सातकापे घावन

काही चवी, वास , पदार्थ , बाहेरच वातावरण , सणवार ह्याच एक घट्ट नातं असत. अन प्रत्येक घराच आपापल असत! आईकडे श्रावण म्हणजे नारळी भात गोकुळाष्टमीचा भरगच्च प्रसाद, फराळ आठवत मला. पण सासरी श्रावणी सोमवार ,नारळीपोर्णिमा ,पंचमी ची सवाष्ण , अन वार्षीक सत्यनारायण असे ठळक कार्यक्रम असतात. अन काही पदार्थ केवळ ह्याच दिवशी बनतात. आल्याच रायत, मिरचीच पंचामृत, वाल घालून पडवळाची भाजी , आंबट बटाटा, पातोळ्या , खांडवीच्या वड्या, काकडीच धोंडस केळ्याची कोशिंबीर वगैरे.
मी तरी श्रावणाची वाट ह्या पदार्थांसाठी पहाते. :) काल पंचमी आणि सत्यनारायण असा डबल धमाका होता! पातोळ्यांचा बेत केला होता. तांदुळ गुळ अन नारळ हे माझे ऑटाफे इन्ग्रेडियंट्स. कोकणात गोडाचे पदार्थ ह्याच ३ स्टार कलाकाराना घेउन होतात बर्‍याचदा.
पातोळ्या म्हणजे हळदीची पानं शोधणं आल. ऐन वेळी ऑफिसात डोंगरभर काम उपसावी लागल्यानी हळदीची पान काही मिळाली नाहीत. मग हा सातकाप्याचा घाट घालायचा ठरवल. ह्या आधी आळश्याची सातकापी घावनं ( डोश्याच्या पिठात चुन ( गुळ खोबरं) ) करण्याचा प्रचंड (?)अनुभव गाठीशी होताच. पण ओरिजिनल रेसिपी तांदुळ भिजत घालून , वाटून घावन , हा आजवर न जमलेला प्रकार. त्यात 'मी काही कधी केली नाहीयेत हां, पण माझी काकी मस्त करायची , खरपूस!कोकणातल्या घरी! ' अस म्हणून आम्च्या ज्ये नांनी उत्साहाला सूरूंग लावायचा प्रयत्न केला . पण माझे स्वैपाकघरातले प्रयोग म्हणजे , आ बैल मुझे मार प्रकारातले अन एकूणच नाही जमणार म्हटल की दाखवतेच असा ( मूर्ख) बाणा असल्यानी, हेच्च करणार अस डिक्लेअर केल. Cool

आदल्या रात्री लक्षात आलं की मैत्रीणीनी नेलेला बिडाचा तवा घरात परत आला नाहिये , तांदुळ भिजत घालून वाटून पुरेसा चिकटपणा येइल का ह्याची रंगित तालिम केलेली नाहीये , नेहेमीचा नॉनस्टिक तवा कोटिंग गेल्यानी बदलायला झालाय अन म्हणून सध्या वापरायचा नाही अस ठरवलय !
:rollingeyes:

प्लॅन बी म्हणून शेवया आहेत ना घरात हे पाहून ठेवलं Donttell
अन घावनाना उकडीच्या मोदकाची पिठी वापरायची ठरवली. एक लहान फ्राय्पॅन आहे ते वापरायच ठरवल. घावनाचा आकार लहान झाला तर तसही सोपच जाणार होतं :winking:

पुजेच्या दिवशी बाकिचा स्वैपाक पटकन हाता वेगळा केला . अन मग हात घातला घावनाना.

चार वाट्या ओला नारळ खवून त्यात २ वाट्या गुळ. जायफळ्/वेलची पावडर अर्धा चमचाभर , काजूचे तुकडे. हे एकत्र करून एखाद मिनिट परतून घ्यायच मंद धगीवर.(किंवा एक मि. माय्क्रोवेव्ह मधे)
हे अस दिसतं

IMG_6173.jpg

तांदळाची पिठी + दुध्+पाणी अस मिसळून पातळ पिठ तयार केल. त्याची व्हिस्कॉसिटी साधारण अशी दिसायला हवी नैतर जाळीदार घावन होत नाहीत , जाड धिरडी सदृश पदार्थ होतो अन दुमडताना मोडतो)

IMG_6176.jpg

आता बेस्ट केस मधे बिडाचा ( निट सिझनिंग केलेला) तवा गॅसवर तापत ठेवायचा. नैतर नॉनस्टिक झिंदाबाद.

IMG_6179.jpg

पहिल एखाद घावन तुटणार ह्याची खात्री बाळगून असा. एकदा न तुटता घावन जमल की मुळ पदार्थ करायला सुरवात करायची.

IMG_6180.jpg

घावन बनता बनता त्याच्या कडा तव्यापासून सुटायला लागतात. तेव्हा अर्ध्या भागावर गुळखोबरं (चुन) पसरवायच. अन त्यावर उरलेला भाग दुमडून घ्यायचा

IMG_6181.jpg

आता उरलेल्या तव्यावर परत पातळ मिश्रण ओतून घ्यायच, हे बनत आल की त्यावर चून पसरून आधीच सेमिसर्कल दुमडायच.हे झाले ३ पदर. हेच सात पदर होइतो करायच !! :rollingeyes: आपापला वकुव , तव्याचा आकार पहाता ४-७ मधे खेळायला हरकत नै!

IMG_6182.jpg

IMG_6183.jpg

IMG_6185.jpg

प्रत्येक परतणी च्या वेळी तुप सोडल की मस्त खरपूस होतात घावन.
अशी ही माझी सातकप्प्याची कहाणी चारकप्प्यात सफळ संपूर्ण झाली Dancing

नवसुगरणीना महत्वाच्या सुचना!
१) वकुबापलिकडाचे प्रयत्न करण्यात जी मजा आहे ती नेहेमीच्या खेळपट्टीवर खेळण्यात नाही ( कंसिडर दिस अ‍ॅज अ ब्लाइंड डेट :winking: )
२) एकदा करायचा ठरवला पदार्थ की तो मनातल्या मनात करून पहायचा, साहित्य , सामग्री , अन उपकरण ( जी सुगरणी गृहित धरतात ) यांच्या गाळलेल्या जागा भरायला उपयोग होतो.
३) आपण असे घाट घातले की नाउमेद करणारे बरेच असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायच.
४) शक्यतो नविन पदार्थ करताना अज्जिबात मल्टिटास्किंग करू नये. आपण काय माशे चे कन्टेस्टंट नाही ६० मि. मधे ११० स्टेप्स ची पाककृती करून दाखवायला  68
५) प्रत्येक पदार्थाचा एक गाभा (इसेन्स) असतो , तो आधी समजून घेतला की तो निट होणे ह्याकडे विशेष लक्ष द्यायच. बाकी गोष्टी जराश्या बदललया , हाताशी असलेल्या साधनांप्रमाणे सुटसुटीत केल्या तरी चालतात
६)मुळातले सातकापे घावन जवळपास ८-१० इंच असतात, बिडाच्या तव्यावर एकदा भट्टी जमली की फटाफट होतात. वाढताना कापून , लेयर्स दाखवणे ( कौशल्य अन नजाकत) अस असत पण मी केल ते भातुकली तल असाव इतक लहान पॅन होतं त्यामुळे ह्याच नाव कोकोनट अ‍ॅन्ड जॅगरी विथ नट्स अ‍ॅन्ड नट्मेग इन सॉफ्ट राइस टॅकोज अस ठेवायची इच्छा होतेय :ty:

IMG_6186.jpg

प्रतिसादातल्या टिपा इथे अ‍ॅड करतेय

माझी काही निरिक्षणं , करताना इतराना उपयोगालायेतील. लॅब टेस्टिंग / पाय्लट्स आर मस्ट !
१) एकेक टप्पा एक्सेल करत जायचा. पहिले न तुटता घावन . लुसलूशित पण लवचिक ( ह्यापेक्षा बरा शब्द सुचेना) दुमडताना तुटणार नाही अस. ( हे एखाद दोन करायचे , ड्राय रन्स सारण न भरता)
२) मग ते घावन व्हायच्या पाव स्टेप आधी सारण भरायच अन दुमडायच.अन लगोलग बॅटर उरलेल्या अर्ध्गोलात ओतायच . म्हणजे जुन्याबरोबर सांधून हे तयार होताहोता परत सारण भरून पहिला आर्धगोल दुमडायचाय .
३)नविन थर अर्धा होइतो पहिला तव्यावरच आहे हे लक्षात घेउन तो जास्त भाजला जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची हे टायमिंग जुळल की जमलच मग थरावर थर सोप्पे आहेत.
४) ८-९" चा करताना ७ पर्यंत थर ज्मतील पण चिमुकले टॅकोज केलेत तर मात्र ४-५ थरांवर थांबायच .
५) गरम काढले की केळीच्या पानावर ठेवायचे . म्हणजे खालून सॉगी( ह्याला काय शब्द वापरावा ओले?)होउन ताटाला चिकटत नाहीत.
६) हे करत असताना , फोन , मोबाइल, दाराची बेल , कामवाल्या मावशी , जेवायला वेळ आहे तोवर चहा मागणारे , पाठीमागे उभ राहून सुचना करणार्‍या कडे १००% दुर्लक्ष करायच . smile

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle