जुन्या आठवणींना उजाळा - चंद्रभागेत पाणी सोडलय, बरं!

माबोवरचे माझे काही जुने ललित इकडे आणते आहे. हे त्यातले एक.

घरासमोरचा रस्ता ओलांडला की भलंमोठं पार्क आहे, त्युर्केनशान्झपार्क(Türkenschanzpark). ह्या पार्कमध्ये जायला जवळ जवळ १४-१५ प्रवेशद्वार आहेत. त्यातलं एक नेमकं आमच्याच घरासमोर. रस्ता ओलांडला की तुम्ही पार्कात. कदाचित म्हणुनच माझे पार्कमध्ये जाणे नियमित. ह्या पार्कमध्ये चालणे, पळणे नेहमीचेच. आलेल्या पाहुण्यांना शतपावली करायला घेऊन जायचे आमचे आवडीचे ठिकाण!

तर ह्याच पार्कमध्ये ७-८ तळे आहेत. त्यातले एक, माझ्या खास आवडीचे. भारतातून परत आल्यापासून माझा बराच वेळ मी ईथे घालवलाय. हे खास आवडायचे कारण म्हणजे ज्या दिवशी सुर्यनारायणाची कृपा असते तेव्हा ईथल्या बाकड्यांवर कायम ऊन असते. इकडून तिकडून सावली येईन म्हणून बाकडं बदलत बसायला लागत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ सतत ऊन असतं ईथे.
काल जरा कामानिमित्त बाहेर पडत असतानाच घरातल्या खिडकीतून ऊन चमकलं. चला म्हणजे फार वेळ नाहीपण जरातरी माझ्या बाकड्यावर बसता येईन. फार वेळ बसता येणार नसल्याने पुस्तक न घेताचा तिकडून तिकडेच निघायच्या तयारीने निघाले. ऊन आहेच तर अंगातल्या स्वेटरचा एक थर कमी करुन पिशवीत घेतला. बर्‍याचदा घरातून छान वाटणारे हे ऊन फसवे असते. ऊन आहे म्हणून नेमकेच तुम्ही घराबाहेर स्वेटरशिवाय पडता आणि कुडकूडत परत येता. असो!

परवा दिवसभर घरीच नसल्याने काल न चुकता थोडेच का होईना मी तळ्याकाठी जरा टेकावे म्हणून मोर्चा पार्कमधून वळवला. ह्या तळ्याचे आणि माझे एक वेगळेच नाते तयार झालेय. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यातले पाणी उपसून टाकणे, कोरडे झाल्यावर त्यातला जुना झालेला, ठिकठिकाणी जिर्ण झालेला पानकागद काढून टाकणे, झाडझूड करणे, तळ्यातल्याच छोट्या कृत्रिम बेटावरच्या झाडांचा विस्तार कमी करणे, नको असलेली झाडे काढणे, नव्याने पानकागद आंथरुण त्याच्या कडा सिमेंटने बंद करणे त्यावर तळयाचा काठ तयार करणे, काठाच्या आतल्या बाजुला वाळुच्या भरलेल्या पिशव्या, दगडगोटे वापरुन त्यांचे थर रचणे, तळ्याच्या बाहेरुन मातीची भर घालून त्यावर गवत लावणे अशा कितीतरी कामांची मी साक्षीदार आहे.

ह्याच कालावधीत तयार झालेले माझ्या आवडत्या बाकड्याचे, तिथेच बसून वाचलेल्या समिधा, जगाच्या पाठिवर, विनोबांची गीता प्रवचने, समिधा वाचताना साधनाताईंशी, आमटे कुटुंबियांशी तयार झालेल्या अनामिक नात्याचे, साधनाताईंशी एकटिनेच केलेल्या संवादांचे, तासंतास बसून अंगावर घेतलेल्या उन्हाचे एक वेगळेच असे विश्व.
तिथे पोहचल्यावर एक वेगळेपण वाटलं. दररोजचं तेच ते परिचयाचं आज जरा बदललय हे जाणवलं. माझं आवडतं बाकडं रिकामंही होतं आणि होतं त्याच जागेवर. ऊन पण फसवं नव्हतं पण तळ्यातल्या बेटावर काही नविन ओंडके विसावले होते. तळ्याला छानसं लाकडी दोन अडीच फुट उंचीचं कुंपण लागलं होतं. तळ्यात पाणी भरलं होतं आणि त्यात बदकांचा जलविहार सुरू होता.

पुस्तक आणलं असतं तर बरं झालं असतं, जरा जास्त वेळ बसले असते. एकाअर्थी पुस्तक नाही आणलं तेही बरच केलं, जरा नविन तळ्याचे नविन रुप तरी पहाता येईल. बदकं त्यांच्याच नादात खेळत होती. काल परवा कुठे बरं असतील ही? आपली जागा बदलली आहे हे जाणवत असेल यांना? सगळ्यांची आधीची ओळ्ख असेल का? कालच पहिल्यांदा भेटले असतिल तर जुने मित्र, जुनी जागा आठवुन रडत असतिल का? मला पडतायेत ही सगळी प्रश्न यांना पडली असतिल का?

बेटापासुन तळ्याच्या मध्यावर यायचे, तिथून परत फिरायचे. मध्येच एखादे बदक पाण्यात सुळकी मारुन दुसरीकडून वर यायचे. मध्येच त्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु व्हायचा, त्यांच्याच नादात दंग होती. पाच एक मिनिटांनी माझ्या लक्षात आले की हे तर बेटावरुन पाण्यात उतरू पहाणार्‍या कावळ्यांना खुन्नस देत होते. पाण्यात जलविहार करुन, नाना जलक्रिडा करुन त्यांना हिणवत होती कि बघा आम्हाला तुमच्यासारखी पाण्यात डुबण्याची बिलकूल भिती वाटत नाही! तुम्ही काय फक्त पायभर पाण्यात उतरुन त्यातच समाधान मानायचे! आणखी असेच काहिसे...

कावळ्यांना ह्या हिणवण्याचा काही फरक पडलेला दिसत नव्हता. ते त्यांच्या नादात थोड्याशा पाण्यात उतरून एक डुबकी मारत. पंखांनी, मानेने अंगावर पाणी घेत परत डुबकी मारत की बेटावरच्या एखाद्या शिळेवर किंवा ओंडक्यावर स्थानापन्न होतं. त्यांच्यातल्या एका कावळ्याचे मन काही केल्या भरत नव्हते. तो पाण्यात यायचा, अंगावर पाणी घ्यायचा. पायाने, मानेने खालीवर करुन, चोचीने अंग चोळायचा, एक डुबकी मारुन त्याच्या ठरलेल्या शिळेवर बसायचा. परत पाण्यात येऊन होता तोच क्रम चालू ठेवायचा. ६-७ वेळा तरी तो पाण्यात उतरला असेन. ज्या दगडावर तो बसला होता एव्हाना त्याची आंघोळ झाली होती.

एक सांगु? मला ह्या कावळ्यात आणि चंद्रभागेत डुबकी मारणारा पांडुरंगभक्त ह्यात काहीच फरक जाणवत नव्हता. चंद्रभागेतिरी जाऊन परत परत शेवटची एक डुबकी मारून येतो म्हणणार्‍या भक्तांची कमी नाही. आमच्यासोबत पंढरपूरला आलेल्या हिराताई त्यातल्याच एक. त्यांना तर एवढ्या लांब येऊन पांडुरंगाचे दर्शन होणार नाही असे सांगत अक्षरशः बाहेर ओढून काढावे लागले होते.
कावळ्याने न्हाऊ घातलेली शिळासुद्धा मला चंद्रभागेतटीची वाटत होती. ती कावळ्याचे हजारदा आभार मानत म्हणत होती, "चंद्रभागेतटी आयुष्यभर राहून कोरडी राहिलेली मी, मला तू आज गंगास्नान करवलस. औक्षवंत भव!"

चंद्रभागेत गुडघाभर पाण्यात उभी असून कोरडी असणारी मी आज ह्या तळ्याकाठीसुद्धा कोरडीच राहिले.

पहिले कावळे जाऊन दुसरे स्नानासाठी आले होते. पहिल्यांनी त्यांना जाता जाता सांगितले असावं आज चंद्रभागेत पाणी सोडलय, बरं!
आणि एवढावेळ वेळेचे भानच विसरून गेलेली मी घड्याळाकडे बघत ठरेलेली कामं मार्गी लावयला उठले.
.......................................................................................................................

pond

pond

pond

chandrabhaga

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle