पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.....

माझे आई-पप्पा गणपती, महालक्ष्मी व्यवस्थित पार पाडून, सगळ्यांच्या भेटी घेऊन, मुंबईला ताईकडे २ दिवसाचा मुक्काम करून शुक्रवारी रात्री १६ सप्टेंबरला सुखरूप लंडनला पोहोचले. बरोबर माझा काका पण आला होता कारण त्याला पुढे अमेरीकेला जायचे होते त्याच्या मुलांकडे.. म्हणुन आम्ही त्याला लंडनला ब्रेक जर्नी करून पुढे जा, असा हट्ट केला होता.. त्या निमिताने त्याला माझ्याकडे राहता येईल, लंडन पाहता येईल, असा प्लानच होता.
हा प्लान तर व्यवस्थित आणि सुखासु़खी झाला.. पण पुढे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जिथे आमचं काहीच चाललं नाही..

पप्पा आले त्या दिवशी, दुसर्‍या दिवशी शनिवारी आणि रविवारपर्यंत व्यवस्थित होते अगदी नॉर्मल.

आमचे मस्त नाष्टा, जेवण, आलेल्या खाऊवर ताव मारणे, गप्पा मारणे, पत्ते खेळणे अगदी व्यवस्थित चालू होते..

पप्पा शनीवारी सकाळी फिरायला पण गेले...

रविवारी दुपारी जेवणे झाल्यावर काकाला जस्ट जवळपास इथल्या लोकल मार्केटमध्ये फिरवून आणू, असं ठरलं..
पप्पा आधी म्हणाले की मी पण येतो; परत १५-२० मिनिटांनी त्यांनी विचार बदलला आणि म्हणे की मी नंतर अजून छान ऊन पडलं की जाईन..

मग आम्ही(मी, काका, माझी मुलगी आणि माझा नवरा ) बाहेर पडलो.. आई आणि पप्पा घरीच थांबले..
१० मिनिटांनी आईचा फोन आला की तुम्ही सगळे परत येता का घरी, पप्पाना दम लागतोय आणि श्वास घ्यायला त्रास होतोय.. आम्ही सुदैवाने जास्त दूर गेलोच नव्हतो. लगेच घरी पोहोचलो. तर ते फक्त ब्रिदिंगचा त्रास होतोय, बाकी कुठेच काही दुखत नाहीये, असं सांगत होते.. आम्ही लगेच अॅम्बुलंसला फोन केला.. ४ मिनीटांत अॅम्बुलंस आली, त्यांनी लगेच ऑक्सिजन मास्क लावला, ईसीजी काढला, शुगर टेस्ट केली.. त्याच्या मतानुसार ईसीजी नॉर्मल नव्हता आणि शुगर खूप वाढली होती.. इनिशिअल ट्रिटमेंट तरी अगदी त्वरीत मिळाली होती. लगेच अँब्युलंसमधुनच त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केलं.

तरी पप्पा म्हणत होते की, मला फक्त ब्रिदिंगचा त्रास होतोय, तुम्ही इतकं सगळं का करताय..?
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथली जी ट्रिट्मेंट होती(शुगर लेव्हल कमी करणे, पेनकिलर देणे, बिपी सतत चेक करणे, ब्रिदिंगसाठी सपोर्ट सिस्टिम देणे, ब्लडटेस्ट करणे) ती पटापट होत होती...

नर्सशी, डाँशी, आमच्याशी पप्पा ५ -६ तास व्यवस्थित बोलत होते (ऑक्सिजन मास्क लावला होताच).
जेव्हा आम्ही पाचही जण(मी, नवरा, आई, काका, माझी मुलगी) त्यांच्याबेड जवळ होतो आणि डॉ त्यांना तपासत होते, आणि प्रश्न विचारत होते.. तेंव्हा पप्पा त्यांना व्यवस्थित उत्तरे देते होते. जेंव्हा Dr. बोलले की "hold my finger", तेव्हा मात्र he couldn't do it and we saw him collapsing.. त्यांना जबरदस्त हार्ट अटॅक आला होता.. चेहर्‍यावर मात्र काहीच वेदना नव्हत्या..

मग मात्र डॉनी आम्हाला फटाफट बाहेर काढलं, लगेच रिव्हाइव्ह प्रोसेस सुरू केली. हार्टबिट्स सुरु केले, सपोर्ट सिस्टिम वाढवली..
थोड्या वेळाने त्यांना Critical Care Unit मध्ये शिफ्ट केले.

आमची परिस्थिती मात्र खूप वाईट होती.. हात-पाय गळाले होते, काय करावं, काही सुचत नव्हतं...
पण तेव्हा आम्हाला आईला सांभाळणे आणि तिला धीर देणे, पॉसिटिव्ह थिंकींग करणे, हे जास्त महत्वाचं होतं..
ठीक आहे, हार्ट अ‍ॅटॅक आला आहे, डॉ आहेत, आपण हॉस्पिटलमध्येच आहोत, सगळी ट्रिटमेंट वेळेवर मिळत आहे.. ह्यातून नक्की पप्पा बाहेर येतील, असा दिलासा तिला आणि आम्हाला आम्हीच देत होतो..

भारतात दादाला आणि ताईला फोन करून कल्पना दिली, आणि काळजी करू नका, फक्त प्रार्थना करा, हेच सांगितलं.. त्यांना आमची जास्त काळजी वाटत होती...

ती रात्र आणि सोमवारचा पूर्ण दिवस नर्स आणि डॉ सगळे झटत होते.. सतत cardiologist च्या संपर्कात होते.. त्यांचं तेच म्हणणं होतं की, पप्पा जरा स्टेबल झाले की, पुढची योग्य ती ट्रिटमेंट देता येईल.. कदाचित पेस मेकर बसवावे लागेल, ह्यांची त्यांनी आम्हाला कल्पना देऊन ठेवली होती.. तेव्हा बर्‍यापैकी होप्स होत्या..
पण मंगळवारी पहाटेपासून परत हार्टबिट्स विक होत गेल्या.. आम्ही पुढचे ४-५ तास त्यांच्या बेडजवळून हाललोच नाही. आई त्यांचा हातात हात घेऊन बसली होती.. मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होते आणि सतत मॉनिटरवर लक्ष ठेवत होते. आम्ही सगळे जण त्यांचे बिपी, हार्टबिट्स कमी कमी होतांना पाहत होतो, पण मिरॅक्युलस काही घडत नव्हतं, आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी त्यांना सकाळी ७:३०च्या आसपास आम्हाला एकटे टाकून जातांना असहाय्य होऊन पाहत बसलो..

सगळं व्यवस्थित, सुरळीत चालू असतांना, असं होऊच कसं शकतं, ह्यावर विश्वासच बसत नव्हता..
वाटत होतं की, हे जे काही होतंय, ते सगळं खोटं असावं, कुणीतरी चिमटा काढून हे सगळं एक वाईट स्वप्न आहे, असं सांगावं, असं ओरडून ओरडून सांगावसं वाटत होतं.. जेंव्हा जाण झाली की, हे खरंच घडले आहे, आणि आपल्याला आता रिअॅलिटी फेस करावीच लागणार आहे.. तेव्हा मग सगळं दु:ख बाजूला ठेवून, उसनं अवसान आणुन पुढची भारतात न्यायची प्रोसेस फॉलो करायला सुरुवात केली..

आईचं दु:ख तर आमच्यापेक्षा जास्त होतं!

मला आणि माझ्या नवर्‍याला ह्याचंच दु:ख होत होतं की, उगीच इथे लंडनला बोलावलं का? त्यामुळेच त्रास झाला का? नसते आले तर हे काही घडलचं नसतं का.. ?
तेव्हा आईने आम्हा दोघांना दम दिला की, खबरदार, असा विचार केलात तर.. होणारी गोष्ट कुठेही होते.. आणि मृत्युचे स्थळ, काळ हे आधीच ठरलेलेच असते.. उलट ही जी ट्रिट्मेंट त्यांना मिळाली ती कदाचित मिळाली नसती... इतकी वेळेवर ट्रिटमेंट, ICU मध्ये सतत आपल्याला जाऊ देणं, शेवटपर्यंत त्यांना बघायला मिळणं, हे कदाचित दुसरीकडे शक्य नसतं झालं..

ही तिची वाक्यं होती.. कुठून तिला इतकी शक्ती आली काय माहित.. ?

पुढचे ३-४ तास हॉस्पीटलमध्येच होतो. तिथुन पायच निघत नव्हता, पण काय करणार... घरी आलो.. सगळे मित्र सोबत घरी आले... ह्या सगळया मित्र-मैत्रिणींची खूप मोलाची मदत झाली.. पुढचे ३-४ दिवस रोज सकाळ, संध्याकाळ डब्बा येत होता, चहा येत होता.. आम्ही नीट खात आहोत की नाही हे पाहुन, मागचं सगळं आवरून, परत आळी-पाळीने सतत आईसोबत राहत होत्या, तिला बोलतं करत होत्या…. मित्र सतत माझ्या नवर्‍यासोबत होते.. बर्‍याच ठिकाणी certificates मिळवायच्या दृष्टीने (जिथे आमची गरज नव्हती) तिथे तेच जात होते.. ३-४ दिवस घर भरलं होतं, त्यामुळे आईला आणि काकाला पण जरा बरं वाटतं होतं..

हॉस्पीटलमधून घरी आल्यावर लगेच Asian Funeral company फायनल केली. त्यांच्याशी बोलून त्यांना बाकीचे ट्रॅव्हल लॉजिस्टिक फायनल करायला सांगितले.. त्यांना हॉस्पिटलमधुन पप्पांना शिफ्ट करून त्यांच्या शितपेटी स्टोरेजमध्ये ठेवायचे असते, आणि कार्गोला सांगून फ्लाईट बुकींग करायचे असते.. आणि अ‍ॅक्चुअल जायच्या दिवशी कार्गोकडे कॉफिन ट्रांसफर होते. mean while ती कार्गो कंपनी आपण ज्या फ्लाईटमधुन जाणार, त्या फ्लाईटमध्येच पप्पांचे बुकींग करते, आणि त्याच फ्लाईटमध्ये लोड करते. (म्हणजे आम्ही तशी अटच घातली होती की, आम्हाला सर्वांना एकाच विमानात जायचे म्हणुन.) पण जोपर्यंत त्यांना Coroners Certificate मिळत नाही तोपर्यंत ते कॉफिन हॉस्पिटलमधून नाही नेऊ शकत. आम्हाला डेथ सर्टिफिकेट, EMBALMING CERTIFICATE, HEALTH N.O.C. (called as Free From Infection Certificate), Passport Cancelled, N.O.C FROM INDIAN EMBASSY, Coroners Certificate हे सगळे सर्टिफिकेट्स पाहिजे होते..

खरतर ही प्रोसेस ८-१० दिवसांची आहे.. आणि आम्हाला तसेच सांगण्यात पण आले होते.. पण माहित नाही कसे काय.. कदाचित पप्पांचेच आशिर्वाद होते आमच्यापाठीशी म्हणून की काय, लिटलरी ३ दिवसात सगळी कामं झालीत.. बाकी सगळे सर्टिफिकेट्स १-२ दिवसातच मिळालेत. दुसर्‍या दिवशी माझा काका आणि दोन मित्र Indian Embassy मध्ये जाऊन तिथलीही कामे (passport cancellation आणि NOC) लवकर केलीत.
इकडे Coroners Certificate घेण्यासाठी माझा नवरा आणि अजून एक मित्र गेला.. Coroners Certificate जे मिळायला २-३ दिवस लागतात, तेसुद्धा आम्हाला २ तासांत मिळाले (overseas case म्हणुन). [माझ्या नवर्‍याने त्या ऑफिसरला सगळी इमोशनल सिच्युएशन सांगितली, आम्हाला घाई का आहे, हे समजाऊन सांगितले. आपले रिती-रिवाज थोड्क्यात सांगितले. भारतामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारे जवळपास ५०० लोक त्यांची आतूरतेने वाट पाहत आहेत, हे सांगितले, ते ऐकून त्याच्यापण डोळ्यांत पाणी आलं, असं नवरा म्हणाला]... त्याने ते Certificate दिले आणि सांगितले की, तुम्हाला दुपारी ४ वाजायच्या आत mortuaryच्या ठिकाणी जाऊन हे Certificate द्यावे लागणार.. तुम्ही Funeral companyच्या कुणाला तरी तिथे त्याच वेळेला बोलवा, म्हणजे त्यांना लगेच तिथुन कॉफिन शिफ्ट करायला बरं पडेल, नाहीतर हे काम परत उद्यावर जाईल.. तेंव्हा दुपारचे २:३० वाजले होते.. हे ऑफिस घरापासुन ४०-५० मिनीटांवर आहे. नवर्‍याने फोन करून मला सांगितले की, काही पेपर्स घेऊन घराच्या खाली ये. आम्ही खालच्या खालूनच जातो.. mortuaryला जाताना थोडी traffic लागली.. जेव्हा हॉस्पिटल(mortuary हॉस्पिटलचाच भाग होता) अगदी समोर दिसत होतं, पण गाडी काही हलत नव्हती, तेव्हा माझ्या नवर्‍याने सरळ त्याच्या मित्राला गाडी थांबवायला सांगितली, आणि त्याने अक्षरश: पळत पळत जाऊन mortuaryचं ऑफिस गाठलं, तेव्हा जस्ट ३:५७ झाले होते आणि सुदैवाने Funeral companyचा माणूसपण तिथे आला होता..

तिकडे भारतातून दादा, भाऊजी, माझे एक मामा ह्यांनी एअरलाईनवाल्यांशी बोलून कुठले ऑप्शन्स रिलाएबल आहेत, हे सगळं पटापट ठरवलं.. त्याबद्दल सतत फोन चालू होते.. शेवटी Jet ने लंडन-मुंबई, मुंबई-औरंगाबाद असं जायचं ठरलं.. Jetच्या सिनिअर ऑफिसरचाच फोन आला, आणि त्यांनी प्रॉमिस केले की, तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही, ह्याची खात्री देतो.. ईंटरनॅशनल-डोमेस्टिक ट्रान्सफर व्यवस्थित होईल..

असे मंगळवार ते गुरुवार हे दिवस लॉजिस्टिक ठरविण्यात, सतत फोन घेण्यात-करण्यात गेले, आईला आधार देतच होतो...

भारतात तर आमच्या जवळच्या नातेवाईकांची तर खूप घालमेल चालू होती.. त्यांना आमची, आणि विशेष करून आईची, खूप काळजी वाटत होती.. त्यांनाही फोनवर काय काय म्हणुन सांगणार.. आणि आमचे ह्या प्रोसेसच्या संदर्भात रिलेटेड बाकी लोकांशी सतत फोन चालू होते.. त्यांचे फोन ठेवले की, दादा-ताईला फोन करा आणि त्यांना अपडेट्स द्या, हेच चालू होते.. दादा, वहिनी, ताईचे सतत फोन येत होते.. त्यांना आईशी खूप बोलावंसं वाटत होतं..

माझा नवरा तर सतत फोन आणि लॅपटॉपला चिकटून होता.. त्याचे आणि दादाचे खरंच कौतुक वाटत होतं.. अश्या परिस्थितीसुध्दा दोघे प्रचंड दु:खात असूनही अगदी शांतपणे, आणि सगळी will-power लाऊन ही प्रोसिजर लवकरात लवकर कशी होईल, हे पाहत होते...

शेवटी, माझी आईच माझ्या नवर्‍याला म्हणाली की, आता काही वेळ कुठलाही फोन घेऊ नका, फोन करू नका, आणि थोडा आराम करा..

गुरूवारी संध्याकाळी ५: ३०च्या आसपास जेव्हा funeral care, कार्गो ह्यांनी ट्रांसफरचे confirm केले, कार्गोने जेटचे बुकींग confirm केले, आणि भारतातून जेटने domestic transferचे confirm केले, तेव्हा जरा रिलॅक्स झालो... विमान सकाळी ९चे होते, त्यामुळे funeral care आणि कार्गोला सांगून ठेवले होते की, Coffin जेव्हा तुम्ही airportवर घेऊन याल, तेव्हा प्लिज फोन करा.. कितीही वाजले असतील तरीही.. त्यांचा आम्हाला पहाटे ३च्या आसपास फोन आला त्याप्रमाणे... सकाळी एअरपोर्टला पोहचल्यावर परत सगळी खात्री करून घेतली. शुक्रवारी सकाळी आम्ही इथुन निघून रात्री मुंबईला पोहोचलो...

Jet च्या क्रुने जरी वारंवार आम्हाला दिलासा दिला, तरी जोपर्यंत औरंगाबादला पोहचून पप्पांना नीट पाहत नाही, तोपर्यंत मनात फार धाकधुक आणि प्रचंड टेंशन होतं.. कॉफिन कसं असेल, कसं ठेवलं असेल, ३-४ दिवस झाले होते, त्यामूळे अजुनच धास्ती होती, जी की ना नीट बोलू शकत होतो, ना दाखवू शकत होतो एकमेकांना...

मुंबईच्या एअरपोर्टवर पोहचल्यावर आणि दादा-ताई दिसल्यावर, मग मात्र मी स्वतःला कन्ट्रोल नाही करू शकले... सगळं आतापर्यंत दाबलेलं बाहेर आलं.. खुपदा सॉरी म्हणाले.. पण ते म्हणाले की, वेडाबाई, जे तुम्हा दोघांनी केलं, ते कदाचित आम्ही इथे पण करू शकलो नसतो...

औरंगाबादच्या कनेक्टिंग फ्लाईटला थोडा वेळ होता, तोपर्यंत दादा, माझा नवरा आणि भाऊजींनी ईंटर्नल ट्रांसफरची खात्री करून घेतली... आणि आम्ही सर्वजण असे हताश मनाने पप्पांना घेऊन औरंगाबादला आलो...

एकाच आठवड्यापूर्वी सगळ्यांना हसत हसत भेटून, बाय करून, लंडनला लेकीकडे जातो असे म्हणून गेलेले पपा असे परत येतील, असं स्वप्नांत तरी कुणाला वाटलं असेल का??

महालक्ष्मीला दादा-वहिनींची भेट झाली, मुंबईला ताईची भेट झाली, मागच्या महिन्यात १-२ घरगुती प्रोग्राम्समुळे काकांकडचे सगळे, मामांकडचे सगळे ह्यांच्या भेटी झाल्या होत्या.. आम्हीच काय ते भेटायचे राहिलो होतो, त्यामुळे फक्त ते आम्हा तिघांना भेटायला इथे आले, आमच्यासोबत काय तो एक-दिड दिवस आनंदात घालवला असेल, ह्याच शेवटच्या सुंदर आठवणी आहेत आता...

तश्या तर अनंत सुंदर आठवणी आहेत......

अत्यंत प्रेमळ, सदैव हसतमुख, कामाच्या बाबतीत नेहमीच प्रामाणिक आणि तत्पर, शांत-समाधानी-सात्विक-सज्जन, कधीही कुणावर न रागावणारे , कुणाला दुखावणे- नावं ठेवणे- कुणाचा तिरस्कार करणे तर अत्यंत दुरची गोष्ट, सगळ्यांचे कोड-कौतुक करणे, प्रोत्साहन देणे, प्रत्येक नातेवाईकाचे जन्मदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा देणे (शक्य असेल तेंव्हा स्वतः पर्सनली त्या व्यक्तीकडे जाऊन ग्रिटिंग-बुके देणे), स्वत:च्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेणे, कुणावर अवलंबून न रहाता स्वतःची कामे स्वतः करणे.. ह्यापैकी एखादा-दुसरा किंवा यातले बरेच काही गुण प्रत्येकांमध्ये असतातच, पण हे सगळेच्या सगळेच गुण त्यांच्यात ठासून भरलेले, आणि एकदा सुद्धा अपवाद म्हणुन ( or for a change) ह्या गुणांना फारकत न देऊन वागणारे व्यक्तिमत्व हे निराळेच.
त्यांच्यामधले काही गुण अंगिकारायचे ठरवले तरीसुद्धा त्याचे पालन रोजच्या रोज करणे खरंच कठीण आहे, आणि पप्पा मात्र हे सहज अंमलात आणत होते आणि तसे वागत होते.. ते ही कुठलाही बडेजाव न करता..

जसे शांतपणे ते जीवन जगले, तसेच शांतपणे अलगद निघून गेले...

त्यांच्या इतकं समॄध्द आयुष्य जगता यावं, हेच आता मागणं आहे..

हे सगळं खूप साठलं होतं.. म्हणुन इथे लिहिलं... सॉरी, तुमच्यासमोर मन मोकळं करतीये.. .
I know.. emotional झाल्यामुळे खूप विस्कळीत लिहिलं असेल...

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle