कलेचा वारसा

काही व्यक्ती जन्माला आल्यापासूनच कलेच्या सानिध्यात वाढतात आणि त्या कला त्यांच्या संस्काराचा एक भाग बनून त्यांचे जीवन कलात्मक बनवतात. थोडक्यात आईवडिलांच्या किंवा जवळील व्यक्तींच्या कलेचा वारसा ह्या व्यक्तींना मिळालेला असतो. मग ही कला आधुनिक युगात नवीन नवीन कल्पनांद्वारे दोन पावले पुढे बहरत जाते. शिवाय ह्या कला जोपासताना अजून अनेक जोडकला हौशीने अंगिकारल्या जातात. पुण्याच्या सौ. आरती खोपकर ह्यांच्यातही अशाच काही कलांचा संगम आहे आज त्यांची आपण ओळख करून घेऊ.

वडील श्री. सुरेश चित्रे हे बँक ऑफ बडोदा मध्ये काम करत असताना चित्रे कुटुंब आपल्या चार मुलींसह गुजरात, कोल्हापूर, इचलकरंजी, पेण शहरांत वास्तव्य होऊन अखेर १९७५ साली पुण्यात स्थायिक झाले. आरतीचे वडील सुंदर चित्रे काढायचे तर आईला भरतकाम, विणकामाचा छंद होता. आरतीमध्ये त्या दोघांचेही गुण उतरून आरतीही सुंदर चित्रे काढत होती व आईच्या हाताखाली भरतकाम-विणकाम सुबक रितीने शिकत होती. आरतीला शिक्षणाची आवड होतीच. इतिहास हा विषय आवडीचा असल्याने त्यांनी इतिहास विषय घेऊन एम.ए. ची पदवी मिळवली. एम. ए झाल्यावर लगेच १९८७ साली आरती टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. हा ग्रॅज्युएशन कोर्स डिस्टन्स लर्निंग म्हणजेच दूरस्थ पद्धतीने शिकवला जातो. त्यासाठी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी लेक्चर्स द्यायला जावे लागे. तसेच या कोर्स साठी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक महाराष्ट्राचा/जगाच्या इतिहासावर अनेक पुस्तके तिने लिहिली. विद्यार्थ्यांसाठी निघत असणार्‍या नियतकालिकांमधूनही तिचे लेखन प्रकाशित होऊ लागले. १९९० साली कु. आरती सौ. आरती चारुहास खोपकर झाल्या. त्यानंतर त्यांना निखिल ह्या त्यांच्या गोंडस मुलामुळे आई ही पदवी मिळून मातृत्वाचा आनंद बहाल झाला. आता घरातील जबाबदारी ही सौ. आरतीसाठी महत्त्वाची होती. निखिलच शिक्षण चालू झाले. कालांतराने काही घरगुती अडचणींमुळे प्रोफेशनला महत्त्व न देता आपल्या संसारासाठी सौ. आरती यांनी १६ वर्षे चालू असलेल्या आपल्या नोकरीचा त्याग केला.

केलेल्या नोकरीच्या त्यागाबद्दल सौ. आरती यांना काहीच दु:ख नव्हते कारण त्यांच्यातील इतर कलांना आता वाव मिळणार होता तेही त्यांच्या हक्काच्या घरी, आपल्याच माणसांत राहून. पाककलेचीही आवड असलेल्या आरती उत्तम स्वयंपाक करतात. घरच्या जबाबदार्‍या पार पाडून सौ. आरती यांना जो वेळ मिळायचा त्यात त्यांचे विणकाम, चित्रकला सारखे आईवडीलांकडून वारसा मिळालेले छंद चालू झाले. काही वर्षांनी सांसारिक जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर इतिहासाच्या पुस्तकांचे अ‍ॅनिमेशन करायची सौ. आरती यांना कल्पना सुचली व त्यासाठी त्यांनी अ‍ॅनिमेशनचा कोर्स चालू केला. ह्या कोर्स मुळे सौ. आरती यांना कॉम्प्युटरची माहिती झाली. ह्या माहितीचा उपयोग त्यांना पुढील कारकिर्दीत भरपूर झाला. नवरा कामावर व निखिल शाळेत गेल्यावर सौ. आरती यांना आता जास्त वेळ मिळू लागला मग त्या वेळेचा सदुपयोग करत आरती यांनी नेट सर्चिंग चालू केले. त्यात मायबोली डॉट कॉमवर त्यांनी सभासदत्व घेऊन लेखन चालू केले. या लेखनासाठी त्यांनी "अवल" टोपण नाव घेतले. त्यातच त्यांना जंगल सफरीची अत्यंत आवड आहे. फोटोग्राफीचीही आवड आपसूकच त्यांच्यात आली. त्यांनी काढलेले फोटो इतरांना आवडू लागले. जंगल सफरीतील अनुभवावर त्यांनी बांधवगड हे पुस्तक प्रकाशीत केले व हे पुस्तक खूप चर्चिले गेले. मायबोलीच्या सदस्यांकडून त्यांच्या प्रत्येक कलेला प्रोत्साहन मिळाल्याने त्यांच्या लेखनात, इतर कालांमध्ये अधिक प्रगती होत गेली व मित्रपरिवार वाढला. त्यांनी आता विविध ब्लॉग लिहिणेही चालू केले. त्यात त्यांच्या लेखनाचा, केलेल्या कलाकुसरींचा, कवितांचा व स्वयंपाकाचा असे अनेक ब्लॉग त्यांनी चालू केले. सौ. आरती आता आपल्या भरतकाम, विणकामाच्या कलाकुसर शेयर करू लागल्याने त्यांच्या अनेक मैत्रिणींनी विणकाम शिकवण्याचा आग्रह केला. पुण्यात रहाणार्‍या मैत्रिणींना तर त्या घरी बोलवून शिकवतात पण मायबोली वरील लांब शहरात, परदेशात असणार्‍या मैत्रिणींना कसे शिकवता येईल हा विचार करताना सौ. आरती यांना ब्लॉग द्वारे ऑनलाईन शिकवण्याची कल्पना सुचली व आपण केलेल्या अ‍ॅनिमेशनच्या कोर्सचा त्यांना आता उपयोग झाला. त्यांनीwww.shikashikava.blogspot.com नावाचा ब्लॉग चालू केला. शिकाशिकवा ह्या नावातही त्यांना सुचवायचे आहे की स्वतः शिका आणि इतरांनाही शिकवून ह्या कलेचा आनंद दुसर्‍यांना द्या. ह्यात भरतकाम, दोन सुयांचे विणकाम व क्रोशे विणकामाची अगदी बेसिक माहिती व्हिडिओ व फोटो सकट लिहायला चालू केली. अनेक प्रकारचे विणकामाचे नमुने विणण्याचे मार्गदर्शन ह्यात केले आहे. ज्या मैत्रिणी विणकाम शिवण्यासाठी उत्सुक होत्या त्यांच्याकडून दक्षिणारुपात किरकोळ रक्कम घेऊन त्यांनी अनेक स्त्रियांना ऑनलाईन मार्गदर्शन करून कलेत निपुण केले आहे. हे शिकवताना लिहिलेल्या ब्लॉग बरोबर त्या व्यक्तीशी फोनवर किंवा वॉट्स अ‍ॅपवर संवाद साधून त्यांच्या शंकांचं अगदी सुलभ शब्दात निरसन करण्याच कौशल्य सौ. आरतीमध्ये असल्याने शिकणार्‍यांनाही पूर्ण समाधान मिळत असते. छोट्याश्या पर्स पासून ते मोठ्या स्वेटरपर्यंत कोणतेही विणकाम आरती हौशीने आपल्या मैत्रिणींना शिकवतात. त्यांचा सगळ्यात मिळून मिसळून राहण्याचा, स्पष्ट, केवळ कलाकुसरीतच नाही तर आयुष्यातील इतर गोष्टींसाठी दुसर्‍यांना नेहमी मदत करण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या अनेक मैत्रिणींना आरती आपली जीवलग मैत्रीण वाटते. अशा ह्या मैत्रिणीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle