एक "अनुभव "असा ही !

अगदी कालच घडलेला हा अनुभव! आपण ठरवतो काय आणि होते काय ,त्याचा हा एक किस्सा! मी एका पर्यावरण विषयक एन जी ओ बरोबर थोडे फार काम करते. म्हणजे भाषांतर करून देते. एखाद्या विषयावर लिहून द्यायला सांगितले तर लिहूनही देते. ही संस्था समाजातील सर्व स्तरांमध्ये पर्यावरण जागृतीचे कार्य करते.टाटा पॉवर कडून या संस्थेला चेंबूर च्या पाड्यात जाऊन तेथील महिलांना घरातील वापरलेल्या / जुन्या कपड्यातून पर्स/पिशव्या/बॅग्ज बनवायला शिकवणे हा विषय मिळाला. त्यासाठी एनजीओ ने माझा होकार गृहीत धरून मला न विचारता होकार देऊन टाकला. त्यावर मी त्यांना म्हटले की बाजारात इतक्या स्वस्त आणि मस्त पर्सेस मिळतात कि वापरलेल्या/टाकाऊ कापडातून कोणीही इतकी मेहनत घेऊन शिकणार नाहीच आणि दोन तासाच्या प्रत्येकी एक सेशन मध्ये -- मी मान मोडून बॅग शिवते आहे आणि या बायका गप्पा मारत आहेंत हे च चित्र डोळ्यासमोर दिसते आहे. त्याशिवाय बॅगा /पर्सेस/पिशव्या शिवणे हे काम माझी नाही. पण मी या महिलांना जुन्या टाकाऊ कपड्यांचा पुनर्वापर कसा करू शकता ते व्यवस्थित साग्र -संगीत सांगते. जेणें करुन या महिलांना एक नवी दृष्टी मिळेल. आणि ह्या उपक्रमा द्वारे त्या सर्व बायकांशी प्रत्यक्ष संवाद चर्चा करुन योग्य परिणाम साधता येतील. माझा हा विचार एनजीओ द्वारे टाटा पॉवर ला पटला स्वीकृती मिळाली.

आता माझे त्या दृष्टीने काम चालू झाले. एकूण तीन पाड्यातल्या महिलांचे तीन सेशन करायचे ठरले. त्याचबरोबर माझ्याबरोबर ही वेळोवेळी सूचनांचे आदानप्रदान चालू झाले. प्रत्येकी दोन तास वेळ नक्की झाला. मी एन जी ओ ला , साहित्य, आकृति, मराठी भाषेत स्टेप- बाय-स्टेप कृती लिहिलेले कागदआणि मी तयार केलेल्या वस्तुंचे फोटो व्हॉट्स अ‍ॅप वर मेल केले.उपस्थित महिलांना देण्यासाठी , त्याच्या प्रतिलिपी एन जी ओ ने काढल्या.पाड्यातल्या सगळ्या महिला शिक्षित असतील असे नाही असेही मला सांगितले होते. त्यासाठी मी रंगीत पेपर शीट्स वर मार्कर पेन च्या साहाय्याने हुबेहूब दिसतील अशा आकृती तयार केल्या तसेच काही जुन्या आणि नव्या कपड्यातून उपयोगी वस्तू तयार केल्या आणि तोंडी बोलायचे “ भाषण “ ही. त्यातून मी त्यांना उपयोग सुचवणार होते. त्या वस्तू करून नेणार नव्हते.या उपक्रमासाठी मी वापरलेले कुडते, टी शर्ट्स, शर्ट, जीन्स पँट्स, चादरी, जुन्या पण टिकाऊ साड्या, फ्रॉक्स, आलेले अन नको असलेले ब्लाऊज पीस, चादरी, पडदे असे साधे-साधे पर्याय विचारात घेतले. या महिलांना एक दृष्टी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करायचा होता अर्थात “ फल कि चिंता ना करो अपना कार्य करो “ हे लक्षात ठेवून.

टाटा पॉवर चा पर्स/पिशव्यांचा आग्रह होता म्हणून मी दोन लहान पर्स, कुडत्यातून एप्रन,साडीच्या पदरातून आणि जुन्या शर्ट मधून हँगर वर लावायचे साडी कव्हर, सलवार सूट शिवून उरलेल्या कापडातून मशीन चे कव्हर, नारायण पेठ साडी चे काठ जोडून एक लहान गालिचा , जरी काठी साडी बॉर्डर मधून टेबल रनर आणि तीन साड्यांची गोदडी ,केस धुतल्यावर डोक्याला बांधायचे टर्बन ,टी शर्ट -जीन्स पॅंट चे उपयोग , मिक्सर कव्हर ,आसन असे काही प्रकार तयार केले. शनिवारी दुपारीं दोन वाजता एक सेशन आणि रविवारी दुपारी दोन सेशन ठरले. मी एक एअरबॅग माझी आणि दुसरी बॅग डेमो ची अशा दोन लहान एअरबॅग केल्या. सकाळी ९.०० ची शिवनेरी ठरली , ती १ वाजेपर्यंत चेंबूर मैत्री पार्क ला पोहोचेल आणि तिथून मला योग्य ठिकाणी घेऊन जायला एन जी व चे दोघे जण येतील असे ठरले.

मी ८.३० ला स्टॉप वर पोहोचले पण ९,१०,११ ची बस कॅन्सल झाली कारण “माहीत नाही” इतकेच कळले आणि शेवटी ११.१५ ला एक शिवनेरी आम्हा ९.०० च्या प्रवाशांना घेऊन निघाली. पण २.१५ ला मैत्री पार्क ला पोहोचली. मला घ्यायला येणाऱयांची गाडी वाटेत बिघडल्याने दुसरी गाडी करून यायला १. १५ तास लागला तोवर मी बाकड्यावर बसून जाणारा-येणारा ट्रॅफिक आणि वरून जाणारी विमाने बघत टाईमपास करत बसले होते.कारण नेमकी जागा मॅडम तुम्हाला कळणार नाही तेव्हा आम्ही तुम्हाला घ्यायला येतो हे उत्तर मिळाले होते. शेवटी एकदाचे मोबाईल च्या कृपेने एकमेकांना भेटलो--कारण एकमेकांशी बोललो होतो पण प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं ना !

पाड्यावर एक तास उशीराने येतो हे कळवले होतेच. शेवटी ३ ३० वाजता सेशन ला सुरुवात झाली या सेशनच्या बायका मुस्लिम, हिंदी, साऊथ च्या होत्या त्यामुळे हिंदीत बोलायचे ठरले .पण एन जी ओ वाल्यानी मला मराठीतून कृती लिहून आणायला सांगितले होते.आणि बायका तर हिंदी समजणाऱ्या ..शेवटी त्यांना सांगितले हे मी तुम्हाला समजावून सांगते आणि कागदातील आकृतीत तुम्हाला बाण आणि बिंदू च्या सहाय्या ने योग्य कृती कळेलच.असो तर मी केलेल्या सर्व वस्तू,कल्पना,खू प आवडल्या. काहींनी पुन्हा नीट समजून घेतल्या . आमच्यातल्या काही जणी पैसे मिळतात म्हणून ” चुनाव प्रचार” ला गेल्या आहेत आणि काही तुमची वाट पाहून परत गेल्या. तर तुम्ही पुन्हा एकदा नक्की या. तुमच्यासाठी खालून गरम चाय -भजीया मागवू का ?वगैरे बोलल्या.एनजीओ सदस्यांनाही विनंती केली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो.

चेंबूरला “ कामत महाराजा“ मध्ये थोडी पोटपूजा, कॉफी आणि आमच्या मुख्य एनजीओ प्रमुखांशी मिटींग झाली [प्रमुख दुसऱ्या एका प्रोजेक्ट संबंधी मिटींग ला गेले होते. त्यामुळे कामत ला भेटायचे ठरले होते.] दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी २ चे सेशन असल्याने माझ्याजवळ रिकामा वेळ होता म्हंणून मी बोरिवली जायचे ठरवले. माझ्यासाठी माझ्या बरोबर असलेली प्रियांका ठाण्याहून नेरुळ ला तिच्या घरी जाणार होती व पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर रहाणार होती त्यामुळे माझी डेमो ची एअर बॅग तिने तिच्याबरोबर नेण्याचे आणि दुसऱ्या दिवशी येताना आणायची असे ठरले. माझे दोन एअरबॅग चे ओझे कमी करण्यासाठी असे म्हटले होते. माझ्यासाठी उबर टॅक्सी मागवली आणि मी बोरिवली साठी निघाले. प्रियांकाची टॅक्सीने ठाणे आणि पुढे लोकल ने नेरुळ ला जाणार होती. मी दीड तासाने घरी पोहोचले.गप्पा गोष्टी करुवून ११ ला झोपायला जाणार इतक्यात एनजीओ प्रमुख चा मला फोन आला कि प्रियांका ठाणे लोकलमध्ये, मोटरमन नंतर च्या लेडीज डब्यात शिरली. गर्दी भरपूर होती. गाडी सुरु झाली आणि वेग पकडला. पहिलाच डबा असल्याने प्लॅटफॉर्म लगेच मागे पडला. रेल्वे ट्रॅक चालू झाला. प्रियांका स्थिर होऊन दारा जवळून आत सरकायचा प्रयत्न करीत होती. दाराकडच्या एका हाताने बॅग धरली होती बॅग जड नव्हती .इतक्यात त्या बॅग धरलेल्या हाताला गाडीच्या बाहेरुन एक जबरदस्त झटका बसला आणि तिच्या हातातून बॅग सुटली आणि रेल्वे ट्रॅक वर पडली.हे सर्व क्षणभरात घडले. प्रियांका एकदम फ्रीज्ड झाली. पण लगेच पुढच्या उरण स्टेशनला उतरली रिक्षा घेऊन ठाणे स्टेशन ला आली .वाटेत ठाण्याला राहाणाऱ्या अद्वैत नावाच्या एनजीओ कलीग ला हकीकत सांगून स्टेशन यायला सांगितले. आणि या दोघांनी रेल्वे ट्रक वर रात्रीच्या अंधारात बॅग शोधायचा” प्रयत्न” केला अद्वैतने. ठाणे पोलीस स्टेशन ला कम्प्लेंट दिली. आणि एनजीओ प्रमुख मॅडम ला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मॅडम ने दोघांनाही रेल्वे ट्रेक वर अंधारात बॅग शोधायला गेल्याबद्दल रागावले कारण ट्रॅक वर गाड्यांची ये-जा चालू असते ना ! प्रियांकाला खूप समजावले पण ती एकसारखी रडत होती.शेवटी पुढच्या लोकल ने प्रियांकाला तिच्या घरी अद्वैत सोडून आला.आता मॅडम ने मला फोन केला आणि सर्व सांगितले. प्रियांका एकटीच राहाते. त्यामुळे तिला मी फोन करून धीर दिला झाल्या प्रकारात तिची ही चूक नव्हती. आता बॅग तर परत मिळणार नव्हती.आतापर्यंत रात्रीचे १२ वाजले होते.आणि माझी झोप उडाली मला दुपारच्या सेशन चा डेमो कसा द्यायचा काही सुचेना. कारण माझ्या जवळ कागद, वस्तू, फाईल्स काहीही नव्हते. खूप दडपण आले. शेवटी ठरवले कि सकाळी न्यूज- पेपर कटींग करायचे बहुतेक डिंक आणि मार्कर पेन चालू स्थितीत घरात असतील आणि ते होते. पहाटे तीन नंतर हवेतल्या गारव्याने मला थोडीशी झोप लागली.

सकाळी उठल्यावर पेपर कापायला सुरुवात केली. मार्कर पेन ने खूणा केल्या आणि मोठ्या आकाराचे नमुने तयार केले. १० वाजेपर्यंत माझ्या भावाने स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत पेपर आणून दिले आणि मी शक्य तितके नमूने ११.३० वाजेपर्यंत तयार केले त्याच बरोब ब्रंच करून जाण्यासाठी तयार झाले .११. ४५ वाजता निघण्यासाठी गाडी बुक केली होती. रविवार, तीन मेगाब्लॉक आणि “ चुनाव प्रचार “ मुळे रस्त्यावर गर्दी ची शक्यता होतीच. दोन तासाने मी व माझ्या मागोमाग प्रियांकाची टीम पोहोचली. मी प्रियंकाला तिच्या मोबाईल वर पाठवलेल्याआकृती व कृती लिहिलेल्या कागदांचे प्रिंट आऊट प्रियांकाने काढून घेतले होते. ते ह्या दोन्ही सेशन च्या बायकांना दिले आणि तिच्या लॅप टॉप वर मी तिला पाठवलेले, तयार वस्तूंचे फोटो डाउनलोड केले. इथेही मिक्स क्राउड होता त्यामुळे दोन्ही भाषेत सांगितले. आता जास्तीत जास्त भर बोलण्यावर च द्यायचा होता आणि पेपर कटींग दाखवून प्रत्यक्ष इमेज ची कल्पना त्यांना करवून द्यायची होती.वर्तमान पत्राचे मोठे कटींग्ज आणि रंगीत पेपर चे कटींग्ज हाताळायला दिले त्यामुळे तयार वस्तूच्या इमेजची कल्पना सेशनच्या सर्व बायकाना करता आली. इथे बरेच प्रश्न विचारले गेले आणि सेशनच्या शेवटी प्रियंकाने लेप टॉप वर ओरिजिनल वस्तू कशा दिसतात ते दाखवले. आणि घडलेला प्रकार सांगितला. आता माझे दडपण ही नाहीसे झाले होते. एकूण हा इव्हेन्ट सक्सेसफुल रित्या पार पडला आणि मी ठरल्या वेळी परतीच्या प्रवासाला निघाले.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle