तिच्या पाठीवर थाप मारत म्हणाली.

"हम्म, अँड आय वोन्ट सर्वाइव द नेक्स्ट!" तिचा चेहरा अजूनही पडलेलाच होता.

"ए, ड्रामा क्वीन!" पूर्वाने तिच्या खांद्यावर फेक पंच मारला. "इस खुशी के मौके पर हम तुम्हे पार्टी थ्रो कर रहे है!"

"नो यार, मूड नही है... आज का दिन ही वर्स्ट है..."
तिने मान हलवली.

"यार... इतना भी क्या? अगर डॉ. पै को कोई हँडल कर सकता है, तो वो सिर्फ तुम हो." पूर्वाने नोटीस बोर्डवरच्या डेव्हीलकडे पाहिले.

ती पूर्वाकडे बघून तोंड वाकडं करणार तोच तिला दारातून शुभदा येताना दिसली.सॉल्ट-पेपर केसांची लांब वेणी, सुती कडक इस्त्रीची साडी आणि केसात माळलेला रोजच्यासारखा अबोलीचा गजरा. ओह नो. डॉ. पै नी नक्की मला फायर केलंय.. ही तेच लेटर घेऊन येतेय.. शिट! तिने रिकामं ताट क्रेटमध्ये ठेऊन पटकन हात धुतले आणि शुभदाकडे गेली. "मै तुम्हे सब्ब् जगा धुंडी!" शुभदा त्रासून बोलली. तिने फाईल टेबलवर ठेवली. "ये सर्जरीके डिटेल्स है, डे आफ्टर टूमारो."

"ओह, मुझे इसकी जरूरत नही पडेगी." ती कसंनुसं हसली.

"डॉ. आनंद तुम्हे स्टडी करने नही बोलते होंगे पर डॉ. पै बहोत स्ट्रिक्ट है. ही वॉन्टस यू टू फुल्ली प्रिपेअर बीफोर सर्जरी." शुभदा टिपिकल तमिळ ऍकसेंट मध्ये म्हणाली.

ओह, हिला समजलं नाहीये. "नो, नो, आय मीन आय वोन्ट बी देअर इन धिस सर्जरी."

शुभदाने तिच्या जाड निळ्या रिमच्या चष्म्यातून तिच्याकडे हीचा एखादा स्क्रू लूज दिसतोय असं रोखून पाहिलं.

"डॉ. पै ने मुझे अभी ये फाईल दी है. इफ यू वॉन्ट टू क्विट, डू लेट मी नो नाऊ!"

सायराने आ वासला. "यू मीन जस्ट नाऊ? आफ्टर सर्जरी?"

शुभदाने होकारार्थी मान हलवली.

"अँड ही सेड टू हँड इट टू मी? मी? सायरा देशमुख?" तिचे डोळे विस्फारले होते.

शुभदाने पुढे होऊन तिच्या कपाळावर बोट आपटले. "येस! ये स्टूपीड क्वेश्चन्स बंद करो!" आणि फिरून काहीतरी पुटपुटत ती बाहेर निघून गेली.

तिच्या मैत्रीणीसुद्धा शॉकमध्ये होत्या. "येय! यू डिड इट!" चंदा ओरडली. सगळ्यांनी मिळून एक ग्रुप हग केल्यावर पुन्हा त्यांच्या पार्टीच्या गप्पा सुरु झाल्या. चंदाकडे हॉस्पिटलजवळ उघडलेल्या नव्या पबचे फ्री एन्ट्री पासेस होते. तिची शिफ्ट सहा वाजता संपत होती. सात वाजता येण्याचं प्रॉमिस करून ती पुन्हा कामात गुंतली. शिफ्ट संपताच घरी जाऊन तयार होऊन पार्टीला जाण्याइतका वेळ हातात होता.

घरी जाऊन तिने आधी स्वच्छ आंघोळ केली. मग लिवाइसची राखीव ब्लॅक स्किनी जीन्स चढवली. वर नेहमीचा टॉप चढवणार तोच तो हिसकावून नेहाने ब्लॅक लेसचे ब्रालेट आणि एका बाजूने ऑफ शोल्डर लूज ग्रे टॉप तिच्या हातात ठेवला. "मी लिंकिंग रोडला घेतला होता" नेहा खांदे उडवत म्हणाली. तिनेच थोडासा मेकअप करून शेवटचा मस्कारा टच अप केल्यावर शिट्टी मारली. "दॅटस लाईक अ पार्टी लुक! मी दुपारी ऍक्टिवा गॅरेजमध्ये नेऊन आणली. प्लग साफ करायला हवा होता, आता नीट आहे." "Awww, माझी स्वीटेस्ट बेबी सिस्टर!" म्हणत सायराने तिच्या गालाची पापी घेतली. "दीद! जा आता."  तिने गाल फुगवत लिपस्टिक पुसली आणि स्ट्रेंजर थिंग्जचा पुढचा एपिसोड प्ले केला.

ऍक्टिवा काढून जाताजाता हॉस्पिटलपाशी आल्यावर तिला अचानक नेहाच्या लेन्सेसचं सोल्यूशन संपलेलं आठवलं. गाडी पार्क करून ती पटकन मेडिकलमध्ये जाऊन बाहेर आली. ते पुडकं सीटखाली ठेऊन ती ऍक्टिवा पार्किंगच्या बाहेर रिव्हर्स घेत असताना अचानक बॅम!!

टेल लाईटला काहीतरी घासले आणि ती ऍक्टिवा सकट खाली पडली. शिट! ती डोकं चोळत उठली तेव्हा तिला शेजारी थांबलेली होंडा सिटी आणि त्यातून उतरून तिच्याकडे पळत येणारा माणूस दिसला. "आय एम सो सो सॉरी, आर यू ओके?" तो पडलेली ऍक्टिवा उचलत म्हणाला. " आय थिंक सो.." शॉकमधून तिला बोलायचं सुचत नव्हतं. ती जीन्सवरची धूळ झाडत उभी राहिली.तिला काही लागलं नव्हतं पण तिच्या गाडीला आलेला भलामोठा डेंट आणि इंडीकेटर लेन्स फुटलेली दिसत होता. "यू सडनली केम अप अँड.. सॉरी आय ऑल्सो मेड अ मिस्टेक." तिला रागाने बोलायचं होतं पण तो बडबड करत तिला बोलूच देत नव्हता.  "हम्म, बट डोन्ट वरी आय एम पेईंग फॉर डॅमेजेस. डू यू यूज जीपे? गिव्ह मी युअर नंबर."

ऑफ कोर्स यू हॅव टू पे! ती थोडी भानावर आली. पटकन तिने नंबर सांगितला. "फिफ्टीन हंड्रेड? इज इट ओके?" "आय गेस सो." पैसे रिसिव्ह होऊन तिचा फोन पिंग झाला. तिने पटकन मेसेजमधली अमाउंट चेक केली. ओके!  "इफ इट इज मोर लेट मी नो. यू हॅव माय नंबर." तिला हात दाखवून तो त्याच्या कारमध्ये जाऊन बसलाही. तिच्या फोनवर त्याचा मिस्ड कॉल होता. तिने accident dude म्हणून नंबर सेव्ह केला.

जरा केस वगैरे नीट करून ती पबच्या दारात पोचली. दारावर बाउन्स नावाची लेटर्स एकावर एक स्लो मोशनमध्ये आदळत होती. यावेळी काळजीपूर्वक गाडी पार्क करून ती वर गेली. लिफ्टचं दार उघडताच म्युटेड पिवळे लाईट्स, लाईव्ह बँडवर सुरू असलेल्या हिप्नो-पॉप म्युझिकच्या हलक्या लकेरी आणि कॉकटेल्सचा गोडसर वास मुरलेली हवा यांनी तिचं डोकं जरा हलकं झालं. चंदाने बसल्या टेबलवरून तिला हात केला.

ती त्यांच्याबरोबर जाऊन बसल्यावर नेहमीची चिडवचिडवी, हॉस्पिटल गॉसिप वगैरे बोलणे होईपर्यंत स्टार्टर्स आली. पिरी पिरी फ्रेंच फ्राईज, चीज पॉपर्स आणि चिकन टिक्का प्लॅटर. सकाळपासूनच्या मोठ्या शिफ्टने सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. पटापट डिशेस रिकाम्या झाल्यावर कॉकटेल्स ऑर्डर करता करता पूर्वा सगळ्यांना ओढत डान्स फ्लोरवर घेऊन गेली. सायराला नेहमीप्रमाणे त्या लहानश्या जागेत घामाघूम होऊन कसाबसा डान्स करायची इच्छा नव्हतीच. ती परत मागे येऊन बारसमोर उंच स्टूल ओढून त्यांना नाचताना बघत बसली. "मॅम युअर ऑर्डर?" "अम्म, आय डोन्ट नो. व्हॉटेव्हर यू सजेस्ट!" "आय नो व्हॉट यू विल लाईक!" म्हणत त्याने नवी शॅम्पेन बॉटल उघडली. एक उंच शॅम्पेन फ्लूट घेऊन त्यात फ्रेश ऑरेंज ज्यूस आणि शॅम्पेन 50 50 मोजून हलकेच मिसळली आणि फ्लूट तिच्याकडे सारला.

"जस्ट व्हॉट यू वॉन्ट!" तो हसला. तिनेही एक स्माईल देत फ्लूट उचलून हळूच एक घोट घेतला. एव्हाना बँडमधली स्टायलिश मुलगी माईकमध्ये बिली एलिशचं "व्हेन आय एम अवे फ्रॉम यूss आय एम हॅपीअर दॅन एssव्हर..."  तिच्या खरखरीत पण गोडसर आवाजात गात होती.

"हे! व्हॉट अ को-इंसिडन्स!" तो तिच्यामागच्या स्टूलवर होता. तिने स्टूल फिरवून मागे पाहिले. ओह, अक्सिडंट डूड! तिला काय बोलावं सुचलंच नाही. "शेवटी काय ड्रिंक बनवलं त्याने?" तो बारटेंडरकडे इशारा करत म्हणाला. ओह ह्याच्या दोन्ही गालांवर खळी पडतेय. "हम्म.. आय डोन्ट नो!" ती जरा शरमून म्हणाली. "पबमध्ये फर्स्ट टाइम?" त्याने हसत विचारले. "ऍक्चुली थर्ड! पण इथे फर्स्ट टाइम आले." ती ही जरा मोकळेपणाने बोलली. "शर्विल!" त्याने हात पुढे केला. "सायरा" तिने हात मिळवला.

"सायरा.. हम्म सुट्स यू." तो त्याचा ग्लास उचलत म्हणाला. "म्हणजे?" तिने डोळे जरा बारीक करून पाहिले. "म्हणजे गोड, चिअरफुल, क्यूट!" त्याने ग्लासच्या कडेवरून तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या तपकिरी डोळ्यात तिला काहीतरी ओळखीचं वाटलं. "थँक्स शर्विल. आय थिंक लहानपणी, आमच्या शेजारी या नावाचा एक डॉगी होता."

तो खळखळून हसला." आय होप, तो ऍट लीस्ट क्यूट असेल."

हा फ्लर्ट करतोय आता! "कमॉन दी, रिस्पॉन्ड कर यार लोकांना. किती दिवस सिंगल राहणार आहेस!" म्हणणारी नेहा तिच्या डोळ्यासमोर चमकून गेली. तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं.
"अगदीच क्यूट. छोटासा पॉम होता!"

"एह.. किमान जर्मन शेफर्ड किंवा रॉटी तरी म्हणायचं होतं!" त्याने तोंड वाकडं केलं.

"नाss तो एवढा मोठा होता" तिने हाताने फुटपट्टीएवढं अंतर दाखवलं.

"हम्म.. मेबी युअर नेम डझन्ट सूट यू आफ्टर ऑल!" यावर दोघेही आपापलं ड्रिंक उचलून हसले.

तिचा विश्वास बसत नव्हता की किती पटकन ते एकमेकांशी गप्पा मारत होते. शर्विल चार्मिंग आहे, फनी आहे, ओव्हरऑल नाइस गाय. तिने कोपऱ्यात नजर टाकली एव्हाना नाचून दमलेल्या चंदा आणि सोनाली मोहितो सिप करत बसल्या होत्या. पूर्वा घामाघूम होऊन अजूनही नाचत होती. तिने बघताच चंदाने डोळा मारत हवेत हार्ट साइन करून दाखवलं आणि सोना येय! करून ओरडली.
त्याला ऐकू नसेल गेलं पण लगेच तिची नजर फॉलो करत त्याने वळून त्यांच्या टेबलकडे पाहिलं. सोनाने मोहितोचा एक मोठा घोट घेतला आणि तिला ठसका लागला.

"डू यू वॉन्ट टू जॉईन देम?"

काय सांगावं? नाही, मला तुझ्याशी बोलायचंय, नो.. आत्ताच भेटलेल्या क्यूट माणसासाठी आपल्या फ्रेंड्सना कोण सोडतं? अशी मुलगी जी शेकडो वर्षात कुणाबरोबर डेटवर गेली नाही. सीम्स पथेटिक.

"माहीत नाही, म्हणजे मी एवढी वाईट मैत्रीण नाहीये." ती शांतपणे म्हणाली.

त्याने मान हलवली."आय नो. ऍक्चुली मीपण कोणाची तरी वाट बघतोय. वेळेवर इथे पोचायचं म्हणून घाई केली आणि तुला धडकलो."

"ओह, अ गर्ल?" याह, सटल.. सो कूल! गो सायरा!

"नो.. जस्ट एक खडूस माणूस ज्याला लोकांच्या वेळेची काही फिकीर नाही." तो मनगटावरच्या घड्याळात बघत म्हणाला.

"यू कॅन जॉईन अस."

"थँक्स पण मी आता निघणार आहे. माझी पहाटे फ्लाईट आहे."

ओह नो! हा चाललाय... तिचा चेहरा जरा गंभीर झाला.

"मेबी.. आय कुड कॉल यू समटाईम... आय हॅव युअर नंबर!"

ओह येस! ती विसरलीच होती. तिचं मोठ्ठ हसू बघून त्यालाही लागण झाली आणि तो हसायला लागला.

समोर खिडकीच्या काचेतून चंद्र जरा जास्तच मोठा दिसत होता.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १०

"सो, हिअर्स द मॅन ऑफ ऍक्शन!"

अनिशची कीबोर्डवरची बोटं थबकली आणि त्याने आवाजाच्या दिशेला पाहिले.

दारात शर्विल हाताची घडी घालून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता.

अ ओ! अनिशच्या डोक्यात प्रकाश पडला. इमर्जन्सीच्या नादात तो शर्विलला भेटायचं अगदीच विसरून गेला होता. त्याने घड्याळात पाहिलं. नऊ! शिट, ह्याला दीडेक तास वाट बघायला लागली तर.. जाम वैतागला असणार. तसं त्याच्या चेहऱ्यावर शक्यतो असे भाव कधी दिसत नाहीत, आज मी बहुतेक जास्तच केलं. तो खुर्ची ढकलून उभा राहिला.

"नो एक्स्क्यूज ब्रो! आय एम सो सॉरी. आपण आताही जाऊ शकतो, कम ऑन. मी हे नंतर संपवतो." तो टेबलकडे हात करत म्हणाला.

"डोन्ट बॉदर! मी आधीच दोन बीअर घेतल्यात, अजून प्यायलो तर फ्लाईट मिस होईल." शर्विल दारातून आत आला आणि सोफ्यावरची सर्जिकल हार्डवेअर बाजूला सरकवून पसरून बसला. दुसऱ्या कोणी त्या हार्डवेअरला स्पर्श केला असता तरी तो उचकला असता पण शर्विलवर नाही.

"सो व्हॉट इज इट? इमर्जन्सी?"

"नेहमीप्रमाणे!" तो खुर्ची सोफ्यासमोर ओढून बसला.

"बिझी डे? अजून स्क्रब्जमधेच आहेस.." शर्विल थोडा सैलावत म्हणाला.

हम्म, नेहमी सर्जरीनंतर लगेच चेंज करतो पण आज वेळच नव्हता.
"दिवस कुठे निसटून गेला कळलंच नाही. हेक्टिक शब्दही कमी पडेल." त्याने हात वर करून आळस दिला.

"नो डिटेल्स प्लीज!" शर्विलने हात जोडले.

शर्विलला कल्पना होती कारण तोही हेल्थकेअरमध्येच होता फक्त दुसऱ्या बाजूला. वडीलांच्या फ्युचरीझम बायोसायन्सेस ह्या मेडिकल इक्वीपमेंट कंपनीत डिरेक्टर होता. त्याचं काम मुख्यत्त्वे सेल्स आणि नवीन कस्टमर्स मिळवणं हे होतं.

"तू कझनशी बॉंडींगचा चांगला चान्स घालवलास. तुला सोयीचं म्हणून मी हा हॉस्पिटलजवळचा पब ठरवला होता. एकतर हल्ली आपण हार्डली कधीतरी भेटतो.." शर्विल उठून डेस्कमागे जात म्हणाला. "मी पहाटे दिल्लीला चाललोय, दोनेक महिने तिकडेच असेन." डेस्कचा सगळ्यात खालचा खण उघडून त्याने छोटासा टॉय बास्केटबॉल काढला.

"दिल्ली? का?" तो बसल्या जागेवरूनच म्हणाला.

"एक डॉक्टर गळाला लावायचाय.." शर्विलने डेस्कशेजारी फरशीवर चिकटवलेली टेपची खूण शोधली आणि खुणेवर उभा राहून बॉल दारामागच्या बास्केटकडे टाकला. रिंगला टच करून बॉल बाऊन्स झाला.

"चं!" खुर्चीतून उठून त्याने बॉल घेतला. "बिग फिश?"

"बिगेस्ट!"

त्याने पोझिशन घेतली. "नीनाच्या लग्नापर्यंत परत येशील ना?"

"अम्म, कधी आहे ते सांग एकदा परत" शर्विलने डोकं खाजवलं.

"सप्टेंबर फर्स्ट वीक." त्याने पोझिशन घेत बॉल गपकन बास्केटमध्ये टाकला. स्कोर!

"एह! झुकेगा नही स्साला! लक हां लक, बाकी काही नाही!" शर्विलने नाक वाकडं केलं.

त्याने हसून बॉल पुन्हा शर्विलकडे दिला. डिच केल्यामुळे इतना तो बनता है. "तुला यावंच लागेल. तिथे आपले सगळे रिलेटीव्हज असतील. तूच मला त्यांच्यापासून वाचवू शकतोस. एक तर तू सगळ्यांचा लाडका आहेस आणि मला ते फक्त सहन करतात. प्लीज मॅन!"

"Aww डोन्ट मेक मी ब्लश!" शर्विलने लाजणाऱ्या मुलीची ओव्हर अ‍ॅक्टिंग करत त्याच्या हातून बॉल घेतला. शूट अँड स्कोअर!

"अरे मी विचारायला विसरलोच. तू काम करत होतास ते मोठं प्रपोजल सबमिट झालं का?"

"गेल्याच महिन्यात." तो समाधानाने हसत म्हणाला.

"आणि त्याचं अप्रूवल कधी मिळेल?"

"पुढच्या सहा महिन्यात तरी मिळायला हवं." विचारानेच त्याला मस्त वाटलं, या प्रोजेक्टवर किती काय काय काम करता येईल त्याचे विचार पुन्हा त्याच्या डोक्यात फिरू लागले.

"पण तू ह्या सगळ्या लग्झरीज सोडून राहू शकशील?" शर्विलच्या चेहऱ्यावर चिंता होती.

"होईल मॅनेज!" त्याने सहज सांगितलं आणि बॉल घेतला.

त्यांचा लुटूपुटूचा गेम आता रंगात आला होता. दोघेही खऱ्या मॅचप्रमाणे स्कोर करत होते. तो पूर्ण लक्ष बास्केटवर केंद्रित करताना शर्विल काहीतरी पबमध्ये भेटलेल्या मुलीबद्दल बडबडत होता.
"टोटल बेब! सो तू न आल्यामुळे इतकं काही बिघडलं नाही उलट बरंच झालं. शी'ज स्वीट. लांब केस, थोडी बुटकी आहे पण तिला ते सूट होतं. तिने मला नंबर पण दिला पण ती अजून वेगळीच स्टोरी आहे. सायरा! नाव पण वेगळं आहे ना!"

त्याने पटकन बॉल फेकला. बास्केटपासून फूटभर लांब जाऊन बॉल बाऊन्स झाला. "एक मिनिट! ती दिसायला कशी होती? परत सांग.."

त्याने अचानक एवढा इंटरेस्ट दाखवल्यामुळे शर्विल जरा गडबडला. "पाच दोन वगैरे उंची, लांब स्ट्रेट केस आणि बोलते खूप. डोन्ट वरी, नॉट युअर टाईप!"

"हां! ते अगदी बरोबर पकडलंस. नॉट माय टाईप. कारण ती माझ्या अंडर काम करते."

"नो वे! शक्यच नाही."

"तिचे डोळे ग्रीनीश ब्लू होते का?"

"एवढं नीट दिसलं नाही, घारे होते माझ्या मते."

"चबी चीक्स. हसल्यावर एका गालाला प्रीती झिंटा टाईप खळी पडते."

"होली शिट! सायरा? ती तुझ्याबरोबर काय काम करते? नर्स?"

"माझी सर्जिकल असिस्टंट आहे."

शर्विल फुटलाच. डोळे मिटून तो जोरजोरात हसायला लागला. "नो! नो फकिंग वे!" डोळ्यातलं पाणी निपटून हसता हसता तो उद्गारला.

"युअर टर्न" त्याने बॉल शर्विलकडे दिला. त्याने बॉल सोफ्याकडे भिरकावला आणि खुर्चीत पसरून बसला. "आता मला डिटेलमध्ये सांग. लास्ट टाइम आपण बोललो तेव्हा तुझा असिस्टंट सोडून गेला होता. तू म्हणत होतास तुझ्याकडे कोणी टिकत नाही."

"डॉ. आनंद. ते रिटायर झाले आणि जाता जाता त्यांची असिस्टंट माझ्या टीममध्ये टाकून गेले."

"नो वे, यू हायर्ड हर?" शर्विलने त्याला ब्लॉक करत विचारले. तो रिलॅक्स होता. कारण जे आहे त्यापेक्षा वाढवून त्याला काही सांगायचं नव्हतं, कारण सांगण्यासारखं काही नव्हतंच. त्याचा चार्मिंग लहान चुलतभाऊ सायरामध्ये इंटरेस्ट दाखवत होता. बिग डील!

"का?"

"कारण तिचं टायमिंग परफेक्ट होतं. माझ्याकडे असिस्टंट नव्हता आणि तिच्याकडे सर्जन. इट वर्क्ड."

शर्विलच्या चेहऱ्यावर आता खोडकर हसू पसरत होतं आणि त्याला अचानक शर्विलला चोपून काढायची इच्छा झाली.

"वेल, मग आम्ही डेटिंग केलं तर तुला ऑकवर्ड नाही ना होणार?"

त्याने रोखून पाहिलं. कपाळावर आता आठ्या आल्या होत्या. त्याची चिडचिड आता वरच्या पायरीवर गेली होती. "डेटिंग? तू फक्त पाच मिनिट भेटलायस तिला."

शर्विलने खांदे उडवले. हसत तो डेस्कवरच्या काही वस्तू बघायला लागला. "राईट! पण मला तिच्याबरोबर मजा आली. काहीतरी इन्स्टंट केमिस्ट्री आहे आमच्यात. तुला कळतंय? तुला जसं एखादा नव्या मेकचा पेसमेकर बघितल्यावर वाटेल तसं. लाईक फिजिकल एक्साईटमेंट टू, यू नो?" डोळा मारत तो म्हणाला.

"फनी हां!?" त्याने शर्विलच्या खांद्यावर हलकेच गुद्दा मारला आणि खांद्यावरची पकड जरा जास्तच मजबूत केली. "त्या तुझ्या डॉक्टरकडे एक डोळा काळानिळा घेऊन कसा जाणार तू?"

"काळानिळा?" शर्विल निरागसपणाचा आव आणत म्हणाला. "आपण फक्त माझ्या होणाऱ्या गर्लफ्रेंडबद्दल बोलत होतो आणि तू मला जखमी करायची धमकी देतोयस! धिस इज नॉट यू, भाऊ!"

नॉर्मली हा कधी मला भाऊ म्हणत नाही, नक्की ह्याच्या डोक्यात काहीतरी खिचडी पकतेय. फक्त माझ्या लाडक्या बाप्पा-पाच्छीकडे बघून मी ह्याचा खून करत नाहीये.  "मी तुला वॉर्न करतोय. स्टॉप इट." तो गंभीरपणे म्हणाला.

"काय स्टॉप करू? बी स्पेसिफिक!" शर्विल पुन्हा तिरकस हसला.

अनिशने त्याच्या खांद्यावरचा हात काढला आणि डेस्कजवळ जाऊन आपल्या वस्तू नीट ठेऊ लागला. "मला माहिती आहे, तू मला त्रास द्यायला हे सगळं मुद्दाम करतोयस. मी तुला ताटकळत ठेवल्याचा बदला. ओके फाईन, नाऊ लीव्ह हर आउट ऑफ इट."

शर्विलने भुवया उंचावल्या, "हाहा, एक म्हणजे असं काहीही नाहीये. मला एक सुंदर मुलगी भेटली, आम्ही बोललो, क्लिक झालो. तर माझ्यासाठी खुश होण्याऐवजी तू मलाच धमकी देतोयस. इंटरेस्टिंग! है ना? दुसरं म्हणजे मी शुभदाला डेट केलं तरी तू असाच रिऍक्ट होशील?"

त्याने फक्त एक जळजळीत कटाक्ष टाकला.

"राईट, ती बरी वागते माझ्याशी. मग एखादी नर्स?"

"स्टॉप इट."

"नाही, मला क्लीअर करायचंय. तुझ्या कुठल्याही एम्प्लॉईबद्दल तू असाच वागशील की हे फक्त सायराबद्दल आहे."

"यू आर बीइंग ऍन ए-होल! ड्रॉप इट."

"ओके फाईन." शर्विलने हात वर केले. "यापुढे सायराबद्दलच्या गोष्टी मी तुला सांगायला येणार नाही."

शर्विलचे बारीकसारीक गेम्स मी अंगाला लावून घेत नाही. चार वर्षांनी लहान असला तरी देवाने त्याला मला त्रास द्यायच्या कामगिरीवरच पाठवलंय. त्याला वाटतंय तो मला फार पिडतोय पण मला काहीही वाटत नाहीये. फाईन. डेट हर. हू केअर्स! त्याने विचारांमध्येच लॅपटॉप मिटून बॅगमध्ये ठेवला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ११

दोन दिवसांनी...

अनिश राऊंडला निघणार इतक्यात मेसेंजर पिंग झाला. त्याने खिशातून सेलफोन काढून पाहिला तर शर्विल! चॅटचा स्क्रीनशॉट!

***
Sh: Hey, this is Sharvil.
Sh: Human from the pub, not your neighbor's dog.
S: Ha! I got confused for a second. How are you, human?
Sh: Good, landed in Delhi. It's so cold here.

त्याने कॅबच्या बाहेर हूड ओढून कुडकुडताना फोटो पाठवला होता.

S: oh no, bichara!

***

शर्विलला हे भारी वाटलं असावं, त्याने उत्साहात अनिशला पुढे मेसेज लिहिला होता.

Sh: Aww, she cares!

अनिशने लगेच रिप्लाय टाईप केला.
A: Not considering how long she took to reply to you, odd! Cause she had an off yesterday. What was the excuse?

Sh: May be she's not a slave to her cellphone like other girls.

अनिश अजून वेळ न घालवता राउंडवर निघाला. तरीही काही वेळात पुन्हा मेसेज आलाच.

Sh: Just to be clear, I know more about women than you do.

A: Okay.

Sh: Just look at our past relationships!

A: OK

त्याच्या बारीक बारीक रिप्लायमुळे शर्विलचा फ्यूज उडाला बहुतेक. लगेच त्याचा मेसेज आला.
Sh: In fact, I think we both are really compatible. I am asking her out when I get back.

त्याने काहीच उत्तर न देता आपला दिनक्रम सुरू ठेवला. तो राऊंडवरून आला तेव्हा आठ वाजले होते, सर्जरी दहाला शेड्यूल्ड होती. कॉरिडॉरमधून येतानाच त्याला त्याच्या केबिनच्या भिंतीला टेकून थांबलेली सायरा दिसली. हातात कॉफी आणि एक टपरवेअरचा डबा बॅलन्स करत थांबलेली. ही इथे काय करतेय म्हणून त्याने आजूबाजूला पाहिले. पण नाही, ती त्याच्याच दारापाशी थांबली होती. "वेटिंग फॉर मी?" त्याने जरा जवळ पोचताच विचारलं. ती लगेच नीट उभी राहिली. "येस! गुड मॉर्निंग!" तिच्या नाकाचा शेंडा आणि गाल वाऱ्याने लाल झाले होते. ओलसर रेनी जॅकेटची झिप गळ्यापर्यंत लावलेली होती. एवढ्यात त्याला हवेत पसरणारा फणसाच्या सांदणाचा वेगळाच गोडसर वास जाणवला आणि तोंडाला पाणी सुटलं.

तो हातात किल्ली धरून तसाच उभा होता.

ती बाजूला झाली नाही. तिची नजर त्याच्या छातीपासून वर चेहरा आणि डोळ्यांपर्यंत जाऊन थांबली. डोळ्यात बघायला तिला मान जरा वर करावी लागत होती. तिच्याइतकंच तोही तिला निरखत असणार कारण ती लगेच म्हणाली, "तुम्ही कसली वाट बघताय?" तो ओठ वाकडा करून तिरकस हसला. "तू माझं दार ब्लॉक करून उभी आहेस."

ओह! ती खजिल होत पटकन बाजूला झाली. "सॉरी, मला कॉफीची खूप गरज आहे."

"हे काय आहे? स्मेल्स गुड!" त्याने डब्याकडे बोट दाखवत विचारले.

"हे.. म्हणजे हा ब्राईब आहे." ती खांदे उडवत म्हणाली.

त्याने लॉक उघडलं आणि थांबून तिच्याकडे बघून एक भुवई उंचावली. "ब्राईब?"

तिने हसू येऊ नये म्हणून खालचा ओठ किंचित चावत उत्तर दिलं. "हम्म, फणसाचा सांदण. शुभदा म्हणाली तुम्हाला आवडतं. काल मला सुट्टी होती म्हणून केलं."

हम्म.

इंटरेस्टिंग.

कालचा दिवस हिने शर्विलला टेक्स्ट करत घालवायला हवा होता, पण हिने तर माझ्यासाठी सांदण तयार केलंय!

"हे तू गुरुवारी लेट आल्याबद्दल आहे का?" त्याने गंभीर रहात विचारले.

"एक्झॅक्टली. आय एम रिअली सॉरी. मला यापूर्वी कधीच उशीर झाला नव्हता आणि पुन्हा कधीही मी उशीर होऊ देणार नाही. मी माफी मागणं पुरेसं वाटलं नाही म्हणून तुम्हाला थोडा मस्का मारायचा होता." तिने हातातल्या डब्याकडे आणि त्याच्याकडे बघितलं.

त्याला जाणवून द्यायला डब्याचं झाकण अर्धवट उघडून दाखवलं. डॅम! धिस स्मेल्स गुड! तो सुगंध त्याला उन्हाळी सुट्ट्या आणि आज्जीच्या धुरकट, गोडसर, खमंग वासाच्या स्वयंपाकघरात घेऊन गेला.

त्याला अचानक जाणवलं की तिचं असं वागणं त्याच्या बाकी असिस्टंटसपेक्षा किती निराळं होतं. सुबोध त्याला काही सांगायला येतानाच हातपाय थरथरत यायचा. निम्म्या लोकांची त्याच्याशी बोलायचीच हिम्मत नव्हती आणि निम्मे काय ते पटकन बोलून तिथून पळ काढायचे. ASAP.

पण सायरा खूप कॉन्फिडंट आहे, आताही ती आत येऊन केबिनचं निरीक्षण करत होती, अचानक ती हसली. त्याने ती कुठे बघतेय ते पाहिलं, सोफ्याच्या पायाशी टेकलेला टॉय बास्केटबॉल! ओह, हा उचलायचा राहिलाच.

तिच्या नजरेला नजर देणे टाळत तो उगीच डेस्कवरच्या फाईल्स चाळू लागला. ती अजून स्क्रब्जमध्ये नाहीये, तिची ब्लॅक स्किनी जीन्स क्यूट दिसतेय आणि ते यलो जॅकेट. तिचे लांब केस पोनिटेलमध्ये आहेत.

शर्विल बरोबर होता. शी'ज नॉट माय टाईप.

ही गोष्ट त्याला स्वतःला सांगावी लागतेय ह्याचा राग आला.

"ब्राईबची काही गरज नाही." तो अचानक म्हणाला. त्याला तिला सरळच सांगायचं होतं. "माझ्याबरोबर काम करण्यासाठी, एक चांगली टीममेट होण्यासाठी तू मला आवडणं गरजेचं नाहीये. ना तू माझ्यासाठी काही स्वीट्स वगैरे बनवणं. फक्त शार्प वेळेवर येणं आणि परफेक्ट काम करणं एवढंच पुरेसं आहे. हाऊ अबाउट दॅट?"

"बट आय वॉन्टेड यू टू लाईक मी.." ती काय बोलायचं न सुचून म्हणाली.

त्याने खांदे उडवले."तसं बघायला गेलं तर इथलं कोणीच मला आवडत नाही, शुभदा सोडता. तेही फक्त आम्ही एकमेकांचा आदर करतो, आवड नाही."

"म्हणजे तुम्हाला कोणी आवडण्यापेक्षा त्याचा आदर करणं जास्त महत्त्वाचं आहे."

त्याने फाईलमधून डोकं बाहेर काढून तिच्याकडे पाहिलं. ती डोळे बारीक करून त्याचंच निरीक्षण करत होती.

ही एवढीशी मुलगी माझ्याच केबीनमध्ये मलाच ग्रिल करतेय! त्याला सहन झालं नाही.

"येस."

ती अचानक हसली. "सो देअर्स नो होप फॉर अस, फॉर बीइंग फ्रेंडली."

तिने त्याला चिडवलं आणि तेवढ्या वेळात त्याच्या आत काहीतरी जरा मऊ, काहीतरी भावना निर्माण झाली. त्याचं थंडगार, मेलेलं हृदय अजून पूर्ण मेलं नव्हतं तर...

"नो. देअर्स नो होप."

सो त्याने लॉजिकल कृती करत ती भावना दूर लोटली.

नो. नो होप. नॉट ऍज फ्रेंड्स, नॉट एनिथिंग मोर. हे स्वतःलाच सांगावं लागतंय याचं त्याला वैषम्य वाटत होतं. जर शर्विलने तिला आणून त्याच्याशी जोडलं नसतं तर त्याला तिची जाणीवही झाली नसती. हे असे भंकस विचार मनात येणं ही सगळी शर्विलची चूक आहे.

तिने मान हलवली. चक्क तिच्या चेहऱ्यावर सुटका झाल्यासारखे भाव होते. ती अजिबात अपसेट दिसत नव्हती. "ओके!" तिने डब्याचं झाकण लावलं. "मी स्टाफ लाऊंजमध्ये नेऊन हे वाटून टाकते. सी यू इन द सर्जरी."

ती वळून दार लावत बाहेर पडली.

आणि सांदणाचा डबाही बरोबर घेऊन गेली.

---

किती वेळ फुकट घालवला! काल केवढी मेहनत घेऊन तिने सांदण केलं तिलाच माहिती होतं. तांदुळाचा रवा करण्यापासून, अक्खा नारळ फोडून त्याचं दूध काढणं आणि रसाळ गरे ताटलीत घासून घासून रस काढणं काय सोपं काम होतं! शेवटी आज पहाटे उठून जुन्या मोदकपात्रात हीट ऍडजस्ट करत, घामाघूम होऊन, न जाळता ते परफेक्ट सांदण बाहेर काढणं. ऊफ!

एनिवे, स्वयंपाक ही सिच्युएशन कंट्रोल करायची तिची पद्धत होती. आजच्या सर्जरीची प्रत्येक स्टेप पाठ करून झाली तरीही तिला काळजी वाटत होती. पहाटे तिने अर्ध्या अर्ध्या तासाचे तीन अलार्म लावले होते. कपडे इस्त्री करून बाहेर काढून ठेवले होते. सांदण झाल्या झाल्या ती पटापट तयार होऊन पंधरा मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोचली होती. तिला तिचं सेकंड इम्प्रेशन तरी खास व्हायला हवं होतं आणि ते होण्याचा कॉन्फिडन्ससुद्धा होता. फक्त डॉ. पैंच्या रिकाम्या केबिनपाशी पोहोचेपर्यंत. आणि तिथून सगळंच मुसळ केरात!

स्टाफ लाऊंजमध्ये जाताच तिने डबा टेबलवर आदळला. सुरीने तो सांदणाचा स्लॅब भोसकून काढायची प्रबळ इच्छा तिने दाबून टाकली. "ऊहह... तुमने स्वीट लाया?" खुर्चीतून उठत नॅन्सी नर्स तिच्या जवळ आली. तिने येस म्हटल्यावर नॅन्सीने लगेच स्वीट्स स्वीट्स म्हणून आरडा ओरड करून गर्दी जमवून ते संपवूनही टाकलं. सगळ्यांचे आह, ऊह आणि कॉम्प्लिमेंट्स ऐकूनही तिला फार आनंदी वाटत नव्हतं. हे सगळं डॉ. पै नी करायला हवं होतं.

तू मला आवडणं गरजेचं नाही.

असं कोण बोलतं!? एक सायकोपॅथ!
प्रत्येकाला वाटतं, लोकांना आपण आवडावं म्हणून. त्यांनाही नक्कीच वाटत असणार.

आय नो!

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १२

डॉ. पै ओटीच्या दारातून आत येईपर्यंत तिला पुन्हा दिसले नव्हते. आत येताच त्यांनी ऍनेस्थेशियाचा स्टेटस बघून पुढे येताना नर्सला काही सूचना दिल्या आणि सरळ तिच्या दिशेने आले. ती हातात एप्रन धरून तयारच होती. तिने डोक्यावर नीट चापूनचोपून हॉट पिंक स्क्रब कॅप घातली होती. मागच्या वेळी तिला इतका वेळ मिळाला नव्हता. त्यांनी एप्रनमध्ये हात घालता घालता तिच्या डोक्याकडे बघून मान हलवली.

"काय?" तिच्या तोंडून निघालंच.

"काही नाही."

हम्म पिंक आवडत नाही बहुतेक. देव करो याला प्रिन्सेस आवडणारी मुलगी होवो! मग बघू.

तिने पाठीवरच्या नाड्या बांधायला घेतल्या. मागच्या वेळप्रमाणेच ह्या कृतीत वाटायला हवी त्यापेक्षा जास्त जवळीक वाटतेय. तिने अलगद त्याच्या पाठीला स्पर्श न होण्याची काळजी घेत गाठ बांधली. आज तिला रडवायला दुसरा कोणी सर्जन नव्हता. ती स्क्रब होऊन डॉ. पैच्या समोर पोझिशन घेऊन थांबली. मागच्या वेळी शेजारी उभी असल्याने तिला त्याची प्रत्येक हालचाल जाणवत होती. कामात असताना त्याला चुकून धक्का लागू नये म्हणून तिला बरीच काळजी घ्यावी लागली होती. आज समोरून चांगला व्ह्यू मिळत होता.

ओह गॉड, हा माणूस ह्या कपड्यातदेखिल एवढा हंक का दिसतो? त्याचे चमकते वितळलेल्या चॉकलेटसारखे डोळे, मास्कमागे लपलेलं सरळ नाक, नेव्ही कॅपमागून किंचित दिसणारे रेशमी केस. ओटीच्या प्रखर उजेडात त्याचा गव्हाळ वर्ण चमकत होता. तिच्या हृदयाचा चुराडा होणार तोच तो नर्सला काहीतरी ओरडला. हुं! ती भानावर आली. समोर कोणी हिरो नव्हे तर चालता बोलता रोबो उभा होता. त्याच्या स्क्रब्जखाली हृदय आहे की नाही याचीही तिला शंका होती.

अचानक त्याची नजर तिच्यावर रोखलेली दिसली. "आर यू पेइंग अटेन्शन?"

"येस" ती खोटं बोलत नव्हती. त्याच्यावर लक्ष असलं तरी टेक्निकली लक्ष तो करत असलेल्या कामावरच होतं. फक्त तिला त्याच्यासारख्या लक्ष विचलित करणाऱ्या हंकबरोबर कामाची सवय करून घ्यायला हवी होती.

"ओके. व्हॉट विल बी माय नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट?" त्याने एकदम वर्गात बोलताना पकडून खडू मारणाऱ्या शिक्षकासारखं विचारलं.

ती मास्कआडून दूध मटकावलेल्या मांजरीसारखी हसली. "फिनोशिएटो रिब स्प्रेडर 75 mm."

त्याला बसलेला सुखद धक्का चेहऱ्यावर दिसू न देण्याची चांगलीच प्रॅक्टिस होती तरीही तिने शपथेवर सांगितलं असतं की तिने त्याच्या मनात बारीकसा तरी आदर मिळवलाय. तिला नाचत सगळ्यांना हाय फाईव्ह देण्याची तीव्र इच्छा झाली. पण तिने गंभीरपणे रिब स्प्रेडर पुढे केला. तिला त्याचे शब्द लक्षात होते. वेळेवर येऊन काम व्यवस्थित करणे. बस्स. त्याचा आदर मिळवणं जास्त गरजेचं आहे.

तरीही एक गोष्ट तिला अजूनही टोचत होती. स्प्रेडर नीट बसवून झाल्यावर तिने हळूच कुजबुजत विचारलं. "मला एक गोष्ट विचारायची होती. गेल्या वेळी मी एवढा उशीर केल्यावर तुम्ही मला फायर का नाही केलं? तुम्ही स्पष्टपणे फक्त एक चान्स म्हणाला होता." क्षणभर शांतता पसरली, त्याचं काम सुरू होतं. आजूबाजूचा व्हाईट नॉईज, मशिन्सची बीप बीप, आजूबाजूच्या लोकांची आपसातील कुजबूज सगळं ऐकू येत होतं. "तू जास्त विचार करतेयस." शेवटी एकदाचा तो म्हणाला. "मला एक साईज मोठी क्युरेट पास कर. आहे ना?"

तिने शोधून त्याच्या हातात दिली. "खरंच?"

त्याने आधीची क्युरेट तिला परत केली. "तुला चांगलं रेकमेंडेशन होतं आणि मला असिस्टंटची गरज होती." तो क्युरेट वापरत म्हणाला. "बाकी काही ऑप्शन नव्हता. आता हे चिटचॅट पुरे. कामाकडे लक्ष दे." तो खाली कापल्या जाणाऱ्या टिश्यूकडे बारकाईने बघत म्हणाला.

काहीही, ह्याला इतका अनुभव आणि हातांना सवय आहे की खाली न बघतासुद्धा सहज ऑपरेट करेल. त्याला बोलायचंच नाहीये. माझं तोंड बंद करायला उगा गरज नसताना फोकस करायचं नाटक करतोय. तिने मास्कमध्ये नाक मुरडलं.

फाईन!

तिने उरलेली सर्जरी हात चालू, तोंड बंद ठेऊन त्याचा विचार करत घालवली. कोणी आवडण्यापेक्षा त्याचा आदर वाटायला हवा आणि हे त्याला स्वतःलाही ऍप्लिकेबल आहे. लोक त्याला घाबरून रहायला हवेत. किती दुःखी, एकाकी आहे असं आयुष्य! नक्की याच्यामागे काहीतरी डिफेन्स मेकॅनिझम आहे. हे शोधायच्या मागे लागायची काही गरज नव्हती पण तिला राहवत नव्हतं. त्याने केबिनमध्ये तिला स्पष्टपणे सांगितलं होतं पण ती तो मुद्दा सोडायला तयार नव्हती. तिने एरवी लक्ष दिलं नसतं पण त्याने चक्क तिचं सांदण अव्हेरलं होतं! आता ती शोध लावणारच होती. शुभदाला नक्की माहिती असेल!

सर्जरी संपल्यावर कपडे बदलून ती शुभदाच्या डेस्ककडे आली. शुभदा नाही! ओह लंच टाइम आहे. ती पटापट लाऊंजकडे गेली. शुभदा नेहमीप्रमाणे टेबलवर तिचा डबा उघडून फेमिनाची पानं उलटत एकेक घास घेत होती. "व्वा, टॅमरीन्ड राईस!" सायरा तिच्या शेजारची खुर्ची ओढून बसली. "ले लो.. देको इदर मुरुक्कू बी हय" दुसरा प्लास्टिकचा डबा दाखवत शुभदाने एक चमचा तिच्याकडे सरकवला. "अरे नही नही, आप खाओ." म्हणत जनरल हाय हॅलो करून झाल्यावर ती मुद्द्यावर आली. "डॉ. पै के साथ आप कबसे काम कर रही हो?"

"जबसे उसने इदर जॉईन किया तबसे. उसके पहले मैं मेन रिसेप्शनपे थी." शुभदाने खाता खाता उत्तर दिले. "आय एम द ओन्ली वन हू कॅन वर्क विथ हिम!"

"तो आप भी मानती हो ना उनके साथ काम करना कितना डिफीकल्ट है!"

शुभदाने फक्त मान हलवली.

"लेकीन मुझे लगता है की ये सब दिखावा है, रिअल लाईफ मे वो इतने बुरे नहीं हो सकते." तिने खडा टाकून पाहिला.

"द हार्डर द शेल, द सॉफ्टर द कोअर!" शुभदा थांबून किंचित हसली.

वाह! चक्क शुभदा इतकी कवीमनाची असेलसं कधी वाटलं नाही. हे तर एखाद्या पोस्टरवर लावण्यासारखं वाक्य आहे. तेवढ्यात तिचं शुभदाच्या हातातल्या फेमिनाच्या कव्हर पेजवर लक्ष गेलं. तिथे शहाळे पिणारी बिकिनीअलंकृत सुंदरीसुद्धा हेच म्हणत होती!

मरो!

"सो यू थिंक ही इज सॉफ्ट इन द हार्ट, हां?"

"ऍबसोल्युटली! होनाही चाहीये. इन बच्चोंके लिये वो डे अँड नाईट कितना एफर्ट लेता है, उपर से उनके हायपर पेरेन्ट्स को हँडल करो. ग्रॅंट मिलने के लिए भी उसने बहोत मेहनत किया है." शुभदा पाणी प्यायचं थांबवत म्हणाली.

"ग्रँट?"

शुभदा गप्प झाली."वो तुम उनकोही पुछो. आय डोन्ट नो द डिटेल्स." शुभदाने डबा संपवलेला बघून ती उठली आणि थँक्स म्हणून जेवायला गेली. प्लेट हातात घेऊन बुफेच्या रांगेतही ती त्याचा विचार करत होती. ते आठवड्याला साधारण चार सर्जरीज करतात म्हणजे आतापर्यंत शेकडो मुलांना त्यांनी वाचवलंय. त्यातल्या ट्रस्टकडून केल्या जाणाऱ्या सर्जरीसाठी ते स्वतःची फीपण घेत नाहीत.  सो, ही कान्ट बी ऑल बॅड. सगळे म्हणतात एवढे व्हीलन तर नक्कीच नाही.

तिने भरलेलं ताट टेबलावर ठेवलं आणि खिशातून फोन बाहेर काढून सायलेंट मोड ऑफ केला. ओह, शर्विलचा टेक्स्ट!

Sh: Hey, what's up?

मेसेज येऊन दोन तीन तास झाले होते. हम्म सर्जरी सुरू असणार तेव्हा. रिप्लायला इतका उशीर झाल्याचं तिला थोडं वाईट वाटलं.

S: Just got off surgery, sorry. I am good but exhausted.

Sh: I know. These surgeons run you guys into ground.

S: It's not that bad. I like my job.

Sh: So how's your doctor? Is he good?

हाहा! ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून डॉ. पैंबद्दल तिच्या सगळ्या भावना तिने लिहून काढायच्या ठरवल्या तर तिची बोटं गळून पडतील. शेवटी निबंध न लिहिता तिने थोडक्यात उत्तर लिहिले.

S: I am still thinking. I liked my old doctor a lot but he retired. This new guy will be ok once we match our rhythm.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १३

संध्याकाळी घरी पोचल्यावरही तिचे शर्विलबरोबर टेक्स्ट्स सुरूच होते. तो तिच्यात इंटरेस्ट घेतोय हे दिसतच होतं पण ती अजून त्या पायरीवर पोचली नव्हती. त्याला दिल्लीहून यायला किती दिवस लागतील याचा काही अंदाज नव्हता, पण तो परत आला तरी डेटिंग वगैरे करायला ती मनाने अजून तितकीशी तयार नव्हती. कपडे इस्त्री करताना तिच्या फोनवर accident guy नाव ब्लिंक झालेलं नेहाने पाहिलं. झालं! ह्या सासूला स ग ळी इत्यंभूत माहिती द्यावीच लागली. 

"अग पण नको का म्हणतेस? यू आर सोss सिंगल! तुला झीरो बॉयफ्रेंड्स आहेत, झीरो!!" नेहा जीन्स फोल्ड करताकरता म्हणाली.

"आय नो.. पण.." काय एक्स्प्लेन करायचं ते तिचं तिलाच समजत नव्हतं. शर्विल सगळ्या गोष्टी टिकमार्क करतोय पण तिचं हृदय धडधडत नाहीये, त्याचा मेसेज आल्यावर नाव दिसलं की उत्सुकतेने तिचे डोळे चमकत नाहीयेत. "काय माहीत.. मी जेवणाची तयारी करायला घेते." ती खुर्ची सरकवून उठली.

"पण तू त्याला रिप्लाय केलाच नाहीस..." नेहा तिचा फोन उंचावून दाखवत ओरडली.

आह, हे असं व्हर्च्युअल गप्पा मारणं किती बोर आहे. नेहा आणि तिच्या फ्रेंड्सना काय मजा वाटते कुणास ठाऊक! "नेहा, प्लीज तू रिप्लाय कर ना. फक्त मी जास्त डेस्पो दिसणार नाही एवढी काळजी घे."

"थांब डझनभर हार्ट आईजच टाकते!" नेहाने मान वाकडी करत म्हणल्यावर तिने मान वळवून डोळे वटारले. "किडींग!!" नेहा पटापट टाईप करू लागल्यावर तिने कांदा चिरायला घेतला. शर्विल रात्री तिचे काय प्लॅन्स आहेत विचारत होता. तिने काहीतरी व्हेग उत्तर लिहायला सांगितले. तिच्या अस्तित्त्वात नसलेल्या सोशल/नाईट लाईफबद्दल त्याला कळायला नको. "मी त्याला सांगितलं, आय एम हिटींग द टाऊन विथ माय गर्ल्स अँड पेंटिंग द टाऊन रेड! पेंटिंग द टाऊन रेड म्हणजे काय ग एक्झॅक्टली?" नेहा म्हणाली.

"नेहाsss"

नेहा तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमधून वाचत होती. " तो म्हणतोय, तो हॉटेलची रूम सर्व्हिस घेऊन एकटा जेवतोय. ऑ... बिचारा."

आयतं जेवण आणि आयती साफसफाई! मला हे कधीही द्या! ती किंचित हसली.

थोड्या वेळाने तिच्या फोनवर इनकमिंग इमेलची बारीक शिट्टी वाजली. "डॉ. पै कोण आहेत?" नेहाने विचारलं.

तिच्या पोटात गपकन खड्डा पडला. "काय?" किसताना हातातला चीज ब्लॉक खाली टाकत ती ओरडलीच.

"ओह माय गॉड, तेच डॉक्टर! वेबसाईटवरचे!" नेहाची ट्यूब पेटली.

ती ओट्यापासून पळत दोन सेकंदात हॉलमध्ये पोचली आणि नेहाच्या हातून फोन हिसकावला. "ऑss माझं बोट.." नेहा दुखऱ्या बोटावर फुंकर घालत किंचाळली. धडधडून तिचं हृदय बाहेर येईल की काय अशी स्थिती होती. तिच्या हातावरचं चीज स्क्रीनवर पसरून स्क्रीन ब्लर झाली होती. हॉस्पिटलबाहेर मला इमेल? मेबी ही इज ट्राइंग टू बी फ्रेंडली. तिने थरथरत्या हाताने मेल उघडली. नेहा हे बघतच होती. तिने मेल वाचली आणि फुस्स! फुग्यातली हवाच गेली. शनिवारच्या सर्जरीची वेळ अर्धा तास पुढे ढकलली होती. मेलसुद्धा तिला पर्सनली न पाठवता सगळे सतराशे साठ लोक सीसीमध्ये होते.

"काय आहे?" नेहा रुमालात बर्फाचा खडा घेऊन बोट शेकवत पुढे आली. "विशेष काही नाही... आय काईण्ड ऑफ वर्क फॉर हिम. आऊच!" ती बोलतानाच बर्फाचा खडा तिच्या दंडावर बसला. "हो? कधीपासून?" नेहाने मुद्दाम गंभीर चेहरा ठेवत विचारले. खाली पडलेला बर्फ उचलून तिने पुन्हा मारायच्या आत सायराने उचलला. "पंधरा दिवस झाले. पण हे अजून नवीन आहे, मी त्या टीममध्ये टिकेनसं वाटत नाही." तिने मला काही फरक पडत नाही असं नाटक करत सांगितलं.

"आणि ही इमेल?"

"काही नाही, वर्क स्टफ!"

"पण तुला काहीतरी वेगळं पर्सनल असेल असं वाटलं, हो ना? माझ्या बोटाचा ऑलमोस्ट तुकडा पाडलास तू!" नेहा डोळे बारीक करून तिच्याकडे बघत म्हणाली.

तेवढ्यात शर्विलचा मेसेज वाजला. हुश्श म्हणत तिने नेहाला तिकडे डायव्हर्ट केले. नेहा मेसेज टाईप करायला लागल्यावर तिने आत जाऊन चीज किसायचे काम पुन्हा सुरू केले. पिझा अव्हनमध्ये सारून तिने हात धुतले. ओट्याला टेकून हात पुसता पुसता तिच्या डोक्यात प्रकाश पडला. शर्विलचा मेसेज आणि डॉ. पैंची इमेल. दोन्हीला तिचा रिस्पॉन्स किती वेगळा होता. इमेलच्या नादात अति एक्साइटमेंट मध्ये तिने नेहाचं बोट मुरगळलं होतं.

आय नो. हे सगळं आमच्यात असलेल्या चिडचिडीमुळे असणार. आमची वर्किंग रिलेशनशिप म्हणजे उकळता ज्वालामुखी आहे. ते मला कसंबसं सहन करतात. एवढंच नाही तर त्यांनी आमच्यात एक मोठी भिंत उभी करून ठेवलीय की मी प्रयत्न करूनही फ्रेंडली वागू नाही शकत. पण ती भिंत पाडायचा अजूनच प्रयत्न करते. काहीही सायरा, ग्रो अप. ही'ज जस्ट युअर बॉस! पण मला डॉ. आनंद इमेल करायचे तेव्हा असं काही वाटत नव्हतं. अर्थात तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मी त्यांची फेवरीट बच्ची होते. ही वॉज नाइस टू मी. सर्जरीमध्ये ते बोलायचे आणि कायम माझी चौकशी करायचे. कधीतरी म्युझिक कुठलं लावायचं यावरून वाद घालायचे.

डॉ. पैंबरोबर सर्जरीमध्ये कॅज्युअली गप्पा मारायचा मी विचारही नाही करू शकत. म्युझिक लावणं तर लांबच.

"शर्विल तुझ्यात जामच इंटरेस्टेड दिसतोय." अचानक नेहा म्हणाली आणि ती भानावर आली. नेहा तिचा मूड हलका करू पहात होती. ओह, मला मूड हलका करायची तरी का गरज पडावी? हू इज डॉ. पै? मी कशाला काळजी करतेय. काही दिवसांपूर्वी मला ते सहन होत नव्हते आणि आता मी अपसेट आहे की ते मला नोटीस करत नाहीत आणि माझ्याशी फ्रेंडली वागत नाहीत. कश्याला! आय डोन्ट वॉन्ट टू बी हिज फ्रेंड! तिने स्वतःला चिमटा काढला.

ह्या सगळ्याचं एक्स्प्लनेशन एवढंच आहे की आय जस्ट वॉन्ट हिम टू लाईक मी. लाईक डॉ. आनंद डिड. दॅट्स ऑल. मला एक हातोडा घेऊन त्या नाईट किंगच्या आजूबाजूचा बर्फ हळूहळू एकेक टवका फोडून काढायचाय जोपर्यंत ते डोळे उघडून म्हणत नाहीत, ओह सायरा? शी'ज नॉट बॅड. हम्म, हा प्लॅन चांगला आहे. जोरदार कामाला लागायला हवं. गो सायरा!

----

पुढचे जवळपास तीन महिने ती जिवापाड मेहनत करत होती. अगदी मॉडेल एम्प्लॉयी. रोज शिफ्टला वेळेआधी हजर असणे, प्रत्येक सर्जरीआधी सगळ्या स्टेप्स समजून पाठ करणे, कामात जीव ओतून, पूर्ण लक्ष देऊन काम करणे, सगळ्यांशी आदराने आणि नम्रपणे वागणे आणि नवीन गोष्टी शिकून घेणे हे सगळं ती अगदी बिनचूकपणे करत होती. नर्सेस तिला सारखं सांगत होत्या की आता सर्जरीज किती सरळ, विना अडथळा आणि बऱ्याच कमी वेळात होत आहेत. डॉ. पैंची टीम इतकी फ्लॉलेस याआधी कधीच नव्हती. डॉ. पैंकडून आदर मिळवण्यासाठी तिने अक्षरशः जीवाचं रान केलं होतं. सगळेजण हे नोटीस करत होते, फक्त डॉ. पै सोडून.

उलट त्यांचा तिच्याबद्दल ऍटीट्यूड अजूनच कडक झाला होता.

तो विनाकारण तिच्यावर चिडचिड करत होता. प्रत्येक बारीकश्या चुकीवरही ओरडत होता, अगदी तिने एखादं इन्स्ट्रुमेंट द्यायला किंचित उशीर झाला किंवा त्याने प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायला जराही वेळ लागला किंवा तिने अगदी लांबलचक सर्जरीत बाथरूम ब्रेक मागायची हिंमत केली तरीही त्याचा पारा चटकन चढत होता. सगळे सर्जन्स असा ब्रेक देतात, इव्हन काहीजण असिस्टंट बदलतातसुद्धा.

OT च्या बाहेर तो कधी दिसतच नाही. ती स्क्रब बदलून बाहेर येईपर्यंत तो गेलेला असतो. कॉरिडॉर मध्ये दिसला नाही तर त्याच्या केबिनमध्ये असतो जिथे शुभदा "डोन्ट डिस्टर्ब हिम" म्हणत जाऊ देत नाही. आजही शुभदा "ऐसा मैने उस्को कब्बी नई देखा. इट सीम्स समथिंग इज गोइंग ऑन इन हिज पर्सनल लाईफ."  असंच म्हणत होती.

पण आज तिला शुभदाचा सल्ला नको होता. ती आता हे सहन करू शकत नव्हती. रोज सर्जरीमध्ये त्याच्या समोर सात आठ तास उभं राहून नीट काम करूनसुद्धा त्याचा असा ऍटीट्यूड सहन करण्यासारखं तिने काहीच चुकीचं केलं नव्हतं.

तिचं काम अचूक होतं. ती वेळच्यावेळी येत होती.  त्याने न बोलणं, प्रोफेशनल वागणं मान्य, त्याला फ्रेंडली वागायचं नव्हतं तेही मान्य पण याचा अर्थ त्याने अख्या टीममध्ये मुद्दाम फक्त तिच्याशी इतकं रूड वागावं असं नव्हे.

ती शुभदाच्या डेस्कसमोरून पुढे जाऊन त्याच्या दारावर नॉक करून थांबली. दार बंदच होतं. तिने दाराला कान लावून कानोसा घेतला, फोनही चालू नव्हता. तिने पुन्हा नॉक केलं. "डॉ. पै, मे आय हॅव अ वर्ड प्लीज?" ती शांतपणे पण मोठ्याने म्हणाली. आतून खुर्ची सरकवण्याच्या आवाज आणि मागोमाग पायरव. दार उघडलं. त्याने तिच्याकडे थंड नजरेने बघितलं. स्क्रब्जच्या जागी आता स्लेट ब्लू शर्ट आणि ब्लॅक ट्रावझर्स आल्या होत्या. ते परफेक्ट सिल्की केस बऱ्याचदा हात फिरवल्यासारखे अस्ताव्यस्त होते. तरीही तिने बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून फोकस एकाच गोष्टीवर ठेवला, मला याचा किती राग येतोय!

"येस?" त्याने भुवई उंचावली.

तिने न घाबरता हनुवटी उंचावून त्याच्या नजरेला नजर दिली. "मला माझ्या जॉब परफॉर्मन्सबद्दल बोलायचंय."

"म्हणजे?" त्याच्या भुवया जवळ आल्या.

"हो, म्हणजे तुम्हाला माझ्याकडून अजून काय एक्सपेक्ट आहे? शिफ्टला अजून लवकर येणं, अजून फास्ट रिस्पॉन्स टाइम, अजून मोठा ब्लॅडर की अजून काही?"

तिच्या तिरकस बोलण्याची त्याला मजा वाटली नाही.

"तुझं काम चाललंय तसं ठीक आहे." तो मागे सरकून दार लावू लागला तेवढ्यात तिने दारात पाय घातला. "माझं काम चांगलं आहे तर तुम्ही माझ्याशी इतकं वाईट का वागताय? पहिल्या दिवशी उशीर केल्याबद्दल मला अजून माफ केलं नाहीये का? कारण ही अपॉर्च्युनिटी मी किती सिरियसली घेते हे मी माझ्या कामातून तुम्हाला दाखवलंय."

त्याने तिच्या दारात अडकलेल्या स्नीकरकडे पाहून पुन्हा वर पाहिलं. "सायरा! तुला HR कडे जाऊन चार फॉर्म भरायची इच्छा आहे का? कारण तू पाय हलवला नाहीस तर आपल्या दोघांना बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील जसं की कशामुळे मी तुझ्या पायावर दरवाजा लावला."

"गुड! आता तुम्ही मला जखमी करायची धमकी देताय." ती हवेत हात उडवत म्हणाली.

आईशपथ एक क्षण तिला त्याच्या डोळ्यात जरा हसल्यासारखी चमक दिसली. पण लगेच त्याच्या चकाचक पॉलीश्ड शूजने तिचा पाय बाहेर सरकवला आणि दार बंद झालं.

"व्हॉट अ शो ऑफ प्रोफेशनॅलिझम डॉक्टर!" ती बंद दारासमोर पुटपुटली.

"मैने पहले ही वॉर्न किया था" शुभदा डेस्कवरून तिच्याकडे रोखून बघत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १४

शनिवार तिचा घातवार ठरला.

डॉ. पै OT च्या दारातून आत आले तेव्हाच वाईट मूडमध्ये दिसत होते. ऑपरेशन सुरू असतानाही त्यांचे थंड डोळे तिच्यावर रोखलेले होते. त्याचा काय प्रॉब्लेम आहे तिला कळत नव्हतं पण जे काही आहे तिकडे दुर्लक्ष करून तिला पुढे जायचेच होते. त्याची निगेटिव्ह एनर्जी बाजुला सारून तिचे काम नीट पाडायचे होते पण ही कठीणच गोष्ट होती.

"सायरा, ती क्युरेट मला मिळणार आहे की आता दुसऱ्या कोणाला बोलवू?"

तिने योग्य उत्तर देण्याआधी जीभ चावली. "मी करेक्ट साईज बघत होते." क्युरेट देताना ती म्हणाली.

"मग वेळ वाया गेला, ही बरोबर नाहीये."

येस इट इज. यू इगोमेनियाक!

"तुम्हाला दुसरी हवी आहे का डॉक्टर?" ती आवाजात अति गोडवा आणत म्हणाली.

"येस सायरा." तो एखादया ढ मुलीला समजावून सांगण्याच्या सुरात म्हणाला. "आय नीड अ करेक्ट वन." OT मध्ये शांतता झाली. सगळेजण कामात असल्याचं दाखवत असले तरी त्यांचे कान या संभाषणात होते. सायरा किती आणि कुठपर्यंत ऐकून घेते हे सगळ्यांना बघायचं होतं.

सगळे तिचा स्फोट व्हायची वाट बघत होते पण तिने एक खोल श्वास घेतला आणि एखाद्या संत माणसासारखी "ऑफ कोर्स, लगेच देते" म्हणून ती ट्रे मध्ये बघू लागली. ट्रे उचलताच शेजारून आय व्ही चेक करणाऱ्या नॅन्सीचा तिच्या कोपरावर धक्का लागला आणि खळ्ळ.. अक्खा स्टराईल इन्स्ट्रुमेंट्सचा ट्रे खाली पडला. तिथल्या सगळ्यांचा श्वास एकदम अडकला. काहीजण शॉकमध्ये फरशीवर बघू लागले. "दुसरा सेट रेडी आहे का?" डॉ. पै नी पटकन विचारले. "नाही, अर्धवट आहे." तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिले. तिने पुढचा सगळा गोळीबार ऐकायला डोळे घट्ट मिटून घेतले. आज मरण पक्कं!

"सगळं पटापट गोळा कर आणि ऑटोक्लेवमध्ये टाक. लगेच! नॅन्सी, टेक हर प्लेस विथ रिमेनिंग इन्स्ट्रुमेंट्स." तो पटकन म्हणाला.

तिने सटासट ग्लव्हज काढून कचऱ्यात फेकले आणि गुढघ्यावर बसून सगळी इन्स्ट्रुमेंट आणि टेबलखाली घरंगळलेले स्क्रू वगैरे गोळा केले. दुसऱ्या असिस्टंटबरोबर मोजून पूर्ण सेट असल्याची खात्री करून ती ऑटोक्लेवकडे पळाली. सगळा सेट स्टराईल व्हायला जेमतेम वीस मिनिटं लागली. ती स्क्रब होऊन सगळा सेट घेऊन परत आल्यावर पूर्ण सर्जरी कुठल्याही अडचणीशिवाय, थोड्याश्या उशिराने का होईना पूर्ण झाली.

इतका वेळ तिने सगळी भीती मनाच्या दुसऱ्या कप्प्यात दाबून ठेवली होती. डॉ. पै तिला टाके बंद करायला सांगून बाहेर गेले. तिने सुटकेचा निःश्वास टाकला. तिचं डोकं बधिर झालं होतं. ती किती दुर्दैवी आहे याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इतकं काम करूनही शेवटी सगळं युनिव्हर्स डॉ. पैंच्याच फेवरमध्ये होतं.

"सायरा, आर यू ओके? मैं हेल्प करू क्या?" नॅन्सीने शेजारून तिला विचारलं.

"नो नो, आय एम डूइंग इट." तिने टाके घालायला सुरूवात केली. कदाचित ह्या हॉस्पिटलमधलं तिचं हे शेवटचं काम असेल.

---
त्याने गरम पाण्याच्या नळाखाली हातावरचा साबण धुवायला सुरुवात केली तोच OR चं झुलतं दार ढकलून नॅन्सी  डोकावली. "एक मिनिट बात कर सकती हूं क्या डॉक्टर?"

त्याच्या आणि विकेंडमध्ये अजून कामाचा डोंगर उभा होता. काम जास्त आणि वेळ कमी. तो नॉर्मली वीकेंडला पण त्याच्या केबिनमध्येच असतो पण शुभदा नसल्यामुळे कामं जरा मंदावतात. एखादा ट्रेनीही नसतो त्यामुळे पटकन कॉफीसुद्धा हातात आणून मिळत नाही. क्लिनिंग स्टाफ तो असताना आतच येत नाही कारण त्याला त्याच्या वस्तू हलवलेल्या आवडत नाहीत. त्याच्या पसाऱ्यालाही मेथड इन मॅडनेस आहे. त्याने केलेला कचरा तो स्वतःच बिनमध्ये टाकतो.

पण हा वीकेंड नेहमीपेक्षा वेगळा आहे. उद्या नीना म्हणजे आत्येबहिणीचं लग्न आहे. अर्थात लग्न आधीच कोर्टात झालंय, उद्या फक्त रिसेप्शन कम पार्टी आहे. त्याला जरा लवकर निघून ड्राय क्लीनरकडून त्याचा सूट कलेक्ट करायचा होता.

सायराने सर्जरीमध्ये डीले केला नसता तर एव्हाना तो बाहेर पडला असता. "क्या चाहीये?" त्याने वळून नॅपकिन उचलला. ती दार सोडून पुढे आली. "जो हुआ उसमे सायरा का कोई फॉल्ट नहीं है. आप उसको प्लीज पनिश मत करो. आपने शायद नोटीस नही किया बट शी इज रिअली गुड. हम सुबोध के साथ काम करते थे, उसकी कंपॅरिझनमे दीज डेज आर लाईक हेवन."

त्याने नॅपकिन लॉंड्री बास्केटमध्ये फेकला.

त्याचा पेशन्स संपतोयसा बघून ती पुढे पटकन म्हणाली." ओके उसने आज डीले किया, लेकीन हर बार उसने बहुत एफिशियंटली काम किया है. आपका बहुत प्रोसिजर टाइम बचाया है."

मला माहिती आहे.

"एक्सेप्ट टुडे, शी इज योर बेस्ट असिस्टंट. प्लीज थिंक अबाउट हर."

"व्हॉट डू यू थिंक? आय एम गोइंग टू फायर हर?"

घाबरून तिचे डोळे विस्फारले."प्लीज डोन्ट!  उसने मेरा काम भी आसान किया है."

"थँक्स फॉर युअर ओपिनियन नॅन्सी, बट आय एम नॉट गोइंग टू फायर हर. हॅव अ नाइस वीकेंड." तो तिच्याशेजारून जाताजाता म्हणाला.

स्क्रब्ज बदलून त्याने नेहमीचा व्हाईट शर्ट आणि ग्रे ट्रावझर्स घातल्या आणि केबिनमध्ये येऊन पेपरवर्क संपवत बसला. शेजारी खिडकीच्या काचेवर आदळणारा मुसळधार पाऊस दिसताच त्याने न्यूज बघितल्या. दोन दिवस सलग वादळी पावसाचा इशारा फ्लॅश होत होता. झालं! आजपासून तुंबई सुरू! त्याने वैतागून फाईल्स लॅपटॉपबरोबर बॅगमध्ये भरल्या, उद्या घरीच थांबून हे संपवू.

तो स्टाफ लिफ्टमध्ये शिरला तेव्हा आधीच आत गर्दी होती पण त्याला बघताच लोकांनी जागा रिकामी करून दिली. बॉस असल्याचे फायदे! लिफ्टचा दरवाजा ग्राउंड फ्लोरच्या पार्किंगमध्ये सरकून उघडला. तो त्याच्या कारच्या दिशेने वळणार इतक्यात त्याला मेन एक्झिटपाशी भिजून ऍक्टिवा ढकलत पुन्हा पार्किंगमध्ये आत आणणारी सायरा दिसली. तिने स्क्रब्ज बदलून जीन्स आणि तेच पिवळं जॅकेट घातलं होतं. तेवढ्यात तिने गालांवर जोरजोरात पालथा हात फिरवून अश्रू पुसले.

ओह, ही रडतेय... शिट! त्याने आपल्या कारकडे नजर टाकली, पटकन निघून जाऊ शकतो. त्याने पुन्हा पाहिलं तर तिने ऍक्टिवा बाजूला पार्क केली आणि पाठीला सॅक लावून बाहेर जायच्या तयारीत होती. रस्त्यावर आत्ताच घोटाभर पाणी वहात होतं. कधीही रस्त्याची नदी आणि चिखलात ट्रॅफीकचा मुरांबा होणार होता. बाहेर सगळीकडे काळोखी दाटून विजा कडाडत होत्या.

फ*!

"सायरा!" तो मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज सहज तिच्यापर्यंत पोचला. "थांब" तो पुढे जात म्हणाला.

तिने थांबून मागे वळून पाहिलं. डोळे पुन्हा पुसून तिने मान हलवली. "माझी शिफ्ट संपलीय. मला आत्ता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. जे काय ओरडायचं, ऐकवायचं असेल ते सोमवारी ऐकवा. मी घरी जातेय."

"कशी?"

तिने पाण्याने भरलेले डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं." कशी म्हणजे?"

"घरी कशी जाणार? तुझी टू व्हीलर बंद पडलीय."

तो ओरडत नाही कळल्यावर ती थोडी रिलॅक्स झाली. "ओह! बसने." ती खांद्यावर सॅकच्या बेल्टमध्ये अंगठा अडकवत म्हणाली."गेटपासून थोडं पुढे चालत गेलं की एक बस स्टॉप आहे."

"आत्ता? ह्या पावसातून? थोड्या वेळात बस ट्रॅफिकमध्ये अडकतील. उबर वगैरे का करत नाहीस?"

"एकही कॅब अव्हेलेबल नाहीये. एखादी आलीच तर तिप्पट भाडं सांगतायत. इट्स ओके, मला सवय आहे बसची." तिचा आवाज जरा मोकळा झाला होता.

तिच्याकडे छत्रीसुद्धा दिसत नाहीये. जॅकेट आधीच भिजलंय. "तू पूर्ण भिजून गारठशील, बस लवकर येईलशी वाटत नाही."

तिने किंचित हसून एक पाऊल मागे घेतलं." मी जाईन नीट. तुम्ही काळजी नका करू."

काळजी! दुर्दैवाने त्याला तिची काळजी वाटत होती. गेले तीन महिने तो तिची काळजीच करत होता.

सगळी शर्विलची चूक होती. रोज रोज शर्विल त्याला सायराबरोबरच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स पाठवून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काय प्रोग्रेस आहे ते सांगून त्याला वात आणत होता. सायराचे टेक्स्ट आणि स्मायलीज त्याच्या अजूनच डोक्यात जात होत्या. रिलेशनशिप! किती हास्यास्पद आहे. ते दोघं कुठे बाहेर गेले नाहीत, फोनवर बोललेही नाहीत, आहेत ते फक्त टेक्स्टस्. जर नंबर ऑफ टेक्स्ट्स वर रिलेशनशिप होत असती तर तो एकाच वेळी त्याच्या कामवाली, लॉंड्रीवाला आणि स्वीगी नाहीतर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये असता!

"एवढ्या पावसात मी तुला बस स्टॉपवर थांबू  देणार नाही. चल, मी सोडतो तुला."

तिच्या हसण्याचा आवाज पार्किंगमध्ये घुमला. "नको. त्यापेक्षा मी चालत जाईन. हार्डली अडीच - तीन किलोमीटर आहे."

"मी रिक्वेस्ट करत नाहीये, ऑर्डर समज. सोमवारी मला तुझी न्यूमोनिया झाला म्हणून सिक लीव्ह नकोय." तो गंभीर होत म्हणाला.

तिने रागाने पाहिलं."तुम्ही हे कॉलेजमध्येच शिकलाय की नुसतं भिजल्यामुळे न्यूमोनिया होत नाही."

ती वळून जायला निघाली इतक्यात त्याने तिच्या सॅकचा बेल्ट ओढून सॅक काढून घेतली आणि हातात धरून कारच्या दिशेने चालू पडला. ती मागे येतेय की नाही याची त्याला फिकीर नव्हती.

"डॉ. पै!" ती मागून भराभर चालत ओरडली.

"तुझी शिफ्ट संपली ना? आता मला अनिश म्हणू शकतेस." तो चालत राहिला.

"डॉक्टर!" ती मुद्दाम म्हणाली."प्लीज मला माझी सॅक द्या नाहीतर मी सिक्योरिटी बोलावते."

"अनिश! आणि जर तू सिक्योरिटी बोलवत असशील तर संतोषला बोलाव. तो जरा तरुण आहे, माझ्यामागे पळू शकेल. तशीही मी सॅक घेऊनच जाणार आहे." बोलतानाही त्याला आता हसायला येत होतं. सॅक अगदीच हलकी होती. "ह्यात आहे काय नक्की?"

"पाण्याची बॉटल आणि एक टपरवेअरचा डबा." ती अजूनही त्याला गाठू शकली नव्हती.

टपरवेअर! त्याने मागे वळून ती कुठवर आलीय ते पाहिलं. "तू पुन्हा सांदण आणलं होतं?"

तिने मान हलवली "मागच्या वेळी शुभदाला मिळालं नव्हतं."

"मागच्या वेळी मलाही मिळालं नव्हतं." त्याने मुद्दा मांडलाच.

ती फिस्कारून हसली. "अँड आय डोन्ट फील बॅड अबाउट इट."

तिला त्याचं हसू दिसू नये म्हणून त्याने पुन्हा समोर बघितलं. ब्रूटली ऑनेस्ट! नेहमीप्रमाणे. OR मध्ये ती अगदी आज्ञाधारक असते पण OR च्या बाहेर कुठेही? शक्यच नाही!

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १५

गाड्यांची एक रांग पास करून तो पुढे डावीकडे वळला आणि डॉक्टरांसाठी राखीव पार्किंगकडे जाऊन तिची वाट बघत थांबला. ती येऊन पहिल्याच ब्लॅक ऑडीसमोर थांबली.

"माझी नाहीये." तो गालात हसत म्हणाला.

"राईट!" ती पुढे होऊन शुभ्र चमकत्या लेक्ससपाशी गेली.

त्याने नकारार्थी मान हलवली आणि पुढे होऊन चालू लागला.

पुढच्या लालभडक फरारीकडे ती बघतच राहिली.

"डॉ. पंडित! एका सेलिब्रिटी पेशंटने गिफ्ट दिलीय" तो मागे न बघता म्हणाला.

ओहो, चंदाचे कॉस्मेटिक सर्जन! लाईफ इन प्लास्टिक, इट्स फँटास्टीक! तिने मान हलवली.

ती त्याच्या मागोमाग गेली, हां हीच! ब्लॅक मर्स जीएलसी. पण तिने मान उंचावून पाहिलं तर तो पलीकडे जात होता. रिमोटची बीप बीप ऐकू आली. गाडीचे टेललाईट्स फ्लॅश झाले. तिथे ती होती, त्याने मेडिकल कॉलेजपासून चालवलेली कार! तिने पुढे जाऊन पाहिलं तर तिथे इवलीशी मरून होंडा जॅझ उभी होती. ती चेहऱ्यावर आश्चर्य न दाखवता दार उघडून ड्रायव्हर सीटशेजारी बसली.

"इट्स गॉट गुड मायलेज आणि ट्रॅफिकमध्ये बरी पडते. ऑल्सो, आय एम नॉट इंटू कार्स!" तो म्हणाला.

"तुम्ही टांगा नाहीतर बैलगाडी वापरली असती तरी मला धक्का बसला नसता." ती नाक मुरडत म्हणाली.

त्याने हसत मागचं दार उघडून त्याची लॅपटॉप बॅग आणि तिची सॅक ठेवली आणि तिच्या शेजारी येऊन बसला. "भयंकर ट्रॅफिक असणार.."

शांततेत त्यांनी सीटबेल्ट लावले. "कुठे राहतेस तू?" गाडी मुख्य रस्त्यावर आल्यावर तो म्हणाला.

"वेस्ट. साईरूप नगर, पाचवी गल्ली."

"गुड, मला तिकडेच रस्त्यात एक काम आहे. तुला सोडायच्या आधी पाच मिनिटं थांबलो तर चालेल ना?"

"तुम्ही ज्या पद्धतीने माझी सॅक घेतली आणि मला गाडीत बसायला लावलं त्यावरून माझ्याकडे काही ऑप्शन नाहीच्चे!"

अच्छा, ही अजून नाक फुगवून बसलीय. फाईन. "वी आर ऑन द सेम पेज. नाइस!"

तिला त्याचं बोलणं अजिबात मजेशीर वाटत नव्हतं.

त्याने स्टिअरिंग आणि समोरचा रस्ता यावर लक्ष केंद्रित केलं होतं, जरी तिच्याकडे बघावं वाटलं तरी.

खूप काळानंतर त्याच्या कारमध्ये शेजारच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं. तिच्याइतकं इंटरेस्टिंग तर कोणीच नाही. ती ह्या छोट्या जागेत सुद्धा लहानशी दिसतेय. तिने मांडीवर हात एकमेकांत गुंफून ठेवले होते. हां! हातात सेलफोन नाहीये. तो खुषीत हसला. आत्तापर्यंत तिने शर्विलला टेक्स्ट करून तिचा दिवस कसा गेला सांगायला हवं. आत्ता तिने सांगितलं असतं की तिच्या शैतान बॉसने तिला रडवलं आणि आता घरी सोडतोय म्हणून.

त्याने एका हाताने टाय सैल केला. अचानक त्याला घसा दाटून आल्यासारखं वाटलं.

ट्रॅफिक कापत दोन रस्ते पुढे गेल्यावर तिला बोलायचं बळ आलं. "आज जे झालं ते सोडून मी तुम्हाला काही त्रास दिलाय का?" गुड! फायनली! "गेले तीन महिने तुम्ही माझ्यावर चिडचिड करताय आणि त्याचं कारणही मला माहित नाहीये."

कार पुढच्या गाडीला धडकता धडकता थांबली. पुन्हा एक रेड सिग्नल.

"यू नो, मला अ‍ॅक्चुली असं वाटत होतं की आपला प्रवास शांततेत होईल." तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला."तुला कधी असं नाही वाटत का, की याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये."

"वाटलं होतं, बट इट डझंट मेक सेन्स. तुम्ही फक्त माझ्यावर रागावता. बाकी कोणी उदा. नॅन्सीने एक मिनिट लेट आयव्ही कनेक्ट केली तर तुम्ही चिडत नाही पण मी असं काही केलं तर लिटरली डोळ्यांनी माझा खून करता." ती पटकन म्हणाली.

हॅ! असं काही नाहीये आणि असलंच तर मी नोटीस केलं नाही. त्याने हनुवटीवर वाढलेल्या स्टबलमधून हात फिरवला.

"देअर आर फ्यू थिंग्ज ऑन माय माईंड." तो शांतपणे म्हणाला.

"वर्क?"

"हम्म, काही वर्क रिलेटेड आहेत. मी एक ग्रँट प्रपोजल सबमिट केलंय त्याला उत्तर यायला वेळ लागतोय."

"हो, शुभदा असं काहीतरी सांगत होती."

"तो स्ट्रेस आणि आणखी नव्या केसेस ऍक्सेप्ट केल्यात त्याबरोबर ऍडिशनल पेपरवर्क वगैरे प्री ऑप, पोस्ट ऑप.. यू नो द ड्रिल.." तो रस्त्यावर नजर ठेवत म्हणाला.

"ओके.. पण म्हणून तुम्ही तो सगळा स्ट्रेस माझ्या एकटीवर का काढताय? जिमला जा, बीनबॅगवर पंच मारा." ती ताडताड बोलली.

"पंचिंग बॅग म्हणतात तिला!" तो हसू दाबत म्हणाला.

"तेच ते." तिने ओठ चावला."आणि अजून काय, काही वर्क रिलेटेड आणि बाकी काय?"

आता रस्ता बदलायची वेळ आलीय. त्याला एकीकडे स्वतःपाशी कबुली द्यायची होती की तिच्या त्याच्या कझीनबरोबरच्या टेक्स्टिंग आणि फ्लर्टिंगमुळे त्याला त्रास होतोय. पण शर्विल त्याचा चुलतभाऊ आहे हेच तिला अजून माहीत नाहीये. त्याने शर्विलला विचारलंही होतं पण त्याचं म्हणणं 'ही गोष्ट त्यांच्या बोलण्यात ऑर्गनिकली अजून आली नाही.' व्हॉट द हेल! त्याने शर्विलला 'मग आर्टिफिशिअली आण' म्हणून सांगितलं होतं. सिम्पल! पण शर्विलला तिला इतक्यात हे सांगून घाबरवायचं नव्हतं. जसं काही त्याच्याशी नातं असल्यामुळे शर्विलवर धब्बा वगैरे लागणार होता. शर्विलच्या लॉजिकला काही अर्थ नव्हताच. पण स्वतः तिला हे न सांगण्याचा शर्विलला दिलेला शब्द त्याने पाळला होता.

ह्या क्षणापर्यंत तरी. आत्ता तिला कारमध्ये बसवून हे अगदी नॉर्मल असल्यासारखा तो वागत होता. तिच्या फ्लोरल परफ्यूमचा हलकासा गंध त्याला जाणवत होता. सीटमध्ये तिची प्रत्येक हालचाल तो नोटीस करत होता. ती आरामात बसायचा प्रयत्न करतेय की त्याच्यापासून शक्य तेवढं लांब बसायचा? तिचा गाल ऑलमोस्ट खिडकीच्या काचेला टेकलाय.

ते दोघं चॅट करतायत याचा मला त्रास व्हायला नको, आणि मी तेच स्वतःला पुनःपुन्हा सांगतोय. शर्विलला हवं तसं वागू दे, माझं लाईफ आहे तसं सुरू राहील. हाच माझा प्लॅन होता, पण तो यशस्वी होतोयसं वाटत नाही. तिच्यामते मी रिअल ए*होल आहे. आय एम द डेव्हील!

"आता विषय बदलूया" म्हणत त्याने एफ एम प्ले करायला बटनाकडे हात नेला. कदाचित टॉप टेन गाणी ऐकून ही विसरून जाईल.

"नाही." तिने व्हॉल्यूम कमी म्हणजे जवळपास बंदच केला. "आता आपण खऱ्या कारणाकडे येऊया. दॅट इज यू हेट मी!"

त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या."नो, आय डोन्ट हेट यू."

"अरे हो सॉरी, काय होतं ते? मी तुम्हाला आवडत नाही. दोन्हीत काय फरक आहे!"

तो गप्प राहिला, गाडीत हाताला चटका बसेल इतकं टेन्शन तयार झालं होतं. त्याने एफ एमचा आवाज किंचित वाढवला, गाडी मेन रोडवरून गल्लीत आत घातली आणि एफ एमवर आधीचं गाणं बदलून 'दीवाना हुआ बादल' सुरू झालं. तिने एक श्वास सोडत हाताची घडी घातली.

"धिस इज नॉट वर्किंग आउट, आय थिंक आय शुड क्विट!"

त्याला एकदम कोणीतरी पोटात जोरदार बुक्का मारल्यासारखं झालं. "काय!? पण का?" तो कष्टाने डोळे रस्त्यावर ठेवत म्हणाला. "आज ओटीमध्ये जे झालं त्यामुळे?"

"हो, म्हणजे तो एक भाग झाला. पण मला ओटीमध्ये तुमची पर्सनॅलिटी, तुमचा प्रेझेन्स घाबरून टाकणारा वाटतो. माझी प्रत्येक कृती पारखली जातेय, तुम्ही मला जज करताय असं वाटतं. तुम्ही प्रत्येक वेळी मी किती मंद आहे किंवा तुमच्या स्पीडशी मॅच करू शकत नाही असे वागता. मेबी वी आर नॉट अ गुड मॅच. मला वाटत होतं मी प्रेशर हँडल करेन. डॉ. आनंदबरोबर काम करताना सगळ्यांना मोकळं आणि फ्रेश वाटायचं, मागे म्युझिक सुरू असायचं. वी वर हॅपी, बट यू.."

"मी व्हॉट?" त्याला पुढे ऐकायचंच होतं.

"यू आर इंटिमिडेटिंग." ती पुटपुटली.

त्याने गाडी पटकन वळवून दुकानासमोर पार्क केली आणि तिच्याकडे पाहिलं. ती काचेतून सरळ समोर पहात होती. काचेवर पावसाच्या माऱ्यातून अर्थातच समोरचं काहीच दिसत नव्हतं.

त्याने किंचित खाकरून बोलायला सुरुवात केली. "ओके, मला जेवढं समजलं त्यावरून प्रॉब्लेम बहुतेक मी आहे."

'बहुतेक' मी! ती सीटवर मागे डोकं टेकून हसत सुटली. तिचे ओलसर केस चेहऱ्यावरून पाठीवर ओघळून इथेतिथे चिकटले होते. हसताना डोळे बंद होऊन पापण्यांचे लांब काळेभोर केस तिच्या गोबऱ्या गालांना स्पर्श करत होते. तो स्थिर बसून फक्त तिच्याकडे बघत राहिला. त्याने हात स्टेअरिंगवर घट्ट धरून ठेवले कारण कुठल्या तरी वेड्या कारणाने त्याला पुढे होऊन तिला स्पर्श करण्याची तीव्र इच्छा झाली होती. बोट तिच्या नाकाच्या शेंड्याला लावून खाली आणत तिच्या ओठांवरून फिरवावंसं वाटत होते जे सध्या त्याच्यामुळे पसरून हसत होते.

हळूहळू ती भानावर येत शांत झाली. "प्रॉब्लेम 'बहुतेक' मी आहे. हो? खरंच?" हसून तिच्या डोळ्याच्या कडेला पाणी आलं होतं ते पुसत ती म्हणाली.

भानावर येत त्याने मान फिरवून बाहेर पाहिलं.  कारच्या बाहेर पडलं पाहिजे. पाऊस गेला खड्डयात.

"तू इथेच बस. मी पाच मिनिटात आलोच." म्हणून तो बाहेर पडला. नशिबाने सूट रेडी होता तो कलेक्ट करून काही मिनिटात बाहेर आला तेव्हा सूटवर प्लास्टिकची गारमेंट बॅग होती पण तो स्वतः भिजत होता. त्याने पळत येऊन मागचं दार उघडलं. ती साईड मिररमधून त्याच्याकडे बघत होती. पावसाने त्याच्या कपाळावर ओघळलेले केस, भिजून ऑलमोस्ट ट्रान्सपरंट होऊन त्याच्या कातीव ऍब्सना चिकटलेला पांढरा शर्ट. सायरा मागे वळून त्याच्याकडे बघत म्हणाली. "तुम्ही पूर्णच भिजलाय." टेल मी समथिंग न्यू! त्याने सूटची बॅग व्यवस्थित सरळ करून सीटवर ठेवली.

तो परत आत येऊन बसला तेव्हा ती बरीच शांत झाली होती. त्यांने भिजलेल्या शर्टच्या बाह्या उघडून कोपरापर्यंत फोल्ड केल्या. हाताने केस विस्कटत केसातले पाणी झटकले. कारमधल्या गरम हवेने थोड्या वेळात शर्ट वाळायला हवा.

"आता मला रस्ता सांग." तो सरळ म्हणाला.

"मला आपलं बोलणं पूर्ण करायचंय."

"मी माझा सूट घेतला आणि आता तुला घरी सोडतोय. आपलं एवढंच ठरलं होतं."

तिने अचानक त्याच्या ओल्या मनगटावर तिचा मऊ, नाजूक तळहात ठेवला. त्याने तिच्या हाताकडे बघून पुन्हा वर पाहिले. त्याला वाटलं ती घाबरून हात काढून घेईल पण नाही.

"तुम्ही प्रॉब्लेम तुमच्यात आहे हे मान्य केल्यावर मी हसायला नको होतं. सॉरी." ती मवाळपणे म्हणाली.

ओह, तिला वाटतंय की तिने माझ्या स्वाभिमानाला धक्का लावलाय वगैरे, जसा काही माझा स्वाभिमान इतका नाजूक आहे! तिच्याकडे बघता बघता तो विचार करत होता.

"मी तुमच्या टीममध्ये रहावं वाटत असेल तर प्लीज माझ्याशी बोलत जा."

"आय डोन्ट गिव्ह अ शिट इफ यू स्टे!" हां, तिला वाटतंय तिने मला पूर्ण ओळखलंय आणि आता गोड बोलून ती माझी काही डार्क सिक्रेटस उघड करून घेईल तर असं काही नाहीये.

तिची त्याच्या मनगटावरची पकड एक क्षण घट्ट झाली आणि तिने हात सोडून दिला. हाताची घडी घातली. "एस व्ही रोडवरून लेफ्टची पाचवी गल्ली."

मला काय करावं समजत नाहीये. तिला आत्ताच्या आता कारच्या बाहेर काढून माझी उरलीसुरली प्रतिष्ठा टिकवावी असं वाटतंय पण त्याच वेळी माझ्या इगोमुळे ती नोकरी सोडून गेली हे सोमवारी शुभदा आणि नॅन्सीला कसं सांगणार हा पण इश्यू आहे.

"मला   घरी   सोडा!" ती एकेका शब्दावर जोर देत म्हणाली.

"मी OR मध्ये गोड माणूस म्हणून वागू शकत नाही." तो अचानक बोलू लागला. विचार न करताच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडत होते. "मी म्युझिक प्ले करून जोक्स पण नाही करू शकत. पीडीऍट्रिक कार्डीऍक सर्जरी कधीही कॉमन नसते. ती इंफन्ट हार्टस् पूर्ण तयारच झालेली नसतात जी आपण पूर्णत्वाला नेतो. हे एखादं म्हाताऱ्या माणसाचं ब्लॉक झालेलं हार्ट, ब्लॉकेज काढून चांगल्या आर्टरीज बसवण्याइतकं साधं नाहीये. ऑपरेट केलेली कमीत कमी तीस टक्के मुलं मोठी होऊनही आयुष्यभर आजारी रहातात. त्यांची काही चूक नसताना जन्मतः त्यांना हे भोग भोगावे लागतात. मला त्यांना जगायचा, पूर्णपणे निरोगी जगायचा चान्स द्यायचाय. आय एम नो गॉड, बट समटाइम्स आय हॅव टू ऍक्ट लाईक वन."

तिने अजूनही चेहरा त्याच्याकडे वळवला नव्हता. तरीही तो बोलत राहिला.

"मी माझ्या कामात खूप फोकस्ड असतो, त्यात काही कमीजास्त झालं तर माझी लोकांवर चिडचिड होते."

"लोकांवर नाही, फक्त माझ्यावर." ती मुद्दा सोडत नव्हती.

"कारण मी तुला त्यांच्यापेक्षा सुपिरीयर समजतो. माझ्या तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत."

तिने फक्त हुं! म्हणत मान हलवली. त्याला तिची पोनिटेल खेचून तिचं तोंड आपल्याकडे वळवण्याची इच्छा होत होती पण त्याने हातांवर काबू ठेवत खिडकीबाहेर दणकून पडणाऱ्या मुसळ धारांकडे नजर टाकली. त्याला त्याच्या कामाच्या काळ्या, गढूळ रिऍलिटीच्या तळाशी जायला आवडत नसे पण तिने आज कुठला पर्यायच ठेवला नव्हता.

"सायरा, कधी एखाद्या मुलाचा जीव तुझ्या हातांवर अवलंबून होता?" त्याचा आवाज बर्फासारखा थंड झाला होता. " तुला आठ तासांच्या सर्जरीनंतर बाहेर वाट बघणाऱ्या एका आईला जाऊन सांगावं लागलंय की आता तिच्या बाळासाठी आपण काहीच करू शकत नाही. कितीही सर्जरी केल्या तरी ते बाळ दोनेक महिन्यांच्या वर जगू शकणार नाही."

"कधी चुकून एखादी नर्व्ह कापली जाऊन कोणाला ऑलमोस्ट पॅरालाईझ केलं आहेस? ऑपरेशन टेबलवर असताना कुठल्या बाळाची धडधडती आयुष्य रेषा सरळ होताना बघितली आहेस?  यू थिंक आय एम अ कोल्ड ऍ*होल! तुला मी तुझ्याबरोबर गोड गोड वागायला हवंय, कौतुक करून मॉडेल एम्प्लॉयीचा स्टार द्यायला हवाय, आय वोन्ट!" त्याने जरा थांबून श्वास घेतला."ग्रो अप सायरा!"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १६

सायराला शक्य असतं तर तिने चालत्या गाडीतून उडीच मारली असती. थोडं जखमी होणंही परवडेल. पण तरीही ती थरथरत गप्प बसून राहिली. तोही गप्पच होता. "डेड एन्डचं घर" म्हटल्यावर त्याने घरासमोर कार वळवून थांबवली. पावसात उतरून मागचं दार उघडून तिने सॅक काढली आणि पूर्णच भिजू नये म्हणून छातीशी धरली. दार लावल्यावर त्याला लिफ्टबद्दल थँक्स म्हणावं की आत्ताच्या वागण्यासाठी माफी मागावी हे न कळून काही क्षण तिने डोअर हँडल धरूनच ठेवलं. पण शेवटी काहीच न बोलता ती पावसातून घराकडे पळत सुटली. पावसात न भिजणे हे वरवरचं कारण पण मुख्य म्हणजे तिला शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून लांब जायचं होतं. लॅच उघडून तिने दणकून दार बंद केलं. खिडकीच्या अर्धवट सरकवलेल्या पडद्यातून तिला कार झपकन निघून जाताना दिसली. तिच्या छातीत चार पाच ट्रेन एकत्र धडधडत गेल्यासारखं होत होतं.

"दीssद! यू वोण्ट बिलीव्ह धिस!!" आतून नेहा ओरडत आली.

तिने दचकून नेहाकडे पाहिलं. ती हातातला उघडा लॅपटॉप सांभाळत तिच्याजवळ घेऊन आली. मेसेंजर टॅब ओपन होती. मी नसताना ही शर्विलशी बोलतेय, आय सी! त्यावरून तिला आठवलं की तिने दिवसभरात फोन चेक केला नव्हता.

"नेहा!!" ती ओरडलीच.

"ओके, ओके! आय एम गिल्टी. तुझ्या परमिशनशिवाय मी त्याच्याशी बोलले. पण दिवसभर इतके मेसेज आले की शेवटी मला रिप्लाय करावा लागला. गेस व्हॉट? तो परत येतोय! आणि त्याने उद्या तुला भेटण्यासाठी विचारलंय." नेहा नाचतच ओरडली.

भीतीने तिच्या पोटात गोळा आला. "मला सांग, तू त्याला रिप.."

"मी हो सांगितलं! प्लीजच!! अँड गेस व्हॉट? तुम्हाला पार्टीला जायचंय. त्याच्या बहिणीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे म्हणे. नेहाचे सायरासारखेच हिरवट घारे डोळे ते रिसेप्शनऐवजी ऑस्कर वगैरे असल्यासारखे चमकत होते.

ओह गॉड, दिवसभरात मला किती धक्क्यावर धक्के बसणार आहेत. हे अजून काय वाढून ठेवलंय पुढ्यात! माझा विश्वास बसत नाहीये की नेहा त्याला हो सांगून बसलीय. ओके, शर्विल छान माणूस आहे, सेफ आहे, पण मला इतक्यात तरी त्याला भेटायचं नव्हतं, आणि लग्नबिग्न, रिसेप्शन पार्टीत वगैरे तर नाहीच नाही.

ती लॅपटॉप मांडीवर घेऊन बसली. पूर्ण चॅट तिने भराभर वाचून स्क्रोल केलं. चॅट साधं आणि जरा बोरिंगच होतं. हवामान (सगळीकडे पाऊस), त्याची फ्लाईट (शेजारच्या सीटवर उपद्व्यापी लहान मूल आणि त्याची झोपाळू आई) वगैरे वगैरे. नेहाने प्रत्येक वाक्यात दोन चार इमोजी वापरलेत. गॉड! मी त्याच्याजागी असते तर कधीच चॅट करणं बंद केलं असतं. पण शर्विल टिकून आहे!

दुर्दैवाने.

शेवटी त्याने मला रिसेप्शनसाठी इन्व्हाईट केलंय, तोच मला पिकअप करेल वगैरे आणि नेहाने मूर्खासारखं accept केलंय, चार हार्ट आईजबरोबर. मी त्याला प्रचंड डेस्पो मुलगी वाटत असणार. त्याहून वाईट म्हणजे त्याने पुढे लिहिलंय की हे भलंमोठं लग्न नाहीये फक्त जवळचे थोडेसेच नातेवाईक आणि मित्र असणार आहेत. थीम मॉडर्न विथ सम ट्रॅडिशन आहे कारण नवरदेव जर्मन आहे.

तिने नेहाकडे मान वळवली. "त्याच्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे त्याचे आईवडील आणि सगळे नातेवाईक तिथे असतील."

नेहाने खांदे उडवले. "तो म्हणाला फक्त पन्नास साठ लोक असतील, खूप गर्दी नसेल. चांगलं आहे की मग!"

"ते अजून वाईट आहे येडपट! तिथे मी प्रत्येकाच्या रडारवर असेन."

"ओss ते माझ्या डोक्यातच नाही आलं." नेहाचं तोंड पडलं.

तिने लॅपटॉप सोफ्यावर ठेवला आणि समोरची बॉटल उचलून घटाघट पाणी प्यायली. तिला किंचाळत स्वतःचे केस उपटायची इच्छा होत होती. "हे अनडू कसं करू शकतो?"

नेहा तिच्या समोर येऊन गुढघ्यावर बसली आणि तिचे हात हातात घेतले."अनडू कशाला? ही'ज अ नाईस गाय आणि तू स्वतःच सांगितलं होतंस तो किती चार्मिंग आणि क्युट आहे ते. तसेही फर्स्ट डेटला सगळे ऑकवर्डच असतात, तसं समज. मेबी तुला खूप मजा येईल. जाऊन तर बघ!"

तिने नकारार्थी मान हलवत कपाळाला हात लावला.

नेहाने उठून तिच्या शेजारी बसत पाठीवरून हात फिरवला. "तुला ह्यातून बाहेर पडायचंय?"

"हो!"

"अगं पण मी त्याला हो म्हणून आता खूप वेळ झाला. तो बिचारा खूप एक्सायटेड आहे आता असं कॅन्सल करणं चांगलं नाही वाटणार. मी तर तुझ्या आय मेकपची पण प्रॅक्टिस करून ठेवली, हे बघ." ती एका डोळ्याचा निळसर आयशॅडो आणि लायनरचे विंग्स दाखवत म्हणाली. नेहा अगदी रडायची बाकी होती.

तिला किंचित हसू आलं. "पण माझ्याकडे ह्या थीमसारखा छान ड्रेस पण नाहीये." तिने श्वास सोडला.

"डोन्टच वरी! नेहा आहे ना! अगं तो माझ्या फेअरवेल पार्टीसाठी आपण स्काय ब्लू लेहंगा घेतला होता ना, त्याची एक शिवण उसवून तुला होईल तो. मी एकदाच घातलाय." उत्साहाने नेहाचे डोळे चमकले.

"तो तुझा डुप्लिकेट रितू कुमार! तू बारीक आहेस म्हणून चालून जातो, मला नाही सूट होणार."

"दीद, तुला उलट जास्त छान दिसेल. इट नीड्स कर्व्हज लाईक यू. सेक्सी दिसेल!"

"मला काहीतरी सोबर ड्रेस हवाय पण ह्या महिन्यात घेऊ शकत नाही. आत्ताच तर तुझी मिड टर्म फी भरली आपण."

"म्हणूनच हा ट्राय कर." नेहाने भराभर तो लेहंगा आणून ब्लाउजची एक शिवण उसवली.

जेवणं होऊन, सगळी वीकेंड कामं संपवून दमलेली असूनसुद्धा रात्री ती कशीबशी झोपली.

---

रविवार दुपार

ती आरशासमोर बसली होती. नेहा काळजीपूर्वक तिच्या पापणीवर आय लायनरची रेष आखत होती.
"नेहा, मला लेहंगा अजूनही टू मच वाटतोय" ती आकाशी नेटवर चंदेरी बुंदके असलेल्या ओढणीची पिन नीट करत म्हणाली. "चिल! इतकं पण एक्सपोज होत नाहीये. फक्त पाठ थोडी दिसतेय. तिकडे बरेच फॉरेनर्स असतील त्यात तुझा ड्रेस फार उठून नाही दिसणार."

"थोडी? ऑलमोस्ट बॅकलेस आहे हा इतकुसा ब्लाउज. आणि कंबरपण दिसतेय, म्हणून मला साडी वगैरे प्रकार आवडत नाहीत."

"रिलॅक्स, सगळ्या बायका अश्याच कपड्यात असतील तिकडे. यू आर लूकींग सो हॉट अँड चिक!"

हम्म.. तिच्या पोटात कसंतरी होत होतं, अजूनही रिसेप्शन वगैरे अटेंड करायची इच्छा नव्हती. पोटात टेन्शनचा गोळा आला होता. आता नेहाने तिचे कंबरेपर्यंत येणारे सरळ, सुळसुळीत केस विंचरून टोकाला थोडे सॉफ्ट कर्ल्स केले. नेहाची काम करता करता काहीतरी बडबड सुरू होती.

चेहऱ्याचे टेन्स फीचर्स जरा रिलॅक्स करायचा तिने प्रयत्न केला. काल डॉ. पै तिला सोडून गेल्यापासूनच ती टेन्स होती. तिला नीट झोपही लागली नव्हती. सारखे त्यांचे शब्द मनात घोळत होते. एक म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर होतं. त्यांना येणाऱ्या स्ट्रेसची ती कल्पनाही करू शकली नसती. तिने आता फक्त कामावर लक्ष द्यायला हवं. पण त्यांनी स्वतःची चूक पण मान्य करायला हवी. ते नुसतं तिला पंचिंग बॅग म्हणून नाही वापरू शकत.

उद्या सकाळी काय होणार या विचारानेच ती घाबरत होती. कारमधल्या बिहेवियरसाठी माफी मागावी की तरीही ते स्वतःला बदलत नसले तर दुसरी नोकरी शोधावी.. नेहा समजतेय मला रिसेप्शनला जायचं टेन्शन आलंय, म्हणून ती मेकअप खूपच काळजीपूर्वक करतेय. मेकअप खरंच मस्त झालाय. नेहाने इतके दिवस यू ट्यूब व्हिडीओ बघत वेळ घालवल्याचा काहीतरी फायदा झाला.

"डन! आता हे कर्ल्स विंचरले की तू एकदम हॉलिवूड स्टार दिसणार!" नेहा कर्लिंग आयर्न खाली ठेवत म्हणाली.

तिने कसाबसा फक्त अंगठा दाखवला. आता ती तयार होती.

"हम्म, गॉर्जस!" नेहाने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघत शिट्टी वाजवली.

"थँक्स, मी जपून वागेन, तुझी मेहनत खराब नाही करणार!" ती हसत म्हणाली.

"मला शंकाच आहे, तुझ्यासारख्या टॉमबॉयवर हे सगळं किती वेळ टिकेल. पण प्लीज काळजी घे, मधेच एकदा लिपस्टिक वगैरे टचअप कर."

नेहा फोन घेऊन बाहेर गेल्यावर ती आरश्यात बघून स्वतःलाच पेप टॉक देत होती. जे शर्विलबद्दल नव्हे तर पुन:पुन्हा येणारे डॉ. पैंचे विचार डोक्यातून काढून टाकण्याबद्दल होतं. तिने डोळे मिटले. समोर अनिशचे भिजून कपाळावर ओघळलेले केस, दार उघडून आत बसताना अंगाला चिकटलेल्या पांढऱ्या शर्टमधून दिसलेले बायसेप्स, गप्प बसून स्टीअरिंग घट्ट धरलेले मजबूत हात, लांबसडक बोटं आणि तिला ग्रो अप म्हणणाऱ्या आवाजातील संताप. लक्ष देऊन वास घेतला तर नाकात अजूनही त्याचा मस्की सुगंध जाणवत होता. त्याच्या केबिनमध्ये कमी पण कारच्या बंद जागेत तो नशीला गंध दुप्पट पसरला होता. त्याच्या शर्टमध्ये भिनलेल्या पावसासारखाच तो गंध तिच्या मनात भिनून राहिला होता. तोच तिला भानावर आणत  डोअरबेल जोरात वाजली.

"दीssदी? तयार आहेस का?" बाहेरून नेहाच्या ओरडण्याचा आवाज आला."शर्विल आलाय."

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १७

"हो, आलेच!" ती आरशासमोर उभी राहून हसायचा प्रयत्न करत ओरडली. ती बाहेर येताच शर्विल हातातला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून सोफ्यावरून उठला. तो इतका हँडसम दिसत होता की तिला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला प्रत्यक्ष पाहून महिने उलटून गेले होते, तेही पबच्या अंधुक उजेडात. तिच्या आठवणीतला तो आत्ताच्या त्याला नक्कीच न्याय देत नव्हता. त्याचे जेल लावून स्टायलीश सेट केलेले दाट काळे केस, कडक कॉटनचा पांढरा कुर्ता आणि चुडीदार, वर त्याने आकाशी, चंदेरी फ्लोरल वर्क असलेलं मोतीया रंगाचं नेहरू जॅकेट घातलं होतं. खिशात आकाशी रुमालाचा त्रिकोण. पायात गुळगुळीत पॉलिश केलेले ब्राऊन लेदर शूज आणि त्याहून त्याचा पॉलिश्ड चेहरा उत्साहाने चमकत होता. तो इतका मस्त डॅपर डूड होऊन आला होता की तुलनेत तिला अगदीच एखाद्या लहान मुलीने गॅदरिंगसाठी तयार झाल्यासारखं वाटलं.

त्याने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघितलं आणि हसून पुढे होत गालापाशी हवेत मुआह केलं. "हे गॉजस! लूकिंग ग्रेट! मी थोडा तुला मॅच करायचा प्रयत्न केला."

ती जरा गोंधळली, मग आठवलं बहुतेक काल नेहाने त्याला तिच्या ड्रेसबद्दल सांगितलं असावं. तिने नेहाकडे कटाक्ष टाकला. नेहा डोळा मारत आता निघा म्हणून हात दाखवत होती. "माझी काळजी करू नको, नेटफ्लिक्स आहे ना! ब्रिजर्टनचा नवा सीझन संपवतेय मी आज. यू बोथ एन्जॉय!"

"उशिरा पर्यंत जागू नकोस." सायरा रागावली.

"फक्त साडेदहापर्यंत, मग झोपेन." नेहाने चष्मा अजून वर केला. "हे, इट वॉज नाईस मीटिंग यू शर्विल दादा!"

"यू टू, नेहा!" तो तिच्याकडे बघून हसत म्हणाला. नेहा आपल्या चार्म आणि बडबडीने कुणालाही खिशात टाकू शकते.

"नेहा तुझ्यासारखीच दिसते." बाहेर पडून त्याच्या चमकत्या फॉर्च्युनरकडे तिला नेताना तो म्हणाला.

हम्म.

"गोड आहे ती."

"फसू नकोस बरं, चॅप्टर आहे ती!" ती गालात हसली.

तिच्यासाठी दार उघडून तो उभा राहिला. नंतर गाडी सुरू करताना त्याने उशीर झाल्याबद्दल सांगितलं. रिसेप्शन सहालाच सुरू झालंआणि आता सात वाजले होते.

"माझी फ्लाईट उशिरा आली, प्लस हे स्काय ब्लू जॅकेट शोधण्यात वेळ गेला. पार फिनिक्स मार्केट सिटीला जाऊन सापडलं. इट्स ओके. दे विल अंडरस्टँड"

तो गाडी पार्क करून तिचा हात धरून बँक्वेट हॉलकडे निघाला. थोडा वेळ का होईना पावसाने विश्रांती घेतली होती.

तिला उशीर झालेला अजिबात आवडत नाही, स्पेशली अशा फंक्शनला. नाहीतर सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळतात. मुख्य दरवाजातून ते आत शिरले आणि नेमकं तेच झालं. स्टेजवर नवरा नवरीला लोक शुभेच्छा देत होते आणि खाली दोन्ही बाजूला राउंड टेबल्सवर बसलेले लोक दोघांचं निरीक्षण करत होते. तिचे गाल उष्ण झाले. पटकन उलट फिरून तिथून बाहेर पळून जावसं वाटलं. पण ती आता जाऊ शकत नव्हती. शरमून खालमानेने ती कशीबशी पुढे गेली.

शर्विलला काहीच फरक पडला नव्हता. तो मस्त समोरून येणाऱ्यांशी बोलत, हसत काहींच्या पाठीवर थोपटत चालला होता. त्यामुळे त्यांना पुढे जायला अजूनच वेळ लागत होता. तिला शक्य तेवढं मागेच बसायचं होतं.

"तिथे बसूया का?" मधल्या रांगेतल्या टेबलापाशी जागा दाखवत तिने विचारलं.

"आपले सगळे लोक पहिल्या टेबलापाशी आहेत, जागा ठेवली असेल आपल्याला." तो एकदम चिल होता.

पहिल्या दोन रांगा फक्त आडव्या टेबलांच्या होत्या. दोन्ही बाजूच्या टेबलांच्या वर स्फटिकांची दोन भलीमोठी झुंबरे टांगली होती. त्यातून सगळीकडे सोनेरी प्रकाश पडत होता. अरर.. तिला एकदम स्कॅनरमध्ये ठेवल्याचा फील आला. नेहाला आत्ताच्या आत्ता घरी जाऊन बडवून काढायला हवं, हे कशात अडकवलं मला!

"शर्विल, किती उशीर!" पुढच्या टेबलवरून मागे वळून एक कांजीवरम नेसलेल्या गोड काकू हात उंचावत होत्या. "मला वाटलं तू आज पोहोचतोस तरी की नाही." शर्विलची आई! नक्कीच. तेच नाक, तशीच हेअरलाईन.

ते दोघे पुढे पोहोचेपर्यंत त्याच्या आईची नजर सायरावर पडली आणि त्या छान हसल्या. सायराला इतर वेळी त्यांना भेटायला आवडलं असतं पण इथे, बापरे. तरीही ती पुढे टेबलाजवळ जाताच हसली आणि... अचानक तिच्या पायाखालून जमीन नाहीशी झाली. पुतळाच झाला तिचा. मागे चालणारा शर्विल तिच्यावर धडकला आणि ती खाली पडणार इतक्यात हात धरून त्याने तिला सावरले. तिला त्याचा स्पर्श जाणवलाही नाही, समोर काय बघतेय ते तिला कळतच नव्हतं, तिच्या कल्पनेचा एखादा तुकडा आहे की एखादं भयानक स्वप्न पडलंय..

"डॉ. पै?" ती नकळत कुजबुजली.

तिला बघून डॉ. पै ताडकन उठून उभे राहिले. पूर्ण सहा फूट. तिचं तोंड उघडंच राहिलं. हृदय धडधडून कधीही बंद पडण्याच्या अवस्थेत होतं. ही इज डार्कनेस! त्याचे केस, डोळे, सूट, एक्स्प्रेशन्स सगळंच! त्याचं लक्ष तिच्यावरून शर्विलकडे गेलं.
"आर यू किडींग मी? तू तिला इथे घेऊन आलास? इथे??"

वेssट, व्हॉट? तिने शर्विलकडे बघितलं. हे दोघे  एकमेकांना ओळखतात?

तेवढ्यात हॉलभर बॉलिवूड इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचे सूर पसरले आणि स्टेजवर नवीन कपलसाठी भलामोठा वेडिंग केक आणला गेला.

शर्विल न बोलता तिला रांगेतून बाबा, आई आणि अनिशच्या पलीकडच्या खुर्चीकडे घेऊन गेला. "तू शर्विलच्या मैत्रिणीला ओळखतोस? काकूंनी आश्चर्याने अनिशला विचारले. सगळं खूप फास्ट होतं होतं. "ती माझी कलीग आहे, पाच्छी." सहज सांगून तो पुन्हा सायराकडे वळला.

"माय मॉम अँड डॅड. आणि अनिश, माझा चुलतभाऊ." दुसऱ्या बाजूने शर्विल तिच्या कानाजवळ कुजबुजला.

भाऊ! तो शब्द ट्रकची धडक बसल्यासारखा तिच्या अंगावर आला. ह्या दोघांमध्ये मी सँडविच झालेय. दोन भाऊ! एक, ज्याच्यात मी इंटरेस्टेड असायला हवं आणि दुसरा ज्याला मी डोक्यातून काढून टाकू शकत नाहीये. दिस मेक्स नो सेन्स. तिला पडलेले हजार प्रश्न ती आत्ता विचारू शकत नव्हती कारण त्यांच्या आजूबाजूला रिसेप्शन सुरू होतं.

समोर केक कापून नवपरिणीत जोडपे एकमेकांना भरवत होते. अश्यावेळी प्रश्न विचारणं उद्धटपणाचं वाटलं असतं म्हणून ती गप्प राहिली. जीभ चावून तिने समोर लक्ष दिलं. गुड, केकवर फोकस कर.

पण नाहीच.

तिला स्वतःच्या हातांची थरथर चांगली जाणवत होती. तिच्या दोन्ही बाजूला बसलेले दोघे भाऊ स्थिर समोर बघत होते. त्या दोघांना तिच्यासारखा धक्का बसलेला दिसत नव्हता. एक मिनिट, तिला बघताक्षणी डॉ. पै काय म्हणाले होते?

तू तिला 'इथे' घेऊन आलास? इथे!

म्हणजे ते तिला इथे बघून सरप्राईज झाले होते पण शर्विलबरोबर बघून नाही. व्हॉट द हेल!!

तिला शेजारून डॉ. पैंची नजर तिच्यावर जाणवली. त्याला तिने त्याच्याकडे बघायला हवं होतं. पण तिने अजिबात मान वळवली नाही. ती खुर्चीतच जरा सरकली तर त्याचा गुढघा तिच्या पायाला लागला. तो पाय बाजूला करत नव्हता आणि काय करावं तिला सुचत नव्हतं. त्याच्या पाय लागणाऱ्या ठिकाणी लेहंगा चुरगळत होता पण त्याने काय फरक पडतो. त्याचा स्पर्श होत होता तिथली त्वचा अक्षरशः भाजत होती. तिच्या पायापासून अंगात उष्ण लहरी दौडत होत्या, प्रत्येक श्वास तापला होता आणि ती स्वतःवर कितीही ओरडली तरी तिला पाय तिथून हटवता येत नव्हता.

इतक्यात ती अस्वस्थ दिसतेय बघून शर्विलने टेबलावरचा तिचा हात हातात घेत थोपटला. ती जागची हलणार तोच प्रत्येक टेबलावर ठेवलेला रिसेप्शनची टाइम लाईन असलेला प्लॅन अनिशने उचलून तिच्या हातात दिला. जसं काही तिला त्या बावळट प्लॅनमध्ये इंटरेस्ट असेल. तो घेताना तिच्या बोटाना त्याच्या बोटांचा अस्फुट स्पर्श झाला अन तेवढ्याने तिच्या अंगात वीज लहरत गेली. तिला पाय तर हटवता येत नव्हता पण ती किंचित शर्विलकडे वळून बसली आणि गडबडीत चुकून मोकळे केस खांद्यावरून पुढे घेतले. ओह शिट, शिट, शिट! तिच्या उघड्या पाठीवरची नजर तिला जाणवली. मी का घातला हा ड्रेस! का!! तिने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली.

कालपासून घडणाऱ्या एकामागोमाग एक घटनांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. सगळंच खूप घाईत होत होतं. कालचा कारमधला सगळा सीन आणि त्याचा संताप इतका इंटेन्स होता की त्यातून बाहेर येऊन त्याला फेस करायला तिला दोन दिवस तरी हवे होते. ती सोमवारी काय होणार म्हणून घाबरत होती आणि अचानक आजच तो तिच्या शेजारी होता. मांडीला मांडी लावून. वर त्याचा तो मस्की सुगंध. कलोन! तिला त्या वासाची एकूण एक बाटली जमवून टॉयलेटमध्ये फ्लश करावीशी वाटली.

ती शर्विलकडे चेहरा वळवून प्रत्यक्षात शून्यात बघताना शर्विलचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो फक्त ओठ हलवून सॉरी म्हणाला. ती एक शब्दही बोलली नाही.

स्पष्टीकरणे विचारायला आणि द्यायला रिसेप्शननंतर भरपूर वेळ होता.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १८

केक कापून झाल्यावर संगीत आणि नाचगाणी होण्याआधी वेटर्स ड्रिंक्स आणि फिंगर फूड सर्व्ह करू लागले. अनिश स्वतःला अल्कोहोलमध्ये बुडवून घ्यायच्या विचारात होता जेणेकरून सायरा इथे शर्विलबरोबर असल्याचं तो विसरून जाईल. पण ती शेजारीच शर्विलचं कसंबसं तयार केलेलं एक्स्प्लनेशन ऐकत उभी होती. त्याने ऑलरेडी एक ड्रिंक संपवून दुसऱ्यासाठी वेटरला हात केला. सायरा खूप चिडलीय, ऑब्वीअसली. माझ्या भावाने ही सिच्युएशन अत्यंत वाईट प्रकारे हँडल केलीय आणि मी चुकून पॉसीबल लव्ह ट्रँगलचा एक कोन झालोय. मला तो कोन होण्यात काही इंटरेस्ट नाहीये.

"बघ सिम्पल आहे, मी तेव्हा बाऊन्समध्ये खूप वेळ बसलो होतो आणि तू तुझ्या फ्रेंड्सबरोबर आली होतीस. मला अनिश भेटायला येणार होता पण त्याने ऐनवेळी टांग दिली. मग तुला भेटायचा चान्स मी सोडला नाही." शर्विल आता तिच्यासमोर अगदी शेपूट घालत होता. त्याने काळजी घेतली नाही तर सायराचे डोळे त्याचं डोकं जाळून भोक पाडू शकतात. "ठीक आहे, पण तेव्हा तुला माहिती होतं का मी डॉ. पैंबरोबर काम करते?"

परत डॉ. पै.
बुलशिट!

"अनिश!" त्याने चूक सुधारली. तिने त्याच्याकडे थर्ड डिग्री बर्न्स देणारा कटाक्ष टाकला. शर्विल अस्वस्थ होत जॅकेटची कॉलर सरळ करत होता. "मला त्या रात्रीच पण नंतर कळलं."

"मग नंतरसुद्धा तू मला सांगितलं का नाहीस? आपण किती दिवसांपासून चॅट करतोय." तिने मान हलवली. "मला हे सगळं आता खूपच वीअर्ड वाटतंय!"

आता शर्विलचा सूर विनवणीचा झाला. "मी सांगणारच होतो, पण मधेच खूप कामात बिझी झालो. आज तर सांगूनच टाकणार होतो."

अनिश गालात हसत त्यांच्याकडे बघत होता. खरं म्हणजे त्याला तिथं उभं राहून हा सीन बघायला मजा येत होती. रोहित शेट्टीच्या गाड्या ब्लास्ट होऊन स्लो मो मध्ये उडतात तसंच! शर्विलचा बँड वाजताना बघायला मजा येत होती. त्याने अजून एक घोट घ्यायला ग्लास तोंडाजवळ नेला तेवढ्यात सायराने मोर्चा त्याच्याकडे वळवला. "आणि तुम्हालासुद्धा माहिती होतं. मग मला का नाही सांगितलं?"

"आय डोन्ट नो." त्याने रिकामा हात वर केला. "ह्या भांडणात मी नाहीये. तुला विचारायचं असेल ते तुझ्या बॉयफ्रेंड ला विचार!"

तिने हाताची घडी घातली. "ही इज नॉट माय बॉयफ्रेंड. येट! काल मला घरी सोडताना तरी तुम्ही हे सांगू शकत होतात. तेव्हा भरपूर वेळ होता."

त्याने उत्तर देण्याऐवजी हातातला ग्लास रिकामा केला. घशात उतरणाऱ्या द्रवापेक्षा तिची नजर जास्त जाळत होती.

शर्विलने लगेच त्याच्याकडे पाहिलं. "हे, व्हॉट डू यू मीन, घरी सोडताना?" आता शर्विलला मुद्दा मिळाला.

हाहा. धिस इज रिच!

आता चिडायचा टर्न शर्विलचा होता.

त्याला हसू येत होतं. "भाऊ रिलॅक्स! पाऊस पडत होता आणि तिची गाडी बंद पडली म्हणून मी सोडलं. आता माझा खून करणार असल्यासारखं बघू नको."

"धिस इज अ मेस! तुम्ही काय ते सॉर्टआउट करा, मी चालले." सायराने हवेत हात उडवले आणि शेजारच्या सर्व्हिंग टेबलावरचा एक पायनॅपल ज्यूसचा ग्लास उचलून लांबच्या एका खुर्चीत जाऊन बसली.

ती जरा लांब गेल्याचं पाहून तो शर्विलच्या समोर सरकला. त्याला चुकवायला, पळ काढायला जागाच नव्हती. "इज धिस अ गेम टू यू? नक्की काय विचार करून तिला इथे घेऊन आलास?"

शर्विल खांदे मागे करून त्याच्यासमोर ताठ उभा राहिला. "गेम नाही, प्रयोग! मला बघायचं होतं की तिला इथे माझ्याबरोबर बघून तू किती चिडतोस. बाहेर कुठे तू आम्हाला भेटला नसतास. मी तिच्याशी बोलल्याचं ऐकूनच तेव्हा तू विचित्र वागत होतास. सो, मला स्वतःला बघायचं होतं की मी तिच्याबरोबर असताना तू कसा वागशील? आणि माझी शंका बरोबर ठरली."

त्याने भुवई उंचावली. "असं? जरा माझ्या डोक्यात प्रकाश पाड."

शर्विल स्वतःवर खूष होत हसला. "तुला सायरा आवडते. आम्ही आलो तेव्हा ती इथे आल्यामुळे तू अपसेट नव्हतास. ती 'माझ्या'बरोबर आल्यामुळे अपसेट होतास."

त्याने शर्विलच्या खांद्यावर हात ठेवत त्याला ढकललं. शर्विल जरा अडखळून पुन्हा उभा राहिला.

त्याच्या ह्या रिऍक्शनने दोघेही चकित झाले. लहानपणी, टीनेजमध्ये त्यांनी खूप मारामाऱ्या केल्या होत्या पण मोठेपणी कधी फिजिकल व्हायची वेळ आली नव्हती.

तो पुन्हा पुढे झाला." यू आर अ‍ॅक्टिंग लाईक ऍन इडियट!"

शर्विलही पुढे आला. "मेबी सो. पण मी तुझ्यासारखा मिझरेबल फूल नाहीये. तुला असं एकटं राहायची इतकी सवय झालीय की समोर आनंदी व्हायचा इतका मोठा चान्स असूनसुद्धा तुला दिसत नाहीये."

अचानक शेजारून मोहनआज्जो उठून उभे राहिले. "सगळं ठीक आहे ना मुलांनो?"

"एकदम मस्त!" शर्विल हात वर करत निरागसपणे म्हणाला. "नाउ प्लीज एक्सक्यूज मी, मला माझ्या डेटला शोधू दे." हे त्याच्याकडे बघून.

तिला शोधत जाणाऱ्या पाठमोऱ्या शर्विलकडे बघत त्याने टाय जरा लूज केला. त्याच्या डोक्यात शर्विल लावत असलेल्या रंगीबेरंगी कल्पना रुजण्याआधी उपटून फेकायच्या होत्या. शर्विलला वाटतंय, मी सायराचा विषय निघाला की जेलस होतो. माझ्या मनात तिच्यासाठी फीलिंग्ज आहेत. मला फक्त त्याने माझ्या एम्प्लॉयीबरोबर काही रिलेशनशिप ठेवायला नको आहे. तीच डोकेदुखी टाळायचा माझा प्रयत्न आहे.

धिस इज सो स्टूपीड!

त्याने शेजारून जाणाऱ्या वेटरला थांबवत एक शँपेन फ्लूट उचलून पूर्ण पिऊन ट्रे मध्ये ठेवला आणि दुसरा उचलला. वेटर त्याच्याकडे पहातच राहिला. आज पार्टीत बॉटम्स अप करणारा हा पहिलाच गृहस्थ होता. दुसराही ग्लास संपवून त्याने ट्रे मध्ये ठेवला.

"सर, तुम्हाला अजून काही आणू का?" वेटरने काळजीने त्याच्याकडे बघत विचारले.

त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. कुठे जावं विचार करताना त्याला बाप्पा- पाछीबरोबर गप्पा मारणारी सायरा दिसली. ही त्यांच्याशी कसल्या गप्पा मारतेय? शर्विल जवळ कुठे दिसत नाहीये पण मला चिडवायला तो अचानक कुठूनही सायराच्या बाजूला प्रकट होईल. मला चिडवण्यासाठी तिच्या गालावर किस किंवा कंबरेत हात असले काहीही उद्योग करू शकतो. रिसेप्शन सुरू असतानाही त्याने तिचा हात धरला होता. रिडीक्युलस! मला पीडीए अजिबात आवडत नाही. हे असले टची फीली उद्योग. त्याने मला राग येण्यासाठीच ते केलं असणार, तरीही मी त्याला माफ केलं नाहीये. रादर, मला अजूनच राग आलाय. सायराला हे माहिती आहे का, की ती फक्त त्याच्या खेळातलं एक प्यादं आहे.

वाटत तरी नाही. ती एवढी तयार होऊन आलीय. सिल्की लांब केस आज थोडे वेव्ही करून मोकळे सोडलेत. मेकअपमुळे चेहऱ्याचे सगळे फीचर्स उठून दिसतायत. हॉस्पिटलमध्ये असताना ती तिच्या दिसण्यावर फार मेहनत घेत नाही, खरं तर त्याची गरजही नाहीये. तिचा मेकअप आणि ड्रेस छान आहे, लोक माना वळवून तिच्याकडे बघत आहेत पण मला तिचा स्वच्छ, ताजा तरतरीत चेहरा आवडतो. गोबरे गाल, सिल्की केस, क्यूट स्माईल, तिच्यात एक गर्ल नेक्स्ट डोअर चार्म आहे तो कुणालाही भुरळ पाडू शकतो.

एक क्षण त्याने तिचा एक रेग्युलर मुलगी म्हणून विचार केला. त्याने त्यांच्या वर्किंग रिलेशनशिपकडे दुर्लक्ष केलं आणि तिचं उत्साही असणं, तोंडावर उत्तर देणं, तिचा आत्मविश्वास आणि OT मध्ये काम करतानाची जिद्द आठवली. एकदा तिच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर फिरवली. त्याच्या छातीत आग लागली पण लगेच गिल्टी वाटून त्यावर पाणी फिरलं. सायरा 'कोणीही' बाई नाहीये, ती माझी असिस्टंट आहे आणि मी असं पाहिलेलं तिला नक्कीच आवडणार नाही.

"अनिश!" समोरून पाच्छीने हात हलवत हाक मारली. तो त्यांच्या दिशेने गेला. "ही सायरा मला सांगत होती, तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करता म्हणून. मला माहीतच नव्हतं."

"आम्ही तिला प्रश्न विचारून बेजार केलं." बाप्पा शेजारून हसत म्हणाले."तू बॉस म्हणून कसा आहेस ते ऐकायचं होतं!"

"टेक्निकली मी तिचा बॉस नाहीये." तो कडक शब्दात म्हणाला."मी तिला पगार देत नाही."

मिनिटभर त्याचा वैताग सगळ्यांच्या चांगल्या मूडवर पाणी फिरवणार होता, पण सायराने निभावून नेलं. "ह्याच आठवड्यात आम्ही एक खूप किचकट सर्जरी केली. ही केस घ्यायला भारतातल्या बऱ्याच मोठमोठ्या सर्जन्सनी नकार दिला होता पण डॉ. पैंनी एकहाती ती यशस्वी केली."

बाप्पा- पाच्छी आनंदाने तिचं ऐकत होते. त्याच्या कामाबद्दल तो त्यांच्याशी कधीच बोलला नव्हता.

"त्यात इतकं नाही विशेष नव्हतं." तो जरासा शरमून म्हणाला.

पाच्छीने त्याच्या दंडावर थोपटलं."तू गप्प रहा. हां, सायरा तू सर्जरीमध्ये काय करतेस? मला सर्जिकल असिस्टंट म्हणून कोणी असतात, हेच आज कळतंय."

"कसं कळणार, आपला सगळा वेळ आपण नवऱ्याची बायको नाहीतर घाडग्यांची सून बघत घालवता ना!" बाप्पानी मधेच टोचलं आणि पाच्छीच्या नुसत्या वटारलेल्या डोळ्यांत बघत गप्प झाले.

"ती माझी राईट हँड आहे. सर्जरीची इन्स्ट्रुमेंट तयार ठेवणं, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रुमेंट माझ्या हातात देणं, मग जखम शिवून बंद करणं, वर ड्रेसिंग वगैरे सगळं ती करते. तिच्याशिवाय मी सर्जरी करू शकत नाही." हे सगळं बोलताना तो फक्त पाच्छीकडे बघून बोलत होता पण आजूबाजूला शांतता पसरलेली त्याच्या लक्षात आली. शेवटी त्याने मान वळवून शेजारी सायराकडे बघितलं, ती धक्का बसल्यासारखी मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती. पाच्छी त्याच्याकडे बघून गालात हसत होती आणि थँक् गॉड, तोंड बंद ठेऊन बाप्पा हातातल्या ग्लासकडे बघत होते.

त्याने एक श्वास सोडून केसातून हात फिरवला. "सायरा, तुझ्याशी एक मिनिट काही बोलू शकतो का?"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - १९

तिने उत्तर देण्यापूर्वीच त्याने तिच्या कोपराला धरून एका रिकाम्या टेबलकडे नेले.

"हळू! तुम्ही पळताय आणि मला ह्या हील्समध्ये फास्ट चालता येत नाहीये."

त्याने तिचा हात किती घट्ट धरला होता ते जाणवून त्याने चालायचा वेग कमी केला. टेबलापाशी पोचल्यावर तिला एका जागी बसवून तो समोरच्या खुर्चीत बसला, जेणेकरून समोरासमोर बोलता येईल.

"जस्ट टू बी क्लिअर, मी तुमच्या नातेवाईकांशी फक्त पोलाईटली बोलत होते." तिच्या आवाजातली मृदुता आता निघून गेली हाती.

नक्कीच.

"शर्विलने तुला ह्या लग्नाला बोलावताना काय सांगितलं होतं?" त्याने गंभीरपणे विचारलं.

तिने जरा चुळबुळ केली. "अम्म.. म्हणजे विशेष काही नाही. लहानसं रिसेप्शन आहे. घरचेच लोक असतील, नो प्रेशर वगैरे वगैरे."

"त्याने माझा उल्लेखही केला नाही?"

"नव्हताच केला." ती कडक आवाजात म्हणाली. "पण नक्कीच करायला हवा होता."

हम्म. त्याने मान हलवली. पुढची काही मिनिटं त्रासदायक असतील पण आता हे तिला सांगायलाच हवं होतं. नाहीतर सगळं त्याच्यावर येऊन फुटेल. शर्विलला लोकांच्या भावनांशी खेळणं जमेत असेल पण सोमवारी त्याला सायराला फेस करावं लागणार नाहीये, मला करायचं आहे.

"तुझ्या मनात शर्विलसाठी फीलिंग्ज आहेत?" त्याने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले.

"फीलिंग्ज.. अं.." तिने नजर वळवली पण तिचा वाकडा झालेला चेहरा त्याला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरत होतं पण ते समोर न दाखवण्याइतका तो हुशार होता. "वाटलंच मला आणि तेही ठीक आहे कारण शर्विल तुला इथे फक्त मला जेलस करायला घेऊन आला होता." त्याने तोफगोळा टाकला.

ती खाली टेबलकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात काहीतरी भावनांचा खेळ सुरू होता पण तिला नक्की वाईट वाटलंय की पूर्ण गोष्ट ऐकायची उत्सुकता आहे ते कळत नव्हतं.

तिच्या प्रतिक्रियेसाठी त्याने स्वतःला तयार ठेवलं आणि पुढे बोलत राहिला. "सगळं समजावून सांगायला किचकट आणि तेवढंच मुर्खपणाचं आहे. पण सांगायची गोष्ट ही की शर्विलने स्वतःच असा समज करून घेतलाय की तुम्ही दोघांनी डेट केलेलं मला आवडणार नाही आणि माझ्या मनात तुझ्यासाठी काहीतरी बर्निंग डिझायर वगैरे आहे. म्हणून ही थिअरी टेस्ट करायला त्याने तुला इथे आणलं."

तिच्या कपाळावर आठयांचं जाळं पसरलं. "मी ऐकलेली ही सगळ्यात विचित्र गोष्ट आहे."

चला आमचं कुठेतरी एकमत आहे.

"बर्निंग डिझायर? माझ्यासाठी! एह!"  तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला अजिबात अपेक्षित नसलेली गोष्ट तिने केली.

ती खळखळून हसू लागली.

"खरं सांगायचं तर त्याने खोटं बोलून मला इथे यायला भाग पडलं म्हणून मी त्याच्यावर चिडूही शकत नाही. कारण त्याच्या आमंत्रणाला उत्तर 'मी' दिलं नव्हतं."

काय?! आता तो समोर झुकून पुढे ऐकायला उत्सुक होता.

"माझ्या लहान बहिणीने." ती खांदे उडवत म्हणाली. " मला टेक्स्ट करायला खूप बोर होतं म्हणून मी तिला ते काम दिलं आणि ती थोडी वहावत गेली. ह्या लग्नाबद्दल आणि तिने शर्विलच्या आमंत्रणाला हो म्हटल्याचं मला कालच समजलं."

आह! रिलीफ!! "तू जोक करतेयस."

तिने हसता हसता ओठ चावला. "नाही. माझ्या बहिणीला वाटतं मी जरा बाहेर जावं, डेटिंग वगैरे करावं आणि शर्विल माझ्यात इंटरेस्ट दाखवणारा पहिला माणूस होता."

"दॅट कान्ट बी ट्रू!"

तिचं हसू मावळलं. "इट इज! आम्ही सगळे काही दाट केस आणि डार्सीसारखी ब्रूडींग पर्सनॅलिटी असलेले कार्डीऍक सर्जन नसतो."

"डार्सी? तू काय बोलतेयस?" त्याने रोखून बघत विचारले.

"ओ कम ऑन!" तिने हात हलवला."तुमच्या इगोला अजून खतपाणी घालण्याची माझ्यात एनर्जी नाही. तुम्ही डॉक्टर आहात, अट्रॅक्टिव आहात, तुम्ही टिंडरवर वगैरे गेलात तर मॅचेस बघूनबघून तुमचे अंगठे गळून पडतील. एवढ्या ट्रॅफीकला हँडल करण्यासाठी टिंडरला नवा सर्व्हर घ्यावा लागेल."

तो तिच्याकडे पाहून अविश्वासाने हसला. "तू नक्की किती ड्रिंक घेतलीस?" तिला त्याचा जोक बहुतेक आवडला नाही. ती खांदे उडवून जायला निघाली. "थांब." तिचं मनगट धरून त्याने तिला थांबवलं.

परत तेच. स्किन ऑन स्किन. हे संध्याकाळपासून सुरू होतं. तो रिसेप्शन प्लॅन देताना बोटांचा स्पर्श, मग त्याचा गुढघा पायाला टेकणे, त्याने तिला टेबलकडे आणताना धरलेलं कोपर आणि आता हे मनगट! ते इतकं नाजूक आहे की त्याने काळजी घेतली नाही तर त्याने धरलेल्या जागी वळ उठेल.

"यूज्वली आपल्या हातात ग्लव्ह्ज असतात." त्याच्या तोंडातून निघून गेलं. शिट! ऍम आय सो हाय!?

"काय?"

त्याने हातात धरलेल्या तिच्या मनगटाकडे बघितलं. "OT मध्ये तू मला इन्स्ट्रुमेंट हातात देतेस तेव्हा आपण ग्लव्ह्ज घातलेले असतात, म्हणून.."

म्हणून हे इतकं इंटिमेट वाटतंय. त्याने पुढचे शब्द गिळून टाकले आणि तिचा हात सोडला.

"आय थिंक मला घरी जायला हवं. आजची संध्याकाळ म्हणजे टोटल डिझास्टर आहे." ती जाण्यासाठी वळली.

तिचा हात सोडल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याचा आता गोंधळ होत होत होता. तिला जाऊ द्यावं की थांबवावं. ते एकत्र काम करतात, इथे ती त्याच्या भावाबरोबर आलीय आणि आजच्या संध्याकाळचा कुठलाच भाग नॉर्मल नाहीये.

"व्हॉट इफ शर्विल वॉज राईट?" तो अचानक म्हणाला." त्याचा प्रयोग यशस्वी झाला असेल तर?"

ती वळली आणि त्यांची नजर एकमेकांत मिसळली. त्याने विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ तिच्या डोळ्यात हळूहळू झिरपताना त्याला दिसत होता. होली शिट! मी हे काय करून बसलो! हे मी का विचारलं!!

"गॉच्या!!"  तिच्या पाठीमागून शर्विलचा मोठा आवाज आला. परफेक्ट टायमिंग साधत शर्विल पुढे आला आणि त्याने सायराच्या खांद्यावर हात टाकला. तिने अंग चोरले पण ते त्याच्या लक्षात आले नाही. "कमॉन, सगळ्यांना वर दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये बोलावलंय. डिनर सुरू होतोय."

---

ओह गॉड, समोर फाईव्ह कोर्स मील आणि माझ्या आयुष्यातील सगळ्यात विचित्र संभाषण! याचीच कमी होती. तिची भूक मेली होती आणि पोट म्हणजे टेन्शनचा गोळा झालं होतं. तरीही ती शर्विल आणि सगळ्या फॅमिलीसोबत जेवायला बसली होती. डॉ. पै तिच्या समोर बसले होते. परत ब्रूडींग मि. डार्सी स्टाईल! हॉलमधल्या सगळ्या त्यांच्या नात्यात नसलेल्या होतकरू बायकांच्या नजरा त्याच्यावर होत्या. त्याच्या ग्लासात पाणी ओतणारी वेट्रेस पण त्याच्या केसांकडे बघत पाणी ओततेय. दाट, सिल्की, थोडे विस्कटलेले आणि ग्रिप इट व्हाइल ही किस यू सेन्सलेस केस! पाणी काठोकाठ भरून सांडण्यापूर्वी वेट्रेस जागी होऊन पटकन पुढे सर्व्ह करायला वळली.

जेवणाचं टेबल लांबलचक असलं तरी रुंदीला कमी होतं. समोरचे सहा फुटी पाय त्यात न मावून त्याचे गुढघे मधेच तिला स्पर्श करत होते. आतापर्यंत हे दोनदा झालं आणि दोन्हीवेळा तिच्या पोटात खड्डा पडला. तोंडातून उसासा बाहेर पडू नये म्हणून तिने पुढ्यातल्या नानचा तुकडा तोंडात कोंबला. गुड, आता पोटात गोळ्याऐवजी भलामोठा नान जाऊन बसेल.

हॉलमधल्या फक्त बाकीच्या बायकाच डोळ्यात बदाम आणून त्याच्याकडे बघत नव्हत्या, ती समोरच बसल्यामुळे तिला जास्त चांगला ऍक्सेस होता. ही हँडसम माणसाची कुठलीतरी नवी जात असल्यासारखी तिने डेटा जमवायला सुरुवात केली. तिची निरीक्षणे:

१. त्याचे डोळे वितळत्या चॉकलेटसारखे आहेत की मधासारखे ते ठरवणं कठीण आहे. माणूस कितीही कडू असला तरी डोळे गोडच आहेत.

२. ब्लेझर काढून खुर्चीच्या पाठीला घालणे ठीक पण त्या व्हाईट शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड करणे गरजेचे आहे का? जेवताना तरी ते मनगट आणि शिरा पॉर्न न दाखवण्याची आमच्यावर कृपा करावी. TYSM.

३. तो अतिशय वाईट गेस्ट आहे. त्याच्या बाजूच्या लोकांशी तो आतापर्यंत मोजून पाच शब्द बोलला आहे. मला कळतंय कारण माझा एक कान तिकडेच समर्पित आहे. त्याने साधा आवंढा गिळला तरी मला कळेलच.

४. मी कितीही प्रयत्न केला तरी तो माझी नजर टाळतोय. बहुतेक मघाशी बोललेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होत असावा.

त्या गोष्टीचा त्याला पश्चात्ताप व्हावा की नको हे काही तिचं ठरत नव्हतं. ते दार तिच्यासाठी कधी उघडलं जाईल असा तिने या आधी कधी विचारच केला नव्हता.

"सायरा, तू कधीपासून हे काम करते आहेस?" शेजारून तिला शर्विलच्या आईने विचारले. अरे हो, तिच्या आजूबाजूला सगळीकडे पैच पैंचा ढिगारा होता. ह्या काकू एवढ्या प्रेमळ नसत्या तर हे एक वाईट स्वप्न ठरलं असतं. गॉटच्या भाषेत बोलायचं तर त्या सॅम टार्ली होत्या. दयाळू, मदत करणाऱ्या आणि खाण्यापिण्यासाठी नेहमी तयार! आताही त्या तिला समोरची नान ठेवलेली परडी संपवायला मदत करत होत्या.

"बरीच वर्ष झाली. आधी मी हे शिकायचा विचार केला नव्हता."

"अच्छा? मेडिकलला जायचं नव्हतं तुला?"

"मेडिकललाच जायचं होतं पण डॉक्टर व्हायला. एन्ट्रन्ससुद्धा पास झाले पण मग काही कारणांनी पुढे जाता आलं नाही." त्यांच्या चेहऱ्यावर दयेसारखं काही दिसायच्या आत ती पुढे बोलली, "पण मी आता जे काम करते ते मला आवडतं."

"शर्विल मला सांगत होता, तुझ्या लहान बहिणीची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळे मेडिकल सोडावं लागलं का?"

"हो, पण मला आवडतं तिची काळजी घ्यायला. काहीच प्रॉब्लेम नाही." ओह नो, आता ह्या मम्मी पप्पांबद्दल विचारणार..

पण नाही, नशिबाने त्यांनी संभाषण दुसऱ्या दिशेला वळवले.

"एकटी कधीपासून सांभाळते आहेस तिला?"

"वीस वर्षांची असल्यापासून."

"बापरे!" त्यांनी चक् चक् करत मान हलवली. "तुला खूप लवकर मोठं व्हावं लागलं."

ती हसली. "हो, पण त्यामुळे मी खूप काही शिकले. मला त्याचं वाईट वाटत नाही." त्यांनी तिच्या हातावर हात ठेवून थोपटलं. अचानक तिचा घसा दाटून आला. कदाचित बऱ्याच वर्षांनी कोणीतरी तिची प्रेमाने चौकशी केली होती.

"तू बहिणीला सांभाळतेस हे मला माहित नव्हतं." त्यांच्या गप्पा भेदत समोरून डॉ. पैंचा आवाज आला.

ती स्तब्ध झाली. ती काकूंकडेच बघत होती. डॉ. पै ऐकत असतील याची तिला कल्पना नव्हती. आजूबाजूच्या कलकलाटात त्यांना तिचा आवाज ऐकू येणं कठीण होतं. दुर्दैवाने, जरा धीट होत तिने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा ते तिच्याकडे निरखून पहात होते. नो डाऊट त्यांनी प्रत्येक शब्द ऐकलाय.

तिला परत काही मिनिटं मागे जावंसं वाटलं जेव्हा ते तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. आता ते ज्या पद्धतीने तिच्याकडे बघत होते त्यावरून त्यांना तिचा सॉफ्ट स्पॉट कळला होता. हे वाईट आहे. ऑलरेडी ते तिला इतकं डॉमिनेट करू शकतात त्यात अजून एक मुद्दा तिनेच ऍड केला होता.

तिच्या उजवीकडे बसलेला शर्विल शेजारच्या माणसाच्या कुठल्याश्या जोकवर खदखदून हसला. तिला आणि डॉ. पैंना हे लग्न एखाद्या थेरपी सेशनसारखं वाटत असलं तरी शर्विल खूपच एन्जॉय करत होता. तिची कौटुंबिक दुःख ऐकणारे अजून श्रोते तिला नको होते.

"आय विश यू हॅड टोल्ड मी." अनिश काळजीच्या सुरात म्हणाला.

ती जराशी खोकली. "तुम्ही माझ्या हॉस्पिटलबाहेरच्या आयुष्याबद्दल कधी विचारलं नाही."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २०

त्यानंतर जेवण कितीतरी वेळ सुरूच होतं. ती कशीबशी शांत बसून होती पण वेटरने टेबलावरची शेवटची प्लेट उचलताच ती चटकन उठली. मधेमधे येणाऱ्या लोकांना चुकवत वॉशरूमकडे पळाली. अपेक्षेप्रमाणे तिथे रांगेत एक लहान मुलगी, तिची आई आणि एक आजी होत्याच. ती भिंतीला टेकून तिच्या नंबरची वाट बघत थांबली, म्हणजे एकदाचं त्या स्टॉलमध्ये स्वतःला कितीही वेळ लॉक करून लोकांना टाळता येईल.

नंबर येताच टॉयलेट सीटवर टिश्यू पेपर पसरून ती बसली. फोनवर उबर ऍप उघडलं. अकरा वाजले होते आणि जेमतेम दोन कॅब दिसत होत्या. का ही ही! हे कॅब फेअर आहे की जोक! माझं आठवड्याचं पेट्रोल येईल ह्यात. ती कपाळाला हात लावून बसली. बाहेर आजही मुसळधार पाऊस पडतोय आणि इतक्या रात्री वीसेक किमी चालत जाणं अशक्य आहे.

"हॅलो!! लवकर बाहेर या, इथे दोनच वॉशरूम आहेत" कोणीतरी बाई धाडधाड दार वाजवत ओरडली.

"सॉरीss माझं पोट बिघडलंय!" तिने आतून जोरात नळ सोडून उत्तर दिले.

कितीही कॅब शोधून तिला चांगलं डील मिळालं नाही. हम्म.. म्हणजे इथून निसटता येणार नाही, शर्विलचीच वाट बघावी लागणार तर.

बऱ्याच वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिला वाटलं शर्विल तिला काळजीने शोधत असेल पण तो समोर डान्स फ्लोरवर एका छोट्या मुलीला मूनवॉक करून दाखवत होता, नंतर दोन करवल्यांमध्ये नाचत त्याचा नागिन डान्स सुरू झाला. तेवढ्या वेळात ती स्टेजशेजारी दमून बसलेल्या नवरा नवरीला विश करून आली. अजूनही बाकी लोक नाचत होते. ती त्यांच्याकडे पाठ करून वळली. काही लोक नाचण्यासाठी बनलेले असतात तर काही फक्त टाळ्या वाजवण्यासाठी. ती नक्कीच दुसऱ्या कॅटेगरीत मोडत होती.

ती वळून कुठल्यातरी कोपऱ्यातली जागा शोधत होती की तिला आरामात एकटीला बसता येईल. तेवढ्यात तिला खिडकीतून बाहेर बसलेले डॉ. पै दिसले. हॉलला बाहेर एक अर्धवर्तुळाकार बाल्कनी होती. तिने दारात जाऊन त्याच्याकडे पाहिले. तो एकटाच हातात स्कॉच सांभाळत बसला होता. समोर तुफान पावसाने हवा कुंद झाली होती. अशोकाच्या झाडांचे शेंडे वाऱ्याच्या झोतांबरोबर वाकडेतिकडे हलत होते. गळणाऱ्या पागोळ्यांच्या मुसळधारांचे तुषार त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर उडत होते. त्यानेही तिथल्या गर्दीत त्याचा एकांत शोधला होता. पावसाकडे बघत एक मोठा घोट घेऊन त्याने ग्लास कडेच्या टेबलावर ठेवला आणि खुर्चीत मान मागे टाकून वर काळ्याभोर आकाशाकडे पहात राहिला.

मूर्ख माणूस.

इतक्या गार हवेत भिजत, बर्फ घातलेलं ड्रिंक घेतोय आणि मला न्यूमोनिया होईल सांगत होता! आजारी पडेल. पडू दे!

मला काय!

आणि तरीही ती आत जाऊन खुर्चीवर घातलेला त्याचा ब्लेझर घेऊन बाहेर आली. काचेचं दार सरकवताच सोसाट्याच्या गार वाऱ्याचा झोत थेंबांसह तिच्या अंगावर आला. ती पटकन त्याच्याजवळ पोचली. "गॉड! हा काय वेडेपणा आहे. इथे काय करताय तुम्ही?"

त्याने काही रिऍक्ट न करता फक्त हातातला ग्लास उंचावला.

"हम्म, आय गेट इट. पिऊन मरायचा प्रयत्न आहे. संध्याकाळपासून तुम्ही ड्रिंक्स घेताय, आता वेळ जवळ आली असेल." ती तावातावाने म्हणाली.

तो हसला, "अजून एक ड्रिंक. त्याने काम होईल बहुतेक."

तो नेहमीपेक्षा हळू एकेक शब्द बोलत होता. हम्म चढलीय चांगलीच. तिने समोर जाऊन ब्लेझर त्याच्या मांडीवर ठेवला त्या वाऱ्यापावसातून शक्य तितक्या लवकर पळत आत गेली. आता तिला त्याची दया येत नव्हती, तिने जॅकेट द्यायचे काम केले होते. आता तिला फक्त एक रिकामी खुर्ची बघून, पाय ताणून, फोनवर किंडल उघडून बसायचं होतं. पण पुढे जाताच तिला दिसलं की असा विचार करणारी ती एकटीच नव्हती. अजून एक टीनएज मुलगी तिथे हंगर गेम्स उघडून बसली होती. "मी इथे बसले तर चालेल ना?" तिच्यासमोरची रिकामी खुर्ची ओढत सायराने विचारले. मुलीने पुस्तकातून डोकं न काढता फक्त मान हलवली. वाss, माझ्याच जमातीतली आहे.

काही वेळ ती आरामात वाचत राहिली, कुणी काही बोलायला येत नाही ते बरंच होतं. अचानक तिच्या डोळ्यासमोर दोन किल्ल्या हलल्या. तिने मान वर केली तर समोर डॉ. पै.

"प्लीज ड्राइव्ह मी होम."

तिने नाक वाकडं केलं. "का? तुम्ही गाडी चालवू शकता ना?"

"ती शक्यता चार ड्रिंकपूर्वीच संपली."

"मग? दुसऱ्या कुणाला विचारा. सगळे तुमचेच लोक आहेत."

त्यांनी किल्ल्या तिच्या मांडीवर टाकल्या. "मला कोणी नातेवाईक घरी यायला नकोय आणि शर्विल काही इथून लवकर निघणार नाही. मी आधीच सगळ्यांचा निरोप घेऊन बसलो होतो. मला माहिती आहे, तुलाही इथून लवकर बाहेर पडायचंय. एका दगडात दोन पक्षी. आता चल, मी सगळ्यांना आपण निघतोय म्हणून सांगितलंय."

"उबर करा."

"मला दारापर्यंत सुखरूप सोडणारा माणूस हवाय, ड्रायव्हरला वर नाही नेऊ शकत."

फाईन. माझा फोन तसाही मरत आलाय.

मी कुणाचा निरोप घ्यायची गरज नाही पण तरीही मी बाय म्हणून येणार आहे. आय एम नॉट दॅट जर्क. ती नाचणाऱ्या शर्विलकडे गेली. खालून तिने "मी निघतेय" म्हणून डॉ. पैं कडे बोट दाखवून सांगितल्यावर तो हसत वरूनच ओरडला. "Ok कूल, ड्राइव्ह सेफ." तिने डोळे फिरवले. तिला निघालेली बघून ऍटलीस्ट त्याच्या आईला वाईट वाटलं. "लवकरच भेटू परत " म्हणून त्यांनी तिच्या खांद्यावर थोपटलं. जरी तसे काही चान्सेस नक्कीच नव्हते. डॉ. पै दाराजवळ तिची वाट बघत होते.

पार्किंगमध्ये पोहोचेपर्यंत ती पुढे आणि ते हळूहळू तिच्या मागे चालत होते. टोटली हाय.

कारजवळ येताच तिने मागे पाहिलं तर ते दुसरीकडेच चालले होते. "कुठे जाताय?" ती पळत त्याच्याकडे गेली. "सॉरी, मी कारचा रंग विसरलो." तो नकळत हसत म्हणाला. ती हात ओढत त्याला कारकडे घेऊन निघाली. "एक मिनिट." तो थांबून खाली वाकला. उघड्या पार्किंगमधली एक टाईल फुटून त्यात हिरवं रोप उगवलं होतं. त्यावर आलेलं एक बारीकसं पिवळं फुल त्याने तोडलं. "टोकन ऑफ ग्रॅटीट्यूड." त्याने फुल तिच्यासमोर धरलं. तिने ते घेऊन पर्समध्ये टाकलं. "ओके थँक्स, आता चला."

ओह गॉड, मी कुठून अडकले ह्या सगळ्यात.

तिने गाडी अनलॉक केली. ती सोबर असूनसुद्धा त्याला धरून गाडीत कोंबणं तिला कठीण जात होतं. "व्हाय आर यू सो बिग!" ती पुटपुटली. शेवटी त्याला आत बसवून सीटबेल्ट लावल्यावर ती पलीकडे बसली. सीट शंभर फूट पुढे घेतल्यावर तिचे पाय एकदाचे ऍक्सीलेटरपर्यंत पोचले. स्टीअरिंगवरचा तिचा हात जरा थरथरला. आईच्या आजारपणात त्यांची जुनी सॅन्ट्रो विकायला लागल्यापासून तिने कुठल्या कारला हात लावला नव्हता. पण काही मिनिटातच ती हायवेवर होती. कारच्या gps वर त्याचा पत्ता होता.

पावसातून मागेमागे पडणारा धुवट, चमकता रस्ता वळणे घेत होता. आह, खूप दिवसांनी तिला जरा मोकळं वाटलं.

"सायरा, सायरा, सायरा.. व्हाय डू यू हेट मी?" सीटवर टेकलेलं डोकं तिच्याकडे वळवून तो हळू हळू म्हणाला.

तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याचा निरागस चार्म तिच्यावर पूर्ण वेगाने धडकला. त्याचा चेहरा तिच्याकडे वळला होता. त्याचे डोळे तिला विनवत होते. कशासाठी ते तिला कळत नव्हतं. त्याच्या ओठांचं उलटं दुःखी धनुष्य झालं होतं. समोर काँसोलवर त्याने तळहात उघडा ठेवला होता, जसा काही तो तिने हात धरण्याची वाट बघत होता.

तिने स्टीअरिंग घट्ट पकडलं.
"आय डोन्ट हेट यू डॉ. पै."

त्याने समोर फिरणाऱ्या वायपर्सकडे नजर वळवली आणि कुठेतरी दुखल्यासारखा लांब श्वास घेतला.

"माझं नाव अनिश आहे. तू दर वेळी का.."

"ओके. ओके." ती पटकन त्याला गप्प करायला म्हणाली, " अनिश."

त्याने श्वास सोडला. "परत एकदा."

त्याचं न ऐकता तिने fm लावून आवाज मोठा केला. पुढे बोलणं खुंटायलाच हवं कारण कुठल्याश्या 'रात बाकी' प्रोग्रॅममध्ये अरिजित जोरजोरात 'जो तेरी खातिर तड़पे, पहले से ही,
क्या उसे तड़पाना, ओ जालिमा...' गात होता.

हिरानंदानीमधला त्याचा फ्लॅट एकविसाव्या मजल्यावर होता. गार्डने दाखवलेल्या त्याच्या पार्किंगमध्ये तिने कार पार्क केली. त्याला कसाबसा बाहेर काढून ती लिफ्टमध्ये शिरली. फक्त 2102 लिहिलेल्या वूडन लूकच्या चमकत्या दरवाज्यासमोर त्याला उभं करून तिने हात पुसले "ऑल राईट, पोचलो आपण. सी यू." म्हणून ती मागे सरकत होती. तो दाराला कपाळ टेकवून तसाच उभा राहिला, आत जायचं नाव नाही.

"बरं, मी दार उघडते... हम्म, आता जा आत.." तिने त्याच्या पाठीवर एका बोटाने टोकलं. ती त्याला बाहेर सोडून जाऊ शकत नव्हती. काही इमर्जन्सी झाली तर तिथे कोणीच नव्हतं. फायनली ती त्याला धरून आत शिरली. डॉ. पैंची लिव्हिंग रूम. त्याचा हात तिच्या खांद्यावरून लोंबत होता. तिने हातातली किल्ल्यांची कीचेन सोफ्यावर टाकली. कॉरिडॉरमधून एखाद्या जखमी सैनिकासारखं ती त्याला ओढत नेत होती. त्याचं वजन तिला झेपत नव्हतं. समोर प्रत्येक दारात ती थांबू पहात होती.

"नाही, नाही ही स्टडी आहे, नाही हे बाथरूम आहे." तो फक्त नाही नाही मान हलवत होता.

"तुम्ही बेडरूम नक्की कुठाय ते सांगितलं नाही तर तुम्हाला इथेच झोपावं लागेल. आय स्वेअर, तुम्ही इतके जास्त हाय असल्याचं नाटक करताय." ती वैतागून म्हणाली.

फायनली शेवटच्या दारासमोर तो थांबला. तिने दरवाजा ढकलला. त्याची बेडरूम त्याच्या केबिनसारखीच पसरलेली असेल असं तिला वाटलं होतं पण सरप्रायजिंगली बेडरूम चांगली डेकोरेट केलेली आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागी आवरलेली होती. किंग साईज बेडवर हॉटेल स्टाईल पांढऱ्या शीट्स होत्या. पायापाशी एक गुबगुबीत ग्रे कम्फर्टर टक इन केलेला होता. एका भिंतीवर तीन मोठे ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम केलेले नकाशे लावले होते. कोपऱ्यात पांढऱ्या चौकोनी सिरॅमिकच्या कुंडीत एक हिरवंगार झीझी प्लांट होतं. नेहमी पाणी घालत असल्यासारखं. इतकी वॉर्म, कोझी बेडरूम बघून तिच्याच आत काहीतरी व्हायला लागलं.

सायरा, कट ले!

"आय थिंक आता सगळं ठीक आहे, तुम्ही झोपा. मी निघते."

तिच्या खांद्यावरचा हात हळूहळू काढून तो जरा लांब सरकला. तिच्याकडे तोंड करून त्याने तिच्या नजरेला नजर मिळवली. "थांब. तू पूर्ण संध्याकाळ माझ्यापासून पळते आहेस. जस्ट स्टे फॉर अ मिनिट."

त्याच्या बेडरूममध्ये ते दोघे एकमेकांपासून काही पावलांवर उभे होते. एकमेकांकडे बघत.

तिला तिच्या प्रत्येक श्वासाची जाणीव होत होती.

"मला निघायलाच हवं."

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २१

"नको. प्लीज थांब. आय प्रॉमिस, मी काही करणार नाही." तो भुवया जवळ आणून तिच्यावर फोकस करत म्हणाला.

ती मोठ्याने हसली. "तुम्ही काय सांगताय ते तुम्हालाच कळत नाहीये. यू आर टोटली ड्रंक!"

त्याला सकाळी यातलं काहीच आठवणार नाही. आताही ती कोण आहे हे कळतंय की नाही देव जाणे.

सुस्कारा सोडून तो बेडकडे वळला आणि गुबगुबीत मॅट्रेसच्या कडेला धप्पकन बसला. गुढघ्यांवर कोपरं टेकून त्याने डोकं दोन्ही हातात गच्च धरून ठेवलं. "मला माहीत आहे तू... तुम्ही सगळेच, माझ्याबद्दल काय विचार करता. मी एक अतिशय वाईट, भावनाशून्य माणूस आहे. जो OR मध्ये बारीकशी चूक झाली तरी चिडतो, सगळ्यांना फैलावर घेतो, वगैरे. मेबी ते खरं असेल. आय एम नॉट अ गुड मॅन." त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. खिडकीच्या पडद्यामधून येणाऱ्या चंद्रप्रकाशाच्या लहानश्या तुकड्यात त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे चढउतार स्पष्ट दिसत होते. "आय हॅड अ वाईफ. हे तुला माहिती होतं का?"

त्याच्या पटापट विषय बदलण्यामुळे तिची धडधड वाढली. रात्री थांबण्याबद्दल बोलून आता तो त्याच्या लग्नाबद्दल सांगत होता. तिला पटकन वळून तिथून पळ काढायचा होता पण तिचे पाय तिथेच चिकटून राहिले. शुद्धीत असताना जे कधीच उघड करणार नाही अश्या गोष्टी तो आत्ता सांगत होता.

"डिवोर्स?"

त्याने मान हलवून नजर वळवली. "मी MBBS संपताच लग्न केलं होतं. माझ्या आईला खूप वर्ष ब्रेस्ट कॅन्सर होता. सर्जरी, किमो सगळं नीट झालं. शी वॉज अ सर्वायवर. पण मी शेवटच्या वर्षाला असताना कॅन्सर परत आला. तिला जाण्यापूर्वी मला सेटल झालेलं बघायचं होतं. तन्वी आमच्या फॅमिली फ्रेंडची मुलगी, आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. सगळे असं धरूनच चालले होते की आमचं लग्न होणार. तसंच झालं. लग्न होताच तीन महिन्यात अम्मा गेली. माझं MS सुरू होतं, बरोबर रेसिडेन्सी सुरू होती. खूप काम होतं. आम्ही हॉस्पिटलजवळ फ्लॅट घेऊन राहात होतो तरीही मला खूपदा घरी यायला जमत नसे. तन्वीला डॉक्टरची बायको म्हणवून घ्यायला आवडत होतं पण त्यातली रिऍलिटी झेपत नव्हती. मी आठवड्याला 75 ते 80 तास काम करत होतो. त्यात तिच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. आय रिअली फेल्ड ऍज अ हजबंड."

ती गप्प राहून त्याला पुढे बोलू देत होती.

त्याने केसांतून हात फिरवला. "तिला जसं कोडकौतुकाचं फॅमिली लाईफ हवं होतं तसं मी देऊ शकलो नाही. तिने वर्षभर वाट बघितली आणि एक दिवस बॅग भरून निघून गेली. ती गेली हेही मला दीडेक दिवसाने कळलं. मी तिला फोनवर विचारलं 'तुझे थोडे कपडे कुणाला देऊन टाकले की काय, मला कपाटात रिकामी जागा दिसतेय.' त्यावर तिचं कडवट हसणं अजून लक्षात आहे."

"आणि तुमचे वडील?"

"'पपा न्यूरोसर्जन आहेत, मी लहान असल्यापासून ते इतके बिझी होते की माझ्यासाठी ते कधीच जवळ नव्हते. अम्मा गायनॅक होती. मला लहानपणापासून पाच्छीनेच सांभाळलंय. यू नो, शर्विलची आई. अम्मा गेल्यानंतर पपाना UK मध्ये एक चांगली संधी आली म्हणून ते तिकडे गेले आणि तिकडेच राहिले. आय एम नॉट क्लोज टू हिम. बघ, कालच्या लग्नालासुद्धा ते आले नाहीत. नीना त्यांची सख्खी भाची असूनसुद्धा."

ओह, त्याला बायको असेल असं तिच्या कधी डोक्यातही आलं नव्हतं. आजच्या आधी तो तिच्यासाठी फक्त एक सर्जन होता, त्याला काही पर्सनल लाईफ असू शकेल, त्यात तो इतका एकाकी असेल हे कधी वाटलंच नाही. ह्या क्षणी, ह्या खोलीत त्याच्या भूतकाळाबद्दल ऐकताना तिला अचानक जाणवलं की त्याच्या त्या कडक इस्त्रीच्या सूटखाली एक धडधडणारं हृदय आहे आणि त्याला हॉस्पिटलबाहेर काही इच्छा, आकांक्षा असू शकतात.

लोकांप्रमाणेच डिवोर्ससाठी ती त्याला दोष देईल अश्या अपेक्षेने तो तिच्याकडे बघत होता. ते जाणवून तिने एक पाऊल पुढे टाकलं. "तुमचं लग्न तुटलं म्हणून तुम्ही एक वाईट माणूस ठरत नाही. तुमची रेसिडेन्सी सुरू होती, आई गेल्याची पोकळी मनात होती, कदाचित तुमच्या दोघांसाठीही तो काळ खूप अवघड असेल."

"असेल कदाचित. पण तिने कधीच लग्न केलंय आणि ती आता प्रेग्नन्ट आहे." जमिनीकडे बघत त्याचे दुखावलेले शब्द बाहेर आले. "तिची फॅमिली वाढतेय आणि मी डिवोर्सनंतर साधी एक रिलेशनशिपसुद्धा करू शकलो नाही."

"कारण तुमची रिलेशनशिप हॉस्पिटलबरोबर आहे."

त्याने पापण्या उचलून तिच्याकडे पाहिले. "हम्म, मेबी इट्स नॉट इनफ एनीमोर." तो पुटपुटला आणि बसल्या जागीच थाडकन बेडवर आडवा झाला.

तो जागा होऊन उठेल म्हणून ती वाट बघत थांबली, पण नाही. तिने नाकासमोर बोट धरून पाहिलं, तो मेल्यासारखा झोपला होता.

ओह गॉड...

किचनमध्ये जाऊन तिने फ्रिजमधली एक पाण्याची बाटली आणून बेडशेजारी ठेवली. "तुम्ही माझ्याबरोबर हे जे काही वागलाय त्यामुळे मला तुमचा अतीशय राग येतोय. मी ही डेट चांगली एन्जॉय केली असती. एव्हाना मी शर्विलबरोबर नाचत असते. मान्य आहे, मला नाचायला अजिबात आवडत नाही आणि हो, मी शर्विलमध्ये फार इंटरेस्टेड नव्हते. तरीही! हू नोज, लग्नात बरीच नाती जुळतात." त्याच्या शूजच्या लेस सोडता सोडता त्याला ऐकू जाणार नाही म्हणून ती बडबडत होती. एकेका पायातून शूज काढून तिने खाली टाकले आणि त्याचे पाय उचलून बेडवर ठेवले. बास, खूप झालं. आता हा ओकला तर मी साफ करणार नाहीये.

"तुम्ही वाईट नाही आहात फक्त जरा जास्तच काम करता, म्हणूनच तुमची एक्स सोडून गेली असेल. तिला खरंच निग्लेक्टेड वाटलं असणार. शुभदा म्हणत होती आताही तुम्ही बऱ्याचश्या रात्री हॉस्पिटलमध्येच झोपता."

तिने एकदा त्याच्याकडे आणि शेजारी ठेवलेल्या पाण्याकडे नजर टाकली. डन, निघावं आता. इथून कॅब सहज मिळेल आणि अंतरही मॅनेजेबल आहे. उबरसाठी तिने पर्समधून फोन बाहेर काढला. शिट!! फोन डेड झालाय. डे.. ड!! मी का ते किंडल उघडून बसले, त्यानेच बॅटरी खाल्ली असणार. नोssss नो!! तिला किंचाळावंसं वाटलं.

चलाखी दाखवत तिने ब्लेझरच्या खिशातून त्याचा फोन बाहेर काढला. एंटर पासकोड! Obv! आता काय करू.. काळजीने नेहाचा जीव खालीवर होत असेल. त्याच्या घरात लँडलाईन दिसत नाहीये. आत्ता दीड वाजलाय, ह्या वेळी इथे कुणाच्या घरी जाऊन पण मदत मागू शकत नाही. कोण कसा माणूस भेटेल काय सांगावं.. तिने बेडच्या पलीकडे जाऊन शेजारी प्लग केलेला चार्जर बघितला. हुंह, आयफोन! माझ्या सॅमसंगच्या काय कामाचा.. हताश होत ती तशीच फोन हातात धरून बेडला टेकून खाली बसली. अजून तीन चार तास, जरा पहाट होताच तो उठण्यापूर्वी मी पळ काढेन.. पाठीला बेडची कडा टोचल्यावर तिने उठून त्याची एक उशी टेकायला घेतली. उशीतही त्याचा तो मस्की सुगंध भिनलेला होता. ती त्या गंधापासून लांब राहायच्या प्रयत्नात होती पण काय उपयोग! ती स्वतःच पूर्णपणे त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये होती. त्याची बेडरूम, त्याच्या श्वासांची लय, त्याचा गंध. ती विचारांनी जरा थरथरली.

खिडकीतून चंद्र किरण आत झिरपत होते. त्या मंद उजेडात तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं, त्याचा श्वास एका लयीत शांत सुरू होता. तिला लागोपाठ दोन जांभया आल्या. पापण्या खूप जड झाल्या होत्या. बहुतेक काकूंनी आग्रहाने खायला लावलेली शेवटची दोन वाट्या बासुंदी अंगावर आली होती. तिने डोळे ताणून उघडे ठेवायचा प्रयत्न केला पण उपयोग नाही. स्वतःला झोपू नको, झोपू नको सांगतानाच तिच्या जडावलेल्या पापण्या बंद झाल्या...

आणि ती चहूबाजूनी भणाणता वारा आणि उसळणारा समुद्र पसरलेल्या कुठल्यातरी भल्यामोठ्या दगडी किल्ल्यावरच्या महालात जागी झाली. खालच्या किनाऱ्यावरच्या स्पीकर्समधून हिमेश तक ता ना ना ना, तंदूरी नाईट्स, तंदूरी नाईट्स, तंदूरी नाईट्स रेकत होता. गाण्याच्या तालावर तिच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांमधून ड्रॅगन्स म्हणजे लालभडक ड्रोगॉन आणि हिरवागार ऱ्हेगार उडता उडता नाचत ज्वाळांच्या जिभा लपलपत होते. ठिणग्या जवळ आल्यावर ती घाबरून स्वतःला महालाच्या कानाकोपऱ्यात लपवत होती. कुठल्याही क्षणी तिची तंदूरी होणार होती.

इतक्यात एक दाट केस आणि मधाळ डोळ्यांचा, 'पांढरा शर्ट आणि ब्लॅक ट्रावझर्स '?! घातलेला सुंदर राजपुत्र दार उघडून आत आला आणि खिडकीमागे लपून त्याने नाईट किंगच्या भाल्याने ऱ्हेगारला बरोब्बर टिपला. ऱ्हेगार समुद्रात कोसळताना बघून त्याच्या मागोमाग ड्रोगॉन नाहीसा झाला. तो परत येऊन हल्ला करण्याआधी राजपुत्राने तिला बाहेर नेण्याऐवजी उचलून एका मंचकावर झोपवले. ती त्याला सांगत होती, तिला झोपायचं नाहीये, तिला निघायचंय, घरी तिची बहीण वाट बघतेय, तरीही त्याने तिच्या अंगावर उबदार पांघरूण घातले आणि चक्क तिच्याकडे पाठ फिरवून बाहेर निघाला!

"हेय! तू काहीतरी विसरतोयस..." त्याने वळून पाहिलं आणि तिने ओठांचा चंबू करून मुआह, मुआह स्मूची आवाज काढून दाखवले. हेलो! हे स्वप्न ऍटलीस्ट PG 13 आहे. मला माझा किस हवाय!! पण तो राजपुत्र फक्त गालातल्या गालात हसला आणि बाहेर चालू पडला.

ह्यां! स्वप्नातसुद्धा असला तत्त्ववादी, खडूस राजकुमार!! काय नशीब आहे...

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २२

पावणेसहाचा अलार्म खणाणला आणि तत्क्षणी ती ताडकन उठून बसली. मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. तिने पटकन उचलून अलार्म बंद केला. स्वप्नातला शेवटचा भाग तिला आठवत होता. तिने आजूबाजूला पाहिले तर ती अजूनही मस्की, वूडी सुगंध येणाऱ्या खोलीत, पांढऱ्याशुभ्र मऊ बेडवर झोपली होती. अचानक तिला जाणीव झाली की आपण अजूनही डॉ. पैंच्या घरात आहोत आणि त्याहून वाईट म्हणजे हा त्याचा बेड आहे.

ओह नो, म्हणजे पहाटे कधीतरी त्यानेच तिला उचलून वर ठेवले आणि ती त्याच्याकडे किसची भीक मागत होती.. ओ नो नो नो.. तिने कपाळावर हात मारला. तिने ताठ बसून पटकन शेजारी पाहिले, नशीब! तो तिथे नव्हता. पटकन तिने आपले कपडे पाहिले, अस्ताव्यस्त असले तरी सगळे अंगावर होते. मोबाईल चार्जर? ओह, त्यानेच दुसरा चार्जर लावलेला दिसतोय.  हुश्श! तिने पटकन मोबाईल उचलला. नेहाचे बावन्न मिस्ड कॉल्स होते. तिने लगेच कॉल केला.

"दीss द, कुठे आहेस तू, बरी आहेस ना?" नेहा पॅनिक होत फोनमधून ओरडली.

तिने फोनवर हात ठेवून आवाज न करता कानोसा घेतला, जास्त आवाज करून चालणार नाही. डॉ. पै उठायच्या आत तिला तिथून पळायचं होतं.
"ऐक, ऐक. मी ठीक आहे. काहीही प्रॉब्लेम नाहीये. मोठी स्टोरी आहे, पण मी थोड्या वेळात घरी येतेय. आल्यावर बोलू."

"हुश्श, मला केवढी भीती वाटत होती. नको नको ते विचार डोक्यात येत होते. मला रात्रभर झोप लागली नाही. पावणे सहा झालेत, आता मी झोपते." सांगून नेहाने कॉल कट केला.

तिने कम्फर्टर झटकून बेडवर पुन्हा पहिल्यासारखा खोचून ठेवला. खाली उतरून दबक्या पावलांनी तिने टेबलावरची पर्स उचलून त्यात मोबाईल टाकला, टेबलाच्या पायाशी नीट ठेवलेले तिचे सँडल्स.. ओह, हे नक्की डॉ. पैंनी काढून ठेवले असणार. तिच्या घोट्याभोवतीचा सँडल स्ट्रॅप काढताना त्याला इमॅजिन करून तिने ओठ चावला. तिने त्याचे कसेतरी काढून खाली टाकलेले शूज आठवून ती जरा शरमली.

तिच्या सगळ्या वस्तू गोळा केल्यावर ती दबक्या पावलांनी बेडरूमच्या दारापर्यंत गेली. त्याच्या नजरेस न पडता ती जर बाहेर पडू शकली तर रस्त्यावर जाऊन लगेच कॅब मिळेल. तेवढ्यात मागे जरासं काही खुट्ट वाजलं. ती घाबरून स्तब्ध झाली. ती किंचाळणार इतक्यात बाथरुमच्या दारातून अनिश डोकावला.  त्याच्या हातात टूथब्रश होता. अंगात ग्रे जॉगर्स आणि बाकी काहीच नव्हतं. तिने इतक्या वेळा पापण्यांची पिटपिट केली जसं काही ती ह्या सिच्युएशनमधून उडून जाणार आहे.

"गुड!"तो मान हलवून म्हणाला. "उठलीस!" आणि परत वळून तोंड धुवायला गेला. तिने तो बाहेर यायच्या आत कुठून पटकन सटकता येईल म्हणून खिडकी, दरवाजा सगळीकडे पाहिलं. पण काही सेकंदात तो बाहेर आला आणि तिच्या शेजारून लिव्हिंग रूममध्ये गेला. आता तो ब्रशशिवाय आणि शर्टशिवाय होता. तिने त्याचे ब्रॉड खांदे आणि पाठीच्या पिळदार मसल्सवरून नजर फिरवली. ती बघत असतानाच त्याने मान वळवून पाहिलं आणि तिने पटकन नजर खिडकीकडे वळवली. "बाथरुमच्या कॅबिनेटमध्ये नवा ब्रश आहे."

थँक्स म्हणून ती पटकन ब्रश करून आली.

" बाहेर ये, मी ब्रेकफास्ट बनवतोय." त्याचा आवाज आला.

ती बाहेर येत हसली. "मला ब्रेकफास्ट शब्द ऐकू आला. इज इट रिअल?"

त्याच्या कपाळाला आठी पडली. "का? तुला भूक नाही लागली?"

तिने भुवया उंचावल्या. ही काय खाणंपिणं डिस्कस करायची वेळ आहे? किती महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या राहिल्यात. जसं की आपण शत्रूपासून एकदम शर्टलेस ब्रेकफास्ट बडीज् कसे झालो वगैरे?

"एक मिनिट! मला सांगा, मी रात्री बेडला टेकून खाली झोपले होते की नाही?"

आता तो पूर्ण वळून सोफ्याला टेकून उभा राहिला.
त्याचे ऍब्ज कातीव आणि कातील आहेत.

"हो."

"मग तुम्ही मला उचलून वर ठेवलं आणि पांघरूण घातलं."

"हम्म."

तिचे गाल आता तापले होते पण तरीही एक कन्फर्मेशन करायचंच होतं. " ओके. आणि मी स्वप्नात बघितलं की.. आय आस्क्ड फॉर अ किस! असं काही झालं नाही. हो ना?" तिने एका श्वासात धडाधड बोलून टाकलं.

अचानक त्याचा चेहराभर मिश्किल हसू पसरलं. "ते नक्कीच झालं! इट वॉज क्यूट!"

हम्म, विचार केला होता तसंच. तिने हाताची घडी घातली आणि खालमानेने भराभर त्याला पास करून मुख्य दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात त्याने तिचे खांदे धरून तिला मागे ओढलं. "थांब, थांब. मी ते क्यूट होतं असं म्हटलं. इतकं एम्ब्रास व्हायची गरज नाही."

"एम्ब्रास नाही ट्रॉमा म्हणा. मला थेरपीची गरज आहे!"

"डोन्ट वरी, मी सोफ्यावर झोपलो होतो." तो अर्धवट हसला आणि तिचं लक्ष त्याच्या झोपून विस्कटलेल्या केसांवर खिळून राहिलं.
"बघ, कालच्या माझ्या वागण्यासमोर हे काहीच वाईट नव्हतं. पिऊन इतका हाय होणं मग तुला मला घरी सोडायला लावणं आणि झोपून जाणं! इतका हाय मी कॉलेजच्या फेअरवेल पार्टीनंतर पहिल्यांदा होतो. आय नेव्हर गो बियॉन्ड टू ड्रिंक्स"

त्या फेअरवेल पार्टीतही तो इतका हाय नसेल, आय डाऊट.

"तुम्ही मला तुमच्या एक्स वाईफबद्दल सांगितलं." ती भराभर गोष्टी बोलून टाकायच्या इराद्याने म्हणाली.

हम्म. त्याने फार उत्साह दाखवला नाही.

"आणि तुम्ही सांगितलं की हॉस्पिटल मला एक मोठा हाईक देणार आहे." ती हसू दाबत म्हणाली.

"स्ट्रेंज! हे सांगितल्याचं काही मला आठवत नाहीये." तो हसून मान हलवत म्हणाला. त्याने तसेच तिचे खांदे धरून तिला पुढे नेत डायनिंग टेबलच्या खुर्चीत बसवलं. ओट्यावर ब्लॅक कॉफी आधीच तयार होती. "दूध? की ब्लॅक?"

"ब्लॅक चालेल."

"शुगर?"

"मला लेक्चर देणार नाही ना?" तिने भुवया उंचावून विचारलं.

"चिल! हे हॉस्पिटल नाहीये."

"दीड चमचा!"

त्याला मगमध्ये कॉफी ढवळताना बघणं जगातली सेक्सीएस्ट गोष्ट होती. तिने स्वतःला जरा कंट्रोल केलं. ह्या महागड्या टेबलावर लाळ गाळणं बरोबर नाही, माझी अक्खी सॅलरी जाईल. त्याने काळा मग आणून तिच्या हातात दिला. "वॉव, लूक ऍट यू बिकमिंग अ डॉक्टर अँड शिट!" तिने मगवर लिहिलेलं मोठ्याने वाचलं.

"शर्विल! दुसरं कोण!" तो ओठ वाकडा करत म्हणाला. "डॉक्टर्स कान्ट फिक्स स्टूपिड, बट वी कॅन सिडेट इट!" त्याने त्याचा मग वाचला.

" मॅडे तो!" ती हसतच होती. तिने मग उचलून कॉफीचा घोट घेतला.

"गुड?" तिची प्रतिक्रिया बघत त्याने विचारले.

आह, ते कातील ऍब्ज तिच्यापासून फूटभर अंतरावर होते. तिने काही न बोलता दोन्ही अंगठे उचलून दाखवले. तो मान हलवून फ्रिजकडे गेला आणि एकेक वस्तू काढून शेजारी ओट्यावर ठेवायला लागला. अंडी, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, चीज.

हा इतकं नॉर्मल वागतोय, जसं काय आम्ही रोजच इथे बसून नाश्ता करतो. तिला आणखी अस्वस्थ वाटलं. तो डोक्यावरच्या कॅबिनेटमधून तेलाची बाटली काढत होता. "तुम्ही प्लीज एक मिनिट थांबाल का?" ती ताठ होत म्हणाली.

तिचा बदललेला आवाज जाणवून तो वळला आणि ओट्याला टेकून उभा राहिला.

"तुम्ही काल रिसेप्शनमध्ये मला काही गोष्टी सांगितल्या. आता नाही म्हणू नका." आवाज शक्य तितका शांत ठेवत ती बोलू लागली. "तुम्ही म्हणालात शर्विलचा प्रयोग यशस्वी झाला असेल. म्हणजे नक्की काय?"

त्याने एक लांब श्वास सोडला." आय थिंक, हे सगळं आपण पोटात काहीतरी गेल्यावर बोलूया.

"नाही. आत्ताच बोलायचं आहे. आपण इथे आल्यावर तुम्ही अजून कायकाय बोललात. कदाचित ते नशेत बोलणं असेल, पण मला वाटलं तुम्ही माझ्याकडे स्वतःबद्दल थोडे ओपन अप होताय."

झालं, सगळं खरं खरं तिने बोलून बाहेर टाकलं होतं. आता त्याने ते हवं तसं वळवून मी नशेत होतो म्हणण्याची ती वाट बघत होती. म्हणजे सगळ्या गोष्टी कार्पेटखाली सारून त्यांची वर्किंग रिलेशनशिप नीट सुरू राहील.

त्याने हाताची घडी घातली."मी सांगितलेलं सगळं माझ्या लक्षात आहे." त्याची नजर तिच्या डोळ्यात खोल जात होती.

तिला नजर वळवायची होती पण हा पुढचा प्रश्न खूपच महत्त्वाचा होता. "आणि त्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतोय?"

तो जराही हलला किंवा बावचळला नाही. "नाही. इन फॅक्ट मी तेच सगळं पुन्हा सांगेन. काल रात्री मी कबूल केलंय की तुला शर्विलबरोबर बघून मी खूप जेलस होतो. ते खरं आहे."

तिचे डोळे मोठे होऊन बाहेर पडायचेच बाकी होते.
"ओह.." तिला काय बोलावं सुचलंच नाही. त्याच्याबरोबर नॉर्मल वागावं की काय, पळून जावं? ऑम्लेट पार्सल करा प्लीज. TYSM.

त्याने सुस्कारा सोडून तिच्याकडे पाठ केली आणि बोलमध्ये अंडी फोडू लागला. "कोथिंबीर चिरशील का? पुढे बोलण्याआधी मला काहीतरी खायचंय."

अश्यावेळी कोथिंबिरीबद्दल कोण बोलतं?!

तरीही तिने सांगितल्याप्रमाणे केलं. ओट्यापाशी त्याच्या शेजारी उभी राहून त्याला ऑम्लेट बनवायला मदत करू लागली. चिराचीर संपवून तिने उरलेल्या कॉफीचा घोट घेतला. ती अजूनही कालच्या ड्रेस आणि मेकअपमध्ये होती, तरी बाथरूममध्ये तिने बराचसा मेकअप धुवून पुसला होता. त्याला त्याचा फार फरक पडलेला दिसत नव्हता. कॉफी संपवताच तिने त्याला तिच्याकडे बघताना पकडलं.

"काय?" तिने चेहरा चाचपून पाहिला.

"काही नाही. ऑम्लेट खाऊया." तो किंचित हसत होता.

"ओके, पण कृपा करून तुम्ही आधी काहीतरी कपडे घाला." ती ओठ चावत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २३

माझा स्वतःवर विश्वास बसत नाहीये, एवढी मी माती खाल्लीय. ती मला घाबरतेय. खुर्चीच्या टोकाला बसून ऑम्लेटचे लहानसे घास कसेबसे खातेय. टेबलाखाली तिचे पाय सलग हलत आहेत. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय. साहजिक आहे, काल संध्याकाळपासून इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यात... तो खाताखाता तिचं निरीक्षण करत होता.

काल सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या मनात ती फक्त त्याची कलीग होती आणि आज सकाळी अचानक फ्यूचर लव्ह इंटरेस्ट! अजून त्याच्या मेंदूला हे नीट प्रोसेस करता येत नव्हतं, पण दोघे मिळून काहीतरी ठरवता येईल, जर तिने आत्ता धीर करून त्याच्या नजरेला नजर दिली तर!

जेव्हा त्याने तो जेलस असल्याचे सांगितले तेव्हा ती घाबरलेली स्पष्ट दिसत होती. तिचे डोळे मोठे झाले, चेहऱ्याचा रंग उडाला आणि तोंडून फक्त ओह! बाहेर पडलं होतं. तेव्हा पटकन त्याच्या मनात 'ओह आय वॉज जस्ट जोकिंग, हाहा' असं ओरडावं का असं येऊन गेलं.

आताही ती नीट खात नाहीये. चुळबुळ सुरू आहे.

"आवडलं नाही?" शेवटी त्याने विचारलं.

"हो, आवडलं ना. म्हणजे छान झालंय." ती गडबडून एक मोठा घास घेत म्हणाली.

ओके. परत शांत बसूया.

अजून थोड्या अस्वस्थ, शांत मिनिटांनंतर त्यांचं खाणं झालं आणि त्याने ताटल्या डिशवॉशरला लावल्या. त्याचं काम झाल्यावर त्याने मागे पाहिलं तो ती हातात पर्स आणि शूज घेऊन जाण्याच्या तयारीत होती. "अं, मी निघते. नेहा वाट बघत असेल."

"कॅब वगैरे नको, मी सोडतो. फक्त मला शूज घालू दे." त्याने केसांतून हात फिरवत ते जरा नीट केले. अंगात एक नेव्ही ब्लू टीशर्ट त्याने मगाशीच तिने सांगितल्यावर अडकवला होता.

तो जरा गोंधळला. तिला लगेच जाऊ द्यायचं नव्हतं पण थांबवून ठेवणंही योग्य दिसलं नसतं. कालपासूनच्या सगळ्या टाईमलाईनचा विचार केला तर ती पळ काढायला बघतेय, ते योग्यच होतं. त्याने तिला तो जेलस असल्याचे सांगणे, पिऊन घरी येऊन मूर्खासारखी आपली डिप्रेसिंग दुःखी कहाणी ऐकवणे असं सगळं केल्यावर नो वंडर, ती इथे त्याच्याबरोबर थांबायचे मिनिट्स मोजत असेल.

तिच्याबरोबर पार्किंगमध्ये पोचल्यावर त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. ती किंचित हसली. पलिकडे जाऊन आत बसताच त्याचे गुढघे स्टीअरिंगवर आपटले.

"सॉरी, मी केलंय ते! माझे पाय पोचत नव्हते." ती जरा शरमून हसत म्हणाली.

तिच्या हसण्याच्या आवाजाने त्याच्या पोटात आलेली टेन्शनची गाठ सुटून मोकळी झाली. सीट  मागे करून त्याने गाडी सुरू केली. हे अजिबात कठीण नाहीये. पुढच्या सिग्नलला थांब आणि म्हण, सायरा तू मला आवडतेस. आय वॉन्ट टू आस्क यू आउट! त्याचं मन त्याला सांगत होतं. इतकं सिम्पल आहे, पण दुर्दैवाने त्याला कुठेतरी ती नाही म्हणण्याची भीती वाटत होती.

त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीतून बाहेर बघत नखं चावत होती की कुठल्याही क्षणी बाहेर उडी मारून पळून जाईल. अति हळू चालवूनसुद्धा वीस मिनिटात तिच्या घरासमोर येऊन त्याने कार थांबवली. सकाळी  रस्ता नेमका बऱ्यापैकी रिकामा होता.

"थँक् यू सो मच." ती त्याच्याकडे वळून म्हणाली.

"तू काल माझी इतकी काळजी घेतल्यावर एवढं तरी मी करायलाच हवं."

"ओह प्लीज, मी इतकी काही काळजी वगैरे घेतली नाही. उलट किस मागत होते, आठवतंय!" ती शरमून म्हणाली.

त्याने हसणं टाळलं."आय सेड इट वॉज क्यूट. इतकं मनाला लावून घेऊ नको."

"हम्म." तिचं लक्ष त्याच्या ओठांकडे गेलं. एव्हाना तिने दार उघडून घराकडे चालायला हवं होतं. त्यांच्यात बोलायला आता काही उरलं नव्हतं. तरीही ती बसून राहिली. तिने त्याच्याकडे बघितल्यावर त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला. त्या सीटवर ती एवढीशी असून तिचा प्रेझेन्स गाडीभर होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या मोकळ्या केसांच्या बटा सगळीकडे पसरल्या होत्या, गाल लालसर झाले होते. तिच्या पाणीदार डोळ्यात खूपश्या अव्यक्त भावना तरळत होत्या. तो तिला बोलायला सांगता सांगता थांबला कारण ती ओठ चावत होती आणि त्याला ते थांबवायचं नव्हतं.

तिने दाराकडे वळून दार उघडायला हँडल पकडलं आणि पुन्हा वळून बघितलं.

पुढचे काही क्षण त्याला युगांसारखे भासले. त्याचं हृदय दुखायला लागेपर्यंत धडधडत होतं. त्याने स्टीअरिंग सोडलं आणि ती इंचभर त्याच्याकडे सरकली. अगदी जराशीच. तिच्या ते लक्षातही आलं नसेल, पण ते जरासं अंतर त्याच्यासाठी पुरेसं होतं. होय नाहीचा प्रश्नच नव्हता. त्याने बोटं तिच्या मोकळ्या केसात खुपसली आणि तिला पुढे ओढलं.

धिस इज इनसेssन!

तिला सोडून जाऊ द्यायला हवं. मी अति करतोय.. त्याचं मन सांगत होतं.

"अनिश..." ती त्याच्या कानापाशी कुजबुजली.

बस! देअर्स नो होप नाऊ! त्याच्या डोळ्यातला मध आता उकळत होता.

"आय एम गोइंग टू... " त्याचा आवाज बदलला होता. "किस यू." आणि त्याने केलं. सुरुवातीला हळुवारपणे तिच्या ओठांवर ओठ टेकताना, तिने त्याच्या छातीवर हात ठेवून ढकलण्याची किंवा चेहरा वळवून गाल पुढे करण्याची त्याच्या मनाने तयारी केली होती. पण तिने हलकेच श्वास सोडला आणि त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्याला आत्ताच्या आत्ता हीच सायरा हवी होती. त्याच्या गाडीत बसून, त्याचा टीशर्ट मुठीत धरून, त्याला स्वतःकडे ओढणारी. त्याने मान किंचित तिरकी करत झुकवली आणि तिच्या ओठांचा पूर्ण ताबा घेतला. त्याची दोन दिवसांची किंचित वाढलेली दाढी तिच्या हनुवटीला घासली आणि तिचा मेंदू पूर्ण बंद पडला.

तिने गळ्यात टाकलेले दोन्ही हात मानेवरून हळूच त्याच्या केसात शिरले आणि रेशमी केसांमधून बोटं फिरवताना तिने डोळे मिटले जसं काही ती कित्येक दिवसांपासून हे करायचीच वाट बघत होती.

इनोसंट किस वाढत वाढत बॉर्डर क्रॉस करून जायला लागला. त्याला तिला स्वतःजवळ अजून ओढून घ्यायचं होतं पण अश्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीसाठी कारमधली जागा अपूरी होती. इन्व्हायरमेन्ट गेलं चुलीत, मी आता हमरच घेतोय!

ती मध्येच काहीतरी बोलू पहात होती पण तिचे शब्द त्याच्या ओठांमध्ये बुडून गेले. त्याचा एक हात तिच्या विस्कटलेल्या रेशमी केसांत होता आणि दुसऱ्या हाताचं बोट त्याने तिच्या गळ्यावरून कॉलर बोनपर्यंत ट्रेस केलं. तिच्या अंगावर शिरशिरी उमटली. ही सकाळ त्या दोघांसाठी अविस्मरणीय होत होती. हळूच स्वतःला सोडवून ती किंचित मागे सरकली.

तिचे ओठ लालेलाल झाले होते. तिने ओठ जागेवर आहेत ना बघितल्यासारखा तोंडावर हात ठेवला. त्याने पुढे होत तिचा हात बाजूला केला आणि जवळ जाऊन ओठ न टेकता तिथेच थांबला. तो सुचवत होता की आपण हे पुन्हा करू शकतो, तू फक्त हो म्हण..

अचानक तिचे डोळे मोठे झाले आणि तोंडावर हात घेऊन ती झटक्यात मागे सरकली. ओ माय गॉड!!

ती एवढंच म्हणाली पण तेवढ्या शब्दांनी ते करंट लागल्यासारखे धाडकन वास्तवात आले. ते दोघे कारमध्ये होते, लवकरच ती बाहेर पडेल, तिच्या घरात जाईल. आज त्याचा ऑफ होता आणि तिची सिक लीव्ह त्याने शुभदाला कळवली होती. पण उद्या? उद्या सकाळी ती हॉस्पिटलमध्ये येईल आणि त्याची असिस्टंट म्हणून ऑपरेशन टेबलसमोर उभी राहील. सगळ्या मार्गांनी ऑफ लिमिट्स!

तिने तोंडावरचा हात बाजूला केला तेव्हा त्याला दिसलं की ती त्याच्या डोक्यापलिकडे खिडकीतून बाहेर बघतेय. ओह, ते 'ओ माय गॉड' किसची प्रतिक्रिया नव्हती तर! त्याला जरा हलकं वाटलं.

"वी हॅव ऑडियन्स!" ती हसत म्हणाली.

त्याने वळून पाहिलं तर खरंच तिच्या घराच्या मोठ्या खिडकीत एक चेहरा दिसत होता.

"माझी बहीण. तिने बघितलं बहुतेक आपल्याला." तिने जीभ चावली.

त्याने नेहाकडे हसून बघत हात हलवला. नेहाचे डोळे विस्फारले आणि पटकन ती खिडकीतून बाजूला पळाली.

"गेली."

"हम्म, बहुतेक अजून चांगला स्पॉट शोधत असेल. तिने दुर्बीण वगैरे शोधायच्या आत मला पळायला हवं!"

आह! तिला एवढी अविस्मरणीय सकाळ दिल्यावरही हे असं!!

तिला दारापर्यंत सोडायच्या बहाण्याने तो तिच्याबरोबर गेला. खरं तर त्याला तिच्याबरोबर अजून थोडा वेळ हवा होता. आता बाहेर आल्यावर तिचा हात हातात घेणं किंवा तिला ओढून किस करणं शक्य नव्हतं. कारमधली जादू एव्हाना विरली होती. तिच्यापासून लांब ठेवायचे म्हणून त्याने दोन्ही हात जॉगर्सच्या खिशात कोंबले. तेवढ्यात ते तिच्या दरवाज्यापाशी पोचले.

आता काही सेकंदात ती घरात नाहीशी होईल. मग नेहमीप्रमाणे अक्खा एकाकी दिवस त्याला स्वतःबरोबरच काढायचा होता. रूटीन सुरू: वर्कआउट, स्टडीमध्ये जाऊन उद्याच्या केसचा अभ्यास. भरपूर काम फुगवून आयुष्याच्या प्रत्येक फटीत भरून टाकायचं की बाकी काही विचार करायला जागाच उरली नाही पाहिजे.

"होम स्वीट होम!" ती खोटा उत्साह दाखवत हसली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २४

सायराला वाटत होतं, त्याला बहुतेक ही लोकॅलिटी आवडणार नाही. जुनी वस्ती आणि घरंही थोडी जुनाट झालेली पण त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांच्या या दोन गल्ल्याच बिल्डरच्या आक्रमणातून टिकून राहिल्या होत्या. बाकी सगळीकडे जुनी घरं पाडून टॉवर्स झाले. तिचं लहानसं बैठं घर होतं. बाहेरचा रंग उडालेला आणि मेंटेनन्सची कमतरता जाणवत होती. तरीही पुढे चार फुटाचं अंगण अगदी स्वच्छ आणि झाडांनी भरलेलं होतं. मनीप्लांटचा एक अजस्त्र वेल घराच्या भिंतीवर पसरला होता. निळ्या दरवाजावर पेपर क्वीलिंग केलेली 17, Deshmukh's अशी अक्षरं असणारी लाकडी फ्रेम होती. ते दाराबाहेर वेलकम लिहिलेल्या मोठ्या तपकिरी मॅटवर उभे होते.

"मला आवडलं.. म्हणजे तुझं घर.."

ती अजून त्याच्या डोळ्यात बघत नव्हती. "हम्म, थँक यू मला सोडायला आल्याबद्दल. मी तुम्हाला आत बोलावलं असतं, पण यू नो.." ती हातातल्या किल्लीकडे बघत म्हणाली."आपण उद्या भेटू."

तिने दार उघडायला किल्ली पुढे केली.

"सायरा.."

"श्श, काय बोलायचं ते काळजीपूर्वक बोला. माझी बहीण नक्की दाराला कान लावून असेल."

"ओह कमॉss न!" आतून आवाज आला. दार धाडकन उघडलं आणि त्याच्यासमोर सायराचं मिनिएचर व्हर्जन उभं होतं. तसंच नाक, तसेच केस फक्त हिचे वर गुंडाळून क्लचरमध्ये अडकवलेले होते. नेहा रागाने दोघांकडे बघत होती पण तिचा राग म्हणजे क्यूट वाघाच्या बछड्याने डरकाळी फोडल्यासारखा होता. तिने लूज टी शर्ट आणि पायजमा घातला होता.

"मी फक्त दार उघडायला आले होते." नेहा पटकन म्हणाली.

"नाही, तू दाराला कान लावून उभी होतीस. आय नो यू!" सायरा हाताची घडी घालून म्हणाली.

नेहाने जोरजोरात मान हलवली "अजिबात नाही, मी तुझ्याशी असं कसं वागेन दी!"

"हो? मग मघाशी खिडकीला नाक टेकून काय करत होतीस तू?" आत शिरत सायराने सँडल्स काढले आणि पर्स टेबलावर टाकली.

"मला वाटलं कचऱ्याची गाडी आली."

"काहीही! तू काहीही गोष्टी रचू शकतेस!" सायरा मान हलवत जरा हसली.

"मी खोटं बोलत नाहीये. पण तू माझी उलटतपासणी का करतेयस?! तुम्ही तिथे काय करत होतात? आय बेट, कुंपणावरून फुलं चोरताचोरता मोटे काकांनीपण बघितलं असेल तुम्हाला."

आणि त्यांचं भांडण चालूच राहिलं. तो अजूनही डोअरमॅटवरच उभा होता. त्या दोघींची बडबड आणि ते घरगुती, थोडं अस्ताव्यस्त, आतून शांत करणारं जिवंत घर बघून त्याला बरं वाटत होतं. तो अचानक शिंकला आणि नेहाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. "वेट! यू आर नॉट शर्विल!"

तो जरा हसला, "मी शर्विलचा मोठा भाऊ आहे."

"पण.. पण कसं शक्य आहे? मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय." नेहा एका बोटाने हनुवटी खाजवत म्हणाली. ती लक्ष देऊन त्याच्याकडे बघत आठवत होती. अचानक तिचे डोळे विस्फारले "मॅकड्रिमी!" तिने सायराकडे पाहिलं.

"डॉ. पै!! तुम्ही डॉ. पै आहात ना, हॉस्पिटलमधले? एक मिनिट, म्हणजे शर्विल तुमचा भाऊ आहे!" चेहरा त्याच्याकडे फिरवत तिने विचारलं.

तेवढ्यात सायराने पटकन तिच्यापुढे येत दरवाजा पकडला. "ओकेssss देन. डॉ. पैंना आता निघायचंय. इमर्जन्सी आहे.." तिने दारात येणाऱ्या नेहाला मागे ढकललं. दार लोटून फक्त एक फट राहील इतकंच उघडं ठेवलं. त्याला फटीतून फक्त तिचा एक डोळा आणि ओठ दिसत होते, काही सेकंदांपूर्वी त्याने किस केलेले. "थँक्स अगेन.." ती खोटं गोड हसत म्हणाली "आपण अजून बोल.."

"दीद, तू मॅकड्रिमीबरोबर होतीस! अँड यू वर किसिंग!" नेहा तिच्यामागे ओरडली.

सायराचे डोळे विस्फारून गाल लाल झाले.

"तिच्याकडे लक्ष देऊ नका, हॉस्पिटलमध्ये भेटू. बाय!" म्हणून तिने दरवाजा लावला. आतून अजूनही त्यांचे एकमेकींवर ओरडण्याचे आवाज येत होते. तो हसत रिमझिम सुरू झालेल्या पावसात बाहेर पडला.

"मी प्रॉमिस केल्याप्रमाणे साडेदहाला झोपून गेले. मला वाटलं तू बारापर्यंत येशील. मला साडेतीनला जाग आली. पाणी प्यायला उठले तर तू दिसली नाहीस, मग माझी सॉलिड टरकली. खूप पाऊस पडत होता. तुला कॉल लागत नव्हता मग मी सरळ शर्विलला कॉल केला पण त्याचाही फोन आउट ऑफ कव्हरेज होता. मी जामच घाबरले. रेणूला कॉल केला, काका ड्यूटीवर होते. मग तिने त्यांना कॉन्फरन्सवर घेतलं. त्यांना तू कुठे आहेस आणि अजून आली नाहीस वगैरे सांगितलं. त्यांना शर्विलची फॅमिली ऐकून माहीत होती. ते म्हणाले, पावसात गाडी वगैरे बंद पडली असेल. जरा उजाडू दे,  तोपर्यंत तू नाही आलीस तर चौकीत येऊन मिसिंग कंप्लेन्ट दे. मी वाट बघत बसले आणि नशिबाने पावणेसहाला तुझा फोन आला. घाबरून माझी जाम वाट लागली होती दी." नेहा बोलतच सुटली होती.

तिने पुढे होत नेहाला मिठी मारून डोक्यावरून हात फिरवला. "आय एम सो सो सॉरी नेहू, माझी चूक झाली. पर्समध्ये पॉवर बँक टाकायला हवी होती. फोन डेड झाल्यावर मला तुझीच काळजी वाटत होती. हे असं डेटवर जाणं वगैरे मी पहिल्यांदाच केलं त्यामुळे अशी धांदल उडाली."

थोड्या वेळाने नेहाला बटाटेपोहे करून देता देता तिने संध्याकाळपासूनची इत्यंभूत कहाणी सांगितली.

---

गेला पूर्ण आठवडा तिच्यासाठी एक गरगरणारा रोलरकोस्टर होता. आधी तिने अनिशच्या केबिनमध्ये जाऊन वाद घातला, दुसऱ्या दिवशी इन्स्ट्रुमेंट्स पाडली, सर्जरी डिले केली, रडली, नंतर त्याने तिला घरी सोडता सोडता फटकारले, रविवारी ती जबरदस्तीने त्याच्या भावाबरोबर लग्नाला गेली आणि शेवटी त्याच्या घरी जाऊन सकाळी त्याच्या बेडमध्ये जागी झाली. सोमवारी सकाळी त्याने तिला किस केलं आणि तिने त्याला मूर्खासारखं धरूनच ठेवलं. तिच्या बोटांनी त्याचे केस घट्ट धरले होते आणि तिच्या व्होकल कॉर्डस अत्यंत वाईट नशीले आवाज काढत होत्या! त्याला वाटलं असेल हिने कधी कोणाला किसच केलं नाहीये.

आज मंगळवार आहे आणि आज मला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल. त्यात काय, ओटीमध्ये जायचं आणि ऑल इज वेल!
बट ऑल इज नॉट ऍट ऑल वेल.

ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करायला वेळ लागतो ना. पटापट इतक्या गोष्टी बदलत आहेत की काय करावं काही सुचत नाहीये. मी काय करू? हे सगळं थांबवू, जरा रडून घेऊ, प्रेमात पडल्याचं सांगू की त्याला माझ्याजवळ येण्यापासून रोखू... हे प्रेम आहे की युद्ध!

टेक्निकली अनिश माझा बॉस नाहीये. हॉस्पिटलचे डिरेक्टर्स माझे बॉस आहेत. पण तो माझा सुपिरिअर आहे, सर्जन आहे आणि थोडासा घाबरवणारा आहे. त्याच्याबरोबर इनव्हॉल्व होणं म्हणजे शुअर शॉट डिझास्टर आहे. ही सिच्युएशन हळुवारपणे कशी हाताळायची ते मला माहिती आहे, इतकं ग्रे'ज काही उगाच नाही बघितलं. कोरिडॉरमध्ये कुजबुज किंवा ओटीमध्ये सेक्सी कटाक्ष नो नो. मला स्वतःबद्दल अजिबात गॉसिप व्हायला नकोय. जर हे कुणाला कळलंच तर ते माझ्या टर्म्सवर कळेल.

सायरा त्यासाठीच HR ऑफिसबाहेर बसली होती. आत काळोख होता, HR वाल्यांचा दिवस अजून सुरू व्हायचा होता. साडेसातच तर वाजले होते. एवढ्यात तिथल्या तीन देवीयांपैकी एक नीता उगवली आणि तिने किल्लीने दार उघडलं. लॅपटॉप ऑन करून लगेच मेकअप करायला वॉशरूमकडे पळायच्या आत सायराने तिला पकडलं. चेहऱ्यावर पटकन मोठं हसू आणत "नीता! हाय, गुड मॉर्निंग!" म्हणून ती समोरच्या खुर्चीतच जाऊन बसली.

"गुड मॉर्निंग" म्हणत नीताला समोर बसावंच लागलं. "काय काम आहे?"

"सॉरी मी खूप लवकर आले पण मला थोडं बोलायचं होतं."

"कुणाबद्दल तक्रार आहे?"

"तक्रार? नाही नाही. मला फक्त एका डॉक्टरांबरोबर माझ्या सिच्युएशनबद्दल माहिती हवी आहे."

"कुठला फॉर्म हवाय? सेक्शुअल हरॅसमेंट की होस्टाईल वर्क कंडिशन्स?" नीता एक मोठी बॉक्स फाईल टेबलावर आपटून त्यातून लाल पिवळे फॉर्म्स काढत म्हणाली.

तिने हात वर केले. "नाही नाही. फॉर्म नकोय. मला फक्त गाईड कर."

"ओके, त्यांनी तुला कशासाठी फोर्स केलं किंवा तुला अस्वस्थ वाटेल असं काही केलं?"

तिने नकारार्थी मान हलवली. "नो. हे दोघांच्या संमतीने होतं. आय ऍक्चुली एंजॉईड इट!"

नीताने भुवया उंचावल्या.

तिने फार डिटेलमध्ये न जाता त्या किसबद्दल सांगितलं.

"सो, तू मला फक्त एवढंच सांगायला आलीस की तुम्ही किस केलं आणि त्यात तुला मजा आली!" नीता एखाद्या लहान पोरीशी बोलावं तसं बोलत होती.

तिने सुस्कारा सोडला. समजलं एकदाचं. "तेच सांगतेय. असं करण्याविरुद्ध हॉस्पिटलच्या काही गाईडलाईन्स, रुल्स असं काही आहे का? एम्प्लॉयी हँडबुक वगैरे?"

"नाही." नीताने बॉक्स फाईल पुन्हा आपटून कॅबिनेटमध्ये ठेवली.

ओह, ओके.

अशी रिलेशनशिप अलाऊड आहे म्हटल्यावर ती थोडी निराशच झाली. "प्लीज एकदा डबल चेक कर ना."

नीताने तिच्याकडे एक मारका कटाक्ष टाकला.

नीता पर्स घेऊन केबिनबाहेर पडली आणि सायरा एकटीच विचार करत बसली. तिच्या पोटात गोळा आला होता. आत्ता तिला जाणवलं की तिला ही रिलेशनशिप कुठल्या तरी रूलमुळे थांबवायची होती. तिला काल रात्रभर झोप लागली नव्हती. पूर्णवेळ तिला त्या किसची बारीकसारीक डिटेल्स आठवत होती. इट्स नॉट ओके. तिला त्या किसआधीचं तिचं साधं सोपं आयुष्य हवं होतं, ज्यात तिला फक्त हॉस्पिटल आणि नेहाला सांभाळायचं होतं. आत्ता तिच्या आत घुसळणाऱ्या ह्या सगळ्या फीलिंग्ज तिला नको होत्या. अजून वाहवत गेलो तर काय, ही भीती होतीच. ती कॅज्युअल रिलेशनशिप करू शकत नव्हती. तिचं आयुष्य आधीच इतकं गुंतागुंतीचं होतं त्यात ही भर!

शिट!

तिला कुठला तरी फॉर्म हवा होता, ज्यामुळे सगळ्या गोष्टीना फुल स्टॉप लागेल. निदान थोडा बफर टाइम मिळेल. तिला अनिशला गोड बोलून हे कसं हॉस्पिटल रुल्सच्या अगेन्स्ट आहे आणि तिला तिचा जॉब टिकवणं किती महत्त्वाचं आहे हे सांगता आलं असतं. पण नीताने सगळा घोळ केला.

"फाईन! आता मलाच काहीतरी करावं लागणार." तिने मन घट्ट केलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २५

ती डॉ. पैंना भेटायला निघाली तेव्हा ते केबिनमध्येच होते. दोन तासांनी सर्जरी शेड्यूल्ड आहे आणि आत्ता कदाचित रेसिडेंटस बरोबर ते राउंडवर निघणार असतील. पण हे काम पटकन होईल.

हळूच दार किलकिले करून ती आत डोकावली. नेहमीप्रमाणे डेस्कमागे डॉ. अनिश पै, अग्रगण्य सर्जन, मिस्टर हॉटीपॅन्ट्स! त्याने फ्रेश हेअरकट केलेला दिसत होता. कडेने केस बारीक करून वर स्टायलिश सिल्की केस, ज्यांना कर्ल व्हायची घाई आहे पण लांबी तेवढी नाहीये. रोजचा पांढरा कोट घातलाय त्याखाली बॉटल ग्रीन शर्ट आहे. आज सकाळी चकाचक दाढी केलेली दिसतेय. आज तिच्या आणि त्या स्मूद जॉलाईनमध्ये कोणी नाहीये.

त्याचे पूर्ण लक्ष खाली टेबलावर उघड्या फाईलमध्ये होते. वाचता वाचता तो हनुवटीवर अंगठा रोवून तर्जनी खालच्या ओठावर पुढे मागे फिरवत होता. ती तिथे का आहे ते सांगत तिने स्वतःला जागे केले आणि समोरच्या दृश्याने अजून संमोहित व्हायच्या आत दारावर मोठ्याने टकटक केली.

त्याने समोर बघितलं आणि तिला बघून हसला. ते एक साधं हसूसुद्धा बाणासारखं तिच्या काळजात घुसलं. तिला वरपासून खालपर्यंत कॅज्युअली न्याहाळून त्याने डोकं पुन्हा समोरच्या फाईलमध्ये खुपसलं. "मॉर्निंग सायरा."

तेव्हा कुठे तिला जाणीव झाली की ती काही न बोलताच तिथे उभी आहे. तिने जरा घसा खाकरला आणि डेस्कसमोर जाऊन हातातला कागद पुढे केला. "गुड मॉर्निंग डॉक्टर. सॉरी टू डिस्टर्ब यू. मला फक्त हे तुम्हाला द्यायचं होतं."

गुड. तिचा आवाज अगदी प्रोफेशनल होता.

त्यालाही ते जाणवलं असावं, कदाचित.

त्याच्या डोळ्यातल्या खोडकर भावावरून तरी काही कळत नव्हतं. त्याने कागद घ्यायला हात पुढे केला.

"हे ऍग्रीमेंट आहे." कागद देऊन ती म्हणाली.

एकदम त्याच्या भुवया वर झाल्या आणि गालातल्या गालात तो हसल्यासारखंही वाटलं. डॅमीट! यात हसण्यासारखं काय आहे?!

"ओव्हरऑल त्याची समरी अशी आहे की आपण एकमेकांना डेट करू शकत नाही." तिने हाताची घट्ट घडी घातली.

"हम्म, मला दिसतंय.. हिअरआफ्टर देअर शॅल बी नो टचिंग ऑर किसिंग ऑफ एनी काईण्ड!"

बरोबर. तिने ऍग्रीमेंट फॉरमॅट्स गूगल केले होते.

तो पुढे वाचत होता. " हेन्सफोर्थ डॉ. पै शॅल रिफ्रेन फ्रॉम एनी सजेस्टिव्ह स्माईल ऑर फ्लर्टिंग." आता त्याचा चेहरा जरा गंभीर वाटला. "पुढे म्हटलंय, द प्लेन्टीफ, सायरा देशमुख शॅल रिफ्रेन फ्रॉम अपीअरिंग इर्रेझिस्टीबल सो ऍज टू नॉट टेम्प्ट डॉ. पै."

तिला प्लेन्टीफचा नक्की अर्थही माहीत नव्हता, पण काहीतरी फॅन्सी लीगल शब्द हवा म्हणून तिने टाकून दिला होता.

"हे सरळ HR कडून आलंय." ती म्हणाली.

"हम्म.."

"उफ, अजून दुसरा काहीच मार्ग नव्हता." ती हवेत हात उडवत म्हणाली.

"सायरा.." त्याचा आवाज जरा बारीक झाला होता. "तुला हे सगळं करण्याची गरज नव्हती. मला लांब ठेवण्यासाठी.."

"गुड मॉर्निंग डॉक्टर." त्याचा रेसिडेंट डॉ. निलेश उघड्या दारातून आत आला. "तुमची कॉफी. डोन्ट वरी, आज पूर्ण ब्लॅक आहे." तो टेबलावर कप ठेऊन जरा लांब दारापाशी जाऊन उभा राहिला.

येस्स! काय वेळेवर आलाय हा माणूस! आता आपोआप डॉ. पै शांत बसतील. सगळ्यांसमोर मी त्यांची फक्त असिस्टंट आहे आणि मला कामं आहेत.

"सी यू इन द ओ आर!" ती वळून पळायच्या तयारीत होती.

"तू काहीतरी विसरते आहेस." मागून आवाज आला.

तिने मान वळवून पाहिले तर तो ऍग्रीमेंटवर सही करत होता. त्याने तो कागद समोर धरल्यावर ती परत डेस्कपाशी गेली. त्याची नजर पूर्णवेळ तिच्यावरच रोखलेली होती. तिने कागद घ्यायचा प्रयत्न केला पण तो सोडत नव्हता. त्याने तिला खुणेने जवळ बोलावलं. काही ऑप्शनच नव्हता, ती पुढे झुकली. निलेशने ऐकू नये म्हणून हे करणं भाग होतं.

"मला सोमवारबद्दल अजिबात पश्चात्ताप नाहीये आणि तुलाही व्हायला नको." तिच्या कानाजवळ उष्ण श्वास सोडत तो म्हणाला. तिच्या अंगावर काटा आला.

हॅलो! हळू बोलणं म्हणजे काय माहिती आहे का!

ती हॅ हॅ करून मोठ्याने खोटं हसली. "तुम्ही विनोदी आहात डॉक्टर. तुम्ही काय बोलताय, मला कळलं नाही. एन्जॉय युअर राउंड!"

पाठ फिरवून ती जी भराभर चालत निघाली ती सरळ स्टाफ लाऊंजमध्ये जाऊनच थांबली. हे ऍग्रीमेंट मी आता लॅमीनेट करून ठेवणार आहे. त्याच्या साध्या शब्दांनी माझ्यावर असा इफेक्ट होतोय तर खरंच पुन्हा किस करून काय होईल!

ती पूर्ण लक्ष देऊन सर्जरीसाठी तयारी करू लागली. OR मध्ये जाऊन कित्येक वर्षे लोटल्यासारखी वाटत होती, खरंतर दोनच दिवस झाले होते. सगळी परफेक्ट तयारी करूनही तिच्याकडे काही मिनिटं शिल्लक राहिली. तिने केस पेपर्स पुन्हा एकदा पाठ केले. आज रडणं, वस्तू पडणं असं काहीही होणार नव्हतं. कदाचित तो केबिनमधल्या मूडमध्ये वैतागलेला असेल तर..
ती विचाराने थरथरत होती. काचेच्या भिंतीमागे नेहमीप्रमाणे शिकाऊ लोकांची गर्दी होती. त्याने बोललेलं काही लोकांना ऐकू गेलं नाही म्हणजे मिळवली. ती कामात सिरीयस होती आणि लोकांनी त्यांच्याबद्दल ज्यूसी गॉसिप करायला नको होतं. ज्यूसी गॉसिप! ओह, विचार नको करू.

तेवढ्यात दार ढकलून तो आत आला. ओह माय गॉड! आतल्या ह्या फीलिंग्जचं काय करू. ती स्तब्ध झाली आणि लगेच सगळे आवाज बंद झाले. आत येताच त्याची नजर सगळ्या खोलीभर फिरून तिच्यावर येऊन अडकली. त्याच्या डोळ्यात किंचित खोडकरपणा चमकून गेलासा वाटला पण तिला नीट बघायला वेळ मिळाला नाही.

बाकी लोकांनी हजेरी दिली. ती हातात एप्रन धरून उभी होती. त्याने हेडलॅम्प आणि मास्क घातलेला होता. नशिबाने त्यातून त्याचा थोडासाच चेहरा दिसत होता. तिलाही मास्कमागे लपायला आवडत होतं. कोणालाही चेहऱ्यावरचे भाव दिसायला नको.
"आणि तू, सायरा? ऑल सेट?" त्याने जवळ येताच विचारलं.

"येस, रेडी."

सगळं तयार होताच त्याने बोलायला सुरुवात केली. "आज आपला पेशंट, निखिल सोळा वर्षांचा आहे. ओबेस, टाईप टू डायबेटिक आणि हायपरटेन्शन विथ थ्री ब्लॉकेजेस."

तिने खाली पसरलेल्या सत्याण्णव किलो वजनाच्या निखिलकडे बघून मान हलवली.

"वी आर परफॉर्मिंग ऍन ओपन हार्ट विथ कार्डिओपल्मोनरी बायपास. एव्हरीवन रेडी?"

सगळीकडून 'येस' आल्यावर तो पुढे झाला. ती पूर्ण लक्ष सर्जरीकडे देत होती. तो डोळ्यात तेल घालून त्याचं काम करत होता. इन्स्ट्रुमेंट आणि औषधांची नावं सोडून त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. त्याची प्रिसीजन आणि परफेक्ट प्रोसिजर बघून फर्स्ट यर स्टुडंट्स साष्टांग नमस्कारच घालायचे बाकी होते. त्याची प्रत्येक कृती मोजून मापून होती. आज तो तिला नेहमीप्रमाणे ओरडतही नव्हता. एवढंच कशाला ती शेवटचे टाके घालत असतानाही तो बघत थांबला. सर्जरी संपताच काचेबाहेरच्या मुलांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. ही वॉज रिअली परफेक्ट.

चक्क आज एकत्र बाहेर आल्यामुळे तिला त्याच्या शेजारी उभं राहून स्क्रब करावं लागत होतं. खोलीत ते दोघेच होते. ती अजूनही त्याच्या कामावर फिदा होऊन त्याच्या हातांकडे हळूच बघत होती. मनगट, हात, बोटं, साबण, फेस... ओह स्टॉप इट!

"यू डिड वेल टुडे." शांतता भंग करत तो म्हणाला.

ती खुषीत हसली. "केअरफुल! दॅट साऊंड्स लाईक अ कॉम्प्लिमेंट!" तिने हळूच पापण्यांआडून त्याच्याकडे कटाक्ष टाकला. त्याचे ओठ हसत असले तरी लक्ष नळाखाली हात धुण्यावर होते. "मी नवी मेथड ट्राय करतोय. असिस्टंटस् आणि नर्सेसचे थोडे कौतुक करणे."

तिचे डोळे विस्फारले. "पिंच मी! खरंच!"

त्याने हात धुवून टॉवेल हातात घेतला आणि हात पुसत मागच्या ग्रॅनाईटला टेकून उभा राहिला. आता त्याला तिच्याकडे नीट बघता येत होतं. "ओके, आता मला एक प्रश्न विचारायचाय."

शिट! आता वेळेवर कुठाय तो रेसिडंट?!

"ऍग्रीमेंटमध्ये आपल्यात मैत्री असण्याबद्दल काही लिहिलंय का?"

तिच्या पोटात फुलपाखरू उडालं. "अम्म.. हो, ते ऍनेक्श्चर टू मध्ये आहे. नीता म्हणाली, मैत्री वगैरे चालेल." ती जामच गडबडली होती.

त्याने मोठ्याने हसत मान हलवली. नक्की तिच्याबरोबर काय करावं त्याला समजत नसणार, तिने विचार करत जीभ चावली.

"यू आर समथिंग एल्स, सायरा!"

तिने हसू दाबायचा प्रयत्न करत ओठ घट्ट मिटून घेतले. "जस्ट टू बी क्लिअर, मलाही सोमवारबद्दल काही पश्चात्ताप नाहीये. फक्त.."

"इट्स ओके. एक्स्प्लेन नको करू. ऍग्रीमेंटमध्ये सगळं नीट एक्स्प्लेन केलंय." त्याने हात वर करत तिला थांबवलं आणि उजवा हात पुढे केला. "फ्रेंड्स?"

तिने हात पुढे केला, कोणी डोकं ताळ्यावर नसलेली बाईच त्याचा हात हातात घेणार नाही. त्याच्या उबदार हाताचा स्पर्श होताच तिच्या पोटात गपकन खड्डा पडला. ती पुन्हा त्याच्या कारमध्ये होती, त्याचा शर्ट मुठीत धरून, टोटली लॉस्ट! फक्त त्याच्या हातात हात देऊन तिचे पाय डळमळीत झाले होते. सगळी शक्ती निघून गेली होती. तिने काही उत्तर द्यायची तो वाट बघतोय, हे त्याच्या गालावर खळी उमटेपर्यंत ती विसरूनच गेली होती. मला काय वाटतंय ते त्याला तंतोतंत कळलंय. त्याला माहितीये की त्यांच्यात 'फक्त' मैत्री होणं अशक्य आहे. रादर त्यामुळेच त्याने ही मैत्रीची ऑफर दिलीय. मी ऍग्रीमेंट बनवून सुरू केलेला खेळ तो आता माझ्याशी खेळतोय. ती आता विचारात पडली.

त्याचे डोळे सांगतायत, मला माहितीये तुला मी जवळ यायला हवंय पण आता मी माझा वेळ घेणार आहे.

वाटलं होतं ते ऍग्रीमेंट करून तिला पुढे जाण्यापूर्वी अजून थोडी स्पेस, थोडा बफर टाइम मिळेल पण आता बहुतेक जास्तच उशीर झाला होता.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २६

मी ते ऍग्रीमेंट साइन करायला नको होतं. खोटं तर ते होतं, नक्कीच. कुठली लीगल डॉक्युमेंट्स 'हूमसोएव्हर इट मे कन्सर्न' ने सुरू होतात!! पण तरीही तो कागद महत्त्वाचा होता. त्या किसनंतर सायरा नक्कीच घाबरलेली होती.. आय गेट इट. टेबलावरचा काचेचा पेपरवेट फिरवत तो विचार करत होता.

फक्त कलिग्स ते एकदम कारमध्ये किस करणारे कपल हा अगदीच लाँग शॉट होता. मी पुढे जाण्यासाठी तयार असलो तरी ती असायलाच हवी असं नाही. तिच्या निर्णयावर कुठलाही दबाव येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तिच्या इच्छेचा आदर आहे म्हणूनच तिला हवा असलेला वेळ आणि स्पेस मी देतोय. पण अजून किती वेळ देऊ शकेन हे मलाच कळत नाहीये. आधी ती माझ्यासाठी फक्त एक सुंदर दिसणारी मुलगी होती, मी तिच्यात इन्वॉल्व झालंच पाहिजे असं काही नव्हतं. पण आता, सगळंच बदललंय. किस करताना बदललेल्या ज्या जाणिवा होत्या त्यांचं काय करायचं? तेव्हा ती जशी वागली, खूप दिवसांपासून हवी असलेली गोष्ट फायनली मिळाल्यासारखी, त्याचं काय करायचं?

ती OT मध्ये माझ्याकडे बघताना मला दिसते. तिने कितीही चोरटे कटाक्ष टाकले तरी मला कळतात. जेव्हा बघताना चुकून माझी नजर तिला भिडते तेव्हा तिचे गाल लाल होतात. किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट देताना तिच्या बोटांचा मला स्पर्श झाला तरी ती मी कानात कुजबुजल्यासारखी लाजते.

शी'ज अ टोटल मेस! मंगळवारी स्क्रब करताना तिच्याशी बोलल्यानंतर ती लगेच गायब झाली. बुधवार, गुरुवार तिला एकटीला गाठताच नाही आलं. शुक्रवारी सर्जरी संपल्यावर काहीतरी जेवावं म्हणून तो लाऊंजमध्ये गेला. त्याने प्लेटमध्ये चिकन नूडल सुपचा बोल ठेऊन शेजारी भरपूर भाज्या घातलेला पास्ता प्रिमावेरा वाढला. टुडेज स्पेशल डेझर्ट बघून त्याला रहावले नाही. चीट डे म्हणून लहान डेझर्ट प्लेटमध्ये त्याने एक डच ट्रफल पेस्ट्री वाढून घेतली.

तो सगळं घेऊन टेबलवर बसतानाच समोर सायरा दिसली. त्याचं लक्ष जायची वाट बघत ती दारात थांबली होती. आतल्या अजून दोन तीन डॉक्टरांनी तिच्याकडे बघितल्याने तिची चुळबुळ सुरू होती. ती अजून स्क्रब्जमध्ये होती आणि नेहमीची घट्ट पोनिटेल. तिने कितीही साधं, कडक दिसायचा प्रयत्न केला तरी ती मोहकच दिसत होती. गोबरे गाल, लांब काळ्याभोर पापण्या. त्याच्याकडे लक्ष जाताच डोळे चमकून ती हसली. आता ती नुसती मोहक नाही कातिल सुंदर दिसायला लागली.

आय विश, तिच्या शर्टवर माझं नाव बहात्तर साईज फॉन्टमध्ये लिहायला हवं.

तो उठून पुढे गेला. "तू आत येऊ शकतेस. कोणी ओरडणार नाही तुला!"

ती हसून जागेवरच थांबली. तिचा बहुतेक त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. "कमॉन इन!" म्हणून तो वळल्यावर तिला जावंच लागलं. ती डोळे विस्फारून डॉक्टरांना मिळणाऱ्या लग्झरीज बघत होती. "नशीब इथे दारात रेड कार्पेट आणि दोन्ही बाजूला बाऊन्सर्स नाहीत! तेवढंच बाकी आहे."

तो किंचित हसला.

"आमच्या लाऊंजमधलं साधं वेंडिंग मशीनसुदधा दोन थपडा मारल्याशिवाय चालत नाही."

"तू इथे वेंडिंग मशीनबद्दल तक्रार करायला आली आहेस का?" तो तिरकस हसत म्हणाला.

"नोss कमॉन!" तिचं लक्ष प्लेटकडे गेलं. "वॉव! डच ट्रफल पेस्ट्री? तुम्ही चक्क गोड खाताय?" तिने पटकन जीभ चावली.

"चीट डे असतो कधीतरी. घे ना, मी नंतर दुसरी घेईन." त्याने प्लेट पुढे सरकवली.

"अम्म.. नको. फक्त टेस्ट करते.." म्हणत तिने वितळलेल्या चॉकलेटमध्ये बोट बुडवून तोंडाजवळ नेले. तिचं वागणं सहज होतं तरीही त्याचं पूर्ण लक्ष तिने बोट तोंडात घालून, चंबू करून चोखणाऱ्या ओठांवर होतं. आता आग लागायचीच बाकी होती.

"डॉ. पै?"

"हम्म.."

"मी काय म्हणाले ते ऐकलं का तुम्ही?"

"नॉट ऍट ऑल."

हम्म, लांब श्वास सोडून ती बोलायला लागली."मी विचारायला आले होते की उद्या नाईट शिफ्ट ऐवजी मी डे शिफ्ट करून लवकर निघू का? नेहाला चेकअपसाठी न्यायचं आहे."

त्याने डोक्यातले बिनकामाचे विचार बाजूला सरकवले. "चालेल, तशीही उद्या सर्जरी नाहीये. नेहाला काय झालं?"

"विशेष काही नाही, जस्ट रुटीन अपॉइंटमेंट आहे."

"गुड. पण तुम्ही जाणार कश्या? पाऊस काही थांबण्यातला नाही."

"फार लांब नाहीये, बसने जास्तीत जास्त अर्धा तास लागेल."

"हवी असेल तर कार घेऊन जा. मी  हॉस्पिटलमध्येच असेन."

त्याची ऑफर ऐकून ती अवाक झाली.

"काय झालं?" त्याने न हसता विचारलं.

तिच्या चेहऱ्यावर आता गुपित कळल्यासारखं हसू पसरलं. "तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजना कार वापरू देता?"

तिला काय सुचवायचंय ते कळून त्याने समोर हात झटकला. " शुअर! त्यात काय! शुभदा कायम माझी कार घेऊन जात असते."

ती फुटलीच! त्याला चक्क गप्पा मारत हसताना बघून येणारे जाणारे डॉक्टर्स त्यांच्याकडे बघत जात होते. फ* ऑफ! मी ह्या मुलीशी गेल्या तीन दिवसात धड बोललोसुद्धा नाहीये वर एक ऍग्रीमेंट साइन केलंय ज्यात मी हिला किस करण्यावर बंदी आहे. पण या क्षणी मला तेच हवंय.  तिची पोनिटेल मागे खेचून, हनुवटी वर होईल. तिला पाय उंचावून चवड्यांवर उभं रहावं लागेल, मी थोडा खाली वाकेन म्हणजे तिला सोपं होईल. बस! मागच्या वेळपेक्षा हा किस नक्कीच चांगला असेल...

ती हसता हसता अचानक थांबली. तिचे डोळे विस्फारले आणि हळूच ओठ विलग झाले. ओह येस, सायरा. तू ऍग्रीमेंट साइन करून घेऊ शकतेस, पण ह्या फीलिंग्स? तू ओठावरून जीभ फिरवलीस कारण तू तोच विचार करते आहेस जो मी करतोय आणि तू आत्ता तुझे लाल होत चाललेले गाल बघितले पाहिजेस.

"थँक्स डॉ. पै."

तो मान हलवत हसला. परत डॉ. पै! जसं काही असं म्हटल्यामुळे ती मला लांब ठेऊ शकणार आहे.

"झालं बोलून?" त्याने भुवई उंचावली.

"हो, म्हणजे नाही, अं.. मी निघते. पेस्ट्रीसाठी थँक्स." ती खुर्ची सरकवून उठताच तो दारापर्यंत तिच्याबरोबर गेला. ती न थांबता चालत सुटली.

"सायरा, लिफ्ट त्या बाजूला आहे." त्याने गालात हसत बोट दाखवलं.

ती पटकन उलट फिरली. "हो माहितीये.." आणि लिफ्टकडे पळत सुटली. तो हसून त्याच्या जेवणाकडे वळला.

एक आठवडाही टिकत नाही ही!

---
संध्याकाळपासून तूफान पाऊस पडत होता. शुभदा कधीच निघून गेली होती. तो लॅपटॉपवर टॅप टॅप करत पेपरवर्क संपवायच्या मागे होता. आता नऊ वाजत आले होते. खिडकीबाहेर बघून त्याने फोनवर नजर टाकली. ह्या स्पीडने काम सोमवारपर्यंत संपणार नाही. एव्हाना शिफ्ट संपून बरेचसे लोक निघून गेले होते. तरीही तो हातातला छोटा बास्केटबॉल हवेत उडवून कॅच करत बसला होता. एकतर यामुळे त्याला नीट विचार करता येत होता आणि त्याचे हात एंगेज रहात होते. नाहीतर एव्हाना त्याने सायराला कॉल केला असता. त्याला तिची काळजी वाटत होती आणि दोघी घरी नीट पोचल्याचं चेक करायचं होतं.

फक्त एकच मिनिट! म्हणून त्याने फोन हातात घेतलाच. त्याने कॉन्टॅक्ट लिस्टमधून तिचा नंबर घेतला होता पण तिच्याकडे अजूनही त्याचा पर्सनल नंबर नव्हता.

विचार बदलण्यापूर्वी त्याने कॉल केला.

काही रिंगनंतर तिने फोन उचलला. "हॅलो?"
तिचा आवाज वेगळा येत होता.

"सायरा?"

"मी नेहा बोलतेय. सायरा बाथरूममध्ये आहे. कोण बोलतंय?"

त्याने टेबलावरच्या दोन फाईल सरळ केल्या. फोन ठेवावा की काय न सुचून तो पुढे बोलला. "धिस इज डॉ. पै."

"नो वे!! एक मिनिट, एक मिनिट." ती फोनवर हात ठेवून ओरडली. "दी ss लवकर ये. तुझ्या डॉक्टरांचा फोन आहे."

फोनमधून काहीतरी खुडबुड आणि दबके आवाज आले. मॅकड्रिमी!

"खेचू नको" सायराचा आवाज आणि मागोमाग हेअर ड्रायर सुरू केल्याचा आवाज. ती बाथरूममधून बाहेर आली असणार. "धिस इज नॉट फनी!"

"तिला वाटतंय, मी प्रँक करतेय." नेहा फोनवर त्याला म्हणाली.

"नेहू, तुझी ऍक्टिंग अतिशय वाईट आहे. मला माहितीये फोनवर कोणी नाहीये." सायराचा आवाज.

नेहा हसत सुटली."आय स्वेअर ते आहेत! तूच बघ."
तिने फोन बहुतेक सायराकडे दिला.

"हाहा, काहीही!" तिच्या आवाजात नेहाचा प्रँक पकडल्याचा आत्मविश्वास होता. "हॅलो डॉ. पै, कॉल केल्याबद्दल थॅंक यू! तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे कारण मी आत्ता तुमचीच आठवण काढत होते."

तो खळखळून हसला आणि ती किंचाळली.

"फोनवर कोणीतरी आहे!" ती नेहाकडे बघून ओरडली.

"मी आधीच सांगितलं होतं." नेहाचा दबका आवाज.

तिने घसा खाकरून स्वतःला जरा ताळ्यावर आणलं. "अम्म, हॅलो?"

"सायरा, मी अनिश बोलतोय."

"ओह, हॅलो डॉ. पै! प्लीज मी आधी जे काय बरळले ते विसरून जा."

तो तिरकस हसला पण तिला जरा शांत करावं म्हणून बोलू लागला." मी फक्त तुम्ही दोघी नीट घरी पोचलात ना हे विचारायला फोन केला होता."

"काय?" ती अजून शॉकमध्येच होती.

"बराच पाऊस होता म्हणून." आता तोही जरा विचार करून बोलला.

"हो. व्यवस्थित पोचलो. नो प्रॉब्लेम." तिने काहीतरी खुसखुस करून दार लावल्याचा आवाज आला. "सॉरी, मी नेहाला इथून बाहेर काढत होते."

"अरे हो, तिची अपॉइंटमेंट कशी होती?"

तिने उत्तर द्यायला थोडा वेळ लावला."ठीक आहे सगळं. तुम्ही फक्त एवढंच विचारायला फोन केलाय की अजून काही आहे? खरं सांगा."

खरं? खरं सांगायचं तर मी एकटा शनिवारी रात्री केबिनमध्ये काम करत बसलोय. कदाचित आधी एवढ्याने मी समाधानी होतो पण आता अचानक सगळं बदललंय. मला खूप काही विचारायचंय. तू आंघोळ करून घरात कुठले कपडे घातलेत, तू डिनरसाठी काय बनवलं आहेस, तू जेवणानंतर मूव्ही बघशील की वाचत बसशील? मला तुला पुन्हा किस करून काय वाटतंय ते बघायचंय आणि तू ते मला करू देणार नाहीस, म्हणून मी काहीतरी कारण काढून हा कॉल केलाय. कदाचित मी समजतोय त्यापेक्षा माझं मन तिला जास्त उमगलंय कारण मी हे काहीही न बोलताच पलीकडे तिचा आवाज मऊशार झाला.

"अनिश? सगळं ठीक आहे ना?"

त्याने एकदम मान झटकून सगळे विचार बाजूला केले. "ऑल ओके! सोमवारी भेटू."

क्रमश:

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २७

त्याने फोन ठेवताच तिने नेहाबरोबर बसून पूर्ण कॉलचं सगळ्या बाजूंनी डिसेक्शन केलं.

कदाचित त्याला खरंच त्या नीट घरी पोचल्याची खात्री करायची असेल.

कदाचित त्याला महत्त्वाचं काही सांगायचं असेल पण ऐनवेळी त्याने पाऊल मागे घेतलं.

कदाचित हा नुसता फ्रेंडली कॉल होता.

फ्रेंडली! फ्रेंड्स! फ्रेंडशिप! अचानक ह्या सगळया शब्दांचा तिला प्रचंड राग येत होता.

तिने अक्खा रविवार त्याच्या विचारात घालवला. त्याने तिला लवकर निघायची परवानगी देऊन वर आणखी कार ऑफर करणं.. इतका मृदू मनाचा कधी झाला हा?! फोनवरचा त्याचा सेक्सी आवाज तिला पुनःपुन्हा आठवत होता. तिने न राहवून घरी डच ट्रफल पेस्ट्रीसुद्धा बेक केली. कारण ती खाताना तिला तो आठवत होता. किती मूर्खपणा! आय नो! ती खाताखाता काल तो तिच्याकडे बघत असतानाचे डोळे आठवत होती. त्या पेस्ट्रीचा शेवटचा तुकडा नेहाने रात्री संपवला तेव्हा तिला रडू येणंच बाकी होतं.

मला बहुतेक वेड लागतंय.

सेक्शुअल अट्रॅक्शन खूप वेळ दाबून टाकल्यामुळे माणसं वेडी होत असतील का? होतातच बहुतेक.

खरं सांगायचं तर, तो ते ऍग्रीमेंट इतकं सिरीयसली पाळेल माहिती असतं तर कदाचित मी ते बनवताना सतरा वेळा विचार केला असता! इतक्या कमी वेळात एवढ्या सगळ्या घटना घडत गेल्या की मी जरा गांगरून गेले होते. मला थोडा शांत डोक्याने विचार करायचा होता, पण डोकं शांत सोडून सगळं काही आहे. उलट त्यात विचारांची रस्सीखेच सुरू आहे. अनिशचे विचार, तो किस आणि तो ते ऍग्रीमेंट खरं मानून पाळतोय ह्याचा त्रास, डोक्यात कल्लोळ सुरू आहे.

सोमवार उगवला. सर्जरीत ते समोरासमोर होते. ती स्टेप बाय स्टेप त्याला हत्यारे देत होती. हे काम डोळे मिटूनही जमणारं होतं त्यामुळे तिचे विचार जरा नको तिकडे भरकटले. अनिशने रविवारी काय केलं ते तिला जाणून घ्यायचं होतं. तो इतका हँडसम आहे. स्क्रब्जसारख्या डल कपड्यांमधूनही त्याची मस्क्यूलीन स्ट्रेंथ जाणवतेय. स्मोकिंग हॉट! OT मध्ये तो साक्षात देव आहे. बाहेरच्या जगात बायका त्याच्याबद्दल काय विचार करत असतील, तिला उत्सुकता होती. तो जर एकटा बारमध्ये गेला तर डेफिनेटली त्याला कोणी ना कोणी भेटेल. ह्या विचारानेच तिच्या पोटात कसंतरी झालं. तो कधी बाऊन्समध्ये जातो का? हॉस्पिटलच्या समोरच तर आहे. नक्कीच जात असेल, त्या दिवशी शर्विलने त्याला तिथेच तर बोलावलं होतं.

अनिश आता सर्जरीच्या ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यावर आला होता.

"तुमचा संडे कसा होता डॉ. पै? गुड?" अचानक तिने विचारलेच.

त्याने पटकन तिच्याकडे बघितले. त्याचे रोखून बघणारे डोळे सर्जिकल ग्लासेसही थांबवू शकत नव्हते. "फाईन! प्रॉडक्टिव!"

ओह नो, प्रॉडक्टिव?! म्हणजे काय.

"अच्छा! म्हणजे भरपूर काम केलं का?"

"हम्म."

एकच शब्द. मला राग येतोय.

"बोवी प्लीज."

तिने बोवी उचलून हात पुढे केला. सर्जरी संपेपर्यंत ती गप्पच राहिली. एव्हाना तिची जळून हालत खराब झाली होती. त्याला कोणाची कंपनी मिळाली असेल तर.. तिला जाणून घ्यायचं होतं.

नाही, मला नकोय ती माहिती. मी त्याच्याकडून ऍग्रीमेंट साइन करून घेतलं की आमच्यात टचिंग,फ्लर्टिंग, किसिंग काही होणार नाही आणि तो दुसऱ्या कुठल्या बाईबरोबर हे सगळं करेल म्हणून आता मी चिडतेय, नॉट फेअर! ती जोरजोरात स्क्रब करताना स्वतःवरच चिडत होती. स्क्रबिंग संपवून ती बाहेर आली तेव्हा तो नेमका पॅसेजमध्ये एका सुंदर नर्सशी बोलत होता.

ओह गॉड! मला उलटी येईल आता.

नर्स सुंदर होतीच पण तिने सायरा कधीही करू शकत नाही असा छान सटल मेकअप केला होता. लिपस्टिक, भरपूर मस्कारा. त्यांच्या दिशेने चालताना तिने पोनीटेल घट्ट केली. तिला खरं उलट फिरून मागे जायचं होतं पण लिफ्ट त्यांच्याच दिशेला होती. तिने मन घट्ट केलं, खांदे ताठ केले आणि लिफ्टकडे चालत राहिली.

नर्स त्याच्या जवळ जाऊन काहीतरी बोलली आणि अनिश नर्सकडे बघून हसला हे तिच्या डोळ्यांनी टिपले. त्यांनी एकत्र घालवलेल्या इतक्या महिन्यात तो तिच्याकडे बघून हसलेलं हाताच्या बोटावर मोजता येईल! तिला भिंतीवर एक पंच मारावासा वाटला. तिने चालण्याची गती वाढवली. लिफ्ट अजून का येत नाहीये! ती त्यांच्या शेजारून जाताना नर्सचा साखर पेरलेला आवाज आला. "तुम्ही तिथे भेटाल असं वाटलं नव्हतं."

त्यावर त्याचं उत्तर तिला ऐकू आलं नाही.

तिच्या हातांच्या मुठी वळल्या. ती सरळ लिफ्टसमोर जाऊन थांबली आणि बटन इतक्या जोरात दाबलं की तिचा अंगठा दुखायला लागला.
कमॉन.. कमॉन... पुटपुटत अजून दहा वेळा ती बटन दाबतच राहिली.

अचानक शेजारी कुणीतरी येऊन उभं असल्याचं तिला जाणवलं आणि पाठोपाठ त्याच्या मस्की सुगंधाने तिचं डोकं बंद पडलं. तो असायला हवा त्यापेक्षा ज..रासा जास्त जवळ उभा होता. तिने नजर समोर ठेवली आणि स्टीलच्या भिंतीवर दिसणाऱ्या त्यांच्या वेड्यावाकड्या प्रतिबिंबाकडे बघत राहिली. तो स्तब्ध उभा होता. सगळीकडे शांतता होती. कदाचित या शांततेत त्याला तिची चिडचिड जाणवत असेल. तिने आवळलेल्या मुठी सोडल्या. समोर नंबर्स बदलत लिफ्ट खाली आली आणि शेवटी लिफ्टचं दार उघडलं.

ती आत शिरली, मागोमाग तोही. दरवाजे झूप्प करून बंद झाले आणि जणू आतला ऑक्सिजनच संपून गेला. लिफ्टमध्ये ते दोघेच होते. तिने बाराव्या मजल्याचे बटन दाबले, त्याने काहीच हालचाल केली नाही. ती हाताची घडी घालून कोपऱ्यात भिंतीला चिकटून, समोर बघत उभी राहिली. तोही वळल्यामुळे तिला फक्त त्याची पाठ दिसत होती. तो अगदीच रिलॅक्स दिसतोय, नक्कीच त्या नर्सचा विचार करत असणार.

ती जळून खाक होत होती. याआधी तिला असं कधीच झालं नव्हतं. एवढया छोट्याश्या गोष्टीने ती इतकी चिडेल, इतका त्रास होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि हे सगळं अश्या माणसासाठी जो साधं वळून तिच्याकडे बघतही नाहीये.

तिने दात आवळले आणि चिडून करवादली. "तुम्हाला हॉस्पिटल स्टाफबरोबर फ्लर्ट करायचं असेल तर निदान कुठेतरी एकांतात करु शकाल का? इथे कोणीही तुम्हाला बघू शकतं. इट्स रिअली नॉट दॅट प्रोफेशनल."

त्याने फक्त हसून मान आडवी हलवली. वळून बघितलंसुद्धा नाही.

अच्छा, माझे शब्द उत्तर देण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत तर.

"तुम्ही 'कुठे' भेटाल असं वाटलं नव्हतं तिला?" तिने तरीही विचारलंच.

अचानक डिंग वाजून लिफ्ट थांबली आणि दार उघडलं. तीन चार जण आत आले. अजून सातवाच मजला होता पण त्यांचा एकांत नाहीसा झाला होता. तिचा प्रश्न तसाच हवेत राहिला, आता काही उत्तर मिळणार नाही. तिच्या छातीत धडधडत होतं. त्यांच्यातलं टेन्शन नक्कीच बाकी लोकांना कळत असेल. तिच्याकडे बघणाऱ्या एका माणसाकडे तिने वैतागून बघितले.

शेवटी एकदाचा बारावा मजला आला. दार उघडताच ती सुटका झाल्यासारखी पटकन बाहेर पडली आणि मोकळा श्वास घेतला. तेवढ्यात तिच्या कोपरावर एक मजबूत हात पडला आणि ती ओरडायच्या आत त्याने तिला भराभर एका दारामागे नेले. ती स्टोरेजची चिंचोळी जागा होती. त्याने दार आपटलं आणि कोणी उघडू नये म्हणून आतून एक मॉप दारावर तिरका ठेवला.

"तू मला ते ऍग्रीमेंट साइन करायला लावलंस, सायरा." तो जवळ येत म्हणाला. "तूच सांगितलंस की तुला माझ्याबरोबर काही करायचं नाहीये, मग असं का वागते आहेस? जेलस असल्यासारखं."

तिचे डोळे विस्फारले. "मी असं काहीही करत नाहीये." हे तिने बोललेलं सगळ्यात वाईट खोटं होतं. कोणीही सांगेल.

"तू मला रविवारबद्दल विचारत होतीस. काय कारण?"

"असंच, मी सहज तुमची चौकशी करत होते." ती खाली बघत म्हणाली.

"खोटं बोलतेयस." त्याचा आवाज गंभीर होता. "मग ऐक. काल ती नर्स मला फळवाल्याकडे भेटली होती. तिच्या आठ वर्षाच्या मुलाबरोबर होती, ज्या मुलाची तो बाळ असताना मी सर्जरी केली होती."

तिचे गाल शरमून तापले. ह्या काळोखात त्याला तेवढं तरी दिसू नये म्हणून ती प्रार्थना करत होती.

त्याने तिच्याकडे अजून एक पाऊल टाकलं आणि तिने त्याला थांबवायला हात वर केले.

"मी समजले तुम्ही दोघं फ्लर्ट करताय." शेवटी तिला कबूल करावंच लागलं.

"आणि करत असलो तर.." त्याचा आवाज अजूनही मऊ झाला नव्हता.

ती मागे सरकत आता मागच्या लोखंडी शेल्फला टेकली होती आणि त्याचा काठ तिच्या पाठीत घुसत होता. कुठल्याही क्षणी कोणी इथे फिनेल घ्यायला येऊ शकतं. दार उघडेल आणि.. तिचा जीव अर्धा होत होता.

"अनिश!" ती आता अगदीच वितळली होती. "आय एम सॉरी. एवढ्याश्या गोष्टीने मी हायपर व्हायला नको होतं. मला कळतंय, मी बालिशपणे वागले. आता प्लीज मला जाऊदे, मी पुन्हा अजिबात असं वागणार नाही." ती मनापासून माफी मागत होती.

त्याच्या ओठाचा कोपरा वाकडा झाला. तिचं पाणी पाणी झालं.

"सायरा" त्याने पुढे होत बोटाने तिची हनुवटी वर केली. तिचं डोकं किंचित मागे झुकवलं जेणेकरून त्याचा चेहरा तिच्या जवळ येईल. ती टेन्स होऊन थरथरत होती. त्याने किस करायला नको, ती अजून पहिल्यातूनच सावरली नव्हती.

"मी आत्ता, इथे तुला किस करू शकतो.." तो बोलत असताना तिचा ऊर धपापत होता. कितीही श्वास घेतले तरी ते कमीच पडत होते. " मी फक्त थोडासा वाकलो, असा.." त्याने खाली ओठ तिच्या जवळ आणले. ओठांना किंचित स्पर्श झालेला तिला जाणवला. तिच्या अंगावर काटा फुलला. तिने दोन्ही हातानी मागचा शेल्फ धरला, नाहीतर ती तिथेच कोसळली असती.

"आय नो, तुला काय हवंय..तुझी प्रत्येक इच्छा तुझ्या चेहऱ्यावर दिसते. ह्या चेहऱ्यावर." त्याने हलकेच बोट फिरवत तिच्या गालापासून जॉ लाईन ट्रेस केली. त्याचं बोट हळूहळू तिच्या गळ्यापर्यंत गेल्यावर ती स्तब्ध झाली. आत्ता जर त्याने पूर्ण तळवा टेकवला तर तिच्या हृदयानेसुद्धा मान्य केले असते.

"तू लाल झालीयेस." त्याचा आवाज जरा मृदू होता.

"यू आर रॉन्ग. तुम्हाला वाटतंय मला तुम्ही किस करायला हवंय? पण मी घाबरलेय!" ती बोलत राहिली. "यू हॅव ऑल द पॉवर. हे जर वर्कआऊट झालं नाही तर मला जबरदस्तीने दुसरा जॉब शोधावा लागेल. सगळीकडे आपल्याबद्दल गॉसिप पसरलं तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही पण मला नक्कीच सगळे चालू असिस्टंट म्हणतील. मला ह्या वाटेला जायचं नाही, जोपर्यंत माझी खात्री होत नाही की मला हेच हवंय."

"आणि माझं काय? जर मला हे सगळं हवं असेल तर?" त्याचा हात गळ्याभोवती येऊन अंगठा तिच्या थडथड उडणाऱ्या पल्सवर जाऊन थांबला.
आश्चर्य म्हणजे हे त्याने घाबरवल्यासारखं नव्हे तर नाजूकपणे केलं. तिला वाटलं तो आता तिला काहीतरी सेन्सिबल सांगेल पण तो गप्प राहिला. त्याचे डोळे तिच्या डोळ्यात अडकले आणि त्यात शंभर भाव तरळून गेले. पुन्हा त्याचा चेहरा तिच्या जवळ आल्यावर ती हलूच शकली नाही.

पण त्याच्या ओठांचा तिला स्पर्श होण्याच्या आत तो बाजूला झाला आणि त्याने कपाळ शेजारच्या भिंतीला टेकले. त्याने डोळे घट्ट मिटून कुठेतरी दुखल्यासारखं तिचं नाव घेतलं. लगेच जोरात दार ढकलून तो बाहेर पडला. त्याने भिरकावलेला मॉप भिंतीच्या कडेला कुठेतरी आपटून पडला होता.

ती अजूनही थरथरत होती. तिला तिच्यावर नेम धरून डागलेली गोळी कानाशेजारून गेल्यासारखं वाटलं.

आता तिला सुटल्यासारखं, मोकळं वाटायला हवं पण जास्त निराशच वाटत होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २८

अनिशला मी माझ्यापासून लांब ठेवतेय कारण मी एक जबाबदार आणि प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. मी स्वतःला कायम सांगतेय की तू स्वप्नं काहीही बघ पण त्यांच्या आहारी जाऊ नको. मला माझ्या भविष्याचा आणि नेहाच्याही भल्याचा विचार करायचा आहे. आत्ताच काही काळापूर्वी माझी नोकरी जाणार होती. त्यावेळची दुसरा जॉब मिळेपर्यंतची अनिश्चितता आणि अस्वस्थपणा मी विसरू शकत नाही. फक्त माझ्या मनाला वाटतं म्हणून मी स्वतःला असं मोकळं सोडू शकत नाही. आय डोन्ट हॅव दॅट लग्झरी. सायरा अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करत होती.

पुढचा सगळा आठवडा टॉर्चर होता. रोज सर्जरी शेड्युल्ड होत्या आणि रोज त्याचं दर्शन होत होतं. तो अजूनही स्क्रब्जमध्ये तेवढाच हॉट दिसतोय आणि त्या 'बेडहेड', 'बेडरूम आईज' अश्या टर्म्स मॉडर्न डिक्शनरीतून खोडून टाकल्या पाहिजेत म्हणजे त्याला बघून मनात येणार नाहीत.

त्याचीही अवस्था तिच्याहून फारशी वेगळी नव्हती. वरवर तो ठरवल्याप्रमाणे सगळ्यांशी बरं बोलायचा प्रयत्न करत असला तरी आतून तो उकळत असणार. आता तो सगळ्यांवर ओरडून ऑर्डर्स सोडत नाही पण जगावर चिडल्यासारखा पाय आपटत फिरतो.

ओटीमधून बाहेर आल्यावर ती त्याच्यापासून चार हात लांबच रहात होती जेणेकरून पुन्हा लिफ्ट किंवा स्टोरेजची भीती नको. पण दिवसभर त्याला चुकवणे खूप कठीण आहे. सारखं मागे वळून तो जवळ नाही ना बघणं आणि कुठेही त्याचा आवाज येत नाही हे चेक करत रहाणं यामुळे तिला ऑलमोस्ट PTSD झाला होता. रोज ती दमून गारद होत होती आणि त्यात भर म्हणून सारखे नेहाचे तिला प्रश्न. आता तिने घरी ग्रेज बघण्यावर बंदी आणली तर नेहा सारखी रोमान्स नॉवेल्स वाचत होती आणि मनानेच तिला आणि अनिशला रोमान्सचे हिरो हिरॉईन ठरवून टाकले होते. नेहाचे प्रश्न वरवर साधे वाटत असतील पण तिला तिच्या ट्रिक्स माहिती होत्या. प्रत्येक प्रश्नातून नेहा तिला टेस्ट करत होती.

आजची सर्जरी कशी झाली?

व्यवस्थित.

"तिथे डॉ. पै होते का?"

हो, obv!

ते स्क्रब्जमध्ये हँडसम दिसत असतील ना?

हो, मग?

प्रत्येक वेळी नेहाने तिला पकडायला टाकलेला गळ ती चुकवते, तिला काही फरक पडत नाही असं दाखवत.

फक्त झोपताना पांघरूण ओढलं की तिला तिचा एकटीचा वेळ मिळतो. तेव्हा ती दिवसभर अनिशबरोबर घालवलेल्या क्षणांचा पेटारा उघडते. त्याने तिच्याकडे टाकलेला प्रत्येक कटाक्ष, तिला उद्देशून म्हटलेला प्रत्येक शब्द ती पुन्हा एकदा जगते आणि हे सगळं एका वेगळ्या जगात घडत असतं तर.. अशी स्वप्न रेखाटते.

स्टोरेजच्या घटनेला आता काही आठवडे उलटून गेले होते. हॉलमधून जाताना तिला त्याचा आवाज आला. समोर शुभदाच्या डेस्कपाशी तो उत्साहात बोलत होता. ती उत्सुकतेने जागीच थांबली. त्याने हातातला कागद शुभदासमोर वाचण्यासाठी धरला. त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं हसू होतं. इतक्या आनंदात तिने त्याला कधीच बघितलं नव्हतं. ती स्तब्ध होऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती, जवळपास संमोहित होऊन. हसणं माणसाचा चेहरा इतका बदलून टाकतं?!

हॅलो हार्ट? इट्स मी, ब्रेन! कंट्रोल युअरसेल्फ!

"ग्रँट कमिटीका ईमेल है." तो अभिमानाने शुभदाला सांगत होता. "कमिटीने दो प्रपोजल्स फायनल किए है, एक मेरा और दुसरा वेल्लोरका एक डॉक्टर है."

"ओह, दॅट्स ग्रेट!! काँग्रॅट्स डॉक्टर!" शुभदाने त्याचा हात धरून जोरजोरात हलवला. "फायनल डिसीजन कब आएगा?"

"होपफूली, दिवालीके पहले." त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम होतं.

ओह, त्याने खूप मेहनत घेऊन प्रपोजल बनवलं होतं ती ही ग्रँट असणार. मला त्याबद्दल फार कमी माहिती आहे पण त्याच्या डोक्यावर याचा खूप दबाव होता. फायनल टू मध्ये येणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तिला पुढे होऊन त्याचं अभिनंदन करून ईमेल बघाविशी वाटली. पण तेवढ्यात त्याने समोर तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर तिच्यावर आपटली आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विरून गेलं, त्याचे हसरे डोळे कठोर झाले आणि तिची त्याचं अभिनंदन करायची इच्छा आतल्याआत मरुन गेली. ती रस्ता बदलून वळली आणि मागच्या बाजूचा जिना चढू लागली. वाईट दिसलं तरी चालेल पण त्याच्या शेजारून जाण्यापेक्षा बरं!

दिवाळीची तीही मनापासून वाट बघत होती पण एकीकडे तिला खूप उदासही वाटत होतं. ह्या आठवड्याच्या शेवटी दिवाळीची पाच दिवस सुट्टी होती, प्रत्येक डिपार्टमेंटचे थोडेसेच लोक एक्स्ट्रा इंसेंटिव्ह घेऊन हॉस्पिटलमध्ये थांबतील. त्याआधीच्या संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे हॉस्पिटलकडून स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळी पार्टी असेल. कुठलं तरी फॅन्सी हॉटेल आणि चविष्ट मेनू! इतके वर्ष फक्त तेवढ्यासाठी ती आणि तिच्या मैत्रिणी पार्टी अटेंड करायच्या. डॉ. पै कधीच त्या पार्टीत दिसले नव्हते आणि मोस्टली या वर्षीही नसतील.

त्याच्याबद्दल काय वाटतंय हे तिला नक्की ठरवता येत नव्हतं पण त्याला बघितल्याशिवाय चार पाच दिवस काढणं खूप कठीण होतं. आत्तापेक्षा फार काही वेगळे दिवस नसतील कारण ओटीबाहेर अजूनही ते दोघे बोलत नव्हते. गेले काही आठवडे ती तिला बाकी कलिग्जसारखंच वागवत होता. तो जेव्हाही काही बोलेल ते कामाबद्दलच असतं. हल्ली तो रूड वागत नाहीये पण त्याच्यात काही दिवसांपूर्वी आलेली मृदूता पुरती हरवलीय.

आत्ताही ती चंदाबरोबर लाऊंजमध्ये बसली होती. मनातली खिन्नता चेहऱ्यावर न दाखवायचा प्रयत्न करत तिने समोरच्या कोरड्या व्हेज सँडविचचा बारीकसा घास घेतला. इतक्यात चंदाने तिला कोपर मारलं. "समोर बघ!" तिने मान उचलून समोर पाहिलं तर दारात डॉ. पै. आज ब्लू शर्टवर पांढरा कोट. हातात दोन तीन फाईल्स आणि फोल्डरचा गठ्ठा. तो सरळ तिच्याकडे बघत होता, आता पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्या विचाराने ती घाबरली. ती उठून पटकन दरवाज्याकडे गेली. "मायराला काही होतंय का?" तिने काळजीने विचारले. सकाळीच मायराची सर्जरी झाली होती.

तो कसल्यातरी गहन विचारात होता. "नाही, ती ठीक आहे. आत्ताच एक नवीन केस आलीय आणि मला तिच्याबद्दल तुझ्याशी बोलायचंय."

तिने रोखून धरलेला श्वास सोडला. "ओह, ओके. मी लंचचं सगळं आवरून येते.

"त्याची गरज नाही, तू लंच कर. मी लंच पॅक करून आणलाय, बसून बोलू." त्याने आत पाऊल ठेवलं आणि आजूबाजूचे सगळे लोक धक्का बसल्यासारखे त्याच्याकडे बघू लागले. डॉक्टर्स इथे जेवत नाहीत, त्यांच्यासाठी सिरॅमिक प्लेट्स,  स्पेशल केटरिंग विथ सर्व्हिस असते. आमच्याकडे स्टीलची ताटं, पोळी भाजी आणि मॅगी कप्पा नूडल्स असतात.

त्याला लोक बघतायत हे कळलं तरी त्याची फिकीर नव्हती. तो सरळ कोपऱ्यातल्या रिकाम्या टेबलवर जाऊन बसला. हातातल्या फाईल्स, फॉईल पार्सलचा बॉक्स टेबलावर ठेवला आणि पाय लांब केले. ती आपला लंच घेऊन त्या टेबलापाशी जाईपर्यंत लोकांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या. हे काय चाललंय त्यांना कळत नव्हतं. लोकांचा विचार सोडून तिने त्याच्याकडे लक्ष दिले. तो इतक्या घाईत तिच्याशी बोलायला आला म्हणजे नक्कीच ही खूप महत्त्वाची केस असणार. ती त्याच्याशेजारची खुर्ची ओढून बसली. त्याने आधीच फोल्डर उघडून काही कागद बाहेर काढले होते.

"बंगलोरच्या एका मित्राने मला सकाळीच ह्या इमर्जन्सी केसबद्दल ईमेल पाठवली होती. " तो लगेच कामाचं बोलायला लागला. "ही सोनल सतरा वर्षांची आहे. तिला जन्मतः एबस्टाइन्स अनॉमली आहे. म्हणजे हार्टची डावी बाजू नीट डेव्हलप झाली नाही आणि रक्ताभिसरण वेगळ्या मार्गाने सुरू आहे. रक्तात ऑक्सिजन खूप कमी पोचतो. तिला त्यावेळी फार सिम्प्टम्स नव्हते आणि गावात डिलिव्हरी झाली म्हणून कोणाच्या लक्षात आलं नाही. पण आता तिला साधी हालचालही करता येत नाही. दोन्ही आर्टरीज अरुंद झाल्यात. बऱ्याच वर्षांपूर्वीच तिची सर्जरी व्हायला हवी होती पण तिच्या पालकांनी बाकी हेल्थ इश्यूजना प्राधान्य दिले."

"बाकी हेल्थ इश्यूज म्हणजे?" तिने फाईलमध्ये बघत विचारले.

"ल्युकेमिया."
तिचा श्वास अडकला, तिने एकदम वर बघितले. त्याने मान हलवली. "त्यांनी हार्टकडे दुर्लक्ष केले नव्हते, औषधं सुरू होती. ती आठेक वर्षाची असताना एक सर्जरी झाली होती पण त्याचा फार उपयोग झाला नाही.

"आता तिचं वय जास्त आहे.."

"हम्म, पण आता इमर्जन्सी सर्जरी करण्यावाचून पर्याय नाही. तिची मोटर फंक्शन्स हळूहळू बंद पडत चालली आहेत."

ओह, आधी कँसरवर मात केली आणि आता हे.. तिचं शरीर किती झेलू शकेल? सायराला वाईट वाटत होतं.

"सो, तुमच्या मित्राकडे ही केस आहे?"

"त्याची स्पेशालिटी वेगळी आहे, तो ऑनकॉलॉजिस्ट आहे. तिचं शरीर आत्ताच केमो आणि रेडिएशनच्या माऱ्यातून बाहेर आलंय. खूप ऍडिशनल रिस्कस आहेत. म्हणून कोणी सर्जन्स ह्या केसला हात लावायला तयार नाहीत."

पण अनिश ही केस घेईल. नो डाऊट.

त्याने तिच्याकडे बघितलं, ती काय विचार करतेय ते जाणवून त्याने मान हलवली. "तिचे आईवडील पुढच्या फ्लाईटने तिला इथे घेऊन येतायत. आपण हे करणार असू तर मला तुझी मदत लागेल."

"हो, ऑफ कोर्स." तिने मान हलवली. तिला नक्की काय मदत करायची आहे याची कल्पना नव्हती. तिने हो म्हणताच तो सगळं आवरून उठला आणि तिला घेऊन बाहेर पडला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - २९

शुभदा तिच्या डेस्कमागे उभी राहून कानाला रिसीव्हर लावून हाताने भराभर नोटपॅडवर लिहीत होती. त्यांना येताना बघताच तिने फोन होल्डवर टाकला आणि डॉ. पैना भराभर अपडेट दिले. "डॉ. गांधी सर्जरीमे हैं, वो कॉल बॅक करेंगे. डॉ. कनसेका लंच ब्रेक है, उनको बादमे कॉल करती हूं, अभी लाईन पर डॉ. डिसूझा है. पेशंट को सुबह की फ्लाईट मिली है, दे विल रीच हिअर अराउंड इलेव्हन. मैने सामनेवाला हॉटेल ट्राय किया लेकिन वो फुल्ली बुक्ड है."

काळजीपूर्वक ऐकत त्याने मान हलवली. "तुम डॉक्टर्स हँडल करो, हॉटेल बुकिंग सायरा कर लेगी. मेरा शेड्यूल क्लिअर करो, सर्जरीज पुश करो." केबिनकडे जाताना त्याने मागे सायराकडे वळून बघितले. "सायरा, हॉटेल बुक झाल्यावर माझे पेशंट रीशेड्यूल करायला शुभदाला मदत करशील का?" तिने मान डोलावली आणि डेस्कवरचा दुसरा फोन उचलला.

ती काय करतेय तिला समजत नव्हतं. नॉर्मली पेशंटच्या नातेवाइकांची सोय हॉस्पिटल थोडंच करतं? "ते किती दिवस इथे असतील?"

"सुरुवात तीन दिवसांपासून कर." तो केबिनकडे गेला.

दुपारची हळूहळू संध्याकाळ झाली. तिला जेवायला पोचू शकणार नाही एवढं नेहाला कळवण्याइतकाही वेळ मिळाला नव्हता. दिवाळीमुळे सगळी हॉटेल्स फुल्ल होती, जिथे जागा होती तिथे कायच्या काय टॅरीफस् होती. शेवटी एकदाची हॉस्पिटलपासून थोडं दूर एका हॉटेलमध्ये तिने गोड बोलून रूम मिळवली, टॅरीफ तरीही जास्तच होतं. तिच्या पोटात गोळा आला पण शुभदाने तेवढं चालेल म्हणून धीर देत डॉ. पैंचं क्रेडिट कार्ड पुढे केलं. तिने पेमेंट करून बूकिंग केलं आणि पेशंटस् रीशेड्यूल करण्याकडे वळली.

अनिशच्या कामातही भरपूर अडथळे होते. त्याचे ओळखीच्या सर्जन्सना कॉल सुरूच होते. मधेच शुभदाने तिला खुसखुस करत सांगितले की सर्जरीसाठी अजून दोन सर्जनची गरज होती, त्याला या केसमध्ये कुठलेही चान्सेस घ्यायचे नव्हते. पण आत्ता सगळ्यांचंच टाईमटेबल पॅक असतं. दिवाळी आणि सुट्ट्यांच्या प्लॅनिंगमुळे  ऐनवेळेला स्वतःच्या सर्जरीज पोस्टपोन, रीशेड्यूल करून कोणी मिळणं फारच कठीण होतं.

ती लिस्टमधल्या पेशंटना कॉल करून त्यांच्या कन्सल्टेशन आणि प्री ऑप अपॉइंटमेंट्स री-शेड्यूल करून एकेका नावावर काट मारत होती. तेवढ्यात केबिनमधून त्याची जोरात हाक आली. हातातलं पेन टाकून ती पटकन आत पळाली.

तो खिडकीजवळ येरझाऱ्या घालत होता. पांढरा कोट खुर्चीच्या पाठीवर टाकलेला होता. निळ्या शर्टाच्या बाह्या दुमडलेल्या, शर्टचं वरचं बटन उघडं आणि केस पुनःपुन्हा विस्कटल्यासारखे होते. तो डोकं दुखत असल्यासारखं कपाळ दाबत होता. इतका स्ट्रेस्ड तो याआधी कधीच दिसला नव्हता. "प्लीज खाली जाऊन डॉ. गांधींना असतील तिथून घेऊन ये. त्यांचा फोन कोणी उचलत नाहीये. त्यांना सांग, मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं आहे."

मान हलवून ती भराभर लिफ्टकडे गेली. तिसऱ्या मजल्यावर डॉक्टरांच्या सगळ्या केबिन्स बंदच दिसत होत्या. डॉ. गांधींच्या केबिनचेही दिवे बंद होते. तिने पटकन बाहेरच्या रिसेप्शनवर चौकशी केली. "डॉ. गांधी.. ते एक तासापूर्वीच गेले. आज त्यांच्या मुलीचा फर्स्ट बर्थडे आहे ना!" रिसेप्शनिस्ट म्हणाली. सायराने डोळे घट्ट मिटले. तिने घड्याळात बघितलं तर आठ वाजत आले होते.

ती परत वर गेली. ही खबर देणारी व्यक्ती तिला व्हायचं नव्हतं. काय माहीत हा माणूस गोळीबिळी घालेल!

"फ*ग हेल!!" तिने सांगितल्यावर खुर्चीवर एक गुद्दा मारून त्याने खिडकीतून बाहेर बघितले. बाहेर अंधार पडून ट्रॅफिकच्या दिव्यांची रांग लागली होती. तिला काय करावं समजत नव्हतं. त्याला एकांत द्यावा की प्रोत्साहन द्यायला काही बोलावं. दुपारपासून न थकता तो फोनवरच बोलत होता. अजून बोलायला त्याचा आवाज शिल्लक आहे ही कमाल म्हणायची!

त्याचं डोकं शांत व्हायची वाट बघत ती डेस्कसमोर उभी होती. काय बोलावं याचा विचार डोक्यात सुरू होता. तिला 'शांत व्हा, सगळं छान होईल' वगैरे काहीतरी बिनबुडाचं बोलायचं नव्हतं. कारण तिलाही माहिती होतं की सगळं छान होण्याचे चान्सेस खूप कमी होते. "डॉ. पै.." दारातून शुभदाचा आवाज आला. "ट्रॅफिक और बढनेसे पहले मुझे निकलना होगा. आय'ल कम अर्ली टुमॉरो."

"येस, तुम जाओ. काम सुबह खतम करते है." तो डोकं न वळवता म्हणाला. तिने शुभदाकडे बघून किंचित हसत हात हलवला.

शुभदा गेल्यावर ते दोघे बराच वेळ शांततेत उभे होते, ती शांतता अंगावर येईपर्यंत. डेस्कपलिकडे जाऊन त्याच्या पाठीवर हात टाकून घट्ट मिठी मारण्याची तीव्र इच्छा तिने कशीबशी दाबून टाकली. शेवटी तो खिडकीतून डेस्ककडे वळला.

"उशीर झालाय, तू पण निघ." पुन्हा कामाला लागण्यापूर्वी तिच्याकडे बघून तो म्हणाला. त्याचा आवाज इतका निराश आणि रिकामा होता की ती कळवळली. "आणि तुम्ही काय करणार?"

त्याने फायलींकडे हात केला."हे."

ऑफ कोर्स, उशीर वगैरे आमच्यासाठी. तो त्याचं काम संपेपर्यंत कुठेही जाणार नाही.

"मी पण थांबते मदतीला." तो काय म्हणणार याचा अंदाज होता तरीही ती मान ताठ करून म्हणाली.

"नको. बराच उशीर झालाय. नेहा एकटी असेल, जा तू."

अंदाज होताच, त्यामुळे तिला तो नाही म्हणाल्याचं तिला वाईट वाटलं नाही. ती त्याच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसली. तो वर न बघता फाईल वाचत होता. त्याचं पूर्ण लक्ष खालच्या कार्डीऍक MRI आणि ECG रिपोर्टमध्ये होतं. त्याच्या दबलेल्या खांद्यावरचं ओझं तिला अक्षरशः दिसत होतं. ती त्याच्यामागे खिडकीबाहेर झगमगणारे दिवे बघत शांत बसून राहिली. "मी हे करू शकतो सांगून मी वेडेपणा केलाय." त्याचा बारीक आवाज आला. "मी त्या लोकांना सांगितलं, शेड्यूल ऍडजस्ट केलं पण आता मला खात्री वाटत नाहीये."

"आय एम शुअर, तुम्ही अश्या बऱ्याच केसेस हँडल केल्या असतील." तिने धीर द्यायचा प्रयत्न केला.

त्याने केसांतून हात फिरवत केस मुळापासून खेचले. तो स्वतःवरच चिडला होता.

ती त्याला हार मानू देणार नव्हती. हे कोणी करू शकत असेल तर फक्त तोच करू शकतो. "हाऊ कॅन आय हेल्प?" तिने खंबीर होत विचारले.

"मी तो फाईल्सचा गठ्ठा काढलाय. त्यात आपल्या केसशी मॅच होणारे कार्डीऍक MRI आणि ECG रिपोर्ट शोध." तो मुद्दाम तिरकस बोलत होता. ती ते ऐकण्याचा वेडेपणा करणार नाही असं त्याला वाटलं. पण ती खुर्ची सरकवून उठली आणि भिंतीकडे गेली. तो ढिगारा जवळपास तिच्या कंबरेइतका होता.

"सायरा, मी जोक करत होतो. तू घरी जा, मी बघेन ते." तो हातातलं पेन खाली ठेवत म्हणाला.

टू लेट. तिने शूज काढून बाजूला ठेवले, पोनीटेल घट्ट केली आणि खालच्या कार्पेटवर मांडी घालून बसली. तिचे स्क्रब्ज तसेही लूज असल्यामुळे पजामा घातल्यासारखेच वाटत होते. "फक्त MRI आणि ECG बघायचे ना?"

"सायरा, तुला हे करायची खरंच गरज नाही." तो खुर्चीतूनच म्हणाला. तिने काहीच उत्तर दिले नाही. शेजारच्या सोफ्यावर तिने फायलींचा एक गठ्ठा ठेवला आणि मांडी घालून बसली. तो तिचा नाद सोडून परत कामाला लागला, फक्त तेवढ्यात डोकं चालवून त्याने पिझ्झा ऑर्डर केला.

तिच्याकडे एक्स्पर्ट नॉलेज नव्हतं पण त्याने तिला एक्झॅक्टली काय बघायचं ते सांगितल्यामुळे तिला ते शोधणं सोपं होतं. तो त्याच्या खुर्चीतच काम करत होता, तो काय करतोय विचारायचं धाडस तिच्यात नव्हतं. शेवटी ती त्याच्या मदतीला थांबली होती, तिला त्याचं लक्ष विचलित करायचं नव्हतं. पिझ्झा आल्यावर तिने नेहाला कॉल करून इमर्जन्सीमुळे थांबावं लागतंय म्हणून सांगितलं. त्यांनी काम करता करताच पिझ्झा खाल्ला आणि तिने एक जांभई दिली. तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे नजर टाकली. तो खालच्या ओठावर अंगठा फिरवत डोळे बारीक करून एक रिपोर्ट वाचत होता. मधेच त्याने डोकं हलवलं आणि तो कागद मुठीत चुरगळून खाली बिनमध्ये फेकला. पान उलटून तो पुढे वाचत राहिला. तिने पुन्हा आपल्या फायलीत डोकं घातलं.

परत तिने घड्याळात बघितलं तेव्हा दीड वाजला होता. ऐशी टक्के गठ्ठा संपला होता. रिपोर्टमधल्या इमेजेस बघून बघून तिच्या शिणलेल्या डोळ्यांना ब्रेक हवा होता. तिला डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेला २०:२०:२० नियम आठवला.

अनिशच तिचा वीस सेकंदाचा ब्रेक होता.

तो अचानक हलला आणि त्याने समोर पाहिलं. तिने पटकन नजर मांडीवरच्या फाईलमध्ये हलवली.

"काय झालं?"

तिचे गाल किंचित लाल झाले, काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून तिने विचारलं."बाय एनी चान्स, इथे एखादं ब्लॅंकेट, शाल वगैरे काही आहे?"

त्याने उठून हात वर करून आळस दिला आणि पलीकडच्या कपाटातून एक पातळ ब्लॅंकेट काढून तिला दिलं. तो परत जाऊन लॅपटॉपसमोर बसणार तोच त्याने लॅपटॉप उचलला आणि सोफ्यावर दुसऱ्या टोकाला येऊन बसला. "खुर्चीत बसून बसून पाठ दुखायला लागली."

तिने मान हलवली. हे एकाच सोफ्यावर बसणं जरा इंटिमेट वाटू शकतं पण निदान त्यांचा एकमेकांना स्पर्श होण्याची भीती नव्हती. सोफा बराच मोठा होता. तिने स्वतःला ब्लॅंकेटमध्ये गुरगुटायला सुरुवात केली. अर्ध ब्लॅंकेट अंगावर लपेटल्यावर तिला तो बघत असल्याचं जाणवलं.

"ओह, सॉरी! तुम्हालापण हवंय का?" तिने एक कोपरा पुढे करत विचारलं. तो त्याच्या तळहातालाही पुरला नसता! तिची ऑफर त्याला विनोदी वाटली असणार कारण त्याने गालात हसत मान हलवली.

"नको. आय एम गुड!"

तिला पुन्हा सांगण्याची गरज नव्हतीच. तिने ते मऊ, उबदार ब्लॅंकेट स्वतःभोवती गुरगुटून घेतले. हम्म, त्याचा मस्की सुगंध.. तिने फाईल उचलून वाचायला सुरुवात केली. किती वेळ गेला कुणास ठाऊक, पोटभर पिझ्झा आणि उबदार ब्लॅंकेटमुळे झोप मी म्हणायला लागली. तिने कितीतरी वेळा डुलकीतून खाडकन डोळे उघडले, पण झोप अनावर होती. फक्त थोडाच वेळ... म्हणत शेवटी तिने डोळे मिटले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३०

रात्रीचे तीन वाजत आलेत. एव्हाना मेंदूची अक्षरशः चाळण झालीय. खिडकीबाहेर रस्ताही किर्रर्र अंधारात बुडालाय. त्याने हात वर करून आळोखे पिळोखे देत बाहेर बघितलं. समोर सायरा ब्लॅंकेटमध्ये गुरगुटून झोपली होती. सकाळ होण्यापूर्वी थोड्या तरी झोपेची त्याला नितांत गरज होती. एवढीशी असून पसरून झोपल्यामुळे तिने सोफ्यावर खूपच जागा व्यापली होती. त्याने शूज काढले आणि लॅपटॉप मिटून खाली ठेवला. तिने ब्लॅंकेट अजून गुंडाळून घेत थोडी हालचाल केली. तिचं ब्लॅंकेट ओढून घ्यायचं विसरून जा! तो खाली कार्पेटवर झोपू शकला असता पण दुसऱ्या दिवशी पाठ भयंकर दुखली असती, आज ते परवडण्यातलं नाही. शेवटी त्याने तिला सोफ्याच्या थोडं कडेला सरकवून स्वतः आतल्या बाजूला आडवा झाला. तिचे गुढघे त्याच्या डोक्याजवळ होते. तिला जाग येईल म्हणून तो जपून हालचाल करत होता पण ती ढिम्म होती.

ती सोफ्यावरून गडगडू नये म्हणून एका हाताने त्याने तिचे पाय धरून ठेवले आणि एक हात उशीसारखा डोक्याखाली घेतला. हे फार कम्फर्टेबल नव्हतं पण ठीक होतं.. ही केस घेतल्यापासून पहिल्यांदा त्याला डोकं थोडं शांत झाल्यासारखं वाटलं. सकाळी त्याची हॉस्पिटलच्या लीगल टीमबरोबर मीटिंग होती. त्याने ही केस घेतल्याची खबर लीगल टीमला मिळाली आणि सर्जरी होण्याआधी त्यांना काही इश्यूजवर चर्चा करायची होती. तो काय सांगेल ते कदाचित त्यांना पटणार नाही, पण सकाळच्या गोष्टी सकाळी बघू म्हणून त्याने ते विचार झटकून टाकले.

सायरा डोळे चोळत उठून बसली. "अनिश?" तिच्या डोळ्यात अजून झोप होती.

"हम्म?" तो आडवाच होता.

"यू ओके? ब्लॅंकेट हवंय?" तिने ब्लॅंकेट काढून त्याच्या अंगावर घातलं. "हे दोघांना पुरणार नाही. मी घरी जाते." ती सोफ्यावरून उतरायच्या तयारीत होती.

"नको जाऊ." त्याने तिचे पाय तसेच धरून ठेवले. ती थांबली आणि त्याची नजर तिच्या ओठांवरून प्रश्नार्थक डोळ्यांकडे गेली. खूप उशीर झालाय. आत्ता माझ्या डोक्यात भलते सलते विचार यायला नकोत पण ते येतायत. त्याची नजर पुन्हा तिच्या ओठांवर स्थिरावली.

"तुम्ही असं बघणार असाल तर मी थांबणार नाही." ती मान हलवत म्हणाली. त्याने भुवई उंचावली. "ओके, फाईन! आय नो, उशीर झालाय. ठीक आहे, मग मी उलटी झोपते, मेबी माझ्या पायांना वास येत असेल." ती जीभ चावत म्हणाली.

तो हसला पण त्याने विरोध केला नाही. ती पलटून झोपताना त्याने ब्लॅंकेट उघडून धरलं. तिचं डोकं त्याच्या छातीपर्यंत येत होतं. तिने थोडं अंतर ठेवायचा प्रयत्न केला पण सोफा इतकाही पसरट नव्हता. त्याने हात पुढे करून तिला जवळ घेतलं. आता तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं. एवढं चिकटून झोपल्यावर त्याला काही मिनिटांपूर्वी येणारी झोप पार उडून गेली. ती पडू नये म्हणून त्याने तिच्या कंबरेवरून पाठीवर हात ठेवला होता. तिचे सॉफ्ट कर्व्हज आणि त्याच्या छातीवर ठेवलेला तिचा हात यांनी त्याचं उष्ण रक्त सळसळत होतं.

तिने नर्व्हस होत मान वर करून त्याच्या डोळ्यात बघितलं. दुसऱ्या एखाद्या वेळी, जर ती झोपेच्या इतक्या अंमलाखाली नसती तर तिने नक्कीच दूर व्हायचा, लांब जाऊन झोपायचा प्रयत्न केला असता. त्याला आपण तिचा फायदा घेत असल्यासारखं वाटलं. पण ती स्वतःच तर थांबली, तिला कोणी फोर्स केला नव्हता. कितीही आकर्षण वाटले तरी तो पुढे काही करणार नव्हता. त्याचे हात होते तिथेच थांबले आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला परत झोपी जायला सांगितले.

"गुड नाईट अनिश.." तिचा आवाज पाकात बुडवल्यासारखा होता.

तिचे डोळे मिटल्यानंतरही तो खूप वेळ जागा होता. तिच्या चेहऱ्याचे आकार उकार बघता बघता तिच्या हृदयाचे ठोके त्याचं धडधडणारं हृदय शांतवत होते. ती त्याच्या मिठीत असणंच त्याच्यासाठी पुरेसं होतं. ह्याच शांत वाटण्याची त्याला गरज होती. त्याच्या आयुष्यातून ही शांतता कधीच नाहीशी झाली होती, कदाचित अम्मा गेल्यापासूनच. शेजारी तन्वी असतानाही त्याला कधी असं वाटलं नव्हतं. त्या वेळी तो तन्वीबरोबर जे वागला त्याचं त्याला वाईट वाटत होतं पण ते वेगळे होणं हा दोघांसाठी चांगला निर्णय होता. तन्वीबरोबर असताना कधीही त्याला तिच्या शेजारी जागं राहून फक्त ती त्याच्या जवळ असण्याबद्दल कृतज्ञ वाटेल असं कधीही झालं नव्हतं.

सायराची पोनीटेल लूज होऊन केस त्याच्या खांद्यावर पसरले होते. तिच्या शॅम्पूच्या मंद गोडसर वासाने त्याच्या पोटात उमाळा दाटून येत होता. उद्या इतक्या महत्त्वाच्या कामाचा दिवस नसता तर... त्याने तिला समोर बसवून तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल विचारलं असतं. अकाली प्रौढ होऊन गेली कितीतरी वर्ष तिला उपसावे लागलेले कष्ट, बहिणीची जबाबदारी घेतल्यावर वाटणारी भीती, जवळ आईवडील नसल्याचं दुःख.

झोपेत ती खूप निरागस आणि लहान दिसतेय. त्याला अचानक तिची काळजी घ्यावीशी वाटली, जशी ती तिच्या बहिणीची घेते.

तुझी काळजी कोण घेतं सायरा?

हू'ज युअर गार्डीयन?!

---

ती नेहमीप्रमाणे साडेपाचला उठून बसली. त्याचा हात बाजूला करून ती अलगद खाली उतरली. लॅपटॉप टेबलावर ठेऊन फाईल्स नीट रचत असतानाच तिला तो सोफ्यावर कोपर टेकून तिच्याकडे बघत असल्याची जाणीव झाली. "गुड मॉर्निंग!" तो पुन्हा डोळे मिटत म्हणाला.

"मॉर्निंग! हरी अप. तुमच्या कपड्यांचं काय?" तिने पोनीटेल नव्याने बांधत विचारले.

"डोन्ट वरी, इथल्या कपाटात कपड्यांचा एक स्पेअर सेट असतो. मी काही पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये थांबलो नाहीये." उठून ब्लॅंकेटची घडी घालत तो म्हणाला.

"ओके, मी लाऊंजमध्ये पळते."

"प्लीज मला एक ब्लॅक कॉफी पाठव, डबल शॉट."

त्याला अंगठा दाखवून ती बाहेर पडली.

इतकी चांगली सुरू झालेली सकाळ अचानक एक वाईट वळण घेत त्याच्या अंगावर आली. कॉन्फरन्स रूममध्ये दहा वाजता लीगल टीमबरोबर त्याची मीटिंग सुरू होती. चार आंबट चेहरा केलेले लोक चष्मे आणि कडक इस्त्रीचे शर्ट घालून टेबलापलीकडे बसले होते. इतक्या वर्षात त्याचा त्यांच्याशी काधीही संबंध आला नव्हता. त्यांना सर्जन्स आणि हॉस्पिटल स्टाफला वाचवण्यासाठीच नेमलेले होते पण या क्षणी ते अनिश आणि त्याच्या पेशंटच्या आड येत होते. ते लोक पुन्हा पुन्हा एकच गोष्ट फिरवून सांगत होते. ही केस म्हणजे हॉस्पिटलसाठी लीगल नाईटमेर आहे.

"ही लायाबलिटी पेशंटला मिळणाऱ्या फायद्यापेक्षा खूप जास्त आहे. जर सर्जरीत काही चूक झाली तर हॉस्पिटलचा मालप्रॅक्टिस इन्शुरन्स होणार्‍या कोर्ट केसेसचा खर्च देणार नाही. तुमच्या कलीग्जनी ही केस घेण्याच्या विरोधात मत दिलंय." लीगल टीममधील एक खप्पड माणूस बोलला. ओह येस.. माझेच तीन कलीग्ज. डॉ. शेंडे, डॉ. गांधी आणि डॉ. यलगुंतीवार. द थ्री स्टूजेस! ज्यांना पेशंटचा जीव हळूहळू गेला तरी चालेल पण हॉस्पिटलचं नाव महत्त्वाचं आहे. आज डॉ. आनंद असते तर निदान एक मत माझ्या बाजूचं असतं. ते तिघेही पांढरे कोट घालून टेबलाच्या शेजारी बसलेत, खरंतर तो कोट आत्ता ते मुळीच डिझर्व करत नाहीत. त्यांच्यापैकी एकातही त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची हिम्मत नव्हती. त्याला शक्य असतं तर त्याने एकेकाची गचांडी धरली असती.

"अच्छा! माझ्या कलीग्जनी ह्या केसचा एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास केल्याचं मला माहितच नव्हतं. नॉट टू मेन्शन, धिस केस इज नॉट देअर स्पेशालिटी. मी माझ्या स्पेशालिटीचे डझनभर लोक फोनवर आणून माझा निर्णय कसा बरोबर आहे हे प्रूव्ह करू शकतो."

"डॉ. पै तुम्ही पूर्ण विचार केला नाहीये. दिल से मत सोचो यार." डॉ. शेंडेला आवाज फुटला.

अनिशच्या एकाच जळजळीत कटाक्षाने तो गारद झाला.

"कमॉन डॉ. पै! सोचो सक्सेसके चान्सेस टेन परसेन्ट है लेकीन बाकी नाइंटी परसेन्ट का क्या? वी विल लूज द पेशंट." डॉ. यलगुंतीवार आपल्या मित्राची बाजू घेत म्हणाले.

"वी डोन्ट नीड पब्लिसिटी लाईक दॅट. त्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी सोशल मीडियावर पेज आहे, आता ती सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. ही केस आपलं हॉस्पिटल घेणार म्हणून आत्ताच पत्रकार बाहेर ठाण मांडून बसलेत. आत्ता ते तुम्हाला हिरो म्हणत आहेत पण तुम्ही हरलात तर काय? तुमचं नाव किती खराब होईल. ह्याचा विचार केलाय?" डॉ. गांधी म्हणाले.

तो संतापाने उकळत होता. थोडा विरोध होण्याची त्याला अपेक्षा होती पण त्याचे सहकारीच हे प्रकरण इतकं टोकाला नेतील असं वाटलं नव्हतं.

शेवटी तो उभा राहिला. चेहऱ्यावर एक खोटं हसू चिकटवून त्याने बोलायला सुरुवात केली. "थँक्स फॉर द इन्फर्मेशन जेंटलमेन. माझी पेशंट आणि तिचे आईवडील कुठल्याही क्षणी इथे पोचतील. इफ यू विल एक्स्क्यूज मी, आय डोन्ट वॉन्ट टू कीप देम वेटिंग." आणि तो कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडला. "डॉ. पैss" मागून शेंडेच्या हाकेनेही तो थांबला नाही.

लिफ्टमध्ये तो चिडून थरथरत होता. लिफ्टचं दार उघडताच तो मुठी आवळून शुभदाच्या टेबलकडे आला. समोरच आंघोळ करून, नवे स्क्रब्ज घालून ताजीतवानी सायरा उभी होती. तो दिसताच ती हसत पुढे आली. "सोनल इज हिअर! आत्ताच शुभदा तिच्या आईवडिलांना दुसऱ्या कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन गेली. ते तुमची वाट बघतायत."

तिच्या डोळ्यातली आशेची चमक बघून त्याचा राग अजून वाढला.

"गुड!" तो कोरड्या आवाजात म्हणाला. "ते अगदी वेळेत आलेत. सर्जरी होणार नाही हे ऐकायला."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

बदतमीज़ दिल - ३१

आम्ही इथे असण्याची काहीच शक्यता नव्हती पण आम्ही होतो! आम्ही ओटीमध्ये होतो, सोनलची सर्जरी आता कुठल्याही क्षणी सुरू होणार होती. खोलीभर एक तणावाने भरलेली शांतता होती. वेगवेगळ्या यंत्रांचे आवाज आणि मधेच ऐकू येणारे बीपबीप एवढेच काय ते शांती भंग करत होते. ती पूर्ण तयारीनिशी अनिशच्या इशाऱ्याची वाट बघत होती. आज ऑपरेशन टेबलसमोर ते दोघेच नव्हते. त्यांच्याबरोबर अजून एक कंजेनिअल हार्ट सर्जन होते. MS करताना अनिशला ज्युनियर असलेले डॉ. शिंदे. ते नाशिकहून सकाळीच इथे पोचले आणि ही सर्जरी कुठलीही फी न घेता करणार होते, रादर ते सगळेच ही सर्जरी कुठलीही फी न घेता करणार होते. अजून एक सर्जन दिल्लीहून येणार होत्या पण फ्लाईट डीले झाल्यामुळे त्या अजून पोचल्या नव्हत्या.

आज काचेच्या भिंतीमागे फक्त लीगल टीम आणि तिघे डॉक्टर्स घारीच्या नजरेने लक्ष ठेऊन होते. आश्चर्य आहे, डॉ. पैंची इतकी हॉलमार्क ठरणारी केस असून कोणी रेसिडेंटस, स्टुडंट्स कोणीच कसं नाहीये..

अनिशने ती कुठे बघतेय ते पाहिलं. तिच्या डोक्यात चाललेले विचार जाणवून त्याने मान हलवली. "आज मी जर फेल झालो तर ते बघायला त्यांना प्रेक्षक नको आहेत." तो तिरकस हसला. "त्यांच्यामते जेवढे कमी विटनेस असतील तेवढं बरं."

"डॉ. पै, आर यू रेडी?" मागून भूलतज्ञांचा आवाज आला.

सगळ्यांनी आधीच रोल कॉल केला होता, तिच्यामते आता अजून थांबण्याची गरज नव्हती. पण ती म्हणजे डॉ. पै नव्हती. ह्या केसमुळे तिचं करियर धोक्यात नव्हतं. काही चूक झाली तर तिचं नाव खराब होणार नव्हतं, सोनलला काही झालं तर तिला सोनलच्या आशेवर असलेल्या आई वडिलांना तोंड दाखवावं लागणार नव्हतं.

शेवटी अनिशने घसा खाकरला आणि वर घड्याळात पाहिलं. "ओके! इफ एव्हरीवन्स रेडी, लेट्स बिगीन. सायरा, टेन ब्लेड." त्याचा हात पुढे झाला.

सोनलला तिचे आईवडील हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तेव्हा त्यांना सगळ्यात आधी सायराच भेटली होती. शुभदा फोनवर बिझी होती त्यामुळे तिलाच पुढे व्हावं लागलं. सोनल व्हीलचेअरवर बसूनसुद्धा आनंदी दिसत होती. आणि बारीक. खूप बारीक, इतकी की वाऱ्यानेसुद्धा उडून जाईल. पण सोनलच्या डोळ्यात एक घट्ट निर्धार होता जो तिच्या चांगला परिचयाचा होता.

कॉन्फरन्स रूममध्ये अनिश तिच्या पालकांना सर्जरीत येऊ शकणारे धोके आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही किती महागडी सर्जरी होऊ शकते त्याबद्दल समजावून सांगत होता. वर्षानुवर्षे कॅन्सर ट्रीटमेंटवर झालेल्या खर्चाने तिचे आईवडील पार धुतले गेले होते. कर्नाटकातल्या एका खेड्यात सरकारी शिक्षक असणाऱ्या वडिलांनी शक्य तो सगळा खर्च केला होता, जमीन विकून आणखी त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं. सोशल मीडियावरून काही प्रमाणात पैसे जमा झाले होते पण गरजेपेक्षा खूपच कमी. आताही त्यांनी फेसबुकवर सोनलचा नवा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यांच्याकडे आता काही शिल्लक नव्हती पण ही गोष्ट अनिशला थांबवू शकणार नव्हतीच.

अजून हॉस्पिटलची परमिशन मिळायची बाकी होतीच. ती अनिश आणि शुभदाबरोबर त्याच्या केबिनमध्ये चर्चा करत होती. असा उपाय हवा होता ज्याने हॉस्पिटलकडून अनिशवर कोर्ट केस होणार नाही. शेवटी तिने साधी सरळ गोष्ट सुचवून पाहिली. "सोनलला भेटायला लीगल टीमलाच सांगू. जे लोक सर्जरी नको म्हणतायत त्यांनाच तिला सर्जरी होणार नाही हे सांगू दे." त्यांनी लीगल टीम आणि तिन्ही सर्जन्सना कसंबसं तयार करून कॉन्फरन्स रूममध्ये जमवलं. अनिश सर्जिकल डिपार्टमेंटच्या हेडनाही घेऊन आला. हाच माणूस अंतिम निर्णय देऊ शकत होता.

सोनल त्या लोकांशी बोलताना ती आणि डॉ. पै काचेबाहेरून बघत होते. सोनलच्या शरीराने दगा दिला तरी मन तितकंच घट्ट होतं. ती तिच्या बरं होण्याचा हक्क सांगत असताना तिचे डोळे भरून आले होते पण एक टिपूसही खाली पडला नाही.

बर्‍याच वेळाने सगळेजण बाहेर पडून लिफ्टकडे गेले. त्यांच्या खाली घातलेल्या माना आणि सुस्कारे यावरून निर्णय बऱ्यापैकी कळलाच होता. सगळ्यात शेवटी डिपार्टमेंट हेड बाहेर आले. "ह्या सर्जरीची कॉस्ट हॉस्पिटल बेअर करणार नाही." ते सरळच म्हणाले.

अनिशला तो जिंकल्याचं जाणवलं. "मी असं कधीच म्हटलं नाही. मी टीम जमवली आहे, सगळे लोक फ्री काम करतील. आय'ल कव्हर द कॉस्ट ऑफ सप्लाइज अँड डिव्हायसेस."

त्यांनी हरल्यासारखं डोकं हलवलं आणि निघून गेले.

तिला हवेत एक पंच मारावासा वाटला, येस्स! तिने आणि अनिशने एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले. होली शिट! वी डिड इट!! त्यांचे डोळे बोलत होते. त्याच क्षणी तिला पुढे होऊन त्याला कडकडून मिठी माराविशी वाटली.

सोनलची सर्जरी खूप मोठी आणि किचकट होती. तिने याआधीही अनिशबरोबर खूप वेळखाऊ सर्जरीज केल्या होत्या पण ही वेळ वेगळीच होती. अनिश इतक्या तणावात तिला आधी कधीच दिसला नव्हता. तो डोळ्यात तेल घालून काम करत असला तरी आज त्याचा स्वतःवरचा विश्वास जरा ढळला होता. त्याच्या मध्येच थांबून खांदे गोल फिरवणे आणि मान वरखाली मोडण्यातून तिला ते जाणवत होतं. बाकी लोकांचा अविश्वास त्याच्या डोक्यात शिरला होता. काहीतरी चुकेल म्हणून तो काळजीत होता. तिला त्याला हलवून आठवण करून द्यावीशी वाटली, तू डॉ. अनिश पै आहेस, MS, M Ch. द ओन्ली सुपरहिरो, आय हॅव एव्हर सीन!

पण त्याऐवजी ती शांत राहून लक्षपूर्वक काम करत राहिली. काही चूक झाली तर ती माझ्यामुळे नक्कीच होऊ देणार नाही.

सहा तास होऊन गेल्यावर त्याने तिला ब्रेक घेऊन काहीतरी खाऊन यायला सांगितले. तिला विरोध करायचा होता, पण तेवढ्यासाठी त्याचा वेळ आणि एनर्जी वाया घालवायची नव्हती. ती गुपचूप दुसऱ्या असिस्टंटकडे इन्स्ट्रुमेंट ट्रे देऊन बाहेर पडली. अनिशने ब्रेक घेतला नव्हता, घेता आला तरीही तो घेणार नाही याची तिला खात्री होती. हे काम करण्यासाठीच तो बनला होता, त्याने स्वतःचं शरीर सलग काम करत रहाण्यासाठी ट्रेन केलं होतं. सोनल बाहेर पडल्याशिवाय तो बाहेर येणार नाही.

विचार करत तिने वॉशरूममध्येच दोन स्निकर्स खाल्ल्या. बाहेर आल्यावर पॅसेजमध्ये तिला सोनलचे आईवडील दिसले. तिला वाटलं तरी आत्ता ती त्यांच्याशी बोलू शकत नव्हती. सोनलच्या आईचं तिच्याकडे लक्ष जाताच ती किंचित हसून लिफ्टमध्ये घुसली. लिफ्टचं दार उघडून बाहेर पाऊल टाकताच तिला ओटीमधून आरडाओरड ऐकू आली आणि जाणवलं अरे हा तर अनिशचा आवाज आहे! ती पळत सुटली.

ओटीचं दार ढकलताच त्याचा आवाज आला. "इट्स PE! PE! वास्क्यूलर सर्जन पाहिजे. डॉ. दास पोचल्या नसतील तर डॉ. गांधींना बोलवा. क्विक." शिट! पल्मोनरी एम्बॉलिझम. रक्ताची गुठळी मानेत तयार होऊन काही सेकंदात हृदयाजवळ पोचली होती. सोनल पूर्ण घामाने भिजली होती. "नॅन्सी, कीप द हेपारीन गोइंग." नर्सने पटकन आयव्हीमधून हेपारीनचा पुढचा डोस सुरू केला. ती पटकन स्क्रब झाली, नर्सने तिचा गाऊन बांधला आणि हातात स्टराइल ग्लव्हस सरकवले. डॉ. शिंदेंच्या हातातलं सक्शन हँडल तिने काढून घेतलं म्हणजे त्यांना अनिशला जास्त मदत करता येईल. ओटी मधली सगळी मशिन्स ओरडून ओरडून त्यांना काहीतरी करायला सांगत होती. त्याने न थांबता फुगलेल्या धमनीवर कट देऊन एम्बोलेक्टमी सुरू केली. नर्सने रक्ताची अजून एक पिशवी सुरू केली.

तेवढ्यात टेबलाभोवतीचे लोक पांगले आणि वास्क्यूलर सर्जन आत आल्या. बाकी लोकांच्या मानाने त्या खूप शांत होत्या. कदाचित अश्या स्पेशालिटीचे लोक स्वतःला शांत राहण्यासाठी ट्रेन करत असणार. अनिशने श्वास सोडला. एका नर्सने पटकन त्यांना एप्रन, ग्लव्हज वगैरे चढवून तयार केले. "डॉ. दास, इट्स PE. आय हॅव स्टार्टेड विथ एम्बोलेक्टमी." अनिश बाजूला झाला. डॉ. दास पुढे झाल्या आणि कॅथेटर लावायची प्रोसिजर सुरू केली. कॅथेटरमधून ब्लड क्लॉट काढण्याचं डिव्हाईस टाकून त्यांनी हळूहळू पण अचूकपणे स्टेंट घालून क्लॉट बाहेर काढला. आता सगळीकडे रक्त पसरू लागले होते. त्यांनी डोकं तिरकं करून हेडलॅंपचा उजेड एका ठिकाणी नीट पडला. काही वेळ काम करून पुन्हा त्यांचा आवाज आला. "द वेसल इज क्लँप्ड." त्यांनी मान वर करून सायराकडे पाहिलं. "यू! सक्शन राईट हिअर अनटील आय टेल यू टू स्टॉप. आय नीड द एरिया क्लिअर." सायराने लगेच सांगितल्याप्रमाणे काम सुरू केले आणि त्यांनी मान डोलवून टाके घातले. "आय एम सरप्राईज्ड डॉ. पै, ये काम तुमने खुद क्यू नही किया?" डॉ. दास टाके घालता घालता अनिशला म्हणाल्या.

"इस केस मे मुझे कोई चान्सेस नहीं लेने थे." अनिशने उत्तर दिले. "वी न्यू द रिस्क. कँसर प्लस फ्लाईट, ये होने ही वाला था. हमने सब प्रिकॉशन्स लिये थे. हेपारीन, पैरोमे कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स, सब था. फिर भी सडनली उपरसे क्लॉट आया, विच इज व्हेरी रेअर. हर बॉडी इज नॉट अ टेक्स्ट्बुक." हे तो थोडं स्वतःला आणि थोडं बरोबर काम करणार्‍या रेसिडेंटना सांगत होता. सायराने त्याच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न केला पण त्याचं पूर्ण लक्ष सोनलकडे होतं. अजून आम्ही लढाई जिंकली नाही, अजून अर्ध्यातच आहोत. काय होईल काहीच सांगता येत नाही.. पण तिने विचार बदलला, मला पॉझिटिव्ह रहायला हवं. सोनल इज अ फायटर, सगळं चांगलंच होईल.

सर्जरी पुढे सुरूच होती. अनिशबरोबर ही सर्जरी करताना तिला एक गोष्ट मात्र समजली. आठ तासांहून मोठी सर्जरी करताना विचार करायला खूप वेळ होता. तुम्ही तुमच्या अख्ख्या आयुष्याचा आणि तुम्ही ज्या वाटेवर आहात ती बरोबर आहे की बदलायची आहे याचा नीट विचार करू शकता.

तिला आता हे कळून चुकलं होतं की तिला कितीही नको वाटल्या तरी त्याच्याबद्दल तिच्या मनात असलेल्या भावना कधीही नाहीश्या होणार नाहीत.

त्याच्याबरोबर काम करण्यामुळे बऱ्याच गोष्टींचा गुंता होतो आणि एकत्र काम करताना त्याला बघून थोडी तरी हिरो वर्शिप होतेच. एक हुषार सर्जन म्हणून त्याच्यावर क्रश आहेच पण ओआरबाहेरही एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. ओके, हे लवकर कळत नाही कारण वरवर त्याचं कडक वागणं, इगो, टफ गाय इमेज वगैरे दिसते. पण आतून तो किती मऊ आहे ते तिला आता कळलं होतं. असा माणूस जो स्वतः लढू शकत नाहीत अशा लहान मुलांसाठी लढतो, स्वतःचा वेळ आणि पैसा दोन्ही दान करतो, कोणी नावाजण्यासाठी नाही तर त्याला आतून हे करण्याची गरज वाटते म्हणून. तिने इतका निस्वार्थी माणूस आजपर्यंत तरी कोणी पाहिला नव्हता.

अचानक तिला जाणीव झाली की तिला तो हवाय, ओ आरमध्ये आणि बाहेरसुद्धा!

क्रमशः
बदतमीज़ दिल (लेखमालिका - २)

Keywords: 

लेख: