LCHF डाएट, मधुमेह आणि माझा अनुभव - भाग १

ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेचा पोलाच्या एक फूट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वीच पडले होते.

सर्वात आधी एका गोष्टीचे बरे वाटले की, पिल्लू माझ्या सायकलवर मागे नव्हता. पण दुसरी काळजी अशी वाटली की, मला काही झालं असतं तर? नवरा भारतात गेलेला आणि लेकरू घरी एकटच.

घरी जाऊन आधी दवाखान्यात फोन केला. अचानक चक्कर येऊन सायकलवरून पडल्याचे सांगितल्याने दुसऱ्या दिवशीची सकाळची भेटण्याची वेळ मिळाली. डॉक्टरला रक्त, लघवी तपासल्यानंतर दोन्हीकडे साखर असल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी उपाशी पोटी परत रक्ततपासणी केल्यानंतर कळाले की रक्तात साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.

डॉक्टरच्या मते, माझ्या पोटाचा घेर फार वाढलेला नसल्याने आणि मी दिसायलाही अगदीच गलेलट्ठ म्हणावी अशी दिसत नसल्याने, ती म्हणाली की, तुला मधुमेह प्रकार १ असण्याची शक्यता आहे. उद्या आपण मुख्य दवाखान्यात तपासणी करून पाहू. घरी आल्यावर सर्वात आधी मधुमेहावर माहिती वाचायला सुरुवात केली आणि जाणवले की, आता जर आपण इथेच आवर घातला नाही तर पुढे बऱ्याच आजारांना आमंत्रण देणार आहोत.

मुख्य दवाखान्यातून सांगण्यात आले की, भारतीय लोकांमध्ये कमी वजनाच्या लोकांनासुद्धा मधुमेह प्रकार २ असू शकतो; त्यामुळे मला मधुमेह प्रकार २ असण्यावर शिक्कामोर्तब झाले.

मधुमेह प्रकार १ मध्ये तुमच्या शरीरातील स्वादुपिंड (pancreas) इन्सुलिन बनवायचे थांबवते त्यामुळे तुम्हाला गोळी किंवा इंजेक्शन स्वरूपात जेवणापूर्वी इन्सुलिन घ्यावे लागते.

मधुमेह प्रकार २ मध्ये तुमच्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन कमी प्रमाणात बनवते किंवा जे इन्सुलिन उपलब्ध आहे ते वापरण्याची शरीराची क्षमता कमी झालेली असते.

मला मेटफोर्मीन घेण्यास सांगण्यात आले. आठवडाभर एकच गोळी घ्यायची, तिची सवय झाली की १ वाढवायची. अश्या प्रकारे सकाळी २ आणि रात्री २ अशी चारापर्यंत प्रगती केली. मेटफोर्मीनने पोटाचा त्रास सुरू झाला. डोळ्यांची तपासणी झाली तेव्हा कळाले की, डोळ्यांना अजून तरी काही इजा झालेली नाही. हृदय, किडनी, डोळे सुरळीत कार्यरत आहे तोवरच यातून बाहेर पडायचे ठरवले. साखर पहिल्या दिवसापासूनच बंद केली होती. चॉकलेट, बिस्कीट, केक, शीतपेय, आइस्क्रीम ह्यांची फारशी आवड नसल्याने त्यांच्यापासून फारकत घेणे सोपे गेले. झेपेल तितकाच पण नियमित व्यायाम दररोज करण्यास सांगितले.

मधुमेहाबद्दल वाचायला सुरुवात केल्यानंतर, जिथे वाचावे तिथे हेच दिसायचे की, हा आजार बरा होण्यातला नाही. पण एक दिवस एक जाहिरात दिसली. त्यात त्यांचे म्हणणे होते आमच्या पुस्तकात आम्ही बरे होण्याचे रहस्य दिले आहे. तासभर त्यांचे 'औषध कंपन्या किती स्वार्थी आहेत' आणि 'ते किती काळजीवाहू आहेत', तसेच 'एकाच पुस्तकाचा खर्च केला की तुम्ही कसे बरे होणार आणि औषधांवरचा खर्च कसा कमी होणार'! हे असे तासभराचे प्रवचन ऐकल्यावर एक मात्र कळले की, दालचिनी आणि हेम्प प्रोटीन ह्यांच्या सेवनाने मधुमेहींना नक्की फायदा होतो. त्यावर अधिक माहिती काढली असता ते खरोखरीच माझ्या कामाचे आहेत हे कळले आणि मी त्यांचा माझ्या आहारात समावेश केला.

दरम्यान दवाखान्यातूनच आहारतज्ज्ञाच्या भेटीची वेळ मिळाली. मला असलेल्या सगळ्या शंका मी लिहून नेल्या होत्या. मी आहारात केलेले बदल सांगितले; उदाहरणार्थ, साखर, मैदा, बटाटा, चॉकलेट, आईसक्रीम, शीतपेय पूर्णपणे बंद केले आहेत. ह्यातले काही खावेसेच वाटले तर काय काय खाऊ शकते ही शंका विचारल्यावर तिने सांगितले की, सगळे थोड्या प्रमाणात चालते. एखादा बटाटा, दिवसाला २ ब्रेड स्लाईस, जरासे शीत पेय पण जरासेच हं, शिवाय मांसाहार, सलाडचे प्रमाण वाढवण्यास आणि लो फॅट आहार घ्यायला सांगितला. हिरव्या रंगाचे 'की होल'चे ट्रेडमार्क असणारे सगळे बाजारात मिळणारे खाद्यपदार्थ खाणे उत्तम आहे हे सुचवले.

पुढच्यावेळी खरेदीला गेले तर ब्रेड, पास्ता, दही, तांदूळ असे बरेच काही त्या ट्रेडमार्कचे सापडले. अमुक ह्या ट्रेडमार्कचे आहे आणि खायला चालते म्हणून मग ब्रेड, पास्ता खाणे वरचेवर होवू लागले आणि स्थिरावणारी रक्तातली साखर परत वाढू लागली. चपातीपेक्षा भाकरी बरी म्हणून (दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने) बाजरीची भाकरी खाणे सुरू केले. दिवस रात्र एकच विचार डोक्यात घोळत असायचा की आपल्याला मधुमेह झाला आहे. हा विचार काही केला डोक्यातून जात नसे मग ठरवले की रात्री झोपताना (स्वतःलाच झोपण्यापूर्वीच) स्लीप टॉक द्यायचे; सकारात्मक विचार करायला सुरुवात केली की, आपल्याला बरे व्हायचेच आहे आणि औषधांपासून मुक्ती मिळवायची आहे.

नवर्‍याने एक दिवस समजावले की, हा आजार बरा होण्यातला नाही पण पथ्य पाळले तर काही त्रास होत नाही. मधुमेह वाढू नये ह्याची काळजी घेणे आता आपल्या हातात आहे. त्याच काळात प्रमोदकाकांचा मायबोलीवर लिहीलेला लेख वाचला. त्याचा फायदा मला शांत राहायला झाला. आता मधुमेह झालाच आहे तर त्याच्याशी मैत्री करून जगायचे. परंतु तो बरा होण्यासाठी माहिती शोधणे सुरूच होते. असेच एक दिवस वाचनात आले की, जर लिव्हर फॅट कमी करता आले तर मधुमेह बरा होऊ शकतो. लिव्हर फॅट कमी करणे हे मनावर घ्यायचे ठरवले. साखर बंद केल्याने वजन साधारण ३ कि. कमी झालेच होते. आणखी वजन कमी करणे गरजेचे होते. माझी डायबेटीस नर्स मी सगळी पथ्ये पाळते म्हणून आणि रक्तातले साखरेचे प्रमाण कमी कालावधीच बरेच खाली आले होते म्हणून खूष होती.

त्याच दरम्यान आमची एक कुटुंबाशी ओळख झाली. एकमेकांकडे जाणे-येणे वाढले. गप्पांच्या ओघात त्या मित्राने सांगितले की, त्यालाही मधुमेह होता; तसेच त्याच्या बायकोला पिसीओडीचा त्रास होता. पॅलिओ डाएटने दोघांनाही फायदा झाला आहे. पॅलिओ डाएटबद्दल त्याने सांगितल्याप्रमाणे फक्त मांसाहारावरच जास्त भर असल्याने मला ते जमण्यासारखे नव्हते. पोळी, भात एकदमच खायचाच नाही हे तर कठीणच होते.

मी पॅलिओ डाएटबद्दल माहिती वाचायला सुरुवात केली. त्याने फेसबुक वर एका पॅलिओ गटात मला सहभागी केले. त्यावरच्या तमिळ पोस्ट मी भाषांतरीत करून वाचू लागले. तिथल्या सक्सेस स्टोरी वाचतानाच मी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. पॅलिओ डाएट, अ‍ॅटकीन्स डाएट हे 'लो कार्ब हाय फॅट' प्रकारात मोडतात हे समजले.

सवयीप्रमाणे मायबोलीवर चौकशीचा धागा काढला (http://www.maayboli.com/node/57088). भाग्यश्री (बस्के) तसेच इतर काहीजणांकडून ह्या डायटबद्दल सकारात्मक प्रतिक्रीया मिळाली. एकाने किटोजनीक डाएटची लिंक दिल्याने (http://www.ketogenic-diet-resource.com/ketogenic-diet-plan.html)तिथेही बरीच माहिती मिळाली तसेच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली.

एका डॉ. सदस्याकडून हे कळले की, किटोसिस होऊ नये ह्याची काळजी घ्यायला हवी; तसेच किटोजनीक डाएटच्या लिंक वरून कळले की, ह्या डाएट प्रक्रियेत किटोसिस होणे अपेक्षित आहे परंतु किटोऑसिडोसिस होऊ न देणे, ह्याची काळजी घ्यायला हवी. अर्थात ही सगळीच माहिती माझ्यासाठी उपयुक्त होती कारण किटोसिस होणे अपेक्षित आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतेच.

अखेर मी डाएट करायचे ठरवले. नवर्‍याने पण वाचन सुरू केले. डायबेटीस बरा होत नाही हे त्याचे पूर्वीचे मत बदलायला लागले. मी हे मला झेपेल तसे करायलाच हवे, असे त्यालाही वाटू लागले.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle