तिरंगी गोष्ट

झुंजुमुंजु झालं. पहाट वारा स्वतःबरोबर केशरी देठाच्या पारिजातकाचा मंद सुवास वाहून आणत मन प्रसन्न करीत होता. काही वेळातच पूर्व दिशा उजळू लागली. चैतन्यमय अशा सोनेरी केशरी, गुलाबी रंगांनी. अहाहा ! निसर्गाने केलेली ही केशरी उधळण सार्‍या सॄष्टीच्या तनामनांत सळसळता उत्साह जागवते खरी. मी आहेच असा सार्‍या जगताला चैतन्य बहाल करणारा. केशरी रंग स्वतःवरच खूश होत विचार करत होता. रस्त्याने चालता चालता बहरलेला केशरी-नारिंगी गुलमोहर, अबोली, केशरी गुलाब, टपोरा नारिंगी झेंडू हे सारे कसे आपल्यामुळेच खुलुन दिसतायत हे त्याला जाणवले. काही वेळातच बाजारपेठेत वर्दळ वाढू लागली. दुकाने उघडू लागली. रस्त्याच्या कडेला हारीने मांडलेली नारिंगी संत्रे सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. पूर्व दिशेला लकाकणारे व कणाकणाने प्रखर होत जाणारे सूर्य नारायणही माझ्याच मोहात पडले आणि मलाच अंगाखांद्यावर घेऊन अवतीर्ण झाले या विचाराने केशरी रंग स्वतःशीच खुदकन हसला. माझ्या रंगासहीत माझे नावही लेऊन आलेल्या खाद्यपदार्थाने तर खवय्यांच्या, सुग्रणींच्या मनात अगदी मानाचे स्थानच पटकावले आणि ते पिकवणारा काश्मीर हा प्रदेशही धन्य झाला. मुद्दाम सप्टेंबर महिन्यात केशराचे मळे बघायला काश्मीरला पर्यटकांचे थवेच्या थवे येतात. या केशराने तर भुरळ घातलीय लोकांवर.रंगगंधासहीत स्वतःची आहुती देऊन त्याने खाद्यपदार्थांना रंग व स्वादाच्या दुनियेत ज्या उंचीवर नेऊन ठेवलेय त्याला तोडच नाही. केशरी दूध, केशरी भात या पारंपारीक पदार्थांपासून बिर्याणीपर्यंत सारे माझ्या रंगावर फिदा. स्वतःच्या कर्तुत्वावर खूश झालेला असा केशरी रंग भानावर आला तो दूरून कानी पडलेल्या घंटानादाने. आवाजाच्या दिशेला नजर वळताच दॄष्टीपथात आले ते दूर डोंगरमाथ्यावरचे मंदीर. कळसावर भगवा ध्वज दिमाखात मिरवणारे. नजर जाताच नतमस्तक व्हायला लावणारी ही भागवत धर्माची पताका - अर्थात केशरीवर्णीच ! शिवरायांनीदेखील हाच रंग निवडावा ना हिंदवी स्वराज्याच्या ध्वजासाठी. केशरी रंगाची पाऊले नकळत त्या ध्वाजाच्या दिशेने पडू लागली. डोंगर चढून मंदीरात प्रवेशताच नजर खिळली ती भव्य आणि दिव्य शेंदूरचर्चित केशरी मूर्तीवर. अहाहा ! काय ते तेज ! नकळत केशरी रंग मूर्तीच्या चरणकमलांवर नतमस्तक झाला. कसलीही याचना न करता स्वीकारलेले शारण्य.त्याच्या मनांत एक प्रकारची रितेपणाची भावना भरुन राहिली, तॄप्ती, समाधान, शांती बहाल करणारी भावना अर्थात वैराग्य, त्याग.... जी या केशरी रंगाची खरी ओळख होती. ही ओळख लेऊनच तो आपल्या राष्ट्र ध्वजात उच्चस्थानी विराजमान होता, त्याला मिळवण्यासाठी कैक जीवांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेऊन...............

कुणीतरी पाठीमागून येऊन केशरी रंगाच्या पाठीवर अलगद हात ठेवले. केशरी रंगाने चमकून पाहिले. शांत धीरोदत्त अशी पांढर्‍या रंगाची मूर्ती त्याला दिसली. "आपण? आणि इथे? केशरी रंग विचारता झाला. "हो, तू ही अशी असीम शांती अनुभवत होतास ना इथे? मग मला यावेच लागले."

पांढरा रंग म्हणजे शांततेचे प्रतिक - केशरी रंगास जाणीव झाली. त्याच्यासह चालता चालता केशरी रंग ही असीम शांती अनुभवू लागला. केवळ पांढर्‍या रंगाच्या सहवासानेच केशरी रंगाच्या मनात त्याची विविध रुपे साकारु लागली.

डोंगरकड्यावरुन अंग झोकुन देणारा दुग्धवर्णी धबधबा, खळाळत वाहणारी नदी, अथांग विस्तीर्ण आकाश, शुभ्र बर्फाच्छादित पर्वतशिखरे, जाई-जुई, मोगरा अशी अगणित फुले ही सारी दॄश्ये शिवाय सार्‍या रंगांना स्वतःत सामावून घेण्याच्या स्वभावामुळे आता केशरी रंगास तर पांढरा रंग जिथे तिथे जाणवू लागला. किंबहुना अशी वस्तूच नव्हती जिच्यात पांढरा रंग नाही. असा सर्व जग व्यापूनही नामानिराळा राहणारा, कसलाही गर्व नसणारा, स्वकर्तुत्वाची जाण असूनही अहंकार नसणारा असा हा रंग. सार्‍या विश्वाला शांतीचा संदेश देणारा, शांतीदूत.स्वतःच्या अस्तित्वाने स्वतःतील शांती दुसर्‍याकडे प्रक्षेपित करणारा.....खराखुरा शांतीसूर्य. क्रांतीकारकांच्या विलोभनीय त्यागाची पुरेपुर जाण असलेल्या आपल्या देशाने म्हणूनच केवळ इतरांच्या स्वातंत्र्याचा मान ठेवून राष्ट्रध्वजात पत्करलेला हा शांती दर्शी रंग....श्वेतवर्ण.

केशरी रंगाच्या मनातील हे विचारप्रवाह स्तंभित झाले एका सळसळीने. दचकून पाहताच जाणवली ती हिरव्यागार पानांची सळसळ. षोडशवर्षीय युवतीच्या आविर्भावात समोर उभा ठाकला हिरवा रंग, हास्याचे कारंजे उडाल्याच्या आविर्भावात त्याने अवतीभवतीची हिरवीगार पाने हलवली. आपसुक त्यांवर बसलेले पक्षीही उडू बागडू लागले, किलबिलू लागले. दूरपर्यंत ही हिरव्या रंगाच्या विविध छटांची दुलई दिसत होती. नवनिर्मितीचा, सॄजनाचा वसा घेऊन आलेला हा हिरवा रंग. जणू सार्‍या सॄष्टीला उच्चरवाने सांगतोय की वापरा तुमच्यातील क्षमता, ओळखा स्वतःची ताकद, जागवा सुप्तावस्थेत असलेले कलागुण आणि येऊ दे बहर तुमच्यातील प्रतिभेला. यांतूनच लागतील नवे शोध, समजतील नव्या विचार धारा. असे हे नव विचारांचे, गुणांचे सॄजन आपण स्वीकारु तेव्हाच प्रगतीपथावार मार्गक्रमण करु. ही भारतभू सुजलाम सुफलाम आहे, त्यात हे नवनिर्माणाचं सॄजन आकार घेतंय हे सार्‍या जगाला समजण्यासाठी ही हिरवाई ठाकली आहे या आपल्या राष्ट्रध्वजात. तिच्या आंतरीक शक्तीला प्रतिसाद देऊयात.

एका क्षणी ते तिघेही एकत्र आले. केशरी रंगाने पांढर्‍या रंगाच्या हातात आपले हात गुंफले तर पांढर्‍याने हिरव्या रंगास कवेत घेतले. पांढरा रंग नेहमीच्या धीरगंभीर स्वरात बोलू लागला. आपण तिघे स्वभावाने भिन्न, प्रत्येकाचं एक खास वैशिष्ट्य पण आपल्या तिघांचे गुण एकत्र आले की एक सकारात्मक उर्जा अनुभवास येते, सर्वांसाठी कल्याणकारक उर्जा, चक्रासारखी २४ तास सतत प्रवाही असणारी. ज्या महान मानवांनी एकत्र येऊन आपणा तिघांस असे स्वतःच्या राष्ट्राच्या राष्ट्र ध्वजासाठी एकत्र आणले त्यांची बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगीच. जे राष्ट्र आपणा तिघांच्या गुणांचे स्मरण ठेऊन त्यानुसार मार्क्रमण करत राहते ते राष्ट्र महासत्ता झाल्याखेरीज राहणारच नाही.

जयहिंद !!
अशी ही राष्ट्रध्वजातील तिरंगांची महती विदीत करणारी गोष्ट मातॄभूमीला आणि तिच्या प्रत्येक लेकराला समर्पित.

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle